Home Blog Page 51

UP मध्ये वादळी वारे, 94 जणांचा मृत्यू : 80 KMPH वेगाने आलेल्या वादळात तरुण उडून गेला

देशात दोन प्रकारच्या हवामानाचा अनुभव येत आहे. बुधवारी, प्रयागराज आणि अयोध्यासह उत्तर प्रदेशातील ३० जिल्ह्यांमध्ये वादळामुळे ९४ लोकांचा मृत्यू झाला. प्रयागराजमध्ये सर्वाधिक १७, तर भदोहीमध्ये १६ मृत्यूंची नोंद झाली.बरेली येथे ताशी ८० किमी वेगाने आलेल्या वादळाने एका तरुणाला आणि पत्र्याच्या शेडला उडवून लावले. राज्यातील बांदा शहरात तापमान ४५.४°C पर्यंत पोहोचले. आज ५१ जिल्ह्यांसाठी तीव्र वादळ आणि पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे.

राजस्थानमध्येही तीव्र उष्णता आणि उष्णतेची लाट जाणवत आहे. बुधवारी सलग चौथ्या दिवशी जैसलमेर हे देशातील सर्वात उष्ण शहर ठरले, जिथे तापमान ४६.१°C पर्यंत पोहोचले. हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज बिकानेर, जोधपूर, जैसलमेर आणि बारमेरमध्ये तीव्र उष्णतेसाठी रेड अलर्ट लागू आहे. १३ जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, मध्य प्रदेशातील २५ हून अधिक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट पसरली असून, ती १८ मे पर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. बुधवारी खजुराहोमध्ये तापमान ४५.४°C होते. आज इंदूर, उज्जैन, धार आणि रतलाममध्ये उष्णतेच्या लाटेसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये रात्री तापमान वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
येथे, हरियाणात गेल्या २४ तासांत कमाल तापमानात १.१°C ने वाढ झाली आहे. राज्यातील ५ शहरांमध्ये तापमान ४०°C पेक्षा जास्त होते, त्यापैकी नारनौलमध्ये ते ४२.५°C होते. राज्यात १७ मे पासून उष्णतेच्या लाटेसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिहारमधील पूर्णिया-कटिहारसह ७ जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तराखंडच्या डोंगराळ जिल्ह्यांमध्ये आज पावसासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
15 मे:

राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये देखील उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
झारखंडमध्ये काही ठिकाणी 50-60 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळी पाऊस येऊ शकतो.
बिहार, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, केरळ आणि कर्नाटकमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो.
16 मे:

पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि पश्चिम यूपीमध्ये पाऊस, सोसाट्याचा वारा येऊ शकतो.
जम्मू-काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये पावसासोबत गारपीट होऊ शकते. डोंगराळ भागात जोरदार वारेही वाहू शकतात.
बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसासोबत वीज कोसळण्याचा इशारा आहे.

संघटीत शक्तीपुढे मान तुकवू नका,आम्ही सोबत आहोत..

पुणे- नियमबाह्य होर्डींग्ज,बेकायदा होर्डींग्ज यांचा पुण्यात बाजार उठवू पाहणाऱ्या आणि योग्य दर आकारणी ला विरोध करणाऱ्यांचा सामना करणाऱ्या स्थायी समिती अध्यक्ष आणि महापालिका आयुक्त यांच्या भूमिकेला पाठींबा देत ‘आपले पुणे आपला आपला परिसर’ संस्थेचे आणि महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर,सुहास कुलकर्णी तसेच माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी ,’संघटीत शक्तीपुढे मान तुकवू नका,आम्ही सोबत आहोत,पुणेकर सोबत आहेत’ अशा शब्दात या दोहोंचे मनोबल वाढविले आहे.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे कि,’असंघटित पुणेकरांवर अन्याय होणार होता तो जागृत नागरी संघटना आणि लोकप्रतिनिधींनी दूर केला मालमत्ता करामध्ये वाढ होऊ दिली नाही.प्रशासनाने मांडलेले होल्डिंगचे दरपत्रक संघटित व्यवसायिकांमुळे मागे घ्यावे लागले असा आम्ही आरोप केला त्यात तथ्यही होते.पण आपण काल आढावा घेऊन कठोर भूमिका घेतली जी घेणे आवश्यक आहे कारण महानगरपालिकेचे उत्पन्न वाढले तर आणि तरच आपल्याला विकास कामे करणे शक्य आहे. पुणे महानगरपालिकेचे क्षेत्र हे मुंबई महानगरपालिका क्षेत्रापेक्षा जास्त मोठे आहे.अर्थात मुंबईच उत्पन्नाचं पोटेन्शिअल आणि पुण्याचे यामध्ये फरक आहे.
लंडन महानगरपालिका उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत हा होर्डिंगचे उत्पन्न आहे.
मुळात बेकायदेशीर होर्डिंग कायदेशीर करण्यासाठी एक “अभय योजना” तयार करावी खरं म्हणजे आमचा अभय योजनेला नेहमीच विरोध राहिलेला आहे परंतु गेले दहा वर्ष वर्तमानपत्रात बेकायदेशीर होर्डिंगची संख्या किती याबाबत वेगवेगळ्या दावे प्रति दावे होत असतात. हा विषय इतका सोपा आहे पुणे महानगरपालिकेचे प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारी यांनी त्यांच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये असणाऱ्या सर्व होर्डिंग ची संख्या फोटो त्यांच्याकडे लेझर गन दिली तर त्याचे माप सुद्धा अचूक मिळू शकेल इतकं तंत्रज्ञान पुढे आलेले आहे.
म्हणजे प्रशासनाला अंदाज येईल की महानगरपालिकेला पैसे न भरता किती जण उत्पन्न मिळवत आहेत त्यांच्याकडून आपल्याला महसूल उत्पन्न मिळवता येईल अर्थात त्याचा दर हा नेहमीपेक्षा जास्त असला पाहिजे.आणि मग ज्या वेळेला आपले एकदा जाहिरातीचे धोरण ठरले त्याप्रमाणे मग पुढच्या काळामध्ये शहर विद्रुप न होता चांगले होऊन उत्पन्न वाढेल.आपण याबाबत आम्ही केलेल्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून एक पाऊल पुढे टाकले आहे त्यामुळे आपले पुनश्च एकदा अभिनंदन.अध्यक्ष स्थायी समिती याने महसूल वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवले त्याप्रमाणे ते कामही करत आहेत एक समिती ही नेमली आहे उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यासाठी आम्ही देखील आपल्या सोबत आहोत हा आमचा शब्द आहे.असेही केसकर,कुलकर्णी आणि बधे यांनी म्हटले आहे.

होर्डींग्ज नियमावलीतील अत्यल्प भाग पहा

‘अंतर्नाद’ या संगीत नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शनिवारी चिंचवड मध्ये

भक्ती, संगीत आणि आत्मशोधाचा प्रवास घडवणारे भव्य नाटक – भाऊसाहेब भोईर

पिंपरी, पुणे (दि.१३ मे २०२६) पंढरीची वारी हा जगातील एकमेव सोहळा आहे की, या सोहळ्यात सर्व अठरा पग्गड जाती एकत्र येऊन वारी मध्ये सहभागी होतात. देहू, आळंदी पासून पंढरपूर पर्यंत वारीत सहभागी होण्याचे आत्मिक समाधान हे अडीच तासात देण्याचा प्रयत्न “अंतर्नाद” या संगीत नाटकातून प्रेक्षकांना मिळेल. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या पसंतीला उतरेल असा ५१ कलाकारांचा सहभाग असलेल्या या प्रयोगात अभंग, गवळण, भारुड, पोवाड्याचा समावेश या सात्विक कार्यक्रमात आहे. अंतर्मनातील नाद समजून घेण्यासाठी आणि स्वतः मधला विठ्ठल शोधण्यासाठी सर्वांनी
‘अंतर्नाद’ या संगीत नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शनिवारी, (दि.१६) सायंकाळी ७ वाजता, चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात येऊन पहावा असे आवाहन अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष व मोरया थिएटरचे संस्थापक, “अंतर्नाद” चे निर्माते भाऊसाहेब भोईर यांनी केले.
पिंपरी आचार्य अत्रे सभागृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भोईर बोलत होते. यावेळी प्रणव सपकाळे, मनोज डाळिंबकर, निरंजन पेडगावकर, अंकिता शिवतरे, राजू बंग आदी उपस्थित होते.
यावेळी भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले की, वारीचं महत्व नवीन पिढीला “अंतर्नाद” मधून कळेल आणि त्यांना प्रेरणा मिळेल. संतांविषयी अनेक साहित्य, अभंग आहेत. परंतु या नाटकात त्याची आम्ही त्याची कॉपी केली नाही तर सर्व नवीन आहे. लोकसंगीतात वापरली जाणारी बहुतांशी सर्व वाद्य या संगीत नाटकात वापरली आहेत. आपल्या अंतरात्म्याचा आवाज समजून घेण्यासाठी आपण अंतर्नाद पहावे. संगीत, भक्ती आणि कलेचा वारसा जपणाऱ्या पिंपरी चिंचवडच्या सांस्कृतिक विश्वात ‘मोरया थिएटर्स’ एक नवी कोरी कलाकृती घेऊन येत आहे. पंढरीच्या वारीचा आणि आत्म्याचा प्रवास मांडणाऱ्या या भव्य संगीत नाटकाचा दुसरा प्रयोग हडपसर येथील विठ्ठलराव तुपे नाट्यगृहात शुक्रवारी (दि. २२ मे), सायंकाळी सात वाजता होणार आहे. रसिक प्रेक्षकांसाठी या नाटकाची तिकिटे ‘बुक माय शो’ आणि ‘तिकीट खिडकी’ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. तसेच चिंचवड येथील नाट्यगृहाच्या तिकीट खिडकीवरही विक्री सुरू आहे अशी माहिती दिग्दर्शक मनोज डाळिंबकर यांनी दिली.
नाटकाचे कथानकः “अंतर्नाद” हे केवळ नाटक नसून तो आत्म्याशी संवाद साधणारा एक भावस्पर्शी प्रवास आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या पवित्र भूमीकडे निघालेल्या माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आणि त्यातील वारकऱ्यांच्या श्रद्धेचे जिवंत चित्रण यात पाहायला मिळेल. दिंडीत सहभागी झालेल्या एका युवा वारकऱ्याची विठ्ठल भक्ती आणि त्यातून घडलेला त्याचा अंतर्मनातील प्रवास म्हणजे ‘अंतर्नाद’ होय. या नाटकाचा निर्माता म्हणून काम करताना, वारकरी परंपरेला अभिवादन करणारी ही आधुनिक कलाकृती रसिकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल, असा मला विश्वास भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केला.
नाटकाचे लेखन विनोद रत्ना यांनी केले असून, संकल्पना व दिग्दर्शन मनोज डाळींबकर यांचे आहे. संगीत निरंजन पेडगावकर यांनी दिले आहे आणि मुराद तांबोळी यांनी गीते शब्दबद्ध केली आहेत. नृत्यदिग्दर्शन अंकिता शिवतरे व सौगंध कापसे यांनी केले आहे. तांत्रिक बाजू अभिप्राय कामठे (प्रकाश योजना), कमलेश बिचे (रंगभूषा) आणि वेदिका काळे (वेशभूषा) यांनी सांभाळली आहे. सहाय्यक दिग्दर्शन आकाश थिटे यांनी केले आहे.

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण

मुंबई, दि.१३ :नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित होत आहे. या कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कुंभमेळ्याच्या लोगोसाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे तीन हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धकांमधून तीन उत्कृष्ट स्पर्धकांचा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या पुणे येथील सुमित काटे यांना तीन लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक पटकावलेल्या नोएडा येथील मयांक नायक यांना दोन लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या पंढरपूर येथील पीयुष पिंपळनेरकर यांचा एक लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रसून जोशी, अश्विनी देशपांडे, मंदार राणे, वृषाली केकणे (देशमुख), बारिश दाते, विनय नारंग, डॉ. प्राजक्ता बास्ते, प्रफुल्ल सावंत, डॉ. दिनेश वैद्य, अँथनी लोपेझ आणि डॉ. किरण शिंदे यांसारख्या दिग्गज डिझाइन तज्ज्ञांच्या समितीने या प्रवेशिकांचे परिक्षण केले. सर्जनशीलता, नाविन्य, ब्रँड सुसंगतता आणि सादरीकरण या निकषांवर आधारित ही निवड करण्यात आली. या समितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी प्रास्ताविकाद्वारे कुंभमेळा आयोजन आणि लोगो स्पर्धेबाबत माहिती दिली.

यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांच्यासह विविध आखाड्यांचे साधू, संत उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यावेळी उपस्थित साधू संतांचे स्वागत केले.

नाशिक – त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाविषयी

नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, ‘मायगव्ह’ आणि ‘असोसिएशन ऑफ डिझाइनर्स ऑफ इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या देशव्यापी डिझाइन स्पर्धेतून या बोधचिन्हाची निवड करण्यात आली. २० नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत मायगव्ह प्लॅटफॉर्मवर पार पडलेल्या या स्पर्धेत ७० आंतरराष्ट्रीय स्पर्धकांसह एकूण ३,०६७ प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या.

सहभागाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य आघाडीवर राहिले, त्याखालोखाल दिल्ली आणि तामिळनाडूचा क्रमांक लागला. 18 ते 24 वयोगटातील तरुणांनी या स्पर्धेत सर्वाधिक सक्रिय सहभाग नोंदवला.

➡️हे बोधचिन्ह नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या पवित्र भूगोल आणि धार्मिक परंपरांवर आधारित आहे.

➡️भगवान शंकराचे त्रिशूळ: आध्यात्मिक उर्जेचे प्रतीक.

➡️त्र्यंबकेश्वर मंदिर: प्रादेशिक वारशाचे दर्शन घडवणारी मंदिराची प्रतिकृती.

➡️काळाराम मंदिराची कमान आणि गोदावरी नदी: गोदावरी नदीला ‘शिवलिंगा’च्या रूपात दर्शविण्यात आले असून, ते कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाच्या परंपरेचे महत्त्व अधोरेखित करते.

“शी कॅन अँड शी विल”महिला बॉक्सिंग खेळाडू दत्तक योजना

पुणे-

रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल आणि पुणे सिटी बॉक्सिंग असोसिएशन महिला बॉक्सिंग खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महिला खेळाडू दत्तक योजनेचा एक भाग म्हणून 2023 पासून “शी कॅन अँड शी विल” हा विशेष उपक्रम संयुक्तपणे राबवत आहेत.

या उपक्रमासाठी मनापासून निधी देणाऱ्या रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रलच्या अध्यक्षा रोटरियन लेखा नायर आणि या प्रकल्पासाठी प्रमुख देणगीदारांपैकी एक असलेल्या रोटरियन योगेश शाह यांनी पुण्यातील महिला बॉक्सर्सना राज्य आणि राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पोडियम फिनिश करताना पाहण्याची उत्सुकता व्यक्त केली आहे.

या उपक्रमांतर्गत पुणे शहर, पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडमधील निवडक ६० महिला बॉक्सर्ससाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यांनी उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले आहे. हे शिबिर २२ एप्रिल ते ३० एप्रिल, २०२६ या कालावधीत जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम, पुणे येथे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक श्री. शिवकुमार पाल यांच्या तज्ञ मार्गदर्शनाखाली होणार आहे.

वरिष्ठ प्रशिक्षक श्री. शिवकुमार पाल यांनी भारतातील अनेक आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या बॉक्सरना प्रशिक्षण दिले आहे आणि आता पुण्यातील महिला खेळाडूंना त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल.

या उपक्रमाद्वारे, सहभागी खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, क्रीडा उपकरणे आणि योग्य पोषण (आहार योजना) बद्दल तपशीलवार मार्गदर्शन मिळेल.

शिबिराच्या शेवटी अंतिम टप्प्यासाठी एकूण 15 महिला खेळाडूंची निवड केली जाईल. या निवडक 15 खेळाडूंना “महिला खेळाडू दत्तक योजनेत” समाविष्ट केले जाईल, ज्या अंतर्गत त्यांना प्रगत प्रशिक्षण, क्रीडा उपकरणे, योग्य आहार नियोजन आणि त्यांची कामगिरी वाढवण्यासाठी वर्षभर तज्ञांचे मार्गदर्शन मिळेल.

याशिवाय, या खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यास सक्षम बनविण्याच्या उद्देशाने विशेष तयारीसह त्यांना आर्थिक मदत दिली जाईल.
2023 पासून सुरू असलेल्या या उपक्रमाचा एक भाग म्हणून, यापूर्वी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करणाऱ्या पुणे शहरातील आठ महिला खेळाडूंची निवड करण्यात आली होती.

या कार्यक्रमांतर्गत 11 ते 15 डिसेंबर 2023 या कालावधीत द्रोणाचार्य पुरस्कार विजेते ज्येष्ठ बॉक्सिंग प्रशिक्षक श्री. डी. चंद्रालाल यांच्या मार्गदर्शनाखाली जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम येथे उच्चस्तरीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान, खेळाडूंना बॉक्सिंग किट, बॉक्सिंग ग्लोव्हज, ट्रॅकसूट आणि रिंग शूजसह आवश्यक क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. योग्य पोषण (डाएट प्लॅन) आणि प्रशिक्षण याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले.

या उपक्रमातील अनेक खेळाडूंनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे:

  1. झीनत शेख – शालेय राष्ट्रीय अजिंक्यपद: कांस्य पदक; आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटसाठी निवड
  2. सृष्टी चोरगे – शालेय राष्ट्रीय अजिंक्यपद: रौप्य पदक
  3. हर्षदा लोहट – राज्य स्पर्धा: सुवर्णपदक; अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत सहभाग
  4. वैष्णवी कदम – राष्ट्रीय स्पर्धा: सुवर्णपदक
  5. समीक्षा सूर्यवंशी – राज्य स्पर्धा: सुवर्णपदक
    ६. भूमिका खिलारे – राज्य स्पर्धा: सुवर्णपदक
  6. सोनिया सूर्यवंशी – पश्चिम विभागीय चॅम्पियनशिप: सुवर्णपदक
  7. रिया कुटे – शालेय राज्य स्पर्धा: सुवर्णपदक

“शी कॅन अँड शी विल” हा प्रकल्प महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांचा खेळातील सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे. भविष्यातील यशस्वी महिला बॉक्सरचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पालनपोषण करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे.

इंडियन बॉक्सिंग कौन्सिलचे अध्यक्ष ऑलिंपियन बॉक्सिंग रेफरी ब्रिगेडियर पीकेएम राजा, पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष श्री. अविनाश बागवे, महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे महासचिव श्री. भरतकुमार व्हावळ, शिवछत्रपती पुरस्कार विजेते व पिंपरी चिंचवड शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव तथा पुणे विभागीय सचिव श्री. विजय यादव, आंतरराष्ट्रीय कोच व पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव श्री. विजय गुजर, राष्ट्रीय पंच व पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे महासचिव श्री. अभिमान सुर्यवंशी यांच्यासह पुण्यातील तीनही संघटनांचे पदाधिकारी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकत्रितरित्या परिश्रम घेत आहेत.

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या केंद्र सरकारविरोधात जोरदार आंदोलन

पुणे : NEET परीक्षा रद्द झाल्यानंतर देशभरात विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यार्थी संघटनेकडून पुणे शहरात आक्रमक निषेध आंदोलन करण्यात आले. “विद्यार्थ्यांच्या भविष्याचा बाजार मांडणाऱ्या व्यवस्थेविरोधात आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

या आंदोलनाचे नेतृत्व विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील प्रमुख उपस्थित होते. आंदोलनादरम्यान केंद्र सरकार आणि परीक्षा व्यवस्थापनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की,
“मागील काही वर्षांपासून NEET व इतर परीक्षांमध्ये पेपरफुटी, गैरव्यवहार आणि गोंधळाची मालिका सुरू आहे. लाखो विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करून परीक्षा देतात, मात्र भ्रष्ट आणि निष्क्रिय यंत्रणेमुळे त्यांचे भविष्य अंधारात ढकलले जात आहे. मोदी सरकारला विद्यार्थ्यांच्या आणि जनतेच्या प्रश्नासंदर्भात काहीही देणे घेणे राहिलेले नाही. ते केवळ निवडणुकांचा प्रचार आणि आपले इव्हेंट करण्यात व्यस्त आहेत. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही.”

यावेळी श्रीकांत पाटील यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधत, “शिक्षण व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला असून, दोषींवर कठोर कारवाई आणि पारदर्शक परीक्षा प्रणाली लागू होईपर्यंत संघर्ष सुरू राहील,” असे सांगितले.

या आंदोलनात पिंपरी चिंचवड विद्यार्थी शहराध्यक्ष राहुल आहेर, प्रदेश सरचिटणीस शार्दुल उबाळे, प्रदेश सचिव राजवीर ठवरे, पुणे विद्यार्थी संघटनेचे अजय पवार, संघराज शेलार, युवक प्रदेश सचिव अशोक बेंद्रे, पुणे युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे, युवक कार्याध्यक्ष अजिंक्य पालकर, प्रसिध्दी प्रमुख अमोघ ढमाले अजय पवार, साहिल कांबळे, ओम पोकळे, जयदीप देवकुळे, रोहन पवार, अर्जुन गांजे, रिषभ भडाळे , स्वप्नील खंडागळे, आर्यन गायकवाड, ज्ञानेश्वर वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व पदाधिकारी सहभागी झाले होते.

“NEET घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करा”, “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ बंद करा”, “पेपरफुटी करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

‘NEET’ पेपरफुटीच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन करा; केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा

मुंबई, दि. १३ मे २०२६

देशातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली आज फोर्ट परिसरातील राज्याच्या CET सेल कार्यालयासमोर मुंबई युवक काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो युवकांनी सहभाग घेत भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

नीट पेपरफुटी प्रकरणी भाजपा सरकारवर टीका करत मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन म्हणाल्या की, “नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे देशभरातील २४ लाख विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या स्वप्नांवर सरकारने बुलडोझर फिरवला आहे. या गंभीर प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. तसेच विद्यार्थ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी.”

त्या पुढे म्हणाल्या की, “‘NEET’ पेपरफुटी प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन करण्यात यावी. या प्रश्नपत्रिका फुटीमागील संपूर्ण साखळी भाजपाशी संबंधित लोकांकडून चालवली जात असून, बेकायदेशीर मार्गाने विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त केले जात आहे. आम्ही सर्वजण मिळून या अन्यायाविरोधात लढा देऊ आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देऊ.”

झीनत शबरीन यांनी पुढे आरोप केला की, “ज्या NTA महासंचालकांच्या कार्यकाळात २०२४ ची ‘NEET’ परीक्षा प्रश्नपत्रिका फुटली, त्याच व्यक्तीची छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे ‘प्रधान सल्लागार’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका फुटीच्या घोटाळ्यात सहभागी असलेल्या लोकांना भाजप सरकारकडून बक्षीस म्हणून मोठी पदे दिली जात आहेत.”

या आंदोलनात मुंबई युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पंकज चौधरी, महासचिव तेजस चांदूरकर, आसिफ खान, गुरमन सिंग, गणेश शेगार, मितेश सोनकर, संतोष यादव, जिल्हाध्यक्ष शेखर जगताप, शिव यादव, अब्दुल समद तसेच विधानसभा अध्यक्ष इम्रान खान, प्रसन्न रांदिवे, आशिष सरोज, अल्तमेश कुरेशी, राहुल पेडणेकर, राज तुरेराव, सचिन, बृजमोहन यादव, सोहेब, मझहर आणि अबुतालिब यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी झाले होते या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधींनी आठवड्यातून एक दिवस ‘पीएमपीएमएल’ बस किंवा ‘पुणे मेट्रो’चा वापर करावा

महानगरपालिकेत आठवड्यातून एक दिवस ‘सार्वजनिक वाहतूक दिन’ पाळण्याचा महापौरांचा प्रस्ताव

पुणे,: पुणे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी वर्गाने आठवड्यातून किमान एक दिवस खाजगी वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असा महत्त्वपूर्ण प्रस्ताव महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे यांनी मांडला आहे. यासंदर्भात त्यांनी आयुक्त यांना अधिकृत पत्र पाठविले आहे.

जागतिक पातळीवर इंधनाशी संबंधित निर्माण होणाऱ्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि सार्वजनिक वाहतुकीच्या वापराबाबत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून हा उपक्रम राबविण्याची गरज महापौरांनी व्यक्त केली आहे. तसेच, राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनीही शहरांमधील वाहतूक सुलभतेसाठी मेट्रोसारख्या सार्वजनिक प्रकल्पांच्या वापरावर दिलेल्या भराचा उल्लेख यावेळी करण्यात आला आहे.

महापौरांनी आपल्या पत्रात पुढील सूचना मांडल्या आहेत:

  • महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधींनी आठवड्यातून एक दिवस ‘पीएमपीएमएल’ बस किंवा ‘पुणे मेट्रो’चा वापर करावा.
  • शक्य असल्यास सायकलचा वापर करून पर्यावरणपूरक प्रवासाला प्रोत्साहन द्यावे.
  • अपरिहार्य परिस्थितीत ‘कारपूलिंग’चा अवलंब करावा.

महापौरांनी नमूद केले की, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी स्वतः सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत असल्यास सर्वसामान्य नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश जाईल. तसेच, प्रत्यक्ष प्रवास करताना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्या दूर करण्यासाठी प्रशासनाला अधिक प्रभावीपणे काम करता येईल.

आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी तसेच इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि शहरातील वाहतूक व्यवस्थेवर ताण कमी करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती महापौरांनी केली आहे.

रात्र शाळेतील विद्यार्थ्यांचा संघर्ष प्रेरणादायी – महापौर नागपुरे

पुण्यातील विद्यार्थ्यांनी राज्यात प्रथम-द्वितीय येत शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा

पुणे,: “रात्र शाळा ही अतिशय गरजेची आणि समाजासाठी महत्त्वाची शिक्षण व्यवस्था आहे. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून राज्यात अव्वल येणाऱ्या या विद्यार्थ्यांचा संघर्ष खरोखर प्रेरणादायी आहे. माझे पती देखील रात्र महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले आहेत. त्यामुळे अशा शिक्षण व्यवस्थेचे महत्त्व अधिक अधोरेखित होते,” असे गौरवोद्गार पुणे महानगरपालिकेच्या महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे यांनी काढले.

दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी संचलित आबासाहेब अत्रे रात्र प्रशालेतील दहावी परीक्षेत राज्यात प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा महापौर मॅडम यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करत त्यांच्या जिद्दीचे कौतुक केले.

विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहराच्या शिरपेचात पुन्हा एक मानाचा तुरा रोवणारी ही कामगिरी ठरली आहे. रात्र शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत घवघवीत यश संपादन केले आहे.

दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी संचलित आबासाहेब अत्रे रात्र प्रशालेचा यंदाचा दहावीचा निकाल ८८.८८ टक्के लागला आहे. वसुप्रद वैभव कुलकर्णी यांनी ९०.४० टक्के गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला, तर अंकुश काशिनाथ रेवाळे यांनी ८४.८० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला.

संघर्षातून यश मिळविणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या कथा प्रेरणादायी आहेत. वसुप्रद कुलकर्णी यांनी वेदपाठशाळेतील शिक्षण, पौरोहित्याचे काम आणि रात्री अभ्यास करत यश मिळवले. तर अंकुश रेवाळे यांनी दिवसा सुरक्षा रक्षक व बाऊन्सर म्हणून काम करत, कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत आणि अत्यंत कठीण परिस्थितीत अभ्यास करून हे यश संपादन केले.

यावेळी महापौर मॅडम यांनी पुणे महानगरपालिकेतील ज्या कर्मचाऱ्यांचे शिक्षण अर्धवट राहिले आहे, त्यांनी इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी अशा रात्र प्रशालांमध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमास दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष संजीव महाजन, सदस्य भारत वेदपाठक, ज्येष्ठ शिक्षक संजय सातपुते, कुंभार आदी उपस्थित होते.संस्थेचे कार्याध्यक्ष संजीव महाजन यांनी संस्था शताब्दी वर्षात पदार्पण करत असताना हे यश महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तर ज्येष्ठ शिक्षक संजय सातपुते यांनी रात्र शाळेतील विद्यार्थ्यांच्या जिद्दीचा गौरव करत त्यांच्या संघर्षमय प्रवासाचे विशेष कौतुक केले.

चित्रपट महामंडळाच्या रोखलेल्या निवडणुकीचा मार्ग झाला खुला

पुणे-:सदोष मतदार यादीच्या वादामुळे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीवर आलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवली असून, आता महामंडळाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. सदस्यत्व वर्गीकरणाबाबत वाद असला, तरी त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया थांबवणे योग्य नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.यामुळे तब्बल ५ व्या वर्षी चित्रपट महामंडळाच्या रोखलेल्या निवडणुकीचा मार्ग खुला झाला आहे. धर्मदाय आयुक्त कार्यालयाची बेफिकिरी देखील यामुळे उजेडात आली आहे. डिसेम्बर २०२२ मध्ये महामंडळाच्या वतीने आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या सहमतीने करण्यात आलेल्या मतदार याद्या अनुकूल मानून निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता आणि जानेवारी २०२३ मध्ये उमेदवारी अर्ज देखील स्वीकारायला सुरुवात झाली. हे उमेदवारी अर्ज देताना दिल्या गेलेल्या मतदार याद्यांच्या मध्ये असलेला घोटाळा चव्हाट्यावर आला आणि एकच वादळ उठले .अगोदरच कोरोना च्या कारणाने लांबलेल्या निवडणुकाना मुंबई उच्च न्यायालयाने ११ जानेवारी २०२३ ला दिलेल्या अंतरिम आदेशाद्वारे महामंडळाच्या निवडणुकांना स्थगिती दिली होती. मतदार यादी किंवा सदस्यत्व वर्गीकरणाबाबतचा वाद निवडणुकीनंतरही तपासता येऊ शकतो. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेलाच स्थगिती देणे योग्य नाही, असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश रद्द केला.तथापि, सदस्यत्वासंदर्भातील मूळ वादावर सर्वोच्च न्यायालयाने कोणतेही अंतिम मत व्यक्त केलेले नाही. त्या मुद्द्यावर उच्च न्यायालय स्वतंत्रपणे सुनावणी घेऊन निर्णय देणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. मात्र मूळ वादावर अंतिम निर्णय अद्याप बाकी असून, उच्च न्यायालयातील सुनावणीनंतर निवडणूक प्रक्रिया सुरू होऊ शकते.”जवळपास ४५ ते ५० हजार सभासदांना ‘ब’ वर्गामध्ये तीन वर्षे पूर्ण झाल्याने ते ‘अ’ वर्गासाठी पात्र झाले आहेत. त्यांच्या भवितव्याचा निर्णय उच्च न्यायालयातील १० जूनच्या सुनावणीत होईल. त्यानुसार अद्ययावत मतदार यादी तयार होऊन निवडणूक प्रक्रिया सुरू होईल”, असे

काही जणांचे ‘वर्ग अ’ सदस्यत्व नाकारल्याचा तर काही अ वर्ग सभासद असून त्यांचीच नावे वगळल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. ‘वर्ग अ’ सदस्यांनाच महामंडळाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आला होता.यानंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन त्यावर स्थगिती आणल्याने महामंडळाची निवडणूक आणखी लांबली . ५ वर्षासाठी निवडून आलेल्या सदस्यांच्याच हाती पुढेही काही काळ कारभार राहिला.

रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा – महापौर नागपुरे

0

पुणे, : “पुण्यातील ३२ रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी प्राधान्य द्या. त्यासाठी आवश्यक निधी, विविध प्रकारच्या मान्यता व निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करा. याच वर्षी संबंधित रस्त्यांची कामे पूर्ण होतील, याकडे गांभीयनि लक्ष द्या,” अशा सूचना महापौर मंजूषा नागपुरे यांनी प्रशासनास दिल्या.
महापौर नागपुरे यांनी महापालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा बुधवारी आढावा घेतला. या वेळी
अतिरिक्त आयुक्त, वरिष्ठ अधिकारी, विभाग प्रमुख उपस्थित होते. बैठकीत शहरातील रस्ते, पायाभूत सुविधा, डिजिटायझेशन, उद्याने, सांस्कृतिक सुविधा आणि मालमत्ता व्यवस्थापन यासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

नागपुरे म्हणाल्या, “शिवणे-खराडी रस्ता आणि म्हात्रे पूल परिसरातील भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी प्रयत्न करा. नव्याने समाविष्ट गावांमधील प्रमख रस्त्यांच्या विकासासाठी स्वतंत्र कार्यवाही होण्याची आवश्यकता आहे. पीपीपी तत्त्वावरील, क्रेडिट नोटच्या माध्यमातून सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांनाही वेग द्या. पावसाळ्यापूर्वी खोदाईची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना द्या. सांस्कृतिक व क्रीडा विभागाला नाट्यगृहांच्या स्वच्छता, देखभाल-दुरुस्तीसाठी सक्षम यंत्रणा उभाराव्यात “

राज्यातील ९९ टक्के वीज ग्राहकांना ग्रीड सपोर्ट चार्ज नाही

0

मुंबई, दि. १३ मे २०२६: राज्यातील छतावरील सौरऊर्जा प्रकल्प बसविलेल्या सरसकट सर्व वीज ग्राहकांना ग्रीड सपोर्ट चार्ज हा अधिभार द्यावा लागणार असल्याचे चित्र काही हितसंबंधी गटांकडून निर्माण केले जात असून ते पूर्णपणे चुकीचे आहे. राज्यामध्ये महावितरणचे एकूण ३ कोटी १७ लाख वीज ग्राहक असून त्यापैकी ४४,२४६ ग्राहकांना म्हणजे एकूण ग्राहकांपैकी एक टक्क्यापेक्षा कमी अर्थात केवळ ०.१४ टक्के वीज ग्राहकांना हा अधिभार लागू झाला आहे, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली. 

ज्या ग्राहकांचा मंजूर भार १० किलोवॅटपेक्षा अधिक आहे व ज्यांनी छतावरील सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविला आहे त्यांना त्यांनी निर्माण केलेल्या विजेवर ग्रीड सपोर्ट चार्ज लागू करावा, असा आदेश महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने दिला आहे. त्यानुसार महावितरणने संबंधित वीज ग्राहकांना हा अधिभार लागू केला आहे. 

राज्यात महावितरणचे २ कोटी ३७ लाख घरगुती वीज ग्राहक आहेत. त्यापैकी ६ लाख ५७ हजार घरगुती वीज ग्राहकांनी छतावरील सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविले आहेत. आयोगाच्या आदेशानुसार सौरऊर्जा प्रकल्प बसविलेल्या एकूण घरगुती ग्राहकांपैकी १६,४१० म्हणजे केवळ २.४९ टक्के घरगुती ग्राहकांनाच ग्रीड सपोर्ट चार्ज लागू झाला आहे. सर्व २ कोटी ३७ लाख ग्राहकांशी तुलना केली तर ग्रीड सपोर्ट चार्ज लागू झालेल्या घरगुती ग्राहकांचे प्रमाण केवळ ०.०७ टक्के आहे.

राज्यात एकूण ४ लाख ४५ हजार औद्योगिक (उच्चदाब व लघुदाब) वीज ग्राहक असून त्यापैकी केवळ ८,८९४ ग्राहकांना म्हणजे सुमारे २ टक्के ग्राहकांना ग्रीड सपोर्ट चार्ज लागू झालेला आहे. त्याचप्रमाणे महावितरणच्या एकूण २३ लाख ३० हजार व्यावसायिक वीजग्राहकांपैकी १२,८३२ ग्राहकांना म्हणजे ०.५५ टक्के व्यावसायिक ग्राहकांना ग्रीड सपोर्ट चार्ज लागू झाला आहे.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने २०१९ साली छतावरील सौरऊर्जा निर्मिती करणाऱ्या वीजग्राहकांवर ग्रीड सपोर्ट चार्ज लागू करण्याचा निर्णय दिला होता. त्यावेळी आयोगाने छतावरील सौरऊर्जानिर्मिती प्रकल्पांची राज्यातील एकूण क्षमता २ हजार मेगावॅट झाल्यावर हा चार्ज लागू करण्याचा आदेश दिला होता. आयोगाने २०२३ मध्ये ही मर्यादा ५ हजार मेगावॅट केली. या वर्षाच्या सुरुवातीला राज्याने ५ हजार मेगावॅटची क्षमता ओलांडल्यानंतर आयोगाने २५ मार्च २०२६ च्या वीजदर आदेशात ग्रीड सपोर्ट चार्ज निश्चित केला.

सौरऊर्जा प्रकल्प बसविलेल्या ग्राहकांना १२९ कोटींचा लाभ – छतावरील सौरऊर्जा प्रकल्प बसविलेले जे ग्राहक अतिरिक्त वीज महावितरणला देतात त्यांना त्याबद्दल लाभ मिळतो. राज्यातील ४ लाख ९० हजार वीजग्राहकांना या प्रकारे गेल्या वर्षभरात १२९ कोटी ५७ लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे. त्यामध्ये ४ लाख ७२ हजार घरगुती ग्राहकांचा समावेश आहे व त्यांना १२४ कोटी ५५ लाख रुपयांचा लाभ झाला आहे.

 NEET घोटाळ्याविरोधात आक्रमक आंदोलन

गुडलक चौक येथे NEET चा प्रतीकात्मक पुतळा जाळून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची युवक काँग्रेसची मागणी.

पुणे : देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या NEET परीक्षेतील सततच्या गैरव्यवस्था, पेपरफुटी आणि भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ युवक काँग्रेसतर्फे आज गुडलक चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी NEET चा प्रतीकात्मक पुतळा जाळून केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या मेहनतीची खिल्ली उडवणाऱ्या आणि शिक्षण व्यवस्थेचे पूर्णपणे राजकारण करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करत युवक काँग्रेसने केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली.

यावेळी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले,

“देशातील विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करून स्वतःचे भविष्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण मोदी सरकारच्या भ्रष्ट आणि निष्क्रिय व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे. NEET परीक्षा आता गुणवत्तेची नसून भ्रष्टाचाराची परीक्षा बनली आहे. शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा.”

युवक काँग्रेसचे राज्याचे मीडिया विभाग अध्यक्ष अक्षय जैन म्हणाले,

“जे सरकार परीक्षा सुरक्षित ठेवू शकत नाही, ते देशाचे भविष्य काय सुरक्षित ठेवणार? विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राख करणाऱ्या या सरकारविरोधात युवक काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यावर बुलडोझर चालवणाऱ्यांना जनता कधीच माफ करणार नाही. 

प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश अबनावे म्हणाले,

“विद्यार्थ्यांच्या कष्टावर पाणी फेरणाऱ्या या व्यवस्थेविरोधात आता देशभरातील विद्यार्थी आणि युवक रस्त्यावर उतरतील. NEET घोटाळ्याची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.”

या आंदोलनात प्रदेश अध्यक्ष शिवराज मोरे, अक्षय जैन, प्रथमेश अबनावे, मोहसीन शेख, भूषण रानभरे, सौरभ अमराळे, अंजनेय साठे, अथर्व सोनार, सद्दाम शेख, अभिषेक अवचार, निखिल मलके, सागर धाडवे,ओंकार मोरे, विशाल कामेकर, दिनेश सरताळे, विकास सुपनार, अँड सूरज, प्रसन्न मोरे, तेजस बनसोड आदी  पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने युवक विद्यार्थी उपस्थित होते.

भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करणार-मंत्री अतुल सावे

पुणे, दि. १३: महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त राज्य शासनाकडून विविध उपक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे, याच पार्श्वभूमीवर भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केले.

श्री. सावे यांनी आज भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी केली, यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर, अधीक्षक अभियंता बिपिन शिंदे, निलेश गिरमे, भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक समितीचे अध्यक्ष अजय खेडेकर, पीएमपीएलचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत डोके आदी पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. सावे म्हणाले, क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती नागरिकांना व्हावी, याकरिता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत चर्चा करुन भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करुन कामाची सुरुवात करण्यात आली होती. सद्यस्थितीत पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून स्मारकाचे काम वेगाने सुरू असून सध्याची ९० टक्के काम पूर्ण झाले आहे, या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत उर्वरित विकास कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी श्री. सावे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी श्री. नायर यांनी पुणे महानगरपालिकेच्यावतीने भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक विकास आराखड्याच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कामांबाबत माहिती दिली.

इमारतीची वैशिष्ट्ये आणि सुविधा: स्मारकामध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित विविध आधुनिक सुविधा असणार असून यामध्ये ऑडिओ-व्हिडिओ शो, दोन्ही महापुरुषांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘थीम बेस्ड’ ऑडिओ-व्हिडिओ शो आणि होलोग्राफीचे काम करण्यात येणार आहे. या दोन्ही महापुरुषांचे अर्धपुतळे आणि त्यांच्या कार्याची माहिती प्रदर्शित केली जाणार आहे. मुली आणि महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र, मार्गदर्शन केंद्र आणि संगणक केंद्र उभारले जाणार आहे. स्मारकात एक ॲम्फीथिएटर देखील असणार आहे.

स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गिकेच्या कामाला सुरुवात..

0

पुणे – बहुप्रतीक्षित स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या ‘सेगमेंट कास्टिंग’च्या कामाला मंगळवारी सुरुवात झाली. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे या विस्तारित मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला आता गती मिळणार आहे.

स्वारगेट ते कात्रज हा मेट्रो मार्ग दक्षिण पुण्याला शहराच्या मुख्य भागाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या मार्गिकेचे काम सुरू झाल्याने भविष्यात सातारा रस्ता परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होईल. पहिल्या सेगमेंटचे काम सुरू झाल्यामुळे पुणे मेट्रोच्या पुढील प्रवासाला वेग आला आहे. लवकरच पुणेकरांना या मार्गावरूनही सुखकर प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.

यावेळी श्रावण हर्डीकर यांनी कास्टिंग यार्डमध्ये सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. त्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि उपस्थित अभियंता तसेच कर्मचाऱ्यांशी संवाद साधून तांत्रिक माहिती जाणून घेतली.

प्रवाशांच्या सोयीसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याने, काम वेळेत आणि उच्च दर्जाचे व्हावे यासाठी त्यांनी आवश्यक त्या सूचनाही दिल्या. यावेळी महामेट्रोचे संचालक विनोदकुमार अग्रवाल (प्रणाली व संचालन), हरेंद्र पांडे (वित्त) आणि अतुल गाडगीळ (कार्य) यांच्यासह पुणे मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच या प्रकल्पाची जबाबदारी असलेल्या ‘सीईएम इंडिया’ कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यान यापूर्वी भुयारी मार्ग झाला असून त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देखील प्रवाशांचा मिळत आहे. संबंधित भुयारी प्रकल्प होत असतानाच स्वारगेट ते कात्रज यादरम्यान देखील मेट्रो भुयारी मार्ग व्हावा या दृष्टीने नागरिकांकडून मागणी होत होती. आता या प्रकल्पाचे भूमिपूजन झाल्याने नागरिकांच्या मागणीला यश आले असल्याचे दिसून येत आहे.