Home Blog Page 381

‌‘मेघरंग‌’मध्ये गायन आणि वादनातून मल्हार अविष्कारगांधर्व महाविद्यालय आयोजित कार्यक्रमात मल्हार रागाच्या विविध छटा

पुणे : वर्षा ऋतुनिमित्त भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे आयोजित ‌‘मेघरंग‌’ या कार्यक्रमात मल्हार रागाच्या विविध छटा गायन-वादनातून उमटल्या. गौड मल्हार, मल्हार, सूर मल्हार, मियाँ मल्हार, मेघ, जयत कल्याण अशा रागातील रचना सादर करण्यात आल्या.
विष्णू विनायक स्वरमंदिरात दोन दिवसीय ‌‘मेघरंग‌’या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ गायिका विदुषी मीरा पणशीकर, निवृत्त आयकर आयुक्त डॉ. राजीव रानडे (आयआरएस), महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे, उपप्राचार्या परिणिता मराठे, अपर्णा पणशीकर, पंडित सुरेश बापट यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने झाले. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांची तर दुसऱ्या दिवशी संगीत प्रेमी, सीजीएसटीच्या अतिरिक्त आयुक्त वैशाली पतंगे (आयआरएस), संगीतप्रेमी, एसआरपीएफ कमांडंट तेजस्वी सातपुते (आयपीएस) यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात अपर्णा पणशीकर यांच्या गायनाने झाली. त्यांनी गौड मल्हार रागातील ताल तिलवाडामध्ये ‌‘काहे हो‌’ हा बडा ख्याल सादर केला. त्यानंतर स्वत: रचलेली एक बंदिश ऐकविली. ‌‘बलमा बहार आयी‌’ ही रचना सादर करून त्याला जोडून द्रुत तालातील ‌‘जर झरन झरन‌’ आणि ‌‘अब रसिला‌’ ही मल्हार रागातील रचना सादर करून रसिकांना मल्हार रागांचा आनंद दिला.
ग्वाल्हेर-आग्रा घराण्याचे गायक पंडित सुरेश बापट यांनी मैफलीची सुरुवात जयत कल्याण रागातील , विलंबित तीन तालातील ‌‘पपीहा न बोल‌’ या पारंपरिक बंदिशीने केली. त्यानंतर मास्टर कृष्णराव यांची ‌‘बरसन बरसन लागी चहू’‌ ही रचना सादर केली. यानंतर मियाँ मल्हार मधील मध्य लय झपतालातील ‌‘आयो है मेह नही‌’सह द्रुत तालातील ‌‘कहे लाडली‌’ या रचना सादर केल्यानंतर सूर मल्हारमधील, मध्य लय रूपक तालातील ‌‘गढ दे बीर‌’ आणि द्रुत एकतालातील प्रल्हाद गानू यांची ‌‘आए बदरा कारी कारी’‌ या रचना रसिकांना ऐकविल्या.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात रोहित मराठे यांच्या संवादिनी वादनाने झाली. त्यांनी मियाँ मल्हार रागातील सुनंद तालातील साडेनऊ मात्रांची रचना प्रभावीपणे सादर केली. त्यानंतर द्रुत एकतालातील रचना सादर करून राग मेघमधील द्रुत तीनताल सादर केला. गौड मल्हार रागातील झपतालातील रचना सादर करून संवादिनी वादनाची सांगता केली.
त्यानंतर सुप्रसिद्ध सरोद वादक अनुपम जोशी यांनी मैहर घराण्याचे वैशिष्ट्य असलेल्या अप्रचलित देस मल्हार रागातील आलाप, विलंबित गत, द्रुत गत आणि झाला यांची सुंदर मांडणी केली. सरोद या वाद्यावर महाराष्ट्रातील अभंगमालांच्या रचना वाजविणारे जगातील एकमेव वादक असलेल्या अनुपम जोशी यांनी ‌‘कानडाऊ विठ्ठलु‌’, ‌‘अबीर गुलाल उधळीत रंग‌’, ‌‘खेळ मांडियेला‌’, ‌‘कानडा राजा पंढरीचा‌’ या अभंगांची झलक ऐकविली. त्याला रसिकांनी भरभरून दाद दिली.
जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका विदुषी जुई धायगुडे-पांडे यांनी गायनाची सुरुवात गौड मल्हार रागातील, विलंबित तीन तालातील ‘मान न करीये गोरी तुमरे कारन आयो मेहा’ या बंदिशीने केली. त्यानंतर द्रुत तीनतालात गानसरस्वती किशोरी अमोणकर रचित ‘बरखा बैरी भयो सजनिया’ ही रचना सादर केली. त्यानंतर मीरा मल्हार रागातील, विलंबित रूपकातील ‘तुम घन से घनशाम घटा घन’ ही बंदिश ऐकविली. ‌ त्याला जोडून द्रुत तीन तालातील ‌‘बरसन को आये’ही रचना सुरेलपणे सादर करत कार्यक्रमाची सांगता केली.

कलाकारांना संजय देशपांडे, ऋषिकेश जगताप, प्रणव गुरव (तबला), पंडित प्रमोद मराठे, लीलाधर चक्रदेव, अमेय बिच्चू (संवादिनी) यांनी समर्पक साथसंगत केली. सूत्रसंचालन स्वानंदी गिरीश यांनी केले.

बँकांचे दरवाजे सामान्य लोकांसाठी बंद होण्याच्या मार्गावर…

‘राष्ट्रीयकृत बँकांवर खाजगीकरणाचे संकट’ कार्यक्रम संपन्न.

बॅंकांचे राष्ट्रीयकरण या विषयावरील शिदोरीच्या विशेषांकाचे प्रकाशन

मुंबई, दि. १ ऑगस्ट २०२५.
इंदिराजी गांधी यांनी १९६९ साली बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला त्यामागे एक महत्वाचे कारण होते. देशातील आर्थिक स्रोतांचा ताबा त्यावेळी मुठभर लोकांच्या हातात होता व ही शक्ती लोकशाहीवरही ताबा मिळवू पहात होती, यातून हा महत्वपूर्ण निर्णय झाला. आता पुन्हा ५६ वर्षांनी देशात एक नवी ईस्ट इंडिया कंपनी आली असून दोन भाईंचा मस्तवाल कारभार देशातील सर्व संस्था आपल्या हाती घेऊ पहात आहे. या अदानी व अंबानी यांच्याच कंपन्यांचे राष्ट्रीयकरण करण्याची गरज आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिळक भवन येथे आयोजित राष्ट्रीयकृत बँकांवर खाजगीकरणाचे संकट या विषयावरील सभेला संबोधित केले. यावेळी माजी खासदार कुमार केतकर, हुसेन दलवाई, बँकिंग तज्ञ विश्वास उटगी, प्रा. संजीव चांदोरकर, एस. नागराजन, विठ्ठल राव, शिदोरीचे प्रबंध संपादक अनंत मोहोरी, कार्यकारी संपादक सुनील खांडगे यांच्यासह बँकिंग क्षेत्रातील लोक व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, देशातील नवीन ईस्ट इंडिया कंपनीने मुंबईत धारावी पुनर्वसन योजनेच्या गोंडस नावाने शेकडो एकर जमीन घशात घातली आहे तर दुसरीकडे नागपूरपासून गोव्यापर्यंत रेड कार्पेट असावा यासाठी शक्तीपीठच्या नावाखाली ८८ हजार कोटींचा एक महामार्ग बांधण्याचे घाटत आहे. सरकारकडे पगार देण्यास पैसे नाहीत, लाडकी बहिणसाठी पैसे नाहीत, शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नाहीत मात्र या बेड्या धेंडासाठी पैसे आहेत. निवडणूक आयोग असा का वागत आहे, याचे मुळ या नव्या व्यवस्थेत दडलेले आहे. पैसा फेक तमाशा देख, प्रमाणे पाशवी बहुमत मिळवायचे आणि संविधान, लोकशाही गुंडाळून ठेवण्यासाठी हे सर्व सुरु आहे. बँकांच्या राष्ट्रीयकरणावरचे संकट हा विषय लोकांपर्यंत पोहचवला पाहिजे, असेही सपकाळ यावेळी म्हणाले.

माजी खासदार कुमार केतकर यावेळी म्हणाले की, बँक राष्ट्रीयकरणाच्या निर्णयामागे आंतरराष्ट्रीय व अंतर्गत राजकारणाचा संदर्भ आहे. हा निर्णय जरी १९६९ साली झाली असला तरी त्याचा पाया मात्र १९५५ साली तामिळनाडूतील आवडी अधिवेशनात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरु यांच्यासमोर मांडण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय मुद्द्याचा विचार करता त्याचवर्षी बांडूंग परिषद झाली, त्याचे नेतृत्व पंडित नेहरु यांच्याकडे होते. नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशांनी यात सहभाग घेतला होता आणि तेथेही आर्थिक सार्वभौमत्वाचा ठराव करण्यात आला होता ही सर्व पार्श्वभूमी यामागे आहे. बँकांच्या राष्ट्रीयकरणाने मध्यमवर्गाची ताकद वाढली, आज या राष्ट्रीयकृत बँका संकटात आहेत. या बँका परकीय शक्तींच्या हाती जाता कामा नये यासाठी बँकांचे राष्ट्रीयकरण टिकवणे गरजेचे आहे, असेही कुमार केतकर म्हणाले.

बँकिंग तज्ञ विश्वास उटगी यावेळी म्हणाले की, इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयकरण करून सामान्य लोकांसाठी बँकांचे दरवाजे खुले केले पण आज परिस्थिती बदलली असून ग्रामीण भागातील बँका शहरी भागाकडे जात आहेत आणि हळूहळू या बँकांचे दरवाजे सामान्य लोकांसाठी बंद होत आहेत. या बँकांतील जास्तीत जास्त पैसा मोठ्या उद्योगपतींसाठी वापरला जात आहे. बँकांमध्ये २२५ लाख कोटी रुपयांच्या ठेवी आहेत तर १५० लाख कोटी रुपयांची कर्जे दिलेली आहेत. ताळेबंद छान दिसतात पण प्रत्यक्षात त्यात खूप काळंबेरं आहे. मोठ्या उद्योगपतींनी बँकांचे १६ लाख कोटी रुपये डुबवले आहेत. १०० पैकी ८५ प्रकरणे ही राईट ऑफ केली जात असून हा एक घोटाळा आहे आणि याचा मोठा फटका ठेवीदारांना बसत आहे. भारतातील बँका परदेशी संस्थांना विकण्याचा कार्यक्रम मोदी सरकारने सुरु केला असून येस बँकेत परदेशी गुंतवणूक झाली आहे आणि आता आयडीबीआय बँकेचा पुढचा नंबर आहे अशी भिती त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रीयकृत बँकांवरील हे संकट परतवून लावण्याची गरज आहे, असेही विश्वास उटगी म्हणाले.
प्रा. संजीव चांदोरकर, एस. नागराजन व विठ्ठलराव यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

71वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार- शाहरुख प्रथमच बेस्ट अ‍ॅक्टर:’श्यामची आई’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, नाळ-2 चा भार्गव सर्वोत्कृष्ट बाल कलाकार

नवी दिल्ली- शुक्रवारी दिल्लीत ७१ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. शाहरुख खानला ‘जवान’ चित्रपटासाठी आणि विक्रांत मेस्सीला ‘१२ th फेल’ चित्रपटासाठी संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे.मराठी चित्रपटांसाठी ‘श्यामची आई’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यासोबतच नाळ-2 चित्रपटातील भार्गव जगतापला सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा पुरस्कार मिळाला आहे.राणी मुखर्जीला ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आहे. कटहलला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला आहे.’सिर्फ एक बंदा काफी है’ या हिंदी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संवादाचा पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाचे संवाद दीपक किंगराणी यांनी लिहिले आहेत.

शाहरुख खान आणि विक्रांत मेस्सी यांना पहिल्यांदाच पुरस्कार मिळाला

७१ व्या राष्ट्रीय पुरस्कारात, शाहरुख खान आणि विक्रांत मेस्सी यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. शाहरुखला त्याच्या ‘जवान’ चित्रपटासाठी आणि विक्रांतला ‘१२ th फेल’ चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. ‘जवान’ हा एक अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट होता. या चित्रपटात शाहरुख दुहेरी भूमिकेत दिसला होता. दुसरीकडे, विक्रांतचा चित्रपट एक चरित्रात्मक नाटक होता. हा चित्रपट आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा आणि त्यांची पत्नी आयआरएस अधिकारी श्रद्धा जोशी यांच्या जीवनावर आधारित होता.

राणी मुखर्जी यांनाही पहिल्यांदाच हा पुरस्कार मिळाला आहे

राणी मुखर्जीचा २५ वर्षांच्या कारकिर्दीतील हा पहिलाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे. तिचा ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित कायदेशीर नाटक आहे. हा चित्रपट सॉफ्टवेअर इंजिनियर सागरिका चक्रवर्ती यांच्या ‘द जर्नी ऑफ अ मदर’ या आत्मचरित्रापासून प्रेरित आहे. आशिमा चिब्बर दिग्दर्शित या चित्रपटात राणीने सागरिकाची भूमिका साकारली आहे.

२०११ मध्ये, जेव्हा सागरिका तिचा पती अनुरूप भट्टाचार्यसोबत नॉर्वेमध्ये राहत होती, तेव्हा तिच्या मुलांना नॉर्वेजियन अधिकाऱ्यांनी काढून घेतले. सागरिका तिच्या मुलांच्या ताब्यासाठी नॉर्वेजियन सरकारशी लढते. तो प्रवास चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

कटहलला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला आहे.

द केरल स्टोरी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार मिळाला

  • सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी- द केरल स्टोरी
  • सर्वोत्कृष्ट बालकलाकार- सुकीर्थी वेणी (गांधी कथा चेतू), कबीर खंदारे (जिप्सी), त्रिशा तोसर, श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप (नाळ २)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- पीव्हीएनएस रोहित, तेलुगु (बेबी)
  • सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका- चलेया (जवान), शिल्पा राव
  • सर्वोत्कृष्ट संवाद लेखक- दीपक किंगराणी (सिर्फ एक बंदा कॉफी है)
  • सर्वोत्कृष्ट पटकथा- बेबी (तेलुगु), पार्किंग (तमिळ)

प्रादेशिक भाषेतील या चित्रपटांना मिळाले पुरस्कार

  • सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट- वाश
  • सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट- डीप फ्रीज
  • सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट- रोंगाटापू
  • सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- कथल
  • सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट- कंडीलू
  • सर्वोत्कृष्ट विशेष उल्लेख चित्रपट – अ‍ॅनिमल (री-रेकॉर्डिंग मिक्सर, एमआर राजकृष्णन)
  • सर्वोत्कृष्ट ताई फाके फीचर फिल्म- पै तांग… स्टेप ऑफ होप
  • सर्वोत्कृष्ट गारो फीचर फिल्म- रिमडोगीतांगा
  • सर्वोत्कृष्ट तेलुगू फीचर फिल्म- भगवंत केसरी
  • सर्वोत्कृष्ट तमिळ फीचर फिल्म- पार्किंग
  • सर्वोत्कृष्ट पंजाबी फीचर फिल्म- गोड्डे गोड्डे चा
  • सर्वोत्कृष्ट ओडिया फीचर फिल्म- पुष्कर
  • सर्वोत्कृष्ट मराठी फीचर फिल्म- श्यामची आई
  • सर्वोत्कृष्ट मल्याळम फीचर फिल्म- उल्लुझुकू

मुस्लिमांना टार्गेट करत दंगल:अनेक लोकप्रतिनिधींचा यात समावेश, महाराष्ट्र दंगलीच्या उंबरठ्यावर: प्रक्षोभक विधाने करणाऱ्या नेत्यांना भाषण बंदी करा

पुणे : जिल्ह्यातील यवत येथील मुस्लिम विरोधी दंगल ही पूर्वनियोजित कटाचा भाग असून राज्य सरकारने महाराष्ट्राचे पुरोगामीत्व व महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी या दंगलीतील सर्व संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करावी. तसेच या घटनेला कारण ठरणाऱ्या प्रक्षोभक भाषण करणाऱ्या नेत्यांविरुद्ध देखील कारवाई करावी अशी मागणी आज नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली.

नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीची राहुल डंबाळे , पुण्याचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे , सलिम पटेल, शहाबुद्दन शेख , आसिफ खान , जावेद शेख , यांच्यासह इतर मान्यवरांनी आज जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन यवत येथील घटनेचा निषेध नोंदवला.

“ राज्यात सर्वत्र अस्वस्थता असून मुस्लिम विरोधी वातावरण सातत्याने पसरवण्याचा अजेंडा काही आमदार राबवत आहेत. भाजपचे प्रक्षोभक भाषण करण्यासाठी प्रसिद्ध असणारे आमदार ज्या ठिकाणी सभा करतात त्या ठिकाणी अशा प्रकारच्या दंगली घडताना दिसत आहेत , त्यामुळे राज्य सरकारने प्रक्षोभक भाषण करणाऱ्या नेत्यांच्या सभांवर बंदी आणावी व अशा प्रकारची दंगलीची पार्श्वभूमी असणाऱ्या नेत्यांना तात्काळ अटक करावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान यवतच्या घटनेचे जिल्ह्यात व राज्यात कुठेही पडसाद उमटू नयेत यासाठी सर्व धर्मनिरपेक्ष पुरोगामी कार्यकर्त्यांच्या वतीने राज्यातील नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता ठेवावी असे आवाहन करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करणार-मुख्यमंत्री

पुणे, दि.१: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे संघर्षमय जीवन, त्यांचे महान कार्य, अजरामर साहित्य जगासमोर येण्याकरिता त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल, याकरीता निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासित करुन अण्णा भाऊ साठे यांनी दाखविलेल्या मार्गावर राज्य शासन मार्गक्रमण करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यखंड क्रमांक ५, ६ आणि ७ च्या साहित्य प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, नगर विकास राज्य मंत्री माधुरी मिसाळ, आमदार अमित गोरखे, विजय शिवातारे, सुनील कांबळे, हेमंत रासणे,उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणु गोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून क्रांती घडवली, समाजाला तेज, स्फुलिंग दिले. साहित्यातील एक एक व्यक्तीरेखा जिवंत केल्या. यांच्या लिखाणामध्ये करुणा, संवेदना, क्रांती, काव्य आणि एक वैश्विकता पहायला मिळते. अण्णाभाऊचे साहित्य जगातील २२ भाषेत अनुवादित झाले असून त्या-त्या देशात ते प्रसिद्ध आहेत. तसेच देशातील विविध विद्यापीठात त्यांच्या साहित्यांवर संशोधन सुरू आहे. रशिया देशामध्ये त्यांच्याबद्दल असलेला सन्मान, आत्मीयता, त्यांच्या साहित्यावर होणारा अभ्यास बघता अभिमानाने ऊर भरुन येतो, भारत मातेचा आणि मराठी मातेचा या सुपुत्राचे साहित्य खऱ्याअर्थांने वैश्विक झाले आहे.

अण्णा भाऊंनी कथा, कादंबरी, लोकनाट्य नाटक, सिनेमा पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवास दर्शन अशा प्रकारे साहित्यातील प्रत्येक अंगात बहारदारपणे आणले आहेत. त्यांनी ४९ वर्षाच्या आयुष्यात ४० पेक्षा अधिक कादंबऱ्या आणि विविध प्रकारच्या रचना लिहणारे विलक्षण प्रकारचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या साहित्यावर आज हजारो लोक पीएचडी करीत आहेत. खऱ्या अर्थाने ते एक चालते बोलते विद्यापीठ होते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

संताच्या मांदियाळींनी समाजाच्या विषमतेवर प्रहार करतांना समाजामध्ये सुधारणा करुन एकत्रित करण्याचा प्रयत्न केला, अण्णाभाऊंनी त्याच भावनेने तत्कालीन समाज व्यवस्थेची मांडणी करतांना आंर्तभावना, वेदना, संवेदना दर्शवितांना कुठेही कटुता आणली नाही, साहित्य समाजाला एकत्रित करणारे साहित्य आहे. संपूर्ण समतायुक्त समाज निर्माण करण्याचे कार्य केले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांच्या पोवाडा, गीतामध्ये तरुणाईला स्फुर्ती देण्याचे काम केले.

रशियात देशात असतांना वीर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीतून आलेलो आहे, याठिकाणी वीरांना वदंन करण्याकरिता आलेलो आहे, असे त्यांनी सांगितले. नैराश्य हे तलवारीवर साचलेले धुळीसारखे असते, धुळ झटकली की तलवार पुन्हा धारधार होते, पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर नाही तर कामगाराच्या तळहातावर उभी आहे, असे प्रेरक विचार त्यांनी दिले.

अण्णाभाऊंच्या संघर्षमय जीवनातून त्यांचे व्यक्तीमत्व मोठे झाले. त्यांच्या लेखणीतून समाजाला दिशा, प्रेरणा, सामान्य माणसाला बळ, वंचिताचा आवाज देण्याचे कार्य केले. त्यांचे हे कार्य समाजासमोर आण्याचे काम सुरू आहे. समाजाची मूलतत्त्वे सांगणारे, संवेदना जीवंत ठेवणारे अशाप्रकारचे अजरामर साहित्य पुढच्या प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे, यादृष्टीने संशोधन झाले पाहिजे. साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाकरिता २५ कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, स्मारकाचे आराखडेही तयार झाले आहेत, येत्याकाळात लवकरात स्मारक पूर्ण करण्यात येईल, याकरिता राज्य शासन सहकार्य करेल, असेही श्री. फडणवीस म्हणाले.

अण्णाभाऊची स्मृती चिरंतर जपण्याकरिता राज्य शासन कटीबद्ध-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतींना अभिवादन करुन श्री. शिंदे म्हणाले, अण्णा भाऊ हे साहित्यिक, शाहिर, लढाऊ व्यक्तीमत्व, प्रस्थापित मराठी साहित्य, संस्कृती, परंपरा नाकारणारे पहिले दलित बंडखोर लेखक होते. त्यांचे साहित्य प्रबोधन व परिवर्तनवादी होते. त्यांनी साहित्यातून समाजातील वंचित, दीनदलित, कष्टकरी, स्त्रिया, भटके यांच्या व्यथा आणि वेदना मांडण्याचे काम केले. त्यांच्या कथा कांदबऱ्यांमध्ये कामगारांचा श्रमाचा पुरस्कार, जमीनदारांचा शोषणांचा धिक्कार होता. अण्णाभाऊच्या जयंतीचे औचित्य साधून कथा, लोकनाट्य, नाटक, शाहिरी, प्रवासवर्णनांचा खंड वाचकासमोर येत असून ही मराठी क्षेत्रातील अतिशय महत्वाची घटना आहे.

महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आणि वारसा शेवटच्या घटकांपर्यत नेण्याचे काम अण्णा भाऊंनी केले. प्रखर बुद्धीवाद, समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व, समाजवादी विचारांच्या वैचारिक साधनेवर त्यांचा साहित्य दृष्टीकोन उभा आहे. त्यांच्या शाहिरीने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला बळ मिळण्यासोबत अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा समाजात निर्माण केली. शेतकरी, पददलित, श्रमिक यांच्या वेदंना हुंकार साहित्यातून मांडला, त्यामुळे अण्णा भाऊंची स्मृती चिरंतर जपण्यासोबतच त्यांची उर्जा समाजाला सतत मिळण्याकरिता राज्य शासन कटीबद्ध आहे, असेही श्री. शिंदे म्हणाले.

कार्यक्रमापूर्वी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले.

यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यखंड क्र. ५, ६ आणि ७ साहित्याविषयी माहिती दिली.

यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीचे प्रकाशन समितीचे सदस्य डॉ. माधव गादेकर, डॉ. बी.एन. गायकवाड, डॉ. सोमनाथ कदम, डॉ. मिलींद कसबे, शिवा कांबळे, डॉ. प्रमोद गारोडे, डॉ. विजय कुमटेकर उपस्थित होते.

महसूल विभागाने लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतीमान पद्धतीने कामे करावे-उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. १: केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध विकासकामे करण्यात येत असून महसूल विभागाने लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतीमान पद्धतीने विकासकामे वेळेत मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

विभागीय आयुक्तालय येथे महसूल सप्ताहाचा शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार चेतन तुपे, बापुसाहेब पठारे, शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अपर आयुक्त तुषार ठोंबरे आदी उपस्थित होते.

अधिकारी-कर्मचाऱ्यांना महसूल दिनाच्या शुभेच्छा देवून श्री. पवार म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळापासून महसूल विभाग हा महत्वाचा विभाग म्हणून ओळखला जातो. हा विभाग प्रशासनाचा कणा म्हणून कार्यरत आहे. अतिवृष्टी, पुरपरिस्थिती, नैसर्गिक आपत्तीच्या काळात महसूल विभाग नागरिकांना दिलासा देण्याचे काम करीत असतो. इतर विभागांनाही सोबत घेवून लोककल्याणकारी योजना, ध्येयधोरणे, उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावी करण्यासोबतच प्रशासकीय गतिमानता आण्याकरिता महसूल विभागाने काम करावे. कोरोनाच्या काळात महसूल विभागाने आणि इतर सर्व सबंधित विभागाने उत्तम कामे करुन संकटाशी सामना केला, यांची नोंद नागरिकांनी घेतलेली आहे, असेही ते म्हणाले.

राज्यशासनाच्यावतीने नागरिकांना पारदर्शक सेवा देण्यावर भर देण्यात येत आहे. गावपातळीपासून ते जिल्हापातळीपर्यंत महसूल विभागाशी नागरिकांशी दैनंदिन संबंध येत असतो. त्यामुळे आपण कोणत्याही प्रबोलनास बळी न पडता नागरिकांना गुणवत्तापूर्ण, पारदर्शक सेवा द्यावी, कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना चांगली वागणूक द्यावी. चांगले काम करुन महसूल विभागासह राज्य शासनाप्रती नागरिकाच्या मनात उंचविण्याचे काम केले पाहिजे. आगामी काळात नागरिकांना अधिकाधिक ऑनलाईन सेवा देण्यावर भर देण्यात येणार येणार असून नागरिकांनाही या सेवांचा लाभ घेवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

सर्व विभागांच्या सहभागाने महसूल सप्ताह यशस्वी करा

महसूल सप्ताह महसूल विभागापुरता मर्यादित न ठेवता सर्व विभागांना सहभागी करुन यशस्वी करावा आणि सप्ताहाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांची कामे गतीने पूर्ण करावीत. महसूल सप्ताहामध्ये सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगले कामे करावे. राज्य शासनाच्यावतीने १०० दिवसाचा कृती कार्यक्रम राबविण्यात आला, आता १५० दिवसांचा कृती आराखडा राबविण्यात येत आहे, यामध्ये उत्सूर्फपणे सहभाग होवून कामे करावीत, असेही श्री.पवार म्हणाले.

शासकीय कामकाजात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर भर द्यावा

महसूल विभागाच्या अधिकाधिक सेवा ऑनलाईन झाल्या आहेत, नागरिकांना या सेवांचा प्रभावीपणे, पारदर्शकरित्या लाभ देण्याकरिता अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासकीय कामकाजात ई-प्रणाली, एआयचा प्रभावीपणे वापर केला पाहिजे. आपल्या पदाचा लोककल्याणाकरिता उपयोग झाला पाहिजे, अशी भावना ठेवून जबाबदारीपूर्वक कामे केली पाहिजे. नागरिकांची कामे कायद्याच्या चौकटीत बसवून ही कामे वेळेत होवून त्यांचा वेळ व खर्च वाचविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामांचे अनुकरण करावे

राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम राबविल्याबद्दल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे, इतरांनी त्यांच्या कामाचे अनुकरण करुन आपल्या दैनंदिन कामकाजात समावेश केला पाहिजे. चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी भक्कपणे उभे राहिले पाहिजे. महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी करण्याकरिता संबंधित विभागाचे मंत्री, सचिवांशी चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले.

डॉ. पुलकुंडवार म्हणाले, महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा म्हणून कार्यरत आहे. पुणे विभाग हा प्रगत, प्रगल्भ आणि विकसित विभाग आहे, येथील नागरिक सजग आहेत, लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी अभ्यासू आणि कार्यक्षम आहेत, त्यामुळे समाजाच्या अपेक्षापूर्ण करण्याकरिता विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकाभिमूख, सदैव तत्पर राहून पारदर्शकरित्या कार्यक्षमतेने काम केले पाहिजे. सामान्य नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्या अडचणी समजून त्या सोडविण्याकरिता काम केले पाहिजे. माजी सैनिकांची कामे मार्गी प्राधान्याने मार्गी लावण्याच्यादृष्टीने कामे करावे.

महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गुणगौरव करण्यासाठी दरवर्षी १ ऑगस्ट रोजी महसूल दिन आयोजित करण्यात येतो. सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांना महसुली सेवा अधिक प्रभावीपणे देण्याकरिता संकल्प करण्याचा हा दिवस आहे. येत्या काळात अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील. महसूल सप्ताहामध्ये नागरिकांना सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. पुलकुंडवार यांनी केले.

श्री. डुडी म्हणाले, महसूल विभागाच्यावतीने नागरिकांना ऑनलाईन सेवा देण्यावर भर देण्यात येत आहे. येत्या काळात मंडळ अधिकारी कार्यालय बळकटीकरणाच्यादृष्टीने नवीन कार्यालय, ई-ऑफिस प्रणालीकरिता संगणक, प्रिंटर आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने स्वामित्व उपक्रमाअंतर्गत प्रॉपट्री कार्ड उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सुमारे ९०० किमी.चे रस्ते पाणंद रस्ते खुले करुन ३५ हजार नागरिकांना लाभ देण्यात आला आहे. येत्या काळात पाणंद रस्त्याकरिता ‘जीआयएस’चा वापर करण्यात येणार आहे. लोकअदालतीच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यावर भर दिला पाहिजे. मंडळ अधिकाऱ्यांनी सेतू केंद्राचे सक्षमीकरण करण्याचे प्रयत्न करावे, जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती प्रसार माध्यमाद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे, असेही श्री. डुडी म्हणाले.

श्री.पवार यांच्या हस्ते विभाग आणि जिल्हास्तरीय उत्कृष्ट काम करणाऱ्या तसेच विविध खेळात प्राविण्य मिळालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी तर आभार प्रदर्शन अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी केले.

यावेळी महसूल विभागाच्या कामकाज आढावा घेणारी चित्रफीत दाखविण्यात आली.

कार्यक्रमापूर्वी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्री. पवार यांनी विनम्र अभिवादन केले.

“साहित्याच्या माध्यमातून जनतेच्या मनात अण्णाभाऊंनी स्थान निर्माण केले” – डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे, १ ऑगस्ट २०२५ : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त स्वारगेट येथील सारसबाग चौकात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित राहून अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन केले आणि पुष्पहार अर्पण केला.

यावेळी सुदर्शनाताई त्रिगुणाईत, संजीवनी विजापुरे, नितीन पवार, संदीप शिंदे (शहर प्रमुख – कामगार), स्त्री आधार केंद्राच्या आश्लेषा खंडागळे, सुरेखा कदम पाटील, रेणुका मादर,श्रद्धा वाडेकर ,मीनल धनवटे ,सोनाली मारणे , सारिका कोकाटे, सुधीर कुरुमकर,नितीन लगस, गडकरी सर, तसेच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर आधारित विविध पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकांचे उद्घाटन डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते संपन्न झाले. यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव केला.

“संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो वा महिलांच्या व्यथा, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून सामान्य जनतेचे वास्तव आणि भावना प्रखरपणे मांडल्या. त्यांच्या साहित्यामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक जाणीवा जागृत झाल्या. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शिवसेनेच्या वतीने आम्ही त्यांच्या कार्याचा गौरव करत आहोत. अण्णाभाऊंनी जनतेच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे,” असे उद्गार डॉ. गोऱ्हे यांनी काढले.

कार्यक्रमाचे स्वरूप गौरवपूर्ण असून, अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक योगदानाची उजळणी करणारा हा सोहळा उत्सहात पार पडला.

यवतमध्ये 2 समाजात वाद अन् तणाव:आक्षेपार्ह पोस्टनंतर दगडफेक, जाळपोळ; पोलिसांनी फोडल्या अश्रूधुराच्या नळकांड्या

पुणे-दौंड तालुक्यातील यवत येथे दोन गटांत जातीय तणाव निर्माण झाला आहे. व्हॉट्सॲपवरील एका आक्षेपार्ह पोस्टमुळे हा वाद भडकला. त्यात दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन स्थितीवर नियंत्रण मिळवले. सध्या या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून या घटनेची माहिती घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही थेट घटनास्थळी स्थितीचा आढावा घेतला.

यासंबंधीच्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील यवत गावातील एका समुदायाच्या तरुणाने शुक्रवारी सकाळी सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट केली. या पोस्टची माहिती मिळताच गावात तणाव निर्माण झाला. त्यानंतर दुपारी 12 च्या सुमारास यवतचा आठवडी बाजार बंद करण्यात आला. यावेळी एका गटाच्या लोकांनी काही दुचाकी पेटवून दिल्या. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण स्थिती उद्भवली. यवतचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले की, आक्षेपार्ह तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू आहे. सध्याचा तणाव पाहता गावात मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आक्षेपार्ह पोस्ट करणारा तरुण यवतच्या सहकार नगर भागात राहतो. पोस्टनंतर संतप्त जमावाने त्याच्या घराची तोडफोड केली. यावेळी काही लोकांनी एका धार्मिक स्थळावर दगडफेकही केली. यामुळे तणाव वाढला. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

उल्लेखनीय बाब म्हणजे गत शनिवारी 26 जुलै रोजी यवतच्या नीळकंठेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा कथित अवमान झाला होता. या घटनेमुळे निर्माण झालेला तणाव काहीसा निवळला होता. पण त्यानंतर लगेचच ही घटना घडल्यामुळे येथील तणावात मोठी वाढ झाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक (ग्रामीण) संदीप गिल यांनी यवतच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी पोलिसांना स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी योग्य ते निर्देश दिले. यावेळी बोलताना ते म्हणाले, एका तरुणाने आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी आरोपी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर कारवाईही करण्यात आली आहे. या घटनेनंतर काही लोक एकत्र जमल्यामुळे गावात तणाव निर्माण झाला. पण पोलिसांच्या आवाहनानंतर शांतता प्रस्थापित झाली आहे. सध्या गावात कोणताही तणाव नाही. आमची पेट्रोलिंग येथे सुरू आहे.

या घटनेत काही दुचाकी व दुकानांची जाळपोळ करण्यात आली. पण पोलिस अधीक्षकांनी जाळपोळ झाल्याचा दावा फेटाळला. त्याला जाळपोळ म्हणता येत नाही. काही ठिकाणी काचा फुटल्यात. संतप्त जमाव एक-दोन ठिकाणी गेला होता. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना शांततेचे आवाहन केले. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. येथील स्थिती निवळली आहे, असे ते म्हणाले.

भाजपचे वादग्रस्त आमदार गोपीचंद पडळकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात काल यवतमध्ये एक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामुळे गावात तणाव निर्माण झाला होता. हा तणाव आज दुसऱ्या दिवशीही कायम होता. त्यातूनच आजची घटना घडल्याचा दावा केला जात आहे. दौंडचे आमदार राहुल कूल यांनी याविषयी बोलताना सांगितले की, यवतमध्ये मागील दोन-तीन दिवसांपासून तणावाचे वातावरण होते. सर्वांशी संवाद साधून हा तणाव निवळण्याचा प्रयत्न सुरू होता. सध्या तिथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आम्ही परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवत येथील परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले, मी एका कार्यक्रमात होतो. आताच मी यवतच्या प्रकरणाबाबत माहिती घेतली. त्या ठिकाणी एका बाहेरच्या व्यक्तीने चुकीचं स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला. कोणत्यातरी पुजाऱ्याने बलात्कार केला वैगेरे अशा आशयाचे स्टेटस ठेवण्यात आले होते. यामुळे लोक रस्त्यावर आले. जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज देखील करावा लागला. आता परिस्थिती नियंत्रणात आहे.

सध्या दोन्ही समाजाची लोक एकत्र बसले आहेत. तणाव संपवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याठिकाणी तणाव उत्पन्न होईल अशी घटना घडली तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

आमदार जितेंद्र आव्हाड यांची सत्ताधाऱ्यांवर टीका

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेवरून सरकारवर निशाणा साधला आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. ज्या भागात कधी जातीय तणाव झाला नाही, तिथे आता तणाव निर्माण झाला आहे. राजकीय हितासाठी सध्या महाराष्ट्राचे आरोग्य खराब करण्याचे काम सुरू आहे. हे अतिशय निंदणीय आहे. तणाव शांत करण्याचे काम पुढाऱ्यांचे असते. पण सध्याचे पुढारी स्वतःच जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.

स्टार्टअप्स मुळे युवा स्वप्नांना मिळेल बळ-एमआयटी टीबीआयचे संचालक प्रा.प्रकाश जोशी यांची माहिती

पुणे, १ ऑगस्ट : “एक अशी कल्पना जी आयुष्य बदलू शकते, अशाच काहीशा तरुणांच्या नवीन विचारसरणींच्या पंखांना बळ देण्यासाठी सुरू केलेल्या एका स्टार्टअप ने सामान्य माणसाच्या जीवनात प्रकाश आणता येतो. नव उद्योजकांनी समाजातील समस्यांना ओळखून त्यावर स्टार्टअप सुरू करणे ही काळाची गरज आहे.” अशी माहिती एमआयटी डब्ल्यूपीयू टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्यूबेटर (एमआयटी-टीबीआय) चे संचालक प्रा. प्रकाश जोशी आणि सीईओ निनाद पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता नोकरी तयार करावी. या उद्देशाने पुण्याच्या कोथरूड परिसरातील एमआयटी-डब्ल्यूपीयू कॅम्पसमध्ये सुरू करण्यात आलेल्या एमआयटी टीबीआयच्या कार्याच्या चढत्या आलेखाची माहिती देण्यात आली. यावेळी प्रा. जोशी म्हणाले भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग डीएसटी द्वारे समर्थित हे टीबीआय अधिकृत नवोन्मेष आणि उद्योजकता केंद्र आहे. या सेंटर द्वारे सुरूवातीच्या टप्प्यातील उद्योजकांना-विद्यार्थी आणि अनुभवी संस्थापकांसह- निधी, मार्गदर्शन, ऑफिस स्पेस आणि नेटवर्किंग सारखे आवश्यक समर्थन देऊन मदत केली जाते. राष्ट्रीय स्तरावर तंत्रज्ञान व्यवसाय इनक्यूबेटर म्हणून ओळखले जाणारे डीएसटी आणि एमआयटी डब्ल्यूपीयूच्या सक्रिय पाठिंब्याने कार्यरत आहे.
स्टार्टअप्सचा विचार करता सध्या देशात १० टक्के सक्सेस रेश्यो आहे. यामुळे नवोद्यजकांनी जिद्द आणि महत्वकांक्षा ठेवणे गरजेचे आहे. तसेच सर्वप्रथम मार्केटिंगवर अधिक भर दया, त्यानंतर फायनान्सवर भर दयावा. येथील केंद्राच्या माध्यमातून शहरातील सर्व स्टार्टअप्स सुरू करण्यांसाठी आम्ही योग्य फंडिंग देऊन परिपूर्ण ती मदत करण्यास वचनबद्ध आहोत.
डब्ल्यूपीयूच्या कॅम्पसमध्ये ११ हजार चौरस फूट समर्पित जागा आहे. या मध्ये को वर्किंग ऑफिस आणि विशेषतः विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्ससाठी डिझाइन केलेली जलद प्रोटोटाइपिंग लॅब समाविष्ट असल्याची माहिती निनाद पाटील यांनी दिली.
येथील टीबीआयने आज पर्यंत ७५ स्टार्टअप्सना समर्थन दिले आहे. ज्या मध्ये ३६ सध्या इनक्यूबेटेड आहेत आणि २० स्टार्टअप्सना विविध कार्यक्रमांतर्गत निधी देण्यात आला आहे. इनक्येबेटरमध्ये डेमो डे, स्टर्टअप शोकेस आणि इनोव्हेशन स्पर्धा आयोजित केल्या जातात ज्यामुळे तरूण नवोन्मेषकांना उभारण्यासाठी एक व्यासपीठ मिळते. हे भारत सरकारच्या स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीम अंतर्गत निवडक स्टार्टअप्सना सक्रियपणे अनुदान आणि सीड फंडिंग देखील देत आहे.
एमआयटी टीबीआय केवळ यशस्वीच नाही तर समाजिकदृष्टया प्रभावी आणि शाश्वत व्यवसाय निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे. हे भारतीय स्टार्टअप्सच्याा पुढील पिढीला आकार देण्यास मदत करत आहे.
निनाद पाटील यांनी सांगितले की, येथील तांत्रिक आणि विपणन टीम आज विविध महाविद्यालयांना भेट देत आहे आणि तरूणांना उद्योगांसाठी प्रेरित करत आहेत. यामुळे स्टार्टअपसाठी अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना उदयास येत आहेत. तसेच येथील कर्मचारी अतिशय वैयक्तिक आणि सहानुभूतीपूर्ण मार्गदर्शन देऊन, अधिकृत सेवांच्या पलीकडे नवोन्मेषक स्टार्टअप्सना पाठिंबा देण्यास सक्षम आहेत. तरुण उद्योजक स्वतःच्या स्टार्टअपसाठी  कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी एमआयटी टीबीआयशी संपर्क साधू शकता.

सुर्योदय वृद्धाश्रमात..”Cyber Shiksha for Cyber Suraksha” उपक्रम संपन्न

पुणे- १६ जुलै:सायबर सुरक्षेच्या वाढत्या धोक्याविषयी जनजागृती करण्यासाठी Quick Heal Foundation आणि SP College, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “Cyber Shiksha for Cyber Suraksha” या विशेष उपक्रमांतर्गत सुर्योदय वृद्धाश्रमात एक सायबर सुरक्षा जागरूकता सत्र आयोजित करण्यात आले. हे सत्र विशेषतः एकटे राहणाऱ्या आजी-आजोबांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राबविण्यात आले.

हे सत्र ईशा जोशी आणि अवंती दळवी या दोघींनी संयोजित आणि मार्गदर्शित केले. त्यांनी सायबर गुन्हेगारीच्या विविध प्रकारांवर—जसे की बँकिंग फसवणूक, बनावट फोन कॉल्स, आणि ऑनलाईन स्कॅम्स—सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत माहिती दिली. तसेच अशा प्रकारच्या सायबर धोख्यांपासून स्वतःचा बचाव कसा करावा, याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले.

या उपक्रमात युवा स्वयंसेवकांचा सहभाग विशेष होता. ईशा आणि अवंती यांनी केवळ माहिती दिली नाही तर आजी-आजोबांशी प्रेमाने संवाद साधत त्यांच्यासोबत वेळही घालवला. त्यामुळे सत्र अधिक आनंददायी आणि भावनिकदृष्ट्या समृद्ध ठरले.

या सत्राचा परिणाम अत्यंत सकारात्मक होता. अनेक वृद्धांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, आता मोबाईल व डिजिटल माध्यमांचा वापर करताना त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. तरुण पिढीने दिलेल्या प्रेम आणि संवादामुळे त्यांना जिव्हाळ्याची जाणीव झाली.

या उपक्रमातून सायबर सुरक्षेविषयी जागरूकता तर निर्माण झालीच, पण त्याचबरोबर समाजातील ज्येष्ठ नागरिकांप्रती आपली जबाबदारीही अधोरेखित झाली—ती म्हणजे सुरक्षितता आणि आपुलकीचा आधार देणे.

राज्य शासन एसटी महामंडळ आणि एसटी कामगारांच्या पाठिशी खंबीरपणे उभे- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. १: एसटी महामंडळ आणि एसटी कामगारांचे मूलभूत प्रश्न मार्गी लागले पाहिजेत अशी राज्य शासनाची भूमिका असून राज्य शासन एसटी कामगारांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचे महासचिव हनुमंत ताटे यांचा अमृतमहोत्सव सोहळा व त्यानिमित्त आयोजित कामगार परिषदेत ते बोलत होते. हडपसर येथील विठ्ठल तुपे नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमास उद्योगमंत्री उदय सामंत, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार चेतन तुपे, बापूसाहेब पठारे, ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव, माजी आमदार रवींद्र धंगेकर, सुनील टिंगरे, म्हाडाचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

ते पुढे बोलताना म्हणाले, कोरोनाच्या कालावधीत एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न होता. तेव्हा राज्य शासनाने पुढाकार घेऊन वेतनाची आवश्यक ती तरतूद केली होती. राज्यशासन एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणीच्या काळात मागे उभे राहते. सन १९४८ पासून एसटीचा प्रवास सुरू झाला असून ‘गाव तेथे एसटी’ या ब्रीदवाक्यानुसार सर्वसामान्य माणसाला प्रवासाची सेवा देत आहे. सेवा देत असताना एसटी लोकाभिमुख झाली पाहिजे. प्रवाशांनाही परवडणाऱ्या दरात सेवा देणे आवश्यक असून त्याबाबत कामगारांनीही पुढाकार घेतला पाहिजे.

राज्यातील शहरांचा विस्तार झाल्यामुळे एसटीच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागा शहराच्या मध्यवर्ती भागात आल्या आहेत. त्या ठिकाणी एसटी स्थानकांचा सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर (पी.पी.पी.) विकास करण्यासाठी कराराचा कालावधी ३०-३०-३० वर्षे असा वाढविण्याचे धोरण अंमलात आहे. तथापि, कमी कालावधीमुळे विकसक पुढे येत नसल्याने आता यात बदल करुन आधी ४९ व नंतर ४९ वर्षे असा ९८ वर्षापर्यंत करार वाढविण्याचे नवीन धोरण लवकरच राज्य शासन आणत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना चांगल्या मूलभूत सोयी सुविधा मिळतील, असेही ते म्हणाले.

सर्वसामान्यांना सेवा पुरवित असलेल्या एसटी बसेस चांगल्या असल्या पाहिजेत ही शासनाची भूमिका आहे. डिझेल इंधनावरील खर्च वाचविण्यासाठी ईलेक्ट्रिक बसेसलाही (ईव्ही) प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र शासन मोठ्या प्रमाणात अनुदान देत असून राज्य शासनही प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले.

कामगार संघटनेचे महासचिव हनुमंत ताटे यांनी इंदापूर तालुक्यातील एका सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येऊन एसटीत कारकुनाची नोकरी पत्करल्यानंतर कामगारांच्या प्रश्नांसाठी संघटनेत प्रवेश केला आणि डेपो सचिव, विभाग सचिव, प्रादेशिक उपाध्यक्ष ते महासचिव या पदापर्यंत मोठी वाटचाल केली. महामंडळावर दोन वेळा कामगार प्रतिनिधी म्हणून काम केले. त्यांनी कामगारांच्या प्रश्नांसाठी सतत पुढाकार घेतला, अशा शब्दात श्री. पवार यांनी त्यांचा गौरव केला.

उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले, एसटी महामंडळाचे कर्मचारी मागण्यांसाठी संप करतात तेव्हा ते प्रवाशांचाही विचार करतात. पाच वर्षापूर्वी त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने राज्यशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन ६ हजार ५०० रुपयांची वाढ केली. कामगारांना देशात सर्वाधिक वेतन देणारे आपले एसटी महामंडळ आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने एसटी स्थानकांच्या विकासासाठी ६०० कोटी रुपये दिले असून त्यातून विविध थांब्यांचा विकास करण्यात येत आहे. राज्यातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणची स्थानके बस पोर्टल म्हणून विकसित होणे गरजेचे आहे. स्थानकांवर चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी एसटी कामगार आग्रही असले पाहिजेत, असेही ते म्हणाले.

यावेळी श्री. ताटे आणि त्यांच्या पत्नी यांचा उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. श्री. ताटे यांनी सन्मानाला उत्तरपर भाषण दिले. कामगार नेते बाबा आढाव यांनीही मनोगत व्यक्त केले. संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचे पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

पुणे ते मुंबई अंतर केवळ दीड तासात शक्य:केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

पुणे-काही पुरस्कार व्यक्तीची प्रतिष्ठा वाढतात, तशीच माझी प्रतिष्ठा वाढवणारा पुरस्कार मला मिळाला असल्याबद्दल अतिशय आनंद झाला असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात आला. हा सन्मान गडकरी यांच्या राष्ट्रनिर्माणातल्या भरीव योगदानासाठी दिला गेला आहे. टिळक स्मारक मंदिरात पुरस्काराचे वितरण झाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक उपस्थित होते.

पुणे ते मुंबई अंतर केवळ दीड तासात

देशात पैशाची किंवा टेक्नॉलॉजीची कमतरता नाही. मात्र, देशासाठी काम करणाऱ्यांची कमतरता असल्याची खंत नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. मुंबईपासून बंगलोर पर्यंत आपण नवा महामार्ग तयार करत असून या महामार्गामुळे पुणे ते मुंबई अंतर केवळ दीड तासात पोहोचणे शक्य होणार असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. माझ्या विभागाकडे भरपूर मोठ्या प्रमाणात पैसा पडलेला आहे. मात्र तो खर्च करणारेच नसल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

राजकारणाला न पटणारे सत्य नितीन गडकरी बोलतात – देवेंद्र फडणवीस

राजकारणात सत्य माहिती असून देखील ते बोलू नये, असे मानले जाते. कारण अनेक वेळा त्या सत्य बोलल्याने आपलेच नुकसान होत असते. मात्र अशी परिस्थिती निर्माण झाली की, नितिन जी हमखास सत्यच बोलतात. कितीही नुकसान झाले तरी नितीनजी तेच बोलतात, जे त्यांच्या मनात आहेत. ते कधीच सोयीचे किंवा राजकारणाला जे पटेल ते बोलणार नाहीत. त्यांच्या मनात जे आहे, ते तेच बोलतील. त्यांचा हाच स्पष्टवक्तेपणा लोकांना जास्त मनापासून आवडतो, असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

अजित पवार आणि नितीन गडकरी यांच्यात एक साम्य – देवेंद्र फडणवीस

कुठेही नवीन कन्स्ट्रक्शन झाले की, गडकरी आणि अजित पवार हे पाहणी करण्यासाठी जातात. मात्र, त्या ठिकाणी या कामात काय चुकले? ते हे दोघेही शोधून काढतात. अशा शब्दात फडणवीस यांनी नितीन गडकरी आणि अजित पवार यांच्यात हे सामन्य असल्याचे सांगितले. इतकेच नाही तर संबंधित अधिकाऱ्यांची सर्वासमक्ष खरडपट्टी काढतात. कोणतेही काम गुणवत्ता पूर्णच असायला हवी, असा त्यांचा मानक असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

गडकरी हे केवळ यशस्वी राजकारणीच नाही, तर प्रयोगशील शेतकरी, दूरदृष्टी असलेले उद्योजक, प्रभावी प्रशासक आणि संवेदनशील सामाजिक कार्यकर्ते अजित पवार

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कि,’ लोकमान्य टिळक हे परखड विचारसरणीचे, राष्ट्रसेवेच्या निष्ठेनं झपाटलेले आणि निर्णायक भूमिका घेणारे महान नेते होते. त्यांच्या नावानं आणि त्यांच्या परिवाराकडून दिला जाणारा हा राष्ट्रीय सन्मान यंदा गडकरी साहेबांना देण्यात येतोय, ही अत्यंत सार्थ अभिमानाची बाब आहे. या पुरस्काराच्या गौरवशाली परंपरेत याआधी इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. दोन वर्षांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही हा सन्मान प्राप्त झाला होता. त्यामुळं या पुरस्काराची प्रतिष्ठा आणि भारदस्त परंपरा अधोरेखित होते.

नितीन गडकरी हे केवळ यशस्वी राजकारणीच नाही, तर प्रयोगशील शेतकरी, दूरदृष्टी असलेले उद्योजक, प्रभावी प्रशासक आणि संवेदनशील सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांच्या नेतृत्वात देशात रस्ते विकासाच्या क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडले आहे. ‘भारतमाला’ उपक्रमाअंतर्गत ८३,००० कि.मी. पेक्षा अधिक रस्त्यांचं जाळं निर्माण होत आहे. फास्टटॅग, इंधनात इथेनॉलचा वापर, प्लास्टिकच्या पुनर्वापरातून रस्ते बांधणी यांसारख्या अनेक धोरणात्मक सुधारणा त्यांनी रस्ते व वाहतूक क्षेत्रात यशस्वीपणे राबवल्या आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळं ट्रान्सपोर्टेशन अधिक स्वस्त, वेगवान आणि पर्यावरणपूरक बनले आहे.

गडकरी साहेबांच्या कार्यकाळात महाराष्ट्राला विशेष लाभ मिळाला. राज्यातील रस्ते प्रकल्पांना अधिक गती मिळाली, अनेक राज्य मार्गांचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गांमध्ये करण्यात आलं आहे. त्यांच्या कार्यामुळं महाराष्ट्राची दळणवळण व्यवस्था अधिक मजबूत झाली आहे. त्यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२५ मिळाल्याचा आम्हा सर्व पुणेकर आणि महाराष्ट्रवासीयांना अभिमान आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या रणसंग्रामात अण्णांचे योगदान उल्लेखनीय –कुमार सप्तर्षी

पुणे- महाराष्ट्र कामगार सुरक्षा दल आणि झोपडपट्टी सुरक्षा दल यांच्या वतीने भव्य क्रांती ज्योत सभेचे आयोजन करण्यात आले होते.  लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार देऊन सन्मानीत करावे. या मागण्यांसाठी अण्णा भाऊच्या जन्मभूमी वाटेगावपासून साहित्य क्रांती ज्योत आणण्यात आली हि ज्योत अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा स्मारक स्वारगेट येथे आणली. या साहित्य क्रांती ज्योतीच्या आंदोलनाचे जाहिर सभेत रुपांतर झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनाग्रा, जेष्ठ गांधीवादी विचारवंत कुमार सप्तर्षी आणि स्वागताध्यक्ष भगवानराव वैराट उपस्थित होते. सोनग्रा म्हणाले की अण्णा भाऊ यांचे कार्य महान होते. त्यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान मोठे आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णांनी शाहिरीतून चळवळ उभी केली. देशाच्या व महाराष्ट्राच्या जडणघडणीत अण्णाभाऊंचे योगदान मोठे आहे. अशा महान साहित्यिकडून आपण सर्वांनी आदर्श घेवून समाजहिताचे कार्य केले पाहिजे. सप्तर्षी म्हणाले की, “लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी रशियामध्ये महाराष्ट्राची ओळख करून देताना अण्णांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला होता. साहित्य क्षेत्रात, संयुक्त महाराष्ट्राच्या रणसंग्रामात अण्णांचे योगदान मोठे आहे. वाटेगावपासून पुण्यापर्यंत “साहित्य क्रांती ज्योत” ही झोपडपट्टी सुरक्षा दला तर्फे ४ दिवस पायी प्रवास करत आणण्यात आली. वैराट म्हणाले की देशाच्या जडणघडणीत ज्या राष्ट्रीय महापुरुषांनी फार मोठे योगदान दिले आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीत शाहिरीने समाज जागृती करणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे अशी मागणी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशिनाथ गायकवाड  यांनी केले. तर आभार संतोष कदम यांनी मानले. मोहम्मद शेख, शिवाजी भिसे, हरिभाऊ वाघमारे, दत्ता डाडर, सुनिता जाधव, राजाभाऊ शिंदे, नितीन वन्ने अभिजीत ननावरे , शिवाजी अवघडे, दत्ता कांबळे आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. 

थोर साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांची क्रांती ज्योत अखंड १४ वर्षे  पुण्यात आणली जात आहे. प्रभू श्रीरामाचा १४ वर्षाचा वनवास संपला मात्र भारत सरकारने अण्णा भाऊंना भारतरत्न देवून त्यांचा हा वनवास संपवावा अशी मागणी झोपडपट्टी सुरक्षा दल यांच्यावतीने मागणी करण्यात आली. 

कोकाटेंचा राजीनामा न घेता क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच,युती सरकार बेशरम व लाचार:हर्षवर्धन सपकाळ.

दहशतवादाला रंग देण्याचा भाजपाचा प्रयत्न, मालेगावचा खरा निकाल तर एक दिवस आधी गृहमंत्र्यांनी संसदेत दिला.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे अभिवादन.

मुंबई, दि. १ ऑगस्ट २०२५
राज्यातील भाजपा युती सरकार हे बेशरम व लाचार असून विधानसभेत रमी खेळणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा सोडून क्रीडा मंत्रालय देऊन उचित सन्मानच केला आहे. आता रमी या खेळाला ऑलिंम्पिक दर्जा देतील व तो खेळणाऱ्याला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानितही करतील असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी त्यांना अभिवादन केले. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने काल निकाल दिला असला तरी खरा निकाल देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत एक दिवस आधीच दिला होता, हे यानिमित्ताने खेदाने नमुद करावे वाटते. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो व रंगही नसतो पण भाजपा दहशतवादाला रंग देऊन त्यांचा अजेंडा राबवत आहे. तर खोटारडेपणा व दुटप्पीपणा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वभावाचे पैलू आहेत. मालेगावच्या निकालावर प्रतिक्रीया देताना त्यांनी मंत्रीपदावेळी घेतलेल्या शपथेचा भंग केला आहे. एका घटनेला एक न्याय व दुसऱ्याला दुसरा न्याय हे नैतिकता व शपथेला धरून नाही. फडणवीस यांनी नैतिक व संविधानिक मुल्ये पाळली नाहीत त्यामुळे ते अधर्मी आहेत.

सामाजिक विभागाचा निधी लाडकी बहिण योजनेसाठी वळवला, या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, हे सरकार चुकीच्या पद्धतीने सत्तेवर आले आहे हे आम्ही वारंवार सांगत आलो आहोत त्यामुळे ते चुकीचीच कामे करणार. सामाजिक न्याय विभाग वा आदिवासी विभागाचा निधी हा कोणत्याही परिस्थितीत दुसरीकडे वळवता येत नाही पण सरकार सातत्याने नियमांचे उल्लंघन करत असून संविधानाची पायमल्ली करत आहे.

पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, जे लोक पक्ष सोडून जात आहेत त्यांची चर्चा होत होती पण ज्या पक्षात जायचे त्यांच्याशी योग्य सौदा काही होत नव्हता आता सौदा झाल्याने ते गेले असतील. याला गळती म्हणणे चुकीचे ठरेल, काँग्रेस हा विचार धारेवर चालणारा पक्ष आहे, कोणाच्या जाण्याने पक्ष कमजोर होत नाही, ५०-५० वर्ष एकाच कुटुंबात पक्षाची पदे दिली गेली आता नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळत आहे. जे गेले त्यांनी दिल्या घरी सुखी रहावे, असेही सपकाळ म्हणाले.

तरंगणाऱ्या कोया, बिया निरुपयोगी !_ विजयकुमार कट्टी

मुंबई –आपण आंब्याच्या कोया आणि इतर फळझाडांच्या बिया लावण्यापूर्वी त्या पाण्यात टाकून बघाव्यात.त्या तरंगल्या तर समजायचे,या कोया आणि बिया निरुपयोगी आहेत. पण जर त्या बुडाल्या तर त्या लावण्यायोग्य हे समजून त्या
लावाव्यात असे प्रात्यक्षिकासह मौलिक मार्गदर्शन,वृक्षतज्ञ विजयकुमार कट्टी यांनी नुकतेच केले.नवी मुंबई येथील पर्यावरण तज्ज्ञ सुधीर थोरवे आणि पर्यावरण प्रेमी मंडळीनी रायगड जिल्ह्यातील कर्जत जवळील टेकडीवर आयोजित केलेल्या वृक्षारोपण प्रसंगी श्री कट्टी बोलत होते.

वृक्षारोपण कार्यक्रमाच्या निमित्ताने गेली दोन महिने घरी
जमवलेल्या आंब्याच्या कोया, जांभळाच्या ,फणसाच्या, सीताफळाच्या बिया घेऊन मोठ्या हौसेने माध्यमकर्मी देवेंद्र भुजबळ आले होते.या कोया आणि बिया कुठे लावणे योग्य ठरेल ? असे त्यांनी कट्टी यांना विचारले असता,प्रथम त्यांनी वृक्षारोपणासाठी तयार केलेल्या आणि पावसाचे पाणी जमलेल्या एका खड्ड्यात एकेक कोय टाकण्यास सुरुवात केली आणि प्रत्येक कोय बुडत गेली. कोयांची ज्या पद्धतीने काळजी घ्यायला हवी होती ती न घेतली गेल्याने असे झाले आहे, असे सांगून त्यांनी
कोयांची ,शास्त्रीय पद्धतीने कशी काळजी घ्यावी हे,उपस्थित सर्वांना समजावून सांगितले.सुदैवाने आणलेल्या बिया मात्र बुडाल्याने,त्या सर्व लावण्यात आल्या.

या बरोबरच कट्टी यांनी उपस्थित गृहिणींना ,त्यांनी स्वयंपाकात शेंगदाणे वापरण्यापूर्वी ते पाण्यात टाकून बघावेत आणि ते बुडाले तरच वापरावेत,अशी
“अंदर की बात” सांगितली!

या प्रसंगी नुकतेच दिवंगत झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांच्या स्मरणार्थही वृक्षारोपण करण्यात आले.

या वृक्षारोपणासाठी वनाधिकारी समीर खेडकर, जितेंद्र चव्हाण, कर्जत येथील शरद पवार, विलास आचरेकर,आमदार महेंद्र थोरवे यांचे सहायक राजू थोरवे यांचे सहकार्य लाभले.

श्री सुधीर थोरवे आणि त्यांचे
सम विचारी गेल्या १२ वर्षांपासून वन विभागाच्या सहकार्याने या टेकडीवर वृक्षारोपण करीत आहेत.
७ जणांपासून सुरू झालेला हा समूह आता ७५ पर्यंत गेला आहे.यावेळच्या ७५ जणांमध्ये
सम विचारी स्त्री,पुरुषच नव्हे तर आबाल वृद्ध देखील सहभागी झाल्याने एक प्रकारच्या कौटुंबिक वातावरणात हे वृक्षारोपण झाले. या अनौपचारिक उपक्रमाला निश्चित स्वरूप यावे म्हणून एका फाउंडेशनची स्थापना करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.