Home Blog Page 495

सर्वसमावेशक चित्रपट धोरण तयार करणार – निर्मात्या व समिती अध्यक्ष स्मिता ठाकरे यांचे प्रतिपादन


मुंबई,२१ जाने: चित्रपट क्षेत्रात होणारे बदल लक्षात घेऊन या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन तयार करत असलेले चित्रपट धोरण हे सर्वसमावेशक असेल असे प्रतिपादन ज्येष्ठ निर्मात्या व समिती अध्यक्ष स्मिता ठाकरे यांनी व्यक्त केले.

चित्रपट धोरण समितीची बैठक आज यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे पार पडली त्यावेळी त्या बोलत होत्या.

कलाक्षेत्रात आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा,व्यवसाय करण्यासाठी आवश्यक सुलभता, कामगारांसाठी प्रशिक्षण,आवश्यक आधुनिक तंत्रज्ञान, याबरोबरच चित्रपट क्षेत्रातील पर्यटन विकास, चित्रपटांसाठी वितरण व्यवस्था व कामगारांसाठी आवश्यक योजना आदी विषयातील सद्यस्थिती व भविष्यातील उपायोजना यांचा आढावा घेऊन समग्र चित्रपट धोरण निर्माण करण्यासाठी चर्चा करण्यात आली.

चित्रपट धोरण समितीमध्ये एकूण २२ सदस्य असून यामध्ये तीन शासकीय व १९ चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञ सदस्यांचा समावेश आहे.

यावेळी व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील म्हणाल्या की, या समिती मध्ये विविध गट निर्माण करून विषयनिहाय चर्चा व अभ्यास करत या धोरणाचा प्राथमिक आराखडा लवकरच तयार करण्यात येणार आहे.

प्रारंभी सह व्यवस्थापकीय संचालक डॉ.धनंजय सावळकर यांनी चित्रपट धोरणाबाबत अभ्यासपूर्ण सादरीकरण केले

या बैठकीला वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा वित्त अधिकारी चित्रलेखा खातू रावराणे, मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे, विशेष कार्यकारी अधिकारी संजय पाटील, सह संचालक श्रीराम पांडे यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञ अशोक राणे, सविता मालपेकर,नितेश नांदगावकर,मेधा धाडे,प्रिया कृष्ण स्वामी,उज्वल निरगुडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

भगवद्गीता ही भारतीय तत्वज्ञानाचा गाभा-साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख 

 ‘मी गीता बोलतीय’ पुस्तक प्रकाशन सोहळा
पुणे : भौतिक जीवन जगत असताना अनेकदा आपल्यावर अनेक संकट येतात. त्यावेळी नेमके काय करावे, कसे वागावे हे कळत नाही. अशा परिस्थितीतच  भगवान कृष्णाने अर्जुनाला दिलेली शिकवण ही आजही २१व्या शतकात उपयोगी पडते. भौतिक जीवनामध्ये आदर्श जीवनपद्धती कशी जगावी याचा मार्ग भगवद्गीतेमध्ये सांगितला आहे.  भगवद्गीता ही भारतीय तत्वज्ञानाचा गाभा आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.

अभिताभ होनप लिखित ‘मी गीता बोलतीय’  या भगवदगीतेचे उत्कंठावर्धक वर्णन करणाऱ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आपटे रस्त्यावरील हॉटेल श्रेयस मधील अंबर हॉल येथे पार पडला. यावेळी भारतीय पुस्तक न्यासाचे विश्वस्त राजेश पांडे, गीता धर्म मंडळाच्या कार्यवाह विनया मेहंदळे, लेखक धनंजय गोखले, जनसेवा फौंडेशन चे अध्यक्ष डॉ. विनोद शहा, लेखक अभिताभ होनप उपस्थित होते. यावेळी धनंजय गोखले, डॉ. शहा आणि विनया मेहेंदळे, यांनी पुस्तकामागील भूमिका मांडली.  

राजेश पांडे म्हणाले, व्यवहारी जीवनात अनेकदा भगवंत आपल्याला आठवतो, ते शब्दबद्ध करणे प्रत्येकाला जमतेच असे नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा ग्रंथ. माणसाने  फळाची अपेक्षा न करता नेहमी चांगले काम केले पाहिजे. ते काम करत असताना भगवंताची आठवण ठेवली पाहिजे हाच उपदेश भगवदगीतेत केला आहे. प्रत्येकाचे समाजाला काहीतरी देणे असते आणि आपल्या प्रत्येकाने आपल्या भूमिकेतून ते दिले पाहिजे. 

अभिताभ होनप म्हणाले,  भगवदगीतेत भगवान कृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश हा अत्यंत भावनिक आहे. ही भावनिकता स्त्रीच्या भूमिकेतून मांडण्याचा विचार आला तेव्हा स्वतः गीतेच्या मनातून गीतेचे कथन व्हावे, हा विचार मनात आला. भगवद्गीता हे तत्वज्ञान आहे आणि त्याचे सार सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे. तत्वज्ञानाचा हा मार्ग दाखविण्याचे कार्य मी या पुस्तकाच्या माध्यमातून एका निराळ्या पद्धतीने केले आहे, असेही त्यांनी सांगितले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि गीता मनोगत स्मिता कुलकर्णी ह्यांनी सादर केले तर मुग्धा नलावडे ह्यांनी निवडक अभिवाचन केले.

श्री मंडई म्हसोबा दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न 

पुणे: अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या श्री मंडई म्हसोबा दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. हा विशेष सोहळा धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्यप्रेरित आनंद आश्रम येथे पार पडला.

यावेळी खासदार नरेश म्हस्के देखील उपस्थित होते.  ट्रस्टचे अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांनी एकनाथ शिंदे यांचा सन्मान करून त्यांचे आभार मानले. ट्रस्टचे सदस्य सुधीर साकोरे, राज वांजळे, वेदांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

एकनाथ शिंदे त्यांनी ट्रस्टच्या कार्याची माहिती घेतली आणि कार्य अहवालाचे कौतुक केले. यावेळी त्यांनी ट्रस्टच्या सदस्यांना एकत्र राहून धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देण्याचे आवाहन केले. श्री मंडई म्हसोबा दिनदर्शिका हा धार्मिक कार्याचा एक उत्तम मार्गदर्शक असून त्याला महाराष्ट्रभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली.

चरणसिंग राजपूत यांचा मद्य विक्रेता असोसिएशनच्या वतीने सत्कार

ओतूर दि.२१ जानेवारी-
राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी सन २०२३-२४ मध्ये पुणे जिल्ह्यात हातभट्टी निर्मूलन उत्कृष्ट पद्धतीने राबविली.हातभट्टी व्यवसाय करणाऱ्यांवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये कारवाया करण्यात आल्या. हातभट्टी, बेकादेशीर गोवा दिव दमन मद्याची तस्करीच्या विरोधात विशेष मोहीम राबवली,बनावट ताडी इत्यादी बेकायदेशीर व्यवसाय करणारे व्यक्तींवर प्रस्ताव दाखल करून, दंडात्मक कारवाई करण्यात आली.एम पी डी ए ऍक्ट खाली गुन्हेगारांना तडीपारीचे आदेश यशस्वीरित्यापारित करण्यात आले.पुणे जिल्ह्यात हातभट्टीचे अड्डे कायमस्वरूपी बंद केल्याने राज्य शासनाच्या महसूल वाढीमध्ये झाला.श्री राजपुत यांनी गोवा दिव दमन बनावटीचे मद्याची तस्करी करणारे मद्य तस्कर यांचे विरोधात विशेष मोहीम राबवली.
सदर कारवयांमध्ये १ हजार पेक्षा जास्त वाहने जप्त करण्यात आली.
याबद्दल पुणे जिल्ह्याचे राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल,त्यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेऊन राज्य शासनाने त्यांना “विशेष मोहीम “पदक जाहीर केले आहे. बेकायदेशीर मद्य व हातभट्टीमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी राजपूत यांनी पुणे जिल्ह्यामध्ये राबवलेला “राजपूत पॅटर्न” संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविण्यात यावा असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मद्य विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष विनायक तांबे यांनी केले.
अधीक्षक राजपूत यांना महाराष्ट्र राज्य मद्य विक्रेता असोसिएशन यां यांच्या वतीने विशेष सत्कार ‘सन्मानचिन्ह’ गणेश मूर्ती शाल श्रीफळ देऊन पुणे येथे करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असोसिएशन मार्गदर्शक आर.टी स्वामी हे होते. सदर कार्यक्रम प्रसंगी पुणे जिल्ह्याचे उपअधीक्षक संतोष जगदाळे , सुजित पाटील, उत्तमराव शिंदे,गणेशराव कसरे हे अधिकारी उपस्थित होते.असोसिएशनच्या वतीने टी आर स्वामी यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच सदर प्रसंगी रामलिंग गुगरी,महिला अध्यक्ष सुनीताराजे घाडगे,कैलास गौड ,मुकेश अगरवाल, राजेंद्र थोरात, व्यंकटेश तेलंग, जयस्वाल इत्यादी महाराष्ट्रातील पदाधिकारी उपस्थित होते.
उत्पादन शुल्क विभागामार्फत प्रथमच उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना शासनाच्या वतीने विशेष पुरस्कार देण्याची प्रथा चालू करण्यात आली आणि त्याचा मान चरणसिंह रजपूत यांना मिळाला.
अधीक्षक श्री रजपूत यांनी सन २०२३-२४ मध्ये पुणे जिल्ह्यात हातभट्टी निर्मूलन उत्कृष्ट पद्धतीने राबविल्यामुळे हातभट्टी व्यवसाय करणाऱ्यांवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये कारवाया करण्यात आल्या. हातभट्टी, बेकादेशीर गोवा मद्य,बनावट ताडी इत्यादी बेकायदेशीर व्यवसाय करणारे व्यक्तींवर कलम ९३ अन्वये ११०० पेक्षा जास्त प्रस्ताव दाखल करण्यात आले व मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच सदरचे गुन्हे वारंवार करणाऱ्या गुन्हेगारांना एम पी डी ए ऍक्ट खाली मोठ्या प्रमाणात तडीपारीचे आदेश यशस्वीरित्यापारित करण्यात आले.
पुणे जिल्ह्यात २८५ ठिकाणी हातभट्टीचे मोठे अड्डे कार्यात होते त्यापैकी २२३ अड्डे कायमस्वरूपी बंद करण्यात रजपूत यांना यश आले.त्याचा खूप मोठा परिणाम राज्य शासनाच्या महसूल वाढीमध्ये झाला .देशी दारूची विक्री मध्ये प्रति वर्षे ४५ लाख लिटरने वाढ झाली. ही वाढ गतवर्षीपेक्षा १२ टक्क्याने जास्त आहे तशीच मोहीम त्यांनी गोवा दिव दमन बनावटीचे मध्याची तस्करी करणारे मध् तस्कर यांचे विरोधात विशेष मोहीम राबवली. सदर मोहिमेचा यशस्वी परिणाम होऊन पुणे जिल्ह्याचा महसूल २०२२-२३ या वर्षात १८५५ कोटी होता, त्यामध्ये प्रचंड वाढ होऊन तो २७३० कोटी इतका करण्यात यशस्वी.१२ हजार बेकायदेशीर मद्य तस्करी व हातभट्टी व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. सदर कारवयांमध्ये १ हजार पेक्षा जास्त वाहने जप्त करण्यात आली.
सदर कार्याची दखल महाराष्ट्र राज्य मद्य विक्रेता असोसिएशन यांनी घेऊन त्यांचा विशेष सत्कार ‘सन्मानचिन्ह’ गणेश मूर्ती शाल श्रीफळ देऊन पुणे येथे करण्यात आला. बेकायदेशीर मद्य व हातभट्टीमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी रजपूत यांनी पुणे जिल्ह्यामध्ये राबवलेला “
बालाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले व पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी आभार मानले.

सरहद ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये”मिष्टी गोष्टी” कार्यक्रम संपन्न

पुणे- ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे औचित्य साधून सरहद ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज गुजर- निंबाळकरवाडी शाखेमध्ये “मिष्टी गोष्टी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी कलाकार, दिग्दर्शक, रंगभाषा कला अकादमीचे संस्थापक श्री अमृत श्रीधर सामक हे लाभले.आपल्या मधुर वाणीने त्यांनी मुलांना मंत्रमुग्ध केले. तसेच प्रेरणादायी गोष्टींचा खजिना मुलांपुढे उघडला. व. पु. काळे त्याचबरोबर मराठी लेखकांचा मुलांना गोष्टीरूपाने नव्याने परिचय करून दिला.मुलांनी या खजिण्याचा मनमुराद आनंद लुटला. मुलांमध्ये गोष्टींच्या माध्यमातून समाज जागृती व्हावी, तात्पर्य समजून घेऊन मुलांच्या वागण्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये बदल व्हावा हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या सचिव सौ.सुषमा नहार मॅडम, संस्थेचे विश्वस्त श्री. शैलेश वाडेकर सर यांनी मार्गदर्शन केले.तसेच या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका सौ. निर्मला नलावडे मॅडम यांनी केले. तसेच या कार्यक्रमास पर्यवेक्षिका सौ . मनिषा वाडेकर मॅडम व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. कोमल दिवटे मॅडम उपस्थित होत्या. ज्या उद्देशाने मुलांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता तो उद्देश सफल झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रजनी माटे मॅडम यांनी केले व सौ शशिकला रांजणे मॅडम यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

हिंदू गर्जना चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा लोगोचे पुनीत बालन यांच्या हस्ते अनावरण

दि. ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान रंगणार आखाडा

पुणे:
हिंदू गर्जना प्रतिष्ठान युथ असोसिएशन व पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘हिंदू गर्जना चषक महिला व पुरुष राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा २०२५ चा आखाडा येत्या दि. ७ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत रंगणार आहे या कुस्ती स्पर्धेच्या लोगोचे अनावरण युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते करण्यात आले.
शिक्षण प्रसारक मंडळीच्या सहकार्याने आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या लोगोच्या अनावर प्रसंगी बोलताना पुनीत बालन म्हणाले की, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच पुनीत बालन ग्रुप पुढाकार घेतो. हिंदू गर्जना चषक या निमित्ताने मातीतल्या खेळाशी कुस्तीची अधिक जवळून जोडले जाता येईल याचा आनंद आहे. तसेच या स्पर्धेत आम्ही एकूण 42 लाखांची भरघोस बक्षीसे देणार असून प्रथम क्रमांकास थार भेट देण्यात येणार आहे.
भाजपचे शहराध्यक्ष व हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे म्हणाले, महाराष्ट्र केसरीच्या तोडीस तोड ही स्पर्धा आयोजित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या स्पर्धेसाठी खेळाडू, कलावंत, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ही स्पर्धा दि. ७, ८ व ९ फेब्रुवारी २०२५ रोजी एसपी कॉलेज महाविद्यालय टिळक रोड पुणे येथे भरवण्यात येणार आहे.

अध्यात्मिक क्षेत्रातला ज्ञानतारा निखळला

  • उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 21:- संत साहित्याचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ कीर्तनकार, आणि वारकरी संप्रदायाचे अर्ध्वयू डॉ. किसन महाराज साखरे यांच्या निधनाने अध्यात्मिक क्षेत्रातला ज्ञानतारा निखळला आहे. अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि संत साहित्य यांचा प्रचार-प्रसार करताना त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ कीर्तनकार डॉ किसन महाराज साखरे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोक संदेशात म्हणतात, डॉ किसन महाराज साखरे यांनी संत साहित्याचा गाढा अभ्यास करून कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून समाजाचे आध्यात्मिक प्रबोधन केले. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत यांसारख्या ग्रंथांवर भाष्य करत संतांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले.

ज्ञानेश्वरीच्या प्रचार व प्रसारासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून संत विचारांची प्रभावी मांडणी केली. श्रीमद्भगवद्गीता व संत साहित्य प्रचारासाठी देशभरात त्यांनी ज्ञानयज्ञाचे आयोजन केले. त्यांच्या प्रेरणादायी कार्यामुळे महाराष्ट्राने एक मार्गदर्शक व्यक्तिमत्व गमावले आहे. साखरे महाराज यांच्या निधनामुळे अध्यात्म, शिक्षण आणि संत साहित्य क्षेत्राची अपरिमित अशी हानी झाली आहे. साखरे महाराजांच्या स्मृती आणि विचार आपल्याला नेहमीच प्रेरणा देतील, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील पाणीपुरवठ्यात सप्टेंबरपर्यंत वाढ-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : मोठ्या क्षमतेच्या टाक्या बांधण्याचे काम ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण होईल. त्या नंतर सप्टेंबर महिन्यापासून छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील सर्व भागांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होऊ शकेल आणि पाण्याची समस्या सुटेल, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.

मतदारसंघातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी त्यांनी आज अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांना माहिती देताना आमदार शिरोळे यांनी सांगितले की, गेले दोन वर्षे यासंदर्भातील विकास कामांचा पाठपुरावा केल्यानंतर, आता त्याला चांगले स्वरुप येऊ लागले आहे. पाणीपुरवठ्याच्या अकरा झोन पैकी दहा झोनमधील कामे येत्या ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहेत. विशेषतः सात ठिकाणी पाणी पुरवठ्यासाठी मोठ्या क्षमतेच्या टाक्या बांधण्यात येत असल्याने, पाणी पुरवठ्याचा दाब वाढणार आहे.

येत्या ऑगस्टपर्यंत टाकी बांधण्याचे, तसेच काही ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचा फायदा शिवाजीनगर मतदारसंघातील सर्वच भागातील नागरिकांना होणार आहे. हा मतदारसंघ पर्वती जलकेंद्रापासून लांब असल्याने, येथे पाणीपुरवठ्याची समस्या भेडसावते. आमदार झाल्यापासून ही समस्या सोडविण्यासाठी मी कार्यरत आहे. येत्या ऑगस्टपर्यंत साठवण टाक्या बांधण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यालगतच्या सर्व परिसरात पुरेशा दाबाने व्यवस्थित पाणीपुरवठा सुरू होईल. असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

कला शुद्धरुपात सादर होण्यासाठी नियमित रियाज करा : प्रमोद कांबळे

भारतीय कला प्रसारिणी सभेतर्फे प्रमोद कांबळे यांचा अभिवन जीवन गौरव पुरस्काराने सन्मान
पुणे : काम करताना लाभाचा अथवा सन्मानाचा विचार करू नका, हातात आलेले काम उत्कृष्ट कसे करता येईल, त्यात आपले वेगळेपण कसे दाखविता येईल, याचा विचार करा. यातून आपली कला शुद्ध होईल आणि सर्वांना भावेल. सतत कलेचा विचार करा, रोज रियाज करा असा सल्लाही प्रसिद्ध चित्रकार-शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
भारतीय कला प्रसारिणी सभेतर्फे प्रमोद कांबळे यांचा अभिवन जीवन गौरव पुरस्कार देऊन आज (दि. 21) सन्मान करण्यात आला. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. पुरस्काराचे वितरण भारतीय कला प्रसारिणी सभेचे सचिव, कार्यक्रमाचे अध्यक्ष पुष्कराज भालचंद्र पाठक यांच्या हस्ते झाले.
समाजात अभावानेच आढळणाऱ्या चित्रकलेची साक्षरता वाढविली पाहिजे. सरकारी खुर्चीवर बसलेले अधिकारी कलाविषयात विशेषत: चित्र-शिल्पकलेत साक्षर नसल्यामुळे त्यांच्या सल्ल्याने तयार होणारी कलाकृती अपूर्ण अथवा अयोग्य होते आणि त्याचे समाजात हसे होते, अशी टिप्पणीही कांबळे यांनी या प्रसंगी केली.
प्रास्ताविकात पुष्कराज पाठक म्हणाले, चांगल्या व्यक्ती संस्थेची जोडल्या जाणे हे संस्थेचे भाग्य असते. उत्तम आणि गुणी माणसांमुळेच संस्थेच्या कार्याचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे. विनम्रता ठेवल्यास सर्व गोष्टी मिळत जातात. विद्यार्थ्यांनी वाढत्या वयानुसार प्रगल्भ होत जाणे आवश्यक आहे. प्रमोद कांबळे नम्रपणे करत असलेल्या कलासाधनेचा विद्यार्थ्यांनी आदर्श ठेवावा असे सांगून समाजातील चांगल्या व्यक्तींचा आदर्श ठेवा, त्यांचे नुसते अनुकरण करू नका असे आग्रहपूर्वक सांगितले. बी. एम. पाठक यांच्या नावे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पुरस्काराविषयी त्यांनी अवगत केले.
प्राचार्य प्रा. राहुल बळवंत (अभिनव कला महविद्यालय, टिळकरोड), प्राचार्य डॉ. संजय भारती (अभिनव कला महविद्यालय, पाषाण), प्राचार्य अभिजित नातू (वास्तु विद्या महाविद्यालय, टिळकरोड), सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. तानाजी भंडारे आदी मान्यवर मंचावार होते. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. बिबेवाडीतील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात पुरस्कार वितरण सोहळा झाला. पुरस्कराचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. सुरुवातीस कांबळे यांच्या कार्याची माहिती चित्रफितीद्वारे दाखविण्यात आली.
या निमित्ताने भारतीय कला प्रसारिणी सभेच्या अभिनव कला महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृतींचे अभिनव रंगभाषा या 85व्या कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन कांबळे यांच्या हस्ते झाले. प्रदर्शन बिबेवाडीतील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात भरविण्यात आले असून प्रदर्शन दि. 23 जानेवारीपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळात सर्वांसाठी खुले आहे.
चित्रप्रदर्शनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अभिनव कला महाविद्यालयातील 17 विद्यार्थ्यांना बी. एम. पाठक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. महाविद्यालयात 36 वर्षे अविरत सेवा देणारे ग्रंथपाल कांतिलाल ठाणगे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
स्वागत सचिव पुष्काराज पाठक, प्राचार्य राहुल बळवंत यांनी केले. मानपत्राचे वाचन आणि सूत्रसंचालन रवींद्र खरे यांनी केले. आभार प्राचर्य राहुल बळवंत यांनी मानले आणि संस्थेचे भक्कम पाठबळ हिच यशस्वीतेची खात्री आहे, असे सांगितले.

पुण्यात बिगर हुंडा सामूहिक विवाह सोहळा आयोजित

गोरगरीब व गरजू उपवर-वधूंनी जास्तीत जास्त संख्येने नोंदणी करण्याचे आवाहन

पुणे – अग्रसेन भगवान चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने दि. 15 मार्च २०२५ रोजी बिगर हुंडा सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील सुप्रसिद्ध उद्योगपति रतनलाल हुकुमचंद गोयल यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित हा बिगर हुंडा सामूहिक विवाह सोहळा हिंदू धर्मातील रितीरिवाज आणि धार्मिक परंपरांनुसार भव्य पद्धतीने करण्यात येणार आहे. या सोहळ्यात विवाह करणाऱ्या जोडप्यांना लाखो रुपयांच्या संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. गरीब व गरजू उपवर-वधूंनी लवकरात लवकर आपली निःशुल्क नावनोंदणी करावी, असे आवाहन रतनलाल गोयल आणि राजेश अग्रवाल यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या सोहळ्यासंदर्भात माहिती देताना रतनलाल गोयल व राजेश अग्रवाल यांनी सांगितले की, अग्रवाल समाजाचे कुलदेवता अग्रसेन भगवान यांनीच गरीब व गरजू लोकांना मदत करण्याचा संदेश आपल्या सर्व समाजबांधवांना दिला होता. अग्रसेन भगवान यांच्या याच संदेशाचा सम्मान करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असून, आजवर शेकडो गोरगरीब व गरजू जोडप्यांचे लग्न लावून देण्यात आलेले आहे. या विवाह सोहळ्यात लग्न करणाऱ्या जोडप्यांना विविध वस्तू जसेकि कपाट, पलंग, गादी, चादरी, टेबल, पंखा, मिक्सर, देवघर, भांडी, तसेच घरगुती कामाजाच्या विविध वस्तू मोठ्या प्रमाणावर दिल्या जाणार आहेत. याशिवाय वर-वधूचे कपड़े, वधूचे मंगळसूत्र, तोरड्या आणि जोडवेदेखील दिले जातात.
अत्यंत थाटामाटात आणि हिंदू धर्मातील सर्व विधि-परंपरांनुसार दि. 15 मार्च 2025 रोजी गंगाधाम रोडवरील आईमाता मंदिरासमोर असलेल्या गोयल गार्डन येथे आयोजित या विवाह सोहळ्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क असणार नाही. या वर्षीच्या विवाह सोहळ्यात 25 हून अधिक जोडप्यांचा विवाह करण्याचा आयोजकांचा मानस आहे. या भव्य-दिव्य सामूहिक विवाह सोहळ्याच्या आयोजनासाठी लागणारा सर्व खर्च जसे की वेडिंग हाॅल आणि लाॅन, आकर्षक डेकोरेशन, येणाऱ्या सर्व वऱ्हाडी मंडळींसाठी रुचकर भोजन वगैरे सर्व खर्च रतनलाल गोयल व त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने करण्यात येतो. या विवाह सोहळ्यात लवकरात लवकर नावनोंदणी करण्यासाठी राजेश अग्रवाल (9049992560) आणि रतनलाल गोयल (9422025049) यांच्याशी संपर्क साधावा.
या सोहळ्यात लग्न करणारी मुले-मुली ही सज्ञान असावी आणि मुला-मुलीची तसेच त्यांच्या कुटुंबीयांचीही विवाहासाठी संमती असणे गरजेचे आहे. या सोहळ्यात विवाह करणाऱ्या जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी अग्रवाल समाजासह इतर समाजातील गणमान्य व्यक्ती उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती रतनलाल गोयल व राजेश अग्रवाल यांनी दिली.

ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचे निधन

संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे (वय 89) यांचे सोमवारी रात्री साडेदहा वाजता चिंचवड येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. आळंदी येथे मंगळवारी (ता. 21) दुपारी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. साखरे महाराज यांची प्रकृती बिघडल्याने दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच त्यांना सोमवारी हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

खो खो विश्वचषकःऑस्ट्रेलियन संघात जगताप बंधुंची यशस्वी कामगिरीमंगेश जगतापला चार मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच

पुणे, दि. २१ जानेवारी : लहानपणापासून खो खो खेळाचे धडे शिकलेला आणि मुळ पुणे आणि सध्या ऑस्ट्रेलियात राहणारे मंगेश व तेजस जगताप  यांनी इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमध्ये सुरू असलेल्या खो खो विश्वचषक २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करीत आहेत. या संघाने गुणांची चौकार मारत मलेशिया व जर्मनीचा पाडाव केला. ऑस्ट्रेलियन संघाने कमाल कामगिरी केली. त्यामुळे हा संघ भविष्यात यशस्वी संघ म्हणून उदयास येत आहे.
आयोजित विश्वकप खो खो स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाचे एकूण चार सामने झाले. यामध्ये इंग्लंड केनिया यांच्या बरोबर झालेल्या मॅचमध्ये ते हरले. परंतू मलेशिया व जर्मनी बरोबर झालेले सामने जिंकले. यामध्ये जगताप बंधुंनी आपली चपळता दाखवली आहे. यामध्ये मंगेश जगताप याच्या अप्रतिम खेळाबद्दल चार ही मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच चा सन्मान मिळाला आहे.  या दोघांची मेहनत आणि गुणवत्ता  पाहून ऑस्ट्रेलिया खो खो असोसिएशनने त्यांची निवड केली  होती.  धमाकेदार खेळ करीत गुण मिळविले.
पहिल्या विश्वचषक खो खो स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ कामगिरी बजावण्यास दक्ष झाला असताना त्याला पुण्याची साथ लाभली आहे. यामध्ये विशेष म्हणजे मंगेश व तेजस या जगताप बंधुचा कांगारू संघात समावेश आहे. नवी दिल्ली येथे पहिल्या खो खो विश्व चषक स्पर्धेला नुकतीच सुरूवात झाली आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ अनेक कारणांनी लक्ष वेधून घेत आहे. एकतर या संघाचे नेतृत्व आणि संघटन महाराष्ट्रातील इचलकरंजीच्या ओजस कुलकर्णी याच्याकडे आहे.
जगताप बंंधुचे खेळातील योगदान खूप लक्षवेधी ठरले आहे. ऑस्ट्रेलिया संघांचे आणखी एका कारणाने आकर्षण वाढले आहे. ते म्हणजे जगताप कुटुंबीयाचे योगदान. तेजस २४ वर्षाचा तरूण तर त्याचा १८ वर्षीय भाऊ मंगेश . दोघेही ऑस्ट्रेलियात खो खो मध्ये भरीव कामगिरी करीत आहेत. त्यांचे वडील संदीप जगताप हे ऑस्ट्रेलिया संघाचे प्रायोजक आहेत. ते फिन्सवर्स कंपनीचे चालक आहेत. पदवी मिळवल्यानंतर तेजस हा या कंपनीत संचालक आहे. अशी पुणेरी पलटण विश्वचषक खो खो स्पर्धेत लक्ष्यवेधी कामगिरी केली आहे. 

हडपसर: खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस सात वर्षे सश्रम कारवासाची शिक्षा

पुणे- हडपसर येथील एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस सात वर्षे सश्रम कारवासाची शिक्षा झाली आहे.

खून या गुन्ह्याची घटना ही डावरी नगर, लोखंडी पुलाजवळ, पाण्याच्या टाकीजवळ, हडपसर पुणे येथे दिनांक २७/०६/२०१६ रोजी घडली . यातील आरोपी १) गणेश सुभाष वाबळे, वय २४ वर्षे, रा. डावरीनगर, लोखंडी पुलाजवळ, कॅनॉलजवळ, पुणे याने कुत्रा अंगावर धावून गेल्याचा राग मनात धरुन आरोपी २) गोरक्ष नामदेव लोंढे, वय २० वर्षे, रा. माळवाडी, हडपसर, पुणे ३) उमेश उत्तरेश्वर खंडागळे, वय २० वर्षे, रा. शेवाळवाडी, हडपसर, पुणे ४) प्रदिप ज्ञानदेव करपे, वय २२ वर्षे, रा. काळेपडळ, पुणे व ५) किशोर बापू लोंढे, वय १८ वर्षे, रा. माळवाडी, हडपसर, पुणे यांच्यासह येऊन गैरकायद्याची मंडळी जमवून यातील मयत नामे सागर नामदेव चौगुले यासं लाकडी दंडुका व सिमेंट ब्लॉकच्या साहाय्याने जिवे ठार मारल्याने हडपसर पोलीस ठाणे, पुणे शहर येथे गुन्हा क्रमांक ५०२/२०१६ भा.दं.वि.कलम ३०२,१४३,१४४,१४७,१४८,१४९,३२३,४२७,५०४ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७ (१) (३), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक संदिप देशमाने यांनी केला व यातील आरोपी विरुद्ध न्यायालयामध्ये मुदतीत दोषारोपपत्र सादर केले.वरील प्रकरणामध्ये सबळ साक्षीपुराव्याअंती जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी आरोपीस दिनांक २१/०१/२०२५ रोजी सात वर्षे सश्रम कारावास व ५० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास नऊ महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.कामगिरी सरकारी पक्षातर्फे सहा. सरकारी वकील श्रीमती. निवेदिका काळे, कोर्ट पैरवी पोलीस अंमलदार अविनाश गोसावी, यांनी कामकाज पाहिले.
सदर कामगिरीकरीता प्रोत्साहन म्हणून डॉ. राजकुमार शिंदे (भा.पो.से), पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर यांनी कोर्ट पैरवी पोलीस अंमलदार अविनाश गोसावी व नमूद गुन्हयाचे तपासी अधिकारी पो.नि संदिप देशमाने यांना १० हजार रुपये बक्षिस मंजूर केले आहे.

दुचाकीवरुन येवुन महिलांचे दागिने हिसकावणारे दोन गुन्हेगार जेरबंद, ७ तोळे सोने व एक मोपेड गाडी जप्त

चोरीचे २ गुन्हे उघड

पुणे- दुचाकीवरुन येवुन महिलांचे दागिने हिसकावणारे दोन गुन्हेगार जेरबंद करून त्यांच्याकडून पोलिसांनी ७ तोळे सोने व एक मोपेड गाडी जप्त केली आहे. या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि ,
दि.१४/०१/२०२५ रोजी दुपारी १३/०० वा. चे सुमारास फिर्यादी त्रिमुर्ती चौकाकडुन गुलाबनगर कडे जाणारे रोडवर गोकुळ बंगल्या समोरील सार्वजनीक रोडवर रस्ता ओलांडत असताना एका मोपेड दुचाकी गाडीवरून दोन अनोळखी इसमापैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने त्यांचे गळयातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसका मारून तोडून चोरून नेले. त्या बाबत अज्ञात इसमाविरूध्द सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं.१६/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे (जुना कायदा भादवि कलम ३९२,३४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता..
दि.१८/०१/२०२५ रोजी दाखल गुन्हयाचा तपास सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अधिकारी सपोनि सागर पाटील व पोलीस अंमलदार असे करीत असताना सदर घटनेच्या अनुषंगाने सदर आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार, सागर सुतकर, योगेश ढोले, महेश भगत यांना बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा करणारे दोन्ही इसम हे ईवॉन आयटी पार्क खराडी पुणे येथील हनी स्मोकर पानटपरीचे समोर थांबलेले आहेत. सदरची बातमी वरिष्ठांना कळवुन लागलीच स्टाफसह बातमीचे ठिकाणी जावुन पाहता बातमीतील वर्णनाचे दोन इसम सदर ठिकाणी उभे राहुन सिगरेट ओढत थांबलेले दिसले. त्यांना संशय येताच ते तेथुन पळुन जावु लागल्याने त्यांना सोबतचे स्टाफचे मदतीने थोड्याच अंतरावर पकडुन ताब्यात घेवुन त्यांची नावे पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे १) रितेश अंबादास जाधव वय २६ वर्षे रा.प्रतीक नगर संघर्ष चौक चंदननगर पुणे. मुळ रा. फ्री कॉलनी गल्ली नंबर ६, सोलापुर २) तरूण बलराम झा वय २५ वर्षे रा. पठारे ठुबेनगर बालाजी हॉस्पीटल जवळ खराडी बायपास पुणे मुळ रा. चनोर गाव मणिगची दरभंगा पटणा राज्य बिहार असे असल्याचे सांगीतले. त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता मी व माझा साथीदार असे आम्ही मोपेड दुचाकी गाडीवरून धनकवडी भागात फिरत असताना एक वयस्कर महिला रस्त्याने चालत होती त्या महिलेच्या गळयातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसका मारून चोरी करून आम्ही तेथुन पळुन गेलो. सदर गुन्हाची कबुली दिल्याने सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं.१६/२०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) हा गुन्हा उघडकीस आला असुन त्यांचे कडे अधिक तपास करता त्यांचे कडुन भारती विदयापीठ पोलीस स्टेशन ३९/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०४,३ (५) प्रमाणे उघडकीस आणण्यात आला आहे. सदर आरोपी कडुन एकुण २ चैन चोरीचे गुन्हे उघड करण्यात आले असुन एकुण ५,३०,०००/- रूपये किंमतीचे ७ तोळे सोने व एक मोपेड गाडी असा माल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ २,स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, सागर सुतकर, किरण कांबळे, बजरंग पवार, योगेश ढोले, महेश भगत, अमित पदमाळे, बालाजी केंद्रे, चंद्रकांत जाधव, महेश मंडलिक, खंडु शिंदे यांनी केली आहे.

दुर्मिळ होत चाललेली लोककला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे – डॉ. सदानंद मोरे

 महाराष्ट्राच्या मातीतील लोक साहित्य हे समुंद्रसारखे अथांग – डॉ. अरुणा ढेरे 

लोकसाहित्य व लोकसंस्कृती महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन

पुणे-लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि लोककलामहाराष्ट्राच्या ग्रामीण भागाने जीवनाचा अविभाज्य घटक म्हणून जपून ठेवली आहे. असे प्रतिपादन डॉ. सदानंद मोरे यांनी लोकसाहित्य व लोकसंस्कृती कार्यशाळा व महोत्सवात केले. महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई आयोजित आणि भारतीय लोककला अभ्यास संशोधन कल्याण केंद्र व सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने व फोकलोर अँड क्लचरल हेरीटेज फाउंडेशन पुणे यांच्या समन्वयातून व्याख्यान, परिसंवाद, कार्यशाळा, शोधनिबंध वाचन, लोकसंस्कृती विषयक सांस्कृतिक कार्यशाळा आणि महोत्सवाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले विद्यापीठ येथील संत नामदेव सभागृह येथे संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि  लोकसाहित्य अभ्यासक डॉ. अरुणा ढेरे, पुणे विद्यापीठाचे कुलसचिव ज्योती भाकरे, फोकलोर अँड क्लचरल हेरीटेज फाउंडेशनच्या डॉ.सुनीता धर्मराव, शाहीर हेमंत मावळे, प्रवीण भोळे, रमेश वरखडे यांच्या शुभहस्ते हस्ते पार पडले.मोरे म्हणाले की लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि लोककला काय आहे. हे समजून घेणे गरजेचे आहे. ही दुर्मिळ होत चाललेली लोककला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या सर्व लोककलांना राजाश्रय मिळाला होता. त्यामुळे त्या काळात या लोककलांची पाळेमुळे घट्ट झाली होती. या लोप पावत चाललेले लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि लोककलांना नवसंजीवनी देण्याचे काम महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातून होत आहे, याचा आनंद आहे. काळकर म्हणाले, की आपल्या या लोककलांना खरा उजाळा देत होते ते म्हणजे शेतकरी, लोक कलावंत हे लोककलेचा शिक्षणाचा आणि प्रशिक्षणाचा वारसा पुढे नेत होते. या लोककलांना, लोकसाहित्याला आमच्या मातीचा वास होता. आमच्या मातीचा स्वाद होता. आमच्या मातीचा नाद होता आणि आमच्या मातीचा आमच्याशी होणारा संवाद होता. तो हरवलेला संवादाला समाजाने साद देणं गरजच आहे. ढेरे म्हणाल्या, की महाराष्ट्राच्या मातीतील लोक साहित्य हे समुंद्रसारखे अथांग आहे. हे साहित्य निर्माण करणारे साहित्यकारांनी डोंगराएवढं काम करून ठेवले आहे. याचा वारसा जपन गरजेचे आहे. महाराष्ट्र शासन,  भारतीय लोककला अभ्यास संशोधन कल्याण केंद्र, सावित्रीबाई फुले विद्यापीठ आणि फोकलोर अँड क्लचरल हेरीटेज फाउंडेशन पुणे यांच्या समन्वयातून घेतलेली ही कार्यशाळा महत्वाची आहे.सदरील महोत्सवाचे संयोजक  सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे आणि लोकसाहित्य आणि फोकलोर अँड क्लचरल हेरीटेज फाउंडेशन  समन्वयक डॉ.सुनीता धर्मराव होत्या. सदरील कार्यक्रमाचे आभार विभीषण चवरे यांनी केले तर प्रास्ताविक डॉ.सुनीता धर्मराव यांनी केले.