म्हणाले – कुणाला चावावे हे कुत्र्याला कळले नाही
मुंबई-शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना समोर आली होती. या घटनेवरून विजय वडेट्टीवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी उपरोधक टीका केली आहे. कुणाला चावावे हे कुत्र्याला कळले नाही याचे वाईट वाटते. संभाजी भिडे यांना चावणाऱ्या कुत्र्याची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. तर महत्त्वाच्या माणसाला चावल्याशिवाय कुत्रे काही उचलले जात नाहीत, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना दोन इंजेक्शन दिले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांनी संभाजी भिडेंना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. आता या घटनेवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपरोधिक टीका केली आहे.
कुत्र्याला कुठून दुर्बुद्धी सुचली…कुणाला चावावे हे कुत्र्याला कळले नाही याचे वाईट वाटते. आता कुठला कुत्रा पोलिस शोधत आहेत, याची माहिती अजून मिळालेली नाही, पण मी माहिती घेतो, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. कुत्रा हा प्रामाणिक प्राणी असतो, मात्र या प्रामाणिक कुत्र्याने का असा राग धरला? यासंदर्भात खरंतर एसआयटी वैगरे लावून चौकशी केली पाहिजे, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी उपरोधिक टोला लगावला आहे.
या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही भाष्य केले. माझ्या शहरातही कुत्रे खूप वाढले आहेत. आता कुणाला चावल्यानंतर ते सापडतील ते माहिती नाही. कुत्रा कुणाला चावल्याशिवाय, तोही महत्त्वाच्या माणसाला चावल्याशिवाय कुत्रे काही उचलले जात नाहीत. आता महत्त्वाच्या माणसाला ते चावावेत, अशी आपण देवाकडे प्रार्थना करूयात, म्हणजे सर्वसामान्यांना न्याय मिळेल. या सरकारमध्ये कुत्राही मोठ्या व्यक्तीला चावला तर पकडला जातो. सरकारची कार्य करण्याची पद्धत चांगली आहे, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.
संभाजी भिडे सोमवारी रात्री सांगली येथील आपल्या एका धारकऱ्याकडे जेवणासाठी गेले होते. जेवणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते आपल्या सहकाऱ्यांसोबत घरी परत येत होते. तेव्हा शहरातील माळी गल्ली भागात एका कुत्र्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवत त्यांच्या डाव्या पायाचा चावा घेतला. या अनपेक्षित घटनेमुळे भिडेंसह त्यांच्या सोबतचे कार्यकर्तेही काही क्षण गांगारून गेले. त्यानंतर लगेचच त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. संभाजी भिडेंना डॉक्टरकडून दोन इंजेक्शन देण्यात आली आहेत. सध्या संभाजी भिडेंची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. संभाजी भिडेंना येत्या दोन दिवसात आणखी इंजेक्शन देण्यात येणार आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यानंतर सांगली महापालिका खडबडून जागी झाली आहे. महापालिकेने शहरातील विविध भागात मोकाट कुत्र्यांची धरपकड सुरू केली आहे. ज्या भागात संभाजी भिडे यांना कुत्र्याने चावा घेतला होता त्या परिसरात महापालिकेकडून कुत्रे पकडण्याची मोहीम राबवण्यात आली आहे.