‘मी गीता बोलतीय’ पुस्तक प्रकाशन सोहळा
पुणे : भौतिक जीवन जगत असताना अनेकदा आपल्यावर अनेक संकट येतात. त्यावेळी नेमके काय करावे, कसे वागावे हे कळत नाही. अशा परिस्थितीतच भगवान कृष्णाने अर्जुनाला दिलेली शिकवण ही आजही २१व्या शतकात उपयोगी पडते. भौतिक जीवनामध्ये आदर्श जीवनपद्धती कशी जगावी याचा मार्ग भगवद्गीतेमध्ये सांगितला आहे. भगवद्गीता ही भारतीय तत्वज्ञानाचा गाभा आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.
अभिताभ होनप लिखित ‘मी गीता बोलतीय’ या भगवदगीतेचे उत्कंठावर्धक वर्णन करणाऱ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आपटे रस्त्यावरील हॉटेल श्रेयस मधील अंबर हॉल येथे पार पडला. यावेळी भारतीय पुस्तक न्यासाचे विश्वस्त राजेश पांडे, गीता धर्म मंडळाच्या कार्यवाह विनया मेहंदळे, लेखक धनंजय गोखले, जनसेवा फौंडेशन चे अध्यक्ष डॉ. विनोद शहा, लेखक अभिताभ होनप उपस्थित होते. यावेळी धनंजय गोखले, डॉ. शहा आणि विनया मेहेंदळे, यांनी पुस्तकामागील भूमिका मांडली.
राजेश पांडे म्हणाले, व्यवहारी जीवनात अनेकदा भगवंत आपल्याला आठवतो, ते शब्दबद्ध करणे प्रत्येकाला जमतेच असे नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा ग्रंथ. माणसाने फळाची अपेक्षा न करता नेहमी चांगले काम केले पाहिजे. ते काम करत असताना भगवंताची आठवण ठेवली पाहिजे हाच उपदेश भगवदगीतेत केला आहे. प्रत्येकाचे समाजाला काहीतरी देणे असते आणि आपल्या प्रत्येकाने आपल्या भूमिकेतून ते दिले पाहिजे.
अभिताभ होनप म्हणाले, भगवदगीतेत भगवान कृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश हा अत्यंत भावनिक आहे. ही भावनिकता स्त्रीच्या भूमिकेतून मांडण्याचा विचार आला तेव्हा स्वतः गीतेच्या मनातून गीतेचे कथन व्हावे, हा विचार मनात आला. भगवद्गीता हे तत्वज्ञान आहे आणि त्याचे सार सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे. तत्वज्ञानाचा हा मार्ग दाखविण्याचे कार्य मी या पुस्तकाच्या माध्यमातून एका निराळ्या पद्धतीने केले आहे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि गीता मनोगत स्मिता कुलकर्णी ह्यांनी सादर केले तर मुग्धा नलावडे ह्यांनी निवडक अभिवाचन केले.