Home Blog Page 483

छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक पुरस्काराचे वितरण मंगळवारी-दिनकर शिलेदार यांची माहिती

चार दिवस दिवाळी, ख्रिसमस, रमजान अंकांचे प्रदर्शन पाहण्याची पुणेकरांना संधी

पुणे: स्वर्गवासी कमलाबाई रसिकलाल धारिवाल पुरस्कृत ‘छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धा पुरस्कार’ वितरण सोहळा व दिवाळी, ख्रिसमस, रमजान निमित्ताने प्रकाशित होणाऱ्या अंकांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. १ ते ४ जुलै २०२५ या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ८ या वेळेत आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी (ता. १ जुलै) सकाळी ११ वाजता बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात माजी संमेलनाध्यक्ष व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते, धारिवाल इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाशशेठ धारिवाल यांच्या हस्ते होणार आहे. पुरस्काराचे यंदा नववे वर्ष असून, पुरस्कार वितरण सोहळा संध्याकाळी ५ वाजता गणेश सभागृह, टिळक रस्ता पुणे येथे प्रसिद्ध अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, ज्येष्ठ लेखिका सिसिलिया कार्व्हालो, संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती दिनमार्क पब्लिकेशनचे दिनकर शिलेदार यांनी दिली. प्रसंगी साहित्यिक माधव राजगुरू उपस्थित होते.

दिनकर शिलेदार म्हणाले, “ही स्पर्धा दिवाळी अंकांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात येते. यंदा स्पर्धेत ख्रिसमस सणाच्या निमित्ताने वसई येथून प्रकाशित होत असलेल्या अंकांच्या प्रवेशिका, तसेच रमजान सणानिमित्त प्रकाशित होणार ‘नब्ज्’ हा अंक स्पर्धेसाठी स्वीकारण्यात आला आहे. देशभरातून प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांची माहिती पुणेकरांना व्हावी, यासाठी या अंकांचे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. कादौडी, पाशिहार हे अंक ख्रिसमसमध्ये कादौडी भाषेत प्रसिद्ध होतात. स्पॅनिश लोक भारतात ५०० वर्षांपूर्वी आले होते; तेव्हा कादौडी भाषेचा जन्म झाला. कादौडी भाषा काही लोकांची बोली भाषा म्हणून प्रचलित झाली. गीत, संक्रमण अशासारखे अंक मराठी भाषेतच प्रसिद्ध होतात. त्यामुळे त्यांना या स्पर्धेत सामावून घेण्यात आले. पुढील वर्षी पश्चिम बंगालमधून बंगाली भाषेतील दुर्गा पूजेनिमित्त प्रसिद्ध होणारे अंक सामील करून घेतले जाण्याचा मानस आहे. यंदा स्पर्धेमध्ये २३४ प्रवेशिका स्वीकारण्यात आल्या आहेत. अमेरिकेतून दोन दिवाळी अंक स्पर्धेत सहभागी झाले आहेत. अशा प्रकारची स्पर्धा आणि प्रदर्शन भारतात प्रथमच सादर करण्याचा मान दिनमार्क पब्लिकेशन्सला मिळणार आहे. काही अंक पूनम एजन्सीच्या श्रीकांत भुतडा यांच्या सहकार्यातून मिळवणार असून, ३०० पेक्षा जास्त अंक प्रदर्शनात असतील, असा विश्वास आहे.”

पुण्यातून मिनाज लाटकर या गेली तीन वर्षे रमजाननिमित्त ‘नब्ज’ नावाचा अंक मराठी भाषेत देवनागरी लिपीत सादर करीत आहेत. कोणत्याही सणानिमित्त प्रसिद्ध होणारे अंक वाचन संस्कृतीचा आधारस्तंभ ठरतात. विविध प्रकारची माहिती त्यामुळे उपलब्ध होते. यामुळेच अंकांचे प्रदर्शन भरवण्याचा घाट घालण्यात आला आहे. इथे धर्माचा विचार बाजूला ठेवला आहे. फक्त वाचन संस्कृतीवर भर देण्यात येतो. आक्षेपार्ह लिखाण केले जात नाही ना, याची काळजी घेण्यात येते. यात कुणाच्या भावना दुखावण्याचा विचार मनात आलेला नाही. त्यातूनही कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर मी त्याची आगाऊ माफी मागतो. केवळ वाचकांना चांगले खाद्य मिळावे, हाच त्यामागचा विचार आहे, असे दिनकर शिलेदार यांनी नमूद केले.

छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धा पुरस्कार

सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाचे दोन्ही पुरस्कार यावर्षी सकाळ माध्यम समूहाच्या ‘अवतरण’ आणि ‘ॲग्रोवन’ या दिवाळी अंकाने पटकावले. उत्कृष्ट मुखपृष्ठाचा मान लोकमत समूहाच्या ‘दीपोत्सव’ दिवाळी अंकाला मिळाला आहे. त्याचे श्रेय सुप्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांना जाते. त्याशिवाय उत्कृष्ट दिवाळी अंकांचे प्रथम, द्वितीय आणि उत्तेजनार्थ पुरस्कार असे एकूण ४२ पुरस्कार यावर्षी देण्यात येणार आहेत. अनेक पुरस्कारांत महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, दिव्यमराठी या वृत्तपत्रांनीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

राउंड टेबल इंडियातर्फे दृष्टिहीनांसाठी रविवारी‘बियाँड साइट’ अनोख्या कार रॅलीचे आयोजन

पुणे : सामाजिक समावेशकतेला चालना देण्यासाठी राउंड टेबल इंडिया या संस्थेतर्फे पुण्यात दृष्टीहिनांसाठी ‘बियॉंड साईट’, ही आगळीवेगळी कार रॅली आयोजित करण्यात आली आहे. ही कार रॅली येत्या रविवारी (ता. २९) रोजी सकाळी १० वाजता द फर्न क्लब, अमनोरा पार्क, पुणे येथे होणार आहे, अशी माहिती राउंड टेबल इंडियाचे (एरिया १५) अध्यक्ष अंशुल मंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशनच्या प्रकल्प संचालिका डॉ. आर्वा चिनीकमवाला, राउंड टेबल इंडियाचे सुमित गुप्ता, रोनक पतोडीया, मनन शहा, गुरप्रीत सिंग, इंद्रोनील चॅटर्जी, तरुण सिंग आदी उपस्थित होते.

अंशुल मंगल म्हणाले, “या रॅलीमध्ये ५० कारचालक सहभागी होणार आहेत. दृष्टिक्षम व्यक्ती कार चालवणार आहे, तर दृष्टिहीन व्यक्ती स्मार्टफोनवरून मिळणाऱ्या सूचना ऐकून ड्रायव्हरला मार्ग दाखवणार आहे. दोन तासाचा वेळ, २४ किलोमीटर अंतर असलेल्या या रॅलीचा मार्ग अमनोरा पार्क, खराडी बायपास, शक्ती स्पोर्ट्स, हयात इन्स्टा, गोल्ड ऍडलॅब चौक, वर्दे सोसायटी, गुंजन टॉकीज, कोरेगाव पार्क, वेस्टीन हॉटेल, मुंढवा चौक, मगरपट्टामार्गे अमनोरा पार्क असा आहे. ‘बियाँड साइट’ ही केवळ स्पर्धा नाही, तर दृष्टिहीन व्यक्तींच्या कौशल्यावर विश्वास दाखवण्याचा आणि त्यांच्याविषयी असलेल्या रूढ कल्पनांना आव्हान देण्याचा उपक्रम आहे. संथ गतीने शहरातील ठराविक मार्गावर ही रॅली पार पडणार असून, दृष्टिहीन व्यक्तींची दिशा ज्ञान, स्थानिक समज आणि संवाद कौशल्ये यांचा प्रत्यय इथे येणार आहे.”

“राउंड टेबल इंडियामध्ये आम्ही संधी निर्माण करत समाजातील वंचित घटकांना सक्षम करण्यावर विश्वास ठेवतो. ‘बियाँड साइट’ ही आमच्या समावेशकतेवरील कटिबद्धतेचे आणि दृष्टिहीनांच्या क्षमतेवर असलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. या उपक्रमामध्ये विविध पार्श्वभूमीचे नागरिक सहभागी होणार असून, ड्रायव्हिंगबद्दलची आवड आणि दृष्टिहीन समुदायाबद्दलचा आदर यांच्या जोरावर ते एकत्र येणार आहेत. या रॅलीच्या माध्यमातून केवळ मनोरंजन नव्हे, तर ‘अपंगत्व म्हणजे असमर्थता नव्हे’ हा सामाजिक संदेशही दिला जाणार आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

ही फक्त रॅली नाही, तर दृष्टिहीनांच्या अद्भुत कौशल्यांना ओळख देणारे व्यासपीठ आहे. ‘बियाँड साइट’च्या माध्यमातून अनेकांचे दृष्टिकोन बदलतील आणि दृष्टिहीनांसाठी अधिक समावेशक संधी निर्माण होतील, अशी आशा आहे,” असे डॉ. आर्वा चिनीकमवाला यांनी सांगितले. या उपक्रमाविषयी अधिक माहिती www.roundtableindia.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेत राजर्षी शाहू जयंती उत्साहात साजरी…..

पुणे-अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद पर्वती पुणे येथे राजर्षी शाहू जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. गिरीष प्रभुणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष तंजावरचे  छत्रपती विजयसिंहराजे भोसले, सौ.प्रमिला गायकवाड, सरचिटणीस आखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद, , संयुक्त चिटणीस अजय पाटील, वासंती बोर्डे, खजिनदार ॲड भगवानराव साळुंखे, नियामक मंडळाच्या अध्यक्ष कमलताई व्यवहारे,के. टी. सोनावणे  यांचे उपस्थितीत कार्यक्रमाची सुरवात राजर्षी शाहू महाराज यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली.  राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याविषयी बोलताना डॉ. गिरीष प्रभुणे यांनी शाहूमहाराज यांनी  शिक्षण हे एकमेव ध्येय डोळ्यापुढे ठेवून शिक्षण प्रसाराचे कार्य केले. त्यासाठी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले व जे पालक मुला-मुलींना शाळेत पाठवणार नाहीत त्यांना दंड तसेच त्याच्यावर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्याचा कायदा तयार केला. जात हे भारतीय समाजाचे वास्तव आहे हे ओळखून शैक्षणिक विषमता दूर करण्यासाठी जातनिहाय बोर्डिंग, स्त्रियांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणारा दूरदर्शी राजा म्हणजे शाहू महाराज होय. चातुवर्ण समाजव्यवस्थेला छेद देऊन आपल्या राजदंडाचा वापर स्त्री उद्धारासाठी केला. विधवा पुनर्विवाह, आंतरजातीय विवाह, दलितांबरोबर मानवतावादी व्यवहार करण्याचा पायंडा स्वतःपासून घातला.औद्योगिक व कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी केली. कुस्ती,गायन,चित्रकला या सारख्या विविध कलांना राजाश्रय दिला असे उपस्थितांना मार्गदर्शन केले. छत्रपती विजयसिंहराजे भोसले यांनी या प्रसंगी बोलताना आयुष्याचे प्रश्न सोडविण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगून कौशल्याआधारित  शिक्षणाचे महत्व जाणणारा द्रष्टा राजा म्हणजे लोकराजा राजर्षी शाहू महाराज असे उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मा. सौ.प्रमिला गायकवाड सरचिटणीस आखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद यांनी प्रास्ताविकामध्ये संस्थेच्या विविध शाखा, राबविले जाणारे विविध अभ्यासक्रम,पुरविल्या जाणाऱ्या सुविधा विषयी सांगून संस्थेचा परिचय करून दिला. सदर कार्यक्रमासाठी पद्मश्री डॉ. गिरीष प्रभुणे, छत्रपती विजयसिंहराजे भोसले, सौ.प्रमिला गायकवाड, अजय पाटील, वासंती बोर्डे, ॲड भगवानराव साळुंखे, मा.कमलताई व्यवहारे, के. टी. सोनावणे, संस्थेचे सदस्य, सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दीपक गायकवाड यांनी केले तर आभार संयुक्त चिटणीस  अजय पाटील यांनी मानले.

तरुणाईसाठी राक्षस बनलेल्या व्यसनांची प्रतीकात्मक होळी

जागतिक अमली पदार्थ सेवन व अवैध वाहतूक विरोधी दिनानिमित्त, आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र, अमली पदार्थ विरोधी पथक – पुणे पोलीस, आणि मराठवाडा कॉलेज ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

पुणे: गांजा, अफू, चरस, दारू यांसारख्या व्यसनांचे प्रतिकात्मक रूप असलेल्या राक्षसाची होळी करून, नव्या पिढीसाठी घातक ठरणाऱ्या व्यसनांचा प्रतिकार करण्याचा संदेश देण्यात आला.  यावेळी तरुणांनी व्यसनमुक्त होण्याची शपथ घेतली.

जागतिक अमली पदार्थ सेवन व अवैध वाहतूक विरोधी दिनानिमित्त, आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र, अमली पदार्थ विरोधी पथक  पुणे पोलीस, आणि मराठवाडा कॉलेज ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप भोसले, सुदर्शन गायकवाड, आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे, प्रा.डॉ. पुनम शिंदे, आपलं फाउंडेशनचे मनीष भोसले, प्राचार्य गणेश पठारे, डॉ. अश्विन पारखे, प्रा. दशरथ गावित, प्रा. शिल्पा काब्रा, प्रा. अमित गोसावी, आपलं फाउंडेशन संस्थेचे गुरुप्रसाद रंधे, एन एस एस च्या प्रा. वैशाली निंबाळकर, आनंदवन चे विशाल शिंदे, सागर कांबळे,दत्ता सोनार आदि उपस्थित होते.

या उपक्रमाद्वारे युवकांमध्ये व्यसनांविषयी सजगता निर्माण करण्याचा आणि त्यांना व्यसनमुक्त आयुष्याचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनात्मक सत्राचे आयोजनही यावेळी करण्यात आले होते. 

डॉ. अजय दुधाणे म्हणाले, आजचे तरुण व्यसनांच्या विळख्यात अडकत चालले आहेत. गांजा, चरस, निकोटीन, अल्कोहोल आणि स्क्रीन अ‍ॅडिक्शनसारखी नवी व्यसने तरुणाईचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. अशा काळात केवळ कायद्याने नव्हे, तर सामाजिक आणि मानसिक पातळीवरही लढा उभारणे गरजेचे आहे.  ऋषिकेश इंगळे यांनी सूत्रसंचलन केले. सूरज कांबळे यांनी आभार मानले.

ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्राचा चतुर्थ पदवी प्रदान सोहळा रविवारी

शारदा, रत्नमाला पुरस्कारांसह विविध पुरस्कारांचे होणार वितरण

पुणे : ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र, पुणे यांच्या वतीने चतुर्थ पदवी प्रमाणपत्र वितरण व पुरस्कार सोहळ्याचे भव्य आयोजन रविवार, दिनांक २९ जून २०२५ रोजी करण्यात आले आहे. हा सोहळा पद्मावती येथील विणकर सभागृहात सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत पार पडणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष वेदमूर्ती उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेस संस्थेचे मार्गदर्शक व ज्येष्ठ उद्योगपती मनोज राठी, संपर्कप्रमुख श्रुती योगेश पिसे हे मान्यवर देखील उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्याने होणार आहे. या वेळी वास्तु विशारद, लोलक विशारद, अंक विशारद आणि वास्तु भूषण अभ्यासक्रम पूर्ण करणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे. या सोहळ्यास ज्योतिष व अध्यात्म क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. या वर्षीच्या पदवी वितरण सोहळ्यात १२० हून अधिक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गौरवचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.

कार्यक्रमात सकाळी १० वाजता पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होईल. यामध्ये विद्यावाचस्पती ज्येष्ठ  गाणपत्य डॉ. स्वानंद पुंड महाराज यांना शारदा पुरस्कार, अभिनव ज्योतिष मंडळ सोलापूर या संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ पंचांग कर्ते मोहन दाते यांना रत्नमाला पुरस्कार,  योगीराज वेद विज्ञान आश्रम या पाठशाळेचे अध्यक्ष अश्वमेघयाजी चैतन्य नारायण काळे गुरुजी यांना वेद संवर्धन प्रेरणा पुरस्कार, वेदमूर्ती दत्तात्रय मनोहर साधले गुरुजी यांना वेदमार्ग दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन ज्येष्ठ ज्योतिषतज्ञ शुभांगिनी पांगारकर यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर पुरोहितांचे मंगल मंत्र पठण, सान्वी फुंडकर यांचे सुसंस्कृत नृत्य आणि सन्मान समारंभ पार पडणार आहे.

दुपारी विशेष सत्रात विद्यार्थ्यांचे मनोगत तसेच प्रॅक्टिकल वास्तू व्हिजीट आयोजित करण्यात आली आहे. ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र हे गेल्या अनेक वर्षांपासून वास्तूशास्त्र, अंकशास्त्र व ज्योतिषशास्त्राच्या क्षेत्रात गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देत आहे. आजवर या संस्थेतून ३,००० पेक्षा अधिक विद्यार्थी यशस्वीरीत्या प्रशिक्षित होऊन समाजसेवेच्या माध्यमातून स्वत:चे यशस्वी करियर घडवत आहेत.

हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे कुटुंब चांगलेच आक्रमक

मुंबई-हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू चांगलेच आक्रमक झाले आहेत. एकीकडे या निर्णयाविरोधात राज ठाकरे यांनी 5 तारखेला मुंबईत मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी 7 तारखेला आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. काहीही झाले तरी हिंदीची सक्ती आम्ही लादू देणार नाही. तसेच त्रिभाषा सूत्रच आम्हाला मान्य नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. यातच आता ज्या मुद्यावर या दोन्ही पक्षांची स्थापना झाली, त्या मराठीच्या मुद्द्यावरून आता पुन्हा एकदा हे दोन भाऊ एकत्र येणार का? अशीच चर्चा रंगली आहे. यातच राज ठाकरे यांनी या निर्णयाविरोधात 5 जुलै रोजी मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सात तारखेला आझाद मैदानावर आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता या मराठीच्या मुद्यावर हे दोन्ही भाऊ एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हिंदी सक्तीविरोधात 7 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आझाद मैदानात आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी हुतात्मा स्मारक येथे आधी अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर एक मार्च आझाद मैदानापर्यंत जाईल. तिथेच धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. मुंबईतील मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार, खेळाडू, साहित्यिक आणि सर्व पक्षातील मराठीवर प्रेम करणाऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवहान उद्धव ठाकरे यांनी केले आहे. उद्धव ठाकरे यांनी पक्षभेद विसरून अगदी भाजपमधील नेत्यांनी सुद्धा मराठी माणसासाठी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुती सरकारच्या हिंदीच्या सक्तीच्या निर्णयाविरोधात येत्या 5 जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. या मोर्चात सर्वांनी पक्षीय राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी माझी भेट घेतली. त्यांनी त्यांची भूमिका सांगण्याचा प्रयत्न केला. पण मी त्यांची भूमिका फेटाळून लावली. हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही हे मी त्यांना स्पष्टपणे सांगितले असल्याचे राज यांनी म्हटले आहे. या प्रकरणी 5 जुलै रोजी गिरगाव चौपाटी येथून मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात कोणताही झेंडा नसेल. तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल. या मोर्चाचे नेतृत्व मराठी माणूस करेल, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

हिंदी सक्तीविरोधात ही आंदोलनाची सुरुवात असेल. एक-दोन आंदोलन करून हे थांबणार नाही. जोपर्यंत ही सक्ती मागे घेतली जाणार नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन चालू राहणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. वास्तविक मुख्यमंत्र्यांनी राज्यामध्ये हिंदी सक्ती करणार नाही, असे जाहीर केले, तर पाच मिनिटात हा विषय संपवू शकतो. मात्र हे दळण कशासाठी दळत आहात? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा भाजपने केली होती. मात्र आता ‘बांटेंगे आणि काटेंगे’ असे त्यांचे धोरण दिसत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

आमचा हिंदी भाषेला विरोध नाही. महाराष्ट्रात हिंदी चित्रपट देखील लोकप्रिय होतात आणि तुफान चालतात. हिंदी अभिनेते आणि अभिनेत्री देखील भरपूर पैसा मुंबईत राहून कमवत आहेत. भाजप नेते जे. पी. नड्डा हे एक विधान, एक देश, एक पक्ष, असे विधान करतात. हिंदीची सक्ती देखील त्यांच्या याच एकाधिकारशाही कडे वाटचालीसाठी सुरू असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आता ही भाषिक आणीबाणी भाजप लादत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचा विरोध आम्ही करणार आहे, असे देखील ठाकरे यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे गद्दार जे मिंदेपणाने त्यांच्यासोबत राहत आहेत, त्यांना देखील बाळासाहेब ठाकरे यांचे विचार काय? हे दाखवण्याची वेळ आली आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या धमकीमुळे आमची झोप उडाली:आता आमचे काय होणार? मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्याला शरद पवारांचा खोचक टोला

पुणे-महाराष्ट्रातील महायुती सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे नागपूर ते गोवा असा शक्तिपीठ महामार्ग. परंतु या महामार्गाला कोल्हापूर, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाच्या भूसंसंपादनाच्या दृष्टीने 20 हजार कोटी रुपयांच्या तरतुदीस मंजूरी देण्यात आली आहे. तसेच या प्रकल्पात राजकारण आणाल तर याद राखा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिला आहे. यावर शरद पवारांनी खोचक टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्गात राजकारण आणाल तर याद राखा, असा इशारा विरोधकांना दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी खोचक टोला लगावला आहे. ते म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाचा विषय मला समजून घ्यायचा आहे. कोल्हापूरच्या लोकांबरोबर मी बोलणार आहे. त्यानंतर राज्य सरकारने आम्हा लोकांना त्याची माहिती देण्याची तयारी दाखवली तर तेही समजून घेण्याचा माझा विचार आहे. देवेंद्र फडणवीसांच्या धमकीमुळे आमची झोप उडाली आहे, आता आमचे कसे होणार? असा खोचक टोला लगावला आहे.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, हा प्रकल्प काय आहे? हे आधी मी समजून घेईन. त्याची आवश्यकता आहे का? ते समजून घेईन. त्यासाठी सरकारने आम्हाला माहिती दिली तर ती देखील मी घेणार आहे. त्या भागातला शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जातात, त्या भागातले लोकप्रतिनिधी जे जाहीर बोलत आहेत त्यांची मते आणि त्यांचा आग्रह हा समजून घ्यावा लागेल. मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही, असेही शरद पवारांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शक्तिपीठ महामार्गाविषयी बोलताना म्हणाले, मराठवाड्यातील दुष्काळी चित्र बदलण्यासाठी शक्तिपीठ हे उत्तर असणार आहे. तो एक ॲक्सेस कंट्रोल रोड नसेल, तर त्या महामार्गावर प्रत्यक्ष रेंजमध्ये आम्ही 100 शेततळी बांधणार आहोत. तसेच ब्रिज कम बंधारे बांधून पाणी अडवण्याचा कार्यक्रम राबवणार आहोत आणि ते जलसंवर्धनासाठी उपयुक्त होईल. त्या माध्यमातून ग्रीन एनर्जी तयार करणार आहोत. त्यामुळे मराठवाडा आणि दुष्काळी भागात चित्र बदलणारा शक्तिपीठ महामार्ग असेल.

वित्त विभागाचा शक्तिपीठ महामार्गावर आक्षेप नाही:विरोधकांच्या विरोधाची पर्वा नाही- मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

मुंबई- काही लोकांना प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याची सवय आहे. या लोकांनी असाच समृद्धी महामार्गाला विरोध केला होता. पण आज समृद्धीने अनेक जिल्ह्यांचे चित्र बदलले आहे. विशेषतः मराठवाडा व दुष्काळी पट्ट्याचे चित्र बदलायचे असेल तर शक्तिपीठ महामार्ग हे त्याचे उत्तर आहे. असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा विरोध मोडून काढला मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी हायकोर्टाने विधानसभा निवडणुकीतील 76 लाखांच्या मतदानाच्या गौडबंगालाविषयी दिलेल्या निकालावरही भाष्य केले. या प्रकरणी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना शांत बसण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, राहुल गांधी यांचा देशाचे संविधान, लोकशाही व न्यायालय पद्धतीवर विश्वास असेल तर आता तरी ते महाराष्ट्राच्या निवडणुकीवर बोलणार नाहीत. काल अतिशय विस्तृत निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्यांचे तोंड बंद करण्याचे काम पुराव्यांसह लॉजिकसह न्यायासह व संविधानासह हायकोर्टाने केले आहे. यानंतरही काही लोक झोपेचे सोंग घेऊन झोपल्यासारखे करतील, तर ये पब्लिक है सब जानती हैं.

ते म्हणाले,’ हा केवळ अॅक्सेस कंट्रोल रोड नाही. या महामार्गावर प्रत्येक 100 किलोमीटर अंतरावर 500 ते 1000 शेततळी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शक्तिपीठ महामार्गावर जेवढे नाले क्रॉस होतात, तिथे ब्रिज कम बंधारे बांधून पाणी अडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामुळे दुष्काळी भागामध्ये याचे जलसंवर्धन व जलपुनर्भरणासाठी मोठा उपयोग होणार आहे. याशिवाय याचा वापर करून मोठ्या प्रमाणात ग्रिन एनर्जी तयार करण्याचाही आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे मराठवाडा व दुष्काळी भागाचे पूर्ण चित्र बदलणारा हा महामार्ग आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील अर्थ खात्याने महत्वकांक्षी शक्तिपीठ महामार्गावर कोणताही आक्षेप घेतला नसल्याची स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली. वित्त विभागाने शक्तिपीठावर कोणताही आक्षेप घेतला नाही. वित्त विभागाचे कामच या सर्व गोष्टी पॉइंट आऊट करण्याचे असते. त्यामुळे वित्त विभागाने आक्षेप नोंदवला असे म्हणता येत नाही, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सरकारला टोमणे मारण्यापेक्षा मराठी भाषेतील चांगल्या अलंकारांचा वापर करण्याचा उपरोधिक सल्लाही दिला.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वातील या खात्याने शक्तिपीठ महामार्गामुळे महाराष्ट्र कर्जबाजारी होण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे या महामार्गाच्या कामाला ब्रेक लागणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपरोक्त स्पष्टोक्ती दिली आहे. ते म्हणाले, वित्त विभागाने शक्तिपीठावर कोणताही आक्षेप घेतला नाही. वित्त विभागाचे कामच या सर्व गोष्टी पॉइंट आऊट करण्याचे असते. त्यांनी ते अधोरेखित केले आहे. त्यामुळे वित्त विभागाने आक्षेप नोंदवला असे म्हणता येत नाही.

ते पुढे म्हणाले, एक महामार्ग बनतो तेव्हा तो अर्थव्यवस्थेची दालने उघडतो. 12 हजार कोटींची गुंतवणूक आपण पायाभूत सुविधांमध्ये करतो तेव्हा त्यातला परतावा 12 हजार कोटींहून कितीतरी कोटी जास्त असतो. तो आपल्या अर्थव्यवस्थेला विस्तारित करतो आणि ते कर्ज परत करण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त क्षमता निर्माण करतो. त्यामुळे जगातले सर्वच देश हे कर्जातून पायाभूत सुविधा निर्माण करतात. कारण, अर्थव्यवस्थेचा नियम आहे की, तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरवर कर्ज घेतले तर ते उत्तम कर्ज मानले जाते. त्यातून अर्थव्यवस्थेचा विस्तार होतो, अर्थव्यवस्था बळकट होते. रोजगार निर्मिती होते.

फडणवीस यांनी यावेळी हिंदीच्या सक्तीवरून सरकारवर टीका करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही टोला हाणला. मराठी भाषेत टोमण्यापेक्षा खूप चांगले अलंकार आहे. उद्धव ठाकरे यांनी या अलंकाराचा उपयोग केला तर अधिक चांगले होईल. याहून अधिक मला त्यांना काहीच सांगायचे नाही. कारण, राज्यात हिंदी सक्ती नाही. मराठी सक्ती आहे. हिंदी ऑप्शनल आहे, असे ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी सर्वसामान्य जनतेविषयी केलेले विधान पूर्णपणे चुकीचे असल्याचेही ठणकावून सांगितले. ते म्हणाले, बबनराव लोणीकरांचे विधान पूर्णपणे चुकीचे आहे. त्यांनी काही निवडक लोकांना उद्देशून हे विधान केले असले तरी असे बोलण्याचा अधिकार कुणालाही अधिकार नाही. देशाचे पंतप्रधान ज्यावेळी सांगतात की, मी प्रधान सेवक आहे आणि आम्ही सर्व जण जनतेचे सेवक आहोत. तर आम्हाला मालक बनता येणार नाही. त्यामुळे लोणीकर जे काही बोललेत, ते पूर्णतः चुकीचे आहे. अशा प्रकारचे वक्तव्य योग्य नाही. याची समज त्यांना देण्यात येईल.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी महावितरणने घेतलेल्या वीज दर कपातीच्या निर्णयावरही समाधान व्यक्त केले. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा दरवर्षी वीजेचे दर कमी करण्याचा निर्णय आपल्या सरकारने, महावितरणने घेतला आहे. आपण मागील 20 वर्षातील इतिहास पाहिला तर साधारणतः दरवर्षी वीजेचे दर 9 ते 10 टक्क्यांनी वाढले. पण आता तेच दर आता कमी केले जात आहेत. उदाहरणार्थ, औद्योगिक दर आज 10 रुपये 88 पैसे एवढा आहे. पुढील 5 वर्षात हा दर वाढण्याऐवजी 9.97 पैशांपर्यंत खाली येणार आहे. त्यामुळे उद्योगांना पुढील 5 वर्षांत वीज दरवाढीला नव्हे सामोरे जावे लागणार नाही. उलट त्यांचे दर कमी होतील.

वीजेचा व्यापारी दर हा 19 रुपये 97 पैसे होता. हा दर 2030 मध्ये 23 रुपये 91 पैशांवर गेला असता. पण आता तो 15 रुपये 87 पैशांपर्यंत घसरणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वात मोठी दरवाढ ही घरगुती वापरासाठी देण्यात आली आहे. आपले 70 टक्के ग्राहक आहेत, त्यांना 26 टक्के दरवाढ पुढील 5 वर्षांत देत आहोत. आज त्यांचा दर 8 रुपये 14 पैसे आहे. यंदा हा दर 10 टक्क्यांनी कमी होईल. त्यानंतर पुढील 5 वर्षांत 8.14 पैशांवरून 6 रुपयांवर येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कोथरुड मधील मिसाबंदींकडून आणीबाणीच्या संघर्षमय आठवणींना उजाळा

आणीबाणी लागू करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची हत्या केली- माजी मंत्री प्रकाश जावडेकर

भाजपा कोथरूड मध्य मंडलच्या वतीने आणीबाणीतील बंदींचा विशेष सन्मान

पुणे:स्वतः ची खुर्ची वाचविण्यासाठी देशात आणीबाणी लागू करुन, निरपराध लोकांना तुरुंगात डांबणे ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय राज्यघटनेची हत्या होती, अशी भावना माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली. तसेच, स्वातंत्र्य आणि राज्य घटनेची पुनर्स्थापना करण्यासाठी करावा लागलेला संघर्ष तरुण पिढी पर्यंत पोहोचवणं आवश्यक असल्याची भावना ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

भारतीय जनता पक्ष कोथरूड मध्य मंडलच्या वतीने आणीबाणी काळा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी आणीबाणी मध्ये तुरुंगवास भोगलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सत्कार करुन, त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, कार्यक्रमाचे आयोजक भाजपा मध्य मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर, माजी अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, जगन्नाथ कुलकर्णी यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी आणि माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणीबाणीच्या काळातील आठवणींना उजाळा देताना माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, आपल्या देशाला १५० वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या रुपाने वैभव आपल्या देशाला बहाल केलं. पण स्वतःच्या खूर्चीसाठी कॉंग्रेसने हे वैभव उद्ध्वस्त करुन, देशात आणीबाणी लागू करुन; अनेकांना तुरुंगात डांबलं. या बंदी काळात अनेकांनी प्रचंड हालअपेष्टा सोसल्या. अनेक गरोदर महिलांना देखील तुरुंगात डांबण्याचं काम तत्कालीन सरकारने केलं होतं. त्यांची प्रसूती देखील तुरुंगातच व्हायची, पण कोणीही हार मानली नाही, अशा आठवणी त्यांनी सांगितल्या.

ते पुढे म्हणाले की, आणीबाणी आणि मिसाबंदी हे दोन्ही काळ अतिशय संघर्षाचे होते. मिसाबंदींना अनिश्चित काळासाठी तुरुंगवास भोगावा लागला. त्यामुळे हा संघर्ष काय होता. स्वातंत्र्यासाठी आणि संविधानाच्या पुनर्स्थापनेसाठीचा संघर्ष नव्या पिढीला माहिती असणं आवश्यक आहे.‌ आज कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी खिशात एक पुस्तक घेऊन फिरत आहेत. मात्र ते पुस्तक कोरं आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. तसेच, संघ स्वयंसेवकांच्या जिद्द आणि चिकाटी मुळे देशात पुन्हा संविधानाची पुनर्स्थापना झाली, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

आणीबाणी मध्ये तुरुंगवास भोगलेले मधुसूदन पारखे म्हणाले की, आणीबाणी मध्ये कारागृहात असलेल्या कुणाच्याही मनात खंत नव्हती, उटल तुरुंगवासाच्या काळात सामाजिक कामासाठी नवी ऊर्जा मिळत होती. या कालखंडात असंख्य लोकांनी आपल्या आयुष्याची समिधाच अर्पण केली होती. आज जे लोक संविधान म्हणून ओरडत आहेत, त्यांनी देशात आणीबाणी लागू करण्यासाठी राज्य घटनेची मोड केली, त्यावरही आपली भूमिका मांडावी. सज्जन शक्तीच्या संघर्षाचा इतिहास साक्षीदार आहे, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

यावेळी आणीबाणी काळात तुरुंगवास भोगलेल्या हिरामण जगताप, श्रीराम तथा आप्पा कुलकर्णी, संभाजी ढवरे, अशोकराव नाफडे, श्रीनिवास तेलंग, अनिल रहाळकर, सुभाष काकडे, विजयराव हर्षे, अविनाश देव, कृष्णाजी भडाळे, आनंद करमरकर, विनायक खेडकर, चंद्रशेखर घाटपांडे, प्रा. रघुनाथ काकडे, सोपान चव्हाण, संजयराव रबडे, रवी रबडे, अरविंद शिराळकर, जीना कलगीकर, मोहन थिटे, राजेंद्र कानेटकर, प्रा. अनिल कुलकर्णी, रविंद्र घाटपांडे, शामसुंदर जोशी, विश्वास रथकंटीकर, दिलीपराव नगरकर, विश्वासराव हर्षे, सरमुकादम, अशोक प्रभूणे, मधुसूदन पारखी, जगदिश साठे, मोहनराव पंडित, कुमारजी आठवले, शैला सोमण-पाठक, रंजना शितोळे, मंगला वझे- क्षीरसागर, अमला फडके- वैद्य, प्रज्ञा धारप, श्रीमती मीना भेलके यांचा विशेष सन्मान माजी केंद्रीय मंत्री प्रकाशजी जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

ट्रम्प म्हणाले- इराणने धैर्याने युद्ध लढले:आता त्यांना नुकसान भरून काढायचे आहे, म्हणून त्यांना तेल विकण्यापासून रोखणार नाही

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी नेदरलँड्समध्ये झालेल्या नाटो शिखर परिषदेदरम्यान म्हटले की, इराणने युद्धात शौर्य दाखवले. ते तेलाचा व्यापार करतात. मी इच्छित असल्यास ते थांबवू शकतो, परंतु मला ते करायचे नाही.

युद्धानंतर झालेल्या नुकसानातून सावरण्यासाठी इराणला तेल विकण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जर चीनला इराणकडून तेल खरेदी करायचे असेल तर आम्हाला काहीच हरकत नाही. ट्रम्प म्हणाले की, इराण आणि अमेरिकेत पुढील आठवड्यात चर्चा होईल.

मंगळवारी, नाटो शिखर परिषदेसाठी निघताना ट्रम्प म्हणाले होते की चीन आता इराणकडून तेल खरेदी करू शकतो, परंतु त्यांना आशा आहे की चीन अमेरिकेकडूनही तेल खरेदी करेल.

तथापि, व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले होते की ही इराणवर लादलेल्या अमेरिकेच्या निर्बंधांमध्ये सवलतीची घोषणा नाही. इराण आणि इस्रायलमधील १२ दिवसांच्या युद्धानंतर ट्रम्प यांनी मंगळवारी युद्धबंदीची घोषणा केली होती.

पुण्यात येऊन गांजा विकणारे सोलापूरचे तस्कर पकडले

पुणे- सोलापुरातून येऊन अंमली पदार्थाची तस्करी करणा-या गुन्हेगार टोळीच्या पोलीसांनी मुसकया बांधून त्यांना गजाआड केले आहे.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दिनांक १९/०६/२०२५ रोजी स्वारगेट बस स्टॅन्ड येथे एक सडपातळ इसम, दाढी राखलेली, मानेवर इंग्रजीमध्ये टॅट्यु काढलेला, डोक्यावर काळी टोपी, काळी पॅन्ट घातलेला असुन तो स्वारगेट एस.टी. स्टॅन्ड येथुन वेळापुर येथे जाण्यासाठी बस पकडण्यासाठी स्वारगेट एस.टी स्टॅण्ड येथे उभा आहे. त्याच्या हातात चॉकलेटी कलरची बॅग असून त्या बॅगमध्ये गांजा सारखा अंमली पदार्थ आहे अशी खबर पोलीस अंमलदार राहुल होळकर, विक्रम सांवत, यांना मिळाली होती. त्यामुळे सदर इसमास ताब्यात घेण्यासाठी सापळा लावून स्वारगेट बसस्टॅन्ड येथे स्टाफ रवाना करण्यात आला. सदर इसमास पंढरपुर बस स्टॉप येथे शोधुन बॅगबाबत विचारणा करताच तो बॅग सोडुन पळुन लागला त्यास पोलीस अंमलदार राहुल होळकर, नवनाथ शिंदे व स्वारगेट बस स्थानक ड्युटीवरचे पोलीस अंमलदार विक्रम सावंत यांनी पाठलाग करुन शिताफीने पकडले आहे. सदर इसमाचे नाव नितीन नरसिंह पाल वय-२३ वर्ष रा. ग्रीन सिटीच्या पाठीमागे वेळापुर जिल्हा-सोलापुर असे आहे.
त्याच्या ताब्यातील चॉकलेटी रंगाची बॅग स्वतः पंचासमक्ष तपासणी करता गांजा सारखा अंमली पदार्थ मिळुन आला. सदर इसमास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने आणखी ०२ साथीदार नामे अल्ताफ ईलाई तांबोळी वय-२८ वर्ष रा. ग्रीनसिटीच्या पाठीमागे वेळापुर ता. माळशिरस जि. सोलापुर व विठ्ठल ऊर्फ दादा हरी शिवपाल वय-३१ वर्ष रा. आंबेडकरनगर वेळापुर ता. माळशिरस जि. सोलापुर यांच्या मार्फतीने सदर माल विक्रीसाठी पुण्यात घेवुन आल्याचे तपासात सागितले. सदर मालाचा उर्वरीत साठा इन्होव्हा क्रिस्टा गाडी नंबर-एम.एच.४५ए.डी.३३३३ या गाडीत साठा करुन ठेवला असलेबाबत माहिती दिल्याने सदरबाबत वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग राहुल आवारे यांनी एक विशेष पथक तयार करुन बंडगार्डन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव राऊत, पोलीस अंमलदार राहुल होळकर, विक्रम सांवत, फिरोज शेख, सुजय पवार यांना वेळापुर, पंढरपुर या भागात रवाना करुन संशयीत आरोपींच्या मोबाईलचे तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे शोध घेवून पकडले.

सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, राजेश बनसोडे पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग राहुल आवारे यांनी कारवाई कामी नेमलेल्या विशेष पथकातील पोलीस निरीक्षक, गुन्हे बंडगार्डन पो.स्टे संपतराव राऊत, पोलीस उपनिरीक्षक सुर्यकात सपताळे, पोलीस अंमलदार राहुल होळकर, विक्रम सांवत, फिरोज शेख, सुजय पवार, नवनाथ शिंदे तसेच महिला पोलीस हवालदार प्रिती मोरे, सुजाता दांगट, सहा. पो. फौ. राजेश गोसावी, विजय लोयरे यांच्या पथकाने केली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येताच शेतकऱ्यांची आठवण: बळीराजा मोफत वीज योजनेसाठी 4136 कोटी वितरित

मुंबई-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने राज्य सरकारला ग्रामीण मतदार आणि शेतकऱ्यांची आठवण आली आहे. कृषिपंप ग्राहकांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना व वीज दर सवलत योजनेसाठी ४ हजार १३६ कोटी रुपयांचा निधी महावितरण कंपनीला वितरित करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने या योजनेसाठी ५६८५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. पण प्रत्यक्षात सरकारने या योजनेवर ७,३०० कोटी रुपये जास्त म्हणजेच १२,९८५ कोटी रुपये खर्च केले. तर २०२३-२४ या आर्थिक वर्षात या योजनेवर ७३५५.९१ कोटी रुपये खर्च झाले. कृषिपंप ग्राहकांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना व वीज दर सवलत योजनेसाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात १५,००० कोटी रुपयांची तरतूद आहे. त्यापैकी ४१३६ कोटी रुपये राज्य सरकारने बुधवारी वितरितास मान्यता दिली.

राज्यात मार्च २०२४ अखेर ४७.४१ लाख इतके कृषिपंप ग्राहक होते. सदर ग्राहकांना महावितरण कंपनी मार्फत वीजपुरवठा करण्यात येतो. एकूण ग्राहकांपैकी १६ टक्के कृषिपंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे ३० टक्के ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो. कृषी ग्राहकांचा अंदाजे एकूण वार्षिक वीज वापर ३९ हजार २४६ द.ल.यू. आहे. प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषिपंपास वीजपुरवठा करण्यासाठी होतो. निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना रात्रीच्या काळात १०-८ तास किंवा दिवसा ८ तास थ्री फेज विजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते.

सार्वजनिक ठिकाणीसीसीटीव्ही बसविण्यासाठी समिती स्थापन करून धोरण ठरविणार,घोषणा स्वागतार्ह: आ.शिरोळे

पुणे : सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसविताना शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय रहावा यासाठी धोरण ठरविले जाईल, अशी घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत केली.

ही बैठक मुंबई येथील शासकीय अतिथीगृहात झाली. सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याचे धोरण ठरविण्याची घोषणा मंत्री महोदयांनी बैठकीत केली. या घोषणेचे स्वागत आमदार शिरोळे यांनी केले. पुणे शहरातील अनेक चौकांमधील सीसीटीव्ही बंद असल्याची बाब विधीमंडळाच्या २०२५च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे मी मांडली होती, असे आमदार शिरोळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

रस्त्यातील चौक अथवा अन्य सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसविल्यानंतर त्याची देखभाल कोण करणार? महापालिका करणार?, पोलीस खाते करणार? की जिल्हा प्रशासन करणार? असा प्रश्न बंद पडलेल्या सीसीटीव्ही बाबत निर्माण झालेला होता. अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही देखभाल नसल्याने वर्षभरातच बंद पडले होते. याकरीता सार्वजनिक ठिकाणच्या सीसीटीव्ही बाबत धोरण ठरविले जावे, अशी मागणी अधिवेशनात केली होती, असे शिरोळे यांनी पत्रकात म्हटले आहे.

अनेकवेळा सीसीटीव्हीच्या केबल्स रस्ते खोदाई तसेच अन्य कामांच्या वेळी कापल्या जातात. त्यामुळे सीसीटीव्ही बंद पडतात, याकरीता सीसीटीव्हीच्या केबल्स भूमीगत असाव्यात अशी सूचना मंत्रीमहोदयांकडे पुन्हा एकदा केली आहे, अशी माहिती आमदार शिरोळे यांनी पत्रकात दिली आहे.
सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यासंदर्भात सर्व शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधून, पोलीस विभागाच्या माध्यमातून सचिव पातळीवर एक समिती स्थापन करून धोरण तयार करण्यात येणार असल्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत सांगितले.
यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, गृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार सिंह यांच्यासह नगर विकास व गृह विभागाचे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पहिलीपासून हिंदीला आम आदमी पार्टीचा विरोध ! मुलांना ‘शिक्षा’ नको, ‘शिक्षण’ हवे: आप ची निदर्शने

पुणे- पहिली पासून हिंदी भाषेच्या सक्तीला आम आदमी पार्टीने विरोध करत कोथरूड मध्ये निदर्शने केली . या आंदोलनात आप चे मुकुंद किर्दत, सुरेखा भोसले, शंतनू पांडे, शितल कांडेलकर, अमोल मोरे, सुनील सवदी, संतोष काळे, सुभाष करांडे, उमेश बागडे, आरती करंजवणे, अंजना वांजळे, बाबासाहेब जाधव, अक्षय शिंदे, सतीश यादव, निलेश वांजळे,संजय कटारनवरे, अजय मुनोत,सुनील भोसले,प्रशांत कांबळे,मनोज एरंडकर,अभिजित खंडागळे, महादेव कापरे,प्रदीप माने, कृणाल घारे, सय्यद अली,कुमार घोंगडे, सुनील भोसले, ऋषिकेश मारणे आदी उपस्थित होते.

यावेळी राज्य प्रवक्ता मुकुंद किर्दत म्हणाले कि,’महाराष्ट्र सरकारने मध्यंतरी हिंदी भाषा पहिलीपासून ‘ अनिवार्य’ केली. आप चा व इतर राजकीय पक्षांचा आणि शिक्षणतज्ञांचा विरोध पाहता शिक्षणमंत्र्यांनी ही सक्ती मागे घेणार असल्याचे सांगितले. परंतु त्यानंतर थेट शाळा सुरू झाल्यावर ‘सर्वसाधारणपणे’ हिंदी पहिलीपासून शिकवले जाईल असा शब्दछल करणारा आदेश काढला. आता चर्चा करण्याचे वेळकाढू धोरण हे सरकार राबवत आहे. या युती सरकारच्या आश्वासन न पाळण्याचा आणि आडमार्गाने सक्ती आणण्याचा पुण्यात कर्वे पुतळा चौकात निदर्शने करीत आम आदमी पार्टीने याचा विरोध केला आहे.मुख्यत्वे बहुजन समाजाला व्यावसायिक आणि आर्थिक प्रगतीसाठी इंग्रजी आवश्यक वाटते, दुसरीकडे मराठी या मातृभाषेविषयी आपुलकी, आस्था आणि अभिमान, गर्व आहे. असे असताना लहान वयातच तिसरी भाषा म्हणून *हिंदी भाषेला आडमार्गाने आणून तिला महाराष्ट्राची व्यवहार भाषा बनवण्याचे महायुती सरकारचे आणि त्यातील मुख्यत्वे भाजपचे राजकीय षडयंत्र आम आदमी पार्टी यशस्वी होऊ देणार नाही.

इतर राज्यातील, बोर्डातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करताना अधिक मार्क मिळवून देणारे संस्कृत व इतर देशी/परदेशी भाषा हा पर्याय खुला ठेवणेही आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्रातील इतर भाषिक जनतेसाठी अतिरिक्त भाषेचा पर्याय सुद्धा देता येणे जरूरी आहे. परंतु त्यासाठी तिसरी भाषा पहिलीपासून अपरिहार्य करण्याची गरज नाही. तिसरी मध्ये मातृभाषेत प्राविण्य, सहावी मध्ये दुसऱ्या भाषेत प्राविण्य आणि नववी मध्ये तिसऱ्या भाषेत प्राविण्य या पद्धतीचे भाषा धोरण नवीन शिक्षण धोरण २०२० नुसार लागू करावे अशी मागणी केली गेली.

या युती सरकारच्या भाषा विषयक षडयंत्राविषयी, माय मराठी विषयी प्रेमाचा दिखावा करणारे बहुतेक सर्व भाजपचे वाचाळ नेते गप्प आहेत. शिक्षण खात्याशी संबंधित चंद्रकांतदादा पाटील, नेहमीच खाजगी शाळा संस्था चालकांची बाजू उचलून धरणाऱ्या मेधा कुलकर्णी, माजी शिक्षणमंत्री जावडेकर व शाळा संस्थांवर कब्जा मिळवलेले भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस नेते सुद्धा यावर बोलायला तयार नाहीत. ही बाबच यामागचे हितसंबंध उघड करते. भाजपाच्या बालेकिल्ला असलेल्या पुण्यातील आणि मुख्यत्वे कोथरूडमधील ही मंडळी हाताची घडी, तोंडावर बोट धरून बसली आहेत अशी टीका यावेळी करण्यात आली.

भाजपा पदाधिकाऱ्याचा माज उतरवू-आमदार रासनेंनी मौन सोडावे – धंगेकर

पुणे-केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या पुणे दौऱ्याच्या वेळी, बंदोबस्तावर असणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या पुणे भाजपचे पदाधिकारी प्रमोद कोंढरे यांचा तीव्र निषेध आम्ही करीत असून, कोंढरे यांना आलेला सत्तेचा माज आम्ही निश्चित उतरवू, अशी घणाघाती टीका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे महानगरप्रमुख व माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज केली.याचवेळी घटना घडली तेव्हा याप्रसंगी कसब्याचे भाजपचे आमदार हेमंत रासने उपस्थित होते त्यांनी या बाबतीतचे मौन सोडावे असे आव्हानही धंगेकर यांनी केले.

महाराष्ट्रात युतीचे सरकार आहे त्याचे आम्हाला भान आहे. मात्र, पुण्यातील भाजपचा पदाधिकारी ड्युटीवर असणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग करीत असेल तर राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या या पुण्यात शिवसेना गप्प बसणार नाही. या संदर्भात पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुण्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्याचा माज आम्ही उतरवू असे सांगून रवींद्र धंगेकर म्हणाले की, यापूर्वी देखील याच भाजपा पदाधिकारी असणाऱ्या प्रमोद कोंढरे याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वैशाली नागवडे यांचाही विनयभंग केला होता आणि त्याचा गुन्हा ही नोंदवण्यात आला आहे. त्याचा पाठपुरावा शिवसेनेतर्फे आम्ही करू. हे प्रकरण दाबले जाणार नाही, याची ग्वाही आम्ही पुणेकरांना देतो. या स्त्रीलंपट प्रमोद कोंढरे सारख्या पदाधिकाऱ्याला, मित्रपक्ष भाजपने पक्षातून त्वरित काढून टाकावे अशी मागणी करून, याप्रसंगी कसब्याचे भाजपचे आमदार हेमंत रासने उपस्थित होते त्यांनी या बाबतीतचे मौन सोडवे असे आव्हान धंगेकर यांनी केले.

केवळ पुण्यातच नव्हे तर देशात महिला सुरक्षित राहिल्या पाहिजे, ही शिकवण हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी दिली असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील महिलांच्या सुरक्षेबाबत अतिशय कडक धोरण स्वीकारले आहे. त्यामुळेच, वेळप्रसंगी युतीचाही विचार न करता, महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याचा माज उतरवून, पुण्यातील समस्त महिला वर्गाला आम्ही आधार देवू, त्यासाठी वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करू. असे रवींद्र धंगेकर म्हणाले.