रामराज्य सहकारी बँक लि. च्या नव्या वास्तूच्या कोनशिलेचा उद्घाटन समारंभ
पुणे : जागतिक, राष्ट्रीय, राज्य, जिल्हा आणि सहकारी बँका असे जाळे सर्वत्र पसरलेले आहे. काळ बदलला आहे. सायबर क्राईम खूप मोठ्या प्रमाणात वाढले असून हे अत्यंत भयानक आहे. सायबर क्राईम च्या माध्यमातून देशात ७० हजार कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. बँकांचे संचालक मंडळ हे मालक नसून विश्वस्त आहेत. सभासद हे खरे मालक असून त्यांचे हित जपणे गरजेचे आहे. त्याकरिता सहकारी बँकांनी ग्राहक व लोकाभिमुख व्हायला हवे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
रामराज्य सहकारी बँक लि. च्या नव्या वास्तूचा कोनशिला उद्घाटन समारंभ बिबवेवाडीतील सुप्रिम प्लाझा सोसायटीतील बँकेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार चेतन तुपे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, रामराज्य बँकेचे संस्थापक विजयराव मोहिते, अँड सुभाष मोहिते, अध्यक्षा नंदा लोणकर, उपाध्यक्ष शिरीष मोहिते यांसह बँकेचे सर्व संचालक व व्यवस्थापकीय मंडळातील सदस्य उपस्थित होते.
बँकेचे सुहास पांगुळ, दिलीप सातकर, रामकृष्ण फुले, बाळासाहेब रायकर, दिनेश डांगी, दशरथ शितोळे, ऍड. विजय थोपटे, अशोक कदम, अँड. सुभाष मोहिते, हरिदास चव्हाण, राजेश नाईकरे, सुनील पवार, अविनाश मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी अमरसिंह राठौर यांसह व्यवस्थापकीय मंडळ अध्यक्ष विनोद शहा, सदस्य सीए अनिल शिंदे, ऍड. हेमंत झंझाड यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, सहकार आणि कायद्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. सहकार क्षेत्राबद्दल लोकांमध्ये आपलेपणाची भावना रुजणे गरजेचे आहे. राजकारण बाजूला ठेवून बँकिंगपलीकडे पाहण्याची आवश्यकता असून त्यामधील सुधारणांकरिता समिती स्थापन करून पुढे वाटचाल करू.
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रात सहकारी चळवळ वाढली आणि रुजविली गेली. त्यामध्ये अनेकांचे योगदान आहे. महायुतीमध्ये तीन पक्ष काम करीत आहेत. माझी जवळीक या क्षेत्राशी जास्त असल्याने मी सहकार खाते घेतले. कालानुरूप यामध्ये अनेक बदल करायचे आहेत. गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळ वाढीला लागली आहे. यामध्ये विश्वासाहर्ता हा महत्वाचा घटक असून तो जपणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
अँड. सुभाष मोहिते म्हणाले, बँकेचे आजमितीस ११ हजार सभासद आहेत. समाजातील शेवटचा माणूस बँकिंगशी जोडला जावा, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेला संदेश आम्ही पूर्ण करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले. विजय मोहिते म्हणाले, ज्या भागात सुविधा नाहीत, तिथे बँकिंग करायचे हे आम्ही ठरविले होते. स्पर्धेपेक्षा लोकांना सेवा देण्याचे काम आम्ही करीत आहोत, याचा आम्हाला आनंद आहे.
नंदा लोणकर म्हणाल्या, दिनांक ४ एप्रिल १९९८ साली बँकेच्या पहिल्या वास्तूचे उद्घाटन झाले. तळागाळातील लोकांना मदत व्हावी, या त्यामागील उद्देश होता. आज बँकेच्या ८ शाखा असून मार्च २०२५ अखेर १७० कोटी रुपयाच्या ठेवी आणि ९६ कोटी रुपयांची कर्ज बँकेने दिली आहेत. तब्बल ३ हजार ५०० चौरस फुटाची मालकीची वास्तू बँकेने घेतली असून मुख्य कचेरी आणि बिबवेवाडी शाखा येथे सुरु आहे. त्याचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले आहे. याचा आम्हाला आनंद आहे.