Home Blog Page 458

‘आनंदयात्री‌’तून पुणेकर रसिक ‘पुलकित’पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचतर्फे आयोजन

पुणे : ‌‘तुझे आहे तुजपाशी‌’ नाटकातील प्रवेश, ‘ती फुलराणी‌’तील स्वगत, ‌‌‘अंतू बरवा‌’ या व्यक्तिरेखेसह विविध किश्श्यांनी पुणेकर रसिकांची सायंकाळी ‘पुलकित’ झाली.
निमित्त होते पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच आयोजित ‘आनंदयात्री‌’ या विशेष कार्यक्रमाचे! पूना गेस्ट हाऊस येथे सोमवारी (दि. १४) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपाडे अर्थात पुलंच्या विपुल साहित्यातील उत्कंठावर्धक किस्से आणि पैलू उलगडून दाखविणाऱ्या कार्यक्रमास रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. कलाकारांनी आत्मियतेने केलेले सादरीकरण आणि त्यास रसिकांनी भरभरून दिलेली दाद यातून कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.
‘स्वरयोग’ निर्मित कार्यक्रमाची संकल्पना प्रदीप देसाई यांची होती तर निर्मिती सहाय्य सुबोध चितळे यांचे होते. देसाई यांनी पुलंविषयीच्या अनेक आठवणी आणि किस्से सांगत कार्यक्रमातील रंगत वाढविली. पुलंचे रंगमंचावर झालेले आगमन, आकाशवाणी, दूरदर्शनमध्ये केलेली नोकरी, व्यक्ती म्हणून, संगीतकार म्हणून अनुभवलेले पुलं असे अनेक किस्से त्यांनी सांगितले.
प्रसिद्ध एकपात्री कलाकार सुबोध चितळे, केतकी पांडे, नाट्यकर्मी राजीव कुलकर्णी, मंजुषा जोशी या कलाकारांनी सुरुवातीस ‘तुझे आहे तुजपाशी’ नाटकातील प्रवेश सादर केला. ‘असा मी असामी’ हा एकपात्री प्रवेश, ‘ती फुलराणी’ या नाटकातील स्वगत रसिकांना विशेष भावले. संजय मरळ आणि वैजू चांदवडे यांनी गीते सादर केली. सुनीताबाई देशपांडे यांनी लिहिलेल्या पत्रांचे वाचन हा एक अनोखा अनुभव ठरला.
पूना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार यांनी स्नेह मंचतर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. त्याप्रमाणे पु. ल. देशपांडे यांच्याविषयीच्या आठवणीही सांगितल्या. प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, आनंद सराफ, ममता सपकाळ, बंडा जोशी, मकरंद टिल्लू यांच्यासह सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. कलाकारांचा सत्कार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन अजित कुमठेकर यांनी केले.

म्हाडाच्या लॉटरीमध्ये कल्याणमध्ये 9 लाखात घराचे स्वप्न पूर्ण होणार, जाणून घ्या किमती आणि वेळापत्रक

मुंबई : म्हाडाने ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई परिसरासाठी तब्बल 5362 घरे आणि भूखंडांसाठी लॉटरी काढली आहे. सर्वसामान्यांसाठी ही मोठी संधी असून अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या लॉटरीतील सर्वाधिक घरे ही कल्याणमध्ये असून त्याची एकूण संख्या ही 3,641 इतकी आहे. महत्त्वाचं म्हणजे या घरांच्या किमती या 9 लाखांपासून सुरू होत असून 35 लाखांपर्यंत आहेत.

म्हाडाने कल्याणमध्ये कोणत्या भागासाठी आणि किती किमतीमध्ये घरे उपलब्ध करुन दिली आहेत याची माहिती –

  1. मॅक्रो टेक डेव्हलपर्स, घारीवली, कल्याण (लोढा डेव्हलपर्स)

अल्प उत्पन्न गटासाठी

एकूण घरे – 2429

क्षेत्रफळ – 495 स्क्वेअर फूट

किंमत – 21,37,770 ते 21,98,200 रुपये

  1. होराईझन प्रोजेक्ट प्रा. लिमिटेड, उमरसर सांडप , ठाणे (रुनवाल डेव्हलपर्स)

अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटासाठी

एकूण घरे – 432 आणि 141 (एकू्ण – 571)

किंमत – अल्प उत्पन्न – 19,03,300 ते 19,13,800

अत्यल्प उत्पन्न – 13,40,500 रुपये

  1. धारवानी प्रॉपर्टी, कल्याण

अल्प उत्पन्न

एकूण घरे – 6

किंमत – 22,41,000 किंमत

  1. शिरढोण

अल्प उत्पन्न गट

एकूण घरे – 525

किंमत – 35,66,689

  1. अभिदर्शन कॉर्पोरेशन, एल एल पी , टिटवाळा कल्याण

अत्यल्प उत्पन्न गट

एकूण घरे – 56

किंमत – 19,60,900 ते 19,95,400

  1. सिझन सहारा, आडीवली, पिसवली , कल्याण

अल्प उत्पन्न गट

एकूण घरे- 37

किंमत – 18,90,600 ते 25,75,100

  1. गौरी विनायक बिल्डर्स तिसगाव , कल्याण

अत्यल्प उत्पन्न गट

एकूण घरे- 7

किंमत – 9,55,800 ते 11,32,100

सोडतीचे वेळापत्रक

1) सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज व दस्तऐवती सुरुवात :

15/07/2024 रोजी सकाळी 9:00 वा. पासून

2) ऑनलाईन अर्ज पेमेंट स्वीकारणी सुरुवात :

16/07/2024 रोजी सकाळी 10:30 वा. पासून

3) ऑनलाईन अर्जासाठी लॉटरीची शेवटची तारीख व वेळ :

29/07/2024 रोजी रात्री 11:59 वा. पर्यंत

4) ऑनलाईनद्वारे शुल्क स्वीकारणीची शेवटची दिनांक व वेळ :

30/07/2024 रोजी रात्री 11:59 वा. पर्यंत

5) सोडतीसाठी स्वीकार झालेल्या अर्जांची प्रारंभिक यादी प्रसिद्धी :

29/07/2024 रोजी संध्याकाळी 6:00 वा. पर्यंत

6) हरकती व तक्रारी निवारणासाठी ऑनलाईन लिंकद्वारे अंतिम दिनांक व वेळ :

31/07/2024 रोजी संध्याकाळी 6:00 वा. पर्यंत

7) सोडतीसाठी स्वीकारलेल्या अर्जांची अंतिम यादी प्रसिद्धी :

01/08/2024 रोजी सकाळी 10:00 वा.

8) सोडतीचा दिनांक व वेळ :

02/08/2024 रोजी सकाळी 10:00 वा.

9) सोडतीचे ठिकाण :

डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे

10) सोडतीनंतर यशस्वी अर्जदारांची नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध :

02/08/2024 रोजी संध्याकाळी 6:00 वा. पर्यंत

अर्ज कुठे कराल?
म्हाडाच्या या घरांसाठी 15 जुलै रोजी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून त्यासाठीची शेवटची तारीख ही 29 ऑगस्ट आहे. म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.

जेष्ठ तमाशा कलावंत काळू-बाळू कवलापूरकर यांचे तैलचित्र, विष्णूदास भावे नाट्य मंदिरात लावण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन..!

मुंबई (प्रतिनिधी )- तमाशा सम्राट काळू -बाळू उर्फ कै.लहू -अंकुश खाडे कवलापूरक यांचे सांगली येथील विष्णूदास भावे नाट्य मंदिरात तैलचित्र लावण्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल.असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानभवनात दिले.
तमाशा सम्राट काळू बाळू कवलापूरकर (जि.सांगली) यांचे तमाशा व लोककला क्षेत्रात अतुलनीय योगदान आहे.त्यांनी संपूर्ण आयुष्य लोककला क्षेत्राच्या सेवेत समर्पित केले.
तमाशा कला क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना इ.स.1999-2000 या वर्षाचा संगीत नाट्य अकादमीचा पुरस्काराने संयुक्तपणे सन्मानित करण्यात आले होते.
मात्र सांगली-मिरज-कुपवाड महानगर पालिकेचे असलेल्या विष्णुदास भावे नाट्य मंदिरामध्ये कै. काळू बाळू यांचे अद्याप ही तैलचित्र लावले नसल्याने लोककला क्षेत्रातील लोककलावंतांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी याबद्दल यापूर्वी नाराजी व्यक्त केली होती.
यासंदर्भात आज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना जेष्ठ पत्रकार आणि लोककलेचे अभ्यासक खंडूराज गायकवाड यांनी विधानभवनात प्रत्यक्ष भेट घेवून लेखी निवेदन दिले.यावेळी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, जेष्ठ पत्रकार जासंग बोपेगावकर,नासिकेत पानसरे, केतन खेडेकर हे उपस्थित होते.

लोकमान्यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे निधन

पुणे- केसरीचे विश्वस्त संपादक व लोकमान्याचे पणतू , टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक(वय ७४ ) यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी नातवंडे असा परिवार आहे. आज सकाळी 8 ते 11 या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी टिळकवाड्यात ठेवण्यात येणार आहे. अंत्यसंस्कार दुपारी बारानंतर वैकुंठ स्मशानभूमी येथे करण्यात येणार आहेत.गोवा मुक्ती चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेतृत्व करणारे स्वर्गीय श्री जयंतराव टिळक यांचे ते पुत्र होत .

स्वर्गीय श्री. टिळक १२ वर्षे संसद सदस्य (राज्यसभा) आणि १६ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष होते.सेवा सदन आणि हुजूर पागा सारख्या अनेक शैक्षणिक संस्थांसाठी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणि मार्गदर्शक असलेल्या स्वर्गीय श्रीमती इंदुताई टिळक या त्यांच्या मातोश्री होत्या . कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे बालपणापासूनच अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये रस होता . इंडियन सोसायटी ऑफ न्यूजपेपर,ऑडिट ब्युरो ऑफ सर्कुलेटर्स,इंडियन लँग्वेज न्यूजपेपर असोसिएशन,अखिल भारतीय संपादक परिषद, महाराष्ट्र राज्य पत्रकारिता अधिस्वीकृती समिती अशा विविध संस्थांवर त्यांनी काम पाहिले .

दीपक टिळक यांचा ६ नोव्हेंबर १९५२ रोजी त्यांचा जन्म झाला ,पुणे विद्यापीठातून बीकॉम , MBA,पत्रकारितेचा कोर्स करून वृत्तपत्रातील व्यवस्थापन शास्त्रावर त्यांनी PHD केली

त्यांनी ज्या पदांवर काम केले —

अध्यक्ष आणि विश्वस्त, टिळक स्मारक ट्रस्ट जे नागरिकांच्या सामाजिक आणि राजकीय सेवेला प्रोत्साहन देते. राष्ट्रसेवेतील योगदानाबद्दल एखाद्या व्यक्तीला प्रतिष्ठित टिळक पुरस्कार प्रदान करते.

• अध्यक्ष आणि विश्वस्त, श्री शिवाजी मंदिर ट्रस्ट जे दरवर्षी बैठका आणि योग्य कार्यक्रम आयोजित करून महान योद्धा छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सन्मानार्थ उपक्रमांना प्रोत्साहन देते. ट्रस्टद्वारे विविध क्रीडा उपक्रम देखील आयोजित केले जातात.

• अध्यक्ष आणि विश्वस्त, अनाथ हिंदू महिलाश्रम (हिंदू महिला बचाव गृह संस्था) १९३५ मध्ये निवारा नसलेल्या महिलांच्या संरक्षणासाठी स्थापन झालेले, आता सुमारे ऐंशी न्यायालयीन मुलींची काळजी घेते. सर्व कैद्यांना राहण्याची, भोजनाची, शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातात. याशिवाय, ट्रस्ट एक कामगार महिला वसतिगृह आणि शाळा चालवते.

• अध्यक्ष, १३६ वर्षे जुनी वक्तृत्वोत्तेजक सभा, महिनाभर चालणारी वसंत व्याख्यानमाला आणि जे.एस. रानडे (ज्याला “वसंत व्याख्यानमाला” असे म्हणतात) यांचे आयोजन करते.

अध्यक्ष, वेदशास्त्र सभा, १८७५ मध्ये न्यायमूर्ती रानडे यांनी वैदिक वारशाच्या जतनासाठी स्थापन केली. वैदिक विद्यार्थ्यांसाठी विविध परीक्षा घेतात आणि ऋृगवेदची ध्वनी आणि लिपी दोन्ही सीडी आवृत्ती तयार केली आहे.


• अध्यक्ष आणि विश्वस्त, महिला पुनर्वसन केंद्र जे विधवा आणि गरजू महिलांचे पुनर्वसन करण्यास मदत करते आणि गरजू महिलांसाठी रोजगार आणि प्रशिक्षणासाठी “सुग्रंथ” रेस्टॉरंट चालवते.

• सचिव: पूना ज्युडो असोसिएशन.
• माजी उपाध्यक्ष, ज्युडो फेडरेशन ऑफ इंडिया
• रेड अँड व्हाईट बेल्ट – ज्युडो ८ वा डॅन
• संपूर्ण भारतात ज्युडोच्या प्रसारासाठी प्रयत्न केले आहेत. हजारो तरुण मुलांना ज्युडोमध्ये प्रशिक्षित आणि प्रोत्साहित केले आहे. अनेक राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ज्युडो स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

मिळालेले पुरस्कार
• पी.के. ऊर्फ अण्णा पाटील फाउंडेशनचा “पुरुषोत्तम पुरस्कार”
• सुशील सोशल फोरम पुरस्कार
• आचार्य अत्रे पुरस्कार – मानद सदस्य, रोटरी क्लब ऑफ पुणे साउथ (ऑगस्ट 2012)
• प्रख्यात माजी विद्यार्थी पुरस्कार, M.E. सोसायटीचे नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे

खुनातील आरोपी उद्धव उर्फ उद्ध्या कांबळेला सहकारनगर पोलिसांकडून अटक

पुणे – २०१६ साली झालेल्या खुनाच्या प्रकरणात आरोपी असलेल्या उद्धव कांबळे ऊर्फ उद्ध्या कांबळे याला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयात अनेक वेळा तारखा असूनही तो हजर न राहिल्याने कोर्टाने त्याच्याविरोधात नॉन बेलेबल वॉरंट (NBW) जारी केला होता. उद्धव कांबळे हा शिवसेना शिंदे गटाचा विभाग प्रमुख आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यात उदय कांबळेवर गंभीर आरोप असून त्याच्याविरुद्ध न्यायालयात खटला सुरु आहे. मात्र तो सातत्याने कोर्टाच्या तारखांना अनुपस्थित राहिल्यामुळे न्यायालयाने कठोर भूमिका घेत नॉन बेलेबल वॉरंट काढले.

त्यानंतर सहकारनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत कांबळेला अटक केली आणि न्यायालयासमोर हजर केले. कोर्टात हजर न राहिल्याबाबत खूप गंभीर दखल घेऊन सदर आरोपीवर अटी शर्ती निर्बंध घालून त्यास कोर्टाने करवाई केली. सहकारनगर पोलीस स्टेशन कडिल पोलीस हवालदार गणेश तळेकर , चंद्रकांत जाधव , अमोल मंडले, पदमाकर शिंदे यांनी करवाई केली आहे.

कॉंग्रेसचे युवा नेते वैभव ठाकूरसह नाशिक जिल्ह्यातील असंख्य पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश…

मुंबई दि. १५ जुलै – विकास हाच केंद्रबिंदू मानून आम्ही काम करत आहोत असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले.समाजाचे भले करायचा हा एकच ध्यास आपल्या सर्वांचा आहे असे सांगतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला यश मिळवायचे आहे. विधानसभेत नाशिक जिल्ह्याने शंभर टक्के जागा निवडून दिल्या हे मी कधीही नाकारणार नाही असेही अजित पवार म्हणाले.

मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी, बहुजनांना आपण सत्तेत संधी दिली आहे. जेव्हा आम्ही शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांचे विचार घेऊन चालतो त्यावेळी आम्ही या समाजातील लोकांना प्रतिनिधीत्वही दिले आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.यावेळी वैभव ठाकूर आणि त्यांच्या समवेत पक्षात आलेल्या सर्वांचे अजित पवार यांनी पक्षात स्वागत केले.

कॉंग्रेसचे युवा नेते वैभव ठाकूर यांनी नाशिक जिल्ह्यातील आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आज के. सी. कॉलेज सभागृहात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार हिरामण खोसकर, आमदार विजयसिंह पंडित, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे आदींसह पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“सदस्यांचा सन्मान अबाधित ठेवला पाहिजे; आवश्यक असल्यास मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची मदत घेईन – डॉ. नीलम गोऱ्हे”

मुंबई : वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन केंद्राला मंजूर झालेला निधी अद्याप मिळाला नसल्याबाबत विधान परिषदेत चर्चा रंगली. यावेळी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संबंधित सचिवांना योग्य समज देण्यात येईल, असे जाहीर करून सभागृहाच्या सदस्यांचा सन्मान राखण्याच्या भूमिकेवर ठाम भूमिका घेतली.

विधानपरिषद सदस्य आ. हेमंत पाटील यांनी या विषयावर जोरदार आक्रमक भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, “सरकारी फाईल प्रलंबित असून मी संबंधित महिला सचिवांना चार वेळा फोन केला, परंतु त्यांनी उत्तर दिले नाही. पंधरा-पंधरा दिवस एसएमएसला देखील प्रतिसाद मिळत नाही. हे कुठले शासकीय काम? असा दिरंगाईचा प्रकार असू नये. आमदारांना आणि या सभागृहाच्या सदस्यांना सन्मान मिळाला पाहिजे,” अशी तीव्र शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. पाटील यांनी पुढे असेही म्हटले की, “कॅबिनेट मंत्री दर्जा (स्टेटस) मिळाल्यावर आम्हाला शासकीय पातळीवर संवाद साधता आला पाहिजे. असा प्रतिसाद मिळत नसेल, तर मला हा दर्जा नको आहे.”

यावर प्रतिक्रिया देताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी हेमंत पाटील यांना पाठिंबा देत सांगितले की, “सदस्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे. सचिवांकडून अशा प्रकारे उत्तर सुद्धा न देणे ही गंभीर बाब आहे. आपण दिलेली माहिती मी गांभीर्याने घेतली असून, मी स्वतः संबंधित सचिवांना फोन करून योग्य ती समज देईन. आवश्यक असल्यास मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा करेन. या सभागृहाचे सदस्य असलेल्या कोणत्याही आमदारांचा सन्मान यामध्ये सर्वांत महत्त्वाचा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या या ठाम भूमिकेचे सर्व सदस्यांनी सभागृहात बाके वाजवून स्वागत केले.

ऊसतोड कामगार कायद्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करा :उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. १५ जुलै २०२५ :

ऊसतोड कामगारांसाठी स्वतंत्र कायदा तयार करून तो लवकरात लवकर लागू करण्यासाठी सहकार विभागाने कार्यवाही करावी. जेणेकरून विधेयक डिसेंबर अधिवेशनापूर्वीच अंतिम करून जनतेच्या सूचनांसाठी प्रसिद्ध करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी, असे मत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

विधानभवनात ऊसतोड कामगारांच्या व महिला कामगारांच्या आरोग्य, सुरक्षाव्यवस्था आणि सामाजिक संरक्षणाच्या समस्या तातडीने मार्गी लागाव्यात यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार सदाभाऊ खोत, आमदार प्रा.डॉ. मनीषा कायंदे, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ऊसतोड कायदा तयार करताना कामगारांचा विचार अधिक करण्यात यावा. ऊस तोड कामगारांसाठी प्रत्येक कारखान्यावर आरोग्य तपासणीसाठी डॉक्टरांची ओपीडी सुरू ठेवावी आणि महिला कामगारांसाठी स्त्रीरोगतज्ञाची नेमणूक करण्यात यावी. तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत सर्व ऊसतोड कामगारांची नोंदणी करण्यात यावी. महिला ऊसतोड कामगारांचा लाडक्या बहिणी योजनेत शंभर टक्के सहभाग करून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात यावे, आशा सूचनाही डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.

ऊसतोड महामंडळाच्या पोर्टलवर स्त्री पुरुष कामगारांची स्वतंत्र माहिती द्यावी. ऊसतोड कामगार महामंडळाने मॅटर्निटी बेनिफिट फंडाच्या माध्यमातून ऊसतोड महिला कामगारांना प्रसूती रजा कालावधीत किमान वेतन देण्याबाबत कार्यवाही करावी. तसेच कामाच्या ठिकाणी स्वच्छता गृह, सॅनिटरी पॅड उपलब्ध करून घ्यावे, असेही उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

राज्यातील ऊसतोड कामगारांसाठी विविध कल्याणकारी व सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण करून त्यांची नोंदणी करावी. तसेच प्रत्येक कामगाराला ओळखपत्र देण्यात यावे, जेणेकरून ऊसतोड कामगारांसाठी भविष्यात राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ त्यांना देणे सुलभ होईल. तसेच ऊसतोडणीसाठी इलेक्ट्रॉनिक कोयत्याचा देखील विचार करण्यात यावा, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

विचाराधीन कैद्यांच्या न्यायहक्कांच्या मार्गदर्शनासाठी उपयुक्त ‘अनलॉकिंग लिबर्टी’ पुस्तिकेचे प्रकाशनपुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा पुढाकार

पुणे, दि. 15: प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन यांच्या हस्ते जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने विचाराधीन कैद्यांच्या न्यायहक्कांसाठी न्यायाधिश, वकील आणि या विषयाच्या अनुषंगाने अन्य भागिदारांसाठी उपयुक्त अशा ‘अनलॉकिंग लिबर्टी- द युटीआरसी प्रोसेस अँड अंडरट्रॉयल राईट्स’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय न्याय दिनाचे औचित्य साधून शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालय येथील अशोक सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे, बी. व्ही. वाघ, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील, येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या उप अधीक्षक पल्लवी कदम, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. हेमंत झंजाड, विधी साहाय्यक संरक्षण वकिल मंडळाचे प्रमुख करीम जिवानी आदी उपस्थित होते.

प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. महाजन म्हणाले, न्याय फक्त श्रीमंतांसाठी किंवा आवाज असलेल्यांसाठी नसतो. कैद्यांबाबत आढावा समितीचे (अंडरट्रायल रिव्ह्यू कमिटी) कामकाज केवळ एक प्रशासकीय प्रक्रिया नसून कैद्यांचे स्वातंत्र्य परत मिळण्याचा एक मार्ग आहे. आम्ही संविधानाचे रक्षक आहोत आणि न्याय जलद, समतोल व मानवतावादी असावा यासाठी कटिबद्ध आहोत, असेही श्री. महाजन म्हणाले.

श्रीमती पाटील म्हणाल्या, हे पुस्तक केवळ एक शैक्षणिक साधन नाही तर न्यायाची आशा धरुन शांतपणे वाट बघत बससेल्या कैद्यांचा आवाज आहे. आपली न्यायव्यवस्था केवळ प्रभावशालींसाठी नसून दुर्लक्षितांपर्यंत पोहोचली पाहिजे. हा उपक्रम म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही श्रीमती पाटील म्हणाल्या.

श्रीमती कदम म्हणाल्या, अटकेत असलेले कैदी गुन्हेगार म्हणून नाही तर त्यांच्याबाबत कायदेशीर प्रक्रिया काही तांत्रिक कारणांमुळे थांबल्यामुळे म्हणून तुरुंगात आहेत. त्यांना शिक्षेपेक्षा उपेक्षा अधिक भोगावी लागते. हा उपक्रम त्यांच्या त्या शांततेला आवाज देणारा आहे तसेच गरजेप्रमाणे त्यांच्या मनात नवी आशा निर्माण करणारा आहे, श्रीमती कदम म्हणाल्या.

यावेळी शिवाजीनगर येथे कार्यरत सर्व जिल्हा न्यायाधीश, पुणे महानगरपालिका व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकारी, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे वरिष्ठ अधिकारी, पुणे ग्रामीण पोलीस विभाग, पुणे बार असोसिएशनचे अधिवक्ते, जिल्ह्यातील प्रमुख विधी महाविद्यालयातील विधीशाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.

आधार संच वितरणात पुणे जिल्हा राज्यात प्रथम

पुणे, दि. 15: माहिती व तंत्रज्ञान विभाग मुंबई यांच्याकडून पुणे जिल्ह्यास एकूण 203 आधार संच प्राप्त झाले होते. त्या अनुषंगाने 122 रिक्त आधार केंद्रांकरिता कालबद्ध कार्यक्रम राबवून आधार संच वितरणाची कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून आधार संच वितरणात पुणे जिल्हा राज्यात पहिला असल्याचे उपजिल्हाधिकारी पल्लवी घाटगे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक महसूल मंडळ, नगर पालिका व पुणे महानगर पालिका व पिंपरी चिंचवड महानगर पालिका क्षेत्रात वाढती लोकसंख्या विचारात घेता तसेच शहरी भागात लोकांचे होणारे स्थलांतरण विचारात घेता आधार संचांची आवश्यकता होती. 9 ते 23 मे 2025 दरम्यान जिल्हास्तरावर आधार संच वितरणाबाबतचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. ग्रामीण कार्यक्षेत्राकरिता 65 महसूल मंडळ, नगर पालिकेकरिता 7, पुणे मनपाकरिता 22 व पिंपरी चिंचवड मनपाकरिता 28 रिक्त केंद्र अशाप्रकारे एकूण 122 रिक्त आधार केंद्रांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

आधार संच मिळणेकरिता अर्जदाराकडे आपले सरकार सेवा केंद्र असणे, शासकीय जागेचे ना हरकत प्रमाणपत्र असणे, अर्हता पात्र सुपरवायझर असणे इत्यादी अटी निश्चित करण्यात आल्या होत्या. पात्र अर्जदारांमधून जिल्हाधिकारी कार्यालयात 12 जून 2025 रोजी सोडतीद्वारे (लकी ड्रॉ) सर्व अर्जदारांसमक्ष अंतिम अर्जदारांची निवड करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत यापूर्वी वितरण झालेले आधार संच जुने झालेले असल्याने त्यांना नविन आधार संच बदलून देण्याबाबत शासनाची मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेली आहे. त्यानुसार जिल्हास्तरावरुन कार्यवाही सुरू आहे. अंतिमरित्या पात्र ठरलेल्या आपले सरकार सेवा केंद्र धारकांना नुकतेच धान्य गोदाम वडकी येथे आधार संचांचे वितरण श्रीमती घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले.

नविन आधार संच प्राप्त झालेल्या संच चालकांच्या प्रतिक्रिया:
श्रीमती रुपाली प्रशांत कुमावत:
‘फ’ क्षेत्रीय कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आधार संच वितरणाची प्रक्रिया ही खुल्या जाहिरात देऊन राबविल्याने आमच्यासारख्या गरजू व्यक्तीला न्याय मिळाला. लॉटरीद्वारे अर्जदारांची निवड केल्याने आधार संच वितरणाबाबत कोणतीही शंका राहिली नाही.

भूषण पाटील, ड क्षेत्रीय कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका – वृत्तपत्रात देणेत आलेली जाहिरात व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर वेळोवेळी दिलेल्या सूचना यामुळे आधार संच वितरणाचे कामकाज हे गतीशील राहिले. आधार संच वितरण प्रक्रियेबाबत समाधानी आहे.

संदीप कांबळे आंबवणे मंडळ, वेल्हे: वेल्हे (राजगड) सारख्या दुर्गम भागात आधारच्या कामासाठी नागरिकांना 40 ते 50 किमी दूर जावे लागत होते. वेल्हे तालुक्यातील बारा मावळ खोरे, वेल्हे, कानंद पासली, पानशेत या दुर्गम भागातील वृद्ध, महिला, विद्यार्थी व लहान मुले यांना याचा फायदा होणार आहे.
0000

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

पुणे, दि. १५: जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

त्याचा तपशील पुढीलप्रमाणे:

जिल्हा परिषदेअंतर्गत १३ पंचायत समित्यांमधील निवडणूक विभाग व निर्वाचक गणांची प्रारुप प्रभागरचना १४ जुलै २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, जिल्हा परिषद पुणे, पुणे जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालये व सर्व पंचायत समिती कार्यालयांच्या सूचना फलकावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ww.pune.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या प्रारुप प्रभाग रचनेच्या अनुषंगाने २१ जुलै २०२५ पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती व सूचना सादर करता येतील. प्राप्त हरकतीच्या आधारे अभिप्रायासह जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्तांकडे २८ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत. प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर विभागीय आयुक्त ११ ऑगस्टपर्यंत सुनावणी घेऊन निर्णय घेणार आहेत. अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोग किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडे १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती समन्वयक अधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक २०२५ तथा उपजिल्हाधिकारी चारुशिला देशमुख-मोहिते यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविताना देखभालीची यंत्रणा उभी करावी-आमदार सिद्धार्थ शिरोळे

मुंबई : राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. त्याचवेळी देखभालीची यंत्रणा उभी करण्यात यावी, अशी सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (मंगळवारी) विधानसभेत बोलताना केली.

सर्व शासकीय शाळांमध्ये सीसीटीव्ही चे नेटवर्क सरकार वाढवत आहे. त्यांच्या देखभालीची यंत्रणा उभी करण्यात यावी. जेणेकरून सरकार एवढी गुंतवणूक करत आहे, ती गुंतवणूक बऱ्याच काळासाठी उपयोगात येऊ शकेल. त्याचप्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) या आधुनिकतेचा त्यात अंतर्भाव असेल का? आणि त्यानुसार यंत्रणा खरेदीच्या सूचना दिल्या जातील का? असे आमदार शिरोळे यांनी शिक्षणमंत्र्यांना विचारले.

भविष्यकालीन आधुनिकतेचा विचार करूनच यंत्रसामग्री बसविली जाईल, असे आश्वासन शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रश्नांना उत्तर देताना दिले.

मुंबई हायकोर्टाचा राहुल गांधींना दिलासा:सावकरांवरील टिप्पणीबाबतची याचिका फेटाळली, याचिकाकर्त्याला फटकारले

मुंबई -काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी केलेल्या कथित विधानांवरून दाखल करण्यात आलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. याचिकेत राहुल गांधी यांना न्यायालयाने सावरकरांबद्दल अधिक माहिती मिळावी यासाठी याचिकेची प्रत वाचण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली होती.ही याचिका अभिनव भारत काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पंकज फडणीस यांनी दाखल केली होती. त्यांनी आपल्या याचिकेत नमूद केले होते की, राहुल गांधी यांच्या विधानांमुळे स्वातंत्र्यलढ्याच्या आदर्शांचे आणि संविधानात दिलेल्या मूलभूत कर्तव्यांचे पालन करण्याच्या त्यांच्या अधिकाराचे उल्लंघन झाले आहे.

मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सुनावणीस आली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने “राहुल गांधी यांना कोणतीही याचिका वाचण्याचे निर्देश आम्ही देऊ शकत नाही. एखाद्या नेत्याची विचारसरणी बदलण्यासाठी न्यायालय कोणताही बंधनकारक आदेश देऊ शकत नाही.” असे म्हणत ही याचिका फेटाळून लावत याचिकाकर्ते पंकज फडणीस यांना फटकारले.

डॉ. फडणीस हे वैयक्तिकरित्या न्यायालयात उपस्थित होते. त्यांनी युक्तिवाद केला की, “राहुल गांधी हे सध्या विरोधी पक्षनेते आहेत आणि आपल्या लोकशाहीमध्ये अशा पदावरील व्यक्ती कधीही पंतप्रधान होऊ शकते. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांना विशेष महत्त्व आहे.” यावर न्यायालयाने मौखिक टिप्पणी करत म्हटले, “आम्हाला माहिती नाही की ते पंतप्रधान होतील की नाही. तुम्हाला हे माहीत असेलच.”

खंडपीठाने शेवटी याचिका फेटाळताना नमूद केले की, याचिकाकर्त्याने त्यांच्या तक्रारी योग्य मंचावर मांडाव्यात. त्यामुळे राहुल गांधी यांना याचिका वाचण्याचा किंवा विचारसरणी बदलण्याचा कोणताही आदेश देऊ शकत नाही.

राहुल गांधी यांनी यापूर्वीही अनेकदा विनायक सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधाने केले आहेत. डिसेंबर 2022 मध्ये ‘भारत जोडो यात्रा’दरम्यान अकोल्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सावरकर यांना “ब्रिटिशांचे सेवक” आणि “पेन्शनधारक” असे संबोधले होते. त्यांनी असा दावा केला होता की सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडून पेन्शन घेण्यासाठी दया याचिका लिहिल्या.

याशिवाय, राहुल गांधी यांनी लंडनमधील एका भाषणात असा उल्लेख केला होता की, सावरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना एका मुस्लिम तरुणाला मारहाण करून आनंद झाल्याचे एका पुस्तकात नमूद आहे. हे विधानही अनेकांच्या रोषाचे कारण ठरले होते. विशेषतः महाराष्ट्रात यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. सावरकर समर्थक आणि अनेक राजकीय नेत्यांनी राहुल गांधींवर टीकेची झोड उठवली होती.

पुणे महानगर नियोजन समितीला दुर्लक्षित केल्यामुळे हिंजवडी समस्याग्रस्त – वसंत भसे

प्रारूप विकास आराखड्यास झालेला खर्च व्यर्थपुन्हा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा

पिंपरी, पुणे – हिंजवडी, चाकण, तळेगाव, खेड सह पुणे व पिंपरी चिंचवड शहराच्या लगत असणाऱ्या परिसरात वाहतुकीच्या समस्याने उग्ररूप धारण केले आहे. या समस्या पुणे महानगर नियोजन समितीला दुर्लक्षित केल्यामुळे उद्भवल्या आहेत. ७४ व्या घटना दुरुस्ती नुसार मा. राज्यपाल यांच्या आदेशाने स्थापन झालेल्या या समितीचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आता तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समितीला विश्वासात घेऊन नियमित बैठका घेऊन कामकाज करावे अन्यथा पुन्हा उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागेल असा इशारा पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य वसंत भसे यांनी दिला.
सोमवारी (दि.१४) चिंचवड येथे पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य वसंत भसे आणि दिपाली हुलावळे यांच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भसे
यांनी सांगितले की, महानगर कार्यक्षेत्रातील विकास आराखडा तयार करणे, त्यावर धोरणात्मक निर्णय घेणे व प्रादेशिक विकासात शाश्वतता राखणे, विविध स्थानिक स्वराज्य संस्था व शासकीय, निम शासकीय संस्थांमध्ये समन्वय साधून या क्षेत्राचे नियोजन करणे व अधिनियम (२४३ झेड इ) नुसार काम करणे हे या वैधानिक समितीचे कर्तव्य आहे. पुणे महानगर नियोजन समितीची स्थापना दि.१६ जुलै २०२१ रोजी झाली आहे. समिती मध्ये सदस्य संख्या ४५ (लोकनियुक्त ३० व शासकीय १५) आहे. परंतु अद्याप पर्यंत या समितीची एकही बैठक आयोजित करण्यात आली नाही. ही बाब कायद्याचे उल्लंघन करणारी आहे. या समितीला असणारे अधिकार दुर्लक्षित करून करण्यात आलेला प्रारूप विकास आराखडा बेकायदेशीर आहे. या विरुद्ध उच्च न्यायालयात वसंत सुदाम भसे, सुखदेव बाळू तापकीर आणि दिपाली दिपक हुलावळे या सदस्यांनी दावा (क्रमांक २२५२/२०२३) दाखल केला होता. त्यानुसार २५/०१/२०२४ रोजीच्या आदेशान्वये प्रारूप विकास योजना आराखड्यासंबंधी नागरिकांच्या हरकती सूचनांवर अंतिम निर्णय घेण्यास मा. उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश दिला आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले की, मा. उच्च न्यायालयात हा आराखडा रद्द करत आहोत असे नमूद करून शपथपत्र दाखल करावे व हा दावा संपवावा. आता या विकास आराखड्यास करण्यात आलेला कोट्यावधी रुपयांचा खर्च या समितीला दुर्लक्षित करून निर्णय घेणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करावा अशीही मागणी भसे यांनी यावेळी केली. या समितीचे मुख्य कार्य म्हणजे महानगर पातळीवर विकास आराखडा तयार करणे, त्यावर धोरणात्मक निर्णय घेणे व प्रादेशिक विकासात शाश्वतता राखणे. तसेच महानगर क्षेत्रातील पंचायत समिती नगरपालिका यांचेमधील सामान्य बाबी, संतुलीत क्षेत्राचे नियोजन, रस्ते, वाहतूक, घन कचरा, पाणी या पायाभूत सेवा सुविधांसह कृत्रिम व नैसर्गिक संसाधनाचा एकात्मिक विकास तथा नैसर्गिक संवर्धन करून कार्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समन्वय साधने हे आहे.
दरम्यान समितीच्या कायदेशीर कार्यक्षेत्रात शासकीय, प्रशासकीय व निमशासकीय संस्थाकडून महानगर नियोजन समितीच्या मान्यतेविना बेकायदेशीर विकास योजना राबवताना दिसून येत आहेत. ही बाब समितीच्या निर्णयक्षमतेला बाधा ठरत असल्यामुळे पुणे महानगर क्षेत्राचा नियोजन प्रक्रियेतील समन्वय संपुष्टात येत आहे. तसेच पुणे महामेट्रोचा नव्याने केलेला विस्तार आराखडा, जलसंपदा पुणे विभागाने (कालवा कमिटीने घेतलेले ठराव), पुणे महामेट्रोने तयार केलेला एकात्मिक वाहतूक विकास आराखडा, जिल्हा नियोजन समितीने महानगर क्षेत्रात मजूर केलेली विकास कामे, महानगर क्षेत्रात मंजूर केलेल्या टी पी स्कीम, रिंगरोडच्या रेखांकनामध्ये करण्यात आलेले बदल, कार्यक्षेत्रातील महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषदने तयार केलेले विकास आराखडे, झोपडपट्टी पुनर्वसन महामंडळ, पुणे यांने मंजूर केलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना, महानगर क्षेत्रामध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण, पुणे (म्हाडा) यांनी मंजूर केलेले गृह प्रकल्प हे सर्व बेकायदेशीर ठरत आहे असाही दावा वसंत भसे यांनी या पत्रकार परिषदेत केला.
त्याच बरोबर महानगर नियोजन समितीची त्वरित बैठक आयोजित करावी. समितीला कार्यक्षेत्रात काम करण्यासाठी उच्च दर्जाचे अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावे. मंजूर केलेल्या टी पी स्कीम आणि रिंगरोडच्या रेखांकना मध्ये करण्यात आलेले बदल रद्द करावे. कार्यक्षेत्रातील महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषदने तयार केलेले विकास आराखडे, झोपडपट्टी पुनर्वसन महामंडळ, पुणे यांनी मंजूर केलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना आणि महानगर क्षेत्रामध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण, पुणे (MHADA) यांनी मंजूर केलेले गृह प्रकल्प रद्द करण्यात यावेत अशीही मागणी वसंत भसे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केली.

आंबील ओढा सीमाभिंतीचा निधी कुठे गेला? खा. मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलनाच इशारा

पुणे (प्रतिनिधी):
२०१९ मध्ये आलेल्या महापुरामुळे संपूर्ण पुणे हादरले होते. आंबील ओढ्याने अनेक वस्ती, झोपडपट्ट्या आणि सोसायट्यांना पाण्यात बुडवले. या प्रलयानंतर शहरात नालेसफाई, अतिक्रमण हटाव आणि सीमाभिंतीची गरज स्पष्ट झाली होती. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा पूर पुणेकरांच्या जिवावर बेतला आणि त्याच वेळी प्रशासनाच्या कामकाजावरही मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले.याच पार्श्वभूमीवर, तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महाराष्ट्र शासनाकडे आंबील ओढ्याच्या सीमाभिंतीसाठी पाठपुरावा केला. शासनाकडून २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे पत्र पुणे महापालिकेला मिळाले. मात्र, या निधीचे काय झाले, हा मोठा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपा नेत्यांनी आणि तत्कालीन महापौर यांनी या निधीच्या घोषणा करत होर्डिंगबाजी केली, आणि पुणेकरांना गंडवले. प्रत्यक्षात निधी मिळाला नाही, काम झाले नाही आणि पुणेकर पुन्हा संकटाच्या छायेत राहिले.या फसवणुकीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज दत्तवाडी येथे आंबील ओढ्यावर जोरदार आंदोलन करण्यात आले. “पुणेकरांची दिशाभूल करणाऱ्या भाजपाच्या खोट्या घोषणांचा निषेध करतो,” २०० कोटी गेले कुठे, अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या .

आंबील ओढा सीमाभिंत प्रश्न स्थानिक कार्यकर्ते, शिवसेना प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत यांनी वेळोवेळी मांडला प्रशासनाने त्यावर स्थळ पाहणी केली पण पुढील कार्यवाही होत नाही, हे निष्क्रिय प्रशासनाचे लक्षण आहे.

यावेळी आंदोलनाचे नेतृत्व शहरप्रमुख संजय मोरे,गजानन थरकुडे, यांनी केले. त्यांच्या सोबत, माजी नगरसेवक अशोक हरणावळ, सचिव मकरंद पेठकर, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, उपशहरप्रमुख पंढरीनाथ खोपडे, आबा कुंभारकर, शहर संघटक राजेंद्र शिंदे, दिपक जगताप, महिला आघाडीच्या रेखा कोंडे, मनीषा गरुड, विभागप्रमुख चंदन साळुंके, नंदू येवले, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष दत्ता घुले, आरोग्य सेनेचे रमेश क्षीरसागर, तसेच बाळासाहेब गरुड, गणेश घोलप, गिरीश गायकवाड, रूपेश पवार, निलेश वाघमारे, संजय साळवी, किरण जगताप, प्रतीक गालिंदे, नागेश खडके, मनोज यादव, विजय जोरी, नितीन दलभंजन, शिवम खोपडे, मोहन देशपांडे, राहुल शेडगे, विनोद वांजले, रमेश लडकत, राजेश शेलार, मनीष घरत, सनी गायकवाड, सचिन बाबर, हृषिकेश गायकवाड, जगदीश रेड्डी आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यापुढेही पुणेकरांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणार आहे आणि निधी मिळेपर्यंत लढा थांबणार नाही, वेळप्रसंगी पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या नवीन कार्यालयाबाहेर आंदोलन केले जाईल असा निर्धार यावेळी करण्यात आला.