Home Blog Page 382

बोगस “डॉक्टरेट” पासून सावध रहा!

मागच्या वर्षी मी एक लेख लिहिला होता, तो म्हणजे
“असले पुरस्कार नको रे बाप्पा !” त्याचे कारण म्हणजे, समाज माध्यमांचा गैरवापर करून खोटी प्रतिष्ठा ,प्रसिध्दी
मिळवू इच्छिणाऱ्या व्यक्तींकडून काही हजार रुपये घेऊन हे पुरस्कार सरळसरळ विकण्यात आलेले असतात .
तथाकथित पुरस्कार प्राप्त व्यक्ती त्या पुरस्कारासह छायाचित्रे काढून घेऊन,त्या सोबत स्वतःची माहिती देऊन प्रसार माध्यमे,समाजमाध्यमे यात ती प्रसिद्ध करून खोटी प्रतिष्ठा आणि खोटा मोठेपणा मिरवित राहतात.अजाण नागरिक या सर्व बोगस बाबींना भुलून पुरस्कार प्राप्त व्यक्तींना कधी समक्ष भेटून,फोन करून ,फेस बुक, व्हॉट्स ॲप वर भरभरून शुभेच्छा देत राहतात.

असेच गैर प्रकार तथाकथित
“डॉक्टरेट” “ऑनररी डॉक्टरेट” च्या बाबतीतही होत आहेत.
“डॉक्टरेट” किंवा “ऑनररी डॉक्टरेट” बोगस आहे,हे ओळखण्याच्या काही महत्वाच्या पुढील बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत, जेणेकरून आपली आणि आपल्या मार्फत समाजाची, सरकारची आणि अन्य संबंधित व्यक्ती,संस्था यांची होणारी फसवणूक टळू शकेल.अन्यथा अशा व्यक्तिविरुद्ध विविध कलमांद्वारे गुन्हे दाखल होऊन
अशा बोगस पदव्यांपासून मिळणारी बोगस प्रतिष्ठा मिळणे तर दूरच राहील, पण आपल्या वाडवडिलांनी आणि आपण कष्टाने कमविलेली आहे ती खरीखुरी प्रतिष्ठा धुळीस मिळू शकेल.या बाबतीत काय कायदेशीर कारवाई ला तोंड द्यावे लागू शकते,याविषयी कुणी कायदेतज्ञ,जाणकार वकील अधिक चांगला प्रकाश टाकू शकतील.

आता मिळणारी “डॉक्टरेट” किंवा “ऑनररी डॉक्टरेट” ही बोगस आहे, हे ओळखण्याच्या काही अत्यंत सोप्या बाबी आहेत.त्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत.
१) कुठलेही खरेखुरे विद्यापीठ हे,ह्या बोगस जाहिरातींप्रमाणे
समाज माध्यमातून जाहिराती
देत नाही.तर ते अधिकृत वृत्तपत्रांमधूनच जाहिराती देत असतात.
२)ह्या जाहिरातीमध्ये ह्या बोगस विद्यापीठांचे पूर्ण पत्ते, लॅन्ड लाइन फोन नंबर नसतात. तर संपर्क साधण्यासाठी फक्त मोबाईल क्रमांक दिलेला असतो.
३) दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रावर सुद्धा बोगस विद्यापीठांचे पूर्ण पत्ते नसतात.
४) जगातील कुठलेही विद्यापीठ हे त्यांचे पदवीदान समारंभ हे त्यांच्या पदवीदान सभागृहात किंवा पदवीदान समारंभ अतिशय भव्य स्वरूपात करावयाचा असेल तरी तो त्यांच्या प्रांगणातच आयोजित करीत असतात. अशा पदवीदान समारंभांना त्या विद्यापीठाचे कुलगुरू, विद्यापीठाने निमंत्रित केलेले,तोलामोलाचे प्रमुख पाहुणे,विविध विभागांचे प्रमुख, संबंधित विद्यार्थी, पालक असे शेकडोंच्या संख्येने उपस्थित असतात.
५) कुठलेही खरेखुरे विद्यापीठ हे ऑनररी डॉक्टरेट साठी मुळात जाहिरातच देत नाही, तर ते स्वतःहून कुठल्या
मान्यवर व्यक्ती ला अशी पदवी द्यायची ते ठरवीत असते.
६) बोगस पदव्यांचे बोगस पदवीदान समारंभ हे कुठल्यातरी पंचतारांकित हॉटेलमध्ये किंवा अशाच स्वरूपाच्या सभागृहात आयोजित करण्यात येतात.
आता हे सर्व बोगसच असल्यामुळे वर उल्लेख केला आहे त्याप्रमाणे तिथे कुणी कुलगुरू,प्रमुख पाहुणे ,हजारो विद्यार्थी,त्यांचे पालक असे कुणीही उपस्थित नसते. मात्र हे बोगस विद्यापीठ “आंतरराष्ट्रीय ” आहे हे भासविण्यासाठी एकदोन आफ्रिकन,पाश्चात्य गोरी माणसे उभी केलेली असतात.
अर्थात ती सुद्धा ह्या टोळीचा भाग असतात. काही वेळा मात्र,अशा भानगडींची काही कल्पना नसलेल्या काही भारतीय प्रतिष्ठित व्यक्ती देखील उपस्थित राहून ,अशा बोगस पदवीदान समारंभांची प्रतिष्ठा,शान वाढवित असल्याचे दिसून येते.
७) कुठलेली खरेखुरे विद्यापीठ हे ऑनररी डॉक्टरेट साठी एक पैसाही घेत नाही. कारण ती पदवी ही सन्मान म्हणून देण्यात आलेली असते.
८)बोगस डॉक्टरेट, ऑनररी डॉक्टरेट ह्या पदव्या सरळ सरळ लाखो रुपये घेऊन देण्यात आलेल्या असतात.
९) बरं,ह्या टोळ्या परदेशातीलच असतील,तर असेही नाही! मागे मी शोध घेतला असता,अशा बोगस विद्यापीठाचा पत्ता चक्क सांगलीचा निघाला.मी स्वतः येऊन पैसे भरतो,आपला पत्ता पाठविल्यास बरे होईल,असे सांगितल्यावर त्यांनी फक्त शिवाजी चौक,सांगली इतकाच पत्ता दिला. माझ्या सांगली येथील एका मित्राला तिथे जाऊन शोध घेण्यास सांगितले असता,तास भर शोध घेऊनही त्याला हे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, किंवा विद्यापीठाची साधी पाटीही कुठे दिसली नाही!मी संबंधित महिलेला फोन करून हे सांगितले तर तिने माझा फोन कट करून माझा नंबरच ब्लॉक करून टाकला.

माझ्या लक्षात आलेल्या काही बाबी मी वर नमूद केल्या आहेत. जाणकार मंडळी अधिक भर घालू शकतील.

तरी “बोगस डॉक्टरेट”, “ऑनररी डॉक्टरेट” मिळविण्यापासून सावध रहा. स्वतः फसू नका आणि ह्या पदव्या स्वतःच्या नावापुढे लावून इतरांना फसवू नका, असे कळकळीने सांगावेसे वाटते.

आपल्याला खरीखुरी डॉक्टरेट, खरीखुरी
ऑनररी डॉक्टरेट खरोखरच
खरेखुरे संशोधन करून मिळावी, समाजासाठी विशेष योगदान देऊन मिळावी,
यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
लेखक: देवेंद्र भुजबळ
9869484800

अलका भुजबळ यांचा सन्मान

मुंबई-

गेली ५ वर्ष न्यूज स्टोरी टुडे पोर्टल ची निर्मिती करणाऱ्या सौ अलका भुजबळ यांनी, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत,वयाच्या ६२व्या वर्षी नुकतेच न्यूज स्टोरी टुडे यू ट्यूब चॅनल सुरू केले आहे. या बद्दल त्यांचा सानपाडा जेष्ठ नागरिक संघाच्या मासिक आनंद मेळ्यात संघाचे अध्यक्ष मारुती कदम,संघाच्या उपाध्यक्षा डॉ विजया गोसावी आणि दुसऱ्या जेष्ठ सदस्या भानुमती शाह यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संघाचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यूज स्टोरी टुडे या यू ट्यूब चॅनेलवर “ओळख” या सदरात पहिलीच मुलाखत ही दोन विशेष मुलांची आई असलेल्या सौ अर्चना पाटील यांची घेण्यात आली आहे.सौ अर्चना पाटील यांची मुलगी कर्णबधिर असूनही आज ती आंतरराष्ट्रीय कीर्तीची भरतनाट्यम नृत्यांगना आहे. तर स्वमग्न असलेला मुलगा चक्क गणित विषयात पी एचडी करीत आहे.

सौ अलका भुजबळ यांनी घेतलेल्या या मुलाखतीत सौ
अर्चना पाटील यांनी त्यांची, त्यांची पतीची जिद्द , मुलांचा प्रतिसाद आणि नातेवाईकांचा झालेला असह्य त्रास हा सर्व संघर्ष अतिशय निर्लेपपणे उलगडून दाखविला आहे.

रोजगाराचा मुद्दा राजकारणाच्या पलीकडे, युवकांच्या न्यायहक्कासाठी काँग्रेस शेवटपर्यंत लढेल: हर्षवर्धन सपकाळ

पुणे-
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पार पडलेला “रोजगार सत्याग्रह” उत्स्फूर्त, शिस्तबद्ध आणि यशस्वी ठरला. २०१९ पासून रखडलेली जलसंपदा विभाग (WRD) आणि जलसंवर्धन विभागातील (WCD) स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकी अशा एकूण ४,६०० पेक्षा अधिक अभियंता पदांची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील २७ जिल्ह्यांमधून बेरोजगार अभियंते रस्त्यावर उतरले होते. यात ३५० हून अधिक अभियंत्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.

या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि रोजगार विभागाचे राज्य संयोजक धनंजय रामकृष्ण शिंदे यांनी केले. इंजिनिअर्स असोसिएशन या तरुण अभियंत्यांच्या संघटनेने राज्यभरातून आंदोलनाला सक्रीय पाठिंबा दिला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्हिडीओ कॉलद्वारे या आंदोलकांशी थेट संवाद साधला आणि पुणे दौऱ्यात प्रत्यक्ष भेटीचे आश्वासन दिले. “रोजगाराचा मुद्दा राजकारणाच्या पलीकडे असून, युवकांच्या न्यायहक्कासाठी काँग्रेस शेवटपर्यंत लढेल.” असे आश्वासन सपकाळ यांनी दिले. ज्येष्ठ काँग्रेस नेते गोपाळ तिवारी यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन उपस्थित युवकांशी संवाद साधला.

काँग्रेस पक्षाने राज्य सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या कालावधीत ठोस निर्णय न झाल्यास संभाजी नगरमधील WALMI च्या मुख्य गेटसमोर अनिश्चित कालीन सत्याग्रह करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी येत्या आठवड्यात चर्चा घेण्याचे आश्वासन दिले आहे अशी माहिती धनंजय शिंदे यांनी दिली.

चौफुल्यावर जाऊन ठाँय ठाँय गोळ्या मारू नका. अजितदादांनी कार्यकर्त्यांना सुनावले ..आपल्या सुनांना त्रास देऊ नका

पुणे-गत काही दिवसांपासून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सातत्याने वादात अडकत आहेत. यामुळे बेजार झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सुनावले आहे . तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहात. तुमच्याकडून कोणतीही चूक होऊ देऊ नका. उगीच कुठेही, किंवा चौफुल्यावर जाऊन ठाँय ठाँय करू नका,ढगात गोळ्या मारू नका असे ते हाताने बंदुकीचा इशारा करत म्हणालेत.

राष्ट्रवादी–महायुती सरकारच्या विकासाभिमुख कार्यशैलीने प्रेरित होऊन आमदार शंकर मांडेकर यांच्या नेतृत्वाखाली आज पुण्यात भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी मुळशी, भोर आणि राजगड तालुक्यातील विविध पक्षातील प्रमुख पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी नवप्रवेशित कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत करत सर्वांशी संवाद साधला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारधारेवर चालणारा, सर्वसमावेशक हिताचं भान जपणारा पक्ष आहे. आम्ही काम करताना कोणताही जात-पंथ-धर्माचा भेदभाव करत नाही. त्यामुळं कार्यकर्त्यांनी देखील सर्वांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका जोपासायची आहे.आपलं राष्ट्रवादी-महायुती सरकार राज्यातील तमाम जनतेच्या कल्याणासाठी, त्यांच्या न्याय-हक्कासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध आहे. राज्यात सर्व पायाभूत सुविधांचा विस्तार, सामाजिक योजनांची अंमलबजावणी आणि आधुनिकतेची जोड या साऱ्यांमधून आपण शाश्वत महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पावलं टाकत आहोत. या प्रवासात आपल्या सर्वांचा सक्रिय सहभाग राहावा व महाराष्ट्र हिताचं कार्य आपल्या सर्वांच्या हातून घडावं, हीच अपेक्षा आहे.

भोरचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाने चौफुला येथील एका कलाकेंद्रात गोळीबार केला होता. त्याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले होते. अजित पवार यांनी स्वतः या प्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा या प्रकरणाचा दाखला देत आमदार शंकर मांडेकर यांच्यासह वादात सापडणाऱ्या आपल्या कार्यकर्त्यांना सुनावले आहे.

चौफुल्याला जाऊन तरफडू नका.कुठेही जाऊन ठाँय ठाँय करू नका. ढगात गोळ्या मारू नका. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी झाले आहात. काहीजण सहकारी झालेत. त्यामुळे आता तुमच्याकडून कधीही, कुठेही चूक होऊ देऊ नका. अशाने संबंधित व्यक्तीची आणि तो ज्या पक्षाचा आहे त्या पक्षाचीही बदनामी होते. हे अजिबात चालणार नाही, असे अजित पवार शुक्रवारी सकाळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले. यावेळी त्यांच्या बाजूलाच आमदार मांडेकर बसले होते. अजित पवारांचे हे बोल ऐकूण ते वरमल्यासारखे झाले.

अजित पवार यांनी यावेळी पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणावरही भाष्य केले. काही जणांनी आपल्या सुनांना कशा प्रकारे त्रास दिला? त्यांनी आम्हाला लग्नाला बोलावले. त्यामुळे आम्ही लग्नाला गेलो. त्यात आमचा काही दोष आहे का? आम्ही त्यांना त्यांच्या सुनेला त्रास द्यायला सांगितले का? उद्या सरपंचाच्या घरी लग्न असेल आणि आम्हाला त्याचे निमंत्रण असेल तर आम्ही तिकडेही जाणार. पण उद्या काय दिवा लागणार हे आम्हाला कसे कळणार? आम्हाला माहिती असते तर आम्ही गेलोच नसतो. लक्षात ठेवा. आपापसात सलोखा ठेवा, असे अजित पवार म्हणाले. अजित पवारांनी यावेळी केलेल्या हाताच्या अॅक्शननंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम येथील विवाहित वैष्णवी हगवणे हिचा दोन महिन्यांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला होता. वैष्णवीला लग्नात फॉर्च्यूनर कार, 51 तोळे सोने, चांदीची भांडी दिली होती. त्यानंतरही हुंड्यासाठी तिचा छळ होत होता, असा तिच्या आई-वडिलांचा आरोप आहे. त्यांच्या मते, तिच्या सासरच्यांनी जमीन खरेदीसाठी 2 कोटींची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण न झाल्याने वैष्णवीचा छळ सुरू होता. या छळाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केली. वैष्णवीचे सासरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते.

महापालिकेच्या पथ विभागाने घेतला एका वृद्धाचा बळी

खड्ड्यात दुचाकी घसरली अन् वृद्धाचा कारखाली चिरडून मृत्यू, थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

पुणे- महापालिकेचे लाडके खाते असलेल्या पथ विभागाने बिबवेवाडी कोंढवा रस्त्यावर गंगाधाम चौकात केलेले रस्त्याचे काम आणि तिथे गेलेले बळी सर्वांना ठाऊक आहेतच , रस्तोरस्ती पडलेले खड्डे ,पडलेली वाळू, रस्त्यांच्या दुरावस्थेने पुणेकरांनी कमावलेली पाठीची, कंबरेची दुरवस्था हे सारे वर्षानुवर्षे पाहत असलेले पुणेकर एवढे सोशिक कि आपले जीव गमवतात पण महापालिकेच्या पथ विभागाची कधी कॉलर पकडून जाब विचारत नाहीत .अशाच महापालिकेच्या भाग्यवान पथ विभागाने आज आणखी एका वृद्धाचा बळी घेतला आहे. त्याचे असे झाले ,
खड्ड्यांमुळे गाडी स्लीप झाली आणि चालक मागून आलेल्या कारच्या चाकाखाली आला. यामध्ये 61 वर्षीय वृद्ध जगन्नाथ काळे यांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात औंधमधील गजबजलेल्या राहुल हॉटेलजवळ घडला.जगन्नाथ काळे हे आपल्या दुचाकीवरून जात असताना गाडी स्लीप झाली त्यामुळे ते तोल जाऊन रस्त्यावर कोसळले. याचवेळी मागून आलेल्या कारने त्यांना चिरडले. अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात स्पष्टपणे कैद झाला आहे.

आंधळी प्रजा ..अधांतरी दरबार … प्रशासका अजब तुझे सरकार …

रस्तोरस्ती चांगले रस्ते उखडायचे, पुन्हा पुन्हा कॉंक्रीटच्या नावाखाली करायचे ,इस्टीमेट म्हणजे पूर्वगणन पत्रक घोटाळा नंतर टेंडर घोटाळा, नंतर टक्केवारी हेही पाहत आलेले पुणेकर बिच्चारे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना साहेब साहेब करतच डोक्यावर घेतात आणि असे रस्त्यावर मृत्युमुखी पडतात असे चित्र वारंवार दिसून आले आहे. फार तर एखाद्या कोर्टात एखादी केस कोणी केली तर कोर्ट हि महापालिकेला नुकसानभरपाई देण्याचे आदेश देते अन .. अन काय ती लोकांनी भरलेल्या कारच्या पैशाच्या तिजोरीतूनच दिली जाते. ..

‘घाशीराम कोतवाल’ हिंदी रंगभूमीवर,ज्येष्ठ हिंदी अभिनेते संजय मिश्रा मध्यवर्ती भूमिकेत

ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर लिखित ‘घाशीराम कोतवाल’ हे  मराठी  आणि  भारतीय  रंगभूमीवरचं अत्यंत  महत्त्वाचं नाटक. ‘घाशीराम कोतवाल’चा पहिला प्रयोग होऊन (१६ डिसेंबर १९७२) आज ५२ वर्ष पूर्ण झाली आहेत.  हे नाटक आजवर सुमारे दहा भारतीय भाषांमधून आणि जगातील तीन भाषांमध्ये सादर झाले आहे. मात्र, हिंदीत हे नाटक व्यावसायिकदृष्ट्या सादर केले गेले नाही. त्यामुळे अभिजात कलाकृतीचं हे कालातीत नाटक हिंदी भाषकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हिंदी रंगभूमीवरही सादर करण्याचा निर्णय घेत लेखक-दिग्दर्शक अभिजित पानसे आणि भालचंद्र कुबल यांनी या हिंदी नाटकाचे शिवधनुष्य पेलले आहे. या नाटकाची पत्रकार परिषद नुकतीच संपन्न झाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेते मकरंद देशपांडे, ज्येष्ठ हिंदी अभिनेते संजय  मिश्रा, दिग्दर्शक अभिजित पानसे आणि भालचंद्र कुबल, नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर आदि मान्यवर उपस्थित  होते.

यावेळी बोलताना ज्येष्ठ हिंदी अभिनेते संजय मिश्रा म्हणाले की , ‘नाटक  करण्याची फार मनापासून इच्छा होती परंतु  चित्रपटांमुळे वेळ मिळत नव्हता. ‘घाशीराम कोतवाल’ अभिजात कलाकृतीचं हे कालातीत नाटक आणि त्याचा अवकाश फार मोठा आहे. असं नाटक करायला मिळतंय हे नट  म्हणून मला समृद्ध करणार होत. त्यामुळे उत्तम असा टीमसोबत हे जुळून आल्यानंतर मी होकार दिला’. एकीकडे मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी आणि ओटीटी सारखी नवीन माध्यमं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असताना नाटकांनी प्रेक्षकांच्या मनात आपली जागा कायम राखली आहे. मराठी नाटकात आजच्या विवंचना, आनंद, संघर्षाचे प्रतिबिंब दिसते. मराठी रंगभूमी एक प्रवाह आहे आणि या प्रवाहाचे मुख्य माध्यम म्हणून नाटकांकडे पहायला हवे ,असेही ते म्हणाले.

या नाटकाला शुभेच्छा देताना अभिनेता मकरंद देशपांडे म्हणाले की, नाटक जिवंत करण्याचं काम नट करत असतो. त्यातही  ‘घाशीराम कोतवाल’ सारखं अजरामर नाटक आणि त्यातली भूमिका  हे आव्हानच.  हे आव्हान संजय मिश्रा  सारखा कसलेला नट आणि अभ्यासू दिग्दर्शक अभिजित पानसे अशी मंडळी येऊन करतायेत ही नक्कीच मोठी गोष्ट आहे. अशा कलाकृती प्रेक्षकांपर्यंत  पोहचणं मला अधिक महत्त्वाचं वाटतं. 

‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक अमराठी प्रेक्षकांपर्यंत पोचविण्याच्या हेतून आम्ही ते हिंदीत सादर करीत असल्याचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी यावेळी नमूद केले. मूळ नाटकात नृत्य व संगीताला महत्त्वाचे स्थान होते, ते लक्षात घेऊन या नाटकाचा बाज आजच्या काळाला अनुसरुन सादरीकरणाच्या दृष्टीने लाइव्ह संगीत १२ ते १५ वाद्यांचा संच  मराठी लावणी आणि कव्वाली असा नजराणा या  नाटकात असल्याचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी यावेळी सांगितले. 

नाटक हे महाराष्ट्रातील कित्येक पिढयांचे व्यक्त होण्याचे माध्यम राहिले आहे. अशावेळी भाषेच्या सीमेपलीकडे जाणारे हे कालातीत नाटक हिंदीत आणण्याचा आनंद दिग्दर्शक भालचंद्र कुबल यांनी व्यक्त केला.  

हिंदीमध्ये येणारे ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक आकांक्षा माळी यांच्या ‘३३ एएम स्टुडिओ’, अनिता पालांडे आणि दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्या रावण फ्युचर प्रोडक्शनतर्फेसादर होणार आहे. संजय मिश्रा, संतोष जुवेकर, उर्मिला कानिटकर या  कलाकारांच्या दमदार अभिनयाने सजलेल्या या नाटकाचा  शुभारंभ  १४ ऑगस्ट  बालगंधर्व रंगमंदिर बांद्रा येथे रात्रौ ८.०० वा. रंगणार आहे. त्यानंतर पुढील प्रयोग १५ ऑगस्ट बालगंधर्व रंगमंदिर बांद्रा येथे रात्रौ ८.०० वा. व २३ ऑगस्ट टाटा थिएटर एनसीपीए, येथे रात्रौ ८.०० वा. होणार आहे.  ६० कलाकारांचा संच नाटकात काम करणार आहे.

हिंदी नाटकाची संहिता हिंदीतील प्रसिद्ध लेखक कवी प्रा. वसंत देव यांनी लिहिली आहे. पेशवेकालीन इतिहासाची पार्श्वभूमी असलेल्या या नाटकातून तेंडुलकरांनी वर्तमानकालीन राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. सत्ताधारी नाना फडणवीस घाशीराम कोतवालाला आपल्या मर्जीनुसार खेळवतो, त्याच वेळी समाजालाही खेळवतो. वेगवेगळ्या क्षेत्रात या घाशीरामाचे दर्शन आपल्याला प्रत्यही घडत असते, क्रौर्यतेच्या परिसीमेचे असे दर्शन घडवणार हे नाटक त्या दृष्टीने कालातीत आहे असे म्हणता येईल. 

नाटकातील गीते प्राध्यापक अशोक बागवे, चंद्रशेखर सानेकर, सुनिता शुक्ला त्रिवेदी व मंदार देशपांडे यानी लिहिली आहेत. तसेच  नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे असून, नृत्य दिग्दर्शन फुलवा खामकर तर संगीत मंदार देशपांडे यांचे आहे. प्रकाश योजना हर्षवर्धन पाठक तर वेशभूषा व वस्त्रसंकल्पना अभिजित पानसे, वस्त्रकौशल्य चैत्राली डोंगरे तथा वस्त्रनिर्मिती बळवंत काजरोळकर यांची आहे. निर्मिती प्रमुख मंदार टिल्लू असून व्यवस्थापनाची जबाबदारी  संतोष महाडिक यांनी सांभाळली आहे.

या नाटकाचे प्रयोग नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्सच्या वतीने नरीमन पॉईंट येथील टाटा थिएटर मधे होणार असून कार्यकारी अधिकारी राजेश्री शिंदे यांनी या सहकार्याबाबत आपला आनंद व्यक्त करत म्हटलं आहे, “घाशीराम कोतवालच्या निर्मितीशी जोडले गेलो आहोत याचा आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. विजय तेंडुलकर यांचे प्रतिष्ठित नाटक घाशीराम कोतवालच्या नव्या सादरीकरणाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये चांगलीच वाढीस लागली आहे.”

नागरिकांना सुलभ, सहज सेवा मिळाव्यात या दृष्टीने १५० दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम यशस्वी करा- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पुणे: नागरिकांना सेवा पुरवताना त्या सहजतेने, सुलभरित्या मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री यांचा १५० दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम यशस्वीरित्या राबवावा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले. सर्व अद्ययावत कायदे, नियम, शासन निर्णय आदींची माहिती आपल्या संकेतस्थळावर अपलोड करावी जेणेकरुन नागरिकांचा फायदा होईल, असेही ते म्हणाले.

१५० दिवसांचा कृती आराखडा अंमलबजावणीच्या आढाव्यासाठी विधानभवनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त आयुक्त (सामान्य प्रशासन) तुषार ठोंबरे यांच्यासह विविध विभागप्रमुख, जिल्हास्तरीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते. विभागातील जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

या मोहिमेत कोणतीही शिथीलता येणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना देऊन डॉ. पुलकुंडवार म्हणाले, ही मोहिम प्रभावीपणे राबविण्याचे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे निर्देश आहेत. ई- गव्हर्नन्स सुधारणा, विकसित महाराष्ट्र २०४७ आणि सेवाविषयक सुधारणा हे तीन मुख्य घटक असून सर्व शासकीय सेवा डिजिटल माध्यमातून नागरिकांना मिळाव्यात यावर भर द्यावा. सेवा देताना नियमांची अचूक माहिती असावी यासाठी सर्व अद्ययावत नियम, कायद्यांच्या प्रती उपलब्ध करून ठेवाव्यात. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर तसेच ज्या जिल्हास्तरीय कार्यालयांची संकेतस्थळे असतील त्यांनी असे नियम, कायदे अपलोड करावेत.

सर्व जिल्हाधिकारी आपल्या अधिनस्त महसूल विभागातील कार्यालये तसेच जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांकडून या आरखड्याच्या अनुषंगाने होत असलेल्या कार्यवाहीचा नियमित आढावा घेऊन गती द्यावी. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्या अधिनस्त कार्यालयात हा उपक्रम उत्कृष्ट पद्धतीने राबविण्याबाबत आढावा घेऊन गती द्यावी, असेही ते म्हणाले.

यावेळी श्री. ठोंबरे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे १५० दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमातील समाविष्ट बाबी, राबवावयाचे उपक्रम आदींची माहिती दिली.

आपले सरकार सेवा पोर्टलद्वारे ऑनलाईन सेवा प्रदान करणे, नागरिकांच्या तक्रार निवारण यंत्रणेचे बळकटीकरण करणे, अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी डॅशबोर्ड तयार करणे, व्यवसायांच्या दृष्टीने कामकाजातील कार्यक्षमता वाढविण्यासाठी उद्योग, व्यवसायांना अधिक मदत होईल या पद्धतीने कागदपत्रे कमी करून मंजुरी प्रक्रियेचे टप्पे व वेळ कमी करणे आदी काम या आराखड्यात करणे आवश्यक आहे.

६ मे पासून या उपक्रमाची सुरूवात झालेली आहे. संकेतस्थळ, आपले सरकार, ई- ऑफीस, डॅशबोर्ड, आणि नवीन तंत्रज्ञान आधारित सेवा (वेब अप्लिकेशन) यावर आधारित २०० गुणांची ही स्पर्धा आहे.

लवकरच पहिल्या टप्प्यात मोहिमेच्या अंतरिम प्रगतीचा आढावा घेण्यात येणार आहे. २ ऑक्टोबर रोजी मोहिमेचा अंतिम अहवाल सादर करण्यात येणार असून स्पर्धेचा निकाल २५ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर केला जाणार आहे. अंतरिम टप्प्यातील मूल्यमापन क्वालिटी कौंसिल ऑफ इंडिया या बाह्य संस्थेमार्फत करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

गणेशोत्सवावरील कालमर्यादेची बंधने शिथिल व्हावीत यासाठी न्यायालयात बाजू मांडू – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे: सण उत्सव साजरे करत असताना ध्वनिक्षेपक किंवा इतर अनुषंगाने न्यायालयाने कालमर्यादेबाबत बंधने घातलेली असून त्यातील काही दिवस ठरावीक मर्यादेची शिथिलता देण्यात येते. त्यापैकी अधिकाधिक दिवस गणेशोत्सवासाठी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, तसेच गणेशोत्सव साजरा करत असताना कालमर्यादेची बंधने शिथिल व्हावीत यासाठी न्यायालयामध्ये बाजू मांडण्याचे काम करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्यावतीने आयोजित ‘पिंपरी चिंचवड राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२४’ बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित या कार्यक्रमास आमदार हेमंत रासने, शंकर जगताप, श्रीमंती दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, पिंपरी चिंचवड राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजक विलास कामठे, बापूसाहेब धमाले, कैलास भांबुर्डेकर आदी याप्रसंगी उपस्थित होते.

गणेशोत्सव सर्वांना एकत्र करणार आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेला हा गणेशोत्सव जगातील पावणेदोनशे देशात साजरा केला जातो. जगामध्ये गेलेले भारतीय गणेशोत्सव साजरे करत असतात. नवी पिढीदेखील या उत्सवात मनापासून काम करत असते. आपली भारतीय संस्कृती, परंपरा, सण हे सर्वांना बरोबर घेऊन जाणारे आहेत. सर्वांमध्ये आपलेपणा, एकोपा निर्माण करणारे आहेत. त्यातून अनेकांना सामाजिक क्षेत्रात संधी मिळत असते, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

श्री. पवार पुढे म्हणाले, गणेश मंडळे वर्षाचे ३६५ दिवस काम करत असतात. सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक जागृतीचा सुंदर सेतू निर्माण करण्याचे काम करतात, ही अभिमानाची बाब आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट हे समाजसेवेचे शक्तीकेंद्र ठरले आहे. गणेशोत्सवात कोणीही मागे राहू नये यासाठी सर्वांनी सहभाग घ्यावा.

गणेशोत्सव हा राज्य उत्सव व्हावा यासाठी आमदार रासने यांनी विधानसभेत भूमिका मांडली. आणि मुख्यमंत्री तसेच आपल्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री आणि सर्व सभागृहाने पाठिंबा दिला, ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे, अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या.

आपली भूमी साधू, संतांची, वारकऱ्यांची असून कोणतेही गालबोट न लागता उत्सवा साजरा केला जावा. हे करत असताना सामाजिक भान देखील ठेवले पाहिजे. निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. आगामी गणेशोत्सव सामाजिक सलोखा राखून, पर्यावरण पूरक साजरा करावा. पर्यावरण संरक्षणासाठी गणेश विसर्जन कृत्रिम हौदात केले जावे, अशी भूमिकादेखील त्यांनी मांडली.

राज्य शासन पुणे, पिंपरी चिंचवडसह राज्यातील शहरे आणि राज्याच्या विकासासाठी अनेक प्रकल्प राबवत आहे. पुणे, पिंपरी चिंचवडमधील वाहतूक कोंडी सुटावी यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा आणि पीएमआरडीएचा रिंग रोड, मेट्रोची कामे करण्यात येत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. विकास कामे करत असताना जमिनीची आवश्यकता लागते. पुणे, पिंपरी चिंचवडच्या भविष्याचा विचार करता त्यासाठी नागरिकांनीही सहकार्य केले पाहिजे, असेही आवाहन त्यांनी केले.

राज्यात पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आदी वेगवेगळ्या ठिकाणी औद्योगिक गुंतवणूक यावी यासाठी राज्यशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र उद्योजकांचा जास्तीत जास्त कल पुणे परिसरात येण्याकडे असतो. त्यामुळे त्यांना सुविधा देणे गरजेचे असते. विकास करत असताना ज्यांच्या जमिनी जातील त्यांची पर्यायी व्यवस्थाही केली जाईल. कोणाची गैरसोय होणार नाही, असेही ते म्हणाले.

गणेशोत्सव कालावधीत मेट्रो सेवा रात्री उशीरापर्यंत व पहाटे लवकर सुरू व्हावी ही मागणी पाहता तथा सूचना मेट्रो प्रशासनाला देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

आमदार श्री. रासने प्रास्ताविकात म्हणाले, १८९३ साली लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. समाज संघटित करण्याचे कार्य या उत्सवातून होत आहे. पिंपरी चिंचवड येथे गेली ४० वर्षापासून या स्पर्धेचे आयोजन होत आहे. यावर्षी सुमारे २६० मंडळांनी या स्पर्धेत भाग घेतला आणि त्यापैकी ९६ मंडळे बक्षिसासाठी पात्र ठरली. गणेशोत्सव हा राज्य उत्सव व्हावा या विधानमंडळात मांडलेल्या भूमिकेला यश आले. गणेश मंडळांमार्फत वर्षभर समाजोपयोगी काम होत असते. हा उत्सव निर्बंधमुक्त व्हावा यासाठी प्रयत्न व्हावेत. उत्सवादरम्यान कोणतेही गैरप्रकार होणार नाहीत यासाठी गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते प्रयत्नशील राहतील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

आमदार श्री. जगताप म्हणाले, समाजाची एकरुपता गणेशोत्सवातून दिसून येते. सर्व जाती, धर्म, पंथातील लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सव मंडळांनी चांगल्या प्रकारचे सार्वजनिक उपक्रम राबवून समाजात एकोपा रहावा यासाठी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.

या स्पर्धेत प्रथम आलेल्या श्रीमंत छत्रपती शिवाजी तरुण मंडळ थेरगाव, द्वितीय बक्षीस प्राप्त कै. दामूशेठ गव्हाणे मित्र मंडळ भोसरी, तृतीय क्रमांकाचे बक्षीस चिंतामणी मित्र मंडळ वाल्हेकरवाडी चिंचवडगाव, चतुर्थ क्रमांक भैरवनाथ मित्र मंडळ आकुर्डी, पाचवे बक्षीस भैरवनाथ मित्र मंडळ पिंपळे गुरव काशिदवाडी यांच्यासह अ, ब, क, ड विभागासाठीची बक्षिसे, शालेय विभाग आणि सजावट विभागातील बक्षिसे वितरीत करण्यात आली.

यावेळी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिलेल्या परीक्षकांचाही सन्मान करण्यात आला.

पुनीत बालन यांचे DJ मुक्त आणि विसर्जन मिरवणुकीबाबत ऐतिहासिक निर्णय…पण आ.रासनेंचे निर्णय ?

पुणे- आजपर्यंत दरवर्षी गणेशोत्सव झाल्यावर त्यातील त्रुटी,लोकांना होणारा त्रास, मिळणाऱ्या सोयी सुविधा आणि धार्मिकता यावर चर्चा होत राहिली पण गेल्या वर्षापासून यात आता बदल होतो आहे. कधी काळी जनक कोण ? टिळक कि रंगारी..असा वाद निर्माण करून आपले राजकीय हित साधून झालेले आता यात अजून तरी दूर आहेत.पण त्यांचेच काही चेहरे आता गणेसोत्सव २४ तास सुरु राहिला पाहिजे यासाठी विधानसभेपासून पुण्यात आणलेल्या आय ए एस अधिकाऱ्यांना या धोरणाप्रमाणे वागायला प्रवृत्त करत असताना पुनीत बालन यांनी यंदा गणेशोत्सवाला चांगली दिशा देण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याचे दिसले आहे. गेल्या वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने विसर्जन मिरवणुकीत लवकर सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि आता बालन यांनी काही निर्णय घेतलेत त्यामुळे आता एकूणच गणेशोत्सवात महत्वपूर्ण बदल होत तो लोकमनावर आरूढ होण्याची शक्यता दिसू लागली आहे.

श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाने विसर्जन मिरवणूक वेळेत होण्यासाठी २०२३ मध्ये महत्वाचा निर्णय घेतला.दुपारी 4 वाजताच विसर्जन मिरवणुकीत सहभागी व्हायचे हा निर्णय २०२४ लाही कायम होता.साधारणतः जो दगडूशेठ गणपती दुसऱ्या दिवशी सकाळी विसर्जित होत तेव्हा त्यावेळी सकाळी भाविकांना या गणपतीच्या दर्शनासाठी यावे लागत आणि विसर्जन मिरवणूक २४ तासाहून अधिक काल लांबत.खरे तर हा उत्सव धार्मिक नसून तो सामाजिक आहे हि बाब यात प्रामुख्याने काही लोक अजूनही जाणून आहे. इंग्रजांच्या विरोधात स्वातंत्र्य चळवळीला दिशा मिळायला विचार विनिमय करण्यासाठी एकत्र येण्याची गरज होती, सामाजिक अस्पृश्यता,भेदभाव,देशातील आर्थिक असमतोल, सर्वधर्मसमभाव,एकता,बंधुता आणि समाजाला होणारे उपद्रव थांबविण्यासाठी तेव्हा धार्मिकतेचा आधार देऊन टिळकांनी किंवा भाऊ रंगारी यांनी उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले.आणि हा उत्सव सार्वजनिक झाला पण तो सामाजिक हिताचा होता.आता देशाला स्वातंत्र्य मिळालेले आहे. इंग्रज उरलेले नाहीत पण उत्सव सुरु आहे. पण त्याचे उद्दिष्ट्य जे सामाजिक उत्सवाचे होते ते मात्र पूर्णपणे हरवत चालले आहे आणि आता हा उत्सव राजकीय बनला आहे.येथून नगरसेवक,आमदार,खासदार बनविण्याची फॅक्टरी जणू तो बनला आहे. आणि केवळ हीच फॅक्टरी येथून व्यवस्थित कार्यरत होते आहे. पण ती होत असताना समाजाला होणारे उपद्रव थांबविण्यासाठी हा उत्सव हा हेतू मात्र उत्सव साजरा करणारे बरेच जण विसरू लागले आहेत.

या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची,गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची चंगळ होत गेली आणि हेच आपले निवडणुकीतील खरे प्रचारक म्हणून त्यांना बळ देण्यासाठी राज्यकर्त्यांनी त्यांच्या मागे उभे राहणे पसंत केले.आणि याच भावनेतून आता आमदार रासने यांनी २४ तास उत्सव सुरु ठेवा अशी आरोळी विधानसभेपासून गल्लीतील मंडळापर्यंत ठोकली आहे. ज्याने सामाजिकतेची जाणीव न उरलेले कार्यकर्ते हर्षोल्हासात डुंबत आहेत.पण जनतेच्या भावना यात समजून घ्यायला कोणी पुढे येईनासे झालेय.

पुनीत बालन…हे पुण्यातील अलीकडच्या वर्षात पुढे आलेले नाव,जेव्हा टिळक कि रंगारी असा वाद उकरून काढला गेला,त्यानंतर काही काळातच बालन यांचे नाव पुढे आले आणि हा वाद हि शमला,मागे टाकून उत्सवाला रंगत भरायचे काम बालन यांनी सुरु केले,बालन यांचा उत्सवातील आणि एकूणच मंडळांमधील लोकप्रियतेचा चढता आलेख दिसत असताना २०२३ मध्ये दगडूशेठ मंडळाने अगदी योग्य निर्णय घेतला तो विसर्जन मिरवणूक लवकर संपावी म्हणून सायंकाळी ४ वाजता मिरवणुकीत सहभागी होण्याचा.त्याचे कौतुक व्हायलाच हवे होते आणि झालेही व आजही सर्वांना आहेच.

आता यापुढे हा उत्सव सरकत आहे. बालन यांच्या नव्या घोषणेने…ती म्हणजे DJ मुक्त गणेशोत्सव..शेकडो नाही तर तमाम पुणेकर( सामाजिकता विसरलेले कार्यकर्ते सोडून ) या निर्णयाचे स्वागतच करतील कानठळ्या बसणारी बीभत्स गाणी तर सोडा पण आरती सुद्धा सुमधुर आणि कानाला भावेल,मनाला भक्तीच्या प्रांगणात रमवेल अशाच आवाजाच्या मर्यादेत हवी यात शंका नाही. आता बालन यांचा हा निर्णय किती मंडळे आचरणात आणतील ते दिसेलच.पण सर्वांनीच आणला तर सुरेख होईल असे पुण्यात राहणाऱ्या रहिवाश्यांना ( सामाजिकता विसरलेले कार्यकर्ते सोडून )नक्कीच वाटत असेल.

एवढ्यावरच पुनीत बालन थांबेले नाहीत तर त्यांना २ वर्षात हेही समजले कि, दगडूशेठ सायंकाळी ४ वाजता मिरवणुकीत येऊनही मिरवणूक लांबते आहेच. या समस्येवर त्यांना अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी साथ द्यायचे ठरविले आणि आता अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट यावर्षीपासून सायंकाळनंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी न होता, मानाचे पाच गणपती टिळक पुतळ्यापासून मार्गस्थ झाल्यानंतर त्या पाठोपाठ मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. लक्ष्मी रस्त्यावरून दरवर्षी निघणाऱ्या वैभवशाली गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी हे मोठे ऐतिहासिक निर्णय नक्कीच या उत्सवाला चांगली नवी दिशा देणारे ठरू शकतात.

आता यावर त्यांनी खरे तर उत्सवाला सामाजिकतेचे रूप पुन्हा प्राप्त करून देण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहेत असे मान्य केले तर हे निश्चितच या उत्सवाच्या इतिहासात नोंद घेणारे ठरेल.

पण ….

या दोन्ही मंडळांनी या वर्षी मिरवणुकीत लवकर सहभागी व्हायला कारण वेगळे दिले आहे यावर्षी अनंत चतुदर्शी म्हणजे विसर्जनाचा दिवस (दि.६ सप्टेंबर) च्या दुसऱ्या दिवशी (दि.७ सप्टेंबर) खग्रास चंद्रग्रहण असल्याने ग्रहणकाळात देवाच्या सर्व मूर्ती झाकून ठेवण्याची प्रथा आहे. त्यामुळे दुपारी १२ पूर्वी मंडळाच्या मूर्ती मंदिरात पुन्हा येणे आवश्यक्य आहे.असे कारण दिले आहे. हेही इथे लक्षात घेणे गरजेचे आहे.

आणि आमदार रासने यांनी तर २४ तास उत्सव सुरु राहिला पाहिजे अशी भूमिका राबवायला सुरुवात केली आहे ती कितीजणांना मान्य असेल ?

आता DJ मुक्त उत्सव,विसर्जनाच्या दिवसातच मर्यादित वेळेतच होणारे विसर्जन,याबरोबर रस्तोरस्ती सर्वत्र वाहतुकीची कोंडी करणाऱ्या कमानी मुक्त उत्सव केला तर किती बरे होईल.मंडळांच्या समोर १०/१५ मीटर कमानी राहू द्यात..पण शहरभर,उपनगरे भर या कमानी काय चमत्कार करतात हे सर्वांना ठाऊक आहे. तेव्हा उत्सव असा हवा कि लोकांना तो हवाहवासा वाटायला हवा,जरी कार्यकर्त्यांना मेहनत पडत असली तरी तो केवळ कार्यकर्त्यांचे कोडकौतुका साठी नव्हे तर लोकांच्या हितासाठी,समाजाला उपद्रव वाटणार नाही आणि सामाजिक अस्पृश्यता नष्ट करणारा,भेदभाव नष्ट करणारा,देशातील आर्थिक असमतोल दूर करणारा, सर्वधर्मसमभाव भावना तळागाळापर्यंत रुजविणारा,एकता,बंधुता जोपासणारा झाला तर निश्चित तो जागतिक पातळीवर हवाहवासा ठरेल यात शंका नाही.

बाणेर – बालेवाडी भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अमोल बालवडकर यांची टीम रस्त्यावर

  • २० प्रशिक्षित ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती.वाहतूक कोंडी होत असलेल्या चौकांमध्ये अमोल बालवडकर सोशल फाउंडेशन तर्फे होणार ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती…

पुणे :- बाणेर, बालेवाडी परिसर वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल बालवडकर सोशल फाउंडेशन तर्फे २० ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती करण्यात आली आहे. या ट्रॅफिक वॉर्डन मुळे बाणेर, बालेवाडी परिसरात वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.गेल्या अनेक दिवसांपासून बाणेर-बालेवाडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. बाणेर मुख्य रस्ता, राधा चौक, सायकर चौक, बालेवाडी फाटा, ज्युपिटर हॉस्पिटल रोड, बाणेर बालेवाडी रोड, साई चौक, ममता चौक तसेच महामार्गावर व सर्विस रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडी मध्ये वाहन चालवताना वाहन चालकांची दमछाक होत असलेली दिसून येत आहे. अर्धा ते एक किलोमीटर अंतर कापण्यासाठी एक तासाच्या वर वेळ लागत आहे. ही वाहतूक कोंडी सोडविताना पोलीस प्रशासनाचे देखील दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे. बाणेर-बालेवाडी सारख्या मोठ्या परिसरामध्ये वाहतूक पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे वाहतूक पोलिसांना देखील ही वाहतूक कोंडी सोडविण्यास अपयश येत आहे. या सर्व बाबींचा विचार करून माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी अमोल बालवडकर सोशल फाउंडेशनच्या मार्फत बाणेर बालेवाडी परिसरामध्ये २० ट्रॅफिक वॉर्डनची स्वखर्चातून नियुक्ती केली आहे. या वॉर्डनमुळे बाणेर बालेवाडी परिसरामध्ये वाहतूक कोंडी सुटण्यास मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. 2022 साल पासून अमोल बालवडकर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून बाणेर बालेवाडी परिसरात वेळोवेळी ट्रॅफिक वॉर्डन तर्फे ट्रॅफिक नियोजन करण्यात येत आहे. बालवडकर यांच्यातर्फे स्वखर्चाने लाखो रुपये खर्चून या वॉर्डनची नियुक्ती करण्यात येत आहे. ट्रॅफिक वॉर्डन मुळे अनेक गर्दीच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत होत असल्यामुळे नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे. अमोल बालवडकर हे कामाचा माणूस असल्याचे मत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले.बाणेर बालेवाडी परिसरामध्ये मेट्रोचे काम सुरू आहे. तसेच अनेक ठिकाणी पर्याय रस्ते देखील सुरू होणार आहेत. हे रस्ते सुरू झाल्यावर व मेट्रोचे काम संपल्यावर वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही . परंतु ही कामे होण्यासाठी अजून काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी वाहतूक विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून तसेच मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेर बालेवाडी परिसरामध्ये अमोल बालवडकर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून २० ट्रॅफिक वॉर्डन नेमण्यात आले आहेत. याआधी देखील वेळोवेळी अमोल बालवडकर सोशल फाउंडेशन तर्फे परिसरामध्ये वॉर्डनची नियुक्ती करण्यात आली होती असे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले.

“कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक स्वाती साठे निवृत्त

पुणे-“महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून दिनांक ३१.०७.२०२५ रोजी कारागृह विभागातील सेवा निवृत्त होणाऱ्या प्रथम महिला विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीमती स्वाती मृणालिणी माधव साठे यांचा भव्य सेवापूर्तीचा सत्कार समारंभ दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, के. के. भवन हॉल, येरवडा, पुणे येथे संपन्न झाला .

सेवानिवृत्तीच्या समारंभामध्ये सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या हस्ते विशेष कारागृह महानिरीक्षक स्वाती साठे यांचा शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला आहे. या प्रसंगी सुहास वारके यांना मनोगत व्यक्त करताना शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होणाऱ्या श्रीमती स्वाती साठे, विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी चांगल्या प्रकारे सेवा केली व त्याच बरोबर पोलीस व कारागृह सेवेसारख्या ताणतणावाचे सेवेमध्ये आरोग्य चांगल्या प्रकारे राखून काम केले याचे कौतुक केले. तसेच यापुढे देखील त्यांचे आरोग्य चांगले राहो व त्यांची वैयक्तिक ईच्छा पूर्ण होवो अशा शुभेच्छा दिल्या.

सेवानिवृत्तीच्या समारंभास उपस्थित असणारे कारागृह विभागातील योगेश देसाई, कारागृह उपमहानिरीक्षक, दक्षिण व पूर्व विभाग व कारागृहातील सर्व अधीक्षक यांनी देखील स्वाती साठे यांचे बरोबर एकत्रित केलेल्या कर्तव्याच्या गतकाळातील चांगल्या प्रसंगाच्या आठवणी सांगून उपस्थितांना आवाहन केले. या समारंभात प्राचार्य नितीन वायचळ, दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा, पुणे यांचे सह महाराष्ट्र कारागृहातील इतर कारागृह अधिकारी व कर्मचारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे सूत्र संचालन सत्यवान हिंगमिरे, वरिष्ठ प्रशासन अधिकारी, मुख्यालय, पुणे व रजनी मोटके यांनी केले.”

‘एन्काउंटर स्पेशलिस्ट’ दया नायक निवृत्त


सहाय्यक पोलीस आयुक्त पदावरून त्यांनी आज अधिकृत निवृत्ती घेतली.

मुंबई:मुंबईतील गँगस्टर्स, गुन्हेगारांचा कर्दनकाळ असलेले एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक हे आज निवृत्त झाले आहेत. दया नायक हे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झाले. १९९५ साली दया नायक मुंबई पोलीस दलात भरती झाले होते. त्यानंतर आता सुमारे ३१ वर्षांच्या कारकिर्दीचा प्रवास थांबला. संघर्ष, वादग्रस्त वळणं आयुष्य दया नायक यांच्या वाट्याला आले. जेवढी प्रसिद्धी आली तेवढीच बदनामीही त्यांच्या वाट्याला आली. ९०च्या दशकात मुंबईतील गँगस्टर टोळी संपवण्यात दया नायक यांची भूमिका महत्वाची होती.

या नायक यांच्या नावावर ८६ एन्काउंटर आहेत. तर एक हजारांहून अधिक आरोपींना त्यांनी तुरुंगात पाठवले आहे. यामध्ये दाऊदच्या टोळीतील २२ गुंडांचा, राजन टोळीतील २० गुंडांचा समावेश आहे.लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम (LTTE), लष्कर ए तैय्यबा यासारख्या प्रतिबंधक संघटनांशी संबंधित व्यक्तींचाही खात्मा नायक यांनी केला होता.

कंदहार विमान अपहरण प्रकरणातील दहशतवाद्यांशी संबधित तीन दहशतवाद्यांचा नायक यांनी एन्काउंटर केला होता. दहा महिन्यांपूर्वी ते एसीपी पदासाठी पात्र ठरले होते. निवृत्तीच्या दोन दिवस आधी त्यांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली होती.

१९९० च्या दशकात दया नायक यांना मुंबई पोलीस दलात एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख मिळाली होती. त्यांनी मुंबईतील ८६ गुंडांचा एन्काउंटर केलाय. कर्नाटकातील उडुपी येथे जन्मलेले दया नायक कोकणी भाषिक कुटुंबातील आहेत.

कन्नड माध्यमाच्या शाळेत सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर, १९७९ मध्ये ते नोकरीच्या शोधात मुंबईला आले. येथे त्यांनी एका हॉटेलमध्ये काम करत असतानाच गोरेगावमधील महापालिकेच्या शाळेतून दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अंधेरीतील सीईएस कॉलेजमधून पदवी प्राप्त केली.

‘मैं ना भुलूंगा’ कार्यक्रमातून स्व. मनोज कुमार आणि शाहिद जवानांना श्रद्धांजली

शहीद कुटुंबीयांना स्वरकिरण सांगीतिक रंगमंच तर्फे आर्थिक मदत

पुणे (प्रतिनिधी): भारतीय नागरिकांना देशभक्तीची प्रेरणा देणारे हिंदी सिनेमा दिग्दर्शक, अभिनेते मनोज कुमार उर्फ भारत कुमार यांचे ५ एप्रिल २०२५ रोजी निधन झाल्याने त्यांना तसेच देशाच्या सीमा संरक्षण साठी हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंधूर युद्ध मोहिमेत शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पुण्यातील स्वरकिरण सांगीतिक रंगमंच या संस्थेच्या वतीने ‘मैं ना भुलूंगा’ हा सांगीतिक आणि सामाजिक कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.

ऑपरेशन सुंदर मध्ये शहीद जवान स्व. संदीप पांडुरंग गायकर ब्राह्मणवाडा, जि. अहिल्यानगर यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांचे कुटुंबीय आई-वडील, वीर पत्नी व मुले देखील उपस्थित होते. प्रसंगी संस्थेचे संस्थापक निर्माते ॲड. पी. टी. जगदाळे यांच्या सहकार्यातून अर्थसहाय्य देखील या कुटुंबीयांना करण्यात आले.

घोले रोडवरील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश हंगे, नि. कर्नल किशोर मोरे, प्रभाकर पवार, डॉ. देवीदास अत्तरदे, रवी जगदाळे, काशीराम चव्हाण, श्रीधर भोसले, उमेश उपाळे, सौ. किरण सावंत, विजय महाडिक, राजेश महाडिक, वीरेंद्र नागतोडे आदी उपस्थित होते.

महसूल सप्ताहात नागरिकांनी सहभागी व्हावे- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

विभागीय आयुक्तांकडून महसूल दिनाच्या शुभेच्छा

पुणे, दि. ३१: सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून महसूल विभाग कार्यरत असून विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यासाठी दरवर्षी १ ऑगस्ट रोजी महसूल दिन आयोजित करण्यात येतो. या निमित्ताने शासकीय योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा यासाठी १ ते ७ ऑगस्ट २०२५ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या महसूल सप्ताहामध्ये नागरिकांना सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले. डॉ.पुलकुंडवार यांनी महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

महसूल दिनानिमित्त आपल्या संदेशात डॉ.पुलकुंडवार म्हणतात, महसूल विभाग हा महाराष्ट्र शासनाचा, प्रशासनाचा कणा म्हणून कार्यरत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना विविध सेवा देण्याच काम महसूल विभाग करतो. जमीनीचे अभिलेख तयार करणे, अद्ययावत ठेवणे, सातबारा अद्ययावत ठेवणे व नागरिकांना सहजरित्या उपलब्ध करुन देणे हे महसूल विभागाचे ध्येय आहे. नागरिकांचे महसूल न्यायालयात प्रलंबित असलेले प्रश्न लवकरात लवकर निकाली निघावेत, विनासायास व कमीत कमी कष्टामध्ये प्रलंबित प्रकरणे निकाली काढता आली पाहिजेत, नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे असे महसूल विभागाचे धोरण आहे. यासाठी महसूल विभाग नवनवीन उपक्रम राबवित आहे. महसूल दिनी सर्व तालुके,उपविभाग आणि जिल्ह्याच्या ठिकाणी महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे, असे डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले.

महसूल सप्ताहानिमित्त १ ऑगस्ट रोजी महसूल दिन आणि महसूल सप्ताहाचा शुभारंभ, २ ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर सन २०११ पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करण्याबाबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. ३ ऑगस्ट रोजी पाणंद/शिवरस्त्यांची मोजणी करुन त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे, ४ ऑगस्ट रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ प्रत्येक मंडळनिहाय राबविणे, ५ ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेतील थेट लाभ हस्तांतरणय (डीबीटी) न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करुन डीबीटी करुन अनुदानाचे वाटप करणे, ६ ऑगस्ट रोजी शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व ती अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार (नियमानुकूल करणे/सरकारजमा करणे) निर्णय घेणे आणि ७ ऑगस्ट रोजी कृत्रीम वाळू धोरणाची (एम-सँड) अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे धोरण पूर्णत्वास नेणे याबाबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहनही विभागीय आयुक्तांनी केले आहे.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या प्रयत्नामुळे १२ पिडीत कामगारांची सुटका

पुणे, दि. ३१: जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जागतिक तस्करी विरोधी दिनाचे औचित्य साधून शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा येथे जिल्हा प्रशासन, कामगार विभाग आणि पोलिसांनी संयुक्तिक मोहिम राबवून बुधवारी (३० जुलै) एकूण १२ पिडीत कामगारांची सुटका करण्यात करण्यात आली, याबद्दल पिडीत कामगारांनी जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.

याबाबत इंडिया लेबरलाइन या संस्थेला तक्रारीच्या अनुषंगाने गुळ बनविण्याच्या युनिटमध्ये पिडीतांकरिता बचाव मोहीम राबवण्यात आली, पैठण, छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असलेल्या ज्यामध्ये ७ मुलांसह एकूण १२ पीडितांचा समावेश होता. त्यांना आगाऊ रक्कम देण्यात आली, त्यांच्या हालचालींवर मर्यादा घालून त्यांना २ वर्षे शारीरिक छळ करण्यात येत होता, तसेच त्यांना कामावरून काढण्यात आले होते.

याप्रकरणी संदीप बाळू दुबे विरुद्ध बंधपत्रित कामगार प्रणाली (निर्मूलन) कायदा, १९७६ आणि भारतीय न्याय संहिता अंतर्गत प्राथामिक खबरी अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे. प्रशासनाने घटनेचे गांर्भीर्य लक्षात घेता कामगारांना सर्व प्रक्रिया बंधनकारक कामगार मानक कार्यपद्धतीनुसार २४ तासांच्या आत करण्यात पूर्ण करुन कामगारांची सुटका करण्यात करण्यात आली आणि त्यांना सुटका प्रमाणपत्रे जारी करण्यात आली.जिल्हा प्रशासनाने कामगारांना संभाजीनगर येथील त्यांच्या मूळ गावी पैठण येथे सुरक्षितपणे परत जाण्याची व्यवस्थाही केली.

या कारवाईत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आलेल्या असंघटित क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगार हक्क आणि सुरक्षा संघटना समितीच्या कॅरोल परेरा, ॲड. देवभक्त महापुरे श्री. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे विधी स्वयंसेवक रूपेश चव्हाण, दीपक सहभागी होते, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.