Home Blog Page 556

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे उद्धाटन

0

पुणे, दि. १: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे दूरदृष्यप्रणालीद्वारे शिवाजीनगर पोलीस कवायत मैदान येथून उद्धाटन करण्यात आले.

यावेळी यावेळी आमदार बापुसाहेब पठारे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख संचालक डॉ. सुहास दिवसे, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, क्रीडा व युवक सेवा आयुक्त सुरज मांढरे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, ‘पीएआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, राज्यातल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, त्यांना चांगले उपचार मिळावेत, आरोग्य विषयक मदत मिळावी म्हणून आजपासून राज्यभर जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता कक्ष कार्यान्वित करण्यात येत आहेत. या कक्षामुळे आपल्या जिल्ह्यातल्या नागरिकांना मोठा फायदा होईल.

जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष
दुर्धर आजारावरील उपचाराकरीता आर्थिक सहाय्य तसेच आपत्तीमध्ये देण्यात येणारे आर्थिक साह्य याबाबत नागरिकांना जिल्हा स्तरावर सुविधा उपलब्ध होण्यासोबतच मार्गदर्शन मिळण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने खोली क्रमांक १० तळमजला, जुनी जिल्हा परिषद येथे हा कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. या कक्षासाठी एक पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, एक समाजसेवा अधीक्षक, लिपिक, समन्वयकाची नेमणूक करण्यात आली आहे. वैद्यकीय कक्षामध्ये शासनाच्या सर्व वैद्यकीय सुविधा व आरोग्य विषयक योजनांचे माहितीफलक लावण्यात आले आहेत. या कक्षाला भेट देणाऱ्या रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांसाठी बैठक व्यवस्था व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय आदी सुविधा करण्यात आलेल्या आहेत.

निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची कक्षाला भेट
उद्घाटन कार्यक्रमानंतर निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी कक्षाला भेट देऊन कामकाजाबाबत माहिती घेतली. यावेळी वैद्यकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. मानसिंग साबळे यांनी त्यांचे स्वागत केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयाचे उद्धाटन

पुणे, दि. १: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नूतन कार्यालयाचे विधानभवन येथे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले, महामंडळाचे कार्यकारी संचालक तुषार ठोंबरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.

श्री पवार म्हणाले, आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा आहे. या महामंडळाच्या माध्यमातून, शेतीपूरक व्यवसाय लघु उद्योग, वाहतूक, पुरवठा, विपणन, साठवणूक, प्रक्रिया उद्योग अशा विविध क्षेत्रामध्ये स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी अर्थसहाय उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे महामंडळ समाजाच्या उन्नतीसाठी एक प्रभावी साधन बनेल, असा विश्वास श्री. पवार यांनी व्यक्त केला.

राज्यातील ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या तरुण व बेरोजगार तरुणांना योग्य संधी मिळाल्यास ते समाजासाठी आणि देशासाठी मोठे योगदान येऊ शकतात, या उद्देशाने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. महामंडळाला निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जणार नाही. ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील बेरोजगार तरुण, तरुणींना मदतीचा हात देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी श्री. पवार दिली.

तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर- उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्र दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

पुणे, दि. 1: आजच्या वेगवान तंत्रज्ञानाच्या युगात आपली शेती आधुनिक करणे ही काळाची गरज आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रात ‘एआय’च्या वापरासाठी 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात 50 हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर शेतीला थेट फायदा होईल. ऊसाच्या शेतीतसह इतरही पीकांकरीता ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिल्यानंतर ते बोलत होते. यावेळी आमदार बापुसाहेब पठारे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जमाबंदी आयुक्त व भूमी अभिलेख संचालक डॉ. सुहास दिवसे, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, क्रीडा व युवक सेवा आयुक्त सुरज मांढरे, साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, ‘पीएआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, स्वातंत्र्यसैनिक यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या वर्धापन दिन व जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन श्री. पवार म्हणाले, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी झालेल्या, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात शहीद झालेल्या, महाराष्ट्राच्या वीर सुपुत्रांना अभिवादन करुन संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात योगदान दिलेल्या महाराष्ट्रवीरांच्या त्यागाला वंदन करतानाच त्यांच्या कुटुंबियांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

भारत चोख प्रत्युत्तर देईल…
पेहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीयांना आपले प्राण गमवावे लागले, त्यात पुण्याचे संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांचा समावेश होता. या दहशतवादी हल्ल्यात जीव गमालेल्या सर्व भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन त्यांच्या कुटुंबियांच्या प्रति सहसंवेदना व्यक्त केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत या भ्याड हल्ल्याला लवकरच चोख प्रत्युत्तर देऊन दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना कायमची अद्दल घडवेल. या परिस्थितीत प्रत्येक भारतीयाने सामाजिक सलोखा, शांतता, बंधुता, ऐक्य कायम राखावे, ही आपल्या सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे.

जातनिहाय जनगणना करण्याची मागणी अनेक व्यक्ती, संस्था, संघटनांची गेल्या अनेक दशकांपासून करण्यात येत होती. त्याअनुषंगाने कालच केंद्रीय मंत्रीमंडळाने जातनिहाय जनगणना करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे सर्व समाज घटकांना न्याय्य हक्क मिळण्यास मदत होईल. केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करुन संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाचे मनापासून आभार मानतो.

विकसित भारत, विकसित महाराष्ट्र…
देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ असलेल्या महाराष्ट्राचा देशाच्या एकूण राष्ट्रीय सकल उत्पन्नात (जीडीपी) साडे तेरा टक्के इतका वाटा आहे. या पार्श्वभूमीवर, विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2025-26 या आर्थिक वर्षाचा सात लाख वीस कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. पूर्वानुभवाच्या बळावर राज्यातील जनतेच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण करण्याचा कसोशीचा प्रयत्न या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

‘कृषी हॅकेथॉन’चे नवे पाऊल…
कृषी हॅकेथॉनच्या माध्यमातून राज्यातील युवा संशोधक, स्टार्टअप्स, कृषितज्ज्ञ आणि शेतकरी बांधवांना एकत्र आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीसंबंधी समस्या सोडवण्याचा प्रयत्न खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या, संस्थांच्या मदतीने शासनस्तरावर करण्यात येणार आहे. त्यामुळे नवकल्पक संशोधकांना संधी मिळणार आहे. या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल.

‘इनविट’ स्थापन करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य…
राज्यात रस्ते आणि पूल आदी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि भांडवल उभारणीसाठी ‘महा इनविट’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘इनविट’ स्थापन करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. यामुळे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध होणार आहेत.

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025’ जाहीर…
‘महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण, 2025’ला मान्यता देण्यात आली असून हे धोरण 2030 पर्यंत लागू राहणार आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी येत्या पाच वर्षांसाठी सुमारे 2 हजार कोटी रुपयांच्या निधीच्या तरतूदीस मान्यता देण्यात आली आहे. या धोरणामुळे इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन आणि वापराला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे, यामुळे पर्यावरणाचा समतोल साधला जाणार आहे.

पुणे शहर परिसराच्या विकासासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबविले जात आहेत. यामध्ये इंद्रायणी, पवना, मुळा आणि मुठा नद्यांच्या स्वच्छतेसाठी व नदीत होणारे प्रदुषण नियंत्रण करण्यासाठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्यात येत आहेत. पायाभूत सुविधा हा राज्याच्या प्रगतीचा कणा आहे. राज्यातील मेट्रो, रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली असून पुणे मेट्रोचे कामेसुद्धा वेगाने सुरु आहे, यामुळे येत्या सार्वजनिक वाहतुकीला गती मिळेल. ‘टेमघर’धरणाच्या गळती प्रतिबंधक उपाययोजनांसाठी 488 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

पुणे जिल्ह्याला एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याच्या अंतर्गत जिल्ह्यातल्या 37 ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेलच्या माध्यमातून तसेच शासन सहभागातून या ठिकाणचा विकास करण्यात येणार आहे. त्यामुळे किमान 50 हजार जणांना थेट तर 5 लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

स्मारकांची कामे प्रगतीपथावर…
क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या स्मारकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. राजगुरुनगरच्या शहीद राजगुरु यांच्या स्मारकाचे काम अत्यंत वेगाने सुरु आहे. पुणे शहरातल्या भिडे वाड्यात क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तसेच वस्ताद लहुजी साळवे तसेच वढू बुद्रुक आणि तुळापूर येथे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम सुरू आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्यदिव्य स्मारक चौंडी अहिल्यानगर येथे करण्यात येणार आहे. ही सर्व कामे गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून भरघोस निधी…
पुणे जिल्हा राज्याचे ग्रोथ इंजिन असल्याने जिल्ह्याच्या विकासासाठी नियोजन विभागाने जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), सन 2025-26 अतंर्गत पुणे जिल्ह्याकरिता 1 हजार 379 कोटी रुपये इतका नियतव्यय मंजूर केला आहे. नियोजन विभागाने घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा जवळपास 288 कोटींची वाढ त्यात करण्यात आली आहे. अनुसुचित जाती उपयोजना आणि आराखडा 145 कोटी रुपयांचा आहे, तर आदिवासी उपयोजनेच्या नियतव्ययामध्ये वाढ करुन 65.46 कोटींचा आराखडा मंजुर केला आहे.

सर्व क्षेत्रात महाराष्ट्राची घोडदौड कायम राखताना ‘सुसंस्कृत राज्य’ ही महाराष्ट्राची ओळख आणखी ठळक करण्याकरीता सर्वांनी मिळून प्रयत्न करावे, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्याहस्ते पोलीस महासंचालक सन्मान चिन्हप्राप्त पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्माचिन्ह, तसेच गडचिरोली जिल्ह्यातील सेवा बजावलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशेष पदक तसेच कामगार विभागातील कर्मचाऱ्यांना विशिष्ठ सेवेसाठी प्रोत्साहनात्मक प्रशस्तीपत्र आणि महसूल विभागातील जिल्हा आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यावेळी श्री. पवार यांनी पोलीस दल, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दलाच्या संयुक्त परेड संचलनाचे निरीक्षण केले. यावेळी झालेल्या शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी कार्यक्रमास उपस्थित स्वातंत्र्यसैनिकांची भेट घेवून श्री. पवार यांनी शुभेच्छा दिल्या.

ऐंशी शहरांमध्ये मोफत‘प्री-नीट मेगा मॉकटेस्ट’ घेऊन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न

पुणे   मे २०२५ : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) येत्या दि. ४ मे रोजी होणाऱ्या नीट-यूजी २०२५ परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मोशन एज्युकेशन या संस्थेने एक भव्य मॉक टेस्ट आयोजित केली. ही सिम्युलेशन परीक्षा केवळ कोटा येथेच नव्हे तर एकाच वेळी देशभरातील ८० शहरांमध्ये पार पडली. ‘नीटची तयारी करणाऱ्या ,००० विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतला.

कोटामध्ये ही मॉक टेस्ट दुपारी  ते  या वेळेत घेण्यात आली. नीट परीक्षेच्या प्रत्यक्षातील वेळापत्रकाशी ती जुळणारी होती.

मोशन एज्युकेशनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन विजय यांनी वैयक्तिकरित्या परीक्षा केंद्रांना भेट देत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. त्यांनी सांगितले, “नीट-यूजी २०२५’च्या नवीन परीक्षापद्धतीप्रमाणे आणि अपेक्षित काठिण्यानुसार ही मॉक टेस्ट आमच्या वरिष्ठ प्राध्यापकांनी अत्यंत काटेकोरपणे तयार केली आहे.”

संस्थेचे संयुक्त संचालक आणि नीट विभागप्रमुख अमित वर्मा यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत सांगितले, “नवीन टॉपिक्स सुरू करण्यापेक्षा दिलेल्या वेळेत पेपर सोडवण्याचा सराव करा. तीन तासांत १८० प्रश्न सोडवण्याची क्षमता विकसित करा आणि प्रत्येक चाचणीनंतर आपल्या चुकांचे सखोल विश्लेषण करा. संकल्पना समजण्यातील अडचणी, दुर्लक्ष, लिखाणातील चुका किंवा वेळेचे व्यवस्थापन अशा ज्या कारणांनी चुका होत आहेत, त्या ओळखा आणि त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेवटच्या तयारीच्या काळात तणावमुक्त रहा आणि आरोग्याला प्राधान्य द्या.”

शुभ्रा सिंग ही या मॉक टेस्टमध्ये सहभागी झालेली विद्यार्थिनी म्हणाली, “ही मेगा मॉक टेस्ट खऱ्या नीट परीक्षेचे वातावरण निर्माण करीत होती. आमची तयारी किती झाली आहे, हे समजण्यास या टेस्टमुळे मदत झाली आणि वेळेचे नियोजन सुधारायला संधी मिळाली.”

राजीव कुमार हा विद्यार्थी म्हणाला, “अशी वास्तव परीक्षेसारखी चाचणी देणे म्हणजे खरी परीक्षा कशी असते, हे समजून घेणे आणि त्या तणावाचा सामना कसा करावा हे शिकणे. ही एक अत्यंत उपयुक्त तयारी ठरली.”

कोंढवा येवलेवाडी कार्यालयाच्या तळमजल्यावर ग्रंथालय आणि टेरेसवर गार्डन

पुणे- मुख्यमंत्री यांचे निर्देशानुसार १०० दिवसांचा ७ कलमी कृती आराखड्याच्या अनुषंगाने व कामगार दिन व कोंढवा येवलेवाडी कार्यालयाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सहाय्यक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांचे संकल्पनेतून कार्यालयातील सेवकांना सध्याच्या संगणक व इंटरनेटच्या युगामध्ये सुद्धा वाचनाचे स्थान अबाधित असून, वाचनामुळे मेंदूचा व्यायाम व्हावा. त्यांची एकाग्रता वाढावी. सातत्याने वाचन केले तर आपल्यामधील आत्मविश्वाेस कसा वाढतो. वाचनाने डोळ्यावर येणारा ताण हा टि.व्ही. व संगणकाकडे बघून येणाऱ्या ताणापेक्षा खूपच कमी असल्याने या सर्व बाबी सेवकांकरिता आवश्यक असल्याने कोंढवा येवलेवाडी कार्यालयाच्या तळमजल्यावर ७०० ते ८०० पुस्तकांचे ग्रंथालय अतिशय छोट्या जागेत तयार करणेत आले आहे.तसेच कार्यक्षेत्रातील ओला व सुका कचऱ्यापासून कार्यालयाच्या गच्चीवर ओला व सुका कचरा वापरून बाग फुलाविणेत आली आहे.

या तयार करण्यात आलेल्या टेरेस गार्डनचे उद्घाटनप्रमुख पाहुणे अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी पी, व उप आयुक्त जयंत भोसेकर , यांच्या हस्ते पुणे महानगरपालिका व साई जनसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या टेरेस गार्डन तसेच नागरिक व सेवक यांचेसाठी वाचनालय यांचा उद्घाटन समारंभ पार पडला.
सदर प्रसंगी मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतील १०० दिवसाचा ७ कलमी कार्यक्रमांतर्गत कोंढवा येवलेवाडी कार्यालयात राबविण्यात आलेले विविध उपक्रमाबाबत भेट देवून कार्यालयाची पाहणी केली. भेटी दरम्यान त्यांनी कार्यालयातील सर्व विभागाची पाहणी करून काही आवश्यक व मार्गदर्शक सूचना केल्या. कार्यालयीन परिसर , सुशोभीकारण , टेरेस गार्डन व उन्हाची दाहकता लक्षात घेवून पक्षासाठी केलेली पिण्याचे पाणी व्यवस्था तसेच परिसरात केलेली नागरिकांसाठीची बैठक व्यवस्था , दिव्यांग व्यवस्था , अभ्यागत नोंदणी कक्ष , हिरकणी कक्ष , समुपदेशन कक्ष , दुचाकी पार्कींग व्यवस्था , पिण्याचे पाणी व्यवस्था यांची पाहणी केली. तसेच कार्यालयातील विविध विभागाची पाहणी करून नियोजनाचा आढावा घेतला. पुणे महानगरपालिका ही संस्था (वरं जनहितं ध्येयम ) नागरिकांशी निगडीत असून आपण केलेल्या कामाचा प्रभाव हा नागरिकांवर होत असतो व नागरिकांकडून आपल्या सेवेबाबत मिळणारे समाधान कौतुक हे आपल्या कामाची पावती असते ही कोंढवा येवलेवाडी कार्यालयास मिळाली असल्याचे सांगितले तसेच कार्यालयाने अगदी कमी जागेत छान काम केलेबद्दल कौतुक करून पाठीवर शाबासकीची थाप दिली.
पृथ्वीराज बी पी यांनी कार्यालयास दिलेल्या भेटीबद्दल कार्यालयाच्या वतीने त्यांचे स्वागत करून आभार व्यक्त करणेत आले. सदर पाहणी दरम्यान अतिरिक्त महापालिका आयुक्त यांनी सर्व खात्यांच्या कामकाजाबाबत सर्व पातळीवर उत्कृष्ट शेरा देवून समाधान व्यक्त करून कौतुक केले आहे. तसेच आवर्जून गुणवंत सेवकांचा सत्कार व कौतुक समारंभास अनमोल वेळ देवून सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
सदर कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त दिपक राऊत , अपेक्स कमिटी मेंबर मंदार वेदक , श्रीमती नेराळे मॅडम , तंवर मॅडम , मोहल्ला कमिटी सदस्य , धायभर सदस्य तसेच उप अभियंता चौधरी मॅडम , प्रशासन अधिकारी मोरे , वरिष्ठ आरोग्य निरीक्षक दुल्लम व कदम कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

माझ्या स्थायी समिती अध्यक्ष ते महापौर आणि केंद्रीय राज्यमंत्री पदाच्या कारकीर्दीचा फायदा जनतेला पोहोचविण्यासाठी मी कटीबद्ध – मुरलीधर मोहोळ

पुणे- शहरातील वाहतूक सुधारण्याच्या प्रयत्नांचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला जात आहे, कारण सिंहगड रस्ता (Sinhagad Road) परिसरातील अत्यंत अपेक्षित असलेला उड्डाणपूल महाराष्ट्र दिनी (Maharashtra Day) वाहतुकीसाठी सज्ज होत आहे. यामुळे परिसरातील पायाभूत सुविधा अधिक मजबूत होण्यास मदत मिळणार आहे.या महत्त्वपूर्ण प्रकल्पासह अन्य दोन पुलांची मूळ संकल्पना आणि त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद स्थायी समिती (Standing Committee) अध्यक्षपदाच्या काळात करण्यात आली होती. यामध्ये नळस्टॉप (Nal Stop) येथील दुहेरी उड्डाणपूल, सध्या खुला होणारा सिंहगड रस्त्यावरील पूल आणि कर्वेनगर (Karvenagar) ते सनसिटीला (Suncity) जोडणारा मुठा नदीवरील (Mutha River) पूल यांचा समावेश होता, या तिन्ही कामांना त्यावेळी प्रशासकीय मान्यता मिळाली, असं मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी त्यांच्या X वर ट्विट करत म्हटलं आहे.

विशेष म्हणजे, सिंहगड रस्त्यावरील या पुलाचे बांधकाम महापौरपदाच्या कार्यकाळात पूर्णत्वास नेण्यात आले. त्यावेळी संकल्पित केलेल्या तीन प्रमुख पुलांपैकी दोन पूल आता नागरिकांच्या सेवेत दाखल झाले आहेत, तर तिसऱ्या पुलाचे काम वेगाने सुरू आहे. भारतीय जनता पार्टीने (Bharatiya Janata Party) केलेल्या प्रयत्नांचे हे यश मानले जात आहे, असंही त्यांनी म्हटलं.

नवीन मार्गाचे स्वरूप आणि अपेक्षित लाभ-
हा नवीन उड्डाणपूल (Murlidhar Mohol) राजाराम पूल (Rajaram Bridge) येथून थेट फनटाईम थिएटर (Funtime Theatre) पर्यंत अखंड कनेक्टिव्हिटी देणार आहे. यामुळे सिंहगड रस्त्यावरील प्रवास करणाऱ्या असंख्य वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे, कारण सध्या या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी अनुभवायला मिळते.
पुलाच्या उद्घाटनानंतर या भागातील वाहतूक अधिक सुरळीत होईल आणि प्रवासाच्या वेळेत लक्षणीय बचत होईल, अशी अपेक्षा आहे. हा प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आला असून त्यामुळे नागरिकांची सोय वाढणार आहे, अशी माहिती मोहोळ यांनी दिली.

पुणे मेट्रोचे सर्व कॉरिडॉर लवकरच लोहगाव विमानतळाशी थेट जोडले जाणार आहेत. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली असून, हा निर्णय पुणे विमानतळ (Pune Airport)  ॲडव्हायझरी कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला.

सुमारे तीन वर्षांनंतर झालेल्या या बैठकीत पुणे विमानतळाच्या सुधारणा आणि मेट्रो कनेक्टिव्हिटीसंदर्भात (Pune metro) महत्वपूर्ण चर्चा झाली. आता शहरातील विविध भागांतून विमानतळापर्यंत थेट मेट्रोने पोहोचता येणार आहे.

कोणते मेट्रो मार्ग विमानतळाशी जोडले जाणार? :

निगडी ते स्वारगेट मेट्रो कॉरिडॉर
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो कॉरिडॉर
वनाज ते रामवाडी मेट्रो कॉरिडॉर
खडकवासला ते विमानतळ (भविष्यातील प्रस्तावित मार्ग)
खराडी ते विमानतळ (नवीन प्रस्तावित मार्ग) (Pune Airport News)

Pune Airport काय आहे सरकारचा प्लॅन? :

केंद्रीय मंत्री मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी स्पष्ट केलं की, महा-मेट्रो आणि पुणे महानगरपालिकेला विस्तृत प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. या योजनेचा उद्देश म्हणजे पिंपरी-चिंचवड (PCMC) आणि पुणे जिल्ह्याच्या कोणत्याही भागातून विमानतळापर्यंत सहज प्रवास शक्य करणे.पुणे (Pune) आणि परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता, पुढील 50 ते 100 वर्षांचा विचार करून ही योजना आखण्यात आली आहे. यामुळे पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा होईल.

सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी कमान ते फनटाइम थिएटरपर्यंतच्या उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, दि. १: आगामी पाच वर्षात महाराष्ट्राच्या, वेगवेगळ्या शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर तसेच पुणे महानगर प्रदेश क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाधिक निधी दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी कमान ते फनटाइम थिएटरपर्यंत बांधण्यात आलेल्या २ हजार १२० मीटर लांबीच्या पुलाचे उद्घाटन (टप्पा क्र. २) च्या उद्घाटन प्रसंगी श्री. पवार बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार हेमंत रासने, महानगर पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त एमजे प्रदीप चंद्रन, पृथ्वीराज बी. पी., ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, माजी महापौर दत्ता धनकवडे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र दिनाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, या पुलामुळे वडगाव, धायरी, नरे, नांदेड आणि खडकवासला येथील वेगाने वाढत असलेल्या परिसराचा वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. इनामदार चौक, हिंजवडी चौक, संतोष हॉल चौक, दत्त हॉटेल चौक आणि गोयेगाव असे पाच चौक ओलांडता येणार असल्यामुळे हवेचे प्रदूषण होणार नाही तसेच वाहतुकीसाठी अर्धा तास कमी होणार आहे. येथून सुमारे दीड लाख प्रवासी प्रवास करत असतात. हा उड्डाणपूल केवळ एक वाहतूक प्रकल्प नसून शहराच्या नवनिर्मितीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड शहर वाढत असल्यामुळे पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने पुण्याला मुळशी धरणाचे आणि पिंपरी चिंचवडला ठोकरवाडी धरणाचे पाणी मिळावे असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. मध्यंतरी विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे काम केले. ते देखील कमी पडत असल्यामुळे नवीन विमानतळाचे काम हाती घेतले आहे. काही नाराजी असली तरी जमीन घेतल्याशिवाय, पुनर्वसन केल्याशिवाय विकास होत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

पुण्यामध्ये वाहतुकीचा प्रश्न मोठा आहे. त्यासाठी येरवड्यापासून नवीन बोगदा, ई – वाहने वाढण्याच्यादृष्टीने प्रोत्साहन पर रक्कम देण्यासाठी पुढच्या पाच वर्षांसाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून नदी सुधार प्रकल्पाच्या माध्यमातूनही शहरातील पर्यावरणाचा विचार केला जात आहे. ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित वाटण्याच्या दृष्टीने सुविधा देणे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मुला-मुलींकरता रोजगार निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. टाटा ट्रस्ट आणि पुणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने ३५० कोटी रुपयांचा प्रकल्प बाणेर येथे हाती घेतला आहे. यातून येथील मुला मुलींना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. असे प्रशिक्षण रत्नागिरी तसेच गडचिरोली येथे सुरू केले असून छत्रपती संभाजीनगर, बीड येथे सुरू करण्यात येणार आहे.

जम्मू काश्मीर येथे घडलेल्या घटनेची बाब अत्यंत गंभीरतेने घेतली असून या घटनेच्या पार्श्वभीवर सुरक्षितता बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जम्मू काश्मीर येथील घटना ही विकृती असून अशा विकृतीला ठेचून काढण्यासाठी प्रधानमंत्री यांच्या नेतृत्वात काम सुरू आहे.

हडपसर येथून यवतपर्यंत खालून ६ पदरी आणि वरून चार पदरी उन्नत मार्ग करण्याचा निर्णय कालच मंत्रिमंडळाने घेतला आहे. तसेच वडगाव शेरी पासून वाघोलीच्यापुढे शिक्रापूरपर्यंत वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीनेही निर्णय घेतला आहे. एक बाह्यवर्तुळ मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळमार्फत आणि दुसरा पुणे महानगर प्रदेश विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. अशा पद्धतीने राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या विविध यंत्रणांच्या माध्यमातून कामे पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न चालू आहे, असेही ते म्हणाले.

राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, या पुलासाठी सिंहगड रस्त्यावरील रहिवाश्यांनी गेल्या अनेक वर्षाची मागणी होती. सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीवरील ताण या पुलाच्या निर्मितीमुळे कमी होईल. पुण्यातील सर्वाधिक लांबीचा हा उड्डाणपूल ठरला. पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येचा, नागरीकरणाचा विचार करता या पुलाची आवश्यकता होती, असेही ते म्हणाले.

श्री. मोहोळ पुढे म्हणाले, पुण्याला देशातील सर्वोत्कृष्ट शहर करण्यासाठी राज्य शासन केंद्र शासन महानगरपालिकेच्या वतीने अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प सुरू झाले आहेत. आज पुण्यामध्ये ३२ किलोमीटर पेक्षा अधिक लांबीची मेट्रो सुरू आहे. आता खडकवासला ते खराडी या नवीन मेट्रो मार्गालाही राज्य शासनाने मान्यता दिली असून विस्तृत प्रकल्प अहवाल झाले आहेत. पुढील काळामध्ये वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रोची अंतिम मंजुरी केंद्र शासनाकडून लवकरात लवकर मिळवण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पीएमपीएमएलच्या ताफ्यामध्ये ई बसेस आणि सीएनजी बसेस मिळून जवळपास पंधराशे नवीन बसेस येत आहेत. २०१८- १९ मध्ये सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी आज उद्घाटन झालेल्या या पुलासह, नदीवरील सनसिटी ते कर्वेनगर पूल तसेच नळ स्टॉप चा दुहेरी उड्डाणपूल असे प्रकल्प हाती घेतले, अशी माहिती त्यांनी दिली.

आज पुण्याचा कायापालट होत आहे. लोकसंख्या, नागरीकरण वाढल्यानंतर नागरी प्रश्न वाढतात मात्र ते सोडवण्यासाठी आधीच काळजी घेण्यात येत आहे. आजही देशात राहण्याचे सर्वात सुरक्षित शहर तसेच पहिली पसंती म्हणून पुण्याचे नाव घेतले जाते. त्यामुळे येथील नागरिकांच्या सुविधेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

प्रास्ताविकात आयुक्त डॉ. भोसले म्हणाले, सप्टेंबर २०२१ मध्ये या पुलाच्या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. मध्यंतरी कोविड काळ असतानाही पुलाचे काम गतीने करण्यात आले. पुलाच्या माध्यमातून ५ चौक टाळले गेल्यामुळे नागरिकांचा प्रवासाचा ३० मिनिटांचा वेळ वाचेल. या मार्गावर दररोज सुमारे १.५ लाख वाहने असतात. त्यामुळे खडकवासला, नऱ्हे, वडगाव, धायरी तसेच पुणे शहरातील सर्व नागरिकांना या पुलाचा फायदा होईल.

प्रारंभी फीत कापून या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर श्री. पवार यांच्यासह अन्य मान्यवरांनी चार चाकी वाहनातून या पुलावरून प्रवास करून पाहणी केली.

उड्डाणपुलाची वैशिष्ट्ये:
सिंहगड रस्त्यावरुन स्वारगेटकडे येताना वाहतूक कोंडी कमी करण्याच्यादृष्टीने तीन टप्प्यात उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले होते. कामाची निविदा ११८ कोटी ३७ लाख रुपयांची आहे. त्याअंतर्गत टप्पा १ मध्ये राजाराम पुलाजवळील स्वारगेट कडे जाणारा ५२० मी लांब एकेरी उड्डाणपूल ऑगस्ट २०२४ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. टप्पा २ मध्ये विठ्ठलवाडी ते फन टाईम थिएटर पर्यंतचा सिंहगड कडे जाणारा २.२ कि. मी. लांब उड्डाणपूल आज खुला करण्यात आला तर टप्पा ३ च्या इंडिअन ह्यूम गेट (गोयल गंगा चौक) ते इनामदार चौक पर्यंतच्या स्वारगेटकडे जाणाऱ्या १.५ कि. मी. लांबीच्या उड्डाणपूलाचे काम १५ जून २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

टप्पा २ च्या पुलाचे काम प्रिस्ट्रेस बॉक्स गर्डर पद्धतीने करण्यात आले आहे. उड्डाणपुलाच्या रस्त्याची रुंदी ७.३ मी असून एकूण पिलर ६० आहेत.
0000

काँग्रेसवर टिका करत केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, मोदी सरकारचा जातीनिहाय जनगणनेचा सामाजिक न्यायासाठी ऐतिहासिक निर्णय

पुणे:काँग्रेसवर टिका करत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी, मोदी सरकारचा जातीनिहाय जनगणनेचा सामाजिक न्यायासाठी ऐतिहासिक निर्णय असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान . नरेंद्र मोदी जी यांच्या सक्षम नेतृत्वाखालील झालेल्या CCPA बैठकीत आगामी जनगणनेत जाती आधारित माहितीचा समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय देशात सामाजिक न्यायाची प्रक्रिया बळकट करणारा आणि प्रत्येक घटकाच्या विकासासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली आहे.

त्यांनी असे म्हटले आहे की,दशकानुदशके काँग्रेसने सत्तेत असताना या मुद्द्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं, तर विरोधात असताना केवळ मतांच्या राजकारणासाठी या मुद्द्याचा वापर केला. मात्र आता, मोदी सरकारने टाकलेल्या निर्णायक पावलामुळे समाजातील सर्व स्तरांतील मागास, दुर्लक्षित घटकांना न्याय मिळेल, त्यांच्या सक्षमीकरणाचा मार्ग मोकळा होईल आणि सर्वसमावेशक भारत घडवण्याच्या दिशेने मोठं पाऊल टाकलं जाईल.

डिजीटल स्वाक्षरीची शहानिशा करुनच सदनिकेचा विक्री करारनामा करण्याचे पुणे म्हाडाचे आवाहन

पुणे, दि.३०: उपमुख्य अधिकारी, गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) यांच्या डिजीटल स्वाक्षरीची शहानिशा केल्याशिवाय कोणत्याही व्यक्तिसोबत सदनिकेचा विक्री करारनामा करु नये; अन्यथा संबंधित विकासक आणि व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे म्हाडाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

म्हाडातर्फे ऑक्टोबर २०२३ पुर्वीच्या सर्व सोडतींमधील १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण व २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील सोडतीनंतर विक्रीअभावी शिल्लक सदनिका ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर गरजू व पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी नोंदणी व वितरण प्रक्रियेकरिता https://bookmyhome.mhada.gov.in/ संकेतस्थळावर सुरु करण्यात आले आहे.

या योजनेच्या वितरणासाठी कोणत्याही एजन्सीची नेमणूक केलेली नाही व कोणत्याही व्यक्तीस मध्यस्थी म्हणून नियुक्त केलेले नाही, नागरिकांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये.

सदनिका वितरणाची प्रक्रिया पुर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक असून देकार पत्र हे उपमुख्य अधिकारी,म्हाडा यांच्या डिजीटल स्वाक्षरीने ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्यांच्या लॉग-इन आयडीमध्ये उपलब्ध करुन देण्यात येते. कोणतेही देकार पत्र मानवी हस्ताक्षर करुन तसेच रबरी शिक्क्याचा वापर करुन दिले जात नाही, अशी माहिती उपमुख्य अधिकारी अतुल खोडे यांनी दिली आहे.

जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचाराचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ

केंद्र सरकारने आता आरक्षणाची ५० टक्के मर्यादाही हटवावी.

मुंबई, दि. ३० एप्रिल २००२५
सर्व जात समुहाला सामाजिक न्याय मिळाला पाहिजे ही आमचे नेते राहुलजी गांधी यांची आग्रही भूमिका होती यातूनच त्यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली होती. भाजपाचा याला विरोध होता पण उशिरा का होईना त्यांना जाग आली, त्याचे स्वागतच आहे. केंद्र सरकारने घेतलेला निर्णय हा लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांच्या संघर्ष व विचाराचा मोठा विजय आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, जातनिहाय जनगणनेमुळे सर्व समाज घटकांना विकासात योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल. काँग्रेस पक्षाने नेहमीच सामाजिक न्यायाची भूमिका घेतली आहे. राहुल गांधी यांनी यासाठी मोठा संघर्ष केला असून पुन्हा त्यांच्या दूरदृष्टीचा अनुभव देशाला व सरकारला आला आहे. आता केंद्र सरकारने आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्यासाठी पुढचे पाऊल टाकावे. समाजातील दलित, वंचित, मागास समाजापर्यंत विकासाचे फळ मिळाले पाहिजे. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखपदी ओबीसी, मागास व दलित समाजातील स्वयंसेवकांनाही संधी कधी मिळेल याकडे आमचे लक्ष आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी म्हटले आहे.

भाजपा सरकारने मागील ११ वर्षात जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. वर्षाला दोन कोटी रोजगार देणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, पट्रोल, डिझेल ४० रुपये लिटर करणार, परदेशातील काळा पैसा आणून प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करणार ही आश्वासने चुनावी जुमले ठरले आहेत. हा निर्णय तसाच ठरू नये.
राहुलजी गांधी यांनी याआधीही जे मुद्दे मांडले त्याकडे अहंकारी तानाशाही सरकारने दुर्लक्ष केले होते पण नंतर राहुल झी गांधी यांची भूमिकाच योग्य होती असे स्पष्ट झाले आहे. जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाने पुन्हा तेच सिद्ध झाले आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

दुर्लभ कला प्रकारांचे ‘अर्पण’ चित्रकला प्रदर्शन १ ते ४ मे

दादरकर आर्ट स्टुडिओच्या वतीने राजश्री दादरकर यांचे कला प्रदर्शन 

पुणे: टेराकोटा, मोज़ॅईक आणि स्टेन ग्लास या दुर्लभ होत चाललेल्या कला प्रकारांचे दर्शन घडविणारे अर्पण कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. संजय दादरकर यांच्या स्मरणार्थ राजश्री दादरकर यांच्या कला प्रदर्शनाचे आयोजन दिनांक १ ते ४ मे दरम्यान मॉडेल कॉलनीतील रवी परांजपे स्टुडिओ मध्ये करण्यात आले आहे. 

प्रदर्शनाचे उद्घाटन आर्किटेक्ट  हरी आगाशे यांच्या हस्ते होणार आहे. दिनांक ४ मे पर्यंत दररोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळेत विनामूल्य प्रदर्शन पाहता येणार आहे. 

राजश्री दादरकर म्हणाल्या, या प्रदर्शनामध्ये सुमारे २०० ते २५० कलाकृतींचा समावेश असून त्यात टेराकोटा वॉल फ्रेम्स, स्टेन ग्लास डिझाईन आणि मोज़ॅईक वर्कचे विविध नमुने पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे, या प्रदर्शनात “डीआयवाय टेराकोटा किट” ही नाविन्यपूर्ण संकल्पनाही प्रेक्षकांसमोर सादर करण्यात येणार आहे. या किटद्वारे प्रेक्षक स्वतः टेराकोटाचे डिझाईन बनवण्याचा अनुभव घेऊ शकतील.

राजश्री आणि संजय दादरकर यांची कला यात्रा १९७८ साली अभिनव कला महाविद्यालयातून सुरू झाली. संजय दादरकर यांनी पॉटरी आणि सिरॅमिक्समध्ये प्रशिक्षण घेऊन पुण्यात १९८० मध्ये स्वतःचा स्टुडिओ सुरू केला. भद्रावती येथील कृष्णमूर्ती मिरमिरा यांच्या मार्गदर्शनाखाली संजय यांनी कुंभारकाम, टेराकोटा दिवे, सिरॅमिक्स म्युरल्स आणि स्टेन ग्लास यामध्ये उल्लेखनीय कार्य केलं. त्यांच्या कार्याची ठसा आजही बालगंधर्व रंगमंदिर आणि सारसबागेतील सावरकर टाइल पेंटिंगमधून पाहायला मिळतो.

केसरीवाड्यात अभिवादन करुन गौरवशाली महाराष्ट्र मंगल कलश रथयात्रा पिंपरी-चिंचवडकडे मार्गस्थ…

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने यंदाच्या ६५ व्या १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथयात्रा पुढील मार्गावर मार्गस्थ झाली. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे व पिंपरी-चिंववड च्यावतीने केसरी वाड्यातील श्री गणपती आणि लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. ही रथ यात्रा पुढे पिंपरी चिंचवड शहराकडे रवाना झाली.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे २९ एप्रिल रोजी या रथयात्रेचे लालमहाल, कसबा पेठ येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर गौरव मंगल कलश रथयात्रा ही पक्ष कार्यालय, गुप्ते मंगल कार्यालय येथे मुक्कामी होती. आज सकाळी वारकरी दिंडी काढत विठू रायाच्या जयघोषात ही दिंडी केसरीवाड्यात गेली. आमदार शंकर मांडेकर यांनी आणलेल्या माती व पाणी या गौरव मंगल कलशात अर्पण करण्यात आले. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातील महापुरुषांच्या वास्तव्याने समृद्ध झालेल्या, त्यांच्या महान कार्यांनी प्रेरित अशा भागांतील माती, विशेष नद्या आणि संगमस्थळांहून आणलेले पाणी या मंगल कलशांमध्ये एकत्रित करण्यात येणार असून १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई येथे आणले जाणार असून तेथे भव्य दिव्य असा कार्यक्रम राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कार्याध्यक्ष प्रफुल पटेल,प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.

सदरप्रसंगी महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार शंकर मांडेकर, पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर, प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी, उपाध्यक्ष सुरेश घुले, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष योगेश बहल, पुणे शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, शैलेश टिळक, माजी आमदार विलास लांडे, पुणे जिल्हा मध्य. बँकेचे संचालक सुनील चांदेरे, प्रवीण शिंदे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता सागरे, माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके, दत्तात्रय धनकवडे,बाबुराव चांदेरे, शांतीलाल मिसाळ, पिंपरी चिंचवड शहर महिलाध्यक्ष कविता आल्हाट
विधानसभा अध्यक्ष खडकवासला प्रदीप धुमाळ, ग्रामीण अध्यक्ष राजेंद्र पवार, मुळशी तालुका अध्यक्ष अंकुश मोरे, संतोष बारणे, शाम लोंढे, शिवाजीनगर अभिषेक बोके, विद्यार्थी शुभम माताळे, सोशल मिडिया अध्यक्ष शितल मेदने, अल्पसंख्याक अध्यक्ष पंकज साठे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस मारुती अवरगंड, युवक अंगद माने, शहर सरचिटणीस शितल जौंजाळ, शलाका पाटील, दुष्यंत जाधव,उपाध्यक्ष मिलिंद वालवडकर, डिंपल इंगळे,संजय पाटील, प्रदीप चोपडे, चिटणीस शाम शेळके, विधानसभा कार्याध्यक्ष पुणे कॅन्टोन्मेंट गोरखनाथ भिकुले, शिवाजीनगर बाळासाहेब आहेर, योगेश वराडे, शहर महिला कार्याध्यक्ष गौरी जाधव, युवक कार्याध्यक्ष सुरज गायकवाड, युवक उपाध्यक्ष गिरीश मानकर, सागर चंदनशिवे, सुरज गायकवाड,युवती कार्याध्यक्ष लावण्या शिंदे, उपाध्यक्ष स्नेहल कांबळे, सामाजिक, महिला संघटक सचिव प्रीती डोंगरे, विजया भोसले,सांस्कृतिक कार्याध्यक्ष अशोक जाधव,शैलेश मानकर, युवक अध्यक्ष कसबा गजानन लोंढे, विधानसभा उपाध्यक्ष संतोष हत्ते यांच्यासह पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील पदाधिकारी आदी उपस्थित होते.

वंचित, गुणवंत विद्यार्थ्यांना कौशल्य विकासासाठी आर्थिक पाठबळ

पुणे : ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी डॉ. दीपक शिकारपूर यांनी वंचित, गुणवंत विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणासाठी स्थापन केलेल्या शिकारपूर सोशल फाऊंडेशनच्या वतीने दहा विद्यार्थ्यांना आज (दि. 30) शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
मल्टिव्हर्सिटी ग्रुप, आय-स्पेस, बावधन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि परम महासंगणकाचे निर्माते पद्मभूषण, पद्मश्री, महाराष्ट्र भूषण डॉ. विजय भटकर, नचिकेत भटकर, एम. के. सी. एल.चे व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे, एम. के. सी. एल.चे महाव्यवस्थापक अतुल पटोडी आदी उपस्थित होते.
एम. के. सी. एल.तर्फे कौशल्य वाढीसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. येथे विविध शैक्षणिक शाखांमधील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळावी या हेतूने डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. डॉ. भटकर यांनी विद्यार्थ्यांना आशीर्वादपर शुभेच्छा दिल्या.
शिष्यवृत्ती योजनेविषयी माहिती सांगताना डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, महत्त्वाकांक्षी युवा पिढीला सक्षम करून त्यांना त्यांच्या पायवर उभे राहण्यासाठी मदत व्हावी या करीता ही शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. भारताची ओळख युवकांचा देश अशी आहे. आय. टी. म्हणजे ‌‘इंडियन टॅलेंट‌’ असून इनोव्हेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आजच्या युवा पिढीने ‌‘इंडियाज टुमॉरो‌’ बनावे. विद्यार्थ्यांनी व्यक्तीमत्त्व विकास साधत कायम स्वरूप शिष्याची भूमिका स्वीकारून नवनवीन कौशल्ये आत्मसात करावी जेणेकरून उद्याचा आत्मनिर्भर विकसित भारत निर्माण होण्यास मदत होईल.
शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांनी आर्थिक मदतीमुळे ऐच्छिक शिक्षण घेण्यास मदत होईल, अशी भावना व्यक्त केली. अतुल पतोडी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत भाग्यश्री जाधव यांनी केले तर आभार विश्वजीत उत्तरवार यांनी मानले.

ऐतिहासिक चित्रपटांमुळे संस्कारक्षम पिढी घडेल : मुरलीधर मोहोळ

पुणे : महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राचा इतिहासही वैभवशाली आहे. मुलांना ऐतिहासिक चित्रपट दाखविल्यास भविष्यात संस्कारक्षम पिढी निश्चित घडेल, असा विश्वास केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.
संवाद, पुणे, कोहिनूर ग्रुप व कावरे आईस्क्रीम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाल-कुमार चित्रपट महोत्सवाचा समारोप समारंभ आज (दि. 30) सिटी प्राईड, कोथरूड येथे आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी मंत्री मोहोळ बोलत होते. प्रसिद्ध उद्योजक,सिटी प्राईडचे अरविंद चाफळकर तसेच ‌‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई‌’ या चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, अभिनेते अजय पुरकर, संवाद, पुणेचे सुनील महाजन, कावरे आईस्क्रीमचे राजूशेठ कावरे, जान्हवी कावरे, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर, निकिता मोघे, केतकी महाजन, विनोद सातव आदी उपस्थित होते. ‌‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई‌’ चित्रपटाच्या प्रदर्शनाने महोत्सवाचा समारोप झाला.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोषात मुरलीधर मोहोळ यांनी मुलांचा उत्साह वाढवला. ते पुढे म्हणाले, सत्तावीस वर्षांपासून पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकण्याचे काम संवाद करत आहे. ही साहित्य, कला आणि सांस्कृतीची सेवा अशीच पुढे चालत राहो.
पसायदानाचा अर्थ लक्षात ठेवा आणि त्यानुसार वागा असा संदेश दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी मुलांना दिला. लांजेकरांचे पाच चित्रपट या महोत्सवात मुलांना पाहायला मिळाले.
महाराष्ट्राच्या संस्कृतीची माहिती बाल-कुमारांना व्हावी तसेच महाराष्ट्रातील संत परंपरा व वैभवशाली इतिहास मुलांना कळावा या हेतूने महोत्सवात पाच ऐतिहासिक चित्रपट दाखविण्यात आले. सत्तावीस वर्षांपासून सातत्याने सुरू असणारा हा महाराष्ट्रातील एकमेव बाल चित्रपट महोत्सव आहे, असे सुनील महाजन यांनी प्रास्ताविकात सांगितले.
मंत्री मोहोळ यांचे स्वागत राजूशेठ कावरे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचा सत्कार मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आला. निकिता मोघे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सुनील महाजन यांनी आभार मानले.

शहर पोलीस दलातील २० पोलीस अधिकारी, पोलीस हवालदार यांना महाराष्ट्र दिनानिमित्त महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर

पुणे- महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिनानिमित्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीळकंठ जगताप, दिलीप फुलपगारे, गणेश माने यांच्यासह पुणे शहर पोलीस दलातील २० पोलीस अधिकारी, पोलीस हवालदार यांना सेवा कालावधीत प्रशंसनीय सेवेसाठी पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे. १५ वर्षाहुन अधिक काळ सेवाभिलेख उत्तर राखल्याबद्दल त्यांना हे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.

निळकंठ राजाराम जगताप (वरिष्ठ पोलीस निरीक्षक)
दिलीप मगनशेठ फुलपगारे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकी पोलीस ठाणे)
गणेश जगन्नाथ माने (पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा)
ज्ञानेश्वर काळुराम नागवडे (श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, चंदननगर पोलीस ठाणे)
प्रविण पंढरीनाथ जगताप (श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, हडपसर पोलीस ठाणे)
राजू उत्तम जाधव (सहायक पोलीस फौजदार, खडकी पोलीस ठाणे)सौदागर भगवान माने (सहायक पोलीस फौजदार, वानवडी पोलीस ठाणे)
राहुल देवराम मखरे (सहायक पोलीस फौजदार, गुन्हे शाखा)
संजयकुमार ज्ञानोबा भोसले (सहायक पोलीस फौजदार, विशेष शाखा)
रमेश वसंत दळवी (सहायक पोलीस फौजदार बॉम्ब शोधक व नाशक पथक)
राहुल विष्णु जोशी (पोलीस हवालदार, फरासखाना पोलीस ठाणे)
पांडुरंग सुभाष पवार (पोलीस हवालदार, गुन्हे शाखा)
शरद बबन वाकसे (पोलीस हवालदार, गुन्हे शाखा)
राजू यशवंत कदम (पोलीस हवालदार, मुंढवा पोलीस ठाणे)
ऋषिकेश गुलाबराव महल्ले (पोलीस हवालदार, कोंढवा पोलीस ठाणे)
प्रमोद बबन टिळेकर (पोलीस हवालदार, गुन्हे शाखा)
अमजद गुलाब पठाण (पोलीस हवालदार, बंडगार्डन पोलीस ठाणे)
राहुल रामचंद्र माने (पोलीस हवालदार, फरासखाना पोलीस ठाणे)
अतुल ज्ञानेश्वर साठे (पोलीस हवालदार, शिवाजीनगर पोलीस ठाणे)
सुरेखा दीपक महाजन (पोलीस हवालदार, नियंत्रण कक्ष, पुणे शहर