मतदारसंघातील शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण पुरवले जाईल; पठारे यांचे आश्वासन
पुणे: वडगावशेरी मतदारसंघाचे विद्यमान आमदार बापूसाहेब पठारे निवडून आल्यापासून सातत्याने ऑनफील्डवर दिसत आहेत. त्यांच्या पाहणी दौऱ्यांची व कामांची सध्या मतदारसंघात व पुणे शहरात चांगली चर्चा आहे. गुरुवारी (ता. ६) आमदार बापूसाहेब पठारे अचानक शाळा पाहणीसाठी गेले होते. पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. हेही यावेळी समवेत होते.

येरवडा येथील कै. अनुसयाबाई सावंत विद्यालय व कै. वि. द. घाटे विद्यामंदिर या शाळांना भेट देत पाहणी केली. भेटीदरम्यान, त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक व भौतिक सुविधांची माहिती घेतली. पठारे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत बराच वेळ घालवत अभ्यासही घेतला. तसेच, पाठ्यपुस्तकातील प्रश्नोत्तरं, वाचन, लिखाण अशा शैक्षणिक बाबींवर विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादाचे कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांना शाळेबाबत त्यांच्या अपेक्षा व आवश्यक गोष्टींविषयी विचारपूस केली. विद्यार्थ्यांनीसुद्धा पठारे यांच्यासोबत मनमोकळा संवाद साधला.
शालेय शिक्षण, शिकवण्याच्या पद्धती, शाळेतील मूलभूत सोयी-सुविधा यासारख्या विविध पैलूंवर या भेटीदरम्यान सविस्तर चर्चा करण्यात आली. पठारे यांनी शिक्षकांकडून शाळेतील वास्तव परिस्थिती जाणून घेतली. सोबतच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे सांगितले.

पठारे म्हणाले, “शाळेत शिकणारी मुले-मुली उद्याच्या भारताचे भविष्य आहेत, त्यांना घडवण्याचे कायम शिक्षक मंडळी करत आहेतच, सोबतच एक लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघातील शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यासाठी विविध माध्यमातून कार्यरत राहणे कर्तव्य आहे.”
पाहणी दौऱ्यादरम्यान, आशा राऊत (उपायुक्त, प्राथमिक शिक्षण विभाग), वंदना साळवे (क्षेत्रीय अधिकारी), चंद्रसेन नागटिळक (क्षेत्रीय अधिकार), शुभांगी चव्हाण (उपप्रशासकीय अधिकारी), जयेश शेंडकर (सहायक प्रशासकीय अधिकारी), अनिता वाघमारे (पर्यवेक्षिका), संजय पोळ (क्षेत्रीय अधिकारी), पराग राऊत (आरोग्य निरीक्षक), सुनील कलडोने (उप-आरोग्य निरीक्षक) उपस्थित होते.