जितो, पुणे चॅप्टरच्या वतीने बी टू बी उपक्रमाअंतर्गत संवादात्मक व्याख्यानाचे आयोजन
पुणे : व्यवसायाची धोरणे आखताना अंधानुकरण टाळावे, सुयोग्य प्रणालीचा वापर करावा, बदल स्वीकारण्याची तयारी ठेवावी, नवनवीन व्यावसायिक संधींचा शोधक नजरेने वेध घ्यावा, दूरदृष्टी असावी, व्यवसायाचे उत्तम ज्ञान प्राप्त करावे, ध्येय निश्चित करावे, नितीमूल्ये सांभाळावीत, अशा मौलिक सूचना व्यवसाय रणनीतिकार, मानवशास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षक, वक्ता आणि लेखक डॉ. संजय रुणवाल यांनी केल्या. अनुकरण, नाविन्य या व्यतिरिक्त युवा पिढीने व्यवसाय वृद्धीसाठी नाविन्यपूर्ण अनुकरणाची कास धरावी अशी अभ्यासपूर्ण मांडणीही त्यांनी उलगडून दाखविली.
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) पुणे विभागाच्या वतीने बी टू बी या उपक्रमाअंतर्गत डॉ. संजय रुणवाल यांचे ‘व्यवसाय सुरळीतपणे कसा चालवावा’ या विषयावर महावीर प्रतिष्ठान, सॅलिसबरी पार्क येथे संवादात्मक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. चेअरमन इंद्रकुमार छाजेड, चिफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल, जयेश फुलपगर, अमोल कुचेरिया, आनंद चोरडिया, संजय राठोड, वनिता मेहता, राहुल मुथा, सुमित जैन आदींच्या उपस्थितीत डॉ. रुणवाल यांचा जितो पुणे चॅप्टरच्या वतीने सुरुवातीस सन्मान करण्यात आला.
पारंपरिक पद्धतीने सुरू असलेल्या छोट्या व्यावसायिकांची परिस्थिती आज काय आहे या विषयी भाष्य करताना डॉ. रुणवाल म्हणाले, शहरांचे विस्तारिकरण होत असतानाच लघु व्यावसायिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्याच बरोबरीने ऑनलाईन व्यवसायाने आपले जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. अशा परिस्थितीत व्यवसायातील नफ्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. काळाची पावले ओळखून परंपरागत व्यवसाय पुढे नेत असताना युवा पिढीच्या कल्पनांना वाव देत, त्यांच्यावर विश्वास ठेवत जुन्या पिढीतील व्यावसायिकांनी बदल घडविण्याची मानसिकता स्वीकारली पाहिजे. व्यवसायात सतत बदल न करता आपण करत असलेला व्यवसाय कुठल्या उंचीपर्यंत नेऊ शकतो याची दूरदृष्टी विकसित करणे त्याच्या जोडीला धोरणात्मक व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे.
धोरणात्मक विचार, धोरणात्मक नेतृत्व, स्पर्धात्मक धोरण, धोरणात्मक अंमलबजावणी आणि धोरणात्मक व्यावसायिक जोखीम घेण्याची तयारी, या मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर मांडणी केली. व्यवसायात यश प्राप्त करण्यासाठी आपल्यातील क्षमता ओळखा, नवनवीन संधींचा अभ्यास करा, त्याच प्रमाणे आपल्यातील कमतरता आणि व्यवसायातील जोखीम याचा विचार होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविकात चेअरमन इंद्रकुमार छाजेड म्हणाले, देशाच्या प्रगतीत व्यावसासियांचा मोठा वाटा आहे. बदलत्या काळानुसार व्यावसायिकांनाही आपल्या धोरणांमध्ये योग्य ते बदल करणे आवश्यक असते. त्या अनुषंगाने डॉ. संजय रुणवाल यांचे संवादात्मक व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
डॉ. रुणवाल यांचा परिचय जयेश फुलपगर यांनी करून दिला तर सूत्रसंचालन अमोल कुचेरिया यांनी केले. दिनेश ओसवाल यांनी जितो चॅप्टरच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती सांगितली.