Home Blog Page 3142

‘राजी’व्दारे 100 कोटी क्लबमध्ये पोहोचणारी पहिली मराठी एक्टरेस ठरली अमृता खानविलकर

अभिनेत्री अमृता खानविलकरच्या नुकत्याच रिलीज झालेल्या राजी चित्रपटाने बॉलीवूडच्या ‘100 करोड क्लब’मध्ये एन्ट्री घेतली आहे. आणि ह्या चित्रपटामूळे 100 करोडक्लब मध्ये पोहोचलेल्या पहिल्या मराठी अभिनेत्रीचा मान अमृता खानविलकरने मिळवला आहे.

मराठी फिल्म इंडस्ट्रीकडून सध्या अमृतावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच सिनेसृष्टीतल्या एका जाणकाराने अमृताच्या ह्या यशाचं कौतुक करताना म्हटलंय की, मराठी सिनेसृष्टीत नाव कमवून आपल्या बॉलीवूड करीयरच्या सुरूवातीच्या काळातल्याच एका फिल्मला मिळालेलं हे घवघवीत यश अमृतासाठी नक्कीच महत्वाचे ठरेल. बॉलीवूडमध्ये आत्तापर्यंत माधुरी दिक्षीत ह्या मराठी आडनावाच्या फक्त एकाच अभिनेत्रीला 100 करोड कल्बचा हा पल्ला गाठता आलाय. पण माधुरी ही बॉलीवूड एक्टरेस म्हणूनच गणली जाते. त्यामूळे अमृता खानविलकर ही 100 कोटीच्या क्लबमध्ये पोहोचलेली पहिली मराठी एक्टरेस ठरली आहे.

‘राजी’च्या यशाने आनंदून गेलेली अमृता खानविलकर ह्यावर प्रतिक्रिया देताना म्हणते, “सध्या माझा आनंद गगनात मावत नाही आहे. करण (जोहर) सर, मेघना(गुलजार) मॅम, आलिया विकी आणि युनिटमधल्या प्रत्येकाचीच मेहनत फळाला आलीय, असं मला वाटतं. प्रेक्षकांनी दिलेल्या ह्या प्रेमासाठी मी त्यांची ऋणी आहे.”

स्वत:चा कचरा स्वत:च गोळा करणार! सिंहगड रस्त्यावर व्यापाऱ्यांचा पथदर्शी प्रकल्प

पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ, समग्र नदी परिवार व क्लीन गारबेज मॅनेजमेंट करणार प्रकल्पाची अंमलबजावणी

पुणे : शहरातील व्यापाऱ्यांकडे निर्माण होणारा प्लास्टिक, सुका व ओला कचरा गोळा करुन त्यापासून खत व प्लास्टिकपासून बकेट तयार करण्याचा पथदर्शी प्रकल्प पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ, समग्र नदी परिवार व क्लीन गारबेज मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यास सुरुवात केली आहे. कचरा गोळा करणाऱ्या गाडीचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. हा पथदर्शी प्रकल्प असून सिंहगड रस्त्यावरील व्यापाऱ्यांसाठी हा राबविला जात आहे.

प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याने प्लास्टिक बंदीची घोषणा राज्य सरकारने केली. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होऊन ओला व सुका कचरा आणि प्लास्टिक वेगळे केले तर, प्लास्टिकचा प्रश्न निर्माण होणार नाही. परंतु, महापालिकेकडून आवश्यक तेवढे प्रयत्न यासाठी केले जात नाहीत. त्यामुळेच हा पथदर्शी प्रकल्प सिंहगड रस्त्यावरील व्यापाऱ्यांसाठी राबविण्यात येईल. यानंतर शहरातील इतर भागातही असे प्रयोग होतील, अशी माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली. उद्घाटन प्रसंगी ग्राहक पेठचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, नगरसेवक शंकर पवार, दिनेश धावडे, सोमारामजी राठोड, नवनाथ सोमसे, सुनील गेहलोत, विजय नरेला, कैलास बिबवे, सारंग राडकर, रविंद्र सारुक आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रकल्पांतर्गत व्यापाऱ्यांद्वारेच व्यापाऱ्यांचा कचरा गोळा केला जाणार आहे. त्याचे व्यवस्थित वर्गीकरण कले जाईल व ओल्या व सुक्या कचऱ्यापासून खत व प्लास्टिकच्या कचऱ्यापासून बकेट तयार करण्यात येणार आहेत. यासाठी मोबाईल अॅप विकसित केला जाणार आहे.

महापालिकेद्वारे प्लास्टिक अथवा कचऱ्याबाबत फारशी जनजागृती केली जात नाही. अधिकारी फक्त दंड वसूल करण्याच्या नावाखाली किरकोळ व्यापाऱ्यांना त्रास देण्यात धन्यता मानतात. त्यातून व्यापाऱ्यांची आर्थिक लूट केली जाते. याचा त्रास व्यापाऱ्यांना होतो. राज्य सरकारने याची दखल घेतली नाही तर येत्या निवडणुकीत व्यापारी त्यांना मतदीन करण्याची शक्यता कमी आहे, असेही निवंगुणे यांनी सांगितले.

पाणीपुरवठा योजनेच्या खोदकामात महावितरणच्या दोन वीजवाहिन्या तोडल्या-पर्वती जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडित

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या पर्वती येथील पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनच्या खोदकामात 12 तासात दोन वेळा महावितरणच्या दोन भूमिगत वीजवाहिन्या तोडल्याने सोमवारी (दि. 28) सायंकाळी 5.15 वाजता पर्वती जलशुद्धीकरण केंद्रासह अरण्येश्वर व विठ्ठलवाडी परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला. याप्रकरणी महावितरणकडून दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान अरण्येश्वर परिसरात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सायंकाळी सुरु करण्यात आला तर जलशुद्धीकरण केंद्रासह सिंहगड रोड, विठ्ठलवाडी परिसराचा वीजपुरवठा सुरु करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत दुरुस्ती काम सुरु होते.

याबाबत माहिती अशी की, दत्तवाडी येथील जुन्या पर्वती 22 केव्ही उपकेंद्रातून एक्सप्रेस फिडरद्वारे पुणे महानगरपालिकेच्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्राला वीजपुरवठा केला जातो. उपकेंद्राजवळच पुणे महानगरपालिकेच्या कंत्राटदाराकडून पाणीपुरवठ्याची पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम सुरु आहे. सोमवारी (दि. 28) पहाटे 4 वाजताच्या सुमारास जेसीबीने सुरु असलेल्या खोदकामात एक्सप्रेस फिडरची भूमिगत वाहिनी तुटली. त्यामुळे पर्वती जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र महावितरणकडून या जलशुद्धीकरण केंद्राला जनता वसाहत 22 केव्ही या पर्यायी वीजवाहिनीद्वारे तातडीने वीजपुरवठा सुरु करण्यात आला होता.

त्यानंतर पुन्हा आज सायंकाळी 5.15 वाजता पाईपलाईनच्या खोदकामात जुन्या पर्वती उपकेंद्राला वीजपुरवठा करणारी 22 केव्ही भूमिगत वीजवाहिनी तुटली व उपकेंद्रातील आऊटगोईंग तीन वाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या पर्यायी वीजपुरवठ्यासह अरण्येश्वर व सिंहगड रोड, विठ्ठलवाडी परिसराचा वीजपुरवठा सुद्धा खंडित झाला. यात अरण्येश्वर परिसराचा वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून सुरु करण्यात आला आहे. परंतु पर्वती जलशुद्धीकरण केंद्राला मूळ (एक्सप्रेस फिडर) व पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करणाऱ्या दोन्ही भूमिगत वीजवाहिन्या पाईपलाईनच्या खोदकामात तुटल्याने या केंद्राचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. रात्री उशिरापर्यंत या दोन्ही वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होणार आहे. पाईपलाईनच्या खोदकामात एकाच परिसरात 12 तासांच्या कालावधीत दोन भूमिगत वीजवाहिन्या तोडल्याप्रकरणी महावितरणकडून दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पुण्याच्या पॅडवूमन नीलम तुतेजा यांचा ग्रामीण महिला व मुलींच्या साह्यासाठी पुढाकार

0
  • मासिक पाळी येऊ लागताच २३ टक्के मुली शाळेत जाणे सोडून देतात
  • महिलांमध्ये मासिक पाळीबाबत योग्य जागृती ही काळाची गरज
  • करिश्मा केअर फाऊंडेशन ग्रामीण महिला व मुलींना मोफत सॅनिटरी पॅड वाटणार

 

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात केलेल्या एका आरोग्य सर्वेक्षणानुसार ११ ते १९ वयोगटातील शालेय व महाविद्यालयीन मुली त्यांच्या मासिक पाळीदरम्यानच्या कालावधीत म्हणजेच वर्षभरातील एकूण ५० ते ६० दिवस शाळा बुडवतात ज्याचा दुष्परिणाम त्यांचे आरोग्य व शिक्षण या दोन्हींवर होतो.

भारतभरातील महिलांसाठीच्या स्वच्छता सुविधांवर प्रसिद्ध झालेल्या वर्ष २०१६ च्या अहवालातून पुढे आलेल्या माहितीनुसार वयात आलेल्या सुमारे ६.३० कोटी मुली शौचालयाची सुविधा नसलेल्या घरांत राहतात आणि २३ टक्के मुली मासिक पाळी येणे सुरु झाल्यावर शाळेत जाणेच सोडून देतात. शाळा सोडण्यामागील एक महत्त्वाचा घटक म्हणजे शाळांमध्ये असलेली स्वच्छतागृहाची कमतरता. भारतात या नैसर्गिक जीवशास्त्रीय प्रक्रियेभोवतीचे लांच्छन इतके प्रचंड आहे, की मासिक पाळी हा शब्दही मोठ्याने उच्चारलेला ऐकू येत नाही.

या इशारादर्शक आकडेवारीतूनच एका उदात्त पुढाकाराचा उदय झाला आहे. आजच्या मासिक पाळी आरोग्य दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मुली व महिलांना मोफत सॅनिटरी पॅड्स पुरवण्याच्या हेतूने करिश्मा केअर सॅनिटरी पॅड्स सादर करण्यात आली.

हा प्रकल्प खेड्यांतील व झोपडपट्ट्यांमधील ग्रामीण महिला व मुलींच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या करिश्मा केअर फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने राबवला आहे. करिश्मा केअर सॅनिटरी पॅड्स ही जैव-विघटनशील, पर्यावरण-सुरक्षित, सुगंधरहित व अतिनील संरक्षित आहेत. ही पॅड्स महाराष्ट्रील व शेजारच्या राज्यांतील महिलांनी महिलांसाठी बनविली आहेत आणि त्यातून त्यांना आर्थिक मदतही होणार आहे. ही पॅड्स ग्रामीण महाराष्ट्रातील महिला व मुलींना मोफत वाटली जाणार आहेत.

करिश्मा केअर पॅड्स बनवण्याचे काम त्यांची निर्मिती करणाऱ्या महिलांकडे सोपवण्यात आले आहे. ही पॅड्स विविध स्वयंसहाय्यता गटांकडून त्यांना आर्थिक मदत होण्याच्या दृष्टीने खरेदी केली जातात आणि निर्मिती केंद्रांना भेट दिल्यावर व परवान्याची पडताळणी केल्यानंतरच ही खरेदी होते.

यासंदर्भात पुण्याच्या पॅडवूमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, तसेच करिश्मा केअर फाऊंडेशनच्या संस्थापक व व्यवस्थापकीय विश्वस्त नीलम तुतेजा म्हणाल्या, “गेली तीन वर्षे आम्ही महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात शेकडो खेडेगावांना व शाळांना भेट देत आहोत. आम्ही ग्रामीण भागात अनेक धर्मादाय पुढाकार राबवत आहोत, जसे मराठवाड्यातील दुष्काळ प्रभावित भागांत अन्नधान्याचे वाटप, जवळपास दहा हजार मुलांना वह्या व लेखन साहित्याचे वाटप, बीडमधील आम्ही दत्तक घेतलेल्या व शैक्षणिक खर्च प्रायोजित केलेल्या ३०० मुलींना साह्य, वृक्षारोपण, आरोग्य शिबीरे, समुपदेशन सत्रे आणि विधवा व ग्रामीण महिलांना सल्ला व साह्यासाठी राबवला जाणारा केशक्ती हा प्रकल्प आदींचा त्यात समावेश आहे.

ग्रामीण महिला व मुलींसाठीच्या या विविध सल्ला सत्रांमध्ये मला असे दिसून आले, की अनेक मुली त्यांच्या मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेच्या समस्येमुळे शाळेतच जात नाहीत आणि त्यांच्याकडे सॅनिटरी पॅड्स खरेदी करण्यासाठीही पैसे नसतात. यामुळे शाळेतील त्यांच्या एकंदर उपस्थितीवर परिणाम होतो. अनेक महिलांना शेतात काम करत असताना विविध समस्या जाणवतात. त्यातील काहींमध्ये तर अयोग्य शरीर स्वच्छतेमुळे पूर्वी अनेक आरोग्य समस्या उद्भवल्या. मी महाराष्ट्राच्या अंतर्भागात प्रवास करत असताना १०० हून अधिक खेडेगावांना भेटी दिल्या तेव्हा मला स्वतःलाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. यातूनच या महिलांना मोफत सॅनिटरी पॅड्स पुरवण्याची कल्पना मला सुचली.”

त्या पुढे म्हणाल्या, “ आम्ही उत्पादकांच्या कारखान्यांना भेट दिली. आम्ही देणार असलेली पॅड्स अतिनील संरक्षित (यूव्ही प्रोटेक्टेड) असून त्यांचे पॅकेजिंगही अत्यंत काळजीपूर्वक हातमोजे घालून मगच केले जाते. आम्ही आणखी काही निर्मिती केंद्रांना सहभागी करुन घेणार आहोत व लवकरच आमचे स्वतःचे निर्मिती केंद्र सुरु करण्यापूर्वी या उत्पादकांना उत्पन्न निर्मितीसाठी मदत करणार आहोत. उत्पादकांकडून ही सॅनिटरी पॅड्स खरेदी करण्याचा खर्च भागवण्यासाठी आम्हाला देणग्यांची अपेक्षा आहे, जेणेकरुन ही पॅड्स बीड, जौहर आणि इतर गावे व झोपडपट्ट्यांतील आम्ही दत्तक घेतलेल्या ३०० मुलींना सहजपणे वितरित करता येतील. आम्ही ही मदत एकदाच करुन थांबणार नाही तर ती सातत्याने निरंतर तत्त्वावर केली जाईल. म्हणूनच आम्हाला या उपक्रमाला मदतीसाठी देणग्यांची गरज आहे.”

ग्रामीण भागातील मुलींचे वैयक्तिक शरीर आरोग्य व सुरक्षेच्या, तसेच उन्नतीच्या दिशेने ही निःसंशय एक मोठी झेप ठरेल. दानशूर व्यक्तींकडून भरघोस प्रतिसाद मिळावा असाच हा उदात्त उपक्रम आहे.

पंढरपूरच्या आषाढी वारीची तयार करावी – पालकमंत्री गिरीश बापट

पुणे : पंढरपूरची आषाढी वारी हा महाराष्ट्रातील जनतेच्या श्रध्देचा विषय आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून
लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाला येत असतात. या वारकऱ्यांना केंद्रबिंदू मानून पंढरपूरच्या आषाढी वारीची तयारी
करण्याच्या सूचना अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज दिल्या.
येथील विधान भवनातील सभागृहात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूरच्या आषाढी वारी
पूर्वतयारी विषयक बैठक पार पडली. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, साताऱ्याचे पालकमंत्री विजय
शिवतारे, पशू संवर्धन मंत्री महादेव जानकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, पुणे
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन
काळजे, आमदार सर्वश्री बबनराव शिंदे, प्रशांत परिचारक, विजय काळे, मकरंद पाटील, राहूल कूल, भीमराव तापकीर,
आमदार माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, पुणे मनपाचे आयुक्त सौरभ राव, पुण्याचे जिल्हाधिकारी
नवल किशोर राम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण कीडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी,
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲङ विकास ढगे-पाटील, संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष
बाळासाहेब मोरे, संत सोपानकाका महाराज पालखी सोहळा प्रमुखांसह विविध दिंड्यांचे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री बापट यांनी पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांकडून
आषाढी वारीच्या पूर्व तयारीचा आढावा घेतला. तिन्ही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी तयारीचे सादरीकरण केले.
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, पालखी मार्गाच्या विकासासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात निधी
दिला आहे. त्यामुळे या कामाला गती देण्यासाठी तिन्ही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी भूसंपादनाची कामे वेगाने करावीत.
भूसंपादन करताना बाधित शेतकऱ्यांना योग्य व तातडीने मोबदला देण्यात यावा. त्याच बरोबर आळंदी-देहू मार्गाच्या
दुरूस्तीचे काम तातडीने करून घ्यावे. पालखी मार्गावरील रस्त्याच्या दूरूस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून
घ्यावीत. तसेच पालखी तळांच्या ठिकाणी सपाटीकरण करून तात्पुर्त्या स्वरूपात पुरेशा प्रमाणात शौचालये बांधण्यात
यावीत. पालखी तळाच्या ठिकाणी पुरेशा पाण्याची व वीजेची सोय करण्यात यावी. पर्यावरणाच्या रक्षणासाठी वारीच्या
मार्गावर प्लास्टिक पत्रावळ्या, प्लास्टिक ग्लास, प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर निर्बंध आणावेत, यासाठी लोकांच्यात
जनजागृती करावी.
वारीच्या कालावधीत वारकरी व भाविकांना आरोग्याच्या समस्या उद्भवू नयेत यासाठी शुध्द पिण्याच्या पाण्याचा
पुरवठा करण्याच्या दृष्टीने सर्व पाण्याचे उदभव तपासण्यात यावेत. तसेच आरोग्य विभागाने सर्व ठिकाणी सज्ज
राहण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या. या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, अपघात, दुर्घटना
टाळण्यासाठी पोलिस विभागाने सतर्क राहण्याच्या सूचना ही त्यांनी दिल्या. पंढरपूर आषाढी वारी यशस्वी पार
पाडण्यासाठी शासनाच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
या बैठकीला शासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी, सातारा, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे
लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.

सापामुळे शॉर्टसर्कीट; नांदेड, धायरीमधील 5 वाहिन्यांचा खंडित वीजपुरवठा पूर्ववत

पुणे : उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या 22 केव्ही वीजवाहिनीच्या फिडर पिलरमध्ये मोठा साप शिरल्याने शार्टसर्कीट झाले आणि 5 वाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाल्याचा सोमवारी (दि. 28) हा प्रकार घडला. पर्यायी वीजपुरवठ्याच्या व्यवस्थेसाठी भारव्यवस्थापन शक्य न झाल्याने धायरी परिसर, डिसके विश्व व नांदेडमध्ये सकाळी 9.35 ते दुपारी 2.55 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित राहिला.

याबाबत माहिती अशी, की पर्वती 220 केव्ही उपकेंद्रातून खडकवासला क्र. 1 व क्र. 2 वाहिनीद्वारे खडकवासला उपकेंद्राला वीजपुरवठा केला जातो. तसेच खडकवासला उपकेंद्रातून बाहेर जाणार्‍या एका वीजवाहिनीद्वारे डिएसके उपकेंद्राला वीजपुरवठा केला जातो. आज सकाळी 9.35 वाजताच्या सुमारास खडकवासला क्र. 2 वाहिनीद्वारे होणारा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे खडकवासला उपकेंद्रातील दोन आऊटगोईंग वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला. या दोनपैकी एका वाहिनीवरून डिएसके उपकेंद्राला होणारा वीजपुरवठा बंद झाल्याने या उपकेंद्रातील तीन आऊटगोईंग वाहिन्यांचा सुद्धा वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी डिएसके विश्व, कोलेवाडी, नांदेड गाव, धायरीचा काही परिसर या भागातील सुमारे 12 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करण्याचे प्रयत्न करण्यात आले पण उन्हामुळे विजेची मागणी अधिक असल्याने भारव्यवस्थापन शक्य होऊ शकले नाही.

सुमारे पाऊण तासाच्या पेट्रोलिंगनंतर गोयलगंगा गार्डनमधील 22 केव्ही खडकवासला क्र. 2 वाहिनीच्या फिडर पिलरमध्ये मोठा साप शिरल्याने शॉर्टसर्कीट झाल्याचे दिसून आले. हा साप जळाल्याने मृतावस्थेत दिसून आला. तसेच जाईंट व केबल जळालेले आढळून आले. दरम्यान फिडर पिलरमधील जाईंट व केबल दुरुस्तीचे काम तात्काळ सुरु करण्यात आले. केबलच्या दुरुस्तीसह तीन ठिकाणी जाईंट लावल्यानंतर दुपारी 2.55 वाजता पाच वीजवाहिन्यांचा तसेच त्यावरील परिसराचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

तोरणा टायगर्स संघाचा सलग दुसरा विजय

पुणे: हेमंत पाटील स्पोर्ट्स फाउंडेशन व भारत अगेंस्ट करप्शन यांच्या सहयोगाने आयोजित हेमंत पाटील विमेन्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत एचपी सुपर किंग्स, तोरणा टायगर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून आगेकूच केली.

सिंहगड रोड येथील व्हिजन क्रिकेट अकादमी येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पूनम खेमनारने केलेल्या 78धावांच्या खेळीच्या जोरावर एचपी सुपर किंग्स संघाने सिंहगड स्टार्स संघाचा केवळ 3 धावांनी पराभव करून शानदार सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना एचपी सुपर किंग्स संघाने 20षटकात 7बाद 140धावा केल्या. यात पूनम खेमनारने 57 चेंडूत 78धावा व सई पुरंदरेने  29 चेंडूत 23धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना सिंहगड स्टार्स संघाला 20षटकात 8बाद 137धावापर्यंतच मजल मारता आली.यामध्ये सारिका कोळी 60, श्रद्धा पोखरकर नाबाद 15, सोनल पाटील 14, तेजश्री कदम 12यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. एचपी सुपर किंग्सकडून प्रियांका घोडके(3-21), तेजश्री ननावरे(1-14), प्रियांका भोकरे (1-20)यांनी सुरेख गोलंदाजी केली.सामन्याची मानकरी पूनम खेमनार ठरली.

दुसऱ्या सामन्यात श्वेता जाधव(92धावा)हिने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर तोरणा टायगर्स संघाने रायगड रॉकर्स संघाचा  72 धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय नोंदविला. श्वेता जाधवने 61चेंडूत 16चौकारांसह 92धावा, नेहा बडवाईकने 41 चेंडूत 6चौकारांसह 44धावा यांनी पहिल्या गडयासाठी 69चेंडूत 102धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यांनंतर श्वेता जाधवने(92धावा) व चार्मी गवई नाबाद (27धावा)यांनी दुसऱ्या गडयासाठी 28चेंडूत 50धावांची भागीदारी संघाला 192अशी भक्कम धावसंख्या उभारून दिली. याच्या उत्तरात रायगड रॉकर्सचे आव्हान 20षटकात 5बाद 121धावावर संपुष्टात आले. यात उत्कर्ष पवार 35, पार्वती बाकळे 31, कश्मिरा शिंदे 17यांची खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही तोरणा टायगर्सकडून भूमिका फाळके(1-9), ख़ुशी मुल्ला(1-19), वैष्णवी पाटील(1-22), रोहिणी माने(1-26)यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:

एचपी सुपर किंग्स: 20षटकात 7बाद 140धावा(पूनम खेमनार 78(57,9×4), सई पुरंदरे 23(29,1×4), मनाली जाधव 2-16, वैष्णवी रावलीया 1-6,  सायली अभ्यंकर 1-33, श्वेता खटाळ 1-33)वि.वि.सिंहगड स्टार्स: 20षटकात 8बाद 137धावा(सारिका कोळी 60(42,7×4), श्रद्धा पोखरकर नाबाद 15(10,2×4), सोनल पाटील 14(19), तेजश्री कदम 12, प्रियांका घोडके 3-21, तेजश्री ननावरे 1-14, प्रियांका भोकरे 1-20);सामनावीर-पूनम खेमनार;

तोरणा टायगर्स: 20षटकात 1बाद 193धावा(श्वेता जाधव 92(61,16×4), नेहा बडवाईक 44(41,6×4), चार्मी गवई 27(21,4×4), मानसी जाधव 1-15)वि.वि.रायगड रॉकर्स: 20षटकात 5बाद 121धावा(उत्कर्ष पवार 35(38,2×4), पार्वती बाकळे 31(29,5×4), कश्मिरा शिंदे 17(23,2×4), भूमिका फाळके 1-9, ख़ुशी मुल्ला 1-19, वैष्णवी पाटील 1-22, रोहिणी माने 1-26);सामनावीर-श्वेता जाधव.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन, ऐतिहासिक खोली पाहण्यासाठी गर्दी

पुणे- ‘ने मजसी ने परत मातृभूमीला…सागरा प्राण तळमळला’ यातून मातृभूमीविषयीचे प्रेम व्यक्त करणार्‍या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी सोमवारी फर्ग्युसन महाविद्यालयात तरूण-तरूणींनी गर्दी केली होती.
सावरकरांच्या वास्तत्याने पावन झालेली फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील खोली पाहण्यासाठी खुली करण्यात आली होती. या ठिकणी त्यांचे जीवनकार्य उलगडणारी एक भिंत तयार करण्यात आली होती. त्यातून सावरकर यांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांना चित्ररूपी उजाळा देण्यात आला.
सावरकरांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासून मोठी गर्दी केली होती. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या परिषद व नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते सकाळी सावरकर यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. संचालक महेशे आठवले, कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, वसतिगृह प्रमुख प्रा. श्रीधर व्हनकटे, प्रा. स्वाती जोगळेकर, डॉ. किशोर सोनवणे, डॉ. सविता केळकर, सावरकरांचे अभ्यासक श्री. म. जोशी, पंडित वसंतराव गाडगीळ या वेळी उपस्थित होते. खासदार अनिल शिरोळे यांनी भेट देऊन आदरांजली अर्पण केली.
सावरकरांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांची आठवन करून देणारी चित्रेही येथे पाहण्यासाठी ठेवण्यात आली होती. नागरिक व विद्यार्थ्यांनी भेट दिली आणि त्यांचे जीवनकार्य जाणून घेतले.
सावरकर हे फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी असाताना १९०२ ते १९०५ या कालावधीत वसतिगृह क्रमांक एकमधील खोली क्रमांक १७ मध्ये ते राहत होते. त्यांनी वापरलेला पलंग, वकिली करत असताना परिधान केलेले गाऊन, सावरकरांची साहित्य संपदा या ठिकाणी ठेवण्यात आली होती.

धनगर माझा जीवन गौरव पुरस्काराने मी भारावून गेलो आहे – आ. गणपतराव देशमुख

पुणे – धनगर माझा जीवन गौरव पुरस्काराने मी भारावून गेलो आहे. हा सन्मान माझा नसून दुष्काळी भागातील जनतेने दिलेल्या आशीर्वादाचा सत्कार आहे. असे भावपूर्ण उद्गार राजकारणातील भीष्माचार्य डॉ आ. गणपतराव देशमुख यांनी काढले.

पुणे येथील ऐतिहासिक अशा शनिवारवाडा पटांगणात आयोजित केलेल्या भव्य व नेत्रदीपक अशा धनगर माझा सन्मान सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९३ वी जयंती व धनगर माझाच्या तिसर्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी आमदार रामराव वडकूते, अ‍ॅड. रामहरी रूपनवर, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, माजी आमदार पोपटराव गावडे, गोपीचंद पडळकर, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष उत्तम जानकर, यशवंत सेनेचे माधव गडदे, आल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रवीण काकडे, ज्येष्ठ पत्रकार शामसुंदर सोन्नर,  प्रा.शिवाजी दळणर, राजू दुर्गे, घनशाम हाके,रासपाचे बाळासाहेब दोलताडे, उज्वलाताई हाके, अर्जुन सलगर, तुकाराम काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

तर कार्यक्रम संपताच जलसंधारण तथा राजशिष्ठाचार मंत्री प्रा. राम शिंदे यांनी उपस्थिती लावली. सिंधुदुर्ग येथील कार्यक्रम संपवून येत असताना वाहतुकीच्या प्रचंड गर्दीमुळे येण्यास उशीर झाल्याचे सांगून शुभेच्छा व्यक्त केल्या.

एका गोष्टीची खंत

आज धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. मात्र एका गोष्टीची खंत वाटते, कारण नसताना मंत्रिमंडळातील एका ज्येष्ठ नेत्याने कायद्यात दुरुस्ती न करता सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा केली. यावर जास्त टिप्पणी करणार नाही; मात्र, धनगर समाजाची फसवणूक करतात की काय अशी शंका येत असल्याची खंत ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख यांनी कार्यक्रमात व्यक्त केली.  तसेच माझे उरलेले आयुष्य राज्यातील दुष्काळ हटवण्यासाठी आणि धनगर आरक्षण मिळण्याच्या प्रश्नासाठी आहे. यासाठी जे काही करावे लागेल ते उरलेल्या आयुष्यात करेल, असेही ते म्हणाले.

आ. रामहरी रूपनवर यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर प्रबोधन केले. त्यामुळे उपस्थित मंत्रमुग्ध झाले. तर आ. रामराव वडकुते व गोपीचंद पडळकर व स्वागताध्यक्ष उत्तम जानकर यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

तसेच यावेळी श्री. पांडुरंग पोले (IAS), श्रीमती संगीता धायगुडे (आयुक्त मालेगाव महानगरपालिका), श्री. रमेशशेठ लबडे(उद्योजक), श्री. ज्ञानदेव पडळकर(अधीक्षक अभियंता), श्री. अनिल विष्णू राऊत (क्षेत्र अधिकारी भूमापन), श्री. लहूजी शेवाळे (सरसेनापती, जय मल्हार सेना), श्री. मारुती दिगंबर येडगे (युवा उद्योजक), श्री. व सौ. वैशाली सुनील कुऱ्हाडे (अध्यक्ष, सुधाई सेवाभावी संस्था), सौ. साधना संभाजी गावडे (अध्यक्षा – ईश्वरकृपा शिक्षण संस्था) या सर्वांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच श्री व सौ जयश्री श्रावण वाकसे व युवा उद्योजक विवेक बिडगर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तर मुंबईतील ऋणानुबंधग्रुपच्या वतीने बहारदार समाज प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनगर माझाचे संपादक धनंजय तानले यांनी केले तर आभार गणेश खामगल यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासठी प्रतापराज मासाळ, राजेंद्र गाडेकर, विश्वनाथ साळसकर, रुक्मिणी धर्मे, मीना सूर्यवंशी, राहुल सुरवसे, गणेश पुजारी, आदी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.

या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रात कार्य करणारा जनसमुदाय मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

बौध्द भिक्खू संघदान आराधना २९ मे रोजी राजबागेत

पुणे-विश्‍व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत गौतम बुद्ध पोर्णिमेचे औचित्य साधून “बौध्द भिक्खू संघदान आराधना” समारंभाचे आयोजन केले आहे. हा समारंभ मंगळवार, दि. २९ मे २०१८ रोजी सकाळी १०.३० वा. राजबाग, लोणी काळभोर येथील एमआयटी एडीटी विद्यापीठात होणार आहे.
बौध्द भिक्खू संघदान आराधना या समारंभात डॉ. राहुल बोधी, भिक्खू नागघोष, प्रशील रत्न भंते, विश्‍व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे सल्लागार व लंडन येथील धम्मदूत गौतम भूमिपुत्र व प्रबुध्दरत्न व सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. रतनलाल सोनग्रा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या समारंभात त्याग, करूणा व समर्पणाने बौध्द धर्म प्रसारासाठी आपले संपूर्ण जीवन व्यतित केलेले महाराष्ट्रातून ५० पेक्षा जास्त भिक्खू या संघदान कार्यक्रात सहभागी होणार आहेत. आजच्या युगात जे बौद्ध भिक्खू झाले आहेत आणि धम्मकार्य करीत आहेत, अशांना वंदन करून त्यांना संघदान देण्याचा मनोदय आम्ही व्यक्त केला असून महनीय भिक्खूंना निमंत्रित केले आहे, अशी माहिती एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी दिली.
तथागत गौतम बुद्धाच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित होऊन जे लोक त्यांच्या धम्म मार्गात सम्मिलित होत होते, अशांना बुद्धविहारात राहून संघटनात्मक साधना करावी लागत असे. धम्माची साधना करताना हा धम्म लोककल्याणासाठी असल्यामुळे बौद्ध भिक्खूंना सतत भ्रमण करावे लागत असे. संपूर्णपणे त्याग आणि समर्पणावर आधारित असलेली बौध्द भिक्खूंची ही जीवनपध्दती परंपरा आजही अखंडित आहे. तथागतांनी त्यांच्या जीवनात त्यांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात, यासाठी काही नियम (विनय) सांगितले होते. त्यानुसार त्यांना आपल्या देहरक्षणासाठी वस्त्र, म्हणजे चिवर, ठेवण्याची मुभा दिली होती. ज्या ठिकाणी त्यांना भोजनदानासाठी बोलावीत त्या ठिकाणी गृहपती काही ना काही वस्तू देत असे. तथागताने वर्षाला दोन चिवरे ठेवण्याचा नियम बनविला. त्याप्रमाणे सर्व भिक्खू जर निमंत्रण मिळाले तर भोजनासह त्याचा सन्मानपूर्वक स्वीकार करीत. संघदानाची ही परंपरा हजारो वर्षे तशीच चालू आहे आणि जगातील बौद्धराष्ट्रामध्ये तिचे अत्यंत काटेकोरपणे, जाणीवपूर्वक व आस्थेने पालन होते.
बौद्ध भिक्खू कोणत्याही वस्तूचा किंवा संपत्तीचा संग्रह करीत नाहीत. फक्त आवश्यक तेवढेच ते स्वीकार करतात व त्या उपयोगात आणतात. त्यांची प्रत्येक वस्तू ही कुठल्याही प्रकारे वाया जात नाही. या काळातील सर्वांना ज्ञात असलेले बौद्ध भिक्खू भारतातील डॉ. भदंत आनंद कौशल्यायन हे होत. ते म्हणाले, बौद्ध भिक्खूंना केलेले वस्त्रदान सतत उपयोगी असते. जीर्ण झाल्यावर देखील त्याचा उपयोग भिंतीवर लेप करण्यासाठी केला जातो. याचाच अर्थ असा की, भिक्खूंना दिलेल्या सर्व वस्तूंचा उपयोग काटेकोरपणे सातत्याने होत असतो.
असा हा आगळावेगळा ऐतिहसिक कार्यक्रम विश्‍वशांती केंद्र (आळंदी) आणि एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठ, पुणे, भारत यांच्या संयुक्त विद्यमाने, जगातील सर्वात मोठी घुमटाकार वास्तु म्हणून साकारत असलेल्या ‘तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर महाराज विश्‍वशांती प्रार्थना सभागृह आणि विश्‍वशांती ग्रंथालय’ येथे होणार आहे, ही विशेष उल्लेखनीय बाब आहे.

सात अभाग्यांची उपचार व पुनर्वसनासाठी “श्रद्धा” मध्ये रवानगी

जागतिक स्किझोफ्रेनिया जनजागृती दिनानिमित कर्वे समाज सेवा संस्थेमार्फत विविध उपक्रम

पुणे- “स्किझोफ्रेनिया” या मानसिक आजाराच्या जनजागृतीसाठी जागतिक स्किझोफ्रेनिया जनजागृती दिनानिमित कर्वे समाज सेवा संस्थेच्या समुपदेशन अभ्यासक्रम विभागामार्फत दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येत असून यावर्षी प्रामुख्याने “स्किझोफ्रेनिया” मुळे स्वत्व हरवून घराबाहेर पडत वर्षानुवर्षे रस्त्यावर फिरणार्या मनोरुग्णांना उचलून त्यांच्यावर उपचार व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पुणे शहरातील नागरिकांची जागृती करीत रस्त्यावर फिरणाऱ्या सात (७) मनोरुग्णांना उचलून त्यांची पुढील उपचार व पुनर्वसनासाठी कर्जत येथील “श्रद्धा” पुनर्वसन केंद्रामध्ये मध्ये रवानगी करण्यात आली आहे.

जागतिक स्किझोफ्रेनिया जनजागृती दिनानिमित यावर्षी कर्वे समाज सेवा संस्थेच्या समुपदेशन अभ्यासक्रम विभाग व कर्जत येथील श्रद्धा पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे संचालक डॉ दीपक वलोकर,प्रा चेतन दिवाण, प्रा महेश ठाकूर व श्रद्धा पुनर्वसन केंद्राचे प्रमुख डॉ भरत वाटवानी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवून “स्किझोफ्रेनिया” संबंधी ठिकठिकाणी जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले त्यातीलच एक प्रमुख उपक्रम म्हणून रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णांचे उपचार व पुनर्वसन यासंबंधी जनजागृती करीत मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी प्रत्यक्ष कृती करण्याचा उपक्रम राबविण्यात आल्याचे प्रा चेतन दिवाण यांनी सांगितले.

स्किझोफ्रेनिया या मानसिक आजारामुळे घरातून बाहेर पडून तीन वर्षाहून अधिक काळ पुणे शहरामधील रस्त्यावर फिरणाऱ्या ओबेद या मनोरुग्णाला कर्वे – श्रद्धा च्या टीम ने गत महिन्यामध्ये उचलून उपचार व पुनर्वसन करण्यासाठी कर्जत येथील केंद्रामध्ये रवानगी केली होती त्याच्यावर उपचार करून त्याला काल स्किझोफ्रेनिया जनजागृती दिनाचे औचित्य साधून घरी सोडण्यात आले. तसेच पुणे शहरामध्ये फिरणाऱ्या इतर चार पुरुष व तीन महिला मनोरुग्णांना काल उचलण्यात आले असून त्यांच्यावर कर्जत येथील श्रद्धा च्या पुनर्वसन केंद्रामध्ये उपचार करण्यात येणार आहेत.

स्किझोफ्रेनिया आजार जडल्यानंतर घर सोडून निघून जात वर्षानुवर्षे रस्त्यावर फिरून कचराकुंडीतल्या अन्नावर पोट भरून जगणाऱ्या हजारो मनोरुग्णांना आधार देऊन त्यांच्यावर मोफत उपचार करीत पुनर्वसन करणाऱ्या “ श्रद्धा पुनर्वसन केंद्रा” चे प्रमुख व प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ भरत वाटवानी यांच्या श्रद्धा पुनर्वसन केंद्रास रविवारी दि. २७ रोजी कर्वे समाज सेवा संस्थेच्या समुपदेशन अभ्यासक्रमाचे सर्व विद्यार्थी भेट देणार असून प्रा. चेतन दिवाण यांच्याकडून डॉ भरत वाटवानी यांची प्रकट मुलाखत घेण्यात येणार आहे.

गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलचा निकाल १०० टक्के

पुणे :- बारावीच्या सीबीएसई बोर्डाचा निकाल आज जाहीर झाला. पिंपरीतील गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलचा निकाल १०० टक्के लागला असून येथील  विद्यार्थांनी उत्कृष्ठ यश संपादन केले असून सांची थावणी हिला सर्वाधिक गुण मिळाले आहेत. 
 
एकूण डिस्टिंगक्शन ४४% असून ८७ विद्यार्थ्यांपैकी ६१ विद्यार्थी विज्ञान आणि २६ वाणिज्य विभागातून आहेत. यातील १० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण  मिळाले आहेत. विज्ञान शाखेतील   
सांची थावणी (९५.४),अक्षय मेनन (९४.२),आरुषी दरड आणि रजत दुबे यांना ९२. ८ तर अनिकेत कुमार ९१.४,गौरी मेनन ९१.४,चिराग वोहरा (९१. २)  रिषभ गोयल ९०.२  वाणिज्य शाखेतील मानसी गुप्ता(९५), श्रेया जावळी (८४.४),सेजल अग्रवाल (८३.६) टक्के मिळाले आहेत.  याबद्दल मुख्याध्यपिका भारती भागवाणी यांनी शाळेच्या संचालिका सोनू गुप्ता यांनी  विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

टेनिस स्पर्धेत सुशांत दबस, सुदिप्ता सेंथिल कुमार यांना विजेतेपद

0
मुंबई, 26 मे, 2018 :महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित 12व्या रमेश देसाई मेमोरियल 16वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत  मुलांच्या गटात  सुशांत दबस तर मुलींच्या गटात सुदिप्ता सेंथिल कुमार यांना विजेतेपद. 
 
क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय)येथील टेनिस कोर्टवर पार पडललेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात मुलांच्या गटात  हरियाणाच्या तिस-या मानांकीत सुशांत दबसने हरियाणाच्याच चौथ्या मानांकीत  दिवेश गहलोतचा  6-1, 6-3 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात संघर्षपु्र्ण झालेल्या लढतीत महाराष्ट्राच्या चौदाव्या मानांकीत सुदिप्ता सेंथिल कुमार हीने हरियाणाच्या तेराव्या मानांकीत संदिप्ती रावचा 7-5, 7-6(3) असा टायब्रेक मध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले.
 
स्पर्धेच्या विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना प्रशस्तीपत्रक व करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सीसीआयचे अध्यक्ष प्रिमल उदानी व एआयटीए सुपरवायझर लिना नागेशकर आदी मान्यवर उपस्थित होते. 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी गट : उपांत्य  फेरी: 16वर्षाखालील मुले:  
सुशांत दबस(3)(हरियाणा) वि.वि दिवेश गहलोत(4)(हरियाणा)  6-1, 6-3
मुली- 
सुदिप्ता सेंथिल कुमार(14)(महाराष्ट्र) वि.वि संदिप्ती राव(13)(हरियाणा) 7-5, 7-6(3)

महावितरणकडून 20746 मेगावॉट विजेच्या मागणीचा उच्चांकी पुरवठा

0

मुंबई, दि. 26 मे 2018 : यंदाच्या उन्हाळ्यात शनिवारी (दि. 26 मे) तब्बल 20,746 मेगावॉट विजेची उच्चांकी मागणी नोंदविण्यात आली आणि महावितरणनेही या मागणीएवढाच वीजपुरवठा केला. मुंबईसह राज्यात शनिवारी तब्बल 23987 मेगावॉट विजेची मागणी होती. राज्यात कोणत्याही ठिकाणी भारनियमन न करता विजेची ही मागणी पूर्ण करण्यात आली, हे उल्लेखनीय.

राज्यात सध्या उष्णतेची लाट असल्याने विजेच्या मागणीतही विक्रमी वाढ होत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात दि. 23 एप्रिल रोजी मुंबईवगळून राज्यात महावितरणने 20,340 मेगावॉट विजेच्या उच्चांकी मागणीएवढाच यशस्वी पुरवठा केला होता. त्यानंतर आज राज्यातील महावितरणच्या कार्यक्षेत्रात तब्बल 20,746 मेगावॉॅट विजेची मागणी नोंदविण्यात आली. दि. 23 एप्रिलच्या तुलनेत सुमारे 400 मेगावॉटने विजेची मागणी वाढली तरी महावितरणकडून विजेची उपलब्धता व तांत्रिक व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करून ही यंदाची विक्रमी मागणी यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. यासोबतच आज मुंबईची मागणीसुद्धा 3241 मेगावॉट नोंदविण्यात आली. त्यासह राज्यात एकूण 23,987 मेगावॉट विजेच्या मागणीएवढाच पुरवठा करण्यात आला आहे. राज्यातील विजेची उपलब्धता व तेवढाच पुरवठा याचा हा यावर्षीचा विक्रम आहे.

राज्यात वितरण व पारेषण यंत्रणेचे मोठ्या सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात येत आहे. तसेच या यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामे नियमितपणे करण्यात येत आहेत. त्यामुळे विजेची मागणी वाढत असतानाही यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत राज्याच्या कोणत्याही भागात वीजटंचाईमुळे भारनियमन करण्याची गरज उद्‌भवलेली नाही. तसेच सर्वाधिक विजेच्या मागणीएवढाच पुरवठा करणे महावितरणला शक्य झाले आहे. सध्या महावितरणला महानिर्मिती कंपनीकडून सुमारे 6700 मेगावॉट केंद्रीय प्रकल्प तसेच दीर्घ व लघु मुदतीच्या कराराद्वारे सुमारे 10,200 मेगावॉट आणि इतर विविध स्त्रोतांकडून सुमारे 3900 मेगावॉट वीज उपलब्ध होत आहे.

तंबाखूजन्‍य पदार्थ सेवनाच्‍या दुष्‍परिणामांबाबत जनजागृती करा- दोरगे

पुणे5- व्‍यसनमुकती ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून संबंधित विभागांनी तंबाखू, गुटखा आदी तत्‍सम मादकद्रव्‍याच्‍या सेवनाबाबत जनजागृती करावी, असे आवाहन मादकद्रव्‍य विरोधी विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांनी केले. राष्‍ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्‍हास्‍तरीय संनियंत्रण समितीच्‍या बैठकीत ते बोलत होते. यावेळी  डॉ. केतकी घाटगे,  हसीना मुजावर, दिलीप करंजखेले, प्रमोद पाटील, आशीष येनगंटीवार, डॉ. राहूल मणियार, जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग आदी सदस्‍य उपस्थित होते.

श्री. दोरगे म्‍हणाले, राष्‍ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्‍ह्यातील तसेच महापालिका हद्दीतील मुख्‍याध्‍यापकांचे प्रशिक्षण आयोजित करावे, त्‍यांना शालेय परिसरात तंबाखू, गुटखा आदी तंबाखूजन्‍य पदार्थ विक्रीबंदी बाबत माहिती द्यावी, शालेय परिसरात पानस्‍टॉल, पानटपरी असतील तर त्‍यावर कारवाई करण्‍यात यावी. एस.टी तसेच पीएमपीएलच्‍या वाहनचालक तसेच वाहकांना तंबाखूजन्‍य पदार्थांच्‍या सेवनामुळे होणारे दुष्‍परिणाम याबाबत माहिती द्यावी. बचतगट, फेरीवाल्‍यांच्‍या संघटनांनाही  या कायद्याबाबत व तंबाखूच्‍या दुष्‍परिणामांबद्दल माहिती द्यावी.

13 मे रोजी तंबाखूविरोधी दिन असून त्‍यानिमित्‍ताने जाणीवजागृतीचे कार्यक्रम घेण्‍यात यावे. तंबाखूमुक्‍त  गणेशोत्‍सव आयोजनाबाबत गणेश मंडळ प्रतिनिधींना भेटून त्‍यांचे सहकार्य घ्‍यावे, असे यावेळी सांगण्‍यात आले. जिल्‍ह्यात विविध आयटीकंपन्‍या आहेत,त्‍यांचे स्‍मोकींग झोन आहेत, मात्र काही कर्मचारी पानटपरीवर अथवा चहाटपरीवर येऊन धूम्रपान करतात, त्‍यावर कार्यवाही करण्‍यात यावी, अशा सूचना यावेळी देण्‍यात आल्‍या. बैठकीत विविध सदस्‍यांनी आपल्‍या सूचना मांडल्‍या.