Home Blog Page 564

विधान परिषदेच्या आणखी सहा जागा रिक्त:पुण्यातील कोणाकोणाची होणार नियुक्ती

या सहा जागा होणार रिक्त

कामठी- चंद्रशेखर बावनकुळे भाजप
जत – गोपीचंद पडळकर भाजप
लातूर ग्रामीण – रमेश कराड भाजप
नागपूर मध्य – प्रवीण दटके भाजप
अक्कलकुवा – आमश्या पाडवी शिवसेना
पाथरी – राजेश विटेकर राकाँपा

पुणे- महायुतीकडून ऑक्टोबर महिन्यात १२ पैकी ७ जणांची राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि पोहरादेवी येथील धर्मगुरू बाबूसिंग महाराज राठोड यांना संधी देण्यात आली. त्याचबरोबर शिंदे गटाच्या कोट्यातून माजी खासदार हेमंत पाटील आणि प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे तर अजित पवार गटाकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नाईकवडी यांची वर्णी लावण्यात आली आहे.तेव्हा ५ जागा भरण्यात आल्या नाहीत त्या अजूनही रिक्तच आहेत . त्यानंतर आता पुन्हा आणखी सहा जागा रिक्त होत आहेत . या जागांवर सहा जणांना विधान परिषदेवर पाठवण्यात येणार आहे.यामध्ये आता एकूण रिक्त जागांमध्ये पुण्यातील कोणाकोणाची नियुक्ती होणार आहे याकडे लक्ष लागले असून दीपक मानकर, श्रीनाथ भिमाले यांच्यासह ,माजी खासदार संजय काकडे यांच्या सहमतीने एखाद्याला आमदारकी देण्याची अपेक्षा पुण्यातून केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मुरलीधर मोहोळ यांना सर्वाधिक मते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मिळवून दिली त्यानंतर आता कसब्याचा बालेकिल्ला देखील पुन्हा हस्तगत करून देण्यात मानकर यांचा सिंहाचा वाटा मानला जातो. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी संजय काकडे यांच्या निवास स्थानी जाऊन भेट देऊन चर्चा केली होती . तर वडगाव शेरीचे माजी आमदार मुळीक यांनाही आश्वासन दिले होते .

विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. या निकालानंतर विधान परिषदेवर असलेल्या सहा आमदारांचाही विजय झाला आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या सहा जागा रिक्त झाल्या आहेत. विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या सहा जागांवर नाराजांना संधी मिळणार आहे. त्यामुळे आता महायुतीतील सहा जणांना विधान परिषदेची लॉटरी लागणार असून, सत्ता स्थापनेनंतर विधान परिषदेवर वर्णी लागण्यासाठी नेत्यांमध्ये लॉबिंग होण्याची शक्यता आहे.

भाजपने चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रवीण दटके या विधान परिषदेतील ४ आमदारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. हे चारही आमदार विधानसभेवर निवडून आले आहेत. भाजपच्या कोट्यातील चार जागा रिक्त झाल्या आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेकडून आमश्या पाडवी यांची ही विधानसभेवर वर्णी लागली आहे. त्यामुळे शिवसेनेची विधान परिषदेतील एक जागा रिक्त झाली आहे. तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार राजेश विटेकर हे देखील विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाची जागा रिक्त झाली आहे.

विधानसभेत लाडक्या बहिणींची संख्या घटली, गेल्यावेळी होत्या २७ आता असतील २१ – विरोधी पक्षात तर एकच महिला आमदार

0


मुंबई-एकीकडे लाडक्या बहिणींनी आपल्या लाडक्या भावांना भरभरून मतदान केले असले तरी त्या स्वतः मात्र सत्तेपासून अलिप्त राहिल्याचे चित्र दिसून आले आहे महायुतीच्या विजयामध्ये लाडकी बहीण योजनेचा खूप मोठा वाटा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दुसरीकडे विधानसभेतील महिला आमदारांचे प्रमाण घटले आहे. यंदाच्या निवडणुकीत २१ महिला निवडून आल्या आहेत. यामध्ये १० विद्यमान महिला आमदारांचा समावेश आहे. २८८ सदस्यांच्या मागील विधानसभेत २७ महिला आमदार म्हणजेच फक्त ९.५ टक्के महिला आमदार होत्या. या वेळी २१ महिला उमेदवार जिंकल्याने ही टक्केवारी ७.५ टक्क्यांवर आली आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षातील काँग्रेसच्या ज्योती गायकवाड या एकमेव महिला आमदार आहेत.यंदा विधानसभेच्या निवडणुकीत ४ हजार १३६ उमेदवार रिंगणात होते. त्यात पुरुष उमेदवारांची संख्या ३७७१, तर महिला उमेदवारांची संख्या ३६३ होती. निवडणुकीत तब्बल ३ कोटी ३ लाख महिलांनी मतदानात सहभाग घेतला. निवडणुकीच्या निकालानंतर २२ महिला आमदार विजयी झाल्या आहेत. त्यामध्ये निवडणुकीत १२ विद्यमान महिला आमदांरापैकी १० महिला पुन्हा निवडून आल्या आहेत, तर काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि गीता जैन या दोन महिला आमदारांचा पराभव झाला आहे. नव्या पंधराव्या विधानसभेत १२ नवीन महिला असणार आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि उद्धव ठाकरे गटातून एकही महिला आमदार विजयी झालेल्या नाहीत.

यंदाच्या निवडणुकीत भाजपने १८, शिंदे शिवसेनेकडून ८, अजित पवारच्या राष्ट्रवादीने ४ अशा ३१ महिलांना उमेदवारी दिली होती. त्यामध्ये १२ विद्यमान आमदारांचा समावेश होता. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ११, काँग्रेसने ९, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने १० अशा महाविकास आघाडीने ३० महिलांना संधी दिली होती. त्यामध्ये २ विद्यमान आमदार होत्या. म्हणजेच महायुती व मविआच्या ६० आमदारांमध्ये १२ विद्यमान आमदारांचा समावेश होता. तसेच इतर अपक्ष महिला उमेदवार रिंगणात उतरल्या होत्या. २०१९ मध्ये भाजपने १२ महिला उमेदवारांना संधी दिली होती.

या आहेत राज्यातील नवीन २१ महिला आमदार

भाजप

श्वेता महाले (चिखली)
मेघना बोर्डीकार (जिंतूर)
देवयानी फरांदे (नाशिक मध्य)
सीमा हिरे (नाशिक पश्चिम)
मंदा म्हात्रे (बेलापूर)
मनीषा चौधरी (दहिसर)
विद्या ठाकूर (गोरेगाव)
माधुरी मिसाळ (पर्वती)
मोनिका राजळे (शेवगाव)
नमिता मुंदडा (केज)
श्रीजया चव्हाण (भोकर)
सुलभा गायकवाड (कल्याण पूर्व)
स्नेहा पंडित (वसई)
अनुराधा चव्हाण (फुलंब्री)
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार

सुलभा खोडके (अमरावती)
सरोज अहिरे (देवळाली)
अदिती तटकरे (श्रीवर्धन)
ज्योती गायकवाड (धारावी)
सना मलिक (अनुशक्तीनगर)
शिवसेना शिंदे गट

मंजुळा गावित (साक्री)
संजना जाधव (कन्नड)
भाजपच्या ४ नवीन महिला आमदार
श्रीजया चव्हाण (भोकर), सुलभा गायकवाड (कल्याण पूर्व), स्नेहा पंडित (वसई), अनुराधा चव्हाण (फुलंब्री) भाजप, शिवसेनेच्या मंजुळा गावित (साक्री )आणि संजना जाधव (कन्नड) या दोन महिला विजयी झाल्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर सुलभा खोडके (अमरावती), सरोज अहिरे (देवळाली), सना मलिक (अनुशक्तीनगर) आणि अदिती तटकरे (श्रीवर्धन) या महिला विजयी झाल्या आहेत.


व्यावसायिक संधींचा शोधक नजरेने वेध घ्यावा : डॉ. संजय रुणवाल

जितो, पुणे चॅप्टरच्या वतीने बी टू बी उपक्रमाअंतर्गत संवादात्मक व्याख्यानाचे आयोजन
पुणे : व्यवसायाची धोरणे आखताना अंधानुकरण टाळावे, सुयोग्य प्रणालीचा वापर करावा, बदल स्वीकारण्याची तयारी ठेवावी, नवनवीन व्यावसायिक संधींचा शोधक नजरेने वेध घ्यावा, दूरदृष्टी असावी, व्यवसायाचे उत्तम ज्ञान प्राप्त करावे, ध्येय निश्चित करावे, नितीमूल्ये सांभाळावीत, अशा मौलिक सूचना व्यवसाय रणनीतिकार, मानवशास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षक, वक्ता आणि लेखक डॉ. संजय रुणवाल यांनी केल्या. अनुकरण, नाविन्य या व्यतिरिक्त युवा पिढीने व्यवसाय वृद्धीसाठी नाविन्यपूर्ण अनुकरणाची कास धरावी अशी अभ्यासपूर्ण मांडणीही त्यांनी उलगडून दाखविली.
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) पुणे विभागाच्या वतीने बी टू बी या उपक्रमाअंतर्गत डॉ. संजय रुणवाल यांचे ‌‘व्यवसाय सुरळीतपणे कसा चालवावा‌’ या विषयावर महावीर प्रतिष्ठान, सॅलिसबरी पार्क येथे संवादात्मक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. चेअरमन इंद्रकुमार छाजेड, चिफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल, जयेश फुलपगर, अमोल कुचेरिया, आनंद चोरडिया, संजय राठोड, वनिता मेहता, राहुल मुथा, सुमित जैन आदींच्या उपस्थितीत डॉ. रुणवाल यांचा जितो पुणे चॅप्टरच्या वतीने सुरुवातीस सन्मान करण्यात आला.
पारंपरिक पद्धतीने सुरू असलेल्या छोट्या व्यावसायिकांची परिस्थिती आज काय आहे या विषयी भाष्य करताना डॉ. रुणवाल म्हणाले, शहरांचे विस्तारिकरण होत असतानाच लघु व्यावसायिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्याच बरोबरीने ऑनलाईन व्यवसायाने आपले जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. अशा परिस्थितीत व्यवसायातील नफ्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. काळाची पावले ओळखून परंपरागत व्यवसाय पुढे नेत असताना युवा पिढीच्या कल्पनांना वाव देत, त्यांच्यावर विश्वास ठेवत जुन्या पिढीतील व्यावसायिकांनी बदल घडविण्याची मानसिकता स्वीकारली पाहिजे. व्यवसायात सतत बदल न करता आपण करत असलेला व्यवसाय कुठल्या उंचीपर्यंत नेऊ शकतो याची दूरदृष्टी विकसित करणे त्याच्या जोडीला धोरणात्मक व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे.
धोरणात्मक विचार, धोरणात्मक नेतृत्व, स्पर्धात्मक धोरण, धोरणात्मक अंमलबजावणी आणि धोरणात्मक व्यावसायिक जोखीम घेण्याची तयारी, या मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर मांडणी केली. व्यवसायात यश प्राप्त करण्यासाठी आपल्यातील क्षमता ओळखा, नवनवीन संधींचा अभ्यास करा, त्याच प्रमाणे आपल्यातील कमतरता आणि व्यवसायातील जोखीम याचा विचार होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविकात चेअरमन इंद्रकुमार छाजेड म्हणाले, देशाच्या प्रगतीत व्यावसासियांचा मोठा वाटा आहे. बदलत्या काळानुसार व्यावसायिकांनाही आपल्या धोरणांमध्ये योग्य ते बदल करणे आवश्यक असते. त्या अनुषंगाने डॉ. संजय रुणवाल यांचे संवादात्मक व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
डॉ. रुणवाल यांचा परिचय जयेश फुलपगर यांनी करून दिला तर सूत्रसंचालन अमोल कुचेरिया यांनी केले. दिनेश ओसवाल यांनी जितो चॅप्टरच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती सांगितली.

राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनने (NCH) ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी 1000 हून अधिक कंपन्यांसोबत केली भागीदारी

0

हेल्पलाइनमध्ये परिवर्तनशील बदल आणि तांत्रिक श्रेणीत सुधारणा यामुळे कॉल हँडलिंग सुविधेत होत आहे उल्लेखनीय वाढ

मुंबई-

एका महत्त्वपूर्ण घडामोडीनुसार, राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन (NCH) ने तक्रारींचे जलद गतीने निराकरण करण्यासाठी आपल्या अभिसरण कार्यक्रमांतर्गत 1000 हून अधिक कंपन्यांशी भागीदारी केली आहे. या कंपन्या ई-कॉमर्स, प्रवास आणि पर्यटन, खाजगी शिक्षण, FMCG, ग्राहकोपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक उत्पादने, किरकोळ वस्तू विक्री दुकाने, वाहन उद्योग, डी टी एच आणि केबल सेवा तसेच बँकिंग यासह प्रमुख क्षेत्रांच्या माध्यमातून हे उद्योग कार्यरत आहेत. या अभिसरण कंपन्यांशी संबंधित तक्रारी ऑनलाइन निराकरणासाठी थेट त्यांच्याकडे हस्तांतरित केल्या जातात.

अभिसरण भागीदारांच्या संख्येत 2017 मधील 263 कंपन्यांवरून आतापर्यंत 1009 कंपन्यांपर्यंत वाढ झाली आहे. हेल्पलाइनची कार्यक्षमता वाढवण्यात, तक्रारींचे जलद आणि प्रभावी निवारण आणि पारदर्शकता तसेच जबाबदारीला प्रोत्साहन देण्यासाठी या भागीदारांची भूमिका या वाढीच्या माध्यमातून स्पष्ट होते. ग्राहकांचा अधिक विश्वास वाढीला लागण्याच्या उद्देशाने ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण  दावा दाखल होण्याच्या आधीच्या टप्प्यातच केले केले जाईल हे भागीदार सुनिश्चित करतात. मात्र, एखाद्या तक्रारीचे निराकरण न झाल्यास, ग्राहक संरक्षण कायदा, 2019 अंतर्गत ग्राहकांना योग्य ग्राहक आयोगाकडे जाण्यास प्रोत्साहित केले जाते.

भारत सरकारचा ग्राहक व्यवहार विभाग (DoCA), तक्रार निवारण प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी प्राप्त झालेल्या तक्रारींच्या संकलित माहितीचे नियमितपणे निरीक्षण करतो. चालू आर्थिक वर्षात (2024-25) सर्वाधिक तक्रारी प्राप्त केलेल्या सर्वोच्च दहा अभिसरण मुक्त कंपन्यांबाबत माहिती नुकतीच विभागाने जाणून घेतली आहे. या कंपन्यांमध्ये डेल्हीवरी लिमिटेड, इलेक्ट्रोनिक्स कॉम्प डॉट कॉम, डॉमिनोज पिझ्झा, हेयर अप्लायन्सेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, फर्स्टक्राय डॉट कॉम, थॉमसन इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा रॅपिडो ओरिएंट इलेक्ट्रिक लिमिटेड आणि सिंफनी लिमिटेड या कंपन्यांसोबत चर्चा करण्यासाठी आणि चालू असलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तसेच अभिसरण भागीदार म्हणून त्यांना सामोर आणण्यासाठी.येत्या आठवड्यात  एक बैठक नियोजित आहे.

NCH च्या तांत्रिक परिवर्तनामुळे त्याच्या कॉल-हँडलिंग क्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे. NCH द्वारे प्राप्त झालेल्या कॉल्सची संख्या जानेवारी 2015 मधील 14,795 कॉल्सवरून जानेवारी 2024 मध्ये 1,41,817 कॉल्सवर म्हणजे जवळपास दहापट वाढली आहे. ही उल्लेखनीय वाढ ग्राहकांचा त्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी हेल्पलाइन वापरण्याबाबत वाढत असलेला आत्मविश्वास प्रतिबिंबित करते. दरमहा नोंदवलेल्या तक्रारींची सरासरी संख्या 2017 मधील 37,062 वरून 2024 मध्ये 1,12,468 वर पोहोचली आहे. ग्राहक तक्रार निवारण प्रणाली अधिक विकसित करण्यासाठी `एनसीएच` आपल्या `एनसीएच 2.0` उपक्रमांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता – एआय-आधारित भाषण ओळख प्रणाली, भाषांतर प्रणाली, आणि बहुभाषिक `चॅटबॉट` सादर करण्याच्या प्रक्रियेत आहे. या तांत्रिक सुधारणा तक्रार नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ, कार्यक्षम, आणि सर्वसमावेशक बनवण्याच्या उद्देशाने केल्या जात आहेत.

एआय-सक्षम भाषण ओळख आणि भाषांतर प्रणाली ग्राहकांना त्यांच्या स्थानिक भाषांमध्ये आवाजाद्वारे तक्रारी नोंदवण्याची सुविधा देईल. याद्वारे यातील हस्तक्षेप कमी होईल. बहुभाषिक `चॅटबॉट` तक्रार निवारण प्रक्रिया अधिक सुव्यवस्थित करेल, प्रत्यक्ष वेळेत सहाय्य पुरवेल,  माहिती नोंदणीतील त्रुटी कमी करेल, आणि ग्राहकांच्या एकूण अनुभवात सुधारणा करेल.

या सुधारणा सर्व भाषिक पार्श्वभूमी असलेल्या ग्राहकांना तक्रार निवारण प्रणालीत समान प्रवेश सुनिश्चित करतील. ग्राहक व्यवहार विभाग तक्रार निवारण प्रक्रियेला त्रासमुक्त, जलद, आणि कमी खर्चिक बनवण्यासाठी कटिबद्ध आहे. एनसीएच 2.0 अंतर्गत निर्मितीक्षम एआय, भाषण ओळख, भाषांतर, आणि `चॅटबॉट` तंत्रज्ञानाचा समावेश, न्यायालयात तक्रार दाखल करण्यापूर्वीच्या टप्प्यात ग्राहक संरक्षण सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असेल.

ग्राहक तक्रारींसाठी राष्ट्रीय ग्राहक मदत वाहिनीची (एनसीएच) पुनर्रचना करण्यात आली आहे. यामुळे देशभरातील ग्राहकांसाठी न्यायालयात तक्रार दाखल करण्यापूर्वीच्या टप्प्यात तक्रार निवारणासाठी एक मुख्य प्रवेशबिंदू उपलब्ध झाला आहे. ही मदत वाहिनी 17 भाषांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये मराठीसह हिंदी, इंग्रजी, काश्मीरी, पंजाबी, नेपाळी, गुजराती, कन्नड, तेलगू, तमिळ, मल्याळम, मैथिली, संथाली, बंगाली, ओडिया, आसामी आणि मणिपुरी या भाषांचा समावेश आहे. ग्राहक 1915  या खुल्या क्रमांकावर तक्रारी नोंदवू शकतात.

तक्रारींना एकात्मिक तक्रार निवारण प्रणाली(आयएनजीआरएएम) पोर्टलद्वारेही नोंदवता येते. यात व्हॉट्सअ‍ॅप, एसएमएस, ईमेल, एनसीएच अ‍ॅप, वेब पोर्टल आणि उमंग अ‍ॅप यांसारख्या विविध चॅनेलद्वारे तक्रारी नोंदवण्याची सुविधा आहे.

तक्रारी प्राप्त झाल्यावर `एनसीएच` निवारणासाठी त्यांना संबंधित कंपनी, नियामक संस्था, किंवा शासकीय विभागांकडे पाठवते.

***

लष्कर दिन संचलन 2025 ची एक झलक: 55 व्या इफ्फीमध्ये प्रोमोचे अनावरण


पुणे शहराकडे प्रथमच प्रतिष्ठित लष्कर दिन संचलनाचे यजमानपद

#IFFIWood, 24 नोव्‍हेंबर 2024

पुणे, आपल्या समृद्ध लष्करी वारशासाठी प्रसिद्ध असलेले शहर, 15 जानेवारी 2025 रोजी प्रथमच प्रतिष्ठित लष्कर दिन संचलनाचे यजमानपद सांभाळण्यास सज्ज झाले आहे. पुण्याच्या लष्करी इतिहासातील हा एक मैलाचा दगड ठरणार आहे. 

भारतीय लष्कराने सध्या सुरू असलेल्या गोव्यातील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (इफ्फी) दरम्यान या आगामी संचलनासाठी प्रमोशनल व्हिडिओचे अनावरण आज केले.  याला सिनेफिल्स, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि उद्योग जगतातील नेत्यांकडून उत्साही प्रतिसाद मिळाला.

भारतीय लष्कराचे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ म्हणून फील्ड मार्शल के.एम. करिअप्पा यांची 1949 मध्ये झालेली नियुक्ती, जे भारताच्या स्वातंत्र्योत्तर लष्करी नेतृत्वाचे प्रतीक आहे, याच्या स्मरणार्थ हे लष्कर दिन संचलन आयोजित केले जाते. पारंपरिकरीत्या दिल्लीमध्ये होणारे हे संचलन 2023 पासून वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरण्यास आरंभ झाला , सुरुवात बेंगळुरूपासून झाली, त्यानंतर 2024 मध्ये लखनौमध्ये आयोजन झाले. 2025 च्या संचलनासाठी झालेली पुण्याची निवड. या शहराचे सशस्त्र दलांशी असलेले ऐतिहासिक संबंध आणि भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडचे मुख्यालय म्हणून असलेली भूमिका अधोरेखित करते.  

या वर्षीचे संचलन बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुप आणि सेंटर येथे होणार आहे, ज्यामध्ये मार्चिंग दल, यांत्रिक स्तंभ आणि तांत्रिक प्रदर्शने असतील. ड्रोन आणि रोबोटिक्स सारख्या अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकांसह, लढाऊ प्रात्यक्षिके आणि मार्शल आर्ट्स डिस्प्ले यासारख्या आकर्षक कामगिरीचा समावेश यावर यात भर असेल. 

संचलनाच्या आधी, जानेवारीच्या सुरुवातीला पुणे येथे आयोजित “तुमच्या सैन्याला जाणून घ्या” या प्रदर्शनासारख्या कार्यक्रमांमुळे नागरिकांना प्रगत शस्त्रास्त्रांचे अवलोकन करता येईल आणि देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांशी संवाद साधता येईल. असे उपक्रम सर्वसमावेशकता आणि एकतेवर भर देतात, ज्यामुळे लष्कर दिन संचलन हा केवळ एक औपचारिक प्रसंग न राहता धैर्य, समर्पण आणि तांत्रिक प्रगतीचा राष्ट्रीय उत्सव बनतो.

विविध शहरांमध्ये लष्कर दिन संचलन फिरल्याने भारतीय सैन्याचे देशभरातील नागरिकांशी असलेले संबंध अधिक दृढ होतात. हा उपक्रम उत्सवाचे विकेंद्रीकरण करतो, स्थानिक समुदायांना थेट सशस्त्र दलांशी संलग्न होण्याची संधी प्रदान करतो.

एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावे – दीपक केसरकर:म्हणाले- ही निवडणूक शिंदेंच्याच नेतृत्वात पार पडली, कौलही चांगला मिळाला

मुंबई–महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेचे जनमत दिले आहे. त्यानंतर राज्यात मुख्यमंत्री पदी कोण विराजमान होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच एकनाथ शिंदे यांच्याकडूनही अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मिळावे, यासाठी मागणी केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. अशातच आता यावर शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनीही यावर आता दुसऱ्यांदा भाष्य केले आहे.केसरकर म्हणाले की, ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढवली गेली आहे. या निवडणुकीत जनतेनेही चांगला कौल दिलेला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने आम्ही नेहमीच विचार करतो की, एकनाथ शिंदे यांना प्रथम प्राधान्य द्यायला हवे. तसेच, आम्ही एकनाथ शिंदे यांच्यावर जेवढे प्रेम करतो, तेवढेच प्रेम आणि विश्वास आमचा देवेंद्र फडणवीस यांच्यावरही असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांची जोडी आहे. हे बघा, या जोडीने काय चमत्कार करून दाखवला. अजितदादा हे नंतर सहभागी झाले. त्यामुळे अजितदादांनाही याचे क्रेडिट आहे. पण हे दोघे पहिल्यापासूनच सोबत चालत आहेत. ही जोडी कायम राहील आणि त्यांना देवाचाही आशीर्वाद आहे.

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार:1 CM, 2 DCM फॉर्म्युला; उद्या शपथविधी शक्य

पुणे-महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यात युतीचे सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा फॉर्म्युला ठरला आहे. त्याचवेळी महायुतीच्या पक्षांमध्ये प्रत्येक 6-7 आमदारांमागे एक मंत्रीपदाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. त्यानुसार भाजपचे 22-24, शिंदे गटाचे 10-12 आणि अजित गटाचे 8-10 आमदार मंत्री होऊ शकतात.महायुतीकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही.विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपत आहे, त्यामुळे त्यापूर्वी सरकार स्थापन करावे लागेल. तसे न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल. मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर उद्या मुंबईतील राजभवनात शपथविधी सोहळा होऊ शकतो. सीएम शिंदे यांनी विजयानंतर सांगितले होते की, ज्याच्या जास्त जागा असतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार हे निवडणुकीपूर्वी ठरले नव्हते.देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार रविवारी रात्री सरकारचा चेहरा अर्थात मुख्यमंत्र्यांचे नाव ठरवण्यासाठी दिल्लीला रवाना होतील. भाजप हायकमांडसोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.

या निवडणुकीत सहा मोठ्या पक्षांच्या दोन आघाड्यांमध्ये लढत होती. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांचा समावेश आहे, तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांचा समावेश आहे.149 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या भाजपने सर्वाधिक 132 जागा जिंकल्या आहेत. युतीने 288 पैकी विक्रमी 230 जागा जिंकल्या. भाजपचा स्ट्राइक रेट 88% होता. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला (MVA) 46 जागा मिळाल्या.

अनिकेत पटवर्धन यांनी विजयाचे शिल्पकार, समर्थ नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार

फडणवीस यांनीही महायुती समन्वयक म्हणून अनिकेतचेही केले अभिनंदन

मुख्यमंत्री पदासाठी दिल्या शुभेच्छा

रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाचे युवा नेते आणि कोकणातील महायुतीचे समन्वयक अनिकेत पटवर्धन यांनी भाजप नेते देवेंद्रजी फडणवीस यांची सागर बंगला येथे भेट घेतली. महायुतीच्या विजयाबद्दल आभार मानले आणि अभिनंदन करून मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्रजीना शुभेच्छा दिल्या.

रत्नागिरीतील युवा नेते तसेच मंत्री रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक असलेले अनिकेत पटवर्धन यांनी आज श्री. फडणवीस यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीत राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने 233 जागा जिंकून प्रचंड यश मिळवले. या यशाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे आज त्यांची भेट घेतली.

अनिकेत पटवर्धन यांनी पडद्याआड राहून सूत्रे हलवली. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, भिवंडी जिल्ह्याचे महायुतीचे समन्वयक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती. कोकणामध्ये महायुती टिकवण्यासाठी महायुतीचा समन्वयक म्हणून कामगिरी केली. रत्नागिरी, राजापूर, दापोली आणि चिपळूण या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी होण्यामागे समन्वयक अनिकेत पटवर्धन यांचा सिंहाचा आणि मोलाचा वाटा होता, हे नाकारून चालणार नाही.

युती अभेद्य ठेवणे व पार्टीच्या कार्यकर्त्यांना एकसंध ठेवणे, रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाचा आणि पार्टीच्या विचारधारेबरोबर सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित ठेवणे, महायुती म्हणून मतदान करण्याच्या दृष्टीने संपूर्ण ताकद आणि व्यूहरचना आखली. तसेच या लोकसभा आणि आता विधानसभा विजयामध्ये चांगल्या पद्धतीने अनिकेत पटवर्धन यांनी संयमी व उत्तमरित्या जी भूमिका बजावली, त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

पडद्यामागे राहून भारतीय जनता पार्टी एकसंधपणे टिकण्यासाठी व सगळ्या नेत्यांना एकत्रित ठेवणे व कार्यकर्त्यांना रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर फोनवर संपर्क साधून देणे व त्या त्या ठिकाणी भेटीगाठी करून देणे ही फार उत्तमपणे जबाबदारी पार पाडली. याबद्दल अनिकेत पटवर्धन यांच्यावर सर्व महायुतीच्या नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी पुढील २५ वर्ष अनिकेत पटवर्धन काम करेल. रवींद्र चव्हाण यांच्यासारखी भारतीय जनता पार्टी पुढे चालवतील, अशी आशा कार्यकर्त्यांच्या मनात निश्चितच आता तयार होईल. अनिकेत पटवर्धन यांचे केंद्रीय नेतृत्वाशी असलेले संबंध, राज्यातील असलेले संबंध व रत्नागिरी व इतर अनेक जिल्ह्यातील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये कार्यकर्ता कसा असावा, याचे उत्तम उदाहरण म्हणून देवेंद्रजी व रवींद्र चव्हाण यांनी अनिकेत पटवर्धन यांचे कौतुक केले.

कोकणातलं भविष्यातलं एक चांगलं नेतृत्व म्हणून रवींद्र चव्हाण व देवेंद्रजींनी एक चांगला हिरा शोधलाय, असं म्हणायला हरकत नाही. तसेच चाणक्य नीति काय असू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण, कोणत्याही फोटोची अपेक्षा नाही, कोणतताही बडेजाव न करता पडद्याच्या मागे राहून शांतपणे संयमीपणे सगळं काम कशा पद्धतीने करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणून अनिकेत पटवर्धन यांच्याकडे पाहिलं जातंय. देवेंद्रजींनी तसेच रवींद्र चव्हाण यांनी दाखवलेल्या विश्वासास अनिकेत पटवर्धन पात्र ठरतील, असं रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्ते म्हणत आहेत.

कुठे गेला धंगेकर ..इथे फक्त मानकर .. कसब्याचा बालेकिल्ला पुन्हा मिळवून देण्यात मानकरांचे मोठे योगदान

पुणे : दोन वर्षापूर्वी भाजपकडून कसब्याचा बालेकिल्ला कॉंग्रेसने काढून घेऊन हस्तगत केला होता . तेव्हा धंगेकर यांच्या रूपाने कसब्यावर कॉंग्रेसचा झेंडा फडकला . त्यामागे अनेकांचे मोठे योगदान होते त्या नावात आघाडीवर असणारे नाव होते दीपक मानकर यांचे .. त्यानंतर रमेश बागवे , बाळासाहेब दाभेकर अशी अनेक नावे होती जी तेव्हा धंगेकर यांच्या पाठीशी होती आणि या ताकदीमुळे भाजपने वर्षानुवर्षे कसब्याचा बालेकिल्ला ढासळला तेव्हा हेमंत रासने यांचा पराभव झाला आणि कॉंग्रेसचे धंगेकर विजयी झाले.राजकीय इतिहासात हा बालेकिल्ला कॉंग्रेसने मिळविल्याची हि नोंद राहील. पण दरम्यानच्या काळात परिस्थिती बदलली अजित पवार हे शरद पवारांपासून अलिप्त झाले आणि अजित पवारांच्या समवेत दीपक मानकर राहिले .आणि त्यांच्या समवेत ते भाजपा सेनेच्या महायुतीत सहभागी झाले. कसब्याचा बालेकिल्ला पुन्हा भाजपला तात्काळ त्याच पराभूत उमेदवाराच्या चेहऱ्याने मिळवून देण्यात अजित पवार गटाची अर्थात या गटाचे शहर अध्यक्ष असलेले दीपक मानकर यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. विधान परिषदेच्या नेमणुकांच्या वरून मानकर नाराज होते पण अजित दादांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि पुढच्या खेपेला नाकी तुमच्या कामाचे योगदानाचे चीज करण्याचा सर्वप्रथम प्रयत्न करेल असे आश्वासन दिले .यंदाच्या विधानसभेला काही प्रमाणात धंगेकर पुन्हा एकदा निवडून येतील असं म्हटलं जाऊ लागले होतं, पण त्याची परवा न करता मानकर यांनी कसब्या बरोबर सर्वच मतदार संघातून महायुतीला ताकद द्यायचे काम सुरु ठेवले. मिटिंग , सभा , बैठका, प्रचार फेऱ्या यांच्या आयोजनाबरोबर जिथे आपण कमी आहोत तिथे जास्त लक्ष देण्यासाठी विशेष श्रम घेतले आणि व्हायचे ते झाले कसबा विधानसभेचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना रविंद्र धंगेकरांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर आणि त्यांच्या कुटुंबावर वैयक्तिक टीकाटिप्पणी केली, इथेच धंगेकर जाळ्यात फसले, आणि निवडणुकीची दिशा स्पष्ट झाली .पक्ष पातळीवर असणारी निवडणूक वैयक्तिक पातळीवर गेल्याने कसब्यात मोठ्या संख्येने असणाऱ्या मानकर समर्थकांनी त्यास उत्तर म्हणून हेमंत रासने यांच्या समर्थनार्थ मोहीम सुरू केली .भाजपचे शहर सरचिटणीस राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी रवींद्र धंगेकर यांचे नाव टाळून सोशल मीडियावरून दिलेल्या इशाऱ्याने मानकर समर्थकांत हवा तो संदेश गेला आणि आधीच महायुती म्हणून एकत्र असलेला मानकर गट अधिक कार्यरत झाला.शेवटच्या टप्प्यात बाप्पू मानकरांनी आपली वेगळी यंत्रणा कार्यरत करत गेल्या वेळी अपेक्षित मताधिक्य न मिळालेल्या सदाशिव पेठ, नारायण पेठ परिसर येथे ताकद लावली आणि हेमंत रासने यांच्या विजयात मोठा वाटा उचलला. दीपक मानकर यांचा कसब्यात असलेला समर्थक आणि बाप्पू मानकर यांची प्रचार यंत्रणा यामुळे हेमंत रासनेंच लीड अधिकच वाढले असल्याचे मतदानाच्या आकडेवारीत दिसून आले

विधानसभा निवडणुकीमध्ये त्सुमानी आल्याचं पाहायला मिळाला. महायुतीने २०० पेक्षा जास्त जिंकत निर्विवाद बहुमत मिळविले . तर पुण्यामध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळालं. पुण्यातील सर्वांचं लक्ष लागून असलेल्या कसबा पेठ मतदारसंघातही काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पराभवाचा सामना करावा लागला. रवींद्र धंगेकरांचा पराभव करून भाजप उमेदवार हेमंत रासने यांनी १९ हजारांचे मताधिक्य घेत विजय मिळवला.. कसबामध्ये मानकर समर्थकांनी केलेल्या प्रचाराची जोरदार चर्चा रंगली आहे. धंगेकर यांना निवडणुकीआधी धंगेकर यांनी मानकर यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्याचा मोठा फटका बसल्याचं बोललं जात आहे.

भाजपच्या सदस्यता अभियानाची प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वात बैठक

मुंबई -विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर ऐतिहासिक सदस्यता नोंदणी करण्याचा संकल्प

विधानसभा निवडणूक संपताच भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियानाला प्रारंभ

देशात सदस्यता मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश मुख्यालयात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, श्रीकांत भारतीय, विक्रांत पाटील, माधवी नाईक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. देशात यापूर्वीच सदस्यता अभियानाची सुरुवात झाली होती पण महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रात अभियान राबविण्यात आलं नव्हतं. आता विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर ऐतिहासिक सदस्यता नोंदणी करण्याचा संकल्प बैठकीत करण्यात आला आहे.
मिस कॉलद्वारे मिळवा मेंबरशिप
तुम्हालाही भाजपचे सदस्यत्व मिळवायचे असेल, तर तुम्हाला तुमच्या फोनवरून 8800002024 या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला मिस कॉल करावा लागेल. मिस कॉल केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या फोनवर एक मेसेज प्राप्त होईल, ज्यामध्ये सदस्यत्व क्रमांक दिला जाईल.

सावकारांच्या तगाद्याला वैतागून भवानी पेठेतील व्यावसायिकाची आत्महत्या

पुणे : पावसाळ्यात आलेल्या पुराने ताडीवाला रोड येथील गोदामात पाणी शिरुन मालाचे नुकसान झाले. याचे पैसे द्यावेत म्हणून व्यावसायिकाकडे सावकारांनी तगादा लावला़ मुलाला उचलून नेण्याची धमकी दिली. या मानसिक त्रासामुळे एका व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

राजा परदेशी (वय ४४, रा. महाराष्ट्र तरुण मंडळा शेजारी, हरकानगर, काशेवाडी, भवानी पेठ) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी कंचन राजा परदेशी (वय ३८, रा. काशेवाडी, भवानी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी लक्कडसिंग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार काशेवाडी येथील घरात शनिवारी दुपारी १२ वाजता घडला.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजा परदेशी यांचे ताडीवाला रोड येथे गोदाम होते. लक्कडसिंग हा त्यांना डुक्कर पुरविण्याचे काम करीत असे. परदेशी हे या डुक्करांचे मांस तयार करुन ताडीवाला रोड येथील गोदामात ठेवत असे. ग्राहकांच्या मागणी नुसार त्यांना पुरवठा करत असे. पावसाळ्यात त्यांच्या गोदामात पुराचे पाणी शिरले आणि सर्व माल खराब झाला. जवळपास १० लाख रुपयांचे नुकसान झाले.

हे नुकसान परदेशी भरुन काढू शकले नाही. दुसरीकडे लक्कडसिंग हा त्यांच्याकडे तुझे नुकसान झाले त्याला मी काय करु,
माझे पैसे दे, असे म्हणून पैशांची वारंवार मागणी करत होता.तो शिवीगाळ करुन मानसिक त्रास देत होता. मुलांना उचलून नेण्याची धमकी देत होता.त्याच्या या मानसिक त्रासाला कंटाळून राजा परदेशी यांनी शनिवारी दुपारी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे तपास करीत आहेत

मुंबई -पुणे महामार्गावर कात्रजकडे जाणार्‍या वारजे पुलावर गॅस वाहतूक करणारा टँकर उलटल्याने वाहतूक ठप्प

पुणे : मुंबई -पुणे महामार्गावर कात्रजकडे जाणार्‍या वारजे पुलावर एलपीजीने भरलेला टँकर उलटला. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अग्निशमन दलाचे दोन क्रेनने हा ट्रॅकर बाजूला करण्याचे काम सुरु आहे.
मुंबईहून एलपीजीने भरलेला टँकर कात्रजकडे जात होता. वारजे येथील पुलावर आल्यावर या टँकरच्या पुढील बाजूचा टायर फुटला. त्यामुळे टँकरची पुढील बाजू पुलाला घासत जाऊन पलटला. त्यामुळे टँकरची मागील बाजूची कॅप्सुल संपूर्ण रोडवर आडवी झाली. त्यामुळे संपूर्ण रस्ता बंद झाला. याची खबर रविवारी सकाळी १० वाजून ५९ मिनिटांनी अग्निशमन दलाला मिळाली. त्याबरोबर वारजे येथील गाडी घटनास्थळी पोहचली. पोलीसही दोन क्रेनसह आले. ही घटना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. एलपीजी गॅस भरलेला टँकरची मागील कॅप्सुल बाजूला करण्याचे काम सुरु आहे. तासाभराच्या प्रयत्नानंतर पोलिसांना टँकरचा पुढील भाग व कॅप्सुल बाजूला करण्यात यश आले आहे. दोन्ही बाजूची वाहतूक सुरु करण्यात आली आहे. आता तिसरी क्रेन मागविण्यात आली असून तिच्या सहाय्याने टँकरची कॅप्सुल पुढील भागावर ठेवण्यात येणार आहे

भरधाव मोटारसायकल दुभाजकाला धडकल्याने चालक तरुणाचा मृत्यु ! कात्रजमधील घटना

पुणे : दुभाजक उजेडात असावेत , त्यावर लाईट्स असावेत दुभाजकाची जाणीव वाहनचालकाला अगोदरच होईल अशी व्यवस्था असावी असे सारे नियम असतानाही पुण्यात एकाच रात्री दोन ठिकाणी भरधाव मोटारसायकल दुभाजकाला धडकून अपघात झालेत. भरधाव मोटारसायकल दुभाजकाला धडकल्याने एका घटनेत चालकाचा मृत्यु झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

हर्षद दिपक बर्गे (वय २५, रा. मिलेटरी हौसिंग सोसायटी,सदर बाजार, सातारा) असे मृत्यु पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मित्र ऋषिकेश हेमंत धोत्रे (वय २६, रा. देशमुख कॉलनी, सदर बाजार, सातारा) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा अपघात कात्रजमधील मोरेबाग बसस्टॉपसमोर शनिवारी पहाटे अडीच वाजता घडला.

फिर्यादी व त्यांचा मित्र हर्षद बर्गे हे मोटारसायकलवरुन जात होते. बर्गे याने भरधाव मोटारसायकल चालविताना मोरेबाग बसस्टॉपसमोरील दुभाजकाला धडक दिली. त्यात ते रस्तावर पडल्याने दोघे जखमी झाले. हर्षद बर्गे याचा मृत्यु झाला असून ऋषिकेश धोत्रे हा जखमी झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करीत आहेत.

दुसरी घटना कर्वे रोडवरील रांका ज्वेलर्ससमोरील उड्डाण पुलाच्या सुरुवातीला घडली. त्यात वैभव हनुमंत पिंपळे (वय ३५, रा. सरस्वती कॉलनी, शिवनगर, संभाजीनगर, सातारा) हा तरुण जखमी झाला आहे. याबाबत पोलीस अंमलदार अमोल खारतोडे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वैभव पिंपळे हा शुक्रवारी रात्री अकरा वाजता भरधाव वेगाने कर्वे रोडवरुन जात होता.नळस्टॉपजवळील उड्डाणपुल सुरु होत असताना पुलाच्या कठड्याला दुचाकीची जोरात धडक दिली.
त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक योगिता गायकवाड तपास करीत आहे

अदानींवरील आरोपामुळे देशाच्या प्रतिष्ठेला धक्का !

अमेरिकेतील सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने ( एसईसी) अदानी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी,त्यांचा पुतण्या सागर अदानी व सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात अब्जावधी डॉलरची लाचखोरी केल्याचा आरोप ठेवला आहे. ही लाच भारतातल्या काही सरकारी अधिकाऱ्यांना दिलेली असली तरी हा पैसा अमेरिकेतील गुंतवणूकदारांकडून गोळा केला असल्याचा त्यांचा दावा आहे. एकाच वेळेला लाचखोरी आणि गुंतवणूकदारांची फसवणूक असे दुहेरी आरोप अदानी समूहाविरुद्ध करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा मागोवा.

भारतातील सेबीप्रमाणे अमेरिकेतील भांडवली बाजाराचे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन (एसईसी) हे नियंत्रक आहेत. अमेरिकेतील भांडवली बाजारात कर्जरोखे, शेअर्स यांची विक्री करून भांडवल उभारणाऱ्या कंपन्या, तेथील बाजारातील व्यवहारांवर त्यांचे नियंत्रण असते. न्यूयॉर्कच्या जिल्हा न्यायालयात या नियंत्रकांच्या वतीने फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली असून अदानी समूहाविरुद्ध कायमची मनाई, दिवाणी स्वरूपातील दंड व तीन अधिकारी व संचालकांच्या अटकेची मागणी केली आहे. न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात अदानी समूहावर भारतातील काही राज्यांमधील सरकारी अधिकाऱ्यांना सौर वीज खरेदीसाठी दिल्याचा आरोप केला आहे. मात्र ही लाच दिलेली रक्कम किती आहे, कोणाला दिली आहे याचा कोठेही उल्लेख नाही. प्रसारमाध्यमांनी ही रक्कम 250 मिलियन डॉलर्स ( सुमारे 2200 कोटी रुपये) इतकी असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जगातील कोणत्याही देशात लाच देणे घेणे हा गुन्हा आहे. त्याचे कोणीही समर्थन करत नाही. परंतु अदानींच्या संदर्भात करण्यात आलेले हे आरोप आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे किंवा कसे हेही पाहण्याची गरज आहे. चीन किंवा अमेरिकेतील ‘डीप फेक’ मधील सोरोस सारखी ‘ फेक नेरेटिव्ह’ करणारी मंडळी यामागे आहेत किंवा कसे हेही पाहिले पाहिजे. अर्थात भ्रष्टाचाराचे कोणतेही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणीही समर्थन करणे हे नीतिमत्तेला धरून नाही.

अदानी उद्योग समूहातील अदानी ग्रीन या कंपनीने सप्टेंबर 2021 मध्ये 750 मिलियन डॉलर्स ची उभारणी केली होती. त्यातील 175 मिलियन ( सुमारे साडे सतरा कोटी डॉलर्स ) इतकी रक्कम अमेरिकेच्या गुंतवणूकदारांच्या मार्फत उभारलेली होती. गौतम व सागर अदानी यांनी त्यांच्या अदानी ग्रीन व अझुरे पॉवर या दोन कंपन्यांना फायदा होण्याच्या दृष्टिकोनातून काही लाख डॉलर्स रक्कम भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप आहे. या दोन्ही कंपन्यांकडून बाजारपेठेपेक्षा जास्त दराने वीज खरेदी करण्यासाठी ही लाच देण्यात आली. अझुरे पॉवर या कंपनीचे माजी संचालक सिरील काबेन्स आहेत.त्यांनी ‘फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ॲक्ट'(एफसीपीए)कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन केले असल्याचे तक्रारीमध्ये नमूद केले आहे.

अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनचे हंगामी संचालक संजय वाधवा यांनी सांगितल की या सर्व मंडळींनी अमेरिकेच्या कायद्याचे उल्लंघन केले असल्याने ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. अदानी समूहाने अमेरिकेत भांडवल गोळा केले तेव्हा तेथील बँका व गुंतवणूकदार यांना कोणत्याही वीज प्रकल्पासाठी लाच देणार नाही किंवा लाच देण्याचे आश्वासनही कोणाला देणार नाही अशी हमी दिलेली होती. अशा प्रकारची हमी दिलेली होती किंवा कसे याबाबत काहीही स्पष्टता नाही. 7 मार्च 2023 या दिवशी किंवा त्याच्या जवळपास अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन (एफबीआय) या गुन्हे तपासणी संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सागर अदानी यांची अमेरिकेत भेट घेऊन त्यांच्या ताब्यातील इलेक्ट्रॉनिक उपकरण ताब्यात घेतले. त्याचवेळी त्यांनी सागर अदानींच्या कार्यालयाची झडती घेण्याचे वॉरंटही दाखवले. यामध्ये अमेरिकेच्या कायद्याचा भंग केल्याचे तसेच गैरव्यवहार केल्याचे नमूद केले होते.त्यावेळी सागर आदानींबरोबरच गौतम अदानी विनीत जैन यांच्याही नावाचा व इंडियन एनर्जी कंपनी यांचा उल्लेख केलेला आहे. अमेरिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्याने भारतात प्रत्यक्ष येऊन लाच दिली किंवा कसे याबाबत प्रत्यक्ष चौकशी केलेली नाही. आंध्र प्रदेश व ओडिषा या दोन राज्यांमध्ये सौरऊर्जा पुरवठ्याची कंत्राटे मिळावीत म्हणून सरकारी अधिकाऱ्यांना लाच देण्यात आल्याचा आरोप त्यात आहे.

दरम्यान लाचखोरीचे सर्व आरोप निराधार व बिन बुडाचे असल्याची प्रतिक्रिया अदानी समूहाने दिली आहे. दाखल केलेल्या खटल्यातील हे केवळ आरोप आहेत व जोपर्यंत ते न्यायालयात सिद्ध होत नाहीत तोपर्यंत आरोपीला निर्दोष मानले जाते असे अमेरिकेच्या न्याय विभागाने स्पष्ट केल्याचा उल्लेख अदानी समूहाच्या पत्रकामध्ये केलेला आहे. अदानी समूह उच्च दर्जाच्या तत्वांचा अंगीकार करून पारदर्शकता व नियमांचे पालन करणारा समूह आहे. आमचा समूह जगभरात कार्यरत असून आम्ही नेहमीच कायद्याचे पालन करणारे आहोत. या आरोपांविरुद्ध संबंधित न्यायालयात सर्व ते शक्य कायदेशीर मार्ग शोधून आमची बाजू योग्यरित्या मांडण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान या बातमीचे पडसाद भारतीय बाजारात उमटून अदानी समूहाचे शेअरचे भाव गडगडले आहेत.त्यामुळे भारतीय गुंतवणूकदारांचेही मोठे नुकसान कागदोपत्री झालेले आहे. साहजिकच भारतीय राजकारणात आरोपांची राळ पुन्हा उडालेली आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अदानींच्या चौकशीची, अटकेची मागणी केली आहे. संसदेच्या येत्या अधिवेशनात त्याचे पडसाद उमटणार असून सर्व कामकाज बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान भारतातील एकाही तपास संस्थेने किंवा सेबी यांनी अदानी समूहाविरुद्ध कोणतीही कारवाई केलेली नाही. दरम्यान बांगलादेशच्या उच्च न्यायालयाने अदानी कंपनीबरोबर केलेल्या कराराची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमली आहे. तसेच केनयाने अदानी उद्योग समूहा बरोबर केलेला विमानतळ व वीज निर्मितीचा प्रकल्प रद्द केल्याचे जाहीर केले आहे. या घडामोडींमुळे अदानी समूहच नाही तर भारताची प्रतिमा डागाळली जात आहे. भारताच्या जागतिक प्रतिष्ठेला लागलेला धक्का व आर्थिक स्थानाचा विचार करता सत्ताधारी मोदी सरकारने याची उच्चस्तरीय संसदीय सखोल व निष्पक्ष चौकशी करून हे प्रकरण विनाविलंब तडीस लावावे अशी अपेक्षा आहे.

लेखकप्रा. नंदकुमार काकिर्डे

(लेखक पुणे स्थित अर्थविषयक जेष्ठ पत्रकार असून बँक संचालक आहेत)

महायुतीला मिळालेले निर्विवाद बहुमत राज्याच्या प्रगतीसाठी हितकारी -मसालाकिंग धनंजय दातार

पुणे- मसालाकिंग धनंजय दातार, (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, अदील ग्रुप ऑफ सुपर स्टोअर्स, दुबई, युएई)यांनी म्हटले आहे कि,’महाराष्ट्र विधानसभा २०२४ निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला २०० हून अधिक जागा देत निर्विवाद बहुमत दिले आहे. हा निकाल महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीसाठी हितकारी आणि उत्साहवर्धक ठरेल, असे एक उद्योजक या नात्याने मला वाटते. कारण कोणत्याही राज्याची आर्थिक-औद्योगिक प्रगती ही शासकीय धोरणांच्या स्थिरतेवर अवलंबून असते आणि धोरणे स्थिर राहण्यासाठी तेथील राजवट मजबूत असावी लागते. केंद्रात व महाराष्ट्रात पुढील पाच वर्षे एकाच आघाडीचे, एकविचाराने चालणारे आणि विकासाभिमुख सरकार काम करणार असल्याने आगामी काळात अस्थिर सरकार, तडजोडीचे सरकार किंवा राष्ट्रपती राजवट अशा आव्हानांचा मुकाबला करावा लागणार नाही आणि विकासासाठी केंद्रीय निधीचीही कमतरता भासणार नाही, हे खूप आश्वासक आहे.

महायुतीच्या गेल्या शासनकाळात राज्यकर्त्यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रात प्रगतीची व्यापक आणि वेगवान पावले पडलेली दिसली आहेत. त्याच दमदार वाटचालीचा पुढचा टप्पा भविष्यकाळातही कायम राहील. पायाभूत सुविधा विकासाचे अनेक प्रकल्प पूर्ततेच्या टप्प्यात आहेत. त्यातील काही महाराष्ट्राइतकेच देशाच्या भरभराटीसाठीही महत्त्वाचे आहेत. समृद्धी महामार्ग, मेट्रो, बुलेट ट्रेन, नवे रस्ते व रेलमार्ग बांधणी तथा विद्यमान मार्गांचा विस्तार, वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, प्रस्तावित वाढवण बंदर ही त्यापैकी काही उदाहरणे. महाराष्ट्रात गुंतवणूक, वाहतूक, आयात-निर्यात, औद्योगिक विकास यांना पुढील पाच वर्षांत जोरदार चालना मिळेल, ज्याचा परिणाम राज्याची आर्थिक भरभराट होण्यावर होईल. नव्या सरकारला आणि नेतृत्वाला अनेक शुभेच्छा.