मते घेईपर्यंत निकष ,नियम नाही आठवले आता आठवू लागले ..आता कळले तिजोरीवर भार येतोय
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेमुळं महायुती पुन्हा सत्तेत येण्यास कारणीभूत ठरल्याचं राजकीय तज्ज्ञ आणि जाणकार म्हणतात. दरम्यान, निवडणुकीपूर्वी जर आम्ही सत्तेत आलो तर लाडकी बहीण योजनेत १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देऊ, असं आश्वासन महायुतीनं दिलं होतं. मात्र, राज्यात महायुतीचं सरकार येऊन चार महिने झाले. तरीही अद्याप लाडकी बहीण योजनेत वाढ करण्यात आली नाही. २१०० रुपये कधी येणार, याकडे लाडक्या बहिणी आस लावून बसल्या आहेत. तर मागील दोन महिन्यापूर्वी अनेक निकषावरून ९ लाख लाडक्या बहिणींना या योजनेतून अपात्र ठरविण्यात आलंय. यानंतर आता आणखी ८ लाख बहिणींना या योजनेत केवळ ५०० रुपये मिळणार आहेत. यावरून आता विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय. शेतकरी सन्मान योजनेतून ज्या महिला लाभ घेतायेत, अशा ८ लाख महिलांना पुढील महिन्यापासून लाडकी बहीण योजनेतून केवळ पाचशे रुपये मिळणार आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले असून राज्यातील महायुती सरकारवर टीका करत आहेत. “आम्ही यापूर्वी म्हणत होतो की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना केवळ निवडणूक जिंकण्यासाठी आणि मतांसाठी आणली होती. निवडणुकीपूर्वी २१०० रुपयांचे आश्वासन दिलं होतं. अजूनही २१०० रुपये मिळत नाहीत. आधी ९ लाख महिलांना अपात्र ठरविल्यानंतर आता ८ लाख महिलांना हे सरकार अपात्र ठरवत आहे. सुरुवातीला लाडक्या बहिणींची मतं घेतली, पण आता पैसे द्यायची वेळ आल्यावर त्यांना नियम आठवतात. अपात्र करतात. त्यामुळं लाडक्या बहिणींची कळकळ आणि शाप या सरकारला लागेल”, अशी बोचरी टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवर केलीय.
दरम्यान, राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन गुजरातमध्ये पार पडले. यानंतर काँग्रेसची महाराष्ट्रात बैठक होत आहे. याबाबत नाना पटोले यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, ” या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत. संघटनात्मक बांधणी आणि संघटनात्मक काम, यावर भर दिला जाणार आहे. तसंच जे नेते, पदाधिकारी काम करत नाहीत. त्यांना नारळ दिला जाईल”, असंही नाना पटोले यांनी म्हटलंय.सरकार कोणावरही अन्याय करणार नाही : सरकारनं आठ लाख महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून अपात्र केलं आहे, यावर बोलताना कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितलं की, “जे नियम, अटी आणि निकष जे पूर्वी होते. तेच आता आहेत. ज्या महिला शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेतात आहेत. अशांना अपात्र करण्यात आलंय. परंतु सरकार कोणावरही अन्याय करणार नाही. सरकारने ज्या-ज्या योजनांची घोषणा केलीय. त्या योजना सुरूच राहतील. आता नवीन कोणतेही नियम किंवा अटी सरकारनं आणल्या नाहीत. याउलट या योजनेमध्ये सरकारनं २१०० रुपयांचे आश्वासन दिलं होतं, तेही पूर्ण करेल”, असा विश्वास कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केलाय.