Home Blog Page 375

PMPML विजेत्या महिलांना पैठणी व एक महिन्याच्या मोफत बस प्रवास पासचे वितरण.

रक्षाबंधन सणानिमित्त आयोजित ‘लकी-ड्रॉ’ योजनेतील बक्षीस वितरण सोहळा संपन्न

पुणे –
रक्षाबंधन सणानिमित्त पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) तर्फे दि. ०९ ऑगस्ट २०२५
रोजी, पीएमपीएमएल चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांच्या संकल्पनेतून महिला प्रवाशांसाठी
‘लकी-ड्रॉ’ योजनेचे आयोजन करण्यात आले होते. या योजनेची सोडत दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजी संगणकीय पद्धतीने
करण्यात आली होती.या ‘लकी-ड्रॉ’ योजनेचा बक्षीस वितरण सोहळा आज दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी स्वारगेट येथील प्रशिक्षण
हॉल येथे संपन्न झाला.
या सोहळ्यात पीएमपीएमएल चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांच्या हस्ते, तसेच
मुख्य कार्यकारी अधिकारी आशा राऊत, कलाक्षेत्रम सिल्क अँड सारीज, लक्ष्मी रोड, पुणे या भव्य दालनाचे
मालक सागर पासकंठी, रेडिओ मिरचीचे आर. जे. निमी, केतन धस यांच्या उपस्थितीत सर्व विजेत्या महिला
प्रवाशांना कलाक्षेत्रम सिल्क अँड सारीज, लक्ष्मी रोड, पुणे यांचेकडून पैठणी व पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून एक
महिन्याचा सर्व मार्गासाठी मोफत बस प्रवास पास प्रदान करण्यात आले.
यावेळी शितल माचुत्रे, माया बर्वे, रंजना कांबळे, कविता चव्हाण, पौर्णिमा भोसले, सुनिता मुरंबे, अंचली
गोणारकर, पूजा वैद्य, ऋतुजा सावंत, मिना बोदरे, प्रेरणा पवार, रेखा यरमवार, तनिष्का निकम या ‘लकी-ड्रॉ’ योजनेतील
महिला विजेत्यांना पैठणी व एक महिन्याचा सर्व मार्गासाठी मोफत बस प्रवास पास प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी पीएमपीएमएलच्या विविध विभागांचे विभागप्रमुख तसेच कर्मचारी उपस्थित होते.
पीएमपीएमएलतर्फे या उपक्रमाद्वारे महिला प्रवाशांना प्रोत्साहन देण्याचा आणि प्रवासी सेवेत गुणवत्तावृद्धी करण्याचा
संकल्प व्यक्त करण्यात आला.

धर्मवीरांना सामूहिक तर्पणः अरुंधती फाऊंडेशनतर्फे २१ सप्टेंबर रोजी विशेष कार्यक्रम

पुणेः गेल्या १२०० वर्षांत परकीय आक्रमणांत वीरगती प्राप्त झालेल्या ज्ञात-अज्ञात हिंदू धर्मवीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अरुंधती फाऊंडेशनने यंदाही सामूहिक तर्पण आणि श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी म्हणजेच रविवार दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी 10.00 ते 2.00 दरम्यान हा कार्यक्रम पत्रकार भवन, नवी पेठ येथे पार पडणार आहे. अशी माहिती अरुंधती फाऊंडेशनचे श्री. आदित्य गुप्ते यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

कार्यक्रमा नंतर बहुचर्चित ‘His Story of इतिहास’ ह्या सत्यघटनेवर आधारीत भारतीय इतिहासातल्या अफरातफरीवर भाष्य करणाऱ्या चित्रपटाचे विनामूल्य प्रदर्शन होणार आहे.

गेल्या वर्षी श्री देव ओंकारेश्वर मंदिरात झालेला हा स्तुत्य उपक्रम सर्व हिंदू बांधवांच्या सहकार्याने यशस्वी झाला होता. त्यामुळे यंदाही मोठ्या संख्येने धर्मप्रेमींनी या कार्यक्रमात सहभागी होऊन हुतात्यांच्या बलिदानाचे स्मरण करावे, असे आवाहन आदित्य गुप्ते यांनी केले आहे.

या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश सनातन धर्माच्या रक्षणासाठी प्राणार्पण केलेल्या या धर्मवीरांचे स्मरण करणे, त्यांना सामूहिक तर्पण अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांच्या त्यागाचा वारसा जपण्याची धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जबाबदारी पार पाडणे हा आहे.

गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही सर्व हिंदू संघटना आणि नागरिकांनी या ऐतिहासिक कार्याला सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

दिव्यांगांनी साकारलेल्या वस्तूंचे प्रोत्साहन प्रदर्शन २० सप्टेंबर पासून

दृष्टीहिन व्यक्तींची वस्तू प्रात्यक्षिके आणि कला सादरीकरण ; प्रदर्शनाला प्रवेश विनामूल्य

पुणे : दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्या सोबतच त्या स्वावलंबी व्हाव्या, तसेच समाजाला त्यांच्यातील कौशल्यांची ओळख व्हावी, या उद्देशाने पुण्यातील समविचारी मैत्रिणींनी एकत्र येऊन प्रोत्साहन २०२५  या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. शनिवार, दिनांक २०  सप्टेंबर ते रविवार, दिनांक २१  सप्टेंबर रोजी सकाळी  १० ते ८ यावेळेत कर्वे रस्त्याजवळील अश्वमेध हॉल येथे हे प्रदर्शन होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागातील ३१  दिव्यांग व्यक्ती आणि ९ संस्था या प्रदर्शनात सहभागी होत आहेत.

प्रदर्शनाचे संयोजन रंजना आठल्ये, रेखा कानिटकर, आरती पटवर्धन, माधुरी पाटणकर, शुभदा करंदीकर, गीता पटवर्धन, आबेदा खान, नीलम भाटवडेकर, अमृता पटवर्धन, रोहिणी अभ्यंकर यांनी केले आहे.  प्रदर्शनाचे उद््घाटन शनिवार, दिनांक २० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता दिव्यांगांसाठी कार्यरत असलेल्या इंटिग्रेटेड एज्युकेशन सेंटरच्या अमृता भागवत आणि गती मंद असलेल्या पूजा मुनोत यांच्या हस्ते होणार आहे. फक्त दिव्यांग व्यक्तिंचाच सहभाग असलेल्या या प्रदर्शनात त्यांनी साकारलेल्या उपयुक्त कलात्मक वस्तू आणि खाद्यपदार्थ यांचे  प्रदर्शन व विक्री केली जाते. त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे.

रंजना आठल्ये म्हणाल्या, सन २००३ पासून हे प्रदर्शन दरवर्षी आयोजित केले जाते. प्रदर्शनात सर्व वयोगटातील दिव्यांग व्यक्ती सहभागी होतात. दिव्यांग व्यक्ती, त्यांच्यासाठी काम करणा-या संस्था आणि सामान्य नागरिक यांच्यात परस्पर संवाद व सहकार्य स्थापन करणे, हा या मागचा उद्देश आहे. दृष्टिहीन व्यक्ती आपले दैनंदिन आयुष्य कसे व्यतीत करत असतील याचे कौतुक आणि कुतूहल प्रत्येकाला असते. याबाबतीत त्यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे. दिव्यांगाना सक्षम करणे हाच प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे.

प्रदर्शनात विद्या ज्योती स्पेशल स्कूल, प्रिझम फाउंडेशन, शिर्डी साईबाबा अंध महिला वृद्धाश्रम, संवाद, नंदनवन, स्मित फाऊंडेशन, उन्मेष फाउंडेशन, मैत्र फाऊंडेशन, मोहोर एंटरप्रायझेस इत्यादी भाग घेणार आहेत. प्रदर्शना दरम्यान धायरी येथील दृष्टीहिन वृद्ध महिला वायरचे बास्केट, मण्यांचे शोपीस तयार करण्याचे प्रात्यक्षिक सादर करतील . त्याशिवाय वेळोवेळी  दिव्यांग कलाकार करमणुकीचे कार्यक्रम सादर करतील. प्रदर्शनाला प्रवेश विनामूल्य असून पुणेकरांनी मोठया संख्येने प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

महिंद्राने ओज ट्रॅक्टरची पुढील श्रेणी ऑस्ट्रेलियामध्ये लाँच केली

स्मार्ट शेतीच्या नवीन युगाची सुरुवात

महिंद्राच्या ऑस्ट्रेलियातील पदार्पणाला 20 वर्षे झाली आहेत. त्याच वेळी लाँच झालेल्या या ओज ट्रॅक्टरमुळे आनंद द्विगुणित झाला आहे. यामुळे ऑस्ट्रेलियात ताकद, आराम आणि स्मार्ट शेतीच्या नवीन युगाची सुरुवात झाली आहे.

ब्रिस्बेन18 सप्टेंबर 2025: जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनी असलेल्या महिंद्रा अँड महिंद्राने भविष्याच्या दृष्टीने तयार केलेली ट्रॅक्टर श्रेणी महिंद्रा ओज ऑस्ट्रेलियामध्ये लाँच केली.

ऑस्ट्रेलियामध्ये महिंद्रा कंपनीला 20 वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने कंपनीने सब-कॉम्पॅक्ट आणि कॉम्पॅक्ट श्रेणीतील ओज 1100 आणि 2100 मालिकेतील तीन नवीन ट्रॅक्टर मॉडेल सादर केले. ऑस्ट्रेलियन शेतकऱ्यांच्या अद्वितीय गरजा पूर्ण करण्यासाठी ते विचारपूर्वक डिझाइन केलेले आहेत. हे नवीन ट्रॅक्टर मॉडेल आहेत ओज 1123 एचएसटी (हायड्रोस्टॅटिक ट्रान्समिशन), ओज 1126 एचएसटी आणि शक्तिशाली ओज 2126 एचएसटी.

मजबूत बांधकामासह ऑस्ट्रेलियातील परिस्थितीसाठी तयार करण्यात आलेली ओजची ही श्रेणी दीर्घकाळासाठी तयार करण्यात आली आहे. महिंद्राचे उत्पादन असल्याने विश्वासार्हता आहेच तसेच वापरणाऱ्यांना सोयीचे जाईल असे त्याचे आरामदायी डिझाइन आहे.

ऑस्ट्रेलियन शेतकरी आणि मालमत्ता धारकांसाठी नवीन मानके निश्चित करणारी आहे. ही ओज श्रेणी प्रगत तंत्रज्ञान, शक्तिशाली इंजिन तंत्रज्ञान, बटन-ऑपरेटेड पीटीओ आणि क्लास-लीडिंग लिफ्ट क्षमतेसह लोडर सारख्या नवकल्पनांसह एर्गोनॉमिक प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले पॅनल, प्रगत हायड्रॉलिक्स, पॉवर स्टीअरिंग सिस्टम आणि पर्यायी केबिन कॉन्फिगरेशन सारख्या वैशिष्ट्यांनी नवीन महिंद्रा ट्रॅक्टर सज्ज आहेत. यामुळे अतुलनीय आराम मिळतो तसेच नियंत्रण ठेवता येते.

प्रोजेक्टर स्टाईलचे हेडलाइट्स सकाळी लवकर किंवा रात्री उशिरापर्यंतच्या कामांसाठी स्पष्ट दृश्यमानता देतात. फोल्डेबल आर्मरेस्टसह महिंद्राची आलिशान एमकम्फर्ट सीट आणि ड्रायव्हर-फ्रेंडली कलर-कोडेड कंट्रोल्ससह, चिरस्थायी मूल्यासह आधुनिक शेतीसाठी ओजला एक योग्य भागीदार बनवते.

संस्कृत शब्द “ओजस”म्हणजे ऊर्जेचा साठा, त्यावरून हे नाव देण्यात आले आहे. ओज हा महिंद्राचा सर्वात महत्त्वाकांक्षी, हलका ट्रॅक्टर आहे. महिंद्रा ऑटो अँड फार्म सेक्टर (एएफएस) साठीचे संशोधन आणि विकास केंद्र असलेली महिंद्रा रिसर्च व्हॅली, आणि जपानमधील मित्सुबिशी महिंद्रा कृषी यंत्रसामग्री यांच्या सहयोगी प्रयत्नातून ही नवीन ओज श्रेणी विकसित केली गेली आहे. हलक्या वजनाच्या 4WD ट्रॅक्टर डिझाइनमध्ये ही श्रेणी एक परिवर्तनकारी बदल सुचवते. यात अत्याधुनिक नवकल्पना आहेत ज्या ऑस्ट्रेलियामधील शेतीची पुनर्परिभाषा करण्यासाठी सज्ज आहेत.

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या फार्म इक्विपमेंट बिझनेसचे अध्यक्ष श्री. विजय नाक्रा म्हणाले, महिंद्रा ब्रँड ऑस्ट्रेलियातील पदार्पणाची 20 वर्षे साजरी करत असतानाच जागतिक स्तरावर कौतुक झालेला महिंद्रा ओज ट्रॅक्टर या महत्त्वाच्या बाजारपेठेत सादर करताना आम्हाला आनंद होतो आहे. जपानच्या मित्सुबिशी महिंद्रा ऍग्रीकल्चर मशिनरीसोबतच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या आमच्या प्रगत ग्लोबल लाइटवेट 4डब्ल्यूडी ट्रॅक्टर प्लॅटफॉर्मवर तयार केलेलीओजची ही श्रेणी महिंद्राची नावीन्यपूर्णताटिकाऊपणा तसेच ग्राहक-केंद्रित डिझाइनसाठीची वचनबद्धता दाखवते. जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीसहहे  नवीन उत्पादन कामगिरी आणि विश्वासार्हतेला महत्त्व देणाऱ्या ऑस्ट्रेलियातील शेतकरी तसेच मालमत्ता धारकांना आवडेलअसा आम्हाला विश्वास आहे.”

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे ​​ग्लोबल प्रोडक्ट प्लॅनिंग अँड इंटरनॅशनल ऑपरेशन्स (आसियान अँड आरओडब्ल्यू) प्रमुख श्री. रवींद्र एस. शहाणे म्हणाले, ऑस्ट्रेलियासाठीसब-कॉम्पॅक्ट आणि कॉम्पॅक्ट श्रेणींमधील ओज ११०० आणि २१०० मालिकेतील ओज मॉडेल्स महिंद्रा लाँच करत आहे. स्मार्ट आणि विचारपूर्वक तयार केलेल्या या अग्रगण्यतंत्रज्ञानातील पहिलाच प्रयोग असलेली ओज श्रेणी एक शक्तिशाली मल्टीटास्किंग सोल्यूशन देतेजे तेथील जगण्यासाठी योग्य आहे. तसेच लहान जमीन मालकांसाठी आवश्यक असे बहुआयामीवापरणाऱ्यांची सोय पाहणारे तसेच हाताळणी सोपी असेल असे डिझाइन केलेले आहे. नावीन्यपूर्णता आणि मूल्य यांचा योग्य समन्वय साधत तयार करण्यात आलेली ही नवीन श्रेणी आजपासून संपूर्ण ऑस्ट्रेलियामध्ये उपलब्ध होईल.”

ऑपरेटर अनुभव आणि कृषी नवोपक्रमातील एक धाडसी झेप असलेली महिंद्रा ओज श्रेणी दक्षिण भारतातील महिंद्राच्या अत्याधुनिक कारखान्यात तयार केली जाते. या मालिकेतील मॉडेल्स अमेरिकाकॅनडाथायलंड तसेच भारतातील बाजारपेठांसाठी देखील उपलब्ध आहेत.

यातील आणखी एक दिलासादायक गोष्ट म्हणजे, महिंद्रा ऑस्ट्रेलिया एक विस्तृत वॉरंटी पॅकेज देते: 3 वर्षांचे बंपर-टू-बंपर कव्हरेजतर पॉवरट्रेनवर अतिरिक्त 3 वर्षे वॉरंटी. महिंद्राच्या कटिबध्दतेच्या पाठिंब्याने, ही वॉरंटी त्याच्या श्रेणीत नवीन बेंचमार्क स्थापित करते. तसेच ट्रॅक्टर मालकांना मोठ्या प्रमाणात दिलासा देते.

महिंद्रा ओज 1100 सीरिज

ओज 1100 सबकॉम्पॅक्ट मालिकेत, महिंद्रा दोन मॉडेल्स सादर करेल – ओज 1123 HST आणि ओज 1126 HST. ओज सब-कॉम्पॅक्ट ट्रॅक्टरमध्ये स्टायलिश डिझाइन आणि वापरण्यासाठी सोयीचे असे हायड्रोस्टॅटिक ट्रान्समिशन, क्रूझ कंट्रोल आणि हीटर कॅब आहे, जे कॉम्पॅक्ट उपाय शोधणाऱ्या मालमत्ता धारकांसाठी आदर्श आहे. 

  • 1123 HST: 3,000 आरपीएम वर 23 एचपी पॉवर निर्माण करणारे 3-सिलेंडर डिझेल इंजिन
  • 1126 HST: 3,000 आरपीएम वर 26 एचपी पॉवर निर्माण करणारे 3-सिलेंडर डिझेल इंजिन
  • कार्यक्षमतेने चालण्यासाठी सहज नियंत्रणे
  • ड्रायव्हिंगच्या सोयीसाठी टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टीअरिंग
  • लोडर लिफ्ट क्षमता: 420 किलो
  • रीअर हिच लिफ्ट क्षमता: 350 किलो
  • वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य हाताळणीसाठी पर्यायी मिड-माउंट मॉवर
  • स्टॅंडर्ड 540 आरपीएम रीअर पीटीओ – बटणावर चालणारे
  • विविध भौगोलिक प्रदेशांसाठी टर्फ आणि औद्योगिक टायर पर्याय

महिंद्रा ओज 2100 सीरिज

ओज 2100 कॉम्पॅक्ट मालिकेतील महिंद्रा ओज 2126 HST महिंद्रा सादर करत आहे. मोठ्या प्लॅटफॉर्मवर बनवलेले, ओज 2126 अधिक शक्तिशाली कामांसाठी डिझाइन केलेले आहे. ज्यामध्ये पूर्णपणे एकात्मिक HVAC (हीटर + एअर-कंडिशनर) कॅब पर्याय म्हणून उपलब्ध आहे, ज्यामुळे ते विश्वासार्ह तर ठरतेच पण सर्व हवामानासाठी योग्य ट्रॅक्टर ठरते. ट्रॅक्टरमध्ये सर्वोत्तम-इन-क्लास लोडर लिफ्ट क्षमता आणि कार्यक्षम लोडर ऑपरेशन्ससाठी सायकल टाइम  देखील आहे.

  • 2126 HST: 2,500 आरपीएमवर 26 एचपी उत्पादन करणारे 3-सिलेंडर डिझेल इंजिन
  • कार्यक्षमतेने चालण्यासाठी सहज नियंत्रणे
  • 3-रेंज एचएसटी ट्रान्समिशन
  • ड्रायव्हिंगच्या उत्तम अनुभवासाठी टिल्ट स्टीअरिंग
  • सोप्या हालचाली आणि सुलभतेसाठी रुंद फ्लॅट ऑपरेटर प्लॅटफॉर्म
  • लोडर लिफ्ट क्षमता: 580 किलो
  • रीअर हिच लिफ्ट क्षमता: 800 किलो
  • स्टॅंडर्ड 540 आरपीएम रीअर पीटीओ – बटणावर चालणारे

17 सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलियातील महिंद्राच्या डीलर्सना ओज श्रेणी सादर केली जाईल, आणि त्याच्या बुकिंगला सुरुवात होईल.

गोंधळी कलाकारांसाठी त्रिसूत्री कार्यक्रम राबविणार: परेश गरुड

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोंधळी व भटक्या विमुक्त जाती जमाती विकास संघातर्फे मेळाव्याचे आयोजन

पुणे: गोंधळी कलाकारांचा अपघाती विमा, कागदपत्रे मिळण्यात येणाऱ्या अडचणी सोडवणे आणि त्यांच्या मुलांचे शिक्षण, माता-भगिनींचे सक्षमीकरण हा त्रिसूत्री कार्यक्रम राबविला जाणार आहे. गोंधळी, डवरी व जागरण गोंधळाशी संबंधित अन्य भटक्या विमुक्तांसाठी आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्र आणि कलाकारांचे मानधन यावरही काम करणार असल्याचे गोंधळी व भटक्या विमुक्त जाती जमाती विकास संघाचे अध्यक्ष परेश गरुड यांनी सांगितले.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोंधळी व भटक्या विमुक्त जाती जमाती विकास संघातर्फे गोंधळी कलाकारांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. नवी पेठेतील पत्रकारसंघाच्या सभागृहात झालेल्या या मेळाव्यात भटके विमुक्त विकास परिषदेचे स्वामी धनगर, सद्भाव गती विधी पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे रवी ननावरे, आयुर्विमा प्रतिनिधी विद्या गुगळे, राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयातील लोककला अनुदान विभागाचे सदस्य खोडे आदी उपस्थित होते. ४५ पेक्षा अधिक कलाकारांनी मेळाव्याला उपस्थित लावली.

परेश गरुड म्हणाले, “प्रामुख्याने कलाकार, त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी काम करण्याचे ठरले. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या अडचणी दूर करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासह किमान पदवीचे शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. २२ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवात गोंधळी कलावंतांचा एक लाख रुपयांचा अपघाती विमा संस्थेमार्फत उतरवण्यात येणार आहे. कलाकारांचे आरोग्य, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक अकाउंट, रहिवासी दाखला, उत्पन्नाचे दाखले व कलाकार पेन्शन या विषयात काम करायचे निश्चित करण्यात आले आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत पुणे शहर व जिल्ह्यातील ५०० कलाकारांची नोंदणी करून शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.”

विद्या गुगळे यांनी आयुर्विमाचे महत्व याविषयी माहिती दिली. स्वामी धनगर यांनी भटके विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या योजनांविषयी सांगितले. खुडे यांनी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना कलाकारांना अवगत केल्या. जितेंद्र वाईकर यांनी सूत्रसंचालन केले. हरीश पाचंगे यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत रेणके यांनी आभार मानले.

‘आयव्हीएफ’च्या माध्यमातून पुण्यातील दांपत्याला जनुकदोषमुक्त अपत्यप्राप्ती

पुणे18 सप्टेंबर २०२५ : कराड येथील एका दांपत्याला अपत्यप्राप्तीचे सुख मिळत नव्हते. त्यांना झालेली दोन बाळे जन्मानंतर काही दिवसांतच दगावली होती. या बाळांना आई–वडील दोघांकडूनही आलेल्या अनुवांशिक जनुकदोषामुळे गंभीर आजार झाला होता. मात्र अखेर पुण्यातील इंदिरा आयव्हीएफ येथे ‘इन विट्रो फर्टिलायझेशन’च्या (आयव्हीएफ) उपचारांमुळे या दांपत्याला जनुकदोषमुक्त निरोगी बाळ प्राप्त झाले आहे.

लग्नाला दहा वर्षांहून अधिक काळ उलटून गेला तरीही या दांपत्याला अपत्यप्राप्ती होत नव्हती. त्यांच्यावर ‘स्पायनल मस्क्युलर अ‍ॅट्रॉफी’ (एसएमए) या दुर्धर आजाराची छाया होती. हा आजार दोन्ही पालकांकडून पुढे सरकतो आणि अपत्याच्या जिवंत राहण्याच्या शक्यतांवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. अपत्यप्राप्तीमध्ये जोखीम घ्यावी लागणार हे स्पष्ट दिसत असले, तरी निरोगी अपत्य प्राप्त करण्याची या दांपत्याची जिद्द कायम होती. वैज्ञानिक आणि वैद्यकीय प्रगतीने या अडचणीवर मार्ग निघाला. जनुकीय तपासणी, गुणवत्ता नियंत्रणाचे प्रोटोकॉल्स आणि सततचे वैद्यकीय मूल्यमापन यांवर आधारित खास तयार केलेल्या उपचारयोजनेमुळे या दांपत्याने अशक्य वाटणाऱ्या अडथळ्यांवर मात केली.

इंदिरा आयव्हीएफ येथील आयव्हीएफ तज्ज्ञ डॉअमोल सुभाष लुंकड म्हणाले, “एसएमएसारख्या जनुकदोषातून मार्ग काढणे म्हणजे केवळ वंध्यत्वावर उपचार करणे नसते, तर व्यापक उपचारयोजना, काटेकोर वैद्यकीय देखरेख आणि सातत्यपूर्ण मूल्यमापन त्यामध्ये गरजेचे असते. आम्ही जनुकीय तपासण्या केल्या आणि रुग्णांना विश्वासात घेतले. त्यातून पालकत्वाकडे आत्मविश्वासाने जाणारा मार्ग उभा राहिला.”

या उपचारांमध्ये यशाची शक्यता वाढवण्यासाठी टप्प्याटप्प्याने योजना आखण्यात आली :

·         दांपत्याचा वैद्यकीय इतिहास तपासून, त्यांना त्यांच्या अनुवांशिक आजाराची, त्यातील चाचण्यांची माहिती दिली, जोखीम सांगितली आणि समुपदेशन केले,

·         अंडाशय सक्रियतेची पद्धत वापरून आयव्हीएफ पद्धतीने अंड्यांची वाढ तपासली,

·         प्रयोगशाळेत भ्रूण तयार करून त्याची जनुकीय तपासणी केली आणि दोष निर्माण होऊ शकणारे भ्रूण वगळले,

·         निरोगी भ्रूणाची निवड करून गर्भाशयात प्रत्यारोपण करणे आणि पुढील देखरेख सुरू केली.

या उपचारांनंतर रुग्णाला गर्भधारणा झाली आणि निरोगी, जनुकदोषमुक्त बाळाचा जन्म झाला. अनेक वर्षांची झुंज संपली आणि तिच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

आयव्हीएफचे उपचार, जनुकीय तपासणी आणि सातत्यपूर्ण देखरेख यांचा संगम झाल्यास, जनुकदोषाचा धोका असलेल्या दांपत्यांनाही पालकत्वाचा सुरक्षित व विश्वासार्ह मार्ग उपलब्ध होऊ शकतो, हे या अनुभवावरून दिसून येते.

पुणे शहरातील 4 बडे बिल्डर ED च्या रडारवर, रिअल इस्टेट क्षेत्रात खळबळ…

-दानवीर, धर्मवीर कर्मवीर म्हणविणारे देखील जाळ्यात ? प्रमोद रांका प्रकरणाचा तपास ED कडे

पुण्यातील ख्यातनाम लोकांच्या कंपन्यांवर आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात आयकर विभागाने धाडी टाकल्यानंतर आता सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने याची चौकशी आपल्या हाती घेतली आहे.दिल्लीमधे स्पेशल कनेक्शन्स तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील घनिष्ट संबंध असल्याचे सांगणारे पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर प्रमोद रांका यांच्या गैरव्यवहारांचा तपास ED कडे देण्यात आला आहे. रांका यांच्यासह पुणे शहरातील 4 बडे बिल्डर ED च्या रडारवर असून या सगळ्यांनी मिळून केलेले गैरव्यवहार आता उघडकीस आले आहेत. काही सेवानिवृत्त उच्चपदस्थ अधिकारी देखील या गैरव्यवहारात सहभागी आहेत, त्यांची देखील चौकशी करण्यात येणार असल्याचे वृत्त ‘मिरर’ने दिले आहे

रांका यांच्यासह साॅलिटायर ग्रुप, कोहिनूर डेव्हलपर्स आणि मित्तल बंधूंच्या कंपन्यांवर आयकर विभागाने टाकलेल्या मोठ्या छाप्यानंतर इडीने यासंदर्भातील चौकशी सुरू केली आहे. ‘सीविक मिरर’च्या संपादिका अर्चना मोरे यांनी या कारवाईची माहिती सर्वप्रथम प्रसिद्ध केली. यामुळे पुण्याच्या रियल इस्टेट क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिरर च्या वृत्तात असे म्हटले आहे कि,’ आयकर विभागाच्या चौकशीत काही नामांकित बांधकाम कंपन्या आणि सरकारी अधिकाऱ्यांमधील संदिग्ध संबंध उघड झाले असून यात येस बँक कर्ज घोटाळा आणि इंडियाबुल्स आर्थिक गैरव्यवहार यांचेही धागेदोरे गुंतले असल्याचे समोर आले आहे.प्रमोद रांका हे रिव्हरफ्रंट रिअ‍ॅल्टी पुणे, स्टारव्ह्यू हाउसिंग, प्रोमार्क प्रॉपर्टीज, एक्झर्बिया एपॉक क्रिएशन्स, एम्ब्लेम रिअ‍ॅल्टी, साक्षी शाह रिअ‍ॅल्टी, रांका गारमेंट्स आणि पार्श्वनाथ क्लोदिंग या कंपन्यांमध्ये भागीदार किंवा संचालक आहेत.ईडीचा तपास अजून सुरू आहे. मात्र प्राथमिक तपासात प्रमोद रांका हे या संपूर्ण घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट होत आहे. स्थगित प्रकल्प, टाउनशिप धोरणांचा गैरवापर आणि संशयास्पद आर्थिक व्यवहारांमुळे पुण्याच्या रिअल इस्टेट क्षेत्रसमोर विश्वासार्हतेचे मोठे संकट उभे ठाकले आहे.रांका यांनी वारंवार आपल्या राजकीय ओळखींचा दाखला दिल्याचे सांगितले जाते. त्यांनी स्वतःला दिल्लीतील उच्च पातळीवरील मंडळींशी, केंद्रीय गृहमंत्र्यांशी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक असल्याचा दावा केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांचे नागपूरचे राज्यसभा खासदार अनिल संचेती यांच्याशीही संबंध असल्याचे बोलले जाते. या ओळखींचा त्यांच्या व्यावसायिक फायद्यासाठी वापर झाला काय, याचा तपास सुरू आहे.

त्यांचा प्रभाव केवळ व्यवसायापुरता मर्यादित नसून राजकीय ओळखही मोठी आहे. त्यांच्या मेहुण्यांनी राजस्थानच्या माजी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून काम केले असून त्यांचे संबंध डीएचएफएल घोटाळा तसेच इंडियाबुल्स प्रकरणाशी असल्याचे तपास यंत्रणांनी सांगितले.
ईडीच्या तपासात एका जटील आर्थिक गैरव्यवहाराचे जाळे उघड झाले आहे. एका बिगर बँकिंग वित्तीय संस्थेतून मध्यपूर्वेतील फंडांकडे मोठ्या प्रमाणात निधी वळवण्यात आला. हा पैसा नंतर परदेशी गुंतवणुकीच्या नावाखाली पुन्हा भारतात आणला गेला. त्यानंतर तो कॉर्पोरेट डिपॉझिट म्हणून दाखवून प्रत्यक्षात मुंबईतील लोअर परळमधील प्रकल्पांसह विविध मालमत्ता खरेदीसाठी वापरला गेला. याच संदर्भात व्हीटीपी रिअॅल्टी, गोदरेज प्रॉपर्टीज आणि ऑनेस्ट शेल्टर्स या कंपन्यांनी तब्बल शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त कॉर्पोरेट डिपॉझिट्स घेतल्याचा संशय ईडीला आहे.

रांका यांचा साॅलिटायर ग्रुप, मित्तल बंधू आणि व्हीटीपी रिअॅल्टी यांच्यात मतभेद झाल्याने अनेक प्रकल्प अडकून पडले आहेत. यात मार्केट यार्डमधील साॅलिटेयर वर्ल्ड प्रकल्पाचाही समावेश आहे. या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केलेल्या घर खरेदी करणारे आणि भागधारकांना निधी परत मिळवण्यासाठी हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. टाउनशिप धोरणांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाला आहे. माण, हिंजवडी व मांजरी येथील प्रकल्प वेगवेगळ्या डेव्हलपर्समध्ये विभागले गेले आहेत. नियमांनुसार एका डेव्हलपरकडे पाणीपुरवठा, वीज, शाळा, अग्निशमन केंद्र यांसारखी पायाभूत सोयी पुरवण्याची जबाबदारी असते, मात्र हे नियम पाळले गेले नाही, असा आरोप आहे.ईडीच्या अधिकाऱ्यांच्या तपासात असे आढळल्याचे सांगितले जाते की, एका नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर पैसे मध्यपूर्वेतील एका कंपनीकडे वळवण्यात आले आणि त्यानंतर लगेचच थेट परकीय गुंतवणुकीच्या नियमांच्या आडोशाने हे पैसे भारतातील एका कंपनीकडे परत पाठवण्यात आले.पुढील चौकशीत हेही आढळले की त्याच भारतीय कंपनीने हे पैसे खोट्या ठेवी म्हणून दाखवून विविध मालमत्ता खरेदीसाठी वापरले, ज्यामध्ये मुंबईतील लोअर परळ परिसरातील एक प्रकल्प समाविष्ट आहे. चौकशीत असेही सुचवले गेले की व्हीटीपी रिअॅल्टी, गोदरेज प्राॅपर्टीज आणि ऑनेस्ट शेल्टर्स यांनी संगनमत केले आहे. त्यामुळे ईडीला मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहाराचा संशय आला आणि सर्व संबंधित कपन्यांवर छापे टाकण्यात आले.प्रमोद रांका, सॉलिटेअर ग्रुप, मित्तल ब्रदर्स आणि व्हीटीपी रिॲल्टी यांच्यात मोठा वाद झाला असल्याचे कळते. त्यामुळे या गटांच्या काही प्रकल्पांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. यामध्ये मार्केट यार्ड येथील सॉलिटायर वर्ल्ड प्रकल्पाचा समावेश आहे, जिथे अनेक गुंतवणूकदार आणि हितसंबंधी अडकले आहेत. आपले पैसे परत मिळवण्यासाठी ते धावपळ करत आहेत.रांका यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये सेवा दिलेल्या अनेक माजी मुख्य सचिवांचा प्रभावी वापर केला. त्यापैकी काही जण सेवानिवृत्तीनंतर रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत असल्याचे सांगितले जाते.प्रमोद रांका हे सॉलिटेअर ग्रुपचे भागीदार असून अनेक रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये ते डिझाईनेटेड पार्टनर आहेत. यामध्ये खालील कंपन्यांचा समावेश आहे.

रिव्हरफ्रंट रिअल्टी पुणे एलएलपी : ११ फेब्रुवारी २०११ पासून डिझाईनेटेड पार्टनर
स्टारव्ह्यू हाऊसिंग एलएलपी : १ एप्रिल २०१२ पासून डिझाईनेटेड पार्टनर
प्रोमार्क प्रॉपर्टीज एलएलपी : २४ जून २०१४ पासून डिझाईनेटेड पार्टनर
साक्षी शाह रिॲल्टी एलएलपी : २३ एप्रिल २०२४ पासून डिझाईनेटेड पार्टनर
एक्झर्बिया-एपॉक क्रिएशन्स एलएलपी : १२ जून २०१७ पासून पार्टनर
एम्ब्लेम रिॲल्टी एलएलपी : १५ ऑक्टोबर २०२३ पासून डिझाईनेटेड पार्टनर
रांका गारमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड : २५ नोव्हेंबर २००२ पासून संचालक

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने मिसिंग लिंकचे काम मार्गी

बाणेर मधील ननवरे चौक ते पॅन कार्ड कोथरुडमधील एकलव्य कॉलेज जवळील मिसिंग लिंकच्या कामाला गती

पुणे-कोथरुड मतदारसंघ वाहतूककोंडी मुक्तीच्या दिशेने जलदगतीने पुढे जात असून; ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मतदारसंघातील बहुतांशी मिसिंग लिंकच्या कामाने गती मिळालेली आहे. त्यामुळे मतदारसंघातील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. नुकतेच कोथरुड मतदारसंघातील बाणेर भागातील ननवरे चौक ते पॅन कार्ड रेखांकन पूर्ण झाले आहे. तर एकलव्य कॅालेज येथील मिसिंग लिंकचे काम पूर्ण करण्यासाठी २५०० स्क्वेअर फिट जागा महापालिकेला हस्तांतरित झाली आहे.

कोथरुड मतदारसंघातील मिसिंग लिंक पूर्ण करुन वाहतूककोंडी मुक्त कोथरुडसाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि कोथरुडचे आमदार आग्रही असून; सदर मिसिंग लिंकसाठी महापालिका आयुक्तस्तरावर सातत्याने पाठपुरावा करत आहे. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे मिसिंग लिंकसाठी जमीन अधिग्रहण तथा इतर अडचणी सोडवण्यास गती मिळाली आहे.

यापूर्वी एरंडवणे येथील रजपूत वीटभट्टी परिसरातील जमीन अधिग्रहित होऊन; रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तर सुतारवाडी भागातील रस्ता रुंदीकरणासाठी जमीन हस्तांतरण पूर्ण झाले आहे. याशिवाय बाणेर मधील ननवरे चौक ते पॅन कार्ड रेखांकन महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून पूर्ण झाले आहे. तर कोथरुड मधील एकलव्य कॉलेज येथील रस्त्यासाठी २५०० स्क्वेअर फूट जागा महापालिकेकडे हस्तांतरित झाली असून,सदर रस्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगितले जात आहे. त्यामुळे वाहतूककोंडी मुक्त कोथरुडसाठी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश येताना दिसत आहे.

आंतरराष्ट्रीय पाली भाषा दिवस अनागरिक धम्मपाल बौद्ध परंपरेतील दीपस्तंभ : डॉ. सिद्धार्थ धेंडे

0

पुणे : बौद्ध धम्म प्रसारक व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान अनागरिक धम्मपाल ( श्रीलंका ) यांची 161 व्या जयंतीचे औचित्य साधून आज येरवडा नागपूरचाळ येथील त्रिरत्न विहारात पद्मपाणि फाउंडेशनच्या वतीने माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय पाली भाषा दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आपले विचार व्यक्त करताना अनागारीक धम्मपाल हे श्रीलंकेतून भारतात येऊन भगवान बुद्धाच्या विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी संपूर्ण हयात भर भारतात राहिले व त्यांनी भगवान बुद्धाची जन्मभूमी ही बौद्धांच्या ताब्यात असावी असा महत्त्वपूर्ण विचार या देशात रुजवल्याने त्यांची धम्मा विषयीचे महत्त्व यातून स्पष्ट होत आहे. आज अनागरिक धम्मपाल यांची जयंती संपूर्ण देशभर पाली भाषा दिवस म्हणुन साजरी होत आहे असे सांगितले.

यावेळी पाली भाषेचे महत्व सांगणायासाठी विशेष अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. पद्मपाणी फाउंडेशनचे राहुल डंबाळे यांनी अनागरिक धम्मपाल यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत बौद्ध धम्म चळवळीतील त्यांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच सध्या सुरू असलेल्या बोधगया बुद्ध विहार महामुक्ती आंदोलनाचे तेच एक मात्र प्रणेते असून सुमारे 130 वर्षांपूर्वी त्यांनी हा लढा सुरु केला असल्याची माहीती दिली. प्राचीन असलेल्या पाली भाषा संवर्धनासाठी अनागारिक धम्मपाल यांचे कार्य अतुलनीय स्वरूपाचे असल्याने ते बौद्ध धर्म चळवळीसाठी कायम दीपस्तंभ असल्याचे डंबाळे यांनी सांगितले.

दरम्यान अनागरिक धम्मपाल यांच्या जयंतीचे औचित्य साधून पालीभाषा संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपयोजनांची माहिती यावेळी देण्यात आली.

लोकअदालतीमध्ये अधिकाधिक नागरिकांना लाभ देण्याकरिता अद्ययावत प्रणाली विकसित करणार- सोनल पाटील

पुणे, दि. १८ सप्टेंबर : येत्या १३ डिसेंबर रोजी लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये अधिकाधिक नागरिकांना सहभागी करण्याच्यादृष्टीने अद्ययावत कार्यप्रणाली विकसित करण्याचे काम सुरु आहे. नागरिकांनी या लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले.

श्रीमती पाटील म्हणाल्या, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एम.के. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली १३ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. नागरीकांकडून या लोकअदालतीला उर्त्स्फूत प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी दाखल २ लाख ४३ हजार ४२४ प्रकरणांपैकी १ लाख २७ हजार ५४१ प्रकरणे आणि विशेष मोहिमेत १७ हजार ५६० याप्रमाणे १ लाख ४५ हजार १०१ प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढत पुणे जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. या माध्यमातून ६६५ कोटी ४४ लाख ८१ हजार ६२१ रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले असून यामध्ये वाहन चलनाची संख्या मोठी होती. तसेच ५ ते ६ हजार प्रकरणे निकाली काढून सुमारे १ कोटी रुपयांहून अधिक दंडाची रक्कम वसूल करण्यात आली व २ लाखापेक्षा जास्त प्रकरणे अजून प्रलंबित आहेत.

वाहनमालक, चालकांना विनाहेल्मेट दुचाकी चालविणे, सीटबेल्ट न लावता चारचाकी चालविणे, सिग्नल तोडणे, वेगमर्यादा ओलांडणे, चुकीचे पार्किंग, वाहन चालविताना मोबाइलचा वापर, विनापरवाना, विनापीयूसी वाहन चालविणे, फिटनेस प्रमाणपत्र नसणे, चुकीच्या लेनमध्ये वाहन चालविणे, नंबरप्लेट नसणे या वाहतूक नियमभंगात सवलतीत दंड भरता येईल, म्हणजेच तडजोड करता येईल.

मद्यपान करुन वाहन चालविणे, अपघात करुन पळ काढणे, निष्काळजीपणे वाहन चालवून प्राणांतिक अपघातास कारणीभूत होणे, अल्पवयीन मुलाने वाहन चालविणे, अनधिकृत शर्यत, गुन्ह्यांसाठी वाहनांचा वापर, न्यायालयात सुनावणी प्रलंबित असलेली प्रकरणे आणि अन्य राज्यातील वाहतूक नियमभंगांची चलने, अशा गंभीर स्वरुपाच्या वाहतूक नियमभंगांचा दंड लोकन्यायालयात माफ होत नाही, अशीही माहिती श्रीमती पाटील यांनी दिली.

लोकन्यायालयाच्या माध्यमातून पक्षकारास वाहनावरील दंडामध्ये सूट मिळून वाहनावरचे चलन निघते व खटल्याचा कायदेशीर निपटारा होऊन वाहन विक्री करण्यास किंवा पुढील कार्यवाही करण्यास मदत होते. न्यायालयाकडून समन्स येणे थांबते व पक्षकाराला नोकरी, व्यवसाय सोडून न्यायालयात हजर रहावे लागत नाही. दोनशे रुपयांच्या चलनासाठी पाच हजार रुपयांच्या वकीलाच्या फी पासून सुटका होते. न्यायालयाकडून काय निर्णय होईल, शिक्षा होईल, की निर्दोष सुटका होईल, या मानसिक व शारीरीक त्रासातून पक्षकाराची सूटका होते. या सर्वातून मुक्तता म्हणजेच लोकन्यायालयातील प्रक्रिया हा उत्तम पर्याय नागरिकांसाठी असून एकाच दिवशी कायदेशीर चलन, गुन्हा, दंड यातून नागरिकांची सहज सुटका होते, असेही श्रीमती पाटील म्हणाल्या.

विकसित मराठवाड्यासाठी गावाशी नाळ जोडलेली ठेवा-जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव व्यंकटराव गायकवाड

मराठवाडा सेवक प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय ‌‘मराठवाडा रत्न‌’ पुरस्कार प्रदान सोहळा

पुणे : विकसित देशासोबत विकसित मराठवाड्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या गावाची नाळ जोडलेली ठेवा. नव्या स्टार्टअपची एक शाखा मराठवाड्यात सुरू करा, ज्यामुळे समाजोपयोगी कार्य घडेल, असे प्रतिपादन राज्याच्या जलसंपदा विभागाचे माजी सचिव व्यंकटराव गायकवाड यांनी केले.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून मराठवाडा सेवक प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय मराठवाडा रत्न पुरस्कार वितरण समारंभात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आज (दि. 17) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., मराठवाडा सेवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर चौधरी, ज्येष्ठ गायक पं. अजय पोहनकर, औसा नाथ संस्थानचे (जि. लातूर) पाचवे पीठाधीश गुरूबाबा औसेकर महाराज, कार्याध्यक्ष दिनेश सास्तुरकर आदी व्यासपीठावर होते.
पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर (आरोग्य), डॉ. दिनकरराव मोरे (जलसंवर्धन आणि पर्यावरण), राजेंद्र डहाळे (प्रशासकीय सेवा), ह.भ.प. नारायण महाराज पालमकर (अध्यात्म), सुभाष देशपांडे (संतसाहित्य), देविदास पाठक (पत्रकारिता), धनंजय जोशी (गायन), महादेव जगताप (सामाजिक सुरक्षा), रामचंद्र पवार (उद्योग), प्रसाद पाटील (कृषी तंत्रज्ञान), गणेश खरात (शैक्षणिक क्षेत्र) यांचा राज्यस्तरीय मराठवाडा रत्न पुरस्कार 2025 प्रदान करून गौरव करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. संस्थेचे हितचिंतक प्रवीण शेट्टी, प्रकाश जगताप, सुनील शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
मराठवाडा सेवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर चौधरी यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. गुरूबाबा औसेकर महाराज यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. स्मरणिकेचे संपादक दिनेश सास्तुरकर यांनी मनोगत व्यक्त केले.
व्यंकटराव गायकवाड पुढे म्हणाले, मराठवाडा जेव्हा महाराष्ट्रात आला तेव्हा अवघी अडीच हजार एकर जमीन सिंचनाखाली होती. अतिमागासलेपणाचे हे उदाहरण होते. हे चित्र बदलण्यासाठी मराठवाड्यातील नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. आपल्या उद्योगाची, एक शाखा आपल्या गावात सुरू केली पाहिजे, समाजाला ते उपकारक ठरेल.
पृथ्वीराज बी. पी. म्हणाले, मी प्रशासकीय अधिकारी म्हणून मराठवाड्यात 6 वर्षे काम केले आहे. मराठवाड्याच्या विकासाची संधी आत्ताच आहे. सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले तर विकास शक्य आहे.
ह. भ. प. औसेकर महाराज म्हणाले,‌‘मराठवाडा ही संतांची भूमी आहे. या भूमीला ज्ञान, कला, कौशल्याचा मोठा वारसा आहे. केवळ मराठवाड्याचा विकास अशी दृष्टी न ठेवता, भारतमातेचा विकास, हा विचार ठेवला पाहिजे. अध्यात्माला सामाजिक आयाम दिला पाहिजे. कुठेही गेलात तरी आपली जन्मभूमी विसरू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
पुरस्कारप्राप्त मान्यवरांपैकी देविदास पाठक, दिनकरराव मोरे, नारायण महाराज पालमकर आणि डॉ. रमण गंगाखेडकर यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले.
स्वत:मधील न्यूनगंड काढून टाका, ध्येय निश्चित ठेवा आणि आपल्या कामाचा देशासाठी उपयोग कसा होईल, याचा विचार करा. फक्त आपल्यापुरते पाहू नका, असा सल्ला डॉ. गंगाखेडकर यांनी दिला. पं. अजय पोहनकर यांनी ‌‘गोविंद जय जय, गोपाल जय जय‌’ या रचनेची झलक ऐकवली.
शिल्पा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात धनंजय जोशी आणि सहकाऱ्यांनी भक्तिनाट्यरंग हा गाण्यांचा कार्यक्रम सादर केला. सुभाष देशपांडे यांनी आभार मानले.

वॅस्कॉन इंजिनीयर्सचे आर्थिक वर्ष 27 पर्यंत 4000 कोटी रु.ची ईपीसी ऑर्डर बुक आणि 2500 कोटी रु. बांधकाम क्षेत्रातील प्रकल्पांचे लक्ष्य

पुणे : चार दशकांची समृद्ध परंपरा असलेली ईपीसी आणि रिअल्टी क्षेत्रातील आघाडीची कंपनी वॅस्कॉन इंजिनीयर्स लिमिटेड (VASCONEQ) ने मजबूत ईपीसी ऑर्डर बुक आणि पुढील 12–24 महिन्यांत झपाट्याने गती घेतील असे बांधकाम क्षेत्रातील आगामी मजबूत प्रकल्प यांवर प्रकाश टाकत आपल्या धोरणात्मक वाढीच्या दृष्टीकोनाची रूपरेषा स्पष्ट केली.

कंपनी सध्या 13 शहरांमध्ये सक्रिय असून ईपीसी व्यवसायासाठी सरकारी आणि खाजगी संस्थांबरोबर ऑर्डर गुणोत्तर 75:25 या प्रमाणात काम करत आहे. महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये सुफल, बिहार येथील 606 कोटी रु. मूल्य असलेले वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम, चेन्नईतील 416 कोटी रु. मूल्य असलेले केपजेमिनी आयटी पार्क प्रकल्प आणि 260 कोटी रु. मूल्य असलेला वेदांता टाऊनशिप प्रकल्प यांचा समावेश आहे.

या घोषणेबद्दल भाष्य करताना वॅस्कॉन इंजिनीयर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सिद्धार्थ वासुदेवन मूर्ती म्हणाले, “वॅस्कॉन इंजिनीयर्सची ताकद आमच्या ईपीसी आणि रिअल इस्टेट व्यवसायाचा समतोल प्रमुख भौगोलिक क्षेत्रांमध्ये राखण्यात आहे. पुणे आणि मुंबई येथे सध्या काम सुरु असलेले मजबूत प्रकल्प आणि जवळजवळ 3,000 कोटी रु. ची ईपीसी ऑर्डर बुक तसेच चालू आर्थिक वर्षात अतिरिक्त 2000 कोटी रु.च्या ऑर्डरचे लक्ष्य ठेवून आम्ही आमच्या वाढीचा प्रवास वेगाने पार करू असा आम्हाला विश्वास आहे.

मुंबई बाजारपेठेत, आम्ही ब्रँडेड आणि कॉर्पोरेट कंपन्या मर्यादित प्रमाणात असलेल्या 1–1.5 लाख चौरस फुट रेंजमधील प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे आम्हाला जलद गतीने पर्यावरण मंजुरी मिळते आणि बऱ्याचदा मोठ्या प्रकल्पांना उशीर करणाऱ्या क्लिष्ट मंजुरी चक्रांपासून बचाव होतो.

आमचे लक्ष उच्च-मूल्य ईपीसी करारांमध्ये आमचे स्थान वाढवण्यावर, शहरी केंद्रांमध्ये पुनर्विकास आधारित गृहनिर्माण वाढवण्यावर आणि वित्तीय शिस्त राखण्यावर आहे. जवळजवळ चार दशकांची परंपरा आणि भारतभर 225 पेक्षा जास्त प्रकल्प पूर्ण केल्यानंतर आम्ही गुणवत्ता, वेग आणि विश्वासाने सेवा वितरण करत आहोत.”

पुण्यात, वॅस्कॉन ने प्रमुख ईपीसी करारांद्वारे आपले स्थान मजबूत केले आहे. यात 262 कोटी रु. मूल्य असलेले पुणे पोलिस स्टाफ क्वार्टर्स आणि मोशी, पिंपरी चिंचवड येथील 277 कोटी रु. मूल्य असलेली रुग्णालय इमारत आणि 96 कोटी रु. मूल्य असलेला पीएमआरडीए मधील  गृहनिर्माण प्रकल्प यांचा समावेश आहे. या प्रकल्पांव्यतिरिक्त, ईपीसी ऑर्डर बुक जवळजवळ 3,000 कोटी रु. आहे. त्यामुळे पुढील 18–24 महिन्यांत निवासी, संस्थात्मक आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये स्पष्ट अंमलबजावणी दृष्टीपथात आहे. रिअल इस्टेट क्षेत्राच्या बाबतीत पुणे महत्त्वाचे विकास केंद्र राहिले आहे. त्यात खाराडीतील टॉवर ऑफ असेंड आणि तळेगाव येथील गुड लाईफ  प्रकल्प सुरू आहेत. कल्याणी नगर येथील नियोजित प्रकल्प 1700 कोटी रु. ची GDV भर घालण्याची शक्यता आहे. एकूणच, पुणे रिअल इस्टेट मधील काम सुरु असलेले प्रकल्प सुमारे 1.3 दशलक्ष चौरस फुट विकास दर्शवतात. त्यांची अपेक्षित विक्री किंमत जेव्ही मॉडेल अंतर्गत 1700-2000 कोटी रु. आहे.

मुंबईत सांताक्रुझ येथील वॅस्कॉन ऑर्चीडस आणि सांताक्रुझ पश्चिम येथील प्रकाश सीएचएस प्रकल्पांसह वॅस्कॉनने पुनर्विकास प्रणीत धोरण मजबूत केले आहे समावेश आहे. आगामी पवई निवासी प्रकल्प 425 कोटी रु. विक्री उत्पन्न देण्याची अपेक्षा आहे. सांताक्रुझ, पवई आणि इतर मायक्रो-मार्केट्समधील पुनर्विकास आगामी प्रकल्प सुमारे 0.4 दशलक्ष चौरस फुट असून त्यांची  अपेक्षित विक्री किंमत 1050 कोटी रु. आहे. आर्थिक वर्ष 27 पर्यंत मुंबईतील चालू आणि नियोजित प्रकल्प कंपनीच्या एकूण रिअल इस्टेट पोर्टफ़ोलिओमध्ये सुमारे 50 टक्के योगदान देतील अशी अपेक्षा आहे. रिअल इस्टेट पुनर्विकास व्यतिरिक्त, मुंबई आणि पश्चिम भारतातील ईपीसी संधी देखील सक्रियपणे शोधल्या जात आहेत. त्यात संस्थात्मक आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमधील टेंडर कंपनीच्या दीर्घकालीन ऑर्डर पाईपलाईनमध्ये भर घालत आहेत.

एकत्रितपणे, समग्र नजीकच्या काळातील रिअल इस्टेट प्रकल्प 1.94 दशलक्ष चौरस फुट असून त्याची अपेक्षित विक्री किंमत 2,360 कोटी रु. आहे. मिळालेल्या करारांची मजबूत अंमलबजावणी आणि महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमधील नवीन ऑर्डरचा सतत पुरवठा प्रतिबिंबित करत ईपीसी व्यवसाय जवळजवळ 85 टक्के क्षमता वापरावर कार्यरत आहे.

लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक:85 कोटींची फसवणूक आणि मंगलप्रभात लोढा यांच्या मुलाला जीवे मारण्याच्या धमकीचा आरोप

0

मुंबई- पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली आहे. या अटकेमुळे बांधकाम आणि उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अटकेपूर्वीच राजेंद्र लोढा यांनी लोढा ग्रुपच्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता.मुंबई पोलिसांनी लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना वरळी परिसरातून अटक केली असून, कोर्टाने त्यांना 23 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. राजेंद्र लोढा यांच्यावर लोढा ग्रुपची 85 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, राजेंद्र लोढा यांनी लोढा ग्रुपचे सध्याचे संचालक आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे पुत्र अभिषेक लोढा यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. या गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाने आणखी वेगळे वळण घेतले आहे.

राजेंद्र लोढा यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अभिषेक लोढा यांच्याकडे एक हस्तकला पाठवून त्यांना धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या हस्तकाच्या माध्यमातून त्यांनी आपण ‘सुसाईड बॉम्बर’ असल्याचे सूचित करत, कारवाई झाल्यास अभिषेक लोढा यांचे बरेवाईट करण्याची धमकी दिली. राजेंद्र लोढा यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत अनेक ठिकाणी जमीन अधिग्रहण केल्याचा आणि लोढा ग्रुपचे काही फ्लॅट्स परस्पर विकल्याचा आरोप आहे, ज्यामुळे त्यांनी मोठी मालमत्ता जमा केली. यामुळे लोढा ग्रुपने त्यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली.

लोढा डेव्हलपर्सने यापूर्वीच जाहीर केले होते की राजेंद्र लोढा यांनी 17 ऑगस्ट 2025 पासून कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. कंपनीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आणि त्यांच्या वर्तनाशी संबंधित काही बाबी कंपनीच्या नैतिकता समितीच्या निदर्शनास आल्या होत्या. याच कारणामुळे गेल्या महिन्यात त्यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईचं लोढा अन् कंबोजीकरण सुरू, संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

मुंबई-देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे ब्रँडची चिंता नाही तर भीती आहे.बेस्टच्या निवडणुकीत काय झाले हे मी आधीच सांगितले आहे. मुंबईतील बेस्ट डेपोसह संपूर्ण मुंबई फडणवीसांच्या पंखा खालील बिल्डरांनी ताब्यात घेतली आहे. मुंबईचे लोढा आणि कंबोजीकरण कसे झाले आहे हे मीडियाने समोर आणले पाहिजे.असे शिवसेना नेते आणि खासदार नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष यांनी ठाकरेंना मुंबईचा महापौर खान ला करायचे आहे अशी टीका काल केली या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले ,मुंबईचा महापौर हा मराठी आणि शिवसेनेचाच होईल. त्यांना जर खानांचा तिटकारा असेल तर त्यांनी हसन मुश्रीफ यांना मंत्रिमंडळातून दूर करावे देवेंद्र फडणवीस यांचा इतिहासाचा अभ्यास कच्चा आहे. त्यांना इतिहास आणि सामाजिक ज्ञान नाही. ते महाराष्ट्रात मोदी यांनी चिकटवलेले मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना इतिहास माहिती नाही..अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती कुणी केले? आरिफ मोहम्मद खान यांना बिहारचे राज्यपाल कुणी केले, असे अनेक उदाहरण मला देता येतील. देशाच्या राजकीय-सामाजिक जडण- घडणीत आणि स्वातंत्र्य लढ्यात भाजप आणि आरएसएस नव्हता. पण मुस्लीम समाज सामाजिक चळवळ आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठ्या प्रमाणात सक्रिय होता. त्यांनी हमीद दलवाई यांच्यासारख्या नेत्याचा देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यास करावा.

एकनाथ शिंदे यांनी जर काही बेकायदेशीर कामे केली असतील मुळातच ते स्वत:च बेकायदेशीर आहेत. सध्याच्या सरकारमधील त्यांचे उपमुख्यमंत्रिपद त्यांचा पक्ष आणि चिन्ह हे सर्व बेकायदेशीर आहे. असा बेकायदेशीर व्यक्ती कायदेशीर काम करेल यांची अपेक्षा महाराष्ट्राने ठेवू नये, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. तर नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. ते बेकायदेशीर व्यक्तीला मांडीवर घेऊन बसले आहेत.

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, शहा, फडणवीस यांनी शिंदेंवर कारवाई केली पाहिजे. कोर्टाने सांगण्याची गरज नाही. असेही हे सरकार कोर्टाचे ऐकत नाही. ते त्यांच्या खिशात आहे. कोर्टाने आदेश दिले पाहिजे नगरविकास खात्याच्या मंत्र्यांवर कारवाई करा असे, संजय राऊत यांनी म्हटले आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले की, काल जो प्रकार झाला तो दुर्दैवी होता. त्यांचे आम्ही कुठेही राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला नाही. समाजामध्ये काही माथेफिरु लोक असतात. देशभरात ते अशा स्मारकावर चुकीचे काम करत असतात. शिवसैनिकांनी स्मारकाचे शुद्धीकरण केले आहे. पोलिसांनी त्यासंदर्भात तपास करत एका व्यक्तीला अटक केली आहे. समाजात असेही माथेफिरू लोक असतात. ते कोणताही राग कुठेही काढतात. यावर राजकीय भांडवल न करता कारवाई केली पाहिजे.

संजय राऊत म्हणाले की, नगरविकास खाते हे पैसे खाण्याचे सर्वांत मोठे कुरण झाले आहे. एकनाथ शिंदे यांना जी आर्थिक सूज आली आहे ती नगरविकास खात्यामुळे आली आहे. हे कोर्ट आणि देवेंद्र फडणवीस यांना माहिती नाही का? हिंमत असेल तर त्यांच्यावर कारवाई करा, नुसती निरीक्षणे नोंदवू नका.

४ हजार ठेवीदारांची फसवणूक करून बाणेर मध्ये ऐषोरामात राहणाऱ्या अर्चाना कुटेला CID ने पकडले

पुणे- तब्बल ४००० हून अधिक ठेवीदारांची फसवणुक प्रकरणी ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटीच्या संचालक अर्चना सुरेश कुटे हिला अटक केली आहे. गेली दीड वर्षापासून कुटे फरार होती. दरम्यान, सीआयडीने बाणेर येथुन तिला अटक केली आहे. ४ हजाराहून अधिक ठेवीदारांचे सुमारे २ हजार ४७० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीचे चेअरमन सुरेश कुटे याला सीआयडीने यापूर्वीच अटक केली आहे. अर्चना कुटे ही सुरेश कुटे याची पत्नी आहे.२ कोटी १० लाख ७५ हजार ३२० रुपयांचा ऐवज यावेळी तिच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे .

बीड, जालना, तसेच छत्रपती संभाजीनगरमधील ठेवीदारांची फसवणूक प्रकरणात गेले दीड वर्ष फरार असलेल्या ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या फरार संचालक अर्चना सुरेश कुटे, आशा पद्माकर पाटोदेकर (पाटील) यांच्यावर सीआयडीने कारवाई केली आहे. या प्रकरणात संचालक मंडळाविरुद्ध ९५ गुन्हे दाखल आहेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर संचालक अर्चना कुटे, आशा पाटोदेकर या पसार झाल्या होत्या.

बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीचे संचालक मंडळ, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव, अधिकारी यांच्या विरोधात मे ते सप्टेंबर २०२५ मध्ये एकूण ९५ गुन्हे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या(सीआयडी) छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राकडे तपासाकरीता आहेत. कुटे आणि पाटोदेकर या बाणेर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर सीआयडीच्या पथकाने त्यांना अटक केली,’अशी मााहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिली.

कुटे ग्रुपची बिजनेस प्रमोटर अर्चना कुटे हिने अपहरीत रक्कमेतून मिळवलेली जंगम मालमत्ता, ज्यात सोने ८० लाख ९० हजार ९५० रुपयांचे ६० नग, ५६ लाख ७५ हजार ५०० रुपयांचे चांदीचे २७० नग, ६३ लाख रुपयांची रोकड तसेच १० लाख रुपयांची बीएमडब्ल्यु, स्कुटी असा २ कोटी १० लाख ७५ हजार ३२० रुपयांचा मालमत्तेचा समावेश असून ही मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

सुरेश कुटे आणि त्याची पत्नी अर्चना कुटे यांनी ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून ४ लाखांहून अधिक ठेवीदारांचे सुमार २ हजार ४७० कोटी रुपये जमा केले होते. या प्रकरणात एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट (ईडी)ने सुरेश कुटे आणि इतर आरोपींच्या ३३३ कोटींच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत.

ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी या गुन्ह्यांमध्ये एमपीआयडी अंतर्गत आर्थिक गुन्हे शाखा बीड व सीआयडी छत्रपती संभाजीनगर यांनी एकूण २०७ मालमत्तेचे प्रस्ताव तयार करुन पुढील कारवाईकरीता सादर केलेले आहे. एकूण १३ संचालकांपैकी ९ संचालक व मुख्य आरोपी सुरेश ज्ञानोबा कुटे याची पत्नी अर्चना सुरेश कुटे हिला अटक केली आहे.

अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद, पोलीस उपमहानिरीक्षक अमोल गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त अधीक्षक किरण पाटील, उपअधीक्षक स्वाती थोरात, पोलीस निरीक्षक विजय पणदे, कारभारी गाडेकर, देवचंद घुणावत, सय्यद रफीक यांनी ही कारवाई केली.

नेमकं प्रकरण काय?
गतवर्षी कुटे ग्रुपच्या सर्वच समुहांवर इन्कम टॅक्स विभागाच्या वतीने छापा घालण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात करचोरी केल्याचे उघडकीस आले होते. ‘द कुटे ग्रुप’वर इन्कम टॅक्स विभागाकडून कारवाई झाल्यानंतर त्याचा परिणाम ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या व्यवहारावर झाला. मोठ्या प्रमाणात ज्ञानराधामध्ये ठेवी ठेवलेल्या ठेवीदारांना पैसे मिळण्यास अडचणी येऊ लागल्या. पॅनिक होऊ नका, शांततेत घ्या, कुटे ग्रुपला लोन मंजूर झाले आहे, अशी दीशाभूल कुटे ग्रुपकडून करण्यात येत होती. मात्र, वास्तविक पाहाता एक रुपयादेखील त्यांनी दिला नाही.अखेर सुरेश कुटे, अर्चना कुटे, आशिष पाटोदकर, यशवंत कुलकर्णी यांच्यासहित संचालक मंडळ व कर्मचार्‍यांवर बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, पुणे अशा विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले.

दरम्यान, या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात बैठक घेतली होती. यावेळी गंभीर दखल घेत सीआयडीवर नाराजी व्यक्त केली होती. तसेच बहुराज्य सहकारी संस्था नियंत्रक विभागामार्फत सोसायटीच्या २३८ मालमत्ता जप्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवा, असे निर्देश फडणवीस यांनी दिले होते. तसेच फरार १९ आरोपी सापडत नसल्यानेही मुख्यमंत्र्यांनी तपास यंत्रणेला खडेबोल सुनावले होते.

पोलिसांनी अधिकृत रित्या दिलेली माहिती अशी कि,’राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, छत्रपती संभाजीनगर या परिक्षेत्राकडे तपासावर असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को. ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लिमीटेड, जि.बीड चे संचालक मंडळ, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव, अधिकारी यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी मे २०२५, जुन २०२५, जुलै २०२५ व सप्टेंबर २०२५ पासुन ९५ गुन्हे राज्य गुन्हे अन्वेषण विभागा छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राकडे तपासाकरीता आहेत. मुख्य आरोपी अध्यक्ष सुरेश गानोबा कुटे याला या पुर्वी अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयांमध्ये पाहिजे असलेली मुख्य आरोपी सुरेश ज्ञानोबा कुटे याची पत्नी सौ. अर्चना सुरेश कुटे, बिजनेस प्रमोटर (संचालक), कुटे ग्रुप, रा. कुटेवाडी, ता.जि. बीड व सौ. आशा पच्याकर पाटोदेकर (पाटील), संचालक, ज्ञानराधा मल्टीस्टेट को. ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लिमीटेड, जि.बीड, रा.पाटोदा ता. धाराशिव यांचा पुणे येथे गुन्हे अन्वेषण विभाग छत्रपती संभाजीनगर पथक यांनी शोध घेवुन आज दि.१६.०९.२०२५ रोजी दोन्ही पाहीजे असलेल्या आरोपीतास ताब्यात घेऊन अटकेची कारवाई केली.
यापुर्वी दि.११.०९.२०२५ रोजी गुन्हे अन्वेषण विभाग, छत्रपती संभाजीनगर पथक हे पाहिजे आरोपी सौ. अर्चना सुरेश कुटे, बिजनेस प्रमोटर (संचालक), कुटे ग्रुप हिच्या अटक करण्याच्या अनुषंगाने कारवाईकरीता पुणे गेले असता आरोपी सौ. अर्चना सुरेश कुटे हिने अपहरीत रक्कमेतुन मिळवलेली जंगम मालमत्ता ज्यात सोने एकुण नग-६० किंमत अंदाजे ८०,९०,९५०/- रुपये, चांदी एकुण नग-२७० किंमत अंदाजे ५६,७५,५००/- रुपये, रोकड एकुण ६३,००,०००/- रुपये तसेच बीएमडब्ल्यु स्कुटी किंमत अंदाजे १०,००,०००/- रुपये असा एकुण २,१०,७५,३२०/- रुपयांचा मुद्देमाल गुन्हयामध्ये जप्त केलेला आहे.
ज्ञानराधा मल्टीस्टेट को. ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लिमीटेड, जि.बीड या गुन्हयांमध्ये एमपीआयडी अंतर्गत आर्थिक गुन्हे शाखा, बीड व गुन्हे अन्वेषण विभाग, छत्रपती संभाजीनगर यांनी एकुण २०७ मालमत्तेचे प्रस्ताव तयार करुन पुढील कारवाईकरीता सादर केलेले आहे. तसेच एकुण १३ संचालक मडळांपैकी ०९ संचालक व मुख्य आरोपी सुरेश ज्ञानोबा कुटे याची पत्नी सौ. अर्चना सुरेश कुटे, बिजनेस प्रमोटर (संचालक), कुटे ग्रुप यांना अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई CID चे अपर पोलीस महासंचालक सुनिल रामानंद, पोलीस उपमहानिरीक्षक अमोघ गावकर, पोलीस अधीक्षक यशवंत काळे, संभाजीनगर यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रीमती किरण पाटील,पोलीस उप अधीक्षक श्रीमती स्वाती थोरात,पोलीस निरीक्षक विजय पोलीस हवालदार कारभारी गाडेकर,. देवचंद घुणावत, सय्यद रफिक, चालक/सफौ यांनी केली.