Home Blog Page 535

अधिकाधिक असंघटित  कामगारांना ई – श्रमिक कार्ड मध्ये सामावून घेण्यासाठी प्रयत्न – अर्णब चॅटर्जी

0

भारतीय जनता मजूर सेलच्या राज्य कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा संपन्न

पुणे : राज्य आणि केंद्र सरकार असंघटित कामगारांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून त्यांच्या सबलिकरणाचा प्रयत्न करत आहे. मात्र विरोधी  कामगार संघटना या योजना कामगारांपर्यंत घेऊन जात नाहीत किंवा त्यांचा लाभ कामगारांना मिळू देत नाहीत. भारतीय जनता मजदूर सेल सरकारी योजना कामगारांपर्यंत घेण्यासाठी आणि अधिकाधिक असंघटित  कामगारांना ई – श्रमिक कार्ड मध्ये सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती भारतीय जनता मजूर सेल चे राष्ट्रीय अध्यक्ष अर्णब चॅटर्जी यांनी शनिवारी दिली. 

भारतीय जनता मजूर सेलच्या महाराष्ट्र  राज्य कार्यकारिणीच्या  पदग्रहण सोहळ्या निमित्त आयोजित कार्यक्रमात अर्णब चॅटर्जी  बोलत होते. यावेळी सेलच्या प्रदेशाध्यक्षा ज्योती सावर्डेकर, युवा राष्ट्रीय अध्यक्ष दीपक शर्मा, राष्ट्रीय सचिव संजय अग्रवाल,महाराष्ट्र उपाध्यक्ष जयेश टांक, गुजरात राज्य अध्यक्ष अजय बिडवाई, नवनिर्वाचित राष्ट्रीय प्रवक्ते सुधीर जानज्योत, संतोष पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.  याप्रसंगी राज्य कार्यकारिणीतील 34 नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

पुढे बोलताना चॅटर्जी म्हणाले,  भारतीय जनता मजूर सेल (BJMC) ही राष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त व शासन नोंदणीकृत कामगार संघटना आहे. भारतातील २९ राज्यांमध्ये BJMC चे कार्य चालू असून, महाराष्ट्रातही सशक्त विस्तार करण्यात आला आहे. सध्या आम्ही असंघटित क्षेत्रातील कामगारांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आज राज्यात 30 लाखांहून अधिक कामगारांना ई श्रमिक कार्ड मिळाले आहे, अजूनही अनेक कामगार या सुविधे पासून वंचित आहेत, त्यांच्यापर्यंत सरकारची ही योजना घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. बालकामगार कमी करण्याचा आमचा हेतु असून यासाठी महाराष्ट्रात लवकरच एक शाळा सुरू करण्यात येणार आहे. 

ज्योती सावर्डेकर म्हणाल्या, कामगार व शासन यांच्यात मजबूत सेतू निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे.  सामाजिक न्याय, आर्थिक सक्षमीकरण व कल्याणकारी योजना सर्व कामगारांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची कार्यकारिणी प्रयत्न करणार आहे. आजच्या कार्यक्रमात  नवीन पदाधिकाऱ्यांना अधिकृत नेमणूक पत्र वितरित करण्यात आले आहे. आता  विविध जिल्हा, नगरपालिका, पंचायतस्तरावर कामकाज सुरू होणार आहे. 

महाराष्ट्रातील  सफाई कामगारांचे सशक्तीकरण,किमान वेतन लागू करणे, सुरक्षा साधने (हॅट, ग्लोव्हज, मास्क, सॅनिटायझर, बूट) देणे. आरोग्य विमा, वेळेवर पगार, पेन्शन योजना स्वच्छता, अधिकार व सुरक्षा यावर जनजागृती यासाठी आम्ही काम करणार आहोत. वाहतूक कामगार (ऑटो, ई-रिक्शा, ट्रक चालक), ई-श्रमिक कार्ड नोंदणी, कामगारांच्या कुटुंबांना आरोग्य, विमा, शिक्षण योजना  यांचा त्यांना लाभ मिळवून देण्यात आमचा पुढाकार असेल. फेरीवाल्यांसाठी परवाने व ओळखपत्रे मिळवून देणे, विक्रेता झोन निश्चित करण्यात मदत करणे,PM SVANidhi व सूक्ष्म वित्त योजना आणि उद्योजकता प्रशिक्षण व आर्थिक साक्षरता त्यांच्यात आणण्याचे आमचे ध्येय आहे.

रेशनवरील धान्याचा कोटावाढवून मिळावा:आ. सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

पुणे : शहरातील वाढती लोकसंख्या आणि विस्तार लक्षात घेता राज्य शासनाने पुणे शहरासाठी रेशनवरील धान्याचा कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (शनिवारी) केली.

शहर आणि जिल्ह्यातील रेशनिंग व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज बैठक घेतली. या बैठकीत आमदार शिरोळे सहभागी झाले. त्यांनी रेशनिंग कोटा वाढवून मिळावा अशी मागणी बैठकीत केली. छत्रपती शिवाजीनगर मतदार संघातही रेशन कार्ड्सची संख्या आणि धान्याचा कोटा वाढवून मिळावा, असेही त्यांनी बैठकीत सांगितले.

रेशन दुकानातील धान्य पुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन तत्काळ निवारण करण्यात यावे. पुणे शहरात रेशन विभागाचे ११ परिमंडल झोन आहेत, तेथील कामकाजात गती येण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात यावे, असेही आमदार शिरोळे यांनी सुचविले.

पब्लिक लॉगिन मध्ये ऑनलाईन काम करताना आरसीएमएस ही वेबसाईट सुरळीत चालत नाही. सर्व्हर खूप वेळा स्लो असतो किंवा बंदही असतो, याकडे शिरोळे यांनी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले

युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी टाटाच्या मदतीने राज्यभरात कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

येत्या काळात लोहगाव आणि वडगावशेरी परिसरात कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येईल-उपमुख्यमंत्री

पुणे, दि.१७: रोजगाराच्या माध्यमातून युवकांना स्वावलंबी बनविण्यासोबतच उद्योगधंद्यांना प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यातील विविध भागात कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. येत्या काळात लोहगाव आणि वडगावशेरी परिसरात विद्यार्थ्यांना अत्याधुनिक कौशल्ययुक्त शिक्षण मिळण्याकरीता कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

टाटा ग्रुप, नगरविकास विकास, पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बाणेर येथे टाटा संचलित कौशल्यवर्धन केंद्राच्या भूमिपुजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार बापूसाहेब पठारे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., ओमप्रकाश दिवटे, सीओईपी टेक विद्यापीठाचे कुलगुरू सुनील जी. भिरुड, टाटा टेक्नॉलॉजीसचे कौशल्य विभागाचे प्रमुख सुशीलकुमार, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले आदी उपस्थित होते.

राज्यातील विविध भागात कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यावर भर
श्री. पवार म्हणाले, औद्यागिक प्रशिक्षणाला काळानुरुप अत्याधुनिक बनविण्याची गरज होती, कृत्रिम बुद्धीमत्तासारखे अत्याधुनिक प्रशिक्षण युवकांना मिळाले पाहिजे, यादृष्टीने टाटा टेक्नॉलॉजीस लिमिटेड यांच्यामार्फत खाजगी सहभागातून राज्यात चंद्रपूर, गडचिरोली येथे कौशल्यवर्धन केंद्राची उभारणी करण्यात येत आहे. चंद्रपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कौशल्यवर्धन केंद्राकरिता टाटाने २४० कोटी रुपये आणि राज्य शासनाने ४० कोटी रुपये तसेच गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापिठातील केंद्राकरीता टाटाकडून १४५ कोटी रुपये आणि राज्य शासनाकडून ३० कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच कल्याण डोंबिवली, रत्नागिरी, पुणे, शिर्डी, बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणीही कामे सुरु आहेत. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येत आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात उद्योगपुरक वातावरण निर्माण होण्यास मदत

श्री. पवार पुढे म्हणाले, पुणे शहर ही शैक्षणिक व सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते. अलीकडील काळात पिंपरी-चिंचवडमुळे पुणे शहरालादेखील औद्यागिक नगरी अशी ओळख मिळाली आहे. पुण्यासहित परिसराचा औद्योगिक विकास होताना आयटी पार्क सारख्या संस्था स्थापना झाल्या आहेत. उद्योग आणि आयटी पार्कमध्ये कौशल्ययुक्त मनुष्यबळाची गरज विचारात घेता राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

टाटा टेक्नॉलॉजीस लिमिटेडमार्फत संचालित बाणेर येथील कौशल्यवर्धन केंद्रातून युवकांची रोजगारक्षम पिढी निर्माण करणारे अत्याधुनिक, तांत्रिक प्रशिक्षण मिळणार आहे. उद्योगाधंद्यात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करण्याचे प्रात्याक्षिकही दिले जाणार आहे. यामुळे युवकांना त्यांच्या इच्छेप्रमाणे रोजगार तसेच औद्यगिक क्षेत्राच्या गरजेनुसार प्रशिक्षित मनुष्यबळ मिळेल. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात उद्योगपुरक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल.

पुणे शहराच्या वैभवात भर पडणारी वास्तू उभी करावी
या प्रकल्पाअंतर्गत सर्व यंत्रसामुग्री, औद्योगिक हार्डवेअर, व्यावसायिक तंत्रज्ञान साधने आणि यंत्रसामुग्री, सॉफ्टवेअर व इतर सर्व वस्तूंचे हस्तांतरण पुणे महानगरपालिकेस करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या पीईबी इमारत माहे डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व बाबींचा विचार करुन पुणे शहराच्या वैभवात भर पडणारी वास्तू उभी करावी. सर्व सुविधांनी युक्त आराखडा तयार करुन त्याप्रमाणे कामे दर्जेदार पद्धतीने गतीने पूर्ण करावी, याकरीता राज्य शासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल. पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात विविध सार्वजनिक विकासकामे सुरु असून अधिकाऱ्यांनी समर्पण भावनेने काम करावे, तसेच नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. पवार म्हणाले.

कौशल्यवर्धन केंद्राच्या माध्यमातून ७ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट-डॉ. राजेंद्र भोसले

पुणे शहरातील विद्यार्थ्यांसोबतच औद्योगिक उत्पादनास चालना देण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या कौशल्यवर्धन केंद्रातून दरवर्षी सुमारे ७ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाची एकूण रक्कम इमारत बांधकाम व प्रशिक्षण खर्चासहित रुपये २७९ कोटी ६७ लाख इतकी असून या रक्कमेपैकी रुपये २३७ कोटी ७२ लाख रुपये इतकी रक्कम टाटा टेक्नॉलॉजीस लिमिटेड यांच्याकडून तर उर्वरित खर्च रुपये ४१ कोटी ९५ लाख रुपये नगर विकास विभागाकडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

या प्रकल्पासाठी पुणे महानगरपालिकेकडून सुमारे १ एकर (३ हजार ६०५ चौ.मी.) जागा उपलब्ध देण्यात आली असून त्यामध्ये सुमारे २२ हजार चौरस फूट क्षेत्रफळात इमारत उभारण्यात येणार आहे. या केंद्राचा नवउद्योजक, स्टार्टअप यांच्यासोबत लाखो युवकांना लाभ होणार आहे, असे प्रास्ताविकात डॉ. भोसले म्हणाले.
000

आघाडी काळात अनेक भ्रष्टाचार झाले हे राज्याचे दुर्देव _ भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी

लेखक विनायक आंबेकर लिखित “किंगमेकर क्रॉनिकल_ वसुली व घोटाळ्याचे पर्व “पुस्तकाचे प्रकाशन
पुणे, प्रतिनिधी _
सन २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक नंतर निकाल आले आणि राज्यातील राजकारण बदलले गेले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात युतीने एकत्रित त्या निवडणूक लढवल्या आणि निकालात आम्हाला १६१ जागा देखील मिळाल्या. त्यामुळे राज्यात सरकार युतीचे येणे आवश्यक होते. पण शिवसेनेने जनतेचा, भाजपचा विश्वासघात केला आणि उद्धव ठाकरे हे काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाऊन आघाडी सोबत त्यांनी सरकार स्थापन केले. त्यांचा अडीच वर्षाचा कारभार हा दुर्देवी होता.कोरोना काळात तत्कालीन राज्य सरकार अपयशी ठरले. यादरम्यान अनेक भ्रष्टाचार झाले हे राज्याचे दुर्देव आहे असे मत भाजप नेते आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी व्यक्त केले आहे.

लेखक विनायक आंबेकर लिखित “किंगमेकर क्रॉनिकल_ वसुली व घोटाळ्याचे पर्व “पुस्तकाचे प्रकाशन भाजप नेते आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या हस्ते शनिवारी पार पडले. यावेळी भंडारी म्हणाले, किंगमेकर क्रॉनिकल हे पुस्तक आज प्रकाशित केले हे चांगले आहे. विनायक आंबेकर यांचे लेखन अभ्यासपूर्ण आहे. त्यांनी धर्मकन्या 2014 साली लिहिले. 2016 साली नोटबंदीवर देखील त्यांनी अभ्यासपूर्ण लेखन केले होते. मराठी मध्ये राजकीय विषया बाबत अभ्यासपूर्ण फारसे लिखाण येत नाही.राजकीय घटना कादंबरी स्वरूपात सर्वजण वाचतात. कादंबरीमध्ये थोडे विस्ताराने लिखाण करता येते. सर्व घटनामागील दडलेल्या गोष्टी, हितसंबंध, अंतस्थ हेतू उलगडून दाखवण्याचा प्रयत्न आंबेकर यांनी या पुस्तकातून केला आहे. आंबेकर यांनी हे लिखाण आज लिहिले नसून त्याची तयारी आधीच त्यांनी केली होती.

लेखक विनायक आंबेकर म्हणाले, विविध घटना बद्दल किंवा पंतप्रधान ते मुख्यमंत्री सर्वांबद्दल अर्वाच्च भाषेत बोलणारे असे का बोलतात ते जनतेने समजून घेणे आवश्यक आहे. असे करताना त्यांना जनतेपासून काय लपवयचंय हे जनतेला माहिती व्हावे या साठी हे पुस्तक लिहिले आहे. कोरोना काळ आणि महाविकास आघाडी काळातील घोटाळ्यांची साखळी या पुस्तकातून स्पष्ट केली आहे. मी जे लिखाण केले ते ज्या तथ्य गोष्टी दिसल्या त्याबाबत आणि त्यामागील भूमिका विशद केली आहे. जनतेसमोर आघाडी काळातील विविध घटनांमागील हितसबंधाची, बोगस कार्यपध्दतीची पूर्ण माहिती मिळावी हा माझा उद्देश आहे. एका व्यक्तीला असा भ्रम झाला आहे की,आपण बोलू ते सर्व सत्य आहे परंतु वस्तुस्थिती तशी नाही हे मी दाखवून दिले आहे. आघाडी सरकारच्या काळातील घोटाळ्यांच्या सर्व प्रकरणा मागील तथ्य या पुस्तकात मांडले गेले आहे.

सहेला रे..’ गानमैफलीला रसिकांचा भरघोस प्रतिसाद

भारतीय विद्या भवन, इन्फोसिस फाउंडेशनचे आयोजन

पुणे:भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘कलाश्री’ प्रस्तुत ‘सहेला रे..’ ही गानमैफल भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात सादर झाली. रसिक श्रोत्यांच्या भरघोस उपस्थितीत आणि उत्स्फूर्त प्रतिसादात ही सांगीतिक संध्या रंगली.

या मैफलीत  गायिका डॉ. राधिका जोशी आणि गायक अभिषेक काळे यांनी  भारतरत्न पं. भीमसेन जोशी आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या रचना अत्यंत भावपूर्ण सादर केल्या. डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांच्या आशयपूर्ण निवेदनामुळे कार्यक्रमाला एक वेगळेच साहित्यिक व कलात्मक परिमाण लाभले.भारतीय विद्या भवनचे सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक  केले आणि त्यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार ज्ञानेश्वरीची प्रत आणि प्रशस्तिपत्रक  देऊन करण्यात आला.

मैफलीची सुरुवात डॉ.राधिका जोशी यांनी राग भूपमधील ‘सहेला रे’ या रचनेने केली. त्यानंतर ‘कलाश्री’, ‘राम रंगी’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘जमुना के तीर’, ‘ भाग्यदा लक्ष्मी बारम्मा अशा विविध रचना अभिषेक काळे यांनी सादर केल्या. डॉ. राधिका जोशी यांनी ‘म्हारो प्रणाम’, ‘ जाईन विचारित रानफुल’, ‘’, किशोरीताईंनी स्वरबद्ध केलेली  गझल, तसेच ‘बोलावा विठ्ठल’, ‘अवघा रंग एक झाला’ अशा सशक्त गायनरचना सादर केल्या. आणि रंगलेल्या मैफलीचा समारोप केला.

या गानसंध्येस मालू गावकर (हार्मोनियम) आणि रामकृष्ण करंबेळकर (तबला) यांची प्रभावी साथ लाभली.

‘ सहेला रे’ ही मैफल भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक उपक्रमांतर्गत आयोजित २४४ वा कार्यक्रम होता . या मैफिलीला  प्रवेश विनामूल्य होता .हा कार्यक्रम १७ मे २०२५ रोजी सायंकाळी झाला.

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्यावतीने वासंतिक चंदन उटी सोहळ्याचे आयोजन

भारतीय वारकरी मंडळा’ची भजन सेवा

पुणे– हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्यावतीने वासंतिक चंदन उटी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘भारतीय वारकरी मंडळा’च्यावतीने सादर केलेल्या ‘वासंतिक उटी भजना’ने भाविकांना मंत्रमुग्ध केले.
‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्यावतीने वर्षभर विविध धार्मिक उत्सव साजरे केले जातात. शुक्रवारी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने वासंतिक चंदन उटी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून श्रींच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावला जातो. त्यानुसार भाविकांकडून श्रींच्या मूर्तीला चंदन, गुलाबजल, अत्तर, केशर, गंधा या मिश्रणाचा लेप लावण्यात आला आणि संपूर्ण मंदिर परिसर मोगऱ्यासह इतर फुलांनी सजवण्यात आले. यावेळी ‘भारतीय वारकरी मंडळा’च्यावतीने भजनसेवा करण्यात आली. त्यांच्या सुश्राव्य भजनाच्या स्वरांनी आणि टाळ-मृदुंगाच्या निनादात संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला 1 लाखाची लाच घेताना अटक

0

पुणे:
पिंपरी महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी करीत असलेल्यास १ लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. कंपनीतून वायु प्रदुषण होत असून त्याबाबत गुन्हा दाखल करु नये, यासाठी १ लाख रुपयांची लाच मागितली होती. स्वप्नील मनोहर पाटील (वय ४०) असे या महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे. पाटील हा पिंपरी चिंचवड महापालिकेत पर्यावरण अभियांत्रिकी विभागात कार्यरत आहे.

याबाबत एका ३० वर्षाच्या उद्योजकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांची भोसरी एमआयडीसीमध्ये श्री ट्रेडिंग नावाची कंपनी आहे. गेली १६ वर्षे यांची कंपनी कार्यरत आहे. २५ मार्च रोजी त्यांच्या कंपनीत दोघे जण आले. स्वप्नील पाटील याने सांगितले की, तुमच्या कंपनीच्या विरुद्ध वायु प्रदुषणाची सारथी अ‍ॅपवर ऑनलाईन तक्रार आली आहे. आजु बाजुच्या लोकांना कंपनीतून येणार्‍या वासाचा त्रास होत आहे, असे म्हणून मोबाईलमध्ये आलेली तक्रार दाखविली. त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांना संपूर्ण कंपनी दाखविली. कोठेही वायु प्रदुषण होत नसल्याचे दाखविले. त्यानंतर तक्रार करणार्‍याला स्वप्नील पाटील याने बोलावून घेतले. त्यांनी कंपनीत बसून पंचनामा तयार केला. त्यानंतर त्यांना तुमच्याकडे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण बोर्डाचे सर्टिफिकेट आहे का अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी सर्टिफिकेट नसल्याचे सांगितले.

त्यानंतर काही दिवसांनी तुमच्याकडे प्रदुषण नियंत्रण बोर्डाचे सर्टिफिकेट नसल्याने तुमच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. त्याची नोटीस तयार असल्याचे सांगितले. तक्रारदार स्वप्नील पाटील याला पिंपरी महापालिकेतील कार्यालयात जाऊन भेटल्यावर त्याने कारवाई करायची नसेल तर १ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर स्वप्नील पाटील याने तक्रारदार, त्यांचे वडिल, कंपनीचे मॅनेजर यांना वारंवार फोन करुन लाचेची मागणी केली. त्यानंतर १४ मे रोजी त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

या तक्रारीची पडताळणी केली असता स्वप्नील पाटील याने १ लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी चिंचवड महापालिकेत सापळा रचला. महापालिकेतील कार्यालयाबाहेर स्वप्नील पाटील आला. तक्रारदार यांच्या कारमध्ये येऊन त्यांच्याकडून १ लाख रुपये घेऊन स्वप्नील पाटील याने आपल्याकडील सॅगमध्ये ही रक्कम ठेवली. त्याचवेळी तक्रारदार यांनी कारचे चारही इंटीकेटर लावून इशारा केला. तेथेच थांबलेल्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने स्वप्नील पाटील याला पकडले. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाटील याला एक दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करीत आहेत.

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून


पर्यटकांनी ऐतिहासिक़ पर्यटनाचा लाभ घ्यावा
– पर्यटनमंत्री शंभूराज देसाई
मुंबई, दि. 16 : भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (IRCTC), ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा अनुभव देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ या एका विशेष ट्रेनची घोषणा केली आहे. ही यात्रा Bharat Gaurav Tourist Train अंतर्गत 09 जून 2025 पासून सुरू होत आहे.
या 5 दिवसांच्या विशेष टूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम असणार आहेत. या सहलीद्वारे महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असलेल्या ठिकाणांचा पर्यटकांनी अनुभव घ्यावा, असे आवाहन पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.
भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेजस्वी इतिहासाशी निगडीत धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्याचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा मानस आहे. याबाबत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे, व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सुर्यवंशी आणि पर्यटन संचालक बी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
ही केवळ एक यात्रा नसून, आपल्या वैभवशाली परंपरेचा, सांस्कृतिक वारशाचा आणि स्वाभिमानी इतिहासाचा साक्षात अनुभव घेण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वे विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी ऐतिहासिक उपक्रमासाठी विविध अंगांनी सुसज्ज तयारी केली आहे. भारत गौरव ट्रेन ज्या-ज्या ठिकाणी पोहोचेल, त्या ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती पर्यटकांना देण्यात येणार आहे.
यात्रेदरम्यान, सर्व प्रवाशांचा अनुभव सुखकर आणि संस्मरणीय व्हावा, यासाठी महामंडळाचे अधिकारी IRCTC च्या समन्वयाने प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करतील. 5 दिवसांच्या या प्रवासात रेल्वे स्थानकांपासून ते गडकिल्ल्यांपर्यंत, प्रत्येक ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणांचा वेध घेत, पर्यटकांना समृद्ध अनुभव दिला जाईल. प्रत्येक गडकोटावर, ऐतिहासिक स्थळी पर्यटन व्यवस्थेचे काटेकोर नियोजन केले जाईल. इतिहासावर आधारित कार्यक्रम, गाईड्स, तसेच स्थानिक शिवप्रेमी संघटनांच्या सहकार्याने ही यात्रा अधिक संस्मरणीय करण्यात येईल, असे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सांगितले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा तेजोमयी इतिहास, महाराष्ट्राची शौर्यशाली परंपरा, आणि आपली समृद्ध संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याच्या शासनाच्या ध्यासाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ संपूर्ण समर्पणाने साथ देत आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला नवे क्षितिज गवसणार असून, प्रत्येक भारतीयाच्या हृदयात शिवप्रेमाची जाज्वल्य ज्वाला जागवली जाणार आहे.
या प्रेरणादायी यात्रेत सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वसा चालवावा, आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगावा, आणि नव्या पिढीला या इतिहासाचे दर्शन घडवावे”, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.) यांनी केले आहे.
या उपक्रमासाठी महामंडळाचे महाव्यवस्थापक श्री. चंदशेखर जयस्वाल, वरीष्ठ व्यवस्थापक श्री. संजय ढेकणे तसेच सर्व संबंधित अधिकारी समन्वय साधत परीश्रम करीत असून, छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले, महाराष्ट्राची समृद्ध परंपरा आणि लोकसंस्कृती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी महामंडळ सतत प्रयत्नशील आहे, असे महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिपक हरणे यांनी सांगितले आहे.
🔶 सहल तपशील –
 सहलीचे नाव: छत्रपती शिवाजी महाराज सर्किट
 शुभारंभ दिनांक: 09 जून 2025
 कालावधी: 5 दिवस / 6 दिवसांची यात्रा (सकाळी समाप्ती)
 प्रारंभ व समाप्ती स्थान: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मुंबई
 प्रवास सुरु व संपण्याचे स्थानकं : दादर, ठाणे
🚆 यात्रेचा प्रवासमार्ग –
मुंबई (CSMT) – रायगड – पुणे – शिवनेरी – भीमाशंकर – प्रतापगड – कोल्हापूर – पन्हाळा – मुंबई.

🏰 प्रमुख स्थळांची माहिती –
 रायगड किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक येथे झाला व ही राजधानी होती.
 लाल महाल, पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण येथे गेले.
 कसबा गणपती व शिवसृष्टी, पुणे – पुण्याचे ग्रामदैवत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संग्रहालय.
 शिवनेरी किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ.
 भीमाशंकर ज्योतिर्लिंग – 12 ज्योतिर्लिंग पैकी एक प्रमुख धार्मिक स्थळ.
 प्रतापगड किल्ला – अफझल खानावरील ऐतिहासिक विजयाचे ठिकाण.
 कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर
 पन्हाळा किल्ला – बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक.

💰 पॅकेज शुल्क (प्रति व्यक्ती): –
उपरोक्त सहलासाठी विविध पॅकेजिस तयार करण्यात आली असुन सोयीनुसार इकोनॉमी (SL), कम्फर्ट (3AC), सुपीरियर (2AC) अशा प्रकारच्या सुविधांची निवड करता येणार आहे. सदरच्या पॅकेज बाबत सविस्तर माहीती IRCTC च्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

✅ पॅकेज मध्ये समाविष्ट सेवा: –
 भारत गौरव ट्रेनने प्रवास (SL / 3AC / 2AC)
 AC / Non-AC हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था
 सर्व ठिकाणी स्थानिक वाहतूक व गाईड
 ऑनबोर्ड व ऑफबोर्ड शुद्ध शाकाहारी भोजन
 प्रवास विमा, सर्व प्रवेश शुल्क (किल्ले, मंदिरे, रोपवे, शिवसृष्टी इत्यादी)
 सुरक्षा व्यवस्था.

❌ पॅकेजमध्ये नसलेल्या सेवा: –
 साहसी खेळ, बोटिंग इत्यादी.
 खोलीतील सेवांसाठी वेगळी रक्कम आकारली जाईल.
 इतर कोणताही वैयक्तिक खर्च.
 कोणतेही अतिरिक्त पर्यटन स्थळ.

🗓️ दैनंदिन टूर कार्यक्रम (संक्षिप्त): –
 पहिला दिवस: मुंबई – रायगड – पुणे.
 दुसरा दिवस: पुणे (लाल महाल, शिवसृष्टी, कसबा गणपती).
 तिसरा दिवस: शिवनेरी – भीमाशंकर – पुणे.
 चौथा दिवस: प्रतापगड – कोल्हापूर.
 पाचवा दिवस: कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर – पन्हाळा किल्ला – मुंबई.
 सहावा दिवस: मुंबई (टूर समाप्त).

📌 आरक्षण व अधिक माहिती साठी संपर्क: –
IRCTC वेबसाईट: www.irctctourism.com
/

भाजपा नेत्यांकडून सातत्याने सैन्य दलाचा अपमान, PM मोदी व जे. पी. नड्डांनीच माफी मागावी: हर्षवर्धन सपकाळ

मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदिश देवरा व मंत्री विजय शाह दोघांवरही राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा.

मुंबई, दि. १६ मे २५
ऑपरेशन सिंदूरचे दैदिप्यमान यश हे भारतीय सैन्य दलाचे असून संपूर्ण देशाला या पराक्रामचा अभिमान आहे परंतु भारतीय जनता पक्षाचे काही वाचाळवीर जाणीवपूर्वक भारतीय सैन्यदलाचा अपमान करणारी विधाने करत आहेत. मध्य प्रदेशचा एक मंत्री विजय शाह यांच्या बेताल विधानानंतर मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदिश देवरा यांनी केलेले विधान भारतीय सैन्य दलाचा अपमान करणारे आहे. भाजपा नेत्यांच्या अशा वक्तव्याप्रकरणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीच जाहीर माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, भाजपा मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बद्दल केलेले विधान चीड आणणारे होते, देशभरातून यावर संताप व्यक्त केला जात असतानाच आता भाजपाच्या दुसऱ्या नेत्याने वायफळ बडबड केली आहे. “संपूर्ण देश, देशाचे सैन्य आणि सैनिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चरणी नतमस्तक आहेत.” असे निर्लज्जपणाचे विधान केले आहे. हे विधान भारतीय सैन्य दलाचे शौर्य, संस्कृती व परंपरेचा घोर अपमान करणारे आहे.
मंत्री विजय शाह यांच्यावर भाजपाने अद्याप कारवाई केलेली नाही. भाजपाचे नेते बेताल विधाने करत असताना नरेंद्र मोदी, अमित शाह व जे. पी. नड्डा गप्प का आहेत? भाजपा हा निर्ढावलेला व मस्तीखोर पक्ष आहे, पण जनता हा अपमान सहन करणार नाही. भाजपाचे मंत्री विजय शाह व जगदिश देवरा या दोघांवरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत या विकृतांना वेड्याच्या इस्पितळात भरती केले पाहिजे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढाईत काँग्रेस शिवसेनेबरोबर: हर्षवर्धन सपकाळ.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर घेतली शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची घेतली भेट.

मुंबई, दि. १६ मे २५
भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र धर्म बुडवायला निघाला आहे. संविधान व लोकशाही व्यवस्थेला भाजपा संपवत आहे, त्याचे रक्षण करण्यासाठी मविआ व इंडिया आघाडी काम करत आहे. भाजपाविरोधात लढण्यासाठी जे पक्ष येतील त्यांच्यासोबत काँग्रेस आहे. लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत एकत्र आहोत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ही एक शिष्टाचार भेट होती, यावेळी विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली. प्रबोधनकार ठाकरे यांचा विचार आजही तेवढाच महत्वाचा आहे. प्रबोधन ठाकरे यांनी महाराष्ट्र धर्म कसा असला पाहिजे हे सांगितलेले आहे. ‘देवांचा धर्म व धर्माची देवळे’ पुस्तकात सांगितल्याप्रमाणे आज भाजपा धर्म बुडवायला निघाला आहे. भाजपा लोकशाही व संविधान विरोधी आहे. लोकशाही, संविधान व शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढ्यात आगामी काळात सोबत राहणे व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या संदर्भात यावेळी चर्चा झाली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने स्थानिक नेतृत्वाला आघाडीचे अधिकार दिले असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांना दिली. या निवडणुकीची अधिसुचना निघाल्यावर मित्र पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी लोणार सरोवराची फोटोग्राफी असलेले एक पुस्तक, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्राचे फटकारे व पंढरपूरच्या वारीची फोटोग्राफी असलेले पुस्तक त्यांनी भेट दिले तर मी उद्धव ठाकरे यांना लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांच्यावरील पुस्तक भेट दिल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

जास्तीत जास्त भूभागावर वीज अटकाव यंत्रे बसवा-डॉ. नीलम गोऱ्हे

छत्रपती संभाजीनगर, दि.१६ – पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात विजा कोसळून जीवित आणि वित्तहानी होते, ही हानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त भूभागावर वीज अटकाव यंत्रे बसवा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज जिल्हा प्रशासनास दिले.
सुभेदारी विश्रामगृह येथे आज डॉ. श्रीमती गोऱ्हे यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीत अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, महिला व बालकल्याण विभागाच्या योजना, आरोग्य, ऊसतोड कामगार या विषयांचा आढावा घेण्यात आला.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपोवळे, कामगार उपायुक्त चंद्रकांत राऊत, महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी, जिल्हा महिला बालविकास अधिकारी रेशमा चीमंद्रे, शिक्षणाधिकारी प्राथमिक जयश्री चव्हाण,महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव आदी बैठकीस उपस्थित होते.
विजा कोसळून होणारी जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वित करावी. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीची विशेष तरतूद करावी. जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पुढाकार घेऊन प्रत्येक आरोग्य केंद्रांमध्ये लाडक्या बहिणी व त्यांच्या किमान पाच सहकाऱ्यांची आरोग्य तपासणी करावी. महिलांना होणारे गर्भाशयाचे कर्करोग, स्तनाचे कर्करोग, रक्तक्षय व इतर आजारासंदर्भातची तपासणी होऊन त्यावर उपचार करणे शक्य होईल. त्याद्वारे जिल्ह्यातील महिलांच्या आरोग्याचा स्तर उंचावण्यास मदत होईल. प्रत्येक शासकीय आरोग्य केंद्रातआरोग्य सुविधा सह औषधे यांचा साठाही उपलब्ध करून देण्याबाबतही नियोजन करावे. शाळेमध्ये ‘गुड टच बॅड टच’ सारखे उपक्रम राबवून पोलीस यंत्रणेने शाळेमध्ये निर्भय वातावरण करण्यासाठी पोलीस दीदी आणि पोलीस काका यांच्या माध्यमातून वारंवार भेटी द्यावेत. विद्यार्थ्यांमध्ये निर्भय वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश नीलम गोऱ्हे यांनी दिले.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यामध्ये दशसूत्री उपक्रमा अंतर्गत शाळा महाविद्यालयमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण, आरोग्य, तांत्रिक कौशल्य, निर्भय वातावरण, यासाठी उपक्रम राबविले जात असून या उपक्रमाची माहिती यावेळी दिली . विद्यार्थ्यांना समुपदेशन, तक्रारपेटी, शाळांमध्ये तक्रार करण्यासाठी संपर्क क्रमांक यासाठीचे उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले.

जिल्ह्यामधील ऊसतोड कामगारांची नोंदणी एकूण २५८१३ असल्याचे पंचायत विभागामार्फत सांगितले. या ऊसतोड कामगारांसाठीच्या कामगार विभाग, सामाजिक न्याय विभाग व इतर विभागाने समन्वयाने ऊसतोड कामगारांच्या शैक्षणिक,आर्थिक विकासासाठी योजनांचा लाभ द्यावा,असे निर्देश श्रीमती गोऱ्हे यांनी दिले.

सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक येथे नवीन मल्टी एजन्सी सेंटर (एमएसी) चे केले उद्घाटन

नवी दिल्ली-

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक येथे नवीन मल्टी एजन्सी सेंटर (एमएसी) चे उद्घाटन केले. या प्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृढ राजकीय इच्छाशक्तीचे, गुप्तचर संस्थांच्या अचूक माहितीचे आणि आपल्या तिन्ही सशस्त्र दलांच्या अतुलनीय प्रहार क्षमतेचे अद्वितीय प्रतीक आहे. ते म्हणाले की, भारताला आपल्या तिन्ही सशस्त्र दलांचा, सीमा सुरक्षा दलाचा आणि सर्व सुरक्षा संस्थांचा अभिमान आहे.

छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील करेगाट्लू हिल्स (केजीएच) येथे केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांनी (सीएपीएफ) अलीकडेच केलेल्या ऐतिहासिक नक्षलविरोधी कारवाईबद्दल बोलताना केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, नक्षलवादाविरुद्धच्या या ऐतिहासिक कारवाईमधून आपल्या सुरक्षा दलांमधील उत्कृष्ट समन्वय दिसून येतो. ऑपरेशन सिंदूर दरम्यानही असाच समन्वय दिसून आला, यावरून हे निदर्शनास येते की एखादी मोहीम राबविण्यासाठी आपल्या गुप्तचर संस्था आणि तिन्ही सशस्त्र दलांच्या प्रक्रियेत आणि विचारसरणीत खूप चांगला समन्वय आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, नवीन एमएसीमुळे आजच्या वातावरणात भेडसावणाऱ्या जटिल आणि परस्परांशी निगडित राष्ट्रीय सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी सर्व एजन्सींच्या प्रयत्नांना समन्वयित करण्यासाठी एक अखंड आणि एकात्मिक व्यासपीठ उपलब्ध होईल. त्यांनी आशा व्यक्त केली की हे नवीन जाळे दहशतवाद, उग्रवाद, संघटित गुन्हेगारी आणि सायबर हल्ल्यांसारख्या गंभीर धोक्यांचा सामना करण्यासाठी देशाच्या प्रयत्नांना बळकटी देईल.

अमित शहा यांनी नवीन एमएसी  नेटवर्कची प्रशंसा केली आणि हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरशी संबंधित कामे विक्रमी वेळेत यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, यामध्ये एमएसी आणि जीआयएस सेवांमधील विशाल डेटाबेसची क्षमता वापरण्यासाठी एम्बेडेड (अंतर्भूत) एआय/एमएल तंत्रांसारख्या भविष्यकालीन क्षमतांचा समावेश आहे.

नवीन एमएसी बरोबर उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्रगत डेटा विश्लेषणाचा लाभ घेण्यासाठी, या व्यासपीठावर विविध केंद्रीय संस्थांमध्ये विकेंद्रित असलेल्या इतर महत्त्वाच्या डेटाबेसना एकत्रित करण्याची गरज असल्याचे  अधोरेखित करून भविष्यातील रोडमॅप (पथदर्शक आराखडा) देखील त्यांनी मांडला. शाह म्हणाले की, या नवीन नेटवर्कमुळे एमएसी  नेटवर्कवर निर्माण होणाऱ्या डेटा विश्लेषणाची गुणवत्ता उच्च पातळीवर जाईल, ज्यामुळे अचूक ट्रेंड विश्लेषण, हॉटस्पॉट मॅपिंग आणि टाइमलाइन विश्लेषणाद्वारे अंदाज वर्तवण्याजोगे  आणि क्रियाशील निकाल मिळू शकतील अशी अपेक्षा आहे. संघटित गुन्हेगारीशी गुंतागुंतीचे संबंध असलेल्या दहशतवादी परिसंस्थेचा मुकाबला करण्यासाठी नवीन एमएसी मोठी मदत करेल.

भारतातील सर्वात मोठे इंटेलिजेंस फ्यूजन सेंटर म्हणून, मल्टी एजन्सी सेंटर अर्थात बहु संस्था केंद्र 2001 सालापासून अस्तित्वात आहे आणि केंद्रीय गृहमंत्री एमएसीच्या तांत्रिक अपग्रेडेशनसाठी (श्रेणी सुधारणा) सतत सक्रियपणे मार्गदर्शन करत आहेत. गुप्तचर विभागात स्थित नवीन एमएसीने सर्व गुप्तचर, सुरक्षा, कायदा अंमलबजावणी आणि तपास संस्थांना परस्परांशी जोडले आहे. 500 कोटींहून अधिक खर्च करून कार्यान्वित करण्यात आलेल्या नव्या एमएसी नेटवर्कमध्ये गुणात्मक आणि संख्यात्मक दोन्ही प्रकारचे परिवर्तन झाले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या नव्या एमएसी नेटवर्कमध्ये देशातील बेट प्रदेश, बंडखोरीग्रस्त भाग आणि उंच डोंगराळ भूभाग यांचा समावेश आहे, जे जलद आणि स्वतंत्र सुरक्षित नेटवर्कसह दुर्गम भागातील जिल्हा एसपींच्या पातळीपर्यंत, दुर्गम भागातही   कनेक्टिविटी प्रदान करते.

श्री तुळशीबाग महागणपतीला १५०० कलिंगडांचा नैवेद्य 

मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट च्या वतीने आयोजन ; वासंतिक चंदन उटी
पुणे : रंगीबेरंगी फुलांची आकर्षक आरास… चंदन उटीचे लेपन आणि तब्बल १ हजार ५०० कलिंगडांचा नैवेद्य श्री तुळशीबाग महागणपतीला दाखविण्यात आला. शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात (१२५) संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पासमोर साकारलेला कलिंगडांचा नैवेद्य व पुष आरास पाहण्याकरिता गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली.

मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट च्या वतीने कलिंगडाचा महानैवेद्य‌ व वासंतीक चंदन उटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, उपाध्यक्ष विनायक कदम, दत्ताभाऊ कावरे, गणेश रामलिंग आणि परिसरातील व्यापारी उपस्थित होते. प्रसिद्ध पुष्प सजावटकार सुभाष सरपाले यांनी ही आरास साकारली.

संकष्टी चतुर्थी च्या दिवशी वासंतिक चंदन उटी लेपन करण्यात आले. तसेच रात्री गणेश जागर आणि महाआरती चे आयोजन करण्यात आले होते. शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मंडळातर्फे विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

निवडणुका दिसताच टेंडरसाठी महापलिकेत जाणारे आता प्रशासकाला धारेवर धरण्याचे नाट्य रंगवू लागलेत- संजय मोरे

भाजप करतय पुणेकरांची दिशाभूल .. पुन्हा तेच ते आणि तेच …

पुणे- आज महापालिकेत अचानक भाजपच्या केंद्रीय राज्य मंत्री यांच्या नेतृत्वाखाली काही माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांना बैठक घेऊन धारेवर धरण्याचे नाट्य केवळ निवडणुका समोर दिसू लागल्याने रंगविले असून आजपर्यंत ते केवळ टेंडर साठी महापालिकेत चकरा मारीत होते असा आरोप शिवसेनेचे शहर अध्यक्ष संजय मोरे यांनी केला आहे .

ते पुढे म्हणाले,’ नाले सफाईत हात की सफाई नको. असे आयुक्तांना व प्रशासनाला खडसावून सांगणारे पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी २०० कोटी निधी पुण्यातील ओढ्यांच्या सीमाभिंती बांधण्यासाठी आणला म्हणून संपूर्ण पुण्यात बॅनरबाजी केली होती. शेवटी तो निधी महाराष्ट्र सरकारकडून आलाच नाही. म्हणजे कोण कोणाला फसवत आहे ? नागरिकांना निवडणुकीत फसवायचे निवडून आल्यावर अधिकाऱ्यांना झापायचं मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर, असा खेळ प्रशासन आणि भाजप सत्ताधारी करीत आहेत. ही पुणेकरांची दिशाभूल आहे. पहिल्याच अवकाळी पावसाने सगळ उघडं पडल, आणि महापालिका निवडणूका डोळ्यासमोर दिसतायत, त्यामुळे काहीतरी करतोय हे दाखविण्याचा भाजपचा हा केविलवाणा प्रयत्न दिसतो आहे. इतके दिवस फक्त स्वतःसाठी निधी आणि टेंडरसाठीच चकरा मारणारे भाजपचे नगरसेवक आत्ता अचानक प्रशासनाला धारेवर धरतायत. दिल्ली पासून गल्लीपर्यंत भाजपाची सत्ता आहे. महापालिकेमधे प्रशासक यांच्याच सत्ताकाळात आहे. मागील आठ वर्षापासून भाजपची सत्ता पुणे महापालिकेत आहे. महापौर ते खासदार आणि केंद्रीय मंत्री या प्रवासात पुणेकरांच्या प्रश्नांचा विसर पडल्याने आता एकूणच पुण्याचं नेतृत्व करायचं आहे ? अस आजच्या बैठकीतून दिसत आहे. काही कोटीचे टेंडर लागूनही पुण्यातील ओव्हरहेड केबल भूमिगत करण्याचे काम अद्यापही झालेले नाही. भाजपच अस झालय नाचता येईना आणि अंगण वाकडं म्हणायच. जनतेची दिशाभूल करायची. आता ते शक्य नाही. पुणेकर सूज्ञ आहेत. अबकी बार भाजपा हद्दपार …होईल अशीच आता स्थिती आहे.

भाजप शहराध्यक्षाचे कार्यालय आणि व्यायामशाळा वीजचोरीत सापडल्याचा काँग्रेस- शिवसेना कार्यकर्त्यांचा दावा

पुणे:- भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांचे सानेगुरुजी नगर, आंबील ओढा येथील कार्यालय आणि त्यांचीच भ्रष्टाचारात अडकलेली व्यायामशाळा, विरंगुळा केंद्र वीजचोरीत अडकले असल्याची माहिती अधिकारात उघड झाल्याने काँग्रेस- शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत, आज काँग्रेस – शिवसेना कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने महावितरण पुणे परिमंडळ चे मुख्य अभियंता सुनील काकडे यांची भेट घेऊन त्यांना घेराव घातला आणि प्रश्नांची सरबत्तीच झाडली. सामान्य माणसाला वेगळा न्याय आणि पुणे भाजप च्या शहराध्यक्षाला वेगळा न्याय का? वीजचोरी उघड होऊनही कारवाई का नाही? गेले अनेकवर्ष सदर प्रकरण का दाबण्यात आले? असे अनेक प्रश्न विचारले गेले.यावेळी शिष्टमंडळात किशोर मारणे शहर अध्यक्ष- राजीव गांधी पंचायत राज संघटन पुणे, अक्षय जैन – जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेस, अनंत घरत शिवसेना प्रसिद्धी प्रमुख,सागर धाडवे सरचिटणीस युवक कॉंग्रेस पुणे, कुणाल काळे- युवक काँग्रेस उपाध्यक्ष पुणे, अविनाश अडसूळ – पुणे शहर सचिव, हनुमंत गायकवाड उपाध्यक्ष कोथरूड विभाग हे उपस्थित होते.सदर भ्रष्टाचाराची माहिती कांग्रेस कार्यकर्ते तक्रारदार सागर धाडवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार मेधाताई कुलकर्णी यांस ह मेल द्वारे पाठविली आहे.असेही त्यांनी म्हटले आहे.

या प्रकरणी अनंत घरत आणि सागर धाडवे यांनी म्हटले आहे कि,’ पुणे महानगर पालिकेच्या प्रभाग क्र २९ मधील भाजप शहराध्यक्षांचा तीन व्यायामशाळांचा लाखो रुपयांचा भ्रष्टाचार विषय आज पुण्यात गाजत असताना माहिती अधिकारात अनेक धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे, आणि ह्या भ्रष्टाचारात महावितरण च्या पेशवे पार्क उपविभाग चा महत्वाचा वाटा आहे हे सिद्ध झाले आहे.

स्थळ पाहणी अहवालात भाजप कार्यालय तसेच स्थानिक नगरसेवक यांचे नाव गाळून फक्त कार्यालय” शब्दाचा उल्लेख केला आहे, वीज वापर मधे पब्लिक सर्व्हिस असे नमूद केले आहे पण सदर ठिकाणी शेकडो मुलांकडून व्यायामासाठी पैसे घेतले जातात त्यामुळे हा पब्लिक सर्व्हिस प्रकार नसून व्यावसायिक आहे, तसेच सदर स्थळ पाहणी अहवालात महावितरण च्या अधिकाऱ्यांकडून मुद्दाम पुन्हा स्थानिक सत्ताधारी भाजप नगरसेवकाला वाचवण्यासाठी कोणत्यातरी त्रयस्थ व्यक्तीचे नाव चालक म्हणून टाकण्यात आले आहे असा आरोप काँग्रेस कार्यकर्ते सागर धाडवे यांनी केला आहे.

तसेच दिनांक १६/०४/२५ च्या माहिती अधिकारात सदर कै भानुदास गेजगे व्यायामशाळा सानेगुरुजी नगर , लोकमान्य नगर व्यायामशाळा, आणि कै चंद्रकांत बोत्रे व्यायामशाळा, शाळा क्रमांक १७, नवी पेठ पुणे ३० , या पुणे मनपाच्या व्यायामशाळा मालमत्तेची विज मीटर ची बिले मागवली असताना महावितरण कडून माहिती अधिकारात मयत व्यक्तींची बिले देण्यात आली अश्या प्रकारे माहिती अधिकारात माहिती घेणाऱ्या ची फसवणूक पेशवे पार्क उपविभाग कार्यालय कडून केली गेली आहे .
सामान्य माणसाला ५००/-₹ नाही वेळेवर भरले तर विज तोडणारे महावितरण चे अधिकारी ह्या विषयात गेले १३ वर्ष शांत का आहेत
महावितरणने ही आपल्या महावितरणच्या अश्या भ्रष्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करावी वीजचोरी साठी साथ देण्यास जबाबदार म्हणून कठोर कारवाई करावी मागील १२ वर्षाची थकबाकी तत्पर वसूल करावी तसेच वीजचोरी करणाऱ्या स्थानिक भाजप नगरसेवकावर तत्पर गुन्हा दाखल करण्यासाठी कारवाई करावी,अन्यथा आम्हाला सदर भ्रष्टाचाराच्या विरोधात , वीजचोरी विरोधात महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन करावे लागेल आणि वेळप्रसंगी न्यायालयीन लढाई सुरू करावी लागेल असे महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना भेटण्यास गेलेल्या शिष्टमंडळाकडून कळविण्यात आले .यावेळी बोलताना मुख्य अभियंता काकडे यांनी सदर वीजचोरी विषयात कडक कारवाई करण्याचे आदेश अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांना दिले .