Home Blog Page 383

ईव्हीएम छेडछाड अशक्य; तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध-भारत निवडणूक आयोगाचा दावा

मुंबई, दि. 31 – भारत निवडणूक आयोगाने (ECI) महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर करण्यात आलेल्या ईव्हीएम तपासणी व पडताळणी प्रक्रियेत सर्व यंत्रे योग्य स्थितीत असल्याचे स्पष्ट केले आहे.

आयोगाच्या 17 जून 2025 च्या सूचनांनुसार, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी 10 उमेदवारांच्या विनंतीनुसार 10 विधानसभा मतदारसंघांमधील मतदार युनिट (BU), नियंत्रण यंत्र (CU) व व्हीव्हीपॅट (VVPAT) यांची तपासणी केली. सर्व यंत्रांनी निदान चाचण्या उत्तीर्ण केल्या व व्हीव्हीपॅट स्लिप आणि ईव्हीएम निकालात कोणताही फरक आढळला नाही.

या प्रक्रियेत 8 उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तपासणी पाहिली. एकूण 48 मतदार युनिट, 31 नियंत्रण यंत्रे आणि 31 व्हीव्हीपॅट यांची तपासणी झाली. दोन उमेदवारांनी उपस्थित राहणे टाळले.

काही मतदारसंघांमध्ये (कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, खडकवासला, माजलगाव) मायक्रोकंट्रोलर व मेमरी पडताळणीसाठी निदान चाचणी घेण्यात आली. तर पनवेल, अलीबाग, आर्णी, येवला, चंदगड, कोल्हापूर उत्तर आणि उर्वरित माजलगाव येथील यंत्रांवर निदान चाचणीबरोबरच मॉक पोल घेण्यात आला. सर्व चाचण्यांमध्ये यंत्रे योग्य कार्यरत असल्याचे प्रमाणित झाले.

निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा स्पष्ट केले की ईव्हीएममध्ये कोणत्याही प्रकारे छेडछाड करता येत नाही. त्यामुळे निकालांबाबत शंका घेण्याचे कारण नाही, असे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.

रेल्वे स्फोटाच्या निकालाला राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले, तसे मालेगाव बॉम्बस्फोट निकालावरही सुप्रीम कोर्टात जाणार का?: हर्षवर्धन सपकाळ

दहशतवादाला रंग नसतो, दहशतवादी दहशतवादीच, त्यांना शिक्षा कठोर झालीच पाहिजे,

काँग्रेस नेहमीच दहशतवादाविरोधात, महात्मा गांधी, इंदिराजी व राजीवजी गांधींच्या बलिदानाने काँग्रेसने दहशतवादाची सर्वात मोठी किंमत मोजली.

मुंबई, दि. ३१ जुलै २०२५

काँग्रेस पक्ष नेहमीच दहशतवादाच्या विरोधात राहिलेला आहे. महात्मा गांधी, इंदिराजी गांधी व राजीवजी गांधी यांच्या बलिदाने काँग्रेसने दहशतवादीचा मोठी किंमत मोजलेली आहे. या दहशतवादाला कोणताही रंग नसतो दहशतवादी हा दहशतवादीच असतो, त्याला शिक्षा झाली पाहिजे असे स्पष्ट करत मुंबई रेल्वे स्फोटाच्या निकालावर राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार आहे तसेच मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावरही सुप्रीम कोर्टात जाणार का, हे स्पष्ट करावे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

मालेगावात बॉम्बस्फोटाच्या निकालावर टिळक भवन येथे पत्रकरांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, मालेगावमध्ये २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोटात ६ लोक ठार तर १०० वर जखमी झाले ही वस्तुस्थिती आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, गृहमंत्री आर. आर. पाटील व या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी हेमंत करकरे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता, त्यांचे आज स्मरण होत आहे तसेच “केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींबद्दल सौम्य भूमिका घ्यावी,असे तपास यंत्रणा एनआयए च्या अधिकाऱ्याने सांगितले होते”, या विशेष सरकारी वकील रोहिणी सालियन यांनी केलेले वक्तव्यही आजच्या निकालानंतर महत्वपूर्ण ठरत आहे.

सपकाळ पुढे म्हणाले की, न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली आहे पण हा बॉम्बस्फोट कोणी केला हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहतो. सरकारची भूमिका दहशतवादविरोधी असायला पाहिजे. रेल्वे स्फोटाच्या निकालावर जर सुप्रीम कोर्टात जाण्याची भूमिका आहे तर मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावरही सुप्रीम कोर्टात जावे लागेल, सरकारला दुटप्पी भूमिका घेता येणार नाही. आज जसे आरोपी निर्दोष सुटले तसेच स्वातंत्र्यानंतरचा देशातील पहिला दहशतवादी नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची हत्या केली. या प्रकरणातील ७ आरोपींपैकी ६ जणांना शिक्षा ठोठावली पण सावकर यांची निर्दोष मुक्तता झाली. या प्रकरणातील कपूर आयोगाच्या अहवालात सावरकरांवर ठपका ठेवलेला आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

“आईचं नाव खाकी वर्दीवर”…

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते अंगरक्षकाच्या खाकी वर्दीवर नेमप्लेट लावण्याचा भावपूर्ण क्षण

पुणे, दि. ३० जुलै २०२५ : विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अंगरक्षक पदावर कार्यरत असलेले पुणे पोलीस कर्मचारी श्री. निवास मंगल सर्जेराव वाळवेकर यांनी आपल्या खाकी वर्दीवरील नेमप्लेटवर एक आगळा-वेगळा आणि भावनिक निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या नावासोबत आईचे नाव – ‘मंगल’ – जोडून “श्री. निवास मंगल सर्जेराव वाळवेकर” अशी नव्याने नेमप्लेट तयार करून घेतली आहे.

विशेष म्हणजे, ही नव्याने तयार केलेली नेमप्लेट विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते वाळवेकर यांनी सन्मानपूर्वक व अभिमानाने लावून घेतली. डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते नेमप्लेट लावणे ही केवळ औपचारिक बाब नव्हती, तर तो एक स्त्री सन्मानाचा आणि मातृत्वाच्या गौरवाचा अभिषेक होता, असेच म्हणावे लागेल.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या प्रसंगी वाळवेकर यांच्या निर्णयाचे कौतुक करताना म्हटले की,
“आईचे नाव आपल्या ओळखीत समाविष्ट करणे म्हणजे आईच्या कष्टांचे आणि त्यागाचे सार्वजनिक स्मरण आहे. हे इतरांसाठीही प्रेरणादायी ठरेल.”

श्री. वाळवेकर यांनी सांगितले की, आपल्या यशामागे आणि आजच्या स्थानामागे आईचे अमूल्य योगदान आहे. म्हणूनच वर्दीवर तिचे नाव अभिमानाने झळकावे, हीच भावना या मागे आहे.

या प्रसंगाने एक गोष्ट निश्चित केली की, खाकी वर्दीतला माणूस केवळ कर्तव्यदक्ष नाही, तर संवेदनशील आणि आपल्या मुळांशी जोडलेलाही असतो.

मिठी नदी घोटाळा प्रकरणी ईडीची कारवाई:मुंबईतील 8 जागांवर छापेमारी

मुंबई-मिठी नदी घोटाळ्याच्या चौकशीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी मुंबईतील सुमारे आठ ठिकाणी छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे. मिठी नदीतून काढलेल्या गाळाचे डंपिंग आणि विल्हेवाट लावण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेला बनावट सामंजस्य करार सादर केल्याचा आरोप असलेल्या कंत्राटदारांशी संबंधित असलेल्या जागांवर हे छापे टाकण्यात आले आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक निष्कर्षांवरून असे दिसून येते की अनेक कंत्राटदारांनी बनावट सामंजस्य करार केले होते आणि कधीही न केलेल्या किंवा मोठ्या प्रमाणात वाढवून दाखवलेल्या गाळ काढण्याच्या कामासाठी देयके मागण्यासाठी दिशाभूल करणारी माहिती दिली होती. या कथित घोटाळ्यामुळे बीएमसीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आणि नदीतून योग्य प्रकारे गाळ काढून शहरातील पूर कमी करण्याच्या दीर्घकालीन प्रयत्नांना तडजोड केली गेल्याचे बोलले जात आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 2005 च्या महापुरानंतर मुंबईच्या मध्यभागी वाहणारी मिठी नदी गाळ काढणे आणि साफसफाईचे एक महत्त्वाचे केंद्रबिंदू ठरली आहे. गेल्या काही वर्षांत, बीएमसीने नदीच्या स्वच्छतेसाठी आणि पूर प्रतिबंधक उपाययोजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी वाटप केला आहे. तथापि, कंत्राटदारांकडून भ्रष्टाचार आणि बनावट कागदपत्रांच्या आरोपांमुळे या उपक्रमाला अडचणी येत आहेत.

ईडीच्या छापेमारीचा उद्देश आर्थिक पुरावे गोळा करणे आणि घोटाळ्याशी संबंधित पैशांचा माग काढणे आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, चालू असलेल्या कारवाईच्या निकालांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असे वृत्तसंस्था एएनआयने म्हटले आहे. यापूर्वी 15 जुलै रोजी, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) शहरातून वाहणाऱ्या मिठी नदीच्या गाळ काढण्याशी संबंधित 65 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीबद्दल कंत्राटदार आणि नागरी अधिकाऱ्यांसह 13 जणांविरुद्ध मे महिन्यात गुन्हा दाखल केला होता.

तपासादरम्यान पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता दिनो मोरिया आणि इतरांचीही चौकशी केली आहे. दिनो मोरिया या घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप आहे आणि या मनी लाँड्रिंग चौकशीच्या संदर्भात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आणि अंमलबजावणी संचालनालयाने त्याची चौकशी केली आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट -साध्वी प्रज्ञासह सातही आरोपींची निर्दोष मुक्तता

मुंबई-
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने साध्वी प्रज्ञासह सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात ७ मुख्य आरोपींमध्ये भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी आणि सुधाकर धर द्विवेदी यांचा समावेश होता.

पीडितांचे वकील शाहिद नवीन अन्सारी म्हणाले- आम्ही एनआयए न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करू. या प्रकरणात तपास संस्था आणि सरकार अपयशी ठरले आहे.

२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमध्ये स्फोट झाला होता. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला होता आणि सुमारे १०० जण जखमी झाले होते. सुमारे १७ वर्षांनंतर दिलेल्या निकालात न्यायाधीश ए.के. लाहोटी म्हणाले की, तपास यंत्रणा आरोप सिद्ध करू शकलेली नाही, त्यामुळे आरोपींना संशयाचा फायदा मिळावा.

न्यायाधीश लाहोटी म्हणाले की, स्फोट झाला होता, परंतु मोटारसायकलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता हे सिद्ध झाले नाही. मोटारसायकल साध्वी प्रज्ञा यांच्या नावावर होती हे देखील सिद्ध झाले नाही. कर्नल प्रसाद पुरोहित यांनी बॉम्ब बनवला होता हे देखील सिद्ध झाले नाही.

या प्रकरणाचा निर्णय ८ मे २०२५ रोजी देण्यात येणार होता, परंतु त्यानंतर न्यायालयाने तो ३१ जुलैपर्यंत राखीव ठेवला. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा प्रारंभिक तपास महाराष्ट्र एटीएसने केला होता. २०११ मध्ये हा खटला एनआयएकडे सोपवण्यात आला. एनआयएने २०१६ मध्ये आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणात ३ तपास संस्था आणि ४ न्यायाधीश बदलले आहेत.

जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा समर्थकांसह भाजपा मध्ये प्रवेश-प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत

मुंबई-जालना येथील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये गुरुवारी प्रवेश केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमामध्ये प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील-दानवे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण, आ. बबनराव लोणीकर, जालना ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. नारायण कुचे, प्रदेश सरचिटणीस आ. संजय केनेकर, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. काँग्रेसच्या माजी नगरसेवकांबरोबरच माजी जि.प. ,पं.स. सदस्यांनीही मोठ्या संख्येने भाजपामध्ये प्रवेश केला.
यावेळी श्री. रविंद्र चव्हाण म्हणाले की, जमीनीवरचा कार्यकर्ता असलेले श्री. गोरंट्याल हे भाजपामध्ये प्रवेश करत आहेत याचा मनस्वी आनंद आहे. या भागातील अनेक प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी महायुती सरकार आणि आमची आहे. भाजपाच्या विकासाच्या राजकारणावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, ‘विकसित भारत’ आणि ‘विकसित महाराष्ट्रा’ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी श्री. गोरंट्याल यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या सर्वांचा विश्वास सार्थ ठरेल आणि भाजपा या सर्वांना पाठबळ देईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
भाजपामध्ये प्रवेश करताना कोणतीही अपेक्षा ठेवली नसून केंद्र आणि राज्यातील निर्णायक नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासासाठी भाजपा मध्ये प्रवेश केल्याचे श्री. गोरंट्याल यांनी स्पष्ट केले. जालन्याच्या पहिल्या महापालिका निवडणुकीत पहिला महापौर भाजपाचा होणार याची ग्वाही देतो, पक्ष जी जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणे पार पाडेन असेही श्री. गोरंट्याल यांनी नमूद केले.
भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये माजी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, युवा नेता अक्षय गोरंट्याल, माजी नगरसेवक महावीर ढक्का, शिक्षादेवी ढक्का, जगदीश भारतीया, विजय चौधरी, विनोद रत्नपारखे, संगीता पाजगे, आनंद वाघमारे, ग्रामीणचे सरपंच गोविंद पवार, सुनील चिरखे, सरपंच मनोहर सूळसुळे, अंबादास लोंढे, तालुका उपाध्यक्ष संतोष देव्हडे, माजी सरपंच ज्ञानेश्वर मोरे, बाळूकाका सिरसाट, किशोर कावले, पंचायत समिती माजी सदस्य समाधान शेजुळ आदींचा समावेश आहे. शरद पवार गट आणि उबाठा गटातील कार्यकर्त्यांचाही भाजपा प्रवेश झाला .

भाजपाच्या माजी खासदार, आमदारांनी एक-एक मंडल दत्तक घेऊन संघटनात्मक बांधणीचा संकल्प करा-भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे आवाहन

मुंबई-आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीसाठी पक्षाच्या प्रत्येक माजी खासदार आणि आमदाराने पक्षाच्या संघटनात्मक रचनेतील एक -एक मंडल दत्तक घ्यावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी गुरुवारी केले. प्रदेश कार्यालयात आगामी निवडणुकांची रणनीती आखण्यासाठी झालेल्या माजी आमदार आणि खासदारांच्या बैठकीत श्री. चव्हाण बोलत होते. या बैठकीला ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील-दानवे, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, संजय केनेकर, माधवी नाईक, मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे आदी उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची रणनीती आखण्यात येत असून या बैठकीत संघटनात्मक स्थितीचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. बूथस्तरापासून मतदान केंद्रांपर्यंतची मोर्चेबांधणी, पदाधिकाऱ्यांची जबाबदारी, संपर्क मोहिमा यावर यावेळी भर देण्यात आला. कार्यकर्त्यांचा जोष, जनसंपर्क आणि केंद्र-राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यावरही विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

महिलांना आर्थिक स्वातंत्र्य हवे- ॲड वर्षा देशपांडे

पुणे-
समाजामध्ये स्त्री, पुरुष समानता निर्माण करण्यासाठी महिलांना पुरुषांप्रमाणेच आर्थिक स्वातंत्र्य मिळायला हवे. केवळ महिला आणि पुरुष समान असल्याचे न सांगता प्रत्यक्ष त्याबाबत जागरूकता झाली पाहिजे असे मत लेक लाडकी अभियान आणि दलित महिला विकास संस्थेच्या ॲड. वर्षा देशपांडे यांनी गुरुवारी व्यक्त केले. वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा गैरवापर करून आजही गर्भलिंग निदान केले जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
ॲड. वर्षा देशपांडे यांना नुकताच संयुक्त राष्ट्र संघातर्फे ‘युएन पॉप्युलेशन पुरस्काराने गौरविण्यात आले. त्या निमित्त पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे ॲड. देशपांडे यांचा वार्तालाप गुरवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष
ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले उपस्थित होते.

शेतीसह विविध क्षेत्रात महिला काम करतात. मात्र, महिलांच्या नावावर शेती नसते. तसेच त्यांना आर्थिक अधिकार आणि मालमत्तेत त्यांचे नाव नसते. त्यामुळे स्त्री पुरुष समानतेची केवळ घोषणा करून होणार नाही तर महिलांना आर्थिक अधिकार देणे महत्वपूर्ण आहे तरच ज्या सक्षम होतील. आर्थिक अधिकार नसल्याने महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गर्भलिंग निदान होऊ नये म्हणून देशात विविध कायदे आहेत. मात्र, देशात गर्भलिंग निदान केले जात आहे. जन्मापूर्वी मुलींची हत्या केली जात असल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. देशात दरवर्षी सहा लाख तर महाराष्ट्रात ५३ हजार महिलांची जन्मास येण्यापूर्वी हत्या होते ही बाब चिंताजनक आहे. देशात याबाबत कडक कायदे असतानाही त्याचे पालन का होत नाही असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. सर्वात पहिले गर्भलिंगनिदान विरोधी कायदा महाराष्ट्र करण्यात आला आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रसह देशातील विविध राज्यांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या कमी होत आहे. यामुळे तरुणांचे लग्न होत नसल्याचे ही वास्तव समोर येत असल्याकडे ॲड. देशपांडे यांनी लक्ष वेधले. तनिष्का डोंगरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

राहुल गांधी म्हणाले- होय भारतीय अर्थव्यवस्था मृतावस्थेतच,ट्रम्प खरे बोलले :PM मोदींनी अदानींना मदत करण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली

नवी दिल्ली-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला मृत अर्थव्यवस्था म्हटले आहे, यावर काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले की, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी वस्तुस्थिती सांगितली आहे.राहुल म्हणाले की, संपूर्ण जगाला माहित आहे की भाजपने अदानींना मदत करण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. ट्रम्प बरोबर आहेत. म्हणजे, पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्र्यांशिवाय सर्वांना माहित आहे की भारताची अर्थव्यवस्था मृतप्राय झाली आहे.

राहुल यांचे हे विधान ट्रम्प यांच्या विधानानंतर आले आहे ज्यात त्यांनी म्हटले होते की रशिया आणि भारत त्यांच्या मृत अर्थव्यवस्थेला कसे हाताळतात याची मला पर्वा नाही.

बुधवारी अमेरिकेने भारतावर २५% कर लादण्याची घोषणा केली. तेव्हापासून काँग्रेससह अनेक पक्षांशी संबंधित लोकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

काँग्रेस खासदार प्रियंका गांधी: मोदी मित्र बनवतात, त्या बदल्यात काय मिळाले? काँग्रेस खासदार प्रियंका गांधी म्हणाल्या- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी टॅरिफवर काय म्हटले ते सर्वांनी पाहिले आहे. पंतप्रधान मोदी सर्वत्र जातात, मित्र बनवतात आणि मग आपल्याला हे मिळते.
काँग्रेसचे राजीव शुक्ला: ट्रम्प भारतावर अन्याय करत आहेत राजीव शुक्ला म्हणाले, “ट्रम्प देशांना धमकावत आहेत. ते भारताला रशियासोबत व्यापार करू नये असे सांगत आहेत. हे खूप चुकीचे आहे. अमेरिका भारताला पाठिंबा देत नाही. आम्ही ट्रम्पशी मैत्रीचा दावा करत होतो. तो कुठे आहे? ते म्हणतात की मोदी माझे मित्र आहे, पण २५% कर लादण्याचा त्याचा काय अर्थ आहे. ते भारतावर अन्याय करत आहे.”
राज्यसभा खासदार जयराम रमेश: तारीफ ही तारीफ में टैरिफ लग गया जयराम म्हणाले- ‘हाय मोदी आणि नमस्ते ट्रम्प’ने काही फायदा झाला नाही. या मैत्रीतून आपल्याला काय मिळाले? हा आपल्या देशासाठी, आपल्या अर्थव्यवस्थेसाठी मोठा धक्का आहे. पंतप्रधानांनी घाबरू नये. अमेरिकेचे ब्लॅकमेलिंग आपल्यासाठी अडचणीचा काळ आहे. आपल्याला वाटायचे की आपल्यासमोर दोन मोठी आव्हाने आहेत – पाकिस्तान आणि चीन, परंतु अमेरिका तिसरी मोठी समस्या म्हणून उदयास आली आहे.
जेडीयू खासदार संजय कुमार झा: हे काही नवीन नाही जेडीयूचे खासदार संजय कुमार झा म्हणाले- हे काही नवीन नाही. वेगवेगळ्या देशांनी वेगवेगळ्या दरांनी शुल्क लादल्याची माहिती मिळाली आहे. सरकार देशाच्या हितासाठी जे करेल ते करेल. सरकार कृषी आणि एमएसएमई क्षेत्राच्या हितासाठी काम करेल. सरकारने असेही म्हटले आहे की चर्चा सुरू आहे. सरकार आणि पंतप्रधान मोदी तोडगा काढण्यास सक्षम आहेत.
काँग्रेसचे राजीव शुक्ला: ट्रम्प भारतावर अन्याय करत आहेत राजीव शुक्ला म्हणाले, “ट्रम्प देशांना धमकावत आहेत. ते भारताला रशियासोबत व्यापार करू नये असे सांगत आहेत. हे खूप चुकीचे आहे. अमेरिका भारताला पाठिंबा देत नाही. आम्ही ट्रम्पशी मैत्रीचा दावा करत होतो. तो कुठे आहे? ते म्हणतात की मोदी माझे मित्र आहे, पण २५% कर लादण्याचा त्याचा काय अर्थ आहे. ते भारतावर अन्याय करत आहे.”
राज्यसभा खासदार जयराम रमेश: तारीफ ही तारीफ में टैरिफ लग गया जयराम म्हणाले- ‘हाय मोदी आणि नमस्ते ट्रम्प’ने काही फायदा झाला नाही. या मैत्रीतून आपल्याला काय मिळाले? हा आपल्या देशासाठी, आपल्या अर्थव्यवस्थेसाठी मोठा धक्का आहे. पंतप्रधानांनी घाबरू नये. अमेरिकेचे ब्लॅकमेलिंग आपल्यासाठी अडचणीचा काळ आहे. आपल्याला वाटायचे की आपल्यासमोर दोन मोठी आव्हाने आहेत – पाकिस्तान आणि चीन, परंतु अमेरिका तिसरी मोठी समस्या म्हणून उदयास आली आहे.

ट्रम्प भारताला डेड इकॉनॉमी म्हणाले…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५% कर लादण्याची घोषणा केली आहे. हा कर १ ऑगस्ट २०२५ पासून लागू होईल. त्यांनी एका पोस्टमध्ये ही माहिती दिली. सध्या, भारतावर अमेरिकेचा वस्तूंवर सरासरी कर सुमारे १०% आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची संपूर्ण पोस्ट:
भारत आमचा मित्र आहे, पण गेल्या काही वर्षांत आम्ही त्यांच्याशी फारसा व्यवसाय केलेला नाही कारण त्यांचे कर खूप जास्त आहेत. तसेच, त्यांच्याकडे खूप कठोर आणि त्रासदायक गैर-आर्थिक व्यापार अडथळे आहेत. तसेच, भारत नेहमीच रशियाकडून बहुतेक लष्करी साहित्य खरेदी करतो आणि चीनसह रशियाचा सर्वात मोठा तेल खरेदीदार आहे. हे सर्व अशा वेळी घडत आहे जेव्हा प्रत्येकजण रशियाला युक्रेनमधील युद्ध थांबवू इच्छितो. हे चांगले नाही! म्हणून, भारताला १ ऑगस्टपासून २५% कर भरावे लागतील आणि वर नमूद केलेल्या गोष्टींसाठी दंड आकारला जाईल. हे निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. अमेरिकेला पुन्हा महान बनवा!

ट्रम्प यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, भारत रशियासोबत काय करतो याची मला पर्वा नाही. जर त्यांना हवे असेल तर ते त्यांच्या बुडत्या अर्थव्यवस्था एकत्र बुडवू शकतात, मला काय फरक पडतो.

भारतासोबत आपला व्यापार खूपच कमी आहे, त्यांचे कर जगात सर्वाधिक आहेत. त्याचप्रमाणे, रशिया आणि अमेरिकेत जवळजवळ कोणताही व्यापार नाही. ते तसेच चालू ठेवा आणि रशियाचे माजी अपयशी अध्यक्ष मेदवेदेव, जे अजूनही स्वतःला राष्ट्रपती मानतात, त्यांना त्यांच्या जिभेवर लक्ष ठेवण्यास सांगा. तो खूप धोकादायक मार्गाने जात आहे!

हा कर काय आहे आणि ट्रम्प यांनी तो भारतावर का लादला?

टॅरिफ म्हणजे आयात शुल्क. जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशाकडून वस्तू खरेदी करतो तेव्हा तो त्यावर काही कर लादतो, ज्याला टॅरिफ म्हणतात. ट्रम्प म्हणतात की भारत अमेरिकन वस्तूंवर खूप जास्त टॅरिफ आकारतो, तर अमेरिका भारतीय वस्तूंवर कमी कर आकारतो.

ट्रम्प यांना वाटते की हा अन्याय आहे. म्हणूनच त्यांनी त्यांच्या “परस्पर कर” धोरणाअंतर्गत भारतावर २५% कर लादण्याची घोषणा केली आहे. जर भारताने त्यांच्या वस्तूंवर जास्त कर लादला तर ते भारतीय वस्तूंवरही जास्त कर लादतील असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच, रशियाकडून भारताने तेल आणि लष्करी उपकरणे खरेदी केल्याबद्दल ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

उ ट्रम्प यांनी बुधवारी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर घोषणा केली की हा २५% कर १ ऑगस्ट २०२५ पासून लागू होईल. याचा अर्थ असा की भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तू, जसे की औषधे, कपडे आणि अभियांत्रिकी उत्पादने, यावर २५% कर आकारला जाईल. यामुळे अमेरिकेत भारतीय वस्तू महाग होतील. त्यांची मागणी कमी होऊ शकते. भारताचा अमेरिकेसोबतचा व्यापार अधिशेष (अधिक निर्यात, कमी आयात) देखील कमी होऊ शकतो.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की २५% कर ही भारतासाठी वाईट बातमी आहे, परंतु आता सर्व लक्ष अमेरिकेसोबतचा व्यापार करार लवकर पूर्ण करण्यावर आहे. जर कराराला विलंब झाला तर त्याचा भारताच्या आर्थिक वर्ष २६ च्या जीडीपीवर परिणाम होऊ शकतो. एलारा कॅपिटलच्या अर्थतज्ज्ञ गरिमा कपूर म्हणाल्या, “जर सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत कोणताही करार झाला नाही, तर भारताच्या पूर्ण वर्षाच्या जीडीपी वाढीच्या अंदाजात २० बेसिस पॉइंटची घट दिसून येते.”

कपूर म्हणाले की, २५% टॅरिफ दर निश्चितच नकारात्मक आहे, कारण व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि फिलीपिन्स सारख्या देशांमध्ये कमी टॅरिफ आहेत. फार्मा सारख्या सवलतीच्या वस्तू आणि लोखंड, स्टील आणि ऑटो सारख्या वेगवेगळ्या दरांच्या वस्तूंवरील टॅरिफची अचूक माहिती अद्याप ज्ञात नाही, परंतु जर फार्मावर देखील टॅरिफ लादला गेला तर ते भारताच्या निर्यातीसाठी अधिक हानिकारक ठरेल, कारण भारताच्या ३०% पेक्षा जास्त फार्मा निर्यात अमेरिकेत जाते.

स्मार्टफोन: २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत भारत अमेरिकेला स्मार्टफोनचा सर्वात मोठा पुरवठादार बनला आहे, त्याने चीनला मागे टाकले आहे. भारताच्या स्मार्टफोन निर्यातीने या क्षेत्रातील अमेरिकेच्या ४४% वाटा व्यापला आहे. परंतु २५% शुल्कामुळे त्यांच्या किमती वाढू शकतात, ज्यामुळे भारतीय स्मार्टफोनच्या स्पर्धात्मकतेवर परिणाम होऊ शकतो.
हिरे आणि दागिने: भारत अमेरिकेला ९ अब्ज डॉलर्स (सुमारे ७९ हजार कोटी रुपये) पेक्षा जास्त किमतीचे दागिने निर्यात करतो, ज्यामध्ये नैसर्गिक आणि प्रयोगशाळेत बनवलेले हिरे, सोने-चांदीचे दागिने आणि रंगीत रत्ने यांचा समावेश आहे. नवीन शुल्कांमुळे त्यांच्या किमती वाढू शकतात, ज्यामुळे भारतीय दागिन्यांची मागणी कमी होऊ शकते आणि नोकऱ्यांना धोका निर्माण होऊ शकतो.
इलेक्ट्रॉनिक्स: भारत लॅपटॉप आणि सर्व्हर सारख्या सुमारे $१४ अब्ज (सुमारे १.२ लाख कोटी रुपये) किमतीच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची अमेरिकेत निर्यात करतो. तथापि, ही उत्पादने सध्या शुल्कमुक्त आहेत कारण अमेरिका कलम २३२ च्या चौकशीखाली आहे. परंतु भविष्यात जर त्यांच्यावर शुल्क लादले गेले तर भारताची किंमत-स्पर्धात्मकता कमी होऊ शकते.
औषधनिर्माण: भारतीय औषध क्षेत्र जगभरात स्वस्त औषधांचा एक प्रमुख पुरवठादार आहे. अमेरिका भारतातून जेनेरिक औषधे, लस आणि सक्रिय घटकांची आयात करते, ज्यांची निर्यात २०२५ मध्ये ७.५ अब्ज डॉलर्स (सुमारे ६५ हजार कोटी रुपये) पेक्षा जास्त होती. जर औषधांवर शुल्क लादले गेले तर ते भारताच्या निर्यातीला मोठा धक्का ठरेल, कारण भारताच्या औषध निर्यातीत अमेरिकेचा वाटा ३०% पेक्षा जास्त आहे.
कापड आणि कपडे: भारत २०२५ मध्ये हस्तनिर्मित रेशीमपासून ते औद्योगिकरित्या बनवलेल्या सुती कापडांपर्यंत सर्व काही अमेरिकेत निर्यात करतो, ज्याची किंमत २.५ अब्ज डॉलर्स (सुमारे २२ हजार कोटी रुपये) पेक्षा जास्त आहे. २५% शुल्कामुळे त्यांच्या किमती वाढतील, ज्यामुळे भारतीय कापडांच्या मागणीवर परिणाम होऊ शकतो आणि हा क्षेत्र कमकुवत होऊ शकतो.

ट्रम्प यांनी एप्रिल २०२५ मध्ये भारतावर २६% कर लादण्याबद्दल बोलले होते, परंतु नंतर ते १ ऑगस्टपर्यंत दोनदा पुढे ढकलले.

आता पुन्हा ट्रम्प यांनी २५% शुल्काचा मुद्दा उपस्थित केला आहे. यासोबतच त्यांनी दंड आकारण्याबद्दलही बोलले आहे. परंतु हा दंड काय असेल किंवा किती असेल हे त्यांनी स्पष्ट केले नाही.दंड म्हणजे भारतातील काही वस्तू किंवा क्षेत्रांवर अतिरिक्त कर लावणे किंवा काही व्यापार सवलती रद्द करणे.उदाहरणार्थ, हे दंड भारताच्या औषधनिर्माण, कापड किंवा इतर प्रमुख निर्यातींवर जास्त शुल्क किंवा कठोर नियमांचे स्वरूप घेऊ शकतात.ट्रम्प यांनी एप्रिल २०२५ मध्ये जगभरातील देशांवर कर लादले होते. भारतावर २६% कर लादण्यात आला होता. परंतु, नंतर तो ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आला.ट्रम्प यांनी एप्रिल २०२५ मध्ये जगभरातील देशांवर कर लादले होते. भारतावर २६% कर लादण्यात आला होता. परंतु, नंतर तो ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आला.
२५ ऑगस्ट रोजी अमेरिकेचे पथक भारत दौऱ्यावर येणार असल्याने आणि सहाव्या फेरीच्या चर्चेमुळे भारताने ही मुदत वाढवण्याचे आवाहन केले आहे.भारतीय अधिकारी सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत एका मोठ्या करारावर पोहोचण्याची आशा बाळगत आहेत. परंतु काही मुद्द्यांवर अजूनही एकमत झालेले नाही, जसे की कृषी आणि दुग्ध क्षेत्र. भारत अनुवांशिकरित्या सुधारित पिके आणि दुग्ध बाजारपेठ उघडण्यास तयार नाही.

ट्रम्प यांनी अनेक वेळा सांगितले आहे की भारत त्यांचा मित्र आहे आणि त्यांनी असाही दावा केला आहे की भारताने त्यांच्या सांगण्यावरून पाकिस्तानसोबत युद्धबंदी केली. दुसरीकडे, टॅरिफच्या बाबतीत, “अमेरिका फर्स्ट” धोरणांतर्गत, ट्रम्प यांना वाटते की अमेरिकेला व्यापारात नुकसान होऊ नये.त्यांचे म्हणणे आहे की भारत अमेरिकन वस्तूंवर १००% पर्यंत शुल्क लादतो, जे चुकीचे आहे. म्हणून, ते भारतावरही शुल्क लादू इच्छितात. तसेच, भारत रशियाकडून तेल आणि शस्त्रे खरेदी करत असल्याबद्दल त्यांना राग आहे.

हे फक्त भारताबद्दल नाही. ट्रम्प यांनी अनेक देशांवर कर जाहीर केले आहेत. उदाहरणार्थ, चीनवर ३४%, व्हिएतनामवर ४६%, तैवानवर ३२% आणि कंबोडियावर ४९% कर जाहीर केले आहेत. कॅनडा आणि मेक्सिकोला काही सूट मिळाली आहे, परंतु ऑटो आणि स्टीलसारख्या क्षेत्रातही त्यांच्यावर कर आहे. ट्रम्प यांचे धोरण असे आहे की जो देश अमेरिकेवर जास्त कर लादेल त्यालाही तोच कर भरावा लागेल.

सामान्य माणसावर थेट परिणाम कमी होईल, परंतु दीर्घकाळात काही गोष्टी महाग होऊ शकतात. जर अमेरिकेत भारतीय वस्तू महाग झाल्या तर भारताची निर्यात कमी होऊ शकते, ज्यामुळे काही कंपन्यांचे नुकसान होईल.विशेषतः फार्मा, टेक्सटाइल आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील कंपन्यांवर याचा परिणाम होऊ शकतो. याचा परिणाम नोकऱ्या आणि अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.दुसरीकडे, जर भारतानेही प्रत्युत्तरात्मक शुल्क लादले, तर अमेरिकन वस्तू, जसे की अॅपल फोन किंवा इतर आयात केलेली उत्पादने भारतात महाग होऊ शकतात.

भारतासमोर दोन पर्याय :

प्रथम, तो शुल्क टाळण्यासाठी अमेरिकेशी व्यापार करार लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करेल.
दुसरे म्हणजे, जर चर्चा अयशस्वी झाली तर कॅनडाप्रमाणे भारत देखील अमेरिकन वस्तूंवर प्रत्युत्तरात्मक शुल्क लादू शकतो. परंतु अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असल्याने भारत राजनैतिक मार्गाने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल.
२०२४ मध्ये, भारताने अमेरिकेला ८७.४ अब्ज डॉलर्सच्या वस्तू विकल्या, तर अमेरिकेतून ४१.८ अब्ज डॉलर्सच्या वस्तू आयात केल्या. अशा परिस्थितीत, दोन्ही देशांसाठी करार आवश्यक आहे.

यावेळी ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर २५% टॅरिफ लावण्याबद्दल स्पष्टपणे बोलले आहे आणि तारीखही दिली आहे. परंतु भारतीय अधिकारी ते तात्पुरते पाऊल मानत आहेत, कारण व्यापार चर्चा अजूनही सुरू आहेत. ट्रम्प यांनी यापूर्वीही टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे आणि अनेक वेळा माघार घेतली आहे. त्यामुळे ही धमकी भारताला व्यापार करारात अधिक सवलती देण्यासाठी दबाव निर्माण करण्याची रणनीती देखील असू शकते. तरीही, जर करार झाला नाही, तर टॅरिफ लागू होण्याची शक्यता आहे.

मानाच्या पाचव्या गणपतींनंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट चा महत्वपूर्ण निर्णय

पुणे : वैभवशाली गणपती विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्यावरून सहभागी होणारे अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट हे जगभरातील गणेशभक्तांसाठी मुख्य आकर्षण असते. मात्र, यावर्षीपासून सायंकाळनंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी न होता, मानाचे पाच गणपती टिळक पुतळ्यापासून मार्गस्थ झाल्यानंतर त्या पाठोपाठ मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय या दोन्ही मंडळांनी घेतला आहे. याविषयी माहिती देण्याकरिता आयोजित पत्रकार परिषदेला अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त, उत्सवप्रमुख पुनीत बालन, अध्यक्ष संजीव जावळे, अखिल मंडई मंडळाचे संजय मते, विश्वास भोर, रोहन मते आदी उपस्थित होते. अण्णा थोरात म्हणाले, गणेशोत्सव हा धार्मिक उत्सव असून संपूर्ण दहा दिवस त्याचे महत्व आहे. त्यातील सगळ्यात महत्वाचा दिवस म्हणजे विसर्जन. यावर्षी अनंत चतुदर्शी (दि.६ सप्टेंबर) च्या दुसऱ्या दिवशी (दि.७ सप्टेंबर) खग्रास चंद्रग्रहण असल्याने ग्रहणकाळात देवाच्या सर्व मूर्ती झाकून ठेवण्याची प्रथा आहे. त्यामुळे दुपारी १२ पूर्वी मंडळाच्या मूर्ती मंदिरात पुन्हा येणे आवश्यक्य आहे.मागील तीन वर्षे पोलिसांनी दिलेल्या वेळेस सा.७ वा श्री ची आरती करून मिरवणुकीत सामील होण्यासाठी तयार असतो पण गेली काही वर्षे पोलिस प्रशासनाने शब्द पाळला नाही. त्या मुळे सायंकाळी मिरवणुकीत सामील होण्यासाठी आम्ही तयार असूनही आम्हाला वेळेवर सहभागी करून घेण्यात आलेले नाही. त्यामुळे यंदा आम्ही हा निर्णय घेतला आहे. सर्व गणेशोत्सव मंडळांना देखील आम्ही आवाहन करीत आहोत की यंदा मिरवणूक रविवारी दुपारी १२ पूर्वी संपवावी. पुनीत बालन म्हणाले, ग्रहणकाळ रविवारी (दि.७) दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांनी सुरु होत आहे. किमान त्याआधी अर्धा तास सर्व गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती मंदिरात नेणे आवश्यक आहे. याकरिता मिरवणूक लवकर संपविणे आवश्यक असून आम्ही मानाचे पाच गणपती टिळक पुतळा चौकातून मार्गस्थ झाल्यानंतर त्या पाठोपाठ मिरवणुकीत सहभागी होणार आहोत. सर्व गणेशमंडळांनी देखील याबाबत सहकार्य केल्यास पोलिस आणि प्रशासना यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल.

ट्रम्प यांच्या 25% टॅरिफमुळे भरडणार शेतकरी-कारागीर:काय स्वस्त-महाग?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५% कर लादण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, भारत रशियाकडून शस्त्रे आणि तेल खरेदी करत आहे, त्यामुळे त्यावर दंडदेखील लावला जाईल. हे १ ऑगस्टपासून लागू होईल.समजा भारतात बनवलेला हिरा १० लाख रुपयांना विकला जातो. जर ट्रम्प यांनी भारतावर २५% टॅरिफ लादला तर हिऱ्याची किंमत २.५० लाख रुपयांनी वाढेल. किमती वाढल्यामुळे अमेरिकेत भारतीय हिऱ्यांचा वापर कमी होईल.
टॅरिफ हा एक प्रकारचा सीमा शुल्क किंवा कर आहे, जो कोणताही देश परदेशातून येणाऱ्या वस्तूंवर लादतो. सरकार तो आयात करणाऱ्या कंपन्यांकडून वसूल करते. देश एकमेकांशी व्यापार वाढवून किंवा कमी करून नियंत्रित करतात.जर एखाद्या देशाचा जकात दर जास्त असेल तर परदेशी वस्तू त्याच्या स्थानिक बाजारपेठेत महाग होतात. यामुळे सरकारचे उत्पन्न वाढते. पण, परदेशी वस्तूंचा वापर कमी होतो आणि स्थानिक कंपन्यांच्या वस्तूंचा वापर वाढतो. अशा प्रकारे सरकार स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देते.

ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथवर ही माहिती दिली. त्यांनी एका पोस्टमध्ये लिहिले की, ‘भारत अमेरिकेचा मित्र आहे, परंतु गेल्या काही वर्षांत अमेरिकेने त्यांच्याशी फारसा व्यापार केला नाही कारण त्यांचे टॅरिफ खूप जास्त आहे. खरं तर, भारताच्या अनेक धोरणांमुळे अमेरिकन कंपन्यांना व्यवसाय करण्यात अडचणी निर्माण होतात.’

ट्रम्प पुढे लिहितात, ‘भारत अजूनही रशियाकडून बहुतेक शस्त्रे खरेदी करतो. एवढेच नाही तर चीनसह भारतही रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल आणि वायू खरेदी करतो, तर संपूर्ण जगाला रशियाने युक्रेनमधील हिंसाचार थांबवावा असे वाटते. या सर्व गोष्टी योग्य नाहीत, म्हणून भारत १ ऑगस्टपासून या सर्वांसाठी २५% कर आणि दंड भरेल.
आर्थिक तज्ज्ञ शरद कोहली यांच्या मते, ट्रम्प यांच्या दंडाचा अर्थ असा आहे की ते केवळ २५% कर लादणार नाहीत, तर तो दंड म्हणून वाढवता देखील येऊ शकतो.यावर उत्तर देताना, भारताच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने म्हटले आहे की, ‘सरकार त्याच्या संभाव्य परिणामांचा अभ्यास करत आहे. भारत आणि अमेरिका गेल्या काही महिन्यांपासून निष्पक्ष, संतुलित आणि परस्पर फायदेशीर द्विपक्षीय संबंधात गुंतले आहेत. व्यापार करारांवर वाटाघाटी करत आहेत. आम्ही या उद्दिष्टासाठी वचनबद्ध आहोत.’

भारत आणि अमेरिका यांच्यात सुमारे ८०० कोटी रुपयांचा कृषी व्यापार आहे. भारत प्रामुख्याने तांदूळ, कोळंबी, मध, वनस्पती अर्क, एरंडेल तेल आणि काळी मिरी अमेरिकेला निर्यात करतो. आणि अमेरिका बदाम, अक्रोड, पिस्ता, सफरचंद आणि खरबूज पाठवते.ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) च्या अहवालानुसार, भारताला अमेरिकन कृषी उत्पादनांवर सरासरी ३७.७% कर आकारला जातो. तर अमेरिकेत भारतीय कृषी उत्पादनांवर तो ५.३% आहे. आता हा कर २५% असल्याने भारतीय शेतकऱ्यांवरील भार वाढेल.

अमेरिकेत भारतीय कृषी उत्पादने महाग होतील, त्यांची मागणी कमी होईल, निर्यात कमी होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होईल. याव्यतिरिक्त, ट्रम्पच्या शुल्कामुळे सर्वात जास्त प्रभावित होणारे काही प्रमुख क्षेत्र…
जर अमेरिकेत या सर्व क्षेत्रातील वस्तूंची मागणी कमी झाली तर भारतात त्यांच्या किमती कमी होतील. याचा परिणाम शेतकरी आणि कामगार यासारख्या या क्षेत्रांशी संबंधित लोकांवर होईल. त्यांचे उत्पन्न कमी होईल आणि रोजगारही कमी होऊ शकतो.

फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन म्हणजेच FIEOच्या अहवालानुसार, अमेरिकेच्या टॅरिफचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होईल. भारतावर २५% टॅरिफमुळे, अंदाजे ६१ हजार कोटी ते ७२ हजार कोटी रुपयांचे वार्षिक नुकसान होऊ शकते. आहे. आणखी काही परिणाम दिसू शकतात. जसे की-निर्यात महाग होईल : अन्न उत्पादने, कापड, विद्युत यंत्रसामग्री, रत्ने आणि दागिने, औषधे आणि ऑटोमोबाइल्ससारख्या अनेक वस्तूंवरील शुल्क महाग होऊ शकते.

व्यापार अधिशेष कमी होईल: सध्या अमेरिका भारतीय वस्तूंवर कमी दर लादते, त्यामुळे भारताला व्यापारात अडचणी येत आहेत. अधिशेषाचा फायदा घ्यावा. शुल्क वाढल्याने भारताला मोठे नुकसान होईल.

रुपया कमकुवत होईल : अधिक आयातीमुळे डॉलरची मागणी वाढेल. यामुळे रुपया कमकुवत होईल आणि डॉलर मजबूत होईल. याचा अर्थ असा की तुम्हाला अमेरिकेतून वस्तू खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील.

आयात वाढेल: जर भारताने अमेरिकेकडून जास्त कर टाळण्यासाठी अमेरिकन वस्तूंवरील कर कमी केले तर भारतीय अमेरिकन वस्तू बाजारात स्वस्त होतील. त्यामुळे आयात वाढेल.

डोनाल्ड ट्रम्प सत्तेत येताच, भारताने अमेरिकेतून येणाऱ्या अनेक वस्तूंवर कर घटवण्यास सुरुवात केली.

अमेरिकन मोटारसायकलींवरील कस्टम ड्यूटी ५०% वरून ३०% पर्यंत कमी करण्यात आली.
अमेरिकन दारूवरील आयात शुल्क १५०% वरून १००% पर्यंत कमी करण्यात आले.
सिंथेटिक फ्लेवरिंग एसेन्सवरील आयात शुल्क १००% वरून २०% पर्यंत कमी केले.

जलचर अन्न बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इथरनेट स्विच आणि फिश हायड्रोलायसेटसारख्या वस्तूंवरील शुल्क कमी करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या अमेरिका भेटीदरम्यान म्हटले होते की, ‘आम्ही राष्ट्रीय हिताशी तडजोड करणार नाही. आम्ही ते करणार नाही, परंतु आम्ही अमेरिकेसोबत भागीदारी वाढवू. ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅरिफ जाहीर केल्यानंतर, भारताने बॅकडोर वाटाघाटी करण्याचे अनेक प्रयत्न केले. व्यापार कराराबाबत अमेरिकन अधिकारी २५ ऑगस्ट रोजी भारतात येतील. येथे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार करार (BTA) बाबतच्या चर्चेचा सहावा टप्पा पार पडेल.

दोन्ही देश सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत व्यापार कराराचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी काम करत आहेत. यासोबतच, आम्ही मध्यवर्ती व्यापार कराराची शक्यतादेखील शोधत आहोत.व्यापार करारासंदर्भातील चर्चेचा शेवटचा टप्पा वॉशिंग्टनमध्ये पार पडला. जिथे भारताचे मुख्य वाटाघाटीकार राजेश अग्रवाल आणि अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी ब्रेंडन लिंच यांनी यावर चर्चा केली.आर्थिक तज्ज्ञ शरद कोहली म्हणतात की भारतावर २५% कर आणि दंड लादण्याचे ट्रम्प यांचे विधान आता बदलू शकते. ट्रम्प त्यांच्या विधानांपासून मागे हटण्यासाठी ओळखले जातात, या करांवरही वाटाघाटी केल्या जातील आणि ते १० ते १५% पर्यंत कमी केले जातील.

आज ट्रम्प प्रशासनात भारतीयांचे स्थान सर्वात मजबूत आहे. व्यवसाय, तंत्रज्ञान अशा अमेरिकेतील जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात भारतीय वंशाचे लोक आघाडीवर आहेत. त्यामुळे, टॅरिफ घोषणेनंतर, याबद्दल फारशी चर्चा होत नाही हे शक्य नाही.
चीन आणि अमेरिकेतील संबंध चांगले नाहीत. अमेरिकेला आशियात भारताची सर्वात जास्त गरज आहे, अशा परिस्थितीत ट्रम्प भारताला नाराज करण्याची चूक करत आहेत.
ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर कर लादल्याने अमेरिकन लोकांना भारतीय वस्तू जास्त किमतीत मिळतील, याचा निषेध केला जाईल.
शरद कोहली म्हणतात की रशियाकडून वस्तू खरेदी करण्यासाठी भारतावर शुल्क लादण्याचे अमेरिकेचे धोरण वाईट आहे. त्यांनी स्वतः या वर्षी जानेवारी ते जुलै २०२५ पर्यंत रशियाकडून २ अब्ज डॉलर्सच्या वस्तू खरेदी केल्या. हे फक्त विधाने करून भारताला धक्का देण्याचा प्रयत्न आहे, ट्रम्प यांच्या वृत्तीत अनेक बदल होऊ शकतात.

१७ वर्षांपूर्वीच्या मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणाची अंतिम सुनावणी,साध्वी प्रज्ञासिंह व कर्नल पुराेहित यांना शिक्षा हाेणार निर्दाेष सुटणार?  

मुंबई- भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासारखे बहुप्रतिष्ठित संशयित आरोपी, तब्बल १७ वर्षांची प्रतीक्षा आणि एक लाखाहून कागदपत्रांची तपासणी यामु‌ळे लक्षवेधी ठरलेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्याची अंतिम सुनावणी आज गुरुवारी (३१ जुलै) होत आहे. त्यामुळे त्याचा निकाल जाहीर हाेणार का? आणि साध्वी प्रज्ञासिंह व कर्नल पुराेहित यांना शिक्षा हाेणार की त्यांची निर्दाेष सुटका हाेणार, या निकालाची प्रतीक्षा आहे.

७-११ मुंबई बाॅम्बस्फाेट खटल्यातील १२ आराेपी निर्दाेष ठरल्यानंतर आता मालेगाव स्फाेटाच्या निकालाकडे लक्ष लागून आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयात कोर्टाचे विशेष न्यायाधीश अभय लाहोटी यांना या खटल्याच्या दस्तएेवजात १० हजार पानांचे परिशिष्ट आणि १ लाख पानांचे दस्त दाखल झालेले असल्याने ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली हाेती. त्याचीही मुदत गुरुवारी संपत आहे. २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावच्या भिक्खू चौकात बॉम्बस्फोट झाला होता. त्यात ६ जण ठार, शंभरहून अधिक जखमी झाले होते. महाराष्ट्र एटीएसचे दिवंगत प्रमुख हेमंत करकरे यांच्या टीमने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्येय यांच्यासह अभिनव भारत संस्थेचे पदाधिकारी, काही साधू-महंतांना अटक केल्याने त्या वेळी ‘हिंदू दहशतवाद’ ही संज्ञा पुढे आली होती.

चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडविणार

पुणे : चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी आणि विविध समस्यांबाबत औद्योगिक संस्था संघटना आणि स्वयंसेवी संस्थांनी #UNCLOG_Chakan_MIDC मोहीम हाती घेतली. तसेच, काही दिवसांपूर्वी आमदार महेश लांडगे यांची भेट घेतली आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी केली होती.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मुंबई येथील दालनामध्ये चाकण औद्योगिक क्षेत्र वाहतूक कोंडी आणि समस्यामुक्त करण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या मावळ, खेड परिसरातील स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासह अपर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, सचिव (रस्ते), सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्य अभियंता, एमएसआयडीसी, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, पुणे, मुख्य अभियंता, एमआयडीसी, पुणे, प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पुणे, पोलीस उपायुक्त (वाहतूक), पिंपरी-चिंचवड, मुख्य अधिकारी, चाकण/तळेगांव नगरपालिका असे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
चाकण हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील एक अत्यंत महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असून, सध्या येथे अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या औद्योगिक क्षेत्रापुरत्याच मर्यादित नसून, स्थानिक रहिवाशांच्या जीवनमानावरही प्रतिकूल परिणाम घडवत आहेत, अशी भूमिका मा. मंत्रीमहोदय यांच्यासमोर आमदार लांडगे यांनी मांडली.

हिंजवडीप्रमाणे ‘सिंगल पॉईंट ॲथॉरिटी’ करा…
राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० (नाशिक फाटा ते खेड) एलिव्हेटेड कॉरिडॉर भूसंपादन (पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पीएमआरडी, एमआयडीसी, नॅशनल हायवे, पीडब्ल्यूडी किंवा जिल्हा परिषद अशा सर्व अस्थापनांशी समन्वय करण्यासाठी ‘सिंगल पॉईंट ॲथॉरिटी’) पिंपरी-चिंचवडमधून चाकण औद्योगिक पट्टयात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांचा विस्तार आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ (हडपसर ते यवत) आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ डी (तळेगाव–चाकण–शिक्रापूर) काम सुरू करणे. यासह रस्त्यांचे विस्तारीकरण व देखभाल, वाहतूक नियंत्रण व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक सुधारणा, पार्किंग व्यवस्थापन, औद्योगिक वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग (फ्रेट कॉरिडॉर), स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत, नगरपालिका), MSRDC, PWD, RTO आणि पोलीस विभाग यांच्यात समन्वय करुन दीर्घकालीन वाहतूक मास्टर प्लॅन तयार करून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्याची मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे. त्याला मंत्री महोदय यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.


चाकण औद्योगिक क्षेत्राची आता वाहतूक कोंडी-समस्यामुक्तीकडे वाटचाल!

  • महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

चंदननगर येथे माजी सैनिकांना झालेल्या त्रासाबद्दल पोलीस आयुक्तांकडून खेद व कठोर कारवाईची आदेश


कुटूंबीयांसह , कार्यकर्त्यांनी घेतली आयुक्तांची भेट

पुणे : येथील चंदन नगर भागात राहणाऱ्या मुस्लिम समाजाच्या घरांमध्ये घुसून त्यांना बांगलादेशी ठरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कथित हिंदुत्ववादी समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मानॉरीटीच्या वतीने आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेण्यात आली. यावेळी माजी सैनिक असलेल्या कुटुंबीयांच्या प्रतिनिधींनीनी पोलीस आयुक्तांसमोर संपूर्ण घटनाक्रम सांगितला असता “ या घटनेबद्दल नाराजगी व खेद व्यक्त करत सैन्य दलामध्ये कार्यरत असलेल्या कुटुंबाच्या बाबत अशा प्रकारची घटना होणे अत्यंत वाईट आहे व अशा प्रकारची कृती करणाऱ्यां विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. “ असे स्पष्ट आश्वासन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले

दिनांक 26 जुलै रोजी रात्री उशिरा चंदन नगर येथे शमशाद शेख यांच्या घरामध्ये घुसून बजरंग दल , विश्व हिंदू परिषद व इतर सकल हिंदू समाज वडगाव शेरी च्या नावाखाली स्वतःला हिंदुत्वादी म्हणवणाऱ्या समाजकंटक व्यक्तींनी गोंधळ घातला होता. यावेळी त्यांनी सदर कुटुंबीयांना रोहिंग्या, बांगलादेशी असे संबोधून त्यांची अवहेलना केली होती. यासंदर्भामध्ये पोलिसांकडे तक्रार करून सुद्धा कारवाई होत नसल्याने संबंधित कुटुंबीयांनी नॅशनल कॉन्फरन्सचे राहुल डंबाळे यांच्या उपस्थितीत आज पोलीस आयुक्त यांची भेट घेतली यावेळी सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा व अप्पर पोलीस आयुक्त मनोज कुमार पाटील यांचे अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते. तसेच यावेळी मानवी हक्क कार्यकर्ते अँड. असीम सरोदे, शहाबुद्दीन शेख, वसिम सय्य्द, अफजल खान, अझहर खान, मुफ्ती शाहीद , ॲड. तौसिफ शेख, आतिफ शेख, जावेद शेख, फिरोज खान, करिम शेख, समिर शेख , अस्लम सय्यद , सुफीयान तांबोळी , शारुख शेख , सादमान खान, साहील खान , इम्तियाज खान , हुसैन शेख. इत्यादी लोक सहभागी होते

पोलीस आयुक्त अमितेश कुमार
“ पुणे शहरांमध्ये अशा प्रकारची कोणतीही धार्मिक विद्वेशाची कृती खपवून घेतली जाणार नाही. कायद्याप्रमाणे जे वागणार नाहीत व चुकीची माहिती व दिशाभूल देणारी माहिती देऊन स्वतःचा अजेंडा चालवण्याचा प्रयत्न करतील अशांवर कठोर कारवाई करण्यात येईल. शहरांमध्ये कोणीही धार्मिक भीतीच्या छायेत राहू नये , समाजकंटकांवर कारवाई करण्यास आम्ही सक्षम आहोत असा विश्वास यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शिष्टमंडळात दिला “

राहुल डंबाळे ( एनसीएम )
“ अलिकडच्या काळात पुणे शहरातील धार्मिक ध्रुवीकरणाच्या घटनांमध्ये वाढ करून शहरातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम त्याच त्या व्यक्तींकडून व संघटनांकडून केला जात असल्याने अशांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे मत नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे राहुल डंबाळे यांनी व्यक्त केले. दरम्यान समाजकंटक व धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांच्या विरुद्ध या पुढील कालावधीमध्ये अधिक ताकतीने लढण्यात येणार असल्याचेही डंबाळे यांनी सांगितले.