मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईडी (अंमलबजावणी संचालनालय) या तपास यंत्रणेच्या अधिकारांवर तीव्र शब्दांत भाष्य केले. यावेळी त्यांनी पीएमएलए कायद्यातील तरतुदीला का विरोध केला, याबाबतही सांगितले. कायद्याच्या तरतुदीला विरोध केला होता, पण ऐकले नाही, सरकार गेले आणि त्यानंतर पहिली कारवाई पी. चिदंबरम यांच्यावर झाली, अशी आठवण शरद पवार यांनी यावेळी सांगितली. तसेच संजय राऊतांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती, त्यामुळे त्यांना पत्राचाळीच्या केसमध्ये संबंध नसताना गुंतवले गेले, असेही ते म्हणाले.
शरद पवार म्हणाले, ईडी ही जी यंत्रणा आहे, कशी वागते याचे उत्तम लिखाण पुस्तकात आहे. मला आठवते केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात होतो. पी. चिदंबरम हे त्यावेळी माझे सहकारी होते. कायद्यात कशी दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे, या संबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणला, तो प्रस्ताव वाचल्यानंतर मी डॉ. मनमोहन सिंगांना सांगितले हा प्रस्ताव अत्यंत घातक आहे, आपण करता कामा नये, त्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला. ज्याला अटक केली त्याने स्वत: गुन्हा केला नाही हे सिद्ध करावे अशी तरतूद कायद्यात प्रस्तावित केली गेली. मी स्वत: विरोध केला, हे करु नका, उद्या राज्य बदलले तर त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागेल हे सांगितले, ते ऐकले गेले नाही. राज्य गेले आणि पहिली कारवाई चिदंबरम यांच्यावर करण्यात आली. विरोधकांवर अशा केसेस अधिक केल्या जातील ही शंका माझ्या सारख्याला होती ती खरी ठरली, असे शरद पवार म्हणाले.
संबंध नसताना राऊतांना गुंतवले
शरद पवार यांनी यावेळी संजय राऊत यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईवरही भाष्य केले. ते म्हणाले, संजय राऊतांनी काय केले होते, ते नियमित सामनामध्ये रोखठोक भूमिका मांडतात, ते सुरु होते. ती त्यांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती. ते अस्वस्थ होते, फक्त संधीची वाट पाहत होते. त्यांना पत्राचाळ प्रकरणाने संधी दिली. पत्राचाळीमध्ये कष्ट करणारे मध्यमवर्गीय लोक राहत होते. त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला, त्या चाळकऱ्यांना घरे मिळावी अशी त्यांची मागणी होती. ते संजय राऊत यांच्याकडे गेले. संजय राऊत यांच्या नेहमीच्या लिखाणाने दुखावलेल्या शासकीय यंत्रणेला संधी मिळाली. ईडीचे योगदान या प्रकरणात अधिक आहे. ईडीने केलेल्या केसमध्ये संजय राऊत यांचा संबंध नसताना गुंतवले गेले. जिथे अन्याय होतो, अत्याचार होतो तिथे सामना उभा राहतो. शासकीय यंत्रणेत भ्रष्टाचार आहे, त्याच्या विरोधात ते नेहमीच लिहितात याची कल्पना आपल्या सर्वांना आहे, असे शरद पवार म्हणाले.
कारवाई दूरच, पण राऊतांनाच आत जावे लागले
मुंबई, महाराष्ट्रात काही लोक चुकीचे काम करत होते, हे माहीत असताना त्यांच्या संबंधी कारवाई होत नव्हती. संजय राऊतांनी खासदार म्हणून देशाच्या प्रमुखांना पत्र लिहिलं. जे लोक शासकीय यंत्रणा यांच्याशी भ्रष्टाचाराच्या मार्गानं संबंध ठेवतात, अशा लोकांमार्फत पैसे कसे गोळा केले जातात याचे सविस्तर लिखाण केंद्र सरकारला कळवले. त्या प्रकरणात 30 ते 35 लोक असे होते, कंपन्या होत्या, त्यांच्याकडून पैसे काढले गेले, ती रक्कम 58 कोटींच्या आसपास होती. ही माहिती संजय राऊतांकडे आल्यानंतर त्यांनी देशाच्या प्रमुख लोकांना लिखित स्वरुपात दिली, त्याचा परिणाम एकच झाला, कारवाई झाली नाही पण त्यांना आत जावे लागले. संजय राऊत यांना अटक झाली, त्याबद्दल पुस्तक लिहिण्यात आले आहे, असे शरद पवार म्हणाले.
पवारांनी संजय राऊतांच्या पुस्तकावरही केले भाष्य
संजय राऊतांच्या पुस्तकात दोन राजवटींचा पुस्तकात उल्लेख आहे. एक एनडीएच्या काळात आणि नंतर यूपीएच्या काळातील. ईडीने कोणत्या पक्षांवर केसेस केल्या याची माहिती आहे. एनडीएच्या काळात 21 जणांवर कारवाई केली होती. यूपीएच्या काळात 9 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं. अटक कुणाला केली नाही. एनडीएच्या काळात काँग्रेस, टीएमसी, राष्ट्रवादी, शिवसेना, द्रमुक, बिजू जनता दल, आरजेडी, बसपा, सपा, टीडीप, आप, मार्क्सवादी पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, मनसे, अण्णा द्रमुक, टीआरएस एवढ्या पक्षाच्या नेत्यांवर चौकशा करून केसेस केल्या, असंही शरद पवार म्हणाले.
तसेच मी विचार करतोय, हे पुस्तक वाचल्यावर महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेने देशात परिवर्तन केलं तर पहिलं काम हे करावं लागेल राजकीय पक्षांचा जो अधिकार आहे, जो ईडी कायद्याचा आधार घेऊन उद्ध्वस्त करायचा जी तरतूद झाली आहे, ती बदलावी लागेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.