Home Blog Page 485

लीला गांधी या आपल्या पुण्याचे, कलेचे वैभव; त्यांना पद्म पुरस्कार मिळावा यासाठी शिफारस करू – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

0

ज्येष्ठ अभिनेत्री, नृत्यांगना लीला गांधी यांना ‘बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान

पुणे : ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी या आपल्या पुण्याचे, कलेचे वैभव आहे. त्यांचा सन्मान म्हणजे आपल्या सर्वांचा सन्मान आहे. त्यांना पद्म पुरस्कार मिळावा यांची शिफारस राज्य सरकारच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारकडे करू, असा शब्द केंद्रीय राज्यमंत्री नागरी विमान वाहतूक मुरलीधर मोहोळ यांनी आज दिला.

केंद्रीय राज्यमंत्री नागरी विमान वाहतूक मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना बालगंधर्व परिवाराच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर च्या वर्ध्यापानदिना निमित्त ‘ बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी मोहोळ बोलत होते. या प्रसंगी मा.आमदार उल्हासदादा पवार, अ.भा मराठी नाट्य परिषदचे अध्यक्ष प्रशांत दामले, डॉ. संजय चोरडिया, चंदुकाका ज्वेल्सचे सिद्धार्थ शहा, पुण्याचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, बारामती नाट्य परिषदेचे अध्यक्ष किरण गुजर, बालगंधर्व यांच्या नातसून अनुराधा राजहंस, प्रशासन अधिकारी राजेश कामठे,,बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आदि मान्यवर उपस्थित होते.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, गेली 57 वर्ष बालगंधर्व रंग मंदिराचा वर्धापन दिन सोहळा साजरा केला जात आहे. या निमित्ताने पुण्याची सांस्कृतीक ओळख जपण्याचे काम केले जात आहे. ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना आपण सर्व ‘ब्लॅक अँड व्हाइट’च्या काळा पासून पाहत आलो आहोत. त्यांचे चित्रपट त्यांची कारकीर्द ही वाखणण्याजोगी आहे. लीला गांधी या आपल्या पुण्याचे, कलेचे वैभव आहे. त्यांचा सन्मान म्हणजे आपल्या सर्वांचा सन्मान आहे. त्यांना पद्म पुरस्कार मिळावा याची शिफारस राज्य सरकारच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारकडे करू, असा शब्द केंद्रीय राज्यमंत्री नागरी विमान वाहतूक मुरलीधर मोहोळ यांनी आज दिला.

उल्हास पवार म्हणाले, पू. ल. देशपांडे यांच्या संकल्पनेतून बालगंधर्व रंगमंदिराची निर्मिती झाली. तत्कालीन राजकीय नेत्यांनी त्यांना कोणतीही आठकाठी आणली नाही, ही बाब कौतुकास्पद आहे. बालगंधर्वांच्या नावाने दिला जाणार पुरस्कार लीला गांधी यांना मिळतोय म्हणजे अतिशय यथार्थ निवड आहे.

प्रशांत दामले म्हणाले, अलीकडे महाराष्ट्रात ज्यांना नाट्यगृहांबद्दल काहीही माहिती नाही अशी लोकं नाट्यगृह बांधत आहेत. नाट्यगृह बांधल्या नंतर सुधारणा करण्यापेक्षा आधीच सुसज्ज आणि नियोजनबद्ध नाट्यगृह बांधली गेली पाहिजेत. यासाठी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदीर, गडकरी रंगयातन आणि वाशीच विष्णुदास भावे नाट्यगृह यांचे प्लॅन फॉलो करायला हवेत. एव्हडे केले तरी शासनाचे कोट्यावधी रुपये वाचतील. तसेच नाट्यगृहाशी संबंधीत लोकांना सोबत घेवून नाट्यगृहांचे नियोजन केल्यास ते अचूक ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच राज्यातील नाट्यगृहांसंदर्भात पुढील अडीच वर्षासाठी शासनाने एक आराखडा तयार करण्यात आला असून त्यामुळे तरी राज्यातील नाट्यगृह निट होतील असा आशावाद देखील दामले यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी आपलो मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी म्हणाल्या, “वयाच्या नवव्या वर्षा पासून मी कलाक्षेत्रात कार्यरत असून आज तागायत मी अनेक हिंदी, मराठी चित्रपटात काम केले आहे. समर्थपणे लावणी सादर केल्यानेच अनेक घरंदाज मुली आजही लावणी प्रकार करायला तयार असतात. हिंदीत सर्वात प्रथम नृत्य दिग्दर्शन करण्याची संधी मला यामुळेच मिळाली. आपले कला क्षेत्रातील हे योगदान पाहता आपल्याला पद्म पुरस्कार मिळावा”, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी फोटोग्राफर अक्षय परांजपे, पत्रकार कल्याणी फडके- केळकर, नाट्यनिर्माते पत्रकार अशोक घावटे, नाट्य अभ्यासक व लेखक जयराम पोतदार, गायिका आशाताई खाडीलकर आदींना बालगंधर्व गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रास्ताविक मेघराज राजेभोसले यांनी केले. मानपत्रांचे वाचन अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले तर आभार चित्रसेन भवार यांनी केले.

पूर्व पुण्यात शरद पवार,उद्धव ठाकरेंसह खा.अमोल कोल्हेंना अजितदादांचा झटका

शहर अध्यक्षांच्या एककल्ली पणाचा शरद पवार गटाला दणका

पुणे – माजी आमदार महादेव बाबर, माजी नगरसेवक योगेश ससाणे, माजी उपमहापौर बंडू गायकवाद , माजी उपमहापौर निलेश मगर, माजी नगरसेवक हेमलता मगर, आजित ससाणे, प्रसाद बाबर, अशा मान्यवर कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने सर्वाधिक झटका शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बसला आहे. शहर अध्यक्षांच्या मनमानीला कंटाळून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील मान्यवरांनी अजितदादांच्या दिमतीला जाणे पसंत केल्याचे येथे सांगण्यात आले. माजी आमदार महादेव बाबर तर दीर्घ काळापासून उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज होते त्यांनी आज अजितदादांचा हात धरला.शहर अध्यक्ष पदावरून दीपक मानकर पायउतार झाल्यावर अजितदादांना पक्ष संघटना पुण्यात मजबूत करायची असल्याने सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप यांना शहर अध्यक्ष केल्यावर आता ठाकरे आणि शरद पवार यांचे समर्थक खेचून नेण्याचे राजकारण सुरु झाले आहे. एकीकडे सत्ता आणि दुसरीकडे विरोधकांमधील ठराविक नेत्यांची गटबाजी यामुळे सत्ताधारी पक्ष कडे प्रवेश करणारांचा ओघ वाढतो आहे.दरम्यान यावेळी पुणे, सांगली, हिंगोली, रत्नागिरी, नांदेड, हडपसर येथील विविध पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी जाहीर प्रवेश केला.प्रवेशाचा कार्यक्रम मुंबईत झाला

संघटना वाढवणारे लोकं पक्षात आले आहेत त्यामुळे मिळूनमिसळून काम करुया. सर्वांना मोठी पदे मिळतात असे नाही तर छोटी पदे घेऊन कामाचा आवाका दाखवला पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळी केले.हडपसर येथील महादेव बाबर यांनी पक्षात येण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. त्यांनी माझ्यासोबत काम केले आहे. त्यांच्या येण्याने पक्षाची ताकद शहरात वाढली आहे असेही अजित पवार म्हणाले.

लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. अधिवेशन संपल्यानंतर महाराष्ट्राचा दौरा करणार असून त्याअगोदर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे दौरा करतील असे जाहीर करतानाच आपल्याला बेरजेचे राजकारण करायचे आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांनी आपल्याला ते शिकवले आहे. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या वेगवेगळ्या खात्यातून जनसामान्यांची कामे आपण करत आहोत असे अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.

पक्ष प्रवेश करणार्‍यांनी संघटना बळकट करण्यासाठी अधिकचे प्रयत्न करायचे आहे. याशिवाय सभासद नोंदणीही मोठया प्रमाणात करायची आहे. आपल्याला राष्ट्रवादीचा परिवार म्हणून काम करायचे आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमय करायचा आहे असेही अजितदादा पवार म्हणाले.

पक्षात घेताना कुणाचे वेडेवाकडे धंदे असू नये. त्यांची प्रतिष्ठा चांगली असली पाहिजे. महिला भगिनींचा अनादर होणार नाही याची काळजी घ्यावी. संबंधितांनी कुठेही उर्मटपणे वागता कामा नये असे बजावतानाच शून्यातून विश्व निर्माण करता येते. कुठल्याही गोष्टीचा किंवा कामाचा कमीपणा वाटून घेता कामा नये असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.

राज्यात विकासाची कामे करत असताना शिव – शाहू – फुले – आंबेडकरांचा सामाजिक समतेचा विचार घेऊन वाटचाल करत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.

पक्षाचा वर्धापन दिन पुणे – बालेवाडी येथे साजरा केला. दिवसेंदिवस पक्षात येणार्‍यांची संख्या वाढत आहे. कारण आपले नेतृत्व जनसामान्यांच्या प्रती काम करत आहे. आता हॉल ही कमी पडू लागले असून यापुढे मैदानावर पक्ष प्रवेश घ्यावा लागेल असे सुतोवाच सुनिल तटकरे यांनी केले.

अजितदादांच्या नेतृत्वाखाली पक्ष मजबूत करण्यासाठी, संघटना मजबूत करण्यासाठी काम करु येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळेल असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

या पक्ष प्रवेशाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, आमदार हिरामण खोसकर, आमदार राजू नवघरे, आमदार इद्रीस नायकवडी, आमदार शेखर निकम, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी रत्नागिरीचे अजित यशवंतराव, दापोली खेड काँग्रेस पक्ष विधानसभा माजी अध्यक्ष समद मांडलेकर, म्हापुळ जमाते मुस्लीम उपाध्यक्ष मुनीम मुकादम. अशपाक मांडलेकर,नवी मुंबई काँग्रेसमधील पदाधिकारीसौ. सविता चव्हाण,सौ. विना राठोड, देवकी जाधव, श्वेता जोशी, योगिता मिक्षा, उज्ज्वला पंडीत, मनिषा बस्ताडे, कल्पना गुप्ता, सरस्वती यादव, नमना कुनसे तसेच पलुस तालुक्यातील माजी उपनगराध्यक्ष पलूस नगर परिषद मा. श्री. अशोक सर्जेराव मोरे, संचालक संग्राम वि का सोसायटी पलूस मा. श्री. विजयकुमार पाडुरंग पाटील, युवा उद्योजक विक्रम सर्वेराय पाटील, मातंग समाज राष्ट्र‌वादी शरदबंद्रजी पवार गट जिल्हाध्यक्ष विनायक किसान सदामते, युवा नेते संदिप जयसिग साळुंखे, माजी अध्यक्ष, किसान सेल भाजपा, पलूस तालुका शिवाजी कृष्णा सावंत, युवा नेते बुर्ली संतोष काळे, माजी संचालक, वि सोसा, बुर्ली दिपक वसंत काळे, माजी संचालक, वि सोसा, बुर्ली राजकुमार अण्णा चौगुले, विर सेवा दल, पलूस लालुका राकेश सतीश चौगुले, सांडगेवाडी ग्रामपंचायत सदस्य मनोज चंद्रकांत पवार, सांडगेवाडी तटामुंक्ती समिती अध्यक्ष सुधीर शिवाजी जाधव, पलुस तालुका भाजप माजी संघटक रोहित जलिंदर सूर्यवंशीखानापुर तालुक्यातील माजी सचिव, भाजपा, सांगली जिल्हा पंकज (भैय्या) जोतीराम दबडे, माजी प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा, अनुसूचित मोर्चा संदीप (तात्या) मोहन ठोंबरे, माजी उपाध्यक्ष, भाजपा, खानापूर तालुका आबासो जाधव, माजी अध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा, विटा शहर प्रशांत भस्मे, माजी सरचिटणीस, भाजपा युवा मोर्चा, सांगली जिल्हा प्रथमेश साळुखे, माजी अध्यक्ष, भाजपा ओबीसी मोर्चा, विटा शहर सुहास कुलकर्णी, माजी अध्यक्ष, भाजपा कामगार आघाडी, विटा शहर सतीश सुतार यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला .

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘सीट्रीपलआयटी’ केंद्र उभारा;‘एमआयडीसी’मार्फत जागा, ‘डीपीसी’ कडून 15 टक्के निधी-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, दि. 24 :- राज्यातील युवकांना रोजगाराभिमुख व आधुनिक तंत्रज्ञानाधिष्ठित प्रशिक्षण मिळावे, यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अॅन्ड ट्रेनींग’ अर्थात ‘सीट्रिपलआयटी’ केंद्र उभारण्यात यावे. या केंद्रासाठी ‘एमआयडीसी’ मार्फत आवश्यक जागा उपलब्ध करुन देण्यात यावी, तसेच यासाठी आवश्यक असणारा 15 टक्के निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. राज्यात सध्या दहा केंद्र मंजूर असून उर्वरित 26 जिल्ह्यांमध्येही याच धर्तीवर ‘सीट्रीपलआयटी’ केंद्र उभारण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात राज्यात ‘सीट्रीपलआयटी’ केंद्र उभारणीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव व विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, उद्योग विभागाचे सचिव डॉ. अनबलगन पी., महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलरासू, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव राजेश देशमुख, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी लहू माळी, ‘एम.आय.डी.सी.’चे अधिक्षक अभियंता कैलास भांडेवार, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या संचालक माधवी सरदेशमुख, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, सहसचिव मनोज जाधव, सहसचिव योगेश पाटील, प्रकल्प समन्वयक प्रितम गंजेवार उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यातील तरुणांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळावे, त्यांच्यामध्ये कौशल्यवृद्धी होऊन ते रोजगारक्षम व्हावेत, यासाठी कोणतीही तडजोड करु नये. यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात किमान एक ‘सीट्रीपलआयटी’ केंद्र उभारण्यात यावे. राज्यात सध्या दहा ठिकाणी ‘सीट्रीपलआयटी’ केंद्र मंजूर करण्यात आली आहेत, राज्यातील उर्वरीत 26 जिल्ह्यांमध्येही केंद्रे उभारण्यासाठी टाटा कंपनीशी आवश्यक तो समन्वय साधून कार्यवाही तातडीने करण्यात यावी. या केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी हजारो युवकांना ‘एआय’, ऑटोमेशन, रोबोटिक्स, मशीन लर्निंग अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळणार आहे.

या प्रकल्पांमुळे राज्यात उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार असून नवउद्योजकांना प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात उद्योगस्नेही वातावरणाची पायाभरणी होणार आहे. युवकांचे कौशल्यवर्धन, रोजगार व स्वयंरोजगारासाठी यामुळे मोठी चालना मिळणार आहे. या केंद्रांसाठी आवश्यक असणारी जागा ‘एमआयडीसी’ने द्यावी, तसेच केंद्राची जागा निवडताना ती शहराच्या जवळ असावी, प्रशिक्षार्थींना सोयीची असावी, याची काळजी घेण्यात यावी. या केंद्रासाठी आवश्यक असणारा 15 टक्के निधी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत देण्यात येईल, तसेच खासदार सुनील तटकरे यांच्या मागणी नुसार रायगड जिल्ह्यातील ‘सीट्रिपलआयटी’ केंद्रासाठी ‘एमआयडीसी’ मार्फत निधी उपलब्ध करुन देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

बैठकीतील ठळक मुद्दे:-
प्रत्येक जिल्ह्यातील ‘सीट्रिपलआयटी’ केंद्रासाठी आवश्यक जागा ‘एमआयडीसी’मार्फत
यासाठी लागणारा 15 टक्के निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत
प्रशिक्षणार्थ्यांना सोयीची जागा निवडण्यात येणार

नितीन गडकरी यांची भेट घेऊन आमदार बापूसाहेब पठारे यांनी वडगावशेरीकरांच्या वतीने मानले आभार

पुणे : पुणे-नगर रस्त्यावर वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रस्तावित असलेल्या उन्नत पुलाच्या कामात विमाननगर (हयात हॉटेल चौक) ते खराडी जकात नाका या महत्त्वाच्या टप्प्याचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी आमदार बापूसाहेब पठारे यांनी डिसेंबर २०२४ व जानेवारी २०२५ मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती.

गडकरी साहेबांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, शासन निर्णयाद्वारे सदर टप्प्याचा समावेश करण्यात आलेला आहे.

काल दिनांक २४ जून रोजी नितीन गडकरी पुणे दौऱ्यावर आले असताना आमदार बापूसाहेब पठारे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन वडगावशेरी मतदारसंघाच्या वतीने त्यांचा सत्कार केला व तात्काळ सहकार्यासाठी आभार व्यक्त केले.

यावेळी आमदार अभिमन्यू पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.

तीन वर्षांपासून आदर्श ग्रामसेवक पुरस्कार रखडला; आमदार बापूसाहेब पठारे यांनी केली चौकशीची मागणी

पुणे: तालुका पातळीवर ग्रामपंचायतच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामसेवकांना दिला जाणारा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मागील तीन वर्षांपासून दिला नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. याबाबत आमदार बापूसाहेब पठारे यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्याकडे चौकशीसाठी अधिकृत पत्राद्वारे मागणी केली आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून २०२१-२२, २०२२-२३ व २०२३-२४ या तीन आर्थिक वर्षांसाठी आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देण्यात आले नाहीत. परिणामी, गाव पातळीवर निष्ठेने काम करणाऱ्या ग्रामसेवकांमध्ये नाराजी व असमाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे आमदार पठारे यांनी सांगितले.

बापूसाहेब पठारे यांच्या निवेदनातील प्रमुख तीन प्रमुख मागण्या

१)) २०२१-२२, २०२२-२३, २०२३-२४ या वर्षांचे पुरस्कार का दिले नाहीत, याचे स्पष्टीकरण देण्यात यावे.
२) यंत्रणात्मक किंवा प्रशासकीय अडचणी असल्यास त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे.

३) मी केलेल्या मागणीवर कोणती कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, हे स्पष्ट करावे.

“मी केलेली मागणी जिल्हा परिषद प्रशासनाने लक्षात घेऊन योग्य ती कार्यवाही तत्काळ सुरू करावी. ज्यामुळे उत्तम काम करणाऱ्या ग्रामसेवकांचा सन्मान होईल. त्यांनाही अधिक चांगल्या पद्धतीने काम करता येईल”, असे मत आमदार पठारे यांनी व्यक्त केले.पठारे यांनी केलेल्या मागणीमुळे ग्रामविकासात योगदान देणाऱ्या ग्रामसेवकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी 15 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. 24: यावर्षी 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी आदी अभ्यासक्रमात सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक टक्केवारीच्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या मातंग समाजासह तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांनी ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजने’साठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज 15 जुलैपर्यंत सादर करावेत असेही कळविण्यात आले आहे.

ही शिष्यवृत्ती मातंग समाजातील मांग, मातंग, मिनी मादीग, मादिंग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा पोटजातींसाठी राबविण्यात येते. महामंडळाकडून ज्येष्ठता व जास्त गुण क्रमांकानुसार प्रथम 3 ते 5 विद्यार्थी- विद्यार्थीनींना उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.

विद्यार्थ्यांनी गुणपत्रके, शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आदी कागदपत्रासह जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन जवळ, येरवडा, पुणे दूरध्वनी क्र. 020-29703057 येथे अर्ज करावेत, असे महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
0000

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना;31 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे दि. 24: शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत कला व साहित्य क्षेत्रातील योगदान असलेल्या ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांसाठी ‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना’ राबविण्यात येते. या योजनेच्या लाभासाठी ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांनी 31 जुलै पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेंतर्गत ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना प्रती महिना पाच हजार रुपये मानधन देण्यात येते. योजनेच्या लाभासाठी संबंधित कलाकार, साहित्यिक महाराष्ट्राचा राहिवासी असणे बंधनकारक आहे. वय 50 वर्षांपेक्षा जास्त असावे. दिव्यांग कलाकार, साहित्यिकांचे वय 40 वर्षापेक्षा जास्त असावे. साहित्य व कलाक्षेत्रात सातत्यूपर्ण, दर्जेदार व मोलाची भर, तसेच योगदान कमीत कमी 15 वर्ष असावे.

वयाने ज्येष्ठ असणारे, विधवा, परितक्त्या, दिव्यांग कलाकार यांना प्राधान्य, कलाकाराचे सर्व मार्गांनी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 60 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे. ज्या कलाकारांची उपजीविका फक्त कलेवरच अवलंबून आहे असे कलाकार तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबून होते, मात्र सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार, केंद्र किंवा राज्य शासनाची महामंडळे, इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत अंतर्भूत नसलेले पात्र कलाकार या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.

अर्जासोबत वयाचा दाखला, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, प्रतिज्ञापत्र, बँक पासबूक, लागू असल्यास पती व पत्नीचा एकत्रित फोटो, दिव्यांगत्व असल्यास दिव्यांगत्वाचा दाखला, राज्य, असल्यास केंद्र सरकार पुरस्कार प्रमाणपत्र, नामांकित संस्था, व्यक्ती यांचे शिफारस पत्र असल्यास तसेच अन्य पुरावे जोडावेत.

अर्ज ऑनलाईन पद्धतीने राज्य शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर 1 ते 31 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) तथा राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना समितीचे सदस्य सचिव भूषण जोशी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

खरीप हंगामामध्ये ‘साथी पोर्टल’ वरून बियाणे वितरण व विक्री

पुणे दि. 24: खरीप हंगाम २०२५ मध्ये सर्व प्रकारच्या बियाण्याचे वितरण व विक्री व केंद्र शासनाने विकसित केलेल्या ‘साथी पोर्टल’ प्रणाली वरूनच होणार आहे; त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे विक्रेत्यांकडून साथी पोर्टल प्रणालीवरूनच बियाणे खरेदी करण्याबाबत आग्रह धरावा, असे आवाहन पुणे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

परराज्यात उत्पादित झालेले व महाराष्ट्रात वितरण व विक्री होणाऱ्या बियाण्यांना साथी पोर्टल अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व बियाणे उत्पादक व विक्रेत्यांची नोंदणी साथी पोर्टलवर करण्यात येणार आहे. साथी प्रणालीमुळे बियाणे उद्योगात पारदर्शकता, सुसूत्रता आणि विश्वासार्हता निर्माण होणार आहे.

या पोर्टलमुळे बियाणे उत्पादक कंपन्या, वितरक व विक्रेते यांच्यात समन्वय वाढवून डिजिटल प्रणाली मुळे सर्व संबंधित घटक एका प्लॅटफॉर्मवर आल्यामुळे व्यवस्थापन सोपे होणार आहे व बियाणे व्यवसायातील गैरप्रकाराला आळा घालण्यास मदत होणार असल्याचे कृषी सहसंचालक कार्यालयाच्यावतीने प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

दत्तात्रय गवसाने, विभागीय कृषी सहरांचालक, पुणे: येत्या खरीप हंगामात सर्व बियाणे उत्पादक, वितरक व विक्रेते यांनी साथी पोर्टल प्रणालीचा वापर करूनच बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून बोगस बियाण्यांबाबचे गैरप्रकार होणार नाहीत. या प्रणालीचा वापर करणार नाहीत अशांवर कारवाई केली जाणार आहे.
0000

गायन-वादनाचा सुरेल संगम-पुणेकर रसिकांची भरभरून दाद

श्रीराम पुजारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सांगीतिक कार्यक्रम
पुणे : युवा कलाकार रागिणी शंकर यांचे व्हायोलिनमधून उमटणारे हृदयस्पर्शी सूर, भुवनेश कोमकली यांचे भावपूर्ण, बहारदार गायन आणि विख्यात ज्येष्ठ गायक पंडित व्यंकटेश कुमार यांचे स्वर्गीय सूर यांचा आनंद रसिकांनी अनुभवला.
सोलापूरातील सांस्कृतिक राजदूत म्हणून ओळखले जाणारे विद्यार्थीप्रिय शिक्षक, समाजधुरीण प्रा. श्रीराम पुजारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त श्रीराम पुजारी प्रतिष्ठानतर्फे पुण्यात पुण्याई सभागृह पौड रस्ता येथे या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळच्या सत्रात सुप्रसिद्ध युवा व्हायोलिन वादक रागिणी शंकर यांनी खूप दिवसांनी कार्यक्रमात सकाळचा राग वाजवत आहे, असे सांगून वादनाची सुरुवात राग नटभैरवने केली. गायकी अंगाच्या तंत्रासाठी प्रसिद्ध असलेल्या रागिणी शंकर यांनी व्हायोलिन वादनावरील पकड दर्शविताना रागातील बारकावे अतिशय सफाईदारपणे मांडत रसिकांची वाहवा मिळविली. पुण्यात आले आहे तर मराठीतील अभंग ऐकवू की नाट्यगीत असे रागिणी यांनी रसिकांना विचारताच आषाढी वारी असल्याने आधी अभंग नंतर नाट्यगीत ऐकवा हा रसिकांचा प्रेमळ हट्ट पुरा करताना त्यांनी माझे माहेर पंढरी हा अभंग तर नरवर कृष्णासमान हे नाट्यगीत सादर केले. त्यांना तनय रेगे यांनी तबल्यावर समर्पक साथ केली.
यानंतर सुप्रसिद्ध गायक भुवनेश कोमकली यांची गायन मैफल रंगली. कोमकली आणि पुजारी कुटुबियांचा स्नेहबंध उलगडून भुवनेश यांनी मैफलीची सुरुवात आपले आजोबा पं. कुमार गंधर्व यांनी रचलेल्या तोडी रागातील देवो मोहे धीर या बंदिशीने केली. त्याला जोडून द्रुत लयीत बीन बजाए माई ही पारंपरिक बंदिश सादर केली. तराणा सादर केल्या नंतर भुवनेश कोमकली यांनी राग बिलावलमधील पिवन लागो आणि बाजे रे डमरुवा या पारंपरिक बंदिशी ताकदीने सादर केल्या. संत सुरदास रचित बासुरी बजाए या भक्तिरचनेने भावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या नंतर रितु आयी बोले मोरा रे ही रचना ऐकविली. आत्मा, उत्पत्ती आणि संसार यांच्यातील परस्पर संबंधांचे गूढ उकलून दाखविणारे संत कबीर रचित शून्य गढ शहर, शहर घर बस्ती हे अध्यात्माचे तत्त्व मांडणारे निर्गुणी भजन सादर केले. त्यांना सुयोग कुंडलकर (संवादिनी), आशय कुलकर्णी (तबला), स्वप्नील गायकवाड, कबीर शिरपूरकर (तानपुरा) यांनी सुरेल साथसंगत केली.
सायंकाळच्या सत्रात विख्यात शास्त्रीय गायक पंडित व्यंकटेश कुमार यांचे दमदार गायन झाले. त्यांनी मैफलीची सुरुवात मुलतानी रागातील गोकुल गाव के छोरा रे या पारंपरिक रचनेने केली. याला जोडून द्रुत लयीत नैनन मे आनबान ही रचना प्रभावीपणे सादर केली. चमेली फुली चंपा या रचनेतून अनेक सुगंधित फुलांप्रमाणे स्वरांचे फुललेले आविष्कार रसिकांना भावले. द्रुत लयीत धीट लंगरवा कैसे ही हमीर रागातील पारंपरिक रचना सादर केली.
खमाज रागातील ठुमरी सादर करताना अब कैसे घर जाऊ मै, बाट रोकत कुमर कन्हैय्या ही पारंपरिक रचना सादर केली. शुद्ध स्वर आणि सहज मांडणीतून श्रोत्यांसमोर नटखट कृष्ण कन्हैयाचे रूप साकार झाले. रामदासी मल्हार राग सादर करताना बादरवा गरज आए ही रचना सादर केली.
पुणेकर रसिकांसारखा श्रोता मिळण्याचे भाग्य लागते असे सांगून पंडित व्यंकटेश कुमार यांनी भक्तिगीत सादर करतो म्हटल्यावर रसिकांनी त्यांना कानडी भक्तिगीत सादर करण्याची विनंती केली. यावर आनंदित होऊन संगीतक्षेत्रात भाषेचा भेद नाही, संगीत हे एकमेव क्षेत्र आहे जेथे राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन होते, असे सांगून देवीचे वर्णन करणारी कमले कमलालये ही कानडी रचना तन्मयतेने सादर केली. भाषेच्या पलिकडे जाऊन गायनाचा आनंद रसिकांनी भरभरून लुटला.
मैफलीची सांगता समझा मना कोई नही अपना, नीस दिन रामनाम जपना या भैरवी रागातील भक्तिरचनेने केली. पंडित व्यंकटेश कुमार यांच्या भावपूर्ण, भारदस्त, सुरेल सादरीकरणातून साकार झालेल्या स्वरांच्या हिंदोळ्यावर हेलकावे खात रसिक भावविभोर अवस्थेत रममाण झाले. त्यांना सुयोग कुंडलकर (संवादिनी), भरत कामत (तबला), शिवराज पाटील, नागनाथ नागेशी (तानपुरा, सहगायन) यांनी समर्पक साथसंगत केली.
गुरुकृपेची महती सांगत पंडित व्यंकटेश कुमार म्हणाले, गुरुंची सेवा करण्यात आनंद वाटतो. अगदी दहाच राग गा पण गायनात शुद्धता ठेवा आणि सतत रियाज करत रहा असे आग्रही मत नोंदवून शिष्याने नेहमी प्रामाणिकपणे गुरू सांगतील त्यानुसार शिकत राहिल्यास त्याचा उद्धार होईल असेही आवर्जून सांगितले. सहकलाकारांना भरभरून दाद देत, त्यांचे वारंवार कौतुक करून, रसिकांशी संवाद साधत त्यांनी मैफलीत अनोखे रंग भरले.
हेमांगी पुजारी आणि ललिता दातार यांनी प्रा. श्रीराम पुजारी यांच्या आठवणींना उजाळा दिला. कलाकारांचा सत्कार कलापिनी कोमकली, डॉ. नवनीत तोष्णीवाल, डॉ. विद्याधर बोराडे, डॉ. किरण जोशी यांनी केला तर सूत्रसंचालन मंजुषा गाडगीळ यांनी केले.

अजित पवारांच्या खात्याकडे लक्ष ठेवा:निधी कुठे वितरित होतो याची माहिती घ्या, एकनाथ शिंदेंचे शिवसेनेच्या मंत्र्यांना आदेश

शिंदेंच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती तक्रार,निधी वाटपावर भाजपचे आमदारही नाराज

मुंबई-अजित पवारांच्या खात्याकडे मोठा निधी आहे, त्यावर लक्ष ठेवा. तो निधी कुठे वितरित होतो याची माहिती घ्या, असा आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना दिला असल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची वेगळी बैठक घेतली. यात निधी वाटपावरून शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती आहे.

अजित पवार निधी देत नाहीत, अशी तक्रार शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी अनेकवेळा बोलून दाखवली आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी देखील थेट आरोप केले होते. त्यामुळे निधी वाटपाच्या मुद्द्यावरून महायुतीमधील तिन्ही घटक पक्षांमध्ये धुसफूस असल्याचे दिसून येते. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांसोबत वेगळी बैठक घेतली असल्याचे समजते.

एकनाथ शिंदे निधी वाटपावरून आक्रमक झाल्याचे देखील पाहायला मिळाले. अजित पवार यांच्या खात्यावर लक्ष ठेवण्याचे आदेश शिंदेंनी आपल्या मंत्र्यांना दिले आहेत. अजित पवारांच्या खात्यात 14-14 हजार कोटींचे दोन निधी आहेत. त्यावर लक्ष ठेवले पाहिजे. हा निधी कुठे वितरीत होतो याची माहिती आपल्याला मिळाली पाहिजे असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. दरम्यान, राज्यात निधी वाटपाच्या मुद्द्यावरून शिंदे गटाच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांची भेट घेतली होती. त्यापूर्वी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील पवारांची भेट घेतली होती. या भेटीत निधी वाटपावर चर्चा झाल्याची माहिती आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी अजित पवारांकडून निधी मिळत नसल्याची तक्रार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर निधी हा काही आपल्या खिशातून देत नाही, राज्यातील तिजोरीला शिस्त आणण्यासाठी काही पावले उचलली जातात असे अजित पवारांनी स्पष्ट केले होते. अजित पवारांच्या निधी वाटपावर केवळ शिंदे गटच नव्हे तर भाजपच्या आमदारांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नांदेडच्या दौऱ्यावर असताना भाजपच्या आमदारांनी मंचावर उपस्थित असतानाच तक्रार केली होती.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातर्गंत अर्ज करण्याचे आवाहन

0

पुणे, : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन 2025-26 अंतर्गत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिता राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेचा अधिकाधिक लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा, ‘प्रथम अर्ज, प्रथम लाभ’ या तत्त्वावर लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. अर्ज करताना शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) असणे आवश्यक आहे.

कृषी विभागाच्या मसाला पिके, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, सामूहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, शेडनेट हाऊस, पॉलिहाऊस, प्लास्टिक मल्चिंग, पॅक हाऊस, कांदाचाळ, यांत्रिकीकरण, मशरूम उत्पादन आणि काढणी पश्चात व्यवस्थापन या घटकांसाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.
0000

रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्याकरीता उपाययोजना करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

पुणे: रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण लक्षात घेता अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरीता जिल्ह्यात रस्ते सुरक्षा विषयक आवश्यक उपाययोजना कराव्यात; जिल्ह्यातील अपघाताच्या ठिकाणांची (ब्लॅकस्पॉट) व्यापक स्वरुपात जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्यासह भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

श्री. डूडी म्हणाले, पुणे जिल्ह्यात पुणे महानगरपालिका हद्दीत 15, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 22, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ 2, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ 1 आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत 2 असे एकूण 42 ब्लॅकस्पॉट आहेत, रस्ते सुरक्षतितेच्यादृष्टीने या ठिकाणी लघुकालीन तसेच दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात. अशा ठिकाणी जाण्यास प्रतिबंध किंवा ठराविक कालावधीसाठी निर्बंध, दिशादर्शक फलक लावणे, राडारोडा साफ करणे, बॅरिकेटींग आदी उपाययोजना कराव्यात. या उपाययोजनांची पोलीस प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन विभागाने तपासणी करुन येत्या 1 महिन्यात अहवाल सादर करावा.

मागील एका वर्षात जिल्ह्यात झालेल्या अपघाताची ठिकाणनिहाय कारणे शोधावीत. याअनुषंगाने सर्व संबंधित विभागाला सुरक्षात्मक उपाययोजना सूचना कराव्यात, याचे पालन सर्व संबधितांनी करावे. परिणामी जिल्ह्यातील इतर ठिकाणी याचा उपयोग होईल. खडकवासला धरण चौकातील वाहतूक कोंडी टाळण्याकरीता वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी. रस्ते सुरक्षा जनजागृतीकरीता निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही श्री. डूडी म्हणाले.

यावेळी श्री. बहीर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे जिल्हा रस्ता सुरक्षा समिती अंतर्गत करण्यात आलेल्या कामाबाबत माहिती दिली.

विठ्ठल मंदिरात प्रवेशासाठी बनावट ‘टोकन दर्शन’ पास विक्री

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या भक्तिभावाला काळिमा फासवणारी घटना उघडकीस आली आहे. काही फसवणूक करणाऱ्या टोळ्यांनी विठ्ठल दर्शनासाठी मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी बनावट ‘टोकन दर्शन’ पास तयार करून विक्री केल्याचा प्रकार समोर आला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी सात भाविकांची फसवणूक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी उघडकीस आली. हे भाविक विठ्ठल मंदिरात प्रवेशासाठी दाखल झाल्यानंतर त्यांच्या टोकन पासचे स्कॅनिंग करण्यात आले. स्कॅनिंग दरम्यान हे पास बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मंदिर प्रशासनाने तातडीने कारवाई करत या सात भाविकांना बाजूला घेत चौकशी सुरू केली.

चौकशीत या भाविकांनी सांगितले की, सासवडच्या परिसरात काही अज्ञात व्यक्तींनी त्यांना 100 रुपयांच्या मोबदल्यात ‘दर्शन टोकन’ देऊ केले. जुने अधिकृत पास स्कॅन करून त्यांच्या आधारे बनावट टोकन तयार करून ते भाविकांना देण्यात आले होते. मात्र या भाविकांना पास कोणी दिले, कुठे दिले, आणि नेमके कसे मिळाले याची ठोस माहिती देता आलेली नाही. मंदिर प्रशासनाने त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

आषाढी वारीच्या काळात लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. यामध्ये प्रत्यक्ष रांगेत उभे राहून दर्शन घेण्यासाठी 10 ते 12 तासांचा वेळ लागतो, तर अधिकृत टोकन प्रणालीमुळे अर्ध्या तासात दर्शन मिळू शकते. याचाच गैरफायदा घेत काही फसवणूक करणाऱ्या व्यक्तींनी बनावट पास तयार करून भाविकांची दिशाभूल केली.

दरम्यान, विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. “कोणत्याही प्रकारे बनावट पासची विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील आणि कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा शेळके यांनी दिला. तसेच अधिकृत संकेतस्थळावरूनच मोफत टोकन बुक करावे आणि कोणत्याही मध्यस्थ, एजंट अथवा रस्त्यावर मिळणाऱ्या दर्शन पासांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन भाविकांना केले आहे.

1200 फूट खोल दरीत आढळले तलाठी अन् तरुणीचा मृतदेह

पुण्याच्या जुन्नरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 1200 फूट खोल दरीमध्ये 2 मृतदेह आढळून आले आहेत. यामध्ये श्रीगोंद्याचे तलाठी आणि एका महाविद्यालयीन तरुणीचा मृतदेह समावेश आहे. जुन्नरच्या कोकणकडा परिसरातून दोघांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंद्याचे तलाठी रामचंद्र साहेबराव पारधी, असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रुपाली खुटाण आंबोली असे मृत महाविद्यालयीन तरूणीचे नाव आहे. जुन्नर पोलिस ठाण्याचे निरीक्षकांनी या घटनेची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली.

जुन्नरच्या रिव्हर्स वॉटर फॉलजवळ एक पांढऱ्या रंगाची कार गेली काही दिवस उभी होती. रविवार 22 जून रोजी ही गोष्ट स्थानिकांना निदर्शनास आली तेव्हा त्यांनी शोधाशोध सुरू केली. यावेळी दरीच्या कड्यावर पुरुष आणि स्त्रीच्या चपला आढळून आल्या. यानंतर सोमवारी रेस्कू टीमने दरीत उतरुन शोध घेतला असता रुपाली आणि रामचंद्र यांचे मृतदेह आढळून आले. त्यानंतर जुन्नर पोलिस आणि रेस्क्यू टीमने कठिण परिस्थितीत मृतदेह दरीतून बाहेर काढले आहेत. यानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रग्णालयात पाठवण्यात आले आहेत. रमेश आणि प्रियंका यांनी आत्महत्या केली, की त्यांचा खून करण्यात आला. याबाबतचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर मृत्यूचे कारण समजणार आहे. पोलिसांकडून आजूबाजूला चौकशी केली जात आहे. मृत्यूचे कारण आणि दोघांमधील संबंध याबाबत सखोल चौकशी सुरू आहे.

रोबोने केली ३५ दिवसांच्या नवजात बाळाच्या मूत्रपिंडावर यशस्वी  शस्त्रक्रिया 

रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांची महत्त्वपूर्ण कामगिरी

●        पेल्विक-युरोटेरिक जंक्शन ऑब्स्ट्रेक्शन आजाराने पिडीत असलेल्या नवजात शिशूवरील शस्त्रक्रियेसाठी दा विंची रोबोटिक प्रणालीचा वापर करण्यात आला. मूत्रपिंडातील अडथळा दूर करण्यासाठी अशा पद्धतीची शस्त्रक्रिया झालेल्या या बाळाचा जगभरातील सर्वात लहान मुलांच्या यादीत समावेश झाला.

●        रोबोटिक शस्त्रक्रियेदरम्यान शरीरावर लहान छेद केला जातो. त्यामुळे शस्त्रक्रियेतील आव्हाने टाळता येतात. रुग्णाला वेदना कमी होतात. प्रकृतीत लवकर सुधारणा दिसून येते.

पुणे 24 जून २०२५:  ३५ दिवसांच्या बाळावर दुर्मिळ रोबोटिक शस्त्रक्रिया करत रुबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टरांच्या टीमने या नवजात शिशूला जीवनदान दिले. ही शस्त्रक्रिया वैद्यकीय क्षेत्रात दुर्मिळ मानली जाते. मूत्रपिंडाच्या आजाराने त्रासलेल्या बाळावर रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली. अशा प्रकारची शस्त्रक्रिया करुन घेणारे ३५ दिवसांचे बाळ हे जगातील सर्वात लहान रुग्णांपैकी एक ठरले आहे. मंगळुरु येथील दाम्पत्याने आपल्या नवजात शिशूवरील उपचारासाठी पुण्यातील रुबी क्लिनिल रुग्णालय गाठले होते. डॉक्टरांनी बाळाची शारिरीक तपासणी केली असता त्याच्या दोन्ही किडनीमध्ये पेल्विक-युरेटेरिक जंक्शन ऑब्स्ट्रक्शन नावाचा गंभीर आजार झाल्याचे निदान झाले. या आजारात मूत्रपिंडामधून मूत्राशयाकडे लघवीचा प्रवाह अडकल्याने रुग्णाला प्रचंड वेदना होतात, सूज येते, किडनीला कायमस्वरुपी नुकसान होण्याचा धोका असतो. या आजारातून नवजात शिशूला बरे करण्यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.


रुबी हॉल क्लिनिकचे रोबोटिक सर्जरी विभागाचे संचालक आणि मुख्य रोबोटिक युरो-ऑन्को सर्जन डॉ. हिमेश गांधी यांनी  या शस्त्रक्रियेचे नेतृत्व केले. दा विंची रोबोटिक प्रणालीच्या साहाय्याने ही शस्त्रक्रिया पार पडली. अतिशय गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया सुरक्षितेतेने आणि अचूकरित्या करण्यासाठी दा विंची रोबोटिक प्रणालीचा वापर केला जातो. या पद्धतीचा अवलंब करत पेल्विक-युरेटेरिक जंक्शन ऑब्स्ट्रक्शन आजाराने त्रासलेल्या ३५ दिवसांच्या नवजात शिशूची या आजारातून डॉक्टरांनी सुटका केली.

‘ नवजात शिशूंवर शस्त्रक्रिया करणे हे आव्हान असते. बाळाचे लहान अवयव, नाजूक ऊती यांमुळे शस्त्रक्रियेदरम्यान बाळाच्या जीवाला धोका संभवतो. या शस्त्रक्रियांमध्ये चुकीला वाव नसतो. ’’, असे डॉ. गांधी म्हणाले. रोबोटिक शस्त्रक्रियांमध्ये हा धोका टाळता येतो, असे सांगत त्यांनी रोबोटिक शस्रक्रियेबद्दल माहिती दिली. या शस्त्रक्रियेत आम्ही मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी वापरल्या जाणा-या सूक्ष्म उपकरणांचा वापर केला. ही रोबोटच्या हाताच्या मदतीने शस्त्रक्रिया केली गेली. बाळाच्या शरीरातील अनावश्यक भाग काढण्यासाठी रोबोटचे हात कामी आले. रोबोटच्या हाताचा वापर करुनच मूत्रपिंड पुन्हा मूत्राशयाला जोडले. आता बाळाला लघवीला त्रास होत नाही. बाळाच्या तब्येतीतही सुधारणा दिसून येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. ‘’

रोबोटच्या मदतीने शस्त्रक्रिया केल्याचे अनेक फायदे आहेत. गुंतागुंतीच्या आणि संवेदनशील शस्त्रक्रियांमध्ये रोबोटचा वापर केल्याने सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचा मुद्दाही डॉ. गांधी यांनी मांडला. या पद्धतीत रोबोटिक हातांमुळे शरीरात केवळ लहान छेद देता येतो. ही शस्त्रक्रिया अचूकपणे करता येते. अनावश्यक भागाजवळील ऊतींना फारसा त्रास न होता शस्त्रक्रिया पूर्ण केली जाते. शरीरावर कमी छेद दिले गेल्याने रुग्ण लवकर बरा होतो. दा विंची प्रणालीमुळे सर्जनला शस्त्रक्रिया होत असलेल्या संबंधित भागातील अंतर्गत हालचाली ३डी दृष्याच्या माध्यमातून पाहता येतात. शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेले नियंत्रण साधण्यासाठी ही प्रणाली फायदेशीर ठरते. या पद्धतीचा अवलंब केल्यास सर्जनला शरीलातील अरुंद जागेतही प्रभावीपणे काम करता येते. हे अद्यायावत तंत्रज्ञान केवळ शस्रक्रिया अचूक पद्धतीने करुन कमीतकमी वेळेत पूर्ण करण्यास मदत करते. यामुळे गुंतागुंत टाळता येते. लहान मुलांवरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी रोबोटिक शस्त्रक्रिया उत्तम आणि सुरक्षित पर्याय ठरतो. रुग्णाची सुरक्षितता वाढते शिवाय रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा लवकर दिसून येते.

ही शस्त्रक्रिया पुण्यातील रोबोटिक शस्त्रक्रियेच्या ऐतिहासिक नोंदीतील दुर्मिळ आणि अविस्मरणीय घटना म्हणून पाहिली जात आहे. या शस्त्रक्रियेमुळे पुणे हे शहर वैद्यकीय क्षेत्रातही नावाजले जाईल, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला. बालरोग व मूत्रविकारांवरील गुंतागुंतीच्या व आव्हानात्मक शस्त्रक्रिया पुण्यात उपलब्ध झाल्या आहेत. या आजारांवरील मागणीसाठी रोबोटिक शस्त्रक्रिया करणारे शहर म्हणून पुण्याला नवी ओळख मिळाली आहे. आठ वर्षांपूर्वी डॉ. हिमेश गांधी यांनी २०१७ साली पुण्यातील मूत्रपिंड व पोस्ट्रेड कर्करोगाच्या रुग्णावर पहिल्यांगा रोबोटिक शस्त्रक्रिया केली होती. याच वर्षी रुबी हॉल क्लिनिकमध्ये अत्याधुनिक रोबोटिक शस्त्रक्रिया आणि साधनसामग्री उपलब्ध झाल्या. पुण्यातील वैद्यकीय क्षेत्रात अत्याधुनिक रोबोटिक प्रणाली सुरु करणारे रुबी हॉल क्लिनिक एकमेव रुग्णालय ठरले. रुबी हॉल क्लिनिकचे रोबोटिक सर्जरी विभागाचे संचालक आणि मुख्य रोबोटिक युरो-ऑन्को सर्जन डॉ. हिमेश गांधी यांनी आतापर्यंत ५४०हून अधिक रोबोटिक शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यांनी पोस्ट्रेड तसेच मूत्रपिंडाच्या कर्करोगाने त्रासलेल्या प्रौढांपासून ते जन्मजात विकास असलेल्या लहान मुलांवरही शस्त्रक्रिया केली आहे. हे सर्व रुग्ण आता नव्याने आयुष्य जगत आहेत. डॉ. गांधी यांच्या योगदानामुळे पुणे हे शहर रोबोटिक शस्त्रक्रियेचे शहर म्हणून उदयास येत आहे.

पुण्यात रोबोटिक शस्त्रक्रिया सुरु झाल्याने रुग्णांचा मुंबई, दिल्ली यांसारख्या मोठ्या शहरांच्याऐवजी पुण्यात येण्याचा ओघ वाढत असल्याचा मुद्दा डॉ. हिमेश गांधी यांनी मांडला. गेल्या आठ वर्षांत पुण्यात रोबोटिक शस्त्रक्रियांसाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध होत गेल्या. मुंबई आणि दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमधील अनेक केंद्रांमध्ये रोबोटिक शस्त्रक्रियांचे प्रमाण जास्त आहे. या दोन शहरांमधील रोबोटिक शस्त्रक्रियांचा ओघ जास्त असला तरीही पुण्यातही आता तज्ज्ञ डॉक्टरांच्या साहाय्याने अत्याधुनिक सोयीसुविधा दिल्या जात आहेत. मुंबई किंवा दिल्ली गाठण्याऐवजी रुग्ण पुण्याला पसंती देत आहेत.

डॉ. गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली ब-याच शल्यचिकित्सकांना रोबोटिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळाले आहे. दिल्ली, जयपूर आणि अहमदाबाद यांसारख्या अनेक शहरांत त्यांनी रोबोटिक शस्त्रक्रिया सुरु करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या शहरांत आता अत्याधुनिक रोबोटिक उपचारप्रणाली सुरु झाली आहे. डॉ. गांधी यांच्या अथक प्रयत्नांमुळे असंख्य रुग्णांना नवे जीवनदान मिळाले आहे.