Home Blog Page 461

भीमराव तापकीरांनी वेधले लक्ष अन पुणे महापालिकेतील वाढीव दराच्या घनकचरा निविदा रद्द

मुंबई, दि. १४ : पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित निविदा प्रक्रिया ५ ते ७ टक्के जास्त दराने झाल्याचे आढळून आल्याने ती संपूर्ण प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे कोणतेही आर्थिक नुकसान झाले नसल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य भीमराव तापकीर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या, शासनाने महानगरपालिकेला या निविदा प्रक्रियेची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने महानगरपालिकेने या निविदा रद्द केली. या निविदा प्रक्रियेमुळे महानगरपालिकेला कोणतेही थेट आर्थिक नुकसान झालेले नाही. मात्र, निविदा प्रक्रियेदरम्यान झालेला प्रशासकीय खर्च कोणाकडून वसूल करायचा याबाबत महापालिकेला निर्देश दिले जातील. तसेच सदस्यांना विशिष्ट निविदांबाबत काही शंका असल्यास किंवा कुठल्या निविदांची सखोल चौकशी आवश्यक आहे असे वाटत असल्यास त्यांनी संबंधित माहिती देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. संबंधित प्रकरणांमध्ये चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रत्येक जिल्ह्यात जनसुरक्षा कायद्याची होळी करणार: हर्षवर्धन सपकाळ

सरकार व लाडक्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा!

सरकारच्या चुकीच्या निर्णयाविरोधात आवाज उठवणाऱ्यांना नक्षलवादी ठरवून जेलमध्ये टाकण्याच्या उद्देशानेच कायदा केला.

प्रविण गायकवाडांवर हल्ला करणा-या शक्ती त्याच आहेत ज्यांनी पानसरे, दाभोलकरांची हत्या केली.

मुंबई, दि. २४ जुलै २०२५

अर्बन नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी जनसुरक्षा कायदा आणल्याचा सरकारचा दावा अत्यंत हास्यास्पद आहे. हा कायदा आतून बाहेरून काळा असून सामान्यांची गळचेपी करणारा आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासूनच त्याला विरोध आहे. सभागृहात सत्ताधारी पक्षाकडे बहुमत असल्याने त्यांनी बहुमताच्या जोरावर रेटून नेत कायदा मंजूर करून घेतलेला आहे. सरकारने कायदा मंजूर करून घेतला असला तरी काँग्रेसचा विरोध कायम असून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात या काळ्या कायद्याची होळी केली जाईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, जनसुरक्षा कायद्यामागचा हेतूच मुळात काळा आहे. या कायद्याचा फायदा फक्त सरकार व सरकार धार्जिणे उद्योगपती यानांच होणार आहे. धारावीचा भूखंड गिळंकृत करणारे, गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागडचे खनिज संपत्ती लाटणारे व शक्तीपीठ मार्गाचा रेड कार्पेट ज्यांना हवा आहे त्या उद्योगपतींना त्याचा फायदा होणार आहे. याला विरोध करणारे गडचिरोलीतील पर्यावरणवादी, आदिवासी, धारावीतील लोक, शक्तीपीठला विरोध करणारे शेतकरी यांनी मात्र विरोध केला तर त्यांना जेलमध्ये टाकले जाणार आहे, त्यांची संपत्ती जप्त केली जाणार आहे. सरकारचे फक्त कौतुक करा नाहीतर गप्प बसा आणि विरोधात बोलाल तर जनसुरक्षा कायद्याचा बडगा उभारून तुम्हाला गप्प करू हाच यामागचा हेतू आहे.

संविधानाचा विचार मांडणे, शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार मांडणे, महात्मा गांधी, तुकडोजी महाराज यांचा विचार मांडणे हा नक्षलवाद आहे का? याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करावा. हा जर नक्षलवादी विचार असेल तर तो मी मांडत राहणार, मला अटक करायची तर फडणवीस यांनी खुशाल करावे असे आव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे. डावी विचारसरणी विष पेरणारी आहे हे जर फडणवीस म्हणत असतील तर संघाच्या शाखेत कोणते विष पेरले जाते हे आम्ही सांगू असेही सपकाळ म्हणाले..

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आयुष्यभर अंधश्रद्धा निर्मुलनासाठी काम केले त्यांची हत्या करण्यात आली. बहुजनांना शहाणे करणारे लेखण करणारे कॉम्रेड गोविंद पानसरे, कलबुर्गी यांचीही हत्या केली. यामागे जी शक्ती आहे तीच शक्ती संभाजी ब्रिगेडच्या प्रविण गायकवाड यांच्या हल्ल्यामागे आहे असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

सवलतीच्या दरात खाजगी जागेतील झाडांच्या फांद्या पालिकेकडून छाटणी करून मिळाव्यात-आमदार सिद्धार्थ शिरोळे

मुंबई : झाडांच्या फांद्या तुटून होणारे अपघात टाळण्यासाठी खाजगी जागेतील फांद्या सवलतीच्या दरात पुणे महापालिकेकडून छाटणी करून मिळावे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (सोमवारी) विधानसभेत केली.

पुणे शहरामध्ये काही दिवसांपूर्वी वादळी पावसामुळे कर्वेनगर मध्ये खासगी जागेतील झाड़ पडून दोघांचा मृत्यू झाला. तसेच फांद्या पडून रस्ते बंद होणे , वाहतूक कोंडी होते, फांद्या पडून वाहनांचे नुकसान होणे, असेही प्रकार घडत आहेत, अशी माहिती आमदार शिरोळे यांनी सभागृहाला दिली.

महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक वृक्षांच्या फांद्यांची छाटणी केली जाते, पण खासगी जागेतील झाडांच्या फांद्यांची छाटणी जागेच्या मालकाला पालिकेची परवानगी घेऊन स्वतः करून घ्यावी लागते. मात्र यात बऱ्याच अडचणी येतात. पालिकेकडून परवानगी मिळण्यात विलंब होतो, ठेकेदाराकडून छाटणीसाठी खूप जास्त पैसे वसूल केले जातात. याकरीता सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन फांद्या छाटणीच्या परवानग्या लवकरात लवकर नागरिकांना दिल्या जातील, हे पहावे. तसेच फांद्याची छाटणी सवलतीच्या दरात करून मिळावी. महापालिकेकडून याबाबत नियोजन केले जावे, सरकारने तशा सूचना द्याव्यात, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली.

टेकड्यांवर राडारोडा टाकणे थांबवा-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

मुंबई : बांधकामाचा राडारोडा टाकून शहर आणि भोवतालच्या टेकड्या विद्रुप करण्याचे प्रकार वाढले आहेत. सरकारने ते थांबवावेत, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (सोमवारी) विधानसभेत बोलताना केली.

शहराचा विस्तार वेगाने होतोय. बांधकामेही वेगाने होत आहेत. या बांधकामांवरील राडारोडा टेकड्यांवर टाकला जातोय. ठेकेदार हा राडारोडा टाकत आहेत. राडारोड्यामुळे टेकड्या विद्रुप होत आहेत. याकरीता मंत्री महोदयांनी सर्व वन अधिकाऱ्यांना सांगून याबाबतचा अहवाल मागवावा आणि कारवाई करावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली.

टेकड्यांचे विद्रुपीकरण थांबविण्यासाठी आमदार शिरोळे यांनी केलेल्या मागणीला वनमंत्री गणेश नाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. वन खात्याकडून टेकड्यांवरची माती काढू दिलीच जाणार नाही. मोठमोठ्या शहरांमधून जुने बांधकाम पाडल्यावर राडारोडा टाकण्याचे काम टेकड्या आणि इतरत्र होत आहे. या राडारोड्याची विल्हेवाट लावण्यासाठी राडारोडा विल्हेवाट यंत्रणा उभी करण्याचे काम चालू झाले आहे. शहरांच्या हद्दीपाशी वनखाते, पोलीस खाते आणि महसूल खाते यांचे अधिकारी देखरेख ठेवतील. सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील. राडारोडा वन विभागाच्या जमीनीवर तसेच अन्यत्र टाकू दिला जाणार नाही, हे स्पष्ट करतो, असे आश्वासन गणेश नाईक यांनी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना दिले.

‘सावरकरांच्या:‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटकातून गौतम बुद्धांचा अपमान नाही;उपस्थित वार्ताहराकडून चुकीची ब्रेकिंग न्यूज – दिग्दर्शक हृषिकेश जोशींचा दावा

पुणे- पुण्यात नुकत्याच झालेल्या ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटकावरून वाद रंगला आहे. या नाटकातून तथागत गौतम बुद्धांचा संदेश चुकीच्या पद्धतीने मांडला गेलाय आणि त्यांच्या विचारांचे विकृतीकरण केल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला. मात्र, या प्रकारानंतर अखेर नाटकाचे दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांनी मौन सोडले आहे. नाटकातून गौतम बुद्धांचा कुठलाही अपमान झाला नसल्याचा दावा त्यांनी केलाय.

‘संगीत संन्यस्त खड्ग’ या नाटकाचे सावरकर दर्शन प्रतिष्ठान आणि नाट्यसंपदा कला मंच हे निर्माते आहेत. नाटकाला दीनानाथ मंगेशकर यांचे संगीत आहे. या नाटकाचे सध्या राज्यभरात विविध ठिकाणी प्रयोग सुरू आहेत.कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शनिवारी सायंकाळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटक झाले. सायंकाळी साडेसहा वाजता सुरू झालेल्या या नाटकाला खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह अनेक प्रेक्षक उपस्थित होते. नाटक सुमारे अडीच तास चालले. त्यानंतर साडेआठच्या सुमारास वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नाट्यगृहात दाखल झाले. नाटकात तथागत गौतम बुद्धांचा संदेश चुकीच्या पद्धतीने मांडला गेला आहे, आणि त्यांच्या विचारांचे विकृतीकरण करण्यात आल्याचा आरोपी करत त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ठिय्या केला.

वंचितच्या कार्यकर्त्यांनी म्हटले की, सावरकर लिखित हे नाटक आहे. या नाटकाचा दुसरा प्रयोग होत आहे. सावरकरांचे लिखाण नेहमी फुले शाहू आंबेडकरांच्या आणि गौतम बुद्धांच्या विरोधात राहिलेलं आहे. आम्ही ने नाटक पहायला आलो होतो, नाटक पूर्ण पाहिले. यात सावरकरांनी जगासाठी बुद्ध कामाचा नसून युद्ध कामाचे आहे असा संदेश दिला आहे. या नाटकात हिंसेचे समर्थन करण्यात आले आहे. याबाबत बोलताना एका महिला कार्यकर्त्याने सांगितले की, शांततेने नव्हे तर भांडणातून मार्ग निघू शकतो, असे नाटकामधून सावरकरांनी सांगितले आहे. शांततेत सर्व प्रश्न सुटू शकतात या गौतम बुद्धांच्या शिकवणीला नाटकातून विरोध करण्यात आला आहे. आणखी एका कार्यकर्त्यांने सांगितले की, या नाटकात गौतम बुद्धांच्या विचारांचे पूर्णपणे हनन करण्यात आले आहे. या देशात बुद्धांचे तत्वज्ञान कामाचे नाही, इथे फक्त भांडणे करुन प्रश्न सुटू शकतो असे दाखवण्यात आले आहे. या नाटकाच्या शेवटी बुद्धांवरती तलवार उगारण्यात आली आहे.

दिग्दर्शकांचे उत्तर जसेच्या तसे…

नाटकाच्या साऱ्या वादावर दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांनी एक पोस्ट करून सविस्तर उत्तर दिले आहे. त्यांची बाजू जशीच्या तशी…हृषिकेश जोशी आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की,

काल संगीत संन्यस्त खड्ग नाटकाचा प्रयोग पुण्यात यशवंत नाट्यगृहात साजरा झाला. प्रयोगादरम्यान काही आंदोलकांनी प्रयोग संपत आला असताना अचानक घोषणा बाजी सुरू केली. त्यांनी त्यांची घोषणाबाजी केली, त्यांना पोलिसांनी थांबवलं आणि ते त्यांना बाहेर घेऊन गेले. वास्तवात घडलेला घटनाक्रम असा होता की, जे कुणी आंदोलक आले होते, ते नाटक पाहायला शेवटपर्यंत बसले होते. अडीच तासाच्या नाटकात शेवटचा प्रसंग सुरू झाला… शेवटचा म्हणजे किती, की अगदी सामान्य प्रेक्षकालाही लक्षात येत होतं की, पुढच्या एखाद मिनिटात नाटक संपणार आहे. विक्रमसिंह या पात्राच्या तोंडी जी दोन वाक्ये होती त्यातलं पहिलं वाक्य झालं आणि प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या.. त्याचवेळी हे आंदोलक घोषणा देत रंगमंचाकडे आले, स्टेजवर जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला.. पोलिसांनी त्यांना अडवलं. मंचावर सर्वच पात्रे होती. आंदोलकांच्या घोषणा होईपर्यंत कलाकार आणि तंत्रज्ञ शांतपणे उभे राहिले. प्रयोगाला खासदार मेधाताई कुलकर्णी पहिल्या रांगेत नाटक बघायला बसल्या होत्या. त्यांनी पुढाकार घेऊन परिस्थिती उत्तमरित्या हाताळली. घोषणा देणारे बाहेर गेले. प्रेक्षकांनी आवाज दिला. “सुरू करा नाटक.” दिग्दर्शक या नात्याने मी पुढे होऊन प्रयोग सुरू केला. गौतम बुद्धांचा अनुयायी असलेल्या, बुद्धांच्याच सांगण्यावरून संन्यास घेतलेल्या विक्रमसिंहाचं पुढचं एकंच वाक्य उरलं होतं.. ते असं की, “ मला क्षमा करा भगवन.”

तोवर नाट्यगृहाबाहेर अधिक संख्येच्या लोकांची घोषणाबाजी आत ऐकू येत होती. नाटक पुन्हा सुरू होऊन, जे उरलेच काही सेकंदांचे होते ते पार पडले. प्रथेप्रमाणे कलाकारांची ओळख झाली. बाहेरचा गोंधळ थांबे पर्यंत प्रेक्षकांना आतच बसा अशी विनंती पोलिसांकडून करण्यात आली. प्रेक्षकांनी नुसतच बसण्यापेक्षा सुलोचना या पात्राच्या तोंडी असलेल्या गाण्याची फर्माइश दिली. जे गाणे नाटकात सादर केले जात नाही, ते केतकी चैतन्य हिने अप्रतिम सादर केले. त्या गाण्याचे बोल असे आहेत की,

सुकताचि जगी या, जरी की,

फुले गळत पाकळी पाकळी

उमलती ना त्याही कलिका,

ज्या..

परंतू सुंदर पाकळ्या पाकळ्या

फुलती ही जगी या..

विसर ना हे वैतागी तुझिया

नाटक पार पडले, प्रेक्षक कलाकाराना भेटायला आत आले.

पण खरे राहून राहून आश्चर्य या गोष्टीचे अधिक वाटले की, नाटक संपून मिनिट दोन मिनिट होत नाहीत तोवर, पुण्यात संन्यस्त खड्ग नाटक बंद ‘पाडले’ अशा ब्रेकिंग न्यूज सुरू झाल्या. हे नाटक ‘सावरकरांच्या जीवनावर आधारित’ असल्याचा बातमीतला पहिलाच उल्लेख ऐकून समस्त कलाकारांना आणि प्रेक्षकांनाही प्रचंड धक्का बसला. न्यूज चॅनेलची निवेदिका, इतक्या ‘तातडीने घटनास्थळी’ उपस्थित असलेल्या वार्ताहराला विचारत होती की, “तिथली नक्की परिस्थिती काय आहे? दोन बाजूने घोषणाबाजी नक्की कोणत्या कारणावरून होत आहे?” त्यावर त्या घटनास्थळी वार्ताहराने उत्तर दिले की, “का घोषणा दिल्या जातायत त्या बद्दल मला नक्की माहीत नाही”. हा नाट्यप्रयोग, ज्याला सातत्याने ‘कार्यक्रम’ संबोधलं गेलं, हा सात्यकी सावरकरांनी आयोजित केला होता असा किमान ५ वेळा उल्लेख बातम्यांमध्ये येत होता. ते प्रयोगाला उपस्थित आहेत असंही वार्ताहर बोलला. मुळात एरव्ही व्यावसायिक नाटक जसे नाट्यगृहात तारीख घेऊन लावले जाते तसे या नाटकाचा प्रयोग नाट्यनिर्मात्यांनी लावला होता. त्याचा सात्यकी सावरकरांशी काहीही संबंध नव्हता. ते प्रयोगाला उपस्थितही नव्हते. “नाटक किती वेळानंतर बंद पाडण्यात आले?” या प्रश्नावर वार्ताहर म्हणाला की, “अर्ध्या तासानंतर ते बंद पाडण्यात आले.”वृत्त वाहिन्यांनी उपस्थित असलेल्या निर्माता, दिग्दर्शक, मॅनेजर, कलाकार यांच्या पैकी कुणालाही फोन केला असता, तरी या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असती. आणि समजले असते की, व्यत्यय आणला गेला, पण नाटक व्यवस्थित उपस्थित प्रेक्षकांसमोर पूर्ण पार पडले. ‘उपस्थित असलेल्या वार्ताहराने’ ज्या बाबी सांगितल्या त्या सगळ्या सपशेल खोट्या होत्या हे इथे सखेद नमूद करावे लागेल.

3 महिन्यांत निकाल:SC ने आजच्या सुनावणीत दिले स्पष्ट संकेत:धनुष्यबाण कुणाचा ? ठाकरेंचा नाव, चिन्ह, वाघासह झेंड्यावर दावा

नवी तारीख एक-दोन दिवसांत कळवणार


सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेनेच्या वादावर सुनावणी झाली. त्यात सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण पुढील 3 महिन्यांत निकाली काढण्याचे स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे शिवसेना हे नाव व धनुष्यबण हे निवडणूक चिन्ह कुणाचे? यावर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात फैसला येण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टात जून 2022 पासून शिवसेनेचा वाद प्रलंबित आहे. यावरील सुनावणी वारंवार पुढे ढकलण्यात येत असल्यामुळे मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे.

शिवसेनेत 2022 मध्ये मोठी बंडखोरी झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाला शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह दिले होते. निवडणूक आयोगाच्या या आदेशांना उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिले होते. त्यांच्या या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती सूर्यकांत व न्यायमूर्ती जॉयमल्ल्या बागची यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. त्यात खंडपीठाने हे प्रकरण ऑगस्टमध्ये सुनावणीसाठी घेण्याचे संकेत दिले. तत्पूर्वी ठाकरे गटाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे या प्रकरणी आजच सुनावणी घ्या असा आग्रह धरला. पण कोर्टाने आज प्रकरण ऐकण्यास स्पष्ट नकार दिला. या प्रकरणी पुढील महिन्यात एखादी जवळची तारीख दिली जाईल, असे कोर्ट म्हणाले.

वकील सिद्धार्थ शिंदे यांनी याविषयी बोलताना सांगितले की, सुप्रीम कोर्टाने शिवसेना पक्ष व चिन्हाबाबत एक मोठे विधान केले आहे. कोर्ट म्हणाले की, हे अर्ज वगैरे दाखल करणे आता बंद करा. प्रस्तुत प्रकरण 2 वर्षांपासून प्रलंबित आहे. त्याचा निकाल किंवा मुख्य सुनावणी आपण ऑगस्टमध्ये घेऊ. त्यावर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी ऑगस्ट महिन्यातील तारीख मागितली. त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आपण आपले रोस्टर पाहून ऑगस्टमधील एखादी तारीख देतो, ती तुम्हाला एक-दोन दिवसांत कळवण्यात येईल असे सांगितले.

त्यानुसार ऑगस्टमध्ये या प्रकरणाची सुनावणी होईल. त्यानंतर निकाल राखून ठेवला जाईल. जर ऑगस्टमध्ये सुनावणी झाली तर शिवसेना पक्ष व चिन्हाचा निकाल सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये लागू शकतो. आता ऑगस्टमध्ये ही केस पुन्हा बोर्डावर येईल. त्यावर सुनावणी होईल. पण आज सुप्रीम कोर्टाने एक ठळक सांगितले आहे की, आता 2 वर्षे झाली आहेत आणि आता आम्हाला या मॅटरचा सोक्षमोक्ष लावायचा आहे. आता पुढील महिन्यात होणाऱ्या सुनावणीत पक्ष व चिन्ह एकनाथ शिंदेंबरोबरच राहील की ते परत उद्धव ठाकरे यांना दिले जाईल.

वकील सिद्धार्थ शिंदे पुढे बोलताना म्हणाले, आज सुप्रीम कोर्टाने केलेले विधान हे उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला असेच म्हणावे लागेल. कारण, मागील 2 वर्षांपासून जी अनिश्चितता होती ती आता सुप्रीम कोर्टानेच दूर केली आहे. कोर्टाने स्वतःच या प्रकरणी ऑगस्ट महिन्यातील तारीख देण्याची घोषणा केली आहे. त्यात एक-दोन दिवस सुनावणी चालेल, सुनावणी तहकूब होईल. पण चालू वर्षाच्या आत हे प्रकरण निकाली निघेल हे नक्की.

या मधल्या काळात निवडणुका लागल्या तर सध्या आहे तीच परिस्थिती राहील. पण ऑगस्ट किंवा त्यापुढील दोन महिन्यांत निकाल आला तर स्थिती स्पष्ट होईल. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न हे प्रकरण ऑगस्ट महिन्यातच निकाली निघेल असा राहील, असे शिंदे यांनी सांगितले.

शिंदे गटाच्या वकिलांनी यावेळी ठाकरे यांच्या याचिकेला कडाडून विरोध केला. याचिकाकर्त्यांनी ही याचिका आत्ताच का दाखल केली? ते मागील 2 वर्षांपासून झोपा काढत होते का? असा प्रश्न उपस्थित केला. पण कोर्टाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. आतापर्यंत जे झाले ते झाले. आता 2 वर्ष संपलेत. आम्हाला याचा सोक्षमोक्ष करावाच लागेल, असे कोर्ट म्हणाले. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल पुढील 3 महिन्यांत अपेक्षित आहे, असे सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपल्या याचिकेद्वारे शिवसेना हे नाव, धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह तथा वाघासह भगवा ध्वज पुन्हा वापरण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणात अजित पवार गटाला सशर्त चिन्ह वापरण्याची परवानगी दिली होती. तशी परवानगी आम्हाला दिली जावी असा त्यांचा युक्तिवाद आहे. त्यावर कोर्ट काय निर्णय देतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दुसरीकडे, शिंदे गटाच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच ठाकरेंची अशी मागणी फेटाळल्याचा दावा केला आहे. लोकसभा व विधानसभा निवडणूक यापूर्वीच एका नावाने व चिन्हाने झाल्या आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने ठाकरेंची अशीच एक याचिका यापूर्वी धुडकावून लावली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांनी जून 2022 मध्ये शिवसेनेत मोठी बंडखोरी केली होती. त्यांच्यासोबत शिवसेनेचे बहुसंख्य आमदार गेले होते. त्यानंतर शिंदेंनी भाजपच्या मदतीने महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. ते स्वतः मुख्यमंत्री झाले. या घटनाक्रमानंतर त्यांनी थेट शिवसेनेवर दावा सांगितला. त्यानंतर निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधींच्या बहुमताच्या आधारावर त्यांना शिवसेना नाव व धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह प्रदान केले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही 10 जानेवारी 2024 रोजी शिंदे गट हाच खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा दिला. ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ कपील सिब्बल यांनी याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना 22 जानेवारी 2024 रोजी शिंदे गटासह सर्वच बंडखोर आमदारांना नोटीस बजावली होती.

प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ल्याशी भाजपचा काहीही संबंध नाही -भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे

दीपक काटे भाजपचा कार्यकर्ता असला तरी त्याचेवर कडक कारवाई झाली पाहिजे

मुंबई- शिवधर्म फाउंडेशनचे दीपक काटे यांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेकून त्यांच्या तोंडाला काळे फासले होते. मात्र, प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा दीपक काटे हा भाजपचा सक्रिय पदाधिकारी असल्याचा आरोप होत आहे. याबाबत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी याच्याशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.यासंबंधी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा भारतीय जनता पक्षाशी काही संबंध नाही. अशा खालच्या पातळीवरचे कृत्य करणे हे भाजपच्या रक्तात नाही. प्रवीण गायकवाड यांच्याबाबत झालेल्या घटनेची पोलिसांनी चौकशी करायला हवी. याच्याशी आमचा संबंध नाही. दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता आहे. पण त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. तो कोणत्याही पक्षाचा असेल तरी तो आरोपी असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

संभाजी ब्रिगेड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट मध्ये काळे फासण्यात आले होते. प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ते राज्यभर दौरे करत असतात. अक्कलकोट येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते आले होते. या कार्यक्रम स्थळी त्यांचे स्वागत होत असतानाच ही घटना घडली. शिवधर्म फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने प्रवीण गायकवाड यांच्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत असल्याचा आरोप केला होता. या घटनेमध्ये प्रवीण गायकवाड यांना मारहाण देखील करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे घटना घडल्यानंतर प्रवीण गायकवाड आपल्या गाडीमध्ये बसले होते. मात्र त्यानंतर त्यांना गाडीतून बाहेर काढून देखील मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा जाणून बुजून एकेरी उल्लेख करणाऱ्या संभाजी ब्रिगेड संघटना व संभाजी ब्रिगेड पक्ष यांचा जाहीर निषेध करत शिवधर्म फाउंडेशनने जिल्हाधिकारी कार्यालयावर या आधी देखील मोर्चा काढला होता. संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराज असे पूर्ण लिहावे किंवा संघटनेचे नाव बदलावे, अशी मागणी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक काटे यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी पुणे स्टेशन जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.

प्रविण गायकवाडवर हल्ला करणा-या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा: हर्षवर्धन सपकाळ

0

सरकारी पाठिंब्याने महाराष्ट्रात वाढलेल्या विखारी वृत्ती महाराष्ट्राला अशांत करत आहेत.

मुंबई दि. १३ जुलै २०२५

महाभ्रष्ट महायुती सरकारच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात गुंडाचा सुळसुळाट वाढला आहे. सरकारी पाठिंब्याने वाढलेल्या विखारी वृत्ती महाराष्ट्राला अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. पुरोगामी विचारवंत, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रविण गायकवाड यांच्यावर गुंडांनी केलेला भ्याड हल्ला याचेच प्रतिक आहे. सरकारने या हल्लेखोरांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

प्रविण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करून हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की महाराष्ट्र आता थांबणार नाही, पण प्रत्यक्षात महाराष्ट्रातील गुंडगिरी थांबत नाहीय हे सत्य आहे. राज्यात कायद्याचे राज्य आहे की गुंड आणि माफियाचे असा प्रश्न पडावा इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. संजय गायकवाड यांच्यासारखे सत्ताधारी पक्षाचे आमदारच कायदा हातात घेवून सर्वसामान्य नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मारहाण करतात. पण पोलीस त्यांच्यावर काही कारवाई करत नाहीत. गुंड आणि माफियांना सत्ताधारी पक्षाचे संरक्षण असून त्यांच्या मदतीने विरोधी विचारांच्या लोकांवर हल्ले करून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न सुरु आहे. विशेषत: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर कार्य करणा-या कार्यकर्त्यांना जाणिवपूर्वक लक्ष केले जात आहे. हे हल्लेखोर गुंड सरकारच्या अर्बन नक्षलींच्या व्याखेत बसत नाहीत का ? यांच्यावर जनसुरक्षा कायद्याखाली कारवाई होणार का?

हा हल्ला केवळ प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्ला नाही, तर महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारधारेवर, बहुजन स्वाभिमानावर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे. प्रविण गायकवाड हे गेल्या अनेक वर्षापासून राज्यभर फिरून व्याख्यान आणि भाषणांच्या माध्यमातून तरुणाईचे प्रबोधन करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य, छत्रपती शाहू महाराजांनी, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला समतेचा विचार राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवत आहेत. यामुळे काही संघटना व व्यक्तींच्या मनात त्यांच्या प्रति आकस आणि राग आहे. यातूनच हा भ्याड हल्ला करण्यात आला आहे. या हल्लेखोरांना बेड्या ठोकून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच या हल्ल्याचा मास्टरमाईंड शोधून त्यालाही गजाआड करावे अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली आहे.

महात्मा फुले वाडा व भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक प्रकल्पाच्या कामकाजास गती द्यावी- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

प्रस्तावित स्मारक परिसरातील स्वच्छता आणि सुरक्षितता याबाबत महानगरपालिकेने दक्ष राहण्याच्या दिल्या सूचना

पुणे :
महात्मा फुले वाडा आणि भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक प्रकल्पाच्या कामकाजाला गती देण्यासाठी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत प्रकल्पाशी संबंधित विविध अडचणी, प्रलंबित कामे, महानगरपालिके मार्फत करावयाची कामे, स्मारक समिती च्या अडचणी आणि स्मारकाच्या भविष्यातील आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः कामकाजामध्ये दिरंगाई होऊ नये यासाठी त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या आणि पुढील १५ दिवसांत कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले.

बैठकीत डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, मालक आणि भाडेकरू यांचे नुकसान भरपाईचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा. याबाबतचा सकारात्मक प्रस्ताव शासनास सत्वर सादर करावा जेणेकरून स्मारकाचे काम गतीने पुढे नेता येईल. कामकाजाचे वेळापत्रक करून त्यानुसार कालबद्धरित्या काम पूर्ण करावे.प्राप्त निधीचा विनियोग वेळेत करण्यासाठी समिती आणि मनपा ने सक्रिय व्हावे. स्मारक प्रकल्पाचे दैनंदिन व्यवस्थापन अधिक नियोजनबद्ध व्हावे यासाठी पुणे महानगरपालिकेने वाड्यामध्ये माहिती देणारे एक कार्यालय स्थापन करावे. नागरिकांना प्रकल्पाची माहिती मिळावी, तसेच समिती अध्यक्षांसाठी देखिल कार्यालयाची गरज असून, स्मारक परिसरातील मनपाची कार्यालये इतर ठिकाणी स्थलांतरित करावीत. स्मारक परिसराचे सर्वेक्षण कामकाज वेळेवर पूर्ण करावे , असे त्यांनी स्पष्ट केले.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्य देशासाठी प्रेरणास्थान असून, त्यांच्या स्मृती कायमस्वरूपी जतन व्हाव्यात, या उद्देशाने राष्ट्रीय स्मारक उभारणीसंदर्भातील कामकाज मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.महात्मा फुले राष्ट्रीय स्मारक हे पुणे शहराचे वैभव ठरावे आणि महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनगौरवाचे जिवंत प्रतिक म्हणून सामन्यांना पिढ्यानपिढ्या प्रेरणादायी ठरावे यासाठी आपण सर्वांनी मनापासून काम करण्याच्या सूचना त्यांनी महापालिका व समिती अध्यक्षांना दिल्या. स्मारकाचे कामकाजाला गती देण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या समितीला देखिल सक्षम करणे गरजेचे असून त्यांना महानगरपालिके मार्फत आवश्यक सहकार्य करावे अशा सूचना त्यांनी दिल्या.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त श्री. ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त अविनाश सपकाळ, उपायुक्त अरविंद माळी, उपयुक्त मालमत्ता वसुंधरा बर्वे, भूसंपादन अधिकारी उपजिल्हाधिकारी श्रीमती श्वेता दारुणकर ,शहर अभियंता प्रशांत वाघमारे व इतर अधिकाऱ्यांसोबत महात्मा फुले वाडा व भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक समितीचे अध्यक्ष श्री. निलेश गिरमे हे देखिल उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीसांनी अक्कलकोट घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून ‘गृहमंत्री’ पदाचा राजीनामा द्यावा … काँग्रेस’ची मागणी

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांवर चालणाऱ्या आणि बहुजन व पिडीत समाजासाठी झटणाऱ्या प्रविणदादा गायकवाडांवर भाजपच्या गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा आपण जाहीर निषेध करत असल्याचे काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी स्पष्ट केले आहे
ते म्हणाले,’ श्री छत्रपती संभाजी महाराजांचे नांवे श्री प्रविणदादा गायकवाड चालवत असलेली संघटना अनेक वर्षांपासून काम करीत आहे. संस्थेच्या नावात श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे मागे छत्रपती लावण्यास प्रवीण गायकवाड यांना कोणतीच हरकत नव्हती, मात्र धर्नादाय आयुक्त कार्यालयात तशा प्रकारच्या संस्थेची नोंदणी मुळात झाल्याने, या नावात बदल करू शकत नसल्याची तांत्रीक अडचण असल्याचे समोर आले होते.
त्यामुळे केवळ निमित्त साधून, भाजप युवा मोर्च्याचा पदाधीकारी व सहकार्यांनी केलेला भ्याड हल्ला निषेधार्य असून ‘राज्यातील कायदा-सुव्यवस्था लयाला गेल्याचे’ स्पष्ट द्योतक आहे.
अहिल्यानगर चा छिंदम, कोरटकर, सोलापूरकर, राज्यपाल कोश्यारी, कर्नाटकचे भाजर मुख्यमंत्री, सुधांशू त्रिवेदी इ नी वेळोवेळी केलेला शिव छत्रपतींच्या अवमानावर व भाजप मातृ संस्थेच्या तत्कालीन नेत्यांनी श्री शंभू राजेंच्या चारीत्र्यावर शिंतोडे उडवले त्यावर भाजप युवा नेते गप्प का (?) असा संतप्त सवाल ही गोपाळदादा तिवारी यांनी उपस्थित केला..
संतोष देशमुख, सोमनाथ सुर्यवंशी, बदलापूर चिमुरडीवरील अत्याचार, अक्षय शिंदे फेक एन्कांउटर इ विषय अद्याप कायदेशीर पुर्णत्वास येत नाही.
राज्यात कोयता गँग, ठाणे पोलीस स्टेशन मघील गोळीबार, महीला अत्याचार व अक्कलकोट मधील आजच्या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून, मुख्यमंत्री फडणवीसांनी ‘गृहमंत्री पदाचा’ तातडीने राजीनामा देण्याची मागणी काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
या हल्लेखोरांवर कारवाई झाली नाही तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा ईशारा वजा सल्ला ही दिला.
राज्यातील बिघडत्या कायदा – सुव्यवस्थे विषयी व अस्मिते विषयी जरा ही चाड असेल तर ‘महायुतीच्या सत्तेतील’ दोव्ही पक्षांनी, फडणवीसांकडून ‘गृहमंत्री पदाचा’ राजीनामा घ्यावाअसे आवाहन गोपाळदादा तिवारी यांनी केले.
अन्यथा या पुढे अशा घटनांना इतरांनाही सामोरे जावे लागेल काय(?) याचा गांभीर्याने विचार करावा,अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

टार्गेट एकनाथ शिंदे :हजारो कोटींच्या गैरव्यवहाराची तक्रार, प्रधान महालेखाकारांनी केली चौकशी सुरु

मुंबई- उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या अखत्यारीत येणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या एका निविदेच्या नावाखाली रस्ते विकास महामंडळाची (एमएसआरडीसी) चौकशी सुरू झाली आहे.समृद्धी महामार्ग. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासात एक गेमचेंजर ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी समृद्धी महामार्गाच्या बांधकामात कॉस्ट एस्कलेशनच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक अनियमिततेचा गंभीर आरोप विधिमंडळाच्या लोकलेखा समितीसमोर केला आहे. लेखी स्वरूपात तक्रार मिळाल्यानंतर समितीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवर यांनी राज्याच्या प्रधान महालेखाकारांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले. यानंतर आता प्रधान महालेखाकार यांनी महालेखाकार (लेखा परीक्षण) मार्फत आलेल्या तक्रारीची चौकशी सुरू केली आहे.

११ हजार कोटींचे काम १५ हजार कोटींना

कॉस्ट एस्केलेशनद्वारे सुमारे ८०० कोटी रुपयांची आर्थिक अनियमितता करण्यात आली आहे, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्याचप्रमाणे त्यांचा दुसरा आरोप असा आहे की जालना-नांदेडदरम्यानच्या १७९ किमी समृद्धी महामार्गाच्या बांधकामातही अशाच प्रकारची आर्थिक अनियमितता झाली आहे. सुरुवातीला १७९ किमी लांबीचे काम ११,४४२ कोटी रुपये खर्चून केले जाणार होते. परंतु नंतर ते १५,५५४ कोटी रुपयंापर्यंत पोहोचले आहे.

१९०० कोटी रुपयांचे काम २७०० कोटींना

आमदार रोहित पवार यांच्या तक्रारीनुसार अहिल्यानगर जिल्ह्यात पहिली अनियमितता झाली आहे. या जिल्ह्यात फेज क्रमांक ११ अंतर्गत समृद्धी महामार्गाचे सुमारे २९ किमी काम झाले आहे. गायत्री प्रोजेक्ट नावाची कंपनी १९०० कोटी रुपयांना हे काम करणार होती. परंतु निविदा मिळाल्यानंतरही या कंपनीने नंतर संशयास्पद पद्धतीने काम करण्यास नकार दिला. त्यामुळे एमएसआरडीसीने तेच काम हुजूर मल्टि प्रोजेक्ट नावाच्या दुसऱ्या कंपनीला २७०० कोटींना दिले.

पुण्यात अध्यात्मिक परंपरा, राष्ट्रीय जागृती आणि सामाजिक सुधारणा यांचा मेळ -अमृता फडणवीस

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या वतीने लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार प्रदान ; मंदिराच्या १२८ व्या वर्धापनदिनाचे औचित्य 
पुणे :  अध्यात्मिक  परंपरा, राष्ट्रीय जागृती आणि सामाजिक सुधारणा यांचा मेळ पुण्यात आहे. त्यामुळे पुण्यात येऊन फार आनंद होतो. पुण्यातील प्रकृती आणि लोकं याबद्दल आपुलकी वाटते. इथे काय आणखी सुधारणा करता येतील, हे मी देवेंद्रजींना सांगत असते. ते देखील पुण्याकडे लक्ष देतात, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांनी केले.

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे मंदिराच्या संस्थापिका लक्ष्मीबाई यांचे स्मृतिप्रित्यर्थ २०२५ सालाचे लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार  छत्रपती शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयाच्या लता मंगेशकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आले. यावेळी राज्याच्या युवा धोरण समितीच्या सदस्या डॉ. निवेदिता एकबोटे, श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टचेअध्यक्ष सुनील रासने, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. रजनी उकरंडे, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, उत्सव प्रमुख महेंद्र पिसाळ, उप उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, डॉ. पराग काळकर, सुनील रुकारी, राजेंद्र बलकवडे आदी उपस्थित होते.

दत्त महाराजांची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह, रुपये २५ हजार रुपये सन्मानराशी, महावस्त्र असे पुरस्काराचे स्वरुप होते. निराधार मुली आणि परित्यक्त महिलांसाठी तसेच अनाथ नवजात शिशूंना कायदेशीरपणे दत्तक देण्याचे काम करणा-या ‘महिला सेवा मंडळ’ या संस्थेला तसेच लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेसाठी जगद्विख्यात ओबेसिटी तज्ञ डॉ. जयश्री तोडकर आणि विरूपित पाषाण शिल्पांना नवसंजीवनी देणा-या वज्रलेपनकार स्वाती ओतारी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘महिला सेवा मंडळ’ च्या ज्येष्ठ विश्वस्त पुष्पा हेगडे यांनी पुरस्कार स्वीकारला. काका हलवाई चे राजेंद्र आणि युवराज गाडवे यांनी दत्तमंदिर ट्रस्टला ५१ हजार रुपयांची देणगी दिली. तसेच यावेळी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या पहिल्या महिला विश्वस्त अ‍ॅड. रोहिणी पवार यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

अमृता फडणवीस म्हणाल्या, दत्तमंदिरात तब्बल १२८ वर्षांपासून प्रत्येकजण श्रद्धा व सेवेसाठी येतो. हे मंदिर समाजाच्या सेवेसाठी अग्रेसर आहे, याचा आनंद आहे. खरी मानवता काय आहे, हे विश्वस्तांनी त्यांच्या कार्यातून दाखवून दिले आहे. गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा व्हावा, यामध्ये लोकमान्य टिळकांच्या पाठीमागे लक्ष्मीबाई आणि दगडूशेठ हलवाई यांचा हातभार होता. लक्ष्मीबाई या शांतपणे परिवर्तन घडवून आणत. त्यांच्यामध्ये लोकांप्रती संवेदना होती. त्यांच्यासारखे कार्य या तिन्ही पुरस्कारार्थी यांचे असून आपल्या ज्ञानाचा इतरांना फायदा झाला, तरच जीवन समृद्ध होते, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. निवेदिता एकबोटे म्हणाल्या, लक्ष्मीबाई दत्तमंदिरातील दत्तमहाराजांची जागृत अशी मूर्ती आहे. त्यामुळे मंदिरात आल्यानंतर वेगळ्या प्रकारची ऊर्जा जाणवते. आज ज्या तीन महिलांना पुरस्कार देण्यात आला, त्यांचे कार्य आणि अमृता फडणवीस यांचे कार्य मोठे आहे. त्याप्रमाणे मी देखील वाटचाल करीत आहे.

महिला सेवा मंडळाच्या पुष्पा हेगडे म्हणाल्या, संस्थेला ८४ वर्षे झाली असून आम्ही  काम करीत राहिलो. कशाचीही अपेक्षा केली नाही. मागील ८४ वर्षांत आम्हाला हा पहिला पुरस्कार मिळाला आहे. आमच्या कामाची ही पावती दत्तमंदिर ट्रस्टने दिली आहे.

डॉ.जयश्री तोडकर म्हणाल्या, लक्ष्मीबाई या १२५ वर्षांपूर्वीच्या आंत्रप्रेन्युअर होत्या. त्या धैर्यवान व्यक्ती होत्या. त्यांनी शतकानुशतके आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. आज देशाला शारीरिक तंदुरुस्तीची आवश्यकता असून लठ्ठपणा आणि मधुमेह भारतात ज्याप्रमाणात आहे, तेवढा बाहेर कुठेही नाही. त्यामुळे आपण याबद्दल जागरूक राहून जागृती करायला हवी.

स्वाती ओतारी म्हणाल्या, पुरातन  मूर्तींच्या व्रजलेपनातून माझी ईश्वरसेवा होत आहे. आज दत्तमंदिर ट्रस्टने स्त्रियांचा केलेला सन्मान अलौकिक आहे. माझ्या हातून ईश्वराची अशीच सेवा घडो, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.  

अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराला पुण्यनगरीचा १२८ वर्षांचा भक्तीमय आणि आध्यात्मिक वारसा आहे. त्या मंदिराच्या  लक्ष्मीबाई दगडूशेठ यांच्या कार्याची स्मृती चिरंतन राहावी, यासाठी पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.  अ‍ॅड. प्रताप परदेशी यांनी स्वागत केले. युवराज गाडवे यांनी आभार मानले. डॉ. प्रिया निघोजकर यांनी सूत्रसंचालन केले.

‘माझ्या हत्येचा कट ही त्यांच्या शेवटाची सुरुवात’, शाईफेकीनंतर प्रवीण गायकवाड यांची संतप्त प्रतिक्रिया

सोलापूर : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर आज शाईफेकीची घटना घडली. या घटनेनंतर प्रवीण गायकवाड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सरकावर आरोप केले. आपल्यावरील हल्ल्याच्या घटनेला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे, असं प्रवीण गायकवाड म्हणाले. तसेच आपल्या हत्येचा कट होता आणि ही त्यांच्या शेवटाची सुरुवात आहे, असं देखील प्रवीण गायकवाड म्हणाले आहेत. “मी अक्कलकोटला गेलो होतो. अचानकपणे शिवधर्म प्रतिष्ठान फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर काळं वंगन तेल टाकलं. त्यांनी माझ्यावर हल्ला केला. त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट खरी आहे. पण ही विचारधारा जी आहे, तुम्हाला आठवत असेल, डॉ. पानसरे यांचा खून झाला. डॉ. कलबुर्गी, डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा खून झाला. डॉ. गौरी लंकेशचा खून झाला. या सत्ताकाळात पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते हे असुरक्षित आहेत”, असं प्रवीण गायकवाड म्हणाले.


“कधीकधी पक्ष फोडले जातात, पक्षांनंतर मग कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न केला जातो. मग त्यांच्यासारखी कुठली गोष्ट करता नाही आली, आम्ही एक सत्य विचारसरणीचं काम करतो. आमचा विचार हा राज्यघटनेला अपेक्षित असलेला समता, बंधूता, न्याय आणि स्वातंत्र्याचा आहे. या देशात मानवता प्रस्थापित झाली पाहिजे यासाठी संभाजी ब्रिगेडचं काम चालू आहे आणि ते चालू राहणार आहे. पण दुर्दैवाने अशा सामाजिक संघटनांबाबत काही गैरसमज पसरवले जातात. मग अशा हिंदुत्ववादी विचारसरणीचे कार्यकर्ते माझ्यावर हल्ला करतात”, असं प्रवीण गायकवाड म्हणाले.”मी या घटनेचा निषेध करणार नाही. पण एक निश्चित सांगतो, ही शेवटाची सुरुवात आहे. संभाजी ब्रिगेडचा इतिहास सर्वांना माहिती आहे. संभाजी ब्रिगेडची उत्तर देण्याची पद्धत सर्वांना माहिती आहे. राज्यकर्त्यांमध्ये मुख्यत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत. मी कार्यक्रमात पोहोचलो त्यावेळेस कोणत्याही प्रकारची पोलीस यंत्रणा नव्हती”, अशी प्रतिक्रिया प्रवीण गायकवाड यांनी दिली.शावेळेस मला वाटते की जाणीवपूर्वक पोलीस यंत्रणा तिथे नव्हती का? काही ठरवून षडयंत्र घडलं होतं का? माझ्या जीविताला धोका होता का? माझ्या कार्यकर्त्यांच्या प्रेमाने आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या बहुजन समाजामुळे मी जिवंत आहे. मला आनंद वाटतो की, या पुढच्या काळात काहीतरी चांगलं काम करायचं असल्यामुळे हे नवीन जीवन मिळालं”, असा दावा प्रवीण गायकवाड यांनी केला.”माझ्या हत्येचा कट होता. माझ्यावर तशा प्रकारचा हल्ला झाला आहे. माझे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते संभाजी भोसले असतील, त्यांचे सगळे सहकारी यांच्यामुळे मी जिवंत आहे. अन्यथा माझ्यावर हल्ला झाला होता. याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे”, असं प्रवीण गायकवाड स्पष्ट म्हणाले.

संजीवन वनउद्यान येथे ५०० देशी झाडांची वृक्षलागवड  

महा एनजीओ फेडरेशन, सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज, व्ही. के. ग्रुप आणि केअर फाउंडेशन यांच्या सह अनेक संस्थांचा सहभाग.

पुणे : कोथरूड येथील संजीवन वनउद्यानात नुकताच भव्य वृक्षलागवड उपक्रम पार पडला. महा एनजीओ फेडरेशन, सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज, व्ही. के. ग्रुप आणि केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांचे तब्बल २०० प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यांनी मिळून ५०० देशी वृक्षांचे रोपण केले.

या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन अमोल उंबरजे, मेघना पिंगळे आणि मयूर वारेगावकर यांनी केले. यानंतर झाडांची निगा केअर संस्था तर्फे घेतली जाणार आहे. संस्थापक शेखर मुंदडा व ट्रस्टी अपूर्वा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाने महा एनजीओ फेडरेशन व सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज दरवर्षी अनेक संस्था यांना एकत्रित आणून अशा प्रकारचे वृक्षारोपण उपक्रम राबवित असतात.
उपस्थित मान्यवरांमध्ये अमोल उंबरजे, मुकुंद शिंदे, वीरेंद्र बोराडे, मयुर वारेगांवकर, सविता कोठाले, मेघना पिंगळे, रक्षा कपले, कांचन सिधये, वैभव मोगरेकर, अपूर्वा कारवा, कोमल गांधी व इतर मान्यवर यांचा समावेश होता.  

या वृक्षलागवडीत स्थानिक प्रजातींचा व देशी झाडांचा समावेश होता. विशेष म्हणजे, या उपक्रमात मतिमंद, अनाथ, वयोवृद्ध, युवक, आदिवासी  व्यक्तींचाही सहभाग असून एक सामाजिक समावेश आणि पर्यावरणपूरक बांधिलकी याचे उत्तम उदाहरण साकारले गेले.

या उपक्रमात सहभाग नोंदवलेल्या प्रमुख संस्थांमध्ये व्ही. के. ग्रुप, आयजीबीसी पुणे चॅप्टर, ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर, नवक्षितिज, एफएसएआय, ममता फाउंडेशन, इशरे पुणे चॅप्टर, रवींद्र जाधव ग्लोबल फाउंडेशन, रोस्ट्रम इंडिया सोशल ऑर्गनायझेशन, जिनस्पोर्ट, रिझिलियंट, जिनओंबिओ, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर यांचा समावेश होता. या सर्व संस्थांनी आपली सामाजिक जबाबदारी जपत पर्यावरण रक्षणासाठी कृतीशील सहभाग नोंदवला.

अमोल उंबरजे यांनी सांगितले की, “वृक्षलागवड ही काळाची गरज आहे. झाडे लावणे महत्त्वाचे आहेच, पण त्यांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देणे ही अधिक जबाबदारी आहे. सर्व संस्थांनी एकत्र येत वृक्षलागवड करून, त्यांचे संगोपन करणे गरजेचे आहे, हे आपले कर्तव्य आहे.”

मयूर वारेगावकर यांनी “वृक्षलागवड कसे केले पाहिजे आणि त्यानंतर काय काळजी घ्यावी लागते” यावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा शेवट सहभागी प्रतिनिधींना प्रमाणपत्र वितरण करून करण्यात आला. सहभागी सदस्यांनी स्वतः खड्डे खणून झाडे लावल्याचा विशेष आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराकरिता राज्य शासनाच्यावतीने सर्वोत्परी सहकार्य-मंत्री मंगलप्रभात लोढा

पुणे, दि.१३: राज्यातील बेरोजगार युवकांला रोजगार उपलब्ध करुन त्यांचे भविष्य घडविण्याची राज्य शासनाची जबाबदारी आहे; याकरिता त्यांना येत्या 5 वर्षात स्वयंरोजगाराकरिता राज्य शासनाच्यावतीने सर्वोत्परी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, पुणे पोलीस आयुक्तालय आणि हरीभाई व्ही देसाई कॉलेज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हरीभाई व्ही देसाई कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे आयोजित ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या उपायुक्त अनुपमा पवार, सहायक आयुक्त सागर मोहिते, पोलीस सहायक आयुक्त सरदार पाटील, हरीभाई व्ही देसाई कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे उपाध्यक्ष जनक शहा, सचिव हेमंत मणियार, सहसचिव दिलीप जगड यांच्यासह विविध कंपन्याचे प्रतिनिधी, विद्यार्थी उपस्थित होते.

श्री. लोढा म्हणाले, पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तांत्रिक शिक्षण पूर्ण करणाऱ्या राज्यातील 5 लाख विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करण्याकरिता योजना विचाराधीन असून यामध्ये विविध तज्ञांद्वारे त्यांना मार्गदर्शन करण्यात येईल.

जीवनात प्रचंड मेहनत केल्याशिवाय यश मिळत नसून यशाला कोणताही पर्यायी मार्ग नाही. कामाच्या अनुभवातून शिकवण घ्यावी. यशस्वी व्यक्तीच्या कौशल्याचे अनुकरण करावे. आपण जीवनात उत्तम काम करा. आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्याकरिता काम करावे. युवकांनो पुढे या, स्वयंरोजगार सुरु करा, त्यामध्ये नाविन्यता आणण्याबाबत विचार करावा. आजच्या रोजगार मेळाव्यात रोजगार न मिळालेल्या युवक व युवतींना कौशल्य विकासाच्यादृष्टीने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने सहकार्य करावे. कंपनीच्यावतीने या युवकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन श्री. लोंढा यांनी केले.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वाटचालीबद्दल माहिती देत प्रास्ताविकात श्रीमती पवार म्हणाल्या, या रोजगार मेळाव्यात २६ कंपन्यानी सहभाग घेतला असून त्याअंतर्गत २ हजार रिक्त पदे आहेत. युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याकरिता विभाग प्रयत्नशील आहे, युवकांनी या संधीचा लाभ घेऊन आयुष्यात यशस्वी व्हा. कंपन्यांनी युवकांचे आयुष्य घडविण्याकरिता काम करावे, असे आवाहन श्रीमती पवार यांनी केले.

श्री. पाटील म्हणाले, समाजात विविध होतकरु व्यक्ती असून ते आपल्या कौशल्याच्या जोरावर स्वयंरोजगार करुन यशस्वीपणे जीवन जगत आहेत. त्यामुळे नोकरीच्या पाठीमागे न लागता व्यवसाय केला पाहिजे. युवकांनी सजग राहून परिसरातील नाविन्यपूर्णबाबींचे निरिक्षण करा, असा सल्ला श्री. पाटील यांनी युवकांना दिला.

यावेळी हरिभाई व्ही देसाई कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे श्री. शहा, प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.