पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या काव्य जीवन गौरव पुरस्काराने ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी यांचा सन्मान केला जाणार आहे.
पुरस्कार वितरण समारंभ मंगळवार, दि. 10 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, दुसरा मजला, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला आहे. पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून यात विजय सातपुते, सुजित कदम, स्वप्नील पोरे, मिलिंद शेंडे, राजश्री सोले, राजश्री महाजनी, स्वाती दाढे, मीना सातपुते, स्वाती यादव, माया मुळे, डॉ. मृणालिनी गायकवाड, आशा ठिपसे, डॉ. रेखा देशमुख, वैजयंती विझें-आपटे यांचा सहभाग असणार आहेत. ज्येष्ठ कवयित्री प्रभा सोनवणे अध्यक्षस्थानी असणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
रंगत-संगत प्रतिष्ठानचा काव्य जीवन गौरव पुरस्कार अंजली कुलकर्णी यांना जाहीर
जागतिक दिव्यांग दिवसाच्या निमित्ताने एसबीआयतर्फे २९ पॅरालिम्पिक विजेत्यांचा गौरव
भारतभरातील २० ठिकाणी एएलआयएमसीओच्या सहकार्याने सुमारे ९००० दिव्यांगजनांना साहाय्यक उपकरणांचे वितरण
मुंबई, 4 डिसेंबर २०२४: देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने जागतिक दिव्यांग दिवसाच्या निमित्ताने पॅरिस २०२४ पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेतील भारताच्या पॅरालिम्पिक विजेत्यांचा सन्मान करण्यासाठी सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमादरम्यान, बँकेने २९ पॅरालिम्पिक विजेत्यांना धनादेश प्रदान केले आणि त्यांच्या अद्वितीय कामगिरीचा गौरव केला. भारताने या पॅरालिम्पिकमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत १८ वा क्रमांक मिळवला.
कार्यक्रमात विचार मांडताना एसबीआय अध्यक्ष सी. एस. सेटी म्हणाले, “पॅरिस २०२४ पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमधील भारताची कामगिरी हा आपल्या देशाच्या क्रीडा प्रवासातील एक निर्णायक क्षण ठरला. या खेळाडूंनी केवळ जिद्द आणि संयमाच्या जोरावर अशक्य ते शक्य करून दाखवले, अडथळे पार केले आणि देशाला प्रेरणा दिली. एसबीआयमध्ये आम्हाला या विजेत्यांना पाठिंबा देण्यात अभिमान वाटतो आणि आम्ही भारतीय क्रीडाविश्वासाठी अधिक समावेशक, प्रोत्साहन पूरक वातावरण निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
सर्वसमावेशकतेच्या दिशेने आपल्या वचनबद्धतेला अनुसरून, एसबीआयने २०२४-२५ या आर्थिक वर्षातील आपल्या सीएसआर उपक्रमांचा भाग म्हणून आर्टिफिशियल लिम्ब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एएलआयएमसीओ) सोबत सहयोग करण्याची घोषणा केली. या भागीदारीचा उद्देश देशभरातील २० ठिकाणी सुमारे ९००० दिव्यांगजनांना साहाय्यक उपकरणे वितरीत करणे आहे.
या उपक्रमातून व्यक्तिगत सक्षमीकरण, सर्वसमावेशकतेला चालना आणि भारतीय क्रीडा प्रकारांना पाठिंबा देण्यासाठी असलेली एसबीआयची बांधिलकी अधोरेखित होते.
पदक विजेते (झलक):
सुवर्णपदक: Harvinder Singh, Sumit Antil, Dharambir, Praveen Kumar, Navdeep Singh, Nitesh Kumar, Avani Lekhara
रौप्यपदक: Nishad Kumar, Yogesh Kanthuniya, Sharad Kumar, Ajeet Singh, Sachin Khilari, Pranav Soorma, Thulasimathi Murugesan, Suhas Yathiraj, Manish Narwal
2019 मध्ये आम्हाला मिळालेला कौल हिसकावून घेण्यात आला..आता स्पष्ट बहुमताने महायुतीचे सरकार
मुंबई-देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी बोलताना फडणवीस यांनी आपली निवड केल्याबद्दल पक्षाचे आभार मानले. तसेच महाराष्ट्राला विकासाच्या एका नव्या उंचीवर नेण्याचा निर्धारही व्यक्त केला. विशेषतः यावेळी त्यांनी यंदाची निवडणूक अत्यंत ऐतिहासिक ठरल्याचे नमूद करत ‘एक है तो सेफ है’, ‘मोदी है तो मुमकीन है’चा नाराही दिला.देवेंद्र फडणवीस म्हणाले, 2019 मध्येही जनतेचा कौल आपल्याला मिळाला होता. पण दुर्दैवाने जनतेचा कौल हिसकावून घेण्यात आला. त्यावेळी जनतेसोबत बेईमानी झाली. माझी त्या इतिहासात जाण्याची इच्छा नाही. आपण एक नवी सुरूवात करत आहोत. पण एका गोष्टीचा निश्चित उल्लेख करेन, की सुरुवातीच्या अडीच वर्षात ज्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्रास देण्यात आला, आपल्या आमदारांना त्रास देण्यात आला, नेत्यांना त्रास देण्यात आला. त्यानंतरही एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही. सर्व आमदार, सर्व नेते संघर्ष करत होते. त्या संघर्षामुळेच 2022 मध्ये पुन्हा आपले सरकार आले. त्यातूनच आज पुन्हा एकदा स्पष्ट बहुमताने महायुतीचे सरकार आले. हे एक अभूतपूर्व यश आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. ही निवड प्रक्रिया करण्यासाठी आलेले केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी व निर्मला सीतारामन यांचेही मी आभार मानतो. विशेषतः या संपूर्ण प्रक्रियेत आमच्यासोबत असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही मी आभार मानतो. आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे की, यावेळची निवडणूक अत्यंत ऐतिहासिक ठरली. या निवडणुकीचे विश्लेषण करायचे झाले तर, तर मी असे म्हणेन की, या निवडणुकीने एक गोष्ट आपल्यापुढे निश्चितपणे ठेवली आहे, ती म्हणजे एक है तो सेफ है आणि मोदी है तो मुमकीन है.
लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा देशात विजयाची मालिका सुरू झाली. महाराष्ट्राच्या जनतेला माझा साष्टांग दंडवत. त्यांनी खूप मोठा जनादेश आम्हाला दिला. यंदाचे वर्ष अतिशय महत्त्वाचे आहे. आपण सर्वजण ज्या प्रक्रियेतून निवडून येतो, त्या संविधानाला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या वर्षात आज आपण सरकार स्थापन करत आहोत.
महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीवर अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवली. आम्हाला प्रचंड मोठा जनादेश दिला. या जनादेशाचा आनंद आहेच, पण यामुळे आपली जबाबदारीही तेवढीच वाढली आहे. एका मोठ्या जबाबदारीची जाणीव करून देणारा जनादेश जनतेने आम्हाला दिला आहे. विशेषतः आपल्या लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, शेतकरी किंवा तरुण असतील या सर्वांनी आणि समाजातील दलित, वंचित, ओबीसी, आदिवासी सर्वांनी दिलेल्या जनादेशाचा सन्मान राखण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे.म्हणून आपली प्राथमिकता ही आपण सुरू केलेल्या योजना आणि आपण दिलेली आश्वासने पूर्ण करण्याला असेल. तसेच महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी, महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी आपल्या सर्वांना सातत्याने कार्यरत राहायचे आहे.माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला राज्याच्या सर्वोच्च पदाची 3 वेळा संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो. हा पक्ष ज्या प्रकारे त्यांच्या नेतृत्वात मोठा झाला, त्यातूनच सामान्य कार्यकर्त्यांना वेगवेगळी पदे मिळाली. काम करण्याची संधी मिळाली.देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आपल्या सहकाऱ्यांना भविष्यातील काही गोष्टींचीही जाणिव करून दिली. ते म्हणाले, आपल्याला जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लाणार आहे. आपल्याला जनतेच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. हे करताना आपल्याला महायुतीमधील सर्वांना सोबत घेऊन पुढे जावे लागेल. काहीवेळा सर्वांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. पण आपण एक मोठा विचार घेऊन राजकारणात आलो आहोत हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.भविष्यात काही गोष्टी आपल्या मनासारख्या होतील व काही गोष्टी मनाविरोधात होतील. पण त्यानंतरही आपण सर्वजण एकदिलाने काम करू. आपली शक्ती दाखवून देऊ. मी राज्यातील जनतेला आश्वस्त करू इच्छितो की, आमचे सराकर महाराष्ट्राच्या सर्वांगिन विकासासाठी, प्रगतीसाठी 24 तास काम करेल व सामान्य माणसांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.
महायुती सरकारचा शपधविधी 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. यावेळी अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची तर काही आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका समोर आली आहे.
बाणेरला मुरकुटे पाटील कॉम्प्लेक्समध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय
पुणे- बाणेरला मुरकुटे पाटील कॉम्प्लेक्समध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली चालविल्या जाणाऱ्या वेश्याव्यवसायावर छापा मारून पुणे पोलिसांनी ३ पिडीत महिलांची सुटका केली आणि हा व्यवसाय चालविणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि.०३/१२/२०२४ रोजी गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, “मून थाई सपा”ऑफिस नंबर ३सर्वे नंबर 4 बापूसाहेब मुरकुटे पाटील कॉम्प्लेक्स तिसरा मजला तुळशी प्युअर व्हेज व महाबळेश्वर हॉटेल शेजारी बाणेर रोड पुणे येथे स्पा च्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालू असले बाबत गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने सदर ठिकाणी बनावट गिऱ्हाईक पाठवून खात्री केली असता नमूद स्पा नावाखाली वेश्याव्यवसाय चालवीत असल्याचे निष्पन्न झाल्याने अचानक छापा कारवाई करून एकूण ०३ भारतीय पीडित महिला यांची सुटका करून आरोपी नामे 1) मॅनेजर – सताउद्दीन मोहम्मद दिलावर हुसेन वय 22 वर्ष रा. जुनी सांगवी पुणे व आणखी एक फरार आरोपी त्यांचेविरुद्ध बाणेर पोलिस स्टेशन येथे बी एन एस कलम 143,3(5) सह अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3,4,5, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर शैलेश बलकवडे , पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर निखिल पिंगळे,सहा.पोलीस आयुक्त गुन्हे १,पुणे गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली भरोसा सेल गुन्हे शाखा,पुणे शहर च्या पोलीस निरीक्षक श्रीमती संगीता जाधव , पोलीस उपनिरीक्षक चव्हाण व त्यांचा स्टाफ यांनी केली आहे.
गीता परिवार तर्फे बावधन येथील स्टार गेझ सोसायटी मध्ये गीता जयंती कार्यक्रम संपन्न
पुणे –
गीता जयंतीनिमित्त देश-विदेशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे,ज्यामुळे गीतेच्या मूल्यांचा प्रभावी प्रसार सर्वांपर्यंत करता येईल आणि प्रत्येक हिंदू कुटुंबाला श्रीमद्भगवद्गीतेच्या पठन व अभ्यासाशी जोडता येईल.
याच उपक्रमाचा भाग म्हणून गीता परिवार, पुणे यांनी दि. १ डिसेंबर रोजी बावधन येथील स्टारगेझ सोसायटी मध्ये श्रीमद्भगवद्गीतेच्या १८ अध्यायांच्या पठणाचा कार्यक्रम तेथील नागरिकांच्या हर्षोल्हासात आयोजित केला.या कार्यक्रमात सर्व नागरिकांनी उत्साहाने भाग घेतला,आणि गीता परिवार देखील या आयोजनाचा भाग बनला.
या कार्यक्रमात मुलांनी गीतेचे पठण आणि हनुमान चालीसेचे सामूहिक गायन केले.
कार्यक्रमाचा मुख्य उद्देश गीतेच्या उपदेशांचा प्रसार करणे आणि सामाजिक एकोप्याला चालना देणे हा होता,ज्यामध्ये सर्वांनी आपले योगदान दिले.
कार्यक्रमात गीतेचे वितरणही करण्यात आले. सोसायटीतील सर्व रहिवाशांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.यामध्ये १०० नागरीकांनी यात भाग घेतला आणि गीतेच्या शिकवणींना जीवनात आत्मसात करण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाचे संचालन श्रीमती रेखा गिल्ड यांनी केले. रेखा गिल्ड या सोसायटीत मुलांसाठी गीतेच्या वर्गांचे आयोजन देखील करतात.
हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी श्रीमती रेखा गिल्ड, श्री मधुकर पौर्णेकर, श्री दिलीप खोपडे, श्री श्रीमंत जगताप, श्रीमती रागिणी शर्मा, श्रीमती नेहा औरंगाबादकर, श्रीमती अश्विनी,आणि श्री अखिल औरंगाबादकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
देवेंद्र फडणवीस यांची निवड होताच पुण्यात जल्लोष
पुणे –
भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्या निमित्त पुण्यातील अलका टॉकीज चौकात भाजपच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी कार्यकर्त्यांसह स्वतः ढोल वादन करत देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्या निमित्त आनंद साजरा केला.
यावेळी पुणे शहर सरचिटणीस , ,पुनीत जोशी, राघवेंद्र मानकर राहुल भंडारे , सुभाष जंगले,वर्षा तापकीर, प्रमोद कोंढरे,,रवींद्र साळे गावकर गणेश घोष,माजी नगरसेवक जयंत भावे आदित्य माळवे, अजय खेडेकर, राजेंद्र काकडे, पुष्कर तुळजापूरकर,राजू परदेशी ,प्रणव गंजीवाले, उमेश शाह, दिलीप उंबरकर, संदीप काळे उपस्थित होते.
घाटे म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर विराजमान होत आहे. राज्यातील युवक आणि महिला यांचा सन्मान आणि उद्धार करण्यासाठी फडणवीस यांची निवड पदावर करण्यात आली आहे. राज्यातील लाडकी बहीण यांना त्यांचा हक्काचा देवाभाऊ मिळणार आहे. पुण्यातील सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी असे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते शपथविधीसाठी उद्या मुंबई मध्ये जाणार आहे. देवेंद्र फडणवीस हे समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन यापुढील काळात वाटचाल करतील. 2014 ते 2019 या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वीपणे राज्याची धुरा सांभाळलेली आहे .त्यामुळे ते पुन्हा एकदा चांगल्याप्रकारे राज्याला विकासाच्या वाटेवर नेतील असा विश्वास राज्यातील जनतेला आहे. लाडक्या बहिणी सोबत लाडके भाऊ देखील भाजपच्या पाठीशी विधानसभा निवडणूकीत राहिलेली आहे. महायुतीला राज्यात ऐतिहासिक यश मिळालेले असून विरोधकांचा सुफडा साफ झालेला आहे.
देवेंद्र फडणवीस होणार नवे CM:भाजप गटनेतेपदी निवड
मुंबई-महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 11 दिवसांनी आज नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार आहे. विधीमंडळ पक्षाचा नेता निवडीसाठी भाजपचे केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. आज दुपारी महायुतीमधील नेते राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करतील. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता आझाद मैदान, मुंबई येथे शपथविधी होणार आहे.
देवेंद्र फडणवीस हे वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. वर्षावर एकनाथ शिंदेसोबत ते चर्चा करत असून काही वेळाने हे नेते राज्यपालांकडे जातील.देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर दुपारी 2 वाजता महायुतीच्या तिन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांचीम्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार यांची बैठक होणार आहे. महायुतीची ही पहिलीच अधिकृत बैठक असेल. या बैठकीत मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाला अंतिम स्वरूप देण्यात येईल. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता हे तिन्ही नेते एका शिष्टमंडळासह राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा सादर करतील.
सुप्रीम कोर्टाचा पुणे पोलिसांना झटका:पोलीस कारभाराचा व्हिडीओ FB वर टाकणाऱ्यावरील पोलीस कारवाई रद्द
अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायद्यानुसार सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट करणे नागरिकांच्या स्वातंत्र्याचा भाग आहे. त्यावर कोणी इतर व्यक्ती अपमानजनक टिपणी करत असेल, तर पोस्ट करणाऱ्यांचा तो अपराध नाही
पोलिसांकडून बेकायदेशीर कारभार झाल्याने,हि समस्या सार्वजनिक स्वरूपात मांडली.त्यामुळे FB पोस्ट टाकणाऱ्यावर पोलिसांनी सूड भावनेतून कारवाई केली. .
पुणे -येथे 27 नोव्हेंबर 2022 रोजी पुण्यातील जंगली महाराज रस्ता येथे विजय सागर यांनी फुटपाथच्या बाजूला त्यांचे वाहन पार्किंग केले होते. त्यावेळी महिला वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी संबंधित वाहन उचलून शिवाजीनगर वाहतूक पोलिस चौकीत नेले. सागर हे त्यांची मुलगी आणि एक वर्षाचा नातू यांच्यासह सदर ठिकाणी गेल्यानंतर त्यांना 785 रुपयांचे चलन भरण्यास सांगितले. तसेच महिला वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी 1000 रुपयांचा ‘कार्पोरेशन फाईन’ सांगत एकप्रकारे लाचेचीही मागणी केली. सागर यांनी ही लाच देण्यास नकार दिला. तसेच याबाबतचा फेसबुक लाईव्ह व्हिडिओ केला.हा फेसबुक लाईव्ह व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊन महिला पोलिस कर्मचारी विरोधात अनेक जणांनी अवमानकारक टिप्पणी केली. याबाबतची माहिती सागर यांना समजल्यानंतर सागर यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावरून काढून टाकला. मात्र, 29 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित महिला पोलिस हवालदाराने सागर आणि अज्ञात व्यक्ती यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 500, 509 ,34 सूचना प्रद्योगिक अधिनियम कलम 67 नुसार एफआयआर दाखल केला.
फौजदारी गुन्हा दाखल झाल्यानंतर सागर यांनी याबाबत सत्र न्यायालयातून जामीन मिळवून घेतला. तसेच फौजदारी गुन्हा रद्द करण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. परंतु उच्च न्यायालयाने याबाबत दोषारोपपत्र दाखल झाल्याने, सदर याचिका निकाली काढण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे सागर यांनी सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल करून दाद मागितली. त्यांचे वकील सत्या मुळे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, घटनेच्या कलम 19 (१) (ए) नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायद्यानुसार सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट करणे नागरिकांच्या स्वातंत्र्याचा भाग आहे. त्यावर कोणी इतर व्यक्ती अपमानजनक टिपणी करत असेल, तर पोस्ट करणाऱ्यांचा तो अपराध नाही. महाराष्ट्र नगरनिगम अधिनियम नुसार एक हजार रुपये वाहतूक पोलिसांनी मागणे बेकायदेशीर गोष्ट होती.
सर्वोच्च न्यायालयाने याबाबत सांगितले की, संबंधित प्रकरण आणखी पुढे घेऊन जाणे कायदेशीर कारवाईचा दुरुपयोग ठरेल. संबधित प्रकरण हे उच्च न्यायालयाने यापूर्वीच रद्द करण्याची गरज होती. कोणत्या पोस्टवर कोणी अश्लील आणि अपमानजनक भाष्य केले असेल तर तक्रारदार यांना त्यांच्या विरोधात तक्रार करण्याचा हक्क आहे. मात्र, सागर यांच्या विरोधात कोणतीही अपराधी गोष्ट असल्याचे दिसून येत नाही. त्यांनी केवळ त्यांची समस्या सार्वजनिक स्वरूपात मांडली. पोलिसांकडून एक हजार रुपये मागणी बेकायदेशीर होते. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी सूड भावनेतून कारवाई केली.
पुण्यात विधानसभा मतमोजणीसाठी संगणक पुरवठादार ठेकेदारावर गुन्हा दाखल
पुणे:महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत पुण्यातील काेरेगाव पार्क येथे मतमाेजणी केंद्र ठेवण्यात आले हाेते. सदर ठिकाणी मतमाेजणीच्या 1 दिवस अगोदर म्हणजे 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत मतमाेजणी पूर्व रंगीत तालीम घेणे गरजेचे हाेते. परंतु मतमाेजणीच्या प्रक्रियेत संगणक पुरवठा व जाेडणीचे कामकाज करणाऱ्या इंदु इन्फाेटेक कंपनीने दिरंगाई केली. त्यामुळे मतमाेजणी रंगीत तालीम घेता न आल्याने संबंधित कंपनीवर काेरेगाव पार्क पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मंडल अधिकारी पुष्पा वसंत गाेसावी (वय-54) यांनी इंदु इन्फाेटेक कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्याविरोधात पाेलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार लाेकप्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 134 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतमाेजणीच्या दिवशी इंदु इन्फाेटेक या कंपनीस संगणक पुरवठा व जाेडणीच्या कामकाजाकरिता करारनामा करुन आदेशित केले हाेते. संबंधित करारनाम्यानुसार संगणक पुरवठा व जाेडणीचे कामकाज मतदानाच्या 1 दिवस अगोदर म्हणजे 22 नोव्हेंबर रोजी भारतीय खाद्य निगम, काेरेगाव पार्क, पुणे याठिकाणी सकाळी 11 वाजेपर्यंत पूर्ण न केल्याने मतमाेजणी पूर्व रंगीत तालीम घेता आली नाही. याबाबत पुढील तपास सहाय्यक पाेलिस निरीक्षक पुरुषाेत्तम देवकर करत आहेत.
विद्यापीठात क्रीडा संस्कृती व क्रीडा क्षेत्राला नव संजीवनी देणार
पुणे, दि.३ डिसेंबर: क्रीडा क्षेत्रातील मातब्बर देश म्हणून उदयास आणायचे असेल, तर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास करणे, क्रीडा धोरणाची अंमलबजावणी करणे, अनुभवी खेळाडूंचा सल्ला व मार्गदर्शन घेणे, विद्यापीठ स्तरावर खेळाबाबत सकारात्मक विचार विकसित करणे आणि क्रीडा कार्यक्रमांबाबत जागरूकता निर्माण करणे. हा मुख्य उद्देश ठेऊन एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने प्रथमच ‘स्पोर्टस अॅडव्हायझरी बोर्डची’ स्थापना केली.
डब्ल्यूपीयूच्या क्रीडा विभागाच्या वतिने स्थापित करण्यात आलेल्या ‘स्पोर्टस अॅडव्हायझरी बोर्ड’ची पहिली बैठक डब्ल्यूपीयूच्या संत श्री ज्ञानेश्वर हॉलमध्ये संपन्न झाली. या वेळी उपस्थित मान्यवरांनी वरील निर्णयाला संमती दर्शवून लवकरात लवकर कार्यास सुरूवात करण्यात येणार आहे.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड होते. तसेच डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, कुलसचिव गणेश पोकळे, डब्ल्यूपीयूचे क्रीडा संचालक डॉ.पी.जी. धनवे व सह संचालक अभय कचरे उपस्थित होते.
या ‘स्पोर्टस अॅडव्हायझरी बोर्ड’ मध्ये देशातील नामांकित क्रीडा खेळाडूंपैकी अंजली भागवत (शुटींग, राजीव गांधी खेल रत्न अवॉर्ड), शांताराम जाधव (कबड्डी, अर्जुन अवॉर्ड), मनोज पिंगळे (बॉक्सिंग, अर्जुन अवॉर्ड),श्रीरंग इनामदार (खो खो, अर्जुन अवॉर्ड), अभिजित कुंटे (बुद्धिबळ, ध्यानचंद पुरस्कार), प्रा. विलास कथुरे (कुस्ती, शिव छत्रपती पुरस्कार), मनोज एरंडे (स्विमिंग, शिव छत्रपती पुरस्कार), अजित जरांडे (जिम्नॅस्टिक, शिव छत्रपती पुरस्कार), योगेश धाडवे ( ज्यूडो, शिव छत्रपती पुरस्कार), वैशाली फडतरे (व्हॉलीबॉल, शिव छत्रपती पुरस्कार), डॉ. कौस्तुभ राडकर (आयर्न मॅन, शिव छत्रपती पुरस्कार), डॉ. पल्लवी कवाणे (योगा, वर्ल्ड चॅम्पियन), कपीलेश भाटे ( हॉर्स रायडींग, आंतरराष्ट्रीय खेळाडू ), मंदार ताम्हाणे (फूटबॉल, सीईओ नॉर्थ इस्ट युनायटेड फूटबॉल क्लब), असिम पाटील (ई स्पोर्टस आणि इंडस्ट्रीयलिस्ट), सुंदर अय्यर (सचीव, भारतीय लॉन टेनिस संघटना), कमलेश पिसाळ (सचिव, एमसीए), अपुर्व सोनटक्के (बास्केटबॉल, आंतरराष्ट्रीय खेळाडू), उमेश झिरपे (एव्हरेस्ट वीर), योगेश नातू (फूटबॉल), डॉ. अजित मापारी (स्पोर्ट मेडिसिन), डॉ. स्वरूप सवनूर (मेंटल ट्रेनिंग कोच ) आणि मिंलिंद ढमढेरे (ज्येष्ठ क्रीडा पत्रकार) यांचा समावेश असून ते बैठकीला उपस्थित होते.
या व्यतिरिक्त रेखा भिडे (हॉकी, अर्जुनी अवॉर्ड), कमलेश मेहता (टेबल टेनिस,अर्जुन अवॉर्ड) व आदित्य कानिटकर (गोल्फ कोच) हे ऑनलाईन उपस्थित होते.
बैठकीमध्ये मान्यवरांनी विचार मांडून क्रीडा विषयक शास्त्रोक्त माहिती, क्रीडा विषयक उपक्रम, राष्ट्रीय क्रीडा दिन व क्रीडा सप्ताहाचे आयोजन करणे आणि बोर्डाच्या माध्यमातून खेळाडूंना भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविण्यासाठी परिपूर्ण मदत केली जाणार आहे. डब्ल्यूपीयूच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्राला आवश्यक आंतरराष्ट्रीय सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहे. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक उपलब्ध करून खेळाडूंना मार्गदर्शन दिले जाईल. विभिन्न खेळासाठी आवश्यक अत्याधुनिक क्रीडा सुविधा, विद्यापीठ स्तरावर पुण्यातील व खाजगी विद्यापीठांमध्ये विभिन्न खेळाच्या लीग स्पर्धेचे आयोजन आणि भविष्यात स्पोर्टस युनिव्हर्सिटी उघडण्याचा मानस आहे. क्रीडा संस्कृतीला वृध्दिगत करण्यासाठी बहु आयामी दृष्टीकोण ठेऊन यामध्ये विद्यार्थी, प्राध्यापक, प्रशासन, क्रीडा तज्ज्ञ आणि व्यापक समुदाय यांचा समावेश आवश्यक आहे.
या बैठकीला एमआयटी डब्ल्यूपीयूचे आंतरराष्ट्रीय खेळाडू व विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थिती होते.
आदर्श परिचारिका व आदर्श माता कै. अन्नपूर्णाबाई जोशी पुरस्कार सोहळा संपन्न
पुणे ः अबला महिलांसाठी मदत करणाऱ्या आणि शिक्षणसेवेसाठी नेहमी तत्पर असणाऱ्या अन्नपूर्णाबाई जोशी यांनी नेहमीच काळाच्या पुढे जाऊन विचार केला आणि समाजसेवेत मोलाचे योगदान दिले. अन्नपूर्णाबाई जोशी यांचे कार्य हे उद्याच्या पिढीला प्रेरणादायी आहे, असे मत गीताधर्म मंडळाचे अध्यक्ष डाॅ. मुकुंद दातार यांनी व्यक्त केले.
आदर्श परिचारिका व आदर्श माता कै. अन्नपूर्णाबाई जोशी पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन सदाशिव पेठेतील गीताधर्म मंडळातील सभागृहात करण्यात आले. यंदाचा पुरस्कार आदर्श विद्यार्थी प्रकाशनचे रमेश कुंदूर यांना प्रदान करण्यात आला. या प्रसंगी शिक्षणतज्ञ डॉ. न.म. जोशी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र असे होते. या कार्यक्रमात रमेश कुंदूर यांनी कैलासाचे दिव्य अंतरंग हा स्लाईड शो सादर केला.
रमेश कुंदूर म्हणाले, मला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे आणखी जोमाने काम करण्याची जबाबदारी आहे. ‘श्यामची आई’ या पुस्तकाच्या माध्यमातून घराघरातील मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवण्याचा प्रयत्न केला. मला ही प्रेरणा माझ्या आई-वडिलांकडून मिळाली आहे. यापुढेही माझ्या हातून उत्तम कार्य घडावे, असेही त्यांनी सांगितले.शैलजा कात्रे यांनी प्रास्ताविक केले. सुरेखा जोशी यांनी आभार मानले.
जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे आयोजन अकरा लाखाहून अधिक जंतनाशक गोळ्यांचे वितरण होणार
पुणे, दि. ३: राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे औचित्य साधून ४ ते १० डिसेंबर २०२४ या कालावधीत मोहीम राबविण्यात येणार असून जिल्ह्यात सुमारे ११ लाख ६० हजार २७२ लाभार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी दिली आहे.
राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुलांमुलींना शाळा व अंगणवाडी केंद्रस्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे असा आहे. ही मोहीम केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सार्वजनिक आरोग्य, महिला व बालविकास आणि शिक्षण विभागामार्फत सर्व अंगणवाडी, शाळा, महाविद्यालयात मोहीम राबविण्यात येणार आहे.
या अंतर्गत सर्व शासकीय शाळा, शासकीय अनुदानित शाळा, आश्रम शाळा, महानगरपालिका शाळा, सर्व खाजगी अनुदानित शाळा, सर्व खाजगी अनुदानित शाळा, सैनिकी शाळा, सी.बी.एस.सी. स्कूल, नवोदय विद्यालय, सुधारगृह, सर्व खाजगी इंग्रजी माध्यमिक शाळा, मदरसे, मिशनरी स्कूल, गुरुकुल, संस्कार केंद्र, सर्व कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय प्रथम वर्षाचे विद्यार्थी, नर्सिंग कॉलेज, आय.टी.आय., तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी, कला, वाणिज्य व विज्ञान, फार्मसी महाविद्यालय. डी.एड. महाविद्यालय, सर्व ग्रामीण व शहरी अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्र आदी ठिकाणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
जंतनाशक गोळीचे सेवन केल्यानंतर सौम्य प्रकारची लक्षणे आढळल्यास सावलीत विश्रांती घ्यावी तसेच स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे, तीव्र स्वरुपाची लक्षणे आढळल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रास घेवून जावे. याबाबत अधिक माहितीकरीता १०४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती डॉ. देसाई यांनी दिली आहे.
संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद: सक्षम भारताच्या निर्मितीसाठी सशक्त युवापिढी घडविणे अत्यंत महत्वाचे आहे. याकरिता ४ डिसेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात १०८ प्राथमिक आरोग्य केंद्र, ५४४ उपकेंद्र (आरोग्य मंदिरे) अंतर्गत असणाऱ्या ५ हजार ५७० शाळा आणि ४ हजार ६९३ अंगणवाडी व १६५ महाविद्यालय मध्ये एकूण ११ लाख ६० हजार २७२ इतक्या जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. पालकांनी १ ते १९ वर्ष वयोगटातील मुलामुलींना जंतनाशक गोळी अवश्य घ्यावी.
0000
पुणे येथे बाल आनंद मेळावा संपन्न
दिव्यांग विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुण ओळखून त्यांना प्रोत्साहित करावे- दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी
पुणे, दि. 3: शिक्षकांनी दिव्यांग विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुण ओळखून त्यांना त्या त्या क्षेत्रात प्रोत्साहित करण्यासह यशस्वी वाटचालीकरीता मार्गदर्शन करावे, असे आवाहन दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त प्रवीण पुरी यांनी केले.
आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित बाल आनंद मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे आदी उपस्थित होते.
श्री. पुरी म्हणाले, शासकीय व शासन अधिपत्याखालील आस्थापनेवर राखीव असलेल्या ४ टक्के जागांवर दिव्यांग उमेदवारांना नोकरी मिळण्यासोबतच शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्याकरीता शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावेत.
श्री. पाटील म्हणाले, कार्यक्रमाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कला व गुण बघितले असता तेही सर्वसामान्यापेक्षा कमी नाहीत. सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व क्षेत्रांमध्ये प्राविण्य मिळवण्याबाबत प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
श्री. देवढे यांनी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाचे महत्त्व, जिल्ह्यामध्ये दिव्यांग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्था, दिव्यांगासाठी शासन स्तरावरून अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या योजना आदींची माहिती दिली.
यावेळी दिव्यांग मुलांच्या विशेष शाळेतील विद्यार्थ्यांचे सनई चौघडा वादन, गणेश वंदना व मल्लखांब प्रात्यक्षिकद्वारे सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रकला, अॅबिलिकपिक्स, कला, संगीत व क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या ४१ यशस्वी दिव्यांग विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
बाल आनंद मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील ८१ दिव्यांगाच्या विशेष शाळा व कर्मशाळातील ३ हजार २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला,
0000
भाजपचा कारभार म्हणजे वधू – वराचा पत्ता नाही आणि हॉल बुक करत आहेत:अनंत गाडगीळ यांचा टोमणा
पुणे:विधानसभेच्या निवडणूका होऊन १० दिवस उलटले तरी अजूनही भा.ज.प. नेता निवडू शकलेली नाही. लोकशाही प्रथेप्रमाणे निकालांनंतर बहुमतवाला पक्ष नेता निवड करतो. त्यांनतर सदर नेता राज्यपालांची भेट घेऊन बहुमताचा पुरावा देतो. त्या अनुषंगाने राज्यपाल सरकार स्थापन करण्यासाठी बहुमतवाल्या पक्षाच्या नेत्यास आमंत्रित करतात व त्यांनतर शपथविधी होतो.
महाराष्ट्रात प्रथा तर सोडाच पण हि प्रक्रियाही सुरु होण्यापूर्वीच भा.ज. प. चेच अध्यक्ष शपथविधीची तारीख जाहीर करतात. ह्यातुन एकाधिकारीशाही, संविधानाची पायमल्ली, लोकशाही प्रथांचे विसर्जन याचे प्रतिबिंब दिसून येते. ही देशाच्या आणि लोकशाहीच्या दृष्टीने धोकादायक बाब आहे. थोडक्यात, भा. ज. प. चा गेल्या आठ दिवसातील कारभार म्हणजे हॉल बुक केला आहे , म्हणून आता वधू वर शोधायचा, “जावई निवडीपूर्वीच रुसलेले” अश्यातला प्रकार असल्याची उपरोधक टीका काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईत ९ लाखाहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त
पुणे, दि. 3: पुणे विभागाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत आंबेगाव तालुक्यात मंचर गावचे हद्दीत चाकण रोडवरील पेट्रोल पंपासमोर चविष्ठ ढाब्याजवळ, भोरवाडी येथे वाहनाची तपासणी केली असता वाहनातून परराज्यनिर्मीत असलेला भांग मिश्रीत पदार्थाच्या वाहनासह एकूण ९ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांनी दिली आहे.
याप्रकरणी प्रविण मगाराम चौधरी, देहुफाटा, चाकण ता. खेड यांच्याविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा अधिनियम १९४९ अन्वये १ डिसेंबर रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच सदर गुन्हयामध्ये महालक्ष्मी आयुर्वेदिक फार्मानिर्मीत स्पेशल बावा विजयावटी भांग मिश्रीत पदार्थाने तयार केलेल्या गोळयांच्या पाकीटांनी भरलेल्या सुमारे ५० किलो ग्रॅमच्या एकूण ५ गोण्या अंदाजे २५० किलो ग्रॅम वजानाचे भांग मिश्रीत पदार्थ, एक पांढऱ्या रंगाचे मारुती सुझुकी कंपनीचे सीएनजी सुपर कॅरी मॉडेलचे चार चाकी वाहन क्रमांक व एक व्हिओ कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाईत निरीक्षक नरेंद्र थोरात, दुय्यम निरीक्षक विराज माने व धिरज सस्ते, प्रताप कदम, सतिश पौंधे, शशिकांत भाट,रणजीत चव्हाण, अनिल थोरात, अमोल दळवी, राहुल तारळकर सहभाग घेतला. अवैद्य दारू व्यवसाय करणाऱ्यावर अशाच प्रकारची कारवाई सूरू राहणार असून कोठेही अवैद्य दारू व्यवसाय सूरू असल्यास राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक ०२०-२९९११९८६ वर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आले आहे.
