मुंबई–महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेचे जनमत दिले आहे. त्यानंतर राज्यात मुख्यमंत्री पदी कोण विराजमान होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच एकनाथ शिंदे यांच्याकडूनही अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मिळावे, यासाठी मागणी केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. अशातच आता यावर शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनीही यावर आता दुसऱ्यांदा भाष्य केले आहे.केसरकर म्हणाले की, ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढवली गेली आहे. या निवडणुकीत जनतेनेही चांगला कौल दिलेला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने आम्ही नेहमीच विचार करतो की, एकनाथ शिंदे यांना प्रथम प्राधान्य द्यायला हवे. तसेच, आम्ही एकनाथ शिंदे यांच्यावर जेवढे प्रेम करतो, तेवढेच प्रेम आणि विश्वास आमचा देवेंद्र फडणवीस यांच्यावरही असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांची जोडी आहे. हे बघा, या जोडीने काय चमत्कार करून दाखवला. अजितदादा हे नंतर सहभागी झाले. त्यामुळे अजितदादांनाही याचे क्रेडिट आहे. पण हे दोघे पहिल्यापासूनच सोबत चालत आहेत. ही जोडी कायम राहील आणि त्यांना देवाचाही आशीर्वाद आहे.