भारताने 16 जुलै 2025 रोजी लडाख येथे आकाश प्राईम या भारतीय लष्करातील आकाश शस्त्र प्रणालीच्या आधुनिक आवृत्तीच्या मदतीने अतिउंचीवरील दोन हवाई अतिद्रुतगती मानवरहित लक्ष्यांना यशस्वीरित्या नष्ट करून एक महत्त्वाचा टप्पा साध्य केला. ही शस्त्र प्रणाली 4500 मीटरपेक्षा जास्त उंचीवर काम करण्यासाठी तयार करण्यात आली आहे आणि त्यामध्ये रेडियो फ्रिक्वेन्सीचा माग काढणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या यंत्रणेचा समावेश आहे. विविध वापरकर्त्यांकडून परिचालनविषयक वापराचे अनुभव लक्षात घेऊन, परिचालनात्मक परिणामकारकतेत सुधारणा करण्यासाठी विविध प्रकारचे अद्ययावतीकरण करण्यात येते ज्यामधून स्वदेशी बनावटीच्या शस्त्र प्रणालीसाठी तयार करण्यात आलेल्या परिसंस्थेचे फायदे प्रदर्शित होतात.
लष्कराचा हवाई संरक्षण विभाग आणि संरक्षण संशोधन व विकास संस्था यांनी, भारत डायनामिक्स लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांसारख्या संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांच्या आणि इतर उद्योग भागीदारांच्या सहकार्याने, स्वदेशी बनावटीच्या आकाश प्राईम शस्त्र प्रणालीची यशस्वीरीत्या पडताळणी केली आहे. या चाचण्या ‘फर्स्ट ऑफ प्रॉडक्शन मॉडेल फायरिंग ट्रायल’ चा भाग होत्या. यामुळे या प्रणालीचा वेळेत समावेश करणे शक्य होईल आणि देशाच्या उंच पर्वतीय सीमांवरील हवाई संरक्षण क्षमता वाढेल.
‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारताच्या स्वदेशी बनावटीच्या हवाई संरक्षण प्रणालींनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीनंतर हे साध्य झाल्यामुळे ही कामगिरी विशेष महत्त्वाची आहे. यामुळे देशाच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांना मोठी चालना मिळाली आहे, ज्यांच्याकडे आता जागतिक संरक्षण बाजारपेठेत जास्तीत जास्त प्रमाणात लक्ष वेधले जात आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय लष्कर, डीआरडीओ आणि संरक्षण उद्योगाचे या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे. भारताच्या हवाई संरक्षण क्षमतेसाठी, विशेषतः उच्च-उंचीवरील (high-altitude) परिचालनात्मक गरजा पूर्ण करण्यासाठी, एक महत्त्वपूर्ण चालना अशा शब्दात त्यांनी या कामगिरीची प्रशंसा केली आहे.
संरक्षण संशोधन व विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष, डॉ. समीर व्ही. कामत यांनी यशस्वी चाचणीशी संबंधित सर्व चमूचे अभिनंदन केले आणि सांगितले की, या क्षेपणास्त्राने देशाच्या उच्च-उंचीवरील महत्त्वाच्या हवाई संरक्षण गरजांची पूर्तता केली आहे.
पिंपरी (दि.१७) : हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी या भागातील प्रमुख ६ रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने बुधवारी संबंधित शेतकऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
या कामांमुळे वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळणार असून विकासाला गती मिळणार आहे. बैठकीत रस्त्यांसाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियेची रूपरेषा आणि कार्यवाहीबाबत अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांसोबत धोरणात्मक चर्चा झाली. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी शेतकरी, व्यावसायिकांच्या अडचणी समजून घेत त्यांच्या शंकांचे निरसन केले.
हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने रस्ते रुंदीकरणाच्या अनुषंगाने प्रक्रिया राबविण्यात येत असून यासाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन संबंधित शेतकऱ्यांची संवाद आणि समन्वय ठेवूनच करणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या बैठकीस अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, मुख्य अभियंता रिनाज पठाण, अधिक्षक अभियंता शिवप्रसाद बागडी, परवानगी व नियोजन विभागाचे श्रीकांत प्रभुणे आदी अधिकारी उपस्थित होते.
पिंपरी (दि.१७) : हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कठोर पावले उचलली जात आहे. त्या अनुषंगाने बुधवारी हिंजवडी परिसरातील अतिक्रमणांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या भागातील अतिक्रमणासंदर्भात सर्वेक्षण सुरू असून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.
हिंजवडी, माण, मारुंजी भागातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएसह इतर शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून संयुक्त मोहीम हाती घेण्यात आली आहे. बुधवारी माण गावातील गट क्रमांक १६६ मधील ओढे – नाल्याभोवती असलेल्या २८ बांधकामांचे अतिक्रमण काढण्यात आले. यासह विप्रो सर्कल परिसरातील माऊली हॉटेलवरचे अतिक्रमणही काढले. संबंधित कारवाई पीएमआरडीए, एमआयडीसीसह इतर शासकीय यंत्रणाच्या माध्यमातून करण्यात आली.
वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, या उद्देशाने अतिक्रमणधारकांचा सर्वे करण्यात येत असून त्यांना नोटीसा बजावण्यात येणार आहे. त्यामुळे हिंजवडीसह परिसरातील अतिक्रमणधारकांनी स्वत: आपली अतिक्रमणे काढून घेत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पोलीस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल झेंडे यांनी केले आहे. यासह कोणतेही बांधकाम करताना पीएमआरडीएची पूर्वपरवानगी घेऊनच करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला शिर्डी व पुरंदर विमानतळाच्या कामाचा आढावा मुंबई, दि. 17 : आगामी काळात होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या दृष्टीने शिर्डी विमानतळ हे महत्त्वाचे विमानतळ असणार आहे. त्यामुळे हे विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी नूतनीकरण व विस्तारीकरणाची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.
शिर्डी व पुरंदर विमानतळाच्या कामाचा आढावा आज श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील विधानभवनातील बैठकीत घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलरासू, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, मुख्य वित्त अधिकारी अनिशा गोदानी आदी उपस्थित होते.
शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरण व नुतनीकरणाच्या कामाचा सविस्तर आढावा घेऊन मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, शिर्डीतील विमानतळावरील नवीन एटीसी इमारत, नवीन एकात्मिक मालवाहतूक इमारत, नवीन टर्मिनल इमारतीची कामे प्रस्तावित आहेत. ही कामे आगामी कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र, या कामांना गती देवून ही कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक वाटल्यास अतिरिक्त मनुष्यबळ वापरावे. तसेच विमानतळासाठी आवश्यक असणारी खरेदी व स्ट्रक्चरल डिझाईनची कामे येत्या आठवड्यात पूर्ण करावीत. शिर्डी विमानतळ हे मुंबई व नवी मुंबई विमानतळाच्या जवळचे विमानतळ आहे. येथील लहान विमाने पार्किंगसाठी शिर्डी विमानतळाचा वापर होऊ शकतो. त्यादृष्टीने आतापासूनच शिर्डी विमानतळावर सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक असल्यास आणखी जमिन संपादीत करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.
पुरंदर विमानतळासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे आता या विमानतळासाठी लागणारी जमिन संपादीत करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पुणे, जिल्हाधिकारी यांनी तातडीने सुरू करावी. जेणेकरून विमानतळाचे काम लवकर सुरू होईल. हे विमानतळ सुरू झाल्यावर महाराष्ट्रातील विमानसेवेचे जाळे आणखी विस्तारणार आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरंदर विमानतळाचे काम लवकर सुरू व्हावे, यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी. तसेच त्याठिकाणी मोठी विमाने उतरण्याची सोय असावी, त्यासाठी आतापासूनच आवश्यक ती काळजी घ्यावी. या विमानतळावर विमानांच्या हँगरचीही व्यवस्था असावी, असे सांगितले.
महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या उपाध्यक्ष स्वाती पांडे यांनी सादरीकरणाद्वारे शिर्डी व पुरंदर विमानतळाच्या कामांची माहिती दिली. शिर्डी विमानतळासाठी नेमण्यात आलेल्या सल्लागार कंपनी व कंत्राटदार कंपनीच्या प्रतिनिधींनीही माहिती दिली.
पुणे, दि. १७: सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी संस्थांना सहकार पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून संस्थांनी ३१ जुलै २०२५ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना सन २०२३-२४ चा पुरस्कार देवून त्यांचा उचित गौरव करण्यासाठी शासनाने सहकार पुरस्कार देण्याचे ठरविले आहे. यासाठी यापूर्वी १८ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्यास कळविण्यात आले होते. तथापि, सन २०२५ या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये अधिकाधिक सहकारी संस्थांना पुरस्कार मिळण्याकरिता प्रस्ताव सादर करता यावेत यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील इच्छुक सहकारी संस्थांनी सविस्तर प्रस्ताव संबंधित तालुक्याच्या सहायक निबंधक, सहकारी संस्था किंवा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात सादर करावेत.
सहकारी संस्थांनी पुरस्काराच्या अटी, निकष आदी अधिक माहितीसाठी https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच तालुक्याचे सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक अथवा विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्ह्याचे अपर निबंधक (पतसंस्था) सहकारी संस्था, श्रीकृष्ण वाडेकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. ००००
पुणे: वडगावशेरी मतदारसंघातील वाहतूक कोंडीच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आमदार बापूसाहेब पठारे यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू ठेवले आहेत. ‘पुणे ते शिरूर’ उन्नत पुल प्रकल्पात आता ‘फिनिक्स मॉल (हयात हॉटेल) ते खराडी जकात नाका’ हा ५ किलोमीटरचा भाग नुकताच समाविष्ट करण्यात आला आहे.
पूर्वी या भागाचा समावेश प्रकल्पातून वगळण्यात आला होता. परंतु, आमदार बापूसाहेब पठारे यांच्या पाठपुराव्यामुळे वळगण्यात आलेला भाग पुन्हा समाविष्ट करण्यात आला. अद्यापही या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली नसल्याने आमदार बापूसाहेब पठारे यांनी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे मुख्य अभियंता रणजित हांडे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संबंधित कामासाठी तातडीने निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे निवेदन सादर केले.
सदर पुणे ते शिरूर उन्नत पुलामुळे पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सुटेल. तसेच, वाहतूक सुरळीत होऊन नागरिक सुटकेचा नि:श्वास सोडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पोलीस प्रशासनाची दिरंगाई आणि रुग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्ष व दुटप्पी भूमिकेबद्दल व्यक्त केली तीव्र नाराजी
मुंबई : बॉम्बे रूग्णालय, मुंबई येथे महिला कर्मचाऱ्यांवरील झालेल्या अत्याचार प्रकरणी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली असून, संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीमध्ये डॉ. गोऱ्हे अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारींवर चर्चा करताना त्यांनी स्पष्ट केले की, आरोपीवर तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई केली जावी आणि चार्जशीट दाखल करण्यात यावे. तसेच, “महिला कर्मचाऱ्यांना या प्रकरणी जर कुणी धमकी दिली, त्रास दिला किंवा दबाव आणण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा,” असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
डॉ. गोऱ्हे यांनी पोलीस प्रशासनाच्या दिरंगाईच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देताना त्यांनी म्हटले की, “वेळ पडल्यास व्यवस्थापनातील दोषी अधिकाऱ्यांवर आवश्यक कारवाई करण्यास अजिबात कसूर करू नये.” तेथील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून कंत्राटी पद्धतीवर येणाऱ्या या महिलांचे व्यवस्थापनाकडून शोषण होणार नाही याची पोलीस प्रशासनाने काळजी घ्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या.
विशाखा समितीचे सक्षमीकरण, कर्मचाऱ्यांची तक्रार नोंदविण्यासाठी महिला पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करणे, खोट्या केसेस निर्गत करणे, भरोसा सेल कार्यान्वित करून दर्शनी भागात अधिकारी यांचे नाव मोबाईल नंबर जाहीर करणे, प्रतिबंधात्मक कारवाईसह आरोपींविरुद्ध तत्काळ चार्जशीट दाखल करणे याबाबत त्यांनी पोलीस प्रशासनास सूचना दिल्या. अशा प्रकारच्या घटना भविष्यात सहन केल्या जाणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
बैठकीत महिला कर्मचाऱ्यांनी आपले प्रश्न मांडले, त्यावर तातडीने न्याय मिळवून देण्याची हमी डॉ. गोऱ्हे यांनी दिली. तसेच, महिला सुरक्षेसाठी रुग्णालय प्रशासनाने योग्य पावले न उचलल्यास आरोग्य विभागाने त्यांचेविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी याबाबत आरोग्य विभागास सूचना दिल्या.
यावेळी बैठकीस माजी विधानपरिषद सदस्य किरण पावसकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, सह पोलीस आयुक्त लखमी गौतम, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. पुजा सिंह यांच्यासह रुग्णालय महिला कर्मचारी प्रतिनिधी उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सरकारमुळे नाही, सर्वोच्च न्यायालयामुळे लांबल्या – एकनाथ शिंदे…..एकनाथ शिंदे म्हणाले, लोकांच्या समस्यांवर अभ्यासपूर्ण प्रश्न अनेकांनी विचारले. पण काही लोकांनी फक्त आरोप-प्रत्यारोप करण्याचे काम केले. काहींनी अर्धवट मुद्दे मांडले. जे काही असेल त्याला उत्तर देण्याचे काम माझे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नसल्याने प्रशासक नेमले आहेत, त्यामुळे काम होत नसल्याचे म्हटले गेले आहे. आपण संविधान मानतो त्यानुसार आपण चौकटीत राहून काम करतो. सरकारने या निवडणुका रोखून धरल्या असे नाही. 20 ऑगस्ट 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु, आता निवडणुका होणर आहेत.मुंबईच्या विकासाबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. परंतु, मुंबईचा विकास होत आहे. कोस्टल रोडच्या माध्यमातून आपण ते बघू शकतो. आमच्यासाठी मुंबईकर फर्स्ट आहेत, काही लोकांना कॉन्ट्रॅक्टर फर्स्ट आहे. मुंबईला इकनॉमिक हब करण्याचे काम सुरू आहे. मुंबई तोडण्याचे नाही तर जगाशी जोडण्याचे काम आम्ही करत आहोत. महायुतीचे सरकार आल्यावर आम्ही सगळे स्टे हटवले आणि वेगाने विकास कामांना सुरू केले आहे. राज्य सरकार प्रामाणिकपणे मुंबईसाठी जे काही करत आहे ते सगळ्यांसामोर आहे. काही लोक म्हणतात मराठी माणसासाठी काय केले? मी एवढेच सांगेल मुंबईतला मराठी माणूस मुंबईच्या बाहेर का फेकला गेला, हे कोणामुळे गेला याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
मुंबई-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत नियम 293 अन्वये सुरू असलेल्या चर्चेला उत्तर दिले….. यात त्यांनी मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पासह इतर मुद्यांवरून विरोधकांना विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला चांगलेच खडेबोल सुनावले. मतदानाच्या आधी मराठी – मराठी म्हणायचे आणि निवडून आल्यानंतर कोण रे तू म्हणायचे, असा प्रकार सध्या सुरू आहे, असे ते म्हणाले. डिनो मोरियाने मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
एकनाथ शिंदे आपल्या उत्तरात म्हणाले, धारावी पुनर्विकासाचा देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. तेथील 1 लाख 40 हजार झोपड्यांचे सर्वेक्षण झाले आहे. सद्यस्थितीत तेथील लोक अत्यंत वाईट स्थितीत राहतात. ते माणसे नाहीत का? या प्रकरणी सरकारवर बिल्डरच्या घशात जागा घातल्याचे आरोप होतात. ही जागा कुणाच्याही घशात घाली नाही तर डीआरपीला (धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट) दिली आहे. त्यात सरकार भागिदार आहे. त्यामुळे आपण सर्वकाही अदानींनी देतोय ही वस्तुस्थिती नाही. तेथील लोकांनाही हा प्रकल्प हवा आहे. आपण का त्याला विरोध करायचा?
आपल्याला मोठेमोठे बंगले पाहिजे. चांगली घरे पाहिजे आणि त्यांनी त्याच स्थितीत खितपत पडायचे का? तिथे चांगली घरे झाली तर तेथील जनतेचे जीवनमान उंचावेल. विरोधकांनी या नागरिकांचे जीवनमान पहावे व नंतर विरोध करावा. मतदानाच्या आधी मराठी – मराठी म्हणायचे मी आणि तू आणि निवडून आल्यानंतर मराठी माणसाला म्हणायचे कोण रे तू, असा टोलाही त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांना हाणला. अशी परिस्थिती व भूमिका आमची नाही. त्यांच्या मागे उभे राहा. त्यांना धीर द्या. हे बिल्डरसोबत साटेलोटे झालेले कुणाचे आहेत? असे शिंदे म्हणाले.
त्यांच्या या विधानावर सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी वन्स मोअरची मागणी केली. पण शिंदे आकाशवाणी एकदाच होते असे म्हणते विषय पुढे सरकवला. ते म्हणाले, स्वार्थाचा झेंडा व सत्तेचा झेंडा राबावयाचा हेच यांना (विरोधक) माहिती आहे. विजयराव (विजय वडेट्टीवार) मी तुमच्याविषयी बोलत नाही. तुम्ही समजदार आहात. ही पोरंटोरं बोलली तर समजू शकतो. पण तुम्ही विरोधी पक्षनेते व मंत्री राहिला आहात. त्यामुळे तुम्ही खोटेनाटे बोलणे सोडले पाहिजे. अरे विकासाला चालना द्या. विकासविरोधी निर्णय घेणारे कोण आहेत. आम्ही सरकारमध्ये येण्यापूर्वी मुंबई व महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प बंद होते. आम्ही त्यांना चालना दिली.
मुंबईतील बांग्लादेशी रोहिंग्यांना कुणी सुविधा व नळ कनेक्शन दिले? तेव्हा महापालिकेत कुणाची सत्ता होती? हे सगळे आहे. मी फार आरोप करणार नाही. पण आमच्यावर आरोप करतात. कोविडमध्ये खिचडी चोरणारे, डेडबॉडी बॅग चोरणारे कुणावर आरोप करता? जिथे डॉक्टर व पेशंट नाहीत तेथूनही या लोकांनी पैसे काढले. रस्ते बनवणारा कंत्राटदार, कपड्याचा व्यापारी त्याला कोविड सेंटर दिले. कुणावर आरोप करता भ्रष्टाचाराचे? असेही ते यावेळी ठाकरे गटावर टीका करताना म्हणाले.
काँक्रिटचे रस्ते झाल्यानंतर त्यावर 25 वर्षे दुरुस्तीचा खर्च नाही. दरवर्षी दुरुस्ती करून काळ्याचे पांढरे करून दुरुस्तीच्या नावाने पैसे काढण्याचे काम कोण करत होते? आम्ही डीप क्लीन ड्राईव्हने रस्ते धुवायला गेलो. तुमच्या लोकांनी तर त्याच्या तिजोऱ्या धुतल्या आतापर्यंत. बोलायला आम्हालाही येते. मिठी नदीतील गाळ कोण काढतंय? त्यांना मराठी माणूस दिसला नाही. तो डिनो मोरिया दिसला. आता त्या मोरियाने तोंड उघडले तर कितीतरी लोकांचा मोरया होईल. म्हणून जे काचेच्या घरात राहतात, ते दुसऱ्यांच्या घरावर दगड मारत नाहीत, असे शिंदे म्हणाले.
आम्ही प्रामाणिकपणे काम करतो. पण विरोधकांनी आरोप करताना त्याला आधार आहे का हे तपासले पाहिजे. त्यात वस्तुस्थिती व वास्तव असले पाहिजे. असे नसेल तर विरोधी पक्ष हा केवळ विनोदी पक्ष ठरेल. ‘उम्र भर ग़ालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी आइना साफ़ करता रहा’ असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी मिर्झा गालिब यांचा शेर नमूद करताना महाविकास आघाडीच्या नेत्यांना हाणला.
मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड व सत्ताधारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वादाचे आज विधानभवन परिसरात तीव्र पडसाद उमटले. या दोन्ही नेत्यांचे समर्थक आज सायंकाळी थेट विधानभवनाच्या लॉबीत एकमेकांना भिडले. यावेळी त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. या अचानक घडलेल्या प्रसंगामुळे विधिमंडळाच्या लॉबीत असणाऱ्या आमदारांत एकच घबराट पसरली. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत घटनेचा अहवाल मागवला आहे. या घटनेमुळे विधानभवनातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गत आठवड्यात विधिमंडळ परिसरात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे पाहून ‘मंगळसूत्र चोर’ अशी घोषणाबाजी केली होती. यामुळे पडळकर चांगलेच संतापले होते. या घटनेला 5 दिवस लोटत नाहीत तोच बुधवारी विधान भवनाच्या गेटवर या दोन्ही नेत्यांत चांगलीच बाचाबाची झाली. त्यानंतर आज पडळकरांच्या एका समर्थकाने आव्हाड यांना मारण्याची धमकी दिली. या घटनेचे आज विधानभवनाच्या लॉबीत तीव्र पडसाद उमटले. या दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आज विधानभवनाच्या लॉबीत भिडले. त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली. अचानक झालेल्या या प्रसंगामुळे तिथे उपस्थित असणारे आमदार व पत्रकारांत एकच खळबळ माजली. हे सर्वजण सुरक्षित ठिकाणी धावताना दिसून आले. या घटनेत आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण झाल्याची माहिती आहे.या प्रकरणी गोपीचंद पडळकर यांना छेडले असता त्यांनी आपला या घटनेशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. तसेच जितेंद्र आव्हाड यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला आपण ओळखत नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हे लोक मलाच मारण्यासाठी आले होते -जितेंद्र आव्हाड…. जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, मी भाषण करून थोडी मोकळी हवा घेण्यासाठी सभागृहाबाहेर आलो होतो. तेव्हा हा प्रकार घडला. हे लोक मलाच मारण्यासाठी आले होते. हा हल्ला कुणी केला हे संपूर्ण महाराष्ट्राला समजले आहे. याहून मोठा पुरावा काय पाहिजे? तुम्ही विधानभवनात गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील, तर आमचेच जीव सुरक्षित नाहीत. मी स्वतः ट्विट केले आहे. मला आई-बहिणीवरून शिवीगाळ करण्यात आली आहे. मारून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे. कुत्रा, डुक्कर अजून बरेच काही लिहिले आहे. काय चालू आहे विधानसभेत?विधानसभेत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आमदार सुरक्षित नसतील, तर कशाला राहायचे आमदार? काय गुन्हा आहे आमचा? कुणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई-बहिणींवर शिव्या देतो. त्याला ऑफिशिअल लँग्वेज म्हणून घोषित करा. असंसदीय शब्द वापरले जातात. त्यालाच आता संसदीय शब्द म्हणून घोषित करा. सत्तेचा एवढा माज, असा तीव्र संताप आव्हाड आपला संताप व्यक्त करताना म्हणाले.
हाणामारी करणाऱ्या गुंडांसह त्यांच्या पोषिंद्यांवर कारवाई करा – उद्धव ठाकरे……….शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. हाणामारी करणारे समर्थक होते का गुंड होते? येथे अशी परिस्थिती निर्माण झाली असेल तर विधानभवनाला अर्थ काय? ज्यांनी या लोकांना पास दिले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मग तो कोणत्याही पक्षाचा असो. ज्यांनी त्यांना पास दिले त्यांचे नाव पुढे आले पाहिजे. शेवटी हा अधिकार अध्यक्षांचा असतो. अध्यक्षांची दिशाभूल केली गेली का? हा पण विषय आहे. पण अशी मारामारी आमदारांना धक्काबुक्की ही गुंडागर्दी आता विधानभवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी सर्व विषय सोडून या गुंडांवर व त्यांच्या पोषिंद्यांवर कडक कारवाई केली पाहिजे. असे झाले तरच तुम्ही मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवण्याच्या पात्रतेचे आहात असे मी म्हणेन, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दुसरीकडे, विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहांतील आमदारांनी या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आमदार रोहित पवार यांनी या घटनेची माहिती सभागृहाला देत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. राष्ट्रवादीच्या आमदार सना मलिक याविषयी विधानसभेत बोलताना म्हणाल्या की, ही संपूर्ण घटना मी माझ्या डोळ्यांनी पाहिली. एक महिला म्हणून आम्ही जेव्हा आत येतो, तेव्हा आसपास अनेक पुरुष असतात. त्यातच अशी एखादी घटना घडली तर सर्वच पुरुष एकाच दिशेने धावतात. त्या स्थितीत आम्हा महिलांना कोण संरक्षण प्रदान करेल? आमच्यासोबत आमचा केवळ एक पीए असतो. तो लोकांना आवाज देऊन बाजूला करतो. पण आज ज्या वेगाने लोक आतमध्ये घुसत होते ते भयंकर होते. हे पाहून मी सभागृहाला त्याची माहिती देण्यासाठी पुन्हा परत आले. सध्या विधिमंडळ परिसरात कोणतीही शिस्त दिसून येत नाही, असे त्या म्हणाल्या.
सरकारने गंभीर दखल घेतली – आशिष शेलार…..दरम्यान, मंत्री आशिष शेलार यांनी या घटनेची सरकारने गंभीर दखल घेतल्याची माहिती सभागृहाला दिली. ते म्हणाले, आज घडलेल्या सर्व घटनांची सरकारने गांभीर्याने नोंद घेतली आहे. आजची घटना विधानभवनाच्या प्रांगणात घडली आहे. सरकारला आपले काम करावेच लागेल. सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाचा सदस्य असला, कुणालाही धक्काबुक्की, मारहाण किंवा इतर काही झाले असेल, तर ते गंभीरच आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट केली जाईल, असे ते म्हणाले.
पुणे- गेली २५ वर्षे बुधवार पेठेतील फेमस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅसेट गल्लीत अंमली पदार्थांच्या गोळ्यांची विक्री होत असल्याचे समजल्यावरून पोलिसांनी ६ लाखाच्या गोळ्यांसह एकाला पकडले आहे.
याप्मारकरणी पोलिसांनी सांगितले कि,’.पोलीस आयुक्त, पुणे शहर अमितेश कुमार यांनी फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीमधील रेड अलर्ट एरिया मध्ये रात्री उशीरापर्यंत अंमली पदार्थ विक्री तसेच सेवन करण्या-या इसमाचा शोध घेवुन त्यावर सशक्त कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने फरासखाना पोलीस स्टेशन येथील प्रभारी अधिकारी प्रशांत भस्मे, यांनी तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना महत्वाच्या सुचना व आदेश दिले होते. दि.१६/०७/२०२५ रोजी फरासखाना पोलीस स्टेशन येथील तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार पेट्रोलींग करीत असतांना पोलीस अमंलदार नितीन तेलंगे व गजानन सोनुने यांना गोपनीय बातमी प्राप्त झाली की, बँगलोर राज्य कर्नाटक येथील एक इसम दिनांक १७/०७/२०२५ रोजी अंमली पदार्थ युक्त याबा गोळया विक्रीसाठी रेड अलर्ट एरियामधील कॅसेट गल्ली येथे येणार असुन, त्याचेजवळ अंमली पदार्थ युक्त याबा नावाच्या बऱ्याच गोळ्या आहे. सदर प्राप्त बातमीच्या अनुषंगाने फरासखाना पोलीस स्टेशन येथील प्रभारी अधिकारी प्रशांत भस्मे यांनी तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक अरविंद शिंदे यांचे अधिपत्याखाली छापा कारवाई करण्यासाठी एक टिम तयार करुन, त्यांना कारवाई संदर्भात योग्य ते मार्गदर्शन व सुचना देण्यात आल्या होत्या. दिनांक १७/०७/२०२५ रोजी छापा कारवाई टिमने यशस्वी पणे सापळा लावुन, अंमली पदार्थ युक्त याबा गोळी विक्री साठी घेवुन आलेला इसम नामे निशान हबीब मंडल, वय ४७ वर्षे, रा. मुळ रा. नं. ९/३ बी आर रेसीडेन्सी सेकन्ड क्रॉस गणेश मंदिराचे मागे, एन जी आर ले आऊट रुपेन्ना अग्रहरा बँगलोर राज्य कर्नाटक यास ताब्यात घेवुन त्यांच्या अंगझडती दरम्यान अंमली पदार्थ युक्त ७५.३६ ग्रॅम वजनाच्या ७१८ नग (याबा) नावाच्या गोळ्या व गुन्हयात वापरलेली दु-चाकी मोपेड गाडी, चार मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकुण ६,५८,८६०/-रु.किं. चा मुद्देमाल मिळुन आल्याने सदर आरोपी विरुध्द फरासखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. १४४/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (क) अन्वये गुन्हा दाखल करुन सदर गुन्हयात त्याला अटक करण्यात आलेली आहे.सदरची कामगिरी ही अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त, परि-१ कृषिकेश रावले, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फरासखाना पोलीस स्टेशन पुणे शहर प्रशांत भस्मे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजित जाधव, शितल जाधव, पोलीस उप-निरीक्षक अरविंद शिंदे, पोलीस अंमलदार कुष्णा निढाळकर, महेबुब मोकाशी, नितीन तेलंगे, तानाजी नांगरे, मोरे, गजानन सोनुने, नितीन जाधव, महेश राठोड, प्रविण पासलकर, विशाल शिंदे, महेश पवार, अकबर कुरणे, शशीकांत ननावरे, सुमित खुट्टे, चेतन होळकर, प्रशांत पालांडे, संदिप लोंढे मनिषा पुकाळे, रेखा राऊत्त, अर्चना ढवळे, भालेराव, बनसोडे यांनी केलेली आहे.
पुणे, १७ जुलैः ‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ एज्युकेशन, पुणे’ व ‘एमआयटी-राष्ट्रीय सरपंच संसद’ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवशीय ‘महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषद’१९ व २० जुलै २०२५ रोजी हनुमानवाडी आळंदी (देवाची) येथील डॉ. विश्वनाथ कराड वर्ल्ड पीस स्कूल येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत संपूर्ण महाराष्ट्रातील ६० कीर्तनकार आणि १५० सरपंच सहभागी होणार आहेत. अशी माहिती परिषदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील, हभप यशोधन महाराज साखरे आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून ही गोलमेज परिषद होत आहे. या परिषदेचा शुभारंभ शनिवार, १९ जुलै रोजी दुपारी ३.०० वा. होणार आहे. या समारंभासाठी राज्याचे अन्न व औषधे प्रशासन विभागाचे मंत्री श्री.नरहरी झिरवाळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच या सत्रात विधान परिषदेचे सदस्य श्री. श्रीकांत भारतीय, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, खांडबहाले डॉट कॉमचे निर्माते डॉ. सुनिल खांडबहाले हे सन्माननीय वक्ते म्हणून उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असतील. तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल कराड यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तसेच २० जुलै रोजी होणार्या वारकरी संप्रदायाच्या सामाजिक प्रबोधनाची वाटचाल या विषयावर सकाळी ९.३० वा. होणार्या तृतीय सत्रामध्ये राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सामाजिक कार्य मंत्री आशिष शेलार हे प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून उपस्थित राहतील. या वेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सल्लागार वैभव डांगे व अभय टिळक उपस्थित राहणार आहेत. “वारकरी संप्रदायाची २१व्या शतकातील सामाजिक प्रबोधनाची दिशा, स्वरूप, समस्या व आव्हाने आणि निराकरणाची संभाव्य कृतिशील उपाययोजना” हा या परिषदेचा प्रमुख विषय असणार आहे. परिषदेत वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून होत असलेले मौलिक लोककल्याणाचे कार्य, आध्यात्मिक प्रबोधनाबरोबरच लोक जीवनातील विविध दैनंदिन समस्यांच्या निराकरणासाठी अधिकाधिक कसे उपयोगी होईल. या विषयावर विविध अंगाने विचारमंथन करून सामाजिक प्रबोधनाचे नवीन विषय व कार्याची निश्चित दिशा ठरविली जाणार आहे. वारकरी संप्रदायाच्या प्रबोधन कार्याच्या विस्ताराला सहाय्यभूत होणे हा या परिषदेचा प्रमुख उद्देश आहे. उद्घाटनानंतर दोन दिवसात एकूण चार सत्रात ही परिषद संपन्न होईल. ‘२१ व्या शतकातील प्रमुख सामाजिक समस्यांचे स्वरूप व आव्हाने ’, ‘ वारकरी संप्रदायाच्या सामाजिक प्रबोधनाची लोककल्याणकारी वाटचाल’, ‘ वारकरी संप्रदाय-२१व्या शतकातील प्रबोधनाचे स्वरूप, समस्या व आव्हाने’ ‘ वारकरी संप्रदायाच्या सामाजिक प्रबोधनातील आव्हाने व समस्या निराकरणाची संभाव्य उपाययोजना’ या विषयावर सत्रे होतील. महाराष्ट्र राज्यातून ख्यातनाम कीर्तनकार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते व आदर्श सरपंच या परिषदेत आपले मौलिक स्वरूपाचे विचार व्यक्त करतील. परिषदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील यांनी सांगितले की, ‘एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल कराड यांच्या मातोश्री, वारकरी सांप्रदायाच्या नि:स्सीम अनुयायी, तत्त्वदर्शी कवयित्री सौ.उर्मिलाताई कराड यांचा २० जुलै २०२५ हा तृतीय स्मृतिदिन आहे. ‘महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदे’त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल. आयोजित पत्रकार परिषदेत एमआयटी स्कूल ऑफ एज्युकेशनच्या प्रभारी प्राचार्या डॉ. शलिनी टोणपे आणि राष्ट्रीय सरपंच संसदेचे सह समन्वयक प्रकाश महाले उपस्थित होते.
नवी दिल्ली, 17 : स्वच्छ भारत मिशन-शहरी अंतर्गत आयोजित ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024-25’ मध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा देशात आपले वर्चस्व सिद्ध केले असून राज्याला एकूण दहा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यंदाच्या सर्वेक्षणात मिरा भाईंदर महानगरपालिकेने देशात सर्वप्रथम क्रमांक पटकावत राज्याचा नावलौकिक वाढविला आहे.
नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते या राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय गृहनिर्माण नगर विकास मंत्री मनोहर लाल आणि राज्यमंत्री तोखन साहू यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
स्वच्छ शहरांच्या मूल्यांकनामध्ये मिरा भाईंदरने 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या गटात देशात अव्वल स्थान मिळवले आहे. कराड नगर परिषदने 50 हजार ते 3 लाख लोकसंख्येच्या गटात देशात दुसरे स्थान पटकावले असून नवी मुंबई मनपाला “सुपर स्वच्छ लीग सिटी” पुरस्कार मिळाला आहे. लोणावळा, विटा, सासवड, देवळाली प्रवरानगर, पाचगणी आणि पन्हाळा या शहरांनीही आपापल्या गटात सुपर स्वच्छ लीगमध्ये स्थान मिळवले आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने देशात सातवा तर राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. तसेच 7 स्टार गार्बेज फ्री सिटी आणि वॉटर प्लस ही दोन्ही मानांकनंही मिळवली आहेत. नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी महानगरपालिका, नगरपालिकांच्या टीमसह पुरस्कार स्वीकारले.
महाराष्ट्राने कचरा व्यवस्थापन, स्रोत पातळीवरील विलगीकरण, नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून स्वच्छतेच्या दिशेने उल्लेखनीय कार्य केले आहे. मिरा भाईंदरने अत्याधुनिक कचरा व्यवस्थापन प्रणाली, मशीनद्वारे कचरा संकलन आणि नागरिकांमध्ये जनजागृती घडवून हे यश संपादन केले. पिंपरी-चिंचवडने कचरा मुक्त शहर व वॉटर प्लस प्रमाणपत्र मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करत सर्व विजयी शहरांचे अभिनंदन केले. स्वच्छता ही केवळ शारीरिक आरोग्याचा नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचा पाया असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी महिलांच्या वाढत्या सहभागाचे कौतुक करत ही चळवळ महिला सक्षमीकरणासाठी प्रभावी ठरत असल्याचे सांगितले. सफाईमित्रांचे योगदान उल्लेखनीय असून, मॅनहोलऐवजी मशीन-होलचा वापर वाढवण्याचेही त्यांनी आवाहन केले.
स्वच्छ भारत मिशन-शहरी 2.0 अंतर्गत देशभरातील 4,500 हून अधिक शहरांचे 10 महत्त्वपूर्ण निकषांवर मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये कचरा संकलन, स्रोत पातळीवरील विलगीकरण, पर्यावरणपूरक उपाययोजना, नागरिक सहभाग, आणि स्वच्छतेसंदर्भातील जनजागृती यांचा समावेश होता. “रिड्यूस, रीयूज, रीसाइकल” ही या वर्षीची मध्यवर्ती संकल्पना होती. एकूण 3,000 हून अधिक मूल्यांकनकर्त्यांनी 45 दिवसांच्या कालावधीत 11 लाखांहून अधिक घरे आणि परिसरांचे सर्वेक्षण केले असून 14 कोटी नागरिकांनी त्यात सहभाग नोंदविला आहे.
2016 पासून सुरू झालेला स्वच्छ सर्वेक्षण उपक्रम केंद्र शासनान सुरू केले आहे. शहरी स्वच्छतेचा महत्त्वपूर्ण आधारस्तंभ बनला आहे. अंतर्गत महाराष्ट्रातील विविध शहरांनी दाखवलेली कामगिरी संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरत असून, स्वच्छतेच्या दिशेने ही वाटचाल भविष्यातही वेगाने सुरू राहील, अशी अपेक्षा राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी यावेळी व्यक्त केल्या.
पुणे-आज पुणे महानगरपालिकेला नेपाळ देशातील महापौर आणि पदाधिकारी यांनी भेट दिली. पुणे महानगरपालिकेमध्ये अति.महा.आयुक्त (वि) ओमप्रकाश दिवटे यांनी गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. अति.महा.आयुक्त(वि) यांनी पुणे शहराची व पुणे महानगरपालिकेची विस्तृत माहिती सादरीकरणाद्वारे सादर केली. यानंतर उपआयुक्त सामान्य प्रशासन विभाग , उपआयुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग , उप आयुक्त मल:निसारण विभाग इ.विभागांनी त्यांचे विभागाचे सादरीकरण करून माहिती देण्यात आली. या प्रसंगी नरसिंग चैसीर महापौर महाकाली म्युन्सिपालिटी , बिजय सिंह धामी ,महापौर शैल्याशिखर म्युन्सिपालिटी, राम दत्त जोशी ,चेअरपर्सन लेकाम रुरल म्युन्सिपालिटी , .सुरेंद्र बहादूर बिस्त, चीफ एडमिनीस्टेटीव ऑफिसर शैल्यशिखर म्युन्सिपालिटी, श्रीमती गौरी सिंग रावल, महापौर, पटण म्युन्सिपालिटी, .दीपक बहादूर बम, महापौर ,पुर्चौडी म्युन्सिपालिटी,.पुस्कर राज जोशी ,महापौर दशरथ चंद म्युन्सिपालिटी, श्री.भीम बहादूर चंद महापौर ,मेलौली म्युन्सिपालिटी,श्री,दिल्ली राज जोशी ,महापौर अमरगढी, म्युन्सिपालिटी,.भारत बहादूर जोशी ,महापौर परशुराम म्युन्सिपालिटी हे उपस्थित होते. पुणे महानगरपालिकेच्या वतीने उप आयुक्त जयंत भोसेकर.उप आयुक्त घनकचरा व्यवस्थापन संदीप कदम ,नगरसचिव योगिता भोसले , संगणक प्रोग्रामर राहुल जगताप इ.अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .
मुंबई-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर चांगलेच तोंडसूख दिले. त्यांनी त्यांना गद्दार, नमक हराम, एहसान फरामोश, निर्लज्ज व्यक्ती अशा विविध उपमा देत आपल्या मनातील संताप व्यक्त केला. आतापर्यंतच्या एकाही मुख्यमंत्र्याने नगरविकास खाते दुसऱ्या मंत्र्याला दिले नाही. पण यांना देण्यात आले. पण त्यांनी काय केले तर गद्दारी. यांना थोडीही लाज वाटत नाही. ज्या व्यक्तीने एवढे सगळे दिले, त्याच्यावरच आरोप करता. काही संस्कार आहेत की नाही? असे ते आपला रोष व्यक्त करताना म्हणाले.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज सत्ताधारी व विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी आज नियम 293 अन्वये प्रस्ताव मांडला. पण ते भाषण करताना सत्ताधाऱ्यांनी वारंवार अडथळा आणला. त्यावर विरोधक चांगलेच संतप्त झाले. त्यांनी या प्रकारावर आक्षेप नोंदवत सभात्याग केला. त्यानंतर विधिमंडळ परिसरात पत्रकारांनी संवाद साधताना भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नापसंती व्यक्त केली. मी सभागृहात 293 अन्वये प्रस्ताव मांडला. त्यावर संबंधित मंत्र्यांनी उत्तरे देण्याचा दंडक आहे. पण प्रस्तावावर बोलताना माझी अडवणूक करण्यात आली. अध्यक्ष राहुल नार्वेकर दुतोंडी आहेत. ते स्वतःलाच सरकार समजतात. विधानसभा अध्यक्षांनी सरकार बरखास्त करून स्वतः उत्तरे द्यावीत. ते स्वतःला ज्ञानी समजतात, असे भास्कर जाधव आपला संताप व्यक्त करताना म्हणाले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही सरकार विशेषतः एकनाथ शिंदे यांच्यावर तोंडसूख घेतले. परवा सभागृहात चड्डी बनियन गँगच्या लोकांनी जे काही ओम भट स्वाहा केले ते सर्वांनी पाहिले. म्हणूनच मी हातवारे केले. टाचण्या टोचण्याविषयी. हो केले मी हातवारे. माझ्यावर कारवाई करा. कारण, उपमुख्यमंत्र्यांएवढे नमक हराम, एहसान फरामोश व्यक्ती मी पाहिले नाहीत. यांच्यासारखा निर्लज्ज व्यक्ती मी आयुष्यात पाहिला नाही, असे ते एकनाथ शिंदे यांचा नामोल्लेख टाळत म्हणाले. ते पुढे म्हणाले, आम्ही सभागृहात अनेक मुद्दे व प्रश्न उपस्थित केले. त्यावर नगरविकास मंत्री फक्त आणि म्हणून आणि म्हणून (नक्कल करत) बोलले. म्हणूनच मी तोंडावर गद्दार व नमक हराम बोललो. मी मिंधेंचे कुठेही नाव घेतले नाही. पिच्चर वगैरे सर्वकाही खोटे आहे. त्यांना उद्धव ठाकरे सरकारने सर्वकाही दिले. त्यापूर्वी त्यांना कोण ओळखत होते? या आधीच्या सरकारने आपण माहिती घ्या, मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खाते कधी कुणाला दिले का? पण यांना दिले गेले. पण यांनी काय केले? गद्दारी. यांना थोडीही लाज वाटत नाही. ज्या व्यक्तीने एवढे सगळे दिले ते त्याच्यावर आरोप करतात. काही संस्कार झाले आहेत की नाही? त्यांनी डोळ्यात डोळे घालून आरोप करावेत. पण त्यांच्यात ती ही हिंमत नाही. खाली पाहूनच बोलतात, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांना लगावला. दुसरीकडे, विधानसभेत आज आमदार आदित्य ठाकरे व भास्कर जाधव यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्यावर समोरच्या बाकांकडे पाहून हातवारे व इशारे करण्याचा आरोप केला. अध्यक्षांच्या बाबतीत त्यांनी केलेले विधान हे अध्यक्षांचा अवमान आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या या मागणीमुळे सभागृहात मोठा गदारोळ झाला.
पुणे- कर्वेनगर हद्दीतील महालक्ष्मी लॉन्स – राजाराम पुल ते दुधाने लॉन्स 100 फुटी डीपी रस्ता, (शिवणे ते खराडी) लवकरच होणार असल्याचे आज स्पष्ट झाले याबाबत . शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कोथरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष स्वप्निल दुधाने यांनी सांगितले कि,’आज महापालिकेचे पथ विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्यासमवेत आमची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. शिवणे ते खराडी कर्वेनगर हद्दीमधील दरम्यान आपल्या प्रभागातील २ किमी रस्त्यामध्ये बाधित आणि मिसिंग लिंक जोडण्यामध्ये ज्यांच्या जमिनी बाधित होत आहेत, त्या शेतकरी बांधवांच्या सोबत सकारात्मक बैठक पार पडली.
राजाराम पूल ते दुधाने लॉन्स हा १०० फुटी डीपी रोड मिसिंग लिंकच्या माध्यमातून जोडण्याचे काम अद्याप प्रलंबित आहे. हे प्रलंबित काम पूर्णत्वास नेण्यासाठी बाधित शेतकरी बांधवांशी सुसंवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या अडचणींबाबत प्रशासनाशी चर्चा करत सरकारी मोजणी, झोनिंग, योग्य मोबदला, बाधित जमिनीच्या मोबदल्याचे प्रलंबित प्रस्ताव यावर प्रकाश टाकला. या कामांमध्ये दिरंगाई झाल्यास पुढील कामही लवकर न होण्याचा धोका संभवतो, असे निक्षुन सांगत नागरिकांच्या समस्यांचे निवारण करत येत्या सहा महिन्यात सदर रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी विनंती केली. यावेळी नागरिकांना आवश्यकता ते सर्वतोपरी सहकार्य करण्याचा शब्द अधिकारी वर्गाकडून आज देण्यात आला.
सन २०११ साली हा रस्ता जागेवर अस्तित्वातच नव्हता. २०१२ साली प्रथमतः नगरसेवक म्हणून सौ. लक्ष्मी दुधाने या निवडून आल्यानंतर, पहिल्या व दुसऱ्या टर्ममध्ये शेतकरी वर्गाला विश्वासात घेऊन सदर २ किमी रस्त्यापैकी सव्वा ते दीड किमी रस्त्याचे काम आपण पूर्ण करून घेतले होते. परंतु गेल्या तीन वर्षांपासून प्रशासनाकडून या रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही, ही खेदजनक बाब आहे. प्रशासनाने बाधित शेतकरी वर्गाशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात आणि त्यावर योग्य ती कार्यवाही करणे, हे त्यांचे कर्तव्य आहे. याबाबत लोकप्रतिनिधी या नात्याने प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिक या दोहोंना सहकार्य करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत, यात शंकाच नाही.
याप्रसंगी रस्ताबाधित शेतकरी बांधव – जमीन मालक विनोद बराटे, आदित्य बराटे, मांडेकर कुटुंबीय, दिलीपराव बराटे व कुटुंबीय, हेमराज चौधरी, विश्वनाथ बगाटे,जावळकर कुटुंबीय प्रभागातील सहकारी माजी नगरसेवक राजाभाऊ बराटे, सुशील मेंगडे, दत्तात्रय चौधरी तसेच अन्य नागरिक व विविध विभागाचे महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.