Home Blog Page 359

पौलस वाघमारे यांचा षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त सत्कार

पुणे : मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेचे तसेच २६व्या ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पौलस वाघमारे यांचा षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा हृद्य वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रम पौलस वाघमारे फ्रेंड सर्कलतर्फे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात शुक्रवारी (दि. १५) आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह ॲड. प्रमोद आडकर यांच्या हस्ते पौलस वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला.
मागासवर्ग आयोगाचे माजी समन्वयक डॉ. मदन कोठुळे, मसाप उरळीकांचनचे अध्यक्ष लक्ष्मण घुगे, वडगाव शेरी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती गलांडे, नाट्य व चित्रपट दिग्दर्शक सूर्यकांत तिवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पौलस वाघमारे यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. पौलस वाघमारे लिखित ‘अव्यक्त सत्य’ या कथासंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, चांगुलपणा असणाऱ्या व्यक्तींपैकी एक असलेले पौलस वाघमारे हे सात्विक, सत्शील आणि निगर्वी व्यक्तीमत्व आहे. त्यांचे साहित्य क्षेत्रात मोठे योगदान आहे. चांगल्या माणसातीलही लक्षात राहणारी व्यक्ती म्हणजे पौलस वाघमारे होय.
सत्काराला उत्तर देताना पौलस वाघमारे यांनी ‘माझी आई’ ही स्वरचित कविता सादर केली.
लक्ष्मण घुगे म्हणाले, पौलस वाघमारे हे अक्षरांचे रान फुलविणारे लेखक आहेत. त्यांच्या साहित्यिक कलाकृती या सृजनात्मक विचारांची रचनात्मक मांडणी असणाऱ्या आहेत. त्यांच्या लिखाणाची भाषाशैली सहज सोपी असली तरी शब्दांचे रूप असामान्य आहे.
या प्रसंगी डॉ. मदन कोठुळे, मारुती गलांडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. मान्यवरांचे स्वागत अंतोनी मिस्किटा, अरुण कटारिया, आशा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली अवचरे यांनी केले.

ससूनमधील मावशी, दायी, सफाई कर्मचाऱ्यांचा मीरा देशपांडे सेवा पुरस्काराने गौरव

नर्सिंगच्या चार विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचेही वाटप
पुणे : सिटी ग्रुप ॲमानोरा येस्स फौंडेशनतर्फे ससून सर्वोपचार रुग्णालयातील सहा मावशी, दायी, सफाई महिला कर्मचाऱ्यांचा मीरा देशपांडे सेवा सन्मान पुरस्काराने तर ससून, बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नर्सिंगच्या चार विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ससून रुग्णालयातील महात्मा गांधी सभागृहात बुधवारी (दि. 15) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मल्लपा जाधव, सहाय्यक अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. किणीकर, सीईओ मगर, प्रशासकीय अधिकारी डॉ. आवटे, मेट्रन विमल केदार, सिटी ग्रुपचे चिफ सोशल ऑफिसर विवेक कुलकर्णी उपस्थित होते.
सिटी ग्रुपचे चिफ सोशल ऑफिसर विवेक कुलकर्णी यांनी उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, सिटी ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर अनिरुद्ध देशपांडे यांच्या मातोश्री मीरा देशपांडे यांचे ससून रुग्णालयातील नर्सिंग महाविद्यालयातच शिक्षण झाले होते तर वडिल डॉ. प्रद्युम्न देशपांडे हे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. मीरा देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गेल्या आठ वर्षांपासून रुग्णालयातील मावशी, दायी, सफाई महिला कर्मचाऱ्यांना मीरा देशपांडे स्मृती सेवा पुरस्काराने गौरविण्यात येते. तसेच परिचारिका अभ्यासक्रमातील विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. सामाजिक बांधिलकी, सेवा आणि कृतज्ञतेच्या भावनेतून हा उपक्रम राबविला जातो.
चांदणी अमित चव्हाण, कलावती सोपान कांबळे, पूनम प्रमोद सुसगोहेर, त्रिवेणी गौतम सोनवणे, संगीता सनी सोलंकी, हेमा गालफाडे या सफाई कर्मचाऱ्यांचा शाल, साडी, स्मृतीचिन्ह, अकरा हजार रुपये देऊन गौरव करण्यात आला. तर सना खान, इन्सिया सय्यद, साक्षी तिरमाने, क्षितीजा मोरे या विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्र, पंधार हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली. सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव आणि शिष्यवृत्ती वाटप रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांच्या हस्ते झाले.

शहनाई वादन-गायन जुगलबंदी तसेच ताल गजरात रसिक मंत्रमुग्ध

स्वर-मिलाप संगीत महोत्सवात मान्यवर कलाकारांसह विद्यार्थ्यांचे बहारदार सादरीकरण
पुणे : शहनाईचे सूर आणि गायन यांच्या जुगलबंदीतून साकारलेला राग मारू बिहाग तसेच तबला, पखवाज, शहनाई आणि बासरी यांच्या सूर-तालातून साकारलेला ताल गजर याने रसिकांना अद्‌भुत कलाविष्काराचा आनंद मिळाला.
निमित्त होते स्वर-मिलाप संगीत महोत्सवाचे. उमेश-महेश साळुंके व वृंदावनी संगीत विद्यालय हडपसर यांच्यावतीने हडपसर येथील विठ्ठलराव तुपे नाट्यगृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कुसुमवंदन नाट्य संस्था, हडपसरच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सुरुवातीस सुप्रसिद्ध गायक सुरेश पत्की, जयंत केजकर, किरण भट्ट, सरोद वादक अनुपम जोशी, संतोष कुंभार, तबलावादक महेशराज साळुंके, बापूसाहेब औताडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.
या प्रसंगी सुप्रसिद्ध सरोद वादक अनुपम जोशी यांना सुप्रसिद्ध शहनाई वादक पंडित डॉ. प्रमोद गायकवाड यांच्या हस्ते स्वर-मिलाप संगीतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
पंडित डॉ. प्रमोद गायकवाड (शहनाई) आणि किरण भट्ट (गायन) यांच्या जुगलबंदीची सुरुवात मारू बिहाग रागातील ‘नैना लगाई मैने’ या बंदिशीने झाली. नोम-तोम, आलाप यांच्या वादन गायनातून रंगलेल्या जुगलबंदीत डॉ. गायकवाड यांनी मध्यलय त्रितालात शहनाई वादनातील गत ऐकविली. यानंतर गायन-वादनातून ‘पायोजी मैने राम रतन’ ही रामधून सादर केली. रसिकांना हा अनोखा स्वराविष्कार भावला.
महोत्सवात शेवटी ताल गजर सादर करण्यात आला. महेशराज साळुंके (तबला), दीपक दसवडकर (पखवाज), उमेशराज साळुंके (गायन), अनिकेत साळुंके (शहनाई), श्रीकांत गव्हाणे (बासरी) यांच्या सादरीकरणातून तबला-पखवाज वादनातील प्रमुख ठेके, वारकरी संप्रदायातील ‘रामकृष्ण हरी’चा गजर तसेच शास्त्रीय संगीतातील काही रचनांवर सादरीकरण झाले. 51 वादक एकाच मंचावर उपस्थित होते हे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. तबलावादक महेशराज साळुंके आणि पखवाज वादक दीपक दसवडकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अनोख्या संगीताविष्काराला रसिकांनी उभे राहून मानवंदना दिली. ताल गजर ही प्रस्तुती महेशराज साळुंके यांनी उस्ताद झाकीर हुसेन यांना समर्पित केली.
या प्रसंगी स्वरूपा झांबरे या विद्यार्थिनीला आदर्श विद्यार्थी पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मिनल साळुंके यांनी केले तर आभार कमलेश खळदकर यांनी मानले.

महावितरणकडून विद्युत सहायकांची परिमंडल निहाय निवड यादी जाहीर

कागदपत्रांची पडताळणी दि. २० ते २२ ऑगस्टला

मुंबई: महावितरणमध्ये विद्युत सहायक पदासाठी निवड झालेल्या ५ हजार ३८१ उमेदवारांची व संबंधित परिमंडलांची यादी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची व प्रमाणपत्रांची पडताळणी संबंधित परिमंडल कार्यालयांमध्ये दि. २० ते २२ ऑगस्ट दरम्यान करण्यात येणार आहे. या उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर नमूद परिमंडल कार्यालयांमध्ये मूळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे तसेच अद्ययावत ओळखपत्राच्या मूळ प्रतीसह स्वतः हजर राहणे अनिवार्य आहे.

महावितरणने जाहिरात क्र. ०६/२०२३ अन्वये विद्युत सहायक या पदासाठी दि. २० ते २२ मे दरम्यान ऑनलाइन क्षमता चाचणी घेतली होती. यात निवड झालेल्या उमेदवारांची यादी दि. ३० जुलैला सविस्तर माहिती व सूचनेसह कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानंतर दि. १४ ऑगस्टला निवड यादीतील उमेदवार व त्यांना वर्ग केलेल्या परिमंडलांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

आता येत्या दि. २० ते २२ ऑगस्ट दरम्यान विद्युत सहायक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या ऑनलाइन अर्जामधील नोंदी, अर्हता, कागदपत्रे व प्रमाणपत्रांची छाननी व पडताळणी त्यांना वर्ग केलेल्या संबंधित परिमंडल कार्यालयांमध्ये होणार आहे. या तीनही दिवशी संबंधित परिमंडलांमध्ये सकाळी १० वाजता मूळ कागदपत्रांची पडताळणी सुरू होईल. नमूद दिवशी काही कारणास्तव पडताळणी पूर्ण झाली नाहीतर दुसऱ्या दिवशी करण्यात येईल. तथापि, सर्व मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रांसह संबंधित उमेदवारांनी स्वतः हजर राहणे आवश्यक आहे. जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीसाठी हजर राहणार नाही त्यांची निवड रद्द समजली जाईल व भविष्यात त्यांच्या कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्युत सहायक पदी निवड झालेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रांची पडताळणी केल्यानंतर जे उमेदवार पात्र होतील त्यांच्या नियुक्तीबाबत संबंधित परिमंडलामध्ये पुढील कार्यवाही करण्यात येईल. याबाबतची सर्व माहिती महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय लष्कराच्या शौर्याला ‘तिरंगा फेस्टिवल’ मधून सलाम

किरण साळी मित्र परिवार आणि ढोल ताशा महासंघ, महाराष्ट्र च्या वतीने आयोजन ; भारतीय लष्कराला ७०० हून अधिक ढोल-ताशा वादनातून मानवंदना

पुणे : भारत माता की जय… वंदे मातरम चा जयघोष… एकाच वेळी ७०० हून अधिक ढोल ताशांचे वादन… देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण… रणवाद्यांचे वादन… आणि पाच वीर पत्नीचा हृदयस्पर्शी सन्मान सोहळा अशा देश प्रेमाने भारलेल्या वातावरणात भारतीय लष्कराच्या शौर्याला सलाम करण्यात आला. स्वातंत्र्यदिनी पुण्यात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या ‘तिरंगा फेस्टिवल’ मध्ये एक हजारहून अधिक वादक आणि पाच ते सहा हजारहून अधिक पुणेकरांनी सहभाग घेतला.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारतीय लष्करातील सैनिकांना व त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याच्या उद्देशाने श्री जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर चौकाजवळ, छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर ‘तिरंगा फेस्टिवल २०२५’ चे आयोजन करण्यात आले. किरण साळी मित्र परिवार आणि ढोल ताशा महासंघ, महाराष्ट्र च्या वतीने हा फेस्टिवल घेण्यात आला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, सेनाधिकारी पद्मश्री मुरलीकांत पेटकर, राजेश पांडे, मेघराज भोसले, आयोजक किरण साळी, संजय सातपुते, आनंद सराफ, ऍड. शिरीष थिटे, माजी नगरसेवक सुशील मेंगडे, श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंत बहिरट पाटील आदी उपस्थित होते.

देश रक्षणार्थ प्राणांची बाजी लावणा-या भारतीय सैनिकांच्या पाच वीरपत्नींचा सन्मान करण्यात आला. यामध्ये वीरपत्नी मीनाक्षी भिसे, राणी चौधरी, सुस्मिता पालेकर, प्रतिभा खटके, दिपाली मोरे यांचा समावेश होता. तिरंगी उपरणे आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित गौरव झाला.

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, भारत देशासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या सैनिकांच्या वीर पत्नींसोबत आपण आहोत, हा विश्वास देणारा हा कार्यक्रम आहे. प्रत्येक सणाला आपण सैनिकांच्या कुटुंबांसोबत असायला हवे. ढोल ताशा वादन हे सर्वत्र होत असून याला लवकरच चांगला दर्जा व उंची मिळेल.

ढोल ताशा महासंघ महाराष्ट्र अंतर्गत असलेल्या ढोल ताशा पथकांतील ७००हून अधिक वादकांनी एकत्रितपणे वाद्यवादन केले. ढोल ताशाच्या वादनातून ‘आॅपरेशन सिंदूर’ व ‘आॅपरेशन महादेव’ मधील वीरांना मानवंदना देण्यात आली. विविध वाद्यांचा सुरेल अविष्कार असलेला ‘नादरंग’ -तालवाद्यकचेरी हा कार्यक्रम सादर झाला. याशिवाय ‘वंदे मातरम’ या स्वर मैफलीतून बालकलाकारांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. तसेच गीततिरंगा/ रामराज्याभिषेक भरतनाट्यम नृत्यावर आधारित सादरीकरण झाले. केशव शंखनाद पथकाने देखील शंख वादन केले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त सामुदायिक पसायदानाने फेस्टिवलची सांगता झाली. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावून स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.

महाराष्ट्रात दहीहंडीच्या विविध घटनांत १०० वर गोविंदा जखमी, एका कार्यक्रमात DCM शिंदे थोडक्यात बचावले

मुंबई- महाराष्ट्रात दहीहंडीच्या उत्सवात दोघांच्या मृत्यूची घटना समोर आली आहे. मानखुर्दमध्ये दुर्देवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे. बाल गोविंदा पथकातील 32 वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला आहे.तर गावदेवी गोविंदा पथकातील रोहन वाळवी या गोविंदाचा मृत्यू झाल्याचे येथे समजले आहे .महाराष्ट्रात दहीहंडीच्या विविध घटनांत १०० वर गोविंदा जखमी झाल्याचे वृत्त असून खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमात बाल बाल बचावल्याचे समजले आहे.

मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरमध्ये ही दुर्घटना घडली आहे. बाल गोविंदा पथक तिथे दाखल झालं होतं. 32 वर्षीय जगमोहन चौधरी याला दहीहंडीचा रोप बांधला जात होता. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. जगमोहन चौधरी दोर बांधत असताना खाली पडला आणि या दुर्दैवी घटनेत त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जगमोहनला तातडीने शताब्धी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण तिथे डॉक्टरांनी त्याला तपासलं असता त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलं. यामुळे मानखुर्दमध्ये शोककळा पसरली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीच्या निमित्ताने नव्या मुंबईत विविध कार्यक्रमास हजेरी लावली होती. एकनाथ शिंदेंचा घनसोलीतील शेवटचा कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्यानंतर शिंदे स्टेजवरून खाली उतरत असताना अचानक स्टेज खचला. क्षमतेपेक्षा जास्त कार्यकर्ते जमा झाल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. या अनपेक्षित घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळ उडाला. मात्र, शिंदे यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी तातडीने त्यांना सावरले आणि सुरक्षितपणे घटनास्थळावरून बाहेर काढले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.रुग्णालयांनुसार आकडेवारी

सेंट्रल मुंबईतील रुग्णालयांत 51 जखमी गोविंदांना दाखल करण्यात आले. यापैकी 32 जणांवर उपचार सुरू आहेत. ग.टी. रुग्णालयात दाखल असलेला 23 वर्षीय श्रेयस चालके हा गंभीर जखमी असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 19 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.
ईस्टर्न सबर्बन रुग्णालयांत 31 जखमी गोविंदा दाखल झाले होते. यापैकी 5 जणांवर उपचार सुरू असून उर्वरित 26 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
वेस्टर्न सबर्बन रुग्णालयांत 34 जण दाखल झाले. यातील ३ जण उपचाराधीन आहेत. कांदिवली येथील बीडीबीए रुग्णालयात दाखल असलेला 9 वर्षीय आर्यन यादव गंभीर अवस्थेत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 31 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.मुंबईत आणखी एका गोविंदाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हा गोविंदा गावदेवी गोविंदा पथकातील होता. रोहन वाळवी असे मृत्यू झालेल्या गोविंदाचे नाव आहे. रोहन अंधेरीतल्या दहीहंडीत सहभागी न होता एका टेम्पोत बसलेला असताना तो अचानक बेशुद्ध पडला, त्यानंतर त्याला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला. याआधी मानखुर्द येथे एका गोविंदाचा दहीहंडी बांधताना मृत्यू झाला. हा तरुण गल्लीतल्या बालगोपाळांसाठी पहिल्या मजल्यावरून दहीहंडी बांधता होता. त्यावेळी अचानक तो खाली पडला.

जम्मू-काश्मीरमध्ये ३ दिवसांत दुसऱ्यांदा ढगफुटी: कठुआ येथे 4 जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेश: कुल्लूमध्ये ढगफुटी, मंडीमध्ये पूर; चंदीगड-मनाली चार लेन बंद

जम्मू-काश्मीरमध्ये ३ दिवसांत दुसऱ्यांदा ढगफुटीची घटना घडली आहे. रविवारी सकाळी कठुआ जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील जोद व्हॅली भागात ढगफुटीच्या घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला. ६ जण जखमी झाले आहेत. जोद व्यतिरिक्त, माथेर चक, बगारड, चांग्रा आणि दिलवान-हुटली येथेही भूस्खलन झाले आहे.

भूस्खलनानंतर जोद गाव शहरापासून तुटले. बऱ्याच प्रयत्नांनंतर बचाव पथक गावात पोहोचले. येथे घरे अनेक फूटांपर्यंत पाण्याने आणि ढिगाऱ्याने भरली आहेत. लोकांना चिखलातून बाहेर काढण्यात आले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तीन दिवसांपूर्वी, १४ ऑगस्ट रोजी किश्तवाडच्या चसोटी गावात ढगफुटीची घटना घडली. या घटनेत ६५ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. २०० हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे.

त्याच वेळी, हवामान खात्याने १७ ते १९ ऑगस्ट दरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जम्मू, रियासी, उधमपूर, राजौरी, पूंछ, सांबा, कठुआ, दोडा, किश्तवार, रामबन आणि काश्मीरच्या काही भागात ढगफुटी आणि भूस्खलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये १७ ते १९ ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता

त्याच वेळी, हवामान खात्याने १७ ते १९ ऑगस्ट दरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जम्मू, रियासी, उधमपूर, राजौरी, पूंछ, सांबा, कठुआ, दोडा, किश्तवार, रामबन आणि काश्मीरच्या काही भागात ढगफुटी आणि भूस्खलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.

हिमाचल प्रदेश: कुल्लूमध्ये ढगफुटी, मंडीमध्ये पूर; चंदीगड-मनाली चार लेन बंद

रविवारी पहाटे ४ वाजता कुल्लूच्या शालनाला येथे ढग फुटले. यामुळे कुल्लू आणि मंडीच्या अनेक भागात मोठे नुकसान झाले आहे. पुरामुळे टाकोली सब्जी आणि टाकोली फोरलेनवर ढिगारा पडला आहे. कुल्लू-मंडीच्या वेगवेगळ्या भागात १० हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. अनेक घरे ढिगाऱ्यांनी भरली आहेत.

शालनाल खाड येथील पुरामुळे अफकॉन कंपनीच्या कार्यालयाची आणि कॉलनीची भिंत तुटली. येथे कर्मचाऱ्यांनी पळून जाऊन आपले प्राण वाचवले, स्थानिक लोकांच्या घरांचेही मोठे नुकसान झाले. टाकोली, पनारसा आणि नागवाई येथे १० हून अधिक वाहनांचेही नुकसान झाले आहे.

चंदीगड-मनाली चार-लेन मार्ग मंडी आणि कुल्लूमध्ये अनेक ठिकाणी बंद करण्यात आला आहे. मंडी जिल्ह्यातील बागी पराशर येथेही अचानक आलेल्या पुरामुळे नुकसान झाल्याची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या मते, आज चंबा, कांगडा, मंडी, शिमला आणि सिरमौरमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात या पावसाळ्यात आतापर्यंत २६१ जणांचा मृत्यू झाला आहे.
किश्तवाडमध्ये आतापर्यंत ६५ जणांचा मृत्यू

जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील चसोटी गावात १४ ऑगस्ट रोजी दुपारी १२.२५ वाजता ढगफुटी झाली. त्यामुळे ढिगाऱ्याखाली गाडल्यामुळे आतापर्यंत ६५ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३४ मृतदेहांची ओळख पटली आहे. ५०० हून अधिक लोकांना वाचवण्यात आले आहे, तर २०० लोक अजूनही बेपत्ता आहेत.

जखमींची संख्या १८० आहे, त्यापैकी ४० जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना किश्तवाड-जम्मू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ७५ जणांची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी प्रशासनाला दिली आहे. एनडीआरएफ, लष्कर (३००+ सैनिक), व्हाईट नाईट कॉर्प्स मेडिकल टीम, पोलिस, एसडीआरएफ आणि इतर एजन्सींच्या ३ टीम बचावकार्यात गुंतल्या आहेत.

जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला शनिवारी चासोती येथे पोहोचले. त्यांनी आपत्तीग्रस्तांची भेट घेतली आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावर एका व्यक्तीने त्यांना सांगितले – आम्हाला काहीही नको आहे, तुम्ही सर्व काही तुमच्या घरी घेऊन जा, फक्त आम्हाला मृतदेह द्या. माझी आई आणि काकू बेपत्ता आहेत.

तरुणांनी आरोप केला होता की येथे २० जेसीबी आले आहेत, आम्ही कालपासून पाहत आहोत की फक्त २ जेसीबी काम करत आहेत. आज तुम्ही आलात तेव्हा हे सुरू झाले होते. जेव्हा एखादा नेता येतो तेव्हा जेसीबी सुरू होतात.

जिल्ह्यातील पद्दार उपविभागातील चासोती गावात हजारो भाविक माचैल माता यात्रेसाठी पोहोचले तेव्हा ही दुर्घटना घडली. यात्रेचा हा पहिला थांबा आहे. येथे बसेस, तंबू, लंगर आणि भाविकांच्या अनेक दुकाने होती. पुरात सर्व काही वाहून गेले.

महिलांनी फोडली अन्यायाची प्रतीकात्मक दहीहंडी

सोमवार पेठेत पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष ॲड.नितीन परतानी यांच्या वतीने आयोजन

पुणे : सर्वत्र मोठ्या प्रमाणात महिलांवर सुरु असलेल्या अत्याचाराचा पुण्यात अभिनव पद्धतीने निषेध करीत महिलांनी अन्यायाची प्रतीकात्मक दहीहंडी फोडली. सोमवार पेठेतील रास्ते वाडा चौकात आयोजित काँग्रेसच्या दहीहंडीमध्ये ही हंडी फोडण्यात आली.

यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, मुख्य आयोजक व पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष ॲड.नितीन परतानी, नीलम परतानी ,अभिनेत्री श्रुती मराठे आदी उपस्थित होते. कसबा पेठेतील गणेश मित्र मंडळ दहीहंडी संघाच्या महिलांनी ही दहीहंडी फोडली. वारजे येथील मोरया प्रतिष्ठान वाद्य पथकाने ढोल ताशा वादन केले.श्रुती मराठे म्हणाली, महिलांवरील अत्याचाराच्या बाबत आपण काहीतरी करणे गरजेचे आहे. त्यामुळे दहीहंडी सारख्या उत्सवातून मांडलेल्या या महिलांशी संबंधित विषयाला आपण पाठिंबा द्यायला हवा.

ॲड.नितीन परतानी म्हणाले,  राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे आज महिलांवरील अन्यायाची प्रतीकात्मक दहीहंडी करण्यात आली. हि हंडी महिलांनीच एकजुटीने फोडली. महिला एकजूट आणि अन्यायाला प्रतिकार करण्यास आम्ही सज्ज आहोत, असा संदेश महिलांनी यनिमित्ताने दिला.

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भर दुपारी कोयतेधारी तिघे सराफी दुकानात तर घुसले पण …

पुणे-स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी रस्त्यावर रहदारी कमी असल्याचा फायदा घेत भर दुपारी औंध मधील एका ज्वेलर्सला लुटण्याचा प्रयत्न झाला आहे. पण दुकानदाराच्या धाडसाने चोरट्यांना आपली दुचाकी सोडून पळण्याची वेळ आली. औंध येथील ओंकार कॉम्प्लेक्समधील रामदेव ज्वेलर्स येथे शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.नेमाराम चौधरी (वय ५८) यांचे औंध येथील ओंकार कॉम्प्लेक्समध्ये रामदेव ज्वेलर्स हे सोन्या चांदीचे दुकान आहे. स्वातंत्र्य दिन असल्यामुळे रस्त्यांवर रहदारी कमी आणि दुकानात गर्दी सुद्धा नव्हती. त्यामुळे नेमाराम चौधरी हे दुकानात सुमारे साडेतीनच्या दरम्यान एकटेच बसलेले होते. इतक्यात तीन जण दुकानात शिरले. त्यांच्या हातात कोयते होते, तलवारी होत्या. हातातील हत्यार पाहून नेमाराम चौधरी यांना क्षणात कळलंय की चोरटे आपल्या दुकानात घुसले. नेमाराम चौधरी यांना काही कळण्याच्या आतच या तीनही चोरट्याने त्यांच्यावर तुफान हल्ला चढवला. चोरट्यांनी हल्ला चढवताच तितक्याच ताकतीने चौधरी यांनी त्यांचा प्रतिकार केला.नेमाराम चौधरी यांचा प्रतिकार पाहून तीन चोरट्यांनी त्यांना खेचत दुकानाच्या बाहेर आणले. दुकानाच्या बाहेर आणून चोरट्या पैकी एकाने त्यांच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चौधरी यांनी आरडाओरड करताच आजूबाजूचे लोक जमा व्हायला लागले आणि हे पाहताच चोरट्यांनी तिथून धूम ठोकली. चोरटे पळून जात असले तरी चौधरी यांनी माघार घेतली नाही, चौधरींनी चोरट्यांचा पाठलाग केला. दुकानाच्या बाजूला लावलेल्या आपल्या दुचाकी वर बसण्याचा प्रयत्न चोरटे करत असतानाच नेमाराम चौधरी यांनी दुचाकी वर एक लाख मारून ती जागेवरच खाली पडली. त्यामुळे चोरटे दुचाकी सोडून विधाते वस्तीकडे जाणार्‍या रस्त्याने पळून गेले. या प्रकाराची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले.याबाबत चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भोजनावळे यांनी अधिक माहिती दिली आहे.

चोरटे दुकानात केवळ ४० सेंकद होते. त्यानंतर त्यांनी चौधरी यांना मारहाण करत बाहेर आणले. चोरट्यांना दुकानातून काही चोरुन नेता आले नाही. पण चोरट्यांचा नेमका चोरीचा प्रयत्न होता की आणखी काय कारण होते, याची तपासणी करीत आहोत. पण दिवसाढवळ्या तेही स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पुण्यात अशा पद्धतीने हातात कोयते घेऊन चोरीचा प्रयत्न झाल्याने पुन्हा एकदा शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कल्याणीनगरमधील बॉलर पबवर छापा-स्वातंत्र्यदिनी ड्राय डे दिवशी 300 ग्राहकांना मद्य विक्री करताना पकडले

अनेकवेळा हॉटेलवर कारवाई पण मालकाला अभय ? संबंधित बॉलर पब विरोधात यापूर्वी देखील अनेकवेळा कारवाई झाल्या आहे परंतु हॉटेलचे मॅनेजर किंवा कर्मचारी यांचेवर तात्पुरती कारवाई केली जात असल्याचे दिसून आले आहे. राजकीय दबावामुळे हॉटेलचे मालकांवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात येत नाही. स्वातंत्र्य दिवसा निमित्ताने पुणे शहरात मद्य विक्रीवर पूर्णपणे प्रतिबंध असताना देखील कल्याणीनगर येथे हॉटेल बॉलर पब मध्ये सरसकट दारु विक्री करण्यात येत होती. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाल्यावर पोलिसांनी कारवाई केली.

पुणे-स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ड्राय डे असताना देखील पुण्यातील उच्चभ्रू भाग समजल्या जाणाऱ्या कल्याणीनगर भागात नामांकित बॉलर पब मध्ये मद्यविक्री चालू असल्याची माहिती पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यानुसार पोलीसांचे पथकाने बॉलर पब मध्ये रात्री एक वाजता छापा टाकून पाहणी केली असता, मद्य विक्री केली जात असल्याचे दिसून आल्याने पबवर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बॉलर पबचे मॅनेजर रेमंड फ्रान्सिस डिसोजा (वय- ४५,रा. शास्त्रीनगर, कोथरूड,पुणे) याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी त्याचे ताब्यातील आस्थापना, हॉटेल ‘हॉटेल बॉलर’ हे सरकारने घालवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करुन विहित वेळेपेक्षा जास्त वेळ सुरु ठेवले.

हॉटेल मध्ये सुमारे ३०० ते ४०० ग्राहक यांना खाद्यपदार्थ, मद्य पेय आदी सुविधा पुरवत असल्याचे मिळून आल्याने याबाबत पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. येरवडा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात पोलीस शिपाई ज्ञानेश्वर बाळसराफ (वय- ४२) यांनी फिर्याद दाखल केली आहे. या घटनेवेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक जितेंद्र पाटील व पोलीस उपनिरीक्षक महेश फटांगरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम २९३, २२३ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

आंबेडकर राष्ट्रीय स्मारकांच्या मागणीसाठी हजारो भीमसैनिकांचे ठिय्या आंदोलन

  • कॉंग्रेसचे अरविंद शिंदे , राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप, शिवसेनेचे संजय मोरे यांनी आंदोलनास उपस्थित राहून समितीच्या तसेच आंबेडकरी समाजाच्या योग्य मागण्यांना पाठिंबा दर्शविला.

पुणे : मंगळवार पेठ येथील रस्ते विकास महामंडळाच्या च्या जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे या मागणीसाठी आज, स्वातंत्र्यदिनी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तार कृती समितीच्या वतीने हजारो भीमसैनिकांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.  आंदोलनातून राष्ट्रीय स्मारकाची जोरदार मागणी करण्यात आली असून ते लवकर पूर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने नियोजित जागेवर खाजगी विकसकाचे सुरू असलेले काम स्थगित करण्याचे आदेश दोनच दिवसांपूर्वी जारी करण्यात आले आहेत, त्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. 

आजच्या ठिय्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आंबेडकर अनुयायान कडून कोणत्याही स्वरूपाची घोषणाबाजी तसेच नेत्यांकडून भाषणे करण्यात आली नाहीत. तरी देखील डॉ.  बाबासाहेब आंबेडकरांचे पश्चिम महाराष्ट्रा,  पुण्यात येथोचित स्मारक नसल्याची खंत आंबेडकरी अनुयायांमध्ये व नेत्यांमध्ये स्पष्ट जाणवत होती.  या आंदोलनामध्ये विविध पक्ष संघटनांमध्ये कार्यरत असलेले सर्वच आंबेडकरी नेते , कार्यकर्ते याशिवाय मुस्लिम समाजासह अन्य समाजाच्या नेते, कार्यकर्त्यांनी या आंदोलनात  सहभागी होत डॉ. आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाला आपला पाठिंबा जाहीर केला. या शिस्तबद्ध ठिय्या आंदोलनात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. 

दरम्यान आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा प्रश्न मार्गी लावावा यासाठी पुणे लोकसभा मतदारसंघातील खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विशेष प्रयत्न करत रास्ते विकास महामंडळाकडून  विकासाच्या कामाला स्थगिती मिळवण्याचे पत्र प्राप्त करून घेतले आहे.  तसेच याच संदर्भामध्ये पुणे पोलीस आयुक्त यांनी देखील मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधत याबाबत सत्व लक्ष घालण्याची विनंती केली होती  व त्याचा परिणाम स्थगितीपत्र लवकर प्राप्त झाल्या याची जाणीव ठेव राज्य शासन व वरील दोघांचेही यावेळी अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले. तसेच या आजच्या आंदोलनाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पाठिंबा दर्शवला असून स्मारकाच्या भूमिकेसोबत आपण आहोत असा विश्वास त्यांनी आंदोलकांना दिला आहे . यापूर्वी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी देखील स्मारकासाठी सकारात्मकता दर्शवली होती त्यामुळे आता स्मारकाचा मार्ग प्रशस्त झाला आहे अशी भावना आंबेडकरी अनुयायांनी आज व्यक्त केली. 

दरम्यान आता शासनाने स्मारकाच्या घोषणेसाठी व प्रत्यक्ष कामासाठी कोणताही विलंब न करता कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा व या स्मारकासाठीची किमान शंभर कोटी रुपयांची तरतूद करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली, 

मुख्यमंत्री सकारात्मक केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांची दूरध्वनीवरून माहिती

आंबेडकरी समाजाचे मंगळवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भावनांचा विस्तार करून राष्ट्रीय स्मारक करावे या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू असताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तार कृती समितीच्या समन्वयकांना दूरध्वनी करून आजच्या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून ते सकारात्मक असल्याचे सांगत स्मारकांच्या मागणीसाठी आंबेडकरी समाजाला पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असे अश्वासन मोहोळ यांनी दिले.

वसंतदादा पाटलांचं सरकार का पाडलं? शरद पवार यांनी उघडपणे सारं काही सांगितलं

पुणे-ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर विरोधकांकडून नेहमी दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडण्यावरुन राजकीय टीका केली जाते. पण त्यावेळी नेमकी राजकीय परिस्थिती काय होती? याबाबत शरद पवार यांनी आज सविस्तर खुलासा केला आहे.काँग्रेस नेते उल्हास पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात पुण्यातील उमेदीचा काळ, काँग्रेसमधील वाटचाल, उल्हास पवारांसारख्या समविचारी कार्यकर्त्यांसोबतचा काळ आणि आठवणींना उजाळा दिला. “काँग्रेसमध्ये आम्ही होतो तेव्हा काँग्रेस वेगळी झाली. निवडणूक झाली, कोणाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. त्यावेळेस काँग्रेसमध्ये एक राग असायचा. तेव्हा आम्ही ठरवलं. दादांचे सरकार घालवायचं आणि मी मुख्यमंत्री झालो. त्या 10 वर्षांनंतर आम्ही परत एकत्र आलो. पण मुख्यमंत्री कोणाला बनवायचं? याची चर्चा झाली. वसंत दादांनी सांगितलं की, आता चर्चा नाही. पक्ष सर्वांचा आहे, म्हणून याचं नेतृत्व शरदकडे द्यायचं, असं वसंत दादा त्या काळात म्हणाले होते”, असं शरद पवार यांनी सविस्तर सांगितलं.

शरद पवारांनी नेमका किस्सा काय सांगितला?
“यशवंतराव चव्हाण यांचं भाषण म्हटलं तर आम्हा लोकांनी ते कधीच सोडलं नाही. नीट विषयावर मंत्रमुग्ध व्हावं, अशा प्रकारचे विचार हे यशवंतराव चव्हाण मांडायचे. विनायकराव पाटील आज हयात नाहीयत. ते पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लोकांना असायचं. वसंतदादाचं देखील आम्हाला मार्गदर्शन असायचं. ही मोठी माणसं आहेत. या सगळ्या लोकांचं अंतकरण फार मोठं होतं. महाराष्ट्र ाच्या नेतृत्वाची फळी या ज्येष्ठ लोकांनी उभी केली आणि वर्षोनुवर्षे महाराष्ट्र एक देशाचं चांगलं राज्य होऊ शकला. त्याला राज्य चालवण्याची ताकद आणि दृष्टी असलेल्या नेतृत्वाची फळी या लोकांनी उभी केली. त्यामुळे महाराष्ट्राचा चेहरा बदललाय”, असं शरद पवार म्हणाले.”या लोकांचं मन किती मोठं होतं याचे अनेक उदाहरणं सांगता येतील. मला आठवतंय, काँग्रेसमध्ये ज्यावेळी होतो. काँग्रेस विभागली. इंदिरा काँग्रेस वेगळी झाली, एस काँग्रेस वेगळी झाली, आम्ही एस काँग्रेसमध्ये होतो. यशवंतराव चव्हाण होते. आणखी लोक होते आणि निवडणूक झाली. निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळालं नाही. काँग्रेसला काही जागा, आम्हाला काही जागा. शेवटी आम्ही एकत्र आलो आणि वसंतदादांना मुख्यमंत्री केलं”, असं शरद पवार म्हणाले आणि ते पुढे किस्सा सांगू लागले.”पण आमच्या तरुण लोकांचा त्यावेळेला काँग्रेसवर कायमच राग असायचा. आम्ही सगळे यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचे. त्यामुळे आमच्यात एक अंतर होतं. वसंतदादा हे आम्हा लोकांचे नेते. पण शेवटी त्यांनी हे दोघे एकत्र यावे यासाठी प्रयत्न केले आणि त्याला आम्हा लोकांचा विरोध होता. त्या विरोधामध्ये जे प्रमुख होते, त्यामध्ये मी होतो. परिणाम काय झाला, एक दिवशी ठरवलं, दादांचं सरकार घालवायचं. आणि दादांचं सरकार आम्ही लोकांनी घालवलं. आणि मी मुख्यमंत्री झालो. माझ्या हातात सत्ता आली”, असं शरद पवार यांनी सांगितलं.”सांगायचं कारण असं त्यानंतर 10 वर्षानंतर आम्ही परत एकत्र आलो. राज्याचा मुख्यमंत्री कोणाला करायचं याची बैठक होती. त्या बैठकीत अनेक लोक होते. वसंतदादांनी ही बैठक बोलावली. त्या बैठकीत अनेक नावांची चर्चा झाली. दादांनी सांगितलं, आता बाकी कुणाच्या नावाची चर्चा नाही. आज पुन्हा एकदा पक्ष सावरायचा आहे आणि पक्ष सावरायचा असेल तर पक्षाचं नेतृत्व शरदकडे द्यायचं हा निकाल त्यांनी दिला. ज्या व्यक्तीचं सरकार मी पाडलं ती व्यक्ती पुन्हा गांधी, नेहरुंचे विचार मजबूत करण्यासाठी मी काय केलं ही गोष्ट विसरुन मोठ्या अंतकरणाने पुन्हा एकत्र करण्याची भूमिका मानणारं असं हे नेतृत्व होतं”, अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली.

ऑप्टिकल फायबरच्या कामादरम्यान तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू:कुटुंबीयांचा आक्रोश

पुणे-बीएसएनएलच्या इन्स्पेक्शन चेंबरमध्ये ऑप्टिकल फायबरचे काम करताना गुदमरून तीन कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना दुपारी निगडी प्राधिकरण सेक्टर क्रमांक २७, प्लॉट क्रमांक ६५ समोर रस्त्याच्या कडेला असलेल्या बीएसएनएलच्या चेंबरमध्ये घडली. दरम्यान यांच्यासोबत असलेला चौथा कामगार बालंबाल बचावला.दत्ता होलारे, लखन धावरे (दोघेही रा. गुरुद्वारा चौक, आकुर्डी) आणि साहेबराव गिरसेप (रा. बिजलीनगर) अशी मृत कामगारांची नावे आहेत. हे कामगार मूळचे धाराशिवचे राहणारे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएनएल आकुर्डी कार्यालयातील तीन कंत्राटी कामगार नेहमीप्रमाणे रोजच्या कामावर गेले होते. चेंबरमधील कामानिमित्ताने ड्रेनेज मध्ये रावसाहेब सर्वात प्रथम उतरले. काही कळण्याआधीच मोठा आवाज झाला आणि ड्रेनज मध्ये साचलेल्या अतिशय दुर्गंधीयुक्त पाण्यात ते कोसळले. लखनने हे पाहिले तसा तोही खाली उतरला. रावसाहेबाला उचलण्यासाठी खाली वाकला आणि तोही कोसळला. हे पाहणाऱ्या दत्ताने एका क्षणाचाही वेळ न लावता ड्रेनज मध्ये उडी घेतली आणि तोही डोळे पांढरे करून आडवा झाला.

यांच्यासोबत आलेला चौथा कामगार चेंबर बाहेर उभा होता. ड्रेनेजमध्ये गॅस असल्याचे त्याच्या लक्षात आले. खाली उतरलेल्या तिघांना वाचवण्यासाठी त्यांनी आरडाओरडा सुरू केला. मात्र तोपर्यंत गुदमरून तिघांचाही मृत्यू झालेला होता अशी माहिती निगडी पोलिसांनी दिली.घटनेनंतर परिसरात क्षणात खळबळ उडाली. स्थानिकांनी कामगारांना बाहेर काढण्यासाठी जीव तोडून प्रयत्न केले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

दरम्यान, घराबाहेर कामाला गेलेली आपली माणसे आता परत येतील या आशेने वाट पाहणाऱ्या कुटुंबियांना, दुपारपर्यंत त्यांच्या निधनाची दुःखद बातमी कळवण्यात आली. कुणाच्या कपाळावरचे कुंकू पुसले, कुणाच्या डोक्यावरची सावली हिरावली, तर कुणाच्या हातातील कष्टकऱ्याची ऊब कायमची हरपली. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी तिन्ही घरांचे दिवे विझल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान तिघांच्या कुटुंबीयांना सायंकाळपर्यंत या घटनेची माहिती मिळालेली नव्हती. पोस्टमार्टम करण्यासाठी वाय सी एम रुग्णालयात मृतदेह आणण्यात आले. त्यावेळी तिघांचे कुटुंबीय तेथे आल्यानंतर एकच आक्रोश पाहायला मिळाला. हे कुटुंबीय धाराशिवचे आहे. रात्री उशिरा या तिघांचे मृतदेह कुटुंबीयांनी त्यांच्या मूळ गावी नेले.

देशातील साखर उद्योगाची सद्यस्थिती चिंताजनक:साखर कारखान्यांच्या खासगीकरणावर शरद पवारांकडून चिंता व्यक्त

पुणे -पुण्यात साथी किशोर पवार जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित परिसंवादात शरद पवार यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले. राज्यातील सहकारी साखर कारखानदारीला धोका निर्माण झाला असून खासगी कारखान्यांची संख्या वाढत आहे. साखर कारखान्यांची क्षमता वाढत असली तरी कामगारांची संख्या मात्र झपाट्याने कमी होत आहे.

कारखानदारी आणि साखर कामगार टिकवण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन चर्चा करण्याची आवश्यकता पवार यांनी व्यक्त केली. या प्रक्रियेत महाराष्ट्र सरकारलाही सहभागी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

साथी किशोर पवार प्रतिष्ठान आणि लोकमान्य सोसायटीतर्फे आयोजित या कार्यक्रमात माजी मंत्री बाळासाहेब थोरात, साखर कामगार प्रतिनिधी तात्यासाहेब काळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. पवार यांनी साथी किशोर पवार यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांचे स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि कामगार चळवळीतील योगदान अधोरेखित केले.

देशातील साखर उद्योगाची सद्यस्थिती चिंताजनक असल्याचे पवार यांनी नमूद केले. कापड गिरण्यांप्रमाणेच साखर कारखान्यांमधील कामगारांची स्थिती बिकट होत चालली आहे. कामगार चळवळीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून, कामगारांची पिळवणूक होत असेल तर संघर्ष अपरिहार्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आज सहकार क्षेत्रात खासगी कारखाने वाढत आहेत. तर सहकारी कारखाने कमी होत आहेत. पूर्वीही खासगी कारखाने होते. पण, ते महाराष्ट्रातल्या लोकांचे होते. कारखान्यात जो कामगार घाम गाळतो, तो टिकला पाहिजे. पण, सध्या उलटे चित्र बघायला मिळते. कारखान्यांची साईज वाढली. 20 हजार टन क्षमतेचे कारखाने झाले. पण, कामगारांची संख्या 150 ते 200 पर्यंत मर्यादित झाली. हे चिंताजनक आहे. म्हणूनच या प्रश्नावर एकत्र बसून चर्चा करावी लागेल. महाराष्ट्र सरकारला विश्वासात घेऊन यावर मार्ग काढावा लागेल, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.

पुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजे मुक्त दहिहंडीचा थरार

  • ऐतिहासिक लाल महाल चौकात तरुणाईचा जनसागर उधळला
  • ढोल ताशा, बॅन्ड, वरळी बिट्सचे पारंपारिक वाद्यांचा गजर….
  • राधेकृष्ण ग्रुपने दहिहंडी संघाने सात थर रचत फोडली हंडी

पुणे :
गोविंदा रे गोपाळाचा जयघोष, ढोल ताशांचा मंगलमय गजर, महाकाल नृत्य आणि मुंबईतील प्रसिद्ध वरळी बिट्स यांच्या पारंपारिक संगीतावर थिरकणार्या तरुणाईचा उसळलेला जनसागर अशा उत्साही वातावरणात पुनीत बालन ग्रुप आयोजित २६ सार्वजनिक मंडळांची संयुक्त अशा दहीहंडीचा थरार पुणेकरांनी अनुभवला. ऐतिहासिक लाल महाल चौकात तुडुंब गर्दीसमोर राधेकृष्ण ग्रुपने सात थर रचत ही संयुक्त दहीहंडी फोडण्याचा बहुमान मिळवला. महाराष्ट्रातील पहिली डीजे मुक्त दहिहंडी साजरा करीत एक नवा आदर्श यानिमित्ताने पुनीत बालन ग्रुपने मांडला.
शहरातील २६ सार्वजनिक मंडळांनी एकत्र येऊन पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून संयुक्त दहिहंडी उत्सव सुरू केला आहे. यावर्षीची संयुक्त दहीहंडी डिजे मुक्त साजरी करण्याची घोषणा पुनीत बालन केली होती. त्यामुळे या डीजे मुक्त दहीहंडीला पुणेकर कसा प्रतिसाद देणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, ढोल ताशाचा गजर आणि वरळी बिटसने वाजविलेल्या संगीतावर हजारो पुणेकरांनी ठेका धरला आणि डीजे मुक्त दहिहंडीचा प्रयोग यशस्वी करत एक नवीन पायंडा पाडला. प्रभात बॅन्डच्या सुमधुर वादनाने या दहीहंडी कार्यक्रमाची सुरवात झाली. युवा वाद्य पथक, समर्थ पथक, रमणबाग आणि शिवमुद्रा या ढोल पथकांच्या जोरदार वादनाने या कार्यक्रमाची रंगत वाढविली आणि वरळी बिट्सच्या बॅंडने केलेल्या वादनाने अवघे वातावरण दंगून गेले.
यावेळी अभिनेता व दिगदर्शक प्रविण तरडे, अभिनेता हार्दिक जोशी, मराठी बिग बॉस फेम ईरिना यांच्यासह अनेक मराठी कलाकारांनी या उत्सवाला हजेरी लावली. यावेळी दहिहंडीच्या सलामी करीता वंदे मातरम दहिहंडी संघ, नटराज संघ, म्हसोबा संघ, भोईराज संघ, गणेश मित्रमंडळ संघ, गणेश महिला गोविंदा पथक, गणेश तोफखाना दहीहंडी संघ, नवज्योत ग्रुप संघ, इंद्रेश्वर संघ (इंदापूर),  शिवकन्या गोविंदा पथक (चेंबुर-मुंबई), शिवतेज ग्रुप, दहिहंडी संघ यांसारख्या अनेक गोविंदा पथकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. रात्री पावणे दहा वाजता राधेकृष्ण ग्रुपने सात थर रचत ही ऐतिहासिक दहीहडी फोडण्याचा मान मिळविला.

या वर्षीचे दहीहंडी उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे उज्जैन येथील पारंपारिक ‘शिव महाकाल’ पथक होते, या पथकाच्या तालावर नाचत तरुणाईने जल्लोष केला. 

 
पुणेकरांनी डीजे मुक्त दहीहंडी ला उस्फूर्त प्रतिसाद देत हा उत्सव यशस्वी केल्याबदल मी मनापासून आभार व्यक्त करतो. गतवर्षी आम्ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी सार्वजनिक मंडळांची संयुक्त दहीहंडी उत्सव सुरू केला होता. यंदाच्या वर्षी डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प केला असून, त्याच भूमिकेतून दहीहंडीमध्ये डीजेचा वापर टाळण्यात आला. त्यामुळे ध्वनी प्रदूषण कमी झाले आणि पारंपारिक वाद्यवादकांनाही रोजगार मिळाला.

  • पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप/ विश्वस्त, उत्सव प्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट