Home Blog Page 462

नृत्य हा लोकांतात केलेला योगच : नृत्यगुरू डॉ. स्वाती दैठणकर

गानवर्धन, स्वरझंकार ज्ञानपीठ आयोजित मुक्तसंगीत चर्चासत्र

पुणे : भरतनाट्यम्‌‍ ही मंदिरात ईश्वरासमोर सादर होणारी कला असून तो ईश्वराप्रती पोहोचण्याचा मार्ग आहे. ज्या प्रमाणे योगसूत्रात अष्टांग योग आहेत त्याप्रमाणे नृत्ययोगातही अनेक हस्तमुद्रा व वर्ण यांच्याद्वारे योगसूत्राची मांडणी केलेली दिसते. अष्टांग योगात यम, नियम, आसन अशा क्रमाने समाधीपर्यंत पोहोचता येते. त्याचप्रमाणे भरतनाट्यम्‌‍ नृत्याद्वारे पुष्पांजली, अलारिपु या क्रमाने पुढे जात तिल्लानातून सच्चितानंदाचा आविष्कार प्रकट होतो. त्यामुळेच योग ही एकांतसाधना असेल तर नृत्य हा लोकांतात केलेला योग आहे, असे विचार सुप्रसिद्ध भरतनाट्यम्‌‍ नृत्यगुरू डॉ. स्वाती दैठणकर यांनी व्यक्त केले.

गानवर्धन आणि व्हायोलिन अकादमीचे स्वरझंकार ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुक्तसंगीत चर्चासत्रात दुसऱ्या दिवशी (दि. 13) नृत्यगुरू स्वाती दैठणकर यांचे ‌‘नृत्ययोग.. अद्वैताचा प्रवास‌’ या विषयावर शिष्यांसह स-प्रत्याक्षिक व्याख्यान झाले. त्या वेळी त्यांनी रसिकांशी संवाद साधला. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पूना गेस्ट हाऊसचे संचालक डॉ. किशोर सरपोतदार यांची विशेष उपस्थिती होती. गानवर्धनचे अध्यक्ष दयानंद घोटकर, व्हायोलिन अकादमीच्या स्वरझंकार ज्ञानपीठाचे प्रमुख पंडित अतुलकुमार उपाध्ये, गानवर्धनच्या कोषाध्यक्ष सविता हर्षे मंचावर होते. नृत्यगुरू डॉ. स्वाती दैठणकर यांच्यासह त्यांच्या शिष्या राजलक्ष्मी बागडे, शलाका माडगे, मैथिली साने, श्रीया जोशी यांचा कार्यक्रमात सहभाग होता.

योग ही वैयक्तिक साधना आहे, परंतु नृत्ययोगातून उर्जेचे वहन होऊन नृत्य नर्तकालाच नव्हे तर दर्शकांनाही समाधीची अनुभूती मिळू शकते. आध्यात्मानुसार राजयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग आणि कर्मयोग हे ईश्वरापर्यंत पोहोचण्याचे मार्ग असतील तर आत्मा, परमात्मा आणि गुरूंचे प्रतिक दर्शविणारा नृत्ययोग आपल्याला ईश्वरापर्यंत घेऊन जाऊ शकतो. एवढे सामर्थ्य नृत्यकलेत आहे, असे स्वाती दैठणकर म्हणाल्या. कला ही आयुष्यापेक्षा मोठी आहे, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने करण्यात आली. योग आणि नृत्याची तत्त्वे दर्शविणाऱ्या नटराजाचे वर्णन करणारी ‌‘सांब सदाशिव‌’ ही रचना नृत्यातून सादर करण्यात आली. कर्ण आणि भरतनाट्यम्‌‍ तसेच कर्ण आणि योग यातील साधर्म्य सांगणाऱ्या रचनाही प्रात्यक्षिकांसह सादर करण्यात आल्या. पंचमहाभूते, द्वैत-अद्वैताचा प्रवास दर्शवत ज्ञानेश्वर माऊलींच्या ‌‘कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी‌’ अशा विविध ओव्यांवरही नृत्यविष्कार सादर करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता ‌‘असतो मा सद्गमय‌’ या रचनेतून साकारण्यात आली.

कथक नृत्यांगना डॉ. आसावरी रहाळकर आणि भरतनाट्यम्‌‍ नृत्यांगना रमा कुकनूर यांचा विशेष गौरव स्वाती दैठणकर, डॉ. किशोर सरपोतदार यांच्या हस्ते करण्यात आला.

डॉ. किशोर सरपोतदार म्हणाले, मुक्त संगीत चर्चासत्राच्या माध्यमातून आजचे कलाकार पुढील पिढी घडविण्याचे महत्त्वाचे कार्य करीत आहे. कलाकार आणि रसिकांमधील नाते दृढ होण्यासाठी गानवर्धन, स्वरझंकार सारख्या संस्था कार्यरत आहेत. नामवंत, गुणी कलाकार शोधून त्यांचे कार्य रसिकांपर्यंत पोहोचविण्याचे रत्नपारख्याचे काम या संस्था करीत आहेत.

प्रास्ताविक दयानंद घोटकर यांनी तर डॉ. नीलिमा राडकर यांनी सूत्रसंचालन केले. कलाकारांचा सत्कार पंडित अतुलकुमार उपाध्ये यांच्या हस्ते करण्यात आला. कुमुद धर्माधिकारी, प्रसिद्ध संतुरवादक डॉ. धनंजय दैठणकर, डॉ. राजश्री महाजनी, डॉ. विद्या गोखले, मुकुंद जोशी, वासंती ब्रह्मे, अजित कुमठेकर यांची उपस्थिती होती.

पुणे महापालिकेचे विभाजन करा-प्रस्ताव सरकारला पाठवणार

पुणे-पुणे महापालिकेचे विभाजन करा असा प्रस्ताव सरकारला पाठवणार असल्याची माहिती एस एम जोशी सभागृहात झालेल्या बैठकीनंतर मान्यवर नेत्यांनी दिली या बैठकीला यावेळी अंकुश काकडे, प्रशांत जगताप, सौ. राजलक्ष्मी भोसले, संजय बालगुडे, श्रीकांत शिरोळे, जालिंदर कामठे, आश्विनी कदम, निता परदेशी, शिवा मंत्रि, विरेंद्र किराड, नरेंद्र व्यवहारें, आबा बागूल, सुभाष जगताप, उज्वल केसकर, नितीन कदम, प्रवीण तुपे आदि मान्यवर उपस्थित होते.

पुणे महानगरपालिकेचे स्थापना १९५० साली झाली. त्यानंतर १९९७ साली पहिल्यांदा महानगरपालिका क्षेत्राचा विस्तार झाला. त्यानंतर २०१७ पासून ३४ गावांचा समावेश झाला व त्यानंतर २ गावे वगळण्यात आली. सातत्याने विविध गावांचा महानगरपालिका क्षेत्रात समावेश सुरू आहे. एकीकडे महानगरपालिकेचे क्षेत्र वाढत असताना महानगरपालिकेचे कर्मचारी, अधिकारी व एकूणच सोयी सुविधा मात्र वाढताना दिसत नाहीत. नव्याने समाविष्ट झालेली गावं झपाट्याने ओसाड होत आहेत.

म्हणूनच पुणे महानगरपालिका क्षेत्राचे दोन महानगरपालिकांमध्ये विभाजन करावे अशी मागणी जोर धरत आहे. याच विषयावर मंथन करण्यासाठी माजी महापौर अंकुश काकडे व संजय बालगुडे यांनी चर्चासत्राचे आयोजन केले. या चर्चासत्रात पुणे शहराचे सर्वपक्षीय माजी महापौर, माजी उपमहापौर, जि.प.चे माजी अध्यक्ष, मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यांनी सहभाग घेऊन चर्चा केली. या चर्चेअंती पुणे महानगरपालिकेचे विभाजन करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या संमतीने प्रस्ताव सरकारला पाठवण्यावर एकमत झाले आहे.

हिंजवडीतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना हाती घ्या

पीएमआरडीएमध्ये झालेल्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निर्देश

पिंपरी (दि. १३) : हिंजवडी आयटी क्षेत्राला अधिक चालना देण्यासाठी या भागातील वाहतूक व्यवस्था विनाअडथळा आणि जलद गतीने कशी करता येईल, त्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करणे अपेक्षित आहे. यासाठी काही नवीन रस्ते प्रस्तावित तसेच रुंद करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयात रविवारी (दि.१३) झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

नैसर्गिक ओढे – नाल्याभोवती अतिक्रमण तसेच प्रवाह अडवल्यामुळे हिंजवडी आयटी पार्कसह इतर भागात पावसाचे पाणी साचत असल्याने नागरिकांना अडचणी येत आहे. त्यामुळे अशा अतिक्रमणावर तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश यावेळी उपमुख्यमंत्री यांनी दिले. या भागातील उद्योग, व्यवसायाला चालना देण्यासाठी रस्ते रुंद करत विनाअडथळा वाहतूक सुरळीत होईल, अशा उपाययोजना हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले. हिंजवडी, माण, मारुंजीसह शहर परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पर्यायी नवीन रस्त्यांची आखणी तसेच रस्ते मोठे करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हिंजवडीसह परिसरातील रस्ते खराब झाले असून त्याची तातडीने दुरुस्ती करत नाल्यातील अनधिकृत बांधकामे पाडावीत, नाल्यांचा प्रवाह कोणी बदलला, याची चौकशी करत अशा बांधकामांवर कठोर कारवाईचे निर्देश, यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिले. यासह पाण्याचा नैसर्गिक प्रवाह खुला करत, वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आराखड्यातील रस्ते तसेच नवीन रस्त्याची आखणी करत यासंबंधी तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. बैठकीत पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी हिंजवडी भागात केलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने तसेच रिंग रोडच्या कामाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

या बैठकीला आमदार शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, एमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीसीएमसीचे आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, मुख्य अभियंता रिनाज पठाण यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुणे मेट्रो लाईन ३ चे काम गतीने पूर्ण करावे

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बैठकीपूर्वी हिंजवडी आयटी पार्क परिसरातील पुणे मेट्रो लाईन ३ स्थानक, हिंजवडी आदी भागातील मेट्रोच्या कामाची पाहणी करून मेट्रो लाईनचे काम गतीने पूर्ण करावे अशा सूचना मेट्रो व टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. हिंजवडी, माण, मारुंजी भागातील नैसर्गिक ओढे – नाल्यांवरील अतिक्रमण तसेच पाण्याचा प्रवाह रोखल्यामुळे पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे संबंधित अतिक्रमणावर कठोर कारवाई करून प्रवाह मोकळे करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासकीय यंत्रणांना यावेळी दिले.

साडेसतरानळीतील मूलभूत सुविधांसाठी रस्त्यावर उतरले ग्रामस्थ!

“सुविधा द्या अन्यथा न्यायालयात दाद मागणार – अमोल नाना तुपे यांचा आक्रमक इशारा!

“स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी झगडावं लागत असेल, तर हा विकासाचा कुठला चेहरा आहे?”

पुणे- साडेसतरानळीतील नागरीकांचा आज संताप शिगेला पोहोचला. पुणे महापालिकेच्या हद्दीत २०१७ मध्ये समाविष्ट झालेल्या या भागातील नागरीकांना आज आठ वर्षांनंतरही पाणी, वीज, रस्ते आणि आरोग्याच्या मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. यामुळे ग्रामस्थांनी आज तीव्र आंदोलन छेडत प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं.

या आंदोलनाचं नेतृत्व क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना यशवंत तुपे यांनी केलं. त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “जर या भागातील समस्या तातडीने सुटल्या नाहीत, तर आम्ही थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठवू!”

🛑 सत्ताधाऱ्यांचे दोन आमदार असूनही साडेसतरानळीला सुविधा नाहीत!

हडपसर विधानसभा मतदारसंघातून दोन सत्ताधारी आमदार असताना देखील या भागात कोणतीच सुधारणा झालेली नाही, अशी तिव्र नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली. आंदोलनादरम्यान नागरिक अक्षरश: आक्रमक झाले होते. प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

📌 साडेसतरानळीतील प्रमुख समस्या

⛔ पिण्याच्या पाण्याचा तीव्र टंचाई – गावात शुद्ध व सुरक्षित पाण्याची कोणतीही हमी नाही. नागरिकांना लांबून पाणी आणावं लागतं.
⛔ खड्डेमय रस्ते – अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांची अवस्था दयनीय, अपघातांचं प्रमाण वाढलंय.
⛔ वारंवार वीज खंडित – अभ्यास, कामकाज विस्कळीत.
⛔ आरोग्य सेवा शून्य – गावात प्राथमिक आरोग्य केंद्रही नाही.
⛔ स्वच्छता व कचरा व्यवस्थापन नाही – गटारी, शौचालयांचा अभाव. आजारांचं प्रमाण वाढलंय.
⛔ कर भरूनही सुविधा नाहीत – घरपट्टी, अन्य कर नियमितपणे घेतले जात आहेत, पण त्या बदल्यात काहीच नाही!

📣 ग्रामस्थांच्या ठाम मागण्या…

📍 शुद्ध पिण्याच्या पाण्याची तात्काळ योजना
📍 सर्व रस्त्यांचं डांबरीकरण आणि दुरुस्ती
📍 वीजपुरवठा सुरळीत करणं
📍 प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी
📍 कचरा व्यवस्थापन व स्वच्छतागृहांची व्यवस्था
📍 कराच्या बदल्यात सुविधा द्याव्यात

🗣️ “न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” – अमोल नाना तुपे

अमोल नाना तुपे यांनी यावेळी जोरदार इशारा दिला, “जर आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या नाहीत, तर आम्हाला महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर उपोषण करावं लागेल. या भागाला महापालिकेत सामावून घेऊन जर सुविधा दिल्या जात नसतील, तर तेच चुकीचं ठरतं!”

📸 …आणि ग्रामस्थांचा संताप कॅमेऱ्यात कैद!

या आंदोलनात महिलांचा देखील मोठा सहभाग होता. हातात पत्रके, घोषणांनी परिसर दणाणून गेला. गावकऱ्यांच्या डोळ्यात असहायतेचा नाही, तर झगड्याचा ज्वाला होता!

🟥 साडेसतरानळीतील नागरीकांच्या व्यथा फक्त घोषणांपुरत्या नाहीत – त्यांना आता कृती हवी आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देणं, हीच काळाची गरज आहे!

“आपत्तीला तोंड देण्यासाठी एकात्म आणि जागरुक समाजाची आवश्यकता”

पुणे(प्रतिनिधी) : “निसर्गात बदल हे होतच राहणार त्यामुळे आपत्ती ही अपरिहार्य आहे. त्या अनुभवातून धडा घेऊन मूलगामी उपाय करण्याची गरज आहे. त्यासाठी एकात्म आणि जागरुक समाजाची आवश्यकता आहे. लोभ ही आपत्ती व्यवस्थापन करताना येणारी सर्वात मोठी अडचण असून संतुलित जीवन पद्धती हाच त्यावरील उपाय आहे. आपत्ती व्यवस्थापनाचा अंतर्भाव शिक्षणात केला पाहिजे. आपत्तीला तोंड देण्यासाठी केवळ भावना पुरेशी नसते तर कौशल्य देखील आवश्यक असते. त्यादृष्टीने सेवा भारतीने चांगले काम केले आहे,” असे प्रतिपादन पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांनी आज येथे केले.
राष्ट्रीय सेवा भारती आणि सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय सेवा साधना – आपदा प्रबंधन’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे आयुक्त शेखर सिंह, मुंबईतील सोमय्या विद्यापीठाचे प्र-कुलगुरु आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ञ प्रा. डॉ. सतीश मोढ आणि सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र या संस्थेचे अध्यक्ष विजय काळे उपस्थित होते.
बृहन् महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सच्या पद्मश्री डॉ. सायरस पूनावाल ऑडिटोरियममध्ये हा समारंभ झाला.
या प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “आपत्तीला तोंड देण्यासाठी कितीही तयारी केली तरी प्रत्यक्षात त्या व्यवस्थेत कमतरता जाणवतेच. ग्रामीण भागात गावकरी तातडीने मदतीसाठी पुढे येतात, मात्र त्यांनाही प्रशिक्षणाची गरज असल्याचे जाणवते. आपद्ग्रस्त परिसरातून नागरिकांचे स्थलांतर करताना खूप सतर्क रहावे लागते. भूकंपाला तोंड देऊ शकतील अशा इमारती बांधल्या आहेत का? असा प्रश्न काही प्रदेशातील बांधकामे बघितल्यावर पडतो. शहरी भागात पाणी तुंबण्याची मोठी समस्या आहे, त्याला अनेक घटक कारणीभूत असतात. नद्यांची लांबी लक्षात घेता नदी किनाऱ्यांवर नजर ठेवणे शक्य होत नाही. आपत्ती व्यवस्थापनासाठी पिंपरी चिंचवडमध्ये महापालिका सेवा भारतीच्या सहकार्याने काही उपक्रम राबवत आहे.”
प्रमुख वक्ते प्रा. डॉ. सतीश मोढ म्हणाले, “दुर्घटना घडते त्या वेळी अनपेक्षित परिस्थितीला सामोरे जावे लागते. त्यासाठी शाळेपासून शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. कोणती दुर्घटना कशामुळे घडते हे सांगणे गरजेचे आहे. आपला जीव कसा वाचवायचा याचे ज्ञान नसते, त्यामुळे हानी होते आणि संकट ओढावते. हे दुष्टचक्र तोडणे आवश्यक आहे. नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण नसल्यामुळे परिस्थितीची जाणीव न झाल्याने अनेक ठिकाणी चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत. दुर्देवाने अशा घटनांचे राजकारण केले जाते. आपला अमूल्य जीव वाचवणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. मुंबईमध्ये मोकळ्या मैदानांवर असणारे केबलचे जाळे ही आपत्कालीन स्थितीत तिथे हेलिकॉप्टर उतरवण्यातील सर्वात मोठी समस्या आहे. मुंबईतील ६० टक्के लोकसंख्या झोपडपट्ट्यांमध्ये राहते, ही कच्ची घरे भूकंपाला तोंड देण्यास सक्षम नाहीत. सुमारे १६ हजार इमारती पावसाळ्यात धोकादायक ठरतात. त्यामुळे भूकंप किंवा वादळासारख्या आपत्तीत सुमारे एक कोटी नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. सरकारने या नागरिकांना मोफत घरे बांधून दिल्यास मानवतेसाठी ते एक वरदान ठरेल. नियम डावलून केलेले बांधकाम म्हणजे आपणच बांधलेली आपली कबर असते, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. सार्वजनिक स्वच्छता, नागरी कर्तव्ये आणि कायद्याचे पालन हे आपत्ती व्यवस्थापनासाठी अतिशय आवश्यक आहे.”
हिंदी आणि इंग्रजी भाषेतील या पुस्तकातील लेखकांच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय तज्ञ डॉ. राजन गेंगजे यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “आपत्ती व्यवस्थापन हा विषय वैदिक काळापालून भारतात अस्तित्वात आहे. भगवान श्रीकृष्णांनी हाताच्या करंगळीवर उचलेल्या गोवर्धन पर्वताखाली आसरा घेतलेले गोकुळवासी हे त्याचे उदाहरण आहे. नेतृत्व, निर्णयक्षमता आणि सामुहिक कृती या आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक बाबी आहेत. इसवी सनाच्या ३ ऱ्या आणि ४ थ्या शतकात चाणक्याने चंद्रगुप्त आणि बिंबिसार या राजांना मार्गदर्शन करताना आपत्तीच्या प्रसंगी मदत न करणाऱ्यांना दंड ठोठावण्याचा उपदेश केला होता. २००१ साली गुजरातमध्ये झालेला भूकंप आणि २००४ साली आलेली त्सुनामी या महाप्रलयंकारी घटनांनंतर केंद्र सरकारने उच्चसत्रिय समिती स्थापन केली. त्यानंतर एनडीआरएफ सारख्या यंत्रणा उभ्या राहिल्या आणि आपत्ती व्यवस्थापनाचे चित्र बदलेल. तोपर्यंत देशाची सैन्यदले आपत्तीत मदतकार्य करत होती, वास्तविक त्यासाठी सैन्य तयार केले जात नाही. समाजाला प्रशिक्षण देणे महत्वाचे काम असून सेवा भारती ते करत आहे. समाजाला प्रोत्साहित करण्यासाठी प्रभावशाली व्यक्तींची मदत सेवा भारतीने घ्यावी.”
सेवा भारती पश्चिम महाराष्ट्रचे सचिव प्रदीप सबनीस यांच्या हस्ते डॉ. गेंगजे यांचा प्रातिनिधिक स्वरुपात सत्कार करण्यात आला.
समारंभाच्या प्रास्ताविकात विजय काळे यांनी सेवा भारती पश्चिम महाराष्ट्रच्या कार्याचा आढावा घेताना शिक्षण, आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयांना प्राधान्य देत लहान शाळांमध्ये फिरत्या प्रयोगशाळा,लहान गावांमध्ये फिरते दवाखाने, शहरातील वस्त्यांमध्ये संस्कारवर्ग, अभ्यासिका आदी उपक्रम सुरू असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास रा स्व संघांचे प्रांत सहकार्यवाह महेशराव करपे,सेवा प्रमुख शैलेंद्रजी बोरकर तसेच सेवा भारती प्रांत सचिव प्रदीपजी सबनीस आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवा भारती पश्चिम महाराष्ट्रचे प्रांत कोषाध्यक्ष सुधीर जवळेकर यांनी केले.

लोकांनी ज्यांना नाकारले, जे मागून आले ..त्यांना भाजपने खासदार केले – वर्षा गायकवाड

मुंबई-ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. यावर कॉंग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांचे मी अभिनंदन करते, पण एक प्रश्न इथे येतो की, माधव भंडारी जे आमच्या विरोधात इतके बोलत होते, त्यांना संधी दिली गेली नाही.भारतीय संविधानाच्या कलम 80 (3) अंतर्गत, राष्ट्रपतींना राज्यसभेत 12 सदस्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार आहे. हे सदस्य कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा यासारख्या क्षेत्रात विशेष योगदानासाठी निवडले जातात. राज्यसभेच्या एकूण सदस्यांची संख्या 250 आहे, ज्यामध्ये 238 निवडून आलेले आणि 12 नामांकित सदस्य आहेत.

पुढे बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, पूनम महाजन यांच्या वडिलांपासून भाजपमध्ये सगळे सक्रिय आहेत, त्यांना डावलण्यात आले आणि जे मागून आले त्यांना संधी दिली, अशा शब्दांत गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच लोकसभेत त्यांना मी नाही, जनतेने पाडले आहे. जनतेने त्यांचा पराभव केला आहे, असेही वर्ष गायकवाड म्हणाल्या.लोकसभेच्या निवडणुकीत भाजपकडून कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईमधून उमेदवारी दिली होती. परंतु, या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. ही त्यांची पहिलीच राजकीय निवडणूक होती. पराभवानंतर देखील उज्ज्वल निकम यांची पुन्हा राज्याचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, कॉंग्रेसने त्यांच्या नियुक्तिवर फेरविचार करण्यात यावा असे सुचवत त्यांच्या नियुक्तीला विरोध केला होता.

वर्षा गायकवाड पुढे बोलताना म्हणाल्या, आजही संविधान बचाव जनसंवाद सभेचे आयोजन केले जात आहे. सध्या देशात असंविधान सुरू आहे. सगळीकडे कचऱ्याचे साम्राज्य आहे. अशा नागरिकांचा आवाज बनणार तरी कोण? त्यासाठी आम्ही ही सभा आयोजित केली आहे. लोकांना संविधानाने बोलण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. पत्रकारांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे. हा अधिकार सरकारकडून काढला जात आहे. आम्ही अदानीबद्दल बोलतो, त्यांच्यावर आम्ही बोलायचे नाही का मग? सगळे माओवादी कसे होऊ शकतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, उज्ज्वल निकम यांच्या व्यतिरिक्त केरळचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन मास्ते, भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि सुप्रसिद्ध इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांनाही राज्यसभेवर नामांकित करण्यात आले आहे. या नियुक्त्या त्या जागांसाठी करण्यात आल्या आहेत, ज्या पूर्वी नामांकित सदस्यांच्या निवृत्ती मुळे रिक्त होत्या.

सरहद संस्था भारतरत्न स्व.भूपेन हजारिका यांच्या जन्मशताब्दीनिमित्त देशभर विविध उपक्रम राबविणार.

नवी दिल्ली: यंदाच्या वर्षी भूपेन हजारिका यांच्या जन्मशताब्दीचे(८ सप्टेंबर १९२६ _२०२६) वर्षसुरू होणार असुन देशाच्या सीमावर्ती भागातील जनतेशी नाते जोडण्यासाठी स्थापन झालेल्या सरहद संस्थेच्या वतीने भारतरत्न स्व.भूपेन हजारिका यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर पुणे, मुंबई तसेच दिल्लीत विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती सरहद संस्थेचे विश्वस्त शैलेश वाडेकर आणि अनुज नहार यांनी आज एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
भूपेन हजारिका त्यांच्या अंतिम काळात मुंबईत सरहद संस्थेचा त्यांच्याशी संपर्क आला होता . ईशान्य भारतातील युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घेण्याचेही ठरले होते.महाराष्ट्राशी त्यांचे आपुलकीचे नाते होते.त्यांच्या आयुष्याचा दीर्घकाळ मुंबईतच गेला ते महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानत असत. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावाने संस्थेने त्यांच्या कुटुंबियांच्या संमतीने भूपेन हजारिका राष्ट्रीय पुरस्कार सुरू केला. यंदाच्या वर्षीही ईशान्य भारतातील विविध मान्यवरांना त्यांच्या नावे पुरस्कार देण्यात येणार आहे.
शिवाय पुस्तक प्रकाशने, परिसंवाद, व्याख्याने. हजारिका यांच्या अप्रकाशित गीतांना संगीत देणे, त्यांच्या नावाने स्टुडिओ आणि स्व.जमनाबाई फिरोदिया ईशान्य भारत भवनाची पुण्यात उभारणी असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. संगीताच्या माध्यमातून हिंसाचार आणि दहशतवादाचे प्रमाण कमी करणे शक्य आहे असे त्यांचे ठाम मत होते. हीच स्व.भूपेन हजारिका यांच्या जन्मशताब्दी निमित्त राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची मध्यवर्ती कल्पना आहे.
ईशान्य भारत विकास मंत्री ज्योतिरादित्य शिंदे तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही यासाठी निमंत्रित करण्यात येणार असुन या उपक्रमांचा शुभारंभ सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुण्यात करण्यात येईल असेही पत्रकात पुढे म्हटले आहे.

“नथिंग डुईंग”४५ मिनिटे स्तब्धता पाळा,शांततेच्या अनुभवासाठी एक चळवळ

पुणे, १३ जुलै – सायबर मैत्र आणि GRY फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या “नथिंग डुईंग” या अनोख्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. द लाईव्ह, बिडकर आयकॉन, मदन तलाठी पथ, राहुल नगर येथे सकाळी १० ते १२ या वेळेत हा कार्यक्रम पार पडला.

४५ मिनिटे कोणतीही हालचाल न करता, न बोलता, न वाचता, न फोन वापरता – फक्त शांत बसणे ही कल्पना अनेकांसाठी नवी होती, पण विलक्षण अनुभव देणारी ठरली. किशोरवयीन मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील लोक या ‘चॅलेंज’ मध्ये सहभागी झाले.

कार्यक्रमाचे निरीक्षक म्हणून निरंजन मेढेकर, ममता क्षेमकल्याणी आणि अभिजित पेंढारकर यांनी निरीक्षक म्हणून काम बघितले. 

प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शिरीषा साठे या प्रमुख पाहुण्यांनी ‘डोपामिन सर्ज’ आणि डिजिटल माध्यमांच्या व्यसनाधीनतेबाबत अभ्यासपूर्ण व अंतर्मुख करणारे विचार मांडले. सततच्या ऑनलाईन वापरामुळे कंटाळवाण्या क्षणांना सामोरे जाण्याची आपली क्षमता कमी होत चालली आहे, हे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.

सायबर मैत्रच्या संस्थापक मुक्ता चैतन्य यांनी कार्यक्रमामागील हेतू सांगताना सांगितले:

‘नथिंग डुईंग’ हा फक्त एक प्रयोग नसून एक चळवळ आहे. सततच्या डिजिटल वापरामुळे, करमणुकीच्या शोधात, आणि डोपामिनच्या अतिरेकात आपण स्वतःपासून दुरावत चाललो आहोत. या उपक्रमामार्फत लोकांना पुन्हा एकदा स्वतःकडे वळण्याची, शांतपणे काहीही न करता बसून राहण्याची संधी मिळावी, असा माझा हेतू होता. हे केवळ अनप्लगिंग नाही, तर स्वतःशी पुन्हा एकदा जोडून घेण्याचा प्रयत्न आहे.

सायबर मैत्र आणि GRY फाउंडेशन यांनी या आगळ्या उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार मानले. यापुढेही असे कार्यक्रम सातत्याने राबवण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमानंतर अनेक सहभागींनी या ४५ मिनिटांच्या शांततेचा अनुभव अतिशय सकारात्मक आणि अंतर्मुख करणारा असल्याचे सांगितले.

भरकटलेला राष्ट्रवाद घातक : डॉ. कुमार सप्तर्षी

पुणे: महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने आज, १३ जुलै रोजी कोथरूडमधील गांधी भवन येथे  झालेल्या ‘गांधी दर्शन’ शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत हा कार्यक्रम पार पडला. या २२ व्या शिबिरात विविध वयोगटांतील कार्यकर्त,नागरिक सहभागी झाले.

शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यांनी आपल्या भाषणात गांधी विचारांचे सामाजिक व राजकीय महत्त्व आजही कायम असल्याचे सांगून, युवकांनी गांधी तत्त्वज्ञानाशी नवा संवाद साधावा, असे आवाहन केले.सगळे एकसारखे असावे, असे वाटणारा राष्ट्रवाद हा भरकटतो. राष्ट्रवाद हा प्रगल्भ नसेल तर भरकटतो. गांधीवाद हा भरकटलेल्या राष्ट्रवादाला उत्तर आहे’. असेही ते म्हणाले.

 लेखक आणि तंत्रज्ञानतज्ज्ञ डॉ. अच्युत गोडबोले यांनी “कृत्रिम बुद्धिमत्ता आणि समाजावरील परिणाम” या विषयावर अत्यंत समर्पक आणि विचारप्रवर्तक मांडणी केली. त्यांनी तंत्रज्ञानाच्या वेगाने बदलणाऱ्या जगात गांधीजींच्या मूल्यांची गरज अधिक तीव्र असल्याचे अधोरेखित केले.

ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी “जागतिकीकरण आणि स्थानिक समाजरचना” यावर भाष्य करताना जागतिकीकरणाच्या विळख्यात हरवणाऱ्या मूल्यांची आठवण करून दिली. त्यांनी सांगितले की, गांधीजींचे विचार जागतिकीकरणालाही मानवतेचा चेहरा देऊ शकतात.महाराष्ट्राने प्रबोधनाचे कार्यक्रम थांबवता कामा नये. केडर कॅम्प, शिबीरे सुरु राहिली पाहिजेत.बाजारपेठ जिंकणे हा जागतिकीकरणाचा उद्देश असतो.सार्वजनिक व्यवस्था बदनाम करून भांडवलशाहीकडे दिल्या गेल्या.इतिहासाची पुनरावृत्ती होत नाही, आणि इतिहास वर्तमानाचे प्रश्न सोडवत नाही. तरीही इतिहासासाठी आपण भांडत बसतो’, अशीही टिप्पणी त्यांनी केली.

लेखक आणि कायदेतज्ज्ञ ऍड. शंकर निकम यांनी “भरकटलेला राष्ट्रवाद” या विषयावर आपले विचार मांडले. त्यांनी स्पष्ट केले की, खऱ्या अर्थाने राष्ट्रवाद म्हणजे सन्मान, समता आणि सर्वसमावेशकता – जे गांधीजींच्या विचारसरणीत प्रकर्षाने दिसते.

राष्ट्रवाद सर्वसमावेशक असला पाहिजे. हिटलर चा राष्ट्रवाद हा फसलेला राष्ट्रवाद होता. संकुचितपणा हा राष्ट्रवादाला घातक आहे.चकवा लागलेल्या नेतृत्वाच्या मागे गेल्यावर समाजाची हानी होते’.

अनिकेत पालकर यांनी वक्त्यांचे स्वागत केले.अन्वर राजन, एम एस जाधव, ज्ञानेश्वर मोळक, अप्पा अनारसे, स्वप्नील तोंडे इत्यादी उपस्थित होते.

शिबिरात सत्य, अहिंसा, सामाजिक बांधिलकी, ग्रामस्वराज्य आणि स्वावलंबन यासारख्या मूलगामी विचारांवर चर्चा झाली. सहभागींसाठी हे शिबिर वैचारिक समृद्धीचा आणि अंतर्मुखतेचा अनुभव ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तर सत्रात सहभागींनी विविध मुद्द्यांवर संवाद साधला.

‘गांधी दर्शन’ शिबिराचे आयोजन हे केवळ स्मरणरंजन नव्हे, तर गांधीवादी तत्त्वांना नव्या पिढीसमोर अर्थपूर्ण रीतीने सादर करण्याचा प्रयत्न होता. या शिबिरातून मिळालेल्या प्रेरणेने युवक आणि कार्यकर्त्यांनी गांधी विचारांची व्याप्ती वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला.

………

द्वंद्वाची उत्तरे मिळतात तेच खरे प्रभावी साहित्य : डॉ. निलम गोऱ्हे

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे डॉ. आशुतोष जावडेकर यांचा काव्य प्रतिभा पुरस्काराने गौरव

पुणे : माणसाच्या मनातील द्वंद्वाची उत्तरे जेव्हा साहित्यातून सापडतील तेव्हाच ते साहित्य अधिक प्रभावी ठरेल, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. संगीतकार, गीतकार, कवी, लेखक, डॉक्टर असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. आशुतोष जावडेकर यांनी राजकीय पार्श्वभूमी असूनही स्वत:ची सर्जनशीलता जपली आहे; त्यांचे लिखाणही प्रभावी आहे. ते खऱ्या अर्थाने पु. ल. देशपांडे यांचा वारसा जपणारे आहेत, असे गौरवोद्गार विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काढले.

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे काव्य प्रतिभा पुरस्काराने प्रसिद्ध व्याख्याते, लेखक, कवी डॉ. आशुतोष जावडेकर यांचा आज (दि. 13) डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्या वेळी डॉ. गोऱ्हे अध्यक्षपदावरून बोलत होत्या. ज्येष्ठ विचारवंत लेखक, कवी डॉ. राजा दीक्षित यांची प्रमुख उपस्थिती होती. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर मंचावर होते. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. नवी पेठेतील पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

तरुण पिढीमुळे सामाजिक-राजकीय परिवर्तन होत असल्याचे सांगून डॉ. निमल गोऱ्हे म्हणाल्या, पुस्तक हेच प्रभावी माध्यम आहे इतर माध्यमे नाहीत, अशी सध्याची परिस्थिती नाही. समाजमाध्यमेही प्रभावी आहेत. समाजमाध्यमांद्वारे अर्थपूर्ण संवाद झाला पाहिजे. परस्परातील संवाद कमी झालेला असताना तो वाढविण्यासाठी रंगत-संगत प्रतिष्ठान विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न करीत असल्याबद्दल त्यांनी ॲड. प्रमोद आडकर यांचे कौतुक केले.

सभात्याग आणि ट्रोलिंगसाठी टोळ्या…

पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त वातावरण वैचारिक आणि आनंददायी असल्याने सभात्यागाची भीती नाही, असे डॉ. निलम गोऱ्हे यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला. समाजमाध्यमावरील ट्रोलिंगचा मुद्द्याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, ट्रोलिंग करण्यासाठी राजकारण्यांनी टोळ्या केल्या आहेत. त्या एक-दोन दिवस ट्रोल करतात पैसा संपला की थांबतात. मी मात्र अशा प्रकारापासून दूर आहे.

समाजमाध्यमांमुळे अभिव्यक्तीचे लोकशाहीकरण : डॉ. आशुतोष जावडेकर

संतसाहित्यामुळे कवितेची ताकद कळल्याचे सांगून सत्काराला उत्तर देताना आशुतोष जावडेकर म्हणाले, श्रवणसुखाच्या मांडवात संगीतकार भेटले, काव्याला चाली देताना कवी भेटले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि शेक्सपिअर साहित्याच्या क्षेत्रातील गुरू आहेत. सध्याच्या काव्यप्रांतावर टीका करताना डॉ. जावडेकर म्हणाले, काव्याच्या व्यासपीठावर हिणकस प्रकार सुरू आहेत. त्या मानाने समाजमाध्यमांवरील कविता चांगल्या आहेत. संपादनाचा अभाव असला तरी अभिव्यक्तीचे लोकशाहीकरण झाल्याचे जाणवते आहे. गीत, काव्य लिखाणाप्रमाणेच गद्य लिखाणातही लय असावी लागते. काव्य लिखाण हे शास्त्रच आहे ते जर पेलता आले नाही तर विस्फोटक ठरू शकते. कविता जगता आली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

साहित्याच्या क्षेत्रातील डॉ. आशुतोष जावडेकर यांची कामगिरी अष्टपैलू असून त्यांना शब्द, सूर आणि लय त्यांना सापडली असल्याचे डॉ. राजा दीक्षित म्हणाले.

सुरुवातीस ॲड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला.

पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त आयोजित निमंत्रितांच्या कविसंमेलनात बंडा जोशी, प्रमोद खराडे, माधव हुंडेकर, मृणालिनी कानिटकर-जोशी, तनुजा चव्हाण, वर्षा बेंडिगेरी-कुलकर्णी, स्वप्नील पोरे, सुजित कदम, विजय सातपुते, डॉ. मृदुला कुलकर्णी-खैरनार यांचा सहभाग होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले तर मानपत्राचे वाचन प्राजक्ता वेदपाठक यांनी केले.

राहुलजी, बलिदान मोठे, त्याग मोठा मग पक्ष का होतोय छोटा ?

पुणे- महाराष्ट्रात एकेकाळी एक प्रबळ शक्ती असलेल्या काँग्रेसला आता पारंपारिक समर्थन आधाराच्या मूक पण सतत ऱ्हासाचा सामना करावा लागत आहे कारण एकेकाळी पक्षाचा कणा असलेल्या अनेक निष्ठावंत कुटुंबांची नवीन पिढी एकतर प्रतिस्पर्ध्यांशी जुळवून घेत आहे किंवा सक्रिय राजकारणातून माघार घेत आहे.
या बदलामुळे काँग्रेसची संघटनात्मक खोली कमकुवत होत आहे आणि या वर्षी होणाऱ्या महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी त्यांच्या अडचणी वाढत आहेत..
गेल्या वर्षी, विधानसभा निवडणुकीत पक्षाला सर्वात वाईट पराभवाचा सामना करावा लागला, २८८ सदस्यांच्या सभागृहात फक्त १६ जागा जिंकल्या. शिवसेना (यूबीटी) आणि राष्ट्रवादी (सपा) सोबत युती करून त्यांनी १०१ जागा लढवल्या.
अलिकडच्या काही महिन्यांत, काँग्रेसशी दीर्घकालीन संबंध असलेल्या कुटुंबांच्या नेत्यांनी असे पाऊल उचलले आहे की, एकेकाळी वचनबद्ध असलेल्या पायावर पक्षाचे कमी होत चाललेले आकर्षण दिसून येते.पक्षाशी वचनबद्ध राहिलेल्या शेवटच्या निष्ठावंत कुटुंबांपैकी एक असलेले ज्येष्ठ काँग्रेस सदस्य अनंत गाडगीळ यांनी अनेक दशकांपासून संघटनेशी संबंधित असलेल्या दुसऱ्या पिढीतील कुटुंबांच्या पलायनाच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली.पक्षाशी वचनबद्ध राहिलेल्या शेवटच्या निष्ठावंत कुटुंबांपैकी एक असलेले ज्येष्ठ काँग्रेस सदस्य अनंत गाडगीळ यांनी अनेक दशकांपासून संघटनेशी संबंधित असलेल्या दुसऱ्या पिढीतील कुटुंबांच्या पलायनाच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली.तिसऱ्या पिढीतील राजकारणी असलेल्या गाडगीळ यांनी पीटीआयला सांगितले की, काँग्रेस विचारसरणीशी खोलवर रुजलेले व्यक्ती म्हणून त्यांना १३९ वर्षे जुन्या पक्षाच्या भविष्याची चिंता होती.
केंद्रीय मंत्रिमंडळातील त्यांच्या वडिलांच्या (बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ) सहकाऱ्यांची मुले आणि इतर अनेक जण काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील झाले आहेत हे पाहून त्यांना अस्वस्थ वाटले.
महाराष्ट्रात माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी २०२४ मध्ये काँग्रेस सोडली आणि आता ते शिवसेनेचे खासदार आहेत. सांगलीमध्ये, कट्टर काँग्रेसी शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र सत्यजित देशमुख भाजपमध्ये सामील झाले.”विडंबना पहा. शिवाजीराव देशमुख यांना कौन्सिलच्या अध्यक्षपदावरून बेकायदेशीरपणे काढून टाकण्यासाठी इतर पक्षांशी हातमिळवणी करणाऱ्या भाजपने नंतर त्यांच्या मुलाला आमदार केले. धुळ्यात, कट्टर काँग्रेसी रोहिदास पाटील यांचे पुत्र कुणाल पाटील यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला.
“पुण्यात, काँग्रेसने त्यांना योग्य बक्षीस दिले नाही असा दावा करून दुसरे काँग्रेसी आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे पुत्र संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे दिग्गज वसंतदादा पाटील यांच्या नात राजश्री पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला,” असे गाडगीळ म्हणाले.
ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे पुतणे आणि एकेकाळी राहुल गांधींचे जवळचे मानले जाणारे सत्यजित तांबे केवळ स्वतंत्र आमदार झाले नाहीत ते सर्व पारंपारिक काँग्रेसी कुटुंबातील होते,” असे माजी आमदारांनी नमूद केले.काँग्रेस नेते शिवराज पाटील यांच्या सून अर्चना पाटील २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेल्या आणि लातूर शहरातून काँग्रेसचे अमित देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढवली.
गाडगीळ म्हणाले की, गेल्या काही वर्षांत काँग्रेसमध्ये दृष्टिकोन बदलला आहे जो निष्ठावंतांना तसेच कार्यकर्त्यांना आवडत नाही.
“पक्षातील निष्ठावंतांमध्ये अशी भावना वाढत आहे की बाहेरच्या पक्षातील नेत्यांना कॅाग्रेसमधे येताच लगेच बक्षीस दिले जाते. ते असे निदर्शनास आणून देतात की महाराष्ट्रात गेल्या १०-१२ वर्षांत, ज्यांनी पूर्वी काँग्रेस सोडली त्यातील अनेकांना महत्त्वाची पदे देण्यात आली होती. (निवडणूक) उमेदवारांची चुकीची निवड हा एक मुद्दा आहे. निष्ठावंत काँग्रेसी हे सर्व पचवू शकत नाहीत,” असे त्यांनी म्हटले.त्यांच्या मते, काही वरिष्ठ कार्यकर्त्यांचे असे मत आहे की पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांना योग्य ती माहिती पुरवली जात नाही.
“(काँग्रेस खासदार) सोनिया, राहुल आणि (अध्यक्ष मल्लिकार्जुन) खरगेजी यांना संपूर्ण देशातील पक्षाचे कामकाज पाहावे लागते. त्यांना सर्वकाही माहिती असेल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. म्हणूनच, निवडणुकीदरम्यान पक्ष निरीक्षकांची नियुक्ती केली जाते. परंतु जर निरीक्षकांनी त्यांचे योग्य मूल्यमापन केले नाही तर पक्षाचे नुकसान होते,” असे गाडगीळ यांनी म्हटले आहे.
पुणे लोकसभेची जागा त्यांच्या आजोबांनी आणि नंतर त्यांच्या वडिलांनी अनेक वेळा जिंकली होती, परंतु आता ती भाजपकडे आहे ज्यांचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी जून २०२४ मध्ये रवींद्र धंगेकर (काँग्रेस) यांचा पराभव केला.”काँग्रेसने (लोकसभा निवडणुकीत) एका उमेदवाराला उभे केले ज्याने दोन पक्ष बदलले होते. तो हरला आणि तरीही त्याला (नोव्हेंबर २०२४ मध्ये) विधानसभा निवडणुकीत पुन्हा उमेदवारी देण्यात आली. तिथेही हरला. आता, तो पक्ष सोडून गेला आहे. हे सर्व ९ ते १० महिन्यांत घडले,” असे त्यांनी नमूद केले. निवडणूक आयोगाचा “पक्षपाती” दृष्टिकोन, “पहलगाम हल्ल्यानंतरच्या परिस्थितीचे चुकीचे हाताळणे ” आणि बेरोजगारी यासारख्या मुद्द्यांवर काँग्रेसने रस्त्यावर उतरण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
गाडगीळ म्हणाले की, १९६९ मध्ये काँग्रेस फुटली, परंतु १९७१ मध्ये केंद्रात पुन्हा सत्तेत आली.”१९७७ मध्ये पक्षाचा पराभव झाला, परंतु १९८० मध्ये केंद्रात पुन्हा सत्तेत आला. काँग्रेस एका फिनिक्ससारखी आहे,” असे त्यांनी युक्तिवाद केला.
“या तरुण राजकारण्यांपैकी अनेकांना आता काँग्रेसमध्ये भविष्य दिसत नाही. संघटना कमकुवत आहे. त्यांचा बदल विचारसरणीपेक्षा जगण्यावर जास्त अवलंबून आहे,” असे काँग्रेसचे काही नेते बोलू लागलेत
राजकीय निरीक्षकांनी सांगितले की महाराष्ट्र काँग्रेसमधील समस्या केवळ पक्षांतराची नाही तर पिढ्यान्पिढ्या निष्ठा कमी होत चालली आहे.
दशकांपासून काँग्रेससोबत उभ्या राहिलेल्या कुटुंबांना आता त्यांचे तरुण सदस्य पक्षाच्या वैचारिक पायऱ्यांपासून वेगळे झालेले दिसतात, असे ते म्हणाले.
“पूर्वी काँग्रेससोबत असण्याचा अर्थ प्रतिष्ठा, दिल्लीत प्रवेश आणि वारसा होता. आज, याचा अर्थ दिशाहीन विरोधी पक्षात असणे असा होतो,” असे एका राजकीय विश्लेषकाने सांगितले.
“हो, काही जण निघून गेले आहेत, परंतु हे वैयक्तिक निर्णय आहेत. काँग्रेसकडे अजूनही लोकांमध्ये एक समर्पित कार्यकर्ते आणि पाठिंबा आहे,” असे एमपीसीसीचे कार्यकारी अध्यक्ष नसीम खान म्हणाले.मात्र
काँग्रेसशी निष्ठा असलेल्या कुटुंबांच्या नवीन पिढीमध्ये असंतोष असल्याचे एका वरिष्ठ नेत्याने कबूल केले.

ब्रिगेडचे आक्रमक आंदोलक प्रवीण गायकवाड यांना काळे फासले…

संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप
अक्कलकोट-संभाजी ब्रिगेड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष, आक्रमक आंदोलक म्हणून ओळखले जाणारे प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट मध्ये काळे फासण्यात आले आहे. ते राज्यभर दौरे करत असतात. आज अक्कलकोट येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते आले होते. या कार्यक्रम स्थळी त्यांचे स्वागत होत असतानाच ही घटना घडली. शिवधर्म फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने प्रवीण गायकवाड यांच्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत असल्याचा आरोप केला आहे.

या घटनेमध्ये प्रवीण गायकवाड यांना मारहाण देखील करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे घटना घडल्यानंतर प्रवीण गायकवाड आपल्या गाडीमध्ये बसले होते. मात्र त्यानंतर त्यांना गाडीतून बाहेर काढून देखील मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आधी देखील संघटनेच्या वतीने संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावात संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत असून छत्रपती संभाजी ब्रिगेड असे नामकरण करण्याची मागणी करण्यात आली होती. सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने या संघटनेची मान्यता रद्द करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण करण्यात आले होते.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा जाणून बुजून एकेरी उल्लेख करणाऱ्या संभाजी ब्रिगेड संघटना व संभाजी ब्रिगेड पक्ष यांचा जाहीर निषेध करत शिवधर्म फाउंडेशनने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराज असे पूर्ण लिहावे किंवा संघटनेचे नाव बदलावे, अशी मागणी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक काटे यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी पुणे स्टेशन जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.

या वेळी दीपक काटे म्हणाले हेाते की,अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र, स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज संपूर्ण भारतवासीयांसाठी आदर्श आहेत. महाराष्ट्रात मात्र, ‘संभाजी ब्रिगेड’ छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून अवमान करत आहे. संभाजी ब्रिगेड नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत आहे, ही बाब संभाजी ब्रिगेड संघटना व संभाजी ब्रिगेड पक्ष यांना वारंवार निदर्शनास आणून दिली आहे. तरीही संभाजी ब्रिगेड संघटना व पक्षाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्याला फाशी देण्याची भाषा करतात. मात्र स्वतःच्या संघटनेत संभाजी महाराजांचा अवमान होतोय, एकेरी उल्लेख होतोय, याकडे ते दुर्लक्ष करतात, हा त्यांचा दुटप्पीपणा असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

संभाजी ब्रिगेड संघटनेने व पक्षाने नावात बदल केला नाही, तर संघटना आणि पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत. संघटनेने ‘संभाजी ब्रिगेड’च्या नावात ‘धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ असे पूर्ण लिहावे, अशी मागणी देखील शिवधर्म फाउंडेशनने केली होती.

आळंदीत अल्पवयीन मुलीचे अपहरण अन् बलात्कार; महिला कीर्तनकारासह 5 जणांवर गुन्हा

पुणे- आळंदी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहिल्यानगर येथील एका तरुणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. पीडित तरुणीने 112 या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यात एका महिला कीर्तनकाराचा समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

पीडित तरुणी अहिल्यानगर जिल्ह्यातील असून, गेल्या महिन्यात, म्हणजेच 2 जून रोजी, तिचे अपहरण करण्यात आले होते. तिला आळंदी येथील केळगाव रोडवर असलेल्या मुलींच्या एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जबरदस्तीने डांबून ठेवण्यात आले होते. या कालावधीत तिच्यावर सतत बलात्कार करून लग्नासाठी दबाव टाकला जात होता. या प्रकरणी पीडित तरुणीने शेवगाव पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध तक्रार दिली आहे. अधिक माहितीनुसार, 2 जून रोजी पीडित तरुणी तिच्या घरी एकटीच होती. त्यावेळी तिच्या ओळखीच्या कीर्तनकार सुनिता आंधळे तिच्या घरी आल्या. आंधळे यांनी तिला शेतात जाऊन येऊ असे सांगून घराबाहेर आणले. तेथे आधीच उभ्या असलेल्या एका काळ्या चारचाकी गाडीत (MH 43 CC 7812) तिला ढकलण्यात आले. तिने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, अण्णासाहेब आंधळे, प्रवीण आंधळे, अभिमन्यू आंधळे आणि कीर्तनकार सुनिता आंधळे यांनी तिला जबरदस्तीने गाडीत बसवले.पीडित तरुणी आरडाओरड करणार तोच, तिचे तोंड दाबून ‘आवाज करू नकोस, नाहीतर तुझ्या चेहऱ्यावर ॲसिड टाकू’ अशी धमकी देण्यात आली, ज्यामुळे तिला गप्प बसावे लागले. यानंतर अहिल्यानगर येथून निघालेली गाडी थेट पुण्यातील आळंदी येथील मुलींच्या खासगी वारकरी शिक्षण संस्थेच्या इमारतीत थांबली.येथे अण्णासाहेब आंधळे, प्रवीण आंधळे, कीर्तनकार सुनिता आंधळे आणि अभिमन्यू आंधळे यांनी तिला एका खोलीत डांबून ठेवले. तिथे, अण्णासाहेब आंधळे याने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. तिच्यावर याच पद्धतीने वारंवार बलात्कार करून लग्नासाठी दबाव टाकला जात होता, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.

या सर्व प्रकारानंतर पीडितेने स्वतःला सावरत हुशारीने 112 या क्रमांकावर कॉल करून मदत मागितली. पोलिसांनी तात्काळ तपासचक्रे फिरवत घटनास्थळ गाठले आणि संबंधित व्यक्तींना अटक करून आळंदी पोलिस ठाण्यात आणले.सुरुवातीला पीडित तरुणी खूप घाबरली असल्यामुळे तिने तक्रार दिली नव्हती. परंतु, 7 जुलै रोजी तिने घडलेला सर्व प्रकार घरच्यांना सांगितल्यानंतर शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे, प्रवीण प्रल्हाद आंधळे, गाडीचा अनोळखी चालक, सुनिता अभिमन्यू आंधळे आणि अभिमन्यू भगवान आंधळे या पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

तळजाई सदु शिंदे मैदानावर….

0

पर्यावरणाला साद घालत आणि श्वानासोबत रन करत पुणेकरांनी लुटला ग्रीन पुणे मान्सुन हिल इको फ्रेंडली मँरेथाँनचा आनंद..

पुणे-गोल्ड लीफ एटंरटेनमेंट च्या वतीने या मँरेथाँऩचे पुण्यातील सहकार नगर येथील तळजाई परिसरातील सदु शिंदे क्रिकेट मैदानावर या मँरेथाँनचे आयोजन करण्यात आले.यावेळी पुणेकरांनी मोठया संख्येने सहभाग घेत या मँरेथाँनचा आनंद लुटला.या मँऱेथाँनचे हे दुसरे वर्ष आहे.21 ,10 आणि 5 किलोमीटर या प्रकारात या मँरेथाँनचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी प्रथमच पेट रनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणेकरांनी आपल्या पेटसोबत या मँरेथाँनमध्ये सहभाग घेतला. तसेच लहान मुलांचीही विशेष रन आयोजित करण्यात आली होती. वनराई संस्थेच्यावतीने प्रत्येक रनरला देशी झाडांच्या रोपांचे वाटप करण्यात आले.

भाजप नेते उज्ज्वल निकम राज्यसभेवर खासदार:राष्ट्रपतींनी 5 सदस्यांना केले नियुक्त

पुणे -राष्ट्रपतींनी राज्यसभेसाठी चार नवीन नामांकित सदस्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये ज्येष्ठ वकील आणि लोकसभा निवडणुकीत भाजपचे मुंबईतील उमेदवार उज्ज्वल निकम यांचा समावेश आहे. निकम हे अजमल कसाबसह अनेक हाय-प्रोफाइल फौजदारी खटल्यांमध्ये सरकारी वकील होते.

त्यांच्याशिवाय, केरळचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन मास्ते, भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि सुप्रसिद्ध इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांनाही राज्यसभेवर नामांकित करण्यात आले आहे. या नियुक्त्या त्या जागांसाठी करण्यात आल्या आहेत, ज्या पूर्वी नामांकित सदस्यांच्या निवृत्ती मुळे रिक्त होत्या.

भारतीय संविधानाच्या कलम 80 (3) अंतर्गत, राष्ट्रपतींना राज्यसभेत 12 सदस्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार आहे. हे सदस्य कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा यासारख्या क्षेत्रात विशेष योगदानासाठी निवडले जातात. राज्यसभेच्या एकूण सदस्यांची संख्या 250 आहे, ज्यामध्ये 238 निवडून आलेले आणि 12 नामांकित सदस्य आहेत.
प्रसिद्ध क्रिमिनल लॉयर अशी ओळख असलेले उज्ज्वल निकम हे सरकारी वकील म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक बहुचर्चित खटल्यांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. 26/11च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबविरुद्ध खटल्यात सरकारी वकील म्हणून काम पाहिले होते. यासोबतच 1993 बॉम्बस्फोट प्रकरण, गुलशन कुमार हत्या आणि खैरलांजी सारख्या गाजलेल्या प्रकरणात सरकारची बाजूही त्यांनी मांडली. गुन्हेगाराला कोर्ट शिक्षा देतेच पण एकाही निरपराध व्यक्तीला शिक्षा व्हायला नको, हे तत्त्व उज्ज्वल निकम यांनी आचरणात आणले आहे. त्यामुळे ते गुन्हेगारांना शिक्षा मिळावी यासाठी करावे लागणारे परिश्रम, मिळणार्‍या धमक्या, अशातही ते मोठ्या धैर्याने उभे राहातात.