राज्यात ५ लाखांवर ग्राहकांना ६ कोटींचा आर्थिक फायदा
मुंबई, दि. ३० जून २०२५: वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ ‘इमेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडणाऱ्या लघुदाब वर्गवारीतील ग्राहकांनी महावितरणच्या गो-ग्रीन योजनेमध्ये ५ लाखांचा टप्पा गाठला आहे. या योजनेत सोमवार (दि. ३०)पर्यंत सहभागी झालेल्या ५ लाख ३ हजार ७९५ वीजग्राहकांना ६ कोटी ४ लाख ५५ हजार रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे.
पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी होण्याची ऑनलाइन सुविधा व योजनेची सविस्तर माहिती महावितरणच्या मोबाईल अॅप व www.mahadiscom.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये सहभागी व्हावे व पर्यावरणपूरक योजनेत योगदान द्यावे असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी केले आहे.
वार्षिक १२० रूपयांचा फायदा – महावितरणकडून पर्यावरणपूरक ‘गो-ग्रीन’ योजनेतून वीज बिलासाठी छापील कागदाचा वापर कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. कागदी बिलाऐवजी फक्त ‘इमेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांचा वीजबिलामध्ये वार्षिक १२० रुपयांचा आर्थिक फायदा होत आहे. विशेष म्हणजे गो-ग्रीन योजनेचा पर्याय निवडल्यानंतर संबंधित ग्राहकांच्या पहिल्याच वीजबिलामध्ये पुढील १२ महिन्यांची म्हणजे १२० रुपयांची सवलत एकरकमी देण्यात येत आहे. पूर्वी ही सवलत प्रत्येकी १० रुपये प्रत्येक बिलामध्ये मिळत होती.
पर्यावरणस्नेही ५ लाख ग्राहकांचा प्रतिसाद – वीजग्राहकांसाठी ऐच्छिक असलेल्या गो-ग्रीन योजनेला राज्यात प्रतिसाद वाढत आहे. या योजनेत आतापर्यंत ५ लाख ३ हजार ७९५ पर्यावरणस्नेही वीजग्राहक सहभागी झाले आहेत. या ग्राहकांना ६ कोटी ४ लाख ५५ हजार ४०० रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे. यामध्ये (कंसात आर्थिक फायदा रूपयांत) पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक २ लाख १ हजार २३३ (२.४२ कोटी), कोकण- १ लाख १३ हजार २५४ (१.३६ कोटी), उत्तर महाराष्ट्र- ७० हजार २२६ (८४.२७ लाख), विदर्भ- ६३ हजार ७३१ (७६.४७ लाख) तसेच मराठवाड्यामध्ये योजनेत सहभागी ५५ हजार ३५१ वीजग्राहकांना ६६ लाख ४२ हजार रूपयांचा वार्षिक फायदा होत आहे.
गो-ग्रीन योजनेचे फायदे – महावितरणच्या संगणक प्रणालीमध्ये वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच संबंधित ग्राहकांना नोंदणीकृत ‘इमेल’वर व मोबाईलवर ‘एसएमएस’द्वारे दरमहा वीजबिल पाठविण्यात येत आहे. वीजबिलांच्या तारखेपासून सात दिवसांमध्ये रकमेचा तत्पर भरणा केल्यास एक टक्के सवलत दिली जाते. त्यासाठीही वीजबिल तात्काळ ऑनलाईनद्वारे भरणे सोयीचे झाले आहे. वीजग्राहकांना इमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येते. यासह महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील ११ महिन्यांचे असे एकूण १२ महिन्यांचे वीजबिले मूळ स्वरुपात उपलब्ध आहेत. आवश्यकतेप्रमाणे वीजग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे.
पुण्यातील आमदार आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनालगतची जागा कर्करोग रुग्णालयासाठी देणार असल्याचे जाहीर केले, यावर आंबेडकरी नेते, कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. पुणे महापालिकेने सदरील जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणासाठी आरक्षित केलेली असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही जागा खासगी बिल्डरच्या घशात घातली त्यावेळी माधुरी मिसाळ मुग गिळून गप्प राहिल्या. आंबेडकरी समाजाने या विरोधात आवाज उठवला, आजच्या परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार ही जागा आंबेडकर भवन साठी देण्यास तयार आहेत, प्रस्तावित कर्करोग रुग्णालयांसाठी सदरील जागा अपुरी असून त्यासाठी( येरवडा येथील मनोरुग्णालयाची 27 एकर किंवा ससून हॉस्पिटल मधील आवारातील 460000 स्क्वेअर फुट जागा कर्करोग रुग्णालयासाठी देण्यात यावी असा प्रस्ताव ससून प्रशासनाने दिलेला असताना मिसाळ या जाणीवपूर्वक आंबेडकरी समाजाच्या भावनांशी खेळत आहेत असा आरोप करत माधुरी मिसाळ यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची एवढी ॲलर्जी का? असा संतप्त सवाल आंबेडकरी नेते, कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. या पावसाळी अधिवेशनामध्ये सकारात्मक निर्णय न झाल्यास हा लढा तीव्र केला जाईल असा इशारा आजच्या पत्रकार परिषदेत देण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरणासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केवळ आश्वासनांवर बोळवण केल्याने आंबेडकरी चळवळीतील नेते आक्रमक
१५ ऑगस्ट रोजी आंबेडकरी समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रचंड मोठे आंदोलन करण्याचा निर्धार
पुणे : मंगळवार पेठ येथील ससून हॉस्पिटल समोरील जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तार करावा, त्या ठिकाणी राष्ट्रीय दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक निर्माण करावे अशी मागणी आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्षीय नेत्यांची आहे. राज्याच्या आजपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात या विषयावर डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समिती पुणे च्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच १५ ऑगस्ट रोजी पुणे जिल्हाधिकारी कचेरीवर आंबेडकरी जनतेच्या वतीने प्रचंड जवाब दो आंदोलन करण्याचा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारिकरण कृती समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत सोमवारी देण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनालगत मंगळवार पेठेतील सर्व्हे नंबर ४०५ मधील जागा विस्तारीकरणासाठी देण्याचा निर्णय २० जुलै २००० साला मध्ये पुणे महापालिकेच्या स्थायी समिती व मुख्य सभेने ठराव बहुमताने मंजूर केला होता. मात्र, ४ सप्टेंबर २०२४ पासून एन. जी. व्हेंचर्सला ६० वर्षांच्या भाडेकरारावर ही जागा देण्याचा बेकायदेशीर करार केला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एखादा ठराव सर्वानुमते मंजूर झाल्यास त्याची तात्काळ अंमलबजावणी होण्या ऐवजी नियम धाब्यावर बसवून कायद्याची पायमल्ली करत घाईगडबडीने हा भूखंड खाजगी कंपनीला देण्याचा निर्णय घेतला. पक्ष व राजकारण बाजूला ठेवून आंबेडकरी जनतेच्या अस्मितेचा विषय असलेली ही जागा खासगी कंपनीला देऊ नये, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केलेली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणासाठी आंबेडकरी जनतेच्या भावना तीव्र आहेत. या भवनाचे विस्तारीकरण करण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दिले होते. तदनंतर 2016 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस साहेब यांनी देखील ही जागा डॉ. आंबेडकर स्मारकासाठी देण्याचा आदेश काढला होता. त्यामुळे महापालिकेने २००० साला मध्ये केलेल्या ठरावाची त्वरित अंमलबजावणी करून येथे आंबेडकर भवनाचा विस्तार व स्मारकाचे काम त्वरित सुरु करावे. महापालिकेच्या वतीने आंबेडकरी विचारांचे प्रचार व प्रसार केंद्र, संशोधन केंद्र, स्पर्धा परीक्षा केंद्र, अभ्यासिका यासह डॉ. आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारावे, जेणेकरून आंबेडकरी समाजाला न्याय मिळेल, अशी भावना नेत्यांनी व्यक्त केली.
या संदर्भात समितीने हा प्रश्न शासनाकडे मांडण्यासाठी सर्व प्रथम पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी चर्चा केली, त्यानंतर त्यांनी समितीची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी भेट घडवून आणली..यावेळी फडणवीस यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करण्यात येऊन त्यांना संपूर्ण विषय सांगितला होता त्यावेळी त्यांनी बाबासाहेबांच्या स्मारकासाठी आपण सकारात्मक आहोत, मात्र काही निर्णय यापूर्वी झाले असल्यामुळे त्यातील तांत्रिक बाजू पाहून सकारात्मक निर्णय घेऊ असे त्यांनी कळवले होते. त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची समक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले. सदर निवेदनाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेमध्ये मुख्यमंत्र्यांनी सदर स्मारकाच्या जागेबाबत आपण सकारात्मक असून शासनाच्या वतीने शक्य तितक्या लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले होते, तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा सदरील जागा आंबेडकर सांस्कृतिक भवन साठी देण्यास हरकत नसल्याचे समितीला सांगितले होते. मात्र मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी तसा प्रस्ताव कॅबिनेट मध्ये अद्याप मांडला नाही यामुळे आंबेडकरी नेते नाराजी व्यक्त करत आहेत.
ब्राह्मण महासंघ संचालित ‘ब्राह्मण इंडस्ट्रियल अँड ट्रेडर्स ऑर्गनायझेशन ‘ (बिटो) च्या परिषदेला शनिवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ उद्योजक,सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे,ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक दिलीप कोटीभास्कर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.अनिरुद्ध देशपांडे, दिलीप कोटिभास्कर, अजित कुलकर्णी, सुरेश दाबक, पिनाक वाघ ,राहुल पंडित आणि कपिलेश भाट्ये या बांधकाम क्षेत्रातील मान्यवरांनी प्रकट मुलाखतीद्वारे उपस्थितांशी संवाद साधला.’ब्राह्मण इंडस्ट्रियल अँड ट्रेडर्स ऑर्गनायझेशन ‘ (बिटो) चे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांच्या हस्ते ज्ञानेश्वरीची प्रत आणि पुणेरी पगडी देवून या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.विविध क्षेत्रातील उद्योजक, व्यावसायिकांनी व्यवसायविषयक सादरीकरणे केली.’ब्राह्मण समाजाने उद्योगात ठसा उमटवावा’ असा सूर या चर्चेत उमटला.
मनोज तारे यांनी स्वागत केले.नाना अभ्यंकर यांनी प्रस्तावित ब्राह्मण चेम्बर्स चे नियोजन मांडले.मेघा म्हसवडे,आदिती जोशी यांनी सूत्रसंचालन केले.अॅड. नीता जोशी, संदीप जोशी, अभिषेक जोशी,अविनाश कुलकर्णी,प्रवीण शिरसीकर,संजय देशमुख,नाना भांगे,सुधीर दाबके, अजित कुलकर्णी,तृप्ती तारे, महेंद्र मणेरीकर आदी उपस्थित होते.नितीन शुक्ल यांनी आभार मानले
प्रसिद्ध उद्योजक अनिरुद्ध देशपांडे,ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक दिलीप कोटीभास्कर यांनी उपस्थित व्यावसायिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. देशपांडे म्हणाले ‘ क्रीडा क्षेत्रामुळे दिग्गज मंडळींशी संबंध आला. त्यामुळे ब्राह्मण व्यावसायिकांनी असे मानू नये की संपर्क साधणे अवघड असते.आपल्या उद्दीष्टावर लक्ष केंद्रीत करावे,वेळ वाया घालवू नये. इतर व्यापारी समाजातील व्यक्ती व्यवसायासाठी परगावात जायला तयार असतात.आपण देखील परगावात व्यवसाय करण्याची तयारी ठेवली पाहिजे’.
दिलीप कोटीभास्कर म्हणाले,’आपण विविध विषयांवर राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करता आले पाहिजे’.बांधकाम व्यावसायिक अजित कुलकर्णी म्हणाले,’खिशात काहीही पैसे नसतानाही व्यवसाय करता येतो.अक्कलहुशारीने पुढे जाता आला पाहिजे. जिद्द, चिकाटी असली पाहिजे’. सुरेश दाबक म्हणाले,’बांधकाम व्यवसायला उद्योगाचा दर्जा मिळणे आवश्यक आहे.कमी मनुष्यबळात काम करता आले पाहिजे. मराठी मनुष्यबळ या व्यवसायात आले पाहिजे.पिनाक वाघ म्हणाले,’ विविध आदर्श डोळयासमोर असतील तर मार्ग सुकर होतो’.कपिलेश भाट्ये म्हणाले,’ चांगले भागीदार मिळणे ही महत्वाची गोष्ट ठरते’.
‘ब्राह्मण इंडस्ट्रियल अँड ट्रेडर्स ऑर्गनायझेशन ‘ (बिटो) चे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी बिटोच्या कार्याची माहिती दिली.ते म्हणाले, ‘ ब्राह्मण समाजाने नोकरी च्या मागे न लागता व्यवसायात पुढे जावे.इतर समाजाशी स्पर्धा न करता स्वतःचा ठसा उमटवावा. एकमेकांना मदत करत पुढे गेले पाहिजे.’
मुंबई, 30th जून 2025: भारतातील नंबर 1 पिकअप ब्रँड बोलेरो पिक-अपचे निर्माते महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने आज आपली संपूर्णपणे नविन बोलेरो MaXX पिक-अप HD 1.9 CNG सादर केली असून लहान व्यावसायिक वाहन विभागात एक नवीन मापदंड प्रस्थापित करत आहे. 11.19 लाख रु. (एक्स-शोरूम) किमतीत उपलब्ध असलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण पिकअपमध्ये 1.85 टनची सर्वाधिक पेलोड क्षमता आहे. त्यामुळे ग्राहकांना अतुलनीय क्षमता आणि निवडीचे स्वातंत्र्य मिळते.
एक मजबूत 2.5-लिटर टर्बोचार्ज्ड CNG इंजिनद्वारे संचालित बोलेरो MaXX पिक-अप HD 1.9 CNG 61 kW आणि श्रेणीत सर्वोत्तम 220 Nm टॉर्क @ 1,200–2,200 rpm वितरीत करते, जे कठीण भार परिस्थितीतही अतुलनीय कार्यक्षमता सुनिश्चित करते. विशेषतः लांब पल्ल्याच्या कामकाजासाठी डिझाइन करण्यात आलेले हे वाहन एक सिंगल CNG पूर्ण भरल्यावर 400 किमी* पर्यंतचा प्रभावी प्रवास करू शकते. यामध्ये 180-लिटरची टाकी क्षमता आहे. हे वाहन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि पॉवर स्टीअरिंगसह सुसज्ज असून शहरी आणि निमशहरी परिसरात सहजपणे चालवता येते.
बोलेरो MaXX पिक-अप HD 1.9 CNG हे महिंद्राचे पहिले CNG पिकअप असून, यामध्ये प्रगत iMAXX टेलिमॅटिक्स सोल्यूशनद्वारे समर्थित आधुनिक कनेक्टेड तंत्रज्ञान आहे. ही नाविन्यपूर्ण प्रणाली रिअल-टाईम वाहन माहिती पुरविते. त्यामुळे जास्त कार्यक्षम कामकाज आणि अधिक स्मार्ट फ्लीट व्यवस्थापन शक्य होते. चालकाच्या आरामाला प्राधान्य देत, या पिकअपमध्ये एअर कंडिशनिंग व हीटिंग सिस्टम असून त्यामुळे सर्व हवामान परिस्थितींमध्ये वाहन चालवणे सुलभ होते. तसेच उंचीनुसार अॅडजस्ट करता येणाऱ्या ड्रायव्हर सीटमुळे एर्गोनोमिक सपोर्ट मिळतो. शिवाय, D+2 आसनरचना यामुळे या वाहनाचा वापर अनेक प्रकारच्या उपयोजनांसाठी केला जाऊ शकतो.
3050 mm लांबीचा प्रशस्त कार्गो बेड असलेले हे वाहन सहजतेने मोठे लोड हाताळू शकते. यामध्ये मजबूत 16-इंच टायर आणि पुढील व मागील अॅक्सलवर टिकाऊ लीफ स्प्रिंग सस्पेंशन देण्यात आले आहेत. ते विविध प्रकारच्या प्रदेशात उत्कृष्ट पकड आणि स्थिरता पुरविते.
महिंद्राने बोलेरो MaXX पिक-अप HD 1.9 CNG चे सादरीकरण करून मजबूती, टिकाऊपणा, विश्वासार्हता, कमी देखभाल खर्च आणि उच्च पुनर्विक्री मूल्यासंदर्भातील आपले नेतृत्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. भारताच्या वाहतूक व लॉजिस्टिक्स क्षेत्राच्या सतत बदलत्या गरजांना पूर्ततेसाठी हे भविष्यकालीन उपयुक्त वाहन खास तयार करण्यात आले आहे.
दिव्यांग शिबीरात ५०० हून अधिक दिव्यागांनी घेतला विविध सेवांचा लाभ
पुणे, 30: दिव्यांगत्वामुळे हालचाल करण्यास असमर्थ असणाऱ्या दिव्यांग बालकांच्या वैद्यकीय मूल्यमापनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने घरपोच सुविधा पुरविण्यात येणार आहे. याकरिता प्राधिकरणाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन यांनी केले.
उच्च न्यायालयाची किशोर न्याय समिती व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने बाल कल्याण संस्था, गणेशखिंड येथे आयोजित दिव्यांग नागरिकांकरिता विशेष सशक्तीकरण शिबीर शुक्रवारी (दि.२८) आयोजित करण्यात आले. या शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील, दिव्यांग आयुक्तालयाचे आयुक्त प्रवीण पुरी, बाल कल्याण संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री प्रतापराव पवार, पिंपरी-चिंचवड येथील दिव्यांग भवनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, दिव्यांग कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त संगीता डावखर आदी यावेळी उपस्थित होते.
प्रत्येक दिव्यांग मुलाला त्यांच्या क्षमतेची पर्वा न करता वाढण्याची, शिकण्याची आणि यशस्वी होण्याची समान संधी मिळायला हवी, असे सांगून न्यायाधीश श्री. महाजन म्हणाले, दिव्यांगाचे समावेशन हा त्यांचा अधिकार असून कोणतेही दिव्यांग बालक दुर्लक्षित राहू नये, ही आपली सामूहिक बांधिलकी आहे. दिव्यांगाकरिता आयोजित शिबीर हे सेवा पुरवण्यापुरते मर्यादित नसून समावेशक व न्याय्य समाज निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, असेही ते म्हणाले.
दिव्यांग बांधवाचे सक्षमीकरण करणे सामूहिक जबाबदारी-सोनल पाटील दिव्यांग मुलांचा समाजातील प्रत्येक घटकात समावेश करून समाजाची वीण अधिक मजबूत करण्याच्यादृष्टीने त्यांचे सक्षमीकरण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. या शिबिराच्या माध्यमातून न्याय व्यवस्था, प्रशासन, वैद्यकीय सेवा आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन दिव्यांग मुलांच्या समावेशन, सन्मान आणि सशक्तीकरणासाठी एक प्रभावी पाऊल उचलले आहे. यापुढेही दिव्यांग बांधवाच्या सक्षमीकरणाकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण प्रयत्नशील राहील, असे श्रीमती पाटील यांनी नमूद केले.
या शिबिरात १०० पेक्षा अधिक दिव्यांग मुलांची वैद्यकीय तपासणी व प्रमाणपत्राचे वितरण तसेच ५०० हून अधिक लाभार्थ्यांना विविध कायदेशीर, वैद्यकीय व कल्याणकारी सेवांचा लाभ देण्यात आला. दिव्यांग मुलांसाठी समुपदेशन, पालकांसाठी मार्गदर्शन व समुपदेशन, आधार कार्ड नोंदणी, मोफत कायदेशीर सल्ला व मदत, पुणे महानगरपालिक व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांमधील विविध लोककल्याणकारी योजनांकरिता नोंदणी, राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या सुविधांबाबत मार्गदर्शन, राष्ट्रीय विश्वस्त संस्था अधिनियमाअंतर्गत लाभ, शासकीय कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग मुलांसाठी निवृत्तीवेतन योजना, शिष्यवृत्ती योजना आदींबाबत माहिती देण्यात आली.
औंध जिल्हा रुग्णालय व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, पिंपरी येथील डॉक्टरांच्या पथकामार्फत दिव्यांग बांधवाची अंधत्व, अल्प दृष्टिक्षमतेचा दोष, श्रवण क्षमता कमी होणे, हालचालींचा अडथळा, बौद्धिक दिव्यांगत्व, मानसिक आजार, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, सेरेब्रल पाल्सी, पार्किन्सन आजार, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, मल्टिपल स्क्लेरोसिस, वाणी व भाषा दिव्यांगत्व, थॅलेसेमिया, हिमोफिलिया, सिकल सेल अॅनिमिया आदी दिव्यांगत्व अपंगत्व, जुनाट न्यूरोलॉजिकल स्थिती, शिकण्याची अडचण, आम्ल हल्ला ग्रस्त, बुटकेपणा, एकाधिक दिव्यांगत्वांचे मिश्र स्वरूप आदी आजाराची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
बाल कल्याण संस्था, ॲक्शन फॉर इम्पॅक्ट फाउंडेशन, एकांश ट्रस्ट, सप्तऋषी फाउंडेशनच्यावतीने आधार कार्ड नोंदणी, जैन डिव्हाईन ग्रुपच्यावतीने व्हीलचेअर व स्कूल बॅग वाटप आदी माध्यमातून सामाजिक संस्थांनी शिबीरात सक्रीय सहभाग नोंदविला. यावेळी ॲक्शन फॉर इम्पॅक्ट फाउंडेशनचे प्रतीक इंगळे, एकांश ट्रस्टच्या अनिता अय्यर, जैन डिव्हाईन ग्रुपचे संकेत शहा, आदी उपस्थित होते.
पुणे, दि. ३०: राष्ट्रीय महिला आयोगाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचे जलद आणि प्रभावी निराकरण करण्यासाठी आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली २ जुलै २०२५ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बहुउद्देशीय सभागृह, पाचवा मजला, पुणे येथे महिला जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनिषा बिरारीस यांनी दिली आहे.
या जनसुनावणी दरम्यान पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच पुणे ग्रामीण पोलीसांशी संबंधित सन २०२३, २०२४ आणि २०२५ या वर्षातील सुमारे ३५ प्रलंबित तक्रारींची वॉक-इन तक्रारदारांसह सुनावणी घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या पथकाच्यावतीने दुपारी १२ वाजता संबंधित ठिकाणी प्राथमिक सुनावणी सुरु करणार असून आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रहाटकर ह्या दुपारी २ वाजता सुनावणी घेणार आहेत.
या जनसुनावणीसाठी तक्रारदार महिलांना थेट सुनावणीस उपस्थित राहून त्यांची तक्रार लेखी स्वरुपात मांडता येणार असून पीडित वा तक्रारदार महिलांनी जनसुनावणीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहनही श्रीमती बिरारीस यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.
उद्गारतर्फे पं. रोहिणी भाटे यांना नृत्यांजली अर्पण.
पुणे ता. 30: पं. रोहिणीताई भाटे यांच्या नृत्यशैलीचा वारसा लाभलेल्या संगीताचार्य आसावरी पाटणकर यांच्या शिष्यांकडून बहारदार नृत्यरचना सादर करत गुरु पं. भाटे यांना नृत्यांजली अर्पण करण्यात आली. उद्गार संस्थेतर्फे आयोजित संवेदना या कार्यक्रमातून गुरु शिष्य परंपरेचा वारसा उलगडला.
बाल शिक्षण मंदिर, मयूर कॉलनी कोथरूड येथे हा कार्यक्रम पार पडला. यास ब्रह्मचैतन्य उदयनाथ महाराज, उस्ताद उस्मान खान, उस्ताद फैय्याज हुसैन खान आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वतः आसावरीताई व त्यांच्या शिष्यांनी नृत्यरूपी गुरुदक्षिणा देत रोहिणीताई भाटे यांच्या स्मृतींना अभिवादन केले. दुर्गा स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर उद्गारच्या शिष्यांनी ताल धमार अतिशय सक्षमपणे पेलत, त्याची सुंदर मांडणी करत तो पूर्ण तयारीनिशी प्रेक्षकांसमोर मांडला. ज्येष्ठ तबलावादक गुरु पं. अरविंदकुमार आजाद यांच्याकडून प्राप्त झालेल्या रचना व काही बंदिशी सादर करत उत्कृष्ट पदन्यासाचे शिष्यांनी दर्शन घडविले.
अपर्णा पानसे यांनी कवी सुरदास रचित प्रीती करि काहू, सुख ना लह्यो यावर केलेला नृत्याभिनय रसिकांना विशेष भावला. तर साडेनऊ मात्रांच्या ताल सादरीकरणातून त्यांच्यातील सूक्ष्म अभ्यासू वृत्तीची झलक प्रेक्षकांना घडली. सीतेचे क्रोध हरण हा आसावरीताईंचा स्वरचित गतभाव तसेच राधा ही संरचना यातून नृत्याविष्कार आणि अभिनय याची सुंदर सांगड प्रेक्षकांनी अनुभवली. गुरूंकडून लाभलेल्या परंपरेला स्वत:च्या विचारातून दिलेला आयाम हे या एकूणच सादरीकरणाचे वैशिष्ट्य होते.
यावेळी तबला श्री आदित्य देशमुख, संवादिनी देवेंद्र देशपांडे, गायन अर्पिता वैशंपायन आणि बासरी आदित्य गोगटे यांनी समर्पक साथ दिली.
ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्राचा चतुर्थ पदवी प्रदान सोहळा व शारदा, रत्नमाला पुरस्कारांसह विविध पुरस्कारांचे वितरण पुणे : विज्ञानावर आधारित अभ्यास आणि संशोधन ही केवळ ज्योतिष शास्त्राचीच नव्हे तर काळाची गरज आहे. विज्ञान हे ज्योतिषशास्त्राचे मूळ आहे. त्यामुळे ज्योतिष शास्त्रामध्ये अंधश्रद्धेला वाव नाही, असे मत ज्येष्ठ पंचांग कर्ते मोहन दाते यांनी व्यक्त केले.
ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र, पुणे यांच्या वतीने चतुर्थ पदवी प्रमाणपत्र वितरण व पुरस्कार सोहळ्याचे भव्य आयोजन पद्मावती येथील विणकर सभागृहात करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ ज्योतिषतज्ञ शुभांगिनी पांगारकर, संस्थेचे अध्यक्ष वेदमूर्ती उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी उपस्थित होते. विद्यावाचस्पती ज्येष्ठ गाणपत्य डॉ. स्वानंद पुंड महाराज यांना शारदा पुरस्कार, अभिनव ज्योतिष मंडळ सोलापूर या संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ पंचांगकर्ते मोहन दाते यांना रत्नमाला पुरस्कार, योगीराज वेद विज्ञान आश्रम या पाठशाळेचे अध्यक्ष अश्वमेघयाजी चैतन्य नारायण काळे गुरुजी यांना वेद संवर्धन प्रेरणा पुरस्कार, वेदमूर्ती दत्तात्रय मनोहर साधले गुरुजी यांना वेदमार्ग दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात वास्तु विशारद, लोलक विशारद, अंक विशारद आणि वास्तु भूषण अभ्यासक्रम पूर्ण करणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. या वर्षीच्या पदवी वितरण सोहळ्यात १२० हून अधिक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गौरवचिन्ह प्रदान करण्यात आले. पुरोहितांचे मंगल मंत्र पठण, सान्वी फुंडकर यांचे सुसंस्कृत नृत्य आणि सन्मान समारंभ पार पडला.
मोहन दाते म्हणाले, ज्योतिष शास्त्रामध्ये अधिक अभ्यास आणि संशोधन केले पाहिजे. संस्कृती जपण्यासाठी विज्ञानावर आधारित ज्योतिष शास्त्र पुढील पिढीपर्यंत जाणे गरजेचे आहे समाजामध्ये काळाप्रमाणे बदल घडत आहेत. पूर्वी बहपत्नीत्व संकल्पना होती, परंतु आता ती दूर झाली आहे. त्यानुसारच ज्योतिषशास्त्राचा अभ्यास झाला पाहिजे.
स्वानंद पुंड म्हणाले, माणसाला जगण्यासाठी बुद्धी आणि सिद्धी दोन्ही ची गरज असते. केवळ विद्वत्ता किंवा पुस्तकी ज्ञान असणे गरजेचे नाही, तर त्याला व्यवहार ज्ञानाचीही जोड असावी लागते. अध्यात्माच्या माध्यमातून स्वानंदाची प्राप्ती होते, असेही त्यांनी सांगितले.
वेदमूर्ती दत्तात्रय मनोहर साधले म्हणाले, ज्योतिषाचे मूळ वेद आहे. काळानुसार आपल्या पूर्वजांनी यज्ञाचे अनुसरण केले आहे. वेदांमध्ये सर्व शास्त्राची उत्पत्ती झाली आहे. जे सहा शास्त्र विज्ञानाच्या माध्यमातून निर्माण झाले आहेत, त्यापैकी एक ज्योतिष शास्त्र आहे. चैतन्य नारायण काळे गुरुजी म्हणाले, योगामध्ये विज्ञानाचा समावेश आहे. त्यामुळे योग विद्येकडे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. विज्ञानावर आधारित योग आणि वेद तरुणांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. वेदांवर आधारित हजारो ज्योतिष विषयक ग्रंथांची निर्मिती झाली आहे, हे ग्रंथही तरुणांना मिळणे आवश्यक आहे.
वेदमूर्ती उमेश कुलकर्णी म्हणाले, विज्ञानावर आधारित ज्योतिष वास्तुविद्येचे अध्ययन केलेले लाखो वास्तु ज्योतिष विशारद तयार करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. आमच्या विद्यार्थ्यांना स्वत:चे व्यासपीठ मिळावे, त्यांना इतरांकडे व्यासपीठ मिळवण्यासाठी याचना करायला लागू नये, यासाठीच पुरस्कार आणि अशा प्रकारच्या उपक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाला आणि व्यासपीठाला तरुणांचा दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे, असेही त्यांनी सांगितले.देश विदेशातील जवळपास १७५ विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
दुपारी विशेष सत्रात विद्यार्थ्यांचे मनोगत तसेच प्रॅक्टिकल वास्तू व्हिजीट आयोजित करण्यात आली होती. वास्तु व्हिजिटच्या वेळी गुरुजींनी विद्यार्थ्यांकडून प्रतिज्ञा करून घेतली की आलेल्या जातकाची कोणत्याही परिस्थितीत फसवणूक करायची नाही. ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र हे गेल्या अनेक वर्षांपासून वास्तूशास्त्र, अंकशास्त्र व ज्योतिषशास्त्राच्या क्षेत्रात गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देत आहे. आजवर या संस्थेतून ३,००० पेक्षा अधिक विद्यार्थी यशस्वीरीत्या प्रशिक्षित होऊन समाजसेवेच्या माध्यमातून स्वत:चे यशस्वी करियर घडवत आहेत.
पुणे दि. 30: बाल न्याय (मुलांचे काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ अंतर्गत नोंदणीकृत तसेच मान्यता प्राप्त संस्थांच्या तपासणीकरिता जिल्हास्तरावर गठीत तपासणी समितीवर अशासकीय व्यक्तींची नियुक्ती करण्यात येणार असून इच्छुकांनी आपला अर्ज 21 जुलै 2025 पर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय येथे पाठविण्याचे आवाहन करण्यात आहे.
या समितीवर बाल हक्क, संगोपन, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कार्यरत असलेल्या नागरी समुहाचा एक सदस्य व बालकांसोबत काम करण्याचा अनुभव असलेला एक मानसोपचार तज्ज्ञ असे दोन सदस्य निवडण्यात येणार आहे. याकरिता अर्जदार किमान पदवीधर असावा. बाल हक्क, काळजी, संरक्षण आणि कल्याण क्षेत्रातील किमान १० वर्षाचा अनुभव असावा. अर्जदाराचे वय ३५ पेक्षा कमी आणि ६५ पेक्षा अधिक नसावे. अशासकीय सदस्याचा कालावधी नेमणुकीच्या दिनांकापासून तीन वर्षाचा राहील.
अधिक माहितीकरिता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्र परिसर, बिडी कामगार वसाहत, गोल्फ क्लब रोड, आंबेडकर चौक, येरवडा, पुणे ४११००६ या पत्त्यावर तसेच कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२०-२५५३६८७ आणि jimbapune@yahoo.com या इमेल पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती बिरारीस यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.
फुफ्फुस प्रत्यारोपणानंतर जवान पुन्हा: देश सेवेसाठी सज्ज लष्करी सेवेतील जवानावर फुफ्फुस प्रत्यारोपणाची भारतातील पहिली शस्त्रक्रिया. रुग्ण पल्मोनरी लँगरहॅन्स सेल हिस्टियोसाइटोसिस (PLCH) या दुर्मिळ फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त होता आणि ऑक्सिजनवर पूर्णपणे अवलंबून होता. महाराष्ट्र पोलिसांच्या ५ पथकांच्या मदतीने मुंबई ते पुणे ग्रीन कॉरिडॉर साकारण्यात आला आणि अवयव दोन तासांपेक्षा कमी वेळेत पोहोचवले गेले.
डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे यांनी आतापर्यंत ४६० हून अधिक प्रत्यारोपण यशस्वीपणे पूर्ण केली आहेत – ज्यामध्ये ३२ दुहेरी फुफ्फुस प्रत्यारोपण, ४ हृदय व फुफ्फुस एकत्रित प्रत्यारोपण, ४ स्वतंत्र हृदय प्रत्यारोपण, आणि १ हृदय व मूत्रपिंड एकत्रित प्रत्यारोपण यांचा समावेश आहे – ज्यामुळे ते भारतातील अवयव प्रत्यारोपण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था म्हणून सिद्ध झाले आहेत.
पुणे : जम्मू आणि काश्मीरमधील ३० वर्षीय सेवारत भारतीय लष्करी अधिकारी एका दुर्मिळ आणि जीवघेण्या फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त होता. त्याच्यावर डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे येथे यशस्वी दुहेरी फुफ्फुस प्रत्यारोपण करण्यात आले. या ऐतिहासिक शस्त्रक्रियेद्वारे भारतात लष्करी सेवेतील जवानावर करण्यात आलेले पहिले यशस्वी दुहेरी फुफ्फुस प्रत्यारोपण पूर्ण झाले असून, यामुळे डीपीयु हे क्रिटिकल केअर आणि प्रगत प्रत्यारोपण विज्ञानाचे प्रमुख केंद्र म्हणून पुन्हा अधोरेखित झाले आहे. या अधिकाऱ्याला पल्मोनरी लॅंगरहॅन्स सेल हिस्टियोसाइटोसिस (PLCH) या दुर्मिळ इंटरस्टिशियल फुफ्फुस विकाराचे निदान झाले होते, जो हळूहळू श्वसनक्रियेचा अपयश घडवून आणणारा आजार आहे. प्रकृती खालावत गेल्याने तो पूर्णपणे ऑक्सिजनवर अवलंबून आणि अंथरुणावर खिळून होता. कार्डिओथोरेसिक सेंटर, कमांड हॉस्पिटल, पुणे येथून त्याला रेफर केल्यानंतर, त्याची तपासणी करून २० मार्च २०२५ रोजी डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे येथे प्रत्यारोपणासाठी नोंदणी करण्यात आली. १४ एप्रिल २०२५ रोजी एक अत्यंत क्लिष्ट १२ तासांची शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णाची प्रकृती लक्षणीयरीत्या सुधारली — एका आठवड्याच्या आत ऑक्सिजन शिवाय श्वसन करू लागला आणि दोन आठवड्यांत डिस्चार्ज होऊन तो चालत आणि स्वतंत्रपणे श्वसन करत घरी गेला. मा. डॉ. पी. डी. पाटील, कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे म्हणाले, “हे प्रत्यारोपण आपल्या आरोग्यसेवा प्रणालीच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे, जिथे प्रगत सुविधा, अनुभवी वैद्यकीय तज्ज्ञ आणि समर्पित सहायक टीम एकत्र येऊन असामान्य शक्य करतात. डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने एका सेवारत जवानाच्या पुनर्प्राप्तीचा भाग बनू शकलो याचा आम्हाला अभिमान आहे. ट्रान्सप्लांट आणि रिहॅबिलिटेशन टीमपासून ते कोऑर्डिनेटर्स, नर्सिंग स्टाफ आणि ग्रीन कॉरिडॉर शक्य करणाऱ्या प्रशासनापर्यंत प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार.” मा. डॉ. (सौ.) भाग्यश्री पी. पाटील, प्र-कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे, म्हणाल्या, “आपल्या रुग्णालयामार्फत स्पर्शलेले प्रत्येक जीवन हे आमच्या उद्देशपूर्ण उपचारांप्रती असलेल्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. एका जवानाच्या अशा गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून पुनर्प्राप्तीला पाठिंबा देणे हे आमच्या मूल्यांचे दर्शन घडवते — करुणा, उत्कृष्टता आणि राष्ट्रसेवा. देशासाठी सेवा केलेल्या व्यक्तीची काळजी घेणे हा आमचा सन्मान आहे. डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हे प्रगत वैद्यकीय सेवांचे केंद्र आहे, जिथे वैद्यकीय उत्कृष्टता, सहवेदना आणि राष्ट्रीय जबाबदारी यांचे संतुलन साधले जाते.”
डॉ. संदीप अट्टावार, लीड ट्रान्सप्लांट सर्जन, डीपीयु सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे, म्हणाले, “PLCH हा दुर्मिळ आणि गुंतागुंतीचा आजार आहे. या प्रत्यारोपणासाठी वैद्यकीय अचूकता, समन्वय आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विश्वास आवश्यक होता. रुग्णाची इतक्या वेगाने सुधारणा होणे ही प्रत्येक विभागाच्या एकत्रित समन्वयाची फलश्रुती आहे.” डॉ. राहुल केंद्रे, ट्रान्सप्लांट पल्मोनॉलॉजिस्ट, डीपीयु सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे, म्हणाले, “देशासाठी सेवा केलेल्या व्यक्तीची सेवा करणे हे आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट होती. त्याची इच्छाशक्ती, संपूर्ण टीमचे समन्वय आणि वेळेवर मिळालेली काळजी यामुळे हे यश शक्य झाले.” डॉ. रेखा आर्कोट, अधिष्ठाता, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, म्हणाल्या, “भारतीय लष्कराच्या एका शूर सेवेतील अधिकाऱ्यावर केलेले हे जीवन वाचवणारे फुफ्फुस प्रत्यारोपण हे केवळ वैद्यकीय मैलाचा दगड नसून, सेवा आणि बलिदानाच्या भावनेला अर्पण आहे. एका जवानाला आयुष्यात दुसरी संधी देण्यात आमची भूमिका असणे हे आम्हाला अत्यंत सन्मानाचे वाटते. आमची टीम जे करत आहे ते राष्ट्रसेवेच्या सन्मानातून प्रेरित आहे. हे यश आम्हा सर्वांसाठी अभिमान, कृतज्ञता आणि आशेचा क्षण आहे.” इंटेन्सिव्ह केअर युनिट (ICU) टीम, डॉ. प्रशांत साखवळकर (इंटेन्सिविस्ट) यांच्या नेतृत्वाखाली रुग्णाची स्थिरता आणि पुनर्प्राप्ती सुनिश्चित करत होती. त्यांना डॉ. असीर तांबोळी, डॉ. स्वप्नील, डॉ. सागर, डॉ. विरें आणि डॉ. अमेय साळवे यांचा साथ मिळाला. डॉ. संजप्रिया, डॉ. प्रतीक्षा आणि डॉ. शिफा यांनी विभागांमधील दैनंदिन समन्वय साधला. डॉ. रणजित जोएल आणि डॉ. अशोक यांनी रुग्णाच्या पुनर्वसन आणि फिजिओथेरपीची जबाबदारी पार पाडली आणि त्याच्या पूर्ण कार्यक्षमतेची पुनर्प्राप्ती सुनिश्चित केली. या प्रत्यारोपणात ऑपरेशन्स टीम ने महत्त्वाची भूमिका बजावली. ऑपरेटिंग थिएटरमध्ये सिजो राजन, रीजो कुरियाकोस, रोहिणी आणि वामिक यांनी अवयव काढणे आणि प्रत्यारोपणाची प्रक्रिया दोन OT सेटअप्समध्ये पार पाडली. हलीमथ, विशाल आणि सुनील यांनी अवयव परफ्युजन आणि ECMO सपोर्ट हाताळले. श्री. भगवत पाटील, ब्रॉन्कोस्कोपिक टेक्निशियन, यांनी प्री-ऑपरेटिव्ह तपासण्या सुरळीत पार पाडल्या. ICU नर्सिंग टीम – गणेश मुंडे, पूजा, प्रीती, नयना, वैशाली, सोनाली आणि कविता यांनी शस्त्रक्रियेपूर्व काळजीपासून डिस्चार्जपर्यंत दक्ष आणि करुणाशील सेवा दिली. ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन – दस्तऐवजीकरण, ZTCC चे पालन आणि क्लिनिकल मॅचिंग – हे श्री. अरुण अशोकन आणि सौ. वसंती यांनी वेळेत आणि काटेकोरपणे पार पाडले. संपूर्ण संस्थात्मक फ्रेमवर्क आणि ऑपरेशनल तयारीचे नेतृत्व डॉ. एच. एच. चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक, डीपीयु सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी यांनी केले. त्यांचे मार्गदर्शन आणि देखरेख यामुळे वैद्यकीय, शस्त्रक्रिया आणि प्रशासकीय टीममध्ये अचूक समन्वय साधता आला. या प्रत्यारोपणातील अंतिम आणि सर्वात वेळेवर भाग म्हणजे दाता फुफ्फुसांची वाहतूक, जी लष्करी अचूकतेने पार पडली. झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर (ZTCC) च्या मंजुरीनंतर, सौ. आरती यांच्या समन्वयातून डोंबिवली ते पुणे केवळ दोन तासांच्या आत ग्रीन कॉरिडॉर द्वारे फुफ्फुस पोहोचवले गेले. या मिशनचे नेतृत्व श्री. प्रमोद पाटील, प्रशासकीय प्रमुख, डीपीयु सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांनी आणि श्री. पार्थसारथी शानमुगम, प्रशासकीय प्रमुख, अवयव प्रत्यारोपण यांनी केले, आणि ट्राफिक कमिशनर्स आणि जिल्ह्यातील शहर वाहतूक प्रशासनाच्या सहयोगाने हे यशस्वी झाले. डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या विलक्षण टीमवर्क, वैद्यकीय कौशल्य आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे, आज एक सेवारत भारतीय लष्करी जवान मुक्तपणे श्वास घेत आहे आणि नव्या ताकदीने आणि सन्मानाने आयुष्याकडे पाहत आहे. हे रुग्णालय प्रत्यारोपण विज्ञान पुढे नेण्यासाठी आणि अवयवदानाच्या जीवन वाचवणाऱ्या प्रभावाविषयी देशव्यापी जागरूकता वाढवण्यासाठी कटिबद्ध आहे.
शहराच्या पाहुणचार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तींना मिळणार सन्मान डीएलसी गाइड ही जगातील पहिली स्वतंत्र दर्जांकन प्रणाली असून, तिचे सक्रिय अध्याय न्यूयॉर्क, लंडन,
दुबई, मुंबई, बंगळुरू आणि दिल्ली या आघाडीच्या शहरांमध्ये कार्यरत.
पुणे : फाईन डाइन रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्ससाठी खास विकसित करण्यात आलेली ‘डीएलसी गाइड’ ही जगातील पहिली स्वतंत्र दर्जांकन प्रणाली आता पुण्यामध्ये अधिकृतपणे प्रकाशित करण्यात आली आहे. डेला ग्रुपचे संस्थापक व अध्यक्ष जिमी मिस्त्री यांची ‘डीएलसी गाइड’ ही संकल्पना आहे. त्यांनी मिशलिन आणि फोर्ब्स गाइड्स यांपासून प्रेरणा घेत एक परिवर्तन घडवणारी आणि पूर्णतः स्वतंत्र मानांकन प्रणाली तयार केली आहे. जगभरातील आघाडीच्या हॉटेल्ससाठी आणि रेस्टॉरंट्ससाठी नव्या मापदंडांची मांडणी तिच्यातून केली जाते. न्यूयॉर्क, लंडन, दुबई, मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू यांसारख्या मोठ्या शहरांमधील यशस्वी अध्यायांनंतर, पुण्यातील प्रकाशन हा ‘डीएलसी’च्या जागतिक प्रवासातील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो. जगभरात पाहुणचाराच्या उच्चतम दर्जांची ओळख समुदाय-आधारित दृष्टिकोनातून दिली जात असाना पुण्यात ‘डीएलसी गाइड’चे प्रकाशन होणे ही मोठ्या औचित्याची बाब आहे. या प्रकाशन समारंभाला पुण्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख राजेश बनसोडे हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे ‘कायनेटिक इंजिनिअरिंग’चे व्यवस्थापकीय संचालक अजिंक्य फिरोदिया, ‘कायनेटिक ग्रीन’च्या संस्थापिका व मुख्य कार्यकारी अधिकारी सुलज्जा फिरोदिया मोटवानी, ‘बादल साबू ग्रुप’चे संस्थापक बादल साबू, ‘फाइव्ह-एफ वर्ल्ड’चे कार्यकारी अध्यक्ष डॉ. गणेश नटराजन, सेलिब्रिटी शेफ अमृता रायचंद, ‘क्रिसाला डेव्हलपर्स’चे अध्यक्ष सागर अग्रवाल आणि ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. योगेश म्हसे या उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी आणि ‘डीएलसी’च्या परीक्षकांनी उपस्थित राहून या उपक्रमाच्या उच्च विश्वासार्हतेला आणि उद्योजकीय आधाराला अधोरेखित केले.
‘डीएलसी गाइड पुणे २०२५’मध्ये पुढील रेस्टॉरंट्सचा व मान्यवरांचा समावेश आहे : ताओ-फू, जे डब्ल्यू मॅरियट – शेफ फू लेई उकियो, द रिट्झ कार्लटन – शेफ अभिषेक कुमार बॅस्टियन एम्पायर – रंजीत बिंद्रा अल्टो विनो, जे डब्ल्यू मॅरियट – शेफ ख्रिश्चियन हुबर आस्माना, द रिट्झ कार्लटन – शेफ निशेष भार्गव त्सुकी – शेफ निलांजन मैती मोचा – शेफ राजीव कुमार अल दी ला – शेफ तपस मन्ना
पुण्याच्या विकसित होत असलेल्या खाद्यसंस्कृतीत दिलेल्या अत्युत्कृष्ट योगदानासाठी या रेस्टॉरंट्सना गौरवण्यात आले आहे. यापूर्वी, ‘डीएलसी गाइड’ने न्यूयॉर्कमधील बंगलो – शेफ विकास खन्ना, झुमा – शेफ डॅनिएल सू, इंडियन अॅक्सेंट – शेफ शांतनू मेहरोत्रा; लंडनमधील जिमखाना – शेफ सिद आहुजा, बनारस – शेफ समीर तनेजा, कर्नल साब – शेफ सोहन भंडारी; दुबईमधील किनोया – शेफ नेहा मिश्रा, रो-ऑन४५ – शेफ जेसन अॅथर्टन, त्रेसिंड – शेफ मोहम्मद झीशान, मेसान १५ – शेफ रीटा सुएदान; दिल्लीतील हाऊस ऑफ मिंग, (ताज महाल), बुखारा (आयटीसी), अल्बेरो (ताज चेंबर्स); आणि बंगळुरूमधील लुपा – शेफ मनु चंद्रा, द १३थ फ्लोअर – शेफ खगराज शर्मा, फार्मलोर – शेफ जॉन्सन एडेनेझर यांसारख्या प्रतिष्ठित रेस्टॉरंट्सचा सन्मान केला आहे. आजवर ५०पेक्षा जास्त रेस्टॉरंट्सना डीएलसी गाइडचा सन्मान मिळाला आहे, तसेच ४०हून अधिक आंतरराष्ट्रीय परीक्षक या पॅनलवर कार्यरत आहेत. ही क्रांतिकारी जागतिक दर्जांकन प्रणाली पाहुणचार आणि पाककलेतील उत्कृष्टतेची नवी मापदंडे निश्चित करत आहे आणि जागतिक स्तरावर आदर्श निर्माण करत आहे. या कार्यक्रमात बोलताना ‘डेला ग्रुप’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जिमी मिस्त्री म्हणाले, “पाहुणचार म्हणजे केवळ चविष्ट जेवण वाढणे किंवा जागा आलिशानपणे सजवणे नव्हे, तर आयुष्याला स्पर्श करणारे, संवादाला प्रोत्साहन देणारे आणि वारसा घडवणारे अनुभव निर्माण करणे! डीएलसी गाइडच्या माध्यमातून आम्ही केवळ उत्कृष्टतेचा सन्मान करत नाही, तर जगासाठी दर्जाचे नवे निकष ठरवीत आहोत. मी नेहमी स्पष्टता आणि हेतुपूर्णतेच्या आधारे विचार मांडण्यावर विश्वास ठेवतो. आमचे हे गाइड आदरातिथ्य उद्योगाच्या अधिक प्रामाणिक, प्रेरणादायी आणि उद्योजकतेच्या नेतृत्वाखालील भविष्याकडे नेणारे आमचे एक मोठे पाऊल आहे.” डेला लीडर्स क्लब (डीएलसी) हा उद्योजक, व्यावसायिक आणि नव्या पिढीतील नेत्यांचे जागतिक समुदाय उभारण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेला जगातील पहिला व्यावसायिक मंच आहे. द्रष्टे उद्योजक जिमी मिस्त्री यांनी स्थापन केलेल्या या क्लबचा १७ शहरांमध्ये विस्तार असून, यामध्ये २,८०० हून अधिक सदस्य कार्यरत आहेत. हा मंच जागतिक पातळीवरील सहकार्य, ज्ञानाची देवाणघेवाण आणि नेतृत्व विकासासाठी प्रेरणा देतो. लक्झरी रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्ससाठीचा स्वतंत्र जागतिक दर्जांकन मानदंड असलेल्या डीएलसी गाइडसारख्या उपक्रमांद्वारे डीएलसी ही प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि मूल्यनिर्मिती यांचे प्रतिनिधित्व करते. या गाइडमध्ये कोणतेही व्यावसायिक पूर्वग्रह नसल्याने, डीएलसी सदस्यांना उद्दिष्टपूर्ण नेतृत्व करण्याची, दर्जा उंचावण्याची आणि परिणामकारक सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा मिळते. ‘डेला टाउनशिप’मध्ये जागतिक चवींचे अनुभव, विचारपूर्वक निवडलेली समुदायसंस्था असा खास ‘डीएलसी टच’ ‘डेला’च्या आगामी थीमआधारित टाउनशिप्सना या जागतिक खाद्यसांस्कृतिक सन्मानाचा सुंदर अनुभव मिळणार आहे. ‘उत्कृष्ट लाईफस्टाइलला प्राधान्य देणारी ठिकाणे’ अशी ओळख या टाऊनशिप्सना मिळेल. डीएलसी गाइड या प्रणालीचा एक भाग झाल्यामुळे, येथील रहिवाशांना आता उत्कृष्ट रचना, दर्जेदार पाहुणचार आणि जागतिक स्तरावरील भोजनमानकांद्वारे घडवलेला एक उच्च प्रतीचा, जागतिक निकषांवर आधारित जीवनानुभव मिळणार आहे.
जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणे आणि रुबी हॉल क्लिनिक यांच्यावतीने डॉक्टरांचा सन्मान व वैद्यकीय परिषद
सर्वोत्तम जनरल प्रॅक्टिशनर पुरस्कार डॉ. सुनिल अंभोरे यांना प्रदान
पुणे : जेव्हा रुग्ण बरा होऊन रुग्णालयातून बाहेर पडतो. तेव्हा तो देवासोबतच त्याला वाचवणाऱ्या डाॅक्टरांसमोर देखील नतमस्तक होतो. डाॅक्टर रुग्णाला औषधासोबतच जगण्याचे बळ देखील देतात. रुग्णाला आधार आणि मार्गदर्शन करतात. समाजाने डाॅक्टरांचे कितीही ऋण फेडले तरी ते कमीच ठरेल. असे मत एमएमआरडीए, वांद्रेचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी व्यक्त केले.
डॉक्टर्स डे निमित्ताने जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन,पुणे आणि रुबी हॉल क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने डाॅक्टर्स डे निमित्त वैद्यकीय परिषद आणि सर्वोत्तम जनरल प्रॅक्टिशनर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात वर्षातील सर्वोत्तम जनरल प्रॅक्टिशनर पुरस्कार डॉ. सुनिल दिवाकर अंभोरे यांना प्रदान करण्यात आले. पगडी, सन्मानचिन्ह आणि उपरणे असे पुरस्काराचे स्वरुप होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून पुणे महानगरपालिका वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रल्हाद पाटील, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन पुणेचे अध्यक्ष डॉ. सुनिल भुजबळ, उपाध्यक्ष डॉ. अप्पासाहेब काकडे, सचिव डॉ. भाग्यश्री मुनोत-मेहता, डॉ.राजेश दोशी, सहसचिव हे पदाधिकारी उपस्थित होते.
वैद्यकीय परिषदेत विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. डॉ. साक्षे जैन यांचे द ट्रिनिटी थर्ड जेंडर, डॉ. कपिल झिरपे यांचे हवेद्वारे पसरणाऱ्या आजारांवरील संक्रमण नियंत्रण, डॉ. हिमेश गांधी यांचे युरोलॉजीमधील रोबोटिक सर्जरी व प्रोस्टेट वरील मिनिमली इनवेसिव्ह सर्जरी, डॉ. उर्मी शेठ यांचे रक्तक्षयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, डॉ. पियुष लोढा यांचे एन्डोक्रायनॉलॉजीतील रंजक केसेस, डॉ. सायमन ग्रांट यांचे वैद्यकीय तंत्रज्ञानातील नवनवीन प्रयोग या विषयावर व्याख्याने झाली.
अमृत नाटेकर म्हणाले, डॉक्टर हे चालते बोलते देव आहेत,आपल्यासाठी ते देवासमान आहेत. कोविड सारख्या काळात त्यांनी देवदूतासारखी भूमिका बजावली. जेव्हा संपूर्ण देश आणि जग महामारीच्या संकटात अडकले होते, तेव्हा डॉक्टरांनी जीव धोक्यात घालून जगाला वाचवण्याचे कार्य केले.
प्रल्हाद पाटील म्हणाले, डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संवाद चांगला असला पाहिजे. विशेषतः ग्रामीण व झोपडपट्टी भागातील चालीरीती, परंपरा यांची माहिती डॉक्टरांना असली पाहिजे, ज्यामुळे रुग्णांचा डॉक्टरांवर विश्वास बसेल. रुग्णांची सेवा करत असताना, डॉक्टरांनी स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घेतली पाहिजे.
डॉ. सुनिल भुजबळ म्हणाले, सर्वोत्तम जनरल प्रॅक्टिशनर पुरस्कार देणे म्हणजे डाॅक्टरांच्या केवळ कामगिरीचा गौरव नव्हे, तर त्यांच्या संपूर्ण आणि अथक सेवाभावाचे कौतुक आहे. डॉ. भाग्यश्री मुनोत-मेहता यांनी सूत्रसंचालन केले व सचिव डॉ. राजेश दोशी यांनी आभार मानले.
केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सजावटीचा शुभारंभ पुणे : मानाचा चौथा महागणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टचे यंदाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष (१२५) असून यंदाच्या गणेशोत्सवात मथुरेतील वृंदावन साकारण्यात येणार आहे. या सजावटीचा शुभारंभ केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले.
बिबवेवाडी येथील सरपाले फ्लाॅवर मर्चंट येथे झालेल्या कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, उपाध्यक्ष विनायक कदम,आमदार हेमंत रासने, स्वागताध्यक्ष व उद्योजक कृष्णकुमार गोयल, पुष्प सजावटकार सुभाष सरपाले, मंडळाचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या तसेच गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुण्यातील गणेशोत्सवात सार्वजनिक स्वरूपातील विधायक उपक्रम नेहमीच राबवले जातात. परंतु त्याची दखल घेतली जात नाही. याउलट, एखादी वाईट घटना घडली, तर मात्र तिची लगेच दखल घेतली जाते. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. परंतु स्वातंत्र्यानंतरही पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी विधायक उपक्रमांची परंपरा जपली आहे. हा उत्सव केवळ दहा दिवसांचा नसतो, तर गणेशोत्सव मंडळांच्या वतीने वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्याचे देशभरातून कौतुक होते, असेही त्यांनी सांगितले.
कोषाध्यक्ष नितीन पंडित म्हणाले, सन १९५२ सालापासून गणेशोत्सवात धार्मिक व पौराणिक देखाव्यांची परंपरा असणारे श्री तुळशीबाग मंडळ यंदाच्या वर्षीही आकर्षक मथुरेतील वृंदावन या संकल्पनेतून देखावा सादर करणार आहे. तब्बल ८० फूट रुंद १२० फूट लांब ३५ फूट उंच असा भव्य देखावा होणार आहे. त्यात १४ फूट उंचीचे ४० खांब, दहा बाय दहा आकाराच्या १४ पॅनल आणि जवळपास ३० मोर या वृंदावन देखाव्यात विहार करणार आहेत. राधा कृष्णाचे मंदिर २० फूट लांब आणि ४० फूट उंच असे भव्य प्रवेशद्वार या देखाव्यात असणार आहे. सरपाले बंधू सदर देखाव्याची निर्मिती करत आहे.
पुणे : जगत्गुरू श्रीमान मध्वाचार्य मूळ महासंस्थानतर्फे श्री वरदेंद्र तीर्थ स्वामीजी यांच्या 240व्या आराधना महोत्सवाला आज (सोमवार, दि. 30 जून) भक्तीरसपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. या महोत्सवानिमित्त श्री राघवेंद्र स्वामी महासंस्थानचे मंत्रायल (आंध्रप्रदेश) पिठाधीश्वर श्री श्री 108 श्री सुबुधेंद्रतीर्थ श्रीपादा: पिठाधीपतिगुलू नंजनगूडु यांचे आगमन झाले आहे. आराधना महोत्सवानिमित्त मठाच्या आवारातील श्री वरदेंद्र तीर्थ स्वामीजी यांच्या समाधीस विशेष महापूजेने पुष्पालंकारित करण्यात आले आहे. सदाशिव पेठेतील लक्ष्मी रोडवरील नंजनगूडु श्री वरदेंद्र श्री राघवेंद्र स्वामी मठ येथे या तीन दिवसीय आराधना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आराधना महोत्सवानिमित्त रविवारी सायंकाळी ध्वजारोहण, प्रार्थनाउत्सव, गौपूजा आणि धनधान्य पूजा करण्यात आली. तर आज (दि. 30) पहाटे साडेपाच पासून सुप्रभात, निर्माल्यसेवा, पंचामृतपूजा, अलंकारपूजा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी आराधना महोत्सवाला सुरुवात झाली. आराधना महोत्सवास पुण्यासह महाराष्ट्रातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिठाधीश्वर श्री श्री 108 श्री सुबुधेंद्रतीर्थ श्रीपादा: पिठाधीपतिगुलू नंजनगूडु यांची पाद्यपूजा करण्यात आली तसेच तप्त मुद्रा धारण सोहळा झाला. श्री श्री 108 श्री सुबुधेंद्रतीर्थ श्रीपादा: पिठाधीपतिगुलू नंजनगूडु यांच्या हस्ते सभामंडपात श्री मूलरामाची साग्रसंगीत पूजा करण्यात आली. सायंकाळी कुमारी अभिज्ञा रघुनंदन यांनी दासवाणी सेवा रुजू केली. त्यानंतर मठाच्या आवारात रजत रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दि. 1 आणि दि. 2 जुलै रोजीही सकाळी 5:30 ते सायंकाळी 8 या वेळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 1 जुलै रोजी पंडित रघुनंदन पणशीकर यांचे हिंदुस्तानी शास्त्रीय गायन आणि दि. 2 जुलै रोजी कृती नरसिंम्हाचार कुर्डी दासवाणी सादर करून आपली सेवा रुजू करणार आहेत. हे सांस्कृतिक सायंकाळी 6 ते 7 या वेळात होणार आहेत.
भारतीय जनता पक्षामध्ये पद म्हणजे जबाबदारी असते. पक्षाकडून आज ज्यांना पद मिळाले, ते जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आहे, अशी भावना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. गेल्या ११ वर्षात पंतप्रधान मोदींजी यांच्या नेतृत्वात देश झपाट्याने प्रगती करीत आहे. जवळपास २५ कोटी जनता दारिद्र्य रेषेच्या वर आली आहे. हे सर्वापर्यंत पोहोचवावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत भाजपा कोथरुड मध्य मंडलाची कार्यकारिणी आज जाहीर होऊन; मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, गणेश कळमकर, उपाध्यक्ष नितीन शिंदे, कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, माजी अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला उपस्थित होते.
ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्षामध्ये मिळणारे पद हे केवळ नावापुरते पद नसून ती जबाबदारी असते. ती देत असताना सर्व कार्यकर्त्यांचा विचार होतं असतो. त्यामुळे आज ज्यांना ज्यांना पद मिळाले आहे, त्यांनी पूर्ण करण्यासाठी काम करावे. आपल्याकडे अनेक कार्यकर्ते असेही आहेत, ज्यांचा प्रवास बूथ अध्यक्षापासून सुरू होऊन, केंद्रीय नेतृत्वापर्यंत पोहोचला आहे.
ते पुढे म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रवास अतिशय दैदिप्यमान राहिलेला आहे. तीन वेळा एका राज्याचे मुख्यमंत्री आणि सलग ११ वर्षे पंतप्रधान पद म्हणून अतिशय प्रभावी काम करत आहेत. पंतप्रधान पदाच्या काळात २५ कोटी जनता दारिद्र्य रेषेतून बाहेर आली. आज आपल्या अर्थव्यवस्थेची तिसऱ्या क्रमांकाकडे झेप सुरु आहे.देवेंद्रजींच्या नेतृत्वात राज्य प्रगतीपथावर आहे. कालच देवेंद्रजींनी शेतीसाठी कमीदराने वीज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. हे सर्व लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
मंडल अध्यक्ष निलेश कोंडाळकर म्हणाले की, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा राजकीय प्रवास मी जवळून पाहिला आहे. ते जेव्हा मंडल सरचिटणीस होते, तेव्हा मी बूथचा युवा मोर्चा अध्यक्ष अध्यक्ष होतो. मंडल सरचिटणीस ते केंद्रीय मंत्री पर्यंत त्यांनी पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्या पार पडल्या. चंद्रकांतदादा पाटील यांनी ही विद्यार्थी परिषदेपासून ते राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री असा प्रवास आहे. त्यामुळे आपण दोघांचाही आदर्श समोर ठेऊन काम केले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली.