पुणे : मुंबई -पुणे महामार्गावर कात्रजकडे जाणार्या वारजे पुलावर एलपीजीने भरलेला टँकर उलटला. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अग्निशमन दलाचे दोन क्रेनने हा ट्रॅकर बाजूला करण्याचे काम सुरु आहे.
मुंबईहून एलपीजीने भरलेला टँकर कात्रजकडे जात होता. वारजे येथील पुलावर आल्यावर या टँकरच्या पुढील बाजूचा टायर फुटला. त्यामुळे टँकरची पुढील बाजू पुलाला घासत जाऊन पलटला. त्यामुळे टँकरची मागील बाजूची कॅप्सुल संपूर्ण रोडवर आडवी झाली. त्यामुळे संपूर्ण रस्ता बंद झाला. याची खबर रविवारी सकाळी १० वाजून ५९ मिनिटांनी अग्निशमन दलाला मिळाली. त्याबरोबर वारजे येथील गाडी घटनास्थळी पोहचली. पोलीसही दोन क्रेनसह आले. ही घटना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. एलपीजी गॅस भरलेला टँकरची मागील कॅप्सुल बाजूला करण्याचे काम सुरु आहे. तासाभराच्या प्रयत्नानंतर पोलिसांना टँकरचा पुढील भाग व कॅप्सुल बाजूला करण्यात यश आले आहे. दोन्ही बाजूची वाहतूक सुरु करण्यात आली आहे. आता तिसरी क्रेन मागविण्यात आली असून तिच्या सहाय्याने टँकरची कॅप्सुल पुढील भागावर ठेवण्यात येणार आहे