Home Blog Page 52

बारामतीत पुन्हा कोसळले विमान…

बारामती:

गोजुबावी (ता. बारामती) हद्दीत जाधव-आटोळेवस्ती परिसरात पाझर तलावालगत आज सकाळी साडेआठच्या सुमारास ‘रेड बर्ड’ कंपनीचे शिकाऊ विमान शेतात कोसळल्याची घटना घडली. त्या वेळी संबंधित शेतात महिला काम करत होत्या.सुदैवाने विमान लोकवस्तीत न पडता शेतात कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली.

विमानात एकटाच वैमानिक होता. तो या अपघातातून बचावला असून त्याला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र विमानाचे मोठे नुकसान झाले आहे. घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. माहिती मिळताच पोलिस तसेच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

प्रत्यक्षदर्शी मंगल जाधव यांनी सांगितले, “मी बाजूच्या शेतात काम करत होते. अचानक विमान खाली येताना दिसले. मी घाबरून पाहू लागले. विमान आधी विजेच्या खांबाला धडकले आणि नंतर शेतात जाऊन थांबले. त्यातून एक व्यक्ती खाली उतरली. त्याला काही झाले नव्हते. हा प्रकार पाहून मी फार घाबरून गेले होते.”

याच गावाच्या हद्दीत सुमारे साडेतीन महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला होता. पुन्हा त्याच परिसरात विमान दुर्घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये काही काळ घबराट व धावपळ उडाली.

सोन्याचे भाव रात्रीतून कडाडले! तब्बल 14 हजारांची वाढ


पुणे :काल रात्री उशिरा केंद्र सरकारने सोने, चांदी आणि इतर मौल्यवान धातूंवरील आयात शुल्कात मोठी वाढ केली आहे.
त्यामुळे आता विदेशातून सोने, चांदी आयात अधिक महाग झाली आहे. सरकारचा हा नवा निर्णय आजपासूनच लागू झाल्याने अचानक सोनं-चांदीचे भाव वाढले. या मोठ्या भाववाढीमुळे आता सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. चला जाऊन घेऊयात काय आहेत नवे दर.

भारतातील सोन्याचे भाव

Goodreturns वेबसाइटच्या ताज्या आकडेवारीनुसार सकाळी 10 वाजता राजधानी दिल्लीमध्ये सोन्याचे भाव पुढीलप्रमाणे आहे.

24 कॅरेट सोनं – 1,68,040 रुपये प्रति तोळा आणि 16,804 रुपये प्रति ग्रॅम

22 कॅरेट सोनं – 1,54,050 रुपये प्रति तोळा आणि 15,405 रुपये प्रति ग्रॅम

18 कॅरेट सोनं – 1,26,070 रुपये प्रति तोळा आणि 12,607 रुपये प्रति ग्रॅम

आज सोन्याचा भाव एकदम 14 हजारांनी वाढला आहे. ही एका दिवसातील सर्वात मोठी वाढ ठरली आहे.

2 मार्चनंतर आज पहिल्यांदा सोनं 1,68,000 रुपयांच्या पुढे गेलं आहे

एका वर्षाचा भाव बघता सोनं तब्बल 72 हजारांनी महाग झालं आहे.

महाराष्ट्रातील सोन्याचा भाव

Goodreturns वेबसाइट च्या ताज्या आकडेवारीनुसार सकाळी 10 वाजता राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि इतर शहरांमधील सोन्याचे भाव पुढीलप्रमाणे आहे.

24 कॅरेट सोनं – 1,67,890 रुपये प्रति तोळा आणि 16,789 रुपये प्रति ग्रॅम

22 कॅरेट सोनं – 1,53,900 रुपये प्रति तोळा आणि 15,390 रुपये प्रति ग्रॅम

18 कॅरेट सोनं – 1,25,920 रुपये प्रति तोळा आणि 12,592 रुपये प्रति ग्रॅम

चांदीचा भाव

Goodreturns च्या आकडेवारीनुसार आज सकाळी महाराष्ट्रासह राजधानी दिल्लीत चांदीच्या दराने 2 मार्चनंतर पहिल्यांदा 3 लाखाचा टप्पा पार केला आहे. आज चांदी प्रति किलो 3,10,000 रुपये आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर चांदीकहा भाव तब्बल 20 हजार रुपयांनी वाढला आहे.

कमोडिटी बाजार

देशांतर्गत कमोडिटी बाजार MCX वर आज सकाळी सोन्याचा भाव 10 हजारांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 1,62,700 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर चांदीचा भाव 17 हजार रुपयांनी वाढून 2,96,512 रुपयांवर व्यवहार करत आहे.

नगर विकास 2 प्रति नियुक्तीचे मोठे दुकान,वेळीच आवर घालावा – उज्वल केसकर

पुणे- पुणे महापालिकेत स्थानिक अधिकाऱ्यांना डावलून सरकारी अधिकाऱ्यांचा भरणा वाढल्याच्या प्रकाराकडे माय मराठी ने लक्ष वेधले असता माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनीही यावर आपली प्रतिक्रिया नोंदवीत नगर विकास 2 प्रति नियुक्तीचे मोठे दुकान झाले आहे, वेळीच आवर घातला पाहिजे असे म्हटले आहे. महापालिकेत स्थानिक अधिकाऱ्याच्या हक्काची असलेली अतिरिक्त आयुक्तांची जागा सरकारी अधिकाऱ्याला देण्यात आली याप्रमाणे सुमारे असंख्य सहायक आयुक्त आणि उपायुक्त अशा पदांवर महापालिकेतील स्थानिक अधिकार्यांचा हक्क असताना त्यांना डावलून तिथे सरकारी बाबू बसविण्यात आलेत आणि आता या बाबूंमध्ये मलईदार खाते मिळविण्यासाठी स्पर्धा सुरु आहे. एकीकडे स्थानिक अधिकारी आणि सरकरी अधिकारी असे २ प्रवाह उसळू पाहत असताना महापालिका आयुक्तांवर याची सांगड घालण्याची जबाबदारी येऊन ठेपली आहे.या संदर्भातील वृत्तावर केसकर,कुलकर्णी, बधे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे कि,’पूर्वीच्या काळात सरकारी अधिकारी आले तर सभागृहात आम्ही सर्वपक्षीय नगरसेवक सहा सहा महिने ठराव होऊ देत नव्हतो, जोपर्यंत महानगरपालिकेचे मुख्य सभा ठराव करत नाही तोपर्यंत आलेल्या अधिकाऱ्याला पगार देखील मिळत नसत,बाकी भत्ते दूरच..तेव्हा सरकारी अधिकारी पुणे महानगरपालिकेमध्ये पाठवणं सोपं नव्हतं, मुख्य सभा त्यांना माघारी पाठवीत,आता सर्रास चालू आहे…नगर विकास 2 प्रति नियुक्तीचे मोठे दुकान झाले आहे वेळीच आवर घातला पाहिजे
ज्या ज्या शासकीय कर्मचाऱ्यांची पुणे मनपा मध्ये प्रतिनियुक्तीवर कुठल्याही खात्यात तीन वर्ष पूर्ण झाली आहे किंवा एकूण मनपा मध्ये तीन वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांना तातडीने राज्य सरकारच्या सेवेमध्ये परत पाठवण्याचा धोरणात्मक निर्णय सर्वपक्षीय सदस्यानी आणि नेत्यांनी घेणे आवश्यक आहे यामुळे महानगरपालिकेचा फायदा होणार आहे.काहीजण ज्युनिअर इंजिनियर पासून उपायुक्तांपर्यंत महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत.तर अनेकजण वॉर्ड ऑफिसर म्हणून नेमले गेलेत .सहाय्यक आयुक्त सरकारी अधिकारी असताच कामा नये आपल्या शहराचे अधिकारी यासाठी अतिशय योग्य असतात त्यांना स्थानिक समस्या, सुटणाऱ्या, रखडलेल्या,न सुटणाऱ्या अशा सगळ्या गोष्टी माहिती असतात बाहेरून आलेल्या लोकांना काही माहिती नसतं काही जण तर केवळ मुलाचे शिक्षण मुलीचे शिक्षण यासाठी पुण्यामध्ये टाईमपास साठी पोस्टिंग येतात ते रिझल्ट देत नाहीत, असा अनुभव आहे.

सामान्य माणसालाही समजेल अशा पद्धतीने नवा आयकर कायदा, 2025 ची निर्मिती –मुख्य आयकर आयुक्त विवेक वाडेकर

पुणे, 12 मे 2026

प्रधान मुख्य आयकर आयुक्त, पुणे यांच्या वतीने “प्रारंभ 2026” — Policy Reform and Responsible Action for Mission Viksit Bharat — या राष्ट्रीय जनजागृती उपक्रमांतर्गत आयकर अधिनियम, 2025 विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिनांक 20 मार्च 2026 रोजी सुरू केलेल्या देशव्यापी जनजागृती अभियानाचा भाग असून, 1 एप्रिल 2026 पासून लागू झालेल्या आयकर अधिनियम, 2025 बाबत करदाते, व्यावसायिक, उद्योग क्षेत्र आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा यामागील उद्देश आहे, अशी माहिती पुण्याचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त श्री. विवेक वाडेकर यांनी आयकर भवन, पुणे येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत सर्वांना दिली.

वाडेकर म्हणाले, नवीन आयकर अधिनियम, 2025 हा भारताच्या प्रत्यक्ष कर व्यवस्थेतील एक महत्त्वपूर्ण आणि व्यापक सुधारणा करणारा कायदा असून, करप्रणाली अधिक सुलभ, पारदर्शक, तंत्रज्ञानाधारित आणि करदाता-केंद्रित करण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

प्रारंभ 2026 कार्यक्रमासाठी माननीय खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यास सहमती दर्शविली आहे. तसेच श्रीमती लीला पूनावाला आणि श्री प्रदीप भार्गव मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. आयकर विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच विविध व्यावसायिक, शैक्षणिक आणि औद्योगिक संस्थांचे प्रतिनिधी देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. शुक्रवार, 15 मे रोजी सकाळी 10.30 वाजता ऑडिटोरियम, दुसरा मजला, कॉसमॉस टॉवर, प्लॉट क्र. 6, आयसीएस कॉलनी, युनिव्हर्सिटी रोड, गणेशखिंड, शिवाजीनगर, पुणे – 411007, येथे हा कार्यक्रम होईल, असे त्यांनी सांगितले.

नव्या कायद्यासंदर्भात चर्चा करताना श्री वाडेकर म्हणाले की या कायद्यामध्ये पूर्वीच्या कायद्यातील 819 कलमांच्या तुलनेत आता 536 कलमे आणि 47 प्रकरणांच्या तुलनेत 23 प्रकरणे करण्यात आले आहेत. तसेच, कायद्याची भाषा, मांडणी आणि रचना अधिक सोपी, स्पष्ट आणि सुबोध करण्यात आली आहे, ज्यामुळे करदात्यांना कायदा अधिक सुलभपणे समजणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे, आयकर नियमांची संख्या 511 वरून 333 पर्यंत आणि फॉर्म्सची संख्या 399 वरून 190 पर्यंत कमी करण्यात आली आहे.

वाडेकर यांनी असेही नमूद केले की, आयकर कायदा 2025 मुळे कर प्रणाली लक्षणीयरीत्या सुलभ झाली आहे. त्यांनी यावर भर दिला की, या कायद्याची रचना आता अशा प्रकारे करण्यात आली आहे की, एक सामान्य व्यक्ती देखील त्याचे वाचन करून त्यातील तरतुदी शांतपणे समजून घेऊ शकते. ही सुलभता कायद्याच्या पुनर्रचित आराखड्यामुळे आणि अधिक स्पष्ट व सोप्या भाषेच्या वापरामुळे शक्य झाली असून, जुन्या कायद्यातील क्लिष्टता आता दूर करण्यात आली आहे.

प्रारंभ 2026 कार्यक्रमात आयकर विभागातील वरिष्ठ अधिकारी, सनदी लेखापाल, करसल्लागार, विधिज्ञ, उद्योग संघटनांचे प्रतिनिधी, व्यापारी संघटना, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच या क्षेत्रांशी संबंधित व्यक्ती सहभागी होणार आहेत. नवीन कायद्याच्या अंमलबजावणीचे व्यावहारिक परिणाम, करप्रशासनातील सुलभीकरण, तंत्रज्ञानाचा वापर, स्वयंप्रेरित करपालन आणि करदात्यांशी विश्वासाधारित संवाद यांसंदर्भात सखोल चर्चा या कार्यक्रमात होणार आहे.

करदात्यांसाठी बहुभाषिक जनजागृती मोहीम, FAQs, मार्गदर्शक साहित्य, “कर साथी” हा AI आधारित चॅटबॉट, “कर सेतू” मार्गदर्शक पुस्तिका तसेच “संवाद” या हितधारक संवाद उपक्रमांच्या माध्यमातून नवीन कायद्याविषयी व्यापक जनजागृती केली जात आहे.

हा कार्यक्रम नवीन आयकर अधिनियम, 2025 संदर्भात जनजागृती वाढविणे, करदाते आणि विभाग यांच्यात सकारात्मक संवाद प्रस्थापित करणे आणि कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीस चालना देणे यासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे.

जागतिक स्त्रीवादाचा पाया संत जनाबाईने घातला— डॉ.श्रीपाल सबनीस

मानवता धर्म पेरण्याचे काम संतानी केले — डॉ.रंगनाथ पठारे
पुणे – संत जनाबाई या स्त्री साहित्याच्या प्रवर्तक होत्या एवढेच नाही तर जागतिक स्त्रीवादाचा पाया संत जनाबाई यांनी घातला असे मत जेष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले .
पुढे ते म्हणाले की ,संत नामदेव आणि संत जनाबाई यांनी कीर्तन परंपरेला शिखरावर नेले . संत जनाबाई या मातंग समाजाच्या होत्या त्यांचे तत्वज्ञान हे चैतन्यवादी होते तसेच त्यांना स्त्री जन्माचा सार्थक अभिमान होता असे परखड मत सबनीस यांनी यावेळी व्यक्त केले .धनंजय होनमाने लिखित संत जनाबाई शोध आणि तत्त्वचिंतन या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पुण्यात पार पडला त्यावेळी ते बोलत होते
मानवता धर्म पेरण्याचे काम संतांनी केले .महाराष्ट्राची भूमी समतेने ठेवण्याचे कार्य संताचे आहे .तसेच लोकप्रबोधनाचे अत्यंत व्यापक कार्य संतानी केले त्यामध्ये संत जनाबाई यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे असल्याचे मत जेष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा.डॉ.रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केले .
धनंजय होनमाने यांनी संत जनाबाई यांच्या चरित्राचा योग्य शोध घेतला आहे संत जनाबाई या मातंग समाजाच्या होत्या त्यांच्या या संशोधनाने जनाबाई यांच्या अभंगाचा आणि कार्याचा बोध घेणे अधिक महत्पूर्ण ठरणार आहे .जनाबाई यांनी त्यावेळी समाजव्यवस्थेचा त्रास सहन केला तरीही त्यांनी धाडसाने उभे राहून समाज प्रबोधनाचे काम केले हाच खरा विद्रोह जनाबाई यांनी अभंगातून व्यक्त केला .असे मत जेष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ.विश्वनाथ शिंदे यांनी व्यक्त केले .

ह.भ.प.प्रा.डॉ.सुहास फडतरे आपल्या मनोगतात म्हणाले की ,भारतीय समाजव्यवस्थेने स्त्रियांवर अन्याय झाला .बुद्ध आणि महावीर यांनी स्त्रियांना पहिल्यांदा न्याय दिला .आम्हा सापडले वर्म कडू भागवत धर्म तसेच भागवत धर्म एकच धर्म मानतो तो म्हणे मानवता धर्म होय असे ते म्हणाले .
संत जनाबाई यांच्या ओव्या सर्वसामान्य महिलांनी जात्यावर गाइल्या तसेच त्या गावागावात पोहोचल्या तशा अर्थाने त्या ग्रामीण भागात अधिक लोकप्रिय होत्या असे मत जेष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.आशालता कांबळे यांनी व्यक्त केले .

या प्रकाशन समारंभास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत रंगनाथ पठारे , संत जनाबाई शोध आणि तत्त्वचिंतन या ग्रंथाचे लेखक प्रा. धनंजय व्हनमाने, जेष्ठ इतिहास अभ्यासक प्रा. विश्वनाथ शिंदे,ह.भ.प दिनकरशास्त्री भुकेले ,ह.भ.प. डॉ. सुहास फडतरे,डॉ. आशालता कांबळे ,माजी मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे ,माजी मंत्री रमेश बागवे ,माजी सभागृह नेते सुभाष जगताप ,समस्त वारकरी फडकरी दिंडी समाजचे उपाध्यक्ष विष्णु कबीर,शब्दालय प्रकाशन च्या सुमती लांडे ,माजी नगरसेवक अविनाश बागवे,अॅड. एकनाथ जावीर तसेच या प्रकाशन सोहळ्याचे स्वागताध्यक्ष शरदभाऊ लाड (चेअरमन, क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी. बापू लाड सह. साखर लि., कुंडल) होते.तर या कार्यक्रमाचे आयोजन शब्दावली प्रकाशन व संत जनाबाई संस्थान गंगाखेड यांनी केले होते .या कार्यक्रमास वारकरी संप्रदाय तसेच विविध सामाजिक ,राजकीय क्षेत्रातील प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

उद्योजक अशोक मिलापचंद जैन यांचा गूढ मृत्यू:आपटे रस्त्यावरील हॉटेलच्या रूम मध्ये आढळला मृतदेह

पुणे : पुण्यातील उद्योजकअशोक जैन (वय 61) हे एका हॉटेलच्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. प्राथमिक माहितीनुसार त्यांनी विषारी पदार्थ सेवन केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. खोलीचा दरवाजा बराच वेळ ठोठावला, पण आतून काहीच हालचाल झाली नाही. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांचा संशय वाढला आणि काही क्षणातच पुण्यातल्या आपटे रोड परिसरात मोठी धावपळ सुरू झाली. दरवाजा उघडला आणि आतलं दृश्य पाहून सगळेच हादरले.

ही घटना शनिवारी 9 मे रोजी दुपारी उघडकीस आली. हॉटेल कर्मचाऱ्यांनी दरवाजा बंद असल्याचं लक्षात येताच पोलिसांना माहिती दिली. डेक्कन पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि खोली उघडली. त्यानंतर संपूर्ण प्रकार समोर आला. अशोक जैन हे शुक्रवारी 8 मे रोजी दुपारी घरातून बाहेर पडले होते. मात्र, रात्रीपर्यंत ते परतलेच नाहीत. फोनही लागत नसल्यानं घरच्यांनी शोधाशोध सुरू केली होती. अखेर स्वारगेट पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
दरम्यान, पोलिसांनी खोलीची झाडाझडती घेतली असता एक चिठ्ठी सापडली आहे. परिस्थिती पाहता हा आत्महत्येचा प्रकार असल्याचं प्रथमदर्शनी वाटत असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, त्या चिठ्ठीत आर्थिक अडचणींचा उल्लेख असल्याचं समोर आलं आहे. मात्र ही चिठ्ठी खरंच अशोक जैन यांनीच लिहिली आहे का? याची सविस्तर पडताळणी नातेवाईकांच्या मदतीने केली जाणार आहे. या घटनेमुळे शहरात आणि व्यापारी वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल डेटा आणि इतर पुरावे तपासले जात असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे

अर्बन चॅलेंज फंडातून पायाभूत सुविधांसाठी महापालिकेला मिळणार ७१० कोटी

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

पुणे : शहर आणि उपनगरांतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या अर्बन चॅलेंज फंडातून पुणे महापालिकेला ७१० कोटी रुपयांचा निधी येत्या काही दिवसांत मिळणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक आणि रस्ते या क्षेत्रांसाठी या निधीतून मदत मिळणार असून राज्य सरकारने सुमारे ३० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवले असल्याचेही त्यांनी मंगळवारी (दि.१२) पत्रकारांना सांगितले.

या निधीतून पुणे, नाशिक आणि पिंपरी चिंचवड या शहरांनी आर्थिक मदतीची मागणी केली होती. त्यापैकी पिंपरी चिंचवड महापालिकेने सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला होता. पुणे महापालिका हद्दीतील वाहणारे पाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी या निधीची मागणी करण्यात आली होती, असेही त्यांनी सांगितले.

शहरालगतच्या सात गावांमध्ये पायाभूत सुविधा उभारण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. वाघोली, मांजरी, हंडेवाडी-औताडेवाडी, शेवाळवाडी, बावधन, वडाचीवाडी आणि होळकरवाडी या भागांमध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्रे (एसटीपी) उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेली सुमारे ३५० कोटी रुपयांची कामे यापुढेही सुरू राहणार आहेत. तसेच, आतापर्यंत १ हजार २९० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून येत्या काही दिवसांत आणखी ७१० कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. पुढील टप्प्यात पायाभूत सुविधांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध होणार असून त्यातून रस्ते विकासाची कामे हाती घेतली जाणार आहेत.

एकूणच, विविध योजनांच्या माध्यमातून सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा निधी शहरासाठी उपलब्ध होणार असल्याचे भिमाले यांनी स्पष्ट केले. या निधीच्या मदतीने वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उभारण्यास गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वसंत मोरेंनी महापलिका आयुक्तांना म्हटले ..बस मेट्रोने फिरा

पुणे-पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर आता पुण्यातही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. वसंत मोरे यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांना पत्र देत महापालिका अधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, अशी मागणी केली आहे.

याबाबत वसंत मोरे यांनी सांगितले की, पंतप्रधानांनी देशभरातील नागरिकांना पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करून काटकसर करण्याचे आवाहन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेतील आयुक्त, वरिष्ठ अधिकारी, महापौर, समिती अध्यक्ष आणि नगरसेवक यांनी आदर्श घालून द्यावा. यासाठी सायकल, ई-सायकल, इंधनविरहित वाहने तसेच बस व मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर दैनंदिन प्रवासासाठी करावा.तसेच एकाच परिसरात राहणाऱ्या अधिकाऱ्यांनी कारपूलिंग करून एकाच वाहनातून प्रवास करावा, यामुळे इंधन बचत होण्यास मदत होईल, अशीही मागणी केली आहे. विशेष म्हणजे, या आवाहनाची सुरुवात प्रत्यक्ष कृतीतून दाखवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांनी मनपा कार्यालयात येण्यासाठी घोड्यावरून प्रवास केल्याचे मोरे यांनी सांगितले.

“प्रशासनाने स्वतः काटकसर केली तरच सामान्य नागरिकांकडून त्याची अपेक्षा ठेवण्याचा नैतिक अधिकार राहील,” असे स्पष्ट मत वसंत मोरे यांनी व्यक्त केले. मनपा प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र होरपळणार!:राज्यात पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट; पारा 46 अंशांच्या पार जाण्याचा अंदाज

0

मुंबई-राज्यात सध्या तापमानाचा पारा वेगाने वाढत असून विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने 40 अंशांची ओलांडली असून, पुणे हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी राज्यात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विदर्भासह उर्वरित महाराष्ट्रातही तापमानात मोठी वाढ होणार असल्याने पुढील 72 तास राज्यासाठी अत्यंत कडक उन्हाचे असणार आहेत.

राज्यात उन्हाचा तडाखा अधिकच तीव्र झाला असून, विशेषतः अकोला आणि नंदुरबार जिल्ह्यांत तापमानाचा पारा 45.3 अंशांच्याही पुढे गेल्याने नागरिक होरपळून निघत आहेत. सद्यस्थितीत बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशांच्या वर असल्याने पुणे हवामान विभागाने नागरिकांना पुढील तीन दिवस आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पुढील पाच दिवसांत पावसाची कोणतीही शक्यता नसल्याने उकाडा कमी होण्याचे चिन्ह नाहीत. उलट विदर्भात येत्या चार ते पाच दिवसांत तापमानात मोठी वाढ होऊन काही भागांत ‘यलो अलर्ट’ कायम राहील, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राने संपूर्ण विदर्भासाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला असून, येत्या चार ते पाच दिवसांत तापमानाचा पारा पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मे महिन्याच्या उत्तरार्धात विदर्भाला पुन्हा एकदा तीव्र उष्णतेच्या लाटेचा मोठा फटका बसू शकतो, ज्यामुळे उन्हाचा कडाका आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. नागरिकांनी वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

सध्या विदर्भात उष्णतेच्या लाटेसाठी पोषक स्थिती निर्माण झाली असून, ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’चा प्रभाव कमी झाल्याने उत्तरेकडील राज्यांतून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात मोठी वाढ होत आहे. आगामी काही दिवसांत विदर्भाच्या पाऱ्यात 4 ते 6 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून, अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 45 ते 46 अंशांच्या पुढे जाण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या वाढत्या उष्म्यामुळे विदर्भ पुन्हा एकदा होरपळून निघण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

लोकां सांगे ब्रम्हज्ञान स्वत: कोरडे पाषाण ही मोदी भाजपाची स्थिती: नाना पटोले

0

पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनाला भाजपा मंत्र्यांकडूनच बगल, स्वतः ऐशोआरामात राहून जनतेला काटकसरची आवाहन.

भोंदू अशोक खरात प्रकरण दडपण्याचा प्रयत्न, दोषी मंत्री आणि अधिकाऱ्यांवर कारवाई न करता संरक्षण.

मुंबई, दि. १२ मे २०२६.

राज्यातील सत्ताधारी पक्षातील मंत्री आणि आमदार सुरक्षेच्या नावाखाली मोठमोठे ताफे घेऊन फिरत आहेत. सरकारी व्यवस्थेची आणि जनतेच्या पैशांची मोठ्या प्रमाणावर उधळपट्टी सुरू आहे. देशातील अनेक महत्त्वाच्या संस्था आणि व्यवस्था विक्रीच्या मार्गावर नेल्या गेल्या असून, सर्व राज्यांवर ताबा मिळवण्याचे राजकारण सुरू आहे. पश्चिम बंगाल निवडणुका जिंकल्यानंतर भाजपने देशाचा नकाशा जाहीर करून किती राज्यांमध्ये सत्ता मिळवली याची जाहिरात केली. स्वतःच्याच हाताने स्वतःची पाठ थोपटण्याचे काम भाजप सरकारने केले आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केला आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, भाजप सरकारमधील मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि स्वतः पंतप्रधान कसे वागतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. माजी केंद्रीय मंत्री मधू दंडवते यांनी अशाच कठीण परिस्थितीत स्वतःपासून काटकसरीची सुरुवात केली होती. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि लालबहादूर शास्त्री यांनीही स्वतः उदाहरण घालून दिले होते. त्यांनी देशासाठी आदर्श आणि मार्गदर्शक अशी व्यवस्था निर्माण केली. मात्र, भाजप सरकारकडून अशा प्रकारच्या जबाबदार भूमिकेची अपेक्षा कुणालाही वाटत नाही.
भाजप तेरा वर्षे सत्तेत असतानाही देशाची जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती लपवण्यासाठी वेगवेगळे विषय पुढे आणले जात आहेत. तत्कालीन परिस्थितीत देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नव्हता. माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी हरितक्रांती आणि श्वेतक्रांती घडवून आणत देशाला स्वयंपूर्ण बनवले. या ऐतिहासिक गोष्टींचा उल्लेख भाजपनेही करायला हवा. आज देश अमेरिकेच्या दबावाखाली काम करत असल्याची भावना जनतेमध्ये निर्माण झाली आहे. भारताने यापूर्वी कधीही कोणत्याही देशासमोर शरणागती पत्करलेली नव्हती. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची स्वायत्तता आणि सुरक्षितता धोक्यात आल्याची भावना निर्माण झाली आहे. देशाला अमेरिकेसमोर गहाण ठेवण्याचे काम झाले आहे.

राहुलजी गांधी यांनी याबाबत अनेकदा भूमिका मांडली आहे. मी स्वतः यासंदर्भात पत्रव्यवहार केला असून, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही यावर टीका केली आहे. याचा अर्थ देशाची परिस्थिती धोकादायक बनत चालली आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत असुरक्षित होत चालला असून, सामान्य जनतेसमोर अन्नधान्य आणि दैनंदिन गरजांबाबत गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. देशावर संकट आलेल्या काळात काँग्रेसने नेहमी सर्वपक्षीय भूमिका घेतली. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनाही परदेश दौऱ्यावर प्रतिनिधित्वाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, आज देशाचे पंतप्रधान सर्वपक्षीय बैठकींना अनुपस्थित राहतात. त्यामुळे शरद पवार यांनी दिलेला सल्ला योग्य असल्याचे स्पष्ट होते असेही नाना पटोले म्हणाले.

अशोक खरात प्रकरण दडपण्याचा प्रयत्न..
चंद्रशेखर बावनकुळे यांची कीव वाटते, त्यांच्या स्वतःच्या मुख्यमंत्र्यांनी हा महिलांशी संबंधित संवेदनशील विषय असल्याचे म्हटले होते. या प्रकरणात अनेक महिलांचे शोषण झाल्याचा आरोप आहे. मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर या प्रकरणातील चार मंत्र्यांबाबतचे पुरावे सादर केले जातील. सरकारने नेमलेल्या एसआयटीची मर्यादा ठरवण्यात आली असून, पीडित महिलांकडून माहिती घेतली जात आहे. मात्र, नंतर हे प्रकरण ईडीकडे वर्ग करण्यात आले. राज्यात EOW सारखी यंत्रणा असताना ईडीकडे चौकशी सोपवण्याची गरज का भासली? राज्य सरकारचा स्वतःच्या पोलिसांवर विश्वास नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचे आरोप आहेत. त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे का, अशी शंका निर्माण झाली आहे. दोषी मंत्री आणि अधिकाऱ्यांना बाजूला करण्याऐवजी त्यांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप होत आहे. मुख्यमंत्री वेळकाढूपणा करत असल्याची भावना जनतेमध्ये आहे. हा आरोप नसून वस्तुस्थिती असल्याचे आम्ही मानतो.

शिव, फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या विचारांचा हा महाराष्ट्र आहे. या विचारांना काळिमा फासण्याचा प्रयत्न कुणीही केला तर तो सहन केला जाणार नाही. या प्रकरणात काळी जादू, अंधश्रद्धा आणि भोंदू बाबांशी संबंधित बाबी समोर आल्या आहेत. राज्यात धर्माच्या नावाखाली भोंदूगिरीचा सुळसुळाट वाढत चालला आहे. दोषींवर कठोर कारवाई झाल्याशिवाय महाराष्ट्राला लागलेली ही कीड थांबणार नाही.

नाशिकमधील एसएसके हॉटेलमधील घटना आणि खरात प्रकरण यांचा परस्पर संबंध असल्याचा संशय आहे. ही संपूर्ण साखळी असून, सरकारने वेळेत गांभीर्याने कारवाई केली असती तर अनेक महिलांना वाचवता आले असते. त्यामुळे या घटनेला सरकार पूर्णपणे जबाबदार असल्याचे आमचे मत आहे.

राज्यातील विविध विभागांमध्ये २०१८ साली डेप्युटेशन संदर्भात काढण्यात आलेल्या जीआरचे पालन होत नसल्याचे दिसत आहे. एसआरए विभागात महानगरपालिकेचे १८ अधिकारी डेप्युटेशनवर असून, काही अधिकाऱ्यांना नियमित करण्यात आले आहे. यामध्ये भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होत आहेत. राज्य आणि मुंबई लुटली जात आहे. या सर्व बाबींबाबत मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे कळवण्यात आले असून, जून महिन्यातील विधानसभेच्या अधिवेशनात हे सर्व मुद्दे सभागृहात मांडणार आहे.

प्रफुल पटेल यांच्याबाबत बोलताना नाना पटोले यांनी म्हटले की, त्यांनी अजित पवारांसोबत वेगळा पक्ष स्थापन करून दिल्लीतील मोर्चा सांभाळला. प्रफुल पटेल हे माझ्या जिल्ह्यातील नेते आहेत. त्यांना कार्यकारिणीतून बाहेर काढणे किंवा त्यांचा अपमान होणे योग्य नाही. ते आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला स्वतंत्रपणे गेले.

राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली. गुन्हेगारांचा शोध घेण्यातही सरकार अपयशी ठरत आहे. प्रत्येक ५३ मिनिटांनी महिला किंवा मुलींवर अत्याचार होत असल्याची परिस्थिती आहे. सावित्रीबाई फुले यांच्या महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढणे ही गंभीर बाब आहे.

राज्यातील अनेक मंत्री आज गुवाहाटीला गेले आहेत. दुसऱ्यांना ब्रह्मज्ञान सांगायचे आणि स्वतः मात्र ऐशोआरामात राहायचे, ही भाजपची भूमिका आहे. युद्धकाळात लालबहादूर शास्त्री यांनी स्वतःपासून काटकसर सुरू केली होती. त्यावेळी देशातील महिलांनी स्वतःचे दागिने देऊन देशाला मदत केली. मात्र, आजचे सरकार स्वतः ऐशोआरामात राहून सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडत असल्याचे चित्र आहे असेही नाना पटोले म्हणाले.

मोदींनी देशाचा तमाशा करून टाकला, आमदार जितेंद्र आव्हाड घोड्यावर स्वार होऊन म्हणाले- मोदी 2000 वर्ष मागे नेणार

0

PM मोदींच्या आवाहनांचा राष्ट्रवादीकडून निषेध:
मुंबई-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैयक्तिक वाहनांचा वापर बंद करून सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन देशातील जनतेला केले आहे. तसेच वर्षभर सोने देखील खरेदी न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. अनेक गोष्टींचे आवाहन मोदी यांनी केले. त्यानंतर विरोधकांनी त्यांच्या या आवाहनांचा जोरदार निषेध केला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटातर्फे ठाण्यात आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे घोड्यावर सवार झाल्याचे पाहायला मिळाले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, पूर्वी लोक घोड्यावरून फिरायचे, बैलगाडी घेऊन फिरायचे. आता पेट्रोल आले, डिझेल आले गाड्या आल्या. आता परत एकदा 2000 वर्षांपूर्वी मागे घेऊन जाणार मोदी हे आपल्याला माहीत आहे. आता मंत्र्यांना पण आम्ही सांगणार की मंत्रालयात जाताना घोड्यावर जा, बैलगाडीवर जा, मोदींनी सांगितले आहे. आपण मोदींचे ऐकलेच पाहिजे. ते परदेशी जनता उपाशी, अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.

पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, तेल कमी वापरा म्हणतात, महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात, एवढे तेल लावतात ते. आता मला माहीत नाही की ते उद्यापासून तेल कमी वापरणार की केस कापणार. पण उद्यापासून तेल कमी वापरा. मी कोणाला सल्ला देत नाही. सल्ला मी फक्त मोदींचा ऐकतो म्हणून घोड्यावर बसलो आहे, अशी उपहासात्मक टीका आव्हाड यांनी केली.
अडानी अंबानी सोन्याच्या धंद्यात येतील

पंतप्रधान मोदींनी वर्षभर सोने खरेदी करू नका असे म्हटले आहे, यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, सोनं हा एकच धंदा आहे ज्यात अडानी अंबानी नाहीयेत. पुढच्या वर्षाच्या अखेरपर्यंत अडानी अंबानी सोन्याच्या धंद्यात येतील. मागच्या वर्षी एक रुपयाला घेतलेले सोने 1 रुपया 54 पैसे देऊन गेले आहे. तसेच भाजपच्या लोकांच्या ताफ्यातच जास्त गाड्या दिसून येत आहेत. त्यांना सगळे माफ आहे. त्यांनी गाड्या वापरायच्या, परदेशात जायचं, सर्वसामान्य जनतेने मात्र काही करू नये.

पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, देशात जेव्हा कम्प्युटर आले होते, तेव्हा मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी हे स्वतः बैलगाडी घेऊन संसदेत गेले होते. आमचे आता आवाहन आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा वर्षामधून निघतात मंत्रालयात येण्यासाठी, तेव्हा त्यांनी घोडा गाडी किंवा बैलगाडीमधून जावे.

जंगली महाराज रस्त्यावरील मॅकेनाईज्ड पार्किंग ‘पांढरा हत्ती’:अनेक वर्षांपासून विनावापर, त्वरित निर्णय घेण्याची मागणी

पुणे-शहरातील जंगली महाराज रस्त्यावरील मॅकेनाईज्ड पार्किंग प्रकल्प अनेक वर्षांपासून विनावापर पडून आहे. या प्रकल्पावर त्वरित निर्णय घेण्याची मागणी क्रिएटीव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

खर्डेकर यांनी या निवेदनात असे म्हटले आहे कि , छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर २००७ साली उभारण्यात आलेला हा प्रकल्प सुरुवातीपासूनच अपेक्षेप्रमाणे वापरला गेला नाही. त्यावेळी यांत्रिक पार्किंगबद्दल नागरिकांमध्ये संभ्रम होता आणि पार्किंगची समस्याही आजच्या इतकी गंभीर नव्हती. त्यामुळे हा प्रकल्प ‘पांढरा हत्ती’ ठरल्याचा आरोप करत त्यावेळी आंदोलनेही झाली होती.

गेल्या दोन दशकांत शहरातील परिस्थिती बदलली असली तरी, हा प्रकल्प बहुतांश काळ बंदच राहिला आहे. दोन वर्षांपूर्वी याबाबत पाठपुरावा केला असता, मेट्रो प्रशासनासोबत चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, सद्यस्थितीत ही यंत्रणा पूर्णपणे निष्क्रिय असून, परिसरात कचरा साचलेला दिसत आहे.

तज्ञांच्या मते, सध्याच्या मोठ्या आकाराच्या वाहनांमुळे या जुन्या यंत्रणेत पार्किंग करणे अवघड आहे. तसेच, आर्थिकदृष्ट्याही हा प्रकल्प व्यवहार्य नसल्याचे मत व्यक्त होत आहे. त्यामुळे या जागेचे नूतनीकरण करण्याऐवजी पर्यायी उपयोगाचा विचार करावा, अन्यथा पुन्हा ‘पांढरा हत्ती’ निर्माण होईल, अशी भूमिकाही खर्डेकर यांनी मांडली आहे.

बालेवाडीतील कचरा वर्गीकरण शेडला भीषण आग

पुणे- : बालेवाडी येथील महामार्गालगत असलेल्या कचरा वर्गीकरण शेडमधील कचऱ्याला आग लागल्याची घटना घडली. सलग तीन तास हा कचरा जळत असल्याने परिसरात धुराचे लोट पसरले होते. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून “कचरा वर्गीकरण शेड”च्या नावाखाली येथे मोठ्या प्रमाणात कचरा साठवून ठेवला जात आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या परिसरात अनेक शैक्षणिक संस्था असून कचरा डेपोच्या मागील बाजूस पुणे महानगरपालिकेचा बस डेपो देखील आहे. आगीमुळे बस डेपोला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता होती. तसेच परिसरात मेट्रो, महामार्ग आणि बस डेपो असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी हा कचरा वर्गीकरण प्रकल्प तातडीने अन्यत्र हलवावा, अशी मागणी बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

आग लागण्याची नेमकी कारणे शोधून संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, अशीही मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच बालेवाडी रेसिडेन्शियल असोसिएशनने सहाय्यक आयुक्त, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय यांना यासंदर्भात निवेदन देऊन संभाव्य धोक्याबाबत इशारा दिला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने आज ही गंभीर घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

“पुणे जिल्ह्यातील पिंपळगाव जोग कालवा फुटीप्रकरणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या…”

कालव्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सूचना

मुंबई, दि. १२ मे २०२६ : जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोग परिसरात कालवा फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाल्याची गंभीर बाब उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निदर्शनास आली आहे. याबाबत त्यांनी जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांना निवेदनाद्वारे तातडीने कार्यवाही करण्याची सूचना दिली आहे.

दिनांक १२ मे २०२६ रोजी झालेल्या या घटनेमुळे कालव्याचे पाणी शेतजमिनीत घुसल्याने पिके, सुपीक माती, शेतबांध तसेच सिंचन व्यवस्थेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती युवासेना तालुकाप्रमुख विकास राऊत आणि स्थानिक शेतकऱ्यांनी डॉ. गोऱ्हे यांना दिली.

या पार्श्वभूमीवर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महसूल व जलसंपदा विभागामार्फत तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन नियमांनुसार त्वरीत नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी सूचना केली आहे.

तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संबंधित कालव्याची तांत्रिक तपासणी करून आवश्यक दुरुस्ती व मजबुतीकरणाची कामे तातडीने हाती घेण्यात यावीत. कालव्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

सदर प्रकरणात करण्यात आलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल आपल्या कार्यालयास सादर करावा, अशी सूचनाही डॉ. गोऱ्हे यांनी संबंधित विभागाला केली आहे.

महात्मा फुले स्मारक रहिवाशांच्या प्रलंबित प्रश्नांवर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकाराने सकारात्मक चर्चा

“लोकांना विश्वासात घेऊन पुनर्वसनाची पुढील प्रक्रिया राबविण्यात येईल – डॉ. नीलम गोऱ्हे”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा करण्यात येणार

मुंबई, दि. १२ मे २०२६ :
पुण्यातील महात्मा फुले स्मारक रहिवाशी कृती समितीच्या प्रलंबित प्रश्नांबाबत विधानभवनात आढावा घेण्यात आला. पुनर्वसनाची प्रक्रिया राबविताना स्थानिक रहिवाशांना विश्वासात घेण्यात यावे, असे निर्देश विधानपरिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

महात्मा फुले स्मारक रहिवाशी कृती समिती, पुणे यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्यक्ष व ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीत रहिवाशांच्या पुनर्वसन, मोबदला, फ्लॅट वाटप आणि सर्वेक्षणासंदर्भातील विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना इतर महानगरपालिकांमध्ये देण्यात आलेल्या मोबदल्याचा अभ्यास करण्यात यावा, असे निर्देश दिले. महानगरपालिका किती जागा सामावून घेऊ शकते याचाही अभ्यास करण्यात यावा. ज्या महानगरपालिकांमध्ये जितका मोबदला देण्यात आला आहे त्याचाही अभ्यास करण्यात येणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना १५ तारखेला विशेष बैठक घेण्यात यावी, अशा सूचना दिल्या. संबंधित रहिवाशांसमोर धोरण मांडण्यात यावे, त्यांना आवाहन करण्यात यावे आणि त्यांचा विश्वास संपादन करण्यात यावा, असे त्यांनी सांगितले.

पुनर्वसन प्रक्रियेत पारदर्शकता आणि लोकाभिमुख भूमिका महत्त्वाची असून ज्यांना रोख रक्कम हवी आहे त्यांना रोख मोबदला आणि ज्यांना फ्लॅट हवा आहे त्यांना फ्लॅट देण्याचा पर्याय विचारात घेण्यात यावा. सर्व स्मारकांचे सर्वेक्षण करून संपूर्ण तपशील लोकांसमोर मांडण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.

कृती समितीच्या सदस्यांना स्थायी समिती सदस्यांकडे निवेदन सादर करून आपले मत अधिकृतपणे नोंदविण्याचाही सल्ला डॉ. गोऱ्हे यांनी दिला. त्यामुळे किती लोक घर स्वीकारण्यास तयार आहेत आणि किती लोकांना रोख रक्कम हवी आहे याची स्पष्ट माहिती उपलब्ध होईल. बैठकीपूर्वी लोकांचे मत जाणून घेतले तर ते उपयोगी ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

बैठकीत पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त सपकाळ यांनी सर्व संबंधितांची स्वतंत्र बैठक घेऊन वन-टू-वन संवाद साधण्यात यावा. त्यानंतर लोकांना विश्वासात घेऊन पुनर्वसनाची पुढील प्रक्रिया राबविण्यात यावी, असे निर्देश डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

तसेच महात्मा फुले स्मारक रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

बैठकीस पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर, उपायुक्त सपकाळ, नगर विकास विभाग २ च्या उपसचिव प्रियंका छापवाले, महात्मा फुले स्मारक रहिवाशी कृती समितीचे अध्यक्ष निलेश गिरमे, समितीचे सदस्य विशाल मोहिते, अमर नाईक, अविनाश देवकुळे, श्रीनिवास गोणे, नरेंद्र कच्चावे यांच्यासह इतर सदस्य ऑनलाईन उपस्थित होते.