Home Blog Page 3243

तुकाराम मुंडेंच्या कारभारावर जोरदार टीका -पुणे महापालिका मुख्य सभा (व्हिडीओ -भाग 1 )

0

पुणे-बिबवेवाडी -अप्पर इंदिरानगर येथे झालेला अपघात आणि पीएमपीएमएल मधून अपंग सेवकांना मुख्य संचालक तुकाराम मुंडे यांनी घरी बसविल्याचा आरोप ,त्याबरोबर 6 महिन्याचा आगाऊ पगार देवून ११० लोकांची परस्पर भरती केल्याचा आरोप अशा विविध मुद्द्यांवर आजच्या महापालिका मुख्य सभेत मुंडे यांच्यावर असंख्य सभासदांनी प्रश्नांची झोड उठविली . पण नेहमीप्रमाणे  मुंडे याही मुख्य सभेला हजर नव्हतेच . त्यांनी आपल्या अधिकाऱ्याला प्रतिनिधी म्हणून पाठविले होते .. नगरसेवक अविनाश बागवे , अविनाश साळवे आणि विपक्ष नेता चेतन तुपे पाटील यांचा … पहा भाग 1 … क्रमशः 

पुण्याच्या पाणीपुरवठ्यात तब्बल साडेसहा टीएमसी कपातीचे आदेश …

0

पुणे : शहरात चोवीस तास पाणीपुरवठा करण्याच्या योजनेचे घोडे चौखूर उधळत  असताना ,यंदा भरपूर पाऊसझालेला असताना , शासनाने पुणे महापालिकेला २०२१ पर्यंत वार्षिक ११.५० टीएमसी पाणी मंजूर केले असताना ,पुणे महापालिकेला वार्षिक ८.१९ टीएमसी पाणीपुरवठा करण्याचे  आदेश जलसंपदा विभागाने दिले आहे. यामुळे सध्याच्या पाणीपुरवठ्यात तब्बल साडे सहा टीएमसीपेक्षाही अधिक कपात करावी लागणार आहे. जलसंपदा विभागाच्या या आदेशामुळे महापालिकेच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
शासनाने पुणे महापालिकेला २०२१ पर्यंत वार्षिक ११.५० टीएमसी पाणी मंजूर केले आहे. त्यानुसार शहराची आजची लोकसंख्या ३९.१८ लाख गृहित धरून महापालिकेला वार्षिक ८.१९ टीएमसीपर्यंत पाणीपुरवठा करण्याचा आदेश प्राथमिक विवाद निवारण अधिकारी तथा जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता टी. एन. मुंडे यांनी दिला आहे. महापालिकेकडून मंजुरीपेक्षा अधिक पाणीवापर होत असल्याने शेतीसाठी पुरेसे पाणी मिळत नसल्याची शेतकर्‍यांची तक्रार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी विठ्ठल जर्‍हाड यांनी जलसंपदा विभागाकडे धाव घेत यावर सुनावणी घेऊन न्याय देण्याची मागणी केली होती. त्यानुसार पुणे महापालिका, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता आणि खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना प्रतिवादी करण्यात आले होते.
या सुनावणीत महापालिकेने लेखी म्हणणे सादर केले. आजूबाजूच्या २१ ग्रामपंचायतींनाही पाणीपुरवठा करावा लागतो. २०१७ मध्ये पुण्याची लोकसंख्या ३९.१८ लाख असून शासनाने मंजूर केलेले ११.५ टीएमसी पाणी शहरास पुरत नाही. सध्या महापालिकेकडून १५ टीएमसी पाणीवापर होत असून हे पाणी मंजूर आरक्षणाच्या २.३५ टीएमसी अधिक असल्याचे महापालिकेने आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले. परंतु ग्रामपंचायतींच्या हद्दीतील लोकसंख्या किती, त्यांच्याकडून किती बिले आकारण्यात आली याबाबतची आकडेवारी महापालिकेला सुनावणीदरम्यान सादर करता आली नाही. तसेच ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करावा लागत असल्याचे महापालिकेने म्हणणे मांडले असले तरी काही ग्रामपंचायतींसाठी जलसंपदा विभागाकडून पाणीपुरवठा मंजूर केल्याचे निदर्शनास आणून देत मुंडे यांनी महापालिकेचे म्हणणे खोडून काढले.
जलसंपदा विभागाने सुनावणीच्या सुरवातीच्या टप्प्यात तर सुनावणीसाठी सक्षम अधिकार्‍याचीही नेमणूक करण्याकडेही कानाडोळा करण्यात आला. त्यावर जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी महापालिकेचे कान टोचत कारवाईचा बडगा उगारला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिकेने सुनावणीसाठी अधिकार्‍याची नेमणूक केली. महापालिकेने दाखल केलेल्या म्हणण्यानुसार २०१७ची लोकसंख्या ३९.१८ लाख तर कॅन्टोन्मेंट बोर्डाची लोकसंख्या १.५८ लाख गृहित धरून जलसंपदा विभागाने ८.१९ टीएमसी पाणीपुरवठा करण्याचा आदेश दिला. सध्या गळतीचे प्रमाण हे ३५ टक्के आहे. २०१७ पर्यंत गळती १५ टक्क्यांपर्यंत खाली आणण्याची आणि २४ तास पाणीपुरवठ्याची योजना आखण्यात येत असल्याचे महापालिकेने प्रतिज्ञापत्रात नमूद केले. परंतु लोकसंख्येच्या प्रमाणात दरडोई १५५ लिटर पाणीवापराचा निकष लक्षात घेऊन महापालिकेला ८.१९ टीएमसी पाणीपुरवठा करण्याचा आदेश मुंडे यांनी दिला.

डायबेटीसच्या बदलत्या व्याख्या या विषयावरील परिषदेचे पुण्यात आयोजन

0

पुणे :

इंडियन डायटेटीक असोसिएशन, पुणे चॅप्टर (भारतीय आहारसंस्था पुणे शाखा) आणि ‘डॉ. शिरोडकरर्स हेल्थ सोल्युशन्स प्रा. लि.’ यांनी ‘चेजिंग पॅराडाईमस् इन डायबेटीस’ (डायबेटिसच्या बदलत्या व्याख्या) या विषयावरील आहार तज्ज्ञांच्या परिषदेचे आयोजन केले आहे. ही परिषद जागतिक मधुमेह दिनी मंगळवारी, 14 नोव्हेंबर 2017 रोजी, दुपारी 3 ते 6 या वेळेत ‘हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग इन्स्टिट्यूट’च्या (मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर) येथील दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात संपन्न होणार आहे.

अजय शिरोडकर (व्यवस्थापकीय संचालक, डॉ. शिरोडकर्स हेल्थ सोल्युशन्स प्रा. लि.), प्रा. अनुजा किणीकर (‘इंडियन डायटेटीक असोसिएशन’ पुणे चॅप्टर (भारतीय आहारसंस्था, पुणे शाखा) च्या अध्यक्ष) आणि डॉ. ज्योती शिरोडकर (‘डायबेटीससाठी आयुर्वेद’ भारत सरकारच्या प्रोटोकोल कमिटीच्या तज्ज्ञ सदस्य) यांनी ही माहिती पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च’ (आयसर) संस्थेतील जीवशास्त्रज्ञ डॉ. मिलिंद वाटवे, डॉ. ज्योती शिरोडकर (‘डायबेटीससाठी आयुर्वेद’ या भारत सरकारच्या प्रोटोकोल कमिटीच्या तज्ज्ञ सदस्य) आणि ‘डायटेटीक असोसिएशन’च्या शारदा अडसूळ हे तज्ज्ञ या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत. पुण्यातील साधारण 100 डॉक्टर, आहारतज्ज्ञ या परिषदेत सहभागी होणार आहेत.

मधुमेही रुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या पेटंट मिळालेल्या आहार उत्पादनांचे सादरीकरण या परिषदेत केले जाणार आहे. त्यात हेल्थ आटा, स्नॅकमिक्स, हेल्थ ड्रिंक यांचा समावेश आहे.

डॉ. ज्योती शिरोडकर म्हणाल्या, ‘मधूमेह व इतर नॉनकम्युनिकेबल रोगांच्या भारतातील पसरणार्‍या महालाटेविरुद्ध काम करण्यासाठी, डायबेटीसच्या बदलत्या व्याख्या समजून घेण्याची नितांत गरज आहे. आधुनिक आहारतज्ज्ञ आणि आयुर्वेदिय आहारतज्ज्ञ यांची भूमिका डायबेटीसची महालाट परतविण्यात निर्णायक आणि महत्त्वाची ठरणार आहे, म्हणून या परिषदेद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.’

पुण्यातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च’ (आयसर) संस्थेतील जीवशास्त्रज्ञ डॉ. मिलिंद वाटवे यांच्या नुकत्याच पुढे आलेल्या संशोधनातूनही मधुमेहच्या बदलत्या व्याख्या अधारेखित होत आहेत. या विषयावरील त्यांचे व्याख्यानही या परिषदेमध्ये होईल.

‘मधूमेहसाठी आयुर्वेद’ या भारत सरकारच्या प्रोटोकोल कमिटीच्या तज्ज्ञ सदस्य डॉ. ज्योती शिरोडकर, मधूमेहची भारतात व जगात आलेली महालाट परतविण्यात आयुर्वेद कसा समर्थपणे हातभार लावू शकतो व डायबेटीस, लठ्ठपणा, PCOS, हृदयरोग यांच्या रुग्णांनी वेळीच आयुर्वेदाचे सहाय्य घेण्याची गरज या परिषदेमध्ये प्रतिपादन करतील. तसेच ‘अमेरिकन डायबेटीस असोसिएशन’ने 2011 पासून क्लिनिकल प्रॅक्टिस, गाईडलाइन (CPG 2011) मध्ये समाविष्ट केलेल्या ‘मेडिकल न्यूट्रीशन थेरपी’ या विषयी आधुनिक आहारतज्ज्ञ श्रद्धा अडसूळ व्याख्यान देतील.

त्यानंतर आयआयटी मुंबईचे पदवीधर व ‘डॉ. शिरोडकर हेल्थ सोल्युशन्स’ या स्टार्टअप कंपनीचे संचालक अजय शिरोडकर यांचे सादरीकरण होईल. डॉ. शिरोडकर यांच्या दीर्घ संशोधनातून तयार झालेली, इंटरनॅशनल पेटंट मिळालेली हेल्थ फूडची माहिती ते देतील. हे हेल्थ फूड आयुर्वेद व आधुनिक आहारशास्त्र यांची सांगड घालून तयार केलेले, प्रयोगशालेय तपासण्या, प्रत्यक्ष रुग्ण/ निरोगी व्यक्ती यावर चाचण्या करून सिद्ध झालेले आहे. विशिष्ट कडधान्ये व तृणधान्ये यावर ग्रंथोक्त संस्कार करून बनविलेली व आरोग्यदक्ष पुणेकर ग्राहकांच्या पंसतीस उतरत असलेली ‘डॉ. शिरोडकर हेल्थ फूड्स’ या परिषदेत सादर करण्यात येतील.

या परिषदेच्या निमित्ताने मधुमेहाची महालाट परतविण्यासाठी एकात्मिक दृष्टीकोन विकसित करण्याच्या दिशेने आणि तशी कृती योजना आखण्याच्या दिशेने पाऊल उचलले जाईल. त्या अनुषंगाने सर्व तज्ज्ञ चर्चा करतील.

महावितरणच्या ‘शून्य थकबाकी’ मोहिमेचा तडाखा – तीन दिवसांत 36 हजार थकबाकीदारांची वीज खंडि

0

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड शहरांसह ग्रामीण भागात वीजबिलांचे थकबाकीदार असलेल्या 36 हजार 166 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांचा वीजपुरवठा गेल्या तीन दिवसांच्या विशेष ‘शून्य थकबाकी’ मोहिमेत खंडित करण्यात आला आहे. ही मोहीम सुटीच्या दिवशीही सुरु राहणार आहे.

पुणे परिमंडलात वीजबिलांची थकबाकी वसुल करण्यासाठी ‘शून्य थकबाकी’ची विशेष मोहिम सुरु झाली आहे. गेल्या तीन दिवसांत पुणे, पिंपरी चिंचवड शहरांसह मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यातील 21 कोटी 45 लाख रुपयांची थकबाकी असलेले 36 हजार 166 वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यात 17 हजार 983 वीजग्राहकांचा 10 कोटी 33 लाखांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आला आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक अशा 33 हजार 989 थकबाकीदारांचा वीजपुरवठा 18 कोटींच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे. यात तब्बल 17 हजार 489 थकबाकीदारांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. तसेच मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यातील 2177 थकबाकीदारांचा वीजपुरवठा 3 कोटी 46 लाखांच्या थकीत वीजबिलांमुळे खंडित करण्यात आला आहे.

या मोहिमेमुळे थकबाकी व चालू वीजबिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा म्हणून पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्ग दि. 11 व 12 तसेच 14 नोव्हेंबरला सुटीच्या दिवशी सुरु राहणार आहेत. वीजग्राहकांकडे किती रक्कम थकीत आहे हे न पाहता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत वीजबिलांचा त्वरीत भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. थकीत वीजबिल भरण्यासाठी स्थानिक वीजबील भरणा केद्गांसह व घरबसल्या ‘ऑनलाईन’ पेमेंटसाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध आहे.

‘विद्यार्थी दिन’ आणि ‘पोलीस काका जनजागृती अभियान’ ला चांगला प्रतिसाद

0

पुणे :’महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ च्या ‘अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज’ मध्ये नुकताच विद्यार्थी दिन साजरा करण्यात आला. तसेच ‘पोलीस काका जनजागृती अभियान’ राबविण्यात आले, अशी माहिती प्राचार्य परवेज शेख यांनी दिली.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शाळेत प्रवेश मिळून त्यांनी साताऱ्यातील प्रतापसिंह हायस्कूल मध्ये जाण्यास सुरुवात केली होती, या दिवसाची विद्यार्थ्यांना माहिती देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

तसेच ‘अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज’ मधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ‘हॅलो पोलीस काका’ अभियान देखील राबविण्यात आले. या अभियानांतर्गत संकट समयी पोलीस काकांना फोन करा, असे आवाहन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.

 

जॉकलीन अदिना क्रिस्टीन व तेरेझा मिहालीकोवा यांना दुहेरीचे विजेतेपद

0

पुणे- आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्या सहकार्याने व नवनाथ शेटे स्पोर्टस्‌ अकादमी तर्फे आयोजित एआयटीए, एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 25000डॉलर पुणे ओपन आयटीएफ महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत भारतच्या तिस-या मानांकीत कारमान कौर थंडीने थायलंडच्या बिगर मानांकीत बुनयावी थामचायवात हीचा तर रोमानीयाच्या दुस-या मानांकीत जॉकलीन अदिना क्रिस्टीन हीने भारताच्या बिगर मानांकीत झील देसाईचा पराभव करत अंतीम फेरीत प्रवेश केला.

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरी गटात उपांत्य फेरीत एक तास चार मिनिटे रंगलेल्या लढतीत भारतच्या तिस-या मानांकीत कारमान कौर थंडीने थायलंडच्या बिगर मानांकीत बुनयावी थामचायवात हीचा 6-3, 6-1 असा सरळ सेटमध्ये पराभव करत अंतीम फेरीत प्रवेश केला. आपल्या कामगिरीत सातत्य राखत कारमानने उत्कृष्ठ सर्व्हिस करत बुनयावीवर विजय मिळवला. उपांत्य फेरीच्या दुस-या लढतीत एक तास बारा मिनिटे चाललेल्या लढतीत भारताच्या बिगर मानांकीत झील देसाईला रोमानीयाच्या दुस-या मानांकीत जॉकलीन अदिना क्रिस्टीन कडून 6-4, 6-3 असा पराभव पत्करावा लागला.

दुहेरी गटात अंतिम फेरीत रोमानीयाच्या जॉकलीन अदिना क्रिस्टीन व स्लोवाकीयाच्या तेरेझा मिहालीकोवा या जोडीने एक तास आकरा मिनिट चाललेल्या लढतीत चायनीज तायपेच्या पी-ची ली व रशियाच्या याना सिझीकोवा यांचा 4-6, 6-3, 10-7 असा तीन सेटमध्ये पराभव करत दुहेरीचे विजेतेपद पटकावले.

दुहेरी गटातील विजेत्या खेळाडूंना 1500 डॉलर, करंडक व 50 डब्लुटीए गुण तर उपविजेत्या खेळाडूंना 900 डॉलर, करंडक व 30 डब्लुटीए गुण देण्यात आले. दुहेरी गटातील स्पर्धेचे पारितोषिक वितरण कोथरूडच्या आमदार प्राचार्य मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक नवनाथ शेटे, नियोजन सचिव अश्विन गिरमे, पुणे ओपन फाऊंडेशनचे सदस्य शिवाजी चौधरी, समिर भांबरे व आयटीएफ सुपरवायझर शितल अय्यर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- एकेरी गट- उपांत्य फेरी

कारमान कौर थंडी(भारत,3) वि.वि बुनयावी थामचायवात(थायलंड)- 6-3, 6-1

जॉकलीन अदिना क्रिस्टीन(रोमानीया,2)  वि.वि झील देसाई(भारत) 6-4, 6-3

दुहेरी गट- अंतिम फेरी

जॉकलीन अदिना क्रिस्टीन(रोमानीया)/ तेरेझा मिहालीकोवा (स्लोवाकीया,4) वि.वि पी-ची ली(चायनीज तायपे)/ याना सिझीकोवा(रशिया,3) 4-6, 6-3, 10-7

थायलंड रॅली मालिका 2017 चौथी फेरी-सुधारीत कारमुळे संजय आशावादी

0

पुणे – पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले शनिवारी-रविवारी थायलंड रॅली मालिकेतील चौथ्या फेरीत सहभागी होत आहे. मागील वर्ष तसेच यंदा पहिल्या फेरीच्या तुलनेत कारच्या तांत्रिक सज्जतेमध्ये सुधारणा झाली आहे. त्यामुळे चांगली कामगिरी नोंदविण्याच्या संजयच्या आशा उंचावल्या आहेत.

या मालिकेतील ही चौथी फेरी आहे. संजयने दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत भाग घेतला नव्हता. आशिया करंडक मालिकेतील फेऱ्यांच्या तारखा तसेच आर5 कारसह सराव करायचा असल्यामुळे तो या रॅलींमध्ये भाग घेऊ शकला नाही. पहिली फेरी त्याच्यासाठी संमिश्र ठरली. अवघे दोन किलोमीटर बाकी असताना इसुझू डीमॅक्स युटीलीटी कार इंजिन टर्बो बंद पडून त्याची संधी हुकली.

 टीम इसुझू फुकेटने यावेळी कारवर बरीच मेहनत घेतली आहे. विचाई वात्ताहाविशुथ हे या संघाचे प्रमुख आहेतते ट्यूनर सुद्धा आहेतगेल्या वर्षी कार तांत्रिकदृष्ट्या सुसज्ज नव्हतीत्यानंतर या संघाने बरेच प्रयत्न केलेआशियाई क्रॉसकंट्री रॅली तसेच डकार रॅलीच्या तयारीसाठी संजयने या संघाला प्राधान्य दिले आहेतो पुढील महिन्या आशियाई क्रॉसकंट्रीत सहभागी होणार आहेत्यामुळे त्याला या मालिकेत खास प्रवेश देण्यात आला आहे.

 संजयने यंदा एम्पार्ट संघाच्या साथीत मित्सुबिशी मिराज आर5 कार खरेदीत केली आहे. सुबारु इम्प्रेझा कारच्या तुलनेत ती जास्त शक्तीशाली आणि वेगवान आहे. या कारचा अनुभव संजयसाठी मोलाचा ठरेल.संजयने सांगितले की, मिनील थान्याफात हा थायलंडचाच नॅव्हीगेटर माझ्या जोडीला असेल. पहिल्या फेरीत त्याचे इंग्रजी उच्चार समजणे थोडे कठिण गेले होते. यावेळी आम्हाला एकमेकांच्या शैलीचा आणि कार्यपद्धतीचा अंदाज आला आहे. त्याचा फायदा होईल.

आर्ची नंतर तिचे आई – बाबा सिनेमात

0

रिंकू राजगुरूच्या आई-बाबांचा चित्रपटात प्रवेश !

आर्ची नाही तर तिचे आई बाबा सिनेमात !

‘सैराट’ चित्रपटातील आपल्या भूमिकेने सगळ्यांना याड लावणारी आर्ची म्हणजे रिंकू राजगुरूनंतर आता तिचे आई-वडीलही चित्रपटात काम करणार आहेत. तुम्हाला वाचून धक्का बसला असेल पण ही बातमी खरी आहे. रिंकूची आई आशा राजगुरु आणि वडील महादेव राजगुरु हे आगामी ‘एक मराठा लाख मराठा’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत.२४ नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.

‘एक मराठा, लाख मराठा’ हा चित्रपट शेतकरी कुटुंबात राहणाऱ्या एका तरुणावर आधारित आहे. या चित्रपटात हा तरुण आपल्या बहिणीवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करत असतो. कालांतराने त्याच्या संघर्षाचे रुपांतर मोठ्या जनआंदोलनात होते. मात्र हे झालेले रुपांतर त्याला कळत नाही. त्याच्या समोर केवळ एकच लक्ष्य असते, आणि ते म्हणजे आपल्या बहिणीला न्याय मिळवून देणे.

‘एक मराठा लाख मराठा’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन साताऱ्याच्या गणेश शिंदे यांनी  त्यांच्या साई सिने फिल्म्स निर्मितीसंस्थे अंतर्गत केले आहे. अतुल लोहार आणि गणेश सातोर्डेकर यांनी चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन केलं आहे. तसंच, मिलिंद गुणाजी, भारत गणेशपुरे, किशोर कदम, मोहन जोशी, विद्याधर जोशी, अरुण नलावडे, संजय खापरे, नागेश भोसले, विजय पाटकर, प्रिया बेर्डे, सुरेखा कुडची, उषा नाईक, नफिसा शेख, ढोले गुरुजी, भक्ती चव्हाण, सुरेश विश्वकर्मा आणि राधिका पाटील यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

हिंदीतील खलनायक मराठीत

0

आजवर बऱ्याच कलाकारांनी खलनायकी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचं काम केलं आहे. आपल्या अनोख्या शैलीमुळे खलनायकी भूमिका साकारणारे काही कलाकार तर नायकांइतके लोकप्रियही झाले आहेत. अवतार गिल, रझा मुराद, शाहबाझ खान आणि कुनिका या कलाकारांनीही आपल्या अनोख्या अभिनयशैलीच्या बळावर वेळोवेळी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता धिंगाणा या मराठी चित्रपटात या कलाकारांचा खलनायकी अभिनय पाहायला मिळणार आहे. येत्या ८ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

दिग्दर्शक चंद्रकांत दुधगावकर यांनी धिंगाणाचं दिग्दर्शन केलं असून, समीर सदानंद पाटील यांनी ममता प्रोडक्शन हाऊस या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अवतार गिल, रझा मुराद, शाहबाझ खान आणि कुनिका हे हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार प्रथमच मराठीत एकत्र दिसणार आहेत. मराठी चित्रपट ही संक्रमणावस्थेतून जात असल्याने हिंदीतील बऱ्याच कलाकारांचा मराठीकडे ओढा वाढला आहे, पण एकाच वेळी चार नामवंत कलाकारांना धिंगाणामध्ये खलनायकी भूमिकेसाठी निवडलं जाणं ही कथेची गरज असल्याचं निर्माता समीर सदानंद पाटील यांचं म्हणणं आहे. या चित्रपटाची कथा वर्तमान काळातील वास्तववादी सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारी आहे. त्यामुळे यातील खलनायकी भूमिका साकारणारे कलाकारही त्याच ताकदीचे असणं गरजेचं होतं. मराठीतही खलनायकी भूमिका साकारणारे तगडे कलाकार असले तरी धिंगाणामधील व्यक्तिरेखांसाठी हिंदीतले कलाकार आवश्यक होते. या चारही जणांना जेव्हा धिंगाणामध्ये अभिनय करण्याबाबत विचारलं गेलं तेव्हा त्यांना आपापल्या व्यक्तिरेखा खूप भावल्या आणि त्यांनी तात्काळ होकार दिल्याचं दिग्दर्शक चंद्रकांत दुधगावकर यांचं म्हणणं आहे. हे चौघेही एक चिटफंड कंपनी चालवत असल्याचे चित्रपटात पाहायला मिळेल. अवतार गिल यांनी मोहनअण्णा, रझा मुराद यांनी अंजनमामा, शाहबाझ खान यांनी राजा भैया, तर कुनिका यांनी करिष्मा नावाच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.धिंगाणाचं दिग्दर्शन करणाऱ्या चंद्रकांत दुधगावकर यांनी या चित्रपटात एका आशयघन कथानकाद्वारे महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. हेमंत एदलाबादकर यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे. प्रियदर्शन जाधव आणि प्राजक्ता हनमघर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. कॅमेरामन आय. गिरीधरन यांनी छायांकन केलं असून, फैझल महाडीक यांनी संकलन केलं आहे. धिंगाणामध्ये विविध मूड्समधील तीन गाणी असून, संगीतकार अमितराज आणि शशांक पोवार यांनी संगीतबद्ध केली आहेत. कोरिओग्राफर सुजीत कुमार यांनी या चित्रपटातील गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे. संदिप इनामके यांनी कलादिग्दर्शन केलं आहे, तर संजय कांबळे प्रोडक्शन डिझाइनर आहेत. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि कोल्हापूरमधील विविध लोकेशन्सवर चित्रीत झालेला हा सिनेमा ८ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

आमदारांना आदेश नव्हे, विनंती ऊर्जामंत्री बावनकुळे यांचे निवेदन

0

 

मुंबई – कृषीपंपाच्या थकबाकीवरील दंड आणि व्याज बाजूला सारुन शेतकऱ्यांना शासनाच्या मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेचा लाभ व थकबाकीतून दिलासा मिळावा, वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण या शासकीय कंपनीची राज्यात असलेली वीजबिलाची थकबाकी वसूल होण्यासाठी जनजागृती व्हावी व थकबाकीदार ग्राहकांनी वीजबिल भरावे या प्रामाणिक उद्देशाने आपण आमदार महोदयांची यासाठी मदत आणि सहकार्य घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमदारांना कोणतेही आदेश दिलेले नाहीत तर पत्र पाठवून विनंती करण्यात आली असल्याचे ऊर्जामंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यातील शेतकऱ्यांची कृषीपंप, सार्वजनिक पाणी पुरवठा व पथदिव्यांची थकबाकी 24 हजार कोटी रुपयांवर आहे. वीजनिर्मिती, वीजपारेषण, वीजवितरण, कोळसा व साहित्य खरेदी, देखभाल दुरूस्ती आदींसाठी मोठ्या प्रमाणात निधींची गरज आहे. परंतु वीजबिलाची वसूलीच झाली नाही तर ही कामे कशी होतील ? ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी वीजबिलाची थकबाकी भरावी यासाठी जनजागृती होऊन एक सकारात्मक संदेश शेतकऱ्यांमध्ये जावा, इतकाच प्रामाणिक उद्देश या पत्रामागे आहे. लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या मागे लावून वीजबिल वसूल करण्याचा कोणताही उद्देश या पत्रामागे नाही. तसेच कोणी चुकीचा अर्थही काढू नये असे आवाहन ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवेदनाद्वारे केले आहे.

 

योजना नेमकी कशासाठी ? २४ तास पाणीपुरवठ्यासाठी की…आणखी कशासाठी ?

0

पुणे :पुणेकरांना २४ तास पाणीपुरवठा प्रकल्प करण्याची नितांत गरज आणि आवश्यक्यता किती आहे ; कि नाही ? हा प्रश्न सोडा … पण किमान ही योजना नेमकी कोणत्या उद्देशाने राबविण्याचा घाट घातला जातो आहे ? या प्रश्नावरच आता खल माजेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे .

या योजनेच्या पूर्वीच्या पूर्वगणकपत्रातच (ईस्टिमेट) त्रुटी असल्याची  बाब उघडकीस आली असून, त्यामुळेच योजनेतील कामांच्या रकमांचे आकडे फुगले होते, किंवा फुगविले होते असे आता स्पष्ट दिसत  आहे.  विशेष म्हणजे, ‘फायबर ऑप्टिकल केबल’साठी (डक्‍ट) दुप्पट दर लावल्याचे आता दिसून येत  आहे. या योजनेद्वारे पुणेकरांचे कोट्यवधी रुपये हडप करण्याचा डाव रचल्याचा आरोप होत आहे.याआधी योजनेचे सुमारे 2 हजार 818 कोटी रुपयांचे ईस्टिमेट मंजूर करण्यात आले होते. मात्र, यावर प्रचंड आरोप झाल्यानंतर या  योजनेच्या कामाच्या निविदा रद्द केल्या. त्यानंतर सुमारे 203 कोटी रुपयांची कपात करीत 2 हजार 615 कोटींचे सुधारित पूर्वगणकपत्र  मांडले होते. त्यावरील चर्चेदरम्यान पूर्वीच्या ईस्टिमेट मध्ये कामांच्या खर्चाचे आकडे फुगविल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळेच दोनदा मांडण्यात आलेल्या ईस्टिमेट मधून पुणेकरांचे 493 कोटी वाचल्याचे स्पष्ट झाले. जुन्या ईस्टिमेटनुसार योजनेतील जलवाहिन्यांबरोबर सुमारे 277 कोटी रुपयांचे ‘डक्‍ट’ टाकण्याचा डाव होता; पण वाहिन्यांमध्ये ‘डक्‍ट’ टाकण्याचा दर 87 रुपये प्रतिमीटर धरला होता. हा दर दुप्पट असल्याचे कमिटीच्या निदर्शनास आल्याने तो 47 रुपयांपर्यंत आला. या कामात शंभर कोटी रुपयांची बचत झाली. आवश्‍यकता नसतानाही विशिष्ट प्रकारचे पाईप घेण्याचा प्रयत्न होता. त्यात, बदल केल्याने 60 कोटी वाचले आहेत. तसेच, ज्या तंत्रज्ञानाची गरज नव्हती, मात्र, त्याचा वापर आवश्‍यक असल्याचे सांगून आकडे वाढविल्याचेही दिसून आले. पुढील दहा वर्षांची देखभाल-दुरुस्ती आणि मीटर खरेदीच्या खर्चात 50 कोटींची कपात झाली आहे.
योजनेसाठी निधीची पूर्वी केलेली तरतूद
2 हजार 264 कोटी कर्जरोखे
500 कोटी (महापालिकेचा वाटा)
299 कोटी (स्मार्ट सिटीतून अपेक्षित, पुढील आठवड्यात निर्णय)
200 कोटी (अमृत योजना – हा निधी 50 कोटींनी वाढणार)
योजनेचा खर्च
पहिले एस्टिमेट

2 हजार 818 कोटी
दुसरे एस्टिमेट
2 हजार 615 कोटी
एस्टिमेट कमिटीने मंजूर केलेले अंतिम एस्टिमेट
2 हजार 325 कोटी

शिक्षण मंडळाचा ‘बाप’ बनेल अशी होणार शिक्षण समिती ..(आगीतून फुफाट्यात नेणारा कारभार )

0

पुणे- ज्या कारणास्तव महापालिकांचे शिक्षण मंडळ बरखास्त केले , आता त्या कडे च दुर्लक्ष करून आणखी स्वैराचाराला स्वायत्तता देणारी शिक्षण समिती नेमण्याचा घाट घातला जात असल्याचे वृत्त हाती आले आहे .महापालिकेचे पैसे वापरून पीएमपीएमएलबस व्य्वास्थानाला मनमानीची संधी तसाच प्रकार शिक्षण समितीबाबत ही होणार असल्याचे बोलले जात आहे .

महापालिकेच्या जुन्या शिक्षण मंडळातील गैरव्यवहाराच्या घटना सातत्याने उघडकीस आल्याने मंडळाच्या कारभारावर सर्वच स्तरांतून टीका झाली.त्यामुळे शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर नव्याने स्थापन होणाऱ्या  महापालिका शिक्षण समितीचे प्रारूप निश्चित करताना समितीच्या २२ सदस्यांपैकी १५ सदस्य बाहेरचे असतील. या समितीमध्ये अवघ्या चार नगरसेवकांना स्थान दिले जाणार आहे. तीन जागा राज्यपाल नियुक्त असतील. त्यामुळे पुन्हा १५ जागांवर राजकीय कार्यकर्त्यांचेच ‘पुनर्वसन’ या नव्या समितीच्या माध्यमातून होईल.आणि राज्यपाल नियुक्त ३ जागाही पुढे असणारच आहेत .

विशेष धक्कादायक म्हणजे , शिक्षण समितीबद्दल कोणतीही चर्चा महापालिकेच्या सभागृहात होणार नसल्याचे किंवा त्याबाबत कोणतीही माहिती मागविता येणार नसल्याचे समितीच्या प्रारूपामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. स्थायी समितीने दिलेल्या खर्चाच्या रकमेसंदर्भात स्थायी समितीमध्ये केवळ चर्चा आणि प्रश्न विचारता येऊ शकतील किंवा त्या अनुषंगाने योग्य ते आदेश स्थायी समिती देऊ शकेल. जादा निधी मंजुरीचा अधिकारही स्थायी समितीला आहे. मात्र शिक्षण समितीच्या कार्याबाबत स्थायी समितीला काही आक्षेप असल्यास किंवा चुकीचा आदेश असल्यास त्यावर शिक्षण संचालकांकडून आक्षेप नोंदविल्यानंतर पंधरा दिवसात निर्णय होईल. तो मान्य नसल्यास राज्याचा शिक्षण विभाग त्यावर योग्य तो निर्णय घेईल, असे प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले आहे. शिक्षण समितीवर कारवाई करायची झाल्यास महापालिका आयुक्तांना शालेय शिक्षण विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे.

राज्य शासनाने १ जुलै २०१३ मध्ये नगरपरिषदा आणि महापालिकांची शिक्षण मंडळे बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. सर्व शिक्षण मंडळांचे महापालिकेत विलिनीकरण होईल आणि महापालिकेतील अन्य समित्यांप्रमाणेच शिक्षण समितीची स्थापना करून त्याचे कामकाज करण्यात येईल, असे राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आले होते.

शिक्षण समितीचे प्रारूप, सदस्यांची संख्या राज्य शासनाने निश्चित केली असून तसा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवण्यात आला आहे. येत्या काही दिवसांमध्ये त्याला मंजुरी मिळणार आहे. समितीमधील सदस्यांची संख्या २२ असेल. यामध्ये केवळ चार नगरसेवकांना स्थान मिळणार असून त्यामध्ये किमान पदवीधर असलेल्या दोन नगरसेविका आणि दोन नगरसेवकांचा समावेश असेल. समितीमधील तीन जागा राज्यपाल नियुक्त असतील तर १५ जागांची नियुक्ती ही मतदानाने महापालिकेच्या सभागृहात होणार आहे. या १५ जागांवरील नियुक्ती ही महापालिकेतील राजकीय संख्याबळानुसार होणार असल्यामुळे या जागांवर वर्णी लागावी यासाठी राजकीय कार्यकर्त्यांची चढाओढ लागणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

महापालिकेच्या शाळा 
310
विद्यार्थी संख्या 
90 हजार
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी 
5000
शिक्षण विभागासाठी आर्थिक तरतूद 
349 कोटी

सावित्रीमाईंच्या पुण्यात नगरसेविकेची मुस्कटदाबी (पहा व्हिडीओ)

0

पुणे- राष्ट्रवादीच्या नगरसेविका नंदा लोणकर यांची ,महिला अवमानाच्या विरोधातील तहकुबी अक्षरशः झुगारून देवून त्यांची मुस्कटदाबी महापालिकेच्या सभागृहात करण्यात आली असा आरोप राष्ट्रवादीच्या महिला नगरसेविकांनी केला आहे. तहकुबी स्वीकारा अथवा फेटाळा… पण तिला अशा प्रकारे थेट झुगारून महिलांना डावलण्याचे कारस्थान करू नका असे सभेनंतर नगरसेविकांनी सांगितले . 2 तहकुबी आल्या नंतर महापौरांनी काय केले पाहिजे यावर नंतर चर्चासत्रे रंगू लागली .
महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांच्या कपातीचा आज मनसेच्या नगरसेवकांनी तीव्र निषेध नोंदवत पालिकेच्या सभागृहात सुरक्षा रक्षकाच्या वेशभूषेत प्रवेश केला.सुरक्षा विभागात कंत्राटी पद्धतीने सुमारे 1700 ते 1800 सुरक्षा रक्षक करतात.  मात्र ही संख्या अतिरिक्त असल्याने 900 कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार  पालिका प्रशासनाने ९०० सुरक्षारकांची निविदा मान्य केली आहे. त्यामुळे अतिरिक्त सुरक्षारक्षकांचे काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला.  या विरोधात मनसेने आज आंदोलनासाठी  पालिकेच्या मुख्यसभेत सुरक्षा रक्षकाच्या वेशभूषेत प्रवेश केला. तर नोटबंदीविरोधात  भाजप बरोबर असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकानी पुणे महापालिका मुख्यसभेमध्ये काळ्या टोप्या परिधान करून प्रवेश केला . पण ही पहिली मुख्य सभा माजी नगरसेवक  सतीश लोंढे आणि सकाळ चे पत्रकार आशिष जाधव आदी मान्यवरांच्या दुखद निधनामुळे  श्रद्धांजली वाहून तहकूब करण्यात आली. मात्र तत्पूर्वी ६५ विषय मोठ्या खुबीने दाखल करवून घेण्यात आले .
त्यानंतर सुरु झाली ऑक्टोबर कार्य पत्रिकेवरील विषयांसाठीची   मुख्य सभा . नगरसचिव यांनी ही कार्यपत्रिका पुकारली .. पण नेत्यांचा कल तहकुबीचा दिसला . आणि नगरसेविका नंदा लोणकर यांनी,’ दारूला महिलांचे नाव द्या ‘ अशा वक्तव्याबाबत मंत्री महाजन यांचा निषेध करणारी तहकुबी दिली .तर सभागृह नेते यांनी कोणतेही कारण नसलेली सभा तहकुबी दिली . आणि नंतर काय झाले ते आपण प्रत्यक्षच पहा (व्हिडीओ)

 

मंगेश तेंडुलकरांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन

0
पुणे- प्रसिद्ध व्यंगचित्रकार स्वर्गीय मंगेश तेंडुलकर यांच्या व्यंगचित्रांचे  नव्वदावे प्रदर्शन त्यांच्या कुटुंबीयांनी आयोजित केले आहे. बालगंधर्व कलादालनात दिनांक ११आणि १२तसेच १३ नोव्हेंबर रोजी हे प्रदर्शन भरणार असुन पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या हस्ते शनिवार ११ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता हे उदघाटन करण्यात येणार आहे.या वेळी कोहिनूर ग्रूपचे श्री विनीत गोयल हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.यावेळी मंगेश तेंडुलकर यांच्या *तेंडुलकरी स्ट्रोक्स* या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात येणार आहे. शनिवार,रविवार आणि सोमवार या तिन्ही दिवशी सकाळी १० ते रात्रौ ८ वाजेपर्यंत हे प्रदर्शन पाहता येणार आहे

“वैद्यकीय शिक्षण व संशोधन’- सद्यःस्थिती व भविष्यातील वाटचाल” या विषयावर विचारमंथनासाठी दोन दिवसीय राष्ट्रीय गोलमेज परिषदेचे आयोजन

0
पुणे: भारतातील सध्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन क्षेत्रासमोर असलेल्या, १३० कोटी लोकसंख्येच्या मानाने अत्यंत अपुरी असलेली डॉक्टरांची संख्या, शासकीय आणि खाजगी क्षेत्रातील महाविद्यालयाची अपुरी संख्या, कॅपिटेशन आणि डोनेशन यासारखे वादग्रस्त मुद्दे, मध्यम वर्गाला न परवडणारे अतिशय महागडे वैद्यकीय शिक्षण शुल्क अशा अनेक अडीअडचणी व गंभीर समस्यांवर अत्यंत सखोल आणि सर्वंकष अशा, वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील अत्यंत अभ्यासू, विद्वान अशा तज्ञांच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्तरावरील दोन दिवसीय गोलमेज परिषदेचे आयोजन  डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठ, पुणे व मायमर वैद्यकीय महाविद्यालय, तळेगाव यांच्यातर्फे शनिवार दि. ११ व रविवार १२ नोव्हेंबर २०१७ रोजी संत ज्ञानेश्‍वर सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
या राष्ट्रीय परिषदेमागील पार्श्‍वभूमी अशी : सन १९५६ मध्ये भारत सरकारच्या वतीने मेडीकल कॉन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय) या शिखर संस्थेची स्थापना, देशातील वैद्यकीय शिक्षण आणि वैद्यकीय सेवा यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी तसेच त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात आली. एमसीआयच्या मार्गदर्शनाखाली आजवर आपल्या भारत देशामध्ये अनेक दर्जेदार व नामांकित शासकीय व खाजगी वैद्यकीय संस्था आणि रुग्णालयांची स्थापना झाली, हे निश्‍चितच कौतुकास्पद आहे.
तथापि, भारताची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, वैद्यकीय शिक्षण संस्थांची संख्या व दर्जा, तसेच वैद्यकीय सेवा पुरविण्यामध्ये एमसीआय आणि शासकीय व्यवस्था खूप कमी पडल्याचे दिसून येते. भारतासारख्या खंडप्राय विशाल आणि विकसनशील देशात अजूनही आरोग्य या विषयास अधिक प्राधान्य देणे आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार दर हजार लोकसंख्येमागे किमान एक डॉक्टर असणे आवश्यक असताना, आपल्या भारतात हे प्रमाण ०.६ डॉक्टर इतकेच आहे. यावर उपाय म्हणून आरोग्य सेवा अधिक बळकट करून, अधिक डॉक्टर्स निर्माण होणे आवश्यक आहे. यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन क्षेत्रात आमूलाग्र बदल होणे देखील आवश्यक आहे.
          सदरील राष्ट्रीय परिषदेमध्ये केवळ खाजगी वा शासकीय वैद्यकीय शिक्षण संस्थांपुढे असलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया, प्रवेशसंख्या, शैक्षणिक शुल्क, नीट सारखी प्रवेश परिक्षा पद्धती, गुणवत्ताप्राप्त वैद्यकीय शिक्षकांची अपुरी संख्या, अशा समस्यांपुरतीच मर्यादित नसून,  वैद्यकीय शिक्षणाचा खर्च, उपलब्ध संसाधनांचा सुयोग्य वापर करून कमीत कमी ठेवणे,  वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा उंचवणे, वैद्यकीय महाविद्यालयांतील शिक्षकांची उपलब्धता व त्यांचा दर्जा वाढवणे, वैद्यकीय अभ्यासक्रमाचा आढावा घेणे व सुधारणा करणे, वैद्यकीय शिक्षणात आधुनिक व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, तसेच, वैद्यकीय अभ्यासक्रमाशी संबंधित विविध परीक्षा पद्धती यावर राष्ट्रीय स्तरावर काही धोरणात्मक बदल घडविण्यासाठी, या राष्ट्रीय परिषदेतील तज्ञ, डॉक्टर्स सांगोवांग चर्चा करून, एकत्रितपणे ‘पुणे जाहीरनाम्या’च्या माध्यमातून महत्त्वपूर्ण ठराव पारित करतील व हे ठराव व शिफारशी भारत सरकार, मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या निरीक्षण समिती आणि एमसीआय समोर राष्ट्रहिताच्या दृष्टीने पुढील कार्यवाहीसाठी मांडण्यात येतील.
        त्याचबरोबर, भारत सरकार, ओव्हरसाईट कमिटी, एमसीआय या सारख्या नियंत्रण संस्थांद्वारे बेड ऑक्यूपन्सी, शिक्षकांचा हजेरी पट, ओपीडीतील पेशंटची संख्या अशा लहान-मोठ्या मुद्द्यांवर शैक्षणिक संस्थांची अडवणूक आणि त्यामुळे निर्माण होणारे प्रश्‍न, यासाठी राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये समन्वय, सुसूत्रता व सुसंवाद  निर्माण करून, शासकीय व खासगी शैक्षणिक संस्थांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, त्यांच्यामध्ये विश्‍वासार्हता निर्माण व्हावी, यासाठी देखील चर्चा करून, त्यादृष्टीने काही धोरणात्मक बदल सुचविण्यात येतील.
          या राष्ट्रीय गोलमेज परिषदेच्या उद्घाटन समारंभासाठी सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून भारत सरकारच्या निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल हे उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव डॉ. संजय देशमुख, राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सहसंचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व जे.जे.रूग्णालय समूहाचे अधिष्ठाता डॉ.एस.डी.नणंदकर इत्यादी मान्यवर या परिषदेस उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय तमीळनाडू राज्याच्या शासकीय एमजीआर वैद्यकीय विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. एस. गीतालक्ष्मी, चेन्नई येथील श्रीरामचंद्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.वी. विजयराघवन, नवी मुंबई येथील डॉ. डी.वा हीींिं://ी.वा/य. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिरीष पाटील, आर्म्ड फोर्सेस (सशस्त्र सेना) वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता मेजर जनरल डॉ. माधुरी कानिटकर, पुण्याच्या कमांड हॉस्पिटलचे अधिष्ठाता मुख्य मेजर जनरल डॉ. अभिजित चक्रवर्ती, विख्यात बाल शल्यचिकित्सक व मुंबई येथील के.ई.एम. रूग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. संजय ओक इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेचे आयोजन ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा.कराड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष व जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. चंद्रकांत पांडव, परिषदेचे कार्याध्यक्ष व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठचे माजी कुलगुरू डॉ. अरूण जामकर व  परिषदेच्या उपाध्यक्षा आणि माईर्स एमआयटीच्या विश्‍वस्त व कार्यकारी संचालिका डॉ.सुचित्रा कराड-नागरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.