Home Blog Page 464

कोथरुड मध्ये वाहतूक नियंत्रणासाठी ५० वॅार्डनची नियुक्ती करा! मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश

वाहतूक कोंडीच्या समस्यांबाबत अधिकारी आणि नागरिक यांच्यासोबत बैठक

पुणे-आगामी काळ हा सण-समारंभाचा काळ आहे. त्यामुळे या काळात नागरिक खरंदीसाठी बाहेर पडण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे संभाव्य वाहतूककोंडी टाळण्यासाठी कोथरुड मध्ये ५० वॅार्डनची नियुक्ती करा, असे निर्देश ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिले. तसेच, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नागरिकांनीही सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कोथरुड मधील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संजय कदम, पुणे महानगरपालिका शहर मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त संदीप खलाटे, क्षेत्रीय उपायुक्त यांच्या सह भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक तथा कोथरुड मधील विविध सोसायटींचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला मतदारसंघातील माजी नगरसेवक आणि विविध सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी वाहतूककोंडीच्या समस्या मांडल्या. यात प्रामुख्याने आंबेडकर चौक परिसर, एरंडवणे गुळवणी पथ, एमआयटी कॅालेज परिसर, पौड रोड, कर्वेरोड, कोथरुड डेपो आदी भागातील वाहतूक कोंडीच्या समस्या मांडल्या. त्यावर ना. पाटील यांनी सर्व समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.

आंबेडकर चौक भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी तसेच, भविष्याचा विचार करून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. तसेच, एमआयटी कॅालेजजवळ बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. त्यासोबतच भरधाव वाहनांसाठी गतिरोधक उभारण्याच्या सूचना दिल्या. तसेच, वाहतूक कोंडीला कारण ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या. त्यासोबतच , आगामी काळ हा सण-समारंभाचा काळ आहे. त्यामुळे या काळात नागरिक खरंदीसाठी बाहेर पडण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे संभाव्य वाहतूककोंडी टाळण्यासाठी कोथरुड मध्ये ५० वॅार्डनची नियुक्ती कराव्यात असे निर्देशही या बैठकीत दिले.

यावेळी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी कोथरुड मतदारसंघातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी ना. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या उपाययोजनांचे कौतुक करून आभार मानले. तसेच, वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या तथा नो पार्किंग मध्ये गाडी लावून वाहतूकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाईसाठी वाहतूक विभागाने PTP traffic हे ॲप कार्यन्वित केले असून; या ॲपवर आजपर्यंत ४५०० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ३२०० जणांवर कारवाई झाली असल्याची माहिती देत, नागरिकांनी याचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले. त्यासोबतच एफसी रोड येथे AI कॅमेरा कार्यान्वित करुन वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असून, उर्वरित पुणे शहरातही कार्यान्वित करण्याचा मानस असल्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, आजच्या बैठकीत प्राप्त तक्रारी तथा वाहतूक कोंडीच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा दर दहा दिवसांनी आढावा घेणार असल्याचे ही त्यांनी यावेळी बैठकीत नमूद केले.

प्रशासकीय सेवेत पॅशन अत्यंत महत्वाचेमाजी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर 

एमआयटी डब्ल्यूपीयूत यूपीएससीच्या यशस्वितांचा १५वां राष्ट्रीय पातळीवर सत्कार संपन्न

पुणे, १२ जुलैः” प्रशासकीय सेवेत कार्य करतांना सहानुभूती, करूणा आणि पॅशन या तीन गोष्टी अत्यंत महत्वाचे आहे. पॅशन नसेल तर यशस्वी होता येत नाही. अशावेळेस पॅशनला कठोर परिश्रमाची जोड दयावी. सतत शिकण्याची सवय आणि उत्तम कार्य करण्यावर अधिक भर दयावा. आपला व्यवहारच आपल्या प्रगतीचे द्वार उघडतो.” असे विचार मुंबई येथील माजी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग) आणि डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) स्पर्धा परीक्षा-२०२४ मधील यशस्वितांच्या १५ व्या राष्ट्रीय सत्कार सोहळ्याच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी लोकसभेच्या पहिल्या महिला माजी महासचिव स्नेहलता श्रीवास्तव व सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमीचे माजी संचालक ए.एस.राजन हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, सीएओ डॉ. प्रसाद खांडेकर, स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड कॉमर्सच्या डीन डॉ. अंजली साने, देशातून प्रथम आलेली शक्ती दुबे, तिसरा आलेला अर्चित डोंगरे व गोपाळ वामणे उपस्थित होते.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या आशीर्वादाने आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यात देशातून प्रथम आलेली शक्ती दुबे आणि तिसरा आलेला अर्चित डोंगरे यांना अनुक्रमे १ लाख रुपये रोख व ३० हजार रुपये रोख तसेच शाल, ज्ञानेश्वरांची प्रतिमा व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर १४० यशस्वितांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
विवेक फणसाळकर म्हणाले,”नागरी सेवांमध्ये प्रवेश करण्याचा आपल्या हेतूचा कधीही विसर पडू देऊ नका. या सेेवेमध्ये प्रचंड आव्हाने असल्याने येथे राहूनच त्याचा सामना करावा. समाजाच्या व देशाच्या प्रगतीसाठी योग्य ध्येय धोरणे बनवून त्यावर अंमलबजावणी करावी. सार्वजनिक सेवा ही एक विशेष सेवा असून ती समाज व देशाच्या विकासासाठी असावी. प्रशासकीय सेवेत कार्य करतांना कठोर परिश्रमावर विश्वास ठेवा. आपण जसा व्यवहार करू तशीच परतफेड समाजाकडून मिळेल. मानवतेला प्राथमिकता देऊन त्यांच्या कल्याणासाठी कार्य करावे.”
स्नेहलता श्रीवास्तव म्हणाल्या,” प्रशासकीय सेवा हा अत्यंत महत्वाचा टास्क आहे. कठोर परिश्रम याबरोबरच सतत शिकण्याची प्रवृत्ती ठेवावी. या सेवेमध्ये स्वतःवर प्रचंड नियंत्रण ठेऊन नम्रतेचा गुण अंगिकारावा. प्रगती करण्यासाठी नवनवीन शिकण्याच्या वृत्तीबरोबरच स्वतःजवळ एक डायरी ठेऊन दिवसभराचा चार्ट लिहावा. सर्वांशी सर्वोत्तम व्यवहार कसा करता येईल या वर लक्ष केंद्रीत करावे.”
ए.एस.राजन म्हणाले,” सेवा कर्तव्य परमोधर्म ही ब्रीद वाक्य लक्षात ठेऊन याला सर्वाधिक महत्व द्यावे. आपली एक चूक ही संपूर्ण समाजाला भोगावी लागेल. त्यामुळेच अचूक निर्णय घेऊन त्याचा त्रास कोणालाही होणार नाही हे पाहावे. जीवनामध्ये शिस्त अत्यंत महत्वाची असून त्यातूनच लोकशाहीला सशक्त करण्यासाठी प्रयत्न करावे. राष्ट्रीय सुरक्षा हाच मुख्य अजेंडा ठेऊन प्रशासकीय सेवेत कार्य करावे.”
शक्ती दुबे आणि अर्चित डोंगरे यांनी राष्ट्रीय सेवेसाठी आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी सर्व काही करण्याचे आश्वासन दिले.
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी प्रास्ताविक व स्वागतपर भाषण केले. डॉ.प्रसाद खांडेकर यांनी सर्व सत्कारमूर्तींना आपल्या कार्याप्रती प्रामाणिकता राखण्याची शपथ दिली.
प्रा.डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अंजली साने यांनी आभार मानले.

राज्यस्तरीय सौंदर्य स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान सोहळा

जनकल्याण बहुउद्देशीय फाउंडेशन, पुणे आणि आशुतोष डान्स स्टुडिओज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
पुणे : जनकल्याण बहुउद्देशीय फाउंडेशन, पुणे आणि आशुतोष डान्स स्टुडिओज यांच्या संयुक्त विद्यमाने नृत्यकला संगम आणि अँजेलिक फेस ऑफ पुणे – सौंदर्य स्पर्धा या स्पर्धेतील विजेत्यांच्या सन्मान सोहळ्याचे नवी पेठेतील पत्रकार भवन येथे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

वायब्रंट ग्रुप ऑफ कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अश्विनी जाधव, पी.के. ट्रेडर्सचे शिवाजी इंडे, पुणे बिझनेस क्लबच्या संस्थापक सपना काकडे, अभिनेता निखिल निगडे, सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट प्रीत पाटील, फर्स्ट लेडी बाऊन्सर सिक्युरिटी ग्रुपच्या संस्थापक दीपा परब, तसेच आयोजक आशुतोष अभिजीत संकाये पाटील उपस्थित होते.

या स्पर्धेत विविध वयोगटांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. किड्स कॅटेगरीत साक्षी रामदासी हिने प्रथम क्रमांक पटकावला. टीन्स कॅटेगरीत स्वरा पाथरूडकरहिने बाजी मारली. मिस कॅटेगरीत धनश्री गायकवाड विजेती ठरली, तर मिसेस कॅटेगरीत प्रतीक्षा वालगुडे हिने प्रथम क्रमांक मिळवला. ‘मोस्ट पॉप्युलर फेस ऑफ द इव्हेंट’ हा किताब तितीक्षा राजेमाने हिला मिळाला.

स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर परीक्षक पॅनल उपस्थित होता. यामध्ये सागर अंदणकर (चंद्रपूर), प्रीत पाटील (बेंगळुरू), प्रणाली खाम्बेकर (नाशिक), निखिल निगडे (पुणे) आणि मयुरी आव्हाड (लातूर) यांचा समावेश होता.

आशुतोष अभिजीत संकाये पाटील म्हणाले, या स्पर्धेमागचा उद्देश नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा होता. राज्यभरातून आलेल्या स्पर्धकांनी अत्यंत चांगली कामगिरी केली. अशा स्पर्धांमुळे युवकांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते आणि त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होते. त्यामुळे पुढील काळात ही स्पर्धा अधिक व्यापक स्वरूपात आयोजित करण्यात येईल.

गुरुपौर्णिमेनिमित्त सायबर जनजागृती उपक्रम राबवला — QHF Cyber Warriors Club

पुणे : सर परशुरामभाऊ महाविद्यालय आणि Quick Heal Foundation – Cyber Warriors Club यांचा संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेनिमित्त एक सायबर जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.

सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या उपक्रमात महाविद्यालयातील स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा रक्षक, ग्रंथालय कर्मचारी, नॉन-टीचिंग स्टाफ, मावश्या, कॅन्टीन कर्मचारी यांच्यासारख्या अनेक सेवाभावी व्यक्तींना “गुरु” मानून त्यांचा सन्मान करण्यात आला.

या उपक्रमात विद्यार्थ्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याला काही सोप्या व उपयुक्त सायबर सुरक्षा टिप्स सांगून त्यांना डिजिटल युगात सुरक्षित राहण्यासाठी प्रेरित केले सुरक्षा रक्षक, कार्यालयीन मदतनीस, ग्रंथालयातील कर्मचारी, वॉशरूम स्वच्छता करणाऱ्या मावश्या, कॅन्टीनमधील कर्मचारी अशा अनेक कार्यकर्त्यांना विशेष “Cyber Guru” बॅज देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

Quick heal Cyber Warriors Club च्या विद्यार्थ्यांनी या माध्यमातून सायबर सुरक्षा जागृतीसह आदर व्यक्त करण्याची अभिनव संकल्पना यशस्वीरीत्या राबवली

स्नेहमेळाव्यात निवृत्त ज्येष्ठ पत्रकारांनी जागविल्या जुन्या आठवणी

पुणे-येथील कोहिनूर मंगल कार्यालयात आज आयोजित करण्यात आलेल्या निवृत्त ज्येष्ठ पत्रकारांच्या स्नेहमेळाव्यात जुन्या पिढीतील निवृत्त ज्येष्ठ पत्रकारांनी पत्रकारितेच्या काळातील आठवणींना उजाळा देत  वृत्तपत्र क्षेत्रातील जुने संदर्भ, महत्त्वाच्या घटना आणि अनेक सामाजिक घडामोडींच्या आठवणी जागविल्या. पुण्यातील माध्यम समन्वयक प्रवीण प्र. वाळिंबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या निवृत्त ज्येष्ठ पत्रकार स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. प्रारंभी ‘अक्षरकला मीडिया’च्या तन्मयी मेहेंदळे-कुलकर्णी यांनी स्वागतगीत गायिले. ‘अक्षरकला मीडिया’चे रोहिणी अद्वैत, सागर बाबर आणि मधुरा नातू यांनी सर्वांचे स्वागत केले.  ज्येष्ठ पत्रकार अविनाश गोडबोले यांनी पुण्यातील दिवंगत पत्रकारांच्या नावांच्या यादीचे वाचन केले. सर्वांनी स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली. ‘अक्षरकला मीडिया’चे प्रमुख व कार्यक्रमाचे संयोजक प्रवीण प्र. वाळिंबे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणले की, ’१० वर्षांपूर्वी पुण्यातील निवृत्त ज्येष्ठ पत्रकारांचा शोध घेऊन त्यांची माहिती संकलित केली व पहिला निवृत्त ज्येष्ठ पत्रकारांचा स्नेहमेळावा आयोजित केला होता. आता निवृत्त ज्येष्ठ पत्रकारांच्या ग्रुपमध्ये १२५हून अधिक निवृत्त ज्येष्ठ पत्रकार आहेत.’

यावेळी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार, ‘पुणे फेस्टिव्हल’चे उपाध्यक्ष व ‘कोहिनूर ग्रुप’चे अध्यक्ष  कृष्णकुमार गोयल आणि ‘बेळगाव तरुण भारत’चे संपादक व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते वयाची ७५ वर्षे पूर्ण करणाऱ्या २१ निवृत्त ज्येष्ठ पत्रकारांचा पुणेरी पगडी आणि पुस्तके भेट देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी उपस्थित तीनही पाहुण्यांनी निवृत्त ज्येष्ठ पत्रकारांनी पत्रकारितेच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा गौरव केला. ‘राजकारण्यांवर आणि समाजातील गैरप्रवृत्तींवर अंकुश ठेवणारे पत्रकार निष्ठेने आयुष्यभर एका अर्थाने समाजाची सेवाच करीत असतात. आज आर्थिक परिस्थिती थोडी बदललेली असली, तरी पूर्वीच्या काळी पत्रकारांना पोटाला चिमटा देऊन आपली सेवा बजावावी लागत असे. परंतु अशा कष्टदायी वातावरणातही अनेक पत्रकारांनी उत्तम काम करून चांगली समाजसेवा करीत उत्तम आदर्श लोकांपुढे ठेवला आहे. पुण्यात अशा सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे पुण्यातील पत्रकार महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांसाठीचे आदर्श ठरले आहेत,’ असे गौरवोद्गारही उल्हास पवार यांनी काढले.

‘कोहिनूर ग्रुप’चे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल म्हणाले की, ‘पूर्वी पगार कमी होते, तरी पत्रकारितेतील निष्ठा मोठी होती. समाजाचे प्रबोधन करीत समाजाला चांगली दिशा देण्याचे काम पत्रकारांच्या जुन्या पिढीने केले. जुन्या पिढीतील पत्रकार हे ‘कोहिनूर’ हिऱ्याप्रमाणे चकमदार असून, समाजाला त्यांनी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन केले,’ असे कृष्णकुमार गोयल म्हणाले.

दै. ‘बेळगाव तरुण भारत’चे संपादक व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर म्हणाले की, ‘पत्रकारिता हा धर्म असून, लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आजही माध्यमांकडे समाज अपेक्षेने बघतो. ध्येयवादी पत्रकार  हे समाजाचे वैभव असून, पुण्यातील निवृत्त ज्येष्ठ पत्रकारांचा असा स्नेहमेळावा महाराष्ट्रात एकमेव होत असावा,’ अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले.

 यावेळी निवृत्त ज्येष्ठ पत्रकारांतर्फे डॉ. कुमार सप्तर्षी, कर्नल विनायक तांबेकर, अरविंद गोखले, सुधीर गाडगीळ, मुकुंद संगोराम, चंद्रशेखर कारखानीस, विनीता देशमुख , राजीव साबडे आदींनी मनोगत व्यक्त केले.ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे दै. ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर, ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पुणे आवृत्तीचे संपादक श्रीधर लोणी, ‘प्रभात’चे कार्यकारी संपादक अविनाश भट, ‘सामना’चे निवासी संपादक अरुण निगवेकर, ‘पुढारी’चे कार्यकारी संपादक सुनील माळी, पुणे ‘लोकसत्ता’चे माजी संपादक मुकुंद संगोराम, दै. ‘प्रहार’चे माजी संपादक सुकृत खांडेकर, तसेच रमेश डोईफोडे ,हरीश केंची,सत्यजित जोशी, मीरा जोशी,राज काझी,प्रसन्न केसकर , चंद्रन अय्यर, मनोहर सप्रे,शैलेश गुजर,संतोष डिंगणकर शरद लोणकर,वल्लभ कुलकर्णी ,विद्याधर ताठे , विवेक भुसे , वाय व्ही कृष्णमुर्ती ,सुभाष इनामदार , सुभाषचंद्र जाधव,दै. ‘सकाळ’चे मुख्य वार्ताहर मंगेश कोळपकर, दै. ‘लोकमत’चे मुख्य वार्ताहर राजू इनामदार, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील व सरचिटणीस मंगेश फल्ले, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे आदींनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

या मेळाव्याला सुमारे १००हून अधिक निवृत्त ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते. त्यांमध्ये निवृत्त महिला पत्रकारांची संख्याही मोठी होती. ‘अक्षरकला मीडिया’च्या श्रुती तिवारी यांनी आभारप्रदर्शन केले. यानंतर भोजन होऊन हा स्मरणीय कार्यक्रम संपला.

७५ वर्षांवरील ज्येष्ठ पत्रकार 

फरीद शेख अमीर – १९ सप्टेंबर १९३३,

जयराम देसाई  – ७ सप्टेंबर १९३८ ,

अशोक डुंबरे  –  ३० मार्च १९३९ ,

विनायक तांबेकर  –  १२ जुन १९४०,

डॉ. कुमार सप्तर्षी  –  २१ ऑगस्ट १९४१, 

वी.वाय.कृष्णमुर्ती  –  १२ एप्रिल १९४२ ,

गोपाळ सक्रीकर  –  २८ ऑगस्ट १९४२,

उषःप्रभा  पागे -भिडे  –  २७ डिसेंबर १९४३, 

चंद्रशेखर कारखानीस  –  २८ ऑक्टोबर १९४४ ,

मोरेश्वर जोशी  –  ३१ ऑगस्ट १९४५ ,

अरविंद गोखले  –  १६ मे १९४७, 

शर्मिला कारखानीस  –  १ जून १९४८ ,

अशोक काणे  –  ११ ऑक्टोबर १९४८,

अनिल टाकळकर  –  ८ मार्च १९४९, 

 दिलीप कुकडे  –  ११ मे १९५० ,

प्रभाकर खोले  –  ७ सप्टेंबर १९५०,

सुभाष नाईक  –  ११ ऑक्टोबर १९५०, 

सुधीर गाडगीळ  – २५ नोव्हेंबर १९५०, 

मनोहर कुलकर्णी – ७ डिसेंबर १९५०.. 

महावीर जोंधळे.. यांचा  समावेश होता.

अजित पवारांची पोलिसांना सूचना:म्हणाले – बेशिस्त वागणारा माझा नातलग किंवा कितीही मोठ्या बापाचा असला तरी त्याला टायरमध्ये घाला

पुणे-सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेशिस्त वर्तन करणाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. बेशिस्त वागणारा माणूस कितीही मोठ्या बापाचा असला तरी मी पोलिसांना त्याला टायरमध्ये घेऊन झोडायला सांगणार आहे. नियम सर्वांसाठी समान आहेत. मग तो अजित पवार असो किवा अजित पवारांचा कुणी नातलग असो, असे ते म्हणालेत.

अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी बारामती येथील सावित्री हॉस्पिटलचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना त्यांनी हुल्लडबाजी करणाऱ्यांना उपरोक्त शब्दांत इशारा दिला. ते म्हणाले, कधी कधी दुचाकीवाले इकडे-तिकडे पाहतात आणि हळूच राँग साईडने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतात. असा माणूस सापडला तर तो मुलगा किंवा व्यक्ती कितीही मोठ्या बापाचा असला तरी, मी त्याला टायरमध्ये घेऊन झोडायला सांगणार आहे. त्याला त्याच्या 10 पिढ्या आठवल्या पाहिजेत. कुणीही अजिबात नियम तोडू नका. मग तो अजित पवार असो की अजित पवाराचा नातलग असो. सर्वाना नियम सारखा आहे.

अजित पवार पुढे म्हणाले, मी जे करतो ते बारामतीकरांसह सर्वांसाठी करतो. मी अनेक ठिकाणी झाडे लावली. पण तिथे कुणीपण येत आहे. जनावरे चरत आहेत. पण तसे चालणार नाही. जिथे माणसांना बसण्यासाठी जागा केली आहे, तिथे एक दुचाकीस्वार निवांत मांडी घालून लोकांसोबत गप्पा मारत होता. मी गाडी वळवली व पोलिसांना सांगितले की, याची गाडी ताब्यात घे आणि याला चांगला टायरमध्ये घाल. मग त्याने चुकले म्हणून विनवणी केली.

मोकाट जनावरांच्या मालकांवर कारवाई करणारअजित पवारांनी यावेळी शहरातील मोकाट जनावरांच्या मुद्यावरही भाष्य केले. काही जण चुका करतात. रस्त्यावर कचरा टाकतात. जनावरे चरायला सोडतात. मी त्यांना सांगतो, ती जनावरे कोंडवाड्यात घाला. ऐकले तर ठीक, नाही तर मी त्यांना बाजार दाखवतो. मालकांनाही माझा इशारा आहे. त्यांच्यावरही केसेस होतील. ज्यांची गाढवं आहेत, जनावरे आहेत, ज्यांच्या गायी इकडे-तिकडे फिरत असतात, त्यांनी ते आपल्या दारात बांधाव्यात. त्यांना काय खायला-प्यायला घालायचे ते घालावे. मी बारामती जी चांगली करतो, ती काय सर्वांना कसेही फिरण्यासाठी नाही, असे ते म्हणाले.

लवकरच जाहीर होणार गट क लिपिक व टंकलेखक परीक्षेचा अंतिम निकाल

एमपीएससीच्या कारभारावर आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत लक्षवेधी

मुंबई/ पुणे (दि११ जुलै): राज्यातील हजारो विद्यार्थी पुणे शहरात स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. मात्र आयोगाच्या विलंबामुळे त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले जात आहे. २०२३ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या ७००७ पदांसाठीच्या गट क लिपिक व टंकलेखक परीक्षेचा अंतिम निकाल अद्यापही जाहीर झाला नसल्याची बाब कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून विधानसभेत मांडली. यावेळी न्यायालयाने या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात कोणतीही अडचण नसल्याचे नुकतेच सांगितले असून निकालाची प्रत येताच परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल, अशी माहिती राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे.

एमपीएससीच्या माध्यमातून गट क अंतर्गत विविध विभागांसाठी लिपिक व टंकलेखकचा 7007 पदांसाठी 2023 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर काही विद्यार्थी न्यायालयात गेल्याने अंतिम निकाल रखडला होता. नऊ जुलै रोजी न्यायालयाने निकाल जाहीर करण्यास हरकत नसल्याचे सांगितले आहे. न्यायालयाच्या निकालाची प्रत मिळाल्यानंतर या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करून भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

आयोगाच्या कार्यपद्धतीतील ढिसाळपणा ही गंभीर समस्या आहे. निकाल वेळेत लागत नाहीत, पात्रता यादी वेळेत जाहीर होत नाही, परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान होते. MPSC ला निकालासाठी बंधनकारक कालमर्यादा द्यावी, उत्तरदायित्व निश्चित करणारी स्वतंत्र समिती किंवा लोकपाल नेमावा, विद्यार्थ्यांसाठी मानसशास्त्र व कायदेविषयक सल्ला देणारे केंद्र स्थापन करावे, तसेच UPSC प्रमाणे ‘MPSC प्रतिभा सेतु’ उपक्रम सुरू करावा, अशी मागणी यावेळी रासने यांनी सभागृहात केली.

दरम्यान, आशिष शेलार यांनी सांगितले की, “MPSC ही स्वतंत्र संस्था आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिजन मधील १५० दिवस सेवा सुधार कार्यक्रम राबवला जात आहे, यामध्ये MPSC संदर्भातील सुधारणा, निकालातील विलंब, भरती प्रक्रियेतील त्रुटी यांचा समावेश आहे, त्यामुळे रासने यांच्या मागण्यांनुसार सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल”.

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन शिक्षेत वाढ:सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या विधेयकाचे झाले काय?

दारूबंदी सुधारणा विधेयक 2025 घेतले मागे…

मुंबई-सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून नागरिकांना त्रासदायी वर्तन करणारांना शिक्षेत वाढ करण्याची सूचना असलेले दारूबंदी सुधारणा विधेयक 2025 काही अभ्यासात्मक चर्चेचे कारण देऊन मागे घेण्यात आले.या विषयावर एक समिती नेमून त्यावर अहवाल घेऊन निर्णय घ्यावा असे यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी सुचविले आहे . या साठी ६ महिन्याचा कालावधी देखील त्यांनी सांगितला आहे.

शाळा, महाविद्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी कोणी दारू प्यायलेले आढळून आले तर कठोर कारवाई करण्यात यावी.असा कायदा करावा, यासाठी भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभा विधेयक क्रमांक 4 महाराष्ट्र दारूबंदी सुधारणा विधेयक 2025 हे अशासकीय विधेयक मांडले होते. यावर चर्चा झाल्यानंतर मंत्री शेलार यांच्या विनंतीनुसार हे विधेयक मुनगंटीवारांकडून मागे घेण्यात आले….

दारुबंदी विधेयक सुधारणेसाठी सभागृहात आमदार महेश लांडगे यांनी मांडली आक्रमक भूमिका

  • कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांचे सर्वंकष उपाययोजनांचे निर्देश

मुंबई/ पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
‘‘पिंपरी-चिंचवडमध्ये सोसायटींच्या आवारात, मंदिराच्या शेजारी असलेली दारु विक्री दुकाने सील करण्यात आली. मात्र, त्यानंतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने सदर दुकाने सुरू झाली. ज्या अधिकाऱ्यांनी अशी परवागनी दिली, त्यांच्या घराशेजारी दारुविक्री दुकान सुरू करण्याची परवागनी द्यावी. त्यादृष्टीने कायद्यात बदल केला पाहिजे. कायद्याची कठोर अंमलबजावणी केल्याशिवाय निकोप समाज निर्माण होणार नाही, असा घणाघात भाजपा आमदार महेश लांडगे यांनी घेतला.

महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेनशन मुंबईत सुरू आहे. राज्यातील दारुबंदी विधेयकाच्या मुद्यावर विधानसभा सभागृहामध्ये जोरदार चर्चा झाली. या चर्चेत आमदार सुधीर मुगनगंटीवार, अतुल भातखळकर यांनी भूमिका मांडली.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या विधवेशनामध्ये झालेल्या लक्षवेधीदरम्यान दिलेले आश्वासन सरकारने पाळले नाही. दारुबंदी करण्यासाठी एखाद्या गावातील एकूण मतदानातील 50 टक्के मतदानाचा कायदा आहे. पण, जेव्हढे मतदान होईल. त्यापैकी 75 टक्के मतदान जर दारुबंदीविरोधात असेल, तर त्या गावात दारु बंदी झाली पाहिजे, असा कायदा करावा, अशी मागणी केली. सभागृहाने गोलमान उत्तरे देवू नये, असा आक्रमक पवित्रा घेतला. गत अधिवेशनामध्ये आमदार महेश लांडगे यांनी सोसायटींच्या आवारात, धार्मिक स्थळांच्या शेजारी असलेली दारुविक्री दुकाने बंद करण्याबाबत मागणी केली होती. सोयाटीतील नागरिकांनी तक्रार केल्यास सदर दुकाने सील करण्याची भूमिका सरकारने घ्यावी, या मुद्यावर त्यांनी लक्ष वेधले होते.

यावर उत्तर देताना कॅबिनेट मंत्री आशिष शेलार म्हणाले की, राज्यात दारुबंदी नाही. पण, दारुविक्री आणि पिण्याची स्थाने आणि त्या ठिकाणची वर्तणूक यावर मर्यादा आहेत. त्यासाठी कायदा आहे. प्रश्नचिन्ह दारुबंदी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या लोकांबाबत आहे. सार्वजनिक जागेत दारु पिणारे, गैरशिस्तीने वागणाऱ्यांवर सश्रम कारवासाची तरतूद आहे. समाज हित, सार्वजनिक आरोग्याला इजा पोहोचवणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1950 अंतर्गत कारवाई होवू शकते. तसेच, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 नेसुद्धा कारवाई करता येते.

दारुबंदी कायद्याच्या काटेकोर अंमलबजाणवीसाठी अन्य कायद्यांवरही चर्चा झाली पाहिजे. परमिट रुम, बार आणि उत्पानांसाठी परवानगी यामध्ये गेल्या 40 ते 50 वर्षांमध्ये बदल झालेला नाही. त्याचाही सखोल चर्चा झाली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी लोकांनी मद्यपान करु नये. यासाठी दंडात्मक कारवाईत वाढ करणे. धार्मिक स्थळे आणि निवासी घरांच्या आवारात मद्यपान होवू नये. ऐतिहासिक गडकिल्यांवर मद्यपान होवू नये. याच्यावर कठोर कारवाई होणे अपेक्षीत आहे, असेही आशिष शेलार यांनी सांगितले.

सभागृहात सविस्तर चर्चा झाल्यानंतर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दारुबंदी कायद्यात सुधारणा करण्याबाबतचे विधेयक मागे घेतले. त्याला सभागृहात बहुमताने मंजूर करण्यात आले.


राज्यात दारुबंदी कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी सर्वंकष चर्चा करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. सार्वजनिक ठिकाणी गैरशिस्तीने वागणाऱ्या मद्यपी व्यक्तीच्या शिक्षेत वाढ करण्यात येईल. अवैध मद्यमानास प्रतिबंध करण्यासाठी कायद्याची काटेकोर अंमलबजावणीसाठी नागरी सुरक्षा, साक्ष अधिनियमाचीही प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत सन्माननीय आमदारांची समिती निर्माण केली जाईल. त्याची कालमर्यादा 6 महिन्यांची केली जाईल.

  • आशिष शेलार, कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य.

चाकूर च्या माजी नगराध्यक्षांसह शरद पवार गट, ‘प्रहार’ च्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत

मुंबई, 11 जुलै 2025: लातूर जिल्ह्यातील चाकूर नगरपंचायतीचे माजी अध्यक्ष व प्रहारचे नेते कपील माकणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद पवार गटाचे निळकंठ मिरकले यांच्यासह शरद पवार गट, प्रहार च्या असंख्य कार्यकर्त्यांनी शुक्रवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमामध्ये प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष खा. डॉ. अजित गोपछडे, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, आ. संभाजी पाटील निलंगेकर, अर्चना पाटील चाकुरकर, मराठवाडा विभागीय संघटनमंत्री संजय कोडगे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. यावेळी शरद पवार गटाचे डॉ. गोविंद माकणे, चाकूर कृ.उ.बा.स. उपसभापती लक्ष्मण दंडिमे यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला.
यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून या सर्वांनी भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. या कार्यकर्त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही. आपण सर्वजण भाजपाची राष्ट्रीय विचारधारा मजबूत करण्यासाठी तसेच राज्याला विकासात अग्रेसर बनवण्यासाठी झटून काम करूया असे आवाहन केले. या कार्यकर्त्यांनी मांडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी कसून प्रयत्न करण्यात येतील असेही ते म्हणाले.
प्रवेशावेळी श्री. माकणे म्हणाले की मला नगराध्यक्ष करण्यात भाजपा चा सिंहाचा वाटा होता. त्या नंतरही वेळोवेळी विकासकार्यात भाजपाने सहकार्य दिले.
आ. निलंगेकर म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी लातूरमधील योजनांना नेहमीच पाठबळ दिले. प्रवेश केलेले सर्व कार्यकर्ते पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासक नेतृत्वाकडे आशेने पाहत आहेत. प्रवेश केलेले सर्व कार्यकर्ते पक्षाची विचारधारा बळकट करतील असे अर्चना पाटील चाकूरकर यांनी सांगितले.
भाजपा मध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये चाकूर कृ.उ.बा.स. चे संचालक बाबूराव सूर्यवंशी, दत्ता कलाले, मुरंबीचे सरपंच, उपसरपंच सुनिल चिंताले व ज्ञानोबा चावले, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष दयानंद सूर्यवंशी, युवा शहराध्यक्ष अमोल शेटे, चाकूर नगर पंचायत गटनेता हिरकनबाई लाटे, औद्योगिक वसाहत संचालक बाळू लाटे आदींचा समावेश आहे .

साक्षीभावात राहिल्यास जीवनातला प्रत्येक क्षण आनंददायी : अभयकुमार सरदार

‌‘निसर्गातील कार्यक्षमता‌’ विषयावर अनोखे चित्रप्रदर्शन

पुणे : साक्षीभाव साध्य झाल्यास कोणतेही विचार, कल्पना, भावना किंवा पूर्वग्रह नाहीत अशी एका शांत, तरल, संवेदनाक्षम अवस्था प्राप्त होते. ही साक्षीभाव अवस्था संपूर्णत: ज्ञान-विज्ञान, कर्म आणि चैतन्याने परिपूर्ण असते. त्यामुळे साक्षीभावाच्या आधारे जीवनातल्या कोणत्याही बिकट समस्येवर यथार्थ उत्तर मिळते त्याचप्रमाणे अपेक्षित कार्यही हातून घडते आणि जीवनातला प्रत्येक क्षण आनंददायी ठरतो, असे प्रतिपादन गुरुतत्त्वयोग तत्त्वप्रणालीचे प्रणेते अभयकुमार सरदार यांनी केले.
गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुतत्त्वयोग संस्थेच्या शिवाजीनगर येथील ध्यानमंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरुतत्त्वयोग प्रणालीचे प्रणेते अभयकुमार सरदार यांची प्रमुख उपस्थिती होती. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी गुरुतत्त्ववेध स्मरणिकेचे प्रकाशन अभयकुमार सरदार, तेजा दिवाण, राजश्री करे, तेजस दशरथ, सुचित्रा पेंडसे यांच्या हस्ते करण्यात आले.
गुरुपौर्णिमेनिमित्त ‌‘निसर्गातील कार्यक्षमता‌’ या विषयावर अनोखे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. निसर्गातील कोणतीही रचना, कार्यप्रणाली अतिशय कार्यक्षम असते. गुरुतत्त्वाने प्रत्येक जीवाला जगण्यासाठी, प्रतिकूल परिस्थितीत तग धरून राहण्यासाठी काही शारीरिक रचना दिल्या आहेत. या गुणधर्मांचा वापर करून प्राणिमात्र अंत:प्रेरणेने, सहजप्रवृत्तीने जगतात आणि त्यामुळेच ते कार्यक्षम असतात. गुरुतत्त्व हे फक्त मानावापुरते मर्यादित नसून ते सर्व निसर्गाचे मार्गदर्शक तत्त्व आहे, याचा उलगडा या प्रदर्शनातून पहायला मिळला.
गुरुतत्त्वयोगाच्या अभ्यासासाठी आणि त्याच्या साधनेसाठी योग्य वातावरण निर्माण करून देणे आणि हे तत्त्वज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे हे गुरुतत्त्वयोग सार्वजनिक धर्मार्थ विश्वस्त संस्थेचे ध्येय आहे. ‘गुरुतत्त्वाची शिकवण-साक्षीभावाद्वारे वैयक्तिक कार्यक्षमता’ या विषयावर तेजा दिवाण व सुचित्रा पेंडसे यांनी अभ्यासपूर्ण विवेचन सादर केले तर राजश्री करे, तेजस दशरथ आणि प्रचिती पाध्ये यांनी गुरुतत्त्वाच्या साधनेतून आलेल्या अनुभवांचे कथन केले.

पशुसंवर्धन व्यवसायास कृषीसमकक्ष दर्जा देणारे महाराष्ट्र पहिले राज्य- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

पुणे, दि. 11: राज्य मंत्रिमंडळाने पशुसंवर्धन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेत राज्यातील लाखो पशुपालकांना मोठा दिलासा दिला आहे. असा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या निर्णयानुसार पशुधन आधारित सर्व व्यवसाय आता कृषी व्यवसायाच्या समकक्ष मानले जातील, अशी घोषणा पशुसंवर्धनमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी (दि. ११जुलै) विधीमंडळात केली.

या धोरणात्मक सुधारणेमुळे दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन व वराहपालन व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांना नव्या सवलतींचा लाभ होणार आहे. पशुसंवर्धन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याबाबत विभागाने सादर केलेल्या प्रस्तावावर मंत्रिमंडळाने चर्चा केली व विविध निर्णय घेण्यात आले.

यामध्ये 25 हजार मांसल कुक्कुट पक्षी / 50 हजार अंडी उत्पादक कुक्कुट पक्षी क्षमतेच्या तसेच 45 हजार क्षमतेच्या हॅचरी युनिटच्या कुक्कुटपालन व्यवसायास, 100 दुधाळ जनावरांचे संगोपन, 500 मेंढी /शेळीपालन व 200 वराह या पशुसंवर्धन विषयक व्यवसायासाठी वीज दर आकारणी ‘कृषी इतर’ या वर्गवारीनुसार न करता कृषी वर्गवारीप्रमाणे करण्यास मान्यता देण्यात आली. पशुपालन व्यवसायास स्वतंत्र व्यवसाय न समजता शेती व्यवसाय समजून ग्रामपंचायत कर दरात एकसमानता आणण्याकरिता कृषी व्यवसायास ज्या दराने कर आकारणी केली जाते, त्याच दराने कर आकारणी करण्यास मान्यता देण्यात आली.

कृषीप्रमाणे पशुपालन व्यवसायास कर्जावरील व्याज दरात सवलत देण्यास मान्यता देण्यात आली. कृषीप्रमाणे कुक्कुटपालन व इतर पशुसंवर्धन व्यवसायासाठी सोलर पंप व इतर सोलार संच उभारण्यास सवलत देण्यास मान्यता. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी अतिरीक्त नियतव्यय उपलब्ध करुन देण्यास मान्यताही मंत्रीमंडळाने दिली आहे.

या निर्णयांमुळे शाश्वत शेतीला चालना मिळेल, ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती होईल आणि शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य वाढेल. राज्यातील सुमारे ७५ लाख कुटुंबे पशुसंवर्धनाच्या व्यवसायात आहेत, त्यांना याचा थेट लाभ होणार आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे महाराष्ट्रातील पशुसंवर्धन क्षेत्रात क्रांती घडेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा मंत्री (वित्त व नियोजन) अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेने सन 2028 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचविण्यासाठी पथदर्शी आराखडा अहवाल शासनास सादर केला आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आर्थिक सल्लागार परिषदेने जे घटक उत्पन्न वाढीस चालना देऊ शकतील, असे 8 घटक सुनिश्चित केले आहेत. यामध्ये ‘कृषी व संलग्न’ या घटकाचा समावेश आहे. सद्यस्थितीत राज्याच्या सकल उत्पन्नात कृषी क्षेत्राचा वाटा 12 टक्के इतका असून, कृषी क्षेत्राच्या एकूण उत्पन्नात पशुजन्य उत्पन्नाचा वाटा 24 टक्के इतका आहे. निती आयोगाने सन 2021 च्या अहवालात पशुसंवर्धन व्यवसायापासून देशाच्या / राज्याच्या सकल उत्पादनात पशुसंवर्धन व्यवसायाचा सहभाग वाढविण्यासाठी उपाययोजना करण्याची शिफारस केली होती.

पशुसंवर्धन मंत्री, पंकजा मुंडे आपल्या प्रतिक्रीया देतांना म्हणाल्या, पशुसंवर्धनाच्या व्यवसायास प्रोत्साहन देताना कृषी व्यवसायाप्रमाणे सवलती देणे आवश्यक असल्याने राज्य सरकारने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा दिला आहे. विभागाच्या वाटचालीतील हा एक ऐतिहासिक निर्णय असून, या निर्णयामुळे भविष्यात पशुसंवर्धनाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे ग्रामीण अर्थचक्र गतिमान होईल. अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. असे पशुसंवर्धन आयुक्तालयाने प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
0000

चीनमधून बेदाण्यांच्या बेकायदा आयातीमुळेदेशातील शेतकरी, राष्ट्रीय महसुलाचे नुकसान– उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 11 :- चीनमधून कर चुकवून निकृष्ट बेदाण्यांची मोठ्या प्रमाणावर आयात होत असून यामुळे द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांचे आणि राष्ट्रीय महसुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात तात्काळ थांबवावी. बेदाण्यांचे दर स्थिर ठेवून द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी पत्र लिहून केंद्र सरकारकडे केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री शिवराजसिंह चौहान तसेच केंद्रीय व्यापारमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहिले असून महाराष्ट्रातील आणि देशातील द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. चीनमधून निकृष्ट दर्जाच्या बेदाण्यांची बेकायदा आयात वाढली आहे. आयात कर आणि शुल्क चुकवून बेदाणे मोठ्या प्रमाणावर भारतात आणले जात आहेत. या करचोरीमुळे शासनाचा महसूल बुडत असून देशाच्या महसुलाचे नुकसान होत आहे. ऐन हंगामात होत असलेल्या बेकायदा आयातीमुळे देशातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या बेदाण्यांचे दर प्रतिकिलो शंभर ते सव्वाशे रुपयाने घसरले आहेत. याचा फटका द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांना बसला असून त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. हे टाळण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात. बेकायदा आयात व विक्री थांबवण्यासाठी कठोर कारवाई करावी. आयात होणाऱ्या बेदाण्यांचा दर्जा तपासण्यासाठी तसेच करवसुली योग्य, अचूक होण्यासाठी बंदरे, विमानतळ, बाजारपेठांच्या ठिकाणी तपास व करवसुली यंत्रणा कार्यक्षम करावी. ऐन हंगामात बाजारातील बेदाण्यांचे दर स्थिर राखून शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तात्काळ कराव्यात, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री शिवराजसिंह चौहान तसेच केंद्रीय व्यापारमंत्री पियुष गोयल यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादक संघ-पुणे यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले होते तसेच हा प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे.

उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी समन्वयाने काम करावे – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पुणे, दि. ११: उद्योग क्षेत्राच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री गंभीर आहेत. उद्योगांना सर्व पायाभूत सोयी सुविधा पुरविणे तसेच्या त्यांच्या समस्या, प्रश्न सोडविणे ही प्रशासनाची जबाबदारी असून त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.

जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांसोबत उद्योजकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत विधानभवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, पीएमपीएमएलच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ- मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक संदीप रोकडे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक अर्चना कोठारी आदी यावेळी उपस्थित होते.

डॉ. पुलकुंडवार म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडी- माण आयटी पार्क क्षेत्रात पावसाचे पाणी साचणे, वीज खंडीत होणे आदी समस्यांच्या अनुषंगाने कालच मुंबईत विधानभवनात बैठक घेतली आहे. या आयटी पार्कसह जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राच्या सर्व समस्या सोडविणे आणि उद्योगांची वृद्धी व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांचे कटाक्षाने लक्ष आहे. त्यादृष्टीने सर्व अधिकाऱ्यांनी आपापसात समन्वयाने गतीने कार्यवाही करावी. उद्योगांच्या समस्यांबाबत नियमितपणे बैठका घेण्यात येतील आणि त्यासाठी आपण स्वत: तसेच जिल्हाधिकारी उपस्थित राहू, असे त्यांनी सांगितले.

उद्योगांना वीज, पाणी, रस्ते आदी पायाभूत सुविधा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने प्राधान्याने द्याव्यात. औद्योगिक क्षेत्रातील तसेच क्षेत्राबाहेरील रस्त्यांवरील खड्डे संबंधित यंत्रणांनी भरून घ्यावेत तसेच खड्डेमुक्त ठवावेत. क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील भागात कचरा, गटर आदींची स्वच्छता संबंधित यंत्रणांनी करावी.

महावितरणने अखंडित वीजपुरवठ्यासाठी फीडर, उपकेंद्रे, वीज वाहिन्या आदी यंत्रणा अद्ययावत कराव्यात. पुणे विभागात किती उद्योग आहेत तसेच त्यांना पुरविण्यात येणाऱ्या वीजपुरवठ्यात होणारा चढ-उतार याचा डाटा जमा करुन त्याचे विश्लेषण करावे, जेणेकरुन त्यावरील उपाययोजना शोधणे सोपे जाईल, अशाही सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, जिल्हा परिषद तसेच महसूल विभागाने समन्वयाने रस्त्यांवरील अतिक्रमणे मोकळी करावीत. सार्वजनिक बांधकाम विभाग, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आपल्या हद्दीतील रस्त्यांवर पुन्हा अतिक्रमणे होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

चिंचवड येथील ईएसआयसी रुग्णालयात अत्याधुनिक उपचार मिळण्याच्या दृष्टीने उपकरणे सेवा सुविधांसाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. तसेच रुग्णालयाला कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) उपकरणे उपलब्ध करुन देण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येतील, असे पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्री. सिंह म्हणाले.

जिल्हाधिकारी श्री. डूडी म्हणाले, उद्योगांच्या वृद्धीसाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. पिंपरी- चिंचवड, चाकण, रांजणगाव, हिंजवडी, तळेगाव, जेजुरी, बारामती आदी सर्वच औद्योगिक क्षेत्रात तसेच क्षेत्राबाहेरील उद्योगांसाठी पायाभूत सुविधा पुरविण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी उद्योग संघटनांशी वेळोवेळी बैठका घेऊन त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, असेही ते म्हणाले.

कंपन्यांनी आपल्या कामगारांसाठी पीएमपीएमएलच्या बसेसची मागणी केल्यास वेळा आणि मार्ग निश्चित करुन बसेस सुरू करण्यात येतील, असे श्रीमती मुधोळ- मुंडे यांनी सांगितले.

बैठकीस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता नितीन वानखेडे, महावितरण पुणे परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक बी. बी. खंदारे, पिंपरी चिंचवड मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, पुणे शहरचे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील, महावितरण बारामतीचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, पुणे शहर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी डॉ. अर्चना पठारे, हणुमंत पाटील आदींसह, सार्वजनिक बांधकाम विभाग, माथाडी कामगार मंडळ, कामगार विभाग, जिल्हा परिषद आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सहकारी सोयाबीन केंद्राच्या खरेदीतील कोट्यवधींचा घोटाळा उघड,”दिवसभरातच अधिकाऱ्यांचा चार्ज काढा”- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. १० जुलै २०२५ : सोयाबीन सहकारी खरेदी केंद्रातील खरेदी प्रक्रियेत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारावर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संबंधित अधिकाऱ्यांचा चार्ज तातडीने काढण्याचे निर्देश दिले. “पुढील दोन तासांत कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा कागदपत्रे नष्ट होण्याचा धोका संभवतो,” असा स्पष्ट इशारा त्यांनी सभागृहात दिला.

विधान परिषद सदस्य आ. विक्रम काळे यांनी भोकरदन तालुका, जिल्हा जालना येथे झालेल्या बोगस सोयाबीन खरेदी प्रकरणाचा तपशील मांडत ३०७ सारख्या गुन्ह्यांत अडकलेल्या दौंड कुटुंबीयांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. खरेदी केंद्रांमार्फत पीक नोंद नसलेल्या शेतकऱ्यांकडून खरेदी करून, बनावट संस्थांच्या माध्यमातून पैसे लाटल्याचा आरोप त्यांनी केला.

या प्रकरणावर उत्तर देताना मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की, २५१९ शेतकऱ्यांकडून ३९ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. यामध्ये १९ शेतकऱ्यांच्या सातबारावर सोयाबीन नव्हते, तरीही त्यांच्याकडून खरेदी दाखवून रकमा वर्ग करण्यात आल्या. यामध्ये सध्या भागवत दौंड व इतर नऊ जणांवर गुन्हे दाखल असून, पोलीस तपास सुरू आहे. डीएमओ विजय राठोड यांच्या भूमिकेचीही चौकशी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावर कठोर पवित्रा घेत जिल्हा पातळीवरील दोषी अधिकाऱ्यांचा कार्यभार आजच मागे घेण्याची मागणी केली. “अशा भ्रष्ट कारभारामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होतो. त्यामुळे चौकशी प्रक्रियेत गती आणून दोषींना शिक्षा व्हावी,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.