Home Blog Page 463

कोथरूडमध्ये सात्यकी सावरकर आयोजित ‘संन्यस्त खडग’ नाटक वंचित बहुजन आघाडीने पाडले बंद

नाटकात तथागत गौतम बुद्ध यांच्याविषयी अवमानकारक संवाद असल्याचा आरोप

पुणे : वि. दा. सावरकर लिखित ‘संन्यस्त खडग’ या नाटकाच्या सादरीकरणावर वंचित बहुजन आघाडी पुणे शहरातील कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप घेत जोरदार आंदोलन केले. नाटकात जगाला शांती, करुणा आणि अहिंसेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांचा अपमान करण्यात आल्याचा गंभीर आरोप वंचितकडून करण्यात आला आहे.

वंचित बहुजन आघाडीने आपल्या भूमिकेत स्पष्ट म्हटले आहे की, महाराष्ट्रात सावरकर नाही, फुले-शाहू-आंबेडकर चालणार. सावरकरांनी विकृतपणे लिहिलेले हे नाटक गौतम बुद्धांबद्दल अपमानास्पद संवादांनी भरलेले असून, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे म्हणत वंचित बहुजन युवा आघाडीचे शहरअध्यक्ष सागर आल्हाट यांनी नाटक बंद पाडले.

नाटकातील संवादात तथागत बुद्धांविषयी, भिक्कु संघ आणि बुद्ध तत्वज्ञान विषयी अतिशय आपत्तीजनक आणि अवमानकारक संवाद असल्याने हे नाटक महाराष्ट्रात कुठेही सादर होऊ देणार नाही, असा इशारा वंचितने दिला आहे. त्यांनी चेतावणी दिली की, जर हे नाटक परत आणण्याचा प्रयत्न झाला, तर नाटकातील कलाकार, दिग्दर्शक आणि पाहणाऱ्यांनाही दणका देण्यात येईल. वंचित बहुजन आघाडी हे नाटक कुठेही होऊ देणार नाही, हे लक्षात ठेवावे.

वंचितने यामागे भाजपा व आरएसएसची मिलीभगत असल्याचाही आरोप केला आहे. त्यांच्या इशाऱ्यावरून हे जुने नाटक पुन्हा रंगमंचावर आणण्याचा कट असल्याचे वंचितकडून सांगण्यात आले.

दरम्यान, कोथरूड परिसरात यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, नाटक अखेर बंद करण्यात आले आहे. नाटकाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.

यूनेस्को हेरिटेज वारसा, जाहिरातीतुन नव्हे तर कृतीने जपण्याची गरज..काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

रयतेच्या राजांना अभिप्रेत कल्याणकारी लोक-राज्याची संकल्पना वास्तवात उतरवावी.

बारसू रिफायनरी प्रकल्प, कोकणवासीयांनी संघर्षाने घालवून, पश्चिम घाट व कातळशिल्पे वाचवली..!
अन्यथा ‘युनेस्कोच्या यादीत जागतीक वारसा लाभून ही’ नेस्तनाबूत झाली असती..


पुणे – दि १२ जुलै २५
महाराष्ट्र सरकारने राज्यातील ‘शिवकालीन किल्ले’ युनेस्को’च्या यादीत अंतर्भाव झाल्याने सरकारी जाहिरातींतुन मोठ्या प्रमाणात फोटो सेशन केले.
स्वातंत्र्योत्तर प्रजासत्ताक भारतातील, शिव छत्रपतींच्या, संतांच्या व समाज क्रांतीकारकांच्या, पुरोगामी महाराष्ट्रात आजवरच्या काँग्रेस सरकारांनी, शिव छत्रपतींचे ऐतिहासिक किल्ले व वास्तूंचे मनोभावे जतन केले व केंद्र सरकारच्या ‘भारतीय पुरातन, प्राचीन व (ऐतिहासिक) हेरिटेज वास्तूंच्या यादीत’ वेळीच् अंतर्भाव केले. तसेच पुर्वीच्या सरकारांच्या शिवकालीन वास्तू – गड किल्ल्यांच्या सततच्या संवर्धना मुळे आज महाराष्ट्रातील १२ शिवकालीन किल्ले ‘जागतिक युनेस्को च्या यादीत’ समाविष्ट झाले ही निश्चितच आनंदाची, अभिमानास्पद व अभिनंदनीय बाब आहे मात्र केंद्रातील व राज्यातील सरकारांनी याचे कृतीशील महत्व जोपासले पाहिजे.
रयतेचे राजे ठरलेल्या शिव छत्रपतींनी ३०० हुन अधिक किल्ले स्वराज्यासाठी बांधले. छ्त्रपतींची शिवमुद्रा ही संविधानात प्रतिबिंबीत होते व स्वराज्याचे गड किल्ले ही जनतेप्रतीचे ऊत्तरदायीत्व अधोरेखीत करते याचे ही भान सरकारने ठेऊन, रयतेच्या राजांना अभिप्रेत कल्याणकारी लोक-राज्याची संकल्पना वास्तवात उतरवावी.
ते पुढे म्हणाले की, काही वर्षांपूर्वीच मोदी सरकार व त्यांचे ऊद्योगपती मित्रांचा ‘बारसू रिफायनरी प्रकल्प’ हा ‘भारताचे कॅलिफोर्निया’ समजल्या जाणाऱ्या कोकणातील
पश्चिम घाट येथील बारसू कातळ शिल्पे परिसरात करण्याचा घाट घातला होता, हे ऊभ्या महाराष्ट्राने पाहिले. मात्र कोकणवासीयांनी पर्यावरणास अनिष्ट ठरणारा रिफायनरी प्रकल्प संघर्षाने घालवून कातळशिल्पे वाचवली, अन्यथा ‘युनेस्कोच्या यादीत जागतीक वारसा लाभून ही’ कातळशिल्पे नेस्तनाबूत झाली असती असे प्रतिपादन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.

पुणे: बीडीपी झोन निश्चिती संदर्भात नियुक्त समितीने व शासनाने पर्यावरण संवर्धन आणि बाधीत जनतेच्या भावनांचा विचार करावा

BDP करिता आरक्षित क्षेत्रातील पर्यावरण संवर्धनासोबतच पुणेकरांचे संरक्षणाचे अनुषंगाने पुणे महापालिकेने ठोस पावले उचलावित – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे, दि. १२ जुलै २०२५ :
पुणे शहराच्या विकास आराखड्यांतर्गत बायोडायव्हर्सिटी डेव्हलपमेंट प्लॅन – BDP व हिलटॉप हिलस्लोप झोन मधील प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी आज विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीत डोंगर माथा आणि डोंगरउतार अंतर्गत निश्चित करावयाचा बीडीपी झोन ,याबाबतच्या भूसंपादनातील समस्या,यातील अनाधिकृत बांधकामे,जनतेच्या प्राप्त तक्रारी व निवेदने यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.शासनाने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीने आरक्षणाची मुदत संपण्याआधी आपला अहवाल सादर करावा.यामध्ये स्थानिक आमदार,खासदार,इतर लोकप्रतिनिधी यांचे अभिप्राय घेण्यात यावेत तसेच पर्यावरणवादी संघटना व पर्यावरण तज्ञांच्या मतांचाही विचार करावा.यासाठी आरक्षित निर्मनुष्य क्षेत्रातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करावेत.तसेच माळीन,इर्शाळवाडी सारख्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जांभूळवाडी काळेवाडी सारख्या डोंगर उतारावरील अनधिकृत बांधकामे,प्रस्तावित बांधकामे यासाठी नियमावली तयार करावी व त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी अशी त्यांनी सूचना केली.

बीडीपी क्षेत्रात येणाऱ्या आणि स्थलांतरित कराव्या लागणाऱ्या कुटुंबांच्या नुकसानभरपाई व पुनर्वसनाच्यामुद्द्यावर बोलताना,या कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी, तसेच लोकप्रतिनिधींनाही विश्वासात घेऊन या संदर्भातील निर्णय प्रक्रिया राबवली जावी, अशी सूचना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. यासंदर्भात समितीच्या शिफारशी राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार असून अंतिम निर्णय घेताना पर्यावरण संरक्षण आणि लोकभावना विचारात घेऊनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे निर्णय घेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बैठकीत शहरी वने (Urban Forest) या संकल्पनेवरही विशेष भर देण्यात आला. शहरी भागात पर्यावरण संवर्धनाकरिता वनसंपदा वाढविणे आणि स्थानिक भूधारकांना देखिल योग्य न्याय मिळेल या या दृष्टीने असे प्रकल्प राबविलेल्या महानगरपालिका/नगरपालिका यांच्या कार्याचा अभ्यास करावा अशा सूचना डॉ गो-हे यांनी दिल्या.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे,उपसचिव नगरविकास श्रीमती छापवाले,शहर अभियंता श्री प्रशांत वाघमारे,भूसंपादन अधिकारी श्रीमती श्वेता दारुणकर यांचेसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शहनाई हृदयाला भिडणारे वाद्य : डॉ. प्रमोद गायकवाड


गानवर्धन, स्वरझंकार ज्ञानपीठ आयोजित चर्चासत्रात स-प्रात्यक्षिक व्याख्यान

पुणे : पुराण काळातील ग्रंथांमध्ये ‌‘मधुकरी‌’ या नावाने सनई-शहनाईसारख्या मिळत्या जुळत्या वाद्याचा उल्लेख आढळतो. सनई या वाद्याविषयी मतप्रवाह असले तरी मंदिर परंपरेशी जोडले गेलेले हे वाद्य असून हृदयाला भिडणारे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध शहनाईवादक डॉ. प्रमोद गायकवाड यांनी व्यक्त केले.

गानवर्धन आणि व्हायोलिन अकादमीचे स्वरझंकार ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय स-प्रात्यक्षिक मुक्तसंगीत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्राच्या पहिल्या दिवशी (दि. 12) ‌‘शहनाई‌’ या विषयावर डॉ. प्रमोद गायकवाड बोलत होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्योजक पराग गाडगीळ, गानवर्धनचे अध्यक्ष दयानंद घोटकर, व्हायोलिन अकादमीच्या स्वरझंकार ज्ञानपीठाचे प्रमुख पंडित अतुलकुमार उपाध्ये, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध गायक, लेखक व निर्माते आनंद माडगुळकर, डॉ. निलिमा राडकर मंचावर होते.
याच कार्यक्रमात नृत्य पंडिता विदुषी कै. सुजाता नातू पुरस्कृत युवा कथक कलाकार पुरस्कार वैष्णवी देशपांडे व उत्कृष्ट संगतकार पुरस्कार तालवादक निलेश रणदिवे यांना प्रदान करण्यात आला.

शहनाई या वाद्याची निर्मिती, परंपरा, वादन कला या विषयी विस्तृत विवेचन करून डॉ. प्रमोद गायकवाड म्हणाले, शहनाई वादन करणाऱ्या कलाकारांची संख्या फारच कमी आहे, कारण हे वाद्य वाजवायला फार अवघड आहे. वादनाचे तंत्र सहजासहजी आत्मसात करता येत नाही. वादनासाठी आवश्यक असणारी ‌‘रिड‌’ स्वत: तयार करावी लागते. थोडीजरी चूक झाली तरी वादन बेसूर होते.

डॉ. गायकवाड यांनी रागेश्री राग सादर केला. त्यांना नम्रता गायकवाड (सहवादन), निलेश रणदिवे (तबला) यांनी यांनी साथसंगत केली तर शिल्पा देशपांडे यांनी संवाद साधला.

शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने गानवर्धन संस्था 1982 पासून मुक्त संगीत चर्चासत्राचे आयोजन करीत आहे. शास्त्रीय संगीतामधील गायन, वादन व नृत्य या विषयांमधील शास्त्र, सौंदर्यस्थळे व सादरीकरण याविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन उभरत्या कलाकारांना उपयुक्त ठरते, असे दयानंद घोटकर यांनी प्रास्ताविकात सांगितले.
मुक्तसंगीत चर्चासत्र या गानवर्धनच्या उपक्रमाचे कौतुक करून अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना आनंद माडगुळकर म्हणाले, ताल, सूर, नृत्य ही ईश्वराची देणगी असून या सांगीतिक प्रकाराला भाषेची गरज लागत नाही. हे संगीत वैश्विक असल्याने प्रत्येकाला यातून आनंद मिळू शकतो.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासंती ब्रह्मे यांनी केले.

सोमवारी पिंपरी चिंचवड मधील सर्व परमिट रूम आणि बार बंद-तिप्पट कर वाढीचा निषेध..

पिंपरी, पुणे (दि. १२ जुलै २०२५) राज्य सरकारने मद्य विक्रेत्यांवर अन्यायकारकपणे करवाढ लादली आहे. यामध्ये मूल्यवर्धित कर पाच टक्क्यांवरून दहा टक्के, वार्षिक परवाना शुल्क मध्ये १५ टक्के आणि उत्पादन शुल्कात तब्बल ६० टक्के वाढ करण्यात आली आहे. या वर्षभरात ही तिसऱ्यांदा करवाढ केली आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातील हॉटेल व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडतील आणि इच्छा नसताना देखील त्यांना आपला व्यवसाय बंद करावा लागेल पर्यायाने बेरोजगारीत वाढ होईल. राज्य सरकारने केलेल्या या अन्यायकारक करवाढीच्या विरोधात सोमवारी (दि. १४ जुलै) पिंपरी चिंचवड शहरातील सर्व हॉटेल्स परमिट रूम व बियर बार बंद ठेवून राज्य सरकारचा निषेध करण्यात येणार आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश कुदळे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

शनिवारी, पिंपरी गणेश हॉटेल येथे झालेल्या असोसिएशनच्या बैठकीत पिंपरी चिंचवड हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे पदाधिकारी उल्हास शेट्टी, प्रसाद शेट्टी, नवीन लायगुडे, पद्‌द्मनाभ शेट्टी, राकेश शेट्टी, बापूसाहेब फटांगरे, सुमित बाबर, सत्यविजय तेलंग, हरीश शेट्टी, सुधाकर शेट्टी, संतोष ठाकूर, तेजस जुनवणे, नंदकुमार काटे, अभिषेक शेट्टी, जगदीश शेट्टी, रमेश तापकीर, चेतन फुगे, किरण सुवर्णा, महेश नागराणी आदी पदाधिकारी तसेच हॉटेल व्यवसायिक उपस्थित होते.

राज्य सरकारने लादलेल्या अन्यायकारक करवाढीच्या विरोधात महाराष्ट्र राज्यातील हॉटेल व्यवसायिकांच्या ‘आहार’ (ऑल इंडिया हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशन) या शिखर संघटनेने सोमवारी (१४ जुलै) बंद पुकारला आहे. राज्यभरातील २० हजारांहून अधिक हॉटेल आणि रेस्टॉरंट या बंद मध्ये सहभागी होणार आहेत. यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील हॉटेल व्यवसाय बंद ठेवून निषेध करणार आहे असे उल्हास शेट्टी यांनी सांगितले.या अन्यायकारक कारवाढी मुळे दीड लाख कोटी रुपयांची उलाढाल असलेला हा उ‌द्योग अक्षरशः बंद होण्याची वेळ आली असल्याचे प्रसाद शेट्टी यांनी सांगितले.
असोसिएशनच्या वतीने यापूर्वी अनेक वेळा सरकारला निवेदन देण्यात आले. मात्र सरकारकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहारच्या नेतृत्वाखालील २० हजारांहून अधिक हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांनी सरकारच्या अन्यायकारक कर धोरणांचा विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे असे पद्मनाभ शेट्टी यांनी सांगितले.या अन्यायकारक करवाढी मुळे भ्रष्टाचार वाढेल असे मत नवीन लायगुडे यांनी सांगितले.२० हजार पेक्षा अधिक परवानाधारक हॉटेल, रेस्टॉरंट तसेच सुमारे २० लाख लोकांचा रोजगार आणि ४८ हजार पुरवठादार या क्षेत्रावर अवलंबून आहेत.

विशेषतः मुंबई आणि पुणे यांसारख्या शहरांमध्ये हे उ‌द्योग पर्यटन आणि अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आहारने केंद्र सरकारच्या पर्यटन विकास योजनेचाही संदर्भ दिला आहे. केंद्र सरकार जागतिक बँकेच्या सहकार्याने मुंबईला आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून उभारण्याचा प्रयत्न करत असताना सरकार मात्र हा व्यवसाय संपवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

कोरोना काळापासून संपूर्ण हॉस्पिटेलिटी उद्‌द्योग मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरा जात आहे. याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. आता सोमवारी संपूर्ण महाराष्ट्रातील परवानाधारक हॉटेल आणि बार अँड रेस्टॉरंट बंद करण्याशिवाय पर्याय नाही. हा सरकारच्या दंडात्मक करव्यवस्थेचा निषेध करीत पिंपरी चिंचवड शहरातील सर्व हॉटेल्स व्यावसायिक या बंदमध्ये सहभागी होणार आहेत असे पत्र पिंपरी चिंचवड हॉटेल असोसिएशनच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

पशुसंवर्धन व्यवसायास कृषीसमकक्ष दर्जा देणारे महाराष्ट्र पहिले राज्य-पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

पुणे, : राज्य मंत्रिमंडळाने पशुसंवर्धन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेत राज्यातील लाखो पशुपालकांना मोठा दिलासा दिला आहे. असा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या निर्णयानुसार पशुधन आधारित सर्व व्यवसाय आता कृषी व्यवसायाच्या समकक्ष मानले जातील, अशी घोषणा पशुसंवर्धनमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी (दि. ११जुलै) विधीमंडळात केली.

या धोरणात्मक सुधारणेमुळे दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन व वराहपालन व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांना नव्या सवलतींचा लाभ होणार आहे. पशुसंवर्धन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याबाबत विभागाने सादर केलेल्या प्रस्तावावर मंत्रिमंडळाने चर्चा केली व विविध निर्णय घेण्यात आले.

यामध्ये 25 हजार मांसल कुक्कुट पक्षी / 50 हजार अंडी उत्पादक कुक्कुट पक्षी क्षमतेच्या तसेच 45 हजार क्षमतेच्या हॅचरी युनिटच्या कुक्कुटपालन व्यवसायास, 100 दुधाळ जनावरांचे संगोपन, 500 मेंढी /शेळीपालन व 200 वराह या पशुसंवर्धन विषयक व्यवसायासाठी वीज दर आकारणी ‘कृषी इतर’ या वर्गवारीनुसार न करता कृषी वर्गवारीप्रमाणे करण्यास मान्यता देण्यात आली. पशुपालन व्यवसायास स्वतंत्र व्यवसाय न समजता शेती व्यवसाय समजून ग्रामपंचायत कर दरात एकसमानता आणण्याकरिता कृषी व्यवसायास ज्या दराने कर आकारणी केली जाते, त्याच दराने कर आकारणी करण्यास मान्यता देण्यात आली.

कृषीप्रमाणे पशुपालन व्यवसायास कर्जावरील व्याज दरात सवलत देण्यास मान्यता देण्यात आली. कृषीप्रमाणे कुक्कुटपालन व इतर पशुसंवर्धन व्यवसायासाठी सोलर पंप व इतर सोलार संच उभारण्यास सवलत देण्यास मान्यता. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी अतिरीक्त नियतव्यय उपलब्ध करुन देण्यास मान्यताही मंत्रीमंडळाने दिली आहे.

या निर्णयांमुळे शाश्वत शेतीला चालना मिळेल, ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती होईल आणि शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य वाढेल. राज्यातील सुमारे ७५ लाख कुटुंबे पशुसंवर्धनाच्या व्यवसायात आहेत, त्यांना याचा थेट लाभ होणार आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे महाराष्ट्रातील पशुसंवर्धन क्षेत्रात क्रांती घडेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा मंत्री (वित्त व नियोजन) अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेने सन 2028 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचविण्यासाठी पथदर्शी आराखडा अहवाल शासनास सादर केला आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आर्थिक सल्लागार परिषदेने जे घटक उत्पन्न वाढीस चालना देऊ शकतील, असे 8 घटक सुनिश्चित केले आहेत. यामध्ये ‘कृषी व संलग्न’ या घटकाचा समावेश आहे. सद्यस्थितीत राज्याच्या सकल उत्पन्नात कृषी क्षेत्राचा वाटा 12 टक्के इतका असून, कृषी क्षेत्राच्या एकूण उत्पन्नात पशुजन्य उत्पन्नाचा वाटा 24 टक्के इतका आहे. निती आयोगाने सन 2021 च्या अहवालात पशुसंवर्धन व्यवसायापासून देशाच्या / राज्याच्या सकल उत्पादनात पशुसंवर्धन व्यवसायाचा सहभाग वाढविण्यासाठी उपाययोजना करण्याची शिफारस केली होती.

पशुसंवर्धन मंत्री, पंकजा मुंडे आपल्या प्रतिक्रीया देतांना म्हणाल्या, पशुसंवर्धनाच्या व्यवसायास प्रोत्साहन देताना कृषी व्यवसायाप्रमाणे सवलती देणे आवश्यक असल्याने राज्य सरकारने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा दिला आहे. विभागाच्या वाटचालीतील हा एक ऐतिहासिक निर्णय असून, या निर्णयामुळे भविष्यात पशुसंवर्धनाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे ग्रामीण अर्थचक्र गतिमान होईल. अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. असे पशुसंवर्धन आयुक्तालयाने प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

आजचा दिवस हा प्रत्येक शिवप्रेमींसाठी अभिमानाचा – दीपक मानकर

पुणे-

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील १२ गड किल्ल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी प्रदेश” म्हणून मानांकन मिळाल्याबद्दल येथील माजी उपमहापौर आणि युवकात लोकप्रिय असलेले नेते दीपक मानकर यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांना निवेदन देत त्यांचे आणि भारत सरकार व महायुती सरकारचे आभार मानले.
दीपक मानकर यांनी निवेदनात म्हंटले आहे की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या,शौर्यगाथेची साक्ष देणारे महाराष्ट्रातील किल्ले साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला असे १२ किल्ले युनेस्को जागतिक वारसा नामांकन यादीत समाविष्ट झाल्याबद्दल तमाम शिवप्रेमी आणि महाराष्ट्रवासीयांकडून भारत सरकार, महायुती सरकार सर्वांचे मन:पूर्वक आभार…!

राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईत १ कोटीहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त

पुणे, दि.12 : राज्य उत्पादन शुल्क सासवड विभागाच्या भरारी पथकाच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत सासवड गावच्याहद्दीत वीर फाटा जेजुरी-सासवड रोड, पुरंदर येथे १ कोटी ३३ लाख ७८ हजार ४०० रुपये इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे,अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे अधीक्षक अतुल कानडे यांनी दिली आहे.

याबाबत सासवड विभागाच्या पथकाने सापळा रचून संशयित वाहन टाटा कंपनीचा एलपीटी (१२१२) सहाचाकी माल वाहतूक कंटेनर क्र. MH-४९-एटी-३४७१ वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये गोवा राज्य बनावटीचे रॉयल ब्लु माल्ट व्हीस्की मद्याचे १८० मि.ली क्षमतेच्या प्रत्येक बॉक्समध्ये ४८ बाटल्या या प्रमाणे एकूण १२०४ बॉक्स (५७ हजार ७९२ बाटल्या) अशा प्रकारे एकुण रुपये १ कोटी १५ लाख ५८ हजार ४०० हजार इतक्या किंमतीचा मद्यसाठा, वाहन व मोबाईलसहीत एकुण १ कोटी ३३ हजार ७८ हजार ४०० रुपये इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यामध्ये वाहनचालकाविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ तील कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

या कारवाईत उपअधीक्षक संतोष जगदाळे, निरीक्षक संभाजी बरगे यांनी सहभाग घेतलेला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक संभाजी बरगे हे करीत आहेत.

जिल्ह्यात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीविरुद्ध नियमित कारवाई सुरु राहणार असून कोणत्याही नागरिकास अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीबाबत माहिती मिळाल्यास त्यांनी टोल फ्री. क्रमांक. १८००२३३९९९९ व दुरध्वनी क्रमांक ०२०-२६०५८६३३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मिसिंग लिंक प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांकडून मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी

पुणे दि.१२- यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. या प्रकल्पातील एक बोगदा देशातील सर्वात लांब बोगदा असून या प्रकल्पामुळे पुणे-मुंबई प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या कामाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार बाळा भेगडे, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, सह व्यवस्थापकीय संचालक मनुज जिंदल, राजेश पाटील मुख्य अभियंता राजेश निघोट, अधीक्षक अभियंता राहुल वसईकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, मुंबई- पुणे या महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई-पुणे हे अंतर कमी होणार असल्याने प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. महामार्गावरील घाट असलेला भाग या प्रकल्पामुळे टाळता येणार असून घाटमार्गामुळे होणारा वाहतुक अडथळा दूर होणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर या महामार्गावर आरामदायी प्रवास होणार आहे.

मिसिंग लिंक प्रकल्पांतर्गत एकूण तीन बोगदे असून एक बोगदा ९ किलोमीटर लांब व २३ मीटर रुंदचा असून देशातल्या सर्वात जास्त लांबीचा बोगदा ठरणार आहे. या अगोदर समृद्धी महामार्गावरील बोगद्याचा विक्रम या बोगद्यामुळे मागे पडेल. प्रकल्पांतर्गत अतिशय उंच पूल बांधण्यात येत असून याची उंची १८५ मीटर आहे. देशामध्ये आत्तापर्यंत एवढा उंच पूल कुठल्याच ठिकाणी बांधला गेला नाही. हा देखील एक विक्रम होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळच्यावतीने या प्रकल्पाचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. या प्रकल्पाचे एकूण ९४ टक्के काम पूर्ण करण्यात आले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असेही श्री.फडणवीस म्हणाले. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत प्रकल्पाचे काम करणारे अभियंते आणि कामगारांचे कौतुक केले. उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, मिसिंग लिंक प्रकल्प हा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बांधण्यात येत असून, हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहे. येथील वातावरण व हवेच्या दाबाची स्थिती पाहता अतिशय कठीण परिस्थितीमध्ये अनेक अभियंते येथे काम करीत आहेत. हा प्रकल्प सुरू झाल्यावर मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास अर्ध्या तासाने कमी होणार असून या घाट भागातील वाहतुकीची समस्या पूर्णपणे सुटण्यास आणि अपघात टाळण्यास मदत होणार आहे. महामार्गावरील या प्रकल्पामुळे वेळेसोबतच इंधनाचीही बचत होईल, प्रदूषणही कमी होईल. देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासाला या प्रकल्पामुळे चालना मिळणार असून सर्वसामान्य नागरिकांना व राज्यातल्या जनतेला हा प्रकल्प दिलासादायक ठरेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी व्यवस्थापकीय संचालक श्री. गायकवाड यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली.

खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

पुणे-भाजप हा नेहमीच कार्यकर्ता यांना वेगवेगळ्या संधी देत असतो. कार्यकर्ता याची क्षमता पाहून त्याला वेगवेगळी संधी दिली जाते. भाजप पक्ष हा पुढील पिढी देखील दूरदृष्टीने तयार करत असतो. खासदार मुरलीधर मोहोळ हे त्यांना दिलेले काम झोकून देऊन करण्याचा नेहमी प्रयत्न करतात. राजकीय आणि प्रशासकीय कामात ते कुस्ती परंपरा प्रमाणे कौशल्यपूर्वक एकाचवेळी विविध कामे करतात. कोरोना काळात मुरलीधर मोहोळ यांनी नियोजनबद्ध काम केले त्यामुळे देशात त्यांचे नाव झाले. सदर काळात विविध क्षेत्रासाठी आणि लोकांकरिता त्यांनी अतुलनीय काम केले. संयम न सोडता आणि पाठपुरावा करून त्यांनी आपले काम आतापर्यंत केले. संकटात जो काम करतो तो खरा नेता असतो. त्याचमुळे त्यांची नवी ओळख निर्माण झाली असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक विभाग राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने “24 तास जनसंपर्क कार्यालय” शुभारंभ व प्रथम वर्ष कार्यअहवाल प्रकाशन तसेच कोरोना काळातील अनुभव कथन करणारे ” प्रथम माणूस”पुस्तक प्रकाशन या कार्यक्रमांचे आयोजन शनिवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास विभाग राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश पांडे यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मध्यंतरी एक बातमी पाहिली की, देवेंद्र फडणवीस यांचे पुण्यावर विशेष प्रेम असून ते नऊ वेळा पुण्यात आले, पण असे मी काही मोजत नाही. मुरलीधर मोहोळ त्यांचे कार्यालयाचे उद्घाटन आणि वर्षपूर्ती कार्याचे अहवाल प्रकाशन करत आहे ही महत्वाची गोष्ट आहे. देशात कोणत्याही खासदाराचे अशाप्रकारे नागरिकांसाठी २४/७ कार्यालय पाहिले आहे. स्व. गिरीश बापट यांनी चांगले नेतृत्व पुण्याचे केले. त्यांच्या नंतर सर्व वरिष्ठ नेत्यांनी एकमुखाने खासदार पदासाठी मुरलीधर मोहोळ यांचे नाव ठरवले. मोहोळ निवडून आल्यावर त्यांना देशातील महत्त्वाचे खाते काम करण्यासाठी मिळाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत ते काम करत आहे. त्यांची शिस्त कडक आहे. तेथील पद हे जबाबदारीचे असून ते उपभोगता येत नाही. अमित शाह यांनी मला खासगी गप्पात सांगितले की, मुरलीधर मोहोळ चांगला नेता असून अभ्यासू असल्याने त्यांचे भविष्य उज्वल आहे. त्यामुळे त्यांचे काम चांगल्याप्रकारे सुरू आहे. देशभरात मुरलीधर मोहोळ फिरून विविध दिलेली कामे जबाबदारीने पूर्ण करत आहे. सातत्याने विविध ठिकाणी फिरून दांडगा जनसंपर्क देखील ते करत आहे. तसेच पुण्याचे केंद्राकडे असलेले विषय सातत्याने पाठपुरावा करतात त्यामुळे जागृत प्रतिनिधी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठबळ दिले आणि महाराष्ट्र सरकार मधील विविध मंत्री यांनी अनेकांशी संवाद साधत राज्यातील महत्त्वपूर्ण किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले. त्यातून जागतिक वारसा स्थळ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले यांचा समावेश नुकताच झाला आहे. विविध आंतरराष्ट्रीय निकष पूर्ण करून ही मान्यता मिळाली आहे. पश्चिम घाटात, जंगल, समुद्र किनारे या जागी अभूतपूर्व स्थापत्य शैली कला किल्ल्याचे माध्यमातून विकसित करण्यात आलेली आहे. जंजिरा सारख्या किल्ल्याची बांधणी अचंबित करणारी आहे. त्यामुळे आता मराठा आणि हिंदवी साम्राज्याचा इतिहास जागतिक स्तरावर व्यापक स्वरूपात पोहचला जाणार आहे. जागतिक पर्यटक आणि अभ्यासक यांच्यासाठी ही ठिकाणे आता महत्वपूर्ण क्षेत्र झाली आहे.

मिसिंग लिंक मधून नवीन इको सिस्टिम

पुणे ते मुंबई दरम्यान द्रुतगती महामार्गावर जो मिसिंग लिंक तयार होत आहे त्यामुळे अर्धा तास प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. देशातील सर्वात लांब नऊ किलोमीटर बोगदा, देशातील सर्वात उंच केबल पूल याठिकाणी तयार होत आहे. तसेच पुण्यात दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच तयार केला जाईल पण नवी मुंबई मध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच सुरु होत आहे. यामुळे नवीन इको सिस्टिम या भागात तयार होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

प्रसेनजित फडणवीस यांना ‘शिक्षा भास्कर पुरस्कार’ प्रदान

कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

पुणे : कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य  प्रसेनजित फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राचार्य डॉ. संदीप कदम, संस्थापक संचालक प्रा. यशोधन सोमण , संचालक प्रा. प्रशांत कसबे आणि अंकित लुनावत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्राचार्य डॉ. कदम सरांनी विद्यार्थ्यांना गुरुदक्षिणा म्हणून मोबाईलचा कमी वापर आणि १०० टक्के उपस्थिती ठेवण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी मनोगतातून गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी कीस्टोन परिवारातर्फे शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल १० प्राध्यापकांचा ‘विद्या विभूषण पुरस्कार’ देऊन शाल आणि सन्मानपत्र देत गौरव करण्यात आला. यामध्ये प्रा. शर्वरी कुलकर्णी, प्रा. सागर राजेभोसले, प्रा. विपुल महिंद्रकर, डॉ. सोनाली शिर्के, प्रा. जयश्री पवार, प्रा. सुवर्णा फुले, प्रा. रूपाली नाळे, प्रा. पूनम नझीरकर, प्रा. स्वाती पानेरी आणि प्रा. शीतल माने यांचा समावेश होता. संगणक अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थिनी स्नेहा भोसले आणि अनुष्का पाटील या दोघींनी अंतिम वर्षात दोन्ही सेमिस्टरमध्ये १० SGPA मिळवलेबद्दल त्यांचा आणि त्यांच्या पालकांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी ग्रीटिंग कार्ड मेकिंग स्पर्धेत एकूण ८७ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यात अदनान शेख (१ला), किर्ती कदम (२रा) आणि नक्षत्रा चासकर (३रा) यांनी क्रमशः पारितोषिके मिळवली. चारोळी लेखन स्पर्धेत ४३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यात उर्मिला सुर्वे (१ली), कल्याणी खोडके (२री) आणि इंगवले गुरुराज (३रा) हे विजेते ठरले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसेनजित फडणवीस  यांना त्यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल ‘शिक्षा भास्कर पुरस्कार’, पुणेरी पगडी आणि सन्मानपत्र देऊन कीस्टोन परिवाराने गौरविले. आपल्या मनोगतात प्रमुख पाहुणे फडणवीस यांनी कीस्टोन परिवार आणि सोमण  सर यांचे आभार मानले आणि हा सन्मान त्यांच्या जीवनातील गौरवाचा क्षण असल्याचे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्योग व शिक्षण क्षेत्रातील नव्या आव्हानांची माहिती दिली आणि उपस्थित सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
संस्थापक संचालक प्रा. सोमण  सरांनी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरु शिष्य परंपरेचे महत्व सांगत पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अँकर्स क्लबच्या विद्यार्थ्यांनी केले. संयोजन प्रा. सुवर्णा फुले यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. या कार्यक्रमात १००० पेक्षा अधिक विद्यार्थी, विभागप्रमुख, शिक्षकवर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

मंगळवारी मीरा रोड येथे काँग्रेसची “आम्ही मराठी, आम्ही भारतीय” भाषा कार्यशाळा.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम

मुंबई, दि. १२ जुलै २०२५
मिरा भाईंदर परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये मराठी आणि हिंदी भाषिक वर्गामध्ये काही संघर्ष निर्माण झाला होता. या संदर्भात मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली मोर्चे काढण्याचे आले होते. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात तणाव आणि कटुता निर्माण झाली आहे. ती अजिबात योग्य नाही. ही कटुता आणि तणाव कमी करून संवाद वाढवण्यासाठी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला असून सोमवारी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षाकडून आम्ही मराठी आम्ही भारतीय या भाषा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
विविधतेत एकता हीच भारताची विशेषता आहे. विविध जाती धर्मांचे, वेगळवेगळ्या भाषा बोलणारे लोक आपल्या देशात गुण्यागोविंद्याने एकत्रितपणे राहतात. मुंबई आणि महाराष्ट्रात तर देशाच्या सर्वच भागातून नोकरी, धंद्याच्या निमित्ताने आलेले लोक एकत्रितपणे राहतात. पण गेल्या काही दिवसांमध्ये भाषेच्या मुद्द्यावरून वाद निर्माण केले जात आहेत. राज्य सरकारनेच हा वाद सुरु केला आहे. खासदार निशिकांत दुबेसारखे राज्याच्या बाहेरील भाजपाचे नेते प्रक्षोभक वक्तव्ये करून या वादाला फोडणी देण्याचे काम करत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायद्यासाठी हा वाद निर्माण केला जात आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसतच आहे. हे समाजाच्या महाराष्ट्राच्या हिताचे नाही त्यामुळे हा संघर्ष संपला पाहिजे. सर्वांनी एकोप्याने बंधुभावाने एकत्रित राहिले पाहिजे यासाठीचा प्रयत्न म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या पुढाकाराने मीरा भाईंदर जिल्हा काँग्रेस कमिटीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मंगळवारी १५ जुलै रोजी मीरा रोड च्या नयानगर येथील अस्मिता क्लब येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मीरा भाईंदर परिसरातील मराठी आणि हिंदी भाषिक नागरिक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उरस्थित राहणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन अॅड. गणेश पाटील यांनी दिली आहे.

‘फर्ग्युसन’मध्ये अकरावीसाठी अतिरिक्त तुकड्यांना मंजुरी

पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीसाठी दोन अतिरिक्त तुकड्यांना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मंजुरी दिल्याची माहिती प्राचार्य डॉ. श्याम मुडे यांनी कळविली आहे.

त्यामुळे इयत्ता अकरावी कला आणि विज्ञान शाखांच्या इंग्रजी माध्यमासाठी स्वयंअर्थसहाय्यीत तत्वावर प्रत्येकी एक नवीन तुकडी मिळाली आहे. आता फर्ग्युसनमध्ये विज्ञान विभागाच्या आठ आणि कला विभागाच्या चार तुकड्या झाल्या आहेत. नवीन तुकड्यांमध्ये प्रत्येकी 120 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय प्रवेश पद्धतीने केले जात आहेत. आज (रविवारी) दुसऱ्या फेरीसाठी प्राधान्यक्रम ठरविण्याची अंतिम मुदत आहे. विद्यार्थी आणि पालकांना त्याप्रमाणे महाविद्यालयाचे प्राधान्यक्रम ठरवता येतील.

सेवाभावी वृत्तीच्या लोकांमुळेच समाजात संतुलन-राज्यमंत्री माधुरी मिसाळ

ज्येष्ठ बांधकाम व्यवसायिक दत्ताजी गायकवाड यांच्यावतीने विद्यार्थिनींना सायकल : शिक्षण प्रसारक मंडळी व निरामय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : सायकलचा वापर केल्यामुळे केवळ पर्यावरणपूरक प्रवास शक्य होतो असे नाही, तर त्यातून नियमित व्यायामाची सवयही लागते, जी शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. समाजासाठी स्वतःचे जीवन समर्पित करणारे दत्ताजी आणि वैदेही गायकवाड दांपत्य आहे. आजच्या कलियुगातील संतुलन हे सेवाभावी वृत्तीच्या चांगल्या लोकांमुळेच टिकून आहे. भारतीय संस्कृती जपण्याचे आणि सेवाभाव पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम या व्यक्तींच्या माध्यमातून होत आहे, असे मत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केले.

शिक्षण प्रसारक मंडळी व निरामय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नू. म. वि. मुलींची प्रशाला व स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानच्या होतकरू विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्यात आले. स.प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ बांधकाम व्यवसायिक दत्ताजी गायकवाड यांच्यावतीने विद्यार्थिनींना सायकल देण्यात  आल्या. 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होत्या. शिक्षण प्रसारक मंडळी नियामक मंडळ अध्यक्ष ॲड.एस. के. जैन, निरामय संस्थेचे सचिव ज्योतीकुमार कुलकर्णी, शाला समिती अध्यक्ष जयंत किराड, स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधीर काळकर, शि. प्र. मंडळी नियामक मंडळ सदस्य सतीश पवार, मिहीर प्रभुदेसाई , निरामय संस्थेचे विश्वस्त उमेश भोसले इ.मान्यवर यावेळी उपस्थित होते.

माधुरी मिसाळ म्हणाल्या, ‘ग्रीन मोबिलिटी’सारख्या संकल्पना अशा छोट्या कृतीतून प्रत्यक्षात येतात.  विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच स्वच्छतेची जाण आणि वेळेची शिस्त शिकवली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

वैदेही गायकवाड म्हणाल्या, सायकल मिळाल्याने मुलींना आत्मविश्वास आणि योग्य दिशा मिळेल. शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे. अनेकदा शाळा दूर असल्यामुळे बसची गरज भासते, पण त्याचा खर्च परवडत नाही. वेळ वाया जातो, थकवा येतो. अशा परिस्थितीत सायकल केवळ एक साधन नसून ती शिक्षणाच्या प्रवासासाठी एक गुरुकिल्ली आहे. सायकलमुळे लांबचा प्रवास सुकर होईल आणि मुलींना नियमितपणे शिक्षणासाठी जाता येईल. हे फक्त वस्तू वाटप नाही, तर शिक्षणात सातत्य राखण्यासाठी केलेला प्रयत्न आहे.

ॲड. एस. के. जैन म्हणाले, संस्थेच्या किशोरी शक्ती उपक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये एक सकारात्मक परिवर्तन होत आहे. केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणे हे शिक्षण प्रसारक मंडळीचे उद्दिष्ट नसून, राष्ट्रासाठी जबाबदार आणि सजग नागरिक घडवणे हे खरे ध्येय आहे. ही जबाबदारी पूर्ण करण्याचे कार्य शिक्षण प्रसारक मंडळी, निरामय संस्था आणि स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान या तिन्ही संस्था करत आहेत, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निरामय संस्थेचे विश्वस्त उमेश भोसले यांनी केले, सूत्रसंचालन दिपाली वाघोलीकर यांनी केले व शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा गुमास्ते यांनी सर्वांचे आभार मानले.

शहराचे नाव जिजाऊ नगर करावे – आ. उमा खापरे

आ. खापरे यांची विधान परिषदेत लक्षवेधी द्वारे मागणी

पिंपरी, पुणे (दि. १२ जुलै २०२५) पिंपरी चिंचवड शहराचे नाव “जिजाऊ नगर” करून राजमाता जिजाऊ यांचा गौरव करण्यात यावा अशी मागणी आमदार उमा खापरे यांनी विधान परिषदेत पावसाळी अधिवेशनात केली.
मुंबई, विधान भवनात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात शुक्रवारी (दि.११ जुलै) आमदार उमा खापरे यांनी लक्षवेधी द्वारे सभापतींकडे मागणी करताना सांगितले की, पिंपरी, चिंचवड, भोसरी या गावांच्या एकत्रीकरणाने पिंपरी चिंचवड शहराची स्थापना करण्यात आली. पिंपरी चिंचवड शहराला इंग्रजीमध्ये “पीसीएमसी”असे संबोधण्यात येते हे संयुक्तिक नाही. जर पिंपरी चिंचवड शहराला “जिजाऊ नगर” नाव दिले तर शहराचा पूर्वीचा ऐतिहासिक वारसा जपणूक केल्यासारखे होईल. तसेच राजमाता जिजाऊ यांचा तो सन्मान देखील ठरेल. राजमाता जिजाऊ यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श या शहराला झालेला आहे. राजमाता जिजाऊ यांनी दापोडी मधील महादेव मंदिरात दर्शन घेतल्याचे इतिहासात नोंद आहे. तसेच चिंचवड गावातील महासाधू मोरया गोसावी महाराजांच्या मंगलमूर्ती वाड्यात जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाल्याचे इतिहासात नमूद आहे. आत्ताचे भोसरी गाव म्हणजे राजा भोज यांची भोजापूर नगरी असल्याचा उल्लेख देखील शीलालेखात नोंद आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांची नावे बदलण्यात आली आहेत. पिंपरी चिंचवड शहराला जिजाऊ नगर असे नाव द्यावे अशी मागणी यापूर्वी भक्ती शक्ती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश हिरामण बारणे तसेच शहरातील अनेक संस्था, संघटना, मंडळ, ट्रस्ट आणि नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.