Home Blog Page 466

विद्यार्थ्यांचे १४ प्रकल्प नीती आयोगाकडे सादर

एआयसी-एमआयटी-एडीटीच्या स्टुडंट इनोव्हेटिव्ह प्रोग्रामचे यश 

पुणे: शालेय विद्यार्थ्यांमधील उद्यमशीलता आणि नवनिर्मितीला चालना देण्यासाठी एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठातील अटल इनक्युबेशन सेंटर (एआईसी) द्वारे अटल टिंकरिंग लॅब स्टुडंट इनोव्हेटिव्ह प्रोग्राम (एटीएल-एसआईपी) राबविला जात असून, चालू शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये महाराष्ट्र तथा छत्तीसगढमधील ९ शाळांचे १४ प्रकल्प मंजुरीसाठी नीती आयोगाकडे पाठविण्यात आले आहे. अंतिम मंजुरी नंतर सहभागी चमू  आंतरराष्ट्रीय उद्योगसमूह डसॉल्ट सिस्टम्स यांच्या साह्याने त्यांचे प्रकल्प विकसित करू शकणार आहेत.

एआईसी -एमआईटी एडीटी इनक्यूबेटर फोरमच्या माध्यमातून ९ शाळांमधील १५ संघांची निवड अटल टिंकरिंग लॅब स्टुडंट इनोव्हेटिव्ह प्रोग्राममध्ये करण्यात आली. या सर्व संघाचे अंतिम ऑनलाइन प्रकल्प सादरीकरण आणि परीक्षण ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले होते.  तत्पूर्वी, निवड झालेल्या शालेय चमूसाठी विशेष प्रशिक्षण वर्ग, ऑनलाईन तसेच ऑफलाईन मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना त्यांच्या बीज कल्पनांमधुन उद्यमशील स्टार्टअप तयार करण्याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ऑनलाइन सादरीकरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एआयसी-एमआयटीएडीटी इनक्यूबेटर फोरमचे व्यवस्थापक कार्यक्रम नीलेश पांडव होते; तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अभिषेक राठी आणि मनोज देशपांडे यांनी काम केले.  प्रख्यात महिला उद्योजिका आणि पुणे येथील फूड मँक कन्सल्टंट्सच्या संचालिका भाग्यश्री म्हात्रे, सायंटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे वरिष्ठ विपणन अभियंता विजय वाढणे, मास एंटरप्रायझेस, पुणेचे संचालक मंगेश चव्हाण आणि एमआईटी विद्यापीठाच्या आयटी विभागाचे अविनाश चौधरी  यांनी परिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे मूल्यमापन केले.    

यापूर्वी २०२२-२३ मध्ये एमआईटी एडीटी विद्यापीठाच्या बायोइंजिनियरिंग विभागाच्या मदतीने  शासकीय विद्यालय, बिलासपूर द्वारे तयार केलेल्या “फूट रिलॅक्सको” प्रकल्पाने राष्ट्रीय स्तरावर प्रथम पारितोषिक सह फ्रान्स भेटीची संधी मिळाली. त्याचप्रमाणे, गत वर्षी आर सी पटेल स्कूल, पुणेच्या टीमला टाटा फाउंडेशनच्या प्रख्यात डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअरद्वारे त्यांचा प्रकल्प विकसित करण्याची संधी मिळाली होती. 

विविध विषयांवर प्रकल्प

अपघात प्रतिबंधक यंत्रणा (स्मार्ट रोड), जलकुंभापासून सक्रिय चारकोल निर्मिती, आपत्ती निर्देशक, पथ विक्रेत्यांसाठी स्ट्रीट मार्ट, मानसिक चार्ट बोर्ड, एलपीजी गॅस लीक शील्ड, डायबेलाझल, स्वयंचलित कृषी उपकरणे इत्यादी विषयांवर प्रकल्प सादर केले. यासाठी एआईसी-एमआयटी एडीटीसह त्यांच्या विज्ञान शिक्षकांचे देखील मार्गदर्शन लाभले. 

फडणवीस सरकारकडून मुंबईच्या भूमिपुत्रांच्या हक्कांवर गदा:400 वर्षांचे चिंबई गावठाण झोपडपट्टी कसे? खासदार वर्षा गायकवाडांचा सवाल


मुंबई-राज्यातील भाजपा युती सरकार हे लाडक्या बिल्डर मित्रांसाठी काम करते हे नवे नाही पण उद्योगपती, बिल्डर धार्जिणे भाजपा युती सरकार आता भूमिपुत्रांच्या हक्कावर गदा आणत आहे. एका बिल्डर मित्राच्या फायद्यासाठी वांद्र्यातील 400 वर्षे जुन्या चिंबई गावठाणला झोपडपट्टी घोषित करण्यात आले आहे. मुंबईच्या भूमिपुत्रांना बेदखल करण्याचे हे षडयंत्र असून बिल्डर मित्रांच्या स्वार्थासाठी मुंबईच्या मूळ नागरिकांना झोपडपट्टीवासी ठरवता का? असा संतप्त सवाल करून मुंबईच्या गावठाण आणि कोळीवाड्यांची ओळख नष्ट करु देणार नाही, असा इशारा मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.यासंदर्भात बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भाजप सरकारने वांद्र्यातील रहिवाशांना 13 फेब्रुवारी पासून SRA अंतर्गत पुनर्विकास सर्वेक्षणासाठी नोटिसा पाठवल्या आहेत, हा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे. या घोटाळ्याविरुद्ध रहिवाशांनी एकत्र येऊन लढा उभारला आहे आणि काँग्रेस पक्ष या लढ्यात भूमिपुत्रांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. सरकारने SRA सर्वेक्षण त्वरित रद्द करावे, मुंबईतील कोणत्याही गावठाण किंवा कोळी वाड्यांमध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजना लागू करू नये. मुंबईतील सर्व गावठाण आणि कोळीवाड्यांचे मॅपिंग विकास आराखड्यात करावे. गावठाण आणि कोळीवाड्यांची ऐतिहासिक ओळख कायम ठेवत नियोजित पुनर्विकासासाठी तातडीने धोरण जाहीर करा, अशा मागण्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केल्या आहेत.भाजप सरकार आधीच मुंबईतील महत्वाचे व मोक्याचे भूखंड फुकटात अदानीच्या खिशात घालत आहे. आता या भ्रष्ट भाजप युती सरकारची नजर भूमिपुत्रांच्या जमिनीवर पडली असून त्यांना बेदखल करण्याचे काम केले जात आहे. काँग्रेस पक्षाने मुंबईकरांच्या हक्कासाठी नेहमीच पुढाकार घेतला असून मुंबईकरांच्या हक्कासाठी कोणताही लढा देण्यास काँग्रेस पक्ष तयार आहे. वांद्र्यातील भूमिपुत्रांच्या हक्कासाठी वेळ पडली तर रस्त्यावर उतरून लढा देऊ, असेही खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

‘सामाजिक सुरक्षेच्या योजना रेवडी संस्कृती नाही’ 

रवींद्रनाथ महातो यांचे मत; १४व्या भारतीय छात्र संसेदेचे दुसरे सत्र 
पुणे, ९ फेब्रु.: ‘स्वातंत्र्यानंतरही देशातील अनेक बांधव असे आहेत की, त्यांना चांगले जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या प्राथमिक सुख- सुविधा मिळत नाहीत. त्यांच्यासाठी सरकारी पातळीवर दिल्या जाणार्‍या सुख-सुविधांना रेवडी म्हणता येणार नाही’, अशी परखड भूमिका झारखंड विधानसभेचे अध्यक्ष रवींद्रनाथ महातो यांनी मांडली. ‘आपल्याकडे कॉर्पोरेटला पायघड्या घातल्या जातात आणि गरीब, मागास समाजाच्या सामाजिक सुरक्षा योजना राबवल्यास विरोध होतो. हे चित्र बदलण्याची गरज आहे,’ असेही महातो म्हणाले.  एमआयटी वर्ल्ड पीस युनिर्व्हसिटी, पुणे आणि एमआयटी स्कूल ऑफ गर्व्हमेंट पुणे यांच्या वतीने आयोजित चौदाव्या भारतीय छात्र दुसर्‍या सत्रात ‘रेवडी संस्कृती : आर्थिक भार किंवा आवश्यक समर्थन’ या विषयावर ते बोलत होते.
यावेळी मेघालयच्या विधानसभेचे अध्यक्ष थॉमस संगमा, काँग्रेसच्या मीडिया आणि पब्लिसिटी विभागाचे अध्यक्ष पवन खेरा, भारतीय छात्र संसदेचे संस्थापक व एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल कराड आणि कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस आणि विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.  महातो म्हणाले, ‘रेवडी शब्दाचा उल्लेख ज्यांच्यासाठी केला जातो. त्या लोकांच्या घरी ताटामध्ये कधीही प्रत्यक्षात रेवडी नसते. वास्तविक, ते लोक दोन वेळच्या जेवणासाठी आजीवन संघर्ष करत असतात. त्यांच्याकडे पिण्यायोग्य स्वच्छ पाणी, चांगल्या आरोग्य सुविधा नाहीत. रोजगाराची व्यवस्था नाही. मी झारखंड राज्याचे प्रतिनिधित्त्व करतो. तेथील परिस्थिती, विशेषत: तरुणांची परिस्थिती विदारक आहे. तुम्ही झारखंडमध्ये कुपोषण ही मोठी समस्या आहे.  सामाजिक सुरक्षेच्या योजना या रेवडी नसून, स्मार्ट आर्थिक निती आहे. देशाच्या संयुक्त संसाधन कोषातून किंवा राज्याच्या संचित कोषातून त्या दिल्या जातात. त्यावर नागरिकांचा पूर्ण अधिकार असतो. सामाजिक सुरक्षेबाबत नकारात्मक विचार करणारा एक वर्ग आहे. उद्योगपतींना पायघड्या घातल्या जातात. त्यावेळी ‘रेवडी’चा विषय कोणी काढत नाही. उद्योगातून रोजगार निर्माण होईल, असे सांगितले जाते. मात्र, किती रोजगार निर्माण झाले, हा प्रश्न कोणी विचारत नाही. देशात कॉर्पोरेटचा नफा वाढीचा दर २२ टक्के आहे. तर, त्यांच्याद्वारे दिल्या जाणार्‍या रोजगार वृद्धिचा दर १.५ टक्के आहे. दुसरीकडे गरीब व मध्यवर्गाला काही दिलासा दिला, तर विशिष्ट वर्ग नाराजी व्यक्त करतो.    पवन खेरा, ‘सरकारकडून देशभरात राबवल्या जाणार्‍या सामाजिक सुरक्षेच्या योजना रेवडी संस्कृती नाहीत. या योजनांची गरज का पडली, याचा विचार झाला पाहिजे. सरकारने विकासाच्या कामांसाठी आजवर अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित केल्या. त्यामध्ये अनेक लोक मागे राहिले. त्या लोकांच्या भल्यासाठी सरकारने काही योजना आणल्या. तर, त्याला विरोध व्हायला नको.’ यावेळी विविध विद्यार्थी प्रतिनिधींनी मते मांडली. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दीपेंद्र शर्मा यांनी प्रास्ताविक केले.

नॅनो युरीया व नॅनो डीएपी खरेदीत ८७ कोटींचा भ्रष्टाचार: नाना पटोले

मर्जीतील पुरवठादारासाठी निविदेतील अनेक अटी व शर्तींमध्ये बदल करून संगनमताने भ्रष्टाचार.

राज्यात दररोज शेतकरी आत्महत्या करत असताना महायुती सरकार मात्र शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्यात मस्त.

कृषी विभागातील भ्रष्टाचारांची सखोल चौकशी करण्याचे धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दाखवावे.

डॉ. मंगेश गोंदावले, सुजित पाटील, महेंद्र धांदे यांची चौकशी करण्यात यावी.

मुंबई, दि. ९ फेब्रुवारी २५
देशातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत असताना भाजपा युतीचे सरकार मात्र त्याकडे गांभिर्याने पहात नाही. शेतकऱ्यांना भरघोस निधी दिल्याच्या घोषणा करून फक्त जाहिरातबाजी करण्यात आली. सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या निधीवर मात्र कृषी विभागातील अधिकारी व मंत्री संगनमताने खिसे भरत राहिले. शेतकऱ्यांच्या नावावर कृषी विभागाने नॅनो युरीया व नॅनो डीएपी च्या १५८ कोटींचा खरेदीत ८७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असून कृषी विभागातील भ्रष्टाचारांची सखोल चौकशी करण्याचे धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावे असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.

कृषी विभागातील घोटाळ्याचा पर्दाफाश करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले एकामागोमाग एक घोटाळा उघड करत आहेत. नाना पटोले यांनी आज नॅनो युरीया व नॅनो DAP खरेदीमधील घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे.
महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने नागपूरच्या पालिवाल माहेश्वरी हाऊस ऑफ बिझनेस एँड रिसर्च मार्फत हा भ्रष्टाचार केला आहे. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने NANO UREA व NANO DAP उत्पादनासाठी कच्चा माल खरेदी करण्याकरिता आग्रीम स्वरूपात १५८.७९२ कोटी रुपयांचा निधी अदा करून घेतला. महामंडळ NANO UREA व NANO DAP हे इफ्को कडून विकत घेऊन पुरवठा करणार होते, यात कच्चा मालाच्या खरेदीचा प्रश्न येत नाही. ही खरेदी प्रक्रिया ही कृषी विभागाच्या इतर प्रक्रियेप्रमाणे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना निवडणूक आयोगाची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे ३०/०३/२०२४ रोजी निविदा प्रकाशित केली. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने निविदेत आलेल्या दरानुसार NANO UREA Plus रू. २२०/- प्रती ५०० मी.लि. बॉटल व NANO DAP रू. ५९०/- प्रती ५०० मी.लि. बॉटलप्रमाणे शासनास 39 लाख 25 हजार 866 बाटल्यांचा पुरवठा केला आहे. NANO UREA Online दर रू.९३/- व NANO DAP Online दर रू.२७३/- असतांना कृषी उद्योग विकास महामंडळाने निविदेत आलेल्या दरानुसार (रू.२२०/- प्रती ५०० मी.लि. बॉटल व NANO DAP रू. ५९०/- प्रती ५०० मी.लि. बॉटल) सरासरी २२२ रुपये प्रती बॉटल जास्त दराने खरेदी करुन ८७ कोटी १५ लाख ४२ हजार २५२ रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. इफ्को हे कृषी उद्योग विकास महामंडळाचे वितरक आहे, २०२३-२४ मध्ये इतर निविष्ठा इफ्कोकडून थेट खरेदी करून शासनास पुरवठा करीत होते. परंतु महामंडळाने २०२४-२५ साठी ३८ लाख बाटल्यांचा पुरवठा करण्यासाठी निविदा काढली हे आश्चर्यकारक व संश्यास्पद आहे. निविदेतील अटी व शर्तीप्रमाणे निविदा ५० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या उत्पादकांसाठीच होती पण अट शिथिल करुन फक्त १ कोटी रुपयांची उलाढाल असे करून उत्पादक/ विक्रेता/उत्पादकाचे अधिकृत प्रतिनिधि असा बदल करण्यात आला. महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ हे स्वतः इफ्कोचे वितरक असता वरिल अटी व शर्ती बदल करून खाजगी विक्रेत्यांमार्फत खरेदी कारण्याची प्रक्रिया संशयास्पद आहे. निविदेतील अटी व शर्ती प्रमाणे महामंडळास पुरवठा करण्यात येणाऱ्या दरापेक्षा खाजगी बाजारात कमी दरात कुठलीही सवलत किंवा कुठलीही सुट देऊन महामंडळाला पुरवठा करीत असलेल्या दरापेक्षा कमी दरात पुरवठा करता येणार नाही, खाजगी बाजारात कमी दर आढळल्यास त्याप्रमाणेच पुरवठादाराला पेमेंट करण्यात येईल याचाच अर्थ की महामंडाळाला पुरवठा करण्याचा दर हा सर्वात कमी असला पाहीजे. ही अट शुद्धीपत्रक काढुन हटवण्यात आली व बाजार भावापेक्षा अधिक / जास्त दराने पुरवठा करण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला. निविदेतील अटी व शर्तीप्रमाणे निविदा धारकाजवळ कृषि आयुक्तालय, पुणे यांचा विक्री परवाना असणे बंधनकारक होते, पालिवाल व इतरांच्याकडे कृषि आयुक्तालयाचा विक्री परवाना निविदा भरतेवेळी नव्हता, अशी माहीती आयुक्तालयाकडुन देण्यात आली तरीही त्यांना पात्र ठरवण्यात आले.

नॅनो डीएपी निविदेत पालिवाल या एकाच निविदा धारकाने भाग घेतला असता त्याला पात्र ठरवण्यात आले व त्यालाच पुरवठा आदेश देण्यात आला. याच निविदा धारकाचे NANO UREA Plus चे दर एल-२ आले असता त्यालाच एल- १ दराने पुरवठा आदेश देण्यात आला. या प्रक्रीयेत नॅनो युरियाचे एल वन दर, रे नॅनो सायन्स यांचे आले असता त्यांना न देता त्यांच्या एल-१ दराने पालिवाल यांना पुरवठा आदेश देण्यात आले असता रे नॅनो यांनी व इतर निविदाधारकाने कुठल्याच प्रकारे तक्रार केली नाही असे समजते. यावरून सर्व भाग घेतलेल्या निविदाधारकांनी संगनमत करून निविदा प्रक्रीयेत महामंडळातील अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने भ्रष्टाचार केल्याचे दिसत आहे असे पटोले यांना सांगितले.

या खरेदी प्रक्रीयेत महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक-गोंदावले, महाव्यवस्थापक-लेखा व वित्त सुजित पाटील व उप महाव्यवस्थापक खते – महेंद्र धांदे यांचा सहभाग असून यांची सखोल चौकशी करावी. राज्यात दररोज शेतकरी आत्महत्या करत असताना महायुती सरकार मात्र शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्यात मस्त आहेत, अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली आहे.

एसपीएफ स्पोर्ट्स मेनियात क्रीडापटूंना प्रोत्साहनजिंकण्याच्या पलीकडेही खेळ खूप काही शिकवतात; सुरेंद्र पठारे यांचे मत

पुणे: “विविध खेळ आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत किंवा आपण ते बनवून घेतले पाहिजे. खेळात केवळ जिंकणे आणि हारणे नसून, त्याहीपलीकडे खूप काही शिकवून जाणारे असतात. शारीरिक तसेच मानसिक स्थितीत सुधार आणण्यासाठी खेळ महत्त्वाची भूमिका बजावतात. विविध खेळ खेळण्याने आरोग्य निरोगी राहण्यास मोठी मदत होते. तंदुरुस्त राहण्यासाठी तर विविध खेळ खेळणे हा सर्वोत्तम पर्याय आहे”, असे मत सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र पठारे यांनी व्यक्त केले.

सुरेंद्र पठारे फाऊंडेशन आयोजित एसपीएफ स्पोर्ट्स मेनिया अंतर्गत स्विमिंग चॅम्पियनशिप, बॅडमिंटन चॅम्पियनशिप तसेच व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा शनिवारी व रविवारी (ता. १ व २ फेब्रु.) पार पडल्या. दरवर्षी स्पोर्ट्स मेनिया अंतर्गत या चॅम्पियनशिप आयोजित करण्यात येतात. महिला व पुरुष या दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली असून, ज्यात विविध वयोगटाचा समावेश होता. सदर स्पर्धांना खेळाडू स्पर्धकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

स्पर्धेविषयी बोलताना सहभागी स्पर्धक म्हणाले, “या स्पर्धेत सहभागी होणे हा चांगला अनुभव होता. स्पर्धेच्याप्रसंगी असलेले नियोजन तसेच पुरवल्या गेलेल्या सुविधाही उत्तम होत्या. अनेक गोष्टी या स्पर्धेतून शिकायला मिळाल्या आणि प्रतिस्पर्धी ताकदीचे असल्याने नक्कीच आमच्या कौशल्यांचाही चांगला कस लागला.”

एसपीएफ स्पोर्ट्स मेनिया अंतर्गत कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धा उर्वरित असून तसेच, पार पडलेल्या एकूणच स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी सुप्रसिद्ध अभिनेता व क्रीडाप्रेमी रणविजय सिंह, वरुण सुद यांची उपस्थिती लाभणार आहे.

आमदार बापूसाहेब पठारे यांची शाळांना सरप्राईज भेट

मतदारसंघातील शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण पुरवले जाईल; पठारे यांचे आश्वासन

पुणे: वडगावशेरी मतदारसंघाचे विद्यमान आमदार बापूसाहेब पठारे निवडून आल्यापासून सातत्याने ऑनफील्डवर दिसत आहेत. त्यांच्या पाहणी दौऱ्यांची व कामांची सध्या मतदारसंघात व पुणे शहरात चांगली चर्चा आहे. गुरुवारी (ता. ६) आमदार बापूसाहेब पठारे अचानक शाळा पाहणीसाठी गेले होते. पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. हेही यावेळी समवेत होते.

येरवडा येथील कै. अनुसयाबाई सावंत विद्यालय व कै. वि. द. घाटे विद्यामंदिर या शाळांना भेट देत पाहणी केली. भेटीदरम्यान, त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक व भौतिक सुविधांची माहिती घेतली. पठारे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत बराच वेळ घालवत अभ्यासही घेतला. तसेच, पाठ्यपुस्तकातील प्रश्नोत्तरं, वाचन, लिखाण अशा शैक्षणिक बाबींवर विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादाचे कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांना शाळेबाबत त्यांच्या अपेक्षा व आवश्यक गोष्टींविषयी विचारपूस केली. विद्यार्थ्यांनीसुद्धा पठारे यांच्यासोबत मनमोकळा संवाद साधला.

शालेय शिक्षण, शिकवण्याच्या पद्धती, शाळेतील मूलभूत सोयी-सुविधा यासारख्या विविध पैलूंवर या भेटीदरम्यान सविस्तर चर्चा करण्यात आली. पठारे यांनी शिक्षकांकडून शाळेतील वास्तव परिस्थिती जाणून घेतली. सोबतच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे सांगितले.

पठारे म्हणाले, “शाळेत शिकणारी मुले-मुली उद्याच्या भारताचे भविष्य आहेत, त्यांना घडवण्याचे कायम शिक्षक मंडळी करत आहेतच, सोबतच एक लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघातील शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यासाठी विविध माध्यमातून कार्यरत राहणे कर्तव्य आहे.”

पाहणी दौऱ्यादरम्यान, आशा राऊत (उपायुक्त, प्राथमिक शिक्षण विभाग), वंदना साळवे (क्षेत्रीय अधिकारी), चंद्रसेन नागटिळक (क्षेत्रीय अधिकार), शुभांगी चव्हाण (उपप्रशासकीय अधिकारी), जयेश शेंडकर (सहायक प्रशासकीय अधिकारी), अनिता वाघमारे (पर्यवेक्षिका), संजय पोळ (क्षेत्रीय अधिकारी), पराग राऊत (आरोग्य निरीक्षक), सुनील कलडोने (उप-आरोग्य निरीक्षक) उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ६१ किलो लाडू मोदक अर्पण व श्रीमंत दगडूशेठ गणपती महाआरती संपन्न

पुणे- आज महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर शिवसेनेच्या वतीने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात विशेष महाआरती आणि ६१ किलो लाडू मोदक अर्पण करण्याचा पवित्र सोहळा संपन्न झाला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त ६१ किलो लाडू मोदकाचा विशेष नैवेद्य श्री गणरायाला अर्पण करून त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि महाराष्ट्राच्या समृद्धीची प्रार्थना करण्यात आली शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या वतीने गणरायाला ६१ किलो मोदकाचा लाडू अर्पण करण्यात आला. शिवसेनेतर्फे आज संपूर्ण शहरात “कॉमन मॅन दिवस” साजरा करीत रक्तदान शिबिरे, मोफत आरोग्य तपासणी, अन्नदान, वृक्षारोपण आणि विशेष महाआरतीसह विविध उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले असून या विशेष सोहळ्याला पुणे शहरातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी,गणेश भक्त, महिला आघाडी, युवा सेना, नागरिक, पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते गणरायाच्या चरणी मुख्यमंत्री साहेबांसाठी विशेष संकल्पही यावेळी सोडण्यात आला.यावेळी शिवसेना शहरप्रमुख पुणे प्रमोद नाना भानगिरे, सुदर्शनाताई त्रिगुनाईत ,सुरेखा पाटील,श्रुती नाझिरकर,सुनील जाधव,सुधीर कुरुमकर,गौरव साईनकर,गणेश काची,नवनाथ निवंगुने,नितीन लगस,निलेश जगताप,आकाश रेणुसे,समीर नाईक,प्रशांत डाबी,सुहास कांबळे,कौस्तुभ कुलकर्णी,संदीप शिंदे, मंगल सोनटक्के,विशाल गब्दुले,माऊली साळुंखे,दीपक अहिरे, वैजंती फाटे,सविता माने व पुणे शहरातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आशा भोसलेंकडून एकनाथ शिंदेंना वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा:म्हणाल्या- शतायुषी व्हा, चांगले काम केल्याने कुणी कधी संपत नाही


मुंबई- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला तुमचा अभिमान आहे, तुम्ही सगळ्यांच्या बोलण्याला तोंड दिले आणि यशस्वी झाला. चांगले काम करत राहा. शतायुषी व्हा, चांगले काम केल्याने कुणी कधी संपत नाही, असे म्हणत आशा भोसले यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एकनाथ शिंदेंना मोलाचा सल्ला दिला आहे.

दरम्यान आशा भोसले पुढे बोलताना म्हणाल्या की, तुम्ही मला फार आवडता. तुम्ही अचानक वरती आलात, आम्हाला माहित नव्हते तुम्ही काम करत होतात. तुम्ही अचानक वर आलात आणि जशी बाळासाहेबांनी एकट्याने शिवसेना घडवली, तशी तुम्ही पुन्हा एकट्याने शिवसेना घडवली, त्यामुळे मला तुमचा अभिमान आहे.आशा भोसले म्हणाल्या की, ज्या हिंमतीने तुम्ही आलात, लोकांच्या बोलण्याला तु्म्ही तोंड दिले, सगळे तुमच्यावर धावून आले होते, त्यावेळी तुम्ही परिस्थितीला तोंड दिले आणि यशस्वी झालात आणि आणखी यशस्वी व्हाल, असा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. शतायुषी व्हा आणि असेच कार्य करत राहा. चांगले कार्य केल्याने कुणीही कधीही संपत नाही.

‘आयएमडीआर’मध्ये सुवर्ण महोत्सवी दीक्षांत समारंभ

पुणे, ता. 9 फेब्रुवारी : ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या (डीईएस) ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट ॲण्ड रीसर्च’मध्ये (आयएमडीआर) ‘सोनीलिव्ह’चे कार्यकारी उपाध्यक्ष दानिश खान यांच्या प्रमुख उपस्थितीत सुवर्ण महोत्सवी दीक्षांत समारंभ संपन्न झाला.

‘डीईएस’च्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष प्रमोद रावत, ‘आयएमडीआर’च्या व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष जगदीश कदम, संचालिका डॉ. शिखा जैन, डॉ. पी. सी. नम्बियार, डॉ. अनिल केसकर, डॉ. सुषमा केसकर यांची उपस्थिती होती.

तंत्रज्ञानातील क्रांतिमुळे पूर्वीपेक्षा अधिक वेगाने बदल होत आहेत. त्याला विरोध न करता ते लवकरात लवकर स्वीकारण्यासाठी आजीवन शिकण्याची तयारी ठेवा. नैतिक मूल्यांचे पालन करा. असा सल्ला खान यांनी दिला.

रावत म्हणाले, “शिक्षण माणसाला एका पातळीवर नेऊन ठेवते. पुढचा प्रवास सर्वोत्कृष्ट व्हावा यासाठी शरीर, मन, आचार, विचार, व्यवहारावर नियंत्रण मिळवा. लोकांचा विश्वास संपादन करा. म्हणजे जीवनातील संघर्ष टाळता येईल.”

प्रिया अग्रवाल या विद्यार्थिनीने सुवर्ण पदकासह डॉ. प्र. चिं. शेजवलकर पुरस्कार मिळविला. डॉ. शेजवलकर यांची कन्या डॉ. सुषमा केसकर आणि जावई डॉ. अनिल केसकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

विचारवेध संमेलनात जात गणना,वर्चस्ववादावर विचारमंथन

८० कोटी नागरिकांना मोफत धान्य द्यावे लागतात, ही प्रगती आहे का?

उच्चवर्गीय वर्गाकडे किती संपत्ती एकवटली आहे,हे कळू शकतात.जातवार जनगणनेला पर्याय असू शकत नाही.

आजवर झालेला अत्याचार उजेडात येवू नये, म्हणून जात गणना नाकारण्यात येत आहे

दुसऱ्या दिवशीच्या विचारसत्रांना चांगला प्रतिसाद

पुणेः

विचारवेध असोसिएशन आयोजित ‘ जातिअंतावर करू काही ‘ विषयावरील विचारवेध संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी जात , जात गणना आणि वर्चस्ववादावर विचारमंथन झाले.सर्व विचारसत्रांना चांगला प्रतिसाद मिळाला.संमेलनाचे हे सहावे वर्ष होते. राष्ट्र सेवा दल, पर्वती पायथा येथे ९ फेब्रुवारी २०२५ रोजी संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात हरीश सदानी यांनी मार्गदर्शन केले.

दुसऱ्या सत्रात सचिन माळी , डॉ.दिलीप चव्हाण यांनी ‘जातीय जनगणना’ विषयावर मार्गदर्शन केले.

९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता सचिन माळी ,दिलीप चव्हाण यांनी ‘जातीय जनगणना’ विषयावर मार्गदर्शन केले.

दुपारच्या सत्रात ‘दलित किचन ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकाच्या संदर्भात लेखक शाहू पाटोळे यांची अनुवादक भूषण कोरगावकर यांनी मुलाखत घेतली.

नीरज हातेकर यांनी ‘आरक्षण संकल्पना आणि उद्देश ‘ तर ‘आरक्षण आणि आरक्षणाचे भवितव्य’ या विषयावर राहुल सोनपिंगळे यांनी विचार मांडले. ‘जातीय उतरंडीमुळे जातीय अत्याचार’ या विषयावर वैभव गीते यांनी संवाद साधला.’जाती जपण्यासाठी स्त्रियांवर अत्याचार-सांस्कृतिक संदर्भ ‘ विषयावर आनंद करंदीकर यांनी संवाद साधला. ‘जातीय अत्याचार पुरुष प्रधानतेमुळे’ या विषयावर अंजुम कादरी यांनी विचार मांडले.शीतल साठे,सचिन माळी यांनी नवयान महाजलसा’ सादर करुन संमेलनाला वेगळ्या उंचीवर नेले.

पहिल्या सत्रात बोलताना हरीश सदानी म्हणाले, ‘शोषक आहे,तो शोषित हवा अशी आपली भूमिका नसून मूलभूत बदल हवा आहे. ज्यांच्याकडे सत्ता आहे, विशेषाधिकार आहेत, त्यांनाही परिवर्तना च्या प्रक्रियेत सामावून घेतले पाहिजे. विशिष्ठ जात नव्हे तर वर्चस्ववाद हा आपला शत्रू आहे.हे समजून घेतले नाही तर समानतेची लढाई अपुरी राहिल.

सचिन माळी म्हणाले,’ जातीला भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक आधार असलेली व्यवस्था मोडायची असेल तर आपापल्या जातीत बोलून संवाद केला पाहिजे. जातीय जन गणनेचा मुद्दा हा जातीय वाद नसून राष्ट्र निर्मितीचा मुद्दा आहे. आजवर झालेला अत्याचार उजेडात येवू नये, म्हणून जात गणना नाकारण्यात येत आहे. मनुष्यत्व नाकारणारा हा मोठा गुन्हा,भ्रष्टाचार आहे. आपण आपले स्वायत्त राजकारण उभे करत नाही, तोपर्यंत न्याय मिळणार नाही.

डॉ दिलीप चव्हाण म्हणाले,’ सामाजिक न्याय नाकारल्याने आणखी पन्नास वर्षांनी देखील भारत गरीब, निरक्षर बेरोजगार व्यक्तीचा देश असणार आहे. सत्ताधाऱ्यांना या गरिबीची भीती नसली तरी जागतिक संस्था आणि भांडवल शाहीला आहे.८० कोटी नागरिकांना मोफत धान्य द्यावे लागतात, ही प्रगती आहे का?परभणी,बीड मधील अलीकडच्या हत्या एकाच महिन्यात होऊनही परभणीच्या हत्येची चर्चा होऊ दिली जात नाही,हे लक्षात घेतले पाहिजे. उपवर्गीकरण हा डाव असून त्यात फसता कामा नये. या जात जनगणनेत श्रीमंत उच्चवर्गीय वर्गाकडे किती संपत्ती एकवटली आहे,हे कळू शकतात.जातवार जनगणनेला पर्याय असू शकत नाही.

सुरेंद्र जोंधळे म्हणाले,’ भारतात व्यक्तीची ओळख जात म्हणून होणार की नागरिक म्हणून होणार, हा प्रश्न जातवार गणनेने उपस्थित केला आहे, आणि तो महत्वाचा आहे.जाती अंताच्या प्रदीर्घ लढ्यासाठी ते आवश्यक आहे.

खाद्यसंस्कृती धर्माशी जोडणे चुकीचे: शाहू पाटोळे

‘दलित किचन ऑफ महाराष्ट्र’ पुस्तकावर विचारवेध संमेलनात चर्चा

पुणे:

विचारवेध असोसिएशन आयोजित सहाव्या विचारवेध संमेलनात रविवारी, दुपारच्या सत्रात ‘दलित किचन ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकाच्या संदर्भात लेखक शाहू पाटोळे यांची अनुवादक भूषण कोरगावकर यांनी मुलाखत घेतली. राष्ट्रसेवा दल सभागृहात झालेल्या या मुलाखतीतून खाद्य संस्कृती, भाषा, आहारावरुन घातले जाणारे वाद यावर उहापोह झाला.

शाहू पाटोळे म्हणाले,पूर्वापारपासून सर्वजण ‘ अन्न हे पूर्ण ब्रह्म’ ऐकत आल्यामुळे ‘ अन्न हे अपूर्ण ब्रह्म’ हा शब्दप्रयोगच लक्षात घेतला जात नाही.हे पुस्तक वाचणाऱ्या परदेशातील वाचकांना हिंदू हे बीफ खातात, बफ खातात यावर विश्वास बसत नाही. यात लपविण्यासारखे काय आहे ? अमूक अन्न खाल्याने तमुक धर्माचा अपमान होतो,हे खोटे आहे.सगळे हिंदू शाकाहारी नाहीत. मांसाहार चांगला आहे,याचा प्रचार करावा लागत नाही.शाकाहार चांगला आहे,हे सांगावे लागते,हे लक्षात घेतले पाहिजे. खाद्यसंस्कृती असते,तशी भाषा संस्कृतीदेखील असते.प्रमाण मराठी भाषेपेक्षा आमची मराठी अधिक समृद्ध आहे,हेही मी सांगू शकतो. विदेशी वाचकसुद्धा मला कळवतात, की माझ्या पुस्तकातील हे अन्न त्यांचे पूर्वज खात होते.

आहारावरून केल्या जाणाऱ्या वादाबद्दल बोलताना पाटोळे म्हणाले,’गोवंश हत्येवर बंदी आहे.पुढे यमाचे वाहन म्हणून रेड्याच्या हत्येवर बंदीची मागणी झाली, मत्स्यावतार, वराह अवतार म्हणून त्या त्या गोष्टींवर बंदी आली, तरी आश्चर्य वाटणार नाही,असा हा काळ आहे’.

ते पुढे म्हणाले,’आहारात बदल होत राहणार,ती अपरिहार्य प्रक्रिया आहे.पण, सक्तीने हे बदल होऊ नयेत.संस्कृती सुटी-सुटी नसते. खाद्य हे आपल्याकडे धर्माशी जोडले गेले आहे. प्रत्यक्षात खाद्यवैविद्य अनेक इतर घटकांशी जोडलेले आहे. जात, वर्ण व्यवस्था जितक्या जास्त, तितक्या खाद्य संस्कृती अधिक,हे लक्षात घेतले पाहिजे. भाषेत जातीय, वर्णीय भेद आहेत,तसे खाद्यातही भेद आहेत. हे भेद उतरंडीनुसार वरून खाली आले आहेत. कोणी काय खावे,हे सरकारने ठरवू नये. मांसाहारासारखे विशिष्ट आहार वाईट आहे, अशी अंधश्रद्धा पसरवली जात आहे. महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी आहे, बफ वर बंदी नाही. म्हशीच्या, डुकराच्या मांसावर बंदी नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.तरीही संभ्रम निर्माण केला जात आहे.

कमी पाणी,स्प्रिंकलर, कीटकनाशक आल्याने रानभाज्याही जवळपास संपुष्टात आल्या आहेत,असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.

भूषण कोरगावकर म्हणाले,’भाषा ही एका वर्गाच्या हातात गेल्याने अनेक गोष्टी लपून राहिल्या.दलित, आदिवासी, ख्रिश्चन, भटके असे सगळ्यांचे शब्द, पाककृती साहित्यात आले पाहिजे.’अन्न हे अपूर्ण ब्रह्म ‘चे इंग्रजी भाषांतर करताना काम सोपे नव्हते.’अन्न हे अपूर्ण ब्रह्म ‘पुस्तकामध्ये ब्लॅक ह्युमर आहे. टीका, द्वेष नाही.

गीताली वि.मं., अनिकेत साळवे, मुकुंद किर्दत,शारदा वाडेकर आदी उपस्थित होते.

‘मोबाईलद्वारे नवी वैचारिक, मानसिक गुलामी आणण्याचे षडयंत्र ‘:डॉ.हुबनाथ पांडे यांचा आरोप

पुणे :

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने आयोजित ‘गांधी दर्शन’ शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.रविवार,दि.९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत आयोजन करण्यात आले होते.कोथरूड येथील गांधी भवनच्या सभागृहात हे शिबीर झाले.ज्येष्ठ पत्रकार विवेक देशपांडे (हिंदुत्वाची वाटचाल आणि पुरोगामित्वापुढील आव्हाने),ज्येष्ठ लेखक डॉ.हुबनाथ पांडे(आज के दौर में गांधी की अहिंसा),ज्येष्ठ पत्रकार कामिल पारखे (मराठी ख्रिश्चन समाज),डॉ.कुमार सप्तर्षी या मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

‘ गांधी दर्शन’ विषयावरचे हे १८ वे शिबीर होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एड.स्वप्नील तोंडे यांनी केले.तेजस भालेराव यांनी संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन केले.डॉ हुबनाथ पांडे यांचे स्वागत तेजस भालेराव यांनी केले तर श्रीकांत मिश्रा यांनी त्यांचा परिचय करून दिला.गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन ,सचिन पांडुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. हुबनाथ पांडे म्हणाले,’गेल्या दहा वर्षांत जेवढे खोटं बोलले गेले ,तेवढे गेल्या पाच हजार वर्षांत बोलले गेले नव्हते. कुंभमेळ्याची नोंद रामायण महाभारतात मिळत नाही.तो साधारण हर्षवर्धनच्या सातव्या शतकात सुरू झाला. पण, कुंभमेळ्याची सुरूवात पुराणकाळापासून झाल्याची खोटी बतावणीही केली जात आहे.अशा प्रकारच्या अनेक खोट्या गोष्टी जाणून बुजून पसरविल्या जात आहेत, आणि समाजात गोंधळ माजवला जात आहे.यासाठी मोबाईलचा सोशल मीडियाचा साधन म्हणून वापर केला जात आहे. त्यामुळे मोबाईलद्वारे नवीन वैचारिक मानसिक गुलामी आणण्याचे षडयंत्र रचले जात आहे. त्यासाठी मोबाईल फोन स्वस्त करण्यात येत आहेत.’

ज्येष्ठ पत्रकार विवेक देशपांडे म्हणाले,’संघ केवळ मुस्लिमविरोधी नसून त्यांचा खरा शत्रू हे धर्मनिरपेक्ष हिंदू आहेत. म्हणूनच त्यांनी दाभोळकर,लंकेश आदींच्या हत्या झाल्या.संघवाल्यांना मुस्लिमांना इजा पोचवायची नाही, त्यांना सतत भितीच्या छायेत ठेवायचे आहे.२०१४ नंतर हिंदुत्वचा विखार उघडपणे, अधिक वाढला आहे,जो संधी मिळाल्याने जाहिरपणे बाहेर आला आहे.संघाची प्रेरणा ही हिंदुराष्ट्र स्थापन करणे हे असून, मुस्लिमांना दुय्यम स्थान देणे हे धोरण आहे, या बाबतीत हिटलर हा त्यांचा आदर्श आहे’.

ते म्हणाले,’राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विविध प्रकारची आर्मी तयार केली असून देशातील संघविरोधी लोकांना आणि विचारांना हर प्रकारे दडपून टाकण्यासाठी हे आर्मीदल कार्यरत आहेत.या आर्मी दलाची जबाबदारी बजरंग दलसारख्या संघटनांवर दिली आहे, त्यामुळे बिल हे थेट मोदींवर फाडले जात नाही, पण मोदी यांची या सर्व हिंसाचाराला पूर्ण मूक सहमती आहे’.

डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले ,’सर्व समाजातील जातीयवाद संपला तर संघाच्या विषारी व्यवस्थेचा आणि धोरणांचा निःपात करता येईल, आणि संघप्रेमी ब्राह्मणांना खऱ्या अर्थाने शहाणे आणि धर्मनिरपेक्ष करावे लागेल, हेच विचारवंत आणि समाजसेवकांपुढील पुढील आव्हान आहे .’

बाराशे धावपटूंनी दिला‘रन फॉर किडनी’चा संदेश

‘सेवा भवन दौड़’
आशुतोष पात्राने जिंकली

पुणे
‘सेवा भवन’ या पुण्यातील रुग्णसेवा प्रकल्पातर्फे रविवारी आयोजित ‘सेवा भवन दौड़’मध्ये उत्साहाने सहभागी होत बाराशे धावपटूंनी ‘रन फॉर किडनी हेल्थ’ हा संदेश दिला.‘सेवा भवन दौड़’च्या दहा किलोमीटर गटात आशुतोष पात्रा विजेता ठरला. युवकांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.

‘सेवा भवन दौड़’मधील दहा किलोमीटर गटाच्या शर्यतीचा प्रारंभ रविवारी सकाळी सव्वासहा वाजता महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतून करण्यात आला.

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील,खासदार प्रा डॉ मेधा कुलकर्णी, लेखक, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, ‘गिरिप्रेमी’चे उमेश झिरपे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर,पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह डॉ प्रवीण दबडघाव, पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, ‘सेवा भारती’चे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघटनमंत्री श्रीपाद दाबक, ‘आयर्न मॅन’ निखिलेश पंत यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सेवा भवन दौड़’ हा उपक्रम झाला.

ही शर्यत आशुतोष पात्रा याने जिंकली.त्याने ही शर्यत ४० मिनिटे ४९ सेकंद या वेळेत पूर्ण केली. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतून सकाळी पावणेसात वाजता पाच किलोमीटरच्या शर्यतीचा प्रारंभ करण्यात आला. या शिवाय ‘चॅरिटी रन’ हा उपक्रमही आयोजित करण्यात आला होता.

‘सेवा भवन दौड़’ या उपक्रमापासून ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’च्या आरोग्यविषयक जनजागृती मोहिमेचाही प्रारंभ करण्यात आल्याचे समितीचे कार्यवाह प्रमोद गोऱ्हे यांनी सांगितले. ‘सेवा भवन’ प्रकल्प समितीच्या अध्यक्षा डॉ स्वाती बेलसरे, कार्यवाह पलाश देवळणकर, सहकार्यवाह उमा जोशी,मुख्य कार्यकारी अधिकारी संदेश उभे यांनी संयोजन आणि सारंग भिडे यांनी सूत्रसंचालन केले.

चौकट – १
‘सेवा भवन दौड़’मधील विजेते
दहा किलोमीटर (पुरुष गट) – आशुतोष पात्रा – प्रथम, पंकज कश्यप – द्वितीय, अन्वय नेहरकर – तृतीय
दहा किलोमीटर (महिला गट) – अमृता मांडवे – प्रथम,अमृता सोनसळे -द्वितीय, उज्ज्वला मरगळे – तृतीय

दहा किलोमीटर (साठ वर्षांवरील गट) – जयंत पाठक – प्रथम, राजेंद्र गुजराथी – द्वितीय, प्रशांत वडके – तृतीय

चौकट – २
क्षणचित्रे
मार्गावर धावपटूंचे उत्साही स्वागत
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा स्वयंसेवक म्हणून सहभाग
‘एएफएमसी’, पुणे मेट्रो मधील शंभर जणांचा सहभाग

आयटी कंपन्यांमधील अभियंत्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्तीसगडमध्ये 31नक्षली ठार, 2 जवान शहीद, 2 जखमी

छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर रविवारी झालेल्या चकमकीत १००० हून अधिक सैनिकांनी ३१ नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. या चकमकीत २ डीआरजी आणि एसटीएफ जवान शहीद झाले आणि २ जखमी झाले. जवानांनी १२ नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवली जात आहे.

बस्तर रेंजचे आयजी सुंदरराज पी म्हणाले की, घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. विजापूरच्या इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात शोध सुरू आहे. दरम्यान, बिजापूरचे एसपी जितेंद्र यादव म्हणाले की, मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढत आहे. हे एक मोठे ऑपरेशन आहे. बॅकअप पार्टी पाठवली आहे.या वर्षी आतापर्यंत छत्तीसगडमध्ये ८१ नक्षलवादी मारले गेले आहेत, त्यापैकी ६५ बस्तर विभागात मारले गेले. त्यात विजापूरसह ७ जिल्हे समाविष्ट आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, २०२४ मध्ये सैनिकांनी वेगवेगळ्या चकमकीत २१९ नक्षलवाद्यांना ठार मारले होते.

बस्तरचे आयजी सुंदरराज पी म्हणाले की, माओवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली होती, त्यानंतर घटनास्थळी सैन्य पाठवण्यात आले. बिजापूर डीआरजी, एसटीएफ आणि बस्तर फायटर्सच्या सैनिकांनी नक्षलवाद्यांना घेरले.दरम्यान, डीआयजी कमलोचन कश्यप म्हणाले की, जवानांशी अद्याप संपर्क झालेला नाही. हे एक मोठे ऑपरेशन आहे. आम्हाला नेमका आकडा सांगता येत नाही, पण नक्षलवाद्यांना मोठे नुकसान झाले आहे हे निश्चित आहे. नक्षलवाद्यांच्या मृत्युची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

देशातील पहिला डिजिटल हत्ती ;रॅम्बो सर्कसमध्ये दाखल  !!

बच्चे कंपनीचे विशेष आकर्षण !!

पुणे- आपल्या देशात सर्कसमध्ये प्राण्यांचा खेळ करण्यास तसेच प्राणी पाळण्यास बंदी आहे. बच्चे कंपनीला आवडणारे प्राणी आता आपल्या देशात कोणत्याच सर्कसमध्ये नाहीत. रॅम्बो सर्कस मधील वाघ, सिंह ,हत्ती, अस्वल, हिप्पोपोटोमस ,चिंपांझी, उंट, घोडे , असे सारे प्राणी सरकारकडे जमा झाले. त्यावेळेस रॅम्बो सर्कसचे मालक सुजित दिलीप यांनी केरळमधील कोईमतूर येथून ६ महिने खपून हुबेहूब डिजीटल हत्ती तयार केला. सुमारे ७-८ फूट उंचीचा हा ‘’डीजीटल हत्ती’’ चाकांवर  ठेवला आहे . हत्तीच्या पाठीवर बसलेला सर्कस कलावंत तांत्रिकदृष्ट्या ऑपरेटिंग करतो व त्यानुसार हा डिजीटल हत्ती डावीकडे उजवीकडे मान वळून बघतो , व सोंड उंच करून पाण्यचा फवारा मारतो. तसेच हा डीजीटल हत्ती चीत्त्कारतो देखील ! या सोबतच कापडी चिंपांझी ,जिराफ  आणि झेब्रादेखील सर्कसमध्ये आहेत.

   येत्या काही महिनात मोठा कापडी चिंपांझी दुबईहून आणि उड्या मारणारा मोठा कापडी कांगारू ऑस्ट्रेलियामधून रॅम्बो सर्कसमध्ये देखील होईल. देशातील पहिले डीजीटल हत्ती सर्कसमध्ये पहिल्यांदा आणण्याचा मान रॅम्बो सर्कसला मिळाला याचा आनंद होतो.पुणेकरांनी देखील या डीजीटल हत्तीला मोठा प्रतिसाद दिला . असे सुजित दिलीप म्हणाले ,या प्रसंगी अक्षरकला मीडियाच्या तन्मयी मेहेंदळे यांनी “जिना यहा मरना यहा“हे गाणे गाऊन ‘रॅम्बो सर्कस’चा शुभारंभ केला.