Home Blog Page 482

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्यावतीने आयोजित ‘आरोग्यवारी’ उपक्रम स्तुत्य- क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे

  • आरोग्य वारी’ उपक्रमाचे इंदापूर तालुक्यात निमगाव केतकी येथे आयोजन

पुणे, दि.२७: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्यावतीने आयोजित ‘आरोग्यवारी’ उपक्रम स्तुत्य असल्याचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नमूद केले. महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी आयोगाच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांना राज्य शासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

राज्य महिला आयोग आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे आयोजित ‘आरोग्य वारी’ उपक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, सदस्य सचिव नंदिनी आवडे, उपसचिव डॉ. पद्मश्री बैनाडे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे, आरोग्य उपसंचालक प्रशांत वाडीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, तहसीलदार जीवन बनसोडे, गट विकास अधिकारी सचिन खुडे आदी उपस्थित होते.

श्री. भरणे म्हणाले, आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना त्रास होणार नाही, त्यांना चांगल्या प्रकारच्या आरोग्यविषयक सोई-सुविधा मिळाव्यात याकरीता हा उपक्रम राबविण्यात येत आहे. वारकरी महिलांना सॅनिटरी नॅपकिन, बालकांना स्तनपानाकरिता हिरकणी कक्ष, न्हाणीघर, शौचालय, स्वच्छतागृह, दामिनीपथक, प्राथमिक उपचार, रुग्णवाहिका आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

महिलांची सुरक्षा, सक्षमीकरण आणि सन्मानाकरिता राज्यशासन कार्यरत

राज्य शासनाच्यावतीने महिलांसाठी आरोग्याविषयक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. महिलांच्या प्रश्नाबाबत राज्य शासन जागरूक असून महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरणाकरिता काम करीत आहे. महिलांनी स्वावलंबी व्हावे, त्यांना रोजगार मिळावा याकरिता बचतगटाची चळवळ उभारण्यात आली आहे, बचतगटाच्या माध्यमातून तालुक्यातील महिलांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे.

महिलांना सन्मानाची वागणूक द्या
आपल्यामुळे इतराला त्रास होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, एकमेकाला प्रेम, आनंदाची, विचारांची देवाणघेवाण करण्यासोबतच महिलांना सन्मानाची वागणूक द्या. मनमोकळेपणाने संवाद साधावा. ‘हुंडा घेणार किंवा देणार नाही’ असे चांगले संकल्प करूया, असे आवाहन श्री. भरणे म्हणाले.

आज संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आज इंदापुर तालुक्यात आगमन होत असून नागरिकांनी वारकऱ्यांची उत्तमपणे सेवा करुन तालुक्याचे नाव राज्यात उज्वल करण्याचे काम करुया, असे आवाहन श्री. भरणे यांनी केले.

श्रीमती चाकणकर म्हणाल्या, संत जनाबाई, संत मुक्ताबाईंनी स्त्री मुक्तीची चळवळ वारीच्या माध्यमातून दिली. देहू, आळंदी, मुक्ताईनगर यांसह विविध भागातून वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासत वारीत वारकरी सहभागी होतात. अशा या सहभागी महिलांच्या मासिक पाळीचा आदी आरोग्य आणि स्वच्छताविषयक बाबींचा विचार करुन महिला आयोग आणि पुणे, सातारा तसेच सोलापूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या ४ वर्षापासून ‘आरोग्य वारी’ प्रशासनाच्या सहकार्याने उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाअंतर्गत तिन्ही जिल्ह्यात १९८ हिरकणी कक्ष, ३० हजार ९८८ शौचालय, ३ हजार ४५४ न्हाणीघर, २२३ वैद्यकीय पथक, ३१७ रुग्णवाहिका, १८९ आरोग्यदूत, २२६ स्थानिक उपचार केंद्र, १२ उपजिल्हा रुग्णालय आणि ४६६ उपकेंद्राचा समावेश आहे. तसेच महिलांना सॅनिटरी नॅपकिन, नॅपकिन बर्निंग इन्सिनरेशन आदी सुविधा प्रत्येक १० ते १२ किलोमीटर अंतरावर केल्या आहेत.

महिलांना सुरक्षिततेचा, प्रगतीचा विश्वास देण्यासाठी आयोग प्रयत्न करत आहे. स्त्रीभ्रूणहत्या, बालविवाह विरोधात आई म्हणून महिलांनी भूमिका बजावावी. हुंडाबळी, अंधश्रद्धा, विधवाप्रथा आदी प्रवृत्तीविरोधात सक्षमपणे उभे रहावे. सामाजिक चळवळ म्हणून महिलांना सन्मानाची वागणूक द्यावी. याकरिता अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, आशा कार्यकर्त्या शासनाच्या योजना घराघरापर्यंत पोहचविण्याचे काम करीत असतात, वारीसोबतच विचारांची वारी प्रगतीकडे घेऊन जायची आहे. वारीच्या माध्यमातून आरोग्य विषयक जनजागृती करत आरोग्याची काळजी घेऊया. आपले तन आणि मन सक्षमपणे सदृढ करण्याकरिता एकत्रितपणे प्रयत्न करु या. महिलांची वारी भक्तिमय असण्यासोबतच आरोग्यमय करण्याचा संकल्प करुया, असे आवाहन श्रीमती चाकणकर यांनी केला.

महिलांना कोणाकडूनही त्रासाला, गुन्हेगारीला सामोरे जावे लागल्यास पोलिसांकडे तक्रार करावी. कौटुंबिक हिंसाचाराच्या अनुषंगाने ‘भरोसा सेल’ काम करते. समस्या न सुटल्यास आयोगाकडे संपर्क साधावा, आयोग आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहील, अशी ग्वाही श्रीमती. चाकणकर यांनी दिली.

श्रीमती आवडे म्हणाल्या, राज्य महिला आयोग महिलांच्या हक्काचे संरक्षण करण्याकरिता कटिबद्ध आहे. राज्य शासनाच्यावतीने वारकऱ्यांकरिता उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती आवडे यांनी केले.

इंदापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रदीप गारटकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या ॲड. रेश्मा गार्डे आणि रिटेनर लॉयर संजय चंदनशिवे यांनी महिलांकरिता असलेले कायदे, विधी सेवा प्राधिकरणाच्या सेवांबाबत माहिती दिली.

यावेळी श्री. भरणे यांच्या हस्ते आरोग्य उपक्रमाअंतर्गत हिरकणी कक्ष, औषधोपचार केंद्र, कर्करोग जनजागृती वाहनाचे उद्घाटन करण्यात आले, येथील सोई-सुविधांची माहिती जाणून घेतली.

यावेळी निर्माण संस्थेच्यावतीने ‘हुंडा’ विषयावर जनजागृतीपर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार जाधव, सरपंच प्रवीण डोंगरे, ग्रामविकास अधिकारी आबा जगताप आदी उपस्थित होते.

पुणे ग्रामीण जिल्ह्यात १० जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

पुणे, दि. २७ : पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने अपर जिल्हादंडाधिकारी नामदेव टिळेकर यांनी दिनांक २८ जून २०२५ रोजी मध्यरात्री १२:०५ वाजल्यापासून ते १० जुलै २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणे, दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणत्याही इसमाच्या चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, मोठ्याने अर्वाच्च्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

सभ्यता अगर नितिमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, अविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करुन त्याचा जनतेत प्रसार करणे, कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पद्धतीने महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) व (३) विरुद्ध वर्तन करणे, कलम ३७ चे पोटकलम (३) अन्वये पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करणे तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या पूर्वपरवानगीशिवाय सभा घेणे किंवा मिरवणूक काढणे यासदेखील प्रतिबंध करण्यात आला आहे.

हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे व त्याबाबत परवानगी आहे त्यांना लागू होणार नाही.

आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

राष्ट्रीय शालेय क्रीडास्‍पर्धेत महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद क्रीडा आयुक्‍त शीतल तेली-उगले यांच्‍याकडे करंडक सुपूर्त

पुणे : खेलो इंडिया युवा स्पर्धा पाठोपाठ राष्ट्रीय शालेय क्रीडा स्‍पर्धेतही सर्वसाधारण विजेतेपदकाचा करंडक महाराष्ट्राने पटकविला आहे. विजेतेपदकाचा करंडक क्रीडा व युवक कल्‍याण विभागाच्‍या आयुक्‍त शीतल तेली-उगले यांच्‍याकडे सुपूर्त करण्यात आला आहे.

गतविजेत्या महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे सर्वोत्तम कामगिरी करीत ६८ व्‍या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्‍पर्धेतही महाराष्ट्राने सर्वसाधारण विजेतेपदाचा पराक्रम केला आहे. १९७ सुवर्ण, १५९ रौप्य, १७४ कांस्य अशी एकूण ५३० पदकांची लयलूट करीत महाराष्ट्राने अव्वल स्थानाचे शिखर सर केले आहे. पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात विजेतेपदकाचा करंडक क्रीडा व युवक सेवा संचलनालय आयुक्‍त शीतल तेली-उगले यांच्‍याकडे सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक उदय जोशी यांनी सूपूर्त केला आहे. यावेळी उपसंचालक संजय सबनीस, क्रीडा अधिकारी अरुण पाटील उपस्‍थित होते.

महाराष्ट्राच्‍या खेळाडूंचे अभिनंदन करून आयुक्‍त शीतल तेली-उगले म्‍हणाल्‍या की, वरिष्ठ, युवा गटाप्रमाणेच शालेय स्‍पर्धेतही महाराष्ट अव्‍वल आहे. या यशाचे खेळाडूंसह त्‍यांचे प्रशिक्षक, पालक, संघटक या सर्वांनीच कौतुकास्‍पद कामगिरी केली आहे. ही परंपरा कायम राखण्यासाठी खेळाडूंच्‍या पाठी शासन खंबीरपणे उभे असेल.

दिल्‍ली,हरियाणा या बलाढ्य संघांना मागे टाकून महाराष्टाने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदाला गवसणी घातली आहे. दिल्‍लीने १२४ सुवर्ण, ९४ रौप्य, ११८ कांस्य पदकांसह एकूण ३३६ पदके जिंकून दुसरे स्थान प्राप्त केले. हरियाणा संघ ११४ सुवर्ण, ८० रौप्य, १०३ कांस्य एकूण २९७ पदकांसह तिसर्‍या स्थानावर राहिला. स्‍पर्धेत महाराष्ट्राचे २५२८ क्रीडापटू सहभागी झाले होते. ४२ खेळातील १५५ क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्‍या खेळाडूंच्‍या यशाचा डंका देशभरात वाजला आहे.

दिल्‍लीत संपन्‍न झालेल्‍या भारतीय शालेय स्‍पर्धा महासंघाच्‍या वार्षिक सर्वसाधारण सभेत महाराष्ट्राला विजेतेपदाच्‍या करंडकाने गौरविण्यात आले. भारतीय शालेय खेळ महासंघाचे अध्यक्ष दिपक कुमार यांच्‍या हस्‍ते उपसंचालक उदय जोशी व क्रीडा अधिकारी अरुण पाटील यांनी राज्य्च्या वतीने विजेतेपदाचा करंडक स्‍वीकारला. याप्रसंगी देशभरातील राज्‍य प्रतिनिधी उपस्‍थित होते. महाराष्ट्राच्या पदक विजेत्या खेळाडूंचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी दृकश्राव्य प्रणालीव्दारे अभिनंदन केले आहे.

एकाच वर्षात राष्ट्रीय क्रीडा स्‍पर्धा,खेलो इंडिया युवा स्पर्धा व राष्ट्रीय शालेय क्रीडा स्‍पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्‍य ठरले आहे. शालेय गट, १८ वर्षांखालील युवा गट व वरिष्ठ गटात विजेतेपदकाचा पराक्रम सलग दुसऱ्यांदा करणाऱ्याचा मानही महाराष्ट्राने पटकविला आहे. राष्ट्रीय क्रीडा स्‍पर्धा,खेलो इंडिया युवा स्पर्धा प्रमाणेच राष्ट्रीय शालेय क्रीडा स्‍पर्धेतील पदकविजेत्‍यांना क्रीडा व युवक सेवा संचलनालकडून रोख बक्षिस देण्याची परंपरा आहे. सुवर्ण, रौप्‍य व कांस्य पदक विजेत्‍यांना अनुक्रमे रू.११२५०, रू.८९५०, रू.६७५० तसेच सहभागी खेळाडूंनाही रू. ३७५० रूपयांचे रोख शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येत आहे.

सातत्यपूर्ण प्रयत्न आणि समर्पित भावनेने कार्य करून जीवनात यशस्वी व्हा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

पुणे : सातत्यपूर्ण प्रयत्न, समर्पित भावना आणि निश्चित उद्दीष्ट या त्रिसूत्रीच्या आधारे स्नातकांनी जीवनात यश संपादन करावे. भविष्यातील वाटचाल करतांना निश्चित उद्दीष्ट ठेवून त्याला कठोर परिश्रम, एकाग्रतेची जोड दिल्यास आणि निराश न होता प्रयत्नरत राहिल्यास निश्चितपणे यश संपादन करता येईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केले.

सिम्बायोसिस विद्यापीठ येथे आयोजित आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पदवीप्रदान समारंभात राज्यपाल राधाकृष्णन बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलपती. डॉ. एस. बी. मुजुमदार, प्र. कुलगुरू डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमन, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कुलसचिव डॉ. एम. एस शेजुळ आदी उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, जीवनात थकवा येणे किंवा निराशा येणे स्वाभाविक आहे, पण तिथे थांबून चालणार नाही. जीवनात केलेला प्रत्येक प्रयत्न जीवनाला आकार देण्यासाठी उपयुक्त असतो, आनंद मिळविण्यासाठी असतो. आनंदी मन हे कार्यासाठी ऊर्जा देणारे आणि आपल्याला प्रेरित करणारे असल्याने आपण करीत असलेल्या कामाचा आनंद घेण्याची सवय ठेवावी. आतापर्यंत प्राप्त केलेल्या ज्ञानाच्या आधारे जीवनात यश संपादन करावे, अशा शुभेच्छा श्री. राधाकृष्णन यांनी दिल्या.

राज्यपाल पुढे म्हणाले, आज जगातील अनेक देश, विशेषतः ज्यांची लोकसंख्या वाढत आहे, ते कुशल मनुष्यबळाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारताकडे पाहत आहेत. विद्यार्थ्यांनी ही संधी साधण्यासाठी तयार असले पाहिजे. महाराष्ट्रातील विद्यापीठांना जर्मन, फ्रेंच, जपानी, मँडरीन, स्पॅनिश, इटालियन आणि इतर भाषांमध्ये अल्प-मुदतीचे भाषा अभ्यासक्रम सुरू करण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे. यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना जागतिक नोकरीच्या बाजारपेठेत स्पर्धात्मक फायदा मिळेल. पुणे शहर वाहन उद्योग, माध्यम आणि सूक्ष्म उद्योगांचे प्रमुख केंद्र असल्याने विद्यार्थ्यांना इथे चांगल्या संधी उपलब्ध आहेत, असे त्यांनी सांगितले.

कुलपती डॉ. मुजुमदार म्हणाले, विद्यापीठ ‘वसुंधैव कुटुंबकम’ या ध्येयाने कार्य करीत असून विद्यापीठात विविध देशांचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सारे विश्व एक कुटुंब आहे या भावनेनेच येथे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, असे ते म्हणाले.

राज्यपालांच्या हस्ते, पदवी प्रदान समारंभात २२ देशातील ८२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली तसेच विद्यापीठाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

प्र. कुलगुरू डॉ. येरवडेकर यांनी प्रास्ताविकात विद्यापीठात सुरू असलेल्या विविध उपक्रमाची व अभ्यासक्रमाची माहिती दिली.

फेरीवाल्यांचे दैनंदिन शुल्क कमी करण्याची मागणी- नगर पथ विक्रेता समिती सदस्यांचे आयुक्तांना निवेदन

पुणे :

फेरीवाल्यांचे दैनंदिन शुल्क कमी करावे,फेरीवाला व्यवसायात गॅस सिलेंडर वापरास वैध परवानगी देण्यात यावी,ज्यांनी व्यवसायासाठी अर्ज केले आहेत,त्यांना  तातडीने व्यवसायाची मंजुरी व बिल वाटप करण्यात यावे, निवडून आलेल्या सदस्यांचा ५ वर्षांचा अधिकृत कार्यकाल आजच्या तारखेपासून लागू करण्यात यावा,पेशवेकालीन वारसा लाभलेल्या तुळशीबाग मार्केटला ‘हेरिटेज झोन’ म्हणून दर्जा बहाल करण्यात यावा अशा अनेक मागण्या  नगर पथ विक्रेता समिती सदस्यांनी नगर पथ विक्रेता समिती बैठकीत केल्या.

पुणे महानगरपालिका आयुक्त तथा नगर पथ विक्रेता समिती अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली दि.२६ जून २०२५ रोजी नगर पथ विक्रेता समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.फेरीवाला आणि त्यांच्याशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा होऊन ठोस विषय मांडण्यात आले.बैठकीत सदस्य सागर दहीभाते,गजानन पवार,आशुतोष जाधव,कमल जगधने,नीलम अय्यर यांनी विविध मागण्या केल्या.भीमाबाई  लाडके,ज्ञानेश्वर कोठावळे,शेहनाझ बागबान या सदस्यानी देखील उपयुक्त मुद्दे मांडले.संबंधित विषयांवर लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी आयुक्तांकडे केली.या सर्व मुद्द्यांवर आयुक्त तथा समिती अध्यक्ष यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. 

सदस्य सागर दहीभाते यांनी दोन महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.२०१८ सालापासून  आकारण्यात आलेले वाढीव दैनंदिन शुल्क पुनर्रचित करून त्यात जास्तीत जास्त सवलत देऊन ते कमी करावे तसेच आगाऊ शुल्क आकारले जाते त्यामुळे त्याला दंड लावू नये जेणेकरून हजारो फेरीवाल्यांवरील आर्थिक ओझे कमी होईल त्याचबरोबर पेशवेकालीन वारसा लाभलेल्या तुळशीबाग मार्केटला ‘हेरिटेज झोन’ म्हणून दर्जा बहाल करण्यात यावा,जेणेकरून हा ऐतिहासिक बाजार भविष्यकालीन शहर विकासात संरक्षित राहील.सदस्य गजानन पवार यांनी मागणी केली की फेरीवाला निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचा ५ वर्षांचा अधिकृत कार्यकाल २६ जून २०२५ या  पहिल्या बैठकीच्या  तारखेपासून लागू करण्यात यावा.फेरीवाला व्यवसायात गॅस सिलेंडर वापरास वैध परवानगी देण्यात यावी,ज्यामुळे खाद्य विक्रेत्यांचा व्यवसाय सुलभ व सुरक्षित बनेल.तसेच वीज मिटर साठी  तरतूद करण्यात यावी.
सदस्या कमल जगधने यांनी सदस्यांसाठी स्वतंत्र कार्यालय व प्रशासनिक सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज अधोरेखित केली.सदस्या नीलम अय्यर,आशुतोष जाधव यांनी स्पष्ट मागणी केली की, ज्या व्यावसायिकांकडे प्रमाणपत्र आहे आणी बिल मिळण्यासाठी वेळेत अर्ज केले आहेत झोनमध्ये जागा उपलब्ध आहे,त्यांना तातडीने व्यवसायाची मंजुरी व बिल वाटप करण्यात यावे.या सर्व मुद्द्यांवर आयुक्त तथा समिती अध्यक्ष यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि संबंधित विषयांवर लवकरात लवकर योग्य निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.ही बैठक नगर पथ विक्रेत्यांच्या समस्यांकडे प्रशासनाच्या धोरणात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची सुरुवात ठरणार आहे,असे या सदस्यांनी सांगितले

१९७५ ची आणीबाणी संविधानातील कलमानुसारच, इंदिरागांधींनी नंतर आणीबाणी उठवली व मतचोरी न करता निवडणुकाही घेतल्या: हर्षवर्धन सपकाळ

आणीबाणीला बाळासाहेब ठाकरे,विनोबा भावेंचेही समर्थन, संघाच्या बाळासाहेब देवरसांनी आणीबाणीत इंदिराजींना दोन पत्रे कशासाठी लिहिली.

मुंबई-
इंदिराजी गांधी यांनी १९७५ साली तत्कालीन परिस्थितीमुळे आणीबाणीचा निर्णय घेतला होता. या आणीबाणीचे समर्थन विनोबा भावे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही समर्थन केले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तेव्हाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी इंदिराजी गांधी यांना त्यावेळी दोन पत्रे लिहिले होती, त्यात घालीन लोटांगण…हाच प्रकार आहे. ती पत्रे का लिहिली होती, हेही तपासले पाहिजे, असे म्हणत आणीबाणीत काही प्रशासकीय चुक्या झाल्या पण काही इष्टही झाले, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

फ्रेंड्स ॲाफ डेमोक्रसी आयोजित फॅसिस्ट हुकुमशाही विरोधी कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बोलत होते. यावेळी शिवसेना नेते खा. संजय राऊत, माजी खा. कुमार केतकर, माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, श्वेता संजीव भट आदी उपस्थित होते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी बोलताना पुढे म्हणाले की, इंदिराजी गांधी यांनी १९७५ साली संविधानातील कलमानुसार आणीबाणीचा निर्णय घेतला होता आणि नंतर त्यांनी ती उठवली आणि मतचोरी न करता निवडणुका घेतल्या. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आणीबाणी ही चूक झाली हेही त्यांनी मान्य करत माफी मागितली आणि १९८० मध्ये देशातील जनतेने त्यांना पुन्हा बहुमताने विजयी केले. सोनियाजी, राहुलजी गांधी यांनीही नंतर आणीबाणीच्या काळात प्रशासनाच्या हातून काही चुका झाल्याचे मान्य केले आहे. आणीबाणी हा वेगळा अध्याय आहे. १९७१ च्या युद्धात लष्काराला तेल देणार नाही अशी भूमिका तेल कंपन्यांनी घेतली होती, त्यामुळे नंतर या तेल कंपन्या व काही बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

आणीबाणीने देशाला शिस्त लागली हे मात्र कोणी बोलत नाही. काळाबाजार, भ्रष्ट्राचार करण्याची कोणाची हिम्मत होत नव्हती. आज मात्र याच्या नेमके उलट होत आहे. आज भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला आहे. भाजपाच्या हुकूमशाहीत ३००० कोटींचे जास्तीचे टेंडर खास उद्योगपतीला दिले होते ते सुप्रीम कोर्टाने रद्द केले. धारावी अदानीला विकली, विमानतळ दिले. मराठीवर अतिक्रण करण्याचे काम याच हुकूमशाहीने होत आहे. संस्कृती व सभ्यतेवर घाला घातला जात आहे तोही याच हुकूमशाहीने असेही सपकाळ म्हणाले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यपत्र शिदोरी मासिकाचा आणीबाणीवरील विशेषांकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

भाजपा पदाधिकाऱ्यांकडूनच महिला सुरक्षिततेला धोका: कॉंग्रेसने दिले थेट गणपती बाप्पालाच निवेदन …

पुणे – भाजपा पदाधिकाऱ्यांकडूनच महिला सुरक्षिततेला धोका असल्याचा आरोप करत काल पुणे शहर काँग्रेसने कसबा गणपती मंदिरा समोर आंदोलन करत थेट गणपती बाप्पालाच निवेदन दिले … बाप्पा आता तू तरी … या भाजपच्या उद्दामपणाला आवर घाल अशी आळवणी यावेळी करण्यात आली .यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी महापौर कमलताई व्यवहारे, माजी नगरसेवक अजित दरेकर, रफिक शेख, मेहबूब नदाफ, माजी स्थायी समिती अध्यक्ष माजी नगरसेविका निताताई परदेशी , युवक इंटकचे चेतन अगरवाल, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सुजित यादव, सेवादलाचे प्रकाश पवार, काँग्रेसचे सौरभ अमराळे, ओ.बी.सी. विभागाचे अध्यक्ष प्रदीप परदेशी, युवक काँग्रेसचे अक्षय जैन, ब्लॉक अध्यक्ष अक्षय माने, रविंद्र माझिरे, विशाल जाधव, दिलीप तुपे, रमेश सोनकांबळे, रमेश सकट,हेमंत राजभोज, राज अंबिके, प्रियांका रणपिसे, प्राचीताई दुधाने, सुंदरताई ओव्हाळ, इंदिराताई अहिरे, अर्चनाताई शहा, अनिताताई धिमधिमे, ज्योतीताई चंदेवल, मायाताई डुरे, प्रियांका मधाळे, उषाताई राजगुरू, ॲड. राजश्री अडसूळ, प्राजक्ता गायकवाड, अनुसया गायकवाड, कविता भागवत, नुर शेख, वैभव डांगमाळी, राजेश मोहिते, फिरोज शेख, चेतन पडवळ, अमित कांबळे, सद्दाम शेख, ज्योतीताई आरवेन, राज घेलोत, अनिल पवार, अविनाश अडसूळ, सेल्वराज ॲन्थोनी व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते…

भारतीय जनता पक्षाच्या प्रमोद कोंढरे नावाच्या पदाधिकाऱ्याने केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यक्रमात एका पोलीस प्रशासनातील वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याच्या निषेधार्ह आहे. याच्या आधी ओंकार कदम नावाच्या पदाधिकाऱ्याने महानगरपालिकेतील महिला अधिकाऱ्याचा विनयभंग करुन धमकी दिली होती. त्यावेळी ही पोलिस प्रशासनाने फक्त तोंडदेखली कार्यवाही केली होती. खरंतर महिलांना कायम अपमानास्पद, तुच्छतेची वागणूक देणे हे भारतीय जनता पक्षाचे संस्कारच आहेत. याचा निषेध म्हणून पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कसबा गणपती येथे नालायक भाजपा पदाधिकाऱ्यांच्या विरुद्ध गणपती बाप्पालाच निवेदन देण्यात आले. असे यावेळी शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले.

अडीच हजार पैकी १हजार १३ कोटीचा मिळकतकर ३ महिन्यात वसूल, ३० जून अखेर पर्यंत सवलतिचा फायदा घ्या – अविनाश सकपाळ

पुणे- सन २०२५-२६ च्या मिळकत कर च्या उद्दिष्ट पैकी म्हणजे अडीच हजार पैकी १हजार १३ कोटीचा मिळकतकर ३ महिन्यात वसूल करण्यात महापालिकेच्या मिळकत कर विभागाला यश आले असून , ३० जून अखेर पर्यंत नागरिकांनी मिळकत करतील सवलतीचा फायदा घ्यावा असे आवाहन उप आयुक्त कर आकारणी व कर संकलन विभाग अविनाश सकपाळ यांनी केले आहे.

त्यांनी सांगितले कि,’ पुणे महानगरपालिकेच्या मिळकत कर विभागाने मन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी दिलेल्या उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी नियोजन केलेले आहे.पुणे महानगरपालिका हद्दीतील एकूण मिळकतींची संख्या १४,४३,००० इतकी असून, मन २०२५-२०२६ आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची मागणी रक्कम रु. २५०० कोटी इतकी आहे.दिनांक ०१/०४/२०२५ ने दिनांक २६/०६/२०२५ अखेर ६,१४,६३५ इतक्या मिळकतधारकांनी रक्कम रु. १०१३.२५ कोटी इतका मिळकत कर वसूल केला आहे.दिनांक ३०/०६/२०२५ अखेर मिळकत करामध्ये ५% ते १०% इतकी सवलत मिळणार असल्यामुळे, मिळकतधारकांनी मिळकत कर लवकरात लवकर भरावा, असे आवाहन करण्यात येत आहे. online payment करण्यासाठी
NetBanking, Credit Card, Debit Card, Bharat QR Code, UPI Google Pay, UPI -PhonePe, Post_Debit_Card, UPI, Pos_Credit_Card, EBPP, Mobile Wallet, paytm, Amazon Pay, NEFT-RTGS, अशा सुविधा उपलब्ध आहेत,नागरी सुविधा केंद्र सुट्टीच्या दिवशीमुद्धा सकाळी १०:०० ते दुपारी ४:०० पर्यंत सुरु ठेवण्यात आले आहे.

ठाकरे बंधूंचा हिंदी सक्ती विरोधात एकत्र मोर्चा!:संजय राऊत यांच्या पोस्टमुळे सेना-मनसे नेत्यांचा आनंद द्विगुणीत

मुंबई-महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्ती विरोधामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळे आंदोलन करण्याची घोषणा केली होती. मात्र आता महाराष्ट्रातील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल, अशी घोषणा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. त्यांच्या या पोस्टमुळे आता राज्यातील नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्ती विरोधामध्ये सर्वच विरोधी पक्ष एकत्र येणार असल्याचे संकेत मिळत होते. तेच आता स्पष्ट झाले आहे. काल राज ठाकरे यांनी 5 जुलै रोजी मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर लगेच उद्धव ठाकरे यांनी सात जुलै रोजी आझाद मैदानावर आंदोलन करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासूनच सर्व एकत्र का येत नाही? असे प्रश्न विचारले जात होते. यावर आता अखेर तोडगा निघाला असून हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल, अशी पोस्ट संजय राऊत यांनी केली आहे. यासोबतच संजय राऊत यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो देखील पोस्ट केला आहे.

राज्य सरकारच्या वतीने त्रिभाषा सूत्र स्वीकारण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील शाळांमध्ये आता पहिलीपासून विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकवली जाणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधामध्ये ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. या आधी राज ठाकरे यांनी 5 जुलै रोजी तर उद्धव ठाकरे यांनी सात जुलै रोजी मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली होती. दोन्ही ठाकरे बंधू जर मोर्चा काढणार असतील तर एकत्र का नाही? असा प्रश्न त्यामुळे राज्यात विचारला जात होता. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील शाळात हिंदी विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल, अशी पोस्ट त्यांनी केली आहे. त्यामुळे हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार हे निश्चित झाले आहेत.

या संदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मराठी माणसाची ताकद एकत्र दिसणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काल राज ठाकरे यांनी देखील तेच आव्हान केले होते. त्याला समोरून प्रतिसाद मिळाला आहे. मराठी भाषेची गळचेपी आणि हिंदी भाषेची सक्ती लादण्याचा प्रयत्न केला जातोय. त्या विरोधात मराठी माणसाने एकत्र येऊन आवाज उठवणे गरजेचे आहे. मराठी भाषा हा राजकीय मुद्दा नाही तर मराठी भाषेपुढे कोणीही छोटे मोठे नसल्याचे देशपांडे यांनी म्हटले आहे. सगळे एकत्र आले पाहिजे, यासाठी राज ठाकरे देखील सकारात्मक आहेत. त्यामुळे एकत्रितपणे पाच जुलै रोजी हा मोर्चा निघेल, अशी माहिती देखील संदीप देशपांडे यांनी वृत्त-वाहिनीशी बोलताना दिली आहे.

हा मोर्चा एकत्र निघू नये, यासाठी बरेच प्रयत्न केले गेले – अरविंद सावंत

मराठी माणसासाठी मी माझा वैयक्तिक अहंकार बाजूला ठेवू शकतो, असे मत राज ठाकरे यांनी या आधी देखील व्यक्त केले होते. महाराष्ट्रापेक्षा काहीही मोठे नाही, हे यातून आपल्याला पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे यांनी देखील लगेच राज ठाकरे यांना प्रति टाळी दिली होती. मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि महाराष्ट्राचे हित पाहणाऱ्यांना आपण बरोबर घेतले पाहिजे, अशी उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. त्यामुळे हा मोर्चा एकत्र निघू नये, यासाठी बरेच प्रयत्न केले गेले, असा आरोप देखील अरविंद सावंत यांनी केला आहे.

सेवाभावी संस्थांना कृतज्ञता निधी प्रदान कार्यक्रम

पुणे –
समाजात अनेक सेवाकार्ये सुरू आहेत, त्यातील कोणत्या ना कोणत्या कामाला जोडून घेेणे आणि सेवाकार्यांना शक्य तेवढी मदत करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जे काही ना काही स्वरूपात सेवाकार्य करतात, ते सदैव आनंदात राहतात, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य सुहास हिरेमठ यांनी केले.

जनता सहकारी बँकेतील वरिष्ठ अधिकारी संजीव खळदकर यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने अकरा सेवाभावी संस्थांना अकरा लाख रुपयांचा निधी प्रदान केला. या कार्यक्रमात हिरेमठ बोलत होते. खळदकर कुटुंबीयांतर्फे आयोजित या ‘सामाजिक कृतज्ञता निधी प्रदान कार्यक्रमा’त बँकेचे अध्यक्ष रवींद्र हेजीब, माजी कार्याध्यक्ष हरिभाऊ मिरासदार, अरविंदराव खळदकर आणि संघाच्या पर्वती भागाचे संघचालक अॅड. चंद्रशेखर कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

समाजातील दुःख, दैन्य दूर करण्याचे काम अनेक संस्था आणि व्यक्ती सेवाभावनेतून करत आहेत. अशा कामांपैकी अकरा संस्थांची निवड करून त्यांना कृतज्ञतापूर्वक आणि पवित्र भावनेने संजीव खळदकर यांनी निधी प्रदान केला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, असे हिरेमठ म्हणाले. समाजाला आपण किती देतो, यापेक्षाही देण्यामागची भावना महत्त्वाची असते. समाजासाठी काही ना काही देण्याचा संस्कार आपल्या समाजात आहेच. तो अशा कार्यक्रमांमुळे जागृत होतो, असेही त्यांनी सांगितले.

समाजाला उपयुक्त अशी जी सेवाकार्ये सुरू आहेत त्यांना सर्वप्रकारे साहाय्य करणे हे आपले काम आहे. म्हणून दरवर्षी आपल्या उत्पन्नातील ठरावीक रक्कम सेवाकार्यांना द्यावी, जी सेवाकार्ये सुरू आहेत, त्यातील एखाद्या सेवाकार्याला दरवर्षी ठरवून भेट द्यावी आणि आपला काही वेळ सुद्धा एखाद्या सेवाकार्याला द्यावा, असे आवाहन हिरेमठ यांनी केले.

कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान संचालित श्री गुरुजी रुग्णालय, मित्र मंडळ एज्युकेशन सोसायटीचे सरिता विद्यालय, धर्मजागरण ट्रस्ट, कौशिक आश्रम, भोगावती सांस्कृतिक मंडळ, तारळे, जि. कोल्हापूर, सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र, योगी अरविंद सांस्कृतिक मंच, श्री संत सेवा संघ, उमेद फाउंडेशन, अहिल्या मंडळ, पेण, जि. रायगड आणि अब – नॉर्मल होम या अकरा संस्थांना निधी प्रदान करण्यात आला. संजीव खळदकर यांनी मनोगत व्यक्त केले. भूषण करमरकर यांनी सूत्रसंचालन केले.

सर्वांना समान न्याय मिळेल अशी कर रचना करणार-नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

पुणे _

पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांसह महापालिकेच्या हद्दीत आधीपासून निवास करीत असलेल्या सर्व नागरिकांना समान न्याय मिळेल अशी मिळकत कर आकारणीची रचना केली जाईल असे आश्वासन नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

पुणे महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मिसाळ यांनी महापालिका प्रशासनाबरोबर आज बैठक घेतली होती. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. आयुक्त नवलकिशोर राम, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांची प्रमुख उपस्थिती होती.

मिसाळ म्हणाल्या, “ग्रामपंचायतीपेक्षा अधिक कर समाविष्ट गावातील मिळकतधारांकडून आकारला जात असल्याची भावना या भागातील नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे समाविष्ट गावातून अपेक्षित महसूल संकलन होत नाही. सर्वांना समान न्याय मिळेल अशी कर रचना करणारा सविस्तर प्रस्ताव पुणे महापालिकेने राज्य शासनाकडे पाठवावा त्याला मंजुरी देण्यात येईल.”

मिसाळ म्हणाल्या, “पुणे महापालिकेमध्ये नगरविकास खाते , समाज कल्याण खाते आणि पीएमपीएमएल खाते या अनुषंगाने आढावा बैठक घेतली आहे. पुण्यात दोन वर्ष पूरस्थिती होती त्यानुषंगाने आपत्कालीन व्यवस्था आढावा घेतला. केंद्र सरकारकडून आपत्कालीन व्यवस्थेसाठी ८० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मनपाने दोन प्रकल्प राबवणे ठरवले आहे. अमृत योजना अंतर्गत ड्रेनेजची कामे चांगल्या प्रकारे करण्यात होत आहेत. नवीन सहा एसटीपी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. एकूण दहा एसटीपी करण्यात येणार आहेत. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत साडेचार हजार घरे बांधणे प्रस्तावित आहे.त्यासाठी काही गायराने जागा देखील पाहणे सुरू आहे. पुण्यात या योजनेअंतर्गत गृहनिर्मितीसाठी जमीन उपलब्ध नसल्याने, नवीन बांधकाम ठिकाणी काही दुसऱ्या अधिक प्रमाणात योजना राबवता येईल का याबाबत चर्चा सुरू आहे. शहरातील कर प्रणाली वसुली बाबत आढावा घेतला असता, अनेक जागी कर थकबाकी अधिक असल्याचे दिसून आले आहे. थकीत कर यावर दंड लागल्याने देखील थकीत कर अधिक आहे.आतापर्यंत साडेनऊशे कोटी रुपये कर वसूल करण्यात आले आहे.

मिसाळ म्हणाल्या, “शहरातील पथदिव्यांचा आढावा देखील घेण्यात आला. ५० मेगा वॅट सोलर प्रकल्प प्रस्तावित असून महापालिकेची सार्वजनिक वीज गरज त्यातून भागू शकेल. २०० नवीन इलेक्ट्रिक बस खरेदी बाबत देखील निर्णय घेतला असून त्या लवकर उपलब्ध होतील. नॅशनल ग्रीन एयर प्रोग्राम अंतर्गत ३५० कोटी रुपये मनपाला उपलब्ध झाले आहे. नगरविकास खाते यांना शहरातील सीमाभिंत बांधण्याबाबत २०० कोटी रुपये खर्च प्रस्ताव मनपाने दिला आहे.”

‘हिंदी भाषेची सक्ती बिनडोक व कर्मदरिद्री’-ज्येष्ठ साहित्यिक व मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचा घणाघात

पुणे: महाराष्ट्र राज्य शासनाचा हिंदी वा तिसऱ्या भाषेची सक्ती करण्याचा निर्णय कर्मदरिद्री, बिनडोक आणि महाराष्ट्राचा घात करणारा असल्याचे परखड प्रतिपादन साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले.

बालगंधर्व परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंदीची सक्ती कशाला?’ या विषयावर आयोजित केलेल्या प्रकट संवादामध्ये साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस साहित्य आणि संमेलनाचे माजी अध्यक्ष व भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्याशी सौमित्र पोटे यांनी संवाद साधला. या संवादामध्ये महाराष्ट्रावर केल्या जाणाऱ्या हिंदी शिक्षणाच्या सक्तीबद्दल परखड चर्चा करण्यात आली.

यापूर्वीच्या शिक्षण धोरणात देखील इयत्ता पाचवी पासून हिंदी शिकवली जात होती. आता ती पहिलीपासून सक्तीची करण्याच्या निर्णयामुळे सक्ती केल्यामुळे मराठी भाषिकांमधील हिंदीविषयीचे प्रेमच नष्ट होण्याची भीती देशमुख यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. महाराष्ट्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना केंद्राच्या धोरणाची योग्य ‘कॉपी’ राज्य शासनाला करताना आल्याचे निदर्शनास आणून दिले. सध्या महाराष्ट्रात ७० टक्के मराठी भाषिक राहिले असून ३० टक्के अन्य भाषिक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे आगामी काळात केंद्र सरकारची सक्ती कायम राहिल्यास महाराष्ट्रातील मराठी जनतेत देखील हिंदीचा प्रभाव वाढवून मराठी धोक्यात येण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

केंद्र शासनाचा निर्णय माथी घेऊन हिंदी सक्तीचे धोरण स्वीकारणे अतिशय गलथान आहे. केंद्राची गुलामी पत्करून मराठीचा गळा दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप श्रीपाल सबनीस यांनी केला आहे. मंत्र्यांना शैक्षणिक क्षेत्रातील कोणत्याही बाबींचे ज्ञान नाही. मुलांच्या मानसशास्त्राचे ज्ञान मंत्री आणि निर्णय घेणाऱ्यांना नाही. ते ज्ञान ज्यांना आहे त्या मानसशास्त्रज्ञ, बाल मानसशास्त्रज्ञ आणि शिक्षण तज्ञ यांना विश्वासात घेण्यात सरकार तयार नाही. याखेरीज सरकारच्या या मनमानीच्या विरोधात मराठी माणूस, मराठी साहित्यिक आणि कलावंत उठत नाहीत, अशी खंत देखील सबनीस यांनी व्यक्त केली.

हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. वास्तविक मराठी आणि तमिळ या भारतातील दोन भाषा २२०० वर्ष जुने आहेत. मराठीची गुणवत्ता हिंदीपेक्षा काही पटीने अधिक आहे. त्यामुळे ती लादणे हा मराठीचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी भावना या मान्यवरांनी व्यक्त केली.

हिंदीच्या सक्तीला विरोध करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र पाठवा. आम्ही आमच्या प्रयत्नातून लाख पत्र पाठवली आहेत आपण एक कोटी पत्र पाठवा असे आवाहन लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले. मात्र डॉ सबनीस यांनी त्या पेक्षा अधिक आक्रमक आवाहन करीत एक कोटी पत्र पाठवण्यासाठी आवाहन केले. सौम्य स्वभावाच्या लोकांनी पोस्ट कार्ड पाठवून निषेध व्यक्त करावा. मात्र, उग्र स्वभावाच्या लोकांनी पायातला जोडा हातात घेऊन सरकारला जाब विचारावा, असे आवाहन त्यांनी केले.

अनधिकृत बाल संस्था सुरु असल्यास नागरिकांनी महिला व बालविकास विभागास कळविण्याचे आवाहन

पुणे, दि. २६ : नागरिकांनी आपल्या परिसरात अनधिकृत बाल संस्था सुरु असल्यास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी किंवा चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०९८ तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, आंबेडकर चौक,येरवडा दुरध्वनी क्र. ०२०-२६१३६८७१, ई मेल jimba@yahoo.com वर संपर्क साधावा, असे आवाहन महिला व बालविकास अधिकारी मनिषा बिरारीस यांनी केले आहे.

पुणे जिल्ह्यातील आळंदी आणि ठाणे जिल्ह्यातील खडवली येथे बेकायदेशीर बालगृह, वसतीगृह आणि अनाथाश्रम चालविले जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या संस्थामध्ये बालकांना डांबून ठेवले जात असून त्याचे शारिरीक, मानसिक व लैंगिक शोषण होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबींचा विचार करता बालकांवरील अपराधांना प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.

याबाबी बालन्याय (मुलांचे काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ आणि सुधारित अधिनियम २०२१ तसेच महाराष्ट्र राज्य बालन्याय (मुलांचे काळजी व संरक्षण) नियम, २०१८ मधील तरतुदींचे उल्लघंन करणाऱ्या आहेत. या कायद्यानुसार मान्यता, नोंदणी प्रमाणपत्र नसलेल्या संस्था चालविणाऱ्या व्यक्तीस एक वर्षाचा कारावास आणि एक लाख रुपये किंवा त्याहुन अधिक दंडाची तरतूद आहे, असे श्रीमती बिरारीस यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

कोर्टात हिंमत असती, तर दंड ठोठावला असता:आंबेडकरांचा 76 लाख मतासंबंधीची याचिका फेटाळल्याने संताप

या जजमेंटवरून असं दिसून येत आहे की, निवडणुकीत जी चोरी झाली आहे, ती या चोरांना पाठीशी घालत आहे. याविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत.

मुंबई-न्यायालयात हिम्मत असती तर त्यांनी दंड लावला असता, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक संदर्भातील फेटाळलेल्या याचिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. या याचिकेमुळे न्यायालयाचा वेळ वाया गेला असून आम्ही दंड लावत नसल्याचे न्यायालयाने म्हटले होते. यावर प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. ते आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.न्यायालयाने मूळ याचिका सोडून छोट्या मोठ्या चुकांवर निकाल दिला असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणारच आहोत. मात्र, त्याचबरोबर बार कौन्सिल कडे जाणार आहोत. तसेच यावर बार कौन्सिल ने मत व्यक्त करण्याची मागणी करणार आहोत. हे प्रकरण पब्लिक डोमेन मध्ये जायला हवे, असा आमचा प्रयत्न असेल, असे देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

आम्ही वेळ वाया घालवला असे कोर्टाचे जर म्हणणे आहे. तर तुम्ही आमचे काय एक्सामिन केले? असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. जर निवडणूक आयोग स्वतःहून म्हणत आहे की, 76 लाख मतदान झालेला आहे. इलेक्शन कमिशन स्वतःहून आमच्याकडे रेकॉर्ड नाही, असे म्हणत आहे. त्यामुळे केवळ न्यायालयाला उलट तपासणी करण्याचा अधिकार आहे. इतर कोणालाही असा अधिकार दिलेला नाही. कोर्टाने तपासण्याच्या ऐवजी भलत्याच कोणत्यातरी प्रश्नाला धरून आमची पिटीशन नाकारली असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.2024 मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6 वाजेनंतर अचानक वाढलेल्या 76 लाख मतांबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेला मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळले असले तरी, निवडणूक प्रक्रिया खरोखरच फ्री आणि फेअर झाली का, यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत गंभीर प्रश्न उपस्थित केले. या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असून जे तथ्ये आम्ही मुंबई उच्च न्यायालयासमोर मांडले होते ते सर्वोच्च न्यायालयासमोर मांडू अशी माहिती यावेळी ते म्हणाले की, आम्ही दाखल केलेली याचिका ही निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, नियमबद्ध आणि कायद्यानुसार झाली की नाही, याच्या तपासणीसाठी होती, असे स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाने २०-११-२०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या प्रेसनोटमध्ये मतदानाची टक्केवारी 6.80% वाढली असल्याचे नमूद आहे, ज्यामध्ये तब्बल 76 लाख मतांची भर पडली होती.जर ही आकडेवारी आयोग मान्य करत असेल, तर त्या अनुषंगाने नोंदी आहेत क?, हे आम्ही विचारले होते. पण, त्या नोंदी कोर्टात सादर केल्या गेल्या नाहीत. अशा परिस्थितीत ही निवडणूक खरोखर मुक्त आणि पारदर्शक होती का?, याची तपासणी व्हायलाच हवी होती, असा ठाम आग्रह त्यांनी व्यक्त केला.प्रकाश आंबेडकर यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की, आम्ही जी याचिका दाखल केली होती, ती निवडणूक याचिका नव्हती, तर निवडणूक कंडक्टवरील रीट पिटीशन होती. मात्र, कोर्टाने तिचा निवडणूक याचिका असा अर्थ लावून ती निवडणूक याचिका असल्याचे समजले आणि त्याच आधारावर निकाल दिला. हा लोकशाहीला धक्का आहे.जर ही गैर संविधानिक पिटीशन होती, तर ती कशी गैर संविधानिक आहे ते सांगावे. जेव्हा निवडणूक आयोग स्वतः म्हणतोय की, 76 लाख मतदान झाले आहे असे मान्य करत आहे आणि म्हणतंय की, याचा डाटा अमच्याकडे नाहीये, तर ही पारदर्शक निवडणूक कशी काय?

लोकसत्ता या दैनिकात आलेल्या विश्लेषणाचा आम्ही उल्लेख केला होता, पण कोर्टाने त्याला गांभीर्याने घेतले नाही. इतकंच नाही, तर निवडणूक आयोगाची अधिकृत प्रेस नोटही निकालात विचारात घेतलेली नाही, असे सांगत त्यांनी न्यायालयाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

यावेळी याचिकाकर्ते चेतन अहिरे, सिध्दार्थ मोकळे उपस्थित होते.

वीज खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे वीजदरात कपात

भविष्यकाळात काळात वीजदरात आणखी घट होणारमहावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांचे प्रतिपादन

मुंबई दि. २६ जून २०२५ :-

मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महावितरणने गेल्या अडीच वर्षात राज्याच्या वीज पुरवठ्यासाठी केलेल्या नियोजनामुळे आगामी पाच वर्षात कंपनीची वीज खरेदी खर्चात ६६ हजार कोटी रुपयांची बचत होणार असल्याने त्याचा लाभ वीज ग्राहकांना देऊन आगामी पाच वर्षांसाठी वीजदरात कपात करता आली. महावितरणने नवीकरणीय ऊर्जेवर भर दिला असून त्यांचे वीजदर कायम राहणार असल्याने पाच वर्षानंतर वीजदरात आणखी घट होईल, असे प्रतिपादन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी गुरुवारी मुंबईत केले.

ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी महावितरणचे संचालक (संचलन) सचीन तालेवार, संचालक (वाणिज्य) योगेश गडकरी, संचालक (वित्त) अनुदीप दिघे व संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार उपस्थित होते. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने बुधवारी महावितरणच्या वीजदराबाबत आदेश जारी केला व महावितरणचा वीजदर कमी करण्याचा प्रस्ताव मान्य केला. या पार्श्वभूमीवर मा. लोकेश चंद्र बोलत होते.

मा. लोकेश चंद्र म्हणाले की, महाराष्ट्र राज्याची आगामी काळातील विजेची गरज ध्यानात घेऊन महावितरणने २०३४ -३५ या आर्थिक वर्षापर्यंत पुरेशा विजेसाठीचे नियोजन केले आहे. आगामी पाच वर्षात राज्याची विजेची क्षमता ४५ हजार मेगावॅटने वाढविण्यासाठी वीजखरेदी करार केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने सौर, पवन, पंप स्टोरेज, बॅटरी स्टोरेज अशा नवीकरणीय ऊर्जास्त्रोतांवर भर दिला आहे. या स्त्रोतांमधून वीज स्वस्त दरात मिळणार असल्याने कंपनीची आगामी पाच वर्षात वीजखरेदीची ६६ हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे. त्याचा लाभ घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना वीजदर कपातीच्या स्वरुपात करून देण्यात आला आहे. यासाठी गेली अडीच वर्षे नियोजनबद्धरित्या काम सुरू होते.

त्यांनी सांगितले की, नवीकरणीय ऊर्जेवर भर दिल्यामुळे वीजखरेदीत बचत होण्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या गेमचेंजर योजनेचा महत्त्वाचा वाटा आहे. शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी दिवसा वीज देण्यासाठीच्या या १६ हजार मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पातून सरासरी तीन रुपये प्रती युनिट इतक्या कमी दरात वीज उपलब्ध होणार आहे. अशा प्रकारच्या कल्पक उपायांमुळे महावितरणची वीजखरेदी खर्चात बचत होणार आहे.

मा. लोकेश चंद्र म्हणाले की, महावितरणने रिन्युएबल अर्थात नवीकरणीय ऊर्जेवर भर दिला आहे. त्याद्वारे मिळणाऱ्या विजेचे दर सौर ऊर्जेच्या बाबतीत आगामी २५ वर्षे तर पंप स्टोरेजच्या बाबतीत ४० वर्षे बदलणार नाहीत. स्वस्त व स्थिर दराची वीज मिळाल्यामुळे भविष्यकाळात पाच वर्षानंतर वीजदरात आणखी घट होऊ शकते. राज्यातील घरगुती, औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांचे वीजदर आगामी पाच वर्षात वाढणार नाहीत तर कमीच होत जातील.

स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती वीज ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या वीजवापरासाठी ८० पैसे प्रती युनिट जास्तीची सवलत देण्याचा आदेश आयोगाने दिला आहे. त्याबद्दल विचारले असता मा. लोकेश चंद्र म्हणाले की, ही सवलत कायम राहणार आहे. स्मार्ट मीटर हे ग्राहकांना अचूक वीजबिल उपलब्ध करून देण्यासाठी आणि ग्राहकांना त्यांचा वीजवापर नियमितपणे कळविण्यासाठी आहेत. तसेच राज्यात जेथे स्मार्ट मीटर लावले आहेत, तेथे वीजबिलाबद्दलच्या तक्रारी जवळ जवळ शून्यावर आल्या आहेत.

उद्योगांसाठी महाराष्ट्रातील वीजदर स्पर्धात्मकच

मा. लोकेश चंद्र यांनी सांगितले की, महाराष्ट्रात उद्योगांसाठीचे वीजदर इतर राज्यांपेक्षा जास्त आहेत, अशी तक्रार करण्यात येत असली तरी त्यात तथ्य नाही. राज्यात उद्योगांना वीजदराबाबत मिळणाऱ्या सवलतींचा विचार केला तर सध्याच हे दर स्पर्धात्मक आहेत. तसेच वीजदर कपातीचा निर्णय झाला आहे. आगामी पाच वर्षात राज्यातील उद्योगांचे वीजदर आणखी कमी होत जातील आणि ते गुजरात, तामिळनाडू अशा औद्योगिक मागणी जास्त असलेल्या राज्यांपेक्षा कमी होतील.