Home Blog Page 481

“कुंकवातील भेसळ थांबवा; त्वचेसाठी घातक”

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे कारवाईची मागणी

मुंबई, २८ जून २०२५ : राज्यभरात विक्री होणाऱ्या कुंकवामध्ये रसायनांची व रंगांची भेसळ होत असल्याने महिलांच्या त्वचेस धोका निर्माण झाला आहे, असे निदर्शनास आणत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. नरहरी झिरवाळ यांच्याकडे तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.

२४ जूनला वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या बातमीचा संदर्भ देत त्यांनी कुंकवामध्ये असलेल्या घातक पदार्थांमुळे त्वचेवर खाज, ॲलर्जी, डाग आणि काही वेळा कर्करोग होण्याची शक्यता निर्माण होत असल्याचे नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या पत्राद्वारे राज्यभरातील कुंकू उत्पादक आणि विक्रेत्यांकडून नमुने संकलित करून त्यांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी केली असून, भेसळ आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, असे स्पष्ट केले आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तांनाही यासंदर्भातील प्रत पाठवून यंत्रणेला सजग राहण्याचे आवाहन केले आहे. महिलांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या विषयाकडे शासन गांभीर्याने पाहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

कोर्टातील दोन लिपिकांना लाचलुचपत विभागाकडून अटक:फ्लॅटचा ताबा देण्यासाठी ३५ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले

पुणे-पुण्यातील भाडे नियंत्रण कायदा न्यायालयातील दोन लिपिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ३५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. रविंद्र हिंदुराव पवार (४०) आणि अमित बबन भुसारी (३४) अशी अटक करण्यात आलेल्या लिपिकांची नावे आहेत. प्रकरणी त्यांच्याविरोधात सिंहगड राेड पाेलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ च्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

50 वर्षीय तक्रारदार यांचा विठ्ठलवाडी सिंहगड राेड, हिंगणे खुर्द येथील विशाल पार्क या साेसायटीतील एक फ्लॅट भाडेतत्वावर दिला हाेता. परंतु त्यांचा भाडेकरु सदरचा फ्लॅट खाली करत नव्हता. त्यांनी त्याची तक्रार सक्षम प्राधिकारी, भाडे नियंत्रण कायदा न्यायालय पुणे यांच्याकडे दाखल केली होती. या खटल्याच्या अनुषंगाने भाडे नियंत्रण कायदा न्यायालयाने तक्रारदार यांच्या बाजूने निकाल देऊन भाडेकरुच्या ताब्यात असलेल्या फ्लॅटचा ताबा तक्रारदाराला देण्याचा आदेश दिला हाेता.

या आदेशाची पूर्तता करण्याची जबाबदारी कोर्टाने लिपिक रविंद्र पवार व अमित भुसारी यांच्यावर टाकली. पण या दोघांनी भाडे नियंत्रण कायदा न्यायालयाच्या आदेशावर कार्यवाही करुन फ्लॅटचा ताबा तक्रारदारास देण्यासाठी ४० हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर, एसीबीचे पाेलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांचे मार्गदर्शनाखाली सापळा रचला असता, आराेपी यांनी सिंहगड राेडवरील हाॅटेल राधा प्युअर व्हेज याठिकाणी लाचेची मागणी करुन ती स्वीकारत असताना रंगेहाथ अटक केली. याबाबत आराेपी विराेधात सिंहगड राेड पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रसिद्ध सॅक्सोफोन वादक इकबाल दरबार यांचे वयाच्या 77व्या वर्षी निधन

पुणे-जुन्या पिढीतील नामवंत, ऑर्केस्ट्रा विश्वातील प्रसिद्ध सॅक्सोफोन वादक आणि ‘दरबार बँड’ चे संस्थापक-संचालक इकबाल दरबार यांचे निधन झाले आहे. ते 77 वर्षांचे होते.त्यांच्या मागे तीन मुले, एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे

ऑर्केस्ट्रा ही संकल्पना महाराष्ट्रात रुजवणाऱ्या काही मोजक्या कलावंतांमध्ये दरबार यांचा मानाचा उल्लेख होतो. त्यांच्या वादनाचे चाहते केवळ पुणे-मुंबईपुरते मर्यादित नव्हते तर बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारही त्यांच्या वादनाने भारावून जात असत.

पुणे महानगरपालिकेत आयोजित एका कार्यक्रमात, ज्यात दिलीपकुमार यांचा सन्मान करण्यात आला होता, त्या वेळी ‘मधुबन में राधिका नाचे रे’ हे गीत इकबाल दरबार यांनी सॅक्सोफोनवर सादर केले. त्यांच्या त्या सादरीकरणाने दिलीपकुमार इतके भारावून गेले की त्यांनी उभे राहून त्यांना मानवंदना दिली आणि ‘वन्स मोअर’ ची मागणी केली.

इकबाल दरबार यांचे कार्य केवळ संगीतपुरते मर्यादित नव्हते. सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि सेवाभाव ही त्यांच्या कार्यशैलीची खास वैशिष्ट्ये होती. दरवर्षी पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन मिरवणुकीची सुरुवात त्यांच्या दरबार बँडद्वारे सादर केलेल्या आरतीनेच होत असे. हे केवळ परंपरेचे नव्हे, तर समाजाशी असलेल्या त्यांच्या नात्याचे प्रतीक होते.

त्यांनी सीमेवर जाऊन आपल्या वादनाने भारतीय जवानांचे मनोरंजन केले आणि त्या कार्यक्रमातून मिळालेला निधी कृतज्ञता निधी म्हणून सैन्याला दिला. त्यांनी स्थापन केलेल्या ‘मोहम्मद रफी आर्ट फाउंडेशन’च्या माध्यमातून गरजू कलाकारांना वैद्यकीय आणि आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी ते झटत होते. बँडमधील कलाकार व्यसनमुक्त व्हावेत यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांना योग्य वैद्यकीय मदत मिळावी यासाठीही ते अहोरात्र झटले.

शिना चोहान ‘संत तुकाराम’ मधून; अवली जीजाबाईच्या प्रेरणादायी भूमिकेत येणार प्रेक्षकांसमोर

– चित्रपट १८ जुलै रोजी प्रदर्शित होणार

अभिनेत्री शिना चोहान आपल्या पहिल्या हिंदी चित्रपट ‘संत तुकाराम’ मध्ये अवली जीजाबाई यांची प्रमुख भूमिका साकारत आहे. हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इतिहासात संत तुकाराम यांच्या पत्नी अवली यांना एक धाडसी, समजूतदार आणि वास्तववादी स्त्री म्हणून ओळखलं जातं, ज्या आपल्या पतीच्या अध्यात्मिक मार्ग आणि कुटुंबीय जबाबदाऱ्या यामधील समतोल साधण्याचा प्रयत्न करतात.

शिना चोहान आपल्या भूमिकेविषयी बोलताना म्हणाली:
“आम्ही आजच्या पिढीला संत तुकाराम यांची खरी कहाणी सांगून प्रेरित करू इच्छितो. हा भगवान विठ्ठल यांचा खरा संदेश आहे — की जर तुम्ही मनापासून श्रद्धा ठेवली, तर काहीही अशक्य नाही.”

या भूमिकेच्या तयारीसाठी शिनाने एक मराठी भाषांतरकाराची मदत घेतली आणि १५व्या शतकातील ऐतिहासिक ग्रंथ व लेखांचा अभ्यास केला. याशिवाय, ती त्या गावातही गेली जिथे संत तुकाराम आणि अवली जीजाबाई वास्तव्यास होते, आणि तिथल्या महिलांसोबत वेळ घालवला.

“त्या गावातील महिलांबरोबर घालवलेला वेळ माझ्या भूमिकेच्या आत्मज्ञानासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला,” असे शिनाने सांगितले.

चित्रपटात संत तुकाराम यांची भूमिका साकारणारे मराठी सुपरस्टार सुभोध भावे यांनी शिनाच्या अभिनयाची स्तुती करताना म्हटलं:
“शिना दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनाला अगदी चांगल्या प्रकारे समजते. प्रत्येक सीनमध्ये ती प्रामाणिकपणे आणि समर्पणाने अभिनय करते. तिच्यासारखा सहकलाकार मिळणं हे एक वेगळंच समाधान आहे.”

या चित्रपटात सुभोध भावे यांच्यासोबत संजय मिश्रा, अरुण गोविल, शिशिर शर्मा, हेमंत पांडे, गणेश यादव, ललित तिवारी, मुकेश भट्ट आणि शिव सूर्यवंशी हे मान्यवर कलाकार विविध भूमिकांत झळकणार आहेत. तसेच मुकेश खन्ना हे चित्रपटाचे सूत्रधार (नरेटर) असतील, जे प्रेक्षकांना संत तुकारामांच्या आध्यात्मिक प्रवासामध्ये घेऊन जातील.

चित्रपटाचे संगीत निखिल कामत, रवि त्रिपाठी आणि वीरल-लावण यांनी दिलं आहे. अभंग परंपरेवर आधारित हे संगीत भक्तीभाव, भावनिकता आणि पारंपरिक तत्त्व यांचा सुंदर मिलाफ करतं. हे संगीत संत तुकारामांच्या अंतरंग प्रवासाचं प्रतीक आहे — दु:खातून शांततेकडे, आणि विरोधातून अध्यात्मिक क्रांतीकडे.

‘संत तुकाराम’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य ओम यांनी केलं आहे आणि याची निर्मिती बी. गौतम यांनी Curzon Films आणि पुरुषोत्तम स्टुडिओज यांच्या सहकार्याने केली आहे. हा चित्रपट केवळ ऐतिहासिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर पॅन-इंडिया सिनेमा अनुभव म्हणूनही सादर केला जात आहे, जो प्रेक्षकांच्या हृदयाशी भाषा आणि प्रादेशिक सीमांच्या पलीकडे जाऊन जोडला जातो.

हिंदी सक्तीचा जीआर मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार:आदित्य ठाकरे

मुंबई-राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी हिंदी सक्तीचा निर्णय भाजप सरकारचा असल्याचे सांगत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांवर निशाणा साधला. हिंदी सक्तीचा जीआर मागे घेईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहिल, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी सरकारला दिला आहे.

आम्ही सक्तीचा जीआर काढला होता का? आम्ही प्रत्येक शाळेत मराठी भाषेची सक्ती केली होती. हिंदी भाषा लादण्याचे किंवा तिसरी भाषा लादण्याचे काम भाजपवाल्यांनी केले आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

गेल्या तीन वर्षांत दोन मुख्यमंत्री वेगळे झालेत. ते सरकारमध्ये स्वत: बसलेत. पण आरोप आमच्यावर करत आहेत. नशीब ते नेहरूंवर पोहोचले नाहीत, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. भाजपमध्येही अंतर्गत वाद आहेत, ते आपल्याला दिसत आहेत. दुसरे कोणी असे मंत्री आहेत का, ज्यांना फडणवीसांची जागा पाहिजे? हे ही असू शकते. सक्तीच्या जीआरची तारीख काय आहे? तो परवा काढला आहे. हे लोक कोणत्या धुंदीत आहेत? झोपेत आहेत का? हिंदीच्या सक्तीचा जीआर हा भाजपच्या सरकाने काढलेला आहे. भ्रष्टनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनी काढलेला आहे. शिंदेंनाच फडणवाीसांना अडचणीत आणायचे नाही ना? हा देखील विचार करा, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारमध्ये कोण विरोधात काम करतंय हे ओळखावे. आपण सगळे भारतीय आहोच. पहिलीच्या विद्यार्थ्यांवर तिसरी भाषा खरोखरच लादणार आहात का? याचा थोडा स्वार्थाचे राजकारण बाजुला ठेवून विचार करावा, असा सल्ला आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.

हिंदी सक्तीचा जीआर जोपर्यंत मागे घेतला जात नाही, तोपर्यंत उद्याचे आणि ५ जुलैचे आंदोलन चालूच राहिल. आमचा विरोध भाषेला किंवा भाषिकाला नाही. तुम्ही पहिलीच्या विद्यार्थ्यांवर हिंदी लादत आहात, महाराष्ट्रात सक्ती करत आहात, त्याला आमचा विरोध आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. सरकारमध्ये जी गडबड चालू आहे, त्याविरोधात आम्ही विरोधीपक्ष म्हणून उतरलो आहोत. आमच्यावर कोणतीही भाषा आम्ही लादू देणार नाही, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी सरकारला दिला.

महाराष्ट्रात जवळपास २५ लाख विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. १३ मे रोजी दहावीचा निकाल लागला होता. १३ मे पासून आतापर्यंत प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली, त्यामध्ये पुढे कसे जायचे? याबद्दल कोणाला काहीच माहिती नाही. ऑनलाइन फॉर्ममध्ये गडबडी आहे, ओटीपी येण्यामध्ये अडचणी येत आहेत. वेबसाइट देखील कोलमडली. ११ वी प्रवेशाची यादी लागली नाही, तर युवासेना शांत बसणार नाही, असा इशाराही आमदार आदित्य ठाकरे यांनी दिला.

महाराष्ट्रात हिंदी सक्तीचा RSS व भाजपाचा कुटील डाव हाणून पाडू, मराठीचा गळा घोटू देणार नाही: हर्षवर्धन सपकाळ

भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?

देवेंद्र फडणवीस व बावनकुळेंनी गोलवलकरांच्या बंच ऑफ थॉटवर भूमिका स्पष्ट करावी.

मुंबई, दि. २८ जून २०२५
महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करण्याचा शासन आदेश जारी झाल्यापासून हा निर्णय रद्द करावा ही भूमिका काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे. ८ व्या सुचीतील सर्वभाषा संपवून केवळ हिंदी एकच भाषा ठेवायची हा संघ व भाजपाचा कुटील डाव आहे. हा कुटील डाव हाणून पाडू व मराठीचा गळा घोटू देणार नाही असा खणखणीत इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, हिंदी भाषेचा सन्मानच आहे पण सक्ती चालणार नाही. मराठी फक्त भाषा नाही तर आमची जीवनपद्धती आहे. काही राजकीय पक्ष, संघटना व संस्था आपापल्या पद्धतीने या निर्णयाचा विरोध करत आहेत. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर काँग्रेस पक्षाच्या वतीने मी साहित्यिकांना पत्र लिहून आवाहनही केले आहे. तर काही जण मोर्चा काढत आहेत. हिंदी सक्तीचा निर्णय रद्द करावा हीच सर्वांची दिशा आहे. हा संस्कृतीचा लढा आहे त्यासाठी सर्वांनी पुढे येऊन लढले पाहिजे कोणाचा फोन वा निमंत्रण आले का हा प्रश्न महत्वाचा नाही. आम्ही पहिलीपासून हिंदीच्या सक्तीविरोधात लढत आहोत असेही सपकाळ म्हणाले.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदी नाही तर मग महाराष्ट्रातच पहिलीपासून हिंदी कशासाठी. गुजरातमध्ये एक निती व महाराष्ट्र दुसरी निती कशी हे फडणवीस व बावनकुळे यांनी स्पष्ट करावे, हा भाजपाचा दुटप्पीपणा आहे. तसेच गोलवलकर यांच्या बंच ऑफ थॉट बद्दल त्यांनी भूमिका स्पष्ट करावी असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

तो मोर्चा मराठीसाठी नाही, महापालिका निवडणुकांसाठी आहे ! उद्धव ठाकरेंच्या विरोधामागे राजकारणच असल्याचा फडणवीस यांचा दावा

मुंबई-पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकवण्याच्या मुद्यावरून काढण्यात येत असलेल्या मोर्चावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. ही केवळ राजकीय भूमिका आहे असे मी म्हणणार नाही. कोणाच्याही समोर प्रश्नचिन्ह निर्माण करणार नाही. मात्र महानगरपालिकेच्या निवडणुका नसत्या तर कदाचित इतका वेगळ्या पद्धतीने विरोध झाला नसता. असा दावा फडणवीस यांनी केला आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे हे माझे चांगले मित्र आहेत. म्हणून काय झाले? मात्र त्यांच्या काही भूमिका आहेत. तर माझ्या काही भूमिका आहेत. सर्वांच्या सारख्या भूमिका असत्या तर सर्व एका पक्षात राहिले असते. त्यामुळे भूमिका वेगळ्या असू शकतात. मात्र उद्धव ठाकरे यांनी जर एखादा रिपोर्ट स्वीकारला आणि आता त्याच्या विरोधात ते बोलताय, तर याचा अर्थ केवळ राजकीयच आहे. या राज्यात माशेलकर, मुणगेकर, सुखदेव थोरात यांच्यासारख्या लोकांवर प्रश्नचिन्ह लावता येईल का? असा प्रतिप्रश्न फडणवीस यांनी विचारला आहे.

देवेंद्र फडणवीस यांना राजकारण करायचय, त्यामुळे देवेंद्र फडणवीस काहीतरी करतोय. मात्र या लोकांना देखील राजकारण करायचे आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अशा लोकांनी जर एखादा रिपोर्ट दिला आणि तो तुम्ही स्वीकारला आहे. आता तुम्ही त्यालाच विरोध करता? याचा अर्थ मराठीचा प्रेम नाही तर राजकारण असल्याचा स्पष्ट आरोप देखील फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयामागचे कारणही सांगितले. यामागे एक सायंटिफिक प्रोसेस आहे. या प्रोसेस मध्ये आपले विद्यार्थी पुढे कसे गेले पाहिजे, या दृष्टिकोनातून तयार केलेले त्रिभाषा सूत्र आहे. ते तयार करत असताना विद्यार्थ्यांची बुद्धी सर्वात जास्त कधी चालते, भाषा शिकण्याची शक्यता कधी अधिक असते. या संदर्भातले रिसर्च करून त्या कालावधीमध्ये त्यांना भाषा शिकवल्या तर ते अधिकच्या भाषा शिकू शकतात, अशा प्रकारचा मुद्दा समोर आला. हा आमच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय नाही. कुठलीही भाषा शिका, हिंदीच शिकली पाहिजे असे नाही. हे आम्ही एका मिनिटात सांगितले. हिंदी सक्तीला यांचा विरोध नाही तर यांचा विरोध केवळ हिंदीला आहे. भारतामध्ये तुम्हाला इंग्रजी चालते, तीला तुमचा विरोध नाही. परकीय भाषा चालते मग भारतीय हिंदी का चालत नाही? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

मराठी आणि हिंदी कॉम्पिटिशन झाली तर पहिली मराठीच निवडली जाईल. मराठी सोबत कोणतीही कॉम्पिटिशन नाही. मात्र त्याचवेळी आमच्या मुलांना तीन भाषा शिकायच्या आहे. तीन भाषा शिकले नाही तर नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे क्रेडिट मिळणार नाही. नवीन भाषा न शिकल्यामुळे मराठी विद्यार्थ्यांचे क्रेडिट कमी होणार आहे. त्यामुळे चांगले मार्क घेऊन देखील राष्ट्रीय पातळीवरील संस्थांमध्ये मराठी विद्यार्थ्याचा नंबर लागणार नाही. हे मराठी भाषिक विद्यार्थ्यांना मागे ओढण्यासारखे आहे.

राज्यातील संस्थांमध्ये ॲडमिशन तुम्ही ठरवाल. मात्र राष्ट्रीय पातळीवरील संस्थांमध्ये सर्व निवड सिईटीने होत आहे. यात आपण मराठी मुलांचे नुकसान करत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. हा मुद्दा भावनेपेक्षा वस्तुस्थिती समजून घ्यायचा आहे, असे आवाहन देखील त्यांनी केले. सत्तेत असताना वस्तुस्थिती समजून घ्यायची, कमिटी तयार करायची, त्यांचा रिपोर्ट स्विकारायचा, आणि विरोधी पक्षात गेल्यानंतर भूमिका बदलायची? अशा शब्दात विविध फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

गुजरातमध्येही तिसरीपासून हिंदी भाषा-महाराष्ट्रातील काही विद्वानांनी गुजरातमध्ये तिसरी भाषा शिकवली जाते का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र, गुजरात राज्यामध्ये देखील तिसऱ्या वर्गापासून हिंदी भाषा शिकवली जात आहे. हिंदीला त्यांनी संस्कृत आणि इतर भाषांचे देखील पर्याय दिलेले आहेत. असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी भाषेवरून गुजरातकडे बोट दाखवणाऱ्या नेत्यांना देखील प्रत्युत्तर दिले आहे.

मंजुषा पाटील यांच्या गायनातून स्वरांची मोहिनी

बालगंधर्व यांच्या जयंतीनिमित्त रंगली नाट्यपदांची मैफल

पुणे : तारसप्तकात सहज फिरत असलेला खडा आवाज, त्याच बरोबर नजाकत दर्शविणारा लडिवाळपणा आणि अभिनयाच्या अंगाने भावप्रदर्शित करून विदुषी मंजुषा पाटील यांनी सादर केलेल्या नाट्यपदांनी रसिक मोहित झाले.
संगीताचार्य पंडित द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे नटसम्राट बालगंधर्व यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी गायलेल्या अजरामर नाट्यसंगीतावर आधारित ‌‘मम सुखाची ठेव‌’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन मयूर कॉलनीतील बालशिक्षण मंदिर सभागृहात करण्यात आले होते. विदुषी मंजुषा पाटील यांनी दहा वर्षांनंतर पुण्यात नाट्यसंगीताच्या रंगविलेल्या मैफलीला पुणेकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरुवात ‌‘नमन नटवरा विस्मयकारा‌’ या नांदीने झाली. त्यानंतर स्वयंवर, मानापमान, सौभद्र, अमृतसिद्धी, कान्होपात्रा, एकच प्याला, विद्याहरण अशा विविध संगीत नाटकांमधील गाजलेली नाट्यपदे विदुषी मंजुषा पाटील यांनी प्रभावीपणे सादर केली.
‌‘मधु मधुरा तव‌’, ‌‘बलसागर तुम्ही वीर शिरोमणी‌’, ‌‘मम सुखाची ठेव देवा‌’, ‌‘धावत येई सख्या यदुराया‌’ या पदांसह ‌‘खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी‌’, ‌‘जोहार माय बाप जोहार‌’ या नाट्यपदांचे सुरेल सादरीकरण करताना अनेक नाट्यगीतांना रसिकांकडून वन्समोअर अशी दाद मिळाली. कार्यक्रमाची सांगता कान्होपात्रा नाटकातील ‌‘अगा वैकुंठीच्या राया‌’ या भैरवीतील सुप्रसिद्ध अभंगाने केली. विदुषी मंजुषा पाटील यांनी स्वरांच्या जादूने मोहित करून विठोबाचे लोभसवाणे रूप रसिकांसमोर साकार केले. विठ्ठल नामाच्या जयघोषात, टाळ्यांच्या गजरात सारे रसिक दंग झाले.
बालगंधर्व यांच्या सांगीतिक प्रवासासह अनेक वैयक्तिक किस्से सांगत रवींद्र खरे यांनी अभ्यासपूर्ण निवेदनातून कार्यक्रमाची रंगत वाढविली.
प्रशांत पांडव (तबला), राहुल गोळे (ऑर्गन), प्रसाद जोशी (पखवाज), अपूर्व द्रविड (तालवाद्य), श्रुती भावे-चितळे (व्हायोलिन), तनिष्क अरोरा, अनुष्का साने, रसिका पैठणकर (तानपुरा, सहगायन) यांनी समर्पक साथसंगत केली.
कलाकारांचा सत्कार वीणा सहस्त्रबुद्धे, संजय चितळे, गिरीश चितळे, जयंत सप्रे, गोविंदराव बेडेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाला सांगीतिक क्षेत्रातील दिग्गज कलाकारांनी आवर्जून उपस्थिती लावली होती.
नटसम्राट बालगंधर्व यांच्यासह संगीत नाटकात भूमिका केलेल्या ज्येष्ठ गायक-अभिनेत्री विदुषी निर्मला गोगटे यांनी पंडित काणेबुवा, भास्करबुवा बखले, बालगंधर्व आणि कवी कुलगुरू कालिदास यांच्या कार्याची महती विशद केली. बालगंधर्व हे फक्त सुरेल, नादमय अभिनेते गायक नव्हते तर त्यांचे गाणे हृदयातून फुललेले असे. रंगमंचावरील पदन्यास, केशभूषा, वेशभूषा याकडे बालगंधर्व यांचा विशेष कटाक्ष असे. मंजुषा पाटील यांच्या गायनात नाट्यसंगीताला आवश्यक बहारदारपणा तसेच लडिवाळपणाही आहे अशा शब्दात गोगटे यांनी मंजुषा पाटील यांच्या गायकीचे कौतुक केले.

बासरीच्या अविट गोडीत रसिक दंग 

हर्षित शंकर यांच्या वादनास रसिक पुणेकरांची दाद 

पुणे ता. २७: जगविख्यात बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या तालमीत तयार झालेले अवघे २२ वर्षीय हर्षित शंकर रंगमंचावर आले.. आपल्या सुरेल वादनातून आणि मधुर संवादातून त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं..आषाढसरींच्या साक्षीने सजलेले त्यांचे बासरीवरील जादुई स्वर रसिकांना विलक्षण अनुभूती देऊन गेले. हा सूरमयी सोहळा काल रसिकांनी याची देही याची डोळा अनुभवला.  व्योमी मीडिया अँड एंटरटेनमेंटच्या प्रियांका यादव यांच्या संकल्पनेतून शंकर ध्वनी हा कार्यक्रम पार पडला. खासदार डॉ. मेधाताई कुलकर्णी, ज्येष्ठ तबलावादक पं. अरविंदकुमार आझाद, सारंगधर साठे, अनिल कुमार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

वैष्णवी डेरे यांच्या भरतनाट्यम प्रस्तुतीने मैफलीची सुरुवात झाली. प्रणवा कारम्, सिद्धिविनायकम् तसेच अधीर बिराजे, बासरी श्याम या रचनांचे बहारदार नृत्य सादरीकरण करत त्यांनी रसिकांची मने जिंकली. हर्षित शंकर यांनी पारंपारिक शास्त्रीय वादनातून प्रारंभ केला. रात्रीच्या प्रहरातील राग जोग सादर करत आलापामधून स्वरांचे सौंदर्य उलगडले. त्यांच्या वादनातून श्रोत्यांना गौरवशाली परंपरेचे दर्शन घडले.

 उत्तरोत्तर रंगत गेलेल्या मैफलीत उपशास्त्रीय वादन पेश करत हर्षित शंकर यांनी वेगळ्या उंचीवर नेले. पहाडी धून, तू ही रे..या त्यांच्या रचना ऐकताना रसिकांचे भान हरपले. महादेवाचे आदि आणि अनंत रूप उलगडणारे त्यांचे विलोभनीय स्वर रसिकांना विशेष भावले. वैष्णव जन जो , रघुपती राघव, हरे रामा हरे कृष्णा अशा भक्तिमय रचनांनी त्यांनी आपला प्रस्तुतीची स्वरमय सांगता केली.  

आशिष रागवाणी (तबला), शुभम उगले (पखवाज), रोहित कुलकर्णी (कीबोर्ड), अपूर्व द्रविड (तालवादक) त्यांना समर्पक साथ दिली. तर अनघा हरकरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पुण्यात प्रथमच झालेल्या शंकर ध्वनी कार्यक्रमास रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. येणाऱ्या काळात राज्यभर हा कार्यक्रम घेण्याचा मानस प्रियांका यादव यांनी व्यक्त केला.  

हर्षित शंकर यांच्या वादनाने भारावून गेलेल्या वैभव लव्हाळे यांनी शंकराचा वेणूनाद अशी उत्स्फूर्त कविता सादर केली. 

“हा केवळ वेणूनाद नव्हता साक्षात माधव अवतरला,

ऐकण्या या शंकरास आज शंकर स्वये रसिक जाहला,

ती राधा जी बावरली होती ते वृंदावन येथे अवतरले,

पुन्हा ती यमुना कर्णरंध्रातुन वाहून पुण्यनगरास पावन केले…

हे सूर बासरीचे जाऊदेत त्रिभुवणी हीच माझी प्रार्थना,

साष्टांग हे दंडवत सुरांना आणि सुरामागच्या कलावंतांना.”

नदीसुधार प्रकल्पाबाबत सावळा गोंधळ,एमआयटी,गांधी भवन येथील अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष,पुणेकरांचे नागरी जीवन हलाखीचे…

खासदार मेधा कुलकर्णींकडून महापालिकेची झाडाझडती

पुणे:

“नदीसुधार प्रकल्पाबाबत सावळा गोंधळ सुरु आहे. पुण्यातील नद्या खूप जुन्या आहेत. मात्र, नदीसुधारच्या नावाखाली नद्यांची वाट लागत आहे. पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. राम नदी नाहीशी झाली, तशी मुळा-मुठा नद्याही संपतील का, याची भीती आहे. नदीसुधार प्रकल्पाची कामे चुकीच्या पद्धतीने झालेले आहेत. त्यामुळे पूरस्थिती निर्माण आहे, याला प्रशासन जबाबदार आहे, हे आयुक्तांच्या नजरेस आणले आहे. तसेच सुस रोड कचरा प्रकल्प भिजत घोंगडे झाले असून, तेथील कचरा प्रकल्प तातडीने हलवावा, त्यासाठी पर्यायी जागेचा विचार व्हावा, अशा सूचना केल्या आहेत,शहराचा बकालपणा रोखण्यासाठी, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी माझे नेहमीच प्राधान्य राहिले आहे. आयुक्तांनी सर्व समस्या समजून घेत त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांची भेट घेऊन नागरी समस्यांवर चर्चा केली. यावेळी शहराच्या विविध भागातून आलेल्या नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचत आयुक्तांना निवेदने सादर केली. या समस्या सोडवण्यासंदर्भात प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी आयुक्तांना सूचना केल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्यासह विविध अधिकारी, माजी नगरसेवक जयंत भावे आदी उपस्थित होते.

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “पुण्याचे नागरी जीवन हलाखीचे झाले असून, अशा परिस्थितीत त्याची धुरा नवलकिशोर राम यांच्या खांद्यावर आहे. अनुभवी अधिकारी असल्याने त्यांच्याकडून पुणेकरांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. महापालिका हद्दीत समाविष्ट गावांमध्ये पायाभूत सुविधांचा मोठा अभाव आहे. ड्रेनेज लाईन, कचरा, पाणी प्रश्न यामुळे येथील नागरिक त्रस्त आहेत. गंगाधाम चौकातील प्रस्तावित उड्डाणपूल का होत नाही, याचा मागोवा घेतला. वडगाव बुद्रुकमधील एका जागेत मशीद बांधली आहे. तिथे अनधिकृतपणे वारंवार भिंत उभारली जाते. ती त्वरित काढली जावी.”

कोथरूड येथील ‘एमआयटी’ कथित अनधिकृत बांधकामावर, गांधीभवन परिसरात सुरु असलेले अनधिकृत बांधकामे, यासह पुण्याच्या अनेक भागात परवानगी नसताना कामे सुरू आहेत यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कल्याणीनगर भागातील रुफटॉप हॉटेल, पब, रेस्टोरंट, बार यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. वाहतुकीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

माझी भूमिका मांडण्याचा अधिकार

पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्यावे, अशी भूमिका मी मांडल्यानंतर अतिशय खालच्या स्तराला जाऊन काहींनी टीका केली. पोस्टरबाजी केली. हा प्रकार अतिशय निंदनीय आणि संतापजनक असून, महिलांचे खच्चीकरण करणारा आहे. मस्तानी साहेबांचे चरित्रहनन केले गेले. पण त्याही एक योद्धा होत्या. राजघराण्यातील महिला होत्या. त्यामुळे त्यांचाही आदर राखला गेला पाहिजे. आजही तुमचा आंतरजातीय विवाहाला विरोध आहे का, हे यातून दिसते. जगभर फिरताना मी साडीच नेसून जाते, परंतु पोस्टरमधून वेगळे चित्र निर्माण करीत माझी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. एकेकाळी ज्यांच्यासोबत काम केले, त्यांच्याकडूनच अशी घटना घडल्याने दुखी झाले. पोलीस प्रशासन यावर योग्य ती कारवाई करेल. महिलांच्या बाबतीत असा विचार करणाऱ्या वृत्तीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी लढा देणार आहे. हे सांगताना कुलकर्णी काहीशा भावुक झाल्या. 

भारतीयांच्या बौद्धिक संपदेचे व्यावसायिकीकरण आवश्यक

आयपी तज्ज्ञ ॲड. आनंद माहूरकर यांचे प्रतिपादन; ‘आयसीएआय’तर्फे एक दिवसीय ‘एमएसएमई महोत्सव

पुणे: “बौद्धिक संपदेचा अतिशय समृद्ध वारसा आपल्याला लाभला आहे. या संपदेचा व्यापारवृद्धीसाठी कल्पक आणि फायदेशीर असा वापर आपल्या पूर्वजांनी केला. मात्र मध्ययुगात आपल्याला या वारशाची विस्मृती झाली. आधुनिक काळात या बौद्धिक संपदेचे व्यावसायिकीकरण करणे आवश्यक आहे”, असे प्रतिपादन बौद्धिक संपदा कायदातज्ज्ञ ॲड. आनंद माहूरकर यांनी केले. “व्यापारी समृद्धीचा मार्ग बौद्धिक संपदेच्या निर्मिती आणि तिच्या कायदेशीर नोंदणीतून जातो”, असेही ते म्हणाले.

दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) कमिटी ऑफ एमएसएमई अँड स्टार्टअप व आयसीएआय पुणे शाखेच्या वतीने आयोजित एक दिवसीय ‘एमएसएमई महोत्सवा’त ॲड. माहूरकर बोलत होते. याप्रसंगी आयसीएआय पुणे शाखेचे अध्यक्ष सीए सचिन मिणियार, उपाध्यक्ष सीए प्रणव आपटे, सचिव सीए नीलेश येवलेकर, खजिनदार सीए नेहा फडके, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य प्रीतेश मुनोत, सीए नंदकुमार कदम, सारिका दिंडोकार, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे सहायक संचालक अनिरुद्ध ब्रह्मे, आदी मान्यवर उपस्थित होते. ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, ‘कमिटी ऑफ एमएसएमई अँड स्टार्टअप’चे चेअरमन सीए ग्यानचंद्र मिश्रा, व्हाईस चेअरमन अर्पित काबरा यांच्या मार्गदर्शनात हा महोत्सव झाला.

बौद्धिक संपदा हक्क यावर ॲड. माहूरकर यांनी ऐतिहासिक संदर्भ देत केलेले सादरीकरण आणि इतिहासाचा वर्तमानकालीन धागा जोडण्याची समयसूचकता लक्षणीय होती. ऍड. माहूरकर म्हणाले, “बौद्धिक संपदा आणि बौद्धिक संपदा हक्क, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हे सुरवातीपासून लक्षात ठेवले पाहिजे. पाषाणयुगातील मानवाने कृत्रिमरीत्या घडवलेली दगडी हत्यारे हे प्राचीन बौद्धिक संपदेचे उत्तम उदाहरण आहे. पुढील काळातही महाराष्ट्रातील कारागिरांच्या घराण्यांनी जपलेली पैठणी वस्त्राची निर्मिती, हेही बौद्धिक संपदेचे आणि हक्कांचे आदर्श उदाहरण आहे. कारागिरांनी पैठणीसाठीचे डिझाईन (उदा. मोर, कोयरी, बुट्टे), रेशनी धागे, वस्त्राला मौल्यवान बनविणारी चांदी व सोन्याच्या तारांची गुंफण, अशी बौद्धिक संपदाही निर्माण केली आणि त्याचे उत्तम पद्धतीने व्यावसायिकीकरणही केले, जे आजही कायम आहे. रेशमी वस्त्रात धातूंचे धागे, हे एकाचवेळी इनोव्हेशन होते, सौंदर्याचा घटक त्यात होता. ते टिकाऊ होते. त्याचा व्यापार सर्वदूर होता. मध्ययुगीन काळातील आक्रमणे आणि नंतर ब्रिटिश राज्य, यामुळे आपल्याला आपल्याच बौद्धिक संपदेचा विसर पडला. त्याचे जागरण आवश्यक आहे. मात्र, आधुनिक काळाला अनुसरून या संपदेला कायदेशीर नोंदणीचे कोंदण गरजेचे आहे’, असे ते म्हणाले. ‘बौद्धिक संपदेची निर्मिती, तिचे प्रमाणीकरण, नोंदणी, ब्रंड आणि व्यापार, यातून उत्तम व्यावसायिकीकरण साध्य होईल’, असे ते म्हणाले.

सीए रणजीत कुलकर्णी यांनी ‘द आर्ट अँड सायन्स ऑफ फिनान्शियल प्रोजेक्शन फाॅर लोन सॅक्शन्स’, या विषयावर मार्गदर्शन केले. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या लघु उद्योजकांसाठी तसेच स्टार्टअपसाठी विविध योजना आहेत. त्यांची माहिती करून घेणे आणि त्यानुसार प्रकल्प सादर करणे आवश्यक आहे”, असे ते म्हणाले. कर्ज मिळवण्यासाठी प्रकल्प योजना कशी मांडावी, कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणत्या घटकांचा आवर्जून समावेश करावा, आपल्या ग्राहकांना यासंदर्भात नेमका सल्ला कसा द्यावा, डेव्हलपमेंट प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर) कसा सादर करावा, अशा मुद्यांवर सीए कुलकर्णी यांनी सादरीकरण केले. उत्तरार्धात सीए प्रमोद जैन यांनी ‘व्हर्च्युअल सीएफओ सर्व्हिसेस’ या विषयावर तर सीए श्रीकांत राठी यांनीही मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक करताना सीए सचिन मिणियार म्हणाले, “लेखापरीक्षणाचा व्यवसाय करणारे आणि नव्याने या क्षेत्रात आलेले, सर्वांनाच या क्षेत्रातील नव्या घटकांची माहिती मिळावी, केंद्रीय मंत्रालयाच्या संबंधित क्षेत्राशी संबंधित योजनांचे आकलन व्हावे, बौद्धिक स्वामित्व हक्काविषयी जागरुकता यावी, एआयचे तंत्र समजून घेता यावे, अशा अनेक उद्देशांनी या एक दिवसीय महोत्सवाचे आयोजन केले होते.”

या एमएसएमई महोत्सवात हेल्पडेस्क लावण्यात आला होता. यामध्ये एमएसएमई उद्योगांना उद्यम नोंदणी अद्ययावतीकरण, तक्रार निवारण, केंद्राच्या विविध योजना, त्यासाठी आवश्यक गोष्टी याबाबत जनजागृती करण्यात आली. सीए प्रणव मंत्री यांनी सूत्रसंचालन केले.

संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा संघ व भाजपाचा अजेंडा आजही कायम, संघाच्या होसबळेंचे विधान त्याच व्यापक कटाचा भाग: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई, दि. २७ जून
भाजपा व त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पहिल्यापासूनच संविधान मान्य नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा त्यांचा अजेंडा लपून राहिलेला नाही. संविधानाच्या उद्देशिकेतून सेक्युलर आणि सोशालिस्ट हे शब्द काढण्याच्या रा. स्व. संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांच्या मागणीतून आज ते पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हिंदू राष्ट्र स्थापन करायचे आहे हे सातत्याने त्यांच्या व भाजपा नेत्यांच्या विधानातून उघड होत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तर भाजपा नेते ४०० जागांवर विजय मिळाला तर संविधान बदलणार हे जाहीरपणे सांगत होते. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही संविधानाची समिक्षा केली पाहिजे असे वक्तव्य केले होते. तर पंतप्रधान मोदी यांचे आर्थिक सल्लागार म्हणून काम पाहताना विवेक देबरॉय यांनीही संविधान बदलण्याची गरज आहे असे उघडपणे म्हटले होते. भाजपा व संघ परिवारातून अशा विधानाचे खंडनही केले जात नाही. संविधान, तिरंगा झेंडा हे संघाला मान्य नाही त्यामुळे ते बदलण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे तो आजही कायम आहे.

सात महिन्यांपीर्वी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात धर्मनिरपेक्ष व समाजवादी विचार हा संविधानाचा गाभा आहे हे स्पष्ट केलेले आहे तरीही वारंवार संघ आणि भाजपचे लोक सातत्याने याबाबत चुकीची विधाने करून भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करतात. हा संविधान बदलण्याच्या व्यापक कटाचा एक भाग आहे. भारताची ओळख ही विविधतेत एकता आहे पण ही ओळखच रा. स्व. संघ व भाजपाच्या डोळ्यात खुपते आहे. हिंदू, हिंदी व हिंदूराष्ट्र हाच त्यांचा अजेंडा आहे. लोकशाही व संविधानावर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाने हा अजेंडा लक्षात घ्यावा व लोकशाही आणि संविधान अबाधित ठेवण्यासाठी सदैव तत्पर रहावे, असे आवाहनही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केले आहे.

श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची तातडीने अंमलबजावणी  करा:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रु. 288.17 कोटींच्या श्री क्षेत्र भिमांशकर विकास आराखड्यास मान्यता

 
मुंबई, दि. २७ : श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची अंमलबजावणी तातडीने सुरु करुन कुंभमेळ्याच्या आधी या क्षेत्राचा सुनियोजितपणे दर्जेदार विकास करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
यावेळी श्री क्षेत्र भीमांशकर विकास आराखडा (कुंभमेळा 2027-गर्दी व्यवस्थापन व इतर सोयी सुविधा) रु. 288.17 कोटींच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली.
सह्याद्री अतिथिगृह येथे श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा संदर्भातील आयोजित बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंत्रणांना निर्देश दिले. बैठकीस  सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार दिलीप वळसे पाटील उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी  मोठ्या संख्यने भाविक आणि पर्यटक येतात, त्यांना केंद्रबिंदू मानून याठिकाणी विविध दर्जेदार सुविधा विकसित कराव्यात. कुंभमेळा सुरु होण्यापूर्वी श्री क्षेत्र भीमाशंकर येथील विकासाची कामे पूर्ण करावी, त्यादृष्टीने विकास आराखड्याच्या अंमलबजावणीचा कालबद्ध कार्यक्रम तयार करावा, कालबद्ध कार्यक्रम ठरवून काम सुरू करण्यात यावी. भीमाशंकर परिसराला लाभलेल्या नैसर्गिक सृष्टीसौंदर्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन येथे व्यापक प्रमाणात इको टुरिझम संकल्पना विकसित करण्यात यावी. मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या वनराईचा उपयोग करुन  वनभ्रमण पथ तयार करावे. त्याचसोबत पर्यटक,भाविकांसाठी रोप वे ची सुविधा विकसित करावी.  निगडाळे या ठिकाणी पर्यटकांसाठी सोयीच्या ठरणाऱ्या सर्व सुविधा हॉटेल, रेस्टॉरंट त्याचसोबत इच्छुकांसाठी निवास सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. भीमाशंकर येथील दळणवळण सुविधा, वाहतूक मार्ग, अंतर्गत रस्ते यांच्या विकासास प्राधान्य द्यावे. तसेच याठिकाणी  हेलीपॅड सुविधा उपलब्ध करुन देण्याचेही नियोजन करावे. या परिसराचा विकास करताना स्थानिक व्यावसायिक, दुकानदारांना नवीन दुकाने उपलब्ध करुन द्यावीत. तसेच राजगुरुनगर-तळेघ- भीमाशंकर महामार्ग हा सुरळित वाहतूक व्यवस्थेसाठी उत्तम पर्याय आहे, त्यादृष्टीने त्याचा विकास करण्यात यावा. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे पर्यटक भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता चोख सुरक्षा व्यवस्था ठेवावी, त्यासाठी अतिरिक्त  पोलिस चौकी या परिसरात उभारावी. तसेच अखंडित वीज पुरवठा सुविधा उपलब्धतेच्या दृष्टीने वीज उपकेंद्र ही याठिकाणी  द्यावे.
यावेळी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी श्री क्षेत्र भीमाशंकरच्या विकासकामांबाबत सविस्तर सादरीकरण केले. बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी, तसेच संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.
0000

लोहगावला पाण्याच्या टाक्यांचा मार्ग मोकळा; वनमंत्री नाईक यांचा तातडीने जागा हस्तांतरित करण्याचा आदेश

पुणे: पुणे येथील वनभवन येथे नुकतीच महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक व वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे व यांच्यात बैठक (ता. २७) पार पडली. बैठकीत वडगावशेरी परिसरात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या विविध विकासकामांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक वनजमिनीबाबत चर्चा झाली. आमदार पठारे यांनी याबाबत अनेक मुद्दे वनमंत्र्यासमोर मांडले. या सर्व मुद्द्यांना मंत्री नाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने कार्यवाहीसाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

बैठकीत अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोहगाव येथील डी. वाय. पाटील महाविद्यलयाच्या डोंगरावर असलेल्या स. नं. ३०४ मधील वनजमिनीच्या भागात पुणे महानगरपालिकेमार्फत १ एमबीआर, १ संप वेल व २ नवीन पाण्याच्या टाक्या उभारण्याचा प्रस्ताव आहे. एकूण ०.९७५९ हेक्टर इतकी जागा आवश्यक असून यासाठी अनेक महिने प्रक्रिया सुरू आहे. महानगरपालिकेने मूळ प्रस्ताव, फेर प्रस्ताव, सुधारित प्रस्ताव, संयुक्त पाहण्या, अहवाल आदी सर्व पूर्तता केली असूनदेखील अद्याप जमीन ताब्यात मिळालेली नाही. या कारणामुळे लोहगाव परिसरातील जलप्रकल्प रखडला असून नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हे सर्व तपशील पठारे यांनी बैठकीत मांडले.

मंत्री नाईक यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना ही जागा महानगरपालिकेला हस्तांतरित करण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे लोहगाव परिसरात ५०% भागाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याची शक्यता बापूसाहेब पठारे यांनी वर्तवली.

या व्यतिरिक्त बापूसाहेब पठारे यांनी इतर काही महत्त्वाचे प्रस्तावही मांडले. त्यांनाही वनमंत्र्यांनी सहमती दिली असल्याचे समजते. त्यामध्ये, मौजे निरगुडी व वडगाव शिंदे येथील वनविभागाच्या जमिनीवर उच्च दर्जाचे वनउद्यान विकसित करणे, लोहगाव ते निरगुडी मार्ग वनविभागाच्या हद्दीतून जात असल्याने त्यावर अडथळे येत आहेत. हा मार्ग चऱ्होली व निरगुडीच्या पश्चिम सीमेवरून स्थलांतरित करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. यावरही सकारात्मक निर्णय घेण्यात आला. तसेच, खराडी ते शिवणे रस्त्यावर स. नं. ५७ मधील ०.३८४ हेक्टर वनजमिनीचा वापर रस्ता विकसित करण्यासाठी करावा, अशी मागणीही करण्यात आली. यावरही मंत्री नाईक यांनी सहमती दर्शवली.

सदरच्या सर्वच निर्णयांमुळे वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या पाणी, रस्ते, वाहतूक व पर्यावरणविषयक अनेक समस्या सुटण्यास मदत होणार आहे. बैठकीनंतर आमदार बापूसाहेब पठारे तसेच आमदार महेश लांडगे यांनी मंत्री गणेश नाईक यांचे धानोरी ते चऱ्होली या गावांना जोडणाऱ्या रस्त्याकरिता आवश्यक असलेली वन विभागाची जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल सत्कार करत आभार मानले.

“पंचांगातील ग्रहस्थितीवर शुभ अशुभ परिणाम ठरलेले असतात” – मोहनराव दाते.

“हा महाराष्ट्र अजेय योद्धा बाजीराव पेशवा, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक यासह सर्व जातीतील महापुरुषांचा देखील आहे” – संदीप खर्डेकर.

याज्ञवलक्य आश्रमाचा 98 वा वर्धापनदिन साजरा

– संदीप खर्डेकर यांचा “महर्षी याज्ञवलक्य”, मंजुश्री खर्डेकर यांचा “मुक्ताई” व मुक्ता गरसोळे कुलकर्णी यांचा “बालगंधर्व” पुरस्काराने सन्मान.

पुणे:

जग विषमतेवर चालते विवाहबंधन टिकून राहण्याकरिता एक आक्रमक असल्यास दुसरी बाजु समजुतदार असणे गरजेचे असते असे मत व्यक्त करताना दाते पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनी “घरातील नात्याची संख्या कमी हाेत चालली आहे घरातील साेडून आता बाहेरील व्यक्तीला काका मामा म्हणन्याची वेळ आली आहे त्यामुळे आता एकाच मुलावर न थांबता बहिणीला भाऊ आणि भावाला किमान एक तरी बहिण असावी” असे मत ही त्यांनी व्यक्त केले.
पालकांनी मुलांना लवरात लवकर सेटल हाेऊन याेग्य वयातच लग्न करण्यास सांगितले पाहिजे असे सांगतानाच “ग्रह ताऱ्या नुसार लगाच्या वेळी मुलांच्या पेक्षा मुलगी लहानच हवी,पंचागातील ग्रहस्थितीवर शुभ अशुभ परिणाम ठरलेले असतात
असे मत ही दाते पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनी व्यक्त केले.
याज्ञवलक्य आश्रमाच्या 98 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते संदीप खर्डेकर यांना महर्षी याज्ञवलक्य पुरस्काराने, सौ. मुक्ता गरसोळे कुलकर्णी यांना बालगंधर्व पुरस्काराने, सौ. मंजुश्री खर्डेकर यांना मुक्ताई पुरस्काराने गौरविण्यात आले. तर ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार हा सतीश वैद्य,सौ. सुषमा वैद्य, श्री. अरुण महाजनी यांना तर क्रियाशील कार्यकर्ता पुरस्काराने श्री. बाळकृष्ण देव आणि सौ. वीणा ठकार यांना गौरविण्यात आले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना संदीप खर्डेकर म्हणाले की जातीपाती मध्ये विभागलेला समाज हा कधीच प्रगती करू शकत नाही, आम्ही कधीच जातपात मानली नाही पण आज ज्या पद्धतीने ब्राह्मण समाजाला टार्गेट करण्यात येते, अवमानित करण्यात येते हे अत्यंत दुर्दैवी आहे. ज्याप्रमाणे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे,महात्मा ज्योतिबा फुले,राजर्षी शाहू महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आहे तसाच हा महाराष्ट्र अजेय योद्धा बाजीराव पेशवा, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, चापेकर बंधू, गोपाळकृष्ण गोखले, महर्षी कर्वे यासह अनेक महनीय व्यक्तींचा देखील आहे, त्याचबरोबर हा महाराष्ट्र राणी लक्ष्मीबाई, महादजी शिंदे, अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे, लहुजी वस्ताद साळवे यासह विविध ज्ञातीतील थोर व्यक्तिमत्वांचा देखील आहे असेही खर्डेकर म्हणाले. सर्व जातीतील महापुरुषांचे महाराष्ट्र उभारणीत योगदान आहे त्यामुळे ह्या राज्याला जातीपातीत विभागणे चुकीचे असल्याचे मत ही श्री. खर्डेकर यांनी व्यक्त केले.जातीभेद विरहित एकसंघ हिंदू समाज ही काळाची गरज असल्याचेही खर्डेकर म्हणाले.महर्षी याज्ञवलक्य पुरस्कार हा अधिक चांगले सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा देईल असेही ते म्हणाले.
सौ.मुक्ता गरसोळे कुलकर्णी म्हणाल्या “याज्ञवल्क्य स्मृती कायद्याचे शिक्षण देणारा ग्रंथ ,याज्ञवल्क्य आश्रमाशी बालपणापासून नाते असल्याने संस्थेने दिलेल्या बालगंधर्व पुरस्कार स्विकारताना आनंद होत आहे, तसेच त्यांनी संत साहित्यामधील अनेक उदाहरणे देऊन गुरू शिष्य नाते, संत महती संत वाड्गमय,याचे महत्व सर्व श्रोत्यांसमोर विशद केले. अत्यन्त ओघवत्या शैलीत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सौ. मंजुश्री खर्डेकर यांनीही सत्काराला उत्तर देताना सांगितलं की “मी पक्ष देईल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली, अगदी बूथ स्तरापासून काम केले त्यामुळे पक्षाने मला नगरसेविका,शिक्षण समिती अध्यक्ष अश्या विविध पदांवर काम करण्याची संधी दिली. मी नागरिकांना केंद्रस्थानी ठेऊन त्यांना हवी असलेली आणि त्यांनी सुचविलेली विकास कामं केल्यामुळेच मी चांगले कामं करू शकले असेही मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.

सदर कार्यक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष ज. ल. नगरकर,कार्यवाह प्रमोद चंद्रात्रेय, सुचेता पाताळे , अरूण खेडकर , मनोज तारे , ज्ञानेश्वर बेल्हे, उल्हास पाठक, सुजाता मवाळ,तृप्ती तारे,विमल भालेराव, प्रशांत पिंपरीकर,धनंजय ठुसे नचिकेत बेरी,सुषमा देव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशश्री पुणेकर यांनी केले. नीलिमा पिंपरीकर यांच्या पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.