Home Blog Page 423

खा.डॉ.मेधा कुलकर्णी महिला परिषदेसाठी मेक्सिकोला रवाना

प्रतिनिधी – IPU (International Parliamentary Union) च्या Global Women Conference मेक्सिको येथे आयोजित करण्यात आले असून या कॉन्फरन्ससाठी खा. डॉ. मेधा कुलकर्णी सहभागी होण्यासाठी रवाना झाल्या.
या तीन दिवसीय परिषदेसाठी राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी कुलकर्णी यांना नामदेर्देशित करण्यात आले असून या परिषदेत विविध देशातील महिला खासदारांचा समावेश असणार आहे. विविध देशांमधील महिला संसद सदस्य त्यांचे प्रश्न महिला विषयक कायदे महिलांची सुरक्षितता, सायबर गुन्हे आणि सुरक्षेच्या उपाययोजना, जेंडर इक्वॅलीटी, विविध देशात असलेली याविषयीची स्थिती, घेतलेले निर्णय केलेल्या उपाययोजना, राजकारणात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी करीत असलेले प्रयत्न या सर्वांवर चर्चात्मक परिसंवाद होणार आहेत.
विविध देशाच्या महिला खासदार सहभागी होऊन प्रतिनिधित्व करणार आहेत. डॉ. मेधा कुलकर्णी या भारताचे प्रतिनिधित्व करतील.

सिंहगड सिटी स्कूल, कोंढवा या शाळेवरील कार्यवाहीसाठी शिक्षण उपसंचालकांकडे प्रस्ताव – नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई : सिंहगड सिटी स्कूल, कोंढवा बुद्रुक, पुणे या शाळेने बेकायदेशीर स्थलांतर, बांधकाम केले असल्याने मान्यता रद्द करण्याबाबत किंवा कायम ठेवण्याबाबत निर्णय व कार्यवाही होण्यासाठी शिक्षण उपसंचालक यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत दिली.

सदस्य योगेश टिळेकर यांनी सिंहगड सिटी स्कूल कोंढवा बुद्रुक पुणे ही शाळा इमारतीचा विना भोगवटा प्रमाणपत्र वापर सुरू असल्याबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री मिसाळ बोलत होत्या.

राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या, शाळेत २१०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळा सीबीएसई बोर्डाची आहे, आणि त्याच्यामुळे ह्या शाळेची मान्यता रद्द करावी किंवा योग्य ती कार्यवाही करावी, याबाबत शिक्षण उपसंचालकांना पत्र देण्यात आलेले आहे. महानगरपालिकेने नोटीस दिलेली आहे. २१०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांचे फेर नियोजन करणे गरजेचे आहे. ही आपली सामाजिक बांधीलकी आहे. तथापि, अनधिकृत बांधकाम आणि शाळेवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचे अनुकरण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

  • छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त विधान भवनात अभिवादन

मुंबई : शौर्य, धैर्य आणि स्वराज्यरक्षणासाठी अखेरच्या क्षणापर्यंत लढणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज सकाळी १०:३० वाजता विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ झालेल्या या कार्यक्रमात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या अभिवादन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर; विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री माणिकराव कोकाटे, विधान परिषद आमदार श्रीमती चित्रा वाघ आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याला व त्यागाला वंदन करताना सर्व मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली.

यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संभाजी महाराजांच्या बलिदानाचे स्मरण करत, त्यांच्या संघर्षमय जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. “संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी अभूतपूर्व बलिदान दिले. त्यांचे शौर्य आणि निश्चय हा आजच्या तरुणांनी आदर्श मानावा,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन आणि कार्य हे भारतीय इतिहासातील तेजस्वी पर्व आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करताना त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे हीच खरी आदरांजली ठरेल. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा सन्मान राखण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे, असेही यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

शंभूराजांच्या क्रूर हत्येनंतरच्या काळातील मराठी सरदारांचे तळपते कर्त्तृत्व संशोधन, लेखनासाठी प्रवृत्त करणारे ठरले- माजी पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील

  • प्रसिद्ध इतिहास अभ्यासक व माजी पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांचे प्रतिपादन

पुणे – “छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर मराठी स्वराज्य बलाढ्य औरंगझेबाविरुद्ध किती पराक्रमाने लढले, या लढ्याचा इतिहास रोमहर्षक आहे. या लढ्याची सूत्रे स्वीकारली ती महापराक्रमी संताजी घोरपडे आणि त्यांच्या शूर सहकार्यांनी. सरदार संताजी घोरपडे या व्यक्तिमत्वाने आणि त्यांच्या तळपत्या पराक्रमाच्या गाथेने मला साद घातली. त्याची परिणती ‘शूर सरसेनापती संताजी’ या पुस्तकाच्या लेखनात झाली”, असे मनोगत प्रसिद्ध अभ्यासक, संशोधक आणि माजी पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील (IPS) यांनी मंगळवारी व्यक्त केले. ११ मार्च १६८९ या दिवशी औरंगझेबाने छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या केली होती. मंगळवारी धर्मवीर शंभूराजांच्या स्मृती जागवणाऱ्या दिवसाचे औचित्य साधून डॉ. शेखर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शंभूराजांच्या हत्येनंतरच्या काळातील मराठा सरदार, औरंगजेब, त्यांच्या लढाया विशेतः संताजी घोरपडे याविषयी डॉ. शेखर पाटील यांचा विशेष अभ्यास आहे.

डॉ. शेखर पाटील म्हणाले, “१६८३ ते १६९४ पर्यंतच्या काळात मराठी सैन्य संताजींच्या नेतृत्वाखाली औरंगझेबाशी लढत राहिले, हा इतिहास आहे. छत्रपती राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्यावर वेढ्यात असतानाही, मराठी स्वराज्याचे सर्व अर्थांनी रक्षण आणि बलाढ्य शत्रूशी दोन हात अशी कामगिरी करणारे संताजी घोरपडे हे व्यक्तिमत्व मला सदैव साद घालत राहिले. त्यातूनच या काळाविषयीच्या माझ्या संशोधनाला चालना मिळाली, आणि ‘शूर सरसेनापती संताजी’ या पुस्तकाचे लेखन घडले. आता लवकरच या पुस्तकावर आधारित रणधुरंधर संताजी हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. उच्च दर्जाच्या सिनेमॅटोग्राफी साठी प्रसिद्ध असलेले व विविध राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी असलेले दिग्दर्शक अमोल गोळे हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत”, अशी माहितीही त्यांनी दिली. याप्रसंगी दिग्दर्शक अमोल गोळे, डॉ. अनिरुद्ध आंबेकर, करणसिंग बांदल, एकनाथ दुधे, आदित्य शेखर पाटील, निवृत्ती नवले तसेच घोरपडे घराण्याचे वंशज चंद्रहार घोरपडे व मानसिंग घोरपडे तसेच अन्य घोरपडे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी चित्रपटाच्या पहिला पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

डॉ. शेखर पाटील पुढे म्हणाले, “शिवरायांचे जन्मस्थान असणार्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी माझे लहानपण गेले. तेव्हापासून इतिहासाची गोडी लागली. अभ्यास सुरू झाला. अवघ्या २३ व्या वर्षी संभाजी महाराज छत्रपती झाले. त्यानंतरची ९ वर्षे त्यांनी औरंगझेबाशी अशा लढाया केल्या, की औरंगझेबाने विचार बदलून आधी निजामशाही, आदिलशाही आणि कुतुबशाही संपविण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण काळाचे संशोधन हा माझ्या विशेष अभ्यासाचा विषय आहे. सलग ५ वर्षे संशोधन, सुमारे ८ हजार किलोमीटरचा प्रवास, लढायांची माहिती. या काळाशी संबंधित प्रत्येक स्थळाला भेट देऊन, मी लेखन केले आहे. सर्व उपलब्ध कागदपत्रांचा मी अभ्यास केला आहे. सुमारे ८ वर्षे स्वराज्याचे सेनापती या नात्याने संताजी घोरपडे यांनी स्वराज्य जपले, राखले, आणि औरंगजेबाला हैराण केले. संताजींच्या महापराक्रमी कर्तृत्वाला आदरांजली म्हणून माझा लेखनप्रपंच आहे, त्या लेखनाचे चित्रपटरूपही लवकरच रसिकांसमोर येईल. या विशिष्ट काळातील इतिहास, आणि मराठी सरदारांचे महान कर्तृत्व सर्वांसमोर यावे, हाच उद्देश आहे”.

दिग्दर्शक अमोल गोळे म्हणाले, “ऐतिहासिक चित्रपट करताना वातावरणनिर्मिती, पेहराव, तत्कालीन वास्तू, वस्तू यांना सर्वाधिक महत्त्व असते, हे मी मंगल पांडे, पावनखिंड या ऐतिहासिक चित्रपटांसाठी काम करताना शिकलो आहे. ‘रणधुरंदर संताजी’ चित्रपटाचे दिग्दर्शन करताना हा अनुभव उपयोगी ठरेल. सुमारे वर्षभराच्या काळात हा चित्रपट रसिकांसमोर येईल, असा आमचा प्रयत्न राहील”.

घोरपडे घराण्याचे वंशज चंद्रहार घोरपडे म्हणाले, “संताजी घोरपडे हा घराण्याचा अभिमान आहे. संताजींचे वडील मालोजी घोरपडे हे छत्रपती संभाजी महाराजांचे सरसेनापती होते. या पितापुत्रांनी स्वराज्यासाठी जे योगदान दिले, त्याचे दर्शन यातून घडेल”, याचा विश्वास आहे.

“महिला शिक्षण आणि सशक्तीकरण हाच समाजप्रबोधनाचा खरा मार्ग” – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

  • जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्यावतीने ‘खेळ पैठणीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन; डॉ. नीलम गोऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती

मुंबई – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘खेळ पैठणीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विधान परिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे प्रमुख उपस्थित होत्या. यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना डॉ. गोऱ्हे यांनी महिला शिक्षण आणि सशक्तीकरणाचा महत्वाचा मुद्दा मांडला.

आपल्या भाषणात डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, रमाई आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांसारख्या महान महिलांनी समाजप्रबोधन आणि शिक्षणासाठी मोलाचे कार्य केले. आजही महिला शिक्षण आणि त्यांचे सशक्तीकरण हाच समाजाच्या प्रगतीचा खरा मार्ग आहे.” त्यांनी उपस्थित सर्व महिलांना “भावी नगरसेविका होण्याची संधी आहे,” असे सांगून त्यांना सामाजिक आणि राजकीय नेतृत्वाची संधी घेण्यासाठी प्रोत्साहन दिले.

या कार्यक्रमात शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या, विभाग प्रमुख, माजी नगरसेविका आणि अनेक मान्यवर महिला उपस्थित होत्या. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने शिवसेना सातत्याने काम करत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, “घरगुती जबाबदाऱ्या सांभाळतानाच महिला आपल्या शिक्षणाचा आणि कौशल्यांचा योग्य उपयोग करत आहेत. त्यामुळे त्यांची सामाजिक आणि आर्थिक प्रगती अधिक वेगाने होत आहे.” यावेळी उपस्थित महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि या कार्यक्रमाचे भरभरून स्वागत केले.

या कार्यक्रमात शिवसेना उपनेत्या कला ताई शिंदे, संपर्क प्रमुख वीणा भागवत, विभाग प्रमुख शीतल म्हात्रे बिट्रा आणि भक्ती ताई भोसले या मान्यवरांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन कुणाल सरमळकर आणि पल्लवी कुणाल सरमळकर यांनी केले होते.

वीजक्षेत्रातील आव्हाने स्विकारण्यास महिला सक्षम असल्याचे सिद्ध

  • पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांचे गौरवोद्गार

पुणे, :तांत्रिक व अत्यंत धकाधकीच्या वीजक्षेत्रामध्ये काळानुरुप आव्हाने स्वीकारण्यासाठी सक्षम असल्याचे महिला अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आजवर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीवरून सिद्ध केले आहे असे गौरवोद्गार महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी काढले.

जागतिक महिला दिनानिमित्त महावितरणकडून रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीच्या ‘प्रकाशदीप’ सभागृहात पुणे परिमंडलातील महिला अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रादेशिक संचालक खंदारे बोलत होते.व्यासपीठावर मुख्य अभियंता राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंते सर्वश्री युवराज जरग, सिंहाजीराव गायकवाड, रवींद्र बुंदेले, सहायक महाव्यवस्थापक (वित्त) माधुरी राऊत (वित्त व लेखा) यांची उपस्थिती होती. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते सर्व संवर्गातील महिला अधिकारी, अभियंता, कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधिक गौरव करण्यात आला.

मुख्य अभियंता राजेंद्र पवार म्हणाले की, महावितरणमध्ये महिला अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे व त्या अतिशय सक्षमपणे काम करीत आहेत. कौटुंबिक व नोकरीच्या जबाबदाऱ्या एकाचवेळी सांभाळताना योग्य ताळमेळ साधण्याचे कसब महिलांमध्ये अधिक आहे.

‘महिला दिना’निमित्त आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री सूर्यघर योजना व नवीकरणीय ऊर्जा याबाबत सहायक अभियंता शुभांगी क्षीरसागर यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यानंतर खास महिलांसाठी संगीत रजनीचा कार्यक्रम झाला. सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता ऐश्वर्या वस्त्रद यांनी केले. कार्यक्रमाला महिला अभियंता, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महावितरणच्या वडगाव शाखा कार्यालयाचे नव्या जागेत स्थानांतरण

पुणे ; महावितरणच्या पर्वती विभाग अंतर्गत वडगाव शाखा कार्यालयाचे वडगावमधील मध्यवस्तीत स्थानांतरण करण्यात आले. या कार्यालयाच्या नव्या वास्तूचे उद्घाटन मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते नुकतेच झाले.

वडगाव धायरी उपविभागातील वडगाव शाखा कार्यालय पूर्वी अभिरूची मॉलसमोर भाडेपट्टी तत्त्वावर होते. आता हे कार्यालय वडगावमधील महावितरणच्या मालकीच्या जागेमध्ये कृष्णकुंज सोसायटी, सिंहगड कॉलेज रस्ता, महादेव मंदिराजवळ येथे स्थानांतरीत करण्यात आले आहे. वडगाव परिसरातील सुमारे ३२ हजार ग्राहकांना वीज व विविध ग्राहकसेवा देणाऱ्या या कार्यालयासाठी नवीन वास्तू उभारण्यात आली आहे.

या  वास्तुचे उद्घाटन करताना मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी अभियंता व कर्मचाऱ्यांशी संवाद साधलायावेळी श्री. पवार यांनी तत्पर ग्राहकसेवेसोबतच तक्रारी व समस्यांचे विनाविलंब निराकरण करण्याचे निर्देश दिले. कार्यक्रमाला प्रभारी अधीक्षक अभियंता श्री. रवींद्र बुंदेले, कार्यकारी अभियंता श्री. मनीषकुमार सूर्यवंशी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. अविनाश कलढोणे व श्री. राहुल यादव (स्थापत्य), श्री. विशाल लंके, वडगावचे शाखा अभियंता श्री. आतिश इंगळे व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

‘प्रकाशदूत’च्या वनराईने फुलले महावितरणचे दत्तवाडी कार्यालय

पुणे, दि. ११ मार्च २०२५: महावितरणच्या पर्वती विभाग अंतर्गत दत्तवाडी शाखा कार्यालयाच्या प्रांगणातील पडीक जागेत उभारलेल्या ‘प्रकाशदूत’ बागेचे उद्धाटन मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते नुकतेच झाले. या शाखा कार्यालयाच्या प्रांगणात सुमारे ८०० चौरसफूट जागा अडगळीने व्यापली होती. तेथे साफसफाई करून हिरव्या गवताचा गालिचा व सुमारे १५० झाडांची रोपटे लावून वनराई फुलवली आहे.

‘लाइनमन दिना’निमित्त पर्वती विभागाकडून दत्तवाडी शाखा कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रामुख्याने छोटेखानी ऑक्सीजन रोपट्यांची लागवड केलेल्या ‘प्रकाशदूत’ बागेचे उद्घाटन मुख्य अभियंता श्री. पवार यांच्याहस्ते झाले. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. रवींद्र बुंदेले व श्री. संजीव नेहेते, कार्यकारी अभियंता श्री. मनीषकुमार सूर्यवंशी व श्री. विजेंद्र मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. पाहुण्यांच्या हस्ते लाइनमन व लाइनवूमनचा प्रातिनिधिक गौरव करण्यात आला.

मुख्य अभियंता श्री. पवार यांनी अभियंता व जनमित्रांशी संवाद साधला. ‘महावितरणच्या सेवेचा केंद्रबिंदू हा वीजग्राहकच आहे. त्यांना दर्जेदार व तत्पर सेवा देण्यासोबतच स्वतःच्या आणि ग्राहकांच्या वीजसुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या’ असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला अतिरिक्त कार्यकारी अभियंते उमेश कवडे, उमेश करपे, राहुल यादव, सहायक अभियंता चेतन सोनार व महेश देशमुख आदींसह अभियंते, जनमित्र उपस्थित होते.

छत्रपती संभाजी महाराजांना रक्तदानातून मानवंदना 

  • शिवजयंती महोत्सव समिती, पुणे तर्फे भव्य रक्तदान मानवंदनेचे आयोजन ; १०० स्वराज्यघराण्यांचा आणि महाराष्ट्रातील शिवशंभू भक्तांचा सहभाग 

पुणे : शिवजयंती महोत्सव समिती, पुणे तर्फे स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३६ व्या बलिदान दिनी रक्तदानातून मानवंदना देण्यात आली. मानवंदनेचे हे सलग १२ वे वर्ष आहे. यावेळी जिजाऊ माँसाहेब शहाजी महाराज शिवज्योत रथाच्या नेतृत्वाखाली शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात सहभागी होणाऱ्या तब्बल १०० स्वराज्यघराण्यांच्या वंशजांनी, ढोलताशा पथकांनी, क्रिडा संघटनांनी, गणेशोत्सव मंडळांनी रक्तदान मानवंदनेत सहभाग नोंदवला.

शुभारंभ लॅान्स, म्हात्रे पूल डीपीरोड येथे मानवंदनेची सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आला. यावेळी रक्तदान मानवंदनेचे संकल्पक समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, शंकर कडू, मंगेश शिळीमकर, प्रवीणभय्या गायकवाड, रिंकल अमित गायकवाड तसेच स्वराज्यघराण्यांचे प्रतिनीधी उपस्थित होते.

रक्तदान मानवंदनेची सुरुवात ईशान अमित गायकवाड, सचिन पायगुडे, महेंद्र भोईटे, अविनाश कडू, राजेश जोगदंड, सुनील जोगदंड, दादा भोसले, मंदार मते, बाजीराव निगडे,  ऋषीकेश पासलकर यांनी रक्तदान करुन केली. यावेळी रक्तदात्यांचा संकल्प पुर्ण झाला. हिंजवडी रक्तपेढीने रक्त संकलन केले.

अमित गायकवाड म्हणाले, स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन ११ मार्च हा दिवस “महामृत्युंजय रक्दान दिन” म्हणुन महाराष्ट्र सरकारने जाहीर करावा अणि त्यादविशी संपुर्ण महाराष्ट्रात रक्तदान चळवळीतून संभाजी महाराजांना मानवंदना द्यावी. ज्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी रक्ताचा थेंबनथेंब अर्पण केला स्वराज्याच रक्षण करण्यासाठी, भारतभूमीच रक्षण करण्यासाठी, भारताच्या गौरवशाली संस्कृतीच रक्षण करण्यासाठी त्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना रक्तदानातुन मानवंदना देऊयात, रक्ताच पांग रक्ताने फेडूया, रक्ताचे रक्ताशी नाते जोडूयात ही जाणीव जपत आम्ही सलग १२ वर्षे रक्तदान मानवंदना आयोजित करीत आहोत आणि भविष्यात राज्यव्यापी मानवंदनचे आयोजन करण्यात येणार आहे.

सर्वसामान्यांना वटवृक्षाप्रमाणे आधार देणारा अर्थसंकल्प – डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. १० मार्च २०२५ : केंद्र सरकारने जसा मध्यमवर्गीय, गरीब, शेतकरी आणि महिलांना मदतीची संजीवनी दिली, तसाच दिलासा राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातही वृद्धिंगत करण्यात आला आहे. महाराष्ट्र निर्यात प्रोत्साहन धोरण, पर्यटन धोरण, नवे आयटी धोरण, लॉजिस्टिक्स धोरण, आरोग्य पर्यटन धोरण, २०२५ हे सहकार वर्ष म्हणून घोषित करणे आणि अभिजात मराठी भाषा मोहीम दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांसाठी लाडकी लेक आणि लाडकी बहीण यासारख्या योजनांची व्याप्ती वाढवण्यात आली असून, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

महिला सक्षमीकरणासाठी उमेद मॉल १० जिल्ह्यांत सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने महिलांचे कौशल्यविकास उपक्रम राबवले जाणार आहेत. हे उपक्रम नव्या युगाचे वेध घेणारे ठरणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. तसेच “दुर्गम ते सुगम” या कार्यक्रमांतर्गत देवस्थानांचा आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे.

कृषी आणि ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी ४५ लाख कृषिपंपांसाठी मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी ७,९७८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय, बळीराजा शेत व पाणंद रस्ते योजनेसाठी ३६,३०३ कोटी रुपयांची घसघशीत तरतूद करण्यात आली आहे. शेती उत्पादनांना बाजारभाव मिळावा यासाठीही धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत.

कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने २१ फिरती पथदर्शी न्यायवैधक पथके स्थापन करण्यात येणार आहेत. यासोबतच, हायटेक कमांड सेंटर्सची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे गुन्ह्यांवरील नियंत्रण आणि दोषसिद्धी दर वाढण्यास मदत होईल.

निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेली आश्वासने आणि गावोगावच्या गरजा लक्षात घेऊन महिलांना विकासकेंद्री न्याय देण्याचे वचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्ण केले आहे. या निर्णयांचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अभिनंदन केले आहे.

अर्थसंकल्पात पुणेकरांसाठी भरीव निधीची तरतूद..! पुणेकरांना उत्तम सुविधा देण्यासाठी महायुती सरकार कटिबध्द – शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे

पुणे ; महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा आणि सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प महायुती सरकारच्या नेतृत्वात अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पात पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीमुळे पुणे शहराच्या प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे,

शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे म्हणाले की, या अर्थसंकल्पात पुण्यासाठी भरीव निधी देत विशेष लक्ष केंद्रित केले. यामध्ये प्रामुख्याने पुणे मेट्रो प्रकल्पासाठी ₹८३७ कोटी निधी मंजूर करण्यात आला असून, या तरतुदीमुळे शहरातील मेट्रोच्या कामांना वेग येईल आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होईल. तसेच, मुळा-मुठा नदी संवर्धन प्रकल्पासाठी २३० कोटी रुपयांच्यानिधीची तरतूद करण्यात आली असून, यामुळे नदी प्रदूषण कमी होऊन पर्यावरण संतुलन राखले जाईल.

पुणे शहराच्या पाणीपुरवठा आणि मलिनिसरण व्यवस्थापनेसाठी अनुक्रमे १३२१ कोटी रु. आणि ८१२ कोटी रु. निधी दिला असून, त्यामुळे शहरातील स्वच्छता आणि पाणीपुरवठा व्यवस्थापन अधिक सक्षम होईल. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ८ नवीन उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी ९९२ कोटी रु. निधीची तरतूद करण्यात आली आहे.

शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही भरीव तरतुदी करण्यात आली असून, शिक्षणासाठी ४६८ कोटी रु. आणि आरोग्यासाठी ५०५ कोटी रु. मंजूर करण्यात आले आहेत. या निधीमुळे शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा अधिक सक्षम होतील.

तसेच कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मिती प्रकल्प, वारजे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची स्थापना, सिंहगड रोड उड्डाणपूल आणि नदी पुनर्जीवन प्रकल्प, श्वान प्रेमींसाठी डॉग पार्क उभारणी, फेरीवाल्यांसाठी हॉकर्स प्लाझा असे महत्वपूर्ण निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आले आहेत.

या सर्व तरतुदींमुळे पुणे शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. पुणेकरांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहराचा विकास निश्चितपणे वेगाने होईल असे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी म्हटले आहे.

पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित चौथी ‘फ्रेंडशिप करंडक’ २०२५ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा, रमणबाग फायटर्स संघाला विजेतेपद

पुणे, १० मार्चः पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या संघांचा समावेश असलेल्या चौथ्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत प्रज्योत शिरोडकर याने फटकावलेल्या नाबाद ६० धावा आणि प्रसाद घारे (नाबाद ४२) यांच्या फलंदाजीच्या जोरावर रमणबाग फायटर्स संघाने रंगारी रॉयल्स् संघाचा १० गडी राखून सहज पराभव केला आणि स्पर्धेच्या विजेतेपदावर पहिल्यांदाच आपले नाव कोरले.

सहकारनगर येथील ल.रा. शिंदे हायस्कूल येथील मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना रंगारी रॉयल्स् संघाने १० षटकामध्ये १०३ धावांचे लक्ष्य उभे केले. यामध्ये स्पर्धेचा सर्वोत्कृष्ठ खेळाडू ठरलेला निलेश साळुंखे याने ३५ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ६३ धावांची खेळी केली. त्याला विशाल मुधोळकर याने १६ धावा करून साथ दिली. हे लक्ष्य रमणबाग फायटर्स संघाने ७.२ षटकात व एकही फलंदाज न गमवता पूर्ण केले. सामन्याच्या दुसर्‍या डावामध्ये वर्चस्व गाजवताना रमणबाग संघाच्या प्रज्योत शिरोडकर याने २० चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ६० धावाची खेळी केली. प्रसाद घारे याने दुसर्‍या बाजुने नाबाद ४२ धावांची खेळी करून संघाला सहज विजय मिळवून दिला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुनित बालन ग्रुपचे संचालक आणि स्पर्धेचे आयोजक पुनित बालन, माणिकचंद ऑक्सिरीचच्या संचालिका जान्हवी धारीवाल-बालन आणि प्रसिध्द सिनेचित्रपट अभिनेता आकाश ठोसर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळांचे अध्यक्ष, मंडळाचे सदस्य, कार्यकर्ते, ढोल-ताशा पथकातील सदस्य, मीडिया क्षेत्रातील मान्यवर सदस्य व सहभागी संघ आणि संघातील खेळाडू आदि उपस्थित होते.

विजेत्या रमणबाग फायटर्स संघाला २ लाख ११ हजार रूपये, करंडक व मेडल्स् तर, उपविजेत्या रंगारी रॉयल्स् संघाला १ लाख ११ हजार रूपये, करंडक आणि मेडल्स् देण्यात आले. मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू निलेश साळुंखे याला ५१ हजार रूपये आणि इलेक्ट्रिक बाईक देण्यात आली. ‘फेअर प्ले’ पुरस्कार जिंकणार्‍या युवा योद्धाज् संघ संघाला २५ हजार रूपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. याबरोबरच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज- रूपक तुबाजी, गोलंदाज- सत्यजीत पाळे, यष्टीरक्षक- मयुरेश चासकर, क्षेत्ररक्षक- विशाल मुधोळकर आणि सर्वोत्कृष्ठ ५० वर्षावरील खेळाडू- संतोष गायकवाड या सर्वांना प्रत्येकी ११ हजार रूपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आले.

अंतिम सामन्याचा संक्षिप्त निकालः
रंगारी रॉयल्स्ः १० षटकात ६ गडी बाद १०३ धावा (निलेश साळुंखे ६२ (३५, ७ चौकार, ३ षटकार), विशाल मुधोळकर १६, अथर्व हिरवे ३-२, प्रज्योत शिरोडकर १-११) पराभूत वि. रमणबाग फायटर्सः ७.२ षटकात बिनबाद १०४ धावा (प्रज्योत शिरोडकर नाबाद ६० (२०, ६ चौकार, ४ षटकार), प्रसाद घारे नाबाद ४२ (२५, ३ चौकार, ३ षटकार); सामनावीरः प्रज्योत शिरोडकर;

स्पर्धेची वैयक्तिक आणि इतर पारितोषिकेः
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ खेळाडूः निलेश साळुंखे (१५१ धावा, ७ विकेट; रंगारी रॉयल्स्);
सर्वोत्कृष्ठ फलंदाजः रूपक तुबाजी (२५३ धावा, शिवमुद्रा ब्लास्टर्स);
सर्वोत्कृष्ठ गोलंदाजः सत्यजीत पाळे (१० विकेट, रमणबाग फायटर्स);
सर्वोत्कृष्ठ क्षेत्ररक्षकः विशाल मुधोळकर (रंगारी रॉयल्स्);
सर्वोत्कृष्ठ यष्टीरक्षकः मयुरेश चासकर (१२ बाद; रमणबाग फायटर्स);
सर्वोत्कृष्ठ ५० वर्षावरील खेळाडूः संतोष गायकवाड (गजर सुपरनोव्हा);
फेअर प्ले पुरस्कारः युवा योद्धाज् संघ;

नागरिकांच्या जीवनात गुणात्मक परिवर्तन करुन शासनाची प्रतिमा उंचविण्याचे काम करावे- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

  • आगामी काळात जिल्ह्यात स्वच्छ व सुंदर महसूल प्रशासन राबवूया- जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

पुणे, दि. 10: महसूल विभागाने नागरिकांच्या जीवनात गुणात्मक परिवर्तन घडवून आणण्याकरीता लोकल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासोबतच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत. या माध्यमातून शासनाची प्रतिमा जनमाणसात उंचविण्याकरीता कामे करावीत, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित महसूल कामकाजविषयक कार्यशाळेच्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अपर जिल्हाधिकारी सविता नरके, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आदी उपस्थित होते.

डॉ. पुलकुंडवार म्हणाले, महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी गावपातळीपासून ते मंत्रालयापर्यंत आपली जबाबदारी चोखपणे पार पाडीत असतात. या विभागामार्फत गाव, तालुका, जिल्हा पातळीवर इतर विभागाशी समन्वयाने कामे करुन नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर द्यावा. महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून या विभागाकडून नागरिकांच्या अपेक्षा असतात. शासनाच्या विविध मोहीम, उपक्रम या विभागामार्फत राबविण्यात येतात, त्यामुळे विभागाची प्रतिमा मलीन होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. आगामी काळातही प्रत्येकांनी आपल्या कामकाजात पारदर्शीपणे, नागरिकांशी सुसंवाद व सौजन्याची वागणूक देत त्यांची कामे विहीत मुदतीत निकाली काढावे. भूसंपादन, अर्धन्यायिक प्रकरणे वेळेत मार्गी लावून आदेश पारीत केले पाहिजे.

शासनाच्या निर्देशाप्रमाणे आगामी काळात अर्थचक्राला गती देण्याकरीता उद्योजकाला त्रास होणार नाही, याकरीता उद्योगस्नेही वातावरण निर्माण करावे. पेसा कायद्याद्वारे आदिवासी नागरिकांना संवेदनशीलपद्धतीने सोई-सुविधा विहित कालमर्यादेत देण्यात याव्यात. सीएससी व सेतू केंद्रामार्फत अधिकाधिक सेवा उपलब्ध होण्याच्यादृष्टीने वेळोवळी आढावा घेण्यात यावा. शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या 100 दिवस उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. ‘आयजीओटी’ ॲप किंवा संकेतस्थळावर प्रत्येकांनी नोंदणी करुन प्रशिक्षण पूर्ण करुन घ्यावे. या कार्यशाळेच्या माध्यमातून आपल्या दैनंदिन कामकाजाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल, अशा विश्वास डॉ. पुलकुंडवार यांनी व्यक्त केला.

आगामी काळात जिल्ह्यात स्वच्छ व सुंदर महसूल प्रशासन राबवूया-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

नागरिकांचा महसूल विभागावरील विश्वास अधिक वृद्धींगत करण्याकरीता गतीमान व पारदर्शक पद्धतीने काम कामकाज करावे. नागरिकांचा वेळ, इंधन आणि खर्चात बचत व्हावी यासाठी कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर करावा. पुणे जिल्हा राज्यात अग्रेसर राहील, यादृष्टीने आपण सर्वांनी मिळून स्वच्छ, सुंदर महसूल प्रशासन राबवूया, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.

श्री.डूडी म्हणाले, शासनाची प्रतिमा उंचविणारी कामे तसेच विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम विभागामार्फत राबविण्यात येत असून तळागळातील पात्र नागरिकांना त्यांचा लाभ व्हावा यासाठी योजनांची माध्यमांद्वारे जनजागृती झाली पाहिजे. भूसंपादन, पुनर्वसनाची प्रकरणे विहीत वेळेत निकाली काढावेत. आगामी काळात कामकाजाचे मूल्यमापन करण्यात येणार असून उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. यापुढे जिल्ह्यात अनधिकृत कामे होणार नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी.

जिल्ह्यात सर्व विभागांनी मिळून अधिक लोकसंख्या असलेल्या मध्यवर्ती गावात लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आदी घटकांना सोबत घेवून लोकशाही दिनाचे आयोजन करावे. गाव, मंडळ, तालुकास्तरावर प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यावर भर दिला पाहिजे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांकरीता ठरवून दिलेल्या दिवशी कार्यालयात उपस्थित राहावे, येणाऱ्या नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी, त्यांच्या कामकाजाची माहिती द्यावी. कामे करताना आरोग्याची काळजी घ्यावी. कामाचा हेतू प्रमाणिक असल्यास विभाग आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहील, असा विश्वास श्री. डूडी यांनी व्यक्त केला.

या कार्यशाळेत ई-फेरफार, ई-हक्क, ई-चावडी, ई-पिकपाहणी, ई-क्युजे कोर्ट, ई-कोर्ट, डी-४, शासकीय जागा मागणी, सेवादूत, महाखनिज, महामहसूल, आपले सरकार, पीजी पोर्टल, १०० दिवस कृती आराखडा आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेला मुद्रांक जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी, अधीक्षक भूमी अभिलेख, सहायक अधीक्षक भूमी अभिलेख, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, सेतू चालक आदी उपस्थित होते.

उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय लोकशाही दिनात चार प्रकरणांवर सुनावणी

पुणे, :- विभागातील सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून न्याय व तत्परतेने सोडवणूक करण्यासाठी
विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित लोकशाही दिनात चार प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली. जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः सुनावणी घेऊन प्रकरणे निकाली काढावीत, असे निर्देश डॉ. पुलकुंडवार यांनी यावेळी दिले.

यावेळी अपर आयुक्त उपायुक्त समीक्षा चंद्राकर तसेच विविध विभागांचे विभागस्तरीय अधिकारी उपस्थित होते. नागरिकांच्या तक्रारीवर निर्णय घेण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजन करण्यात येते.

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार निवारण न झालेल्या प्रलंबित दोन व नव्याने दाखल झालेल्या दोन प्रकरणांवर यावेळी विभागीय आयुक्त डॉ.पुलकुंडवार यांनी अर्जदारांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली आणि सुनावणी घेतली. यात पुणे जिल्ह्यातील तीन, कोल्हापूर जिल्ह्यातील एका प्रकरणावर सुनावणी घेण्यात आली. पुनर्वसन प्लॉटचा ताबा मिळण्याबाबत, पावसाळी नाला बांधकाम नकाशात न दर्शविल्यामुळे व साईड मार्जिनमध्ये येत असल्यामुळे बांधकाम परवानगीस स्थगिती देण्याबाबत, ट्रक चोरी प्रकरणी कार्यवाही होण्याबाबत आदी तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली.

कर्ज काढून ठेकेदारांवर उधळपट्टी सुरु असल्याने राज्यावर आठ लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर,महायुतीने जनतेला फसवल्याचे अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले: नाना पटोले

  • सराकरने शेतकरी, लाडक्या बहिणी, बेरोजगारांना फसवले

मुंबई ; महायुती सरकारने आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातल्या सर्वसामान्य जनतेसाठी कोणताही दिलासा नाही. महायुतीने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन अर्थसंकल्पातून पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यामुळे महायुतीने जनतेला फसवल्याचे स्पष्ट झाले आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली आहे.

अर्थसंकल्पावर बोलताना पटोले म्हणाले की, महायुतीने राज्याची अधोगती केल्याचे आर्थिक पाहणी अहवालातूनच समोर आले होते. आज अर्थसंकल्पातून सरकारने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. राज्यावर कर्जाचा डोंगर असून उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्याने आर्थिक गणित बिघडले आहे. महसूली तूट आणि राजकोषीय तूट वाढली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणा पूर्ण होणार की नाही या बाबत साशंकताच आहे. प्रसिद्धीसाठी फक्त घोषणा केल्या जात आहेत. केंद्रातल्या मोदी सरकारप्रमाणे २०४५ मध्ये महाराष्ट्र विकसित होईल, २०३० पर्यंत सर्वांना घर मिळेल अशा पोकळ घोषणा करण्यात आल्या आहेत. पण विधानसभा निवडणुकीत दिलेले आश्वासनांपैकी एकही आश्वासन या सरकारने पूर्ण केले नाही.

लाडक्या बहिणींना २१०० रु., शेतक-यांची कर्जमाफी या घोषणा होतील अशी जनतेची अपेक्षा होती. ही आश्वासने देऊन महायुतीने जनतेची मते मिळवली होती. पण आज त्यांची फसवणूकच सरकारने केली. महागाई, बेरोजगारी या अत्यंत महत्वाच्या विषयांवर अर्थसंकल्पात काही निती, ठोस कृती कार्यक्रम नाही. त्यामुळे सरकार या प्रश्नांवर गंभीर आहे असे दिसत नाही. मुंबई, ठाणे आणि पुणे याच्यापलिकडच्या महाराष्ट्रासाठी मराठवाडा विदर्भातल्या ग्रामीण भागासाठी या अर्थसंकल्पात काहीच नाही. राज्याच्या भविष्यासाठी जनतेच्या हितासाठी काही ठोस घोषणा कोणताही रोडमॅप नसलेला हा दिशाहीन अर्थसंकल्प आहे असे पटोले म्हणाले.