Home Blog Page 322

माऊंट एलबुस सर करणाऱ्या धैर्या कुलकर्णीचा जिद्द पुरस्काराने गौरव

पुणे : मुलांमधील कलागुणांना प्रोत्साहन देणे हे खरे तर पालकांचे कर्तव्य आहे. परंतु आजचे बहुतांश पालक ‌‘मार्क्सवादी‌’ असल्याचे प्रकर्षाने जाणवते. पालकांनी मुलांवर अपेक्षांचे ओझे न लादता मुलांमधील क्षमता, गुण ओळखणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले. शिखरावर पोहोचण्याची ओढ असल्याशिवाय ते सर करता येत नाही. प्रतिकुलतेतून अनुकूलता निर्माण करत धैर्या हिने आपले नाव सार्थ ठरविले आहे. बहुआयामी प्रतिभावंत असे तिचे व्यक्तिमत्त्व आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

युरोप खंडातील माऊंट एलबुस हे 18 हजार 510 फूट उंचीचे सर्वोच्च शिखर सर करणाऱ्या सातारच्या 13 वर्षीय धैर्या ज्योती विनोद कुलकर्णी हिचा रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे शनिवारी (दि. 13) जिद्द पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण शिखर बँकेचे अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी प्रा. मिलिंद जोशी अध्यक्षपदावरून बोलत होते.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर मंचावर होते. सन्मानपत्र व भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरूप होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्योती कुलकर्णी यांचाही या वेळी विशेष सन्मान करण्यात आला.

प्रा. मिलिंद जोशी पुढे म्हणाले, धर्या हिच्यामध्ये लहान वयातच प्रगल्भता निर्माण झाली आहे. नैराश्यावर मात करण्याची शक्ती मिळवत कसोटीच्या प्रसंगी सकारात्मकतेचा दीप प्रज्वलीत करून तिने माऊंट एलबुस हे 18 हजार 510 फूट उंचीचे सर्वोच्च शिखर सर करीत नावाला साजेसे कार्य केले आहे.

विद्याधर अनास्कार म्हणाले, धर्याबरोबरच तिच्या आई-वडिलांचेही कौतुक व्हायला हवे कारण त्यांनी अतिशय कठीण परिस्थितीला सामोरे जात मुलीला तिच्या निर्णयाला पाठींबा दर्शविला. हार न मानण्याची वृत्ती आणि जिद्द असेल तरच यशाचे शिखर गाठता येते, हे धैर्या हिने प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. अनास्कर यांनी धैर्या हिला 21 हजार रुपयांचा धनादेश बक्षीस म्हणून दिला.

सत्काराला उत्तर देताना धर्या कुलकर्णी म्हणाली, आईची शिस्त आणि वडिलांच्या पाठींब्यामुळे मी हे यश मिळवू शकले आहे. लहानपणापासूनच गिर्यारोहणाची आवड होती. सह्याद्रीतील अनेक गडकिल्ल्यांवर भ्रमंती केली आहे. निसर्गाचे जसे आकर्षण आहे तसेच पांढऱ्या डोंगराचेही आहे. प्रतिकुलतेवर मात करत यश गाठले आहे. पुण्यात सत्कार होत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे.

विनोद कुलकर्णी म्हणाले, धर्याच्या यशात तिच्या आईचा सिंहाचा वाटा आहे, हे सांगण्यात मला अभिमानच वाटतो. लहान वयात धैर्याला जो मानसन्मान मिळत आहे हा आई-वडिल म्हणून आमच्यासाठी भाग्ययोगच आहे.

प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी पुरस्कारामागील भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मानपत्राचे वाचन शिल्पा देशपांडे यांनी केले.

गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या एअरोस्पेस बिझनेसने साफ्रान एअरक्राफ्ट इंजिन्स सोबत केला करार 

~ महत्वाचे LEAP इंजिन घटक उत्पादनासाठी

मुंबई, 12 सप्टेंबर 2025: गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या एअरोस्पेस बिझनेसने जागतिक दर्जाचे व्यावसायिक आणि लष्करी इंजिन उत्पादक साफ्रान एअरक्राफ्ट इंजिन्स सोबत करार केला असल्याचे आज जाहीर केले. पाच वर्षांच्या या करारांतर्गत गोदरेज जगातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या व्यावसायिक विमान इंजिन्सपैकी एक असलेल्या LEAP इंजिन्स साठी टीटॅनियम मटेरियलवर आधारित कॉम्प्लेक्स व्हेंटिलेशन असेंब्लीज विकसित करेल. 

CFM इंटरनॅशनल द्वारे विकसित LEAP इंजिन्स हे अत्याधुनिक नॅरो-बॉडी एअरक्राफ्टला शक्ती देतात. हा टप्पा भारताच्या एअरोस्पेस उत्पादन क्षमतेला पुढे नेण्याच्या गोदरेजच्या बांधिलकीला  बळकट करतो. जागतिक एअरक्राफ्ट इंजिन OEMs साठी एक प्रमुख पुरवठादार होण्याच्या दृष्टीकोनाशी हे सुसंगत आहे. उत्पादनामध्ये गुंतागुंतीचे यांत्रिकीकरण, अचूक वेल्डिंग आणि नागरी विमान वाहतुकीच्या कठोर मानकांना पूर्ण करण्यासाठी प्रगत नॉन-डिस्ट्रक्टिव टेस्टिंगचा समावेश असेल.

इंजिनच्या मेन टर्बाइन शाफ्टमध्ये असणाऱ्या कॉम्प्लेक्स व्हेंटिलेशन असेंब्लीजसाठी प्रगत उत्पादन अचूकता आणि कठोर गुणवत्ता मानकांची आवश्यकता आहे. या ऑर्डरसह, गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपने साफ्रान सोबतची आपली दीर्घकालीन भागीदारी अधिक दृढ केली आहे आणि जागतिक एरो-इंजिन प्रोग्राम्सना पाठबळ देण्याची आपली भूमिका विस्तारली आहे.

गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचा एक भाग असलेल्या एअरोस्पेस बिझनेसचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख मानेक बेहरामकामदिन म्हणाले, “हा करार म्हणजे गोदरेजच्या जागतिक दर्जाच्या अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षमतेची पावती आहे आणि जागतिक एअरोस्पेस इकोसिस्टममध्ये भारताच्या वाढत्या भूमिकेची एक ठळक प्रचीती आहे. अशा अत्यंत गुंतागुंतीच्या घटकांचे उत्पादन भारतातच करून आम्ही मेक इन इंडिया, फॉर द वर्ल्ड या दृष्टीकोनाला पुढे नेत आहोत. आमची साफ्रान एअरक्राफ्ट इंजिन्स सोबतची भागीदारी गुणवत्ता, विश्वासार्हता आणि जागतिक स्तरावरील नाविन्यपूर्णता यासाठी आमच्या सामायिक बांधिलकीचे प्रतिक आहे.”

साफ्रान एअरक्राफ्ट इंजिन्सच्या खरेदी विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉमिनिक डुपुई म्हणाले, “या नव्या LEAP प्रोग्राम मँडेटसह आम्ही एक विश्वासार्ह भागीदारी मजबूत करत आहोत. साफ्रान एअरक्राफ्ट इंजिन्सच्या मजबूत आणि वैविध्यपूर्ण जागतिक पुरवठा साखळी तयार करण्याच्या धोरणाशी हे सुसंगत आहे. गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप सोबतच्या या दीर्घकालीन भागीदारीचा  विस्तार करून आम्ही LEAP प्रोग्रामला पाठबळ देत आहोत आणि जागतिक एअरोस्पेस क्षेत्रामध्ये भारताला एक स्ट्रॅटेजिक हब म्हणून दीर्घकालीन औद्योगिक संबंध प्रस्थापित करण्याच्या साफ्रानच्या दृष्टीकोनाला पुढे नेत आहोत.”

गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचा एअरोस्पेस बिझनेस गेल्या चार दशकांपासून भारताच्या हवाईक्षेत्र परिसंस्थेमधील एक विश्वासार्ह भागीदार राहिला आहे. त्यांनी महत्वपूर्ण अवकाश आणि संरक्षण  प्रोग्राम्स तसेच व्यावसायिक विमानवाहतुकीत योगदान दिले आहे. या नव्या करारासह, कंपनीने उच्च प्रतीच्या अचूक एअरोस्पेस घटकांसाठी एक प्रमुख जागतिक पुरवठादार म्हणून आपले स्थान अधिक मजबूत केले आहे.

मेट्रोपर्यंत जाण्यासाठी मोफत बस सेवा -कोथरूडमध्ये मंत्री चंद्रकांतदादांच्या संकल्पनेतून उपक्रमामुळे लोकउत्साहात भर

पुणे- पुण्यातील सार्वजनिक वाहतूक सेवेची महामेट्रो जीवन वाहिनी बनत असतानाच कोथरूड विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने सेवा त्याग समर्पण फाउंडेशनच्या मार्फत कोथरूड विधानसभा मतदारसंघातील मेट्रो मार्गी के पासून दूर अंतरावर असलेल्या कर्वेनगर नवसाह्याद्री डहाणकर कॉलनी भागातील नागरिकांसाठी मोफत शटल बस सेवासुरु करण्यात येणार आहे. पुण्यातील महा मेट्रोचा पहिला प्रयोग म्हणून ज्या कोथरूड मतदारसंघातून शुभारंभ झाला त्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातील मेट्रो मार्गीकेपासून दूर असलेल्या नागरिकांनाही मेट्रो प्रवास सुकर व्हावा या उदात्त हेतूने संबंधित उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन चंद्रकांतदादा पाटील मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य महाराष्ट्र राज्य आमदार, कोथरुड विधानसभा मतदार संघ यांच्या हस्ते हस्ते होणार असून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर उपस्थित राहणार असून रविवार दि. १४ सप्टेंबर २०२५ सकाळी ८.०० वा. नळस्टॉप / SNDT मेट्रो स्थानक, कर्वे रोड, येथे पहिल्या मार्गिका क्र. १ वरील सेटल बसला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.

कोथरूड भागातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या प्रचंड असताना केवळ पौड रस्त्यावरून वनाज कंपनी ते एसएनडीटी महाविद्यालय लगतच्याच नागरिकांना अत्यंत महत्त्वाची मेट्रो सेवेचा लाभ घेण्याची संधी मिळत होती. उर्वरित कोथरूड विधानसभा मतदारसंघातील एरंडवणे नवसह्याद्री सोसायटी, मनमोहन सोसायटी, कर्वेनगर, श्रीमान सोसायटी, हिंगणे होम कॉलनी, गोसावी वस्ती, मावळे आळी यासह डहाणूकर कॉलनी, कोथरूड गावठाण, मयूर कॉलनी, करिश्मा सोसायटी या भागातील नागरिकांना मेट्रो ने प्रवास करण्यासाठी पार्किंग आणि रिक्षा या दोन्ही समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने महा मेट्रोच्या प्रवाशांवरती परिणाम होत होता.कोथरूड विधानसभा मतदारसंघातील आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या लक्षात ही समस्या आल्यानंतर त्यांनी तात्काळ याची दखल घेऊन सेवा त्याग समर्पण फाउंडेशनच्या मार्फत राजाराम पूल– मावळे आळी चौक – विकास चौक – कर्वेनगर चौक- वनदेवी -डहाणूकर चौक – कर्वे पुतळा – करिष्मा चौक – SNDT शी शटल बस सेवा सुरू केली असून सकाळी ८.३० ते १ सकाळच्या सत्रामध्ये सुरू राहणार आहे. त्यानंतर सायं. ४ ते ८ या महत्त्वाच्या काळी सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना मोफत प्रवास करणे शक्य होणार आहे.

गरज असते तिथे राहुल गांधी नेहमीच दांडी मारतात-भारताचा विरोध करण्यासाठी राहुल गांधी अग्रेसर

उपराष्ट्रपतींच्या शपथविधीला अनुपस्थित राहिल्यावरून अनुराग ठाकूर यांची टीका

पुणे: “विरोधी पक्ष भरकटलेल्या अवस्थेत आहे. संसदेचे अधिवेशन सुरु असताना विरोधी पक्षनेते तिथे नसतात. स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात ते नसतात. नुकत्याच झालेल्या उपराष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दांडी मारली. १० वर्षे विरोधी पक्षनेतेपद रिकामे होते. यावेळी त्यांना विरोधी पक्ष होण्याची संधी मिळाली. मात्र ते देशाला गरज असते, तिथे उपस्थित नसतात. भारताचा विरोध करण्यासाठी मात्र राहुल गांधी आघाडीवर असतात,” अशी टीका माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने आयोजित पुणे ऑन पेडल्स सायकल रॅली व पुणे वॉकेथॉनचे उद्घाटन केल्यानंतर अनुराग ठाकूर माध्यमांशी बोलत होते. प्रसंगी प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, क्रिकेटपटू केदार जाधव उपस्थित होते. उपराष्ट्रपतींच्या शपथविधीला राहुल गांधी गैरहजर असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांनीही भारताने पाकिस्तानशी क्रिकेट खेळू नये, असे नमूद केले. 

भारत-पाकिस्तान सामन्यावर बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले, “आंतरराष्ट्रीय स्पर्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) किंवा आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) घेत असते. अशा स्पर्धांमध्ये प्रत्येक देशाने सहभाग घेणे आवश्यक असते. भाग घेतला नाही, तर त्या देशाच्या संघाला स्पर्धेबाहेर व्हावे लागते आणि प्रतिस्पर्धी संघाला त्याचे नाहक गुण मिळतात. द्विपक्षीय मालिकेत पाकिस्तानसोबत खेळायचे नाही, ही भूमिका भारताने घेतलेली आहे. जोवर पाकिस्तानकडून भारतावर होणारे दहशतवादी हल्ले थांबत नाहीत, तोवर पाकिस्तानशी द्विपक्षीय मालिका होणार नाही.”

मोदीजींच्या आईवरील व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना अनुराग ठाकूर म्हणाले, “आईचे स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात सर्वोच्च असते. पण काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल इतके खालच्या स्तराला गेले आहेत, की पंतप्रधानांच्या स्वर्गवासी मातोश्रींविषयी त्यांनी अपशब्द वापरले, शिव्या दिल्या, ‘एआय’ वापरून चुकीचे व्हिडिओ काढले. यावरून काँग्रेसची मानसिकता स्पष्ट होते. राजकारणात इतक्या खालच्या पातळीवर जाण्याची गरज आहे का? माफी मागायची सोडाच, त्यांनी दुसऱ्यांदा पुन्हा तीच चूक केली. बिहारची आणि देशाची जनता काँग्रेसला कधीही माफ करणार नाही. येणाऱ्या निवडणुकांत काँग्रेसला मोठा फटका बसणार हे निश्चित आहे.”

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात महिला व बालकांच्या आरोग्य तपासणी

▪️ 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान राबविले जाणार अभियान

पुणे, दि. १३ :
“स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” संपूर्ण भारतभर तसेच पुणे जिल्ह्यात दि. १७ सप्टेंबर ते दि. २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा उद्देश महिला व बालकांचे आरोग्य तपासणी करून कुटुंबाचे आरोग्य सुदृढ करणे हा आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक बालक आणि महिलांनी सहभागी होऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी केले आहे.

या मोहिमेत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांमार्फत विविध आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. महिलांच्या तपासणीत उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग तपासणी, क्षयरोग, अॅनिमिया व सिकल सेल स्क्रीनिंग, गरोदर मातांची तपासणी व समुपदेशन, लसीकरण सेवा, मासिक पाळी स्वच्छता मार्गदर्शन, किशोरवयीन मुलींचे समुपदेशन, पूरक आहार व आरोग्यदायी आहार पद्धती याबाबत माहिती देण्यात येईल. याशिवाय रक्तदान शिबिरे, आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (PMJAY) कार्ड वितरण व निक्षे मित्र स्वयंसेवी नोंदणीही करण्यात येणार आहे.

या शिबिरांसाठी स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, कान-नाक-घसा तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसिक आरोग्य तज्ञ, कर्करोग तज्ञ आदी तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून देण्यात येईल. जिल्ह्यात एकूण ३२४ शिबिरे प्राथमिक आरोग्य केंद्रांवर व ३३२४ शिबिरे उपकेंद्रांवर, ८५ शिबिरे ही उप ज़िला रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय येथे आयोजित करण्यात येणार आहेत.

अभियानाचे जिल्हास्तरीय उद्घाटन दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी बारामती येथील स्त्री रुग्णालयात खासदार सुनीत्रा पवार यांच्या हस्ते होणार इतर तालुक्यात खासदार आणि आमदारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.

या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीकरिता सर्व वैधकीय आधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, महिला नोडल वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आशा व स्वयंसेवक यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये, इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स, प्रसूती व स्त्रीरोग संस्था तसेच रोटरी क्लब आदींचा सहभाग सुनिश्चित करण्यात आला आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे व ज़िल्हा शल्य चिकित्सक, डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी माहिती दिली की, या अभियानामुळे जिल्ह्यातील महिलांचे व बालकांचे आरोग्य सुधारण्यास मोठी मदत होणार आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सायकल चालवत,पायी चालत दिला शारीरिक स्वास्थ्य व पर्यावरण रक्षणाचा संदेश

७५ गरजू मुलामुलींना सायकल वाटप

पुणे: “शारीरिक स्वास्थ्य, पर्यावरण सरंक्षणासाठी सायकल चालवणे अतिशय उपयुक्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडियाचा नारा दिला असून, त्यांनी दिलेल्या पंचसुत्रीवर पुणेकरांनी आपले आरोग्य चांगले राखावे,” असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले. मेधाताईंच्या पुढाकारातून मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुणेकरांनी दिलेली ही अनोखी भेट असल्याचेही ठाकूर म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने आयोजित पुणे ऑन पेडल्स सायकल रॅली व पुणे वॉकेथॉनमध्ये हजारो पुणेकर सहभागी झाले. सायकल रॅलीचा मार्ग कोथरूडमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळा, बालगंधर्व चौक, तर वॉकेथॉनचा मार्ग एसएनडीटी महाविद्यालयापर्यंत होता. पुणेकरांनी ‘सायकल चालवा’चा नारा देत शारीरिक स्वास्थ्य व पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.

माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली. प्रसंगी पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, क्रिकेटपटू केदार जाधव, महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. विश्राम कुलकर्णी, जयंत भावे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. ठाकूर व मिसाळ यांच्या हस्ते ७५ गरजू मुलामुलींना सायकल भेट देण्यात आली. यावेळी दिलेल्या ‘हर हर मोदी, घर घर मोदी’, ‘मोदी है तो, मुमकिन है’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

अनुराग ठाकूर म्हणाले, “पुण्यातील पर्यावरण मित्रांनी (पीएम) देशाच्या प्राईम मिनिस्टरांना (पीएम) दिलेली ही मानवंदना आहे. मेधाताई यांच्याप्रमाणे इतर लोकप्रतिनिधींनीही असे पर्यावरणपूरक उपक्रम राबवून समाजाचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी पुढाकार घ्यावा. देशवासीयांचे आरोग्य सदृढ व्हावे, यासाठी मोदी यांनी योगदिन, फिट इंडिया, खेलो इंडिया असे अनेक उपक्रम सुरु केले आहेत.”

सायकल वापरण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम गेल्या सहा वर्षांपासून आयोजित केला जात आहे. सायकलचे शहर अशी पुण्याची ओळख आहे. सायकल वापरणे आरोग्यासाठी लाभदायक आहे. पर्यावरणपूरक उपक्रमांतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा होतोय, याचा आनंद वाटत असल्याचे प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात सांगितले.

नवलकिशोर राम म्हणाले, “सायकलींचे शहर अशी ओळख असलेल्या पुण्यात पुन्हा एकदा सायकल चालविण्याबाबत जागरूकता वाढत आहे. स्वतःचे व पर्यावरणाचे स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी अधिकाधिक पुणेकरांनी सायकल चालवण्यास प्रोत्साहन देणारा हा उपक्रम आहे.”

जवळपास पाच हजार आबालवृद्ध यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. योगपटू स्वरा केंजळे, ट्रेकर नंदकिशोर मुळीक, आयर्न किड विहान काशीकर, जाॅगलिंग खेळाडू केतन अमोणकर यांचा क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला. सर्व सहभागीना प्रमाणपत्र, पदक व टीशर्ट देण्यात आले. जयंत भावे यांनी सूत्रसंचालन केले. विश्राम कुलकर्णी यांनी आभार मानले.

15 सप्टेंबरपासून मान्सून परतण्याची शक्यता

0

हिमाचल प्रदेशात पाऊस आणि पुरामुळे मृतांचा आकडा ३८६ वर पोहोचला आहे. या हंगामात राज्यात सामान्यपेक्षा ४३% जास्त पाऊस पडला आहे. १ जून ते १२ सप्टेंबर दरम्यान ६७८.४ मिमी पाऊस पडला, यावेळी ९६७.२ मिमी पाऊस पडला आहे

नवी दिल्ली-हवामान खात्याच्या मते, यावर्षी नैऋत्य मान्सूनची माघार १५ सप्टेंबरच्या सुमारास पश्चिम राजस्थानमधून सुरू होऊ शकते. साधारणपणे १७ सप्टेंबरच्या सुमारास मान्सून वायव्य भारतातून परतण्यास सुरुवात करतो आणि १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्णपणे परततो.

या वर्षी मान्सून २४ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला, जो २००९ नंतरचा सर्वात पहिला, ८ दिवस आधी होता. त्यानंतर, तो ९ दिवस आधी म्हणजेच २९ जूनपर्यंत देशभर पसरला, साधारणपणे ८ जुलैपर्यंत तो संपूर्ण देश व्यापतो. आतापर्यंत देशात ८३६.२ मिमी पाऊस पडला आहे, तर सामान्य पाऊस ७७८.६ मिमी मानला जातो. म्हणजेच, यावेळी ७% जास्त पाऊस पडला आहे.

वायव्य भारतात ७२०.४ मिमी पाऊस पडला आहे, जो सामान्यपेक्षा ३४% जास्त आहे. एका अभ्यासानुसार, गेल्या ५० वर्षांत, मान्सूनचा कालावधी प्रत्येक दशकात सुमारे १.६ दिवसांनी वाढला आहे. म्हणजेच, प्रत्येक दशकात माघार थोडी उशिरा होत आहे.

येथे, उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे गंगेची पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हापेक्षा २३ सेंटीमीटर वर आहे. येथे ८० गावे पुराच्या विळख्यात आहेत. १०० हून अधिक कुटुंबे बेघर झाली आहेत. फारुखाबादमध्ये गंगा काठाची धूप वाढली आहे. गावकरी स्वतःच त्यांची घरे तोडत आहेत. ते विटा आणि लोखंडी सळ्या वाहून नेत आहेत.

ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार उड्डाणपुलाचे लोकार्पण – नागपूरच्या विकासाला नवी गती!

0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज नागपूर येथे ‘ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार उड्डाणपुला’चे लोकार्पण करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, हा पूल नागपूरकरांसाठी मोठा दिलासा ठरणार असून, यामुळे 20 मिनिटांचा प्रवास आता फक्त 3 मिनिटांत होणार आहे. बोले पेट्रोल पंप चौकापासून सुरु होणारा हा उड्डाणपुल आरटीओ कार्यालयापुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महात्मा फुले परिसर, फुटाळा चौकापर्यंत 2.85 किमी लांबीचा आहे. नागपूर शहरातील सर्वात वर्दळीचा हा उड्डाणपूल असून वाडी पोलीस ठाणे ते गुरुद्वारा हा पहिला उ्डडाणपूल 1.95 किमी लांबीचा आहे. उड्डाणपुलाचे नामकरण ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या नावाने करण्यात आले असून, यामार्फत त्यांच्या अद्वितीय ज्ञानसाधनेचे आणि भविष्यवेधी कार्याचे स्मरण अधिक दृढ होईल.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर आणि विदर्भातील पायाभूत सुविधांच्या प्रगतीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. कामठी रोडवरील डबल डेकर पूल हा जगातील सर्वात लांब पूल ठरून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याचेही त्यांनी सांगितले. तिसरा रिंग रोड आणि ‘नवीन नागपूर’ प्रकल्पांच्या जमीन अधिग्रहणासाठी ₹17,000 कोटींच्या तरतुदीसह मोठ्या गुंतवणुकीचे मार्ग खुले होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नागपूर हे तंत्रज्ञान आणि फिनटेक हब म्हणून विकसित होत आहे. तसेच येथे संत्रा प्रक्रिया उद्योग, राज्यातील सर्वात मोठा फूड पार्क, ₹30,000 कोटींच्या गुंतवणुकीसह कोल गॅसिफिकेशन प्रकल्प, सौर मॉड्युल निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत. या गुंतवणुकीतून लाखो रोजगार निर्माण होणार असून, नागपूर स्मार्ट सिटी म्हणून उदयास येईल.

फ्लॅश बससारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वाहतूक सुविधा रिंगरोडवर सुरू होणार असून, नागपूरच्या प्रगतीला वेग देणार आहेत. गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास आणि मजबूत पायाभूत सुविधा नागपूरला औद्योगिक, तांत्रिक आणि आर्थिक विकासाचे केंद्रस्थान बनवत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व इतर मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र-आयोवा(USA) भागीदारी : समृद्धीचा नवा सेतू!

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमेरिकेतील आयोवा राज्याच्या गव्हर्नर किम रेनॉल्ड्स यांनी मुंबई येथे ‘महाराष्ट्र सरकार आणि अमेरिकेतील आयोवा राज्य’ यांच्यातील ऐतिहासिक सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

या कराराद्वारे कृषी व कृषी तंत्रज्ञान, डिजिटलायझेशन, आरोग्य, पर्यटन, क्रीडा, जैवतंत्रज्ञान, वित्तीय सेवा, अक्षय ऊर्जा, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये दोन्ही राज्य एकत्रित काम करणार आहेत. विशेषतः कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), यांत्रिकीकरण आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी आयोवा विद्यापीठ आणि महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठ एकत्र संशोधन करतील.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आयोवा हे अमेरिकेचे ‘फुड बास्केट’ म्हणून ओळखले जाते आणि या सहकार्यातून महाराष्ट्रातील शेती आणि अन्नप्रक्रिया उद्योगाला मोठा फायदा होणार आहे. क्लायमेट-रेझिलियंट ॲग्रीकल्चर, बायोफ्युएल्स आणि नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रांत दोन्ही राज्ये सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करतील.

तसेच, नवी मुंबईतील एड्यु सिटी प्रकल्प, व्यावसायिक प्रशिक्षण, इनोव्हेशन आणि स्टार्टअप्ससाठी निर्माण होणारे वातावरण या करारामुळे अधिक बळकट होईल. आयोवाचे शिष्टमंडळ भारतात येईल तर महाराष्ट्राचे शिष्टमंडळ आयोवाला भेट देऊन परस्पर राज्यातील विविध क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग दोन्ही राज्याच्या विकासासाठी होणार असून, यामुळे दीर्घकालीन भागीदारीला गती मिळेल.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, जगभरातील गुंतवणूकदार महाराष्ट्राकडे आकर्षित होत आहेत. ‘इज ऑफ डूइंग बिझनेस’च्या अनुषंगाने गुंतवणूकदारांसाठी सुलभ वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही विविध सुधारणा व नवनवीन धोरणे सातत्याने राबवत आहोत.

यावेळी आयोवा राज्याचे शिष्टमंडळ, मुंबई येथील अमेरिकन दूतावासाचे अधिकारी व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासन आणि टाटा टेक्नॉलॉजीज् यांच्या संयुक्त भागीदारीतून विकसित महाराष्ट्राच्या दिशेने मोठे पाऊल!

नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रामटेक, नागपूर येथे महाराष्ट्र शासन आणि टाटा टेक्नॉलॉजीज् लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारांतर्गत रामटेक, नागपूर येथे ‘सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्व्हेन्शन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग सेंटर (CIIIT)’ उभारण्यात येणार आहे.

खासगी सहभागातून उभारण्यात येणारे हे CIIIT केंद्र विद्यार्थ्यांना अत्याधुनिक नवउपक्रमांवर आधारित प्रशिक्षण देणार असून, औद्योगिक उत्पादन व रोजगाराला चालना देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. दरवर्षी 3000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची सुविधा येथे उपलब्ध होईल. कौशल्यवर्धन केंद्र इमारत बांधकाम व प्रशिक्षण सुविधासह ₹115 कोटींचा प्रकल्प असून टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडतर्फे ₹98 कोटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

नवउपक्रम व संशोधन प्रशिक्षण सुविधा असलेल्या रामटेक येथील प्रकल्प टाटा टेक्नॉलॉजीज् लिमिटेड व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणार आहे. या कौशल्यवर्धन केंद्रात इनोव्हेशन, डिझाईन, इन्क्युबेशन यासह 9 प्रकारच्या प्रशिक्षण सुविधा राहणार आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

नागरिकांनी आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा

0

मुंबई, दि. १२: महाराष्ट्रात ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ एकत्रित राबविण्यात येत असून राज्यातील सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.एकत्रित योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष ५ लाख रुपयांच्या मर्यादेत १३५६ उपचार पद्धतींवर शासकीय तसेच खासगी अंगीकृत रुग्णालयांमध्ये विनामूल्य उपचार मिळणार आहेत. पिवळे, केशरी, अंत्योदय, अन्नपूर्णा योजना किंवा पांढरे रेशनकार्ड धारक कुटुंब तसेच सर्व शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय या योजनेत समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे या योजनेसाठी उत्पन्नाची कोणतीही अट नाही.

सर्व लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड राज्यातील आशा कर्मचारी, आपले सरकार सेवा केंद्रातील कर्मचारी तसेच स्वस्त धान्य दुकान चालक यांच्या मार्फत तयार केले जात आहेत. लाभार्थी स्वतःही आयुष्मान ॲप किंवा https://beneficiary.nha.gov.in/ या संकेतस्थळावरील बेनिफिशरी पर्यायाद्वारे आपले कार्ड तयार करू शकतात. कार्ड निर्मितीसाठी अद्ययावत शिधापत्रिका, आधार क्रमांक आणि आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे, असे राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आण्णासाहेब चव्हाण यांनी कळविले आहे.

सणासुदीच्या काळात नागरिकांना शुद्ध पदार्थ मिळण्याच्यादृष्टीने कार्यवाही करा-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

पुणे , दि. १२: सणासुदीच्या काळात खवा व दुग्धजन्य पदार्थाचे अधिकाधिक नमुने तपासणीकरिता घेवून आवश्यकत्या ठिकाणी जप्ती करावी, यामाध्यमातून नागरिकांना शुद्ध पदार्थ मिळेल याबाबत दक्षता घ्यावी, नवीन प्रयोगशाळेच्या बांधकामाची पाहणी करुन हे बांधकाम गतीने पूर्ण करुन प्रयोगशाळा सुरु करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले.

मोशी येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयास भेट देवून विभागाच्यावतीने चालू वर्षातील कामकाजाचा आढावा कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी सहआयुक्त अन्न गिरीश हुकरे, सहआयुक्त सुरेश अन्नपुरे,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री झिरवाळ यांच्या हस्ते विभागाच्या उत्कृष्ट काम करणाऱ्या औषध निरीक्षक श्रुतिका जाधव व विजय नांगरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अन्न विभागात नव्याने रुजू झालेल्या अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यासोबंत संवाद साधून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

श्री. झिरवाळ यांच्या हस्ते कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

आढावा बैठकीत औषध विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची सद्यस्थिती, विभागाच्यावतीने करण्यात येणाऱ्या कारवाया आदीबाबत माहिती देण्यात आली.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या आठवणींना दिला उजाळा

0

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा वाढदिवस संपन्न

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा वाढदिवस आज (१२ सप्टेंबर) उत्साहात साजरा झाला.यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. सामाजिक, राजकीय, साहित्यिक, सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रांतून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव झाला. या शुभेच्छांना प्रतिसाद देताना डॉ. गोऱ्हे यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

त्यांनी सांगितले की, “माझ्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर जनतेचे, शिवसैनिकांचे आणि विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांचे प्रेम व आशीर्वाद मिळत आले आहेत. आज वाढदिवसाच्या निमित्ताने मिळालेल्या शुभेच्छांनी माझा उत्साह आणखी वाढवला आहे. या सर्वांच्या प्रेमामुळेच माझ्या कार्याला नेहमी नवी दिशा मिळते.”

आभार प्रदर्शन करताना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिवंगत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेल्या नात्याच्या आणि आठवणींच्या काही खास गोष्टींनाही उजाळा दिला. त्यांनी सांगितले की, “राजकारणात प्रवेश केल्यावर मला बाळासाहेबांचा आशीर्वाद लाभला. त्यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे एक वेगळी शाळा होती. त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी दिलेल्या सूचनांमधून आणि मार्गदर्शनातून मी अनेक गोष्टी शिकले. समाजातील वंचित, उपेक्षित आणि महिला वर्गासाठी काम करताना नेहमीच त्यांचा प्रेरणादायी विचार माझ्यासोबत असतो.”

त्यांनी पुढे नमूद केले की, बाळासाहेबांसोबतच्या भेटीगाठी नेहमीच साध्या पण प्रेरणादायी असत. त्यांच्या सहजसुंदर व्यक्तिमत्त्वामुळे प्रत्येकाला जवळीक वाटे. “ते केवळ पक्षप्रमुख नव्हते, तर एक मार्गदर्शक होते. समाजातील सामान्य माणसाचा आवाज बनण्याची ताकद त्यांनी आम्हाला शिकवली,” असे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले.

डॉ. गोऱ्हे यांनी या प्रसंगी कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपल्या आगामी कार्याचा आराखडाही अधोरेखित केला. “महिला सक्षमीकरण, श्रमिकांचे प्रश्न, सामाजिक न्याय आणि सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवणे हे माझे प्राधान्यक्रम आहेत. बाळासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे लोकांशी जोडलेले राहणे आणि त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करणे हेच माझे ध्येय आहे,” असे त्या म्हणाल्या.

डॉ. नीलम गोऱ्हे यांचे सामाजिक व राजकीय आयुष्य आजवर अनेक चढ-उतारांमधून गेलेले आहे. त्यांनी महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा दिला, शेतकरी व श्रमिकांच्या समस्या मांडल्या आणि विविध जनकल्याणकारी उपक्रम घडवले. त्यांच्या कामाची दखल घेऊनच आज विविध क्षेत्रांतून त्यांना शुभेच्छांचा आणि अभिनंदनाचा वर्षाव झाला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार श्रीकांत शिंदे, सत्यजित देशमुख, मनीषा कायंदे, बाळासाहेब थोरात, सचिन अहिर, विजया रहाटकर, रूपाली चाकणकर, मीना कांबळी, अर्जुन खोतकर, माधुरी मिसाळ आणि अनिता बिरजे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी दूरध्वनी व विविध समाज माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या.

कोंढव्यात अनधिकृत इमारतींवर कारवाई, अनधिकृत बांधकामे विकत घेऊ नका अन्यथा … महापालिकेचा इशारा

पुणे- कात्रज,धनकवडी,कोंढवा,वारजे, आंबेगाव पठार , आदी भागात अनधिकृत इमारती बेसुमार आणि अत्यंत वेगाने वाढत असताना PMC चा बांधकाम परवाना नसलेली अनधिकृत बांधकामे नागरिकांनी खरेदी करू नयेत , तसेच रीडेव्हलपमेंट च्या नावाने केलेली विनापरवाना बांधकामे खरेदी करू नयेत अन्यथा एक न एक दिवस महापालिकेच्या कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा देत महापालिकेने आज कोंढव्यात अनधिकृत इमारतींवर कारवाई सुरु केली .

कोंढवा खुर्द परिसरामध्ये अनाधिकृत बांधकाम कारवाई साठी नियुक्त केलेल्या विशेष पथकामार्फत आज दि.12/9/2025 रोजी कोंढवा खुर्द , शिवनेरी नगर गल्ली क्र. 1, मध्ये P+5  व P+4  मजला दोन इमारती सुमारे 15000 चौ. फुट आर सी सी बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाई साठी 10 बिगारी, 5 पोलीस, 1 jcb , 4 brekar, 2 गॅस cutter,  6 कनिष्ठ अभियंता, 3 उपअभियंता उपस्थित होते.
त्यामुळे सदर अनधिकृत बांधकाम हे कारवाई झाल्यामुळे धोकादायक झालेले आहे.त्याचा वापर करण्यात येऊ नये व सदर इमारतीत सदनिका विकत घेऊ नये.असेही आवाहन पुणे महानगरपालिकेने केले आहे.

मंगळवारी १६ सप्टेंबरला टिळक भवनमध्ये काँग्रेसचा रोजगार मेळावा.

0

४० पेक्षा जास्त नामांकित कंपन्या सहभागी होणार, बेरोजगार तरुणांसाठी मोठी संधी.

मुंबई, दि. १२ सप्टेंबर २०२५
राज्यात बेरोजगारांची संख्या प्रचंड वाढलेली असून शिक्षण असूनही रोजगार मिळत नाही अशी परिस्थिती आहे. सरकार नोकर भरती करत नसल्याने लाखो पात्र मुले-मुली रोजगारापासून वंचित आहेत. तरुणांच्या हाताला काम मिळावे या भूमिकेतून काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला असून मंगळवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागातर्फे आयोजित या रोजगार मेळाव्यात आयटी, बँकिंग, रिटेल, हेल्थकेअर, मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिसेस अशा विविध क्षेत्रांतील ४० पेक्षा जास्त नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. या माध्यमातून तरुणांना शेकडो नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यातील इयत्ता ८ वी पासपासून उच्च शिक्षित गरीब व मध्यम वर्गीय तरुणांसाठी ही विशेष संधी आहे. बेरोजगार तरुणांनी https://forms.gle/1Y7mScKgSAc9tY1E8 या लिंकवर क्लिक करून नोंदणी करावी व या मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आले आहे.