एमआयटीत ४थ्या आंतरराष्ट्रीय कायदा आणि शांतता परिसंवादाचे उद्घाटन
पुणे .- यश मिळविण्यासाठी जिद्द, समर्पण, कठोर परिश्रम आणि वचनबद्धता हे महत्वाची आहे. असे उद्गार मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती जी. ए. सानप यांनी काढले. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ लॉ च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ४थ्या आंतरराष्ट्रीय कायदा आणि शांतता या परिसंवादाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या वेळी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅड. संग्राम देसाई, नामांकित विधिज्ञ अॅड. सुधाकर आव्हाड हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड उपस्थित होते.
अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
तसेच कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस व स्कूल ऑफ लॉ च्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. पौर्णिमा इनामदार उपस्थित होते.
‘शांततेसाठी कायद्याची दिशा’ ह्या विषयावर दोन दिवसीय परिसंवादात कायदा समाजातील सौहार्द आणि जागतिक शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी कसा प्रभावी साधन ठरू शकतो हे या परिसंवादाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
जी. ए. सानप म्हणाले, यश मिळवायचे असेल तर कष्ट, जिद्द, समर्पण यावर भर दिला पाहिजे. माझ्या पालकांपासूनच मी कष्टाचे महत्त्व शिकलो. कष्टामुळे मी जीवनात यशस्वी झालो. यश मिळवण्यासाठी समर्पण आणि वचनबद्धता हे अत्यंत महत्वाचे आहे.
अॅड. सुधाकर आव्हाड म्हणाले “जगात बऱ्याच ठिकाणी अशांतता आणि संघर्ष चालू आहे, अशा परिस्थितीत कायद्याचे शांततेसाठी एक साधन म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. कायदा एक चौकट तयार करतो, ज्याद्वारे समाज आपले विवाद सोडवू शकतात, मानवाधिकारांचे रक्षण करू शकतात आणि न्याय प्रस्थापित करू शकतात. शांतता म्हणजे केवळ संघर्षाचा अभाव नाही, तर न्याय, समानता आणि मानवी प्रतिष्ठेचा आदर असावा लागतो. कायद्याचे शासन हे सुनिश्चित करते की कोणीही कायद्यापासून वर नसतो आणि सर्व व्यक्तींना समान वागणूक दिली जाते. हा सिद्धांत समाजात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कायदा हा संघर्षांचे निराकरण करण्याची आणि अधिकारांचे रक्षण करण्याची चौकट प्रदान करतो, जे सामाजिक स्थैर्य राखण्यासाठी आवश्यक आहे. व्यक्तींना त्यांच्या अधिकारांमध्ये सुरक्षिततेची भावना वाटणे आणि त्यांना न्याय मिळेल याची खात्री असणे अशी वातावरणाची निर्मिती कायद्याचे शासन करते ही सुरक्षा म्हणजे शांततेचा पाया.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले “आजच्या जगात कायदा शांततेच्या स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. जशी कायदे समाजाला संरचना देतात, तसेच आध्यात्मिक तत्त्वे शरीर, मन, आत्मा आणि जीवनाला प्रोत्साहन देतात. ही तत्त्वे योग्य दिशा देतात, ज्यामुळे व्यक्तीला वैयक्तिक शांतता मिळते आणि ती शांतता सामाजिक आणि जागतिक शांततेला प्रोत्साहन देते.”
अॅड. संग्राम देसाई म्हणाले, “आपण वकील म्हणून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शांततेचे प्रचारक म्हणून महत्त्वपूर्ण भागीदार आहोत. भारतीय घटनेने दिलेल्या अधिकार आणि कर्तव्यांची जनजागृती करून कोणी पीडित झाले असेल तर कायद्याने दिलेल्या न्याय प्राप्त करण्याच्या प्रक्रिये बद्दल माहिती देऊ शकतात व समाजात शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल.”
राहुल कराड यांनी शिक्षणाच्या महत्त्वावर MIT-WPU च्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले, “एमआयटी डब्ल्यूपीयूच्या उद्देश मुळात शिक्षणाच्या माध्यमातून पात्र आणि सक्षम व्यक्ती तयार करणे हा आहे, जे देशातील समस्यांचे निराकरण करू शकतात.”
डाॅ. आर.एम.चिटणीस यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.