Home Blog Page 344

प्राधिकरणाची अनाधिकृत होर्डिंगवर धडक कारवाई,अन पीएमआरडीएच्या तिजोरीत ४८ लाखाची भर

पुणे (दि.२५) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील अनधिकृत होर्डिंगवर सोमवारपासून (दि.२१) कारवाई करण्यात येत आहे. यात हवेली आणि मुळशी तालुक्यात तीन ठिकाणी एकाच वेळी अनधिकृत होर्डिंगवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे संबंधितांनी पुढील कारवाई टाळण्यासाठी प्राधिकरणाकडे ४८ लाखांची रक्कम जमा केली आहे.

हवेली तालुक्यातील वडकी, मुळशी तालुक्यातील हिंजवडी येथून कारवाईस सुरूवात करण्यात आली. या कारवाईमुळे होर्डींगधारक व ॲडव्हरटायझिंग कंपनी यांनी धसका घेतला असून प्राधिकरणाच्या विकास परवानगीकडे अंतिम चलणे भरण्यास सुरुवात झाली आहे. २२ एप्रिलपर्यंत एकूण १० होर्डींगधारकांनी अंतिम चलणाची रक्कम ४८ लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा केली आहे. संबंधित कारवाई पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दिपक सिंगला, पोलिस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे, सह आयुक्त डॉ. दिप्ती सुर्यवंशी-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. कारवाईवेळी तहसीलदार रविंद्र रांजणे, तहसीलदार सचिन मस्के, अभियंता विष्णू आव्हाड, दिप्ती घूसे, प्रशांत चौगले, ऋतुराज सोनवणे, गणेश जाधव, तेजस मदने यांच्यासह स्थानिक बंदोबस्त तैनात होता.

प्राधिकरण क्षेत्रात अवकाळी पाऊस, वादळी वारे आदीमुळे होर्डीगपासून धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याची दखल घेऊन यापुढे नियमित अनधिकृत होर्डींगवर कारवाई करण्यात येणार आहे. वर्दळीच्या व रहदारीच्या ठिकाणाचे धोकादायक, मर्यादितपेक्षा उंचीचे, दुबार संरचना होर्डिंग काढून घ्यावेत. तसेच होर्डींगधारकांनी अनधिकृत होर्डींगला परवानगी घेण्यात घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अन्यथा एकतर्फी निष्कासन कारवाई करण्यात येणार आहे. तसेच प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय कोणतेही नवीन आकाशचिन्ह उभारले जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन प्राधिकरणाच्या सहआयुक्त (प्र) डॉ. दिप्ती सुर्यवंशी-पाटील यांनी केले आहे.

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ प्रभात तरुण मित्र मंडळ आणि डेक्कन जिमखाना नागरिक मंचच्या वतीने निदर्शने

पुणे : पहलगाम येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात निष्पाप पर्यटक हिंदू बंधवांना गोळ्या घालून ठार केले गेले. या निर्दयी भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ अपूर्व सोनटक्के, केतकी देशपांडे, बाळासाहेब गिराम यांच्या पुढाकाराने प्रभात तरुण मित्र मंडळ आणि डेक्कन जिमखाना नागरिक मंच च्या वतीने कमला नेहरू पार्क, प्रभात रस्ता येथे तीव्र निदर्शने करण्यात आली.

काश्मीर, पहलगाम येथिल हिंदु पर्यटकांवरील इस्लामी दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी पाक पंतप्रधान शहाबाज शरीफ आणि पाक लष्कर प्रमुख असिम मुनीर व पाकिस्तानच्या झेंड्याचे दहन करुन त्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत निदर्शने करण्यात आले.

या मध्ये महिलांनी उस्फूर्त सहभाग घेतला. आणि स्त्री शक्तीचे संगठन दिसून आले. केतकी देशपांडे, सुवर्णा ऋषि, रंजना नाईक, किमया ढेकणे ,अलका पेशवे ,भक्ती साठे ,माधवी अगरवाल, अपूर्व सोनटक्के, बाळासाहेब गिराम ,विवेक देव,हर्षल मोरे,योगेश जोगळेकर अजिंक्य मेहता, प्रदीप देशपांडे, मिलिंद टकले, पुष्कर लिमये तसेच कामाला नेहरू पार्क मधील नागरिकांचा सहभाग दिसून आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत भूमिपूजन

सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. 25: निरोगी नागरिक हाच राज्याच्या प्रगतीचा पाया असून, आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासोबतच सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध असून याकरीता सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

कुटुंब कल्याण भवन येथे आयोजित राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत भूमिपूजन आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत राज्यातील नवीन ४३ आपला दवाखान्यांचे लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक अमगोथू श्री रंगा नायक, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आदी उपस्थित होते.

राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत आणि नवीन ४३ आपला दवाखान्यांच्या माध्यमातून नव्याने भर पडणाऱ्या आरोग्य सुविधांमुळे राज्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट, सक्षम आणि गतिमान होईल, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्यामुळे एका गरोदर महिलेला जीव गमवावा लागल्याच्या प्रकरणात चौकशी होऊन दोषींवर निश्चित कठोर कारवाई केली जाईल. अशा घटना पुन्हा घडू नये, अशी प्रणाली आणि कठोर नियम सर्व रुग्णालयांना लागू करण्यासाठी राज्य शासन एक नवे धोरण लवकरच राज्यात लागू करणार आहे. या धोरणानुसार कोणतेही रुग्णालय नागरिकाला अत्यावश्यक आरोग्य सेवेपासून वंचित ठेवणार नाही. गरजू नागरिकांना वैद्यकीय मदत मिळालीच पाहिजे, अशी राज्य शासनाची भूमिका असून लवकरच राज्यात रुग्णालयांसाठी ‘नो डिनायल पॉलिसी’ लागू करणार आहे. राज्य शासन रुग्णालयांना जागेसह सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देते.

जागतिक हिवताप दिनानिमित्त चांगले काम करण्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देऊन श्री. पवार म्हणाले, अधिकारी, कर्मचाऱ्यासह नागरिकांनी नियमित व्यायाम केला पाहिजे. संतुलित आहार घेतला पाहिजे. आपले मानसिक आरोग्य चांगले राखून निरोगी नागरिक हाच राज्याच्या प्रगतीचा पाया आहे या विचाराने सर्वांनी काम करावे, नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा दिली पाहिजे. असेही श्री. पवार म्हणाले.

आरोग्य मंत्री श्री.आबिटकर म्हणाले, आरोग्य सेवा पुरविण्यासाठी पुणे हे राज्यातील दुसरे सर्वात महत्त्वाचे ठिकाण आहे. पुण्यात आरोग्य विभागाची अनेक राज्यस्तरीय कार्यालये आहेत. राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीमुळे आरोग्य विभागाची एकाच छताखाली येणार आहेत. यामुळे आरोग्य विभागाची सर्व कार्यालय एकाच ठिकाणी आल्यानंतर प्रशासकीय कामांमध्ये गतिमानता आणि दर्जेदार पायाभूत सुविधा आणि आरोग्य सुविधा देण्यास मदत होणार आहे.

अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज या इमारतीमध्ये प्रशिक्षण हॉल, व्हिडिओ कॉन्फरन्स हॉल, अभिलेख कक्ष, वाहनतळ, आदी पायाभूत सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे, या इमारतीचे काम नियोजित वेळेत पूर्ण करावे. आज लोकार्पण करण्यात आलेल्या नवीन आपला दवाखान्यांपैकी पुणे शहरात सात दवाखाने आहेत. या दवाखान्यांच्या माध्यमातून शहरी भागात झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब नागरिकांना अधिक गतिमान आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, असे श्री. आबिटकर म्हणाले.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, सार्वजनिक आरोग्य विभागाचे काम समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. आरोग्य विभागाने आतापर्यंत विविध महत्त्वाच्या मोहिमा यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागातही आपल्या सेवा पुरविल्या आहेत. या पुढील काळातही आरोग्य विभाग चांगली कामगिरी करून लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवेल, असा विश्वास डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमानंतर जागतिक हिवताप दिनानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर त्यात सहभागी झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक अमगोथू श्री रंगा नायक यांनी केले.

यांत्रिक वस्त्र धुलाई सेवा केंद्र आणि रेण्वीय निदान प्रयोगशाळा सुरु करण्याची आरोग्यमंत्र्यांची घोषणा
सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने रुग्णालयांमध्ये स्वच्छता, आहार आणि रुग्णालयात वापरल्या जाणाऱ्या वस्त्रांची स्वच्छता हे अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. त्यामुळे राज्यातील ८ परिमंडळातील ५९३ आरोग्य संस्थांमध्ये यांत्रिक वस्त्र धुलाई सेवा केंद्र लवकरच सुरु करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे राज्यामध्ये साथरोग उद्रेक काळात जीवाणू व विषाणू चाचणी जलद गतीने करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे येथे रेण्वीय निदान प्रयोगशाळा उभारणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी केली.

देश दुखवटा पाळत असताना सत्कार सोहळे करून घेताना भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही? : अतुल लोंढे

मुंबई, दि. २५ एप्रिल २०२५
जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी २६ निष्पाप पर्यटकांची हत्या केल्याने देशात दुखवटा पाळला जात आहे. संपूर्ण देश या घटनेने हादरला असून जनतेत तीव्र रोष आहे. अशा दुःखद प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नेते व मंत्री सत्कार सोहळे करून घेत आहेत हे अत्यंत संताप आणणारे कृत असून सत्कार सोहळे करून घेताना भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना अतुल लोंढे म्हणाले की, अमरावती मध्ये २६ तारखेला भाजपा नेत्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री दत्ता भरणे, आ. गोपीचंद पडळकर आणि इतर नेत्यांचा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा सोहळा होत आहे. पहलगामच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या चितेची राख विझलेली नाही. या नागरिकांच्या घरी आजही दुःखाचे वातावरण आहे ते अजून या धक्क्यातून सावरले नाहीत. परंतु भाजपा नेते मात्र हार तुरे घेत आहेत हीच भाजपाची संस्कृती आहे का? राम शिंदे हे संवैधानिक पदावर आहेत, या नेत्यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा तरी विचार करायला हवा होता. दुसऱ्याच्या घरी दुःख आहे, त्याचे या भाजपा नेत्यांना काहीच देणेघेणे नाही, असेही अतुल लोंढे म्हणाले.

कुणाल कामराला अंतिम सुनावणीपर्यंत अटकेपासून अभय; चेन्नईला जाऊन जबाब नोंदवा,पोलिसांना हायकोर्टाचा आदेश

सरकारच्या इशाऱ्यानुसार गुन्हा दाखल

मुंबई-मुंबई उच्च न्यायालयाने स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मोठा दिलासा आहे. न्यायालयाने कुणाल कामराने त्याच्यावरील गुन्हा रद्द करण्यासंबंधी दाखल केलेली याचिका सुनावणीसाठी दाखल करून घेतली आहे. तसेच ही याचिका प्रलंबित असेपर्यंत त्याला अटक न करण्याचेही आदेश दिलेत. कोर्टाच्या या आदेशामुळे कुणाल कामराला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्यावर मोठा दिलासा मिळाला आहे.

कुणाल कामराने एका स्टँडअप कॉमेडी शोमध्ये एक विडंबन केले होते. त्यात त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नामोल्लेख टाळत त्यांना ‘गद्दार’ म्हणून हिनवले होते. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध मुंबईतील खार पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी त्याला अनेकदा समन्स पाठवले. पण तो चौकशीसाठी हजर झाला नाही. त्यानंतर त्याने आपल्यावरील एफआयआर रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने शुक्रवारी त्याची याचिका सुनावणीसाठी दाखल करून घेत याचिका प्रलंबित असेपर्यंत त्याला अटक न करण्याचे आदेश दिले.

न्यायमूर्ती सारंग कोतवाल व श्रीराम मोडक यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने या प्रकरणी ट्रायल कोर्टाला आरोपपत्राची दखल न घेण्याचे निर्देश दिलेत. एवढेच नाही तर मुंबई पोलिसांनाही आपला तपास सुरू ठेवत गरज भासली तर चेन्नईला (कामरा राहत असलेल्या विल्लुपुरमच्या जवळ) जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने कुणाल कामराचा जबाब नोंदवण्याचे आदेश दिलेत. आदेशाची सविस्तर प्रत अजून उपलब्ध व्हायची आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे खंडपीठाने 16 एप्रिल रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यावेळी खंडपीठाने कुणाल कामराला अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते. यावेळी कोर्टाने पोलिसांनी त्याला बजावलेल्या कलम 35(3) BNSS अंतर्गत जारी केलेल्या समन्सचाही दाखला दिला होता. या समन्सनुसार, संबंधित व्यक्तीला अटक करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट होते, असे कोर्टाने म्हटले होते.

कामराचे वकील नवरोज सीरवाई यांनी यासंबंधी असा युक्तिवाद केला होता की, प्रस्तुत वादग्रस्त विनोदी क्लिप ही संविधानाच्या कलम 19(1)(अ) अंतर्गत भाषण स्वातंत्र्याच्या अंतर्गत येते. ती भाषण स्वातंत्र्याच्या अपवादाच्या कक्षेत येत नाही. त्यामुळे कामरा विरुद्ध दाखल करण्यात आलेला एफआयआर हा एका राजकीय पक्षाच्या इशाऱ्यानुसार दाखल करण्यात आला आहे. सीरवाई यांनी या प्रकरणी इम्रान प्रतापगढी विरुद्ध गुजरात राज्य खटल्याचा दाखला दिला होता. त्यात सु्प्रीम कोर्टाने भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले होते. तसेच अलोकप्रिय मत व्यक्त करणाऱ्या व्यक्तींच्या अधिकारांचे समर्थन करण्यासाठी न्यायालय आणि पोलिसांना त्यांचे कर्तव्य लक्षात आणून दिले होते.

मुंबईतील खार पोलिस स्टेशनमध्ये स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्याविरुद्ध 3 नवीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही प्रकरणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत दिलेल्या वादग्रस्त विधानाशी संबंधित आहेत. 29 मार्च रोजी मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली तक्रार जळगावच्या महापौरांनी दाखल केली आहे, तर उर्वरित दोन एफआयआर नाशिकमधील 2 वेगवेगळ्या व्यावसायिकांनी दाखल केली आहेत.

या प्रकरणात, मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला चौकशीसाठी 3 समन्स बजावले आहेत. त्याचप्रमाणे, कामरा यांच्याविरुद्धची विशेषाधिकार भंगाची नोटीस महाराष्ट्र विधान परिषदेतही स्वीकारण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे लिहिल्यानंतर वादात सापडलेल्या विनोदी कलाकार कुणाल कामराला पोलिसांनी 31 मार्च रोजी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. पोलिसांनी आतापर्यंत त्यांना दोन समन्स बजावले आहेत.

36 वर्षीय स्टँडअप कॉमेडियनने आपल्या शोमध्ये एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीवर टीका केली होती. कामराने ‘दिल तो पागल है’ चित्रपटातील एका गाण्याचे विडंबन केले होते. त्यात शिंदे यांना गद्दार म्हटले होते. त्याने गाण्याद्वारे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीवर विनोदी शैलीत भाष्यही केले होते. त्यानंतर शिंदे समर्थकांनी मुंबईतील द युनिकॉन्टिनेंटल हॉटेलची तोडफोड केली. कुणालचा कार्यक्रम याच हॉटेलमध्ये झाला होता.

कामराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, 23 मार्चच्या रात्री, शिवसेना शिंदे गटाच्या समर्थकांनी मुंबईतील खार परिसरातील हॅबिटॅट कॉमेडी क्लबची तोडफोड केली. शिंदे म्हणाले, ‘याच व्यक्तीने (कामरा) सर्वोच्च न्यायालय, पंतप्रधान, अर्णब गोस्वामी आणि काही उद्योगपतींवर भाष्य केले होते. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. ते एखाद्यासाठी काम करण्याबद्दल आहे.”

दरम्यान, कुणाल कामरा यांनी शिंदेंबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागणार नसल्याचे सांगितले आणि मुंबईतील ज्या ठिकाणी कॉमेडी शो रेकॉर्ड करण्यात आला त्या ठिकाणी झालेल्या तोडफोडीची टीका केली.

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना अटक

नवी दिल्ली -ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना 2000 सालच्या एका मानहानीच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्यांच्यावर दिल्लीचे विद्यमान नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांचा अवमान केल्याचा आरोप आहे.

मेधा पाटकर या आपल्या ‘नर्मदा बचाओ’ आंदोलनासाठी ओळखल्या जातात. त्यांनी 25 नोव्हेंबर 2000 रोजी यासंबंधी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी व्ही के सक्सेना यांच्यावर गंभीर आरोप केला होता. सक्सेना एका बाजूला नर्मदा बचाओ आंदोलनाला पाठिंबा देतात. पण दुसरीकडे त्यांची स्वयंसेवी संस्था गुजरात सरकारच्या सरदार सरोवर प्रकल्पाला पाठिंबा देते, असे त्या म्हणाल्या होत्या. सक्सेना यांनी नर्मदा बचाओ आंदोलन समितीला देणगी म्हणून दिलेला धनादेश वठला नसल्याचा आरोपही त्यांनी या प्रकरणी केला होता.

व्ही के सक्सेना यांनी या आरोपांनंतर त्यांच्याविरोधात अवमाननेचा दावा दाखल केला होता. गतवर्षी मे महिन्यात दंडाधिकारी कोर्टाने यासंबंधी मेधा पाटकर यांना अवमाननेसंबंधी दोषी घोषित केले होते. तसेच त्यांना 1 जुलै रोजी 5 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षाही सुनावली होती. पण अतिरिक्त सत्र न्यायालयाने 29 जुलै 2024 रोजी ही शिक्षा रद्दबातल करत त्यांना जामीन मंजूर केला होता.

त्यानंतर त्यांनी दिल्ली हायकोर्टात आपल्यावरील अटकेची संभाव्य कारवाई 2 आठवड्यांसाठी स्थगित करण्याची याचिका दाखल केली होती. या याचिकेत प्रोबेशन बाँडचा उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर हायकोर्टाने त्यांना सत्र न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश दिले होते. पण ऐनवेळी त्यांना प्रोबेशन बाँड दाखल करण्यात अपयश आल्यामुळे अखेर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

दिल्ली न्यायालयाने बुधवारी त्यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. त्यानुसार दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी त्यांना अटक केली. आज त्यांना साकेत कोर्टात हजर केले जाणार आहे.

मेधा पाटकर या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या आणि पर्यावरणवादी आहेत. त्या आपल्या नर्मदा बचाओ आंदोलनासाठी प्रसिद्ध आहेत. सामाजिक न्याय, पर्यावरण संरक्षण आणि विस्थापितांच्या हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. नर्मदा खोऱ्यातील धरणांमुळे प्रभावित होणाऱ्या आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी आंदोलन उभारले. त्यांच्या कार्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, त्यांना राईट लाइव्हलीहूड अवॉर्डसह अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मेधा पाटकर यांचे कार्य सामाजिक समानता आणि शाश्वत विकासासाठी प्रेरणादायी आहे.

सैन्याचे सर्चिंग सुरू असताना झाले दोन दहशतवाद्यांच्या घरात स्फोट…

शुक्रवारी सकाळी काश्मीरमध्ये झालेल्या स्फोटात लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, त्रालमधील आसिफ शेख आणि अनंतनागमधील बिजबेहरा येथील आदिल ठोकर यांच्या घरांवर शोध मोहीम सुरू आहे.कारवाईदरम्यान दोन्ही घरांमध्ये स्फोटके आढळून आली. सैनिक सुरक्षिततेसाठी मागे हटले आणि याच दरम्यान स्फोट झाला.

या दोन्ही दहशतवाद्यांची नावे पहलगाम हल्ल्याशी जोडलेली आहेत.
काश्मीरमधील बंदीपुरा येथील कुलनार भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती आहे. शुक्रवारी सकाळी पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवरील (एलओसी) अनेक भागात गोळीबार केला. भारतीय सैन्याने लगेचच प्रत्युत्तर दिले.शोध पथकाने सांगितले की, दहशतवाद्याच्या घरात स्फोटके ठेवण्यात आली होती.

पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संरक्षण यंत्रणा आता अ‍ॅक्शन मोडवर आहे. एनआयएने (राष्ट्रीय तपास यंत्रणा) जम्मू-काश्मीर पोलिसांबरोबर मिळून तपास सुरू केला आहे.या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांमध्ये आसिफ शेख याचं देखील नाव समोर आलं होतं. त्यानंतर पोलीस व एनआयएचं एक पथक आसिफच्या त्राल (काश्मीर) घरी धडकलं. पोलीस आसिफच्या घरी तपास करत असतानाच त्यांना घरात काही संशयित वस्तू व स्फोटकं आढळली. त्याचदरम्यान या घरात मोठा स्फोट होऊन घर बेचिराख झालं.
पोलीस त्राल येथील आसिफ शेख याच्या घरात तपास करत असतानाच त्यांना तिथे काही संशयित वस्तू आढळल्या होत्या. पोलिसांनी सांगितलं की घरात आम्हाला स्फोटकं दिसली होती जी आम्ही जप्त करण्याआधीच स्फोट झाला. घरात स्फोटकं पाहिल्यानंतर पुढचा धोका ओळखून पोलीस व संरक्षण दलाचे जवान मागे हटले. तेवढ्यात घरात मोठा स्फोट झाला आणि या स्फोटात आसिफचं घर बेचिराख झालं. अतिरेक्यांनी पोलीस व गुप्तचर यंत्रणा या घरी धडकतील आणि तपास करतील याचा अंदाज घेऊन आधीच इथे स्फोटकं (उदा. टाईम बॉम्ब) ठेवली असणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे.



दमदार उत्तर देणे अपेक्षीत,तुमची शक्ती दाखवून द्या… मोहन भागवतांची मोदी सरकारला सूचना

मुंबई- -गुरुवारी मुंबईत झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात RSS संरसंघचालक मोहन भागवत यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत विधान केले. ते म्हणाले की, देश शक्तिशाली आहे हे दाखवण्याची वेळ आली आहे असे सांगितले. ही लढाई कोणत्याही समाजांमधली नाही तर धर्म आणि अर्धमाची आहे. काश्मीरमध्ये दहशतवादांच्या कृत्याचा सर्वांकडून निषेध केला जात आहे. ते म्हणाले, रावणाला मारण्याशिवाय रामाकडे पर्याय नव्हता.

काश्मीरमध्ये कट्टरपंथीयांनी जे केले त्याचा प्रत्येकजण निषेध करत आहे. भागवत यांनी त्यांच्या भाषणात एक उदाहरण दिले की रावण हा भगवान शिवाचा भक्त होता पण तो अशा काही कारवायांनी वेढला होता ज्यांचे स्पष्टीकरण देऊन निराकरण होऊ शकत नव्हते, म्हणून प्रभू रामचंद्रांना त्याचा वध करावा लागला.पुढे ते म्हणाले की, असे काही लोक आहेत, ज्यांना समजावून सांगून काहीही होणार नाही. त्यांना धडा शिकवला पाहिजे. मला आशा आहे की हे लवकरच साध्य होईल. पहलगाममध्ये लोकांचा धर्म विचारून मारले गेले, हिंदू असे कधीच करत नाहीत. असेही मोहन भागवत म्हणाले.

मोहन भागवत म्हणाले, शत्रुत्व आणि वैर हा आपला स्वभाव नाही, पण मार खाणे हा देखील देखील आपला स्वभाव नाही. जर तुमच्याकडे शक्ती असेल तर तुम्ही ती दाखवली पाहिजे. अशा वेळी शक्ती दाखवली पाहिजे… हे जगाला संदेश देते की जो सत्तेचा सामना करतो तो बलवान असतो. हा लढा समुदायांमध्ये नाही तर चांगल्या आणि वाईटामध्ये आहे.

काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी जे केले त्याचा सर्वजण निषेध करत आहेत. काश्मीरमध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारल्यानंतर मारण्यात आले. हिंदू हे कधीच करणार नाहीत. या घटनेने आम्हाला दुःख झाले आहे, असे भागवत म्हणाले.

राहुल गांधींनी विचारता पहलगाम सुरक्षेचा प्रश्न,भारत सरकारकडून चूक मान्य

नवी दिल्ली : पहलगाम आतंकी हल्ल्याबाबत आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीतील माहिती आता समोर येऊ लागली आहे,या बैठकीत राहुल गांधी यांनी पहलगाम ला सुरक्षा व्यवस्था का नव्हती? काश्मीर मधील पर्यटन स्थळावरील पूर्वी असलेली सुरक्षा व्यवस्था आता कुठे गायब झाली असे प्रश्न करताच गृहमंत्री अमित शहा यांनी चूक झाल्याचे मान्य केले. ते म्हणाले, जर काहीच घडले नसते तर आपण इथे का बसलो असतो?
बहुतेक राजकीय पक्षांनी गुप्तचर यंत्रणेच्या अपयशाचा आणि तेथे योग्य सुरक्षा तैनातीचा मुद्दा उपस्थित केला. ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथे सुरक्षा कर्मचारी का नव्हते असा प्रश्नही राहुल गांधी यांनी विचारला..सर्वपक्षीय बैठक जवळपास दोन तास चालली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे , राहुल गांधी, टीएमसीचे सुदीप बंदोपाध्याय,सपाचे राम गोपाल यादव, आरजेडीचे प्रेम चंद गुप्ता, संजय सिंह, कृष्ण देव रायुलु , त्रिचि शिवा, श्रीकांत शिंदे हे नेते उपस्थित होते. या बैठकीत विरोधकांनी तीन प्रमुख प्रश्न सरकारला केले. त्यात पहिला प्रश्न होता की हे गुप्तचर यंत्रणांचे अपयश आहे की नाही? सुरक्षेमध्ये मोठी चूक झालेली आहे की नाही?
यावर सरकारने आपली चूक मान्य केली आहे. त्यांनी सरकारची चूक झाली आहे. जर काही झालं नसतं तर आपण इथं एकत्र कशासाठी बसलो असतो असं सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. शिवाय ज्या ठिकाणी फायरिंग झाली त्या ठिकाणी सैन्य किंवा सुरक्षा दल का नव्हतं असा ही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सरकारने सांगितलं की दरवर्षी हा मार्ग जूनमध्ये खोलला जातो. ज्या वेळी अमरनाथ यात्रा असते. मात्र या वर्षी टूर ऑपरेटर्सने सरकारला कोणतीही माहिती न देता जून महिन्यात बुकिंग घेतली होती.
20 एप्रिलपासून पर्यटकांना इथं आणलं जात होते. शिवाय स्थानिक प्रशासनालाही याबाबत काही माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे सुरक्षा दलाच्या जवानांना तैनात करता आलं नाही.असं सरकारने स्पष्ट केलं आहे. जून महिन्यात अमरनाथ यात्रा सुरू होतेय त्यावेळी इथं जवान तैनात केले जातात.

त्याच बरोबर सिंधू पाणी कराराला स्थगिती देण्याचा निर्णय सरकारन घेतला आहे. पण हे पाणी रोखण्याचे किंवा साठवण्याचे कोणतेही साधन नाही. अशा वेळी या स्थगितीचा काय फायदा असा प्रश्नही केला गेला. त्यावर सरकार कठोर पावलं उचलत आहे हा संदेश देण्याचा हा प्रयत्न असल्याचं सरकारने सांगितलं.

“भारताने दहशतवादाविरुद्ध एकत्रितपणे लढावे यावर सर्वांचे एकमत झाले आहे. भारताने भूतकाळात दहशतवादाविरुद्ध कडक कारवाई केली आहे आणि भविष्यातही करत राहील. आयबी, गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती दिली. ती कशी घडली आणि कुठे चूक झाली.

दहशतवादाविरुद्धच्या या लढाईत ते सरकारसोबत असल्याचे सर्व पक्षांनी सांगितले.सर्व राजकीय पक्षांनी हा संदेश दिला आहे. सर्व पक्षांच्या नेत्यांनी एका सुरात म्हटले आहे की, सरकार कोणतेही पाऊल उचलेल, आम्ही त्याचे समर्थन करू. दहशतवाद विरोधी सर्व कृती आणि भविष्यात करायच्या सर्व कृतींसाठी सरकारसोबत एकता सर्वांनी व्यक्त केली.

पावसाळ्यापूर्वी लोहगावमधील रस्त्यांची व इतर कामे पूर्ण करा; आमदार बापूसाहेब पठारे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

पुणे: लोहगाव भागातील नागरी समस्या सोडवण्यासाठी (ता. २४) नगर रोड वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयात आमदार बापूसाहेब पठारे यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली.

बैठकीत लोहगाव येथील पठारे वस्ती रस्ता, लोहगाव-निरगुडी रस्ता, डी. वाय. पाटील रस्ता, उत्तरेश्वर रस्ता, हरणतळे रस्ता, पवार वस्ती रस्ता, काळभोर वस्ती रस्ता आणि वाघमारे वस्ती रस्ता या महत्त्वाच्या रस्त्यांच्या दुरुस्ती, तसेच ड्रेनेज व पाणीपुरवठा लाईनच्या कामांच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

आमदार पठारे यांनी मागील काही महिन्यांपूर्वी या भागाची पाहणी केली होती. त्यावेळी अनेक रस्त्यांवर पाणीपुरवठा आणि ड्रेनेज लाईन नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी महानगरपालिकेच्या संबंधित विभागांशी समन्वय साधत ही कामे हाती घेण्याच्या सूचनाही केल्या होत्या. या भागातून पेट्रोल पाइप लाईन जात असल्यामुळे आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच कामे सुरू होतील, असे बैठकीत नमूद करण्यात आले.

बैठकप्रसंगी, पुणे महानगरपालिकेचे साहाय्यक आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, ड्रेनेज विभाग तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. पठारे यांनी पावसाळ्यापूर्वी ही सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

“नागरिक बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून रस्ते, पाणीपुरवठा आणि ड्रेनेज यंत्रणेची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण होतील यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून कामे करून घेणार आहे” असे पठारे यांनी बोलताना सांगितले.

बैठकीच्या प्रारंभी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

पहलगाम: सर्वपक्षीय बैठक 2 तास चालली:राहुल गांधी आणि विरोधकांचा सरकारच्या प्रत्येक कृतीला पाठिंबा, हवाई दलाने युद्ध सराव सुरू केला

पहलगाम हल्ल्याबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संसदेच्या अ‍ॅनेक्स इमारतीत सर्वपक्षीय बैठक २ तास चालली . यामध्ये गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.बैठकीत पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी दोन मिनिटे मौन पाळण्यात आले.

सर्व पक्षांच्या नेत्यांनी सांगितले- आम्ही सरकारच्या प्रत्येक निर्णयासोबत आहोत.
बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, सर्वपक्षीय बैठक चांगली झाली. सर्व नेत्यांनी एकमताने सांगितले की, आम्ही सीसीएस (कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी) च्या निर्णयासोबत आहोत. सर्व नेत्यांनी भविष्यात सरकारने घेतलेल्या निर्णयांना पाठिंबा दर्शविला. आम्ही स्पष्ट केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, दहशतवादाबाबत सरकारचे धोरण शून्य सहनशीलतेचे आहे. सर्व पक्षांच्या नेत्यांनी म्हटले आहे की ते आता आणि भविष्यात सरकारने घेतलेल्या निर्णयांना पाठिंबा देतील.

सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर राहुल गांधी म्हणाले – पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सर्वांनी निषेध केला. सरकारला कोणतीही कारवाई करण्यासाठी विरोधी पक्षाने पूर्ण पाठिंबा दिला आहे. राहुल गांधी शुक्रवारी काश्मीरमधील अनंतनागला भेट देतील. तिथे तो हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांना भेटेल.
आपचे संजय सिंह – सर्व पक्षांनी दहशतवादी छावण्या नष्ट करण्यासाठी सरकारकडून कारवाईची मागणी केली.तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय- सुरक्षेतील त्रुटींवर चर्चा झाली, दहशतवादाचा सामना करण्यासाठी सर्व पक्ष सरकारसोबत आहेत.केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू- सरकारने नेत्यांना दहशतवादाविरुद्ध कारवाईचे आश्वासन दिले आहे. आयबी आणि गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी राजकारण्यांना या चुकीची माहिती दिली. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पावले उचलली जात आहेत. सर्व पक्षांनी सांगितले की ते सरकारसोबत आहेत आणि दहशतवादाच्या विरोधात आहेत.

तत्पूर्वी, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गुरुवारी पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा तात्काळ प्रभावाने स्थगित केल्या.परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा २७ एप्रिलपासून रद्द करण्यात आले आहेत, त्यामुळे त्यांनी भारत सोडावा. ज्यांना वैद्यकीय व्हिसा मिळाला आहे त्यांना २९ एप्रिल २०२५ पर्यंत भारत सोडावा लागेल.परराष्ट्र मंत्रालयानेही भारतीयांना पाकिस्तानचा प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी उद्या श्रीनगरला जात आहेत.गुरुवारी दुपारी भारताने आयएनएस सुरत युद्धनौकेवरून या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. चाचणी यशस्वी झाली. जमिनीवरून समुद्रात हल्ला करण्याची चाचणी यशस्वीरित्या पार पडली.यापूर्वी, भारताच्या प्रत्युत्तराच्या भीतीने, पाकिस्तानने २४-२५ एप्रिल रोजी कराची किनाऱ्यावरील त्यांच्या विशेष आर्थिक क्षेत्रात (EEZ) जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी करण्याची अधिसूचना जारी केली होती.पाकिस्तानी हवाई दलाने गुरुवारी रात्र दहशतीत घालवली. कराची एअरबेसवरून भारताच्या सीमेवरील पाक हवाई दलाच्या तळांवर १८ लढाऊ विमाने पाठवण्यात आली.

सिंधूचे पाणी थांबवल्याच्या वृत्ताने पाक मध्ये मोठी खळबळ,इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर गोंधळ

0

पाकिस्तान म्हणाला- जर सिंधूचे पाणी थांबवले तर ते ॲक्ट ऑफ वॉर ठरेल,भारताच्या पाच मोठ्या निर्णयानंतर पाकिस्तानची व्यापार बंदीची घोषणा,अन केल्या पाच घोषणा

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर जमावाने घातला गोंधळ


पहलगाम हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या कठोर निर्णयांना प्रत्युत्तर म्हणून, पाकिस्तानने दोन्ही देशांमधील सर्व द्विपक्षीय करार स्थगित करण्याची चर्चा केली आहे. यामध्ये १९७२ च्या शिमला कराराचाही समावेश आहे. आज झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या (NCS) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.या बैठकीनंतर काही वेळातच, पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर जमावाने गोंधळ घातला, काही लोकांनी गेटवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला आणि भारतविरोधी घोषणा दिल्या.
पाकिस्तानमधील राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. एक दिवस आधी, भारताने सिंधू पाणी करार पुढे ढकलण्यासह 5 मोठे निर्णय घेतले होते.जर भारताने सिंधू पाणी करार थांबवला तर तो ॲक्ट ऑफ वॉर म्हणजेच युद्धाचा गुन्हा मानला जाईल, असे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षेला येणाऱ्या कोणत्याही धोक्याला सर्व प्रदेशात जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असे पाकिस्तानने म्हटले आहे. आम्ही कोणत्याही दहशतवादी कारवायांचा निषेध करतो.पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’च्या वृत्तानुसार, एनसीएसच्या बैठकीत असे म्हटले गेले की वक्फ विधेयक भारतात जबरदस्तीने मंजूर करण्यात आले आहे, हा मुस्लिमांना बाजूला ठेवण्याचा प्रयत्न आहे.

भारताच्या पाच मोठ्या निर्णयानंतर पाकिस्तानची व्यापार बंदीची घोषणा,अन केल्या पाच घोषणा
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दहशतवादाविरोधात आता भारताने कठोर पाऊले उचलायला सुरूवात केली आहे. भारताने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा बंद केला. तसेच 48 तासांमध्ये पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचा आदेश दिला. त्यावर पाकिस्ताननेही भारताविरोधात सहा निर्णय घेतले आहेत.
सर्व भारतीय मालकीच्या किंवा भारतीय संचालित विमान कंपन्यांसाठी पाकिस्तानचे हवाई क्षेत्र तात्काळ बंद करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. तसेच अटारी वाघा बॉर्डर पोस्ट तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतासोबत होणारा व्यापारही बंद करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे.
पाकिस्तानने कोणते निर्णय घेतले?

भारतासोबत सुरू असलेला व्यापार बंद. भारताच्या माध्यमातून इतर कोणत्याही देशासोबत व्यापार नाही
भारतीयांचा सार्क व्हिसा रद्द करणार.
भारतीय उच्चायुक्तालयातील लष्कर सल्लागारांना भारतात परतावं लागणार.
वाघा अटारी बॉर्डर बंद.
इस्लामाबादमधील भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांची संख्या 30वर आणणार.
भारतीय विमानांसाठी पाकिस्तानी एअरस्पेस बंद.
पाकिस्तानविरुद्ध भारताचे निर्णय

सिंधू पाणी करार स्थगित .
पाकिस्तानी नागरिकांसाठी भारतीय व्हिसा बंद .
पाकिस्तानी दूतावासातील आकार कमी करण्याचा आदेश.
अटारी वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद राहणार .
भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालय बंद .
मोदींचा दहशतवाद्यांना इशारा

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदा जाहीर भाष्य केलं. हा हल्ला करून भारतीय आत्म्यावरच हल्ला करण्याचं दुःसाहस करणाऱ्या दहशतवाद्यांना जोरदार दणका मिळेल, कल्पनाही करता येणार नाही अशी शिक्षा दहशतवाद्यांना देण्यात येईल असं मोदींनी ठणकावलं. बिहारच्या मधुबनी इथे सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी ही गर्जना केली. दहशतवाद्यांची उरली सुरली आश्रयस्थानंही नष्ट करण्याची वेळ आली आहे असं मोदी म्हणाले.

भारतातून पाकिस्तानात कोणता माल पाठवला जातो?

दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या विविध प्रकारची फळे आणि भाजीपाला अशा अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांची भारतातून पाकिस्तानात निर्यात केली जाते. यामध्ये बटाटे, कांदे आणि लसूण यांचा समावेश आहे. तसेच डाळ, हरभरा आणि बासमती तांदूळही भारतातून पाकिस्तानात पाठवले जातात. याशिवाय पाकिस्तान भारतातून आंबा, केळी यांसारखी अनेक हंगामी फळे आयात केली जातात.

भारतीय चहा जगभरात प्रसिद्ध, पाकिस्तानात मोठी निर्यात

भारतीय चहा जगभरात प्रसिद्ध आहे. आसाम आणि दार्जिलिंगमधून सुगंधित चहाची पानेही पाकिस्तानात पाठवली जातात. याशिवाय भारत पाकिस्तानला मिरची, हळद, जिरे असे विविध प्रकारचे मसाले पाठवतो. यासोबतच भारतातून पाकिस्तानला निर्यात होणाऱ्या इतर वस्तूंमध्ये सेंद्रिय रसायने, औषधी, साखर आणि मिठाई यांचा समावेश होतो.

पाकिस्तानातून भारतात काय येते?

पाकिस्तानातून भारतात येणाऱ्या वस्तूंमध्ये सिमेंट, रॉक सॉल्ट, मुलतानी माती, कापूस, चामडे, काही वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. याशिवाय पेशावरी चप्पल आणि लाहोरी कुर्तेही पाकिस्तानातून भारतात आयात केले जातात.

अटारी मार्ग हा पाकिस्तानसाठी एकमेव जमीन व्यापार मार्ग

अमृतसरपासून अवघ्या 28 किलोमीटर अंतरावर असलेले अटारी हे भारतातील पहिले लँड पोर्ट आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील व्यापार अटारी-वाघा सीमेवरून होतो, त्यामुळे 120 एकरांवर पसरलेला आणि थेट राष्ट्रीय महामार्ग-1 शी जोडलेला हा चेक पॉईंट व्यापारात, विशेषतः अफगाणिस्तानमधून होणाऱ्या आयातीत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

अटारी-वाघा कॉरिडॉरवरील व्यापाराची स्थिती काय?

अटारी-वाघा कॉरिडॉरवरील व्यापारात गेल्या काही वर्षांत अनेक चढ-उतार झाले आहेत. जेथे 2017-18 आणि 2018-19 मध्ये व्यापार सुमारे 4100-4300 कोटी रुपयांचा होता. त्याच वेळी, ते 2019-20 मध्ये 2772 कोटी रुपये आणि 2020-21 मध्ये 2639 कोटी रुपयांपर्यंत खाली आले. 2022-23 मध्ये, व्यापार आणखी घसरला आणि फक्त 2257.55 कोटी रुपये राहिला. तर 2023-24 मध्ये मोठी झेप घेत दोन्ही देशांमधील व्यापार 3886 कोटी रुपयांपर्यंत वाढला. 2023-24 मध्ये या मार्गावरून 6,871 ट्रकने प्रवास केला आणि 71,563 प्रवाशांच्या येजा केल्याच्यी नोंद झाली आहे.

पर्यटकांवरील हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी लागेल!

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून गनबोटे आणि जगदाळेंना श्रद्धांजली

पुणे:काश्मीर मध्ये पर्यटकांवर क्रूरपणे हल्ला करणारे दहशतवादी आणि त्यांच्या म्होरक्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल असा, इशारा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिला. दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या पुण्यातील कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या घरी ना. पाटील यांनी भेट देऊन श्रद्धांजली वाहिली, तसेच कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळी ना. पाटील म्हणाले की, हल्ल्याची कुटुंबियांकडून हकिकत ऐकून मन हेलावून गेलं. दहशतवाद्यांनी ज्या क्रूरपणे पर्यटकांना लक्ष्य केलंय, त्यामुळे संपूर्ण देशच नव्हे; तर जगभरात संतापाची लाट आहे. माननीय नरेंद्र मोदीजी अतिशय संवेदनशील नेतृत्व आहेत. त्यामुळे या घटनेचे गांभीर परिणाम दहशतवादी आणि त्यांच्या सर्व आकांना भोगावे लागतील.

पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ ‘मिशन मोड’वर

आणखी २३२ पर्यटक महाराष्ट्रात परतणार

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

१८३ प्रवासी महाराष्ट्रात परतले, आज २३२ येणार

पुणे (प्रतिनिधी)

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना आणण्याची मोहीम आणखी वेग घेत असून शुक्रवारी २३२ प्रवाशांसाठी विशेष विमानाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. इंडिगो कंपनीचे हे विमान शुक्रवारी दुपारी श्रीनगरवरून महाराष्ट्राकडे झेपावणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून गेल्या ४८ तासांपासून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ महाराष्ट्रातील प्रवाशांना परत आणण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करत असून विशेष विमानांची व्यवस्था करत आहे. गुरुवारी मोहोळ यांच्या प्रयत्नातून १८३ प्रवासी महाराष्ट्रात परतले असून आज शुक्रवारी २३२ प्रवासी महाराष्ट्राकडे येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या प्रवाशांना परतण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली असून राज्य सरकार या विमानांचा खर्च करणार आहे.

केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले ‘महाराष्ट्रातील सर्व पर्यटकांना आणण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू असून जम्मू ते श्रीनगर हा रस्ता बंद असल्याने काही पर्यटक जम्मू येथे अडकलेले आहेत. शिवाय रेल्वेने गेलेल्या प्रवाशांनाही रेल्वे गाड्या रद्द झाल्याचा फटका बसला असून महाराष्ट्रातील सर्व पर्यटकांना श्रीनगरमार्गे आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. नागरिकांचे अजूनही जम्मू-काश्मीरच्या विविध भागातून फोन कॉल्स येत असून त्यांची व्यवस्था केली जात आहे.

पुतणीचे लग्न काही तासांवर; मंत्री मोहोळ मात्र वॉररुममध्येच !

केंद्रीय मंत्री मोहोळ यांची पुतणी अश्विनी हिचा आज (शुक्रवार) विवाह असून गेले काही दिवसापासून मोहोळ कुटुंबियांकडून याची जोरदार तयारी केली जात आहे. मात्र असे असले तरी गेल्या तीन दिवसांपासून मोहोळ स्वतः वॉररूममध्येच व्यस्त आहेत. काश्मीरमध्ये अडकलेल्या नागरिकांचे येणारे फोन, त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क आणि आवश्यक ती मदत करणे यातच मोहोळ स्वतः व्यस्त आहेत. त्यामुळे एकीकडे मोहोळ कुटुंब ‘लग्नघर’ असताना स्वतः मात्र महाराष्ट्रातील नागरिकांना काश्मीरमधून परत आणण्याच्या ‘मिशन’ वरच असल्याचे पाहायला मिळाले.

काश्मिर येथे अडकलेल्या पुण्यातील ६५७ पर्यटकांचा जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. २४ : जम्मू काश्मीर येथे अडकलेल्या ६५७ पर्यटकांनी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षास संपर्क साधला असून २७ एप्रिल २०२५ पर्यंत एकूण १४८ पर्यटक पुण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली आहे.
आज सकाळी १० वाजता पुण्यात विमानाने ११ प्रवासी पोहचले असून आणखीन १९ प्रवासी विमानाने येत आहेत. २५ एप्रिल रोजी ७७ तर २६ एप्रिल रोजी १२ प्रवासी विमानाने येणार आहेत. २७ एप्रिल रोजी २९ पर्यटक रेल्वेने येणार आहेत. नियंत्रण कक्ष सर्व पर्यटकांच्या संपर्कात असून पर्यटकांकडून माहिती घेण्याची कार्यवाही सुरू आहे, असेही जिल्हाधिकारी श्री.डूडी यांनी कळविले आहे.