पुणे- शहरातील शिवाजीनगर पोलिसांनी एका कुख्यात घरफोडी चोराला अटक करून त्याच्याकडून १७ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख हर्षद गुलाब पवार (वय ३१, रा. घोटावडे फाटा, मुळशी, पुणे) अशी आहे.
पोलीस उपनिरीक्षक अजित बडे यांच्या पथकातील पोलीस अंमलदार सचिन जाधव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार म्हसोबा गेट बस स्टॉप, शिवाजीनगर येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून २३६.५३ ग्रॅम सोन्याचे दागिने, २१२ ग्रॅम चांदीचे दागिने, घरफोडीची साधने आणि ४९ कुलुपांच्या चाव्या जप्त करण्यात आल्या आहेत.२०२३ मध्ये जामिनावर सुटलेल्या पवारवर आधीच ५१ पेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याची कार्यपद्धती अत्यंत धूर्त होती. पोलिसांचा तपास चुकवण्यासाठी तो घरफोडी करण्याच्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी ४०-५० किलोमीटरचा फेरफटका मारत असे. तसेच वेगवेगळे जॅकेट आणि टोप्या वापरून वेशभूषा बदलत असे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसल्यास मोबाईलवर बोलण्याचे नाटक करून पोलिसांचा तपास भरकटवत असे. चोरलेले दागिने विकण्यासाठी तो निलकंठ राऊत या सहआरोपीची मदत घेत असल्याचेही तपासात उघड झाले आहे.
पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने केलेल्या कबुलीनंतर आणखी अनेक घरफोड्यांचा छडा लावण्यात पोलीस यशस्वी झाले आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.