20 मे च्या आंदोलनात मातंग समाजाने लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा — रमेश बागवे
पुणे : अनुसूचित जातींमधील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल घटकांना न्याय मिळावा यासाठी आरक्षणाचे अबकड असे वर्गीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी मातंग समाज २० मे २०२५ रोजी लाखोंच्या संख्येने मुंबईवर महाआक्रोश मोर्चा काढणार आहे .या महा आक्रोश मोर्चाला मातंग समाजाने लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मातंग समाजातील सर्वपक्षीय व सर्व संघटनेच्या नेत्यांकडून आज पत्रकार परिषदेत करण्यात आले .
सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आक्रोश महाआंदोलन आयोजित करण्यात आले आहे. हे आंदोलन २० मे २०२५ रोजी, मुंबईच्या आझाद मैदानात दुपारी १ ला* होणार आहे. या आंदोलनाचा मुख्य उद्देश म्हणजे अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून ते येत्या जून २०२५ पासून लागू करवे .उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींमधील दुर्लक्षित घटकांना शैक्षणिक संधी, शासकीय नोकरी व योजनांचा थेट लाभ मिळू शकेल. तरी “राज्य शासनाच्या विविध योजनांपासून आणि आरक्षणाच्या थेट लाभापासून अनेक लहान लहान उपगट वंचित राहत आहेत. त्यामुळे हक्काचे आरक्षण सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपवर्गीकरण अत्यावश्यक झाले आहे अशी समाजाची मागणी आहे. या आंदोलनात सर्व पक्षीय अनेक मान्यवर नेते व लोकप्रतिनिधी सहभागी होणार असून,या आंदोलनाचे नेतृत्व माजी गृहराज्यमंत्री व मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक रमेश बागवे ,आमदार सुनील कांबळे,आमदार अमित गोरखे,आमदार जितेश अंतापूरकर,दलित महासंघाचे नेते प्रा.मच्छिंद्र सकटे,अखिल भारतीय कांग्रेस पक्षाचे सचिव रवींद्र दळवी,माजी आमदार मधुकरराव घाटे, *माजी आमदार नामदेव जयराम ससाणे,माजी सभागृह नेते ,नगरसेवक सुभाष जगताप,विजय डाकले,अनिल हतागळे ,माजी नगरसेविका स्वाती लोखंडे ,उषा नेटके ,अँड.एकनाथ सुगावकर, *माजी मंत्री दिलीप कांबळे,माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, पंडित सूर्यवंशी ,मारुती वाडेकर ,अशोक लोखंडे ,राम चव्हाणयांसारखे अनेक नेते आंदोलनात सहभागी होणार आहेत. सरकारने लवकरात लवकर आरक्षणाचे उपवर्गीकरण करून न्याय द्यावा*, अन्यथा आंदोलन अजूनतीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे येणार्या मंगळवारी आझाद मैदानावर आयोजित केलेल्या आंदोलन सहभागी होण्याचे आवाहन या पत्रकार परिषदेत करण्यात आले . पुण्यातील या पत्रकार परिषदेस माजी गृहराज्यमंत्री व मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक रमेश बागवे ,लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक विष्णूभाऊ कसबे,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुभाष जगताप ,माजी नगरसेवक अविनाश बागवे,अनिल हतागळे ,क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे ,माजी नगरसेविका स्वाती लोखंडे ,सुखदेव अडागळे ,राजश्रीताई अडसूळ,उषा नेटके ,यासह पुण्यातील विविध पक्ष संघटनाचे प्रमुख नेते उपस्थित होते .
भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती मुंबई, दि. १८ – पहलगाम दहशतवादी हल्ल्यात दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या ३ डोंबिवलीकरांसह सर्व पीडितांना आपल्या भारतीय सशस्त्र दलाने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला. या ऑपरेशनदरम्यान भारतमातेच्या वीरपुत्रांनी दाखविलेल्या शौर्य, संयम आणि बलिदानाच्या सन्मानार्थ डोंबिवलीत ‘भव्य तिरंगा यात्रा’ भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. श्री गणपती मंदिर संस्थान येथून गणरायाच्या आशीर्वादाने सुरू झालेली तिरंगा यात्रा इंदिरा चौक – पीपी चेंबर्स – सर्वेश हॉल – पारसमणी नाका करत छत्रपती शिवाजी महाराज चौक (घरडा सर्कल) येथे पोहोचली. डोंबिवलीचे वीरपुत्र कॅप्टन विनयकुमार सच्चान स्मारक येथे त्यांच्या पुण्यस्मृतींस अभिवादन करून यात्रेचा समारोप झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील नवा भारत प्रसंगी दहशतवादाविरुद्ध किती कठोर, कणखर होऊ शकतो; हे ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे जगाने पाहिले. यानिमित्ताने दिसलेल्या नव्या भारताच्या लष्करी सामर्थ्यासोबतच कोट्यवधी भारतीयांची एकजूट हे ‘ऑपरेशन सिंदूर’चे यश आहे, अशी ग्वाही यात्रा समारोपाप्रसंगी दिली.
या यात्रेदरम्यान आ. सुलभाताई गायकवाड, आ. राजेश मोरे, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, गुलाबराव कारंजुले, नरेंद्र पवार, नाना सूर्यवंशी, नंदू परब, नंदू जोशी यांच्यासह पवन पाटील, प्रियाताई जोशी, करण जाधव, धनाजी पाटील, मंदार टावरे, समीर भंडारे, रितेश फडके, सचिन काटे, अमित धात्रस, विजय उपाध्याय, नितेश म्हात्रे, संतोष शेलार, मितेश पेणकर आदी मंडल अध्यक्ष उपस्थित होते. तसेच डोंबिवलीकर न्यू फोर्स अकॅडमीमधील प्रशिक्षणार्थी आणि मोठ्या संख्येने कल्याण-डोंबिवलीकर या यात्रेत सहभागी झाले होते.
रामराज्य सहकारी बँक लि. च्या नव्या वास्तूच्या कोनशिलेचा उद्घाटन समारंभ
पुणे : जागतिक, राष्ट्रीय, राज्य, जिल्हा आणि सहकारी बँका असे जाळे सर्वत्र पसरलेले आहे. काळ बदलला आहे. सायबर क्राईम खूप मोठ्या प्रमाणात वाढले असून हे अत्यंत भयानक आहे. सायबर क्राईम च्या माध्यमातून देशात ७० हजार कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. बँकांचे संचालक मंडळ हे मालक नसून विश्वस्त आहेत. सभासद हे खरे मालक असून त्यांचे हित जपणे गरजेचे आहे. त्याकरिता सहकारी बँकांनी ग्राहक व लोकाभिमुख व्हायला हवे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
रामराज्य सहकारी बँक लि. च्या नव्या वास्तूचा कोनशिला उद्घाटन समारंभ बिबवेवाडीतील सुप्रिम प्लाझा सोसायटीतील बँकेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार चेतन तुपे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, रामराज्य बँकेचे संस्थापक विजयराव मोहिते, अँड सुभाष मोहिते, अध्यक्षा नंदा लोणकर, उपाध्यक्ष शिरीष मोहिते यांसह बँकेचे सर्व संचालक व व्यवस्थापकीय मंडळातील सदस्य उपस्थित होते.
बँकेचे सुहास पांगुळ, दिलीप सातकर, रामकृष्ण फुले, बाळासाहेब रायकर, दिनेश डांगी, दशरथ शितोळे, ऍड. विजय थोपटे, अशोक कदम, अँड. सुभाष मोहिते, हरिदास चव्हाण, राजेश नाईकरे, सुनील पवार, अविनाश मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी अमरसिंह राठौर यांसह व्यवस्थापकीय मंडळ अध्यक्ष विनोद शहा, सदस्य सीए अनिल शिंदे, ऍड. हेमंत झंझाड यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, सहकार आणि कायद्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. सहकार क्षेत्राबद्दल लोकांमध्ये आपलेपणाची भावना रुजणे गरजेचे आहे. राजकारण बाजूला ठेवून बँकिंगपलीकडे पाहण्याची आवश्यकता असून त्यामधील सुधारणांकरिता समिती स्थापन करून पुढे वाटचाल करू.
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रात सहकारी चळवळ वाढली आणि रुजविली गेली. त्यामध्ये अनेकांचे योगदान आहे. महायुतीमध्ये तीन पक्ष काम करीत आहेत. माझी जवळीक या क्षेत्राशी जास्त असल्याने मी सहकार खाते घेतले. कालानुरूप यामध्ये अनेक बदल करायचे आहेत. गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळ वाढीला लागली आहे. यामध्ये विश्वासाहर्ता हा महत्वाचा घटक असून तो जपणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
अँड. सुभाष मोहिते म्हणाले, बँकेचे आजमितीस ११ हजार सभासद आहेत. समाजातील शेवटचा माणूस बँकिंगशी जोडला जावा, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेला संदेश आम्ही पूर्ण करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले. विजय मोहिते म्हणाले, ज्या भागात सुविधा नाहीत, तिथे बँकिंग करायचे हे आम्ही ठरविले होते. स्पर्धेपेक्षा लोकांना सेवा देण्याचे काम आम्ही करीत आहोत, याचा आम्हाला आनंद आहे.
नंदा लोणकर म्हणाल्या, दिनांक ४ एप्रिल १९९८ साली बँकेच्या पहिल्या वास्तूचे उद्घाटन झाले. तळागाळातील लोकांना मदत व्हावी, या त्यामागील उद्देश होता. आज बँकेच्या ८ शाखा असून मार्च २०२५ अखेर १७० कोटी रुपयाच्या ठेवी आणि ९६ कोटी रुपयांची कर्ज बँकेने दिली आहेत. तब्बल ३ हजार ५०० चौरस फुटाची मालकीची वास्तू बँकेने घेतली असून मुख्य कचेरी आणि बिबवेवाडी शाखा येथे सुरु आहे. त्याचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले आहे. याचा आम्हाला आनंद आहे.
मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईडी (अंमलबजावणी संचालनालय) या तपास यंत्रणेच्या अधिकारांवर तीव्र शब्दांत भाष्य केले. यावेळी त्यांनी पीएमएलए कायद्यातील तरतुदीला का विरोध केला, याबाबतही सांगितले. कायद्याच्या तरतुदीला विरोध केला होता, पण ऐकले नाही, सरकार गेले आणि त्यानंतर पहिली कारवाई पी. चिदंबरम यांच्यावर झाली, अशी आठवण शरद पवार यांनी यावेळी सांगितली. तसेच संजय राऊतांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती, त्यामुळे त्यांना पत्राचाळीच्या केसमध्ये संबंध नसताना गुंतवले गेले, असेही ते म्हणाले.
शरद पवार म्हणाले, ईडी ही जी यंत्रणा आहे, कशी वागते याचे उत्तम लिखाण पुस्तकात आहे. मला आठवते केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात होतो. पी. चिदंबरम हे त्यावेळी माझे सहकारी होते. कायद्यात कशी दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे, या संबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणला, तो प्रस्ताव वाचल्यानंतर मी डॉ. मनमोहन सिंगांना सांगितले हा प्रस्ताव अत्यंत घातक आहे, आपण करता कामा नये, त्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला. ज्याला अटक केली त्याने स्वत: गुन्हा केला नाही हे सिद्ध करावे अशी तरतूद कायद्यात प्रस्तावित केली गेली. मी स्वत: विरोध केला, हे करु नका, उद्या राज्य बदलले तर त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागेल हे सांगितले, ते ऐकले गेले नाही. राज्य गेले आणि पहिली कारवाई चिदंबरम यांच्यावर करण्यात आली. विरोधकांवर अशा केसेस अधिक केल्या जातील ही शंका माझ्या सारख्याला होती ती खरी ठरली, असे शरद पवार म्हणाले.
संबंध नसताना राऊतांना गुंतवले
शरद पवार यांनी यावेळी संजय राऊत यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईवरही भाष्य केले. ते म्हणाले, संजय राऊतांनी काय केले होते, ते नियमित सामनामध्ये रोखठोक भूमिका मांडतात, ते सुरु होते. ती त्यांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती. ते अस्वस्थ होते, फक्त संधीची वाट पाहत होते. त्यांना पत्राचाळ प्रकरणाने संधी दिली. पत्राचाळीमध्ये कष्ट करणारे मध्यमवर्गीय लोक राहत होते. त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला, त्या चाळकऱ्यांना घरे मिळावी अशी त्यांची मागणी होती. ते संजय राऊत यांच्याकडे गेले. संजय राऊत यांच्या नेहमीच्या लिखाणाने दुखावलेल्या शासकीय यंत्रणेला संधी मिळाली. ईडीचे योगदान या प्रकरणात अधिक आहे. ईडीने केलेल्या केसमध्ये संजय राऊत यांचा संबंध नसताना गुंतवले गेले. जिथे अन्याय होतो, अत्याचार होतो तिथे सामना उभा राहतो. शासकीय यंत्रणेत भ्रष्टाचार आहे, त्याच्या विरोधात ते नेहमीच लिहितात याची कल्पना आपल्या सर्वांना आहे, असे शरद पवार म्हणाले.
कारवाई दूरच, पण राऊतांनाच आत जावे लागले
मुंबई, महाराष्ट्रात काही लोक चुकीचे काम करत होते, हे माहीत असताना त्यांच्या संबंधी कारवाई होत नव्हती. संजय राऊतांनी खासदार म्हणून देशाच्या प्रमुखांना पत्र लिहिलं. जे लोक शासकीय यंत्रणा यांच्याशी भ्रष्टाचाराच्या मार्गानं संबंध ठेवतात, अशा लोकांमार्फत पैसे कसे गोळा केले जातात याचे सविस्तर लिखाण केंद्र सरकारला कळवले. त्या प्रकरणात 30 ते 35 लोक असे होते, कंपन्या होत्या, त्यांच्याकडून पैसे काढले गेले, ती रक्कम 58 कोटींच्या आसपास होती. ही माहिती संजय राऊतांकडे आल्यानंतर त्यांनी देशाच्या प्रमुख लोकांना लिखित स्वरुपात दिली, त्याचा परिणाम एकच झाला, कारवाई झाली नाही पण त्यांना आत जावे लागले. संजय राऊत यांना अटक झाली, त्याबद्दल पुस्तक लिहिण्यात आले आहे, असे शरद पवार म्हणाले.
पवारांनी संजय राऊतांच्या पुस्तकावरही केले भाष्य
संजय राऊतांच्या पुस्तकात दोन राजवटींचा पुस्तकात उल्लेख आहे. एक एनडीएच्या काळात आणि नंतर यूपीएच्या काळातील. ईडीने कोणत्या पक्षांवर केसेस केल्या याची माहिती आहे. एनडीएच्या काळात 21 जणांवर कारवाई केली होती. यूपीएच्या काळात 9 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं. अटक कुणाला केली नाही. एनडीएच्या काळात काँग्रेस, टीएमसी, राष्ट्रवादी, शिवसेना, द्रमुक, बिजू जनता दल, आरजेडी, बसपा, सपा, टीडीप, आप, मार्क्सवादी पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, मनसे, अण्णा द्रमुक, टीआरएस एवढ्या पक्षाच्या नेत्यांवर चौकशा करून केसेस केल्या, असंही शरद पवार म्हणाले.
तसेच मी विचार करतोय, हे पुस्तक वाचल्यावर महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेने देशात परिवर्तन केलं तर पहिलं काम हे करावं लागेल राजकीय पक्षांचा जो अधिकार आहे, जो ईडी कायद्याचा आधार घेऊन उद्ध्वस्त करायचा जी तरतूद झाली आहे, ती बदलावी लागेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
“हा एक कसोटीचा क्षण आहे. दिवस येतात, दिवस जातात. शरद पवार म्हणाले, सरकार येतं, तसं सरकार जातं. हे सरकार सुद्धा उद्या जाणार आणि ते आपल्याला घालवावंच लागेल. मला हे व्हायचं, आहे मला ते व्हायचं आहे, म्हणून नाही.
स्वर्गासारख्या आपला देश आहे. त्या देशाचा नरक करण्याचा जो प्रयत्न चालू ठेवला आहे, त्यांना नरकात टाकण्यासाठी म्हणून आपल्याला लढावं लागेल. नुसतं लढावं नाही तर, जिंकावं लागेल”, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्या प्रसंगी बोलताना ते असं म्हणाले आहेत. प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात हा प्रकाशन सोहळा पार पडला आहे. या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पटकथाकार, लेखक, कवी जावेद अख्तर होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले हे प्रमुख पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “आज या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला संजय राऊत यांच्या आई, वहिनी, दोन्ही मुली, जावई आणि दोन्ही भाऊ उपस्थित आहेत. घर जर ढेपाळलं तर, लढवय्या हा लढूच शकत नाही. संजय राऊत यांच्या आईने आणि सर्व कुटुंबीयांनी जे धाडस दाखवलं, त्या धाडसाला सीमाच नाही. संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर मी आणि रश्मी ठाकरे त्यांच्या घरी गेलो होतो. यावेळी आम्ही त्यांना धीर देण्या ऐवजी संजय राऊत यांच्या आई आणि सगळ्यांनी आम्हालाच धीर दिला. आयुष्याच्या प्रवासात अनेक माणसे भेटत राहतात. काही कायमची सोबत राहतात आणि काही संधीसाधू असतात. संधी सध्या झाली की पळून जातात. मला असं वाटतंय की, आज आपल्या सगळ्यांची परीक्षा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे घेत आहेत. आयुष्यभर त्यांनी जे काही दिलं, त्यांच्याकडून कोणी काय घेतलं, हे ते बघत आहेत. त्यांचं एक वाक्य आहे, ‘शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा.’ संजय राऊत यांनी पुस्तकाचे नाव नरकातला स्वर्ग ठेवलं आहे. जो माणूस नरकात स्वर्ग शोधतो, तो काय धाटणीचा माणूस असेल, हे वेगळं सांगायला नको. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुषभरात मराठी माणूस आणि हिंदूंना आत्मविश्वास आणि जिद्द दिली. नाही तर आज मुंबई आणि महाराष्ट्रात आपली परिस्थिती काय असती, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. ते बघत आहेत की, मी जे दिलं, ते घेणारे खरे किती आहेत आणि भाडखाऊ पळणारे किती आहेत.”
उद्धव ठाकरे म्हणाले की, “आज जे स्वर्गात गेलेत त्यांच्या दृष्टितीने त्यांना सुद्धा हा कार्यक्रम बघितल्यानंतर हेवा वाटत असेल. मगाशी संजय राऊत तुमचं भाषण सुरु असताना जणू तुम्ही एक विरोधी पुस्तक लिहिलं आहे, अशा थाटात बोलत होता. त्यांना सुद्धा हेवा वाटला असेल, अरे आपण सुद्धा इथं राहिलो असतो. नरक आणि स्वर्ग या कल्पना खऱ्या आहेत की, खोट्या आहेत? याची कल्पना नाही. पण जिथे आहोत तिथे आनंदाने राहावं, दुसऱ्याला आपण आनंद देऊ शकलो नाही, तर निदान त्रास तरी देऊ नये, एवढं जरी माणसाने पाळलं तरी, असं वाटतं आपण आयुष्य जगलो. आज आपण जे बघत आहोत, याला लोकशाही मानायची की हुकूमशाही? हा प्रश्न आणि त्यांचं उत्तर हे सोपं आहे. पण हुकूमशहा कोणीही असला तर त्याला एक ना एक दिवस जावं लागतं. हिटलरला संपूर्ण जग घाबरत होतं. पण संजय राऊत तुम्ही जे आधी लिहायचे त्यात एक आवडीचा शब्द होता, ‘नियती’. नियतीने कदाचित त्याला (हिटलरला) सांगितलं असेल, सगळं जग घाबरतं, तू नाही ना घाबरत. मग घालून घे स्वतःला गोळी. मग त्याला सुद्धा आत्महत्या करावी लागली. हा हुकूमशहाचा शेवट असतो.”
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “या पुस्तकासंदर्भात संजय राऊत यांच्या मुलाखती येत आहेत, त्यातले काही प्रसंग चर्चिले जात आहे. यातच एक प्रसंग आहे तो, अमित शहा यांचा. मला जर कोणी विचारलं की, अमित शहा तुमच्या घरी आले होते का? बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मदत केली होती का? मी सांगणे मला आठवत नाही. कारण आपल्या घराण्याने, आपल्या वाडवडिलांनी कोणावर काही उपकार केले असतील तर, उपकार हे मोजायचे नसतात. उपकार करायचे असतात, पण मोजायचे नसतात. उपकाराची फेड ही कृतज्ञाने करायची की आपकाराने करायची, हे ज्याच्या त्याच्यावर असतं. काही वेळेला असं वाटतं की, कोणाला मदत करताना सुद्धा आपण विचार करू शकत नाही. साकेत गोखले तुम्ही आताच सांगतलं की, एक कैदी असा होता की, ज्याला जामीन मंजूर झाला, पण त्याकडे 500 रुपये नव्हते भरायला. काय करायचं या गोष्टीला? इकडे करोडो रुपयांचे भ्रष्टाचार सुरू आहेत. तर एका बाजूला एक कैदी 500 रुपये नाही म्हणून तुरुंगात पडला आहे. ही जी पद्धत आहे, त्याला लोकशाही म्हणायचं आपण? हे एकाधिकारशाहीने चाललं आहे. मला आठवत आहे की, अनिल देशमुख माझ्या मंत्रिमंडळात गृहमंत्री होते. असा कोणता देश असेल, ज्या देशात मुख्यमंत्र्यांना अटक होते. अरविंद केजरीवाल यांना अटक झाली होती. हेमंत सोरेन आणि गृहमंत्र्यांना अटक झाली. मी मुख्यमंत्री असताना आपल्या राज्याच्या डीजींना आणि सीएसला सीबीआयने बोलवलं होतं. ज्यांच्या शेंड्या केंद्राच्या हातात असतील आणि विरोधी पक्षांच्या सरकारमध्ये अशी माणसे असतील, तर त्यांचं काम ते कसं करू शकतील. ममता बॅनर्जी यांनाही तोच अनुभव आला होता. त्यांच्या सीएसने शेवटी राजीनामा दिला. आपल्या देशात संघराज्य पद्धती आहे. केंद्र हा शब्द नाही. केंद्र सरकारला जितका अधिकार आहे, तितकाच अधिकार कायद्याने राज्य सरकारला सुद्धा आहे आणि असलाच पाहिजे. ईडी, आयटी, सीबीआय आणि पीएमएलए कायदा लावण्याचा अधिकार दिल्लीतील सरकारला असेल तर, तोच अधिकार आमच्या राज्य सरकारला सुद्धा पाहिजे. टाका त्यांच्यावर सुद्धा धाडी, बसवा त्यांना सुद्धा आतमध्ये. संजय राऊत, साकेत गोखले आणि अनिल देशमुख हे भोगून आले आहेत. या तिघांकडेही चार्ज द्या, मग ते सांगतील त्यांच्यावर धाडी टाका. त्यांना तुरुंगात टाका आणि सिद्ध करा की, तुम्ही निर्दोष आहे. या सगळ्या प्रकाराविरोधात लढत राहिलं पाहिजे.”
ते म्हणाले की, “आज निवडणूक आयोगाचे सगळे अधिकारी आले होते, वन नेशन, वन इलेक्शन. यासाठी साकेत गोखलेही आले होते. आपल्याकडून अनिल परब आणि अनिल देसाई यांना मी पाठवलं होतं. वन नेशन, वन इलेक्शन, फार गोंडस आहे. पण निवडणुकीमध्ये पारदर्शकता कुठे आहे. आता आपल्या सरन्यायाधीशांच्या मातोश्रीने सांगितलं की, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. संशय जर का मोकळा करायचा असेल तर, एक तरी निवडणूक देशात बॅलेट पेपरवर घ्या आणि मग तुमची टिमकी वाजवा. पण ते होणार नाही. मग दुसरा विषय मी त्यांना मांडायला सांगितला की, वन नेशन, वन इलेक्शनमध्ये सगळ्यांना एका पातळीवर उभं करा. कारण वन नेशन म्हटलं तर, देशाचा पंतप्रधान आहे आणि देशाचा पंतप्रधान हा एका पक्षाचा प्रचारक होऊ शकत नाही. एक तर त्याने प्रचारक होऊ नये आणि प्रचार करायचा असेल तर, स्वतःच्या पक्षाबरोबर, इतर पक्षांचा आणि अपक्ष उमेदवारांचा प्रचार सुद्धा त्यांनी केला पाहिजे. तर मी म्हणेल लोकशाही आहे.”
“जर मला पाकिस्तान आणि नरक यापैकी एकाची निवड करायची असेल तर मी पाकिस्तानपेक्षा नरकात जाणं पसंत करेन. मी कधीही पाकिस्तानला जाणार नाही”, अशी टीका ज्येष्ठ पटकथाकार, लेखक, कवी जावेद अख्तर यांनी पाकिस्तानवर केली आहे.
शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्या प्रसंगी बोलताना ते असं म्हणाले आहेत. प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात हा प्रकाशन सोहळा पार पडला आहे. या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी ते होते. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले हे प्रमुख पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
जावेद अख्तर म्हणाले की, “माझे ट्वीटर पाहा, त्यात खूप शिव्या देणारे आहेत, पण काही लोक माझी प्रशंसाही करतात. काही लोक म्हणतात की, तुम्ही काफिर आहात. काही लोक म्हणतात जिहादी, तू पाकिस्तानला जायला हवे. जर मला पाकिस्तान किंवा नरक यापैकी एक निवडण्याची संधी मिळाली तर मी नरकात जाणे पसंत करेन.”
यावेळी संजय राऊत यांचे कौतुक करताना ते म्हणाले की, “संजय राऊत हे टी-20 खेळाडू आहे. तो क्रीजबाहेर येतात आणि फक्त चौकार आणि षटकार मारतात. त्यांना बाद होण्याची चिंता नाही.”
मुंबई:खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात पार पडला. या सोहळ्याला ज्येष्ठ पटकथाकार, लेखक, कवी जावेद अख्तर यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले उपस्थित होते.
यावेळी संजय राऊत यांनी खणखणीत भाषण करत तुरुंगातील अनुभव व्यक्त केले. यापुढे ईडी आपल्या दारापुढे येणार नाही, ईडीचा बूच लावून ठेवलाय मी. मी शेवटचा माणूस होतो, ज्याच्या नादाला ईडी लागली. मै आखरी आदमी था, जिसके साथ ईडीने पंगा लिया, अब नहीं लेंगे, अशा रोखठोक शब्दांत संजय राऊत यांनी ईडीचा समाचार घेतला.
जावेद अख्तर, साकेत गोखले, शरद तांदळे यांच्या हिंमतीचे कौतुक करताना संजय राऊत यांनी ईडीच्या चक्रव्यूहावर सडकून टीका केली. साकेत आणि मी आमच्या दोघांमध्ये साम्य असं आहे की, मी त्याच्यामध्ये माझी प्रतिकृती बघतो. ते ही तुरुंगात होते ईडीच्या चक्रव्यूहात आणि मी सुद्धा होतो. आमचे शरद तांदळे.. त्यांनी खरोखरच हिंमतीचे काम केलं आहे. उद्या तुम्ही ईडीसाठी दरवाजे उघडे ठेवा. पण एक सांगतो, यापुढे ईडी आपल्या दारापुढे येणार नाही, ईडीचा बूच लावून ठेवलाय मी. मी शेवटचा माणूस होतो, ज्याच्या नादाला ईडी लागली. मै आखरी आदमी था, जिसके साथ ईडीने पंगा लिया, अब नहीं लेंगे, असे संजय राऊत म्हणाले.
भाषणामधून ईडीचा समाचार घेतानाच त्यांना ज्येष्ठ पटकथाकार जावेद अख्तर यांचे भरभरुन कौतुक केले. ते म्हणाले, जावेद अख्तर साहेब केवळ पटकथाकार, लेखक नाहीत. जिथे जिथे देशात अन्याय घडेल, तिथे जावेद साहेब सातत्याने आपला आवाज उठवत असतात. जावेद साहेबांचं इथं असणं हे अत्यंत प्रेरणादायी आहे. माननीय शरद पवार साहेब, त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होऊच शकत नाहीत. ते ही पडद्यामागून आमच्यासाठी अशा अनेक लढाया लढत राहिले आणि समोरूनही लढत असतात. माननीय उद्धव साहेब माझे सर्वोच्च नेते, मित्र आणि सदैव माझ्या पाठिशी ते उभे राहिले. आणि खास पाहुणा जो आपण कलकत्त्यातून बोलावला आहे. त्यांचं नाव गोखले आहे. आता साकेत गोखले कोलकात्त्यात कुठे गेले? ते तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत आणि ममता बॅनर्जींनी त्यांना खास बोलावून खासदार केलं. का? महाराष्ट्रातून एक लढवय्या त्यांना हवा होता कोलकात्त्यात. आमच्या दोघांमध्ये साम्य असं आहे की मी त्याच्यामध्ये माझी प्रतिकृती बघतो. ते ही तुरुंगात होते ईडीच्या चक्रव्यूहात आणि मी सुद्धा होतो. साकेत गोखले हे काही काळापासून एक तरुण राजकारणी, उत्तम पत्रकार, उत्तम लेखक आहेत ते. ते मूळचे मुंबईचे आहेत.
संजय राऊत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकाचे प्रकाशक न्यू ईरा पब्लिशिंग हाऊसचे शरद तांदळे यांच्या हिंमतीला दाद दिली. आमचे शरद तांदळे हिंमतीचे काम त्यांनी खरोखर केलेले आहे. उद्या तुम्ही ईडीसाठी दरवाजे उघडे ठेवा. पण एक सांगतो, यापुढे ईडी आपल्या दारापुढे येणार नाही, ईडीचा बूच लावून ठेवलाय मी. मी शेवटचा माणूस होतो ईडी त्याच्या नादाला लागली. मै आखरी आदमी था, जिसके साथ ईडीने पंगा लिया, अब नहीं लेंगे, असा जबरदस्त टोलाही यावेळी त्यांनी हाणला.
पुस्तकावर बरीच चर्चा सुरु आहे ती असालयाच पाहिजे. अगर मै एक एडिट लिखता हू तो उसकी चर्चा होती है, किताब लिखता हू तो होनी ही चाहिए. एक संपादकीय मी लिहितो त्याची रोज चर्चा होते. मग जेव्हा एक पुस्तक लिहिलं त्याची चर्चा झाली नाही तर उपयोग काय? दोन दिवसांपासून अनेकांना मिरच्या लागलेल्या आहेत. धडाधड सोशल मीडियावर सुरू आहे, उसने ये लिखा, उसने वो लिखा. पण जे लिहिलंय ते सत्य आहे, वो सच है. आणि माझी ओळख जी माननीय बाळासाहेब ठाकरेंमुळे झाली. सत्य आणि नितिमत्ता या दोन गोष्टींची कास तू सोडू नको, हे बाळासाहेबांनी मला वारंवार सांगितलं, ते मी शेवटपर्यंत पाळलं.
जावेद अख्तर यांना उद्देशून संजय राऊत पुढे म्हणाले, आपकी दो लाईने मुझे हमेशा याद आती है, जो बात कहते डरते है सब वो बात लिख, इतनी अंधेरी थी न कभी रात लिख. डरना नहीं है वो लिखो. बहुत जोर से कहा है जावेद साहबने. हम लिखनेवाले लोग है, हम बोलनेवाले भी लोग है. आम्ही वाकणार नाही, साकेत वाकला नाही, संजय सिंग झुकला नाही. आमचे अनिल देशमुख बसलेत समोर. आम्ही ठरवलं की काही झालं तरी या जुलमी शासन व्यवस्थेच्या रणगाड्यासमोर आपण झुकायचं नाही, आपण लढत रहायचं. कुणीतरी लढावंच लागेल. पुस्तक जेव्हा तुरुंगात लिहायचं ठरवलं. मी त्यांनाही प्रेरणा दिली….देशमुखांना. वेळ घालवायचा आहे ना, जेलमध्ये एक मिनिट एक वर्षासारखा वाटतो. जेव्हा तुम्ही आतमध्ये जाता, त्यातून झुकून जावं लागतं आणि झुकून यावं लागतं.
जेव्हा तुम्ही आत जाता तेव्हा तुमचा जगाशी संबंध तुटतो. मग तुम्ही करायचं काय? बाहेरचा संपर्क नाही, संबंध नाही. दगडाच्या भिंती बघायच्या आणि दिवस काढायचे. अशामध्ये लिहिणं, वाचणं, चांगला सकारात्मक विचार करणं आणि उद्या मी कदाचित बाहेर पडेन हा विचार करायचा. कधी देशमुख साहेब बाहेर पडले, आज तुमचा जामीन होणार, डोन्ट वरी. कधी मी बाहेर पडलो, आज तुमचं आर्ग्युमेंट चांगलं झालं. अशामध्ये दोन-चार, पाच महिने निघून जातात. आणि त्यातून कुणी एखादा सुटलाच तर तो कसा सुटला त्याच्यावरती अख्खं जजमेंट घेऊन अभ्यास करायचा. सगळे जजमेंट वाचत बसल्यावर कळते कोणता पॉईंट काय आहे? हे सगळे तुरुंगातले लोक बॅरिस्टर होऊन बाहेर पडतात. आठ दिवस जरी तुरुंगात राहिला तर तो सर्वोच्च न्यायालयापासून हायकोर्टापर्यंत… कसं चालवायचं कोर्ट आणि कोणता जज, कोणतं बेंच, ये क्या है? यावर पीएचडी होते. हे सर्व वेगळं जग आहे. पण त्यातून आपण आलो, एक राजकीय लढाई असते.
आम्ही ज्या आर्थर रोड तुरुंगात होतो. तिथे एकदा आम्ही उभे होतो, मला वाटलं की इथे ससे कुठून आले? आमच्याबरोबर कुंदन शिंदे होते, ते म्हणाले साहेब तो ससा नाही उंदीर आहे. त्याला म्हटलं इथं आम्हाला खायला मिळत नाही.. उंदरांना काय खायला मिळतयं. सशासारखे उंदीर, घुशी.. उंच धिप्पाड. देशमुखांनी त्यांना सुंदर नावं ठेवली होती. आता त्यांच्याविषयी बोलणं बरं नाही, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आपण मर्यादा पाळल्या पाहिजेत. त्याच्यातून हे पुस्तक निर्माण झालं. पण एक सांगतो, तुरुंगातलं वैशिष्ट्य असं आहे की, माझा सामनातला अग्रलेख… हर दिन मेरा एडिट बाहर आता था.
सरकारने चौकशी कमिशन लावलं होतं. सामना का एडिटोरियल बाहर कैसा आ रहा है. रोज माझं रोखठोक कॉलम बाहेर यायचं. मै खूश होता था मेरा काम हो रहा है. अंदर की बात अंदरही. अखबार तो निकल रहा है ना, लढाई तो जारी है. पण या सगळ्या जरी कटू आठवणी असल्या तरी माझ्यासारखा माणूस जो आहे तो मनाने कधी खचत नाही. मी ज्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, त्या माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सदैव आम्हाला तीच प्रेरणा दिली कि खचू नका, आत्मविश्वास महत्वाचा आहे.
मी एकदा ईडीच्या कोठडीत होतो आणि सरकारवर भयंकर टीका करणारं माझं रोखठोक प्रसिद्ध झालं. मी ईडीच्या आतमध्ये बसून आहे आणि सर्व नॅशनल चॅनेलला बातम्या, संजय राऊत तो जेल में है तो लिखा किसने? रात्री साडेअकरा वाजता दोन अधिकारी मला उठवायला आले. म्हणाले आपका स्टेटमेंट लेना है. मी विचारले का? ते बोलले, जबाब घ्यायचा आहे. चार दिन हो गया आप यहा बैठे है और आपका आर्टिकल आज पब्लिश हो गया, टीव्ही पर चल रहा है. राज्यपालांवर मी लिहिलं होतं, तेव्हाच्या टोपीवाल्या, हे कसे महाराष्ट्रद्रोही आहेत. आणि ती चौकशी लागली. मी म्हणालो, ‘लो मेरा स्टेटमेंट लो आप, मै पहले लिखकर आया था, मुझे पता था ये गंदगी करनेवाला है.’ हे स्टेटमेंटमध्ये आहे माझ्या. बोललो.. आपके यहा तो सीसीटीव्ही फुटेज है, देख लो कैसे गया वो. प्रत्येकाच्या या कथा फार सुंदर आहेत, रोमांचक आहेत.
साकेतने माझ्यापेक्षा वाईट दिवस काढलेले आहेत. साकेत गुजरातच्या साबरमती तुरुंगात होता. साकेतला विमानतळावरून उचललं. साकेत सात महिने तुरुंगात होता. आम्ही त्याच्या मानाने कमी राहिलो. त्याचा अनुभव जास्त आहे. त्याबाबतीत तो मला ज्येष्ठ आहे. 80 टक्के पुस्तक तुरुंगात लिहून झालं, 20 टक्के लिहायला दोन वर्षे लागली. दोन वर्षांत निवडणुका आल्या. मुली मागे लागल्या, बाबा लिहा पूर्ण करा. शेवटी लिहून झालं पुस्तक, ते प्रसिद्ध झालंय. सर्वात महत्वाची गोष्ट आम्ही ज्या कसाबच्या बराकमध्ये राहिलो होतो, ते कुणी बनवलं आमच्या जयंत पाटलांनी. आता काय सांगणार. जयंतराव पाटील गृहमंत्री, इंजिनिअर आदमी है ये. कसाब के लिए स्पेशल बराक कैसे होना चाहिए इसका डिझाईन ये जयंतराव पाटीलने बनाया और बाद में हमको अंदर भेज दिया. और मेरे को बाद में पूछता कैसा था, ये मैने बनाया है. या सर्व गमतीजमती पुस्तकामध्ये आहेत. कटु आठवणी असतातच, पण त्या कटु म्हणून घ्यायच्या नाहीत, तो अनुभव म्हणून घ्यायचा.
उद्धवजींनी पुस्तक वाचलं आणि एका वाक्यात पुस्तकाचं वर्णन केलं… पुस्तकात रडगाणं नाही आहे. पकडा ठीक है, गया जेल में, वापस आ गया, जिसने मुझे पकडा उसको पश्चाताप हो गया. झक मारली आणि याला पकडला. अरे हम गुंडे लोग है, हम जेल जाने से नहीं डरते. देश को ऐसे लोगों की जरुरत है. लोहा लोहे को काटेगा अभी. पूरे देश में एक माहौल बन गया है.
या पुस्तकाचं सार काय आहे? हे पुस्तक राजकीयच आहे. ज्याला विरोधी पक्षात काम करायचं आहे, त्याने हे पुस्तक वाचलं पाहिजे. ज्याला सत्तेची चाटूगिरी करायची आहे, सत्तेसाठी सर्वकाही करायचं आहे, त्याच्यासाठी हे पुस्तक नाही. ज्यांना विरोधी पक्षात राहून देशाचं काम करायचं आहे. या पुस्तकाचा सर्वात शेवटचा सार असा आहे की महाराष्ट्र गांडू नाही आहे. महाराष्ट्र मर्दों की औलाद आहे. या पुस्तकाचं एक महत्व आहे. आमच्यासारखे असंख्य लोक आहेत, अनेकांना त्रास झाला. अनिल परबांना त्रास झाला. झुके नहीं, आज भी लढते रहे.. रहेंगे. आज भी मै कोर्ट में जाता हू. जज के सामने खडा रहता हू, बोलिए क्या है वापस अरेस्ट करोगे, क्या करोगे आप. तानाशहा कब तक तानाशाही करता रहेगा? केव्हा ना केव्हा तरी त्या हुकूमशहालाही जमिनीत गाडलं जातं. हा देशाचा इतिहास, नाही जगाचा इतिहास आहे. सगळे मोठ्या संख्येने इथे आलात. ते माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. या पुस्तकातून लढण्याची प्रेरणा जरी 100 लोकांनी घेतली तर या देशातून, राज्यातून हुकूमशाही पूर्णपणे नष्ट होईल, गाडली जाईल. जे राज्याला, आपल्याला अपेक्षित आहे लोकशाहीचं राज्य.. ते या देशात आणि महाराष्ट्रात येईल.. काही लोकांनी महाराष्ट्राचा नरक केला आहे, त्याचा स्वर्ग करण्याची प्रक्रिया आता सुरू होईल, असा आशावाद संजय राऊत यांनी भाषणाच्या शेवटी व्यक्त केला.
पुणे :महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज संध्याकाळी उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या केल्या. मिळकत कर आकारणी व कर संकलन विभाग प्रमुख पदी अविनाश सपकाळ यांची तर सामान्य प्रशासन आणि निवडणूक विभागाच्या उपायुक्त पदी प्रसाद काटकर यांची नियुक्ती केली आहे . सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त तसेच कर आकारणी विभागाच्या प्रभारी प्रमुख प्रतिभा पाटील यांना दक्षता ,मालमत्ता व व्यवस्थापन तसेच भूसंपादन व व्यवस्थापन विभाग प्रमुख पदी नियुक्त करण्यात आले आहे. तर उपायुक्त प्रशांत ठोंबरे यांच्याकडे आकाशचिन्ह व परवाना, मुद्रणालय तसेच परिमंडळ चारची जबाबदारी देण्यात आली आहे. उपायुक्त किशोरी शिंदे यांच्याकडे क्रीडा विभाग मध्यवर्ती भांडार विभाग सोबतच परिमंडळ दोन ची जबाबदारी देण्यात आली आहे.
अतिक्रमण तसेच मिळकतकर विभागातील प्रकरणांमध्ये दोषी आढळल्याने माधव जगताप यांच्यावर कारवाई करण्यात आली . त्यांच्याकडील मिळकतकर विभागाचा पदभार काढून उपायुक्त प्रतिभा पाटील यांच्याकडे तात्पुरता पदभार सोपविण्यात आला होता. महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असलेला मिळकत कर विभाग मागील काही वर्षांपासून चर्चेत आहे .या पार्श्वभूमीवर या ठिकाणी शासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती होईल अशी चर्चा होती .परंतु आज महापालिका आयुक्त यांनी महापालिकेचे उपायुक्त अविनाश सपकाळ यांच्याकडे ही जबाबदारी सोपवत पुन्हा एकदा धक्का दिला आहे. सपकाळ यांच्याकडे महात्मा फुले वाडा आरक्षित क्षेत्राच्या संपादनाचेही काम आहे. त्यांनी यापूर्वी परिमंडळ गवणी या ठिकाणी काम केले आहे. शासन सेवेतील प्रसाद काटकर यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग तसेच निवडणुकीचे कामकाज देण्यात आले आहे
पुणे : कबुल केल्याप्रमाणे हुंडा दिला नाही, म्हणून विवाहितेला मारहाण करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे याच्यासह पाच जणांवर बावधन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. वैष्णवी शशांक हगवणे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. बावधन पोलिसांनी शशांक राजेंद्र हगवणे (वय २७), सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे (वय ५७), सासु लता राजेंद्र हगवणे (वय ५०), नंणंद करीश्मा राजेंद्र हगवणे (वय२४), दीर सुशील राजेंद्र हगवणे (वय २७) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत आनंद ऊर्फ अनिल साहेबराव कस्पटे (वय ५१, रा. संतकृपा निवास, कस्पटे वस्ती, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटात सध्या असून २००४ मध्ये त्यांनी शिवसेनेचे शरद ढमाले यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुळशी विधानसभा मतदारसंघात निवडणुक लढविली होती. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद कस्पटे यांची मुलगी वैष्णवी आणि भुकुम येथील शशांक हगवणे यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते़ राजेंद्र हगवणे हे सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये नावाजलेले असल्याने वैष्णवी व शशांक यांच्या लग्नाला त्यांनी संमती दिली. वैष्णवी हिच्यासाठी त्यांच्याकडून ५१ तोळे सोने, फॉरच्युनर गाडी, चांदीची भांडी देऊन सनीज वर्ल्ड या ठिकाणी लग्न करुन देण्याचे बोलीवर २८ एप्रिल २०२३ रोजी लग्न करुन दिले. त्यानंतर वैष्णवी नांदण्यास गेली. लग्नाच्या दुसर्या दिवसांपासून शशांक व तिचे सासुसासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या कारणात्सव वाद घालून तिच्या बरोबर भांडणे करु लागले. वैष्णवी हिने फोनद्वारे सांगितले. त्यांनी मुलीचा संसार टिकावा, म्हणून दोघांना समजावून सांगून वेळ मारुन नेत ऑगस्ट २०२३ मध्ये वैष्णवी गर्भवती राहिली. तेव्हा शशांक याने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला तिला मानसिक त्रास दिला. घरातून हाकलून दिले.
हुंड्याच्या पैशांसाठी २७ नोव्हेंबर २०२३ रोजी वैष्णवीने जाचाला कंटाळून विषारी औषध खाऊन स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर शशांक याने जमीन खरेदी करण्यासाठी पैशांची कमतरता आहे, २ कोटी रुपये द्या अशी मागणी केली. त्याचे घरी जाऊन शशांक याने वैष्णवी हिला तुझ्या बापाने मला पैसे दिले नाहीत, तुझ्या बापाला काय भिक लागली काय़ मी तुला काय फुक्कट पोसणार आहे काय, तुझ्या बापाने पैसे दिले नाही तर मी तुझ्या आख्ख्या खानदानाचा काटाच काढतो, असे बोलून धमकी दिली. त्यानंतरही तिला त्रास देणे सुरु होते. मार्च २०२५ मध्ये तिला वाकडला आणून सोडले.
गाडीमध्येही तिला सासु, नणंदेने मारहाण केली. तेव्हा वैष्णवी हिने गाडीतून उडी मारुन जीव देईन असे बोलल्यावर त्रास देणे बंद केले. १६ मे रोजी प्रणव उत्तम बहिरट याने फोन करुन शशांक हगवणे व वैष्णवीचे वाद झाले असल्याचे सांगितले. फिर्यादी यांनी शशांक याला फोन केल्यावर त्याने फोन उचलला नाही. त्यानंतर दुपारी शशांक याने प्रणव याला फोन करुन वैष्णवीने फाशी घेतल्याचे सांगितले. ते तातडीने चेलाराम हॉस्पिटलमध्ये गेले. तेथे वैष्णवी बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडलेली होती. डॉक्टरांकडे चौकशी केल्यावर तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा दिसत होत्या. तिच्या दोन्ही हातावर, दोन्ही मांडीवर, पायावर, पाठीवर, डोक्यावर जखमेच्या खुणा तसेच गळ्याच्या हनुवटीवर लालसर व्रण दिसत होता. डॉक्टरांनी तिचा मृत्यु झाल्याचे सांगितले.
शवविच्छेदनासाठी तिचा मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालावरुन तिचा मृत्यु नेमका कसा झाला, हे समजल्यानंतर त्यानुसार कलम वाढ करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. बावधन पोलीस तपास करीत आहेत.
मुंबई: शिवसेना-भाजप युतीत दरी निर्माण होण्यास भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार असल्याचा ठपका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठेवला आहे. “अमित शहा दिल्लीच्या राजकारणात आल्यापासूनच शिवसेना आणि भाजपमध्ये दुरावा वाढला. स्व. अरुण जेटली यांनीही शहा यांना दोनदा समजावले होते की, शिवसेनेशी वागणुकीत सावधगिरी बाळगा,” असा गौप्यस्फोट राऊतांनी केला.संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, “अरुण जेटली रुग्णालयात असताना अमित शहा त्यांना भेटायला गेले. तेव्हा जेटली म्हणाले होते – शिवसेना हा आपला जुना सहकारी पक्ष आहे. त्यामुळे आपल्याला त्यांच्या सोबत राहायला हवे. ही माहिती मला स्वतः जेटलींनी दिली होती.” पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमचे किंवा अन्य विरोधी पक्षांची संबंध कधीही वाईट नव्हते. अमित शहा दिल्लीच्या राजकारणात आल्यानंतर हे सर्व सुरू झाले. अमित शहांचे काम म्हणजे विरोधकांना ‘खतम करा’ असे आहे. आपली सत्ता बळकट करण्यासाठी त्यांनी अतिशय निर्घृण पद्धत वापरली. ही या देशाची लोकशाही किंवा राजकीय संस्कृती नाही अशी व्यवस्था देशात कधीही नव्हती, असेही राऊत यांनी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. भाजपमध्ये आलेली मंडळी तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीत होती: संजय राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंना भेटायला आले तेव्हा तिथे मी उपस्थित होतो त्यांचे फोटो आहेत. पण आता जे भाजपचे लोकं आहेत ते तेव्हा नव्हते असा टोला भाजपच्या नेतृत्वाला राऊतांनी लगावला आहे. काल भाजपमध्ये आलेली पोरं ही तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये होती. त्यांना काय माहिती शिवसेना-भाजपचे काय नाते होते. माझ्या अटकेपूर्वी कुटुंबीयांना त्रास दिला: संजय राऊत म्हणाले की, मला अटक करण्यापूर्वी माझ्या निकटवर्तीय लोकांना त्रास देण्यात आला. ईडीच्या अटकेआधी मी गृहमंत्री अमित शहांना फोन करत सांगितले होते कुटुंबियांना त्रास देण्यापेक्षा मी दिल्लीतील माझ्या बंगल्यावर आहे तिथून मला अटक करायची असेल तर करा. पण लोकांना त्रास देण्याची नौटंकी थांबवा. मी अमित शहांचा फोन ठेवला आणि आशिष शेलार यांचा मला फोन आला. मी शेलारांना सांगितले मला त्रास द्या मी तुमच्याशी लढायला समर्थ आहे. पण ज्या लोकांचा याशी काही संबंध नाही त्यांना त्रास देऊ नका. त्यावेळी ईडीचे अधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ही सर्व माहिती देत होते.
अटकेपूर्वी सीएम शिंदेंचा फोन आला होता: संजय राऊत म्हणाले की, मला ईडी अटक करणार होती त्यापूर्वी मला एकनाथ शिंदेंचा फोन आला होता. मी अमित शहा यांच्याशी बोलू का? असे शिंदेंनी मला विचारले होते. तुम्ही वर बोललात तरी मी तुमच्या पक्षात येणार नाही हे मी शिंदेंना तेव्हाच स्पष्ट केले होते. मी वर बोलायला समर्थ आहे, तुम्ही बोलायची काही गरज नाही. मी पळून जाणार नाही, होऊ द्या मला अटक असे मी शिंदेंना सांगितले होते.
मुंबई:पुण्यात आयईडी तयार करण्याच्या कटप्रकरणात फरार असलेल्या ISIS च्या स्लीपर मॉड्यूलमधील दोन दहशतवाद्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मुंबई विमानतळावरून अटक केली आहे. अब्दुल्ला फयाज शेख ऊर्फ डायपरवाला आणि तल्हा खान अशी या दोघांची नावे असून, ते इंडोनेशियाच्या जकार्ता शहरात लपून बसले होते. या दोघांना मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या टर्मिनल 2 वर उतरताच अडवून, एनआयएने अटक केली. हे दोघे 2023 च्या पुणे आयईडी कटप्रकरणात फरार होते. त्यांच्यावर अजामिनपात्र वॉरंट जारी होते आणि त्यांच्याबाबत माहिती देणाऱ्यास प्रत्येकी 3 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. एनआयएच्या तपासात उघड झाले की, 2022-23 दरम्यान पुण्यातील कोंढवा परिसरात भाड्याने घेतलेल्या घरात या आरोपींनी आयईडी बनवण्याचे प्रशिक्षण दिले आणि नियंत्रित स्फोट चाचणी घेतली. या प्रकरणात एकूण 10 जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या विरोधात UAPA, स्फोटक पदार्थ कायदा आणि IPC च्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. या गटाने भारत सरकारविरोधात युद्ध छेडण्याचा कट रचत, देशात इस्लामिक राजवट प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने दहशतवादी कारवाया केल्या होत्या, असे एनआयएच्या तपासात स्पष्ट झाले आहे. सध्या सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.या प्रकरणात आतापर्यंत एकूण 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये आता अटक झालेल्या दोघांसह खालील आरोपींचा समावेश आहे: मोहम्मद इमरान खान, मोहम्मद युनूस साकी, अब्दुल कादिर पठाण, सिमाब काझी, झुल्फिकार बारोडावाला, शमिल नाचन, आकिफ नाचन, शहनवाज आलम, सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजाची म्हणून महाराष्ट्रात खोटी वाघनखे आणली आणि त्याचे प्रदर्शन केले. या प्रकरणी सरकारने करदात्यांच्या पैशांचा गैरवापर केला, अशी टीका वकील असिम सरोदे यांनी शनिवारी सरकारवर निशाणा साधताना केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नव्हतेच ती त्यांची वाघनखे म्हणून आणून महाराष्ट्रात खोटे प्रदर्शन केले. लोकांच्या टॅक्स मधून जमविलेल्या लोकनिधीचा गैरवापर केला. आपण बघत राहिलो. pic.twitter.com/U4EIiiohmV
असिम सरोदे सध्या लंडनमध्ये आहेत. त्यांनी तेथील अल्बर्ट अँड व्हिक्टोरिया म्यूझियमला भेट देऊन एका व्हिडिओद्वारे सरकारवर उपरोक्त आरोप केला. सरकारने आणलेली वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज यांची नाहीत. सरकारने ती शिवाजी महाराजांची म्हणून महाराष्ट्रात खोटे प्रदर्शन केले. लोकांच्या टॅक्समधून जमवलेल्या लोकनिधीचा गैरवापर केला. हे सर्व घडत असताना आपण केवळ बघत राहिलो, असे ते म्हणाले.
ती वाघनखे खरेच महाराजांची आहेत का?
असिम सरोदे आपल्या एका व्हिडिओ पोस्टमध्ये म्हणाले, आम्ही अल्बर्ट अँड व्हिक्टोरिया मेमोरियल म्यूझियममध्ये उभे आहोत. महाराष्ट्र व भारताच्या विषयाशी संबंधित एका महत्त्वाच्या मुद्यासाठी इथे लंडनमध्ये आलो आहोत. म्यूझियममला हा कोपरा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. मुघल व मराठा साम्राज्याच्या काळात ज्या काही लढाया व युद्ध झाले किंवा शस्त्रास्त्र वापरण्यात आले ते इथे ठेवण्यात आलेत. शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजल खानाचा वध केला ती वाघनखे येथे होती असे आपल्याला सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने काही कोटी रुपये खर्च करून ती वाघनखे 3 वर्षांसाठी आपल्या ताब्यात घेतली आहेत असे सांगण्यात आले.
आता मुळात ही वाघनखे खरेच छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली होती का? याविषयी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी फार चांगले विश्लेषण केले आहे. मी काही इतिहासकार नाही. पण तरीही अभ्यासू लोकं काहीतरी सांगत असतात तेव्हा आपण काही गोष्टींवर विश्वास ठेवला पाहिजे. लॉर्ड एल्फिन्स्टन आणि ग्रँड डफला सातारच्या प्रतापसिंह छत्रपती यांनी वाघनखे भेट दिली. त्यांनी सुद्धा ही वाघनखे शिवाजी महाराजांची आहेत असा दावा केला नाही. शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधासाठी वापरलेली वाघनखे सातारा छत्रपतींकडे आहे असे त्या प्रत्यक्षदर्शींनी लिहून ठेवले आहे. याच अस्सल वाघनखांसारखी दिसणारी वाघनखे प्रतापसिंह यांनी मला भेट दिली असे एल्फिन्सनसारखा भारताचा इतिहास लिहिणाला माणूस सांगतो. यावर आपण विश्वास ठेवायचा की नाही? असा प्रश्न इंद्रजित सावंत यांनी विचारला आहे.
वाघनखांनी लोकांच्या जिवनात काय फरक पडला?
असिम सरोदे पुढे म्हणाले, व्हिक्टोरिया अल्बर्ट म्यूझियममध्ये यासंबंधी लावण्यात आलेल्या फलकावर ‘क्लेम’ असा शब्द लिहिण्यात आला आहे. या म्यूझियमच्या 22 व्या क्रमांकावर सरकारने आणलेली वाघनखे ठेवण्यात आली होती. त्या ठिकाणी ही वाघनखे शिवाजी महाराजांची असल्याचे, पण त्याचवेळी अनेकांनी असा दावा केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र सरकारने ही वाघनखे आपल्या सर्वांच्या करामधून गोळा झालेल्या पैशांचा वापर करून ही वाघनखे महाराष्ट्रात आणली आहे. पण ही वाघनखे खरी नसल्याचा दावा सर्व इतिहासकार करत आहेत. वाघनखे महाराष्ट्रात नेल्यानंतर लोकांच्या जिवनात फार काही फरक पडेल असेही नाही. मग कोट्यवधी रुपये खर्च करून या म्यूझियमची कमाई का करून देण्यात आली? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे सजग नागरिकांनी व शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी येथील वाघनखे भाड्याने महाराष्ट्रात प्रदर्शन करण्यासाठी का नेले? असा प्रश्न केला पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराज जानते राजे होते. कारण, ते जनतेचा पैशांचा गैरवापर कधीही होऊ देत नव्हते. शेवटचा पैसा सुद्धा लोकांच्या उपयोगासाठी व विकासासाठी वापरला पाहिजे असे समजणाऱ्या शिवाजी महाराजांचे धोरण व विचार या लोकांना पाळता येत नाही. हे लोक इथले कुणाचे तरी नकली वाघनखे घेऊन महाराष्ट्रात जातात व तिथे सांगतात की आम्ही शिवाजी महाराजांवर प्रेम करतो म्हणून ते आणले आहेत. ते विकत घेतले असते तर आपण समजू शकलो असतो. पण भाड्याने 3 वर्षांसाठी इथून नेलेत. त्यासाठी एक मोठी रक्कम नागरिकांच्या करांतून द्यावी लागली. याचा आपण सर्वांनी निषेध केला पाहिजे, असे असिम सरोदे यांनी म्हटले आहे.
हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हिसार पोलिसांनी शनिवारी ज्योतीला न्यायालयात हजर केले, जिथे पोलिसांना ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.हिसार पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ‘ज्योती पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांच्या संपर्कात होती. ती सोशल मीडियाद्वारे भारताची गोपनीय माहिती पाठवत होती. ज्योतीने चार वेळा पाकिस्तानला भेट दिली आहे, ज्यामुळे ती भारतीय सुरक्षा एजन्सींच्या देखरेखीखाली होती.
ज्योती पाकिस्तानात क्रिकेट सामना पाहण्यासाठी गेल्यावर सुरक्षा यंत्रणांचा तिच्यावरील संशय अधिकच वाढला. तिथल्या एका मैत्रिणीने ज्योतीच्या प्रवासाचा संपूर्ण खर्च उचलला. याशिवाय, ती भक्तांच्या गटासह तीनदा पाकिस्तानला गेली होती. ज्योतीविरुद्ध हिसार सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्योतीचे घर हिसारमधील घोडा फार्म रोडवर आहे. तिचा सोशल मीडियावर एक ट्रॅव्हल ब्लॉग आहे. पूर्वी ती गुरुग्राममध्ये एका खासगी कंपनीत काम करायची, पण कोविड दरम्यान तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. यानंतर ती ब्लॉगर बनली. ज्योतीचे इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर ‘ट्रॅव्हल विथ जो’ नावाचे एक चॅनेल आहे. २०२३ पासून हेरगिरीचा संशय: मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्योती २०२३ मध्ये पाकिस्तानला गेली होती. उच्चायुक्तालयातून व्हिसा मिळाल्यानंतर तिने ही यात्रा केली. या काळात ज्योतीची भेट पाकिस्तान उच्चायुक्तालयातील कर्मचारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिशशी झाली, ज्याच्याशी तिचे घनिष्ठ संबंध निर्माण झाले. दानिशच्या माध्यमातून ज्योतीची ओळख पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या इतर एजंटांशी झाली, ज्यात अली अहसान आणि शाकीर उर्फ राणा शाहबाज (ज्यांचे नाव तिने तिच्या फोनमध्ये ‘जट्ट रंधावा’ असे सेव्ह केले होते) यांचा समावेश होता. सोशल मीडियाद्वारे एजंट्सशी संपर्कात राहिले: अहवालानुसार, ज्योती व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मद्वारे या एजंट्सशी संपर्कात राहिली. ती सोशल मीडियावर पाकिस्तानच्या बाजूने सकारात्मक प्रतिमा तर मांडत होतीच, शिवाय संवेदनशील माहितीही शेअर करत होती. दानिश आणि त्याचा सहकारी अली अहसान यांच्यामार्फत ज्योतीची पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांशी (पीआयओ) ओळख झाली, ज्यांनी तिच्या पाकिस्तानात प्रवास आणि राहण्याची व्यवस्था केली. त्याने एका पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्याशी जवळचे संबंध निर्माण केले आणि अलीकडेच त्याच्यासोबत इंडोनेशियातील बाली बेटावर प्रवास केला. २०२५ मध्ये दानिशला देश सोडण्याचे आदेश देण्यात आले होते : मीडिया रिपोर्ट्सनुसार, एहसान-उर-रहीम उर्फ दानिशला १३ मे २०२५ रोजी भारत सरकारने हेरगिरीत सहभागी असल्याच्या आरोपाखाली पर्सना नॉन ग्राटा घोषित केले होते आणि देश सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. ज्योती यांना सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा सादर करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. पाकिस्तान त्याचा वापर भारताविरुद्ध प्रचार आणि हेरगिरीसाठी करत होता.
पुणे : केवळ काफीया आणि रदीफ साधून उत्तम गझलरचना होत नाही. वृत्तरचनेइतकाच गझलेमध्ये लघु गुरु अक्षरांचा क्रम कसोशीने सांभाळाचा लागतो आणि मात्रांचा हिशेब तर गणिती पद्धतीने चोख राहील याची काळजी घ्यावी लागते. ही सारी आचारसंहिता पाळली तरच निर्दोषपणा आणि सफाई फार चांगल्या पद्धतीने प्रत्ययाला येते. गझल लिहिणे ही एक जोखीमच असते, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. ब्रह्मकमळ साहित्य समूह, मुंबई आयोजित मराठी ग़झल मुशायरा या कार्यक्रमात ते बोलत होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी उपस्थित होते. आनंद पेंढारकर यांच्या अध्यक्षतेखाली मराठी गझल मुशायरा सादर करण्यात आला. त्यात विश्वास कुलकर्णी, डॉ. माधुरी चव्हाण-जोशी, महेश देशपांडे, निर्मिती कोलते, संदीप मर्ढेकर, विशाल राजगुरु, एजाज शेख यांनी सहभाग घेतला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गझलकारांचा यथोचित सन्मान व्हावा आणि त्यांना मुख्य प्रवाहात योग्य ते स्थान मिळावे, अशी अपेक्षा गझलकारांनी व्यक्त केली. त्यावर सकारात्मक विचार करू असे प्रा. जोशी यांनी सांगितले. प्रा. जोशी म्हणाले, गझल म्हणजे केवळ प्रेमगीत नसते. त्यातून सामाजिक आशयही प्रभावीपणे प्रकट करता येतो. लेखनातीलच नव्हे, वाचनातीलही बेहोषी, बुद्धिचातुर्य, अनुभवांच्या विरोधपूर्ण मांडणीतून साधली जाणारी कल्पना चमत्कृती, ठाम आणि निर्णायक विधानांमुळे आविष्कारात येणारा ठोसपणा या विशेषांमुळे गझलला दादही भरपूर आणि तत्काळ मिळते. एखाद्या नाजूक, तरल, संयत आणि सूचक कवितेपेक्षा आवाहक आणि आक्रमक गझल श्रोत्याला अधिक मानवते. श्रोत्यांकडून चटकन् दाद वसूल करणारा आणि लोकप्रियेतेचे भरगच्च माप कवीच्या पदरात टाकणारा हा रचना प्रकार आकर्षक आणि अनुकरणीय वाटला, तरी गझलरचना वाटते तितकी सोपी नसते. सच्चा अनुभव त्याच्या लयीसह गझलेत उत्स्फूर्तपणे मांडत शेर कसा बोटीबंद होईल याचे कसब साधावे लागते. सूत्रसंचालन नरेंद्र गिरीधर यांनी केले.
पुणे, दि. १७: मागेल त्याला शेततळे योजनेच्या अनुदानात वाढ करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, किटकनाशकांच्या पुरेशा उपब्धतेवर लक्ष द्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
विधानभवन येथे आयोजित जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार राहुल कुल, सुनील शेळके, चेतन तुपे, हिरामण मांडेकर, बाबाजी काळे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, विभागीय कृषि सहसंचालक दत्तात्रय गवसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक सूरज मडके, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी अजित पिसाळ आदी उपस्थित होते.
जिल्ह्याने ॲग्री हॅकॅथॉनचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे. ज्याचा नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी उपयोग होईल. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर होण्यासाठी अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष त्याचा वापर करण्यास सुरूवात केल्यानंतर त्यांना त्याचे फायदे लक्षात आल्यानंतर अधिक मागणी होईल. ते पाहता विविध पिकांसाठी या तंत्रज्ञानाचा अवलंब व्हावा म्हणून अधिकची तरतूद करण्यात येईल, असेही श्री. पवार म्हणाले.
राज्यात पूर्वी मागेल त्याला शेततळे योजनेत ५० हजार रुपये अनुदान दिले जात होते. ते नंतर वाढवून ७५ हजार रुपये केले. आता त्यात वाढ करण्याची मागणी होत असून १ लाख रुपयांपर्यंत कसे वाढविता येईल याबाबत विचारविनिमय करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
बियाणे, किटकनाशकांच्या बाबतीत तक्रारींकडे तात्काळ लक्ष द्यावे. बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशके बाजारात येऊ नये यासाठी कठोर कारवाई करावी, असेही ते म्हणाले. डोंगरी भागात कृषी विभागाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी तेथील पदे भरण्याची कार्यवाही करण्यात यावी. कृषी विभागाच्या विविध योजनांच्या लाभाची रक्कम महाडिबीटी मार्फत वेळेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल यासाठी प्रयत्न करावेत, आदी सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी डूडी यांनी प्रास्ताविकात सांगितले, मान्सून वेळेवर येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून त्यानुसार जिल्ह्यात बियाणे आणि खतांच्या पुरेशा उपलब्धतेचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र सुमारे २ लाख हेक्टर आहे. गेल्या तीन हंगामात सुमारे ३४ हजार क्विंटल बियाण्यांची विक्री झाली असून यावर्षी ४८ हजार क्विंटल बियाणे पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. १ लाख ९६ हजार मे. टन रासायनिक खतसाठा मंजूर आहे. त्यानुसार पुरवठ्याबाबत अडचण येणार नाही. युरियाचा ७ हजार ५०० मे. टन आणि डी.ए.पी. चा १ हजार मे. टनचा संरक्षित (बफर) साठा करण्यात येणार आहे.
यावर्षी ॲग्री हॅकॅथॉन हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून यात कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्या, स्टार्टअप्स तसेच उद्योग संघटना आदींनी स्पर्धक म्हणून नोंदणी केली आहे. यात कृषी क्षेत्रातील विविध समस्यांचे आठ प्रकारात वर्गीकरण करण्यात आले असून त्यावर स्पर्धकांनी सादर केलेल्या उपाययोजनांची छाननी करुन १ ते ३ जूनदरम्यान हॅकेथॉनचे आयोजन करण्यात येणार आहे. एआय, रोबोटिक्स तंत्रज्ञान, जीआयएस, आयओटी, ड्रोन तंत्रज्ञान, शेतीमध्ये मशीन लर्निंग आदी अत्याधुनिक तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यातून प्रत्येक वर्गीकरणातील प्रथम विजेत्यास २५ लाख रुपये व द्वितीय विजेत्यास १५ लाख रुपये पारितोषिक म्हणून दिले जाईल.
याशिवाय पुढील पाच वर्षात निर्यातक्षम पिकांच्या लागवड तसेच उत्पादन वाढीसाठी समूह अर्थात क्लस्टर पद्धतीने विकास करण्यात येणार आहे. यात केळी, अंजिर, स्ट्रॉबेरी, आंबा, करडई व सूर्यफूल, ज्वारी, भात, भाजीपाला, सोयाबीन यासह ऊस उत्पादकतेत वाढ करणे यावर भर दिला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
इंद्रायणी भाताला भौगोलिक ओळख (जीआय) मिळावी यासाठी प्रयत्न व्हावेत, अशा आमदार श्री. शेळके यांच्या मागणीच्या अनुषंगाने कृषी विभागाने तात्काळ तसा प्रस्ताव करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेच्या रकमेत वाढ व्हावी, वनविभागाच्या हद्दीतील जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात व्हावीत, अशी मागणी आमदार कुल यांनी केली. त्यावर कार्यवाही निर्देश श्री. पवार यांनी दिले.
प्रारंभी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत डीबीटीद्वारे अनुदान प्राप्त लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी या योजनेचे अनुदान आजच बँक खात्यावर जमा झाल्याचा लघुसंदेश (एसएमएस) उपमुख्यमंत्री महोदयांना दाखविल आणि समाधान व्यक्त केले. 0000