Home Blog Page 360

कोथरूडमधील व्यावसायिकाचे पाटण्यात अपहरण अन हत्या

पुणे- एका व्यावसायिकाच्या हत्येची खळबळजनक घटना बिहारमध्ये उघडकीस आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. घोसी पोलीस स्टेशन हद्दीतील माननपूर गावाजवळ शनिवारी, १२ एप्रिल रोजी सकाळी मृतदेह आढळून आला होता.त्यानंतर सोमवार १४ एप्रिल रोजी मृतदेहाची ओळख पटली. मृत व्यक्तीचे नाव लक्ष्मण साधू शिंदे असे आहे. हा पुण्यातील एक व्यापारी होता आणि तो भंगार व्यवसायिक होता.

प्राप्त माहितीनुसार,सायबर गुंडांनी कोथरूडमधील व्यावसायिकाला पाटण्याला बोलावले आणि नंतर त्याचे अपहरण करून हत्या केली. गळा दाबून या ५५ वर्षीय उद्योगपतीचा खून करण्यात आला आहे. कंपनीच्या कामासाठी मेल करून या व्यक्तीला पाटण्याला बोलवले होते. कंपनीचे काही टूल्स आणि मशीनरी स्वस्त भावात विकत देतो, असा आरोपींकडून उद्योगपतीला मेला आला होता.
स्वस्तात मशिनरी मिळेल यासाठी उद्योगपती लक्ष्मण साधू शिंदे बिहारला गेले होते. त्यानंतर तिथे त्यांची हत्या करण्यात आली आहे. पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबाकडून देण्यात आली होती. खून का केला याच कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र बिहारच्या स्पेशल टीमने या संदर्भात पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.आरोपींनी त्यांची हत्या करून बिहारच्या-जेहानबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 33 वर टाकून दिला. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला आहे. पाटणा पोलिसांकडेही लक्ष्मण शिंदे गायब झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती. हत्या झाल्यानंतर बिहार पोलिसांच्या विशेष पथकाने पाच संशयितांना जेहानबाद आणि नालंदा या जिल्ह्यातून अटक केली.

तसेच त्यांचा मृतदेह आणण्यासाठी पुणे पोलीस बिहारमध्ये दाखल झाले आहेत. या काळात, गुन्हेगारांनी त्या व्यावसायिकाला पाटणा, नालंदा आणि जहानाबाद येथे नेले असावे, असा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणाचे पडसाद पाटणा पोलीस मुख्यालयापर्यंत पोहोचले आहेत. या हाय-प्रोफाइल खून प्रकरणाचा तपास पाटणा, जहानाबाद आणि नालंदा पोलीस संयुक्तपणे करत आहेत. या प्रकरणी बिहार पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे.

अलका कुबल रंगभूमीवर ‘वजनदार’ भूमिकेतून पुनरागमन

लठ्ठ असणं कुणालाच फारसं प्रिय नसतं. आपल्या लठ्ठपणाचा कॉम्प्लेक्स अनेकांना येत असतो.बारीक होण्याची धडपड. त्यासाठी चालणं, सायकलिंग, डाएटचे वेगवेगळे प्रकार, औषधं, जिम आणि बरंच काही… सुरु असतं. याच लठ्ठपणावर भाष्य करणार ‘अष्टविनायक’ आणि ‘विप्रा क्रिएशन्स’ यांची प्रस्तुती असलेलं एक वजनदार नाटक रंगभूमीवर येऊ घातलं आहे. विशेष म्हणजे या नाटकाच्या निमित्ताने मनोरंजनसृष्टीतआपल्या खणखणीत ‘वजनदार’ अभिनयाच ठसा उमटविणाऱ्या अभिनेत्री अलका कुबल या नाटकाच्या निमित्ताने २७ वर्षांनी त्या पुन्हा रंगभूमीकडे वळल्या आहेत. एका मोठ्या कालावधीनंतर रंगभूमीवर परतणाऱ्या अलकाजी या नाटकाविषयी फारच उत्सुक आहेत. आपल्या कमबॅक विषयी बोलताना त्या सांगतात की, रंगभूमीवर मला काम करायचेच होते ‘वजनदार’ या नाटकाच्या निमित्ताने मला ही संधी मिळाली. या नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाची उत्सुकता आहेच. माझी भूमिका प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील असा विश्वासही अलका यांनी व्यक्त केला.

वजनदार च्या माध्यमातून पुन्हा नाट्यरसिकांच्या भेटीला येण्याबाबत त्या म्हणाल्या की, जरी २७ वर्षांनी पुन्हा नाटकात काम करीत असले तरी नाटकापासून कधीच दूर गेले नव्हते. नाटकात काम करण्याची इच्छा मनात होतीच. मध्यंतरीच्या काळात चित्रपट, मालिका करण्यासोबतच निर्मितीच्या कामातही व्यग्र असल्याने रंगभूमीवर काम करू शकले नव्हते. पुनरागमन करण्यासाठी एका चांगल्या नाटकाच्या प्रतिक्षेत होते. वजनदार माध्यमातून पुनरागमन करताना खूप आनंद होत आहे.

वेगवेगळ्या सकस नाट्यकृती नाट्यरसिकांसाठी आणणाऱ्या ‘अष्टविनायक’ संस्थेने विप्रा क्रिएशन्स’ च्या साथीने आणलेल्या वजनदार नाट्यकृतीचा शुभारंभ येत्या २४ एप्रिलला यशवंत नाट्यमंदिर माटुंगा येथे दुपारी ४.०० वा. होणार आहे. मनोरंजनसृष्टीतल्या  दोन नावाजलेल्या गुणी अभिनेत्री संपदा कुलकणी-जोगळेकर आणि अलका कुबल वजनदार नाटकाच्या निमित्ताने एकत्र आल्या आहेत. संपदा कुळकर्णी-जोगळेकर लिखित आणि संतोष वेरूळकर दिग्दर्शित या नाटकात अभिनेत्री अलका कुबल मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. अलका कुबल यांच्यासह अभिषेक देशमुख, साक्षी पाटील,अभय जोशी, पूनम सरोदे आदि कलाकार यात आहेत. 

संध्या रोठे, प्रांजली मते, दिलीप जाधव यांनी वजनदार या नाटकाची निर्मिती  केली आहे. संगीत मंदार देशपांडे यांचे आहे. नेपथ्य सचिन गावकर  तर प्रकाश योजना अमोघ फडके यांची आहे. वेशभूषा हर्षदा  बोरकर तर रंगभूषा कमलेश बिचे यांची आहे.

शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल 20 रुपये वाढ करण्याचा निर्णय-उपमुख्यमंत्री अजित पवार

केंद्राची मान्यता आणि नाफेड यंत्रणेमार्फत उपलब्ध होणाऱ्या
10 वस्तूंची विक्री शिधावाटप दूकानातून करण्यास परवानगी
–उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक कार्यालय असावे,
अशा पद्धतीने मुंबई, ठाण्यातील शिधावाटप यंत्रणेची पुनर्रचना
–उपमुख्यमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री अजित पवार

मुंबई, दि. 15 :- राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप करणाऱ्या शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल 20 रुपयांची वाढ करुन ते 150 रुपयांवरुन 170 रुपये करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा अन्न व नागरीपुरवठा मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. केंद्राची मान्यता असलेल्या आणि नाफेडमार्फत उपलब्ध होणाऱ्या दहा जीवनावश्यक वस्तूंची विक्री शिधावाटप दूकानातून करण्यास परवानगी देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत झालेल्या या निर्णयांमुळे शिधावाटप दुकानदारांची अनेक वर्षांची प्रलंबित मागणी पूर्ण झाली असून त्याबद्दल दुकानदारांच्या संघटनांनी आनंद व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत. देशातील 80 कोटी आणि राज्यातील 7 कोटी लाभार्थांना शिधावाटप दुकानांच्या माध्यमातून स्वस्त अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामांपासून राज्याच्या शहरात, गावखेड्यातील शिधावाटप दुकानांपर्यंत अन्नधान्य पुरवण्यासाठी एक प्रभावी यंत्रणा कार्यरत आहे. ही यंत्रणा अधिक जलद, सक्षम, पारदर्शक, विश्वासार्ह बनविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा नागरी पुरवठा विभाग प्रयत्नशील आहे. त्यासाठी स्मार्ट रेशनकार्ड, इलेक्ट्रॉनिक वजनकाटे, जीपीएस ट्रॅकिंग, लाईव्ह मॉनिटरींगसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करुन महाराष्ट्रासाठी उपयुक्त ठरेल अशी खरेदी, वितरण, नियंत्रण, देखभाल यंत्रणा उभारण्याचा निर्णय आज बैठकीत घेण्यात आला. यासाठी सध्या गुजरातमध्ये उपयोगात असलेल्या यंत्रणेचाही अभ्यास करण्यात येणार आहे.

राज्यातील शिधावाटप यंत्रणेसंदर्भातील प्रलंबित प्रकरणांवर तातडीने सुनावणी घेऊन ती निकाली काढण्यात येतील, अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिली. गावखेड्यातल्या प्रत्येक शिधापत्रिका कार्डधारकाला नियोजनानुसार धान्यवाटप झाले पाहिजे, या कार्यवाहीत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी बैठकीत दिले.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात शिधावाटप कार्यालय
मुंबई आणि ठाणे क्षेत्रातील शिधावाटप कार्यालयांची पुनर्रचना करुन प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक कार्यालय असेल अशा पद्धतीने पुनर्रचना करण्याचा महत्वपूर्ण निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी 1980 मध्ये शिधावाटप कार्यालयांची पुनर्रचना करण्यात आली होती. नव्या पुनर्रचनेनंतर मुंबई व ठाण्यात एक परिमंडल कार्यालय आणि 5 नवीन शिधावाटप कार्यालये तयार होतील. यातून मुंबई आणि ठाणे परिसरातील नागरी पुरवठा यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील कार्यालयात झालेल्या या बैठकीत अन्न व नागरी पुरवठा विभागाची सद्यस्थिती, भविष्यातील वाटचालीबाबतचे सादरीकरण करण्यात आले. बैठकीला अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. राजेश देशमुख, अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिव जयश्री भोज, शिधावाटप नियंत्रक सुधाकर तेलंग आदींसह संबंधिक विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि शिधावाटप दुकानदारांच्या संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

दिनानाथ रुग्णालयावर कारवाई होणारच आणि पुन्हा कोणी तनिशा भिसे होणार नाही अशी कारवाई होईल – रुपाली चाकणकर

0

पुणे-राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, दिनानाथ रुग्णालयावर १०० टक्के कारवाई होईल आणि गुन्हाही दाखल होईल . पुन्हा तनिशा भिसे कोणी होणार नाही या अनुषंगानेच ठोस कारवाई करण्यात येणार आहे. आज पुण्यात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या . त्या म्हणाल्या ,'”भिसे कुटुंबियांनी अलंकार पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. आता ससून रुग्णालयाचा अहवाल येणे बाकी आहे. उद्या हा अहवाल येईल आणि सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यावर चर्चा करू.
माता मृत्यू अन्वेशन समिती आणि धर्मादाय आयुक्त समितीचा अहवाल मंत्रालयात सादर करण्यात आला आहे. उद्या ससून रुग्णालयाचा अहवाल येईल. त्यानंतर पुढील कारवाईसंबंधी भूमिका मांडली जाईल. राज्य महिला आयोग सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे. यात जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई जाईल. यापुढे कोणतीही तनिषा भिसे घडू नये ही जबाबदारी आम्ही घेणार आहोत,” असे त्या म्हणाल्या.”दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे धर्मादाय रुग्णालय आहे, त्यामुळे याप्रकरणात धर्मादाय अहवाल असणे आवश्यक आहे. तनिषा भिसे यांनी ज्या रुग्णालयांमध्ये उपचार घेतले तिथला अहवाल येणे गरजेचे आहे. या अहवालांच्या माध्यमातून कायदेशीर कारवाई करण्यात येईल,” असेही रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सुनावणीत १२३ तक्रारींवर कार्यवाही-अध्यक्षा रूपाली चाकणकर

पुणे, दि.१५: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या “महिला आयोग आपल्या दारी” उपक्रमांतर्गत नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित सुनावणीत पुणे शहरातील कौटुंबिक छळ, मालमत्ता आदी प्राप्त एकूण १२३ तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे.

आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आज पासून तीन दिवस पुणे जिल्हा दौऱ्यावर आहेत १६ एप्रिल रोजी पुणे ग्रामीणकरिता जिल्हाधिकारी कार्यालय आणि १७ एप्रिल रोजी पिंपरी चिंचवड येथे जनसुनावणी होणार आहे.

श्रीमती चाकणकर यांनी आज पुणे शहर विभागासाठी जनसुनावणी घेतली. महिलांना मुंबई येथील आयोगाच्या कार्यालयात येण्याची गरज भासू नये, त्यांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आयोगाकडून सर्व संबंधित यंत्रणेसोबत जिल्हास्तरावर सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. यावेळी एकाच छताखाली पोलिस, प्रशासन उपस्थित असल्याने महिलांच्या तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येत आहे.

श्रीमती चाकणकर यांनी जिल्ह्यातील महिला व बालकांच्या प्रश्नांबाबत आढावा घेतला. यावेळी पोलिस, प्रशासन, महिला व बालविकास, कामगार, परिवहन, शिक्षण, आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या विभागांचे सादरीकरण केले.

जनसुनावणी आणि आढावा बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलिस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा महिला बालविकास अधिकारी मनिषा बिरारीस उपस्थित होते.

स्व.तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने रुग्णालयासाठी मार्गदर्शक तत्वे असावीत अशी आयोगाची भूमिका होती. त्याबाबत उपसंचालक आरोग्य डॉ राधाकिसन पवार, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ एकनाथ पवार यांनी आपला अहवाल आयोगास सादर केला. श्रीमती रूपाली चाकणकर यांनी, जनसुनावणी आणि आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देतांना एसओपीबाबत माहिती दिली.

पुणे महापालिका आंतर जिल्हा बदलीतील गैरव्यवहाराची चौकशी करा, शिक्षण आयुक्तांकडे मागणी

पुणे– पुणे महापालिका आंतर जिल्हा बदलीतील गैरव्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी माजी विरोधी पक्ष नेते उज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी शिक्षण आयुक्त यांच्याकडे केली आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये 318 शिक्षक भरती मध्ये घोटाळा झाला होता, त्याबाबत सर्व तपशील सरकारला सादर केला होता. राज्य सरकारच्या शिक्षण आयुक्ताने आदेशही दिले; परंतु पुणे महानगरपालिकेने पुढे काही केले नाही. असा आरोप देखील माजी नगरसेवकांनी केला आहे. नागपूर च्या धर्तीवर पुणे महापालिकेतील शिक्षक भरती गैरव्यवहार प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.

माजी नगरसेवकांनी शिक्षण आयुक्त आणि राज्य सरकारला दिलेल्या निवेदन नुसार पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट 34 गावांमध्ये शिक्षकांची संख्या असताना त्या शिक्षकांचा समावेश महानगरपालिकेत न करता त्यांना जिल्हा परिषदेमध्ये ठेवले आणि इतर जिल्हा परिषद मधून शिक्षक आले हे चुकीचे आहे, कायदेशीर कदाचित योग्य असू शकेल. पवित्र पोर्टलवरूनं अतिशय पारदर्शी प्रक्रिया आपण राबवली जात आहे. परंतु पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने पाठवलेल्या माहिती बाबत सुस्पष्ट खुलासा पुणे महानगरपालिका कडून मागवावा. आत्ता पवित्र पोर्टल मध्ये ज्यांना नेमणुका दिला आहेत, त्यांची कागदपत्र तपासणी होईपर्यंत पुणे महानगरपालिकेची संच मान्यता, उपलब्ध शिक्षक, संवर्गातील शिक्षक व पदवीधर शिक्षक यांचा पूर्ण ताळमेळ लागल्याशिवाय पुढच्या कुठल्याही गोष्टीला मान्यता देऊ नये. पुणेकर नागरिक भरत असलेल्या कर रकमेतून 50 टक्के पगार प्रशासनामार्फत या शिक्षकांवर खर्च होतो. त्यामुळे यामध्ये पारदर्शक व्यवहार असणं आवश्यक आहे. असे पुणेकर म्हणून आमचे मत आहे. असे निवेदनात म्हटले आहे.

ज्या ज्या शंका आमच्या मनामध्ये आहेत त्या बाबत आम्ही प्रशासनाकडे खुलासे मागितले आहेत चर्चा केली आहे परंतु कागदपत्र अद्याप मिळालेली नाही. या शिक्षकांच्या पगारांपैकी 50 टक्के वाटा महाराष्ट्र शासन देखील उचलणार आहे त्यामुळे शासनाने देखील पूर्ण खात्री करणे आवश्यक आहे असे आमचे मत आहे. 313 शिक्षक इतर जिल्हा परिषद मधून जे आले त्यांची पदवीधर अ पदवीधर विषय संवर्ग आणि रोस्टर याची तपासणी न करता नियुक्ती केली आहे त्याची देखील संपूर्णपणे तपासणी होणं आवश्यक आहे. माजी नगरसेवकांनी पुढे म्हटले आहे कि, याबाबत जे एक सकारात्मक पाऊल उचलले आहे त्याचे आम्ही स्वागत करून याबाबत अधिक चौकशी करावी अशी मागणी करतो आहोत. जे गैर मार्गाने कायदा धाब्यावर बसवून पुणे शहरांमध्ये नियुक्ती करून घेतली आहे त्याबाबत त्वरित निर्णय करावा. अशी देखील मागणी शिक्षण आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे.

माजी आमदार संजय घाटगे, पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेश

0

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘विकसित महाराष्ट्र’ संकल्पनेस साथ देण्यासाठी उबाठा, काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादीतून हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आहे. नव्याने भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमुळे भाजपा सदस्य संख्या आणखी 50 लाखांनी वाढेल असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी व्यक्त केला.

उबाठा गटाचे कागलचे माजी आमदार संजय घाटगे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा आणि मालेगाव येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रसाद बळीराम हिरे, श्रीरामपूर चे माजी नगराध्यक्ष संजय फंड यांचा भाजपा प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश झाला. यावेळी ते बोलत होते. श्री. बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. सीमा हिरे, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. बावनकुळे म्हणाले की, कागल व शहापूर च्या माजी आमदारांच्या पक्षप्रवेशामुळे पक्षाला कोल्हापूर आणि ठाणे जिल्ह्यात बळकटी मिळणार आहे. मोठा राजकीय वारसा लाभलेले प्रसाद बळीराम हिरे आणि हजारोंच्या संख्येने भाजपामध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमुळे नाशिक जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक मजबूत होणार आहे. आरोग्य तसेच शिक्षण मंत्र्याची धुरा समर्थपणे सांभाळलेले तसेच दीर्घकाळ विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणा-या स्व. बळीराम हिरे ह्यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर असून त्यांचे पुत्र आणि इतर कुटुंबियांच्या भाजपा प्रवेशामुळे आनंद झाल्याचे श्री. बावनकुळे म्हणाले.

शहराच्या विकासासाठी आपण भाजपात प्रवेश करत असल्याचे श्री. हिरे म्हणाले. भाजपाचे निष्ठेने काम करून भाजपाचा झेंडा संपूर्ण नाशिक जिल्ह्यात दिमाखात फडकवू असेही त्यांनी नमूद केले.

ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते शिवाजीभाऊ देशमुख, श्रीरामपूरचे काँग्रेस नेते व माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी यांच्यासह 12 माजी नगरसेवक, आगरी क्रांती संघटनेचे अध्यक्ष शिवाजी अधिकारी, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक इंद्रजित पडवळ, जिल्हा परिषद माजी सभापती निखिल बरोरा, फलटण चे माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ, तुषार गांधी, प्रसाद हिरे यांच्या पत्नी सौ. गीतांजली हिरे, नाशिक जिल्हा काँग्रेस चे उपाध्यक्ष बाजीराव निकम, रामराव शेवाळे, राजेंद्र लोंढे, अशफाक शेख, सुधाकर बाचकर यांचा भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांत समावेश आहे.

वर्षभरात’दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे ‘आरोग्य गणेशा’ अंतर्गत ७२ हजार ४८३ जणांची रुग्णसेवा

पुणे : रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद अंगिकारून जय गणेश रुग्णसेवा अभियान अंतर्गत ‘आरोग्य गणेशा’ मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे २०२४-२५ आर्थिक वर्षात मोठे योगदान देण्यात आले आहे. यामध्ये वर्षभरात विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया, तपासण्या, साहित्य व औषधे वाटप अशी विविध प्रकारची सर्वतोपरी मदत तब्बल ७२ हजार ४८३ रुग्णांना करण्यात आली आहे. मागील वर्षी २०२३-२४ या वर्षात ४१ हजार ८७७ रुग्णांना मदत करण्यात आली होती, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, पदाधिकारी यतीश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ट्रस्टचे सरचिटणीस व आमदार हेमंत रासने म्हणाले की, जनतेच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात ट्रस्टचे काम सुरू आहे. ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्य विभाग सुरू करण्यात आला असून रुग्णांना सर्वतोपरी मदत होईल असा प्रयत्न करण्यात येतो. ट्रस्टची रुग्णवाहिका सेवा देखील सातत्याने सुरू आहे. ट्रस्टच्या माध्यमातून ससून येथे रुग्ण व नातेवाईकांना भोजन देखील मोफत दिले जाते.

महेश सूर्यवंशी म्हणाले, महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग व पुणे महानगरपालिकेच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा, हे अनेक रुग्णांना माहीत नसते. त्या रुग्णांना ट्रस्टतर्फे योजनांचा लाभ करून दिला जातो. तसेच, ज्या रुग्णांकडे अपुरी कागदपत्रे असतील, त्यांना नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून कागदपत्रे मिळवून देण्याकरिता देखील ट्रस्ट सदैव तत्परतेने कार्य करीत आहे. वर्षभरात ट्रस्टशी संलग्न विविध २२३ रुग्णालय आणि विविध संस्थांमधून ही सेवा दिली जात आहे. जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांना मोफत आरोग्य शिबीर व विविध शाळांमध्ये आरोग्य शिबीराच्या माध्यमातून देखील ही सेवा दिली जाते.

  • कर्णबधिर लहान मुलांच्या गुंतागुंतीच्या ८ शस्त्रक्रिया यशस्वी
    महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील जन्मत: कर्णबधिर असलेल्या वयवर्षे १ ते ४ मधील लहान मुलांच्या कॉक्लियर इम्प्लांट या अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया मोफत करून देण्यात आल्या. या प्रत्येक शस्त्रक्रियेचा खर्च १२ लाख रुपये प्रत्येकी असून अशा ८ शस्त्रक्रिया वर्षभरात झाल्या आहेत. ज्युपिटर हॉस्पिटलच्या माध्यमातून या शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
  • मोफत महाआरोग्य शिबीर रविवारी (दि.२०)
    जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत यंदा मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन रविवार, दि. २० एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत करण्यात आले आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील नू.म.वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात हे शिबीर होणार आहे. यामध्ये ह्रदय आजार, कर्करोग, किडनी, नेत्र आजार, दंत उपचार, स्त्री रोग, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया, अपंगांना मोफत जयपूर फूट वाटप, रक्त तपासणी, रक्तदान शिबीर, ईएनटी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी उपचार, अस्थिरोग, विविध थेरपी, रेडिओलॉजी, श्रवण आणि स्पीच थेरपी उपचार विनामूल्य करून देण्यात येईल. नागरिकांसाठी वाहने पार्किंग व्यवस्था नू.म.वि. प्राथमिक शाळा, अप्पा बळवंत चौक येथे करण्यात आली आहे. -: सन २०२४-२५ वर्षातील आढावा :-
  • नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया – ३७,२२२
  • दंत रोग उपचार – २३६४
  • किडनी विषयक उपचार व शस्त्रक्रिया – २०८९
  • कर्करोग शस्त्रक्रिया – १२३०
  • लहान मुलांच्या शस्त्रक्रिया – ६७२
  • ह्रदय शस्त्रक्रिया – ४२९
  • अस्थिरोग शस्त्रक्रिया – १३३
  • मोफत पॅथॉलॉजिकल टेस्ट – ९२७८
  • मोफत फिजिओथेरपी – ७८३१
  • श्रवणयंत्र व मोल्ड वाटप – ५१५०
  • कृत्रिम अवयव व उपकरणे वाटप – ३७४८
  • एमआरआय, सिटी स्कॅन (५० टक्के सवलत) – २३३७
  • ससून रुग्णालयात भोजनथाळी – १२ लाख रुग्ण

*श्रवणदोष असणा-या गरजू रुग्णांना मोफत श्रवणयंत्र
श्रवणदोष असणाऱ्या गरजू रुग्णांना मोफत श्रवणयंत्र मोल्ड व श्रवणयंत्र वाटप केले जाते. यावर्षी ५ हजार १५० कर्णबधिर मुले व नागरिकांनी याचा लाभ घेतला. ट्रस्टच्या वैद्यकीय विभागात आलेल्या नागरिकांना खुबा प्रत्यारोपण, गुडघा, प्रत्यारोपण आणि अस्थिरोग विषयक १३३ जणांच्या शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या आहेत. तसेच, किडनी स्टो, डायलिसिस, प्रोस्टेट ग्रंथी, पर्मकॅथ, फिस्तुला अशा २ हजार ८९ जणांच्या शस्त्रक्रिया विनामूल्य करून देण्यात आल्या आहेत.

*महाराष्ट्रातून आलेल्या लहान मुलांच्या विनामूल्य शस्त्रक्रिया
महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या ६७२ लहान मुलांच्या ह्रदय, किडनी, कर्करोग व अन्य शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या गेल्या. तर, एमआरआय, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, मेमोग्राफी यासांरख्या महागड्या तपासण्यांवर ५० टक्के सवलतीच्या दरात २ हजार ३३७ रुग्णांना तपासण्या करून देण्यात आल्या आहेत.

दगडूशेठ ट्रस्टचे मोफत पॅथॉलॉजिकल टेस्ट सेंटर – ९ हजार २७८ रुग्णांच्या मोफत तपासण्या
पुण्यातील धनकवडी भागात काशिनाथ पाटील नगर येथे दगडूशेठ ट्रस्टचे मोफत रक्त व विविध प्रकारची रुग्ण तपासणी करणारे केंद्र आहे. याकेंद्रामध्ये दररोज किमान ५० पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी मोफत केली जाते. रक्त तपासणी व विविध तपासण्या अंतर्गत सीबीसी, रक्तगट, थायरॉइड, लिपिड प्रोइल, लिव्हर फंक्शन टेस्ट, फास्टींग पीपी शुगर, एसजीओटी/एस जी पीटी, युरिया, ईएस आर, युरीन, एच आयव्ही इत्यादी विविध प्रकारच्या तपासण्या विनामूल्य केल्या जात आहेत. वर्षभरात ९ हजार २७८ रुग्णांची रक्ततपासणी केली आहे.

मोफत फिजिओथेरपी, कृत्रिम अवयव व साहित्य वाटप, दंतरुग्णवाहिका सेवा
आरोग्य शिबीरात व ट्रस्टच्या वैद्यकीय विभागात आलेल्या अस्थिरोग आजार असलेल्या नागरिकांना मोफत फिजिओथेरपी, अ‍ॅक्युप्रेशर थेरपी, न्युरोथेरपी अशा आवश्यक थेरपी ७ हजार ८३१ रुग्णांना करून देण्यात आल्या. तसेच राज्याच्या विविध भागातून आलेल्या ३ हजार ७४८ विकलांग व्यक्तीना मोफत कृत्रिम अवयव व उपकरणे वाटप करण्यात आले. याशिवाय दंत रुग्णवाहिका द्वारे २ हजार ३६४ रुग्णांना दाढ काढणे, सिमेंट भरणे, रूट केनॉल, कवळी बसविणे असे उपचार विनामूल्य देण्यात आले आहेत.

प्रत्येक महिन्याला शहराच्या विविध भागात आरोग्य शिबिर
उत्सवाची पारंपारीक जागा असलेल्या बुधवार पेठेतील दत्त मंदिरासमोर जय गणेश प्रांगण येथे किंवा शहराच्या विविध भागात प्रत्येक महिन्याला आरोग्य शिबिर आयोजित केले जाते. त्यामध्ये विविध रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर्स रुग्णांची विनामूल्य तपासणी करुन आजाराचे रोग निदान करतात तसेच शिबिरात मोफत औषधोपचाराचे वाटप देखील करण्यात येते. दानपेटी आणि देणगीच्या माध्यमातून मंदिरात जमा होणारा समाजाचा पैसा, देवाचे सर्व धार्मिक उपक्रम करुन उरलेला निधी परत समाजाला देण्याचा प्रयत्न यामाध्यमातून ट्रस्ट करीत आहे, यातून ट्रस्टने श्रध्देला सेवेची जोड दिलेली आहे.

तब्बल १३ रुग्णवाहिकांच्या माध्यमातून अखंडीतपणे विनामूल्य
ट्रस्टच्या एकूण १३ रुग्णवाहिका असून अखंडपणे २४ तास पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यात विनामूल्य सेवा दिली जाते. तसेच महाराष्ट्रात डिझेल खर्चात सेवा दिली जात आहे. यामध्ये कान, डोळे, दंत तपासणी व्हॅनसह कार्डियाक रुग्णवाहिकेचा देखील समावेश आहे. याशिवाय संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळानिमित्त वारक-यांना ट्रस्टच्या रुग्णवाहिकाद्वारे तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मोफत वैद्यकिय सेवा औषधोपचार पुणे ते पंढरपूर वाटप केले जाते. तसेच पालखी सोहळा निमित्त वारक-यांसाठी जय गणेश प्रांगण येथे मोफत डोळ्यांची तपासणी आणि मोफत चष्मे वाटप शिबिर देखील घेतले जाते.

ससून सर्वाेपचार रुग्णालय पुणे येथे वर्षभरात १२ लाख रुग्णांना मोफत भोजन
जय गणेश रुग्णसेवा अभियान अंतर्गत राबविण्यात येणारे ससून सर्वोपचार रुग्णालयातील कार्य समाजाभिमुख आहे. यामध्ये वर्षभरात १२ लाख रुग्णांकरीता दररोजचे २ वेळचे भोजन,चहा आणि नाश्त्याची सोय केली जाते. रुग्णालयातील गरोदर महिलांच्या पाच वॉर्डाचे नूतनीकरण हा दगडूशेठ ट्रस्टच्या कार्यातील महत्वाचा टप्पा आहे. याशिवाय ५९ नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग आणि रुग्णांकरीता अतिदक्षता विभाग देखील अद्यावत करण्यात आला. गरोदर महिलांसाठी ५ कक्ष तसेच रुग्णांच्या नातेवाईकांकरीता विश्रांती गृहाची व्यवस्था दगडूशेठ ट्रस्ट तर्फे करण्यात आली आहे.

गणेशोत्सव कार्यकाळात ४ बेडचे मोफत आयसीयू
गणेशोत्सवामध्ये येणा-या भाविकांची गर्दी पाहता दत्तमंदिर ते मुख्य गणपती मंदिरापर्यंत एकूण ४ वैद्यकिय मदत केंद्रांची व्यवस्था करण्यात येते. यावर्षी महाराष्ट्रात प्रथमच ४ बेडचे मोफत आयसीयू व २ कार्डियाक रुग्णवाहिका सुविधा देण्यात आली. त्यामध्ये विविध नामांकित रुग्णालयांमार्फत तातडीची वैद्यकिय मदत उपलब्ध करुन दिली जाते. यामध्ये केंद्रावर मोफत औषधोपचार, डॉक्टर्स, नर्सेस व इतर स्टाफ इत्यादी प्रकारची वैद्यकिय सुविधा दगडूशेठ ट्रस्टच्या माध्यमातून भाविकांसाठी दिली जाते.

सोनिया, राहुल आणि पित्रोदा यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचे आरोप:नॅशनल हेराल्ड प्रकरण, EDने पहिले चार्जशीट केले दाखल

सन २०२२ मध्ये केली होती राहुल गांधी यांची ५ दिवसांत ५० तास चौकशी आणि सोनिया गांधी यांची ३ दिवसांत १२ तास चौकशी

नवी दिल्ली-काँग्रेसच्या नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र आणि असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (AJL) शी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मंगळवारी पहिले आरोपपत्र दाखल केले. यामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांची नावे आहेत.या प्रकरणात, १२ एप्रिल रोजी तपासादरम्यान, जप्त केलेल्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. ईडीने ६६१ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी नोटीस बजावली होती.

६६१ कोटी रुपयांच्या या स्थावर मालमत्तेव्यतिरिक्त, गुन्ह्यातील उत्पन्न सुरक्षित करण्यासाठी आणि आरोपींना ते नष्ट करण्यापासून रोखण्यासाठी ईडीने नोव्हेंबर २०२३ मध्ये एजेएलचे ९०.२ कोटी रुपयांचे शेअर्स जप्त केले होते.शुक्रवारी, दिल्लीतील हेराल्ड हाऊस (५अ, बहादूर शाह जफर मार्ग), मुंबईतील वांद्रे (पूर्व) आणि लखनऊमधील बिशेश्वर नाथ रोड येथील एजेएल इमारतींवर नोटिसा चिकटवण्यात आल्या.

ईडीने मुंबईतील वांद्रे येथील हेराल्ड हाऊसच्या ७व्या, ८व्या आणि ९व्या मजल्यावर असलेल्या जिंदाल साउथ वेस्ट प्रोजेक्ट्स लिमिटेडला मासिक भाडे/भाडेपट्टा रक्कम अंमलबजावणी संचालनालयाच्या संचालकांच्या नावे हस्तांतरित करण्यासाठी नोटीस बजावली होती.

जून २०२२ मध्ये, नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी यांची ५ दिवसांत ५० तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर २१ जुलै २०२२ रोजी नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी यांची ३ दिवसांत १२ तास चौकशी करण्यात आली. या काळात त्यांना १०० हून अधिक प्रश्न विचारण्यात आले. जूनमध्ये पाच दिवसांत ईडीने राहुल गांधींची ५० तासांहून अधिक वेळ चौकशी केली होती.

नॅशनल हेराल्ड प्रकरण काय आहे?

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१२ मध्ये दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेसचे मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांनी तोट्यात चाललेले नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराद्वारे हडप केल्याचा आरोप केला होता.

आरोपानुसार, काँग्रेस नेत्यांनी नॅशनल हेराल्डच्या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी यंग इंडियन लिमिटेड ऑर्गनायझेशनची स्थापना केली आणि त्याद्वारे नॅशनल हेराल्ड प्रकाशित करणारी असोसिएटेड जर्नल लिमिटेड (AJL) बेकायदेशीरपणे ताब्यात घेतली.

दिल्लीतील बहादूर शाह जफर मार्गावरील २००० कोटी रुपयांच्या हेराल्ड हाऊस इमारतीवर कब्जा करण्यासाठी हे करण्यात आल्याचा आरोप स्वामी यांनी केला.२००० कोटी रुपयांची कंपनी फक्त ५० लाख रुपयांना खरेदी केल्याबद्दल सोनिया गांधी, राहुल गांधी आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर वरिष्ठ काँग्रेस नेत्यांविरुद्ध फौजदारी खटला चालवण्याची मागणी स्वामी यांनी केली होती.

जून २०१४ मध्ये, न्यायालयाने सोनिया, राहुल आणि इतर आरोपींविरुद्ध समन्स जारी केले. ऑगस्ट २०१४ मध्ये, ईडीने या प्रकरणात कारवाई केली आणि मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. डिसेंबर २०१५ मध्ये दिल्लीच्या पटियाला कोर्टाने सोनिया आणि राहुलसह सर्व आरोपींना जामीन मंजूर केला.

पत्नीच्या गुप्तांगात हळद-कुंकू लावलेले लिंबू पिळले, म्हणाला , ‘आता हो वेडी

पुणे-पत्नीने कोर्टात पोटगीचा दावा दाखल केल्यामुळे संतापलेल्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या गुप्तांगात हळद-कुंकू लावलेले लिंबू पिळल्याचा संतापजनक प्रकार पुणे जिल्ह्यात उजेडात आला आहे. ही घटना वर्षभरापूर्वी घडली. याविषयी 36 वर्षीय पीडित महिलेने गत 11 तारखेला पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

यासंबंधीच्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व आरोपी पती यांचा 2004 मध्ये विवाह झाला होता. त्यांना 2 मुले आहेत. लग्नानंतर काही वर्षांनी पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्यात सातत्याने वाद होत होते. या वादाला कंटाळून पीडिता आपल्या दोन्ही मुलांना घेऊन बालेवाडी येथे राहण्यासाठी गेली. त्यानंतर आरोपी पतीही पिंपळे निलख परिसरात दुसऱ्या ठिकाणी राहण्यास गेला. पीडितेने नवऱ्याविरोधात पोटगीचा दावा दाखला. पण मधल्या काळात मुलांची शाळा सुरू झाली. त्यांची वह्या, पुस्तके नवऱ्याच्या घरीच राहिल्या होत्या. त्यामुळे ते आणण्यासाठी पीडिता पतीच्या घरी गेली.

त्यावेळी महिलेची आई, मामी व मुले ही सोसायटीच्या पार्किंगमध्ये थांबली होती. तर पत्नी वरच्या मजल्यावर असणाऱ्या फ्लॅटमध्ये साहित्य आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपीने मद्यप्राशन केले होते. मुलांच्या शाळेच्या साहित्यासाठी आली आणि आमचे साहित्य घेऊन जाते काय? असे म्हणत आरोपीने पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पण पतीने मद्यपान केले असल्यामुळे तिने त्याला फारसा प्रतिसाद दिला नाही. यामु्ळे संतापलेल्या पतीने मी बोलत असलो तरी माझ्याकडे पाहत नाही असे म्हणत घरातील कोयता काढून पत्नीच्या गळ्यावर ठेवला.त्यानंतर पत्नीला जबरदस्तीने कपडे काढायला लावले. तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याने पत्नीच्या इच्छेविरोधात तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित करून हळद-कुंकू लावलेल्या लिंबाच्या 4 फोडी तिच्या गुप्तांगात पिळले. त्यानंतर मी तुझ्यावर जादूटोणा केली असून, तू आता वेडी होणार आहेस. हा प्रकार कुणाला सांगितला तर मी तुला ठार मारेन, अशी धमकीही त्याने पीडितेला दिली. त्यामुळे पीडित महिलेने ही गोष्ट कुणालाही सांगितली नाही. ती कुणालाही काही न बोलता आपल्या आई-मुलांसह आपल्या घरी गेली. त्यानंतर काही दिवसांनी तिने हा प्रकार आपल्या आई व मामीला सांगितला. त्यानंतर त्यांनी 11 एप्रिल रोजी सांगवी पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर हा प्रकार उजेडात आला.

संभाजी भिडेंना चावलेल्या कुत्र्याची एसआयटी चौकशी करा:विजय वडेट्टीवारांची उपरोधक मागणी

म्हणाले – कुणाला चावावे हे कुत्र्याला कळले नाही
मुंबई-शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना समोर आली होती. या घटनेवरून विजय वडेट्टीवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी उपरोधक टीका केली आहे. कुणाला चावावे हे कुत्र्याला कळले नाही याचे वाईट वाटते. संभाजी भिडे यांना चावणाऱ्या कुत्र्याची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. तर महत्त्वाच्या माणसाला चावल्याशिवाय कुत्रे काही उचलले जात नाहीत, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना दोन इंजेक्शन दिले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांनी संभाजी भिडेंना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. आता या घटनेवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपरोधिक टीका केली आहे.

कुत्र्याला कुठून दुर्बुद्धी सुचली…कुणाला चावावे हे कुत्र्याला कळले नाही याचे वाईट वाटते. आता कुठला कुत्रा पोलिस शोधत आहेत, याची माहिती अजून मिळालेली नाही, पण मी माहिती घेतो, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. कुत्रा हा प्रामाणिक प्राणी असतो, मात्र या प्रामाणिक कुत्र्याने का असा राग धरला? यासंदर्भात खरंतर एसआयटी वैगरे लावून चौकशी केली पाहिजे, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी उपरोधिक टोला लगावला आहे.

या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही भाष्य केले. माझ्या शहरातही कुत्रे खूप वाढले आहेत. आता कुणाला चावल्यानंतर ते सापडतील ते माहिती नाही. कुत्रा कुणाला चावल्याशिवाय, तोही महत्त्वाच्या माणसाला चावल्याशिवाय कुत्रे काही उचलले जात नाहीत. आता महत्त्वाच्या माणसाला ते चावावेत, अशी आपण देवाकडे प्रार्थना करूयात, म्हणजे सर्वसामान्यांना न्याय मिळेल. या सरकारमध्ये कुत्राही मोठ्या व्यक्तीला चावला तर पकडला जातो. सरकारची कार्य करण्याची पद्धत चांगली आहे, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

संभाजी भिडे सोमवारी रात्री सांगली येथील आपल्या एका धारकऱ्याकडे जेवणासाठी गेले होते. जेवणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते आपल्या सहकाऱ्यांसोबत घरी परत येत होते. तेव्हा शहरातील माळी गल्ली भागात एका कुत्र्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवत त्यांच्या डाव्या पायाचा चावा घेतला. या अनपेक्षित घटनेमुळे भिडेंसह त्यांच्या सोबतचे कार्यकर्तेही काही क्षण गांगारून गेले. त्यानंतर लगेचच त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. संभाजी भिडेंना डॉक्टरकडून दोन इंजेक्शन देण्यात आली आहेत. सध्या संभाजी भिडेंची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. संभाजी भिडेंना येत्या दोन दिवसात आणखी इंजेक्शन देण्यात येणार आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यानंतर सांगली महापालिका खडबडून जागी झाली आहे. महापालिकेने शहरातील विविध भागात मोकाट कुत्र्यांची धरपकड सुरू केली आहे. ज्या भागात संभाजी भिडे यांना कुत्र्याने चावा घेतला होता त्या परिसरात महापालिकेकडून कुत्रे पकडण्याची मोहीम राबवण्यात आली आहे.

“लाडक्या बहिणींचा शाप लागल्याशिवाय राहणार नाही”, नाना पटोलेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल

मते घेईपर्यंत निकष ,नियम नाही आठवले आता आठवू लागले ..आता कळले तिजोरीवर भार येतोय

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेमुळं महायुती पुन्हा सत्तेत येण्यास कारणीभूत ठरल्याचं राजकीय तज्ज्ञ आणि जाणकार म्हणतात. दरम्यान, निवडणुकीपूर्वी जर आम्ही सत्तेत आलो तर लाडकी बहीण योजनेत १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देऊ, असं आश्वासन महायुतीनं दिलं होतं. मात्र, राज्यात महायुतीचं सरकार येऊन चार महिने झाले. तरीही अद्याप लाडकी बहीण योजनेत वाढ करण्यात आली नाही. २१०० रुपये कधी येणार, याकडे लाडक्या बहिणी आस लावून बसल्या आहेत. तर मागील दोन महिन्यापूर्वी अनेक निकषावरून ९ लाख लाडक्या बहिणींना या योजनेतून अपात्र ठरविण्यात आलंय. यानंतर आता आणखी ८ लाख बहिणींना या योजनेत केवळ ५०० रुपये मिळणार आहेत. यावरून आता विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय. शेतकरी सन्मान योजनेतून ज्या महिला लाभ घेतायेत, अशा ८ लाख महिलांना पुढील महिन्यापासून लाडकी बहीण योजनेतून केवळ पाचशे रुपये मिळणार आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले असून राज्यातील महायुती सरकारवर टीका करत आहेत. “आम्ही यापूर्वी म्हणत होतो की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना केवळ निवडणूक जिंकण्यासाठी आणि मतांसाठी आणली होती. निवडणुकीपूर्वी २१०० रुपयांचे आश्वासन दिलं होतं. अजूनही २१०० रुपये मिळत नाहीत. आधी ९ लाख महिलांना अपात्र ठरविल्यानंतर आता ८ लाख महिलांना हे सरकार अपात्र ठरवत आहे. सुरुवातीला लाडक्या बहिणींची मतं घेतली, पण आता पैसे द्यायची वेळ आल्यावर त्यांना नियम आठवतात. अपात्र करतात. त्यामुळं लाडक्या बहिणींची कळकळ आणि शाप या सरकारला लागेल”, अशी बोचरी टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवर केलीय.

दरम्यान, राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन गुजरातमध्ये पार पडले. यानंतर काँग्रेसची महाराष्ट्रात बैठक होत आहे. याबाबत नाना पटोले यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, ” या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत. संघटनात्मक बांधणी आणि संघटनात्मक काम, यावर भर दिला जाणार आहे. तसंच जे नेते, पदाधिकारी काम करत नाहीत. त्यांना नारळ दिला जाईल”, असंही नाना पटोले यांनी म्हटलंय.सरकार कोणावरही अन्याय करणार नाही : सरकारनं आठ लाख महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून अपात्र केलं आहे, यावर बोलताना कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितलं की, “जे नियम, अटी आणि निकष जे पूर्वी होते. तेच आता आहेत. ज्या महिला शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेतात आहेत. अशांना अपात्र करण्यात आलंय. परंतु सरकार कोणावरही अन्याय करणार नाही. सरकारने ज्या-ज्या योजनांची घोषणा केलीय. त्या योजना सुरूच राहतील. आता नवीन कोणतेही नियम किंवा अटी सरकारनं आणल्या नाहीत. याउलट या योजनेमध्ये सरकारनं २१०० रुपयांचे आश्वासन दिलं होतं, तेही पूर्ण करेल”, असा विश्वास कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केलाय.

सलमान खानला जीवे मारणाऱ्याची धमकी देणारा गुजरातमध्ये सापडला,पोलीस म्हणाले , तो मानसिक रोगी

मुंबई- : बॉलीवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. वरळी वाहतूक नियंत्रण कक्षाला सलमान खानवर हल्ला करणार असल्याचा मेसेज आला होता. यानंतर मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या प्रकरणाचा सखोल तपास करून २४ तासांच्या आत सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला शोधून काढलं आहे.

अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणारी व्यक्ती गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील आहे. ही व्यक्ती मानसिक आजारी आहे. हा तरुण गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील वाघोडिया या गावाचा रहिवासी असल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे. परंतु, अद्याप या तरुणाला अटक केलेली नाही. तपासानंतर २६ वर्षीय तरुणाला नोटीस पाठवून मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिलेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर रविवारी एक संदेश आला होता. यात अभिनेता सलमान खानला घरात घुसून जीवे मारण्याची आणि सलमानची गाडी बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आली होती. मुंबईतील वरळी पोलिसांनी या प्रकरणी तातडीनं गुन्हा दाखल करत सखोल चौकशी केली. या धमकीच्या संदेशानंतर वरळी पोलिसांनी तातडीनं गुन्ह्याची नोंद केली. तसंच सलमानच्या वांद्रे इथल्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडेकोट करण्यात आली.सलमानला वाय प्लस सुरक्षा : सलमान खानला जीवे मारण्याची धमकीचा संदेश आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान हा संदेश वडोदरा इथल्या वाघोडिया गावातील व्यक्तीनं पाठवल्याचं स्पष्ट झालं. वडोदरा पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या तपास पथकासोबत वाघोडिया गावातील तरुणाच्या घरी धाव घेत त्या तरुणाचा तपास सुरू केला. त्यावेळी हा तरुण मानसिक रोगी असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचं समोर आलं. प्रकरणाच्या चौकशीसाठी गरज भासेल त्यावेळी मुंबईत हजर राहावं, अशी नोटीस मुंबई पोलिसांनी त्या तरूणाला दिली आहे. सध्या सलमान खानला मुंबई पोलिसांची वाय प्लस श्रेणीतील सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे,” अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रोहन आनंद यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

सलमानच्या निवासस्थानाला बुलेट प्रुफ काचेचं आच्छादन : सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराची घटना घडली होती. यानंतर नवी मुंबई पोलिसांनी सलमानच्या पनवेल इथल्या फार्म हाऊसची रेकी केलेल्या एका गटाला अटक केली होती. बिश्नोई गँगच्या या आरोपींकडून सलमानच्या फार्महाऊसवर हल्ला करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा पोलिसांनी त्यावेळी केला होता. गोळीबारीच्या घटनेनंतर सलमान खानचे वास्तव्य असलेल्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. निवासस्थानाला बुलेट प्रुफ काचेचं आच्छादन करण्यात आलंय.

भाजपाने मुस्लीम व्यक्तीला पंतप्रधान किंवा पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष करावे: हर्षवर्धन सपकाळ

फडणवीस, अजित पवार व शिंदेंची मोदींकडे पत असेल तर विशेष पॅकेज आणून राज्याची आर्थिक घडी रुळावर आणावी.

अकोला, दि. १५ एप्रिल २०२५
काँग्रेसचे आजपर्यंत ८९ अध्यक्ष झाले, त्यात सर्व जाती धर्माचे, महिला, पुरुष, आदिवासी, एससी, एसटी, हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन धर्माचे नेते होते. काँग्रेसने विकासाची कामे करताना त्याची फळे सर्व जाती धर्माला मिळावीत हेच पाहिले पण आता भाजपावाले त्यांना मुस्लीम समाजाची खुप काळजी असल्याचे दाखवत आहेत. मुस्लीम महिलांच्या हितासाठी तीन तलाक व गरिब मुस्लीमांसाठी वक्फ बोर्ड कायदा आणला हे भाजपा नेते सांगत आहेत. भाजपाचा हा मुस्लीम कळवळा पाहता पंतप्रधानपदी किंवा भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुस्लीम व्यक्तीला संधी द्यावी, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

अकोला येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे जे. पी. नड्डा यांची अध्यक्षपदाची मुदत संपलेली आहे. नरेंद्र मोदी हे सुद्धा ७५ वर्ष पुर्ण करत आहे, त्यांना निवृत्तीचे वेध लागले असतील, रा. स्व. संघातून कोणाच्या नावाचे पाकीट येणार, त्यापेक्षा तुम्हीच एखाद्या मुस्लीम व्यक्तीला पंतप्रधान किंवा भाजपाचा अध्यक्ष करा. सरसंघचालक मोहन भागवत यांनाही विश्रांती द्यावी व त्यांच्या जागी आदिवासी वा दलित समाजाच्या व्यक्तीला सरसंघचालक पदी बसवावे, असेही सपकाळ म्हणाले.

मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतलेल्या नाहीत. सर्व सत्ता आपल्याच हाती हवी या हट्टापायी या निवडणुका होऊ दिल्या जात नाहीत. राज्यातील सर्व सत्ता तीन लोकच चालवत असून लुटारुंची रचना निर्माण केली आहे. शेतकऱ्यांची तूर बाजारात येण्याच्या आधीच त्याचे भाव पाडण्याचे काम मोदी सरकारने केले, दिडपड भाव दिले नाहीत पण शेतकऱ्यांचे कंबरडे मात्र मोडले. सरकारने अतिव़ृष्टीचे, गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचे पैसे दिले नाहीत, ठेकेदारांचे पैसे दिले नाहीत, लाकडी बहिणीला पैसे देत नाहीत, एसटी कर्माचाऱ्यांना पगार मिळत नाही. राज्याचे नेतृत्व करणाऱ्या तिघांची नरेंद्र मोदींकडे पत असेल तर केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला विशेष पॅकेज आणून शेतकरी कर्जमाफी द्यावी व राज्याची आर्थिक घडी व्यवस्थित करावी.
राज्यात अवैध व्यवसायाने कळस गाठला आहे, गांजा, अंमली पदार्थाचा काळा बाजार सुरु आहे. गुजरातच्या कांडला बंदरातून राज्यात ड्रग्ज मोठ्या प्रमाणात येत आहे, पण पोलीस काहीही कारवाई करत नाहीत. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेची अवस्था बिकट झाली आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

यावेळी प्रदेशाध्यक्षांसोबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, आमदार साजिद खान पठाण, शहर जिल्हाध्यक्ष डॉ. प्रशांत वानखेडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, माजी मंत्री अजहर हुसेन, प्रदेश सरचिटणीस शाम उमाळकर, हिदायत पटेल, मदन भरगड, महेश गणगणे, डॉ. जिशान हुसेन डॉ. अभय पाटील यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कचऱ्याच्या आगीमध्ये ८ वीजवाहिन्या जळाल्या; विश्रांतवाडी, मोशी, धानोरीमध्ये वीजपुरवठा विस्कळीत

पुणे, दि. १५ एप्रिल २०२५:आळंदी-कळस रस्त्यावर ग्रेफ सेंटरसमोर असलेल्या ओढ्यात ट्रेंचवर फेकलेल्या कचऱ्याला आग लागली. यात ट्रेंचमधील महावितरणच्या २२ केव्ही क्षमतेच्या ८ वीजवाहिन्या जळाल्या. आज पहाटे २.३० च्या सुमारास हा प्रकार घडला. त्यामुळे विश्रांतवाडी, कळस, धानोरी, लोहगाव परिसरातील सुमारे १ लाख १५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पहाटे ५ वाजेपर्यंत टप्प्याट्प्याने सुरु करण्यात आला. तर विश्रांतवाडी, कळस परिसरातील सुमारे १० हजार आणि दिघी परिसरातील १७ हजार अशा २७ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा दुपारी १२.३० वाजेपर्यंत बंद होता.

याबाबत माहिती अशी की, नगररोड विभाग अंतर्गत आळंदी-कळस रस्त्यावर ग्रेफ सेंटरसमोर एक ओढा आहे. तेथील एका ट्रेंचमध्ये महावितरणच्या ८ वीजवाहिन्या आहेत व त्याद्वारे विश्रांतवाडी, कळस, धानोरी, लोहगाव, दिघी परिसरातील सुमारे १ लाख ४२ हजार ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. मात्र ओढ्यातील या ट्रेंचवर सातत्याने कचरा टाकण्यात येत होता. साठलेल्या या कचऱ्याला आज पहाटे २.३० च्या सुमारास आग लागली. आग वाढल्याने महावितरणकडून पुढील धोका टाळण्यासाठी तातडीने वीजपुरवठा खंडित करण्यात आला. सोबतच अग्निशमन दलानेही त्वरेने दाखल होऊन पहाटे ३ च्या सुमारास आग विझविली.

यानंतर महावितरणकडून सर्वप्रथम पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे व जळालेल्या वीजवाहिन्यांच्या दुरूस्तीचे कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. यामध्ये पर्यायी व्यवस्थेतून विश्रांतवाडी, कळस, धानोरी, लोहगाव परिसरातील सुमारे १ लाख १५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पहाटे ५ वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आला. मात्र विजेच्या वाढलेल्या मागणीमुळे पर्यायी वीजवाहिन्यांवर भार व्यवस्थापन शक्य नसल्याने या परिसरातील सुमारे १० हजार लघुदाब आणि दिघी परिसरातील सुमारे १७ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू होऊ शकला नाही.

महावितरणकडून दुरुस्ती कामे त्वरित करण्यासाठी एकाचवेळी ६ कंत्राटदारांना पाचारण करण्यात आले. सोबतच नगररोड विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अशोक जाधव, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. शारंगधर केनेकर व हर्षितकुमार वाकोडे यांच्यासह शाखा अभियंते, जनमित्रांनी दुरुस्ती कामात सहभाग घेतला.  वीजवाहिन्यांचा जळालेला भाग बदलणे, जॉईंट देणे व इतर कामांसह वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीचे कामे दुपारी १२.३० वाजता पूर्ण झाले. त्यानंतर सर्वच परिसरातील वीजपुरवठा दुरुस्त केलेल्या वाहिन्यांद्वारे सुरू करण्यात आला.