Home Blog Page 385

देशभरात फटाक्यांवर बंदी घाला;फक्त दिल्लीसाठी धोरण बनवू शकत नाही-सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले

0

नवी दिल्ली-गुरुवारी, सर्वोच्च न्यायालयात दिल्लीत फटाक्यांवर बंदी घालण्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी झाली. सरन्यायाधीश बीआर गवई म्हणाले की, जर दिल्ली-एनसीआरमधील शहरांना स्वच्छ हवा मिळवण्याचा अधिकार आहे, तर इतर शहरांतील लोकांना तो अधिकार का नाही?प्रदूषण नियंत्रणाबाबत सरन्यायाधीशांनी सांगितले की, जर फटाक्यांवर बंदी घालायची असेल तर देशभरात त्यावर बंदी घालावी. स्वच्छ हवेचा अधिकार फक्त दिल्ली-एनसीआरपुरता मर्यादित असू शकत नाही, तर संपूर्ण देशातील नागरिकांना तो मिळाला पाहिजे.

ते म्हणाले की, पर्यावरणविषयक कोणतेही धोरण असले तरी ते संपूर्ण भारतात लागू केले पाहिजे. देशातील उच्चभ्रू वर्ग येथे आहे म्हणून आपण दिल्लीसाठी धोरण बनवू शकत नाही.खरं तर, सर्वोच्च न्यायालयाच्या ३ एप्रिल २०२५ च्या आदेशाला आव्हान देण्यात आले आहे, ज्यामध्ये दिल्ली-एनसीआरमध्ये फटाक्यांची विक्री, साठवणूक, वाहतूक आणि उत्पादनावर पूर्ण बंदी घालण्याच्या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

वरिष्ठ वकील म्हणाले- प्रदूषण झाल्यावर श्रीमंत लोक दिल्ली सोडून जातात

सुनावणीदरम्यान, अॅमिकस वरिष्ठ वकील अपराजिता सिंह म्हणाल्या की, उच्चभ्रू वर्ग स्वतःची काळजी घेतो. प्रदूषण झाल्यावर ते दिल्लीबाहेर जातात.दिल्ली-एनसीआरमध्ये फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्याच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशन (सीएक्यूएम) ला नोटीस बजावली आणि दोन आठवड्यांच्या आत उत्तर दाखल करण्यास सांगितले.

यापूर्वी, एप्रिलमध्ये दिल्ली-एनसीआरमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्याच्या प्रकरणाची सुनावणी करताना, सर्वोच्च न्यायालयाने ते अत्यंत आवश्यक असल्याचे म्हटले होते. न्यायालयाने म्हटले होते की ही बंदी काही महिन्यांपुरती मर्यादित ठेवल्याने कोणताही उद्देश साध्य होणार नाही. बंदी लागू झाल्यावर लोक वर्षभर फटाके गोळा करतील आणि त्यांची विक्री करतील.

GRAP-1 १४ ऑक्टोबर रोजी दिल्लीत लागू करण्यात आला

दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक २०० च्या वर गेल्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी दिल्ली एनसीआरमध्ये GRAP-1 लागू करण्यात आला. या अंतर्गत हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये कोळसा आणि लाकडाचा वापर करण्यास बंदी आहे. एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशनने एजन्सींना जुन्या पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या (BS-III पेट्रोल आणि BS-IV डिझेल) ऑपरेशनवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत.रस्ते बांधकाम, नूतनीकरण प्रकल्प आणि देखभालीच्या कामांमध्ये अँटी-स्मॉग गन, पाणी शिंपडणे आणि धूळ प्रतिबंधक तंत्रांचा वापर वाढविण्यास आयोगाने एजन्सींना सांगितले आहे.

पंजाबमध्ये फक्त ग्रीन फटाके फोडण्याची परवानगी

पंजाब सरकारने सुमारे १५ दिवसांपूर्वी सांगितले होते की दिवाळी, गुरुपर्व, नाताळ आणि नवीन वर्षाच्या उत्सवात फक्त ग्रीन फटाके फोडण्याची परवानगी असेल. ग्रीन फटाके असे असतात ज्यात बेरियम मीठ किंवा अँटीमनी, लिथियम, पारा, आर्सेनिक, शिसे किंवा स्ट्रॉन्टियम क्रोमेटची संयुगे नसतात.

एलफिस्टन ब्रिज भागातील बाधित दोन इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये,35% अतिरिक्त क्षेत्रफळ प्रमाणे नवे घर..

0

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रस्तावास मान्यता; बाधित दोन इमारतीतील ८३ प्रकल्पग्रस्तांना दिलासा

मुंबई,दि.११ : येथील शिवडी-वरळी उन्नत मार्गामधील एलफिस्टन ब्रिज परिसरातील बाधित दोन इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन त्याच परिसरातील म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये करण्याचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केला आहे.

लक्ष्मी निवास व हाजी नुरानी चाळ या बाधीत इमारतींमधील एकूण ८३ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आता त्याच परिसरात होणार आहे. उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी हा प्रस्ताव मान्य केल्यामुळे बाधीत इमारतींमधील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.

वरळी-शिवडी कनेक्टर उभारणीसाठी एलफिस्टन ब्रिज पाडण्यात येणार असून पिलर उभारणी करताना लक्ष्मी निवास आणि हाजी नुरानी चाळ या दोन इमारती बाधीत होणार आहे. या दोन इमारतींमधील रहिवाशी प्रकल्पग्रस्तांची त्याच परिसरात म्हाडाकडे उपलब्ध असलेल्या सदनिकांमध्ये पुनर्वसनाची मागणी होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हाडामधील आजूबाजूच्या परिसरातील सदनिकांमध्ये पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे. लक्ष्मी निवास इमारतीमधील ६० प्रकल्पग्रस्त आणि हाजी नुरानी चाळमधील २३ प्रकल्पग्रस्त अशा एकूण ८३ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आता त्याच परिसरात होणार आहे.

यापूर्वी या प्रकल्पासाठी एकूण १९ इमारती बाधित होणार होत्या पण MMRDAने रचनात्मक बदल करून १७ इमारती प्रकल्पाच्या मार्गामुळे बाधित होणार नाही याची काळजी घेतली आणि मार्ग बदलला , ज्यामुळे केवळ रहिवाशांचे पुनर्वसन सुलभ झाले नाही तर सुमारे पुनर्वसनावर होणारा ५२०० कोटी रुपयांचा खर्च वाचवला. तसेच, या निर्णयामुळे प्रकल्पाची गती वाढून तो निर्धारित वेळेत पूर्ण होऊ शकेल.

पुनर्वसनाचे निकष : 300 चौ.फु. पेक्षा कमी क्षेत्र असलेल्या घरमालकांना – 300 चौ.फु. + 35% अतिरिक्त क्षेत्र = एकूण 405 चौ.फु. क्षेत्राची सदनिका देण्यात येणार.

300 ते 1292 चौ.फु. क्षेत्रामधील घरमालकांना – विद्यमान क्षेत्र + 35% अतिरिक्त क्षेत्रफळ प्रमाणे नवे घर दिले जाणार.

34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर:विषय समित्यांच्या सभापतींचेही आरक्षण जाहीर…कोणत्या जिल्ह्याची जागा कुणाला याची पहा यादी

0

मुंबई – राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचे आरक्षण आज जाहीर झाले. त्यात ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असणार असून, छत्रपती संभाजीनगरची जागा सर्वसाधारण गटासाठी सुटली आहे. सरकारने जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासह उपाध्यक्ष, सभापतींचे आरक्षणही जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार उडण्याची शक्यता निर्माणि झाली आहे.

गत दोन ते अडीच वर्षांपासून राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका रखडल्या होत्या. त्यामुळे या निवडणुका केव्हा होणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. पण आता राज्य सरकारने शुक्रवारी एका परिपत्रकाद्वारे राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर केले. त्यामुळे या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे आरक्षण काढताना 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ग्राह्य धरण्यात आली आहे. विशेषतः अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे आरक्षण काढताना संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने प्रवर्गनिहाय आरक्षण काढण्यात आले.

सरकारच्या परिपत्रकानुसार, ठाण्याचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे. तर साताऱ्याची जागा मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षित असणार आहे. पालघरची जागा एसटीसाठी, पुणे व रायगडचे अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी, तर अहिल्यानगर जिल्हा परिषदेची जागा अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव असणार आहे.

कोणत्या जिल्ह्याची जागा कुणाला याची यादी

ठाणेसर्वसाधारण (महिला)
पालघरअनुसूचित जमाती
रायगडसर्वसाधारण
रत्नागिरीनागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सिंधुदुर्गसर्वसाधारण
नाशिकसर्वसाधारण
धुळेनागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
नंदूरबारअनुसूचित जमाती
जळगावसर्वसाधारण
अहिल्यानगरअनुसूचित जमाती (महिला)
पुणेसर्वसाधारण
सातारानागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सांगलीसर्वसाधारण (महिला)
सोलापूरनागरिकांचा मागास प्रवर्ग
कोल्हापूरसर्वसाधारण (महिला)
छत्रपती संभाजीनगरसर्वसाधारण
जालनानागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
बीडअनुसूचित जाती (महिला)
हिंगोलीअनुसूचित जाती
नांदेडनागरिकांचा मागास प्रवर्ग
धाराशिवनागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
लातूरसर्वसाधारण (महिला)
अमरावतीसर्वसाधारण (महिला)
अकोलाअनुसूचित जमाती (महिला)
परभणीअनुसूचित जाती
वाशिमअनुसूचित जमाती (महिला)
बुलढाणासर्वसाधारण
यवतमाळसर्वसाधारण
नागपूरनागरिकांचा मागास प्रवर्ग
वर्धाअनुसूचित जाती
भंडारानागरिकांचा मागास प्रवर्ग
गोंदियासर्वसाधारण (महिला)
चंद्रपूरअनुसूचित जाती (महिला)
गडचिरोलीसर्वसाधारण (महिला)

हाफकीन संस्थेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

पिंपरी-चिंचवड येथे हाफकीन संस्थेच्या कामकाजाचा घेतला आढावा

पुणे, दि. १२ : हाफकीन संस्था ही जागतिक पातळीवर नावाजलेली संस्था असून येथे विविध लसींचे दर्जेदार उत्पादन करण्यात येते. या लसींना जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे संस्थेच्या बळकटीकरणासाठी १५० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. संस्थेच्या अडचणी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून सकारात्मक मार्ग काढला जाईल, असे आश्वासन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले.

पिंपरी-चिंचवड येथील हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळ प्रकल्पास भेट देऊन तेथे आयोजित आढावा बैठकीत मंत्री झिरवाळ बोलत होते. या वेळी हाफकीनचे व्यवस्थापकीय संचालक सुनील महिंद्रकर, महाव्यवस्थापक डॉ. प्रदीप धिवर, व्यवस्थापक नवनाथ गर्जे, पिंपरी-चिंचवड संस्थेचे व्यवस्थापक डॉ. बाबासाहेब कुहे, अन्न व औषध प्रशासनचे सहआयुक्त गिरीश हुकरे, सहायक आयुक्त कोंडीबा गाडेवार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर योगेश बहल आदी मान्यवर उपस्थित होते.

मंत्री झिरवाळ यांनी प्रतिविष उत्पादन, गुणवत्ता आश्वासन, उत्पादन, पशुवैद्यकीय विभाग, कर्मचारी निवासस्थान, तबेला, सर्पालय यांना भेट देत संशोधन, औषध उत्पादन क्षमता, औषधांची मागणी, पुरवठा, गुणवत्ता, साठवणूक आणि चाचणी प्रक्रियेची माहिती घेतली.

या प्रसंगी महिंद्रकर यांनी मुंबई केंद्राविषयी तर डॉ. कुहे यांनी पिंपरी-चिंचवड संस्थेच्या जागा, मनुष्यबळ, कर्मचारी निवासस्थान, उपलब्ध साधनसामुग्री आणि आर्थिक स्थितीची माहिती दिली. तसेच संस्थेच्यावतीने उत्पादित सर्पदंश, विंचूदंश, घटसर्प, श्वानदंश, गॅस गँगरीन प्रतिविष, प्रतिधनुर्वात, पोलिओ लस उत्पादन, साठवणूक क्षमता आणि त्यातून जमा होणाऱ्या महसुलीबाबत पीपीटीद्वारे सविस्तर माहिती सादर करण्यात आली.

पुण्यात शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या एकतेचा आवाज

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व गृहराज्यमंत्री योगेश कदम तसेच रिपब्लिकन सेनेचे विवेक बनसोडे यांचे विशेष मार्गदर्शन

शिवसेना-रिपब्लिकन सेना कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात संपन्न

पुणे :
शिवसेना रिपब्लिकन सेना पुणे शहर व जिल्हा कार्यकर्ता संवाद मेळावा अंबर हॉल, कोथरूड येथे उत्साहात पार पडला. या मेळाव्याला विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्यासह माजी आमदार रवींद्र धंगेकर, नाना भानगिरे प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे, युवराज बनसोडे आणि विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. जिल्ह्यातील आणि शहरातील युवासेना, महिला आघाडी तसेच सर्व अंगीकृत संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मेळाव्याच्या प्रारंभी स्वागतपरिचयानंतर संघटनेचे वर्तमान व भविष्यासंदर्भात सखोल चर्चा झाली. यानंतर मान्यवरांचे मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांचे मनोगत व्यक्त झाले. कार्यक्रमाचा समारोप उत्साहाच्या वातावरणात झाला.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देताना सांगितले की, प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये लोकप्रतिनिधी होण्याची क्षमता आहे. “नगरसेवक, आमदार, खासदार होण्याची ताकद आपल्यात आहे आणि या प्रवासामध्ये कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा असलेला पक्ष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आहे,” असे त्या म्हणाल्या. तसेच खासदार आनंदराव अडसूळ यांना अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्षपद मिळाल्याचा दाखला देत, सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याचे काम शिंदे गट सातत्याने करत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भवन दादर येथे पाडण्याचा प्रयत्न झाला होता. तेव्हा विधानसभा व विधानपरिषदेत आम्ही ठामपणे लढा दिला. बाबासाहेबांच्या विचारांच्या पाठीशी शिवसेना कायम उभी राहील,” असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

डॉ. गोऱ्हे यांनी शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या एकतेच्या संकल्पनेवर भाष्य करताना सांगितले की, हिंदुह्रदयसन्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलेली ही संकल्पना आज वास्तवात उतरली आहे. “राजकारणात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वासार्हता” असेही त्या म्हणाल्या. यावेळी कार्यकर्त्यांच्या विविध प्रश्नांवर तातडीने ॲक्शन घेण्याची हमी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.कोकणाचे व जमा.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाते होते तसेच ते कायम द्ृढ रहावे अशी ईच्छा व्यक्त केली.

या मेळाव्याच्या निमित्ताने पुण्यात शिवसैनिक आणि भीमसैनिकांच्या एकतेचा उत्साह पाहायला मिळाला. शिवशक्ती आणि भीमशक्ती या दोन्हींच्या सहकार्याने सामाजिक न्याय आणि सामान्य कार्यकर्त्यांना संधी या विचारांना अधिक बळ मिळत असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

या वेळी विवेक बनसोडे अध्यक्ष विद्यार्थी सेना, युवराज बनसोडे कामगारसेना अध्यक्ष, हनुमंत पपुल अध्यक्ष पुणे, अजय भालशंकर युवक आघाडी, संजय देखणे उपाध्यक्ष, सुनील वाकेकर प्रवक्ते, आशिष गाडे सरचिटणीस, निलेश गायकवाड जिल्हा अध्यक्ष, विशाल म्हस्के जिल्हा अध्यक्ष, डॉ अझीम शेख महाराष्ट्र सचिव अल्पसंख्यांक, उद्धव कांबळे विभागप्रमुख पर्वती यांच्यासह शिवसेनेचे नाना भानगिरे, माजी आमदार रवींद्र धंगेकर , सुदर्शना त्रिगुणाईत, किरण साळी, राजेश पळसकर , संदीप शिंदे आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

ड्रोन शो द्वारे पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छांनी उजळवणार पुण्याचे आकाश-केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतील उपक्रम

  • अयोध्या आणि वाराणसीनंतर महाराष्ट्रात प्रथमच आयोजन
  • ३-४ किलोमीटरहूनही दिसणार ड्रोन शो !

पंतप्रधान मोदींना पुणेकरांकडून मिळणार अनोख्या शुभेच्छापुण्यातील ७५ हजार विद्यार्थी देणार पंतप्रधान मोदींना शुभेच्छा!
पंतप्रधान मोदी यांचा अमृतमहोत्सव विविध उपक्रमांद्वारे साजरा होत असताना पुण्यातील ७५ हजार विद्यार्थी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टकार्डद्वारे शुभेच्छा देणार आहेत. यात पुणे शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी दिलेले शुभेच्छा संदेश एकत्र करुन थेट पंतप्रधान मोदी यांना पाठविण्यात येणार आहेत, अशीही माहिती केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी यावेळी दिली.

पुणे- देशाचे यशस्वी पंतप्रधान आणि वैश्विक नेतृत्व नरेंद्र मोदी यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस १७ सप्टेंबरला देशभरात सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला दि. १६ रोजी पुण्यात आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा ड्रोन शोसह दिव्यांग सहाय्यता शिबीर आणि संगीत रजनीचे आयोजन स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर केले आहे. ‘ज्योतीने तेजाची आरती’ या ड्रोन शोव्दारे पुणेकरांच्या वतीने पंतप्रधान मोदींना अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. अयोध्या आणि वाराणसीनंतर महाराष्ट्रात हा ड्रोन शो प्रथमच होणार असून यातून विकसित भारताच्या संकल्पाचे दर्शन पुणेकरांना घडणार आहे.

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या वतीनं या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून थ्रीडी स्वरूपात असलेला हा ड्रोन शो ४५ मिनिटे असेल. त्यात मोदी सरकारच्या कामगिरीसह पुण्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मानबिंदूंचे दर्शनही पुणेकरांना घडेल. तसेच पंतप्रधान मोदींनी केलेल्या विकसित भारताचा संकल्पही याद्वारेल पुणेकरांना अनुभवता येईल. हजारो ड्रोन्स जेव्हा अवकाशात झेपावतील, तेव्हा पुण्याच्या ३-४ किलोमीटर परिसरापर्यंतच्या भागातील नागरिकांना हा शो अवकाशात पाहता येणार आहे. मोदीजींच्या वाढदिवसाच्या पूर्व संध्येला हजारो ड्रोन पुण्याच्या अवकाशात झेपावतील आणि त्यांच्या विविध फॉर्मेशन्समधून विकसित भारताच्या दिशेने झालेल्या प्रवासाचे नयनरम्य दर्शन पुणेकरांना घडेल.

केंद्रीय मंत्री मोहोळ पुढे म्हणाले, ‘या निमित्ताने मंगळवार दि. १६ सप्टेंबर या दिवशी स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत दिव्यांगांसाठी सहाय्यता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यात १२०० हून अधिक दिव्यांगांना १७५० आवश्यक साहित्यांचे मोफत वितरण या शिबिरात करण्यात येणार आहे. शिबिरानंतर याच ठिकाणी सायंकाळी ५ ते १० ख्यातनाम संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते यांची लाईव्ह कॉन्सर्ट होईल. दरम्यान रात्री ८ वाजता ‘ज्योतीने तेजाची आरती’ हा ऐतिहासिक ड्रोन शो होणार आहे. या सर्व कार्यक्रमात आपण सहभागी होत या सर्व क्षणांचे साक्षीदार होऊन आपल्या लाडक्या पंतप्रधानांना शुभेच्छा देऊ या’.

‘२६ मे २०१४ या दिवशी संसदेच्या पायरीवर नतमस्तक झालेल्या मोदींचे दृष्य आजही भारतीयांच्या मनावर कोरलेले आहे. त्यांनी गेल्या अकरा वर्षात १४० कोटी देशवासीयांना ‘राष्ट्रहित सर्वतोपरी’ हा मंत्र देत देशात आणि देशाबाहेर ताठमानेने उभे रहाण्याचे बळ दिले. ‘मै देश को झुकने नहिं दुंगा’ हा वज्रनिर्धार करत विकसित भारताचा संकल्प करुन देशवासीयांसाठी ते प्रेरणास्रोत झाले आहेत. सर्वसामान्य देशवासीयांचे जीवनमान उंचाविण्यापासून ते मंगळापर्यंत झेप घेणारे नवे अवकाश धोरण राबविणारे, करोनाची लस मोफत देऊन आफ्रिकेसह १४० लहान, गरीब देशांतील नागरीकांच्या जीवनाचे रक्षण करण्यापासून ते पाकिस्तानच्या घरात घुसून त्यांची नांगी ठेचणे, हे मोदींचे कर्तृत्व आहे. भारतवर्षाचा उर्जा स्त्रोत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून हजारो ड्रोन्सच्या माध्यमातून मोदींना पुणेकरांच्या वतीने शुभेच्छा देणारा, डोळ्यांचे पारणे फेडणारा अनोखा कार्यक्रम सादर होतो आहे. या दिवशी आपण सर्व पुणेकर त्यांना शुभेच्छा देऊ या’ असेही मोहोळ म्हणाले.

स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे तरुण वैभवशाली भारत घडवतील-अविनाश धर्माधिकारी

पुणे :  स्वामी विवेकानंद यांनी तत्वनिष्ठ आणि विवेकनिष्ठ विचार देऊन केवळ भारताच्याच नव्हे तर जगाच्या वाटचालीला एक वेगळी दिशा दिली. त्यांचे विचार आत्मसात करून त्याप्रमाणे आपण आपल्या स्वतःच्या आयुष्यात काही घडवू शकतो का?  असा विचार करणारा तरुण निर्माण झाला पाहिजे. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे तरुणच उद्याचा वैभवशाली भारत घडवू शकतील, असा विश्वास माजी सनदी अधिकारी आणि चाणक्य मंडळ संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मएसो सिनियर कॉलेज तर्फे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित  व्याख्यानमालेमध्ये विश्वबंधुत्व दिनानिमित्त अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रवींद्र वैद्य, उपप्राचार्या डॉ पूनम रावत, नागेश पाटील, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा रवींद्र गोरे यावेळी उपस्थित होते.

अविनाश धर्माधिकारी म्हणाले, आपण तत्वनिष्ठ आणि विवेकनिष्ठ तसेच विज्ञाननिष्ठ तरुण पिढी कसे घडवू शकतो यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. या विचारांवर तयार होणारी पिढी खऱ्या अर्थाने उद्याचा बलशाली भारत घडवणार आहे. आजच्या तरुणांनी  कोणत्यातरी एका विषयाचा ध्यास घेतला पाहिजे आणि त्यामध्ये स्वतःला झोकून देऊन स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे. व्यसनांची प्रतिष्ठा वाढत असणाऱ्या आजच्या समाजामध्ये कार्याला आणि प्रामाणिकपणाला महत्त्व आले तर खऱ्या अर्थाने तरुण पिढी चांगल्या मार्गाला लागू शकेल असा विश्वासही अविनाश धर्माधिकारी यांनी यावेळी व्यक्त केला.

आता प्रत्येक ग्रामपंचायतीत आपले सरकार सेवा केंद्र उपलब्ध ; जिल्ह्यात 1062 केंद्र सुरु

पुणे दि.११ सप्टेंबर
ग्रामविकास विभागाने अधिसूचित केलेल्या सेवांचा विस्तार करत राज्य शासनाच्या विविध विभागांच्या एकूण 1062 सेवा आता थेट प्रत्येक ग्रामपंचायतीत कार्यरत होणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. यासाठी ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय दि. 28 जानेवारी 2025 रोजी जाहीर करण्यात आला असून, ग्रामपंचायत पातळीवरील आपले सरकार सेवा केंद्र हे अधिकृतरीत्या स्वीकृत करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील 1087 ग्रामपंचायतींसाठी युजर आयडी व पासवर्ड मिळविण्यासाठी जिल्हा परिषदे मार्फत महाआयटीला माहिती देण्यात आली होती. जिल्हा परिषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांच्या प्रयत्नातून आतापर्यंत 1014 ग्रामपंचायतींना युजर आयडी व पासवर्ड प्राप्त झाले आहेत. सदर आयडी व पासवर्ड मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. सुहास मापारी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत अधिकारी व केंद्रचालक यांची कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेमध्ये सेवा केंद्र सुरू करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले असून तालुका पातळीवर हँड्स-ऑन ट्रेनिंगचे आयोजन करण्यात येणार आहे. लवकरच ग्रामपंचायत पातळीवर सेवा केंद्र सुरू झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना विविध सेवांचा दिलासा एका ठिकाणी मिळणार असून ग्रामपंचायतींच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे.

महाराष्ट्र विधानमंडळ लोकलेखा समितीची येरवडा मध्यवर्ती कारागृहास भेट

पुणे, दि. ११: महाराष्ट्र विधानमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासह समिती सदस्यांनी येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या विविध विभागास भेटी देऊन कामकाजाची माहिती घेतली. यावेळी बंदीसोबत संवाद साधून कारागृहाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत माहिती घेतली.

याप्रसंगी समिती सदस्य आमदार ॲड. अनिल परब, कृपाल तुमाने, संजय खोडके, सत्यजीत तांबे, समीर कुणावार, अनिल पाटील, सुहास बाबर, रोहित पवार, विधान मंडळाचे सहसचिव नागनाथ थिटे, उपसचिव उमेश शिंदे उपस्थित होते.

मोहनदास करमचंद गांधी यार्ड, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यार्ड, किशोर यार्ड, दूरदृष्य प्रणाली कक्ष (व्हीसी रुम), मुलाखत कक्ष, ई-मुलाखत कक्ष, कारखाना विभाग, नवीन बॅरेक, अतिसुरक्षा विभाग, स्वयंपाकगृह आदी विभागांना भेटी देऊन समितीने तेथील कामकाजाची माहिती घेतली.

यावेळी अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा सुहास वारके, विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई, कारागृह अधीक्षक सुनील ढमाळ उपस्थित होते.

ज्यांच्यावर आरोप केले ते तुमच्या अंगाखांद्यावर खेळत आहेत

पुणे-बिनशर्ट, बिनशर्ट म्हणता म्हणता त्यालाच बिनशर्त तीनदा भेटले, अशा शब्दांत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी राज ठाकरे यांची वारंवार भेट घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे केवळ आणि केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी आपल्या मशालीला इंजिनाचे वंगण फासत असल्याची टीकाही त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधताना केली आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पलटवार केला आहे.

सुषमा अंधारे यांनी ट्विट करत केशव उपाध्ये यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, केशवजी बात निकलेगी तो दूर तक जाएगी. मुलुंडच्या एचडी व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट यांनी ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केले ते सगळे आता तुमच्या अंगाखांद्यावर खेळत आहेत, असे म्हणत अंधारे यांनी निशाणा साधला आहे.

पुढे सुषमा अंधारे म्हणाल्या, ज्या नितेश राणे यांनी फडणवीसांची हाफ चड्डीवाले म्हणून संभावना केली ते आता चाहते आहेत. फडणवीसांची नवाब मलिक, भुजबळ साहेब आणि अजितदादा यांच्याबद्दलची विधान तुमच्या चांगलीच लक्षात असतील की व्हिडिओ स्वरूपात लावावीत? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला. तसेच वेगळा विदर्भ झाल्याशिवाय ते लग्नही करणार नव्हते हे सुद्धा आठवतच असेल तुम्हाला? मनसे उनसे हे सांगणारे सुद्धा फडणवीसच न? असा खोचक सवालही अंधारे यांनी उपस्थित केला.

फडणवीसांच्या एका मुख्यमंत्री पदाच्या महत्वकांक्षेपायी काँग्रेसमुक्त म्हणता म्हणता भाजपा काँग्रेसयुक्त झाली. तुमच्यासारख्या निष्ठावान लोकांची फडणवीसांनी माती केली. यावर चिंतन करणे हे तुमच्या अधिक फायद्याचे राहील, असा सल्लाही सुषमा अंधारे यांनी केशव उपाध्ये यांना दिला आहे.

केशव उपाध्ये काय म्हणाले होते?बिनशर्ट, बिनशर्ट म्हणता म्हणता त्यालाच बिनशर्त तीनदा भेटले. केवळ आणि केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी आता मशालीला इंजिनाचे वंगण फासले, असे ट्विट करत केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची घेतलेल्या भेटीवर टीका केली आहे. तसेच, चरणस्पर्श कधी शिवतीर्थाचा तर जनपथावरि कधी लोटांगण, विचारांचे लोणी गेले, पालिकेची मलई गेली नाचता येईना वाकडे अंगण, असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टोलाही लगावला होता.

दिवेघाटातील रस्ता रुंदीकरणामुळे शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 वाहतूक बंद

वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

पुणे दि. 11 : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गांतर्गत हडपसर ते दिवेघाट या पॅकेज 6 मध्ये रस्ता रुंदीकरणाचे काम भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत सुरू आहे. या कामासाठी खडकात ब्लास्टिंग करण्याची आवश्यकता असल्याने पोलिस प्रशासनाच्या देखरेखीखाली ब्लास्टिंगचे काम करण्यात येत आहे.

शुक्रवारी 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत दिवेघाटातील वाहतूक बंद राहणार असून, दोन्ही बाजूंनी प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाहनचालकांसाठी कात्रज-बोपदेव घाट (राज्य मार्ग क्र. 131) मार्गे सासवड, खेडशिवापूर-सासवड लिंक रोड मार्गे सासवड, कापूरहोळ-नारायणपूर (राज्य मार्ग क्र. 119) मार्गे सासवड तसेच हडपसर-उरळी कांचन-शिंदवणे घाट मार्गे (राज्य मार्ग क्र. 61) सासवड या पर्यायी मार्गांचा वापर करता येणार आहे.

वाहनधारकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने या पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पकाई पुणेचे प्रकल्प संचालक एस. एस. कदम यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
या पुढेही ज्या दिवशी असे ब्लास्टिंगचे काम असेल त्या दिवशी रस्ता बंद होईल. त्यावेळीही वाहनधारकांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेत शिक्षक दिन उत्साहात साजरा….

पुणे-अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या वतीने शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरवात  प्रमुख पाहुणे प्रख्यात व्याख्याते गणेश शिंदे, कार्यक्रमाचे  अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते   उदय जगताप, संस्थेच्या सरचिटणीस .प्रमिलाताई गायकवाड, संयुक्त चिटणीस वासंती बोर्डे,अजय पाटील,  खजिनदार धैर्यशील वंडेकर,के. टी. सोनावणे,  नियामक मंडळाच्या अध्यक्ष कमलताई व्यवहारे  यांचे हस्ते  माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या प्रसंगी संस्थेच्या विविध शाखांमधील  शिक्षकांचा अध्यापनात विशेष नैपुण्य मिळविल्याबद्दल व  ग्रंथपाल, क्रीडा संचालक, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी, कार्यालय अधिक्षक  यांचा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते  विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी गणेश शिंदे यांनी राजर्षी शाहू महाराजांचा वारसा अविरतपणे चालविणाऱ्या, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणून गोरगरीब, ग्रामीण भागातील  मुलांच्या राहण्याची, जेवणाची सोय करून शिक्षणाची द्वारे  खुली  करणाऱ्या स्व. उत्तमराव पाटील  यांच्या कार्याचे स्मरण  केले. आजच्या बदलत्या शिक्षण पद्धतीवर बोलत असताना समाजाचा खरा शिल्पकार म्हणून शिक्षकांची भूमिका खूपच महत्त्वाची असल्याने  शिक्षकांनी काळाबरोबर नव तंत्रज्ञान अवगत करून स्वतः अपडेट हवे. समाजातील वाईट विचार दूर करून विद्यार्थ्यांच्या मनात चांगले विचार रुजविण्याचे काम शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी एकरूप होऊन केले पाहिजे. आजची बेरोजगारी पहाता विद्यार्थ्यांना उद्योजक होण्याचे बळ देऊन कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे या साठी विद्यार्थ्याला जीवन जगण्याची कौशल्य देणारे विद्यापीठ म्हणजे शिक्षक  होय. समाजाचा उद्धार करण्यासाठी तत्त्वज्ञानाने   परीपूर्ण , तांत्रिक कुशल विद्यार्थी घडविण्यासाठी  शिक्षकांनी अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन ज्ञानदान करावे. तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्याच्या प्रतिभेवर परिणाम होणार नाही यासाठी नेहमी प्रयत्नशील असले पाहिजे अशी अपेक्षा या प्रसंगी व्यक्त केली.   उदय जगताप यांनी  स्वतःच्या खडतर शैक्षणिक प्रवासाचे उदाहरण देऊन शिक्षण व्यवस्थेतील बदल, आईवडिलांचा आदर, जीवनातील संस्काराचे महत्व सांगून समाजातील वास्तवाची जाणीव  या प्रसंगी करून दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  संस्थेच्या सरचिटणीस प्रमिलाताई गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन संयुक्त चिटणीसअजय पाटील  यांनी केले. सत्कारार्थीच्या वतीने डॉ.  प्रवीण जाधव  यांनी  मनोगत व्यक्त केले.

भारती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी रशियामध्ये केले लोककलांचे बहारदार सादरीकरण

स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् चे रशियातील आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सादरीकरण
पुणे : भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् ने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा लोककलेचा सांस्कृतिक ठसा उमटवला आहे. रशियातील व्लादिमिर येथे झालेल्या गोल्डन रिंग इंटरनॅशनल फोल्कलोर फेस्टिव्हल मध्ये  विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र व आसाम येथील लोकनृत्य प्रकार  लावणी, गोंधळ, बिहू व भोरताल सादर केले.

भारतीय विश्वविद्यालय संघ, नवी दिल्ली व रशियाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या निमंत्रणावरून या महोत्सवात सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी दाद दिली. या आंतरराष्ट्रीय महोत्सवात भारतासह तब्बल १० देशांतील संघांनी सहभाग नोंदवला. भारती विद्यापीठाचे स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् मधील १० विद्यार्थी व संचालक  प्राध्यापक प्रा. शारंगधर साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झाले होते.

विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, प्र-कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम व कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांनी अभिनंदन केले.

प्रा. शारंगधर साठे म्हणाले, भारतीय लोककलेच्या परंपरेकडे जगभरात आदराने पाहिले जाते. आंतरराष्ट्रीय महोत्सवात भारताचे प्रतिनिधित्व विद्यार्थ्यांनी केले. विद्यार्थ्यांनी मेहनत, सराव आणि जिद्दीने उत्कृष्ट सादरीकरण करून भारताची मान उंचावली आहे. जागतिक मंचावर आपल्या लोकनृत्यांना इतका मोठा प्रतिसाद मिळणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.

वीज क्षेत्रातील कामगिरीत महावितरणचा प्रथम क्रमांक,केंद्र सरकारच्या मानांकनात यश, १०० पैकी ९३ गुण

0

मुंबईदि. ११ सप्टेंबर २०२५: केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने निश्चित केलेल्या मानांकनामध्ये शंभरपैकी ९३ गुण मिळवून महावितरणने प्रथम क्रमांक मिळविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महावितरणने केलेल्या कामगिरीमुळे कंपनीला यश मिळाले आहे. या यशाबद्दल आपण मा. मुख्यमंत्र्याचे आभार मानतो तसेच महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो, असे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले.

महावितरणच्या कामगिरीत ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर व अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले, असे ते म्हणाले.

ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने आरईसी व पॉवर फाऊंडेशन ऑफ इंडिया यांनी वीज कंपन्यांचे मानांकन निश्चित केले. पश्चिम भारतातील राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण १०० पैकी ९३ गुणांसह महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे व राज्याला ए मानांकन मिळाले आहे. महाराष्ट्राच्या पाठोपाठ मध्य प्रदेश (८४.५ गुण), गोवा (७४ गुण), दादरा, नगर हवेली आणि दीव दमण (७४ गुण), गुजरात (६७ गुण) व छत्तीसगड (५२ गुण) यांचा क्रमांक लागतो.

मानांकन निश्चित करण्यासाठी पाच निकष ठरविण्यात आले होते. त्यापैकी संसाधन पर्याप्तता (३२ पैकी ३२ गुण), ऊर्जा परिवर्तन (१५ पैकी १५ गुण) व नियामकाच्या अनुषंगाने प्रशासन (५ पैकी ५) या तीन घटकात महावितरणला पैकीच्या पैकी गुण मिळाले. वीज कंपनीचे आर्थिक स्थैर्य या घटकात २५ पैकी २४ गुण मिळाले. जीवन सुलभता व व्यवसाय सुलभता या निकषात महावितरणला २३ पैकी १७ गुण मिळाले. या निकषात गुजरातला १४ तर मध्य प्रदेशला १६ गुण मिळाले.

वीज क्षेत्रातील कामगिरीबद्दल गुणांकनाची प्रक्रिया ३ मार्च रोजी सुरू झाली होती. देशातील मानांकनामध्ये ८५ पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या राज्यांचा ए गटात समावेश केला असून त्यामध्ये महाराष्ट्रासह एकूण ८ राज्ये आहेत.

महावितरणच्या यशाचे कारण

महावितरणने गेल्या तीन वर्षात ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी तसेच भविष्यकाळाचा वेध घेऊन वीज पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली. त्यामुळे मानांकन उंचावले आहे.

आगामी काळात राज्याची विजेची मागणी किती असेल याचा अभ्यास करून महावितरणने ऊर्जा विभागाच्या मदतीने आराखडा तयार केला. अशा प्रकारे ऊर्जा परिवर्तन आराखडा तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.

ऊर्जा परिवर्तन आराखड्यानुसार महावितरणने गेल्या अडीच वर्षात ४५,००० मेगावॅट वीज खरेदीसाठीचे करार केले व आगामी पाच वर्षांची तरतूद केली. या वीज खरेदी करारांमध्ये नवीकरणीय ऊर्जेवर भर दिल्यामुळे आगामी पाच वर्षात वीज खरेदीचे ६६ हजार कोटी रुपये वाचणार असून त्याच्या आधारे महावितरणच्या वीजदरात पाच वर्षांसाठी सर्वच ग्राहकांच्या वीजदरात कपात करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठीचा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० हा १६ हजार मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प महावितरणच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. राज्याच्या ऊर्जा परिवर्तनासाठी हा महत्त्वाचा गेम चेंजर प्रकल्प आहे. शेतांमध्ये सौर पंप बसविण्याच्या बाबतीत महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. वीज पुरवठ्याचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी महावितरणतर्फे आरडीएसएस योजनेच्या अंतर्गत पायाभूत सुविधांचे काम प्रभावीपणे चालू आहे. या सर्वांचा विशेषतः वीजदराच्या कपातीत मिळालेल्या यशाचा परिणाम म्हणून महावितरणला १०० पैकी ९३ गुण मिळाले असून प्रथम क्रमांक मिळाला आहे.

जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य झाल्यात:त्यांनी आता अल्टिमेटम न देता मागण्यांची अंमलबजावणी कशी होईल याचे प्रयत्न करावेत – मंत्री पाटील

सांगली -मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे व मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद एका नव्या उंचीवर पोहोचला आहे. त्यातच आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जरांगेंना सरकारला अल्टिमेटम न देता सरकारने मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी कशी होईल यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला आहे.चंद्रकांत पाटील गुरूवारी सांगलीत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. गाव पातळीवर समिती स्थापन झाली. गावात एखाद्या व्यक्तीकडे कुणबी दाखला असेल तर त्याचा भाऊबंद आहे, त्यालाही प्रतिज्ञापत्रावर सक्षम अधिकाऱ्याने पडताळणी करून दाखला द्यायचा आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्यामुळे, आता त्यांची अंमलबजावणी कशी होईल यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. सरकारने जरांगे यांच्या सर्वच मागण्या मान्य केल्यामुळे आता त्यांच्या आंदोलनाची धार कमी होईल असा दावाही मंत्री पाटील यांनी यावेळी बोलताना केला.

मनोज जरागे यांच्या आझाद मैदानावरील उपोषणानंतर महायुती सरकारने मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्यासाठी एक खास जीआर काढला. या जीआरवरून सध्या जरांगे व मंत्री छगन भुजबळ रोज आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भुजबळ यांनी या शासन निर्णयाला कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय दिल्यानंतर जरांगे यांनीही मंडल आयोगाच्या निर्णयाला आव्हान देत ओबीसी आरक्षणाच्या मुळावर घाव घालण्याची तयारी केली आहे. यामुळे महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण गढूळ झाले असताना आता राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे यांना आपल्या मागण्यांच्या अंमलबजावणीकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी छगन भुजबळांचीही मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे ओबीसींचे कोणतेही नुकसान होणार नसल्याची खात्री पटत असल्याचाही दावा केला. छगन भुजबळ गत अनेक वर्षांपासून ओबीसी समाजाचे नेतृत्व करतात. त्यांच्यासाठी भांडतात. त्यामुळे ते ताक सुद्धा फुंकून पीत आहेत. त्यांची हळूहळू खात्री होत आहे की, यातून ओबीसींना कोणताही धक्का लागत नाही. त्यामुळे ते आपल्या सहकाऱ्यांना मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागत नसल्याचे समजावून सांगत आहे. बबनराव तायवाडे जसे आपल्या सहकाऱ्यांना सांगत आहेत, तसेच भुजबळही करत आहेत, असे ते म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी छगन भुजबळ यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचेही संकेत दिलेत.