पुणे : शहरातील वाढती लोकसंख्या आणि विस्तार लक्षात घेता राज्य शासनाने पुणे शहरासाठी रेशनवरील धान्याचा कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (शनिवारी) केली.
शहर आणि जिल्ह्यातील रेशनिंग व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज बैठक घेतली. या बैठकीत आमदार शिरोळे सहभागी झाले. त्यांनी रेशनिंग कोटा वाढवून मिळावा अशी मागणी बैठकीत केली. छत्रपती शिवाजीनगर मतदार संघातही रेशन कार्ड्सची संख्या आणि धान्याचा कोटा वाढवून मिळावा, असेही त्यांनी बैठकीत सांगितले.
रेशन दुकानातील धान्य पुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन तत्काळ निवारण करण्यात यावे. पुणे शहरात रेशन विभागाचे ११ परिमंडल झोन आहेत, तेथील कामकाजात गती येण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात यावे, असेही आमदार शिरोळे यांनी सुचविले.
पब्लिक लॉगिन मध्ये ऑनलाईन काम करताना आरसीएमएस ही वेबसाईट सुरळीत चालत नाही. सर्व्हर खूप वेळा स्लो असतो किंवा बंदही असतो, याकडे शिरोळे यांनी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले