Home Blog Page 361

‘सह्याद्रि हॉस्पिटल्स’तर्फे अवयवदान जनजागृती व संकल्पासाठी ‘जिंदगी मिलेगी दोबारा’ अभियान सुरू

पुणे१४ ऑगस्ट २०२५ – देशात लाखो रुग्णांना योग्य ते आवश्यक अवयव उपलब्ध नसल्याने जीव वाचविण्यासाठी अवयव प्रत्यारोपणाची प्रतीक्षा करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर सह्याद्रि हॉस्पिटल्सने ‘जिंदगी मिलेगी दोबारा’ हे मोहीम सुरू केली आहे. अवयवदानाबाबत सर्वसामान्यांत जागृती निर्माण करणे आणि नागरिकांना अवयवदानाची शपथ घेण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा या मोहिमेचा उद्देश आहे. भारतामध्ये मृत व्यक्तींच्या अवयवदानाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. देशात अवयवदानाचा दर दशलक्ष लोकसंख्येमागे १ पेक्षा कमी आहे. सन २०२४ मध्ये देशात सुमारे १८,९०० अवयवांचे प्रत्यारोपण झाले असून भारत जागतिक स्तरावर संख्येनुसार तिसऱ्या क्रमांकावर आहे. तरीही, दरवर्षी अंदाजे १.७५ लाख रुग्णांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज असते, तर यकृत, हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी प्रत्येकी सुमारे ५० हजार रुग्ण प्रतीक्षेत असतात. सह्याद्रि हॉस्पिटल्सचे हे अभियान दि. १३ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत, जागतिक अवयवदान दिनापासून सुरू होऊन, पुणे, नाशिक, कराड व अहिल्यानगर येथील सर्व सह्याद्रि हॉस्पिटल्समध्ये राबवले जाणार आहे. यात सोशल मीडियावरील व्हिडिओ, आवाहने, गैरसमज दूर करणारी माहिती यांचा प्रसार करण्यात येईल, तसेच प्रत्यक्ष लोकसंपर्क साधणाऱ्या उपक्रमांतून नागरिकांना अवयवदानाचा संकल्प करण्यासाठी प्रेरित केले जाईल. समाजातील एखाद्या नागरिकाला तुमच्यामुळे जीवनदान मिळू शकेल, असे आवाहन केले जाईल.

या आठवड्याच्या सुरुवातीला, सह्याद्रि हॉस्पिटल’मध्ये मेंदूमृत घोषित झालेल्या एका २१ वर्षीय दात्याने पुण्यातील पाच गंभीर आजारी रुग्णांचे जीव वाचवले. अपार धैर्य व करुणा दाखवत या दात्याच्या कुटुंबाने जीवनाची अमूल्य भेट देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यकृत, हृदय, फुफ्फुस व मूत्रपिंडाच्या गंभीर आणि जीवघेण्या आजारांनी ग्रस्त रुग्णांना प्रत्यारोपण मिळाले. एका छोट्या निर्णयाचा परिणाम किती विलक्षण असू शकतो आणि फक्त संबंधित रुग्णांनाच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबियांना व समाजालाही कसा दिलासा मिळू शकतो, हे अशा घटनांमधून दिसून येते. म्हणूनच अवयवदानाचा संकल्प हा सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून स्वीकारणे अत्यंत आवश्यक आहे.

या मोहिमेअंतर्गत नागरिक www.ZindagiMilegiDobara.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन संकल्प करू शकतात किंवा ‘सह्याद्री हॉस्पिटल’च्या विविध युनिट्स, कॉर्पोरेट ऑफिस, मेट्रो स्थानकांवरील अवयवदान केंद्रांमध्ये जाऊन संकल्प नोंदवू शकतात. इच्छुकांना या संपूर्ण प्रक्रियेत प्रशिक्षित स्वयंसेवक मार्गदर्शन करतील.

वेबसाइटद्वारे संकल्प करणे असो, QR कोड स्कॅन करणे असो किंवा प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागी होणे असो, ही प्रत्येक कृती कोणाचे तरी प्राण वाचवू शकते. अवयवदानाचा संकल्प करून तुम्ही कोणाच्या तरी आयुष्यात नायक बनू शकता — आणि यंदा रुपेरी पडद्याचा नायक, बॉलीवूडचा आयकॉन अनिल कपूर यांना भेटण्याची संधीही मिळवू शकता!

आता संकल्प करा: www.ZindagiMilegiDobara.com

स्कॅन करा आणि संकल्प करा. कुणाच्या तरी जीवनात सुपरस्टार बना.

“महाराष्ट्र कारागृह विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवेबाबतचे पदक घोषित.”

महाराष्ट्र कारागृह विभागातील अधिकारी/ कर्मचारी यांना स्वातंत्र्यदिन दिनांक 15 ऑगस्ट 2025 च्या औचित्यावर राष्ट्रपतींकडून गुणवत्तापूर्ण सेवेकरीता पदक जाहीर करण्यात आले असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.

राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवेबाबतचे पदक

1.    श्रीमती राणी राजाराम भोसले, अधीक्षक, ठाणे मध्यवर्ती कारागृह.

2.    श्री राजाराम रावसाहेब भोसले, अतिरिक्त अधीक्षक, ठाणे मध्यवर्ती कारागृह.

3.    श्री गजानन काशिनाथ सरोदे, उपअधीक्षक, मुंबई मध्यवर्ती कारागृह.

4.   श्री संजय गंगाराम शिवगण, सुभेदार, मुंबई मध्यवर्ती कारागृह

5.    श्री सुधाकर ओंकार चव्हाण, हवालदार, मुंबई मध्यवर्ती कारागृह.

6.    श्री राजेश मधुकर सावंत, हवालदार, भायखळा जिल्हा कारागृह

7.   श्री संजय सदाशिव जाधव, हवालदार, भायखळा जिल्हा कारागृह

8.    श्रीमती विद्या भरत ढेंबरे, कारागृह शिपाई, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह.

उक्त नमूद केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सेवा कालावधीत शासकीय कर्तव्याप्रती दाखविलेली सचोटी व निष्‍ठेचा एक प्रकारे सन्मान झाला आहे. ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मा.राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवापदक घोषित झाले आहे त्यांचे कारागृह विभागाचे वतीने सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य व योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य यांनी अभिनंदन केले.

भिमसैनिकांडून स्मारकाच्या नियोजित जागेवर बाबासाहेबांच्या नावाची कमान

पुणे : मंगळवार पेठ येथील एमएसआरडीसी ची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरणासाठी अर्थात बाबासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी उपलब्ध व्हावी या मागणीसाठी उद्या होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज मध्यरात्री बहाद्दर भीमसैनिकांनी जागेच्या गेटवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची नियोजित जागा असा फलक लावला आहे. हा फलक लावल्यामुळे आंबेडकरी चळवळीमध्ये चैतन्य उसळले असून उद्याचे आंदोलन अधिक व्यापक व शांततेत होण्याचे स्पष्ट संकेत यातून मिळत आहेत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक पुणे व पश्चिम महाराष्ट्रात नसल्याची खंत आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये गेली अनेक वर्ष खदखद आहे. त्या पार्श्वभूमीवर केवळ पुणे शहरच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण असे सांस्कृतिक केंद्र या ठिकाणी उभे व्हावे या उद्देशाने या स्मारकाची मागणी करण्यात येत आहे.

उद्याच्या आंदोलनामध्ये किमान 50 हजार भीमसैनिक स्त्री-पुरुष सहभागी होतील असा विश्वास आंदोलकांच्या आयोजकांना असून त्या दृष्टिकोनातून सर्व नियोजन सुरू असल्याचे सांगण्यात आलेले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता भयमुक्तपणे या वातावरणात सहभागी व्हावे असे अवाहन करण्यात येत आहे.

आंदोलनाची सुरुवात भारतीय राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीता द्वारे करण्यात येणार आहे.

डॉ. सागर तांबेंना ‘बेस्ट प्रेझेंटेशन पेपर पुरस्कार’

दक्षिण कोरियातील परिषदेत एमआयटी एडीटी विद्यापीठाची झळाळी

पुणे/उल्सान (दक्षिण कोरिया) : पुण्यातील एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. सागर तांबे यांनी दक्षिण कोरियातील युनिव्हर्सिटी ऑफ उल्सान येथे झालेल्या १७व्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ह्युमन सिस्टम इंटरॅक्शन (IEEE HSI 2025) मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरी नोंदवली.

एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या इंटरनॅशनल रिलेशन्स सेलचे सदस्य म्हणून डॉ. तांबे यांनी वास्तविक जगात सहाय्यक तंत्रज्ञानाची प्रगती या विषयावर सत्राध्यक्ष म्हणून काम पाहिले तसेच महत्त्वपूर्ण तांत्रिक संशोधन सादर केले. त्यांच्या या सक्रिय सहभागामुळे आणि नेतृत्वगुणांमुळे भारताची शैक्षणिक व तांत्रिक उपस्थिती जागतिक पातळीवर अधोरेखित झाली.

या परिषदेत डॉ. तांबे यांनी विविध देशांतील प्राध्यापक व संशोधकांशी संवाद साधत संयुक्त संशोधन प्रकल्प, विद्यार्थी व प्राध्यापक देवाण-घेवाण कार्यक्रम, उद्योग-विद्यापीठ सहकार्य आणि तांत्रिक हस्तांतरण यांसारख्या संधींसाठी मार्ग मोकळा केला.

डॉ. तांबे यांच्या या आंतरराष्ट्रीय गौरवानंतर विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र.कुलपती डॉ. मंगेश कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्र.कुलगुरू डाॅ. रामचंद्र पुजेरी, संचालक डॉ. विपुल दलाल, अधिष्ठाता डॉ. रजनीकौर सचदेव-बेदी, डॉ. रेखा सुगंधी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

वायरलेस प्रणालींसाठी महत्वपूर्ण संशोधन

डॉ. तांबे यांनी डॉ. जयश्री प्रसाद आणि डॉ. रजनीशकौर सचदेव यांच्या सहलेखनातून सादर केलेल्या वायरलेस बॉडी सेन्सर नेटवर्कचे तुलनात्मक विश्लेषण: ओएमएनईटी++, कॅस्टालीया, एनएस३ए या संशोधनपत्राला परिषदेत ‘बेस्ट प्रेझेंटेशन पेपर पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. या संशोधनात वायरलेस बॉडी सेन्सर नेटवर्क्ससाठी (डब्ल्यूबीएसएनएस) विविध सिम्युलेशन टूल्सचे तुलनात्मक विश्लेषण करण्यात आले असून, हे संशोधन मानवी-केंद्रित वायरलेस प्रणालींच्या संशोधक आणि तांत्रिक तज्ज्ञांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

मराठी भाषा म्हणजे संस्कृती; ती शिकणे आणि जपणे गरजेचे — कृपाशंकर सिंह

पुण्यात शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

पुणे : “मराठी ही केवळ भाषा नाही, ती आपली संस्कृती आहे. आपण ज्या राज्यात राहतो, त्या राज्यातील भाषा जर शिकली नाही, तर त्या भूमीची संस्कृती समजणार नाही. मराठी आपण शिकलीच पाहिजे, जपलीच पाहिजे,” असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी केले.

पुण्यातील उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’ आणि ‘पायल तिवारी बिटिया फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल गुरुवारी एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन सभागृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी खासदार रजनीताई पाटील, पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन, बिटीया फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता तिवारी, अभिनेत्री स्मिता गोंदकर, ‘कोहिनूर ग्रुप’चे चेअरमन कृष्णकुमार गोयल, दूरदर्शनचे माजी अतिरिक्त संचालक मुकेश शर्मा, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाला.

कृपाशंकर सिंह म्हणाले, “पुण्यात आयोजित शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमधील लघुपट समाजप्रबोधन करणारे आहेत. असा महोत्सव मुंबईतदेखील झाला पाहिजे. तरुणाई समाजासाठी महत्त्वाचे संदेश देत आहे, हे कौतुकास्पद आहे.”

खासदार रजनीताई पाटील म्हणाल्या, “या महोत्सवातील लघुपट हृदयाला भिडणारे आणि समाजाचे डोळे उघडणारे आहेत. ‘पुनीत बालन ग्रुप’ आणि ‘बिटीया फाउंडेशन’चे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. असा प्रबोधनपर महोत्सव दिल्लीमध्येही घेण्याचा मानस आहे.” त्यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने ‘पुनीत बालन ग्रुप’ गणेशोत्सव साजरा करीत असल्याचेही नमूद केले.
   प्रास्ताविक संगीता तिवारी यांनी केले. त्यांनी सांगितले की, महोत्सवात ३०० हून अधिक सामाजिक संदेश देणाऱ्या लघुपटांनी सहभाग घेतला होता. तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग हा महोत्सवाचा मुख्य आधार होता. लघुपटांचे परीक्षण सेन दाभोलकर, झहीर दरबार, विशाल गोरे आणि सचिन दानाई यांनी केले. सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी केले, तर पुनमीत तिवारी यांनी आभार मानले.

पारितोषिक विजेते :

दीड ते तीन मिनिटे गट : पहिले — संदेश वीर, दुसरे — अर्थव शालीग्राम, तिसरे — अक्षय वसकर

तीन ते चार मिनिटे गट : पहिले — तेजस पाटील, दुसरे — अक्षय वसकर, तिसरे — अक्षय भांडवलकर; विशेष — शुभम आणि सांची

पाच ते सात मिनिटे गट : पहिले — स्वप्निल गायकवाड, दुसरे — मेधा गोखले, तिसरे — अभिताभ भवर

रील गट : पहिले व दुसरे — व्यंकटेश सुंभे
विशेष उल्लेख : अक्षय वसकर , अविनाश पिंगळे, मेधा गोखले, अन्वय निरगुडकर

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरात ‘तिरंगी’ सजावट

स्वातंत्र्यदिन, श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि संत ज्ञानेश्वर महाराज ७५० व्या जयंतीनिमित्त प्रतिकृती व पुष्पसजावट
पुणे : श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या वतीने स्वातंत्र्यदिन, श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मंदिरात योगेश्वर श्रीकृष्ण आणि ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिकृती व पुष्पसजावट करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या विशेष शासन निर्णयानुसार श्री दत्त मंदिरामध्ये सप्त शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५०) जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून तिरंगी सजावट देखील करण्यात आले आहे.

सजावटीचा शुभारंभ निकम दिंडी क्र. १६ चे अध्वर्यू निष्ठावंत ज्येष्ठ वारकरी, समाजभूषण ह.भ.प. शांताराम महाराज निम्हण यांचे हस्ते झाला. यावेळी नवी दिल्ली येथील सेंट्रल गांधी स्मारक निधीचे सचिव संजय सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती. ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, कोषाध्यक्ष युवराज गाडवे आदी उपस्थित होते. ट्रस्ट तर्फे त्यांचा महावस्त्र आणि सन्मानचिन्ह देवून यथोचित सत्कार यावेळी करण्यात आला.

ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, योगेश्वर श्रीकृष्ण यांनी भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान सांगितले ते संत ज्ञानेश्वर महाराजांनी सर्वसामान्यांसाठो प्राकृत भाषांतर केले. ज्ञानेश्वरीचे गारुड केवळ वारकरी संप्रदायच नाही तर अवघ्या मानव संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ह भ प शांताराम महाराज निम्हण यांनी आपल्या सुश्राव्य स्वरात ज्ञानेश्वर महाराजांची आरती केली. ही सजावट शनिवार, दि.१६ ऑगस्ट पर्यंत खुली असून भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

स्वातंत्र्यदिनादिवशीच स्वातंत्र्यावर घाला:कुणी काय खावे सरकारने ठरवू नये- राज ठाकरे

मुंबई-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त मांसविक्री बंदीच्या निर्णयावरून राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. “मांसविक्री बंदीसारखे निर्णय घेण्याचा अधिकार सरकार किंवा महापालिकेला नाही,” असे सांगत राज यांनी हा लोकांच्या स्वातंत्र्यावर घाला असल्याचा आरोप केला. कबुतरखान्यांवरून सुरू असलेल्या वादावरही त्यांनी भाष्य केले, “हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करणे सर्वांसाठी बंधनकारक आहे, धर्माच्या नावाखाली नियम मोडणे चुकीचे आहे.” राज्यात सरकार जाणीवपूर्वक समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) जोरदार तयारीला लागली आहे. आज, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये पार पडली. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राज ठाकरे म्हणाले, मांसविक्री बंद करण्याचे अधिकार महापालिकेकडे नाहीत. कोण काय खावे आणि काय खाऊ नये हे ठरवणे सरकार किंवा पालिकेचे काम नाही. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच लोकांना खाण्याचे स्वातंत्र्य न देणे हा सरळ विरोधाभास आहे. स्वातंत्र्य म्हटल्यानंतर तुम्ही बंदी कशी आणू शकता? कोणाचे काय धर्म आणि सण आहेत, त्याप्रमाणे काय खावे आणि कुणी काय खाऊ नये, ही बाब सरकारने सांगू नये, असा घणाघात राज ठाकरे यांनी केला.

ते पुढे म्हणाले, याबाबतचा कायदा 1988 साली आणल्याचे मी ऐकले. कायदा कधीही आणला असला, तरी स्वातंत्र्यदिनी आपण लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेत आहोत. कोणत्याही सरकारने या गोष्टीचा विचार केला पाहिजे.

कबुतरखाना प्रकरणात धर्माच्या नावाखाली नियमभंग चुकीचालोढा राज्याचे मंत्री, एका समाजाचे नाहीत

राज ठाकरे यांनी कबुतरखान्यांवरून सुरू असलेल्या वादावरही भाष्य केले. हायकोर्टाचा स्पष्ट आदेश आहे आणि त्या आदेशानुसार सर्वांनी वागले पाहिजे. कबुतरांमुळे होणाऱ्या रोगांबद्दल डॉक्टरांनी सांगितले आहे. बंदी असतानाही जर धर्माच्या नावाखाली कबुतरांना खाद्य दिले जात असेल, तर ते अत्यंत चुकीचे आहे. पोलिसांनी त्यावर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा एकाचा आदर्श पाहून इतरही तसेच करतील. मग हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयाचा अर्थ काय? असे राज ठाकरे म्हणाले.जैन समाजाच्या आंदोलनावेळी पोलिसांनी तत्काळ कारवाई केली पाहिजे होती, असे सांगत ठाकरे म्हणाले, “लोढा यांच्यासारखे लोक या प्रकरणात मध्यस्थी करत आहेत. ते कुठल्या एका समाजाचे नाहीत, तर राज्याचे मंत्री आहेत. महाराष्ट्राचा आणि न्यायालयाचा सन्मान त्यांनी राखायला हवा.”

काल झालेल्या मराठी बांधवांच्या आंदोलनातील घटनांचा उल्लेख करत ठाकरे म्हणाले, “राज्यात नेमके काय सुरू आहे, हेच कळत नाही. सरकारला हवे तरी काय? निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार सर्व समाजांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे का? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. पहिले हिंदीचा विषय आणला, तिथे वातावरण पेटते का ते बघितले. त्यानंतर आता त्यांनी कबुतरांचा विषय आणला. इथून पुढे कोणते प्राणी आणतील ते माहीत नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी सरकारवर केली.

मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे मी 2016-2017 सालापासून बोलतोय. बाकीचे आत्ता बोलायला लागलेत, असे राज ठाकरे म्हणाले. मुंबई महानगरपालिकेतील मतदार याद्यांची पुनर्तपासणी झाली पाहिजे. आमची लोक ही मतदार याद्यांची तपासणी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्यदिन ‘सौरग्राम दिन’ म्हणून होणार साजरा

ग्रामसभारोड शोचित्ररथ आदींद्वारे सूर्यघर योजनेची जनजागृती

पुणेदि१४ ऑगस्ट२०२५ :- पुणे जिल्ह्यातील १९१९५ हजार वीज ग्राहकांनी ‘पंतप्रधान सूर्यघर-मोफत वीज योजने’चा लाभ घेतला असून, ही योजना प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महावितरणने आता स्वातंत्रदिन ‘सौरग्राम दिन’ म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. या दिवशी महावितरणचे अभियंते-कर्मचारी प्रत्येक गावात ग्रामसभा व विविध कार्यक्रम घेऊन वीजग्राहकांना या योजनेसाठी प्रोत्साहित करणार आहेत.

देशातील प्रत्येक नागरिकाला विजेच्या बाबतीत स्वावलंबी बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंतप्रधान सूर्यघर- मोफत वीज योजना’ सुरु केली आहे. स्वत:च्या घराच्या छतावर वीज तयार करुन तिचा वापर करणे हा त्याच्या मागील उद्देश आहे. या योजनेच्या अनुदानासाठी केंद्राने  ७५ हजार कोटींची तरतूद केली आहे. राज्यात महावितरणने १००० मेगावॅट वीज क्षमतेचा टप्पा ओलांडला आहे. पुणे जिल्ह्यात १९१९५ ग्राहकांनी छतावर सौरप्रकल्प साकारले आहेत. त्याची स्थापित क्षमता ८९ मेगावॅट इतकी आहे.

छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून ग्राहकांना थेट अनुदान मिळते. एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला तीस हजार रुपये, दोन किलोवॅटला साठ हजार रुपये तर तीन किलोवॅटला ७८ हजार रुपये अनुदान मिळते. गृहनिर्माण संस्थांनाही पाचशे किलोवॅटपर्यंत प्रती किलोवॅट १८ हजार रुपये अनुदान मिळते. छतावर बसविलेल्या सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पातून पुढे २५ वर्षे वीजनिर्मिती होते. या वीजनिर्मितीमुळे ग्राहकाची घरगुती गरज पूर्ण होते व अतिरिक्त वीज महावितरणला विकता येते.

ही योजना घरांघरात पोहोचविण्यासाठी स्वातंत्रदिनी ग्रामसभा, रॅली, रोड शो आयोजित करुन सूर्यघर योजनेचे प्रसिद्धीपत्रके वाटून ग्राहकांना त्याचे महत्व पटवून देण्याचे काम केले जाणार आहे. पुणे शहरातील गृहनिर्माण संस्थामध्येही कार्यक्रम आयोजित करुन सूर्यघर योजनेची माहिती दिली जात असून, अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये महावितरणने मोठ्या प्रमाणात मेळावे देखील घेतले असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले. 

तुम्ही करा नाही तर आम्ही सकाळी ७ वाजताच सुरु करू विसर्जन मिरवणूक

लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणूक कोणीही अडवून ठेऊ नये.

पुणे- पुणे -बडी मंडळे उशिरा मिरवणूक सुरु करतात आणि दिवसभर रस्त्यावर राहतात आणि मग त्यांच्या नंतर छोटी म्हटली जाणारी मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी करवून घेतली जातात आणि एकाला एक न्याय , दुसऱ्याला दुसरा न्याय असा दुजाभाव सुरु होतो . अरेरावी आजवर झाली आता पुरे … आम्ही बडी मंडळे जाईपर्यंत का थांबावे .. ? आम्ही आता सकाळी ७ वाजताच लक्ष्मी रस्त्यावर येऊन मिरवणूक सुरु करू . त्यांना जेव्हा यायचे तेव्हा येऊ द्यात ..पण त्यांच्यासाठी आम्ही थांबणार नाही असा निर्णय पुण्यातील ६० गणेश उत्सव मंडळांनी घेत बड्या म्हणविल्या जाणाऱ्या मंडळांना इशारा देत पावित्र्य राखू द्या आणि वेळेत विसर्जन होऊ द्यात ची सूचना केली आहे. ..पहा कोण काय म्हणाले …. #pune#punecity#punekar#puneganeshfestival#punepolitics#politics#punepolice#PuneNews#punerealestate

किश्तवाडमध्ये ढग फुटी, चशोटी गावात धार्मिक यात्रेसाठी जमलेले अनेकजण वाहून गेले; रेस्क्यू ऑपरेशन सुरू


जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवार जिल्ह्यातील पद्दार उपविभागात गुरुवारी दुपारी १२:३० वाजता ढगफुटी झाली. त्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. हा आकडा वाढू शकतो. २५ जण जखमी आहेत. तथापि, प्रशासनाने आतापर्यंत मृतांची संख्या निश्चित केलेली नाही.

पद्दारच्या चाशोटी गावात ढगफुटी झाली. हे ठिकाण माचैल माता मंदिराचे प्रारंभ केंद्र आहे. धार्मिक यात्रेसाठी येथे अनेक लोक जमले होते. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. स्थानिक लोक मदत करण्यात गुंतलेले आहेत.

दरवर्षी ऑगस्टमध्ये माचैल माता तीर्थयात्रा होते. हजारो भाविक येथे येतात. हा मार्ग २५ जुलै ते ५ सप्टेंबर पर्यंत चालेल. हा मार्ग जम्मू ते किश्तवार पर्यंत २१० किमी लांबीचा आहे आणि यामध्ये, पद्दार ते चाशोटी पर्यंत १९.५ किमी रस्त्याने वाहने जाऊ शकतात. त्यानंतर माचैल पर्यंत ८.५ किमी पायी प्रवास आहे.

केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी X वर पोस्ट केले – “जम्मू आणि काश्मीरचे विरोधी पक्षनेते आणि स्थानिक आमदार सुनील कुमार शर्मा यांचा संदेश मिळाल्यानंतर किश्तवाडचे उपायुक्त पंकज कुमार शर्मा यांच्याशी नुकतेच बोललो. चोसिटी भागात ढगफुटी झाली आहे, ज्यामुळे मोठी जीवितहानी होऊ शकते. प्रशासनाने तात्काळ कारवाई सुरू केली आहे. बचाव पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. नुकसानीचे मूल्यांकन केले जात आहे. आवश्यक बचाव आणि वैद्यकीय सुविधांची व्यवस्था केली जात आहे. माझ्या कार्यालयाला नियमित अपडेट मिळत आहेत, सर्व शक्य मदत पुरवली जाईल.”

धनकवडीतील ज्येष्ठ नागरिकाची 30 लाखांची फसवणूक, सहकारनगर पोलिसांत गुन्हा दाखल

पुणे -धनकवडी भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी ३० लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. सहकारनगर पोलिसांनी अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.गेल्या वर्षी सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला मोबाइलवर संदेश पाठवला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष त्यांनी दाखवले. सुरुवातीला ज्येष्ठांनी काही रक्कम गुंतवली. चोरट्यांनी त्यांना गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळाल्याचे भासवले.

या आमिषाला बळी पडून ज्येष्ठांनी दीड ते दोन महिन्यात वेळोवेळी ३० लाख ४५ हजार रुपये गुंतवले. त्यानंतर त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही. चोरट्यांचे मोबाइल क्रमांक बंद असल्याचे आढळून आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.दरम्यान, याच पद्धतीने विमानतळ परिसरात एका तरुणाची ११ लाखांची फसवणूक झाली आहे. ऑनलाइन टास्कच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी १० लाख ६७ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार आणि पोलीस निरीक्षक शरद शेळके दोन्ही प्रकरणांचा तपास करत आहेत.

गणेशोत्सव काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समित्यांनी सज्ज राहावे — विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची — विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

महिला सुरक्षितता, सण व आपत्ती व्यवस्थापनावर कार्यशाळेचे आयोजन

मुंबई, दि. १३ ऑगस्ट — विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या संकल्पनेतून “महिला सुरक्षितता, सणासुदीच्या काळातील कायदा व सुव्यवस्था आणि शहरातील आपत्ती व्यवस्थापन” या विषयांवर विशेष कार्यशाळेचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले. या कार्यशाळेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर प्रमुख उपस्थित असून त्यांनी विशेष मार्गदर्शन केले. मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि महिला दक्षता समित्यांचाही यावेळी सहभाग होता.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कार्यशाळेत बोलताना सणासुदीच्या काळातील कायदा व सुव्यवस्था, नैसर्गिक आपत्ती किंवा गर्दीच्या ठिकाणी महिलांची सुरक्षा ही प्राथमिक जबाबदारी असल्याचे सांगितले. महिला दक्षता समित्यांनी सक्रिय राहून स्थानिक पोलीस स्टेशन, बीट कॉन्स्टेबल आणि सामाजिक संस्थांशी समन्वय साधावा, असे त्यांनी आवाहन केले. महिलांवरील अत्याचार प्रतिबंध, स्त्री-पुरुष समानता, स्त्रीभ्रूणहत्या, कौटुंबिक हिंसाचार याविषयी जनजागृती करताना कायदेशीर तरतुदींची माहिती पोहोचवण्यावर त्यांनी भर दिला.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महिलांची जोखीम ओळखण्याची नैसर्गिक क्षमता समाजाच्या सुरक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की, महिलांची ही निरीक्षणक्षमता केवळ घरापुरती मर्यादित नसून सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः उत्सव आणि गर्दीच्या काळात, अत्यंत प्रभावी ठरते. महिलांचा सहभाग प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या कार्यात वाढला, तर गुन्हे रोखणे आणि आपत्ती टाळणे अधिक सोपे होईल, असे ते म्हणाले. त्यांनी महिला दक्षता समित्यांच्या कार्याचे कौतुक करताना गणेशोत्सव काळात अशा समित्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे मार्गदर्शन करण्यावर भर द्यावा, अशी सूचना केली.

मुंबई पोलीस उपायुक्त श्री विवेक पानसरे यांनी महिलांच्या संरक्षणासाठी पोलीस दलाने उभारलेल्या यंत्रणांची माहिती दिली. निर्भया पथक, महिला मदत कक्ष, स्पेशल जुवेनाइल युनिट, मोबाइल फॉरेन्सिक युनिट आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष या विभागांचा उत्सव काळात अधिक सक्रिय वापर करण्याचे त्यांनी सांगितले.

बॉम्बस्फोट विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सचिन गावडे यांनी गर्दीच्या ठिकाणी आणि मिरवणुकीदरम्यान संशयास्पद हालचाली ओळखण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले. “कोणतीही संशयास्पद वस्तू, पिशवी किंवा वाहन आढळल्यास त्वरित पोलीसांना कळवा,” असे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन संचालक श्री महेश नार्वेकर यांनी गणेशोत्सव काळातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची माहिती दिली. पावसाळा आणि समुद्रातील भरती-ओहोटीच्या पार्श्वभूमीवर जलप्रलय किंवा इतर नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी महापालिकेने सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी १९१६ या हेल्पलाइनचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खासगी सचिव श्री अविनाश रणखांब यांनी केले, तर आभार प्रदर्शन विशेष कार्य अधिकारी श्री प्रशांत पिसाळ यांनी केले. या कार्यशाळेतून महिलांची सुरक्षा ही केवळ पोलीस किंवा प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचा ठाम संदेश देण्यात आला.

महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेसाठी पुणे शहर बॉक्सिंग संघ जाहीर

पुणे-

कॅडेट मुले, कब क्लास मुले आणि युथ मुलांच्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा दिनांक १७ ते २० ऑगस्ट २०२५ रोजी जळगाव येथे आयोजित करण्यात येत आहे.त्याकरिता, पुणे शहर बॉक्सिंग संघटनेतर्फे निवड चाचणी मंगळवार, १२ ऑगस्ट २०२५ रोजी अरुण कुमार वैद्य स्टेडियम येथे पार पडली. या निवड चाचणीत पुणे शहरातील १२ क्लबांनी सहभाग नोंदविला, तर ३८ बॉक्सर निवड चाचणीत उतरले.

निवड समिती:
ROC कमिटी चेअरमन सुरेशकुमार गायकवाड, महाराष्ट्राचे रिंग ऑफिशियल व ज्येष्ठ प्रशिक्षक जीवनलाल निंदाने, वरिष्ठ प्रशिक्षक उमेश जगदाळे, राज्य संघटनेचे तांत्रिक अधिकारी ज्येष्ठ प्रशिक्षक नजिर सय्यद, तसेच ज्येष्ठ प्रशिक्षक उमेश खानेकर यांनी समितीचे काम पाहिले. समितीने वयोगट, वजन गट आणि पात्रता निकष जाहीर केले.

खेळाडूंची निवड त्यांच्या प्रदर्शन, फॉर्म, शारीरिक तयारी व एकूण कामगिरीच्या सखोल परीक्षणावर आधारित होती. रिंगमधील कौशल्य, तांत्रिक तयारी, तसेच मानसिक आणि शारीरिक सहनशक्ती यांचे काटेकोर मूल्यमापन करण्यात आले. यासाठी पंच व तांत्रिक अधिकाऱ्यांच्या सहाय्याने वस्तुनिष्ठ पद्धतीने चाचणी घेण्यात आली.

विशेष योगदान:
महाराष्ट्र संघटनेचे तांत्रिक अधिकारी अशोक मेमजदे, पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे कार्यकारी सदस्य सुनील काळे,पंच व शहर संघटनेचे समन्वयक प्रदीप वाघे, कोचेस कमिशन चेअरमन पुणे शहर बंडू गायकवाड, महाराष्ट्राचे रिंग ऑफिशियल जयंत शिंदे,
पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे सदस्य सुनील काळे ,राष्ट्रीय खेळाडू कुणाल पालकर, पुणे रिंग ऑफिशियल रॉबर्ट दास, NIS प्रशिक्षक मृणाल भोसले, राष्ट्रीय बॉक्सर मंगेश यादव यांनी उत्कृष्ट कार्य केले.

सर्व निकाल व निरीक्षणांचा बारकाईने आढावा घेऊन अंतिम यादी निश्चित करण्यात आली.

निवड झालेल्या खेळाडू:

U-१९ युथ (मुले)
१) ओम धमाले – ४७ ते ५० किग्रॅ
२) आर्यन शिर्के – ५० ते ५५ किग्रॅ
३) स्पर्श परदेसी – ५५ ते ६० किग्रॅ
४) अनिकेत जावले – ६० ते ६५ किग्रॅ
५) तन्मय जानराव (६० ते ६५ किग्रॅ)
६) नागेश देवरे – ७५ ते ८० किग्रॅ
७) सिद्धांत गायकवाड – +८० किग्रॅ

U-१३ कॅडेट (मुले)
१) जी. पाटोळे – २६ ते २८ किग्रॅ
२) हार्दिक वेंगुर्लेकर – २८ ते ३० किग्रॅ
३) सम्यक कांबळे – ३० ते ३२ किग्रॅ
४) पियुष चौधरी – ३४ ते ३६ किग्रॅ
५) स्वराज इंगळे – ३६ ते ३८ किग्रॅ
६) शुभम परियार – ३८ ते ४० किग्रॅ
७)मयंक गायकवाड – ४० ते ४२ किग्रॅ
८) शिवराज आंदेकर–४४ ते ४६ किग्रॅ

U-११ कब_क्लास (मुले)
१) शिवराज महाकाल – २० ते २२ किग्रॅ
२) विहान मगर – २४ ते २६ किग्रॅ
३) विराज कांबळे – २६ ते २८ किग्रॅ
४) आर्यन बेलापूरकर – ३४ ते ३६ किग्रॅ
५) साईराज पगारे – ३६ ते ३८ किग्रॅ
६) रेयांश सूर्यवंशी – ३८ ते ४० किग्रॅ

पुणे शहर बॉक्सिंग संघटनेने ही निवड प्रक्रिया पूर्ण पारदर्शकता व निष्पक्षतेने पार पाडली, जेणेकरून पात्र व गुणवंत खेळाडूंनाच संधी मिळेल. सचिव विजय गुजर यांनी निवड समितीचे संपूर्ण कामकाज काटेकोर व प्रामाणिकपणे पाहिले.

पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्षमाजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी निवड समितीच्या पारदर्शक व निष्ठावान कार्याचे मनःपूर्वक कौतुक करून अभिनंदन व्यक्त केले. तसेच निवड झालेल्या खेळाडूंना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत, आगामी राज्य अजिंक्यपद स्पर्धांमध्ये यशाची शिखरे गाठावीत अशी प्रेरणा दिली

१२ वर्षे झाली डॉ. दाभोळकर खुनाचे सूत्रधार अजूनही मोकाट…

डॉ. दाभोळकर खुनाचे सूत्रधार अजूनही मोकाट:सीबीआयकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची अंनिसची मागणी

पुणे-डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या निर्घृण खुनाला २० ऑगस्ट रोजी १२ वर्षे पूर्ण होत आहेत. याविषयी पुणे सत्र न्यायालयाने शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोघांना दोषी ठरवून शिक्षा दिलेली आहे. असे असले तरीही या खुनामागचे सुत्रधार अजूनही मोकाटच आहेत. त्यांना पकडण्याचे कुठलेही प्रयत्न शासनाच्या पातळीवर सुरु नाहीत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या सूत्रधारांना कधी पकडणार असा संतप्त सवाल हमीद दाभोलकर, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, श्रीपाल ललवाणी व अनिल वेल्हाळ यांनी अंनिसमार्फत पुणे येथील पत्रकार परिषदेमध्ये केला.राष्ट्रीय पातळीवर जादूटोणा विरोधी कायदा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

ते पुढे म्हणाले की ‘डॉ नरेंद्र दाभोळकरांचा खून हा त्यांचे विचार संपवण्यासाठी केलेला एक सुनियोजित कट होता’ असे निरीक्षण पुणे येथील सत्र न्यायालयाने नोंदवले असतानादेखील त्यामागचे सूत्रधार शोधण्यासाठी शासन काहीही प्रयत्न करत नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचे खूनखटले देखील अजून सुरु असल्याने या चारही खूनांमागील सुत्रधारावर कारवाई होऊ शकलेली नाही. जोपर्यंत हे सूत्रधार पकडले जात नाहीत तोपर्यंत विवेकवादी कार्यकर्त्यांना असलेला धोका कायम आहे, असेदेखील त्यांनी यावेळी नमूद केले.

डॉ नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृतिदिनानिमित्ताने ऑल इंडिया पिपल सायन्स नेटवर्क यांच्या माध्यमातून देशभरात २० ऑगस्ट हा ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टीकोन दिवस’ म्हणून पाळला जातो. या वर्षी देखील त्या अंतर्गत देशातील पंधरा पेक्षा अधिक राज्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार याविषयी कार्यक्रम केले जाणार आहेत.यावर्षी १७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजता डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृति व्याख्यानाचे आयोजन साने गुरुजी स्मारक पुणे येथे करण्यात आले आहे. या वेळी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक हे ‘भारताचे संविधान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन’ याविषयी व्याख्यान देतील. हेमंत गोखले, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.

शौर्य गाजविणाऱ्या माजी सैनिकांचा महापालिकेतर्फे विशेष सन्मान

‘हर घर तिरंगा’ उपक्रम तसेच महापालिका अमृत महोत्सवानिमित्त आयोजन
‘माँ तुझे सलाम‌’सांगीतिक कार्यक्रमाला पुणेकरांची दाद
पुणे : ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्‌’, ‘राजमाता जिजाऊ की जय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’ अशा घोषणा तसेच युद्धामध्ये शौर्य गाजविणाऱ्या माजी वीर सैनिकांचा सन्मान असे देशभक्तीमय वातावरण पुणेकरांनी आज (दि. १३ ऑगस्ट) अनुभवले.
निमित्त होते पुणे महानगरपालिकेने आयोजित केलेल्या ‌‘हर घर तिरंगा’ या अभियानाअंतर्गत तसेच महापालिकेच्या अमृत महोत्सवानिमित्त शौर्य, धैर्य, लष्कर सेवेतील अतुलनीय पराक्रमाचा आविष्कार, राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा तसेच समाजसेवेमध्ये ऐतिहासिक काम करणाऱ्या माजी सैनिकांच्या गौरव सोहळ्याचे! बालगंधर्व रंगमंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने देशभक्तीपर हिंदी, मराठी गीतांचा ‌‘माँ तुझे सलाम‌’हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रम महापालिकेच्या सांस्कृतिक केंद्र विभागातर्फे आयोजित करण्यात आला होता.
अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे, सहआयुक्त गोविंद दांगट, राजेश कादबाने, तिमय्या जंगले, सांस्कृतिक विभाग उपायुक्त सुनील बल्लाळ, प्रशासन अधिकारी राजेश कामठे, दीपक राऊत, सुरेखा भणगे, प्रशासकीय अधिकारी संगीता कोकाटे आदी मंचावर होते.
निवृत्त कॅप्टन परशुराम शिंदे, निवृत्त कॅप्टन बाबू जाधव, निवृत्त सुभेदार मेजर हेरंब सालेकर, निवृत्त सुभेदार मेजर विवेकानंद घाडगे, निवृत्त नायक पोपट महाजन, निवृत्त हवालदार अशोक कड, निवृत्त नायक सदाशिव पाटील, निवृत्त नायक सुखदेव भोसले, निवृत्त ऑडनरी फ्लाईट लेफ्टनंट श्यामराव चव्हाण, वीरचक्रप्राप्त निवृत्त कर्नल सदानंद साळुंखे, हवालदार बजरंग निंबाळकर तसेच पॅराऑलिंपिकमध्ये सहभागी रफीक लतिफ खान यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
सत्कारार्थींच्या वतीने मनोगत व्यक्त करताना परशुराम शिंदे म्हणाले, या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय नागरिक तसेच विद्यार्थ्यांच्या मनात देशाविषयी आपुलकी, आदर आणि प्रेम निर्माण झाले आहे. महापालिकेच्यावतीने माजी सैनिकांचा आवर्जून गौरव करण्यात आला याविषयी कृतज्ञ आहोत.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली तर राजेश कामटे यांच्या मार्गदर्शनाखाली तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली. महापालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती प्रास्ताविकात सुनील बल्लाळ यांनी सांगितली.
अमृत महोत्सवानिमित्त महापालिकेतर्फे आयोजित बोधचिन्ह स्पर्धा, माझी वारी वेषभूषा स्पर्धा तसेच आषाढी वारी छायाचित्र स्पर्धेच्या विजेत्यांना आणि परिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
‌या निमित्ताने हिंदी व मराठी देशभक्तीपर गीतांच्या ‘माँ तुझे सलाम‌’या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांची होती तर सूत्रधार निकिता मोघे होत्या. केतकी महाजन-बोरकर यांनी संयोजन केले. जितेंद्र भुरुक, गणेश मोरे, अश्विनी खुरपे, आकाश सोळंकी, माधुरी भोसेकर यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. सादरीकरणाला पुणेकर रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. रशिद शेख, सुनील जाधव, बाबा खान, रोहित जाधव, सोमनाथ फाटक, सुनील साळवी यांची साथसंगत होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील जोशी यांनी केले तर आभार राजेश कामटे यांनी मानले.