Home Blog Page 349

पुणेकरांसमोर उलगडली देशाचा अभिमान ठरलेल्या “चिनाब ब्रिज”ची जन्मकथा

प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशनच्या तसेच सह आयोजक अल्ट्रा टेक, बीएनसीए,आयसिआय, एईएसए, आयजीएस यांच्या वतीने आयोजन

पुणे : जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर नव्याने बांधण्यात आलेला चिनाब पूल हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे, जो चिनाब नदीपासून ३५९ मीटर वर आहे आणि त्याची लांबी १३१५ मीटर आहे, तासाला २६६ किमी वेगाने आलेले वारे सहन करण्याची क्षमता असलेल्या या जागतिक आश्चर्य, देशाचा अभिमान ठरलेल्या या पुलाच्या अंतरंगांची आणि बांधकामाची अनोखी कथा आज पुणेकरांसमोर उलगडण्यात आली.निमित्त होते पुणे प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भारताचा अभिमान “चिनाब ब्रिज” या विशेष चर्चासत्राचे.

बीएनसीए, कर्वे नगर, पुणे येथे विनामूल्य चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी इंजि. विकास रामगुडे(जॉईंट एम.डी एमएसआयडीसी, महाराष्ट्र सरकार), डॉ. सुनील बसारकर (अभियंता)(आयकॉनिक चिनाब रेल्वे ब्रिज चे भूगर्भ तंत्रज्ञान), ब्रिज इंजि. शशांक राजभोज(चिनाब आर्च ब्रिजचे डिझाइन आणि बांधकाम),कार्यक्रम समितीचे अध्यक्ष, इंजि. नारायण कोचक, पुणे प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष शेषराव कदम,सचिव अजय कदम आदि मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना इंजि. विकास रामगुडे म्हणाले, आज पीएसईए च्या वतीने एक वेगळा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता, अनेकदा इंजिनियरला कमी लेखल्याची तक्रार असते मला वाटते या चर्चासत्रात सादर करण्यात आलेल्या प्रेझेंटेशन मधून स्ट्रक्चरल इंजिनियरचे काम किती महत्वाचे असते हे दिसून आले आहे.

डॉ. सुनील बसारकर म्हणाले, आजच्या चर्चासत्रातून ऐतिहासिक आणि जागतिक आश्चर्य ठरलेल्या चिनाब ब्रिजची जन्मकथा सांगताना मला वाटते ही एक इंजिनियरिंग विश्वातील महत्वपूर्ण घटना आहे. अनेक नव्या तंत्रज्ञानाचा आविष्कार या पुलाच्या बांधकाममध्ये झाला आहे. २००३ साली मंजूर करण्यात आलेल्या पुलाच्या प्रत्यक्ष बांधकामाला २००४ मध्ये सुरुवात झाली २०२० ते २०२२ या कोविड काळात हा पूल करण्यासाठी अनेक संकटांचा सामान्य करावा लागला,अनेक आव्हानांचा प्रतिकार करत हा ऐतिहासिक पूल निर्माण करण्यात आला.

इंजि. शशांक राजभोज म्हणाले,चिनाब ब्रिज हा जगात सर्वात मोठा पूल आहे. या उभारणीत आलेल्या अडचणी, आव्हाने मोठी होती, या निर्माणाचा मी एक भाग होतो, हा पूल उभारणे मोठे आव्हान होते, जिथे वाहतूक व्यवस्था नाही, पूलाची ऊंची, पूल उभरण्यात आलेला भूभाग या सर्वच बाबी म्हणजे एक अत्यंत खडतर प्रवास होता, ३० -३० टन वाजनांचे सेगमेंट्स त्या ठिकाणी उभारणे किती कौशल्याचे होते याची माहिती सांगताना माझ्या या पुलाच्या उभारणीतील आठवणींना उजाळा मिळाला.

शेषराव कदम म्हणाले,पीएसईए तर्फे एक तंत्रज्ञान उलगडणारा परिसंवाद आयोजित करण्यात आला.मुळात संस्थेची स्थापनाच आमच्या व्यवसायातील लोकांना आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवणे आणि सर्वाना एकत्र आणणे हा आहे. आज इंजिनियर, आर्किटेक्ट आणि विद्यार्थ्यांच्या मिळालेल्या प्रतिसदाने आम्ही भारावून गेलो आहोत, भविष्यात अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही घ्यावेत यासाठी प्रेरणा यातून मिळाली असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही,

अजय कदम म्हणाले, पीएसईए ही संस्था आम्ही नव्याने सुरू केली असली तरी यातील सर्व संस्थापक हे अनुभवी आहेत. ३० ते ३५ वर्षांचा अनुभव त्यांचा आहे, स्ट्रक्चरल इंजिनिअर्स च्या समोरील आव्हाने आणि नवीन तंत्रज्ञान याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. पुण्यात पहिल्यांदाच एखाद्या मोठ्या प्रॉजेक्ट बद्दल आशा पद्धतीचा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.आजच्या परिसंवाद कार्यक्रमाला पुणेकर,वरिष्ठ प्रॉजेक्ट मॅनेजर्स, जेसीबी सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यां मधील अनुभवी तज्ञ इंजिनियर्स व काही कन्स्ट्रक्शन उपकरणे बनवणारे मेकॅनिकल इंजिनियर्स,विद्यार्थी, पुणे, सातारा, मुंबई येथील स्ट्रक्चरल इंजिनियर्स, बांधकाम व्यावसायिक,बिल्डर्स यांनी सहभाग घेतला यांचा मिळालेला प्रतिसाद आम्हाला प्रेरणा देणार आहे. तसेच अभियांत्रिकी शैक्षणिक संस्थांमधील प्राध्यापक व होतकरू विद्यार्थ्यांचा समावेश PSEA संस्थेच्या प्रशासकीय समितीस आशादायक व उत्साहवर्धक वाटला.

मुंबईकडे कूच नको, कागद-पेन घ्या अन् चर्चेला या:शांततेने मागण्या मांडल्या तर सरकार ऐकेल, चंद्रकांत पाटलांचा मनोज जरांगेंना सल्ला

मुंबई-मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वातावरण तापू लागले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला असून, यावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे.लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. मात्र तो सनदशीर पद्धतीनेच असायला हवा. जर आंदोलन करताना कायद्याचे उल्लंघन होणार असेल, तर सरकार कारवाईस पात्र ठरेल, असा स्पष्ट इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, मनोज जरांगे यांनी कागद-पेन घ्या आणि सरकारसमोर चर्चेला यावे. आरक्षणाबाबत-च्या मागण्या शांततेत मांडल्यास त्यावर सकारात्मक निर्णय होऊ शकतो, असे पाटील यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारने मराठा आरक्षण उपसमितीचे पुनर्गठन केले असून, आता या समितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी चंद्रकांत पाटील हेच या समितीचे अध्यक्ष होते. या बदलावर बोलताना पाटील म्हणाले, एकाच माणसाने किती वेळ काम करायचं? मी बराच काळ अध्यक्ष होतो, पण मी अजूनही समितीत आहे. माझ्या कार्यकाळात अनेक लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे.

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, मराठा आणि ओबीसी दोन्ही समाज महाराष्ट्रातील प्रमुख घटक आहेत आणि ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. जरांगे पाटील यांच्या मागण्या किंवा मराठा समाजाच्या उन्नती साठीच्या मागण्या चांगल्या पद्धतीने कशा पुढे नेता येतील, यावर सरकार लक्ष देईल. आंदोलन करणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु मराठा समाजाच्या उन्नतीसाठी जे काही करणे आवश्यक असेल ते सरकार करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

हि तर भाजपासाठी सोईची ठरणारी प्रभाग रचना,त्वरित रद्द करा: राहुल डंबाळे

पुणे : महानगरपालिकेच्या 2025 मध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने 41 प्रभाग निर्माण करण्यात आलेले आहेत. सदर रचना करत असताना केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांकडे पूर्णता दुर्लक्ष करून केवळ भाजपाच्या विद्यमान उमेदवारांना सोईची ठरणारी प्रभाग रचना केल्याने ती तात्काळ रद्द करावी अशी मागणी रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने पक्ष अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे.

शुक्रवारी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जाहीर केलेल्या प्रभाग रचनेमध्ये नैसर्गिक नदी, नाले , राष्ट्रीय महामार्ग ,राज्य महामार्ग यांचा हद्द निश्चित करताना विचार केला जावा, अशा स्पष्ट सूचना असताना सुद्धा त्याकडे हेतूपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे.

तसेच सध्या निर्माण केलेल्या रचनेमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाशी संबंधित आरक्षण व उमेदवारांवर विपरीत परिणाम करणारी रचना केल्याचे जाणवत आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षणा व्यतिरिक्त निवडून येणारे प्रमाण घटणार असल्याने त्याबाबत देखील नाराजगी या पत्रात व्यक्त करण्यात आलेली आहे. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करून महानगरपालिकेने केलेल्या प्रभाग रचनेस तात्काळ स्थगिती द्यावी अशी विनंती करण्यात आलेली आहे.

प्रभाग रचना काही असली तरी सध्या राज्य सरकारचा कारभार व मागील पाच वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षाने घेतलेले निर्णय यामुळे शहराची प्रचंड हानी झाली असून त्याचा फटका सत्ताधारी भाजपाला बसण्याची शक्यता गृहीत धरूनच बेकायदेशीर हस्तक्षेप करून सोयीची प्रभाग रचना केल्याची भावना समस्त भाजप विरोधी राजकीय कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली आहे.

पुणे महानगरपालिकेची प्रभाग रचना ही सध्या केंद्रामध्ये व देशभरामध्ये सुरू असलेल्या मतचोरी प्रकरणाशी साधर्म्य साधत मतदार चोरीचा हा प्रकार असल्याचे निदर्शनास येत असलेने या विरुद्ध व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असल्याचे सोशॅलिस्ट रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी यावेळी जाहीर केले.

संधीची समान उपलब्धता’ हे स्वातंत्र्य व लोकशाहीचे वैशिष्ट्य – काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी

पुणे : भारतातील लोकशाही व्यवस्थेमुळे व बँकांच्या राष्ट्रीयकृत घोरणांमुळे भारत आज विकसनशील देशांपैकी एक आहे. मात्र स्वातंत्र्यवेळी देशातील साक्षरतेचे प्रमाण खूप कमी होते. कालांतराने राजीव गांधी यांच्या काळात देशात रोजगार पुरक शिक्षण व्यवस्था व  संगणक व इंटरनेट क्रांती झाली. अन् डिजिटल इंडियाची पायाभरणी झाली. यातून आपल्याला दिसून येते की देशात महिला आणि तरुणांना स्वातंत्र्य दिले तर ते कर्तृत्व सिद्ध करतात, असे मत कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळदादा तिवारी यांनी व्यक्त केले.  

शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत संगणक आणि सॉफ्टवेअर कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या एन. एम. डी . प्रा. लि. आणि एन. एम. डी. इन्फॉटेकच्या आठव्या वर्धापन दिनी ते बोलत होते. यावेळी आमदार विक्रमसिंह पाचपुते, राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील, श्रॉफ ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चेअरमन जे. पी. श्रॉफ, अभिनेत्री प्रार्थना बेहरे, वरिष्ठ पोलिस अधिकारी पी. आय वाघमारे, एनएमडी ग्रुपचे संस्थापक नवनाथ मोहन दरेकर, प्रशांत दरेकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना गोपाळदादा तिवारी म्हणाले, नुकतेच झालेल्या सिंदूर ऑपरेशन मधील कर्नल सोफिया असेल किंवा  येथे शेतकऱ्यांच्या मुलांना पाठबळ देणारा नवनाथ दरेकर सारखा तरुण असेल त्यांनी हे दाखवून दिले आहे. त्यामुळे सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुणांना आपल्या स्वप्नांना आकार देण्याचे बळ लाभले. 

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे म्हणाली, मी जेव्हा जेव्हा परराज्यात किंवा परदेशात जाते तेव्हा मराठी उद्योजक दिसत नाही. मराठी माणूस उद्योक, व्यावसाव करू शकत नाही, असं बोललं जात पण आज मला मराठी असल्याचा अभिमान वाटतोय. एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी आज येथे मिळाली आहे.

एन. एम. डी. प्रा. लि. आणि एन. एम. डी. इन्फॉटेक च्या वतीने शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत संगणक आणि सॉफ्टवेअर कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. आजपर्यंत आम्ही २५०+ समाधानी क्लायंट्सचा विश्वास संपादन केला असून ५०००+ विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले आहे. यापैकी २०००+ विद्यार्थ्यांना MNC मध्ये नोकरीची संधी मिळाली आहे, ही आमच्यासाठी आनंद आणि अभिमानाची बाब आहे. भविष्यात आम्ही एआय (Artificial Intelligence) क्षेत्रातील क्लायंट्स मिळवून भारताला सर्वोच्च शक्ती बनविण्याच्या दिशेने योगदान देणार आहोत,” असे मनोगत नावनाथ दरेकर यांनी व्यक्त केले.

प्रशांत दरेकर म्हणाले, नवनाथ यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील एका खेड्यांत शालेय शिक्षण घेतले. पुढे पुण्यात येऊन कष्टाने स्वतचे वेगळे स्थान निर्माण केले, नाव कमावले.  आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून ट्याने शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मोफत तंत्रज्ञान प्रशिक्षण देण्याचा अभिनव उपरं राबविला, यातून हजारो कुटुंबाचा टॉ आधार बनला आहे, त्यांची वाटचाल पुढेही अशीच सुरू राहो अशा सदिच्छा त्यांनी दिल्या. 

या प्रसंगी यशस्वी विद्यार्थ्याना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा पाटील यांनी केले.

अनिल अंबानींच्या घरांवर CBIचे छापे:3000 कोटींच्या कर्ज घोटाळ्याचा खटला, येस बँकेतून घेतलेल्या पैशांच्या गैरवापराचा आरोप

मुंबई-आज सीबीआयने अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपच्या अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही छापेमारी मुंबईत करण्यात आली.मीडिया रिपोर्ट्सनुसार, येस बँकेच्या ३००० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याच्या संदर्भात हा छापा टाकण्यात आला आहे. यापूर्वी २३ जुलै रोजी ईडीने अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपशी संबंधित ३५ हून अधिक ठिकाणी छापे टाकले होते.

हे प्रकरण २०१७ ते २०१९ दरम्यान अनिल अंबानींशी संबंधित रिलायन्स ग्रुप कंपन्यांना येस बँकेने दिलेल्या सुमारे ३,००० कोटी रुपयांच्या कर्जाशी संबंधित आहे.सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले की ही कर्जे कथितपणे शेल कंपन्या आणि समूहाच्या इतर संस्थांना वळवण्यात आली होती. तपासात असेही आढळून आले की येस बँकेच्या उच्च अधिकाऱ्यांना लाच देण्यात आली असावी.सीबीआयने दोन प्रकरणांमध्ये एफआयआर नोंदवला होता. ही प्रकरणे येस बँकेने रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेडला दिलेल्या दोन वेगवेगळ्या कर्जांशी संबंधित आहेत. दोन्ही प्रकरणांमध्ये सीबीआयने येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांचे नाव घेतले होते.यानंतर, एका अधिकाऱ्याने सांगितले की, नॅशनल हाऊसिंग बँक, सेबी, नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी आणि बँक ऑफ बडोदा सारख्या इतर एजन्सी आणि संस्थांनीही ईडीशी माहिती शेअर केली. आता ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे.ईडीने त्यांच्या अहवालात म्हटले होते की ही एक “सुविचारित आणि सुनियोजित” योजना होती ज्यात अंतर्गत बँका, भागधारक, गुंतवणूकदार आणि इतर सार्वजनिक संस्थांना खोटी माहिती देऊन पैसे लुटण्यात आले. तपासात अनेक अनियमितता आढळून आल्या, जसे की:

कमकुवत किंवा पडताळणी नसलेल्या कंपन्यांना कर्जे.
अनेक कंपन्यांमध्ये एकाच संचालकाचा आणि पत्त्याचा वापर.
कर्जाशी संबंधित आवश्यक कागदपत्रांचा अभाव.
बनावट कंपन्यांना पैसे हस्तांतरित करणे.
जुने कर्ज फेडण्यासाठी नवीन कर्ज देण्याची प्रक्रिया (कर्ज सदाहरितीकरण).

काही दिवसांपूर्वी स्टेट बँकेने अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि स्वतः अनिल अंबानी यांना “फसवे” म्हणून घोषित केले होते.एसबीआयचे म्हणणे आहे की आरकॉमने बँकेकडून घेतलेल्या ३१,५८० कोटी रुपयांच्या कर्जाचा गैरवापर केला. यापैकी सुमारे १३,६६७ कोटी रुपये इतर कंपन्यांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी खर्च करण्यात आले. १२,६९२ कोटी रुपये रिलायन्स ग्रुपच्या इतर कंपन्यांना हस्तांतरित करण्यात आले.एसबीआयने असेही म्हटले आहे की आम्ही या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) कडे तक्रार दाखल करण्याच्या प्रक्रियेत आहोत. याशिवाय, अनिल अंबानींविरुद्ध राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (एनसीएलटी) मुंबई येथे वैयक्तिक दिवाळखोरीची कारवाई देखील सुरू आहे.

पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर:पाहण्यासाठी खुली

पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. आज मनपा आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रभागरचना जाहीर केली .मनपा आयुक्तांनी प्रभाग रचना जाहीर करताना “पुणे महानगरपालिका निवडणूक 2025” असा उल्लेख केला.

या रचनेत ४ नगरसेवकांचे ४० प्रभाग (मतदार संख्या ८४००० मतदार.)असून ५ नगरसेवकांचा १ प्रभाग (मतदारसंख्या १०५०००) आहे.

प्रभाग क्रमांक ३८ हा ५ सदस्यांचा असेल.

नागरिकांना हरकती घेण्यासाठी ३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ०३.०० पर्यंत मुदत राहिल.

नकाशे पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट –

https://www.pmc.gov.in

५ वी महाराष्ट्र राज्य फिनस्विमिंग चॅम्पियनशिप बालेवाडीत संपन्न

पुणे-५ वी महाराष्ट्र राज्य फिनस्विमिंग चॅम्पियनशिप रविवार १७ ऑगस्ट २०२५ रोजी शिव छत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी महाळुंगे पुणे येथे यशस्वीरित्या संपन्न झाली.बाणेर येथील टीपीएसए (तपन पाणिग्रही स्विमिंग अकादमी) मधील १२ विद्यार्थ्यांनी या फिनस्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. तपन कुमार पाणिग्रही आणि सब्यसाची पाणिग्रही यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने एकूण ७ सुवर्ण, ८ रौप्य आणि ४ कांस्य पदके जिंकली.महावीरसिंग पाटील, ध्रुव महावर, सम्राज्ञी शं.जोशी, जागवी सबनानी, अद्विता तु देशमुख, अस्मी चौधरी आणि ओवी परब यांनी अप्रतिम कामगिरी केली.

अंडरवॉटर स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (USAM) द्वारे आयोजित ५ व्या महाराष्ट्र स्टेट फिनस्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये अपवादात्मक क्रीडा भावना दिसून आली. १६ जिल्ह्यांतील २५० हून अधिक स्पर्धकांनी ११२ स्पर्धांमध्ये भाग घेतला. ८ ते ८० वर्षे वयोगटातील, दोन्ही लिंगांच्या खेळाडूंनी कौशल्य, वेग, शक्ती, ताकद, सहनशक्ती आणि खेळाबद्दलची आवड दाखवली.या स्पर्धेचे उद्घाटन प्रसिद्ध पॅरालिम्पियन, अर्जुन पुरस्कार विजेते आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते सुयश जाधव यांच्या हस्ते झाले, ज्यांच्या प्रेरणादायी उपस्थितीने सहभागींना त्यांच्या मर्यादा ओलांडण्यास प्रोत्साहित केले.संपूर्ण स्पर्धेत, जलतरणपटूंनी उल्लेखनीय धैर्य आणि दृढनिश्चय दाखवला, ज्यामुळे प्रत्येक शर्यत ताकद आणि उत्साहाची स्पर्धा बनली.

जीवंत स्पर्धा अधोरेखित केली

या उत्साही स्पर्धेने महाराष्ट्रात फिनस्विमनची वाढती लोकप्रियता अधोरेखित केली आणि वेगाने वाढणाऱ्या जलचर खेळाच्या क्षमतेकडे लक्ष वेधले.या चॅम्पियनशिपचा समारोप एका उत्साहात झाला, ज्यामुळे राज्यभरातील पाण्याखालील खेळांमध्ये फिनस्विमिंगसाठी एक असाधारण उल्लेखनीय यशाचा टप्पा पार पडला.

चतुःसुत्रीच्या जोरावर बांधकाम क्षेत्राचे नियोजन असावे – अर्जुन धवन

निकमार विद्यापीठात ९व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
पुणे, २२ ऑगस्ट: “विचारांची स्पष्टता, शिक्षण, शिस्तबद्धता आणि शाश्वतता या चतुःसुत्रीच्या जोरावर बांधकाम क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविता येतील. भविष्यात खेड्यातील लाखो नागरिक जेव्हा शहरांकडे येतील, त्यावेळी शहराचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे असेल आणि जमीन अधिग्रहणाचा मुद्दा सर्वात ज्वलंत ठरेल,” असे विचार हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी लि.चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अर्जुन धवन यांनी व्यक्त केले.
देशातील बांधकाम क्षेत्रातील पहिले अग्रणी निकमार विद्यापीठातर्फे आयोजित कन्स्ट्रक्शन, रिअल इस्टेट, इन्फ्रास्ट्रक्चर अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंट (ICCRIP) या विषयावरील दोन दिवसीय ९व्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी सीडीआयआरचे महासंचालक अमित प्रोठी, निकमार विद्यापीठाचे अध्यक्ष व चीफ पॅट्रन प्रा. डॉ. विजय गुपचूप, पॅट्रन व कुलगुरू डॉ. सुषमा एस. कुलकर्णी, इंटरिम डायरेक्टर जनरल डॉ. तपश कुमार गांगुली आणि परिषदेचे समन्वयक व संशोधन-विकास विभागाचे अधिष्ठाता डॉ. रजनीकांत राजहंस उपस्थित होते.
अर्जुन धवन म्हणाले, “देशातील या उद्योगात अमूलाग्र परिवर्तन झाले आहे. तंत्रज्ञानाने चालणारे हे क्षेत्र प्रचंड वेगाने बदलत आहे, ज्यामध्ये कार्यक्षमता, नावीन्यता आणि शाश्वतता यांचा समावेश आहे. भारतीय बांधकाम बाजारपेठ २०२५ पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ बनणार असून तिचे मूल्य १.४ ट्रिलियन डॉलर्स असेल. देशात रस्ते आणि मेट्रो नेटवर्कचा विस्तार होणार आहे. त्यामुळे मजबूत राजकीय नेतृत्व तसेच इंजिनियर्स आणि सिटी प्लॅनर्सची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार आहे.”
“स्थापत्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा हा आपल्या जीवनपद्धतीचा कणा आहे. या सुविधांमुळे देशाच्या आर्थिक व सामाजिक आकांक्षांना योग्य दिशा मिळते. या क्षेत्रातील गुंतवणुकीचा आर्थिक विकासावर खोलवर परिणाम होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट स्थापत्य ज्ञान, प्रकल्प समन्वयाची शिस्त आणि टिकाऊपणाची भूमिका अंगीकारणे गरजेचे आहे.”
अमित प्रोठी म्हणाले, “विकसित भारतासाठी २०५० पर्यंत १० ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त खर्च पायाभूत सुविधा व गुंतवणूक सेवांवर होईल. नैसर्गिक आपत्ती व हवामान बदलांना तोंड देण्यासाठी क्षमता वाढविणे, नवीन धोरणे तयार करणे आणि नियोजन-व्यवस्थापन यावर अधिक भर दिला जाईल. यामुळे ३ अब्जाहून अधिक लोकांचे जीवनमान सुधारेल. आपत्तीनंतरच्या पुनर्प्राप्ती आणि कृतीसाठी सरकारी, खाजगी उपक्रम आणि समुदायांची क्षमता वाढविणे गरजेचे आहे.”
डॉ. सुषमा कुलकर्णी म्हणाल्या, “आधुनिक युगात तंत्रज्ञानामुळे लोकांचे जीवन अधिक सुखमय झाले आहे. बांधकाम क्षेत्रातही याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. या क्षेत्रातील संशोधन, केस स्टडी, स्टार्टअप्स, इनोव्हेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणात करता येतो. गुजरातमध्ये झालेल्या पुलाच्या दुर्घटनेत योग्य मेंटेनन्स न केल्याचे कारण समोर आले होते. अशा घटना टाळण्यासाठी सिव्हिल क्षेत्रात तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि नव्या बदलांचा स्वीकार करणे अत्यावश्यक आहे.”
प्रा. डॉ. विजय गुपचूप म्हणाले, “निकमारला २०२२ मध्ये विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करण्यात आला. सतत बदलणाऱ्या या क्षेत्रात विद्यापीठाने उद्योग, अकादमिक क्षेत्र, ज्ञान क्षेत्र, संशोधन आणि इनोव्हेशन यांच्यात समन्वय साधून विद्यार्थ्यांना परिपूर्ण बनविण्यावर भर दिला आहे.”
डॉ. तपश कुमार गांगुली म्हणाले, “लोकांचे जीवन सुचारू व आनंददायी करण्यासाठी बांधकाम क्षेत्राच्या माध्यमातून उत्कृष्ट स्मार्ट सिटींची निर्मिती शक्य आहे. निकमारने आयोजित या परिषदेत विद्यार्थ्यांना संशोधन, धोरण आणि तंत्रज्ञानाची अत्याधुनिक माहिती मिळेल.”
डॉ. रजनीकांत राजहंस यांनी स्वागतपर भाषणात सांगितले की, “या परिषदेत १८ देशांतील २०० हून अधिक संशोधन पेपर सादर केले जात आहेत. सहा प्रमुख श्रेणींवर लक्ष केंद्रित असलेल्या परिषदेत संशोधन, केस स्टडीज, डॉक्टरेट संगोष्ठी, प्रॅक्टिशनर्सचे दृष्टिकोन, उद्योग प्रदर्शन आणि हॅकेथॉनचा समावेश आहे.”
एल अँड टीचे कार्यकारी समिती सदस्य व अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांचे सल्लागार एम. व्ही. सतीश हे ऑनलाइन उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, “देशाच्या जीडीपीमध्ये बांधकाम क्षेत्राचा ८ ते ९ टक्के वाटा आहे.”

ससून रुग्णालयातील गंभीर प्रश्नांवर शिवसेना आक्रमक

पुणे, २२ ऑगस्ट :
पुणेकरांचे जीवन वाचविणारे आणि राज्यातील गरीब रुग्णांचा आधारवड ठरलेले ससून सर्वोपचार रुग्णालय आज बिकट अवस्थेत असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
रुग्णालयातील गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आज शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, जिल्हा अध्यक्ष शिव आरोग्यसेना रमेश क्षीरसागर यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार व अधीक्षक यल्लाप्पा जाधव यांना निवेदन देत इशारा दिला की, “तातडीने उपाययोजना करा अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून आक्रोश आंदोलन उभारेल.”
निवेदनात ठळकपणे पुढील त्रुटी निदर्शनास आणण्यात आल्या :
• औषधांची अनुपलब्धता व रुग्णांना बाहेरून औषधे आणण्याची सक्ती
• निवासी डॉक्टरांच्या तक्रारी न सोडवणे
• रुग्णालयातील अस्वच्छता, दुर्गंधी व मेडिकल वेस्ट व्यवस्थापनाचा अभाव
• शौचालयांची बिकट अवस्था व नातेवाईकांसाठी सुविधांचा अभाव
• पोस्टमार्टमला होणारा प्रचंड विलंब व नातेवाईकांकडून वस्तू/पैशांची मागणी
• सुरक्षारक्षकांची लाचखोरी व रुग्ण नातेवाईकांशी अरेरावी
• आयसीयू बेडची कमतरता, ज्यामुळे गरीब रुग्णांचे जीव धोक्यात

यासोबतच शिवसेनेने प्रत्येक वॉर्डात 24 तास वॉर्डबॉयची नेमणूक, दान केलेल्या 4 अॅम्ब्युलन्स तातडीने सुरू करणे, ईमर्जन्सी वॉर्ड क्रमांक 40 येथे कायम वॉर्डबॉयची तैनाती, तसेच शवागार परिसराचे सुशोभीकरण व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली.

शहरप्रमुख संजय मोरे यांनी स्पष्ट इशारा दिला की,
“जनतेच्या जिवाशी थेट संबंधित असलेल्या या मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास शिवसेना जनतेसह रस्त्यावर उतरून आक्रोश आंदोलन छेडेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी रुग्णालय प्रशासनावर राहील.”
यावेळी उपशहरप्रमुख प्रशांत राणे, आबा निकम, संघटक राजेंद्र शिंदे, जावेद खान, विधानसभाप्रमुख उत्तम भुजबळ, राजेश मोरे, अनंत घरत, पराग थोरात, दत्तात्रय घुले, अमर मारटकर, मुंकूद्र चव्हाण, बाळासाहेब मोडक, नागेश खडके, जुबेर शेख, राहुल शेडगे, उत्तम भुजबळ, शैलेश जगताप, अशिष आठळ, रहीम शेख, अनिल दामजी, मुरलीधर विलकर, सुनील रासकोडा, परवेश राव, प्रविण डोंगरे, पदमा सरोटे, सुरज खंडाळे, रोहन गायकवाड, निलेश वाघमारे, स्वप्नील जोगदंड, जितु जठार, विजय पालवे, अनिल परदेशी, गिरीश गायकवाड, मोहन पांढरे, मनोज वासु, अजय परदेशा, ओंकार मारणे महिला आघाडीच्या रोहिणी कोल्हाळ , अल्पना मोरे, अमृत पठार, सोनाली जुनवणे, सवीता गोसावी, नाझ इनामदार, जयश्री वैद्य, आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेशोत्सव या राज्य महोत्सवांतर्गत भजनी मंडळांना मिळणार भांडवली अनुदान- आशिष शेलार

राज्यभरातील १८०० भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी मिळणार रु.२५,०००/- भांडवली अनुदान

मुंबई, दि. २२ ऑगस्ट : यावर्षीपासून प्रथमच गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आलेला आहे. यानिमित्ताने राज्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रमांचे आायोजन करण्यात येत आहे.
याचाच एक भाग म्हणून राज्याभरातील १८०० भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी मिळणार रु.२५,०००/- भांडवली अनुदान वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.
याबाबतचे ऑनलाईन अर्ज दिनांक २३ ऑगस्ट, २०२५ ते ०६ सप्टेंबर, २०२५ या कालावधीत https://mahaanudan.org या वेबपोर्टलवर उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त भजनी मंडळांनी या अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.

पत्रकारांच्या पीएफ आणि पेन्शनची प्रकरणे त्वरीत मार्गी लावण्यात येतील

भविष्य निर्वाह निधी आयुक्त अमित वसिष्ट यांनी दिले पत्रकारांच्या शिष्यमंडळाला आश्‍वासन

पुणे, २२ ऑगस्ट : भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि निवृत्ती वेतन (पेन्शन) संदर्भातील पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्‍नांवर त्वरीत लक्ष घालून,संबंधित प्रकरणे लवकरात लवकर सोडविण्याचे आश्‍वासन पुणे विभागाचे भविष्य निर्वाह निधी आयुक्त अमित वसिष्ट यांनी दिले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने, पत्रकारांच्या शिष्टमंडळांने शुक्रवारी (ता.२२) अमित वसिष्ट यांची भेट घेतली. पत्रकारांच्या संघटनेमार्फत पहिल्यांदाच या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. भेटी दरम्यान, भविष्य निर्वाह निधी आयुक्त (टू) सुरज पाटील, भविष्य निर्वाह निधी आयुक्त (टू) सुदर्शन भालाधरे , भविष्य निर्वाह निधी आयुक्त (टू) दुर्गेशकुमार उपस्थित होते. भेटीचे नियोजन पत्रकार प्रसाद पाठक यांनी केले होते. पत्रकार संघाचे सरचिटणीस मंगेश फल्ले, खजिनदार दिलिप तायडे आणि संघाच्या पदाधिकार्यांच्या वतीने अमित वसिष्ट यांना स्मृतिचिन्ह आणि अभिजात मराठी भाषेवर आधारित पत्रकार संघांची, ‘वृत्तभाषा’ ही स्मरणिका भेट देण्यात आली.
पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाच्या वतीने आयुक्तांना, पत्रकारांना पीएफ आणि पेन्शन संदर्भात भेडसावणार्या अडचणींसदर्भातील माहिती देण्यात आली. तसेच पीएफ आणि पेन्शन संदर्भातील अडचणी सोडविण्याची विनंती भविष्य निर्वाह निधी आयुक्तांना केली. अमित वसिष्ट यांनी देखील पत्रकारांच्या अडचणीं समजून घेतल्या आणि त्या सोडविण्यासाठी समन्वयक नेमण्यात येईल. त्याद्वारे तांत्रिक बाबींची पूर्तता करून पत्रकारांची पीएफ आणि पेन्शन संदर्भातील प्रकरणे मार्गी लावण्यात येईल,असे आश्‍वासन दिले.

रशियन तेल खरेदीने भारताची नफेखोरी:भारतीय कंपन्या अमेरिकन पैशाने तेल खरेदी करून जास्त किमतीला विकतात-ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो


वॉशिंग्टन-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी भारतावर रशियाकडून तेल खरेदी करून नफा कमावल्याचा आरोप केला आहे.गुरुवारी माध्यमांशी बोलताना नवारो म्हणाले की, भारत रशियाकडून स्वस्त दरात कच्चे तेल खरेदी करत आहे, भारतीय कंपन्या ते शुद्ध करून जगाला जास्त किमतीत विकत आहेत. यामुळे रशियाला युक्रेन युद्धासाठी पैसे मिळत आहेत, तर भारत नफा कमवत आहे.ते म्हणाले की, आम्हाला वस्तू विकून मिळणाऱ्या पैशातून ते रशियन तेल खरेदी करतात, ज्यामुळे तेल कंपन्या खूप पैसे कमवतात. त्यामुळे, शुल्क लावणे आवश्यक आहे.

तथापि, त्यांनी असेही म्हटले की युद्धातून शांततेचा मार्ग भारतातून जातो.

रशियाचे तेल खरेदी करण्यासाठी भारतावर २५% अतिरिक्त कर

ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर २५% अतिरिक्त कर लादला आहे, जो २७ ऑगस्टपासून लागू होईल.

यापूर्वी, ट्रम्प यांनी जुलैमध्ये भारतावर २५% कर लादला होता, ज्यामुळे येत्या काळात अमेरिकेत भारतीय वस्तूंच्या आयातीवर ५०% कर भरावा लागेल.

प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जेफ्री सॅक्स यांनी भारतावर मोठ्या प्रमाणात कर लादण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की हा निर्णय अमेरिकन परराष्ट्र धोरणासाठी हानिकारक आहे.यापूर्वी, माजी अमेरिकन राजदूत निक्की हेली यांनी इशारा दिला होता की जर अमेरिका-भारत संबंधांमधील बिघाड थांबवला नाही तर ती एक धोरणात्मक चूक असेल.

जर विश्वास तुटला तर २५ वर्षांचे कष्ट वाया जातील असा इशारा हेली यांनी दिला. भारताला लोकशाहीवादी आणि महत्त्वाचा भागीदार मानणे महत्त्वाचे आहे, असे त्या म्हणाल्या.

युक्रेन युद्धाला प्रोत्साहन देत असल्याचा अमेरिकेचा आरोप भारताने आधीच फेटाळून लावला आहे. गुरुवारी रशियामध्ये पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले की, भारत हा रशियन तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार नाही, तर चीन आहे.

भारतातील रशियन राजदूत रोमन बाबुस्किन यांनी २० ऑगस्ट रोजी सांगितले की, भारताला रशियन कच्च्या तेलावर सुमारे ५% सूट मिळत आहे.चीननंतर भारत हा रशियन तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. युक्रेन युद्धापूर्वी, भारत रशियाकडून फक्त ०.२% (प्रतिदिन ६८ हजार बॅरल) तेल आयात करत होता. मे २०२३ पर्यंत ते ४५% (प्रतिदिन २० लाख बॅरल) पर्यंत वाढले, तर २०२५ मध्ये जानेवारी ते जुलै या कालावधीत, भारत रशियाकडून दररोज १७.८ लाख बॅरल तेल खरेदी करत आहे.गेल्या दोन वर्षांपासून, भारत दरवर्षी १३० अब्ज डॉलर्स (११.३३ लाख कोटी रुपये) पेक्षा जास्त किमतीचे रशियन तेल खरेदी करत आहे.

‘दगडूशेठ’ च्या श्री पद्मनाभ स्वामी मंदिर सजावटीचे उद्घाटन बुधवारी (दि.२७)

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; अनंत श्री विभूषित जगद्गुरु श्री रामानुजाचार्य श्री झालरिया पीठाधीश्वर श्री श्री १००८ प.पू. स्वामी घनश्यामाचार्य महाराज (चित्रकुट, मध्यप्रदेश) यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना ; सायंकाळी विद्युतरोषणाईचे उद्घाटन

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३३ व्या वर्षी गणेशोत्सवात केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. गणेश चतुर्थीला बुधवार, दिनांक २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी मध्यप्रदेश चित्रकुट येथील अनंत श्री विभूषित जगद्गुरु श्री रामानुजाचार्य श्री झालरिया पीठाधीश्वर श्री श्री १००८ प.पू. स्वामी घनश्यामाचार्य महाराज यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर, मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद््घाटन सायंकाळी ७ वाजता होईल, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण,मंगेश सूर्यवंशी, यतीश रासने, सौरभ रायकर, तुषार रायकर,अमोल चव्हाण, विनायक रासने यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बुधवारी (दि.२७) प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी ८.३० वाजता मुख्य मंदिरापासून फुलांनी सजविलेल्या रथातून श्रीं ची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. विविध प्रकारच्या आकर्षक फुलांनी रथ सजविण्यात येणार आहे. प्रतिष्ठापनेनंतर उत्सवमंडपात दुपारी १२ पासून भाविकांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घ्यावा. तर, सायंकाळी विद्युत रोषणाई व सजावटीचे उद््घाटन होणार आहे.

भारतातील केरळ राज्याची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम येथे भगवान विष्णूंना समर्पित असे एक हिंदू मंदिर म्हणजे पद्मनाभस्वामी मंदिर. हे मंदिर श्री वैष्णव परंपरेत श्री विष्णूंचे पवित्र निवासस्थान मानले जाणारे १०८ दिव्य देसमांपैकी म्हणजेच निवास स्थानांपैकी एक आहे. अत्यंत पवित्र असलेल्या या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवात साकारण्यात येत आहे.

पद्मनाभ स्वामी मंदिराच्या प्रतिकृतीत ५ थरांचा गोपुर असणार आहे. त्यामध्ये कृष्णलीला, रामायण, सप्तऋषी, घोडे, हत्ती, सिंह साकारण्यात येणार आहेत. तर, गाभा-यात विष्णू लक्ष्मी, शिवपार्वती, श्रीकृष्ण आणि नृसिंह यांच्या मूर्ती असतील. मुख्य मखराच्या वरच्या बाजूस अष्टकोनी भागामध्ये भगवान पद्मनाभ स्वामींची भव्य निद्रिस्त मूर्ती साकारण्यात येणार आहे. नानाविध वैशिष्टयांनी परिपूर्ण असलेल्या मंदिराची प्रतिकृती सुमारे १०० फूट इतकी असेल.

प्रतिकृतीचा आकार १२० फूट लांब, ९० फूट रंद आणि १०० फूट उंच असणार आहे. यामध्ये ३० भव्य खांब असून ५०० देवी-दैवता, ऋषीमुनी यांच्या मूर्ती असणार आहेत. गाभारा सुवर्ण रंगाने सजलेला असून संपूर्ण छताचा भाग अष्टकोनी स्वरूपात साकारण्यात येईल. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत असून भाविकांना लांबून सहजतेने श्रीं चे दर्शन घेता येईल. कलादिग्दर्शक विनायक रासकर यांनी मंदिराचे काम, मंडप व्यवस्था काळे मांडववाले यांनी केली आहे.

*ॠषिपंचमीनिमित्त ३१ हजार महिलांचे अर्थवशीर्ष पठण
गुरुवार, दिनांक २८ ऑगस्ट रोजी पहाटे ६ वाजता ॠषिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे ३१ हजार महिला सामुदायिकरीत्या अर्थवशीर्ष पठण करणार आहेत. यावेळी पुणे विभागाच्या सहधर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर उपस्थित राहणार आहेत. रात्री १० ते १२ वाजेपर्यंत हरी जागर च्या माध्यमातून महाराष्ट्रातील वारकरी बंधू वारकरी गजर करीत गणरायाचरणी सेवा अर्पण करणार आहेत. उत्सवांतर्गत सूर्यनमस्कार, अग्निहोत्र, वेदपठण, महिला हळदीकुंकू असे विविध कार्यक्रम होणार आहेत. दररोज पहाटे ५ पासून महाअभिषेक पूजा होणार असून सकाळी ८ ते दुपारी १२ यावेळेत मिलींद राहुरकर शास्त्री हे गणेशयाग आणि दुपारी १२ ते ४ यावेळेत दाक्षिणात्य पद्धतीने नटराजशास्त्री यांच्या उपस्थितीत गणेशयाग होणार आहे. भाविकांना स्वहस्ते अभिषेक पहाटे ५ ते सायंकाळी ५ यावेळेत मंडपात करता येणार आहेत.

*उत्सवमंडपात दि. ५ सप्टेंबर सामुहिक सत्यविनायक पूजेचे आयोजन
उत्सवमंडपात दिनांक ५ सप्टेंबर रोजी सामुहिक सत्यविनायक पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सत्यविनायक पूजा ही भगवान शंकर व पार्वती मातेला ब्रह्मा, विष्णू, महेश, आदिशक्ती, सूर्य या पाच देवतांनी सांगितली असल्याचे सत्यविनायक पोथीत सांगण्यात आले आहे. सत्यविनायक पूजेला अनन्यसाधारण महत्व असून ते भाविकांपर्यंत यामाध्यमातून पोहोचविण्यात येणार आहे.

उत्सवात श्रीं ना दररोज विविध पदार्थांचा भोग लावण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी भक्तांना प्रसाद म्हणून त्याचे वितरण केले जाईल. मंदिर व उत्सव मंडप परिसरात येणा-या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. दररोज पहाटे ५ ते ६ यावेळेत विविध शाळांतील विद्यार्थी अथर्वशीर्ष पठण करणार आहेत. एकादशीच्या दिवशी दि. ३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते ५ यावेळेत मंत्र जागर होणार आहे. तर, अनंत चतुर्दशीला श्रींची वैभवशाली सांगता मिरवणूक श्री गणनायक रथातून निघणार आहे.

*गणेशोत्सवात जय गणेश आरोग्यसेवा अभियानांतर्गत ३ ठिकाणी केंद्र, मोफत रुग्णवाहिका सेवा आणि आयसीयू
जय गणेश आरोग्यसेवा अभियानांतर्गत जय गणेश प्रांगणासह मंदिर परिसरात ३ ठिकाणी सुसज्ज अशी २४ तास मोफत वैद्यकीय मदत केंद्र सिटी पोस्ट, गणपती मंदिर व मांगल्य मंगल कार्यालय येथे असणार आहेत. याशिवाय भारती हॉस्पिटल रिसर्च सेंटर धनकवडी, सूर्या सह्याद्री हॉस्पिटल, जहांगिर हॉस्पिटल, रुबी हॉल क्लिनिक, सिल्व्हर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, डॉ.डी.वाय. पाटील हॉस्पिटल पिंपरी, ससून सर्वोपचार रुग्णालय, संचेती हॉस्पिटल येथे मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे. गणपती मंदिराजवळ महाराष्ट्र राज्य उपसंचालक आरोग्य सेवा पुणे तर्फे २४ तास मोफत व्हेंटिलेटर/ आयसीयू ९ बेडची सुविधा देण्यात येईल.

एन.एम.वाडीया ह्रदय रुग्णालय पुणे स्टेशन येथे मोफत कार्डियाक रुग्णवाहिका सेवा विनामूल्य मिळणार आहे. तर, ट्रस्टच्या ११ रुग्णवाहिका उत्सवकाळात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड परिसरात विनामूल्य स्वरुपात कार्यरत असणार आहेत. वैद्यकीय मदत केंद्रावर तसेच रुग्णवाहिकांच्या येथे मोफत औषधे देण्यात येणार असून आरोग्यविषयक सर्वतोपरी मदत भाविकांना देण्याची सुविधा ट्रस्टने उपलब्ध करुन दिली आहे.

*गणेशभक्तांसाठी ५० कोटींचा विमा व उत्सवावर तब्बल १५० कॅमे-यांचा वॉच व ४ एलईडी स्क्रिनची सोय

पुणे शहर मनपा, पिंपरी-चिंचवड मनपा यांसह कॅन्टोनमेंट बोर्ड हद्दींतर्गत गणेशभक्तांसाठी तब्बल ५० कोटींचा विमा ट्रस्टतर्फे काढण्यात आला आहे. यामध्ये चेंगराचेंगरी, अतिरेकी हल्ला वा हवाई हल्ला झाल्यास विम्याचे सुरक्षाकवच मिळणार आहे. यामध्ये अपघाती मृत्यु झाल्यास प्रति व्यक्तीला ५ लाख रुपये, अपघातात अंशत: अपंगत्त्व आल्यास २ लाख रुपये आणि अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्ती ५० हजार रुपयांपर्यंत औषधाचा खर्च देण्यात येईल. उत्सवकाळात ही विम्याची सुविधा असणार आहे.

श्रीं चे दर्शन भाविकांना एलईडी स्क्रिनद्वारे घेता यावे, याकरिता ४ एलईडी स्क्रिन लावण्यात येणार आहेत. उत्सव मंडपात लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर व मूळचंद दुकानाशेजारी अशा तीन एलईडी स्क्रिन तसेच बुधवार चौक येथे एक स्क्रिन लावण्यात येणार आहेत. श्रीं चे आॅनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव देखाव्याच्या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच फरासखाना चौक, बाबू गेनू गणपती, कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर, सिटी पोस्ट अशा परिसरात देखील सीसीटिव्ही कॅमेरे असणार आहेत. याशिवाय मंदिर परिसरात कायमस्वरुपी असलेल्या कॅमे-यांचा वॉच उत्सवावर असणार आहे. त्यामुळे तब्बल १५० कॅमे-यांद्वारे या परिसरावर पोलीस यंत्रणेसोबत ट्रस्टची २५० पुरुष व महिला यांची खासगी सुरक्षाव्यवस्था लक्ष ठेवणार आहे.

समाजाला समृद्ध करण्यासाठी ज्योतिषांनी कार्यरत राहावे

पुणे : भालचंद्र ज्योतिर्विद्यालय आयोजित ४३ व्या दोन दिवसीय अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचा  समारोप २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी  झाला. महालक्ष्मी मंगल कार्यालय (मित्रमंडळ,पर्वती) येथे झालेल्या अधिवेशनात  देशभरातील नामवंत ज्योतिर्विद सहभागी झाले होते.दोन्ही दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत विविध चर्चासत्रे, मार्गदर्शन सत्रे आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. देशातील १२ संस्थांचा या अधिवेशनाच्या आयोजनात सहभाग होता.ज्योतिष प्रसारासाठी कार्य करण्याचे आवाहन वक्त्यांनी या प्रसंगी केले.२२ ऑगस्ट रोजी अधिवेशनाचा दुसरा दिवस विविध ज्योतिष विषयक सत्रांनी गाजला.या सत्राचे उद्घाटन डॉ.सुनीता पागे,डॉ.सीमा देशमुख,मोहन दाते,सिद्धेश्वर मारटकर,मोहन फडके,शुभंगिनी पांगारकर,मधुसूदन घाणेकर,शशिकांत ओक,नितीन गोठी,चारुशीला कांबळे,सोपान बुडबाडकर आणि जानकी पाचारणे यांच्या उपस्थितीत झाले.या दिवशी कै. शीलाताई पाचारणे स्मृती आदर्श ज्योतिष शिक्षिका पुरस्कार सौ.जयश्री बेलसरे यांना,सौ. पुष्पा शेवाळे यांना शिक्षक रत्न पुरस्कार तर चित्रकार ज्ञानेश सोनार यांना ग्रहांकित जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.श्री नाटेकर हे अध्यक्षस्थानी होते.आयोजक चंद्रकांत शेवाळे,सौ.पुष्पा शेवाळे यांचा सत्कार करण्यात आला.सौ.गौरी केंजळे आणि सौ.अर्चना जोगदेव यांनी सूत्रसंचालन केले. 

अध्यक्षीय समारोप करताना,श्री नाटेकर म्हणाले,’ज्योतिष हे उपयुक्त माध्यम असून त्यातून सकारात्मकता  आणि प्रगतीचे दिशादिग्दर्शन व्हावे.समाजाला समृद्ध करण्यासाठी ज्योतिषांनी कार्यरत राहावे.ज्योतिषांनी आधुनिक माध्यमे वापरावीत,त्यातून प्रभाव निर्माण करावा.अधिवेशनातील विषयात वैविध्य आणले पाहिजे.४३ वर्षे हे अधिवेशन होत आहे,ही अतुलनीय गोष्ट आहे.प्रत्येकाच्या आयुष्यात सुख,समाधान,भरभराट यावी,यासाठी सर्वांनी योगदान दिले पाहिजे. 

 अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष अरुण हुपरीकर आणि डॉ.नीलेश कुलकर्णी होतेपहिल्या दिवशी २१ ऑगस्ट रोजी उदघाटन सोहळा उल्हास पाटकर,विजय जकातदार,अविनाश मग्गीरवार,राज कुंवर, नवनीत मानधनी,चंद्रकला जोशी,रोहित वर्मा,नवीनभाई शहा,व.दा.भट,उमेश कुलकर्णी व कैलास केंजळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.या वेळी उल्हास पाटकर यांचा अमृतमहोत्सव निमित्त सपत्निक सत्कार करण्यात आला.तसेच विजय जकातदार दांपत्याला चंद्रपुष्प पुरस्कार आणि रमेश पलंगे यांना वास्तूमहर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आले.सौ.गौरी केंजळे यांनी सूत्रसंचालन केले. ज्योतिषविषयक पुस्तकांचे प्रकाशनही या प्रसंगी झाले.

निस्वार्थ भूमिका भक्तीमध्ये महत्त्वाची-ज्येष्ठ साहित्यिक डाॅ.श्रीपाल सबनीस

: अनुबंध सेवा प्रतिष्ठानच्या वतीने  गणेश भूषण आणि विघ्नहर्ता कार्यकर्ता पुरस्कार प्रदान
पुणे: निस्वार्थ भूमिका ही भक्तीमध्ये फार महत्त्वाची आहे. जे अध्यात्म भौतिकता समृद्ध करते ते खरे अध्यात्म आहे.  गणपती ही केवळ शोभेची, बुद्धीची देवता नाही, ती सर्वांचे कल्याण करणारी देवता आहे. त्याचे रूप विश्वात्मक आहे. उत्सवातून परंपरा जोपासण्याचे काम कार्यकर्ते करतात. कार्यकर्त्यांचा त्याग आणि निस्वार्थ सेवा महत्वाची आहे. संस्कृती ही विचाराने, भक्ती जाणिवेने श्रीमंत व्हावी. समाज सात्विक बनावा. या भूमिकेतून समस्त गणेशोत्सव मंडळे काम करतात,असे मत ज्येष्ठ साहित्यिक डाॅ.श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

अनुबंध सेवा प्रतिष्ठानच्या वतीने  गणेश भूषण आणि विघ्नहर्ता कार्यकर्ता पुरस्काराचे आयोजन सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी उद्योजक कृष्णकुमार गोयल, कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष कौस्तुभ जाधव,कार्याध्यक्ष अथर्व जाधव आणि प्रकाश ढमढेरे उपस्थित होते.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांना गणेश भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. टिळक रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत सणस, विशाल मित्र मंडळ वडारवाडीचे अध्यक्ष मुकेश पवार, सत्यविर मित्र मंडळ शिवदर्शनचे उमेश वैद्य, श्रमदान मित्र मंडळ गंजपेठेचे मोहन सावंत, अजिंक्य मित्र मंडळ मॉडेल कॉलनीचे उमेश शेवते यांना विघ्नहर्ता कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. साऊंड इलेक्ट्रिकल्स जनरेटर्स असोसिएशन चे अध्यक्ष बबलू रमझानी, उपाध्यक्ष शैलेश गायकवाड कार्याध्यक्ष राजू कांबळे यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.

श्रीपाल सबनीस म्हणाले, गणपती ही बुद्धीची देवता आहे. तिला सेवेच्या देवतेमध्ये रूपांतरित करण्याचे काम महेश सूर्यवंशी यांनी दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या माध्यमातून केले आहे. निस्वार्थ सेवेचे प्रकल्प या दगडूशेठच्या माध्यमातून होत आहेत.  त्यामुळे दगडूशेठचा कृतिशील देव मला महत्त्वाचा वाटतो. जात धर्म न पाहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारुन गरजूंसाठी त्यांनी काम केले आहे. गणपतीची अनेक मंदिरे आहेत, परंतु दगडूशेठचे महत्व आणि मूल्य वेगळे आहे. असेही त्यांनी सांगितले.

श्रीकांत शेटे म्हणाले, गणेशोत्सव हा धार्मिक उत्सव आहे. समाजाने एकत्र येणे आणि त्यातून प्रबोधन होणे हे उत्सवातून अपेक्षित आहे. परंतु उत्सव सोडून आता कोण पुढे, कोण मागे याची चर्चा जास्त होत आहे. क्रमांक हा व्यवस्थेचा भाग आहे आणि व्यवस्थेला धक्का लागू नये याची काळजी आपण घ्यायला हवी. आपणच आपला सन्मान ठेवला तर जगात सन्मान मिळेल.

कृष्णकुमार गोयल म्हणाले, सगळीच गणेशोत्सव मंडळे धांगडधिंगा करत नाहीत किंवा डीजे लावत नाहीत, परंतु नकारात्मक गोष्टीला जास्त प्रसिद्धी मिळते.  सगळ्या गणेशोत्सव मंडळांनी चांगल्या पद्धतीने कोणताही दुराभिमान न ठेवता उत्सव साजरा करावा.

महेश सूर्यवंशी म्हणाले, गणेशोत्सव आपण जोरात साजरा करतोय. परंतु गणेशाकडे, त्याच्या स्वरूपाकडे आपले लक्ष नाही. आपल्या संतानी त्याला वंदन केले आहे. गणेश ही एकमेव देवता ज्याचा उत्सव १७५ देशांमध्ये साजरा होत आहे. त्याचा उत्सव आपण इतक्या उत्साहात साजरा करतोय त्या गणेशाचे स्वरूप आपण समजून घेतले तर ‘आवाजाची मर्यादा’ ओलांडली जाणार नाही.

मानाच्या गणपती मंडळांनी लक्ष्मी रस्त्याने त्यांच्यावेळेप्रमाणेच जावे. त्यांनी त्यांच्या मिरवणुकीच्या ताफेचे आत्मपरीक्षण करावे. तर ज्या मंडळांना सकाळी सात वाजता जायचे आहे त्यांना इतर रस्त्यांनी जाऊ द्यावे, जेणेकरून ही मिरवणूक वेळेत संपेल आणि पुणेकरांना कोणतीही अडचण होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.  पराग ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले. अशोक जाधव यांनी प्रास्ताविक केले.