Home Blog Page 480

निलेश कुलये आणि पूजा क्रिश्नमूर्ती ठरले “सिंहगड एपिक ट्रेल मॅरेथॅान”चा विजेता

पुणे – वेस्टर्न घाट्स रनिंग फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय “सिंहगड एपिक ट्रेल मॅरेथॉन” स्पर्धेत ४२ किलोमीटर अंतरासाठी पुरुष गटात निलेश कुलये तर महिला गटात पूजा कृष्णमूर्ती यांनी प्रथम क्रमांक पटकावत आपली विजयी घौडदौड सिद्ध केली.
यावर्षी जगभरातून ८ देश, भारतातील २४ राज्य व ४५ शहरातून ११ कि.मी., २१ कि. मी., ३० कि.मी., व ४२ कि.मी. अंतर धावण्यासाठी धावपट्टूंनी सहभाग घेतला होता. स्वराज्याचा दैदीप्यमान ऐतिहासिक वारसा असलेल्या सिंहगडावर ही स्पर्धा सिंहगडाच्या वेगवेगळ्या पाच वाटांवरून पूर्ण करायची असते. सलग ११ तास चालणाऱ्या या माउंटन ट्रेल मॅरेथॉनमध्ये डोंगर -दऱ्या, चिखल, कडे-कपाऱ्या, आणि सिंहगडाच्या विविध वाटांवरून चित्तथरारक अनूभव स्पर्धकांना मिळतो. पर्यावरण संरक्षण, पुरातन वास्तू आणि गडकोट संवर्धनाच्या संदेशाबरोबरच व्यायामाचा संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जातो.
स्पर्धेचे उद्घाटन उप.जिल्हाधिकारी, शिवरायांच्या युद्धकलेचे आणि गडकोटांचे अभ्यासक सतिश राउत, सिंहगड रोपवेचे संचालक उदयराज शिंदे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाने, पुणे वनविभागाचे अधिकारी मनोज बारबोले व समाधान पाटील, पुणे ग्रामिण पोलिसचे अधिकारी प्रविण मोरे, पर्यटन विभागाचे प्रमुख, घेरा सिंहगड ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य, ग्रामस्थ, व स्पर्धेचेसर्व स्वयंसेवक उपस्थित होते. या स्पर्धेचे आयोजन वेस्टर्न घाट रनिंग फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिग्विजय जेधे, फाऊंडेशनचे सदस्य अनिल पवार, मंदार मते, महेश मालुसरे, ॲड. राजेश सातपुते, मारूती गोळे, अमर धुमाळ यांनी केले आहे.

सिंहगडाच्या पायथ्याशी रोपवे कार्यालयाजवळ स्पर्धेची सुरुवात व सांगता झाली. ही स्पर्धा केवळ धावण्यापुरती मर्यादित नसून पर्यावरण, गडकोट संवर्धन, आणि पुरातन वास्तू रक्षणाचा संदेशही ती देत असते.

विजेते पुढीलप्रमाणे:

 ४२ कि.मी. पुरुष:

१) निलेश कुलये – ४:५८:१३
२) प्रीतम आसरानी – ५:५१:५५
३) पुलकीत वर्मा – ६:१८:५१

 ४२ कि.मी. महिला:
१) पूजा कृष्णमूर्ती

 ३० कि.मी. पुरुष:
१) अनिकेत पवार – ३:१६:३०
२) संजय नेगी – ३:२८:३७
३) नितीश कुमार – ३:३८:३५

 ३० कि.मी. महिला:
१) वीणा तडसरे – ५:३२:१५
२) हेमा आवळे – ६:०६:०९
३) श्रीमा एस बालिगा – ६:१६:४०

 २१ कि.मी. पुरुष:
१) इनेश वसवा – २:११:२७
२) विशाल राजभर – २:३१:५४
३) भूषण शिंदे – ३:०३:१५

 २१ कि.मी. महिला:
१) गीतांजली गुब्बेवाड – ४:१३:२३
२) तान्या डकवर्थ – ४:२२:२०
३) श्रद्धा वस्सा – ४:३३:५२

 ११ कि.मी. पुरुष:
१) साहिल भोसले – १:१७:१३
२) तनय कचरे – १:१८:१९
३) वर्धन गोयल – १:२१:३१

 ११ कि.मी. महिला:
१) सुरभी मेरूकर – १:४९:२८
२) शोभा सिंग – १:४९:५६
३) पूजा वैद्य – २:०६:५६

गुरु म्हणजे अंत:करण जागृत करणारा शक्तीस्त्रोत:अ‍ॅड. डॉ. रोहिणी पवार

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे गुरुपौर्णिमा सप्ताहाचा शुभारंभ

पुणे :  गुरुचरित्र म्हणजे केवळ ग्रंथ नाही तर संपूर्ण जीवनाचे मार्गदर्शन आहे. गुरु म्हणजे फक्त ग्रंथ शिकविणारा नाही, तर अंत:करण जागृत करणारा एक शक्तीस्त्रोत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, समर्थ रामदास स्वामींनी दाखविलेली गुरुभक्ती हेच गुरुपौर्णिमेचे सार आहे, असे मत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदीच्या पहिल्या महिला विश्वस्त अ‍ॅड. डॉ. रोहिणी पवार यांनी व्यक्त केले.

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे गुरुपौर्णिमा सप्ताहाचा शुभारंभ श्री दत्त मंदिर प्रांगणात श्री दत्त कला मंच या उत्सव मंडपात झाला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. रजनी उकरंडे, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, उत्सव प्रमुख महेंद्र पिसाळ, विश्वस्त सुनिल रुकारी, राजेंद्र बलकवडे, अंजली काळकर आदी उपस्थित होते. उत्सवाचे यंदा १२८ वे वर्ष आहे.

  बाल कल्याण संस्था पुणे च्या वतीने गंध फुलांचा गीतांचा हा दिव्यांग मुलांचा संगीतमय कार्यक्रम यावेळी सादर झाला. चैतन्य सिंदाळकर, साकेत देऊचके, सोनल कदम, श्लोक चावीर, श्रेयस जगदाळे, प्रकाश माळी, सिद्धी कुंजीर यांना संगीत शिक्षक दत्तात्रय भावे, वाद्य शिक्षक संजीव हेबाळे, गायन शिक्षक संकेत लोहकरे यांनी साथ दिली.

अ‍ॅड. डॉ. रोहिणी पवार म्हणाल्या, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण एक संकल्प करुया. गुरुंच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवा, भक्ती आणि एकात्मितेचा संकल्प घेऊया. दरवर्षी लाखो भाविक पंढरपूरला चालत जातात, हेच विठ्ठलाच्या भक्तीसाठी गुरुसमर्पण आहे असेही त्यांनी सांगितले.

ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, हरवले आभाळ ज्यांचे हो त्यांचा सोबती या उक्ती प्रमाणे धार्मिक स्थळी समाजाकडून आलेल्या निधीतून धर्मसेवेसोबतच वंचितांच्या विकासासाठी समर्पण भाव जागृत ठेवणे हे सर्व विश्वस्तांचे सामुहिक कर्तव्य असायला हवे. त्यानुसार ट्रस्टचे सामाजिक कार्य अविरतपणे सुरु आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त शुक्रवार, दि ११ जुलै २०२५ पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सव काळात वैद्यकीय तसेच रक्तसंकलन शिबीरे आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये आजच्या प्रथम दिवशी सदाशिव कुंदेन यांच्या सहकार्याने महा ब्लड सेंटरच्या सहाय्याने तीस बाटल्या रक्तसंकलन झाले.

श्री गुरु चरित्र पारायणासह सालाबाद प्रमाणे दररोज विविध भजनी मंडळाच्या भजन सेवा, कीर्तन, प्रवचन, समग्र गीता पठण, शास्त्रीय नृत्य, गायन, वादन, सुगम संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच रक्तदान शिबिर, मोफत वैद्यकीय सेवा, दैनंदिन अन्नदान सेवा असे अनेक सामाजिक उपक्रम या सप्ताहा दरम्यान संपन्न होत असतात. तरी पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले. कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. रजनी उकरंडे यांनी उपस्थितांचे स्वागत आणि विश्वस्त राजेंद्र बलकवडे यांनी प्रास्ताविक केले. कोषाध्यक्ष युवराज गाडवे यांनी आभार मानले.

हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन जीआर रद्द:CM देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

ठाकरे बंधू एकत्रित मोर्चा काढणार म्हटल्यावर फडणवीस नरमले ? शिवाय एकनाथ शिंदे आणि अजित पवारही होते नाराज

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव आणि राज एकत्रित मोर्चा काढण्याच्या बातमी नंतर मोठ्या घडामोडी घडत आहेत . शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे पक्ष या निर्णयाविरोधात येत्या 5 जुलैला भव्य मोर्चा काढणार आहेत. तसेच विविध पक्षांकडून या निर्णयाला विरोध होतोय. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. विधी मंडळाचं उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे चहापानाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हिंदी भाषेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकत्रित पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषाबाबत याआधी घेतलेले दोन्ही शासन निर्णय मागे घेत असल्याची घोषणा केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. महायुतीचे हे चौथे अधिवेशन आहे. बहुतांश भागांमध्ये पाऊस आहे, काही ठिकाणी अतिवृष्टी आहे. काही ठिकाणी पाऊस कमी आहे. सरकारचे निर्णय देखील अतिशय चांगल्या पद्धतीने घेतले जात आहेत. खतांच्या काही तक्रारी आल्या आहेत त्यावर देखील काम केले जात आहे.

विरोधी पक्षाला आम्ही चहापानाला बोलावले होते, परंतु नेहमीप्रमाणे विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. यावेळी त्यांनी एक भलेमोठे पत्र दिले आहे. पत्र मोठे असले तरी मजकूर मोठा नाही. गेल्यावेळी जे मुद्दे घेतले होते तेच पुन्हा टाकून दिले आहे. मराठीचा जो विषय आहे अतिशय गंभीर मुद्दा असला तरी त्यांच्या पत्रात 24 व्याकरणाच्या चुका दिसून आल्या. उबाठाच्या 3 सह्या आहेत, शरद पवार गटाच्या 2 सह्या बघायला मिळाले. भास्कर जाधव यांची यावेळी सही दिसलेली नाही.

आज वडेट्टीवार पत्रकार परिषदेत म्हणाले की अनेक कामांना स्थिगी मिळाली आहे. त्यांना अजूनही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असल्याचे वाटत आहे. आज आपण सगळे लोक या ठिकाणी हिंदीचा जो विषय आहे, आमच्यासाठी मराठीचा विषय आहे. आम्ही मराठी भाषेची सक्ती महाराष्ट्रात केली आहे. पण झोपेचे सोंग घेतलेल्यांना उठवता येत नाही. 21 सप्टेंबर 2020 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे शैक्षणिक धोरण कसे लावायचे यासाठी समिती नेमली होती. 16 ऑक्टोबर 2020 साली जीआर निघाला आणि अतिशय नामवंत असे शास्त्रज्ञ व अभ्यासक डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली 18 तज्ञ लोकांची समिती गठित केली होती.

सर्वच मंडळी नामवंत होती. अशा लोकांची चांगली समिती केली होती. 14 सप्टेंबर रोजी या समितीने 101 पानांचा एक अहवाल उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केला. या अहवालात काय म्हटले होते, तर या अहवालाच्या 8 व्या प्रकरणात भाषेचा मुद्दा आलेला आहे. उबाठा गटाचे उपनेते डॉ. सुखदेव थोरात, कोटापल्ले आणि उबाठाचे विजय कदम भाषेच्या मुद्यात होते. इंग्रजी आणि हिंदी भाषा ही दुसरी भाषा म्हणून पहिलीपासून शिकवावी. अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी तयार होतील. पण त्याचवेळी इंग्रजी आणि हिंदी पहिलीपासून सक्तीची करण्यात यावी, असे यात म्हटले होते. याचा अर्थ हिंदी सक्तीची अंमलबजावणी उद्धव ठाकरेंनी केली होती.

यात कुठेही हा अहवाल स्वीकारतान त्रिभाषा सूत्रे बाजूला ठेवा वगैरे असे काहीच म्हटले नाही. अॅकडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये मार्क मिळतील म्हणून तिसरी भाषा करण्यात आली होती. माशेलकर समितीचा अहवाल आणि निर्णय यावर कॅबिनेट बैठक घेऊन मान्यता देण्यात आली होती. जे आमच्या काळात जीआर निघाले आहेत ते याच सगळ्यावर काम करत निघाले आहेत. 16 एप्रिल 2025 ला आम्ही पहिला जीआर काढला. यात आम्ही असे म्हंटले की मराठी भाषा सक्तीची आहे, दुसरी भाषा इंग्रजी आणि तिसरी भाषा हिंदी म्हटली. परंतु यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आणि 17 एप्रिल रोजी आम्ही हा निर्णय बदलला आणि तिसरी भाषा म्हणून कोणतीही भारतीय भाषा शिकता येईल असा जीआर काढला. तिसरी भाषा पहिलीपासून नाही. सक्तीची केलेली हिंदी यावर पर्याय देण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाचा आधार देत सांगितले की आपली मातृभाषा शिकलीच पाहिजे पण हिंदी देखील आपण शिकली पाहिजे हे आंबेडकरांनी सांगितले आहे. या मंत्रिमंडळात त्यावेळची संपूर्ण शिवसेना होती, शरद पवारांचा पक्ष होता आणि कॉंग्रेस देखील होती. सत्तेतून बाहेर आले की वेगळे बोलायचे आणि सत्तेत असले की वेगळे बोलायचे. ही जी पद्धत आहे, यात केवळ विरोधाला विरोध असे दिसत आहे.

राज ठाकरेंनी पहिला प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारले पाहिजे की तुम्हीच मान्यता दिली होती तर कुठल्या तोंडाने मोर्चा काढायला निघलात. आम्ही त्या दिवशी देखील सांगितले होते की दादा भुसे सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेतील आणि वस्तुस्थिती ठेवतील. कारण तिसरी भाषा शिकली नाही तर मराठी मुलांना तिथे मार्क मिळणार नाही. इतर माध्यमातले जे मुले आहेत त्यांना हिंदी आणि इंग्रजी अनिवार्य आहेच, याचा फायदा त्यांना बँक क्रेडिटमध्ये मिळणार.

आजच्या मंत्रिमंडळात आम्ही यावर चर्चा केली आणि असा निर्णय घेतला, तिसरी भाषा कोणती असावी कुठल्या इयत्तेपासून असावी यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांचा अहवाल आल्यावरच निर्णय घेतला जाईल. आम्ही सध्या घेतलेला निर्णय रद्द करत आहोत.

हिंदी सक्तीच्या निर्णयाला शिंदेंच्या मंत्र्यांचाही विरोध:मंत्रिमंडळ बैठकीत दर्शवली नाराजी

फडणवीस आणि शिंदेंमध्ये चर्चा-निर्णय मागे घेतला नाही तर शिंदेंचे मंत्री आक्रमक होणार

मुंबई-राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिल्यापासून हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याच्या शासन निर्णयावर आता केवळ विरोधकच नव्हे, तर पक्षांतील काही मंत्रीही नाराज असल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील काही मंत्र्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे राज्य सरकार लवकरच हिंदी सक्तीच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय घेऊ शकते, अशी माहिती मिळत आहे.

शालेय शिक्षण विभागाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत इयत्ता 1 ली ते 4 थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीने शिकवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाला राज्यभरातून प्रचंड विरोध होत आहे. शिवसेना ठाकरे गट, मनसे, काँग्रेससह अनेक साहित्यिक, अभ्यासक आणि सामाजिक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

येत्या 30 जून रोजीपासून पावसाळी अधिवेशन चालू होणार आहे. त्याआधी सह्याद्री अतिथीगृहावर मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या अधिवेशनात हिंदी सक्तीवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, हा वाद चिघळण्याआधीच सरकारने पावले उचलण्याचे संकेत मिळत असून, काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे.

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही हिंदी सक्तीच्या निर्णयावर चर्चा झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने हिंदी भाषेबाबतच्या सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवलाय. हिंदी भाषेला शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांचा देखील विरोध असल्याचे समोर आले आहे. सरकारने निर्णय मागे घेतला नाही तर शिवसेना मंत्री देखील आक्रमक होणार असल्याचे बोलले जात आहे. यानंतर आता सरकार या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्याचा विचार करत आहे, अशी चर्चा सुरू आहे.

एकीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेनाही आता विरोधात असल्याचे समोर येते आहे. तर दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी देखील सरकारच्या या निर्णयामुळे खूश नसल्याचे चित्र आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाचवीनंतर विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकवण्यात यावी, अशी भूमिका मांडली आहे. शिवाय ठाकरे बंधूंचा मोर्चा निघणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, असेही अजित पवार यांनी म्हटले होते.

हिंदी सक्ती विरोधात मोठे जनआंदोलन उभे; ५ तारखेच्या मोर्चा आधीच सरकार निर्णय रद्द करेल: हर्षवर्धन सपकाळ.

हिंदू, हिंदी व हिंदूराष्ट्र या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संकल्पनेला काँग्रेसचा विरोध.

आझाद मैदानाच हिंदी सक्तीच्या शासन आदेशाच प्रतीकात्मक होळी करून केला निषेध

मुंबई, दि. २९ जून २५
हिंदी भाषा सक्तीचा शासन आदेश आल्यानंतर लगेच याला विरोध करत हिंदी सक्ती करू नये अशी काँग्रेस पक्षाने भूमिका घेतली. तसेच सर्व राजकीय पक्ष सामाजिक संस्था यांनी यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले होते. हा संस्कृती रक्षणाचा लढा सर्वांनी मिळून लढला पाहिजे. आज राज्यात हिंदी सक्तीच्या विरोधात मोठे आंदोलन उभे राहिले आहे. ५ तारखेला मोर्चा निघत आहे पण मार्चाच्या आधीच हा निर्णय रद्द करण्याची वेळ सरकारवर येईल मात्र हा मोर्चा काढून मराठी संवर्धनासाठी आपण कट्टीबद्ध आहोत हा संदेश देशात पोहचला पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

मराठी भाषा केंद्र व समविचारी संस्था, राजकीय पक्ष यांच्यावतीने आझाद मैदानात हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात अन्याय्य शासननिर्णयांची प्रतीकात्मक होळी करण्यात आली. यावेळी मराठी अभ्यास केंद्राचे डॉ. दीपक पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खा. संजय राऊत, खा.अरविंद सावंत, मनसेचे नेते सरदेसाई, काँग्रेसचे नेते मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. भालचंद्र मुणगेकर आदी उपस्थित होते.

यानंतर मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या सभेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, हिंदू, हिंदी व हिंदूराष्ट्र हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाचा अजेंडा आहे आणि अजेंड्याला काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. भाजपाचे हिंदुत्व हे फक्त हिंदी बोलण्यापुरते व ‘नमस्ते सदा वत्सले’ पुरतेच मर्यादीत आहे. तर भाषेच्या नावाखाली लढवले जात आहे. हिंदी-मराठीचा संघर्ष भारत-पाकिस्तान सारखा लावला जात आहे आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीत त्याचा काही राजकीय लाभ मिळवता येतो का? असा सत्ताधारी भाजपाचा कुटील डाव आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

सपकाळ पुढे म्हणाले की, हिंदी भाषा ही ८०० वर्षांची आहे असे म्हणतात तर मराठी भाषा २३०० वर्षांची आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे पण त्यासोबत केंद्रीय विद्यापीठात मराठी भाषा विभाग सुरु झाले का, त्यासाठी बजेट किती दिले, याचेही उत्तर मिळाले पाहिजे. नाहीतर ‘हर घर में नल, नल में जल’,प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये, दरवर्षी दोन कोटी रोजगार, २०२२ पर्यंत सर्वांना घरे, या आश्वासनासारखे होऊ नये असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

प्रभाग पद्धतीच असंवैधानिक- महेश झगडे

पुणे, २९ जून २०२५ —
एका प्रभागातून चार प्रतिनिधी निवडणे असंवैधानिक आहे. विधानसभेप्रमाणे मोठे प्रभाग झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्था राजकीय पक्षांच्या ताब्यात जातील,’ तसेच एका प्रभागातून चार प्रतिनिधी निवडणे असंवैधानिक आहे. असे मत राज्याचे सामान्य प्रशासन विभागाचे माजी प्रधान सचिव महेश झगडे यांनी रविवारी व्यक्त केले.

माहिती अधिकार कट्ट्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “मतदारांची भूमिका आणि नगरसेवकांची जबाबदारी” या परिसंवादामध्ये ते बोलत होते .हे या कट्ट्याचे ५९९ वे सत्र होते.

सत्राच्या अखेरीस आयोजक आणि उपस्थित नागरिकांनी पुण्यातील मतदार जनजागृती मोहीम शहरभर आणि महाराष्ट्रभर पोहोचविण्याचा निर्धार केला.गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकशाही नाही. नगरसेवकच नाहीत आणि त्याविरोधात मतदारांनीही कुठे विरोध, मोर्चा काढला नाही. हे दुर्दैव आहे.लोकशाहीची वाटचाल हुकुमशाहीकडे आणि संमिश्र लोकशाहीकडे सुरू झाल्याचे दिसते.’ असे मत त्यांनी व्यक्त केले.

या वेळी खासदार वंदना चव्हाण यांनी मतदार जागृती उपक्रम व्यापकपणे सर्वत्र पोहोचविण्याचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी मतदान प्रक्रिया गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले. त्याच प्रमाणे त्यांनी, नागरिकांनी प्रभागाचे चार विभागात तुकडे करायला सक्रिय विरोध केला पाहिजे कारण त्या मुळे निवडून येणाऱ्या उमेदवारावर काहीच जबाबदारी राहत नाही असे मत व्यक्त केले. पुणेकरांनी अशा उमेदवारांना मत द्यावे जे मूलभूत सेवा, सार्वजनिक जागा व पर्यावरणाचे रक्षण, सौंदर्यवर्धन, आरोग्य, शिक्षण व सामाजिक सेवा, सुरक्षित, समावेशक व सार्वजनिक वाहतुकीला चालना या मुद्यांना प्राधान्य देतील असे आवाहनही त्यांनी केले.
नागरिकांना आपले उमेदवार कोण आहेत, हेच कळू नये, यासाठीच चार जणांच्या प्रभागाची रचना करण्यात आली आहे. लोकांच्या प्रश्नांना जबाबदार असणारा एका प्रभागातून एकच सक्षम लोकप्रतिनिधी असायला हवा. पालिकेतील लोकसहभाग ही आता केवळ कागदावरची गोष्ट राहिली आहे. राजकीय नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी, त्यांची सोय करण्यासाठी पालिकेत प्रतिनिधी नियुक्त केले जातात.’ असेही त्या म्हणाल्या.

आरजे संग्राम यांनी उपस्थितांना निवडणूकीमध्ये नागरिकांचा सहभाग हा प्रभागांच्या सीमांपलीकडे जाऊन असावा, आपण फक्त आपल्या प्रभागापुरते मर्यादित न राहता, संपूर्ण शहरासाठी काम करूया. असे आवाहन केले.

कार्यकर्ते तन्मय कानिटकर यांनी प्रत्येक प्रभागात जबाबदार नागरिकांनी तयार केलेल्या शॅडो गव्हर्नमेंट (प्रति सरकार) संकल्पनेची मांडणी केली,ही शॅडो गवर्नमेंट स्थानिक प्रशासनावर लक्ष ठेवेल.

माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी माहिती अधिकार कायद्याच्या सामर्थ्याबद्दल बोलताना, नागरिकांनी हा कायदा प्रशासनातील पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्याचे एक साधन म्हणून वापरावा, असे आवाहन केले.

महेश झगडे यांच्यासह माजी खासदार वंदना चव्हाण, संग्राम खोपडे, तन्मय कानिटकर, सारंग यादवाडकर, राहुल सुनीता भास्कर, विजय कुंभार परिसंवादात सहभागी झाले होते. विनिता देशमुख यांनी सूत्रसंचालन केले तर प्रिती काळे यांनी आभार मानले.

आदिवासींच्या जमिनीवर बांगलादेशी आणि रोहिंग्याच्या वाढत्या वस्तींचे संकट -भाजपाचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर

माय होम इंडिया व जनजाती कल्याण आश्रम तर्फे हूल दिनाचे स्मरण आणि क्रांतीकारकांना आदरांजली
पुणे : भारतामध्ये सगळ्यात जास्त सुसंस्कृत, सुसभ्य, शांतिप्रिय तसेच स्वत:ची संस्कृती जीवनात अंगिकारणारे जनजाती बंधू आहेत. परंतु आदिवासी समाज आजही दारिद्र्यात खितपत पडला आहे. गोरे इंग्रज गेल्यानंतर काळ्या इंग्रजांच्या गुलामीमध्ये हा समाज वाढतो आहे. या व्यतिरिक्तही भयंकर संकट त्यांच्यावर आहे, ते म्हणजे वनवासींच्या जमिनीवर बांगलादेशी आणि रोहिंग्याच्या वस्ती वाढत आहे. लँड जिहाद मोठ्या प्रमाणात वाढत आहे, असे मत भाजपाचे माजी राष्ट्रीय सचिव आणि माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर यांनी व्यक्त केले.  

माय होम इंडिया आणि जनजाती कल्याण आश्रम पुणे यांच्या संयुक्त प्रयत्नातून  सन १८५५ साली ब्रिटिशांविरोधातील लढयात हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण ‘हूल दिन’ च्या माध्यमातून करण्यात आले. कर्वे रस्त्यावरील स्वा. सावरकर अध्यासन केंद्र येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी सुनील देवधर यांचे व्याख्यान झाले.

कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंधचे उपप्राचार्य अशोक साबळे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा.श्याम भुर्के, जनजाती कल्याण आश्रम पश्चिम महाराष्ट्र सचिव शरद शेळके हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘वनपुण्याई’ या जनजाती कल्याण आश्रमाच्या नियतकालिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. तसेच माय होम इंडिया आणि जनजाती कल्याण आश्रमाच्या वतीने संथाल जनजातीच्या स्वातंत्र्य संग्रामातील बलिदानी वीरांना आदरांजली वाहण्यात आली.  

सन १८५५ मध्ये आताचे झारखंड आणि त्यावेळेच्या बंगाल मधील संथाल जनजातीच्या आपल्या बांधवांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध एक अभूतपूर्व लढा उभा केला. दिनांक ३० जून १८५५ रोजी ४०० गावातील ५०,००० पेक्षा जनजातीय बांधव एकत्र आले आणि त्यांनी सशस्त्र संघर्ष केला. त्यामुळे ब्रिटिश बिथरले आणि त्यांनी १०,००० संथाल बंधू भगिनींना गोळ्या घालून मारले. हा दिवस हूल दिवस म्हणून ओळखला जातो.

सुनील देवधर म्हणाले, आदिवासी हा शब्द चुकीचा आहे, या जनजाती आहेत. ट्राईब हा शब्द देखील त्यांच्यासाठी चुकीचा आहे. असंस्कृत, असभ्य, क्रूर अशा अनेक प्रकारच्या मागासलेल्या लोकांना ट्राईब म्हटले आहे. त्यामुळे जनजाती हा योग्य शब्दप्रयोग आहे. हूल ही दहा हजार जनजातीच्या अत्यंत क्रूर, अमानुष हत्येची कहाणी आहे. बिरसा मुंडा यांना या हूल उठावातूनच प्रेरणा मिळाली. भारतामधला महिलांचा सगळ्यात मोठा पहिला उठाव संथाल चा होता. त्यातील वीरांगना फुलो आणि झालो मुर्मू या आजही प्रेरणा देतात. १८७६ च्या संथाल परगणा भू-हक्क कायद्यानुसार जनजातीच्या जमिनी बाहेरचा कोणी विकत घेऊ शकणार नाही हा कायदा इंग्रजांनी निर्माण केला. कायदा करायला भाग पाडणारे सगळ्यात मोठे सशस्त्र आंदोलन हे हूल क्रांती आहे.

‘हूल क्रांती’ ही एक महत्त्वाची पण दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेली घटना आहे. या क्रांतीने हजारो संथाल जनजाती बांधवांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव केला होता. या क्रांतीचे महत्त्व सर्वप्रथम समाजासमोर आणण्याचे कार्य माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केले. त्यानंतर २०२३ साली नरेंद्र मोदी यांनी उपेक्षित राहिलेल्या क्रांतिकारकांना देशासमोर आणले. भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या संथाल जनजाती समाजातून आलेल्या पहिल्या राष्ट्रपती आहेत. या विस्मृतीत गेलेल्या इतिहासाला उजाळा देणे आणि या वीरांचे स्मरण करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, असेही देवधर यांनी सांगितले.

प्रा.श्याम भुर्के म्हणाले, आदिवासींची पिळवणूक इंग्रजांकडून सुरू झाली आणि त्यातूनच ‘हूल क्रांती’चा उदय झाला. आदिवासी समाजाने पर्यावरणाचे संवेदनशीलतेने रक्षण केले; त्यांनी कधीही निसर्गाचे शोषण केले नाही. काहींचे काम मशाल घेऊन पुढे जाणारे असते, तर आदिवासींचे कार्य हे देवाच्या नंदादीपाप्रमाणे शांत, सातत्यपूर्ण आणि दीपवत मार्गदर्शक असे आहे. शरद शेळके, अशोक साबळे यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे आयोजक माय होम इंडियाचे आशुतोष भिसे, जनजाती कल्याण आश्रम पुणेचे अध्यक्ष प्रकाश धोका, जनजाती कल्याण आश्रम पश्चिम महाराष्ट्र सचिव शरद शेळके यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले.

गोदरेज कॅपिटलने ‘क्वीनिटी’ सह त्यांची LGBTQIA+ व्यापकता वाढवली

मुंबई: समानता आणि सर्वसमावेशकतेप्रती आपली वचनबद्धता अधिक दृढ करत, गोदरेज इंडस्ट्रीज
ग्रुपची आर्थिक शाखा गोदरेज कॅपिटलने LGBTQIA+ कर्मचारी आणि सहकाऱ्यांसाठी कर्मचारी साधन गट (ERG)
Qnity लाँच केला आहे.
कंपनीच्या DEI (विविधता, समानता आणि सर्वसमावेशकता) प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो प्राइड
कॅपिटलच्या पायावर उभा आहे. समलैंगिक प्रतिनिधित्वाचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करणारा हा उपक्रम आहे.
Qnity चे उद्दिष्ट एक सुरक्षित, सहाय्यक जागा प्रदान करणे आहे जे सहकार्याची भावना दृढ करतात. आणि प्रोग्रॅमिंग,
संवाद तसेच नेतृत्व सहभागाद्वारे सातत्यपूर्ण सहभाग वाढवते.
गेल्या वर्षभरात, कंपनीने आपले लक्ष्य पूर्ण करत तसेच धोरणात्मक भागीदारीद्वारे 500 हून अधिक LGBTQIA+
प्रोफाइलची तपासणी केली. यामुळे या वर्षीच्या प्राइड मंथमध्ये LGBTQIA+ व्यावसायिकांच्या ऑनबोर्डिंगमध्ये
पाच पट वाढ झाली, जी वित्तीय सेवा उद्योगातील प्रतिनिधित्व आणि आपलेपणासाठी कंपनीची वाढती वचनबद्धता
दर्शवते.
गोदरेज कॅपिटलने या सांस्कृतिक हेतूला कृतीतून पाठिंबा दिला आहे. तिच्या समावेशक धोरणांमध्ये कार्यालयीन
ठिकाणी सर्वांसाठी शौचालये, सकारात्मक धोरण, आयुष्यातील विविध जीवन प्रवासासाठी आवश्यकतेप्रमाणे रजा
आणि समलैंगिक भागीदारांसाठी तयार केलेली कर्ज उत्पादनांचा समावेश आहे, अनेक NBFC मधील हे पहिलेच
आहे. सर्वसमावेशकता केवळ कामाच्या ठिकाणी नसते तर ती ज्या समुदायांना सेवा देते त्यांच्याही जीवनात
प्रतिबिंबित होत असल्याचा कंपनीचा विश्वास सार्थ ठरवते.
याव्यतिरिक्त, पुरस्कार विजेता उपक्रम – प्राइड पाथ हा उद्योग समावेशनात नवीन बेंचमार्क स्थापित करण्यासाठी
डिझाइन केला गेला होता. या उपक्रमात कलेक्शन फंक्शनमध्ये संधींचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करून, विविध
प्रतिभा आणि दृष्टिकोनांची ताकद ओळखून, LGBT+ व्यक्ती आणि cis महिलांसाठी संधीचे दरवाजे खुले केले आहेत.
प्रत्येकाला प्रगतीची आणि भरभराटीची संधी मिळेल असे कामाचे ठिकाण असावे, आणि त्यासाठी चालना देण्यासाठी
संस्थेच्या वचनबद्धतेचे हा उपक्रम प्रतिनिधित्व करतो.
2025 मधील प्राईड मंथ साजरा करत, कंपनीने जागरुकतेसाठी तसेच सहयोगाला प्रोत्साहन देण्यासाठी उद्देश-केंद्रित
उपक्रमांची मालिका सुरू केली. ट्रान्स-लेड कलेक्टिव्ह – अरवाणी आर्ट प्रोजेक्टच्या भागीदारीत, “बिल्डिंग
फायनान्शियल इन्क्लुजन टुगेदर” नावाचे एक भित्तिचित्र नव्याने होणाऱ्या कांजूरमार्ग कार्यालयात तयार करण्यात
आले. समलैंगिक कलाकार आणि वरिष्ठ नेत्यांच्या सहभागाने विकसित झालेले, हे भित्तिचित्र एकता, ओळख आणि
दृश्यमान सहयोगाचे एक जिवंत प्रतीक आहे. नुक्कड नाटक सादरीकरणाद्वारे कंपनीने आपल्या विभागीय कार्यालयात
येणाऱ्या ग्राहकांशी संवाद साधला. यामुळे संवाद निर्मितीसोबतच आणि एक सहानुभूती निर्माण झाली. कंपनी
अंतर्गत, समावेशन 101 नावाची एक संवेदनशीलता मोहीम सुरू करण्यात आली. जी सर्वसामावेशकतेची भाषा,
वर्तनातील सूक्ष्म आक्रमकता समजून घेत दैनंदिन सहयोगाला प्रोत्साहन देईल. याद्वारे प्रतीकात्मक संदेशाच्या पलीकडे
जाण्याचा आणि कायमस्वरूपी बदल घडवण्याचा कंपनीचा हेतू प्रतिबिंबित करते.
गोदरेज कॅपिटलच्या मुख्य मानव संसाधन अधिकारी भाव्या मिश्रा म्हणाल्या की, “लोकांना आपले कामाचे ठिकाण
कसे वाटते, यावरच सर्वसमावेशकता आहे का, हे ठरते आणि ते तेव्हाच अर्थपूर्ण ठरते. प्राइड कॅपिटलच्या लाँचमुळे
LGBTQIA+ कर्मचारी तसेच सहयोगींना जोडण्यासाठी, त्यांचे अनुभव ऐकण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित
संस्कृतीला आकार देण्यासाठी जागा निर्माण करून देते. ही अशी जागा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे जिथे तुमच्या
व्यक्तिमत्त्वाचा आदर केला जातो, आवाज ऐकला जातो आणि कृतीच्या माध्यमातून पाठिंबा मिळतो.”मार्गदर्शन मंडळे, शिक्षण मंच, सहकार्य आणि इतर गोष्टींद्वारे क्वीनिटी वर्षभर सहभाग वाढवत राहील. प्राइड महिना
2025 संपत असताना, सखोल समावेशासाठी ERG पायाभूत सुविधा तयार करते, जी सर्वांसाठीच योग्य तो आदर
आणि लिंग भेदापलीकडे ओळख यावर आधारित आहे.

सारथी संस्थेच्या कामाला निधी कमी पडू दिला जाणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार

सारथीच्या युपीएससी व एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

पुणे, दि. २९ : सारथी संस्थेच्या कामाला गती देण्याचे काम शासनामार्फत करण्यात येत असून त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. ही संस्था नवीन असून या संस्थेच्या विविध योजनांचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना होण्यासाठी सारथीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी येणाऱ्या काळात सामाजिक जबाबदारी म्हणून नवीन विद्याथ्यांना मार्गदर्शन करावे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात युपीएससी व एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास सारथीचे संचालक उमाकांत दांगट, मधुकर कोकाटे, डॉ. नवनाथ पालकर, किशोरराजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, सारथीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शिवाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. पवार पुढे म्हणाले, युपीएससी व एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रशासनात काम करताना लोकाभिमूख काम करुन, समाजातील दुर्बल व वंचित घटकांना मदत करावी. या कामात सातत्य ठेऊन संस्थेचा नावलौकीक वाढवा. सारथी ही संस्था राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने कार्यरत असून, त्यांच्या नावाला साजेसे असे काम उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराने संस्थेची वाटचाल सुरू असून संस्थेचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे. संस्थेच्या माध्यमातून आपणास जे यश मिळाले आहे, त्या यशाचे अनुभव इतरांना सांगून, सारथीच्या माध्यमातून पुढील विद्यार्थ्यांना समर्पक भावनेतून मदत करावी, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक कार्य क्रांतीकारी असून ते विसरता येणार नाही. देशात अशा प्रकारची एकही सामाजिक संस्था नाही, जिच्या उद्दिष्टांमध्ये छत्रपती शाहू महाराजांचा विचार नाही. सामाजिक क्षेत्रात प्रत्येक संस्था व संघटना ही राजर्षी शाहू महाराजांचा विचार घेऊनच पुढे जाते किंवा जाऊ शकते, असे मत व्यक्त करुन राज्यातील शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्था या सर्वांच्या कार्याचा आदर्श हे राजर्षी छत्रपती शाहू महाराजच आहेत, असे श्री. पवार यांनी सांगितले.

सारथी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर आपल्या मनोगतात म्हणाले, महाराष्ट्रात १९८० च्या दशकात युपीएससी व एमपीएससी मध्ये निवड होण्याचे प्रमाण हे नगण्य होते. गेल्या ४ ते ५ वर्षात त्यामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. फक्त रोजगाराच्या बाबतीतच नाहीतर समाजाला पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीने संस्थेचे संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. आगामी काळात सारथी संस्थेमार्फत मोठ्या प्रमाणात उत्तोमत्तम प्रशासकीय अधिकारी तयार होऊन महाराष्ट्राच्या विकासास मोठी गती देतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सारथीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शिवाजी पाटील यांनी केले. यावेळी संस्थेच्या विविध योजना, प्रशिक्षण कार्यक्रम व शिष्यवृत्ती यांचे सादरीकरण करण्यात आले. सारथीच्या यशोगाथांवर आधारित “विजयीभव” व “सारथी उपक्रम माहिती” या पुस्तकांचे प्रकाशन, तसेच ९ युपीएससी व ९१ एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी सारथीच्या मदतीने यश संपादन करू शकलो, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

कार्यक्रमास सारथी संस्थेचे व विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. सुत्रसंचालन स्वाती पाटणकर, तर आभार प्रदर्शन उपव्यवस्थापकीय संचालक अनिल पवार यांनी केले.
०००००

50 वर्षांनी पुन्हा भरला ‌‘हुजुरपागा‌’ शाळेचा दहावीचा वर्गसुवर्ण महोत्सवी मेळ्यात रमल्या विद्यार्थिनी

पुणे : शाळा भरल्याची घंटा, वर्गात जाण्याची लगबग, नैमित्तिक प्रार्थना, ‌‘एकसाथ नमस्ते‌’ असे म्हणत शिक्षकांना केलेले अभिवादन, विद्यार्थिनी व शिक्षिकांच्या हस्ते झालेले सामूहिक दीपप्रज्वलन अशा भारावलेल्या वातावरणात सुमारे 50 वर्षांनंतर सुप्रसिद्ध हुजुरपागा शाळेतील — विद्यार्थिनींनी अनुभवला इयत्ता दहावीचा वर्ग..!

1975 साली दहावी उत्तीर्ण झालेल्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी विनिता पिंपळखरे, हेमलता देशपांडे, विभावरी ठकार, संध्या देशपांडे, मीना साने यांच्या पुढाकारातून आज (दि. 29) हुजुरपागा शाळेतील अमृत महोत्सव सभागृहात सुवर्ण महोत्सवी मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

पुण्यातील नारायण पेठेत असलेली हुजुरपागा ही शाळा स्वातंत्र्यपूर्व भारतातील फक्त मुलींसाठी असलेली दुसरी शाळा आहे. 11वी मॅट्रिक परीक्षा पद्धती बंद झाल्यानंतर 1975 सालात एसएससी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पहिल्या बॅचचा स्नेहमिलन सोहळा होता. 1975 सालच्या दहावीच्या बॅचला शिकविणाऱ्या डॉ. अपर्णा जोशी, सुलभा गोरे, जयश्री बापट, उमा वाळिंबे या ज्येष्ठ शिक्षिकांची विशेष उपस्थिती होती.
विद्यार्थिनींनी केलेले विविध गुणदर्शन पाहून जणू आपण स्नेहसंमेलन अनुभवतो आहे, असा अनुभव प्रत्येकास आला. चित्रपट, भावगीतांसह, नाट्यगीते भारती जोग, मंजुषा दाते, मोहिनी अत्रे, रसिका एकबोटे यांनी सादर केली. जयंत साने (संवादिनी), दीपक उपाध्ये (तबला) यांनी साथसंगत केली.
सीमाशुल्क विभागातून निवृत्त झालेल्या मीना साने-करमकर तसेच क्रीडा क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या हेमलता देशपांडे यांनी आपआपल्या क्षेत्रातील अनुभव कथन केले.
जयश्री बापट यांनी विद्यार्थिनींना ‌‘नमस्ते‌’ असे संबोधन करून मनोगत व्यक्त केले. आज तुमच्या सारखेच मलाही लहान झाल्यासारखे वाटत आहे. तुम्ही विविध क्षेत्रात घेतलेल्या भराऱ्या पाहून आम्हा शिक्षकांना आनंद व कौतुकही आहे. स्वत:साठी वेळ द्या, छंद-आवडी जोपासा त्यातूनच प्रगती, उन्नती साधा आणि आम्ही आनंदी, उत्साही, सकारात्मक आहोत तशाच तुम्हीही रहा अशा शब्दात अनुभवाचे बोल सांगितले.
तुमची एसएससीची पहिली बॅच आम्हालाही हुरहुर लावणारी होती, असे सांगून जयश्री गोरे म्हणाल्या, 1975 सालच्या दहावीच्या परीक्षेत आम्हा नव्या शिक्षकांवर टाकलेला विश्वास तुम्ही विद्यार्थिनींनी सार्थ ठरवत हुजुरपागेच्या लौकिकात भरच घातली. तुम्हा विद्यार्थिनींचा हा विजय आम्हा शिक्षकांचाही विजय ठरला. आज वयाचा ठराविक टप्पा करून तुम्हाला आजीपण लाभले आहे. आपल्या नातवंडांच्या रुपाने तुमच्या हातात ओली माती आली आहे तिला छान आकार द्या आणि घडवा, अशा शुभेच्छा दिल्या.

कल्याणी केतकर, सुरेखा अण्णेगिरी यांनी शिक्षकांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनिता पिंपळखरे यांनी केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीसपदी मंगेश फल्ले तर उपाध्यक्षपदी सागर आव्हाड आणि राजा गायकवाड

पुणे-

पुणे श्रमिक पत्रकार संघ २०२५-२६ या वर्षाच्या निवडणुकीत अध्यक्ष पदी ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीसपदी मंगेश फल्ले तर खजिनदार पदी दिलीप तायडे, उपाध्यक्ष पदी सागर आव्हाड, राजा गायकवाड निवडून आले आहेत. तर चिटणीस पदी तनिष्का डोंगरे आणि निलेश चौधरी यांची निवड झाली आहे.
कार्यकारणी सदस्य पुढील प्रमाणे आहेत.

सज्जाद सय्यद ,लक्ष्मण खोत ,राजाराम पवार ,दत्ता अढागळे ,अतुल चिंचली ,नरेंद्र साठे ,आशिष देशमुख ,समीर सय्यद ,विक्रांत कुलकर्णी,तेजस टवलारकर

हरे राम हरे कृष्णा… च्या जयघोषात पुण्यात श्री श्री जगन्नाथ रथयात्रा

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ – इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे आयोजन ; यंदा तब्बल १ लाख भाविकांना महाप्रसाद
पुणे : हरे राम हरे कृष्णा…जय जगन्नाथ, जय बलराम, जय सुभद्रा… चा अखंड जयघोष, वरुणराजाची संततधार आणि भाविकांचा मोठा उत्साह अशा भक्तीमय वातावरणात पुण्यामध्ये श्री श्री जगन्नाथ रथयात्रा सोहळा जल्लोषात साजरा झाला. ओडिसामधील जगन्नाथ पुरी येथील रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ – इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे आयोजित रथयात्रेत हजारो भाविक पारंपरिक वेशात सहभागी झाले होते. पुष्पवृष्टी करीत पुणेकरांनी या यात्रेचे ठिकठिकाणी मोठया उत्साहात स्वागत केले.



आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ – इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे टिळक रस्त्यावरील स.प.महाविद्यालय येथून जगन्नाथ रथयात्रा सोहळ्याला प्रारंभ झाला. इस्कॉन कात्रज-कोंढवा रस्ता, पुणे मंदिरातील भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांना खास दर्शनासाठी रथावर आणले होते. इस्कॉन संस्थेचे संन्यासी परम पूज्य लोकनाथ स्वामी, इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे, आमदार हेमंत रासने, भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, सुनील कांबळे यांसह पुण्यातील नगरसेवक यांच्या उपस्थितीत भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा यांची आरती करून रथयात्रेला सुरुवात झाली. यावेळी इस्कॉन मंदिराचे उपाध्यक्ष संजय भोसले, मंदिराचे प्रवक्ते जनार्दन चितोडे, रथ यात्रेचे समन्वयक अनंतगोप प्रभू, जनसंपर्क प्रमुख प्रसाद कारखानीस आदी उपस्थित होते.

केरळमधील प्रसिद्ध थैय्यम लोककला आणि संस्कृतीवर आधारित महाविष्णू, नृसिंह सरस्वती आदि देवतांच्या रूपातील कलाकारांचे नृत्य रथ हे यात्रेतील आकर्षण होते. अतिशय जल्लोषात हरे कृष्ण महामंत्राचे कीर्तन आणि त्यावर भाव विभोर होऊन भक्त भगवान जगन्नाथाच्या रथासमोर नृत्य करीत होते. रथ यात्रेच्या मार्गावर भव्य रांगोळ्यांच्या गालीच्यावर रथ हजारो भाविकांतर्फे ओढला जात होता.

भगवान जगन्नाथ, भगवान बलराम आणि सुभद्रा लोकांना दर्शन, आशीर्वाद आणि कृपा देण्यासाठी रस्त्यावर येतात. जगन्नाथ पुरी येथे शतकानुशतके ही रथयात्रा काढली जाते. हा सोहळा साजरा करण्यासाठी जगन्नाथ पुरी येथे लाखो लोक जमतात. परंतु जगन्नाथ पुरी येथे प्रत्येकजण वैयक्तिकरित्या जाऊ शकत नाही. त्यामुळे इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी भगवान जगन्नाथाची कृपा जगभर पसरवण्यासाठी रथयात्रा सुरू केली.

स.प.महाविद्यालय, अभिनव महाविद्यालय चौक, बाजीराव रस्ता, शनिपार चौक, नगरकर तालीम चौक, लक्ष्मी रस्ता, शगुन चौक, रमणबाग शाळा, ओंकारेश्वर मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रस्ता मार्गे स.प.महाविद्यालय येथे रथयात्रेचा समारोप झाला. मार्गावर गीता आणि भागवतावर आधारीत पुस्तकांचे आणि प्रसादाचे वितरण चालू होते. विशेष म्हणजे स्वयं सेवक रथ यात्रा गेल्यानंतर मार्गावर पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या आदि कचरा उचलून घेत होते. सायंकाळी आरती, दर्शन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

रथयात्रेतील रथाची उंची २० फूट इतकी असून फुलांसह रंगीबेरंगी कापडांनी रथावर सजावट करण्यात आली. समारोपानंतर भगवंतांना ५६ भोगांचा नैवेद्य अर्पण करून आरती होईल. जवळपास २० हजार भाविकांना प्रसाद वाटप महाविद्यालयाच्या प्रांगणात रथयात्रेच्या सुरुवातीला आणि समारोपानंतर झाले. तर, रथयात्रा मार्गावर १ लाख प्रसादाची पाकिटे वाटण्यात आली.

प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानात पुणे जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्याकरीता काम करावे

आदिवासी विकास विभागाचे मंत्री डॉ. अशोक वुईके

पुणे, दि. २८: आदिवासी जमातीच्या आर्थिक व सामाजिक विकासाकरीता प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान राबविण्यात येत आहे; शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा नागरिकांना लाभ देवून जिल्ह्यात अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन पुणे जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्याकरीता प्रशासनाचे काम करावे, याकरीता स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून हे अभियान यशस्वीपणे पूर्ण करावे, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास विभागाचे मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले.

प्रधानमंत्री जनजाती आदिवासी महान्याय अभियान आणि प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार उमा खापरे, दिलीप वळसे पाटील, सुनील शेळके, बापूसाहेब पठारे, शंकर मांडेकर, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लिना बनसोड, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त गोपीचंद कदम, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगावचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई आदी उपस्थित होते.

डॉ. वुईके म्हणाले, विकसित भारताकरीता आदिवासींचे योगदान विचारात घेता त्यांच्या सशक्तीकरणाकरिता ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ ३० जून पर्यंत राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीकरीता २५ योजना, १७ विभागाच्या माध्यमातून राबविण्याचे उद्दिष्ट आहे. या अभियानाअंतर्गत पुणे जिल्ह्यातील ९९ गावांची निवड करण्यात आली असून गावातील पात्र नागरिकांना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ देण्याकरिता गावनिहाय कृती आराखडा तयार करा. येत्या १५ ऑगस्ट रोजी आयोजित ग्रामसभेत हा कृती आराखडा मंजूर करुन त्यानुसार कार्यवाही करावी. या गावात योजनांची व्यापक स्वरुपात जनजागृती करावी.

पुणे शहरात आदिवासी जमातीतील विद्यार्थ्यांकरीता अद्यायवत वस्तीगृह बांधण्याकरीता प्रशासनाने जागा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करावी, याकरीता निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. आश्रमशाळेतील पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांची आधार कार्डाकरीता नोंदणी करावी. आदिवासी बांधवांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच त्यांचे हक्क हिरावून घेणार नाही तसेच कातकरी समाजातील मुले शाळेपासून वचिंत राहणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी.

आदिवासी जमातीतील नागरिकांच्या कल्याणाकरीता पुणे जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त करत डॉ. वुईके म्हणाले, आदिवासींच्या कल्याणाकरीता राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाकरीता निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. या बैठकीत लोकप्रतिनिधींनी केलेल्या सर्व सूचनांचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही डॉ. वुईके म्हणाले.

यावेळी आमदार श्री. वळसे पाटील, श्री. शेळके, श्री. पठारे आणि श्री. मांडेकर यांनी आदिवासी जमातीतील नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात, याकरीता निधीची उपलब्ध करुन देण्याची सूचना केल्या.

बैठकीच्या अनुषंगाने माहिती देतांना जिल्हाधिकारी श्री. डूडी म्हणाले, जिल्ह्यात प्रधानमंत्री जनजाती आदिवासी महान्याय अभियानाअंतर्गत १०१ शिबीराचे आयोजन करुन त्यामध्ये १ हजार ४४१ आधार कार्ड, ४८५ लाभार्थ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे वाटप, ३४ लाभार्थ्यांच्या वनहक्क दाव्यास मंजूरी, १३ हजार ४८६ नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र, १३८ लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्जवला गॅस योजना, ९७१ लाभार्थ्यांना प्रधानमंत्री जनधन योजना, ४२७ नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड ,११ हजार १७० नागरिकांना शिधापत्रिका वाटप करण्यात आले आहेत.

प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाअंतर्गत ३१ लाभार्थ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे वाटप, २७ लाभार्थ्यांना प्रधानमंत्री जनधन योजनांचा लाभ, २१४ नागरिकांचे आधार कार्ड, १०१ नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र तसेच ५३ नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड, १५९ शिधापत्रिका, २१ रहिवाशी प्रमाणपत्र आणि ९ नागरिकांना किसान क्रेडिट कार्डचा लाभ देण्यात आला आहे.

प्रधानमंत्री जनजाती आदिवासी महान्याय अभियान आणि प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानात स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक, सामजिक संस्था आदींना विश्वासात घेवून प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल, असेही श्री. डुडी म्हणाले.

श्री. पाटील यांनी जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यातील आदिवासी जमातीकरीता करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.

डॉ. वुईके यांच्या हस्ते जिल्ह्यातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात धनादेश वाटप, कातकरी लाभार्थ्यांना घरकुलांकरीता वनहक्क दावा बहाल करण्यात आले. तसेच भिमाशंकर सेंद्रिय शेतकरी गट निगडाळे, ता. आंबेगाव येथील राईस मिलचे दृकश्राव्यप्रणालीद्वारे उद्धाटन करण्यात आले.

डॉ. वुईके यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील आंबेगाव व जून्नर तालुक्यातील आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी, निदान, प्रतिबंधात्मक उपचाराकरीता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव आणि के.ई.एम. रुग्णालय संशोधन केंद्र पुणे यांच्या सामंजस्य करार करण्यात आला.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथे जिप्सी सफारी उपक्रमाचे उद्घाटन

पुणे, दि.२८: राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथील गवताळ प्रदेशामध्ये जिप्सीमधून करण्यात येणाऱ्या सफारी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. नागरिकांनी या सफारीचा लाभ घेण्याचे त्यांनी आवाहन केले.

यावेळी वनसंरक्षक आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक महादेव मोहिते,सहायक वनसंरक्षक मंगेश ताटे, इंदापुरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी भाग्यश्री ठाकूर आदी उपस्थित होते.

श्री. भरणे यांच्या हस्ते पुणे वनविभागाकडून एकूण ३ जिप्सीधारकांना प्रत्येकी १ लाख रुपयाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले तसेच कडबनवाडी गवताळ प्रदेशाच्या लोगोचे अनावरणही करण्यात आले.

श्री. भरणे यांनी कडबनवाडी येथील गवताळ प्रदेशाची स्वतः सफारी केली. नागरिकांनीही या सफारीचा आनंद घेऊन याबाबत इतर नागरिकांपर्यंत माहिती पोहचवावी, असे आवाहन श्री. भरणे यांनी केले.

यावेळी कडबनवाडी वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जलभूषण भजनदास पवार, सदस्य दादासाहेब जाधव, सरपंच संगिता गावडे, उपसरपंच कडबनवाडी, अॅड. सचिन राउत, फ्रेंडस ऑफ नेचर क्लब, निमगाव केतकी व त्यांचे सदस्य आणि परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

विकासाची बकवास आता तरी भाजपने बंद करावी -माजी आमदार मोहन जोशी

पुणे : शहराच्या विकासाची बकवास करणाऱ्या भाजप नेत्यांना त्यांच्याच पक्षाच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी घरचा आहेर दिला आहे, अशी टीका माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.

गेल्या दहा वर्षात पुण्याचा विकास शून्य झाल्याची कबुली खासदार कुलकर्णी यांनी दिली असून पुण्यात रहावेसे वाटत नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे. विकास खुंटल्याने पुणे नकोसे झाले असे सांगून त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. भाजपच्या दिशाहीन आणि निष्क्रिय कारभारावर विरोधी पक्षांनी टीका करायची गरज उरलेली नाही, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाजावाजा केलेली स्मार्ट सिटी योजना पुण्यासह देशभर फसली आहे. मुठा नदी सुधार नदी योजनेची वीट सुद्धा हललेली नाही, असे भाजपचे नेते बोलत असतात. रस्ते, स्वच्छता आदी नागरी सुविधा कोलमडलेल्या आहेत. रस्ते चांगले नसल्याने छोटे मोठे अपघात होत आहेत. त्यात तरुणांचा बळी गेल्याच्या घटना गेल्या काही दिवसात घडल्या आहेत. त्याचे गांभीर्य भाजप नेत्यांच्या वागणुकीत दिसत नाही. पीएमपीएमएलच्या बसगाड्यांच्या ताफ्यात नव्याने भर घालणेही भाजपच्या नेत्यांना गेल्या पाच वर्षांत जमलेले नाही. पीएमपीएमएलच्या प्रवाशांना दररोज मनःस्ताप सहन करावा लागतो. फक्त निवडणुका जिंकण्यासाठी डावपेच,उथळ कार्यक्रम यात भाजपचे खासदार आमदार मश्गूल आहेत. पुणेकरांनी भाजपला भरभरून मते दिली पण नेते मस्तीत राहिले, असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे.

पुण्याच्या या अवस्थेला प्रशासन जबाबदार नसून त्यावर नियंत्रण ठेवणारे भाजपचे मंत्री, खासदार, आमदार जबाबदार आहेत. मेट्रो, अंतर्गत वर्तुळाकार मार्ग, शहराभोवतीचा रिंग रोड यात मोठ्या घोषणा मुख्य मंत्र्यांनी केल्या अंमलबजावणी काही नाही. मेट्रोचे काम गतीने होत नाही, याकडेही मोहन जोशी यांनी लक्ष वेधले आहे. आगामी महापालिका निवडणुकीत पुणेकर भाजपला धडा शिकवल्या शिवाय रहाणार नाहीत.