Home Blog Page 324

सवाई गंधर्व संगीत महोत्सवासाठी सकाळी ६.०० वाजेपासून रात्री १२.०० वाजेपर्यंत ध्वनीवर्धक वापरास परवानगी

पुणे, दि. ३ नोव्हेंबर : पुणे येथे होणाऱ्या ७१ व्या सवाई गंधर्व संगीत महोत्सव सन २०२५ या कार्यक्रमास जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांनी, त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारीत नियम २०१७ च्या नियम ५ उपनियम (३) नुसार १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ६.०० वाजेपासून रात्री १२.०० वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. या कालावधीत ध्वनीची विहीत मर्यादा काटेकोरपणे पाळावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

कात्रज- मंतरवाडी रोडवरील वाहतुकीत तात्पुरते बदल – मागविल्या नागरिकांच्या सूचना

पुणे, दि. ३ : पुणे शहरातील काळेपडळ वाहतूक विभागांतर्गत वाहतूक सुरक्षित व सुरळीत होण्यासाठी महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या आदेशानुसार (क्र. एम.व्ही.ए. ०११६/८७१/सीआर ३७/ठीआरए २, दिनांक २७ सप्टेंबर १९९६) आणि मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६(१)(२)(बी), ११६(४) व ११७ अन्वये पोलीस उपायुक्त (वाहतूक शाखा) हिंमत जाधव यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून कात्रज मंतरवाडी रोड व हांडेवाडी चौक परिसरात प्रायोगिक स्वरूपात खालीलप्रमाणे तात्पुरते वाहतुकीचे बदल लागू करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
काळेपडळ वाहतूक विभागाच्या कार्यक्षेत्रात करण्यात आलेल्या या प्रायोगिक बदलांनुसार – श्रीराम चौक (जे.एस.पी.एम. कॉलेज) ते हांडेवाडी चौक मार्गावरून होळकरवाडी व कात्रजकडे जाणारी दुचाकी, चारचाकी व हलकी मोटार वाहने डावीकडे वळतील. कात्रजकडून येणाऱ्या वाहनांनी मंतरवाडीच्या दिशेने १०० मीटर पुढे जाऊन जोगेश्वरी मिसळ हॉटेलसमोरून उजवीकडे वळून ‘यू-टर्न’ घेऊन इच्छित स्थळी जाता येईल.
त्याच मार्गावरील जड व अवजड मोटार वाहनांनी मंतरवाडीच्या दिशेने २५० मीटर अंतरावर असलेल्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोरील हॉनेस्टी स्टील दुकानाजवळून उजवीकडे वळून ‘यू-टर्न’ घ्यावा.
होळकरवाडी व मंतरवाडी येथून येणारी दुचाकी व हलकी वाहने हांडेवाडी चौकातून कात्रजच्या दिशेने १०० मीटर पुढे जाऊन शिवेंद्र हॉटेलसमोरून उजवीकडे वळून ‘यू-टर्न’ घेऊन श्रीराम चौक, सय्यदनगर, हडपसर या दिशेने जाता येईल.
होळकरवाडी व मंतरवाडी येथून येणाऱ्या जड व अवजड वाहनांना कात्रजच्या दिशेने २५० मीटर पुढे जाऊन मयुरी वजनकाटा परिसरातून घृव शाळेसमोर उजवीकडे वळून ‘यू-टर्न’ घेऊन पुढे इच्छित स्थळी जाता येईल.
नागरिकांना कळविण्यात येते की, या तात्पुरत्या प्रायोगिक वाहतूक बदलांबाबत आपल्या सूचना व हरकती १६ नोव्हेंबर 2025 दरम्यान लेखी स्वरूपात पोलीस उपायुक्त (वाहतूक नियंत्रण शाखा), बंगला क्र. ६, एअरपोर्ट रोड, येरवडा पोस्ट ऑफिससमोर, पुणे येथे सादर करता येतील. प्राप्त सूचनांचा विचार करून अंतिम आदेश जाहीर करण्यात येतील. अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इ.) यांना सूट देण्यात आली आहे, असे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

अंधेरीतील सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुकेश अंबानींच्या घशात घालण्याचा डाव

मुंबई महानगर पालिकेच्या ताब्यात द्या: राजेश शर्मा

६ नोव्हेंबरला अंधेरी विकास समिती तीव्र आंदोलन करणार.

मुंबई, दि. ३ नोव्हेंबर ..

अंधेरी येथील अद्ययावत सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घ्यावे ही मुंबईकरांची मागणी आहे. हे हॉस्पिटल उद्योगपती मुकेश अंबानी यांना देण्याचा घाट घातला जात आहे परंतु कोणत्याही परिस्थितीत या हॉस्पिटलचे खाजगीकरण करू नये. भाजपा महायुती सरकारने मुंबईकरांच्या मागणीची तत्काळ दखल घ्यावी, यासाठी ६ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता हॉस्पिटलसमोर तीव्र आंदोलन करणार, असा इशारा अंधेरी विकास समितीने दिला आहे.

यासंदर्भात माहिती देताना मुंबईचे माजी उपमहापौर तथा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश शर्मा म्हणाले की, अंधेरी येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घ्यावे यासाठी मागील काही महिन्यापासून प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बीएमसी व संबंधित यंत्रणांकडे यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला आहे परंतु मुख्यमंत्री वा कोणत्याही यंत्रणांकडून त्याला प्रतिसाद दिला जात नाही हे गंभीर आहे. भाजपा महायुती सरकारला मुंबईकांच्या आरोग्याची चिंता नाही त्यांना फक्त उद्योगपतींचे हित पहायचे आहे. मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने सार्वजनिक गरजा लक्षात घेऊन सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या जागेत प्रगत वैद्यकीय संशोधन केंद्र आणि शिक्षणासह आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉस्पिटल म्हणून विकसित करण्याचा विचार करणे आवश्यक आहे. सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या आवारात शिल्लक असलेल्या जागेवर मेडीकल व नर्सिंग कॉलेज सुरु करता येउ शकते.

सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या जागेचा मुळ मालकी हक्क मुंबई महानगरपालिकेचा आहे. महानगरपालिकेने ही जागा सेव्हन हिल्स हॉस्पिटलला लीजवर दिलेली आहे. मुंबई महापालिकेने दुसऱ्या कोणत्याही खाजगी कंपनीच्या ताब्यात ती जागा जाऊ न देता स्वतः ताब्यात घेतली तर मुंबईमध्ये एक प्रशस्त, अत्याधुनिक, सर्व सोयीनियुक्त असे महत्वाचे आरोग्य केंद्र बनू शकते. अंधेरीतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या हॉस्पिटलची बाजार भावानुसार ३००० ते ४००० कोटी रुपये किंमत आहे पण या जागेकडे व्यापारी दृष्टीकोनातून न पाहता मानवी दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता त्यांच्या आरोग्य सेवांसाठी हे हॉस्पिटल एक मोठी संधी आहे, त्यासाठी सध्या असलेल्या सर्व सुविधांचा विचार करता मुंबई महानगरपालिकेने वेळ न घालवता हे हॉस्पिटल ताब्यात घेऊन मुंबईकरांना अत्याधुनिक आरोग्य सेवा देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही राजेश शर्मा म्हणाले.

सुपरस्टार सलमान खान 6 डिसेंबरला हैदराबादमध्ये होणाऱ्या इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या दुसऱ्या फेरीला उपस्थित राहणार

      इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (आयएसआरएल) ने आपल्या हैदराबाद फेरीसाठी नवीन तारखांची घोषणा केली आहे — आता ही स्पर्धा 6 डिसेंबर 2025 रोजी जीएमसी बालयोगी अॅथलेटिक स्टेडियम, गाचीबोवली येथे होणार आहे.
      पहिल्यांदा 7 डिसेंबर रोजी आयोजित केलेला हा कार्यक्रम आठवड्याच्या सुट्टीच्या हिशोबाने प्रेक्षकांची अधिक चांगली उपस्थिती लाभावी यासाठी एका दिवसाने अलीकडे आणण्यात आला आहे.

पुणे, 3 नोव्हेंबर 2025: जगातील पहिली फ्रँचायझी-आधारित सुपरक्रॉस रेसिंग लीग असलेल्या इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (आयएसआरएल) ने आज आपल्या अत्यंत उत्सुकता लागून राहिलेल्या हैदराबाद फेरीसाठी वेळापत्रक बदलाची घोषणा केली. हा कार्यक्रम आता डिसेंबर 2025 रोजी सुप्रसिद्ध जीएमसी बालयोगी अॅथलेटिक स्टेडियम, गाचीबोवली येथे होईल.

या रोमांचक कार्यक्रमात अधिक रंग भरत आयएसआरएलचा ब्रँड अॅम्बेसेडर मेगास्टार सलमान खान स्वतः उपस्थित राहून संघांना प्रोत्साहन देईल आणि स्टँड मधल्या चाहत्यांशी, प्रेक्षकांशी संवाद साधेल.

पूर्णपणे क्शनने भरलेल्या रेस वीकेंडची सुरुवात 5 डिसेंबर रोजी राइझ मोटोज फॅन पार्कसह होईल. पुण्यात झालेल्या पहिल्या फेरीत याला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. रोमांचक फॅन अनुभव मिळवून देताना लाईव्ह संगीत, गेमिंग आणि रेसिंग सिम्युलेटर, खाद्यपदार्थ व पेयांचे स्टॉल्स, टीम मर्चेंडाइज आणि इंटरअॅक्टिव्ह ब्रँड झोन यांची रेलचेल असणार आहे, तेलंगणामधील मोटरस्पोर्ट प्रेमी आणि कुटुंबांसाठी हा एक अविस्मरणीय उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या प्रवर्तकांनी तेलंगणा सरकार आणि तेलंगणा क्रीडा प्राधिकरणाचे सुपरक्रॉसचा खेळ या राज्यात आणणे शक्य करण्यासाठी त्यांनी दिलेल्या अमूल्य सहकार्य आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक आभार मानले आहेत. आयएसआरएल तेलंगणा रायझिंग 2047 या दृष्टीकोनाप्रती योगदान देऊन  नाविन्यपूर्णता, युवकांचा सहभाग आणि क्रीडा उत्कृष्टतेला चालना देण्यासाठी वचनबद्ध आहे.

आयएसआरएलचे ब्रँड अॅम्बेसेडर सलमान खान म्हणाले: “हैदराबाद रेसचा भाग होण्यासाठी आणि चाहत्यांची व रायडर्सची अतुलनीय ऊर्जा अनुभवण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग भारतातील मोटरस्पोर्टसाठी नवा मापदंड निर्माण करत असून हे वेगवान, थरारक आणि उत्कटतेने भरलेले आहे.”

आयएसआरएलचे व्यवस्थापकीय संचालक वीर पटेल म्हणाले: “हैदराबाद फेरी 6 डिसेंबरला अलिकडे आणल्याने आम्हाला चाहत्यांसाठी आणखी शानदार शनिवारी-रात्रीचा अनुभव देण्याची संधी मिळत आहे. सलमान खानच्या प्रत्यक्ष उपस्थितीमुळे हा कार्यक्रम भारतातील मोटरस्पोर्टसाठी एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. आम्ही एका छताखाली जागतिक दर्जाचे रेसिंग, मनोरंजन आणि मोटरस्पोर्टप्रेमी समुदाय एकत्र आणण्यास उत्सुक आहोत.तेलंगणा रायझिंग २०४७ या उपक्रमांतर्गत नवोपक्रम, युवकांचा सहभाग आणि क्रीडा उत्कृष्टतेबद्दल तेलंगणा सरकारचे दृष्टीकोन आम्हाला प्रेरणा देतात. सुपरक्रॉस हा खेळ राज्यात आणण्यासाठी दिलेल्या त्यांच्या अमूल्य सहकार्याबद्दल आम्ही तेलंगणा सरकार आणि तेलंगणा क्रीडा प्राधिकरणाचे मनःपूर्वक आभार मानतो.”

पुण्यातील पहिल्या फेरीत चाहत्यांनी मुसळधार पावसातही हजेरी लावून आपल्या आवडत्या रायडर्सना प्रोत्साहन दिले होते. भारतातील मोटरस्पोर्टची आवड पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे हे आयएसआरएलने त्या कार्यक्रमातून सिद्ध केले. त्या यशावर आधारित, आयएसआरएल जागतिक दर्जाचे रेसिंग, मनोरंजन आणि युवकांचा सहभाग एकाच मंचावर आणत भारतातील मोटरस्पोर्टमध्ये क्रांती घडवत आहे.

हैदराबाद फेरीनंतर, आयएसआरएल सीझन 2ची ग्रँड फिनाले (तिसरी फेरी) 21 डिसेंबर 2025 रोजी केरळ येथील कालिकत मधील ईएमएस कॉर्पोरेशन स्टेडियमवर होणार आहे. त्यातून भारतातील सर्वात मोठ्या मोटरस्पोर्ट सीझनची शानदार सांगता होईल.

हैदराबाद आणि केरळमध्ये हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीची अपेक्षा असून आयएसआरएल स्थानिक प्रतिभेला प्रोत्साहन देण्यास आणि रेसिंग प्रेमींच्या नव्या पिढीला प्रेरित करण्यास वचनबद्ध आहे.

चाहते आपली तिकिटे बुक माय शो वरून खास बुक करू शकतात. तिथे ॲप आणि वेबसाईटवर सर्वसाधारण जनरल आसनांपासून ते व्हीआयपी पासपर्यंत विविध पर्याय उपलब्ध असतील. आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी, हैदराबाद फेरी युरोस्पोर्टवर भारत, बांगलादेश, श्रीलंका आणि मालदीवमध्ये तसेच Rev TV वर कॅनडामध्ये प्रसारित केली जाईल. हा कार्यक्रम फॅनकोड (इंडिया) आणि आयएसआरएलच्या यूट्युब चॅनेलवर जागतिक स्तरावर थेट प्रसारित केला जाईल.

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचा ८वा दीक्षांत समारंभ शनिवारी: ३३३४ विद्यार्थ्यांना होणार पदवी प्रदान

पुणे : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ (एमआयटी एडीटी), विश्वराजबाग, पुणे या विद्यापीठाचा ८वा दीक्षांत समारंभ  शनिवार, दि. ८ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे. यंदाचा समारंभ राजस्थानचे राज्यपाल मा. श्री. हरिभाऊ बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत, तर विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या अध्यक्षतेखाली, स्वामी विवेकानंद मंडप, विश्वराजबाग, लोणी काळभोर येथे संपन्न होणार आहे.
यंदा एकूण ३३३४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मंडी, हिमाचल प्रदेशचे संचालक प्रा. डॉ. लक्ष्मीधर बेहरा यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तसेच, एमआयटी एडीटी विद्यापीठाकडून भारत सरकारच्या तंत्रज्ञान, नवोन्मेष, उष्मायन व उद्यमशीलता क्षेत्रातील राष्ट्रीय तज्ज्ञ सल्लागार परिषदेचे अध्यक्ष श्री. रामानन रामनाथन यांना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (D.Sc.) ही मानद पदवी प्रदान करण्यात येणार आहे. तर ‘ग्लास मॅन ऑफ इंडिया’ म्हणून परिचित आणि गोल्ड प्लस ग्लास इंडस्ट्रीजचे चेअरमन श्री. सुभाष त्यागी यांना औद्योगिक नेतृत्वाबद्दल ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ (D.Litt.) या मानद पदवीने सन्मानित केले जाणार आहे.

एमआयटी एडीटी विद्यापीठाची २०१५ साली स्थापना झाल्यापासूनची प्रगती उल्लेखनीय आहे. यंदाच्या दीक्षांत समारंभात २१ विद्यार्थ्यांना पीएच.डी., २१ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, तर १९५ विद्यार्थ्यांना रँक होल्डर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी पालक, विद्यार्थी आणि निमंत्रितांसह सुमारे ८ हजारांहून अधिक उपस्थिती अपेक्षित आहे.

आजपर्यंतच्या सात दीक्षांत समारंभांत, माजी राज्यपाल व विद्यमान उपराष्ट्रपती मा. श्री. सी. पी. राधाकृष्णन, मा. श्री. नितीनजी गडकरी, श्री. विनोदजी तावडे, इस्त्रोचे माजी चेअरमन पद्मविभूषण डॉ. जी. माधवन नायर, माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, डीआरडीओचे माजी चेअरमन डॉ. जी. सतीश रेड्डी, इस्त्रोचे विद्यमान चेअरमन डॉ. एस. सोमनाथ आदी मान्यवरांनी हजेरी लावली आहे.
“यंदा राज्यपाल मा. श्री. हरिभाऊ बागडे यांचे उपस्थितीमुळे विद्यापीठात उत्साहाचे वातावरण आहे,” अशी माहिती कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डॉ. महेश चोपडे आणि परीक्षा नियंत्रक डॉ. ज्ञानदेव नीलवर्ण यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

“यंदा दीक्षांत समारंभात २१ पीएच.डी., २१ सुवर्णपदकांसह एकूण ३३३४ विद्यार्थ्यांना एमआयटी एडीटी विद्यापीठाकडून पदवी प्रदान करण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्यपाल मा. श्री. हरिभाऊ बागडे, प्रा. डॉ. लक्ष्मीधर बेहरा, श्री. रामानन रामनाथन आणि श्री. सुभाष त्यागी प्रथमच विद्यापीठात येत असल्याने, विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोचली आहे.”
– प्रा. डॉ. मंगेश कराड, कार्यकारी अध्यक्ष तथा प्र-कुलपती,
एमआयटी एडीटी विद्यापीठ, पुणे.

ॲडव्होकेट असीम सरोदेंची सनद 3 महिन्यांसाठी रद्द:महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलची मोठी कारवाई

महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलने सोमवारी सुप्रसिद्ध विधिज्ञ असीम सरोदे यांची वकिलीची सनद 3 महिन्यांसाठी रद्द करून त्यांना जोरदार झटका दिला. असीम सरोदे हे सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष व चिन्हाविषयी सुरू असलेल्या सुनावणीत सहभागी असणाऱ्या वकिलांपैकी एक आहेत. पण आता त्यांची सनद रद्द झाल्यामुळे त्यांना या प्रकरणात कोणताही युक्तिवाद करता येणार नाही.असीम सरोदे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्था, राज्यपाल व विधानसभा अध्यक्ष यांच्याविषयी काही आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यांच्या या विधानांमुळे न्याय व्यवस्थेचा अवमान झाला असून, न्यायालयांविषयी अविश्वास निर्माण झाला आहे, अशी तक्रार एका व्यक्तीने बार कौन्सिलकडे केली होती. या प्रकरणी असीम सरोदे यांना 19 मार्च 2024 पर्यंत लेखी माफी मागण्याची संधी देण्यात आली. पण त्यांनी माफी मागण्यास ठाम नकार दिला. त्यामुळे आता बार कौन्सिलने या तक्रारीवर कारवाई करत त्यांची वकिलीची सनद 3 महिन्यांसाठी रद्दबातल केली आहे.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी वकील विवेकानंद घाटगे यांच्या नेतृत्वात एक समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने असीम सरोदे यांच्या भाषणाचे ट्रान्सक्रिप्ट व व्हिडिओ क्लिप पाहिल्या. त्यात असीम सरोदे स्पष्टपणे म्हणताना दिसून येत आहेत की, ‘राज्यपाल फालतू आहेत’ व ‘न्यायालय सरकारच्या दबावाखाली आहे’. अशा विधानांमुळे जनतेमध्ये न्यायालयाविषयी अविश्वास निर्माण होतो. न्यायव्यवस्था व घटनात्मक पदांविषयी आदर राखणे वकिलाची नैतिक व कायदेशीर जबाबदारी आहे. वकील हे ‘न्यायालयाचे अधिकारी’ (ऑफिसर ऑफ द कोर्ट) असतात. त्यामुळे त्यांनी न्यायसंस्थेविषयी संयम व सन्मान राखला पाहिजे, असे बार कौन्सिलच्या समितीने म्हटले आहे.

असीम सरोदे यांनी या प्रकरणी आपण कोणत्याही न्यायालय किंवा घटनात्मक पदाचा अपमान केला नसल्याचा दावा केला होता. ते म्हणाले होते, मी कोणत्याही प्रकारे न्यायालयाचा किंवा घटनात्मक पदाचा अवमान केला नाही. माझे विधान हे लोकशाहीतील रचनात्मक टीका होती. मी फालतू हा शब्द अपमानार्थ नव्हे, तर सर्वसामान्य भाषेत वापरला. मला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. माझा हेतू न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्याचा नव्हता, तर लोकांना जागरूक करण्याचा होता.

असीम सरोदे हे एक नामवंत वकील आहेत. त्यांचा भारतीय संविधान व कायद्याचा अभ्यास दांडगा आहे. ते सातत्याने राज्यासह देशभरातील विविध सामाजिक व राजकीय मुद्यावर आपले परखड मत मांडत असतात. मानवी हक्कांवरही त्यांचा सखोल अभ्यास आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधीकरण बार असोसिएशनचे ते पुण्याचे अध्यक्ष आहेत. ते सध्या शिवसेना पक्ष व चिन्हाविषयी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत आपली बाजू मांडत आहेत. एवढेच नाही तर संसदेत घुसखोरी करून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडणाऱ्या घटनेतील आरोपी असणाऱ्या अमोल शिंदे नामक तरुणालाही ते कायदेशीर मदत पुरवत आहेत.

आदित्य बिर्ला कॅपिटलच्या दुसऱ्या तिमाहीच्या नफ्यात 3% ची वाढ, 855 कोटी रुपयांचा नफा

मुंबई, 3 नोव्हेंबर 2025: सप्टेंबर 2025 रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत आदित्य बिर्ला कॅपिटलच्या एकत्रित निव्वळ नफ्यात 3 टक्क्यांची वाढ होऊन तो 855 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

आदित्य बिर्ला ग्रुपच्या या वित्तीय सेवा शाखेने मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 834 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.

आदित्य बिर्ला कॅपिटलने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, पुनरावलोकनाधीन तिमाहीत एकूण उत्पन्न वाढून 10,609 कोटी रुपये झाले आहे, जे गेल्या वर्षी 10,362 कोटी रुपये होते.

व्याजातून मिळालेले उत्पन्न हे गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत 4,141 कोटी रुपयांवरून 5,003 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर एकूण खर्चही 9,034 कोटी रुपयांवरून 9,475 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

एकूण मालमत्ता व्यवस्थापन (एएमसी, जीवन विमा आणि आरोग्य विमा) 30 सप्टेंबर 2025 रोजी 10 टक्क्यांनी वाढून 5,50,240 कोटी रुपयांवर पोहोचले आहे जे गेल्या वर्षीच्या याच काळात 5,01,152 कोटी रुपये एवढे होते.

समायोजित PAT बद्दल सविस्तर माहितीसाठी, कृपया खाली दिलेली टीप पहा:

आर्थिक वर्ष 25 च्या दुसऱ्या तिमाहीत करपश्चात एकत्रित नफा 1,001 कोटी रुपये होता. कंपनीने आदित्य बिर्ला इन्शुरन्स ब्रोकर्स लिमिटेड (“ABIBL”) मधील तिचा संपूर्ण 50.002% हिस्सा 30 ऑगस्ट 2024 रोजी समारा कॅपिटल ग्रुपचा भाग आणि समारा अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंडची संलग्न कंपनी एडमी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडला विकला होता. यातून कंपनीला 202.90 कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे (कराचा निव्वळ नफा 166.88 कोटी रुपये आहे). 30 ऑगस्ट 2024 पासून ABIBL ने कंपनीची उपकंपनी म्हणून काम थांबवले आहे. एका वेळचा एकत्रित नफा वगळता करपश्चात नफा आर्थिक वर्ष 25च्या दुसऱ्या तिमाहीत 834कोटी रुपये होता

‘असंभव’मधून रंगणार रहस्यमय कथा

मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट पुन्हा एकत्र!

मराठी चित्रपटसृष्टीतील दोन बहुप्रतिभावान अभिनेत्री पुन्हा एकदा एकत्र येत आहेत आणि यावेळी त्यांची जोडी प्रेक्षकांना एका थरारक कथेत पाहायला मिळणार आहे. मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट या दोन्ही अभिनेत्रींचा आगामी सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट ‘असंभव’ २१ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझर आणि पोस्टरमुळे या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कथानक, कलाकारांची जोडी आणि टिझर, ट्रेलरमधून निर्माण झालेलं रहस्य यामुळे ‘असंभव’ हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला सिनेमा ठरला आहे.

‘आम्ही दोघी’ चित्रपटानंतर आता या दोघी पुन्हा एकत्र आल्या आहेत, मात्र यावेळी त्यांची केमिस्ट्री पूर्णपणे वेगळ्या वातावरणात, गूढता आणि थराराने व्यापलेल्या कथेत रंगताना दिसणार आहे.

या चित्रपटाबद्दल प्रिया बापट म्हणते, ” ‘आम्ही दोघी’ करताना आम्ही ज्या भावनिक प्रवासातून गेलो, तो अनुभव आमच्यासाठी अत्यंत खास होता. तो जिव्हाळ्याचा बंध प्रेक्षकांनी देखील अनुभवला. ‘असंभव’मध्ये आम्ही पुन्हा एकत्र आलो आहोत, मात्र यावेळी तोच बंध एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येईल. मुक्ता सोबत काम करताना नेहमीच एक उत्साह असतो. तिची काम करण्याची पद्धत कमाल आहे. ती त्या भूमिकेत स्वतःला झोकून देते आणि त्यामुळेच समोरचाही तितक्याच उत्साहाने तिच्यासोबत काम करू शकतो. यात आमच्या नात्याची नवी बाजू तर दिसेलच, परंतु त्याचसोबत अनेक प्रश्न आणि आश्चर्याचे क्षणही अनुभवायला मिळतील.”

मुक्ता बर्वे या अनुभवाबद्दल सांगते, “प्रिया सोबत काम करणं नेहमीच एक वेगळा आनंद देणारं असतं. तिच्यासोबत असताना संवाद सहज साधला जातो आणि एकमेकांवरील विश्वास आपोआप वाढतो. ‘आम्ही दोघी’मध्ये आम्ही नात्याची ऊब अनुभवली होती, तर ‘असंभव’मध्ये त्या नात्याभोवती थरार, रहस्य आणि भीतीचं वलय आहे. त्यामुळे काम अधिक रोचक झालं आहे आणि प्रेक्षकांसाठी हा एक नवा व अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.”

‘असंभव’चे दिग्दर्शन सचित पाटील यांनी तर सह दिग्दर्शन पुष्कर सुधाकर श्रोत्री यांनी केले आहे. मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, याच निमित्ताने त्यांनी पहिल्यांदाच एकत्र येऊन निर्मितीक्षेत्रात पाऊल टाकले आहे. सह-निर्मात्यांमध्ये एरिकॉन टेलिफिल्म्सच्या शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई तसेच पी अँड पी एंटरटेनमेंटचे मंगेश परुळेकर आणि संजय पोतदार यांचा समावेश आहे.

जगभरात अल्कोहोलच्या वापरात झपाट्याने घट,भारतात मात्र झपाट्याने वाढ

भारतात दारू बाजारपेठ ६० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली-दोन दशकांत भारतातील महिलांमध्ये अल्कोहोलचे सेवन ५०% वाढले- भारतातील सरासरी उत्पन्न ३०% ने वाढले आहे, ब्रँडेड आणि प्रीमियम दारूची मागणी दरवर्षी १८% ने वाढत आहे.

मुंबई- गेल्या चार वर्षांत जगभरात अल्कोहोलच्या वापरात झपाट्याने घट झाली आहे. भारतात मात्र वाढ होत असल्याचे दिसते आहे. चार वर्षांत मध्य प्रदेशात दारूचे सेवन ८६% आणि राजस्थानमध्ये २९% वाढले. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, जून २०२१ पासून जगातील ५० आघाडीच्या दारू ब्रँडच्या शेअर्समध्ये सरासरी ४६% घट झाली आहे. दरम्यान, भारतात दारूचा वापर सातत्याने वाढत आहे. दरडोई दारूचा वापर २००५ मध्ये २.४ लिटरवरून २०१६ मध्ये ५.७ लिटरपर्यंत वाढला आणि २०३० पर्यंत तो ६.७ लिटरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. भारताची दारू बाजारपेठ ६० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. चार वर्षांत, युनायटेड स्पिरिट्स, रेडिको खेतान आणि ग्लोबस स्पिरिट्सचे शेअर्स १४ पटीने वाढले आहेत. राज्यांना दारू विक्रीतून १९,७३० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.अमेरिका, युरोप आणि चीनसारख्या बाजारपेठांमध्ये डियाजियो, पेर्नोड रिकार्ड, रेमी कॉइंट्रेउ आणि ब्राउन-फॉरमन सारख्या प्रमुख कंपन्यांचे शेअर्स ७५% पर्यंत घसरले आहेत आणि उद्योगाचे मूल्यांकन ७४ लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. आरोग्य जागरूकता, बदलती जीवनशैली आणि महागाई ही याची मुख्य कारणे आहेत. या कंपन्या आता नॉन-अल्कोहोलिक उत्पादनांकडे वळत आहेत. डियाजियोने रिच्युअल झिरो प्रूफ विकत घेतले आहे, तर कार्ल्सबर्ग आणि कॉम्पारी-मिलानोनेही असे ब्रँड लाँच केले आहेत.

मध्य प्रदेशात, २०२१-२२ मध्ये २४५.३३ लाख लिटरवरून २०२४-२५ मध्ये ४५६.४४ लाख लिटरपर्यंत दारूचा वापर झाला, जो ८६% वाढला. याच कालावधीत, राजस्थानमध्ये, वापर २३५.८६ वरून ३०४.१६ लाख लिटरपर्यंत वाढला, जो २८.९५% वाढला.फ्युचर मार्केट इनसाइट्सनुसार, देशातील ६०% लोकसंख्या ३५ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे, जी दारू बाजाराच्या वाढीला चालना देत आहे.
‘डब्ल्यूएचओ ग्लोबल रिपोर्ट’ मध्ये असे आढळून आले आहे की गेल्या दोन दशकांत भारतातील महिलांमध्ये अल्कोहोलचे सेवन ५०% वाढले आहे.स्टॅटिस्टा आणि रिपोर्टलिंक रिसर्चच्या मते, भारतातील सरासरी उत्पन्न ३०% ने वाढले आहे, ब्रँडेड आणि प्रीमियम दारूची मागणी दरवर्षी १८% ने वाढत आहे.

शेतकऱ्यांना दिलासा देणारी ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’

जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यमान यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना सातत्याने करावा लागत आहे. अशावेळी शेतकरी वर्गाला मदतीचा हात देऊन त्यांना दिलासा देण्यासाठी राज्यातील ७.५ एच.पी पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना मोफत वीज देण्यासाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-२०२४’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात मार्च २०२४ अखेर ४७ लाख ४१ हजार इतके कृषी पंप ग्राहक असून या ग्राहकांना महावितरण कंपनीमार्फत वीज पुरवठा करण्यात येतो. एकूण ग्राहकांपैकी १६ टक्के कृषीपंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे ३० टक्के ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो. कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर ३९ हजार २४६ दश लक्ष युनिट आहेत. प्रामुख्याने या विजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो. सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या काळात १०/८ तास किंवा दिवसा ८ तास थ्री फेज विजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते.

जून २०२४ महिन्यात झालेल्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-२०२४’ राबविण्याची घोषणा केली होती. या योजनेद्वारे शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीजबिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरविले असून राज्यातील ४४ लाख ३ हजार शेतकऱ्यांच्या ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरविण्यात येणार आहे. याकरीता १४ हजार ७६० कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्याच्यादृष्टीने व त्यांची थकबाकी वाढू न देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-२०२४ राबविण्यात येत आहे.

ही योजना ५ वर्षासाठी राबविण्यात येत असून त्याचा कालावधी एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ पर्यंत आहे. मात्र ३ वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेवूनच पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यातील ७.५ एच.पी पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील.

योजनेच्या अंमलबजावणीची पद्धत:
‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’ ही योजना महावितरण कंपनीतर्फे राबविण्यात येते. शासनास विद्युत अधिनियम २००३, कलम ६५ अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देवून त्यानुसार अनुदानीत वीज दर लागू करण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीजदर सवलती पोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रीम स्वरुपात वर्ग करण्यात येत आहे.

सध्या देण्यात येणारी वीजदर सवलत ६ हजार ९८५ कोटी रुपये अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये ७ हजार ७७५ कोटी रुपये असे वार्षिक वीजदर सवलतीसाठी प्रतिवर्षी १४ हजार ७६० कोटी रुपये शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येणार आहे. मागेल त्याला सौर कृषीपंप देण्याचे धोरण शासनाकडून ठरविण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी वीजेची सुलभतेने उपलब्धता होऊ शकेल.

सुनील काकडे, मुख्य अभियंता, महावितरण पुणे परिमंडल, पुणे :
‘राज्य शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४ नुसार ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपाना मोफत वीजपुरवठा करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात एकूण ३ लाख २९ हजार ४८८ शेतीपंप आहेत. त्यापैकी ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या एकूण २ लाख ८४ हजार १९८ शेतीपंपधारक शेतकऱ्यांना या मोफत वीज योजनेचा लाभ होत आहे.’

विकास किसन कापडी, मु. जारकरवाडी, पो. पारगांव, ता. आंबेगाव: आमचे ३ एचपी व ५ एचपीचे दोन शेतीपंप कनेक्शन आहेत. गेल्या दीडएक वर्षांपासून आमची लाईट बिलाची चिंता मिटली आहे. पूर्वी दर तीन महिन्याला बील यायचे. ते भरण्यासाठी पैशाची जुळवणी करताना दमझाक व्हायची. योजनेबद्दल सरकारचे धन्यवाद. तसेच सरकारने ही योजना कायमस्वरुपी सुरु ठेवावी.

सुनिल अर्जुन करंडे, काठापूर बु., ता. आंबेगाव: माझे ५ एचपीचे कनेक्शन आहे. मागील वर्षांपासून आम्हाला शेतीचे बील येणे सरकारच्या बळीराजा मोफत योजनेमुळे बंद झाले आहे. या योजनेबद्दल मी समाधानी असून, सरकारचा आभारी आहे. दिवसा वीज देण्यासाठीही सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.

संकलन: जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

अनिल अंबानींच्या 3000 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त:येस बँक कर्ज प्रकरणात पाली हिलमधील घरासह 40 मालमत्तांचा समावेश

दिल्ली ते चेन्नई पर्यंत पसरलेल्या जप्त मालमत्ता

मुंबई-अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपच्या ४० हून अधिक मालमत्ता जप्त केल्या आहेत. या मालमत्तांमध्ये अनिल अंबानी यांचे पाली हिल येथील घर देखील समाविष्ट आहे. जप्त केलेल्या मालमत्तांची एकूण किंमत ₹३,०८४ कोटी असल्याचा अंदाज आहे.जप्त केलेल्या मालमत्ता दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, मुंबई, पुणे, ठाणे, हैदराबाद, चेन्नई, कांचीपुरम आणि पूर्व गोदावरी यासारख्या शहरांमध्ये आहेत. त्यामध्ये निवासी युनिट्स, ऑफिस स्पेस आणि जमिनीचा समावेश आहे. अनिल अंबानी यांचे पाली हिल येथील निवासस्थान सर्वात हाय-प्रोफाइल आहे.ईडी गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेचा शोध घेण्यावर लक्ष केंद्रित करत आहे जेणेकरून अधिकाधिक मालमत्ता जप्त करता येतील. आतापर्यंत ₹३,०८४ कोटी किमतीच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे, ज्यामध्ये रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) च्या येस बँकेच्या कर्ज आणि निधी वळवण्याच्या प्रकरणाचा समावेश आहे.

हे मालमत्ता जप्तीचे आदेश ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी पीएमएलएच्या कलम ५(१) अंतर्गत जारी करण्यात आले होते. ईडीचे म्हणणे आहे की सार्वजनिक पैसे वसूल करण्यासाठी ही पावले आवश्यक आहेत.
ईडीला त्यांच्या चौकशीत रिलायन्स होम फायनान्स (RHFL) आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स (RCFL) मध्ये निधीचा मोठा गैरवापर आढळून आला आहे. २०१७ ते २०१९ दरम्यान, येस बँकेने RHFL मध्ये ₹२,९६५ कोटी आणि RCFL मध्ये ₹२,०४५ कोटी गुंतवले.

परंतु डिसेंबर २०१९ पर्यंत, या रकमा अनुत्पादक मालमत्ता (NPA) बनल्या होत्या. RHFL चे थकित कर्ज अजूनही ₹१,३५३ कोटी आहे, तर RCFL चे कर्ज अजूनही ₹१,९८४ कोटी आहे. एकूण, येस बँकेला ₹२,७०० कोटींपेक्षा जास्त तोटा सहन करावा लागला.

ईडीच्या मते, हे पैसे रिलायन्स ग्रुपच्या इतर कंपन्यांकडे वळवण्यात आले. कर्ज मंजुरी प्रक्रियेतही अनेक अनियमितता आढळून आल्या. उदाहरणार्थ, काही कर्जांसाठी अर्ज करण्यात आला, मंजूर करण्यात आला आणि त्याच दिवशी वितरित करण्यात आले. फील्ड चेक आणि बैठका वगळण्यात आल्या. कागदपत्रे रिक्त किंवा तारीख नसलेली आढळली.

ईडीने याला “जाणूनबुजून नियंत्रण अपयश” असे वर्णन केले आहे. पीएमएलएच्या कलम ५(१) अंतर्गत तपास सुरू आहे आणि ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी जप्तीचे आदेश जारी करण्यात आले.

प्रश्न १: ईडीने अनिल अंबानींवर कारवाई का केली

उत्तर: हे प्रकरण २०१७ ते २०१९ दरम्यान अनिल अंबानींशी संबंधित रिलायन्स ग्रुप कंपन्यांना येस बँकेने दिलेल्या सुमारे ३,००० कोटी रुपयांच्या कर्जाशी संबंधित आहे.

ईडीच्या प्राथमिक तपासात असे दिसून आले की ही कर्जे कथितपणे शेल कंपन्या आणि इतर गट संस्थांना वळवण्यात आली होती. तपासात असेही आढळून आले की येस बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाच देण्यात आली असावी.

प्रश्न २: ईडीच्या चौकशीत आणखी काय समोर आले?

प्रतिसाद: ईडी म्हणते की ही बँका, भागधारक, गुंतवणूकदार आणि इतर सार्वजनिक संस्थांना फसवण्यासाठी “सुव्यवस्थित आणि सुव्यवस्थित” योजना होती. तपासात अनेक अनियमितता उघड झाल्या, ज्यात हे समाविष्ट आहे:

कमकुवत किंवा पडताळणी न झालेल्या कंपन्यांना कर्जे.
अनेक कंपन्यांमध्ये एकाच संचालकाचा आणि पत्त्याचा वापर.
कर्जाशी संबंधित आवश्यक कागदपत्रांचा अभाव.
बनावट कंपन्यांना पैसे हस्तांतरित करणे.
जुने कर्ज फेडण्यासाठी नवीन कर्ज देण्याची प्रक्रिया (कर्ज सदाहरितीकरण).


प्रश्न ३: या प्रकरणात सीबीआयची भूमिका काय आहे?

उत्तर: सीबीआयने दोन प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल केले. ही प्रकरणे येस बँकेने रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेडला दिलेल्या दोन वेगवेगळ्या कर्जांशी संबंधित आहेत. दोन्ही प्रकरणांमध्ये, सीबीआयने येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांचे नाव घेतले आहे.त्यानंतर, एका अधिकाऱ्याने सांगितले की, नॅशनल हाऊसिंग बँक, सेबी, नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी आणि बँक ऑफ बडोदासह इतर एजन्सी आणि संस्थांनीही ईडीशी माहिती शेअर केली. ईडी आता या प्रकरणाची चौकशी करत आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात १३ वर्षीय मुलाचा अंत :संतप्त ग्रामस्थांकडून वनविभागाचे वाहन पेटवले!

0

शिरूर – पिंपरखेड येथे रविवारी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याने रोहन विलास बोंबे (वय 13) या मुलाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या ह्रदयद्रावक घटनेमुळे पिंपरखेड परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे.

दुपारी पावणे चार वाजता रोहन बोंबे घराबाहेर मोकळ्या शेतात खेळत असताना, हत्ती गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली आणि त्याला ओढत उसाच्या शेतात नेले. मुलगा दिसत नसल्याचे लक्षात येताच रोहनच्या आजीने आई-वडिलांना सांगितले. त्यांनी तातडीने शेजाऱ्यांना बोलावून शोध सुरू केला. परिसरातील तरुणांनी आरडाओरड करत उसाच्या शेतात शोध घेतला असता, रोहन मृतावस्थेत आढळून आला.

या अतिशय दुःखद घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. परिसरात 20 दिवसांत बिबट्यांच्या हल्ल्याची ही तिसरी घटना असूनही वनविभागाने कोणताही ठोस बंदोबस्त केला नसल्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. संतापलेल्या जमावाने वनविभागाच्या गाडीला उलटून नंतर पेटवून दिले. ग्रामस्थांनी दोन वेळा रास्तारोको आंदोलन करूनही प्रशासन जागे होत नसल्याने त्यांनी हा संतप्त पवित्रा घेतला. या घटनेनंतर जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत मुलाचे शवविच्छेदन न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

जामिनासाठी सकारात्मक रिपोर्ट कोर्टाला देण्यासाठी २ कोटीची लाच मागणारा फौजदार गजाआड

पुणे- आरोपीला जामिनासाठी सकारात्मक रिपोर्ट कोर्टाला देण्यासाठी दोन कोटी रुपयांची मागणी करून, पहिल्या हप्त्यापोटी ४६ लाखांची लाच घेताना एका पोलिस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रविवारी (ता. २) रास्ता पेठ परिसरात ताब्यात घेतले.प्रमोद रवींद्र चिंतामणी (वय ३५) असे पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.प्रमोद रविंद्र चिंतामणी, वय 44 वर्ष, पोलीस उप निरीक्षक, नेमणूक आर्थिक गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड आयुक्तालय, रा. फ्लॅट नंबर 504, सोपान रेसिडेन्सी, गंगोत्री पार्क, दिघी रोड, भोसरी, पुणे, मुळ कर्जले हरियाळ ता. पारनेर, जि. अहिल्यानगर (वर्ग-2)याच्याविरुद्ध या प्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात चिंतामणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील तक्रारदार हे व्यवसायाने वकील असून त्यांचे आशील यांचेविरुद्ध बावधान पोलीस स्टेशन
येथे गु. रजि.नं. 256/2025, भा. न्या. सं. कलम 316(2), 316(5), 318(4), 336(2), 338,339, 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यामध्ये आशियाच्या वडिलांना सुद्धा अटक झाली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. सदर गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी यांच्याकडे आहे. सदर गुन्ह्यामध्ये तक्रारदारांच्या आशीलाला मदत करण्यासाठी व आशिलाच्या अटकेतील वडिलांच्या जामीन अर्जावर से दाखल करण्यासाठी यातील आरोपी लोकसेवक प्रमोद चिंतामणी, पोलीस उप निरीक्षक हे तक्रारदाराकडे स्वतःसाठी 2 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत असल्याची तक्रार तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे दिली होती.
यातील तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 27/10/2025 रोजी ला.प्र.वि. पुणे विभागाकडून लाच मागणी पडताळणी कारवाई केली असता पडताळणीमध्ये आलोसे यांनी तक्रारदार यांना त्यांच्या अशीलाला गुन्ह्यात मदत करण्यासाठी व त्या गुन्ह्यात अटकेत असलेले आशिलाचे वडील यांच्या जामीन अर्जावर से देण्यासाठी स्वतःसाठी दोन लाखाच्या प्राथमिक लाच मागणीमध्ये अचानकपणे वाढ करून दोन कोटी रुपयांची लाच मागितली त्यापैकी एक कोटी स्वतःसाठी व त्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना एक कोटी असे दोन कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच आलोसे यांनी तक्रारदाराकडे वरील कारणासाठी मागितलेल्या दोन कोटी रुपयांच्या लाच रकमेपैकी 50 लाख स्मयांचा पहिला हप्ता लवकरात लवकर देऊन उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने देण्याचे ठरल्याचे निष्पन्न झाले
वरील प्रमाणे लाच मागणी पडताळणी केल्यानंतर आज दि.2/11/2025 रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान यातील आरोपी लोकसेवक प्रमोद चिंतामणी वय 35 वर्ष, पोलीस उप निरीक्षक, नेमणूक आर्थिक गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड आयुक्तालय यांनी उंटाड्या मारुती मंदिरासमोर, रस्ता पेठ, पुणे शहर येथे तक्रारदाराकडून लाच मागणी पडताळणी कारवाईदरम्यान मागितलेल्या दोन कोटी रकमेतील 50 लाखाच्या पहिला हप्ता रक्कमेपैकी 46,50,000/-रुपयाची लाच तक्रारदाराकडून स्वीकारली असता रंगेहात पकडण्यात आले त्यांच्याविरुद्ध समर्थ पोलीस स्टेशन ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, पुणे व अपर पोलीस अधीक्षक श्री. अजीत पाटील, ला.प्र.वि. पुणे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अर्जुन भोसले, ला.प्र.वि. पुणे, यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. लोकसेवक शासकीय अधिकारी / कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजंट) हे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील क्रमांकवर सपंर्कसाधण्याचे आवाहन श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे (मो.क्र. 9823167154) तसेच अपर पोलीस अधीक्षक-1 श्री. अजीत पाटील, ला.प्र.वि., पुणे (मो.क्र. 9029030530) यांनी केले आहे.
अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे- दुरध्वनी क्रमांक 020-26122134, 26132802, 26050423, 9403781064
1) 2) व्हॉट्स अॅप क्रमांक 9403781064 (पुणे), 9930997700 (मुंबई)
3) ई-मेलआयडी पुणे dyspacbpune@mahapolice.gov.in
4) वेबसाईट www.acbmaharashtra.gov.in
5) ऑनलाईन अॅप तक्रार www.acbmaharashtra.net.in

तेलंगणाच्या रंगारेड्डीत भीषण अपघात:बस-डंपरच्या धडकेत 20 ठार

तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील हैदराबाद-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सकाळी एका डंपर ट्रकने एका आरटीसी बसला धडक दिली. या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले. बस तंदूरहून हैदराबादला जात होती.

बसमध्ये 70 हून अधिक प्रवासी होते, त्यापैकी बहुतेक विद्यार्थी होते. ते रविवारच्या सुट्टीसाठी घरी गेले होते आणि कॉलेजमध्ये जाण्यासाठी हैदराबादला परतत होते. पोलिसांनी सांगितले की, एका वेगाने येणाऱ्या डंपरच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने बसला धडक दिली. चेवेल्ला पोलिस स्टेशन परिसरातील खानपूर गेटजवळ बसचे मोठे नुकसान झाले आणि डंपरवर भरलेला खडी आत असलेल्या प्रवाशांवर पडला.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. खडीखाली गाडलेल्यांना बाहेर काढण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात आला. जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आले.या अपघातामुळे हैदराबाद-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. चेवेल्ला-विकाराबाद मार्गावर वाहने अडकल्याने प्रवाशांना मोठी गैरसोय होत आहे. पोलिस परिस्थिती नियंत्रित करण्याचा आणि वाहतूक वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले. त्यांनी अपघाताची संपूर्ण माहिती मागवली आहे. त्यांनी मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना जखमींना तातडीने हैदराबादला पोहोचवण्याचे आणि त्यांच्यावर योग्य उपचार करण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.

अजित पवार महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदावर चौथ्यांदा विराजमान

मुरलीधर मोहोळ यांच्या पॅनेलला काही पदांचा वाटा

मुंबई-उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या (एमओए) अध्यक्षपदी सलग 4 वेळा पुन्हा एकदा सर्वसंमतीने निवड झाली आहे. अजित दादांच्या या विजयामुळे राजकारणासोबतच त्यांची क्रीडा क्षेत्रावर सुद्धा भक्कम पकड असल्याचे अधोरेखित झाले आहे.एकूण 31 क्रीडा संघटनांपैकी तब्बल 22 पेक्षा जास्त संघटनांनी अजित पवार यांच्या पॅनेलला पाठिंबा दिला होता. यातुन त्यांच्या नेतृत्वावर क्रीडा क्षेत्राचा असलेला विश्वास पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. अजित पवार यांच्या पॅनलमधील आदिल सुमारिवाला, प्रदीप गंधे आणि प्रशांत देशपांडे यांची उपाध्यक्षपदांवर बिनविरोध निवड झाली असून यामुळे अजितदादांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासावर शिक्कामोर्तब झाला आहे.

या निवडणुकीआधी भाजप-युतीत समन्वय राखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा पार पडल्या. त्या चर्चेत मुरलीधर मोहोळ यांच्या पॅनेलला काही पदांचा वाटा देण्याचा निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे महायुतीत समन्वय कायम राहिला. यामुळे अजित दादा पुन्हा एकदा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा कारभार चौथ्यांदा सांभाळणार आहेत.

राजकारण आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रात अजित पवार यांचा दीर्घ अनुभव आणि बेरजेचे राजकारण व यामुळे सर्व पक्ष आणि हितसंबंधी संस्थांनी त्यांच्यावर पुन्हा एकत्रित विश्वास दाखवला. राज्यातील क्रीडा आस्थापनांचे सशक्तीकरण, खेळाडू कल्याण आणि पारदर्शी व्यवस्थापन या अजितदादांच्या जमेच्या बाजू राहिलेल्या आहेत त्यामुळे अजित दादांचे नेतृत्व निर्णायक ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

नव्या कार्यकारिणीसमोर राज्यातील खेळाडू घडविणे, ग्रामीण भागातील क्रीडा पायाभूत सुविधा विकसित करणे आणि महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर अधिक स्पर्धात्मक बनविण्याची जबाबदारी असेल. अजितदादांच्या सक्षम नेतृत्वाखाली ही वाटचाल अधिक प्रेरक ठरेल, असा सर्वसामान्यांचा विश्वास आहे.