Home Blog Page 459

२४ तास पाणी देण्याचे स्वप्न दाखविणाऱ्या महापालिकेला जलसंपदा विभागाचा शॉक:मागितले २१.४८ मात्र दिली १४.६१ टीएमसी पाणी मंजुरी

पुणे- गेली १० वर्षापूर्वी २४ तास पाणीपुरवठ्याचे स्वप्न दाखवून अगोदरच प्रत्येक वर्षी त्या अनुषंगाने जादा पाणीपट्टी वसूल करत आलेल्या आणि आता पर्यंत पुणेकरांना २४ तास पाणी देऊ न शकलेल्या पुणे महापालिकेला आता जलसंपदा विभागाने जोरदार शॉक दिला आहे. पुणे महापालिकेने २०२४-२५ वर्षासाठी २१.४८ पाण्याचे अंदाजपत्रक जलसंपदा विभागाला सादर केले होते. त्यानुसार जलसंपदा विभागाकडून पुणे महापालिकेला १४.६१ टीएमसी पाणी कोटा मंजूर करण्यात आला आहे.यामध्ये जलसंपदा विभागाने गळती ही १३ टक्केच गृहीत धरली आहे. त्यातच १६ खासगी संस्थांना जलसंपदा खात्यामार्फत पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे ०.४७ टीएमसी पाणी वगळले आहे.दरम्यान पुणे महापालिकेला किमान १५.०८ टीएमसी पाणीसाठा मंजुर करायला पाहिजे होता, असे पत्र पुणे महापालिका जलसंपदा विभागाला पाठविणार आहे.

पुणे शहराची समाविष्ट गावासहित ७९ लाख ३९ हजार लोकसंख्या गृहीत धरून हे अंदाजपत्रक पुणे महापालिकेने सादर केले होते. त्याआधीच्या वर्षी महापालिकेने २०.९० टीएमसी पाण्याचे अंदाजपत्रक सादर केले होते. मात्र जलसंपदा विभागाने १२.८२ टीएमसी पाणी मंजूर केले होते. यावर्षी जलसंपदा किती पाण्याचा कोटा मंजूर करणार, याकडे महापालिकेचे डोळे लागून राहिले होते. त्यानुसार १४.६१ टीएमसी पाणी कोटा मंजूर करण्यात आला आहे. बजेट सादर करताना पुणे महापालिकेचे जुने हद्दीमध्ये व नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांमध्ये ३५ टक्के पाणीगळती गृहीत धरली आहे. पुणे शहरामध्ये जुन्या हद्दीमध्ये समान पाणीपुरवठा प्रकल्प राबविण्यात येत असून १४१ झोन पैकी ५० झोनची कामे पूर्ण झालेली आहेत. ५०झोन मध्ये गळती शोधणे व त्याचे दुरुस्ती करणेची कामे सुरु करण्यात आलेली आहेत. तसेच पाणी वितरणामध्ये सुसूत्रता आल्याने काही अत्यल्प पाणीपुरवठा होत असलेल्या भागामध्ये उदा. बाणेर, बालेवाडी, पाषाण या भागातील पाणीपुरवठ्यामध्ये वाढ झालेली आहे. तसेच पुणे मनपा हद्दीलगतच्या नव्याने समाविष्ट गावांमधील वितरण व्यवस्थे मध्ये वाढ करून त्यांचे पाणीपुरवठ्यामध्ये वाढ केलेली आहे. तसेच नव्याने समाविष्ट गावासाठी टैंकर संख्येमध्ये देखील सुमारे ४० टक्के ने वाढ केलीली आहे. या बाबींच्या अनुषंगाने सन २०२४-२५ वर्षासाठी आवश्यक २१.४८ टीएमसी पाण्याचे अंदाजपत्रक तयार केले होते.

जलसंपदा विभागाने १४.६१ टीएमसी पाणी मंजूर केले आहे. म्हणजे दररोज ११३४ एमएलडी पाणी दिले जाणार आहे. मात्र जलसंपदा विभागाने गळती ही १३ टक्केच गृहीत धरली आहे. जलसंपदा विभागाने दावा केला आहे की, १६ खासगी संस्थांना जलसंपदा खात्यामार्फत पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे ०.४७ टीएमसी पाणी वगळले आहे. मात्र महापालिकने याचा उल्लेख बजेट मध्ये केला नव्हता. त्यामुळे एवढे पाणी वगळणे चुकीचे आहे. त्यामुळे किमान १५.०८ टीएमसी पाणी मिळायला हवे होते. त्यानुसार महापालिका आता जलसंपदा विभागाला पत्रव्यवहार करणार आहे.

शहरी गरजू नागरिकांच्या घरासाठी आता प्रधानमंत्री आवास योजना २.० ची अंमलबजावणी

विदर्भातील मास्टेक व शंकरा फाऊंडेशन, यूएसए संस्थाचा पुढाकार

मुंबई, दि. १३ :  शहरी भागातील गरजू लाभार्थ्यांना त्यांच्या स्वप्नातील हक्काचे घर मिळाले पाहिजे, या सामाजिक जबाबदारीसाठी प्रत्येक विभागस्तरीय,शहरस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ यांनी सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करावे, असे आवाहन उपसचिव तथा प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.०चे अभियान संचालक तथा राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणेचे मुख्य अधिकारी अजित कवडे यांनी केले.

बीकेसी येथे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० संदर्भात कोकण विभागाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे, म्हाडाचे मुख्य अभियंता आडे, म्हाडाचे वित्त नियंत्रक अजयसिंह पवार, गृहनिर्माण विभागाचे अवर सचिव रवींद्र खेतले, वरिष्ठ सल्लागार मुकुल बापट, विभाग स्तरीय तसेच शहर स्तरीय तांत्रिक तज्ज्ञ आदी यावेळी उपस्थित होते.

श्री.कवडे म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनेच्या टप्पा १ करिता मासिकप्रगतीअहवालभरून लवकरात लवकर जियो टॅगिंग करावे.  तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या टप्पा २ करिता तत्काळ लाभार्थी नोंदणी सुरू करण्याच्या सूचना केल्या. यासाठी आवश्यकतेनुसार प्रचार अभियान राबविण्याचीही सूचना त्यांनी केली

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.०

सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या घरांचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० ची अंमलबजावणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये केंद्र शासनाने या नव्या टप्प्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या होत्या. त्यानंतर १४ ऑक्टोबर २०२४ रोजी सह्याद्री येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.

गृहस्वप्न साकार होणार!

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २०१५ पासून राज्यात राबविली जात आहे. राज्यातील ३९९ शहरांमध्ये या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, आतापर्यंत १४.७० लाख घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी ३.७९ लाख घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) ही योजना वरदान ठरली असून, आता २.० टप्प्यात आणखी सुधारित स्वरूपात घरे बांधण्यात येणार आहेत.

नव्या टप्प्यातील वैशिष्ट्ये

योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ३० ते ४५ चौ. मी. पर्यंतची घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी (EWS) बांधली जाणार आहेत. या घरांमध्ये शौचालय व इतर नागरी सुविधांचा समावेश असणार आहे.

योजनेची अंमलबजावणी ही (१) वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम (BLC), (२) भागीदारी तत्वावर परवडणारी घरे (AHP), (३) भाडे तत्वावर परवडणारी घरे (ARH) आणि (४) व्याज अनुदान योजना (ISS) या चार प्रमुख घटकांद्वारे केली जाणार आहे.

सर्वसमावेशक नागरी सुविधा

घरकुलांसोबत पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते, वीजपुरवठा अशा मूलभूत सुविधा पुरविल्या जातील. तसेच, दिव्यांग व्यक्तींसाठी आवश्यक रॅम्प आणि सुविधा, अंगणवाड्या, पावसाचे पाणी साठवण्यासाठी यंत्रणा, सौर ऊर्जा प्रणाली आणि हरित क्षेत्रासाठी स्थानिक वृक्षांची लागवड या बाबींचाही समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) व नगरपरिषद प्रशासन संचालनालय (DMA) यांच्या समन्वयाने ही योजना राबवली जात असून आतापर्यंत राज्यात ४३९८९ कुटुंबांची नोंदणी करण्यात आली आहे.

राज्यातील हजारो कुटुंबांचे हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

PoPच्या मूर्ती बनविणे अथवा विसर्जित करणे यावर पूर्णपणे बंदी,विसर्जन कृत्रिम तलावातच / रहिवासी संकुलातील टाकीमध्ये अथवा मूर्ती स्विकृती केंद्रामध्ये देणे बंधनकारक – BP पृथ्वीराज यांनी काढले आदेश

पुणे-सर्व सण-उत्सावा दरम्यान प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती बनविणे अथवा विसर्जित करणे यावरील बंदीबाबत महाप्लीकेचे अतिरिक्त आयुक्त यांनी आदेश काढले असून PoPच्या मूर्ती बनविणे अथवा विसर्जित करणे यावर पूर्णपणे बंदी असून ,विसर्जन कृत्रिम तलावातच / रहिवासी संकुलातील टाकीमध्ये अथवा मूर्ती स्विकृती केंद्रामध्ये देणे बंधनकारक असल्याचे या आदेशात BP पृथ्वीराज यांनी म्हटले आहे .

नेमके काय म्हटले आहे BP पृथ्वीराज यांनी ते पहा जसेच्या तसे ….

केंद्रीय पर्यावरण वने व वातावरणीय बदल विभाग, मंत्रालय भारत सरकार यांच्यावतीने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिनांक १२ मे २०२० रोजी मुर्ती विसर्जनाबाबत मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध केलेली आहेत. त्यास अनुसरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (Water Prevention & Control of Pollution Act १९७४), तसेच मा. उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार व तांत्रिकी समिती समवेत झालेल्या बैठकीनुसार महाराष्ट्राच्या सर्व महापालिकांनी / नगरपरिषद यांनी सणांच्या कालावधीच्या अगोदर व नंतर करण्याच्या कार्यवाहीसाठी मा. उच्च न्यायालयात दाखल, जनहित याचिका क्र. ९६ of २०२४ च्या दि. ३० जानेवारी २०२५ रोजीच्या सुनावणीत देण्यात आलेले आदेशानुसार विविध सण-उत्सावांदरम्यान सर्व महापालिका/ सर्व जिल्हाधिकारी यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुधारीत मार्गदर्शक तत्वांतील कलम २ नुसार प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती बनविणे अथवा विसर्जित करणे यावर पूर्णपणे बंदीच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्याअन्वये पुणे महानगरपालिका क्षेत्रात यापुढील सर्व सण-उत्सावांदरम्यान प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती बनविणे अथवा विसर्जित करणे यावरील बंदीच्या मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे जाहीर करीत आहोत:-
१. पुणे महानगरपालिका क्षेत्रात मूर्ती या नैसर्गिक, पर्यावरणपूरक जैवविघटक पदार्थांपासून तयार करण्यात येतील, ज्या प्लास्टिक, थर्माकोल, POP पासून मुक्त असतील अशा मूर्तींना प्रोत्साहन दिले जाईल. Plaster of Paris पासून तयार करण्यात आलेल्या मूर्ती बनविणे अथवा विसर्जित करणे यावर पूर्णपणे बंदी असेल.
२. सर्व मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच / रहिवासी संकुलातील टाकीमध्ये करणे अथवा मूर्ती स्विकृती केंद्रामध्ये देणे बंधनकारक आहे.

३. मूर्ती रंगविण्यासाठी पर्यावरणास अनुकूल पाणी आधारीत रंग जैव विघटनशील आणि बिनविषारी नैसर्गिक रंगाचा वापर करावा जसे की, हळद, चंदन, गेरु यांचा वापर करावा.
५. विषारी व अविघटनशील रासायनिक रंग /ओईल पेंट्स, कृत्रिम रंगावर आधारीत पेंट्सच्या वापरास सक्त मनाई आहे.
६. पुजेसाठी फुले, वस्त्र, इ. पूजा साहित्य पर्यावरणपुरक असावे. काच, धातूपासून बनविलेल्या ताट-वाट्यांचा वापर करावा.
७. प्लेटसाठी केळी व इतर पानाच्या पत्रावळीचा वापर करावा. एकवेळ वापराचे प्लास्टिक प्लेट, प्लास्टिक साहीत्य वापरू नये.
८. मूर्तींचे दागिने बनविताना वाळलेल्या फुलांचे घटक, पेंढा इत्यादीचा वापर करावा आणि मूर्ती आकर्षक बनविण्यासाठी झाडांची नैसर्गिक उत्पादने वापरावीत.
९. पूजा व उत्सव साजरे करण्या-या मंडळांनी पर्यावरणपूरक बाबीचा वापर करावा.
१०.सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोर पालन करणाऱ्या मूर्तीकार, कारागीर, उत्पादक किंवा व्यावसायिक यांचेकडूनच मूर्ती खरेदी करण्यास प्राधान्य देण्यात यावे.
१०. पर्यावरणपूरक साहित्य / शाडू मातीने मूर्ती घडविण्याचे / साठविण्याचे वेळोवेळी देण्यात आलेले निर्देश यापुढील सर्व उत्सवादरम्यान देखील लागू राहतील व त्यासाठी स्वतंत्र निर्देश / परिपत्रक / जाहिरात देण्यात येणार नाही.
११. यापुढील सर्व सण-उत्सावांसंदर्भात वेळोवेळी देण्यात आलेल्या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ अन्वये, संबंधित कारवाईस पात्र ठरतील.

प्रधानमंत्री आवास योजनेबाबत १४ फेब्रुवारी रोजी कार्यशाळेचे आयोजन

पुणे, दि.१३: प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० या केंद्र पुरस्कृत योजनेची पुणे विभागात प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता भू-शास्त्र विभागाचे सभागृह, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे गृहनिर्माण विभागामार्फत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यशाळेत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अधिक सक्षमपणे कार्यान्वित करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर लाभार्थ्यांची नोंदणी करुन त्यानुसार सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करणे तसेच योजनेबाबत जनजागृती आदींबाबत माहिती देण्यात येणार आहे, असे गृहनिर्माण विभागाने पत्रकान्वये कळविले आहे.

विनोदी लेखन सांस्कृतिक ठेवा व्हावा : भाग्यश्री देसाई

पुणे:विजय पटवर्धन फाऊंडेशन आयोजित ‘निर्मला -श्रीनिवास विनोदी लेखन स्पर्धा – २०२५ ‘ चा पारितोषिक वितरण समारंभ  १२ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता निळू फुले कला अकादमी (लाल बहादूर शास्त्री रस्ता)येथे झाला.निर्माती, अभिनेत्री भाग्यश्री देसाई, नाट्य अभिनेते दीपक रेगे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.

डॉ.अविनाश भोंडवे यांनी प्रथम क्रमांकासाठीचे ५ हजार पारितोषिक पटकावले.द्वितीय क्रमांकासाठीचे ३ हजार रुपयांचे पारितोषिक अवंती कोटे यांना मिळाले.तृतीय क्रमांकासाठी २ हजार रुपयांचे पारितोषिक स्मिता दामले- कुलकर्णी यांना देण्यात आले.अभिनेते विजय पटवर्धन यांनी प्रास्ताविक केले.चिन्मय पाटणकर यांनी  यांनी सूत्रसंचालन केले.५९ लेखकांनी या स्पर्धेत भाग घेतला. दीपक रेगे, अक्षय वाटवे यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले.

 स्पर्धेचे यंदाचे हे चौथे वर्ष होते. विजेत्या लेखकांनी त्याचे वाचन केले.

सौ. वृषाली पटवर्धन, अभिजित इनामदार,किशोर कुलकर्णी, मधुरा टापरे-आगरकर,योगेश सोमण,धनंजय आमोणकर, सुरेंद्र गोखले, प्रशांत तपस्वी, राजू बावडेकर इत्यादी उपस्थित होते.

भाग्यश्री देसाई म्हणाल्या,’ही विनोदी लेखन स्पर्धा महाराष्ट्रातील सांस्कृतिक जीवनातील महत्वाचा उपक्रम आहे. नव्या, ताज्या विनोदी लेखनाला प्रोत्साहन देणारे व्यासपीठ या निमित्ताने उपलब्ध झाले आहे. त्यातून महाराष्ट्राला नवा ठेवा मिळण्याची अपेक्षा आहे.स्पर्धेनंतर किंवा आधी या लेखकांना कार्यशाळेतून मार्गदर्शन केल्यास लेखकांना आणखी पुढे जाण्यास मदत होईल.’

‘विनोदी लेखन ही कला आहे.भावना दुखावण्याच्या काळात विनोद निर्मितीच्या सर्व शक्यतांचा विचार करावा. बोचरी टीका आणि विनोदी तिरकसपणा यातील फरक कळला पाहिजे.लिहिलेली कथा परत वाचावे. सर्व हत्यारे वापरावी, कथेचा आनंद वाचकाना मिळणे हा उद्देश विसरता कामा नये,असा सल्ला परीक्षक अक्षय वाटवे यांनी यावेळी बोलताना दिला.

पुण्यात 50 हून अधिक घरफोड्या करणारा चोरटा जेरबंद,

पुणे- शहरातील शिवाजीनगर पोलिसांनी एका कुख्यात घरफोडी चोराला अटक करून त्याच्याकडून १७ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख हर्षद गुलाब पवार (वय ३१, रा. घोटावडे फाटा, मुळशी, पुणे) अशी आहे.

पोलीस उपनिरीक्षक अजित बडे यांच्या पथकातील पोलीस अंमलदार सचिन जाधव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार म्हसोबा गेट बस स्टॉप, शिवाजीनगर येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून २३६.५३ ग्रॅम सोन्याचे दागिने, २१२ ग्रॅम चांदीचे दागिने, घरफोडीची साधने आणि ४९ कुलुपांच्या चाव्या जप्त करण्यात आल्या आहेत.२०२३ मध्ये जामिनावर सुटलेल्या पवारवर आधीच ५१ पेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याची कार्यपद्धती अत्यंत धूर्त होती. पोलिसांचा तपास चुकवण्यासाठी तो घरफोडी करण्याच्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी ४०-५० किलोमीटरचा फेरफटका मारत असे. तसेच वेगवेगळे जॅकेट आणि टोप्या वापरून वेशभूषा बदलत असे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसल्यास मोबाईलवर बोलण्याचे नाटक करून पोलिसांचा तपास भरकटवत असे. चोरलेले दागिने विकण्यासाठी तो निलकंठ राऊत या सहआरोपीची मदत घेत असल्याचेही तपासात उघड झाले आहे.

पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने केलेल्या कबुलीनंतर आणखी अनेक घरफोड्यांचा छडा लावण्यात पोलीस यशस्वी झाले आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

​​​​​​​मविआच्या सरपंचाला 1 रुपयाही मिळणार नाही:निधी हवा असेल तर भाजपत प्रवेश करा -नीतेश राणे

कुडाळ-निधी हवा असेल तर भाजपमध्ये प्रवेश करा. यापुढे महाविकास आघाडीच्या सरपंचाला एक रुपयाचाही निधी मिळणार नाही, असे वादग्रस्त विधान राज्याचे मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाचे राज्याच्या राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिसाद उमटत आहेत.

भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यात भाजपचा कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना मंत्री नीतेश राणे यांनी उपरोक्त फतवा काढल्यासारखे विधान केले. नीतेश राणे म्हणाले, भाजप जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मोठ्या ताकदीने वाढला पाहिजे. सर्वांनी आगामी निवडणुकांत महायुती सोडून अन्य कुणीही सत्तेत येणार नाही या दृष्टिकोनातून काम करावे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शतप्रतिशत भाजप निर्माण झाला पाहिजे. विरोधी बाकावर असताना मला खूप त्रास देण्यात आला. निधी देण्याच्या मुद्यावरूनही मला डावलण्यात आले.

पण आता आगामी दिवसांत जिल्हा नियोजनाचा निधी असेल, पक्षाचा असो किंवा सरकारचा कोणताही निधी फक्त महायुतीच्या उमेदवारांनाच मिळेल. बाकी कुणालाही काही मिळणार नाही. मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे की, ज्या – ज्या गावात महाविकास आघाडीचे सरपंच आहेत त्यांची यादी काढा. त्या गावांना एक रुपयाचाही निधी मिळणार नाही. गावाचा विकास हवा असेल तर त्यांना भाजपमध्ये प्रवेश करावा लागेल.

सरकार तुम्हाला न्याय देईल, तसेच गावाच्या विकासालाही मदत करेल. निधी वाटपात महायुतीचे काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या गावांना प्राधान्य दिले जाईल. भजापमध्ये प्रवेश केला तरच विकास होईल. उरले सुरले कुणी शिल्लक असतील तर त्यांनी भाजपमध्ये प्रवेस करावा. भाजप एक नंबरचा पक्ष होईल ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. याविषयी कार्यकर्त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नको. महायुतीविषयी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. पण या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून महायुतीच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम मी करेन.

एव्हिएशन गॅलरीमुळे विद्यार्थ्यांच्या विकासाला भर – अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. आयएएस

पुणे : पुणे महानगरपालिका अंतर्गत चालणाऱ्या एव्हिएशन गॅलरीला आणि महानगर पालिकेच्या पाळणाघराला पुणे महानगरपालिकेचे नव निर्वाचित आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी पहिल्यांदाच भेट दिली. यावेळी त्यांनी एव्हिएशन गॅलरीबद्दल बोलताना म्हणाले, “या एव्हिएशन गॅलरीमुळे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक विकासात वृद्धी होईल. पुण्यासारख्या शहरात असे गॅलरी असणे हे आजच्या पिढीला एक वरदानच आहे.”

या एव्हिएशन गॅलरीचा आणखीन विध्यार्थ्यांना लाभ व्हावा या उद्देशाने रिटायर पायलेट आणि ISRO चे रिटायर वैज्ञानिक यांचे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला.

यावेळी पुणे महानगर पालिकेच्या स्वास्थ्य विभाग प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत, पुणे महानगर पालिका बाग विभागाचे बाग व्यवस्थापक अशोक घोरपडे, पुणे महानगर पालिकेचे वरिष्ठ सामाजिक विकास अधिकारी आसंग पाटील, व्हॅन लियर फाउंडेशन अर्बन95चे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी आर्किटेक्ट आमिर पटेल, पाळणाघराचे शिक्षण, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

आयआयएचएम यंग शेफ ऑलिंपियाड विजेतेपद इंग्लंडकडे

पुणे, ता. १३ : जगातील ५० देशांचा समावेश असलेली सर्वात मोठी युवा शेफ स्पर्धा आयआयएचएम इंटरनॅशनल यंग शेफ ऑलिंपियाडचे विजेतेपद इंग्लंडच्या तरुण शेफ कामरान टेलरने पटकावले. यंग शेफ ऑलिम्पियाडच्या (वायसीओ)११ व्या आवृत्तीच्या पहिल्या दोन फेऱ्यांनंतर, पहिल्या दहा संघांचा सहभाग असलेल्या शानदार ग्रँड फिनालेमध्ये, आर्मेनियाच्या आर्सेन आर्मेनाक्यानने रौप्यपदक जिंकले, तर फिलीपिन्सच्या यवेस गॅब्रिएल कॅब्रेरा पोने कांस्यपदक जिंकले.

यंग शेफ ऑलिंपियाडची ११ वी आवृत्ती इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटने (IIHM) लंडन येथील इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी कौन्सिलच्या (IHC) भागीदारीत आयोजित केली होती.

यजमान भारताच्या आयआयएचएम बंगळुरूमधील शेफ अलियाकबर मुस्तफा रामपुरावाला याने युएईच्या जास्मिन अली माहेर लुत्फी जरार याच्या जोडीने प्रतिष्ठित डॉ. सुबोर्नो बोस कलिनरी इंटरनॅशनल चॅलेंज प्राइज जिंकून देशाला अभिमानसपद कामगिरी केली. या अनोख्या श्रेणीत २८ संघांचा समावेश होता, ज्यांना ग्रँड फिनाले किंवा प्लेट राउंडमध्ये स्थान मिळाले नव्हते. पाककृतीतील सहकार्य या संकल्पनेनुसार त्यांना १४ जोड्यांमध्ये विभागण्यात आले होते, जे प्रत्येकी दोन देशांचे प्रतिनिधित्व करत होते.

यंग शेफ ऑलिंपियाडचे अध्यक्ष डॉ. सुबोर्नो बोस म्हणाले, “पाककलेचे विश्व कोलकाताच्या आकाशाखाली एकत्रित आले आहे. ही जणू पाककला राजनीती आहे. युवा शेफच्या जगात, उत्तम भोजनाद्वारे जगाला आनंदी आणि शाश्वत बनवण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. फक्त भारतातच तुम्ही असे काहीतरी साध्य करू शकता. या वर्षी, ही स्पर्धा एका कुटुंबासारखी वाटली आणि आम्हाला गोव्यात उद्घाटन समारंभासाठी एक नवे ठिकाण मिळाले.”

पद्मश्री शेफ संजीव कपूर म्हणाले, “वायसीओ एक वेड आहे. जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही ११ वर्षे करता तेव्हा ती गोष्ट ही, ते झपाटलेपण ही अनेकपटीने वाढते. वायसीओ ही सहकार्यासह चालणारी स्पर्धा आहे. डॉ. बोस हे केवळ सोनेरी जॅकेट घालणारी अजब व्यक्ती नाहीत, तर ती सर्वांना प्रेम वाटावे अशी झपाटलेली, व्यक्ती आहे. ते एक पोलादी व्यक्तिमत्त्व आहे.”

पुणे महानगर प्रदेशाच्या विकास आराखड्यात रुग्णालये, उद्याने यांसारख्या पायाभूत सुविधांची गरज – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

0

मुंबई : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) अंतर्गत होणाऱ्या विकास आराखड्यात नव्याने विकसित होणाऱ्या भागांमध्ये रुग्णालये, उद्याने आणि इतर पायाभूत सुविधांचा समावेश करावा, अशी सूचना महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे झालेल्या पीएमआरडीएच्या बैठकीत त्यांनी हा मुद्दा मांडला.

या बैठकीला उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, नगरविकास राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ आणि पीएमआरडीएचे आयुक्त श्री. योगेश म्हसे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. पीएमआरडीएच्या आराखड्याबाबत झालेल्या या चर्चेत आयुक्त श्री. म्हसे यांनी पुणे महानगर प्रदेशातील प्रस्तावित विकासकामांवर सादरीकरण केले.

पायाभूत सुविधांचा विकास आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे

बैठकीत पुण्याच्या विस्तारित महानगर प्रदेशातील नव्याने विकसित होणाऱ्या भागांत नियोजन करताना आवश्यक मूलभूत सुविधांचा विचार होणे गरजेचे आहे, असे मत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “महानगर प्रदेशाच्या वाढत्या लोकसंख्येमुळे आरोग्य आणि पर्यावरणीय गरजा लक्षात घेऊन रुग्णालये आणि उद्याने यासारख्या सुविधा आराखड्यात समाविष्ट करणे महत्त्वाचे आहे. यामुळे नागरिकांना आरोग्य आणि जीवनशैलीसाठी आवश्यक सोयी मिळतील.”

मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक दखल

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचनेची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या. पीएमआरडीएच्या नियोजनात या बाबींचा अंतर्भाव करण्याचे निर्देशही त्यांनी आयुक्तांना दिले.

या बैठकीत पुणे महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थापन, नागरी सुविधा आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. भविष्यातील प्रकल्प आणि नियोजन यावरही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

अनिता माने यांच्या काव्यात अभिव्यक्तीची उर्मी -डॉ. वर्षा तोडमल

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे प्रेमकवी पुरस्कराचे वितरण

पुणे : अभिव्यक्त होणे ही माणूसपणाची खूण आहे. आजच्या पोटार्थी जगात वावरत असताना सर्जनशीलतेसाठी एक विराम शांतता हवी असते. ही सर्जनशील शांतता आज हरवली आहे. अशा काळात आपल्याला लिहिते ठेवत अभिव्यक्ती जीवंत ठेवण्याची उर्मी कवयित्री अनिता माने यांच्या काव्यातून जाणवते, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका व कवयित्री प्रा. डॉ. वर्षा तोडमल यांनी केले.

रंगत-संगत प्रतिष्ठानच्या काव्य विभागातर्फे व्हॅलेंटाईन डेनिमित्त गुरुवारी (दि.13) प्रसिद्ध कवयित्री अनिता माने यांचा यंदाच्या प्रेमकवी पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पुरस्काराचे वितरण डॉ. वर्षा तोडमल यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, कार्याध्यक्ष मैथिली आडकर मंचावर होते.
डॉ. तोडमल पुढे म्हणाल्या, माणसाच्या माणुसपणाचा आविष्कार, अभिव्यक्तीचा हुंकार काव्यातून झाला असावा, त्यामुळेच काव्य हा आदिम साहित्यप्रकार आहे. कवी या परंपरेवर कलम करीत नाविन्याची निर्मिती करीत असतो. ही प्रयोगशीलता, अभिव्यक्तीचा वेगळा प्रयत्न कवयित्री अनिता माने यांच्या काव्यातून जाणवतो. रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सांस्कृतिक उर्जा देण्याचे कार्य घडत आहे, हे एक जिंदादिल प्रतिष्ठान आहे, असेही त्या आवर्जून म्हणाल्या.

सत्काराला उत्तर देताना अनिता माने म्हणाल्या, प्रेमाची नाती वेगवेळी असतात. त्यांच्या परिभाषाही अनेक असतात. सुरुवातीला मी शब्दांच्या प्रेमात पडले आणि त्यातूनच कविता करू लागले. कवितेने मला खऱ्या अर्थाने जगायला शिकविले. ‌‘तूच दिले शब्दांचे अंगण‌’, ‌‘कोण जाणे कशासाठी‌’ अशा काव्य रचना त्यांनी या प्रसंगी सादर केल्या.

सुरुवातीस ॲड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, प्रत्येक नात्यात प्रेम असतेच. आपल्याला आयुष्य अनेक गोष्टी शिकवित असते. या आयुष्यात दुस्वास, भांडणे, रागराग करत बसण्यापेक्षा जग प्रेमाने जिंकावे, कारण प्रेमाने अनेक गोष्टी सुलभतेने साध्य होत असता.

परियच आणि मानपत्र वाचन वैजयंती आपटे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आयोजित प्रेम कविसंमेलनात कांचन सावंत, डॉ. ज्योती रहाळकर, सुजित कदम, कविता क्षीरसागर, चंचल काळे, जयश्री श्रोत्रिय, केतकी देशपांडे, निरूपमा महाजन, विजय सातपुते, मनीषा सराफ, स्वप्नील पोरे, तनुजा चव्हाण, प्रभा सोनवणे यांचा सहभाग होता. सूत्रसंचालन प्राजक्ता वेदपाठक यांनी केले

एअर इंडियातर्फे उत्तर गोलार्धातील उन्हाळ्याच्या वेळापत्रकात आंतरराष्ट्रीय मार्ग नेटवर्क मजबूत

गुरुग्राम, 13 फेब्रुवारी 2025: एअर इंडियाने उत्तर गोलार्धातील उन्हाळ्याच्या वेळापत्रकांतर्गत 30 मार्च 2025 पासून प्रभावी ठरणाऱ्या काही महत्त्वाच्या मार्गांवर आज आपल्या अतिरिक्त सेवा जाहीर केल्या आहेत:

युनायटेड किंगडम:

·         दिल्ली-लंडन हीथ्रो: आठवड्यातील 3 अतिरिक्त उड्डाणे वाढवून ही संख्या आता आठवड्यातील 21 वरून 24 उड्डाणे अशी झाली आहे. ही सेवा एअर इंडियाच्या प्रमुख A350-900 आणि सुधारित B787-9 विमानांद्वारे देण्यात येईल.

·         अमृतसर-बर्मिंगहॅम: दर आठवड्याला 3 वरून 4 उड्डाणे.

·         अमृतसर-लंडन गॅटविक: दर आठवड्याला 3 वरून 4 उड्डाणे.

·         अहमदाबाद-लंडन गॅटविक: दर आठवड्याला 3 वरून 5 उड्डाणे.

युरोप:

·         दिल्ली-झ्युरिक: दर आठवड्याला 4 वरून 5 उड्डाणे.

·         दिल्ली-व्हिएन्ना: दर आठवड्याला 3 वरून 4 उड्डाणे.

फार ईस्ट (आग्नेय आशिया) आशिया:

·         दिल्ली-सेऊल (इंचेऑन): दर आठवड्याला 4 वरून 5 उड्डाणे.

·         दिल्ली-हॉंगकॉंग: सध्याच्या A321 ऐवजी B787 ड्रीमलाईनर वर आठवड्यात 7 उड्डाणे.

·          

आफ्रिका:

·         दिल्ली-नैरोबी: दर आठवड्याला 3 वरून 4 उड्डाणे.

एअर इंडियाच्या नॅरोबॉडी विमानांचे आधुनिकीकरण चांगल्या प्रकारे सुरू असून ते 2025 च्या मध्यापर्यंत पूर्ण होईल. याशिवाय, मोठी परंपरा असलेल्या वाईडबॉडीज विमानांपैकी पहिले बोईंग  787 विमान एप्रिलमध्ये नवीन सीट्स आणि मनोरंजन प्रणालीसह पुनर्रचना सुरू करेल आणि ऑक्टोबर 2025 मध्ये सेवेत पुन्हा सामील होईल. त्यानंतर, सर्व 27 पारंपरिक विमानांचे अपग्रेड पूर्ण होईपर्यंत दरमहा दोन ते तीन B787s ची भर पडेल.

पारंपरिक बोईंग 777 विमाने नवीन सीट्स आणि मनोरंजन प्रणालीसह पुनर्रचना होऊन सुरुवातीला 2025 मध्ये सेवा द्यायला सुरूवात करणार होती. परंतु आता निवडलेल्या सीट पुरवठादाराच्या उत्पादन मर्यादांमुळे 2026 च्या सुरुवातीस सेवेत येतील. दरम्यान, एअर इंडिया 2025 मध्ये पूर्ण पुनर्रचना कार्यक्रमाच्या आधी B777 च्या अंतर्गत भागांमध्ये शक्य तितक्या सुधारणा करत आहे.

पुनर्रचना कार्यक्रम आणि परिणामी वाहतूक ताफ्यातील तात्पुरत्या कपातीमुळे, एअर इंडिया 30 मार्च ते 13 सप्टेंबर 2025 दरम्यान मुंबई-मेलबर्न थेट सेवा तसेच 30 मार्च 2025 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत कोची-लंडन गॅटविक थेट सेवा या काळासाठी थांबवत आहे. एअर इंडिया अमृतसर, अहमदाबाद आणि गोवा येथून लंडन गॅटविकला आठवड्यात12 उड्डाणे चालू ठेवणार आहे.

राज्यसभेत वक्फ संशोधन विधेयक 2024 च्या संयुक्त संसदीय समितीचा अहवाल आज डॉ . मेधा कुलकर्णींनी पटलावर ठेवला.

नवी दिल्ली- राज्यसभेत वक्फ संशोधन विधेयक 2024 च्या संयुक्त संसदीय समितीचा अहवाल आज डॉ . मेधा कुलकर्णींनी पटलावर ठेवला.यावेळी त्या म्हणाल्या ,'”हा अहवाल कोणत्या एका विशिष्ट समाजाच्या विरोधात नाही. उलट त्या समाजातील गरीब आणि गरजू अशा मुस्लिम बांधवांसाठी अतिशय उत्तमरीतीने निर्णय या अहवाला सुचवले आहेत. वक्फच्या मिळकतींबाबत एक नियमितता व एक कार्यपद्धतीचा अवलंब व्हावा तसेच अतिशय श्रद्धेने ज्या भावनेतून ज्या मिळकतींचे (संपत्तीचे व जमिनीचे) दान झाले असेल, त्यातून मिळणारा लाभ आणि शैक्षणिक व आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुविधा या गरीब मुस्लिमांना मिळाव्यात याचा विचार करण्यात आला आहे.


श्रद्धा भावनेने दान केलेल्या जमिनीचा ताबा खाजगी आणि बेकायदेशीर पद्धतीने व व्यक्तिगतरित्या विरोधी पक्षाच्या धनदांडग्या नेत्यांनी घेतलेला असल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
संयुक्त संसदीय समितीने गेले सहा महिने देशातील प्रत्येक राज्यात असलेल्या अनेक घटकांची संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन प्रत्येक मुद्द्यांचा विचार अहवालामध्ये मांडला आहे.
अतिशय लोकशाही पद्धतीने सर्वांना आपल्या सूचना मांडण्याची संधी दिली गेली होती, त्यावर मतदान घेतले गेले आणि सर्व सूचनांचा समावेश करून हा अहवाल सभागृहाच्या पटलावर सर्वांच्या अध्ययनासाठी सादर करण्यात आलेला आहे.
विरोधकांच्या खोट्या प्रचाराला प्रत्येक वेळी देश बळी पडणार नाही हे त्यांनी आता समजून घ्यावे.
संविधानाच्या व लोकशाहीच्या मूल्यांचा अनादर करून कायदे मोडून यापुढे कोणतेही कार्य करू दिले जाणार नाही.” असे मत संयुक्त समितीच्या सदस्या खासदार डॉ मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

साधू वासवानी पुलाला अडथळा ठरणाऱ्या झोपड्या हटविल्या

पुणे -कोरेगाव पार्क आणि व्हीआयपी विश्रामगृह या भागाला जोडण्यासाठी महत्त्वाचा असणाऱ्या साधू वासवानी रेल्वे पुलाच्या बांधकामाचा मोठा अडसर महापालिकेला दूर करण्यात यश आले आहे. व्हीआयपी विश्रामगृहाच्या बाजूने असलेल्या १०० पेक्षा जास्त झोपड्या हटविण्याचे काम महापालिकेने सुरु केले आहे.त्यामुळे उर्वरित जुना पूल पाडून नवीन पूल बांधण्याच्या कामाला गती येणार आहे.

साधू वासवानी पूल बांधून ५० पेक्षा जास्त वर्ष उलटून गेल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला होता. त्यामुळे हा रेल्वेमार्गावरील पूल पाडून नवा पूल बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यासाठी ८३ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.पण हा पूल नगर रस्ता, हडपसर, पुणे स्टेशन, स्वारगेट या भागात ये जा करण्यासाठी सोईचा होता, त्यावरून रोज हजारो वाहनांची वाहतूक होत होती. हा पूल पाडल्याने परिसरातील नागरिकांना व वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागणार होता. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी पर्यायी व्यवस्था केल्यानंतर याठिकाणी काम सुरु झाले आहे.

महापालिकेने या रेल्वे मार्गावरील पुलाचा काही भाग आधी पाडला. या पुलालगत अनेक झोपड्या होत्या. त्यांना तेथून काढल्यानंतर संपूर्ण पूल पाडता येणार होता. गेल्या काही महिन्यापासून झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न होते. त्यास काही जणांनी विरोध केला होता.अखेर या नागरिकांची समजूत काढल्यानंतर महापालिकेचे त्यांचे हडपसर येथे पुनर्वसन केले आणि आता झोपड्या काढून घेण्यास सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उद्या सर्व झोपड्या हटविल्या जातील असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाने येथील झोपडपट्टी धारकांचे हडपसर सर्वे क्रमांक १३२ येथे पुनर्वसन केले आहे. त्यामुळे या भागातील झोपड्या काढण्याचे काम सुरु झाले आहे. कारणामुळे या प्रकल्पाचे काम आता वेगात सुरु होईल, असे मुख्य अभियंता युवराज देशमुख यांनी सांगितले.

पुणे शहरातील दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा-कात्रज भुयारी मार्ग-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, : पुणे शहरात दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग तयार करावा. हा भुयारी मार्ग ‘ट्वीन टनल’ पद्धतीचा असावा. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सह्याद्री अतिथीगृह येथे काल (दि. १२)झालेल्या बैठकीत दिले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

प्रस्तावित नवीन पुरंदर विमानतळ रस्ते जाळ्यांसाठी 636.84 कोटी, रांजणगाव आणि हिंजवडी औद्योगिक क्षेत्रातील सिमेंट रस्त्यांसाठी बैठकीत २०३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. ‘अर्बन ग्रोथ सेंटर’ करीता रस्त्यांचे जाळे तयार करण्यासाठी 1526 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. पुणे शहर वळण मार्ग, पुणे सातारा आणि पुणे नगर रस्त्यापासून पुरंदर विमान तळाला चांगली ‘ कनेक्टिव्हिटी ‘ तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

नवीन शहर करताना रस्ते 18 मीटर रुंदीचे करावे. भविष्यातील लोकसंख्येचा विचार करीत पायाभूत सुविधांचा अंतर्भाव करावा. प्रदेश विकास प्राधिकरणाने पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करावी. प्राधिकरणांनी अद्ययावत संकेतस्थळ सुरू करावे. संकेतस्थळावरून जास्तीत जास्त ऑनलाईन सुविधा देण्यात याव्यात. विकास शुल्क नागरिकांना परवडेल अशा पद्धतीने ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

मुख्यमंत्री म्हणाले, विकास योजना तयार करताना लागत असलेला कालावधी लक्षात घेता प्राधिकरणांनी विकास योजना दोन टप्प्यात करावी. पहिल्या टप्प्यात रस्ते, मलनिस्सारण, पाणीपुरवठा, विज पुरवठा, स्मशान भूमी, दफन भूमी आदींचा समावेश असावा. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात अन्य सुविधांचा समावेश करावा.

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे आदींसह अधिकारी उपस्थित होते.

प्राधिकरणांना आवश्यकतेनुसार आकृतीबंध मंजूर करून देण्यात आलेला आहे. सध्या प्रतिनियुक्तीवर पदभरती करून या नियुक्त्या नियमित करून घ्याव्यात. प्राधिकरणांना विकासात्मक कामांचे नियोजन करण्यासाठी उपलब्ध असलेली शासकीय जमीन विनामूल्य देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

विकास योजनेत रस्ते 18 मीटर रुंदीचे करण्यासाठी नियमात बदल करण्याच्या सूचना करीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विकास योजनांचे नियोजन करताना चांगल्या दर्जाची सल्लागार एजन्सी नियुक्त करावी. प्राधिकरणांनी भविष्यातील लोकसंख्येचा विचार करता पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर द्यावा, यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करीत प्रकल्प कार्यान्वित करावे. पाण्याचे उपलब्धता बघूनच बांधकाम परवानगी देण्यात यावी.

मुख्यमंत्री म्हणाले, पुणे महानगर परिवहन महामंडळाला प्राधिकरणाने बसेस देताना त्यांच्याकडील मनुष्यबळ, दुरुस्तीची व्यवस्था आणि लोकसंख्येचा विचार करावा. सुरुवातीला पुणे महामंडळाला इलेक्ट्रिक बसेस दिल्या होत्या. या बसेसमुळे अत्यंत कमी दरात नागरिकांना वातानुकूलित प्रवास करता आला. महामंडळांने प्राधिकरणाकडे ५०० बसेसची मागणी केली आहे. या बसेस सीएनजी असाव्यात. भविष्यात कुठल्याही प्रकारे व्यवस्थापनाचा प्रश्न येणार नाही, याची काळजी घ्यावी. पुणे राजभवन आवारातील जागा मेट्रोच्या उड्डाणपूल सेवेसाठी देण्याची कारवाई तातडीने पूर्ण करावी.