पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ, समग्र नदी परिवार व क्लीन गारबेज मॅनेजमेंट करणार प्रकल्पाची अंमलबजावणी
पुणे : शहरातील व्यापाऱ्यांकडे निर्माण होणारा प्लास्टिक, सुका व ओला कचरा गोळा करुन त्यापासून खत व प्लास्टिकपासून बकेट तयार करण्याचा पथदर्शी प्रकल्प पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ, समग्र नदी परिवार व क्लीन गारबेज मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यास सुरुवात केली आहे. कचरा गोळा करणाऱ्या गाडीचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. हा पथदर्शी प्रकल्प असून सिंहगड रस्त्यावरील व्यापाऱ्यांसाठी हा राबविला जात आहे.
प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याने प्लास्टिक बंदीची घोषणा राज्य सरकारने केली. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होऊन ओला व सुका कचरा आणि प्लास्टिक वेगळे केले तर, प्लास्टिकचा प्रश्न निर्माण होणार नाही. परंतु, महापालिकेकडून आवश्यक तेवढे प्रयत्न यासाठी केले जात नाहीत. त्यामुळेच हा पथदर्शी प्रकल्प सिंहगड रस्त्यावरील व्यापाऱ्यांसाठी राबविण्यात येईल. यानंतर शहरातील इतर भागातही असे प्रयोग होतील, अशी माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली. उद्घाटन प्रसंगी ग्राहक पेठचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, नगरसेवक शंकर पवार, दिनेश धावडे, सोमारामजी राठोड, नवनाथ सोमसे, सुनील गेहलोत, विजय नरेला, कैलास बिबवे, सारंग राडकर, रविंद्र सारुक आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रकल्पांतर्गत व्यापाऱ्यांद्वारेच व्यापाऱ्यांचा कचरा गोळा केला जाणार आहे. त्याचे व्यवस्थित वर्गीकरण कले जाईल व ओल्या व सुक्या कचऱ्यापासून खत व प्लास्टिकच्या कचऱ्यापासून बकेट तयार करण्यात येणार आहेत. यासाठी मोबाईल अॅप विकसित केला जाणार आहे.
महापालिकेद्वारे प्लास्टिक अथवा कचऱ्याबाबत फारशी जनजागृती केली जात नाही. अधिकारी फक्त दंड वसूल करण्याच्या नावाखाली किरकोळ व्यापाऱ्यांना त्रास देण्यात धन्यता मानतात. त्यातून व्यापाऱ्यांची आर्थिक लूट केली जाते. याचा त्रास व्यापाऱ्यांना होतो. राज्य सरकारने याची दखल घेतली नाही तर येत्या निवडणुकीत व्यापारी त्यांना मतदीन करण्याची शक्यता कमी आहे, असेही निवंगुणे यांनी सांगितले.